Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘कॅरिऑन’चा फेरविचार होणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अभियांत्रिकी शाखेतील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना कॅरिऑन देण्याबाबत बुधवारी बैठक बोलावली आहे. काही दिवसांपूर्वीच व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कॅरिऑन देऊ नये, असा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र, तांत्रिक मुद्दा उपस्थित करीत वेगळ्या नावाने कॅरिऑन देण्याबाबत प्रशासन निर्णय घेण्याची शक्यता आहे.

अभियांत्रिकी, फार्मसी आणि विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना कॅरिऑन देण्यात येणार नाही, असा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झाला आहे. मात्र, कॅरिऑनच्या मागणीवर ठाम असलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ कॅम्पसमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले. विद्यार्थी मंगळवारी दिवसभर कॅम्पसमध्ये होते. हा दबाव लक्षात घेऊन प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेतली. या बैठकीत प्राचार्यांनी तांत्रिक अडचण सांगितली. कॅरिऑन मिळाल्यास तिसऱ्या वर्षातील विद्यार्थी अंतिम वर्षात जाणार आहेत. हे विद्यार्थी तिसऱ्या वर्गातच राहिल्यास अडचण होणार आहे. पुढील वर्षी क्रेडिट बेस्ड सिस्टीम लागू होणार आहे. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण होईल असे सांगण्यात आले. या मुद्द्याचा विचार करून तेजनकर यांनी इतर विद्यापीठाचा निर्णय आणि सहाय्यभूत कागदपत्रे परीक्षा विभागाकडे पाठवली. यावर विचार करून परीक्षा संचालक निर्णय देणार आहेत. दरम्यान, कॅरिऑन शब्द न वापरता इतर शब्द वापरून फक्त तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनाच कॅरिऑन देण्याबाबत विद्यापीठ प्रशासन तयार झाले आहे. त्यामुळे निर्णय होण्याची शक्यता आहे. तांत्रिक मुद्दे लक्षात घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल. मात्र, कॅरिऑन मिळेल असे सांगता येत नाही असे प्र-कुलगुरू तेजनकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेवारस पेटीमुळे खळबळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

बेवारस लोखंडी पेटी आढळल्याने मंगळवारी (१८ सप्टेंबर) कन्नड बसस्थानकात खळबळ उडाली. दुपारी साडेबारा ते तीन यादरम्यान हा प्रकार घडला. बाँब शोधक व निरस्त पथकाकडून पेटी ताब्यात घेऊन ती उघडून पाहिली असता, पेटीत शालेय विद्यार्थ्यांचे वह्या, पुस्तके व काही कपडे आढळले. त्यानंतर तणाव निवळला.

बसस्थानकातील आतील एका प्रवेशद्वार जवळ सकाळी ११च्या सुमारास लोखंडी पेटी गेल्या दोन तासांपासून बेवारस पडून आसल्याचे एका प्रवाशाने स्थानिक पोलिसांना सांगितले. ही बाब वरिष्ठांना कळविली असता, कन्नड शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील, पोलिस कर्मचारी कैलास करवंदे, राजेंद्र मुळे, गणेश चेळेकर, गजानन कराळे, अंकुश सरोदे, अमोल गायकवाड़ यांनी साडेबाराच्या सुमारास बसस्थानकाचा ताबा घेत. पेटीच्या चोहोबाजूने वाळूने भरलेली पोती लावण्यात आली. या पेटीपासूनचा दोनशे मीटर परिसरातील वाहने हलविण्यात आली. या परिसरातील वर्दळ थांबवण्यात आली,.

खबरदारीसाठी नगर परिषदेची अग्निशामक दलाची गाडी व दोन रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या. औरंगाबादहून श्वान व बाँब शोधक पथकास पाचारण करण्यात आले. दरम्यान, बसस्थानकात पेटीत बाँब आसल्याची अफवा शहरात पसरल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. कन्नड शहर पोलिस गर्दी नियंत्रणात ठेवली होती. दुपारी सव्वातीन वाजता बाँब शोधक पथकाचे भाऊसाहेब एरंडे, उदय वाडिया, रमेश वराडे, गोरख शेलार, सुनील दांडगे, शत्रुघ्न मडवी, श्वान पुंजलसह, गुन्हे व अंमली पदार्थ शोधक पथकाचे प्रकाश मिसार, नासेर पठाण, श्रीकांत जोग, हे खुशी, साशा श्वानसह दाखल झाले. बाँब शोधक पथकाने पेटीची तपासणी केली असता त्यात बाँब नसल्याची खात्री झाल्याने पेटी बाजूला मैदानात घेऊन उघडली. पेटीत वह्या, पुस्तके आणि काही कपडे आढळूले. यामुळे उपस्थित सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला व या नाट्यावर पडदा पडला. दरम्यान, कन्नड शहर पोलिसांनी प्रवासी वाहतूक विशिष्ट अंतर ठेवून सुरळीत ठेवली. कन्नड बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपयोग या पेटीच्या तपासासाठी उपयोग झाला नसल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक लाखाच्या ऐवजासह घरफोड्याला अटक

0
0

वाळूज महानगर : वाळूज महानगरात झालेल्या घरफोडीतील एका आरोपीला मंगळवारी (१८ सप्टेंबर) सकाळी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सुमारे एक लाख रुपयांचा चोरीच्या ऐवजासह ताब्यात घेतले आहे़

गौतम सुखदेव साळवे (३९, रा़ एकतानगर, हर्सूल, औरंगाबाद ह. मु. दत्तनगर फाटा, रांजणगाव शेणपूंजी ता़ गंगापूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या ताब्यातून रोख तीन हजार ९०० रुपये व चोरीचे ११ मोबाइल असा एकूण एक लाख आठ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे़ राजू बाबुराव बडक (रा़ साईनगर, सिडको, वाळूज महानगर) यांच्या घरी १८ ऑगस्ट रोजी चोरी झाली होती. त्याची तक्रार त्यांनी २२ ऑगस्ट रोजी पोलिसांत दिली होती. या प्रकरणाचा तपास करताना आरोपी साळवे यांनी त्यांच्या घरी चोरी केली असल्याचे कबूल केले; तसेच तेथून चोरलेले रोख ११ हजार ९०० रुपयांपैकी तीन हजार ९०० रुपये त्याच्याकडे आढळून आले आहे़त त्याच्या दत्तनगर येथील घराची झडती घेतली असता विविध कंपन्याचे चोरी केलेले अंदाजे किंमत एक लाख पाच हजार रुपयांचे ११ मोबाइल आढळून आले. ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

ही कारवाई पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलिस हेडकॉन्स्टेबल वसंत शेळके, रामदास गाडेकर, सुधीर सोनवणे, प्रकाश गायकवाड, आडीयाल, मनमोहन कोलीमी, देवीदास इंदोरे, बाळासाहेब आंधळे, बाळू लहरे, राजकुमार सूर्यवंशी, बंडू गोरे यांनी पार पाडली आहे. आरोपीविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हेडकॉनस्टेबल एस. जी. जोगस हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धाराशायी वृक्षाला श्रद्धांजली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण रोडवरील डॉ. बाऱ्हाळे हॉस्पिटल शेजारचे वडाचे झाड सार्वजनिक बांधकाम विभागाने विनापरवानगी तोडले. या झाडाला निसर्गप्रेमींनी मंगळवारी श्रद्धांजली अर्पण केली. यानिमित्त झाड तोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणी करत कांचनवाडी भागात वृक्षारोपण करण्यात आले.

रस्ता रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पैठण रोडवरील वडाचे तोडण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेतली नाही. परवानगी न घेता झाडाची कत्तल केल्याच्या निषेधार्थ निसर्गप्रमींकडून मंगळवारी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला सृष्टी संवर्धन संस्था, वुई फॉर एनव्हालयर्लमेंट, सलीम अली सरोवर संवर्धन समिती, निसर्ग मित्र मंडळ, प्रयास ग्रुप, जनसहयोग सेवाभावी सामाजिक संस्था या संस्थांच्या प्रतिनिधींसह निसर्गप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिका आयुक्तांना निवेदन देण्याचा निर्णय श्रद्धांजली सभेनंतर घेण्यात आला. वृक्षतोड प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला खुलासा निसर्ग प्रेमींनी उपलब्ध करून द्यावा व त्या आधारे आक्षेप मांडण्याची संधी द्यावी, यापुढे वृक्ष प्राधिकरणाच्या मान्यतेशिवाय कोणतेही झाड तोडू नये, आदी मागण्या निवेदनात करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफारी पार्कसाठी सहा कंपन्यांचा पुढाकार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सफारी पार्क विकसित करण्यासाठी महापालिका प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेची (पीएमसी) नियुक्ती करणार आहे. पीएमसी नियुक्तीकरिता सहा कंपन्यांनी पुढाकार घेत मंगळवारी 'प्री-बिड' बैठकीत सहभाग घेतला.

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या उपस्थितीत 'प्री-बिड' बैठक घेण्यात आली. यावेळी उपायुक्त वसंत निकम, सफारी पार्कसाठी नियुक्त केलेले नोडल ऑफिसर उपअभियंता खमर, ग्रीन प्रो इंडिया कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीचे किरण उंदरे, एच. एस. के. डिझायनर अँड कन्सलटंट इंटरनॅशनल कंपनी लि.चे रहीम सिद्दीकी, महंम्मद युनूस अँड असोसिएटस्, डी. पी. डिझायनर यांच्यासह दिल्ली व नागपूर येथील प्रत्येकी एका कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. सफारी पार्कची एकूण जागा, तेथे अपेक्षित विकास काम, पार्कमध्ये ठेवण्यात येणारे प्राणी याबद्दल 'प्री-बिड' बैठकीत चर्चा झाली. पीएमसी संदर्भात निविदा दाखल करण्याची शेवटची तारीख पाच आक्टोबर आहे. त्यामुळे या बैठकीनंतर कंपन्यांतर्फे पाच ऑक्टोबरपर्यंत निविदा दाखल केल्या जाण्याची शक्यता आहे.

\Bमास्टर प्लान करणार\B

पीएमसीची नियुक्तीनंतर सर्वप्रथम सफारीपार्कचा मास्टर प्लान तयार केला जाणार आहे. हा आराखडा केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर सफारी पार्कच्या विकासाबद्दल पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’साठी महापौर करणार पाठपुरावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीच्या प्रस्तावाबद्दल आता स्वत: महापौर राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांना पत्र लिहिणार आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर प्रस्तावाच्या आधारे शक्य तेवढ्या लवकर उचित निर्णय घ्या, अशी विनंती ते परदेशी यांना करणार आहेत.

समांतर जलवाहिनीच्या कराराचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या निर्णयाचा कारणापुरता उतारा प्रत, कंपनीचा प्रस्ताव, महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव यांचा समावेश असलेला एकत्रित प्रस्ताव आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी राज्य शासनाच्या नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे पाठवला आहे. म्हैसकर यांच्याकडून आयुक्तांनी पाठवलेला प्रस्ताव अतिरिक्त मुख्य सचिवांच्या कार्यालयात पाठवण्यात आला आहे. आयुक्तांनी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना पाठवलेल्या कागदपत्रांना महापौरांचे 'कव्हरिंग लेटर' जोडून ते अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पाठवण्यात येणार आहे. कंपनीने दिलेला प्रस्ताव, त्यावर पालिका आयुक्तांनी तयार केलेला प्रस्ताव आणि या दोन प्रस्तावाच्या अनुशंगाने सर्वसाधारण सभेने घेतलेला निर्णय या सर्वांचे अवलोकन करून कराराच्या पुनरुज्जीवनाबद्दल लवकरात लवकर उचित निर्णय घ्यावा, अशी विनंती परदेशी यांना केली जाणार आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

\Bमुख्यमंत्र्यांनाही अद्याप मिळाला नाही प्रस्ताव \B

अतिरिक्त मुख्य सचिवांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवल्यामुळे तो मुख्यमंत्र्यांना अद्याप मिळालेला नाही. या प्रक्रियेची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी घेतली. समांतरच्या कराराचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्याना प्राप्त झाला नसल्याने प्रवीणसिंह परदेशी यांच्या नावे स्वत:च पत्र लिहिण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूमिगत’ला आठ दिवसांत धक्का

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भूमिगत गटार योजनेच्या कामाचा कृती आराखडा येत्या आठ दिवसात महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक महापौरांसह पदाधिकाऱ्यांना सादर करणार आहेत. कंत्राटदाराचे पेमेंट थकले व कर्जप्रकरणाला गती न मिळाल्याने चार महिन्यांपासून भूमिगत गटार योजनेचे काम बंद आहे. हे काम बंद पडल्यामुळे अनेक भागातील नागरिकांचे हाल होत आहेत.

केंद्र सरकारच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्किम फॉर स्मॉल अँड मिडियम टाउन्स या योजनेतून औरंगाबाद शहरासाठी भूमिगत गटार योजना मंजूर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने ३६४ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली. परंतु, महापालिकेची निविदा प्रक्रिया झाल्यानंतर या योजनेची किंमत ४६५ कोटी रुपये झाली आहे. तीन वर्षांपासून योजनेचे काम सुरू आहे, पण अद्याप ते पूर्ण झालेले नाही. महापालिकेने पेमेंट न केल्यामुळे कंत्राटदाराने चार महिन्यांपासून काम बंद केले आहे. योजनेचे काम करण्यासाठी निधी कमी पडत असल्यामुळे कर्ज काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. पण, त्यालाही यश मिळालेले नाही. त्यामुळे ही योजना रखडली आहे.

भूमिगत गटार योजनेच्या नावाखाली महापालिकेने नागरिकांकडून 'सिवरेज टॅक्स'च्या माध्यमातून कर वसूल केला. वसूल करण्यात आलेल्या कराचा आकडा सुमारे साठ ते सत्तर कोटी रुपये आहे. नागरिकांकडून कर वसूल केल्यानंतर देखील कर्ज काढण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू होते. या संदर्भात महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, 'सिवरेज टॅक्स'पोटी वसूल करण्यात आलेला पैसा आता कर्ज न काढता योजनेच्या कामासाठी खर्च केला जाईल. भूमिगत गटार योजनेच्या एकूणच कामाबद्दल येत्या आठ दिवसांत आयुक्त कृती आराखडा तयार करणार आहेत. आराखडा तयार केल्यानंतर योजनेच्या उर्वरित कामांना गती मिळेल.

माजी सैनिकांच्या नागरिक मित्र पथकाचे उद्घाटन दोन ऑक्टोबर रोजी केले जाणार आहे. नऊ झोन कार्यालयाच्या अंतर्गत नऊ पथके स्थापन केली जाणार आहेत. महापालिकेतून मोठ्या प्रमाणावर अधिकारी निवृत्त होत आहेत. त्यामुळे मनुष्यबळाचा प्रश्न निर्माण होत आहे. निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी काहीजणांना मानधनावर पुन्हा पालिकेच्या सेवेत घेण्याबद्दल देखील येत्या चार-पाच दिवसांत निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती महापौरांनी दिली.

\Bविकास कामांचे पैसे द्या\B

महापालिकेत विद्युत आणि पाणी पुरवठा भागासाठी काम करणाऱ्या कंत्राटदारांचे पेमेंट चार-पाच महिन्यांपासून थांबवण्यात आले आहे. पेमेंट मिळत नसल्यामुळे कंत्राटदारांनी काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे विकास कामांचे पैसे द्या, अशी शिफारस महापौरांनी आयुक्तांना केली. त्यानुसार आयुक्त कंत्राटदारांशी चर्चा करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटरांकडून मागवला कामांच्या दराचा तपशील

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दीडशे कोटी रुपयांच्या निधीमधून करावयाच्या रस्त्यांच्या कामांच्या निविदा १५ ते २० टक्के जादा दराने प्राप्त झाल्यामुळे महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी त्या कंत्राटदारांकडून दरांचा तपशील मागवला आहे. त्यांच्याकडून तपशील प्राप्त झाल्यानंतर कंत्राटदारांसोबत वाटाघाटी करून पुढील प्रकिया पूर्ण केली जाणार आहे.

उच्च न्यायालयातील याचिका काही कंत्राटदारांनी मागे घेतल्यामुळे दीडशे कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. दीडशेंपैकी सव्वाशे कोटी रुपये किंमतीच्या रस्त्यांची कामे लगेचच सुरू होण्याची शक्यता आहे. या कामांसाठी प्राप्त निविदा उघडल्यावर कंत्राटदारांनी १५ ते २० टक्के जादा दराने निविदा भरल्याचे स्पष्ट झाले आहे. जादा दराने निविदा प्राप्त झाल्यामुळे पालिका आयुक्तांनी त्या कंत्राटदारांकडून दराबद्दलचा तपशील मागवला आहे. जादा दराने निविदा भरल्याचे कारण त्यांना तपशीलातून अपेक्षित आहे. अपेक्षित तपसील मिळाल्यानंतर पालिका आयुक्त स्वत: त्या कंत्राटदारांबरोबर वाटाघाटी करणार आहेत. वाटाघाटी झाल्यानंतर निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत ठेवल्या जातील. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर महापालिका कंत्राटदारांबरोबर करार करेल, त्यानंतर वर्क ऑर्डर दिली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

\Bयांच्या निविदा प्राप्त \B

जीएनआय, राजेश कंस्ट्रक्शन्स, जेपी कंस्ट्रक्शन्स आणि मस्कट कंस्ट्रक्शन या कंत्राटदाराच्या निविदा रस्त्यांच्या कामांसाठी प्राप्त झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिबट्याची दहशत कायम

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

शेतकऱ्याला ठार मारल्याच्या घटनेला १५ दिवस उलटल्यावरही वन विभागाने नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त केला नाही. सध्या तालुक्यात या बिबट्याची दहशत वाढतच आहे. बिबट्याने मंगळवारी नवगाव येथील शेतकऱ्याच्या दोन शेळ्या फाडून खाल्या. बिबट्याला ताबडतोब ठार मारण्याचे आदेश देण्याची मागणी आमदार संदीपान भुमरे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.

तालुक्यातील दक्षिण-पूर्व भागात गेल्या सहा महिन्यांपासून बिबट्या शेतकऱ्याच्या जनावरांना ठार मारत आहे. सहा सप्टेंबर रोजी या बिबट्याने आनंदपूर येथील भारत ठेणगे या शेतकऱ्याला ठार मारले होते. या घटनेनंतर आनंदनपूर व परिसरातील जवळपास २० गावांमध्ये या बिबट्याची दहशत व भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्या नरभक्षक झाल्याने २० गावांतील शेतकरी शेतात जाण्यास घाबरत असून, यामुळे या परिसरातील शेतीच्या कामांवर विपरित परिणाम होत आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी त्यांची जनावरे गावात बांधून ठेवली आहे.

नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने या परिसरात दोन पिंजरे लावले असून, वन विभागाच्या दोन पथकांतील जवळपास २५ कर्मचारी दिवस-रात्र बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र शेतकऱ्याला ठार मारण्याचा घटनेला १५ दिवसांचा कालावधी लोटल्यावरही अद्याप वन विभागाला या बिबट्याला पकडण्यात यश आलेले नाही. बिबट्याने मंगळवारी नवगाव येथील सुबान सालार पठाण यांच्या शेतातील दोन बकऱ्या अक्षरशः फाडून खाल्या. या घटनेमुळे या परिसरातील २० गावांतील गावकरी व शेतकऱ्यांमध्ये अधिकच दहशत पसरली आहे. या बिबट्याला ताबडतोब जेरबंद करा अथवा ठार मारा, अन्यथा याविरुद्ध मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.

\Bवन कर्मचारी प्रशिक्षित नाहीत\B

आनंदपूर येथील शेतकऱ्याला ठार मारल्याच्या घटनेनंतर लोकांचा संताप लक्षात घेऊन वन विभागाचे जवळपास ३० कर्मचारी दिवस-रात्र बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र सध्या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत असलेल्या एकाही कर्मचाऱ्याला बिबट्या पकडण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. यामुळे आम्ही या बिबट्याला पकडूच शकत नाही, अशी माहिती वन विभागाच्या एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. नागपूर येथून तज्ज्ञ पथक बोलावल्याशिवाय या बिबट्याला पकडणे अवघड असल्याचीही माहिती या कर्मचाऱ्याने दिली.

\Bबिबट्याला ठार मारा

\Bआनंदपूर भागातील नरभक्षक बिबट्यामुळे या भागात दहशत पसरली असून, शेतीची कामे रखडली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करा किंवा याला ताबडतोब ठार मारा, अशी मागणी आमदार संदीपान भुमरे यांनी निवेदनाद्वारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोरल्याने मित्राचा खून

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पडेगाव येथील चैतन्यनगर भागात गुरुवारी सकाळी आढळलेल्या तरुणाच्या खुनाचे रहस्य उलगडण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. मोबाइल चोरल्याचा राग आल्याने योगेश साहेबराव आहेर याचा त्याचाच मित्र राजू शेकलाल लोखंडे या ट्रॅक्टरचालकाने खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.

गुरुवारी सकाळी चैतन्यनगर भागातील एका नाल्यामध्ये योगेश आहेर (वय ३० रा. चैतन्यनगर, पडेगाव) या मजुराचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहाच्या अंगावर मारहाणीच्या खुना होत्या. याप्रकरणी घटनास्थळी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय राहुल सूर्यतळ यांनी भेट दिली होती. तपासादरम्यान योगेशचा भाऊ गणेशने बुधवारी रात्री योगेशसोबत असलेल्या राजू लोखंडे नावाच्या मित्राच्या मोबाइलवरून आपले योगेशसोबत बोलणे झाल्याची माहिती दिली. या माहितीवरून पोलिसांनी तांत्रिक माहितीद्वारे पुरावे गोळा केले. संशयित आरोपी राजू लोखंडे (वय ४० रा. मूळ, माळेगाव वासडी, ता. कन्नड, सध्या रा. शरणापूर) हा पसार झाला होता. मंगळवारी तो शरणापूर येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून पथकाने सापळा रचून आरोपी राजू लोखंडेला जेरबंद केले. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, एसीपी डॉ. नाथनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय राहुल सूर्यतळ,जमादार संतोष सोनवणे, बापूराव बावीस्कर, लालखान पठाण, नंदलाल चव्हाण, योगेश गुप्ता, रितेश जाधव, विरेश बने, हिरासिंग राजपूत आदींनी केली.

\Bडोक्याला गंभीर जखम\B

योगेश आहेरच्या भावाने नवा टेंपो घेतला होता. याचा आनंद म्हणून पार्टी करण्यासाठी योगेश व राजू गेले होते. राजूच्या दुचाकीवर दोघे सोबत गेले. त्यांनी दारूच्या बाटल्या सोबत नेल्या. दारू पिल्यानंतर योगेशने राजूचा मोबाइल घेत पँटमध्ये मागच्या बाजूला लपून ठेवला. राजूने मोबाइल शोधल्यानंतर आपल्याला माहित नसल्याचे योगेशने सांगितले. मात्र, झडतीमध्ये योगेशजवळ हा मोबाइल सापडला. यामुळे संतापलेल्या राजूने योगेशला बेदम मारहाण केली. यामध्ये दुचाकीवर पडल्याने योगेशच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्याला तसेच सोडून राजू पसार झाला. जखमी योगेशचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी हा प्रकार उघडकीस आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाडव्याला सिटी बसचे लोकार्पण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिटी बससाठी महापौरांनी आता दिवाळीच्या पाडव्याचा मुहूर्त ठरवला आहे. दिवाळीच्या पाडव्याला पहिल्या टप्प्यातील तीस बसचे लोकार्पण केले जाईल, अशी माहिती त्यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

औरंगाबाद स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत सिटी बस सेवा सुरू केली जाणार आहे. शहराची लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेता दीडशे सिटी बसची आवश्यकता आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात शंभर सिटी बस खरेदीचा निर्णय 'एसपीव्ही'च्या बैठकीत घेण्यात आला. बसचा पुरवठा करण्याचे कंत्राट टाटा कंपनीला दिले आहे. कंपनीकडून येत्या १५ दिवसांत 'सॅम्पल बस' उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानंतर शंभरपैकी तीस बसचा पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती महापौरांनी दिली. पहिल्या टप्प्यातील तीस बस दिवाळीच्या सुमारास प्राप्त होतील आणि दिवाळीच्या पाडव्याला त्यांचे लोकार्पण केले जाईल, असे त्यांनी सांगितले. महापालिका किंवा 'एसपीव्ही'कडे सिटी बस चालवण्याची यंत्रणा नसल्यामुळे एसटी महामंडळाच्या मदतीने पाच वर्षे सिटी बस सेवा चालवली जाणार आहे. सिटी बस चालवण्यासाठी आवश्यक कर्मचारी एसटी महामंडळाकडून घेतले जाणार असून त्यांचा पगार 'एसपीव्ही'च्या माध्यमातून केला जाणार आहे.

\Bस्मार्ट बस थांबे बांधणार\B

टाटा कंपनीकडून बस उपलब्ध होईपर्यंत परिवहन समितीची बैठक घेवून तिकिटाचे दर, बसचा मार्ग ठरविला जाणार आहे. दरम्यानच्या काळात स्मार्टसिटी प्रकल्पातून स्मार्ट बस थांब्यांची निर्मिती केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेशी काडीमोड; जाधव यांची घोषणा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी जाती-जातीमधील तेढ निर्माण करत सामाजिक विषमता कशी वाढेल यासाठी प्रयत्न केले. मी मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा दिलेला असून, सामाजिक समतेसाठी नव्या राजकीय पक्षाची स्थापना करत असल्यामुळे माझा आता शिवसेनेशी संबंध उरला नाही,' अशी घोषणा मंगळवारी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली.

नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्यासाठी जाधव यांनी तापडिया नाट्यमंदिरामध्ये अठरा पगड जातीच्या लोकांच्या उप‌िस्थितीत चिंतन बैठक घेतली. यावेळी नवा राजकीय पक्ष काढत असल्याची घोषणा त्यांनी केली. ते म्हणाले, 'पक्षाचे नाव निश्चित केले असून येत्या दोन महिन्यांमध्ये तांत्रिक बाबी पूर्ण होतील. पक्षाच्या कार्यकारी मंडळामध्ये प्रत्येक धर्मातील वीस लोक राहणार असून, पक्षासंदर्भात या मंडळातील सदस्य निर्णय घेतील. राजकीय पक्षाची घोषणा केल्यामुळे साहजिकच मी शिवसेना सोडली का, असा प्रश्‍न समोर येतो. माझ्या वतीने आज शिवसेनेशी संबंध संपला. आपला शिवसेनेशी कुठलाही वाद नाही, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. येणाऱ्या काळातही ते तसेच राहतील. ते मला जीव लावतात. मी त्यांना जीव लावतो, पण पक्षधोरण पटले नाही. मराठा आरक्षणाविषयी मला बोलू नका असे सांगितले. आता मी ‌विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेशी संबंध उरला नाही.' दरम्यान, चिंतन बैठकीमध्ये अठरा पगड जातीतील लोकांच्या प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी पक्ष काढणे सोपी गोष्ट नसल्याचे काही प्रतिनिधींनी सांगितले, तर काहींनी खासदारकीला उभे राहण्याचा सल्ला दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावणीतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ज‍ळगाव रोडवरील 'सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन'च्या वतीने छावणी परिसरातील विद्यादीप बालगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते आदेश आटोटे यांचे व्याख्यान झाले. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. तुळशीदास कवचट, 'एसएफआय'चे जिल्हा सहसचिव स्टॅलिन आडे, स्वच्छ भारतचे विभागीय समन्वयक विजय रकटे, बालगृहाच्या अधीक्षक सिस्टर डिव्हिना आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी आटोटे म्हणाले, आज उच्चशिक्षित व उच्चपदस्थ लोकांचे आई-वडील वृद्धाश्रमात बघायला मिळत आहेत, ही अत्यंत शोकांतिका आहे. त्यासाठीच आजच्या मुलांमध्ये संस्कार रुजवणे खऱ्याअर्थाने काळाची गरज आहे. त्याचवेळी स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करावे म्हणजे यशाचा मार्ग सापडेल, असेही आवाहन आटोटे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. मारुती राऊत यांनी केले, तर अॅड. सोमनाथ वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. अॅड. रामेश्वर घिरटे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी श्री. लष्करे, गणेश शेजळ, गोविंद इंगळे आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलयुक्तच्या ६०० कामांचे ऑडीट होणार

0
0

(मोठी सिंगल)

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार अभियान कामामध्ये होत असलेल्या अनियमिततेच्या अनेक तक्रारी अभियान सुरू झाल्यापासून आहेत. दरम्यान सिमेंट बंधाऱ्यांचे काम न करताच बिल उचलल्याचे प्रकरण पोलिसांत गेल्यानंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात जलयुक्तच्या ६०० कामांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता बंधारा प्रकरणात अफरातफर करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले.

शिवारातील पाणी ‌शिवारातच जिरवून टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अंतर्गत नदी- नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, सिमेंट बंधारे बांधणे यासह इतर कामे करण्यात येतात. मात्र, या कामांमध्ये गैरव्यवहार करण्यात येत असल्याच्या तक्रारींची संख्याही मोठी आहे. औरंगाबाद जिल्ह्यात बंधाऱ्याच्या बांधकाम प्रकरण पोलिसांपर्यंत गेले आहे. जिल्ह्यातील आडगाव जावळे येथे अशीच अनियमिता होऊन अफरातफर करण्यात आली आहे. यातून राज्य शासनाची मोठी फसवणूक झाल्याचे समितीने केलेल्या चौकशीत समोर आले आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेत जिल्हा प्रशासनाने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामांचे 'थर्ड पार्टी ऑडिट'करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील जलयुक्तच्या ६०० कामांची चौकशी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डे केअर’मध्ये औषधांचा ठणठणाट

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये म्हणजेच 'मिनी घाटी'मध्ये हिमोफिलिया, थॅलेसेमिया, सिकल सेलच्या रुग्णांसाठी नुकताच स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला असला तरी या विभागामध्ये उपचार करण्यासाठी लागणाऱ्या किमान महत्वाच्या औषधांचा कित्येक दिवसांपासून ठणठणाट कायम आहे. विभागाच्या उद्घाटनावेळी हिमोफिलिया रुग्णांसाठी काही प्रमाणात फॅक्टर उपलब्ध करण्यात आले खरे; पण ते अवघ्या काही दिवसांत संपले. त्यानंतर पुन्हा कसे-बसे उपलब्ध करण्यात आलेले फॅक्टरही आठवड्यात संपले. त्यामुळे नियमित स्वरुपात फॅक्टर कधी उपलब्ध होणार आणि थॅलेसेमिया, सिकल सेल रुग्णांवरील उपचारांचे काय, असा थेट सवाल उपस्थित होत आहे.

मोठा गाजावाजा झालेल्या 'मिनी घाटी'च्या उद्घाटनाला प्रत्येक वेळी बगल देण्यात आली व अजूनही रुग्णालयाचे उद्घाटन कधी होणार याविषयी संभ्रम आहेच; तरीही काही महिन्यांपूर्वी रुग्णालयाची ओपीडी गुपचुप सुरू करण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हिमोफिलिया, थॅलेसेमिया, सिकल सेल रुग्णांसाठी 'डे केअर सेंटर' सुरू करण्यात आले. याच केंद्राच्या उद्घाटनानिमित्त हिमोफिलियाग्रस्तांना लागणारे फॅक्टर रुग्णांना देण्यात आले. मात्र उद्घाटनासाठी उपलब्ध करण्यात आलेले ७० ते ८० फॅक्टर त्याच दिवशी संपून गेले. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी केंद्रामध्ये पुन्हा ८० फॅक्टर उपलब्ध करण्यात आले व हे फॅक्टर १४ सप्टेंबर रोजी संपले. तेव्हापासून केंद्रामध्ये फॅक्टरचा ठणठणाट आहे. अर्थात, केवळ फॅक्टरचा नव्हे तर थॅलेसेमिया, सिकल सेल रुग्णांना लागणाऱ्या बहुतांश औषधांचाही या ठिकाणी ठणठणाट आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाडा विभागाच्या आठ जिल्ह्यांसह जळ‍गाव, वाशिम, धुळे आदी डझनभर जिल्ह्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या 'डे केअर सेंटर'मध्ये रुग्णांना नियमित औषधी कधी उपलब्ध होणार, हा खरा प्रश्न आहे.

'आयर्न चिलेशन'ची मागणी दुर्लक्षित

थॅलेसेमिया सोसायटीनुसार संपूर्ण मराठवाड्यात ८ ते १० हजार थॅलेसेमियाचे रुग्ण आहेत आणि प्रत्येक रुग्णाला प्रत्येक महिन्याला देण्यात येणाऱ्या रक्तामुळे शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणात लोह साचून विविध अवयव निकामी होण्याची भीती असते; म्हणूनच जवळजवळ प्रत्येक रुग्णाने प्रत्येक महिन्याला 'आयर्न चिलेशन'च्या गोळ्या घेणे अपेक्षित असते. त्यामुळेच महागड्या 'आयर्न चिलेशन'सह इतर औषधांचा व रक्ताचा पुरवठा करावा, अशी औरंगाबाद थॅलेसेमिया सोसायटीची पूर्वीपासून मागणी आहे. या संदर्भात २८ ऑगस्टलाही पुन्हा एकदा लेखी मागणी करण्यात आली होती. मात्र या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असून, नियमित औषधी पुरवठ्याबाबत अजूनही कोणतेच नियोजन नसल्याचे स्पष्ट झाले आहे. थॅलेसेमियाचे आठ ते दहा हजार, हिमोफिलियाचे सुमारे एक हजार, तर सिकल सेलचे पाचशे, अशा सुमारे दहा हजारांवरील रुग्णांसाठी 'डे केअर सेंटर' पूर्ण क्षमतेने सुरू व्हावे, अशी मागणी आहे.

'डे केअर सेंटर'मध्ये नियमित औषधी-साहित्याचा पुरवठा करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. या केंद्रासाठी तब्बल ८ कोटींचा निधी पडून होता, तो कुठे वळविण्यात आला, याचा शोध लागणे गरजेचे आहे. हे केंद्र इतर जिल्ह्यांसाठीही असल्याने त्यातुलनेत औषधांचा पुरवठा झाला पाहिजे.

- अशोक मानकर, सचिव, औरंगाबाद हिमोफिलिया सोसायटी

थॅलेसेमियाचे सर्वाधिक ८ ते १० हजार रुग्ण आहेत आणि या रुग्णांसाठी 'आयर्न चिलेशन'च्या गोळ्यांसह इतर औषधी व आपत्कालिन आरोग्य सेवा मिळणे गरजेचे आहे. या औषधींचा साठा करुन ठेवण्यासाठी लागणारे 'डीप फ्रिजर्स'देखील केंद्रात उपलब्ध असणे गरजेचे आहे.

- अनिल दिवेकर, सचिव, औरंगाबाद थॅलेसेमिया सोसायटी

हिमोफिलियाग्रस्तांसाठी 'फॅक्टर'ची मागणी करण्यात आली आहे. लवकरच केंद्रामध्ये फॅक्टर उपलब्ध होतील, अशी आशा आहे. इतरही औषधोपचारांसाठी प्रयत्न सुरू आहेत.

- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंतरराष्ट्रीय कार्गोला बीसीएसची मंजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

विमानतळावर आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू करण्याची प्रक्रिया मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू करण्यासाठी सुरक्षा समितीकडून परवानगी मिळालेली आहे. विमानतळावरून जाणाऱ्या सामानाची तपासणी करण्यासाठी 'कस्टम' अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. या नियुक्तीनंतर ही सेवा लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली.

औरंगाबाद विमानतळावरून कृषी उत्पादित माल, औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या यासह अन्य वस्तू व मालांचे उत्पादन करणाऱ्या व्यवसायिकांना आपला माल थेट विदेशात नेऊन विकता यावा तसेच विदेशातील माल थेट शहरात आणून विकता यावा यासाठी आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही सेवा सुरू करण्यापूर्वी देशांतर्गत कार्गो सेवा खासगी ठेकेदाराकडे देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. औरंगाबाद विमानतळ प्राधिकरणाच्या संचालकपदाचा कारभार डी. जी. सावळे यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी पुन्हा आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शहरातील उद्योजकांनीही यासाठी बरेच प्रयत्न केले. दिल्लीत नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. त्यांनी कार्गो सुविधा सुरू करण्याबाबत आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. आंतरराष्ट्रीय कार्गोसाठी आवश्यक साधनसामुग्री पाठविण्याची कारवाई करण्यात आली. यात स्कॅनिंग मशीन, तसेच लिफ़्टर यांचा समावेश आहे. हे साहित्य आल्यानंतर बोर्ड ऑफ सिव्हील सेक्युरिटीज (बीसीएस) च्या समितीने नियोजित जागेची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी विमानतळाच्या जुन्या इमारतीत आंतरराष्ट्रीय कार्गो हब सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. समितीकडून परवानगी मिळाल्यानंतर आता कार्गो सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मात्र, यामध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या कस्टम विभागाच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. औरंगाबाद विमानतळाला कस्टमची परवानगी मिळालेली आहे. कार्गो सेवा सुरू करण्यासाठी कस्टम विभागाचे कर्मचारी नेमणूक आवश्यक आहे. यासाठी विमानतळ कार्यालयाकडून कस्टम विभागाला पत्र देण्यात आले आहे. नागपूर कमिश्नर कार्यालयाकडून कस्टम अधिकारी नेमणूक तसेच सॉफ्टवेअर बसविण्याचे काम झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

……………………

दिवाळीपूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न

विमानतळ प्राधिकरणाकडून आंतरराष्ट्रीय कार्गो सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. कस्टम विभागाला अधिकारी नेमणूक करण्याबाबतचा पत्रव्यवहार सुरू आहे. ही मान्यता मिळाल्यास दिवाळीपूर्वी आंतरराष्ट्रीय कार्गो सुरू करण्यात अडचण राहणार नाही.

डी. जी. साळवे,

संचालक, औरंगाबाद विमानतळ प्राधिकरण

…………

कस्टम अधिकारी नेमणुकीसाठी पुढाकार घेणार

विमानतळावर कार्गो हब तयार करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाच्या प्रयत्नाला आमचा हातभार लागला. ही सेवा सुरू होण्यासाठी किंवा गुडस हॅण्डल करण्यासाठी कस्टम अधिकारी नेमणुकीच्या मुद्याबाबत आम्ही कस्टम कमिश्नरला भेटून हा प्रश्न मार्गी लाऊन लवकरात लवकर कार्गो सुविधा करण्यासाठी पुढाकार घेणार आहोत.

राम भोगले

अध्यक्ष, चेंबर ऑफ मराठवाडा इंड्रस्ट्रियल असोसिऐशन ऑफ अग्रिकल्चर (सीएमआयए)

…………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्युत रोषणाईने शहर उजळले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महालक्ष्मीचा सण संपल्यानंतर जुन्या शहरात देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. येत्या दोन दिवसांत जुन्या शहरात देखावे पाहण्यासाठी गर्दी अपेक्षित आहे. यंदा मंडळांनी ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांवर भर दिला आहे. त्याचबरोबर देखाव्यांसाठी ओळख असलेल्या मंडळांनी यावर्षी देखाव्यांऐवजी विद्युत रोषणाई केली आहे. यावर्षी देखाव्यांच्या तुलनेत झगमगत्या विद्युत रोषणाईने जुने शहर उजळून निघाले आहे.

शहरातील गुलमंडी, औरंगपुरा, मछली खडक, रंगारगल्ली, केळीबाजार, पानदरीबा, धावणी मोहल्ला, राजाबाजार, जाधवमंडी, शहागंज हे भाग गणेशोत्सवामध्ये गणपतीच्या देखाव्यासाठी प्रसिद्ध आहेत. या भागातील जुनी गणेश मंडळे ऐतिहासिक, धार्मिक देखाव्यासाठी; तसेच संगीत व डिस्को लाइटिंगसाठी ओळखली जातात. गणेशोत्सवामध्ये जुन्या शहरात गणपती पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होते. औरंगाबाद शहरात महालक्ष्मीचा सण संपल्यानंतर साधारणपणे नागरिक देखावे पाहण्यासाठी बाहेर पडतात. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. त्यामुळे शहरातील गणेशोत्सवातील देखावे देखील महालक्ष्मीचा सण संपल्यानंतरच खऱ्या अर्थाने सुरू करण्यात येतात. महालक्ष्मीचा सण संपून दोन दिवस उलटले आहेत, मात्र जुन्या शहरात देखावे बघण्यासाठी अद्यापही म्हणावी तशी गर्दी होत नसल्याचे दिसून आले आहे. तुरळक प्रमाणात गर्दी हे देखावे पाहण्यासाठी येत आहे. येत्या गुरुवारी मोहर्रमची सुटी आहे. त्यानंतर शुक्रवारी औद्योगिक सुटी आहे. त्याला जोडून चौथा शनिवार आहे. त्यामुळे उद्यापासून देखावे पाहण्यासाठी गर्दी वाढेल, असे मानले जात आहे.

\Bआकर्षक देखावे सादर\B

जुन्या शहरात मोजक्या मंडळानी देखावे सादर केले आहे. यामध्ये बजाज अॅटो कामगारांच्या शिवशक्ती गणेश मंडळाने खडकेश्वर मंदिराच्या मैदानावर स्मार्ट सिटीचा देखावा तयार केला आहे. औरंगपुरा पोलिस चौकीजवळील ओम गणेश मंडळाने जीवन हे सुंदर आहे. हा जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने कसे पाहता येईल, याचा संदेश देणारा देखावा सादर केला आहे. गुलमंडी येथील अष्टविनायक गणेश मंडळाने यंदाच्या वर्षी देखावा किंवा म्युझिक लाइटिंग सादर न करता गणरायाची केवळ स्थापना केली आहे. मछली खडक येथील संगम गणेश मंडळाने देखील यंदा देखाव्या ऐवजी बिजली या म्युझिक लाइटिंगवर भर दिला आहे. आकर्षक लाइटिंग व सुमधूर गीते यामुळे नागरिक या ठिकाणी गर्दी करताना दिसताना आहे. केळीबाजार येथील नृसिंह गणेश मंडळाने संत ज्ञानेश्वराचा देखावा यावर्षी सादर केला आहे. देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जाधवमंडी येथील यादगार गणेश मंडळाने यंदाच्या वर्षी देखील देखाव्याची परंपरा कायम ठेवली आहे. जागरण गोंधळ व वाघ्या मुरळीचा यांत्रिक देखावा त्यांनी सादर केला आहे. संस्थान गणपती मंडळाने देखील आपल्या धार्मिक देखाव्याची परंपरा कायम ठेवली आहे. संत तुकारामाचे महाराजांचे वैकुंठ प्रस्थान हा देखावा त्यांनी सादर केला आहे. हे देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. धावणी मोहल्ला येथील बाल कन्हैया गणेश मंडळाची गणरायाची भव्य आकर्षक मूर्ती देखील गर्दी खेचताना दिसत आहे. सावरकर चौक समर्थनगर येथील गणेश मंडळाने देखील यंदाच्या वर्षी विद्युत रोषणाई सादर केली आहे. जुना मोंढा भागातील महाराणा प्रताप गणेश मंडळाने भगवान शंकराचा भव्य देखावा सादर केला आहे.

\Bअनेक मंडळांचे देखावे नाही\B

जुन्या शहरात गणपती देखाव्यासाठी अनेक मंडळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहेत. यामध्ये नागेश्वरवाडी येथील नागेश्वर गणेश मंडळ, औरंगपुरा येथील तरुण मराठा गणेश मंडळ, टिळकपथ येथील नर्मदेश्वर गणेश मंडळ, मछली खडक येथील संगम गणेश मंडळ यांच्यासह इतर मंडळाचा समावेश आहे. या मंडळांनी यंदाच्या वर्षी देखावे सादर केले नसल्याने देखावे कमी असल्याचे जाणवते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’प्रवक्तेपदी खुंगर, राऊत, फारुकी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्ता पॅनलमधील ३१ जणांची यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी जाहीर केली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सुरजितसिंग खुंगर, निलेश राऊत आणि उमर फारुकी यांचा समावेश आहे. याशिवाय मराठवाड्यातून बीड जिल्ह्यातील उषाताई दराडे व अमरसिंह पंडित, तर उस्मानाबाद जिल्ह्यातून सक्षणा सलगर यांनाही संधी देण्यात आली आहे.

यादीमध्ये आठ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मुख्य प्रवक्ते म्हणून नवाब मलिक, तर प्रदेश प्रवक्तेपदी आमदार हेमंत टकले, खासदार वंदना चव्हाण, संजय खोडके यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुंडलिकराव सोळुंके यांचे निधन

0
0

औरंगाबाद : कोलते पिंपळगाव (ता. भोकरदन, जि. जालना) येथील रहिवासी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी पुंडलिकराव सखाराम सोळुंके (वय ८४) यांचे बुधवारी (१९ सप्टेंबर) रात्री घाटी रुग्णालयात निधन झाले. हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्याबद्दल केंद्र आणि राज्य शासनाने त्यांना मानपत्र देऊन गौरविले होते. त्यांच्या मागे पत्नी, चार मुले, दोन मुली आणि सुना, नातवंडे असा परिवार आहे. पिंपळगाव कोलते येथे गुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील देखाव्यांना गर्दीची प्रतिक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महालक्ष्मीचा सण संपल्यानंतर जुन्या शहरात देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यंदा मात्र दोन दिवस उलटले तरी देखावे पाहण्यासाठी म्हणावी तशी गर्दी येत नसल्याचे दिसून आले आहे; तसेच शहरातील देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अनेक मंडळानी यंदाच्या वर्षी देखाव्याकडे पाठ फिरवल्याचेही दिसून आले आहे.

शहरातील गुलमंडी, औरंगपुरा, मछली खडक, रंगारगल्ली, केळीबाजार, पानदरीबा, धावणी मोहल्ला, राजाबाजार, जाधवमंडी, शहागंज हे भाग गणेशोत्सवामध्ये गणपतीच्या देखाव्यासाठी प्रसिद्ध आहेत. या भागातील जुनी गणेश मंडळे ऐतिहासिक, धार्मिक देखाव्यासाठी; तसेच संगीत व डिस्को लाइटिंगसाठी ओळखली जातात. गणेशोत्सवामध्ये जुन्या शहरात गणपती पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होते. औरंगाबाद शहरात महालक्ष्मीचा सण संपल्यानंतर साधारणपणे नागरिक देखावे पाहण्यासाठी बाहेर पडतात. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. त्यामुळे शहरातील गणेशोत्सवातील देखावे देखील महालक्ष्मीचा सण संपल्यानंतरच खऱ्या अर्थाने सुरू करण्यात येतात. महालक्ष्मीचा सण संपून दोन दिवस उलटले आहेत, मात्र जुन्या शहरात देखावे बघण्यासाठी अद्यापही म्हणावी तशी गर्दी होत नसल्याचे दिसून आले आहे. तुरळक प्रमाणात गर्दी हे देखावे पाहण्यासाठी येत आहे. येत्या शुक्रवारी व शनिवारी सुटीच्या दिवशी देखावे पाहण्यासाठी गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

\Bमोजके, परंतु आकर्षक देखावे सादर\B

जुन्या शहरात मोजक्या मंडळानी देखावे सादर केले आहे. यामध्ये बजाज अॅटो कामगारांच्या शिवशक्ती गणेश मंडळाने खडकेश्वर मंदिराच्या मैदानावर स्मार्ट सिटीचा देखावा तयार केला आहे. औरंगपुरा पोलिस चौकीजवळील ओम गणेश मंडळाने जीवन हे सुंदर आहे. हा जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने कसे पाहता येईल, याचा संदेश देणारा देखावा सादर केला आहे. गुलमंडी येथील अष्टविनायक गणेश मंडळाने यंदाच्या वर्षी देखावा किंवा म्युझिक लाइटिंग सादर न करता गणरायाची केवळ स्थापना केली आहे. मछली खडक येथील संगम गणेश मंडळाने देखील यंदा देखाव्या ऐवजी बिजली या म्युझिक लाइटिंगवर भर दिला आहे. आकर्षक लाइटिंग व सुमधूर गीते यामुळे नागरिक या ठिकाणी गर्दी करताना दिसताना आहे. केळीबाजार येथील नृसिंह गणेश मंडळाने संत ज्ञानेश्वराचा देखावा यावर्षी सादर केला आहे. देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जाधवमंडी येथील यादगार गणेश मंडळाने यंदाच्या वर्षी देखील देखाव्याची परंपरा कायम ठेवली आहे. जागरण गोंधळ व वाघ्या मुरळीचा यांत्रिक देखावा त्यांनी सादर केला आहे. संस्थान गणपती मंडळाने देखील आपल्या धार्मिक देखाव्याची परंपरा कायम ठेवली आहे. संत तुकारामाचे महाराजांचे वैकुंठ प्रस्थान हा देखावा त्यांनी सादर केला आहे. हे देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. धावणी मोहल्ला येथील बाल कन्हैया गणेश मंडळाची गणरायाची भव्य आकर्षक मूर्ती देखील गर्दी खेचताना दिसत आहे. सावरकर चौक समर्थनगर येथील गणेश मंडळाने देखील यंदाच्या वर्षी विद्युत रोषणाई सादर केली आहे. जुना मोंढा भागातील महाराणा प्रताप गणेश मंडळाने भगवान शंकराचा भव्य देखावा सादर केला आहे.

\Bअनेक मंडळांचे देखावे नाही\B

जुन्या शहरात गणपती देखाव्यासाठी अनेक मंडळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहेत. यामध्ये नागेश्वरवाडी येथील नागेश्वर गणेश मंडळ, औरंगपुरा येथील तरुण मराठा गणेश मंडळ, टिळकपथ येथील नर्मदेश्वर गणेश मंडळ, मछली खडक येथील संगम गणेश मंडळ यांच्यासह इतर मंडळाचा समावेश आहे. या मंडळांनी यंदाच्या वर्षी देखावे सादर केले नसल्याने देखावे कमी असल्याचे जाणवते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images