Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

धनगर समाजाचा उद्या राज्यव्यापी मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आतापर्यंत प्रत्येक सरकारने धनगर समाजाचे आम्हीच तारणहार आहोत, असे दाखविण्याचा प्रयत्न करून फसवणूक केली आहे. खोटा धनगड उभा करून धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याऐवजी तो सुटूच नये या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आता धनगड दाखवा अन्यथा एस. टी. प्रवर्गाचे प्रमाणपत्र द्या', अशी मागणी करण्यासाठी शुक्रवारी (३१ ऑगस्ट) धनगर समाजाचा राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

शुक्रवारी आमखास मैदानावर दुपारी ३ वाजता होणाऱ्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आ. भाई गणपतराव देशमुख राहणार असून मेळाव्यासाठी राज्यभरातून धनगर समाज उपस्थित राहणार आहे. यावेळी गोपीचंद पाडळकर म्हणाले की, 'सरकारने जे ४३ हजार खोटे धनगड कागदावर तयार ठेवले आहेत त्याचे पत्ते धनगरांना द्यावे, अन्यथा धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये प्रमाणपत्र द्या, धनगर समाजाचे हे आंदोलन प्रमाणपत्र घेतल्या शिवाय थांबणार नाही. आंदोलन न करता समाजाला प्रमाणपत्र देण्याची नैतिक जबाबदारी सरकारची होती, मात्र आंदोलन करण्याची नामुष्की सरकारने आणली आहे. आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. सरकार निरुत्तर आहे, असेही त्यांनी सांगितले. मेळाव्याच्या निमित्ताने मराठवाड्यातील विविध शहरात आणि परिसराचा दौरा करण्यात आला असून धनगर समाज जागृत करण्याचे काम गेल्या महिन्याभरापासून सुरू असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी अॅड. वजीर, भीमराव सातपुते, शिवदास बिडगर, उदय जराड, मनजीत कोळेकर आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लेखी आश्वासन मिळेपर्यंत बेमुदत उपोषण सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मराठा, मुस्लिम, धनगर आणि कोळी समाजाला आरक्षण व न्याय देण्यासंदर्भात शासनामार्फत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहील,' असा निर्धार काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

मराठा, मुस्लिम, धनगर व कोळी समाजाच्या न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे दोन ऑगस्टपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. त्यानंतर साखळी उपोषणाच्या २८व्या दिवसांपासून २९ ऑगस्ट रोजी याच मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या संदर्भात आमदार सत्तार म्हणाले, 'या उपोषणाची माहिती जिल्हा प्रशासन तसेच मुख्यमंत्र्यांनाही दिलीली आहे. मात्र, आरक्षणवर सरकार तारीख पे तारीखचा खेळ करत आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आतापर्यंत मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत. जुन्या सरकारने आरक्षण दिले होते. हे टिकवण्याची जबाबदारी तसेच कायद्यामध्ये रुपांतरित करण्याची जबाबदारी सरकारची होती. आता या आरक्षणाचा सरकारने अध्यादेश काढावा तसेच धनगड आणि धनगर, महादेव कोळी व कोळी या शब्दांचा फेर आहे. त्यांना नवीन आरक्षण नको, जुन्या आरक्षणातच दुरुस्ती करावी अशी मागणी सरकारकडे आहे,' असे सत्तार म्हणाले. यावेळी आमदार सुभाष झांबड, नामदेव पवार, डॉ. कल्याण काळे, नितीन पाटील, केशवराव तायडे, किरण पाटील डोणगावकर, डॉ. जितेंद्र देहाडे, अनिल सोनवणे, नंदकिशोर सहारे, रामराव शेळके उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसाच्या मुलाला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एका १४ वर्षीय मुलीची छेड काढत, पाठलाग करून वाईट हेतुने मैत्री करण्यासाठी धमक्या देणारा पोलिसाचा मुलगा व आरोपी हरिदास नामदेव वेळणकर याला एक वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा पोस्को कोर्टाचे विशेष न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी गुरुवारी (३० ऑगस्ट) ठोठावली.

पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार, ४ एप्रिल २०१५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ती घरात एकटी असताना आरोपी हरिदास नामदेव वेळणकर (वय २२, रा. त्रिवेणीनगर, सिडको एन-सात) तिच्या घराजवळ आला व 'माझ्याशी मैत्री कर, तू मला आवडते, आपण फिरायला जाऊ' असे म्हणाला. त्यामुळे मुलगी घाबरली व हा प्रकार आईला सांगेन, असे म्हणाली. त्यावर 'तुझी आई काहीही करू शकत नाही, माझे वडील पोलिस आहेत' असे तो म्हणाला. तेवढ्यात तिची आई आली असता, आरोपी पळून गेला. घडला प्रकार व यापूर्वीही त्याने पाठलाग केला, शाळेतही आला होता, असे तिने आईला सांगितले. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन भादंवि ३५४ (अ) व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोस्को) ११ व १२ कलमान्वये सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\B... तर सहा महिने आणखी सक्तमजुरी\B

खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात पीडिता, पीडितेची आई व मुलीच्या शाळेतील मुख्याध्यापकांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर कोर्टाने भादंवि ३५४ (ड) अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरी, तर पोस्को कायद्याच्या ११ (आय) व १२ कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास चार महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुराधा पाटील यांना ‘रानगंध’ पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना 'रानगंध' साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी साहित्यातील भरीव योगदानाबद्दल हा पुरस्कार आहे. येत्या १६ सप्टेंबर रोजी पळसखेडे (ता. सोयगाव) येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. श्रीमती मंगला घुनावत व रामलालजी घुनावत यांनी त्यांच्या आरजी इंडस्ट्रीजच्या वतीने कविवर्य ना. धों. महानोर यांच्या सन्मानार्थ 'रानगंध' पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. महानोर यांच्या जन्मदिनी पळसखेडे येथे दरवर्षी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यंदाचा पुरस्कार पहिलाच असून कवयित्री अनुराधा पाटील यांची परीक्षक समितीने अंतिम फेरीत निवड केली. गेल्या ४५ वर्षांपासून अनुराधा पाटील निष्ठेने आणि चिंतनपूर्णतेने काव्यलेखन करीत आहेत. त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित असून 'कदाचित अजूनही' हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. पुरस्कार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील असून डॉ. दिलीप धोंडगे व ना. धों. महानोर सदस्य आहेत. येत्या १६ सप्टेंबरला पळसखेडे येथील यशवंतराव चव्हाण खुल्या सभागृहात प्रसिद्ध साहित्यिक श्याम मनोहर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. रोख एक लाख रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी जैन उद्योग समूहाचे अशोक जैन उपस्थित राहणार आहेत, असे महात्मा फुले ग्रंथालयाचे अध्यक्ष बाळासाहेब महानोर यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्ट कर्मचाऱ्यांची जनजागृती फेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बहुचर्चित इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला (आयईपीपीबी) अखेर मुहूर्त मिळाला असून येत्या शनिवारी येथील शाखेचे उद्घाटन होणार आहे. यासंदर्भात नागरिकांन माहिती व्हावी, यासाठी पोस्ट खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गुरुवारी शहरातून जनजागृती फेरी काढली.

येथील मुख्य डाकघर परिसरातून सायंकाळी चार वाजता फेरीला सुरुवात झाली. आपली बँक आपल्या दारापर्यंत अशी घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. सीटी चौक मार्ग काढण्यात आलेल्या या फेरीची सांगता शहागंज येथे करण्यात आली. अनिल साळुंके, सुनील काकड, शालीनी पवार, देवेंद्र परदेशी, अशोक लाटे, नंदकुमार खोसे, शेरु तड़वी, दिलीप कुलकर्णी, डी.आर. भालेराव, सुनील शिंदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेची वीज चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराचा कारभार चालविणाऱ्या महापालिकेनेच वीज चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी झालेल्या जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी उघड केला. तेव्हा पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे खासदार चंद्रकांत खैरे यांना क्षणभर धक्का बसला, तर बैठकीला उपस्थित असलेले शहराचे प्रथम नागरिक महापौर नंदकुमार घोडेले यांच्यावर खाली मान घालायची वेळ आली.

जिल्हा विदयुतीकरण समितीची बैठक गुरुवारी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, एनएचआयचे अजय गाडेकर, अधीक्षक अभियंता संजय सरग, समिती सदस्य आसाराम तळेकर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पालिकेच्या चोरीचपाटीची चक्क महापौरांच्या उपस्थितीत खासदारांपुढे पोलखोल केली. पालिकेच्या तब्बल ८० टक्के पथदिव्यांना चक्क आकडा टाकून वीज दिली जात आहे. गारखेडा उपकेंद्रातील ट्रान्सफार्मरच्या तारांवरून अनेक पथदिव्यांसाठी आकडे टाकून वीज घेण्यात आली आहे. ही माहिती सभागृहात उघड करताच क्षणभर खासदार खैरेही अवाक झाले. सामान्य नागरिकांनी आकडे टाकले, तर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल होतात. आता पालिकाच आकडे टाकून वीज घेत असल्याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पालिकेचे अधिकारी आणि महावितरण अधिकारी यांनी सर्वेक्षण करून अहवाल देण्याच्या सूचना खासदारांनी केल्या. बैठकीत अधीक्षक अभियंता संजय सरग यांनी पथदिव्यांच्याबाबत कोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेने चालू वीज बिल भरले नाही. त्यामुळे दोन कोटी थकबाकी असल्याचे सांगितले. गणेशोत्सवाच्या काळात वीज जाणार नाही याची काळजी घ्या. विसर्जन मिरवणूक मार्गावरील लोंबकळलेल्या तारांचा प्रश्न मार्गी लावा, असे आदेश खासदारांनी दिले. यावेळी कंत्राटदारांकडून होत असलेल्या कामाविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करण्याचेही आदेश खासदारांनी दिले. ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याची वीज जोडणी थकबाकी असेल तर तोडू नका, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मात्र, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी थकबाकी भरावीच लागेल, असे स्पष्ट केले. महावितरण आपल्या दारी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत वीज जोडणी मिळाली नसल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली.

\Bमहापौर-मुख्य अभियंत्यात खडाजंगी\B

रस्त्यावरील खांब हटविणे, ट्रान्सफार्मर शिफ्टिंगवरून महापौर नंदकुमार घोडेले, खासदार चंद्रकांत खैर आणि मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्यात चांगलाच वाद झाला. गणेशकर यांनी महावितरण ही सेवा देणारी कंपनी आहे. त्यामुळे पालिकेने वीज सुविधा तयार करण्यासाठी जागा द्यावी. या नियमावर बोट ठेवले. तेव्हा ही खडाजंगी थांबली.

\Bमीटर असूनही जोडणी नाही

\Bवैजापूर भागात अनेकांना वीज मीटर मिळत नाही, कृषी पंपांना वीज जोडणीसाठी कोटेशन मिळत नाही, अशी तक्रार बैठकीत आली. तेव्हा वैजापूर येथील कार्यकारी अभियंत्यांनी आपल्याकडे मीटर नसल्याचा खुलासा केला. या प्रकरणावरून मुख्य अभियंता सुरेश गणेशकर चांगलेच संतापले. त्यांनी वैजापूरच्या नावावर पाच हजार वीज मीटर असताना तरीही मीटर नाही, असे का सांगता असा सवाल करत त्या अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३२० विद्यार्थ्यांनी बनविले शाडू मातीचे गणपती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा येथील ऑस्टर इंग्लिश स्कूलमध्ये गुरुवारी सकाळी विद्यार्थी आतुरतेने शिक्षक येण्याची वाट पहात होते. अहं, हे सर्व चिमुकले त्यांच्या शाळेतील सरांची वाट पहात नव्हते, तर त्यांना प्रतीक्षा होती गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांची. दहा वाजता बरोबर प्रशिक्षक हजर झाले आणि अत्यंत उत्साहात शाडू मातीचे गणपती बनविण्याची कार्यशाळा सुरू झाली. माती भिजविण्यापासून ते संपूर्ण गणपती तयार होईपर्यंत शिक्षकांच्या प्रात्यक्षिकांसह सूचना सुरू होत्या आणि बघता बघता शाडू मातीचे गणपती तयार झाले. थोडेथोडके नव्हे तर २५० विद्यार्थ्यांनी शाडू मातीचे गणपती बनविले आणि आपल्या घरी हीच सुंदर मूर्ती यंदा बसविण्याचा संकल्प केला. याआधी बुधवारी सिंधी कॉलनीतील ऑस्टर इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या कार्यशाळेत ७० मुलांनी शाडू मातीचे गणपती बनविले.

महाराष्ट्र टाइम्स आणि मोरया फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑगस्टपासून शहरात विविध ठिकाणी शाडू मातीचे गणपती बनविण्याची मोफत कार्यशाळा घेतली जात आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून शाडू मातीचे गणपती बनविण्याचे काम अनेक संस्थांनी हाती घेतले आहे. यंदा मोरया फाऊंडेशन आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या संयुक्त उपक्रमातून शहरात २५ ऑगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत शाडू मातीचे गणपती बनविण्याच्या कार्यशाळा घेतल्या जात आहेत. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी समाज मंदिर श्रीनगर, दिपक गृह उद्योग समोर, उल्कानगरी जवळ, गारखेडा, येथे संपर्क साधावा. अथवा नदीम ९८२२६३०५५५, प्रभू इंगळे, प्रकाश कुलकर्णी (९६६ ५५५७८९०/ ७८७५४५२१००) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑस्टर इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना शाडू मातीचे गणपती बनविण्यासाठी प्रकाश कुलकर्णी, प्रदीप इंगोले, परम काठोळे, धनंजय कुलकर्णी, आकाश तांदळे, मंगेश भारती यांनी मार्गदर्शन केले.

दोन कार्यशाळांत ३२० गणपती

स्थळ : ऑस्टर इंग्लिश स्कूल, चिकलठाणा

वेळ : सकाळी १० ते दुपारी १

गणपती बनविलेले विद्यार्थी : २५०

स्थळ : ऑस्टर इंग्लिश स्कूल, सिंधी कॉलनी

वेळ : सकाळी १०.३० ते दुपारी १.३०

गणपती बनविलेले विद्यार्थी : ७०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय दर्जाचा संभ्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण येथील केंद्रीय संतपीठाचा प्राथमिक प्रस्ताव केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाला १० सप्टेंबरला सादर करण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत केंद्रीय दर्जा न मिळाल्यास राज्य सरकार संतपीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित करून पुढील वर्षापासून अभ्यासक्रम राबविणार आहे. केंद्रीय संतपीठ की महाविद्यालय यावर प्रस्ताव मंजुरीनंतर शिक्कामोर्तब होणार आहे.

नागपूर येथील पावसाळी अधिवेशना दरम्यान १० जुलै रोजी पैठणच्या संतपीठाबाबत महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. या संतपीठासाठी प्रस्ताव निर्मितीची जबाबदारी राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठावर सोपविली होती. त्यानुसार चार बैठका घेऊन ८० टक्के अहवाल तयार करण्यात आला. याबाबत प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 'कालमर्यादेत काम करण्याचे आव्हान असल्यामुळे तातडीने तज्ज्ञांशी चर्चा करून प्रस्ताव तयार करण्यात आला. पूर्वीच्या आराखड्यात बदल करून केंद्रीय स्तरानुसार प्रस्ताव तयार केला. हा प्राथमिक अहवाल १० सप्टेंबरला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला सादर करण्यात येणार आहे. 'एचआरडी'ने सूचना केल्यास त्यांची अंमलबजावणी करुन अंतिम अहवाल देण्यात येईल' असे तेजनकर यांनी सांगितले. जून २०१९ पासून संतपीठात अभ्यासक्रम सुरू होणार आहे. पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत. वारकरी, महानुभाव, जैन, बौद्ध, सुफी, दत्त संप्रदाय अशा विविध संत साहित्याचा अभ्यास केला जाणार आहे, पण केंद्रीय दर्जाविषयी काही प्रमाणात संदिग्धता आहे. 'संतपीठ विद्यापीठच हवे असे नाही. किमान उपकेंद्र झाले तरी पुरे आहे. फक्त ते वारकरी शाळा होऊ नये. या ठिकाणी शिकलेल्या पदवीधरांना इतरत्र नोकरीच्या संधी मिळाल्या पाहिजे. पुरेशा निधीसाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल' असे नोडल ऑफिसर व माजी उपमहापौर संजय जोशी यांनी सांगितले. केंद्रीय दर्जा न मिळाल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित करुन संतपीठात अभ्यासक्रम सुरू होणार आहे. याबाबत डिसेंबर महिन्यात व्यवस्थापन परिषदेत अभ्यासक्रमाला मान्यता घेण्यात येईल असे तेजनकर यांनी सांगितले.

१९८२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या कार्यकाळात संतपीठाचे काम सुरू झाले. तर युती सरकारच्या कार्यकाळात सहा डिसेंबर १९९४ रोजी परिपत्रक काढण्यात आले होते. १९९८ मध्ये संतपीठ इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. संतपीठासाठी १७ एकर जागा असून दोन वसतीगृह आणि प्रशासकीय इमारत उभी आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग इमारतीची डागडुजी आणि स्वच्छता करीत आहे. या पत्रकार परिषदेला प्रस्ताव समितीचे डॉ. अशोक देशमाने, डॉ. दासू वैद्य, डॉ. मुस्तजीब खान, डॉ. प्रवीण वक्ते, स्वप्नील कुलकर्णी उपस्थित होते.

-----प्रस्तावासाठी मागविल्या सूचना

पैठण येथील केंद्रीय संतपीठाच्या निर्मिती व विकासासाठी सूचना व प्रस्ताव मागविले आहेत. येत्या पाच सप्टेंबरपर्यंत सूचना लेखी स्वरुपात टपालाने किंवा provc.office@bamu.in या इ-मेलवर पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. या सूचनांचा अंतिम प्रस्तावात समावेश करण्यात येणार आहे. अभ्यासक्रम व आराखडा सर्वांगिण ठेवणे प्रस्तावाचा उद्देश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आडत व्यापाऱ्यांचा बंद; खरेदी मात्र सुरू !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल खरेदी केल्यास शिक्षेसह दंड आकारण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरुद्ध जाधववाडी येथील आडत व्यापाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत बंद पुकारला आहे. या अघोषित बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा व्यापारी संघटनेने केला, तर दुसरीकडे दिवसभरात बाजरी, ज्वारीसह इतर धान्याची खरेदी झाल्याचे बाजार समितीच्या दैनंदिन अहवालात नमूद केले आहे.

हमी भावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी केल्यास शिक्षेसह दंड आकारण्याच्या शासन आदेशाचे मराठवाड्यात पडसाद उमटत आहेत. जाधववाडी येथील आडत व्यापारी असोसिएशनने याबाबत बैठक घेत आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय बुधवारी घेतला. त्यानुसार गुरुवारपासून बेमुदत बंद पाळण्यात येत आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैय्यालाल जैस्वाल यांनी दिली. शासनाचा निर्णय अन्यायकारक असून व्यापाऱ्यांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण पसरल्याचे त्यांनी नमूद केले. ई-नाम प्रणाली लागू झाल्यापासून धान्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली. शेतकऱ्यांना नगदी पैसे हवे असल्याने शेतकरी दुसऱ्या बाजार समितीत माल विक्रीसाठी नेत आहेत. या परिस्थितीत पुन्हा एक जाचट अट लादण्यात येत असल्याने मोठी कोंडी होईल, अशी तक्रार जैस्वाल यांनी केली. बंदमुळे बाजार समितीतील धान्य मार्केटमध्ये शुकशुकाट आहे.

\Bबाजार समितीचा दावा \B

धान्य मार्केटमध्ये ७२ अडत व्यापारी असून ४०० पेक्षा जास्त हमाल, मापाडी काम करतात. बंदला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा आडत व्यापाऱ्यांकडून होत असतानाच गुरुवारी बाजारात सात क्विंटल गहू, २३ क्विंटल ज्वारी शाळू, ९४ क्विंटल बाजरी, तर २५ क्विंटल मकाची आवक झाली असून दुकानदारांनी माल खरेदी केल्याचा दावा समितीने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूजच्या कंपनीत तोडफोड; सहाजणांचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नऊ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'च्या दिवशी वाळूज परिसरातील एका कंपनीत तोडफोड करुन ७० लाखांचे नुकसान करणारे गजानन चौरमारे, संतोष डुकरे, अक्षय गायकवाड, मनीष नागपुरे, साईनाथ बासरे व सागर पाटील यांचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. दिग्रजकर यांनी गुरुवारी (३० ऑगस्ट) फेटाळला.

याप्रकरणी नितीन उद्धव सपकाळ (वय ४२, रा. बजाजनगर) यांनी फिर्याद दिली होती. त्यांच्या पत्नीची तुषार इंडस्ट्रीज ही कंपनी आहे. ९ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी बंदमुळे कंपनी बंद होती, तर कार्यालयीन काम सुरू होते. यावेळी शंभर ते दीडशे जणांनी घोषणा देत कंपनी का बंद केली नाही, अशी विचारणा करत गेट तोडून कंपनीत प्रवेश केला, वॉचमनला मारहाण करत कार्यालयाची तोडफोड केली. यात कंपनीचे ७० लाखांचे नुकासन झाल्याची तक्रार दिली होती. त्यावरुन एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दहा ऑगस्ट रोजी गजानन माधवराव चौरमारे (वय ३७), संतोष सुनील डुकरे (वय २५), अक्षय कृष्णदेव गायकवाड (वय २२, सर्व रा. बजाजनगर), मनीष नारायण नागपुरे (वय ४२), साईनात गौराजी बासरे (वय २०, दोघे रा. रांजणगाव-शेणपुंजी) व सागर दत्तात्रय पाटील (वय २२, रा. बजाजनगर) यांना अटक केली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या संशयित आरोपींनी नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला होता.

\Bआर्थिक नुकसानाकडे वेधले लक्ष \B

अर्जावरील सुनावणीवेळी, या संशयित आरोपींना आंदोलन बदनाम करायचे होते का, गालबोट लावायचे होते का याचा तपास करायचा आहे. तपास प्राथमिक अवस्थेत असून फरार आरोपींना अटक करायची आहे. या गुन्ह्यात मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याने जामीन देऊ नये, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे व सहाय्यक सरकारी वकील उदय पांडे यांनी केली. जिल्हा सरकारी वकील देशपांडे यांना अॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिल्लीगेट येथील सलीमअली सरोवरालगत केलेल्या अतिक्रमणांवर महापालिकेच्या पथकाने गुरुवारी हातोडा मारला व अतिक्रमण काढून टाकले.

सलीमअली सरोवराजवळ लेकव्हिव शाळेच्या संचालिका रिजवाना बशीर पटेल यांनी एका खोलीचे बांधकाम करून तारेचे कुंपण बांधले होते व अतिक्रमण केले होते. त्यावर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. रिजवाना पटेल यांनी या संदर्भात न्यायालयात दावा दाखल केला होता, पण न्यायालयाने त्यांचा दावा पूर्वीच फेटाळला होता. तलावालगत दुसरे अतिक्रमण जलालोद्दीन नसिरोद्दीन यांनी केले होते. पत्र्याचे कुंपण करून त्यांनी भिंत बांधली होती व खोलीचे बांधकाम देखील केले होते. हे अतिक्रमण देखील पाडण्यात आले. या कारवाईसंदर्भात आयुक्तांनी अतिक्रमण हटाव विभागाला आदेश दिले होते. जलालोद्दीन यांनी कारवाईला स्थगिती मिळावी म्हणून न्यायालयात धाव घेतली होती, पण न्यायालयाने स्थगिती दिली नव्हती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. हिमायत बागेच्या भिंतीला लागून असलेल्या जुन्या फर्नीचर विक्रेत्यांवर देखील कारवाई करण्यात आली. ही कारवाई आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त डी. पी. कुलकर्णी, पदनिर्देशीत अधिकारी सी. एम. अभंग, प्रभाकर पाठक, सिटीचौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे व कर्मचाऱ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हमीपत्राच्या मुद्यावरून मुख्यमंत्री नाराज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीच्या कामासाठी येणाऱ्या अतिरिक्त खर्चासंदर्भात निधी देण्याचे लेखी हमी पत्र मुख्यमंत्र्यांनी द्यावे. त्यानंतर कराराच्या पुनरुज्जीवनाबद्दल निर्णय घेऊ, असे निर्देश महापौरांनी दिल्यामुळे मुख्यमंत्री कमालीचे नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

समांतर जलवाहिनीच्या पीपीपीतत्वावरील कराराचे पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी २७ ऑगस्ट रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. सभेच्या अगदी शेवटच्या टप्प्यात जलवाहिनीच्या कामासाठी लागणाऱ्या जास्तीच्या खर्चाबद्दल निधी देण्याची लेखी हमी मुख्यमंत्र्यांनी द्यावी. त्यानंतर कराराच्या पुनरुज्जीवनाबद्दल निर्णय जाहीर केला जाईल, असे महापौरांनी जाहीर केले. ही भूमिका मुख्यमंत्र्यांवर अविश्वास व्यक्त करणारी असल्याचे बोलले जात आहे. सर्वसाधारण सभेच्या पाच दिवस अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीसी घेवून महापौर, आमदार आणि पालिका आयुक्त यांच्याशी संवाद साधला. समांतर जलवाहिनीचे काम जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत सुरू करा. शासन मदत करायला तयार आहे, असा शब्द यावेळी दिला. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखातर सर्वसाधारण सभेत कराराचे पुनरुज्जीवन करण्याची तयारी देखील महापौरांनी व्हीसीत दाखवली होती. मात्र, नंतर ही भूमिका बदलल्याने याचे तीव्र पडसाद मुख्यमंत्री कार्यालयाच्या पातळीवर उमटल्याचे सूत्रांनी सांगितले.

\Bअन् विश्वास गमावला

\Bसमांतर जलवाहिनीसाठी मदत करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी जशी घेतली, तशीच राज्याचे अतिरिक्त मुख्यसचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी देखील घेतली होती. मदत करण्यासाठी हे दोघेही अनुकूल असताना लेखी हमीचा मुद्दा उपस्थित करून महापौरांनी अविश्वास व्यक्त केल्याची भावना मुख्यमंत्री व अतिरिक्त मुख्यसचिवांच्या स्तरावर निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसतीगृहात कायमची घुसखोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात जुन्या विद्यार्थ्यांचा अनेक वर्षांपासून ताबा आहे. संशोधन कालावधी संपल्यानंतरही विद्यार्थी वसतीगृहात आहेत. त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. याबाबत संशोधक विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची भेट घेत तक्रार केली. नेत्यांच्या दबावापोटी प्रशासनाने आतापर्यंत कधीच कारवाई केली नसल्यामुळे हा वाद चिघळला आहे.

विद्यापीठात नवीन वसतीगृहाची अत्यंत गरज आहे. जुन्या वसतीगृहाची प्रवेश क्षमता कमी आहे. शिवाय अनेक वर्षे डागडुजी नसल्यामुळे वसतीगृहांची दूरवस्था झाली आहे. अधिसभा बैठकीत वसतीगृहांचा मुद्दा अनेकदा चर्चेत आला. यंदा विद्यापीठ प्रशासनाने अर्थसंकल्पात वसतीगृहासाठी आर्थिक तरतूद केली. मात्र, अजूनही आराखडा निश्चित करण्यात आला नाही. परिणामी, वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची कुचंबणा सुरू आहे. संशोधक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सिद्धार्थ वसतीगृहाचा प्रश्न चर्चेत आहे. वसतीगृहात राहण्याची आणि संशोधनाची मुदत संपलेली असूनही अनेक विद्यार्थ्यांनी ताबा सोडला नाही. काही विद्यार्थी दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून वसतीगृहात राहत आहेत. नोकरी करीत असतानाही विद्यार्थीदशा संपलेली नाही. मागील तीन वर्षांपासून पीएच. डी. प्रक्रिया नसल्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांचा राहण्याचा मुद्दा समोर आला नव्हता. मात्र, यावर्षी पीएच. डी. प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अंतिम पात्रता यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज केला. पण, वसतीगृहात जागा नसल्याचे कारण सांगण्यात आले. अनधिकृत ताबा घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतीगृह सोडण्यास सांगा अशी मागणी करण्यात आली. तरीसुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष केले. सध्या नवीन विद्यार्थी वसतीगृह प्रवेशापासून वंचित असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे भाड्याने खोली घेऊन राहणे शक्य नाही. त्यांची विद्यापीठाच्या वसतीगृहात प्रवेश द्यावा अशी मागणी आहे.

दरम्यान, संशोधक विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश द्यावा आणि हा प्रश्न तात्काळ सोडवा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली. याबाबत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना बुधवारी निवेदन देण्यात आले. जुने विद्यार्थी वसतीगृह सोडणार नसतील तर कायदेशीर कारवाई करू असे आश्वासन चोपडे यांनी दिले. यावेळी 'अभाविप'चे महानगर मंत्री शिवा देखणे, विवेक पवार, गोविंद देशपांडे, रामेश्वर काळे, भानुदास डोबाळे उपस्थित होते.

नेत्यांचा प्रशासनावर दबाव ?

नागपूर येथील संत तुकडोजी महाराज विद्यापीठात विद्यार्थी वसतीगृह सोडत नव्हते. विद्यापीठाने तक्रार केल्यानंतर पोलिस प्रशासनाने वसतीगृह रिकामे केले. या धर्तीवर पोलिसांकडे रितसर तक्रार करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांना संघटनांचे आणि विद्यापीठातील नेत्यांचे भक्कम पाठबळ आहे. दरवेळी नेते पाठराखण करीत असल्यामुळे प्रशासनावर दबाव आहे. या परिस्थितीत गरजू विद्यार्थी वसतीगृहाला मुकले आहेत असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. विद्यार्थ्यांनी गुरुवारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांची भेट घेतली. मात्र, कुलगुरुंनी आदेश दिल्यास कारवाई करण्यात येईल असे उत्तर देत त्यांनी विद्यार्थ्यांची बोळवण केली.

यावर्षी पीएच. डी. संशोधनासाठी माझी निवड झाली. रितसर अर्ज करुनही वसतीगृहात प्रवेश मिळाला नाही. माझ्यासारख्या विद्यार्थ्यांची गरज ओळखून प्रशासनाने कार्यवाही करावी.

निखिल आठवले, संशोधक विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेरूळ लेणीचा वारसा जपा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'जगातील विविध देशांना भेटी दिल्यानंतर भारतात वेरुळ येथील कैलास लेणी पाहिली. या स्थापत्य शैलीने भारावून गेले. ही लेणी भारताचे खरे वैभव असून भारतीयांनी हा वारसा जतन करावा' असे प्रतिपादन जर्मन पत्रकार व इतिहास अभ्यासक क्रिस्टल पिल्झ यांनी केले. त्या विद्यापीठात बोलत होत्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभागात पत्रकार क्रिस्टल पिल्झ यांचे व्याख्यान झाले. विभागाच्या सभागृहात बुधवारी व्याख्यानाला विभागप्रमुख प्रोफेसर पुष्पा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. पिल्झ यांनी वेरुळ लेणीच्या स्थापत्यशैलीचे वेगळेपण उलगडून सांगितले. 'वर्षांतून दोन वेळेस कैलास लेणी येथे भेट देते. भारतीयांनी हा वैभवशाली वारसा जपावा. स्थापत्याचे कंगोरे समजून घेतल्यास प्रत्येकजण आत्मभान हरपतो. कैलास लेणीचे महत्त्व सांगण्यासाठी सोशल मीडियावर ग्रुप तयार केला. त्यात सहा हजार सदस्य असून चर्चा करीत असतात' असे पिल्झ म्हणाल्या. दुसऱ्या सत्रात अर्श अली यांनी इजिप्शियन बुद्धिझमवर सचित्र व्याख्यान दिले. क्रिस्टल पिल्झ करीत असलेल्या कामाचे डॉ. पुष्पा गायकवाड यांनी कौतुक केले. त्यांनी हा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा असे आवाहन केले. संजय पाईकराव यांनी प्रास्ताविक केले. सुनिता सावरकर यांनी सूत्रसंचालन केले आणि बळीराम पाईकराव यांनी आभार मानले. यावेळी डॉ. गितांजली बोराडे, सुधीर बलखंडे, प्रबुद्ध म्हस्के, ओजस बोरसे, अर्जुन पट्टेकर, सिंधू लोणकर, अश्विन जोगदंड यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक पालक संघाची ‘एसबीओए’मध्ये स्थापना

$
0
0

एसबीओए पब्लिक स्कूलमध्ये पालक-शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अर्चना फडके यांची अध्यक्षपदी, तर कल्पना मैंद यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. संगीता खरात यांची सचिवपदी संतोष भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुरेखा माने यांची अध्यक्षपदी तर चंद्रशेखर शेळके यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्या हस्तक यांची सचिव तर सहसचिव म्हणून सावलहरी कोंडके व गजानन घोंगडे यांची नियुक्ती झाली आहे. या प्रसंगी पालक व शिक्षकांची मोठी उपस्थिती होती.

जिल्हा परिषद शाळेत राखी पौर्णिमा साजरी

सातारा येथील जिल्हा परिषद शाळेत रक्षाबंधन सणानिमित्त सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राखी बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यात मुला-मुलींनी विविध संदेश देणाऱ्या राखी बनवल्या. मुलींचे शिक्षण, पर्यावरण सरंक्षण, वृक्षसंवर्धन, स्वच्छता असे विविध संदेश देणाऱ्या राख्या बनवल्या. मयुरा चौधरी यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका मंजुश्री राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

सेंट जॉन हायस्कूलमध्ये पुष्पोत्सव

हडकोतील सेंट जॉन इंग्लिश हायस्कूलमध्ये पुष्पोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी अमेरिकेचे मार्क, ऱ्होंडा एडवर्ड, माजी अध्यक्ष रवींद्र डोंगरदिवे, अध्यक्ष जॉन डोंगरदिवे, सचिव जेम्स डोंगरदिवे, संचालिका पल्लवी डोंगरदिवे, आकाश सरकटे, मुख्याध्यापिका चंद्रकला शर्मा, उपमुख्याध्यापिका प्रज्ञा कोरान्ने यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांची पुष्पोत्सवानिमित्त रांगोळी, फुलांची रचना यावर स्पर्धा घेण्यात आली. प्रमुख अतिथींना शाळेतर्फे स्मृतिचिन्ह देण्यात आले.

शिक्षक पतसंस्थेची सर्वसाधारण सभा

शहागंज भागातील महाराष्ट्र हिंदी विद्यालयात अक्षय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या प्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश वाघमारे, पर्यवेक्षक व उपाध्यक्ष रवींद्र तायडे, सचिव वाल्मिक चव्हाण, लेखापरीक्षक जी. ओ. वर्मा, मुख्याध्यापिका पुष्पा गतखणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रकाश वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कमलेशराणी शर्मा, सोनाली वाकळे, शंकर भडगे, किरण पवार, कैलास गौतम, किशोर पाटील, विठ्ठल राठोड, साहेबराव पाटील आदी उपस्थित होते. किशोर पाटील यांनी आभार मानले.

विद्या अरण्यम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

एमजीएम कॅम्पस परिसरातील विद्या अरण्यम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. विश्वस्त अंकुशराव कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोक, भजन, ओडीसी, कथ्थक, नृत्य व गीते सादर केली. विद्या अरण्यमच्या व्हीजन डायरेक्टर पार्वती दत्ता यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनामिका सरकार, शीतल भामरे, सिबाशंकर सातपाथ्ये, कृष्णा गायकवाड आदींनी पुढाकार घेतला.

स्काउट गाइड विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान

साजापूर येथील जिल्हा परिषद शाळेत स्काउट गाइड विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. डॉ. हरिश्चंद्र रामटेके यांनी मार्गदर्शन केले. राज्य स्काऊट्स आणि गाइड्स कार्यालयातर्फे प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सय्यद कलीम, प्रवीण पांडे, मुख्याध्यापक अण्णासाहेब दांडगे, एम. ए. पठाण, सचिन वाघ, हरिश्चंद्र राहाणे, गोपाळ भास्कर, धनंजय नागमवाड, राजू खिल्लारे, गणेश सुपेकर, दीपाली दांडगे, जयश्री साळणे, शीला पारखे, घुगे आदी उपस्थित होते.

अनंत भालेराव विद्यामंदिरचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

चेतनानगर येथील अनंत भालेराव विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. औरंगाबाद जिल्ह्यातून मुक्ता कुलकर्णी (२७वी), सुमेध घोरपडे (२९वा), प्रेरणा कोरडे (३४वी), प्रथमेश पालमकर (३७वा), क्षीतिज सोमण (५२वा), मधुरा शेवाळकर (५८वी), केतकी जोशी (७१वी), तन्मय राणा (८२वा), मृण्मयी कुलकर्णी (९९वी), वैष्णवी अत्रे (१२५वी), स्वराली मसाळ (१२७वी), वेदिका पुदाट (१३२वी), दर्शन महाजन (१४८वा), अथर्व जाधव (१६५वा), आनंदी रेवणशेटे (१७६वी), अनुप थोरमोटे (१७९वा), आकांक्षा शिंदे (१८२वी), श्रेया कोंडगावकर (१९९वी) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. स्नेहमयी महिला मंडळाच्या अध्यक्षा शशीकला बोराडे, सचिव बकुल देशपांडे, मुख्याध्यापिका भारती गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मारहाण करून झोपडी जाळणाऱ्यांना सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आमची जनावरे का चोरली, असा जाब विचारत मारहाण करून झोपडी जाळणाऱ्या चौघांना एक वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी गुरुवारी (३० ऑगस्ट) ठोठावली.

याप्रकरणी ताराचंद झुंबरलाल काळे (वय ६०, रा. ढोरकीन, ता. पैठण) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, नऊ फेब्रुवारी २०१३ रोजी फिर्यादीविरुद्ध जनावरे चोरल्याची तक्रार शेख वजीर शेख कडुभाई (वय ५०), सैय्यद शब्बीर सैय्यद अब्दुल (वय ४५), सैय्यद शकील सैय्यद हनीफ (वय ३०) व सैय्यद मोहम्मद हनीफ अब्दुल (वय ६५, सर्व रा. ढोरकीन) या आरोपींनी केली होती. त्यामध्ये ११ डिसेंबर २०१३ रोजी फिर्यादीला जामीन मिळाला होता. त्याचदिवशी रात्री फिर्यादी आपल्या घरी झोपलेला असता, वरील चौघे आरोपी तिथे आले व त्यांनी 'आमची जनावरे का चोरली' असा जाब विचारत मारहाण केली. तसेच फिर्यादीची झोपडी जाळून टाकले. यात सामानासह शेळीचे पिल्लू मरण पावले, अशी तक्रार दिल्यावरून पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात भादंवि ४३६ सह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील उदय पांडे यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने चौघा आरोपींना अॅट्रॉसिटी कायद्यान्वये एक वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समांतर करार कदमांमुळेच रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीची योजना चांगली आहे, परंतु रामदास कदमांमुळेच या चांगल्या योजनेचा करार रद्द झाला, असे म्हणत खासदार चंद्रकांत खैरे यांनी कदमांना घरचा आहेर दिला. आयुक्त येतात जातात त्यामुळे हमी पत्राचा आग्रह धरल्याचा उल्लेख त्यांनी केला.

महापालिकेच्या झोन क्रमांक ९ च्या कार्यालयाचे स्थलांतर सिंचनभवन समोरील मुळे - तापडिया कॉम्पलेक्समध्ये करण्यात आले. यावेळी चंद्रकांत खैरे बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समितीचे सभापती रेणुकादास वैद्य, सभागृहनेते विकास जैन, वॉर्ड सभापती सुमित्रा हळनोर, नगरसेविका आशा भालेराव, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, वॉर्ड अधिकारी एस.आर.जरारे आदी उपस्थित होते.

वॉर्ड कार्यालयाच्या स्थलांतराच्या कार्यक्रमावर समांतर जलवाहिनीच्या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी हमीपत्र देण्याच्या कामाचे सावट होते. त्याच अनुषंगाने खैरे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, 'समांतर जलवाहिनीचा प्रकल्प चांगला आहे, पण तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांच्यामुळे या प्रकल्पाचा करार रद्द झाला, त्यात शिवसेनेच्या येथील काही पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. गैरसमजुतीतून कदमांनी करार रद्द केला, असा आरोप त्यांनी केला. 'समांतर' चा करार रद्द व्हायला नको होता, शिवसेनेची ती चूक झाली, असा उल्लेखही त्यांनी केला. आयुक्त येतात आणि जातात. त्यांच्या येण्या जाण्याने प्रकल्प रखडतात, त्यामुळे हमी पत्राचा आग्रह आम्ही धरला आहे. मुख्यमंत्र्यांकडून हमी पत्र मिळाल्यावर प्रकल्प निश्चित पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार अतुल सावे म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांसाठी महापालिकेला शंभर कोटी रुपये दिले, आणखी १०० कोटी रुपये देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. कचरा प्रकल्पसाठी त्यांनी न मागता ९१ कोटी रुपये दिले आहेत. समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पासाठी देखील मदत करण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे, असे असताना हमी पत्राची अट घालणे योग्य नाही. हमी पत्र मागणे म्हणजे मुख्यमंत्र्यांवर अविश्वास व्यक्त करणे होय. 'समांतर' च्या कराराबद्दल महापालिकेने सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. महापौर नंदकुमार घोडेले यांचेही यावेळी भाषण झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीच्या कामांसंदर्भात मुख्य अभियंत्यांसोबत बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटीमध्ये प्रस्तावित माता व बालसंगोपन केंद्र, केएमसी वॉर्ड, शवविच्छेदन व शवगृह कक्षाच्या कामासह विविध कामांसाठी पाठपुरावा होऊन ही कामे लवकरात लवकर मार्गी लागावीत, या हेतुने मुख्य अभियंता के. टी. पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी (३० ऑगस्ट) बैठक घेण्यात आली.

घाटी परिसरात प्रस्तावित माता व बालसंगोपन केंद्रासाठी ३८ कोटी रुपये मंजूर असून, त्यापैकी पाच कोटी रुपये २०१८-१९ या वर्षासाठी मंजूर करण्यात आले आहेत. मात्र या कामाला प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी असून, त्यासाठी प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच 'एनआयसीयू'लगत कांगारू मदर केअर वॉर्ड (केएमसी वॉर्ड) सीएसआर फंडातून उभा राहणार आहे. त्यासाठीच्या बांधकामास लवकरात लवकर परवानगी देण्याविषयीही बैठकीत चर्चा झाली. नवीन शवविच्छेदनगृहाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा असून, अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत, ड्रेनेजलाइन आदी कामांसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच घाटीच्या जुन्या इमारतींच्या दुरुस्तीबाबतही लक्ष देण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी बैठकीत दिले. या प्रसंगी घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, नवजात व अर्भकशास्त्र विभागप्रमुख डॉ. एल. एस. देशमुख, स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमटीडीसी सुरू करणार पाच पर्यटक बस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेणीच्या पर्यटकांसाठी पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) नवीन पाच बस सुरू करण्यासंदर्भात मराठवाडा विकास मंडळाच्या बुधवारी (२९ ऑगस्ट) झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या वातानकूलित बससाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

मराठवाडा विकास मंडळातर्फे दळण-वळण आणि तीर्थक्षेत्र विकासाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीला मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, तज्‍ज्ञ संचालक शंकरराव नागरे, सदस्य सचिव दीपक मुगळीकर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अजिंठा आणि वेरूळ लेणी पाहण्यासाठी दरवर्षी येणाऱ्या हजारो पर्यटकांना दळणवळणात अनेक अडचणी येतात, असा मुद्दा उपस्थित झाला. पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी एमटीडीसीतर्फे नवीन पाच बस सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात येऊन येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले. टूर्स आणि ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी पर्यटकांना सेवा देण्याचा विचार करावा, असे आवाहन करण्यात आले. सदस्य सचिव मुगळीकर यांनी मराठवाड्यातील तीर्थक्षेत्रांची माहिती सादर केली. पर्यटकांना आकर्षिक करण्यासाठी आवश्यक प्रसिद्धी करण्यात मागे आहोत, शिवाय कनेक्टिव्हीटीचा अभाव असल्याचे मांडण्यात आले. एमटीडीसीचे मुख्यालय मुंबई येथून औरंगाबादला स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार आहे, असे डॉ. कराड यांनी सांगितले.

हेलिकॉप्टर सेवा, ओपन बस

औरंगाबाद ते अंजिठा हेलिकॉप्टर सेवा, बीबी का मकबरा येथे साउंड अँण्ड लाइट शो, शहरातील ऐतिहासिक दरवाजे, पाणचक्की, सलीम अली सरोवर आदी पर्यटन स्थळांवर विद्युत रोषणाई, औरंगाबाद बाय नाइट उपक्रम, ओपन बस सेवा, औरंगाबाद ते शिर्डी व पैठण पर्यटक बस आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. कलाग्राम येथे थ्रीडी थिएटर, प्लॅनेटोरियम सुरू करण्याबाबत प्रकल्प अहवाल शासनास सादर करण्याचे ठरवण्यात आले. अजिंठा व्ह्यू पॉइंट ते लेणी रोप वे, वेरूळ महोत्सव, पैठण येथील ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास यावर चर्चा करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलतज्‍ज्ञ चितळे यांचा सत्कार

$
0
0

म. टा. प्रति‌निधी, औरंगाबाद

केंद्रीय जलआयोगाचे माजी अध्यक्ष, सचिव तथा जलतज्ज्ञ माधवराव चितळे हे एक सप्टेबरपासून इंदूर येथे स्थायिक होणार असल्याने त्यांचा बुधवारी (२९ ऑगस्ट) वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव डी. एम. मुगळीकर, मंडळाचे तज्ज्ञ सदस्य शंकरराव नागरे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी विजय जाधव, हरिप्रीत सिंग, सुनील चौधरी, आशुतोष बडवे, निवृत्त अभियंता वराडे, वरुडकर आदींची उपस्थिती होती.

मराठवाड्यातील जलसिंचन प्रकल्पाबरोबरच नहर-ए-अंबरींचा प्रकल्प अहवाल, जलशुद्धीकरण प्रकल्प आदी कामांमध्ये चितळे यांचा मोलाचा वाटा आहे. असे मत डॉ. कराड यांनी व्यक्त केले. मराठवाड्यातील लोकांचे जलसंधारण आणि व्यवस्थापन याबाबत अभिनंदन करून मराठवाड्यातील विकास कामांची गती चांगली आहे. उद्योग, सिंचन, कृषी, विकास आदी संस्था मराठवाड्यात समाधानकारक काम करत आहेत, असे चितळे यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images