Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जिल्हा परिषद प्रशासनावर कर्मचाऱ्यांची नाराजी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषद प्रशासनाकडून कर्मचारी पदोन्नती, एखाद्या प्रकरणाबाबत निर्णय घेताना फाइलची वस्तुस्थिती जाणून न घेता दिले जाणारे आदेश यामुळे नाराजी पसरली आहे. काही कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना काही प्रकरणांत झालेल्या त्रुटी निदर्शनासही आणून दिल्या आहेत. यापुढे प्रशासनाकडून काय पावले उचलले जातात याकडे आता कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पवनीत कौर यांनी काही महिन्यांपूर्वी सूत्रे स्वीकारली. त्यांची सीईओ म्हणून ही पहिलीच पोस्टिंग आहे. जिल्हा परिषदेत रुजू झाल्यानंतर सुरवातीचे काही दिवस त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला. आश्वासित प्रगती योजनेंतर्गत विविध विभागातील कर्मचाऱ्यांना तीन ते पाच वर्षांपासून पदोन्नतीची प्रतीक्षा होती. ही प्रक्रिया कौर यांच्या पुढाकाराने पूर्ण झाली. त्यापूर्वी कर्मचारी पदोन्नतीमध्ये सरकारच्या अध्यादेशानुसार प्रक्रिया राबविली गेली, पण याठिकाणी प्रवर्गनिहाय अभ्यास न करता काही नियुक्ती चुकीच्या पद्धतीने दिल्या गेल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली. सेवाज्येष्ठता यादीत वरचा क्रमांक असूनही मुख्यालयाऐवजी अन्य ठिकाणी पोस्टिंग देण्याचेही प्रकार घडले. याबाबत सीईओ कौर यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करताना रोस्टर पाहिल्यानंतर काही गोष्टी प्रथमच सीईओंच्या निदर्शनास आल्याचे सूत्रांनी सांगितले.

\Bप्रस्ताव नियमानुसार तपासावेत\B

अन्य एका शिक्षण विभागातील प्रकरणात रितसर परवानगी असतानाही शिक्षकावर कारवाई प्रस्तावित केली गेली. कर्मचारी पदोन्नतीचा दुसरा टप्पाही लवकरच राबविला जाणार आहे. त्यात काही कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने पदोन्नती दिली जाण्याची शक्यता या सूत्रांनी वर्तविली. एकूणच या प्रकारावरून प्रशासनावर कर्मचाऱ्यांची नाराजी वाढली आहे. सीईओ पवनीत कौर यांनी विविध विभागातील अधिकाऱ्यांकडून आलेले प्रस्ताव नियमानुसार तपासले, तर कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, असे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोशल मीडियाने स्वास्थ्य हरपले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मुख्य प्रवाहातील माध्यमांना हिणकस वागणूक देऊन सत्ताधारी समांतर सोशल मीडियाद्वारे संवाद साधत आहेत. स्वत:ची मते लादण्यासाठी घटनात्मक चौकट नसलेल्या सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. या माध्यमातून बहुतांशी 'फेक न्यूज' बाहेर पडतात. झुंडीने हल्ला करण्याच्या घटनांनी ही माध्यमे सामाजिक स्वास्थ्य बिघडवत असल्याचे सिद्ध केले,' अशी टीका ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे यांनी केली. ते व्याख्यानात बोलत होते.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या ना. गो. नांदापूरकर व्याख्यानमालेचा रविवारी समारोप झाला. प्रा. डोळे यांनी 'प्रसार माध्यमे आणि सत्यासत्यतेचे भवितव्य' या विषयावर भाष्य केले. यावेळी व्यासपीठावर मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे उपस्थित होते.

'लोकशाहीव्यवस्था सामाजिक करारावर उभी असते. ही व्यवस्था मोडीत काढून आजची विचारसरणी सोशल मीडियाद्वारे हिंदूराष्ट्र निर्माण करीत आहे. या माध्यमाला पैसा आणि पाठबळ देऊन वारेमाप वापर सुरू झाला. गोबेल्स नीती वापरल्याने सामाजिक स्वास्थ्य हरपले. अर्थात, ट्रोलर्सची श्रीमंती वाढली आहे. ध्रुव राठी या तरुणाने यू-ट्यूब चॅनलद्वारे हे वास्तव उघड केले. एका ट्वीटसाठी ४० पैसे आणि वर्गवारीनुसार ५० ते २४ हजार रुपये दरमहा पगार घेणारे ट्रोलर्स सत्ताधाऱ्यांनी पोसले आहेत. सोशल मीडियाने सत्य आणि असत्य बातम्यांचा संभ्रम वाढवला आहे. भय व शंका तयार केली आहे. वर्तमानपत्रे बिनभिंतीची शाळा असतात. साध्या वाचकाला दोन रुपयात बरेच ज्ञान देतात. या माध्यमाला झिडकारत सत्ताधारी सोशल मीडिया वापरत आहेत. कारण, सोशल मीडियाचा कुणी प्रतिवाद करीत नाही. मुख्य माध्यमात व्यक्त झाल्यास शेकडो प्रश्न उपस्थित होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोयीच्या घटनांवर ट्विट करतात. पण, साडेचार वर्षात एकही पत्रकार परिषद घेत नाही. सोयीच्या पत्रकारांनाच मुलाखती देतात. कारण माध्यमांबाबत डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी यांच्या भूमिकेत साधर्म्य आहे,' असे प्रा. डोळे म्हणाले. या कार्यक्रमाला साहित्य रसिक उपस्थित होते.

\Bप्रशंसा मंडळे उगवली

\B'फेसबुक व व्हॉटसअॅप यांनी परस्पर प्रशंसा मंडळे तयार केली आहेत. या समविचारी, समदु:खी लोकांचा गट तयार होतो. जे आवडेल तेच फेसबुकवर फिरवतात. एकच विचार नेहमी-नेहमी लादल्याने तो सत्य असल्याचा भ्रम होऊन प्रतिवादापासून दूर पळतात. आपल्या जात, वर्ग, भाषिक समूहात राहायला आवडणाऱ्या लोकांनी सोशल मीडिया व्यापला आहे,' असे प्रा. डोळे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसासाठी भगवान झुलेलाल यांना प्रार्थना

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर व परिसरात सुमारे काही दिवसांपासून पावसाचा मोठा खंड आहे. त्यामुळे वरुणदेवतेला प्रसन्न करण्यासाठी सिंधी समाजाची इष्ट देवता भगवान श्री झुलेलाल यांची रविवारी (१२ ऑगस्ट) पूजा करून बहेराणा साहेब (मिरवणूक) काढण्यात आली.

सिंधी कॉलनी येथील आनंद दयालानी यांच्या घरी असलेल्या चांदीच्या मूर्तीची पूजा करून भक्तीभावे भजन, आरती केल्यानंतर सिंधी कॉलनी येथून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. सिंधी भवन येथे मिरवणूक आल्यानंतर आरती करण्यात आली. त्यानंतर पुन्हा मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत सिंधी समाजातील महिला, पुरुष, मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले. मिरवणुकीचे विसर्जन कंवर कुटिया येथे करण्यात आले.‌ यानंतर भंडारा आयोजित केला होता. यावेळी सिंधी पंचायत प्रमुख किशनचंद तनवाणी, झुलेलाल सेवा समितीचे संस्थापक राजू तनवाणी, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम इसराणी, सचिव भरत नेहलानी, सदस्य शंकर बजाज, देवानंद मदलाणी, प्रकाश किंगर, प्रकाश फुलवाणी, प्रदीप गुणवाणी, विनोद चोटलाणी, बाबू कारिया, महेश सेनानी, प्रदीप गुणवाणी, राजाराम चंदाणी, शंकरलाल गुणवाणी, कल्याणदास माटरा आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोंडअळी भरपाई वाटपाला ब्रेक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

शासनाने मराठवाड्याला दिलेल्या दुसऱ्या टप्प्यांतील ४०७ कोटी रुपयांच्या अनुदानाचे वाटप सुरू करण्यात आले असून, आतापर्यंत यातील ३६६ कोटी रुपये (७५ टक्के) अनुदानाचे वाटप पूर्ण झाले आहे. एकीकडे मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये भरपाई वाटपात वेग आला असताना औरंगाबाद जिल्ह्यात मात्र केवळ ४३ टक्के मदत वाटप झाली आहे.

मराठवाड्यातील तब्बल २६ लाख ९० हजार शेतकऱ्यांना १२२१ कोटी चार लाख रुपयांची आवश्यकता आहे. तीन टप्प्यांत देण्यात येणाऱ्या या मदतीचा ३२५ कोटी ६० लाखांचा पहिला हप्‍ता वाटप करण्यात आल्यानंतर आता ४०७ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता देण्यात आला आहे. सध्या मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये बोंडअळीच्या नुकसानभरपाईचे वाटप सुरू असून, औरंगाबादमध्ये मात्र मदत वाटपाला ब्रेक लागला असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत ३६६ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यांतील सर्वाधिक ९५ टक्‍के नुकसानभरपाईचे वाटप बीड जिल्ह्यात झाले असून, केवळ ४३ टक्के वाटप करून औरंगाबाद जिल्हा सर्वात पिछाडीवर आहे. शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोचवण्यास महसूल प्रशासन कासवगतीने हालचाल करत असल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या टप्प्यांत आलेली नुकसान भरपाई जिल्हा प्रशासनाकडून त्या-त्या तहसील कार्यालयांना वाटप करण्यात आला असून, गेल्या तीन आठवड्यांत औरंगाबाद जिल्ह्यात केवळ ४४ टक्के निधी वाटप झाला आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने सात ऑगस्टपासून पुकारलेल्या तीन दिवसांच्या संपात महसूल कर्मचारीही सहभागी झाल्याने वाटपामध्ये कासवगती आल्याचे बोलले जात आहे.

\Bमराठवाड्यातील भरपाई वाटप (दुसरा टप्पा)\B

जिल्हा..............रक्कम............... टक्केवारी

औरंगाबाद...........५२ कोटी १ लाख.......४३.८९

जालना...............७३ कोटी १८ लाख.......६६.४४

परभणी................५५ कोटी ८२ लाख........८८.३२

हिंगोली................१३ कोटी ७२ लाख.........९३.७७

नांदेड...................६७ कोटी २६ लाख.........९५.६१

बीड.................९८ कोटी १३ लाख............९५.६१

लातूर................१ कोटी २६ लाख.............३६.८३

उस्मानाबाद........५ कोटी २७ लाख..............९७.७७

एकूण...............३६६ ‌कोटी ६९ लाख..........७५.०८

औरंगाबाद जिल्ह्याची स्थिती

तालुका...............वाटपाची टक्केवारी

औरंगाबाद..............५५.१३

पैठण...................८८.०५

फुलंब्री.................१६.१५

वैजापूर................५.४०

गंगापूर...................००

खुलताबाद..............००

कन्नड..................९८.४९

सिल्लोड.................३४.७१

सोयगाव..................९९.९२

अपर तहसील..............००

एकूण.......................४३.८९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावणेपाच लाख लिटर पाणी चोरले

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेची मुख्य जलवाहिनी फोडून पावणेपाच लाख लिटर पाण्याची चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला. दहा जुलै ते दहा ऑगस्ट यादरम्यान मुकुंदवाडी एन-दोन, जे सेक्टर येथे हा प्रकार घडला.याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध चोरीचा; तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महापालिकेचे दुय्यम आवेक्षक माणिक दगडूजी गोरे यांनी तक्रार दिली आहे. यामध्ये मुकुंदवाडीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीतून पाण्याची गळती होत असल्याची माहिती गोरे यांना मिळाली होती. त्यांनी पाहणी केली असता या जलवाहिनीमधून अनाधिकृत नळ कनेक्शन घेण्यात आल्याचे दिसून आले. गेल्या महिन्याभरापासून हा प्रकार सुरू होता. यामध्ये महापालिकेची सहा हजार रुपये पाणीपट्टी भरेल असे पावणेपाच लाख लिटर पाणी चोरल्याचे दिसून आले; तसेच महापालिकेची जलवाहिनीचे फोडल्याने ५० हजार लिटर पाण्याचे देखील नुकसान करण्यात आले. याप्रकरणी संशयित आरोपी बाबुराव खरात, देवराव जोगदंड, गौतम जाधव; तसेच एका महिलेविरुद्ध चोरी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी जमादार काटकर तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी विभागात अपहार; चौकशी अहवाल सादर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रोख नोंदवही, व्हाउचर फाइलसह इतर कागदपत्रांमध्ये फेरफार करत कृषी विभागातील लेखापाल तथा वरिष्ठ लिपिकाने लाखोंचा अपहार केला आहे. याप्रकरणी खात्यांतर्गत चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे. पण, त्याआधारे दोषींवर कारवाई झाली का, या प्रश्नावर वरिष्ठ अधिकारी मूग गिळून गप्प आहेत.

कृषी विभागातील लेखापाल, वरिष्ठ लिपिक सुनील जाधव याने दोन घटनांत ६६ लाख १९ हजारांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. जाधव हा जून २०१२ ते जून २०१७ या कालावधीत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्थेत (आत्मा) लेखापाल वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत होता. या काळात त्याने रोख नोंदवही, बँक पासबुक, व्हाउचर फाइल तसेच इतर कागदपत्रांत फेरफार करत अपहार केला. तो जून २००५ पासून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होता. तेथे तो बँक खाते व लेखा विषयक कामकाज पाहत होता. तेथेही वरिष्ठांच्या बनावट सह्या, शिक्क्यांचा वापर करीत चेक बँकेतून वटवल्याचा आरोप आहे. आत्माचे प्रकल्प संचालक विलास रेणापूरकर यांच्या तक्रारीवरुन जाधव विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशाने आत्माचे संचालक एस. बी. खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली खातेनिहाय चौकशी नियुक्त करण्यात आली होती.

\B

चार कोटींचा अपहार?\B

हा अपहार सुमारे चार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे समजते. स्थानिक अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. त्याची प्रत पोलिसांकडे दिल्याचे सांगत अधिक भाष्य टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालगृहांमध्ये १८७ बालकांना आधार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात नियुक्त झालेल्या नवीन बालकल्याण समितीने प्रवेश प्रकिया सुरू केली असून दोन महिन्यांत बालगृहामध्ये १८७ प्रवेश देण्यात आले. नियमांच्या चौकटीत राहून प्रवेशप्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी कटीबद्ध आहोत, असे बालकल्याण समितीच्या अध्यक्ष अॅड्. ज्योती पत्की यांनी 'मटा'ला सांगितले.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ नुसार नवी बालकल्याण समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या सदस्यांत अॅड्. अनिता शिऊरकर, डॉ. मनोहर बन्सवाल व अश्विनी लखमले (पैठण) यांचा समावेश आहे. समितीचे एक पद अद्याप रिक्त आहे. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या प्रत्येक बालकाला कोणत्याही वेळी दाखल करून घेण्याची मुख्य जबाबदारी बाल कल्याण समितीवर आहे. नवीन समिती २५ एप्रिल रोजी स्थापन झाल्यानंतर मे मध्ये प्रशिक्षण देण्यात आले. त्यानवंतर समितीने प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. गेली दोन वर्षे काळजी व संरक्षणाची गरज कुणाला या मुद्द्यावरून शासन, महिला व बालविकास विभाग यांच्याविरूद्ध संस्थाचालक असा वाद झडला. राज्यातील बालकल्याण समित्यांच्या नियुक्त्या काही वर्षे रखडल्या होत्या.

\Bमे ते जुलैपर्यंत समितीने दिलेले प्रवेश\B

९९ मुले

८८ मुली

---

\Bगृहचौकशी अहवाल\B

१४५

कुटुंब ही प्रत्येक बालकाचा प्रथम निवारा व हक्क आहे. सर्व पर्याय संपल्यानंतर बालगृहाचा विचार असतो. आम्ही नियमांच्या आधारे बालगृहात प्रवेश देत आहोत. मुलांवर अन्याय न होता त्यांना सुरक्षित वातावरण देण्याचे काम सुरू आहे. एखाद्या मुलाला प्रवेश का नाकारला गेला याचीही स्वतंत्र नोंद तपशीलवार ठेवली आहे.

-अॅड्. ज्योती पत्की, अध्यक्ष, बालकल्याण समिती

अनाथ, एकल पालक, भिकारी, परित्यक्ता, कैदी आदींच्या मुलांची काळजी, संरक्षण, संगोपन व पुनर्वसनासाठी समितीचे काम करते. नियमांची काटेकोर अंमलबजावणी करूनच बालगृहात प्रवेश मिळत आहे. कागदपत्रांची पूर्तता, छाननी, गृहचौकशी अहवाल, समितीचे टिपण तपासून समिती प्रवेशप्रक्रिया करत आहे.

-अॅड्. अनिता शिऊरकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक धोरणामुळे उद्रेक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कमवा व शिका योजना', अर्धवेळ नोकरी किंवा सुटीत पूर्णवेळ काम करून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, उच्च शिक्षणाचे शुल्क आवाक्याबाहेर असल्यामुळे अनेकांनी शिक्षण अर्ध्यातच सोडले. 'ईबीसी' सवलतीची योग्य प्रकारे अंमलबजावणी नसल्यामु‌ळे विद्यार्थ्यांत प्रचंड खदखद आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात विद्यार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग शैक्षणिक धोरणाच्या विरोधात दिसला.

मराठा क्रांती मोर्चात १८ ते २५ या वयोगटातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सर्वाधिक सहभाग आहे. 'महाराष्ट्र बंद'मध्ये बहुसंख्य विद्यार्थी रस्त्यावर उतरले. शिक्षण आणि नोकरीत आरक्षण द्या, अशी विद्यार्थ्याची एकमुखी मागणी आहे. वाढत्या शैक्षणिक शुल्काची झळ मराठवाड्यातील गरीब विद्यार्थ्यांना बसली आहे. हा संताप विद्यार्थ्यांनी मराठा मोर्चात मांडला. सधन जात अशी मराठा समाजाची एकसुरी प्रतिमा आहे. उलट अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, हमाल, रिक्षाचालक, औद्योगिक कामगार अशा अनेक वर्गात बहुसंख्य मराठा आहेत. या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिकणे कठीण झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शेकडो विद्यार्थी दररोज 'कमवा व शिका' योजनेत काम करतात. या कामातून किमान जेवणाचा खर्च काढण्याची त्यांची धडपड असते. मात्र, शैक्षणिक शुल्क, साहित्य खरेदी आणि दैनंदिन खर्च भागवणेसुद्धा शक्य नसते. त्यामुळे दवाखाना, मेडिकल स्टोअर, कापड दुकानात अर्धवेळ नोकरी करतात. उन्हाळ्याच्या सुटीत वेगवेगळी कामे करून पुढील वर्षाचा खर्च भागवतात. कष्ट करण्यासाठी नकार नाही, पण शैक्षणिक शुल्कातील तफावत संतापजनक आहे. शैक्षणिक आरक्षण नसल्यामुळे भरमसाठ शुल्क भरणे शक्य नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

अभियांत्रिकी शाखेची पात्रता असूनही शेकडो विद्यार्थी नाईलाजाने बीएसस्सी करीत आहेत. उच्च शिक्षण दिवसेंदिवस कठीण झाल्यामुळे मराठा आंदोलनातून विद्यार्थ्यांचा उद्रेक बाहेर पडत आहे. मराठवाड्यात शेतीची बिकट अवस्था झाली असून, औद्योगिक विकासाअभावी रोजगार नाही. यातूनच हिंगोली, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक उद्रेक आहे. औरंगाबाद शहरातील आंदोलनातही या जिल्ह्यातून स्थलांतरित झालेल्या मराठा विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या होती. गोखले इन्स्टिट्यूट, छत्रपती शिवाजी प्रबोधिनी या संस्थांच्या सर्वेक्षणातून मराठा समाजाच्या आर्थिक दूरवस्थेचे निष्कर्ष समोर आले आहेत. सद्यस्थितीत अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक कुटुंबातील तरुणांच्या हाती मराठा आरक्षण आंदोलन एकवटले आहे.

\Bअध्यादेशावर श्वेतपत्रिका काढा

\Bविद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्यांची संख्या कमी असल्याचे मान्य असूनही दृश्य फायदे गरजेचे वाटतात. आरक्षणामुळे मिळणारी वयोमर्यादा, परीक्षेची संख्या आणि पदोन्नतीतील सवलत महत्त्वाची वाटते. २३ मार्च १९९४ रोजी राज्य शासनाने मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी अध्यादेश काढला. नोकरीच्या आरक्षणासाठी हा अध्यादेश असताना शैक्षणिक आरक्षणाचा मुद्दा घालण्यात आला. केंद्र सरकारने शैक्षणिक आरक्षण २००८ यावर्षी लागू केले असताना राज्यात १९९४ मध्ये कसे लागू झाले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. घटनेचे उल्लंघन करणाऱ्या अध्यादेशावर सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी जोर धरीत आहे. हा शासन निर्णय म्हणजे ओबीसी आरक्षणातील घटनात्मक भ्रष्टाचार व जातीय राजकारणाचे एक विघातक उदाहरण असल्याची टीका झाली आहे.

\Bशासकीय योजनांच्या मर्यादा

\Bआर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (ईबीसी) विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, निर्णयाची अंमलबजावणी करण्यास महाविद्यालयांनी नकार देत पूर्ण शुल्क वसूल केले. सरकारी यंत्रणा महाविद्यालयांवर कारवाई करीत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, सारथी योजना, मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वसतिगृह अशा योजनांची वारंवार घोषणा झाली. पुरेसा निधी आणि अंमलबजा‌वणी नसल्याने या योजना फक्त कागदी घोडे ठरल्या आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना थोपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, उद्रेकाचे मूळ कारण शैक्षणिक धोरणात दडल्याचे दिसत आहे.

मागील पंधरा वर्षात शेतीची प्रचंड वाताहत झाली. खासगी नोकरीसाठी गुणवत्तायुक्त शिक्षण घेणे सामान्य मराठा विद्यार्थ्यांना शक्य नाही. इतर वर्गाला शैक्षणिक आरक्षण असताना आपण वंचित असल्याची भावना उद्रेकाचे कारण ठरत आहे.

- डॉ. बाळासाहेब सराटे, आरक्षण अभ्यासक

आरक्षणाच्या प्रश्नावर मुले-मुली रस्त्यावर उतरत आहेत. सरकारने सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आरक्षण देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे. मागासवर्ग आयोगाने तातडीने अहवाल तयार करावा.

- स्वाती शेजूळ, विद्यार्थिनी, बीएसस्सी

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व ईबीसी शिष्यवृत्ती लागू करण्याचे आश्वासन दिले. मात्र, निर्णयाची पुरेशी अंमलबजावणी झाली नाही. गरिबीमुळे शेकडो विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकत नाही.

- धनश्री शिंदे, विद्यार्थिनी

आमचा विरोध सरकारला नसून आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आहे. आतापर्यंत महत्त्वाच्या निर्णयासाठी घटनादुरुस्ती झाली. आता मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करा.

- अमोल कर्डिले, विद्यार्थी

मराठवाड्यात विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे. विद्यापीठात किंवा महाविद्यालयात पाहणी केल्यास बिकट वास्तव कळेल. मराठा मोर्चाची सरकार दखल घेत नसल्याने संताप वाढला आहे.

- प्रकाश गायकवाड, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन महिन्यांपासून सिग्नल तुटलेलेच

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाळूज आणि पैठण लिंकरोडवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी लावलेले सिग्नल दोन महिन्यांपूर्वी एका अपघातात तुटले आहेत. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या वाहनांची अडचण होत आहे. सिग्नल यंत्रणाच बंद पडल्याने याठिकाणी कार्यरत वाहतूक पोलिसांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

छावणी ते वाळूज रस्त्यावर ए. एस. क्लबजवळ पैठण लिंक रोड जोडला गेला आहे. मुंबई, पुण्याहून येणारी व जाणारी जडवाहतूक या रस्त्यावरून वळविली जाते. या चौकात उत्तरेकडील बाजूला असलेले सिग्नल दोन महिन्यांपूर्वी एका अपघातात तुटले. त्याची अद्याप दुरुस्ती केलेली नाही. एक खांब तुटल्यामुळे संपूर्ण यंत्रणाच बंद पडली आहे. त्यामुळे वाळूज ते छावणी, छावणी ते वाळूज आणि लिंक रोड ते शिर्डी रस्ता या रस्त्यावरील वाहनांना सिग्नल सुरू आहे की नाही याचा नेमका अंदाज येत नाही. भरधाव येणारी वाहने चौकात थांबतात. चारही बाजूची वाहने एकाच वेळी थांबल्याने नेमके कुठले सिग्नल सुरू आहे याचा अंदाज येत नाही. चौकातील वाहतूक पोलिसांना विचारणा करून मग हळूहळू वाहतूक पुढे सरकते. एकाच वेळी दोन बाजूंनी वाहने पुढे सरकली की वाहतुकीची कोंडी होते. वाहनांची फारशी गर्दी नसतानाही कधी कधी कोंडीचा सामना करावा लागतो. तुटलेले सिग्नल कधी दुरुस्त होणार?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात दोन लाख तरुण बेरोजगार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून गेल्या महिन्यात नोकरी मिळावी, यासाठी साडेचार हजारांवर तरुणांनी शासनाच्या महास्वंयम् संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. जिल्ह्यात आजघडीला दोन लाखांवर नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. यात पदवीधर आणि पदव्युत्तरसह अभियांत्रिकी, व्यवस्थापन आदी अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात शेंद्रा, चिकलठाणा, वाळूज, पैठण, रेल्वे स्टेशन, आदी औद्योगिक क्षेत्र आहेत. मात्र जिल्ह्यातील बहुतांश भूमिपूत्रांना नोकरीसाठी वणवण फिरावे लागत आहे. त्यातच कंत्राटी पद्धती रुढ झाल्यामुळे कायमस्वरुपी रोजगारांच्या संधी हिरावून घेतल्या जात आहेत. तसेच नोकरीच्या संधी कमी आणि वाढती स्पर्धा यामुळे हा प्रश्न अधिकच बिकट होत चालला आहे. नोकरी मिळेल, याआशेपोटी येथील रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्रात आतापर्यंत तब्बल दोन लाख ११ हजार ७५३ बेरोजगारांनी नोंदणी केली आहे. यात उच्चशिक्षितांची संख्या लक्षणीय आहे. दहावी पास झालेल्या ४४ हजार, तर बारावी पास झालेल्या ३८ हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सूत्रांनी सांगितले. आयआयटी तसेच डिप्लोमा करणाऱ्या अनुक्रमे दोन हजार ३५४ आणि चार हजार २७० जणांनीही नोकरीकरिता नोंदणी केली आहे. कला, वाणिज्य, विज्ञान आदी शाखेची पदवी मिळविणारे २० हजारांहून अधिक तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.

तीन हजारापेक्षा जास्त अभियांत्रिकी पदवीधारकांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहेत. अभियांत्रिकी पदव्युत्तरांची संख्या १२७ आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेले १४६ तरुणांनाही चांगल्या नोकरीची अपेक्षा बागळून केंद्रात नोंदणी केली आहे.

कला, वाणिज्य तसेच विज्ञान शाखेतून पदव्युत्तर झालेले तीन हजार ५२६ जणांनी नोकरी, रोजगाराची चांगली संधी मिळ‌ावी, यासाठी नोंदणी केली आहे. व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतलेले १२०, कायदा पदवीधारक ९० तरुण याच प्रतीक्षेत आहेत. यासह कृषी, विविध डिप्लोमा शेकडो युवक, युवतींनी नोंदणी केली आहे.

रोजगार मेळावा, महास्वंयम् संकेतस्थळ, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम आदी माध्यमातून बेरोजगारांना नामांकित कंपनीत रोजगाराची संधी मिळावी, यासाठी केंद्रातर्फे प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांना विविध कौशल्य आत्मसात व्हावे, यासाठी प्रयत्न केले जातात. या आणि इतर माध्यमातून २०१६ ते आतापर्यंत २० हजार ७९० जणांना रोजगाराच्या संधी मिळाल्याचे केंद्राचे सहाय्यक संचालक एन. एन. सूर्यवंशी यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

\Bबेरोजगारांची संख्या \B

दहावी उत्तीर्ण ४४,०००

बारावी उत्तीर्ण ३८,०००

आयआयटी २,३५४

डिप्लोमाधारक ४,२७०

पदवीधारक २०,०००

अभियांत्रिकी ३,१२७

व्यवस्थापन १२०

कायदा ९०

वैद्यकीय १४६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रोझोनच्या लॉन्सवर उद्या रिटेलर्स अवॉर्ड्स सोहळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खरेदीची परिभाषा बदलणाऱ्या प्रोझोन मॉलच्या लॉन्सवर स्वातंत्र्यदिनानिमित्त रिटेलर्स अवॉर्ड्स सोहळा रंगणार आहे. यंदा अवॉर्ड्सचे तिसरे वर्ष असून या प्रेरणादायी उपक्रमात टाइम्स ग्रुपचा देखील सहभाग राहणार आहे. १५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता प्रोझोनच्या लॉन्सवर मान्यवरांच्या उपस्थितीत झेंडा वंदन करण्यात येईल. त्यापूर्वी विविध शाळांचे विद्यार्थी रॉक बँड आणि नृत्य सादर करतील. याशिवाय विविध स्थानिक कलावंत विद्यार्थ्यांसह राष्ट्रभक्तीपर गाणी सादर करणार आहेत, असे प्रोझोनचे सेंटर हेड मोहम्मद अर्शद यांनी सांगितले.

चोखंदळ ग्राहक मनपसंद खरेदीसाठी याठिकाणी येत आहे. लहान मुलांपासून युवा वर्गा, प्रौढ अशा सर्व वयोगटाला प्रोझोनला प्राधान्य देण्यात आल्याचे पाहायला मिळते. केवळ औरंगाबादच नव्हे तर मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहक येथे खरेदी तसेच मनोरंजनाचा आनंद घेतात. ब्रँडेड वस्तू खरेदीसाठी तरुणाईचे अतिशय लोकप्रिय ठिकाण म्हणून प्रोझोन मॉल ओळखले जाते. येथे फिल्म फेस्टिवल, रास दांडिया, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन, महाराष्ट्रदिन, जलसंवर्धन महाथॉन, गुढीपाडवा, दसरा-दिवाळी, ईद, ख्रिसमस, रक्तदान शिबिर, विविध प्रदर्शने आदी उपक्रम साजरे केले जातात.

प्रशस्त पार्किंग, नामांकित रिटेल ब्रँड्स, फूड कोर्ट, एंटरटेनमेंट झोन, प्ले पार्क, अशा कितीतरी गोष्टी एकाच छताखाली प्रोझोनच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. याठिकाणी आजवर विविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खरेदी, मनोरंजन, चोखंदळ खाद्यपदार्थांसाठी सर्व वयोगटाचे आकर्षण ठरलेल्या प्रोझोनमध्ये नियमितपणे ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून उपक्रम राबविण्यात येतात. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रोझोनचे सेंटर हेड मोहम्मद अर्शद यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट नोटा चलनात आणणारा पसार आरोपी चार वर्षानंतर जेरबंद

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील पसार आरोपीला चार वर्षानंतर गुन्हे शाखेने अटक केली. शनिवारी राजनगर, मुकुंदवाडी भागात ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी या आरोपीच्या पाच साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

३१ मार्च २०१५ रोजी गुलमंडी भागात बनावट नोटा चलनात आणणारा आरोपी सय्यद मोहसीन सय्यद मीर (रा. जालना) याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्याच्या ताब्यातून हजार व पाचशेच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, तपासामध्ये पोलिसांनी मोहसीनचे साथीदार शेख बशीर पाशा, शेख चांद शेख रसूल, देवचंद निमरोट व भीमराव झिने यांना अटक केली होती. मात्र, त्यांचा आणखी एक साथीदार बलराम उर्फ करण उर्फ पप्पू सुरेशसिंग (वय २९ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. राजनगर, मुकुंदवाडी) हा पसार झाला होता. शनिवारी गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी बलराम हा राजनगर भागात आला असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून आरोपी बलरामला अटक केली. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, पीएसआय विजय जाधव, नसीमखान, धुमाळ, समद पठाण, सुरेश काळवणे, विजयानंद गवळी, रमेश भालेराव, संदीप बीडकर, भावलाल चव्हाण आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा : कलेक्शन, ट्रान्सपोर्टेशनच्या निविदेला प्रतिसाद नाही

0
0

आता कंत्राटदारांशी थेट संवाद

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचऱ्याच्या कलेक्शन आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी महापालिकेने काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन वेळेस निविदा काढल्यावरही कोणत्याच कंत्राटदाराने निविदा भरली नाही. त्यामुळे देशभरातील प्रमुख कंत्राटदारांशी संवाद साधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मशीन्स खरेदीची निविदा महापालिकेने काढली. नऊ झोन कार्यालयात प्रत्येकी तीन या प्रमाणे २७ मशीन्स खरेदी करण्याच्या निविदेला मान्यता मिळाल्यावर मशीन्सचा पुरवठा करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आले. संनियंत्रण समितीने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी चार जागा निश्चित केल्या आहेत. त्यापैकी पडेगाव, चिकलठाणा आणि हर्सूल - सावंगी या जागेवर प्रत्येकी १५० मेट्रिक टन क्षमतेचे मशीन बसवण्यात येणार आहे. या मशीन खरेदीचे कार्यादेश देखील महापालिकेने दिले आहेत. कांचनवाडी येथे कचऱ्यापासून सीएनजी गॅसची निर्मिती करण्यात येणार असून त्याचीही निविदा पालिकेने काढली आहे.

मशीन्स खरेदीची प्रक्रिया पूर्ण होतानाच कचऱ्याचे संकलन व वाहतूक (कलेक्शन अॅण्ड ट्रा्न्सपोर्टेशन) करण्यासाठी कंत्राटदार नियुक्त केला जाणार आहे. यासाठी महापालिकेने दोन वेळा निविदा काढली. दोन्हीही वेळ प्रतिसाद मिळाला नाही. एकाही कंत्राटदाराने निविदा भरली नाही. त्यामुळे कलेक्शन आणि ट्रांसपोर्टेशनच्या क्षेत्रात देशपातळ‌ीवर काम करणाऱ्या कंत्राटदारांशी थेट चर्चा करण्याचे महापालिकेने ठरविले आहे, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. कलेक्शन आणि ट्रान्सपोर्टेशनची निविदा काढल्यावर प्री बीड बैठक घेण्यात आली. या बैठकीत इच्छुक कंत्राटदारांनी काही अटी टाकल्या होत्या. महापालिकेने ३५० वाहनांची अट निविदेत टाकली आहे. ही अट शिथिल करा अशी इच्छुक कंत्राटदारांची मागणी होती. रोज ४५० टन कचरा उचलण्याचा अनुभव कंत्राटदाराला असावा अशी अट निविदेत आहे. ४५० टन ऐवजी २०० टनाची अट ठेवा अशी कंत्राटदारांची मागणी होती. वार्षिक उलाढालीबद्दलच्या अटीलाही कंत्राटदारांचा आक्षेप होता. त्यामुळे या तीन मुद्यांच्या आधारे इच्छुक कंत्राटदारांशी थेट संवाद साधून ट्रान्सपोर्टेशन आणि कलेक्शनच्या निविदेबद्दल निर्णय घेतला जाणार आहे.

१५ ऑगस्टचा मुहूर्त टळणार

नऊ झोन कार्यालयाच्या क्षेत्रात बसवावयाच्या २७ मशीन्सपैकी १२ मशीन्स १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर मिळाव्यात आणि या मशीन्स पडेगाव, चिकलठाणा, हर्सुल - सावंगी व कांचनवाडी येथे बसवण्यात याव्यात असा प्रयत्न पालिकेतर्फे केला जात होता, परंतु पुरवठादाराकडून मशीन्स प्राप्त होण्यास आणखीन १५ दिवस लागण्याची शक्यता असल्यामुळे १५ ऑगस्टचा मुहूर्त टळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वात मोठा तिरंगा उद्या फडकणार

0
0

औरंगाबाद: स्वातंत्र्यदिनी देशातील सर्वात मोठा तिरंगा फडकावण्यासाठी गिर्यारोहक सज्ज झाले आहेत. लातूर येथील ट्रेक डायरीजचे गिर्यारोहक दीपक कोनाळे व एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या ३६० एक्सप्लोरर ग्रुपतर्फे गिरीप्रेमींसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर कळसूबाई शिखरावर ६२ फूट लांब तिरंगा नेण्यात येणार आहे. या विक्रमाची नोंद करण्याची तयारी सुरू असून औरंगाबाद, पुणे, लातूर, मुंबई, अहमदनगर येथील गिरीप्रेमी, गिर्यारोहक मोहिमेत सहभागी होणार आहेत. हे ट्रेकर १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी आपल्याला शहरातून निघून अहनगरनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शिखराच्या पायथ्याला असलेल्या बारी येथे पोहोचतील. चढाईला १५ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता सुरुवात होईल. त्यानंतर शिखर माथ्यावर तिरंगा फडकावण्यात येईल. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी राज घोगरे, दीपक कोलते, संदेश कदम, अमित ससाणे, कल्पेश शिंदे यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगावर कार घालून जीवघेणा हल्ला; दोघांना अटक, कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कंत्राटदाराच्या अंगावर कार घालून जीवघेणा हल्ला करणारे आरोपी रामदास उर्फ रामभाऊ बालाजी ढगे व आरोपी संकेत कृष्णा नेवगे यांना रविवारी (१२ ऑगस्ट) रात्री अटक करुन सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांना गुरुवारपर्यंत (१६ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. एम. चव्हाण यांनी दिले.

या प्रकरणी बाबू सखाराम इखारे (५५, रा. कैलासनगर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी व आरोपी हे कंत्राटदार असून फिर्यादीचा व्यवसाय आरोपींपेक्षा जास्त चालतो, या कारणावरुन फिर्यादी व आरोपींमध्ये वादावादी होत होती. २ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शेंद्रा एमआयडीसी परिसरात आरोपी फिर्यादीला कारमध्ये घेऊन चर्चा करीत होते. त्यानंतर फिर्यादीला कारमधुन खाली उतरवून आरोपींनी फिर्यादीच्या अंगावर कार घातली व जीवघेणा हल्ला केला. यात फिर्यादी गंभीर जखमी झाला होता व फिर्यादीच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध भादंवि ३०७ कलमान्वये करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात आरोपी रामदास उर्फ रामभाऊ बालाजी ढगे (४७, रा. ब्रिजवाडी, एमआयडीसी चिकलठाणा) व आरोपी संकेत कृष्णा नेवगे (२५, रा. मूर्तिजापूर, म्हाडा कॉलनी) यांना रविवारी रात्री अटक करुन सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, प्रकरण गंभीर असून सखोल तपास करणे व आरोपींची कार जप्त करणेही बाकी आहे. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील शोभा विजयसेनानी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपींना गुरुवारपर्यंत (१६ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युवकावर युवकाचा लैंगिक अत्याचार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

युवकावर लैंगिक अत्याचार करणारा आणि लैंगिक कृत्याचा व्हिडिओ काढून बदनामी करण्याची धमकी देत सहा महिने वारंवार अत्याचार करणारा आरोपी सूरज उर्फ बाबासाहेब खंडुजी मक्कासरे याला अटक करुन सोमवारी (१३ ऑगस्ट) कोर्टात हजर करण्यात आले असता, त्याला गुरुवारपर्यंत (१६ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी दिले.

मुळचा वैजापूर तालुक्यातील व सध्या शहरात राहणाऱ्या २० वर्षीय युवकाने रविवारी मध्यरात्री फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा पोलिस खात्यामध्ये भरती होण्यासाठी शहरात आला होता व त्याची तयारी करीत होता. त्याचाच भाग म्हणून तो एमएस-सीआयटी कोर्स करीत होता. हा कोर्स करीत असताना फिर्यादीची ओळख आरोपी सूरज उर्फ बाबासाहेब खंडुजी मक्कासरे (२२, रा. सिडको एन सात, आंबेडकरनगर) याच्याशी झाली होती. दोघांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये झाले होते व आरोपी फिर्यादीला अनेकदा पैसे देण्याचा प्रयत्न करीत होता; पण फिर्यादीने नकार दिला होता. दरम्यान, आरोपीने फिर्यादीला फेब्रुवारी महिन्यात त्याच्या घरी बोलावले होते व त्यावेळी आरोपीने फिर्यादीवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला होता आणि त्याचे व्हिडिओ शुटिंगही आरोपीने केले होते. त्यानंतर बदनामी करण्याची धमकी देत तब्बल सहा महिने त्याच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार फिर्यादीने दिली. त्यावरुन आरोपीविरुद्ध भादंवि ३७७, ३२३, ५०६ कलमान्वये सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, त्याला गुरुवारपर्यंत (१६ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले. सहाय्यक सरकारी वकील एन. ए. ताडेवाड यांनी काम पाहिले.

रविवारी मध्यरात्री प्रकार उघड

आरोपीने फिर्यादी युवकाला रविवारी (१२ ऑगस्ट) मध्यरात्री गरवारे स्टेडियम परिसरात बोलावले होते व अत्याचार करीत असताना पीडित युवकाच्या आवाजामुळे गस्त घालणाऱ्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला घटनास्थळीच अटक केली. त्यानंतर युवकाने दिलेल्या तक्रारीवरुन सोमवारी गुन्हा दाखल झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध मागण्यांसाठी छावणीमध्ये उपोषण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल दोन हजार पटींनी छावणीतील घरांचा कर वाढवल्याचा आरोप करीत वारंवार मागण्या करुनही कर कमी करण्याची तयारी प्रशासनाने दाखविलेली नाही. तसेच १९७१ च्या युद्धामध्ये शहीद झालेले छावणीचे रहिवासी गोपाल हिनवर यांचे नाव चौकाला देण्याच्या मागणीकडेही दुर्लक्ष करण्यात आले. छावणी परिषदेच्या रुग्णालयाची ओपीडी दुपारी सुरू करण्याच्या मागणीलाही वाटाण्याच्या अक्षता दाखवल्याचा आरोप करीत छावणीतील रहिवासी विरेंद्र गायकवाड व माजी सैनिक मिर्झा आजम बेगद यांनी सोमवारपासून (१३ ऑगस्ट) बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

छावणी परिषदेच्या रुग्णालयाच्या ओपीडीची वेळ ही सकाळी ८ ते १२ अशी आहे. मात्र छावणीत मोठ्या प्रमाणावर असलेली गोरगरीब जनता व रुग्णसंख्या पाहता दुपारी ४ ते ७ या वेळेतही ओपीडी सुरू राहावी, अशी आमची मागणी आहे. मात्र प्रधान संचालक (पुणे) यांनी आदेश देऊनही दुपारची ओपीडी सुरू करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे छावणी परिषदेने घराचा कर अचानक तब्बल दोन हजार पटींपर्यंत वाढवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कुठलीही पाहणी, मोजणी, पडताळणी न करता अतार्किक पद्धतीने ही करवाढ करण्यात आली आहे. २०१६ पर्यंत अनेक रहिवाशांना ३५ ते ७० रुपयांपर्यंत असलेला घराचा कर चक्क चार ते साडेचार हजारांपुढे गेला आहे. हा कर कमी करण्यासाठी वारंवार निवेदने देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच १९७१ मध्ये शहीद झालेले छावणीचे रहिवासी गोपाल हिनवर यांचे नाव छावणीच्या एखाद्या चौकाला देण्यात यावे, अशीही मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नायर यांच्याकडे वारंवार केली. मात्र त्याकडेही परिषदेने दुर्लक्ष केल्यामुळेच परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केल्याचे विरेंद्र गायकवाड म्हणाले. मात्र सोमवारी दिवसभर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोणतेही आश्वासन दिले नाही, असेही गायकवाड यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

...तर वीर माता करणार उपोषण

कुठल्याच मागण्या पूर्ण न केल्यामुळे आणि चौकाला शहीद जवान गोपाल हिनवर यांचे नाव न दिल्यामुळेच ७५ वर्षीय वीर माता कमलादेवी गोपान हिनवर या मंगळवारपासून (१४ ऑगस्ट) उपोषणात सहभागी होणार आहेत. जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच राहील, असेही उपोषणकर्त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीपत्नीवर प्राणघातक हल्ला करणारे कुख्यात गुन्हेगार पसार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणावरून कुख्यात गुंडांनी पतीपत्नीवर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. रविवारी रात्री साडेनऊ वाजता किराडपुरा भागात हा थरारक प्रकार घडला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपी पसार झाले आहेत.

किराडपुरा परिसरात अन्वरखान (वय २५) हा तरुण कुटुंबासह राहतो. दोन महिन्यांपूर्वी पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार शेख इरशाद शेख इब्राहीम याने अन्वर खानवर प्राणघातक हल्ला केला होता. दारू पिण्यासाठी पैसे दिले नसल्याने हा प्रकार घडला होता. या प्रकरणी अन्वर खान याच्या तक्रारीवरून शेख इरशाद विरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या गोष्टीचा राग मनात धरून रविवारी रात्री शेख इरशाद, शेख एजाज, मच्छीदादा, बाबर, शेरू, साजीद व इतर साथीदारांनी अन्वरखानचे घर गाठले. त्याच्यावर व त्याची पत्नी मुस्कान खान हिच्यावर तलवार व हॉकी स्टिकने प्राणघातक हल्ला करण्यात आला. तसेच हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेले अन्वर खानचा भाचा मजहर खान, आई, परवीन बेगम, मामा जफर खान यांच्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करीत प्रचंड दहशत पसरवली. जिन्सी पेालिसांना हा प्रकार माहित होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून आरोपी पसार झाले. दरम्यान याप्रकरणी आरोपीविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एपीआय शरद जोगदंड याप्रकरणी तपास करीत आहेत.

चौकट

आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्याला यापूर्वी देखील अटक करण्यात आली होती. पसार आरोपीच्या शोधासाठी जिन्सी पोलिसांसोबतच गुन्हेशाखेचे एक पथक देखील रवाना करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरेफ कॉलनी कचरामुक्त वॉर्ड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

येत्या १६ ऑगस्ट रोजी कचराकोंडीला सहा महिने पूर्ण होत असताना शहरातील ११५ वॉर्डांपैकी आरेफ कॉलनी (वॉर्ड क्रमांक १९) कचरामुक्त वॉर्ड (नो ओपन वेस्ट) म्हणून जाहीर करण्यात आला आहे. आता यानंतर कचरामुक्तीची मोहीम गणेशकॉलनी वॉर्डात राबविली जाणार आहे.

आरेफ कॉलनी वॉर्डात नागरिकांनी आपपाल्या घरी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती सुरू केली आहे. त्यामुळे रस्त्यावर येणारा कचरा बंद झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून हा वॉर्ड कचरामुक्त झाला आहे. सोमवारी या वॉर्डात नागरिकांनी फेरी काढून आनंदोत्सव साजरा केला. यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी हा वॉर्ड कचरामुक्त वॉर्ड म्हणून जाहीर केला. फिडबॅक फाउंडेशनने आरेफ कॉलनी भागात जनजागृती केली. त्याता परिणाम म्हणून हा वॉर्ड कचरामुक्त म्हणून जाहीर करण्यात आला. प्रगती कॉलनी, जलाल कॉलनी हा भाग यापूर्वीच कचरामुक्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे. आरेफ कॉलनी वॉर्ड कचरामुक्त व्हावा यासाठी या वॉर्डाचे नगरसेवक व पालिकेचे विरोधी पक्षनेते जमीर कादरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

आता या वॉर्डात सुमारे अर्धा एकर क्षेत्रावर सॅनिटेशन पार्क केले जाणार आहे. वॉर्डातून रोज निघणाऱ्या सुमारे चार टन कचऱ्यावर या पार्कमध्ये प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी दिली. आरेफ कॉलनीच्या नंतर आता गणेश कॉलनी वॉर्डावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. हा वॉर्ड देखील येत्या काही महिन्यात कचरामुक्त व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

नगरसेविका इंदूर दौऱ्यावर

इंदूर येथील घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाचा अभ्यास करण्यासाठी २५ नगरसेविकांचा गट रविवारी रात्री इंदूरला रवाना झाला. ११ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत इंदूर दौऱ्याची मागणी नगरसेविकांनी केली होती. त्यानुसार त्यांना रविवारी इंदूरला रवाना करण्यात आले. महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी त्यांना निरोप दिला. दोन दिवसाचा अभ्यास दौरा करून मंगळवारी रात्री सर्व नगरसेविका औरंगाबादला परतणार आहेत.

दोन दिवस स्वच्छता मोहीम

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महापालिकेतर्फे मंगळवार, बुधवार असे दोन दिवस शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, खुल्या व सार्वजनिक जागा या ठिकाणी प्रामुख्याने ही मोहीम राबवली जाणार आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हतनूर येथे चक्का जाम

0
0

कन्नड : धनगर समाजासाठी अनुसूचित जमातीच्या (एसटी) सवलतींची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी हतनूर (ता. कन्नड) येथे औरंगाबाद-धुळे महामार्गावर सुमारे दीड तास चक्का जाम व रस्त्याच्या बाजूला तासभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूने सुमारे तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा होत्या.

हतनूर गावातून सकाळी साडेनऊ वाजता फेरी काढण्यात येऊन बस थांब्यावर महामार्गाच्या बाजूला सुमारे तासभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यानतंर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी ११पासून साडेबारापर्यंत 'चक्का जाम' आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार हर्षवर्धन जाधव, माजी आमदार नितिन पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांची भाषणे केली. यावेळी युवकांच्या आत्महत्येबाबत समुपदेशन करून आत्महत्या न करण्याची शपथ घेण्यात आली. माजी आमदार नितिन पाटील यांनी मराठा, धनगर व कोळी समाजाच्या आरक्षणाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेश गुजराणे, पंचायत समिती सदस्य किशोर पवार, रुईखेडा सरपंच नितीन सुसलादे, प्रभाकर सुसलादे, सतीश खेडकर, आप्पासाहेब काळे, बाळू कोतकर, बाळू जोशी, कैलास अकोलकर, नवनाथ लवंगे आदींची यावेळी उपस्थिती होती. उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू, पोलिस निरीक्षक सिद्धार्थ गाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शेख हुसेन शेख चांद यांनी बंदोबस्त ठेवला होता. महसूल प्रशासनाच्या वतीने शेख हारूण यांनी निवेदन स्वीकारले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images