Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शिक्षण चळवळीचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढत असतानाच सरकारने मात्र पैसा वाचविण्यासाठी नोकर भरती बंद केली आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाही. सकाळच्या शासन निर्णयात दुपारी दुरुस्ती व रात्री तो रद्द केला जातो, अशा सर्व परिस्थितीत शिक्षण चळवळीचे मोठे नुकसान होत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीष चव्हाण यांनी केला.

मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे गुरुवारी औरंगाबाद जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनेच्या १६ व्या वर्धापन दिन व सेवा गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे उद्घाटन आमदार चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर महामंडळाचे अध्यक्ष एस. डी. डोंगरे होते. तर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळाचे अध्यक्ष रमेश गिरी, शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब चव्हाण, शिक्षण विभागाचे लेखाधिकारी प्रदीप बाहेकर, उपशिक्षणाधिकारी गजानन सुसर, अरविंद कापसे, संघटनेचे अध्यक्ष वाल्मिक सुरासे, कार्याध्यक्ष भारत चाटे, कार्यवाह आसाराम शेळके आदी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर बोलताना आमदार चव्हाण यांनी शिक्षकेत्तर कर्मचारी हा दुर्लक्षित घटक असून त्यांची संघटना चालविणे अवघड असल्याचे नमूद करत संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. 'पूर्वीपेक्षा शाळा, विद्यार्थी यांची संख्या भरमसाठ वाढली पण, त्या तुलनेत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. मराठी विषयाच्या शिक्षकाला गणित व अन्य विषय शिकविण्यासाठी दिले जात आहे. तर दुसरीकडे सरकारने नोकर भरती बंद केली आहे', असे ते म्हणाले.

शिक्षणाधिकाऱ्यांची संख्याही वाढवली पाहिजे. शाळांची संख्या वाढल्याने हे अधिकारी मराठी शाळांनाच भेट देऊ शकत नाहीत. त्यात इंग्रजी शाळांना केव्हा भेटी देत दर्जा तपासणार, असा सवाल ही आमदार चव्हाण यांनी केला. अपवाद वगळता अनेक इंग्रजी शाळाची अवस्था वाईट आहे. दोन ते तीन हजार पगार घेणारे शिक्षक काय शिकविणार, असा सवाल त्यांनी करत काही घेतलेल्या मुलाखतीत मुख्याध्यापकांनाही इंग्रजीत बोलता आले नाही. मग त्या विद्यार्थ्यांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला.

अर्धवेळ ग्रंथपाल या पदावर त्यांनी आक्षेप घेत अशा कर्मचाऱ्यांनी अर्धा दिवस काम केल्यानंतर काय जनावरे चरण्यासाठी न्यावे का, असा संतप्त सवाल केला. शाळा लहान असो कि मोठी, विद्यार्थी किती ही असो प्रत्येक ठिकाणी ग्रंथपालाचे पद हे पूर्णवेळ पाहिजे, अर्धवेळ ग्रंथपाल हे रद्दच झाले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. शिक्षण व आरोग्य हे सरकारची मूलभूत कर्तव्य, जबाबदारी आहे. त्याकडे दुर्लक्ष करणारे सरकार चालविण्यास लायक नाहीत मग सरकार कोणाचे का असेना, असा टोलाही त्यांनी मारला.

सेवा गौरव पुरस्कार -

या कार्यक्रमात सेवानिवृत्त झालेले शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिमा पांडे, प्राजक्ता पुराणिक, मनोहर म्हस्के, अंबादास बोंगाने, लक्ष्मीकांत देशमुख, मुकुंद हिवाळे,वसंत पठारे, मुकुंद निकाळजे यांना मान्यवरांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर उल्लेखनीय कार्य करणारे जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे उपाशिक्षणाधिकारी गजानन सुसर यांना आदर्श अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यातील निराधारांची हेळसांड थांबेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संजय गांधी निराधार योजनेचा आधार मिळवण्यासाठी जिल्ह्यातील लाभार्थी गेल्या तीन वर्षांपासून धडपडत आहेत. गेल्या दहा महिन्यांपासून समितीच्या बैठकाच न झाल्यामुळे जिल्ह्यातील प्रकरणे प्रलंबित आहेत. आता यापैकी सुमारे ११९४ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून अद्यापही आठशेवर प्रकरणे जैसे थे आहेत.

या योजनेत अनुदान मिळावे यासाठी २०१५ - १६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुमारे दोन हजार जणांनी अर्ज केले आहेत. या योनजेअंतर्गत अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजारांनी ग्रस्त व्यक्ती, निराधार, वृद्ध व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, घटस्फोटित महिलांना अर्थसाहाय्य देण्याचे काम करण्यात येते. यामध्ये लाभार्थींना दर महिन्याला ६०० रुपये अनुदान या योजनेअंतर्गत देण्यात येते़ यातील सुमारे १ हजार अर्ज २०१५-१६ मधील असून त्यानंतर जून २०१८ अखेरपर्यंत उर्वरित अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी संजय गांधी निराधार योजना समिती स्थापन असून या समितीवर राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागलेली आहे. निराधारांच्या अडचणी जाणून त्या सोडवण्यासाठी समितीच्या सदस्यांनी पुढाकर घेणे अपेक्षित असताना समिती अध्यक्षच बैठकांना उपस्थित राहत नाही. यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयामध्ये अर्ज पडून आहेत. आता यातील ११९४ अर्जांना मंजुरी देण्यात आली असून उर्वरित ८०० अर्जांना कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली अद्यापही प्रलंबित आहेत. विभागाने समिती बैठकीचे आतापर्यंत २० मार्च, २६ मार्च तसेच १२ जून २०१८ रोजी नियोजन केले होते. बैठकीसाठी निम्मे सदस्य उपस्थित राहणे आवश्यक असते. या बैठकीसाठी सदस्यही हजर झाले मात्र अध्यक्षच न आल्यामुळे बैठका होऊ शकल्या नाही. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. सध्या प्रशासनाकडे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनांमधील अर्ज प्रलंबित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण, वैजापूर, गंगापूर टँकरग्रस्त

$
0
0

म. टा. प्रति‌निधी, औरंगाबाद

समाधानकारक पावसाअभावी जिल्ह्यातील पैठण, वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांतील अनेक गावांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. सध्या जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या १३८ टँकरपैकी सर्वाधिक टँकर या तीन तालुक्यांमध्ये असून, टँकरद्वारे जिल्ह्यातील तब्बल दोन लाख ९३ हजार नागरिकांची तहान भागवण्यात येत आहे.

जुलै महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यात अडीचशेवर टँकर सुरू होते, मात्र दरम्यानच्या काळात ‌औरंगाबाद, सिल्लोड, खुलताबाद तालुक्यात सुरू असलेले सर्व टँकर बंद झाले. त्यानंतर पावसाच्या मोठ्या खंडामुळे पैठण, वैजापूर आणि गंगापूर तालुक्याला बसलेला टँकरचा विळखा अद्यापही कायम आहे. जुलै अखेरीस पैठमध्ये टँकर बंद केले होते, ते आता ३१पर्यंत पोचले आहेत.

टंचाई आराखडा ३१ जून रोजी संपुष्टात आल्यानंतर जिल्ह्यात सुरू असलेले ६३६ टँकर बंद करण्यात आले. बंद करण्याात आलेल्या टँकरमध्ये सर्वाधिक टँकर एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील होते. टंचाई आराखडा संपुष्टात येण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडे तीव्र टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकर सुरू ठेवण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे टँकर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे जिल्ह्यातील २४२ टँकर सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली. त्यानंतरही टँकरचा चढता आलेख सप्टेंबरअखेरही सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्यातच समाधानकार पाऊस पडला नसला तरी पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या १३८ टँकरपैकी पैठण तालुक्यात ३१, गंगापूर ५९, वैजापूर ४५ तर फुलंब्री तालुक्यात तीन टँकर सुरू आहेत.

औरंगाबादसह जालना जिल्ह्यातही १९ टँकर सुरू असून, जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात १६, जाफराबाद दोन तर परतूर तालुक्यात एक टँकर सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ३४ हजार नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवण्यात येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील स्थिती

तालुका........टँकरसंख्या......पडलेला पाऊस ........अवलंबून असलेले नागरिक

फुलंब्री...........०३...............६९.६६ टक्के ................६ हजार ६५०

पैठण.............३१...............५७.२१ टक्के ...............५६ हजार ६६४

गंगापूर...........५९...............५७.७१ टक्के................१ लाख २८ हजार १३२

वैजापूर..........३९................६७.७७ टक्के................१ लाख २ हजार १४२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यवसायाचे आमिष; १५ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सोन्या-चांदीचा व्यवसाय सुरू करण्याचे आमिष दाखवत तरुणाला १५ लाखांचा गंडा घालून आरोपी पसार झाला. सप्टेंबर २०१६ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत जयभवानीनगरात हा प्रकार घडला. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी साईनाथ खंडू जानवळे (वय २३, रा. जयभवानीनगर) या तरुणाने तक्रार दाखल केली आहे. साईनाथची ओळख दोन वर्षांपूर्वी संशयित आरोपी नीतेश घेवरचंद जैन (रा. एन चार, सिडको) याच्याशी झाली होती. या ओळखीतून जैन याने साईनाथला सोन्याचांदीचा व्यापार करण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला भुलून साईनाथने जैनच्या बोलण्यावरून पंधरा लाख रुपये त्याच्याकडे गुंतवले. साईनाथने जैनला वारंवार व्यवसाय कधी सुरू करायचा याची विचारणा केली. यावेळी जैन याने काळजी करू नको, असे म्हणत उडवाउडवीची उत्तरे दिली. मोठी रक्कम गुंतवलेली असल्याने साईनाथला काही बोलता आले नाही. दरम्यान साईनाथची पंधरा लाखांची रक्कम घेऊन जैन पसार झाला. त्याच्या मोबाइलवर संपर्क साधला असता मोबाइल स्वीच ऑफ करून ठेवला असल्याचे दिसून आले. साईनाथ याने इतर ठिकाणी चौकशी केली असता जैनने इतर काही जणांची देखील सोन्या-चांदीचा व्यवसाय सुरू करण्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने साईनाथने अखेर मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. या प्रकरणी साईनाथच्या तक्रारीवरून संशयित आरोपी नीतेश जैनविरुद्ध पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएसआय संजय बनसोड तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लू सदृश आजाराने कन्नडमध्ये विद्यार्थिनीचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

कन्नड शहरातील टिळकनगर भागातील राहिवाशी शेख इफ्तेखार शेख मुसामोहम्मद यांच्या १२ वर्षांच्या सानिया शेख इफ्तेखार या मुलीचा स्वाइन फ्लू सदृश आजाराने गुरुवारी (२० सप्टेंबर) पहाटे पावनेतीन वाजता उपचारादरम्यान औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात निधन झाले.

याबाबत नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरून, मुलीवर ताप, सर्दी या आजारावर मागील दहा दिवसांपासून उपचार करण्यात येत होते. सहा दिवस कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारानंतर चार दिवसांपासून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. स्वाइन फ्लू सदृश आजारानेच मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. मृत्यू पावलेली मुलगी कन्नडच्या फातेमा कॉन्व्हेंट शाळेतील इयत्ता आठवीत शिकत होती. ती अभ्यासात हुशार होती. या निधनामुळे या शाळेवर शोककळा पसरली. शहरातील सिद्दिक शाह बाबा चौकाजवळील दभनभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सानियाच्या मागे आई, वडील, एक भाऊ, बहीण असा परिवार आहे. शहरातील वकील एन. एम. शेख यांची पुतणी होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेच्या नातेवाइकांची पोलिसांना धक्काबुक्की

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या मुलांच्या नावावर शेती केल्याशिवाय पोस्टमार्टेम न करण्याच्या भूमिकेवर अडून बसलेल्या नातेवाइकांची समजूत काढण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी धक्काबुक्की केल्याचा प्रकार मंगळवारी शहरातील महाराणा प्रताप रोडवर घडला. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे ३० जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा; तसेच दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेवेळी संतप्त जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना आपले रिव्हॉल्व्हर काढावे लागले होते.

सुराळा (ता. वैजापूर) येथील सुनीता अजिनाथ वारकर या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून सोमवारी सकाळी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. सुनीताच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या तिच्या सासरच्या मंडळींवर गुन्हे दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास तिच्या माहेरकडील नातेवाईकांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे सोमवारी दुपारीच पोलिसांनी याप्रकरणी मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासू-सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. परिस्थिती विचारात घेऊन पोलिसांनी या तिघांना अटकही केली होती. त्यानंतर सायंकाळी पोस्टमार्टेम करण्यापूर्वी मृताच्या मुलांच्या नावावर शेती करण्याची नवीन मागणी तिच्या नातेवाईकांकडून करण्यात आली. त्यावर दोन्ही बाजूकडील मंडळींनी चर्चा करून त्यास होकारही दाखविला. त्यानुसार अज्ञान असलेल्या मुलांचे पालक म्हणून वडिलांचे नाव लावण्याचे ठरविण्यात आले होते. या चर्चेत वेळ गेल्याने मंगळवारी पोस्टमार्टेम करण्याचा निर्णय सुनीताच्या नातेवाईकांनी घेतला.

दरम्यान, मंगळवारी सकाळी मात्र या मंडळींनी पालक म्हणून मृत सुनीताच्या पतीऐवजी तिच्या बहिणीचे नाव लावावे, अशी मागणी केली. त्याला वारकर कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी विरोध केला. त्यामुळे मंगळवारी दुपारपर्यंत सुनीताचा मृतदेह हे शवगरात पडून होता. सुनीताच्या माहेर डागपिंपळगाव, मामाच्या गावाचे नागमठाण, जातेगाव, कौटगाव येथील नागरिक मंगळवारी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात जमा झाले होते. दरम्यान, मंगळवारी दुपारी पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब डांगे, सचिन सोनार, महिला पोलिस कर्मचारी कांचन शेळके, चालक पठारे हे उपजिल्हा रुग्णालयाकडे जात होते. त्याचवेळी नातेवाइकांचा जमाव त्यांना पोलिस ठाण्यापासून जवळच असलेल्या लक्ष्मी टॉकिजजवळ उभा असल्याचे दिसले. त्यावेळी कुलकर्णी हे त्यांना सुनीताचे पोस्टमार्टेम करण्याबाबत समजावून सांगत असताना त्यांच्या शाब्दिक चकमकी झाल्या. पाहता पाहता अचानक या जमावातील काहींनी पोलिसांनाच धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यात महिला पोलिस कर्मचारी शेळके यांच्या हाताच्या बोटाला किरकोळ जखम झाली. यावेळी पोलिसांनीही या जमावाला चांगलाच चोप दिला. जमावातील नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून कुलकर्णी यांनी आपल्याकडील शासकीय रिव्हॉल्व्हर हातात काढून वर केल्यावर मात्र ते भानावर आला.

या घटनेची माहिती मिळताच ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या प्रकरणी सचिन सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी नामदेव हिलोडे, ठकाजी हिलोडे (दोघे रा. कौठगाव), संजय एकनाथ गायके, बाळासाहेब गायके,, रामदास सावंत (सर्व रा. नागमठाण) व अन्य २० ते २५ जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोरुग्ण तरुणीचा विनयभंग; वृद्धाला दंडासह सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील वीस वर्षीय मनोरुग्ण तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करणारा ६५ वर्षीय आरोपी लक्ष्मण नाथाजी बनकर याला एक वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी शुक्रवारी (२१ सप्टेंबर) ठोठावली.

याप्रकरणी पीडित मनोरुग्ण तरुणीच्या भावाने फिर्याद दिली होती. त्यानुसार, २५ डिसेंबर २०१२ रोजी सायंकाळी साडेपाचच्या बहीण घरात एकटीच असताना घराजवळ राहणारा आरोपी लक्ष्मण बनकर घरात घुसला. त्याने दरवाजा आतून लावून घेतला. आरोपी घरात घुसताना एका मुलीने पाहिले आणि तिने परिसरातील गिरणी चालकाला ही माहिती दिली. गिरणी चालकाने ती माहिती तरुणीच्या भावाला फोन करून सांगितली. फिर्यादीने तेथे धाव घेऊन दार ठोठावले. आरोपीने दार उघडले आणि तरुणीच्या भावाला धक्का मारून पळून गेला. डोकावून पाहिले असता, आरोपीने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी भादंवि ३७६, ४४८ कलमान्वये उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्याचदिवशी आरोपीला अटक झाली होती.

\B...तर अतिरिक्त कारावास\B

खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील अनिल हिवराळे यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदविले. कोर्टाने आरोपीला भादंवि एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावास, तर भादंवि ४४८ कलमान्वये आरोपीला सहा महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवेकानंद महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विवेकानंद माहविद्यालयात हिंदी दिवसाचे औचित्य साधून विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य शाम शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेत आंतर महाविद्यालयीन युवा कहानी लेखनाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत विशाल सुरेश जाधव या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला. आदित्य संतोष उदावंत व नेहा संतोष दुधलवार यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविला, तर माधव दादाराव मुळे या विद्यार्थ्याला प्रोत्साहनपर पुरस्कार व प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या वेळी हिंदी विभाग प्रमुख डॉ. दिग्विजय टेंगसे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी प्रा. एस. पी वांजरवाडे, प्रा. सारिका खरात, प्रा. रविंद्र साठे, प्रा. रुबिना शेख, प्रा. पंजाब हजारे, दत्ता कोलारे आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आजी-माजी आमदारांमध्ये श्रेयासाठी लढाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

पैठण शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या शासकीय इमारतींच्या कामाचे श्रेय घेणावरून आजी, माजी आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. माझ्या आमदारकीच्या काळात मंजूर झालेल्या शासकीय इमारतीचे माजी आमदार वाघाचौरे यांनी उद्घाटन केल्याचा आरोप आमदार संदीपान भुमरे यांनी केला आहे, तर निधी कसा मंजूर करून आणायचा याचा आणि आमदार भुमरे यांचा काही संबंध आहे का, असा प्रतिहल्ला माजी आमदार वाघचौरे यांनी आमदार भुमरे यांच्यावर चढवला आहे.

जवळपास सव्वाचार कोटी रुपये खर्च करून शहरात अद्ययावत पशुवैद्यकीय चिकित्सालयांच्या इमारत बांधण्यात येणार आहे. आमदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते शुक्रवारी या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना आमदार भुमरे यांनी माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या जोरदार टीका केली. २००४ ते २००९ या काळात मी आमदार असताना सतत पाठपुरवठा करून शहरातील कोर्ट, तहसील, पंचायत समिती कार्यलयाच्या इमारतीसाठी निधी मंजूर करून आणला आणि माजी आमदार वाघचौरे यांनी २००९ ते २०१४ या त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात या इमारतींचा उद्घाटन करून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, अशी टीका त्यांनी केली.

आमदारकीच्या कार्यकाळात वाघचौरे यांनी केवळ त्यांना मिळालेल्या आमदार निधीतूनच कामे केली. याव्यतिरिक्त त्यांना कोणताही निधी आणता आला नाही. त्यांच्या काळात ज्ञानेश्वर उद्यानासमोर झालेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाची चौकशी सुरू आहे. यासर्व प्रकरणाला वाघचौरे जबाबदार असल्याचा आरोप आमदार भुमरे यांनी केला.

आमदार भुमरे यांनी केलेल्या आरोपांचे उत्तर देण्यासाठी माजी आमदार वाघचौरे यांनी त्वरित पत्रकार परिषद बोलावून प्रतिहल्ला चढवला. भुमरे आणि विकासकामे; तसेच विकास कामासाठी निधी कसा आणायचा याचा काही संबंध आहे का, असा प्रतिप्रश्न विचारून वाघचौरे यांनी आमदार भुमरे यांची खिल्ली उडवली. भुमरे यांनी फार पूर्वी विकास कामाच्या नावाखाली पाचोड रोडवर जीनिंग उभी केली होती. आज त्या जिनिंगची काय परिस्थिती आहे. जिल्हा बँकेच्या कर्जाच्या नावाखाली आमदार भुमरे यांनी या जीनिंगची जागा हडपल्याचा आरोप माजी आमदार वाघचौरे यांनी या पत्रकार परिषदेत केला.

गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी ज्ञानेश्वर उद्यनासमोरील सिमेंट रस्त्याचा कामांचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांना विरोध करणारे आमदार भुमरे हे हा रस्ता माझ्यामुळे बोगस झाल्याचा बावळटपणाचा आरोप करत आहे.

- संजय वाघचौरे, माजी आमदार, पैठण

माझ्या पाठपुरवठ्यामुळे, पशुवैद्यकीय चिकित्सालयच्या इमारतीचे काम सुरू झाले आहे. या इमारतीचाही कोणी श्रेय घेऊ नये यासाठी या इमारतीचे काम पूर्ण झाल्यावर मीच याचे उद्घाटन करणार आहे.

- संदिपान भुमरे, आमदार, पैठण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोधेगावच्या सरपंचपदी साधना मोटे बिनविरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

बोधेगाव खुर्द (ता. फुलंब्री) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी साधना देवनाथ मोटे व उपसरपंचपदी सुलोचना नामदेव तायडे यांची शुक्रवारी (२१ सप्टेंबर) बिनविरोध निवड करण्यात आली.

मागील सरपंच, उपसरपंच यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राजीनामे सादर केले होते. त्यानुसार शुक्रवारी दुपारी दोन वाजता निवड प्रक्रियेला सुरवात करण्यात आली. यावेळी सात सदस्य उपस्थित होते. सरपंचपदासाठी साधना मोटे यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची सरपंच म्हणून निवड करण्यात आली. उपसरपंच पदासाठी सुलोचना तायडे यांचाही एकच अर्ज आल्याने यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून शशिकांत ठेंगे यांनी काम पाहिले. त्यांना तलाठी के. आर. तुपे, ग्रामसेवक गंगावणे यांनी सहकार्य केले. यावेळी सुनिता तायडे, नवनाथ मोटे, नंदू मोटे, शोभा मोटे, गंगुबाई मोटे या ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाडूमातीच्या मुर्ती विसर्जनासाठी वॉर्डा वॉर्डात व्यवस्था

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शाडूमातीच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेतर्फे वॉर्डावॉर्डात व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी पाण्याच्या टाक्या ठेवल्या जातील. शहराच्या विविध भागात असलेल्या विसर्जन विहिरींची स्वच्छता देखील करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. शहरात तेरा ठिकाणी गणपती विसर्जन केले जाते. येथील विहिरी स्वच्छ स्वच्छ करण्यात आल्या आहेत. विहिरींच्या परिसरात दिवाबत्ती, सुरक्षा व्यवस्थेसह अन्य सुविधा दिल्या जाणार आहेत. अनेक गणेशभक्तांनी शाडूमातीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. त्यामुळे अशा मुर्तींच्या विसर्जनासाठी वॉर्डा वॉर्डात स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे असे त्यांनी सांगितले. गणपती विर्सजन मिरवणुकीच्या मार्गावर पॅचवर्क करण्यात आले आहे. त्यामुळे गणेशभक्तांना खड्यांचा त्रास होणार नाही, असा दावा महापौरांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आज आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बाल संस्कार केंद्राच्या माध्यमातून शनिवारी (२२ सप्टेबर) सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सरस्वती भुवन मैदानावर सकाळी सव्वासात वाजता सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठणाला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमात २५ हजार भाविक सहभागी होतील व भाविकांची ही उपस्थिती विक्रमी असेल, असे मानले जात आहे. या कार्यक्रमाला शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, श्री स्वामी समर्थ केंद्राचे मराठवाडा प्रतिनिधी विलासराव देशमुख, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सहचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हापरिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात विद्यार्थी, पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्थान गणपती मंदिराच्या समोर पुन्हा डबके, खैरे भडकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिराच्या समोर पुन्हा ड्रेनेजचे डबके साचलेले पाहून खासदार चंद्रकांत खैरे शुक्रवारी चांगलेच भडकले. महापौरांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मंदिराच्या परिसरात तातडीने हजर होण्याचे आदेश त्यांनी दिले.

संस्थान गणपती मंदिर शहरवासियांचे श्रद्धास्थान आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने दररोज या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. त्याशिवाय भंडाऱ्याचे देखील आयोजन केले जाते. दररोज सुमारे २५ ते ३० हजार भाविक भंडाऱ्यात सहभागी होऊन प्रसादाचा लाभ घेतात. मंदिरात गणपती अथर्वशीर्ष पठणाचे देखील आयोजन केले जाते. शुक्रवारी खासदार चंद्रकांत खैरे अथर्वशीर्ष पठणासाठी सकाळीच मंदिराच्या परिसरात आले, तेव्हा त्यांना मंदिराच्या समोर रस्त्यावर ड्रेनेजचे डबके साचलेले दिसले. साचलेल्या डबक्यामुळे भाविकांना बसणे देखील अवघड होऊन बसले होते. ही बाब लक्षात आल्यावर खासदार खैरे कमालीचे संतापले. त्यांनी थेट महापौर नंदकुमार घोडेले यांना फोन केला. घोडेले जागतिक वारसा वास्तूंच्या कार्यक्रमात होते. खैरेंचा फोन आल्यावर ते संस्थान गणपती मंदिरात आले. खैरेंनी त्यांना वस्तूस्थिती दाखविली व पालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलाविण्याचे आदेश दिले. पालिकेचे अधिकारी दाखल झाले. त्यानंतर खैरे यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कुमक बोलावून तुंबलेले ड्रेनेज स्वच्छ केले.

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी देखील खैरे यांनी संस्थान गणपतीच्या परिसरात अशीच बैठक घेतली होती. त्यावेळी देखील त्यांनी पालिका अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. यानंतरही आवश्यक त्या सुविधा पालिकेतर्फे करण्यात आल्या नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहरण करून बलात्कार; पसार आरोपीस अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा परिसरातील १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर जालना येथील सरकारी दवाखान्याच्या परिसरात बलात्कार केल्याच्या प्रकरणात आरोपी रवींद्र भालेराव याला गुरुवारी (२० सप्टेंबर) अटक करुन शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीला सोमवारपर्यंत (२४ सप्टेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी दिले.

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. त्यानुसार, १३ वर्षीय मुलगी १४ ऑगस्ट रोजी चिप्स आणण्यासाठी दुकानात जात असताना आरोपी रवींद्र विश्वनाथ भालेराव (वय २५, रा. शेंद्रा झोपडपट्टी) याने तिचे अपहरण करुन तिला जालन्याच्या सरकारी दवाखान्याच्या परिसरातील मोकळ्या जागेत नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करून कोणाला सांगितल्यास तुझ्या आई, वडील व भावास जिवे मारुन टाकील, अशी धमकी दिली. मुलगी करमाडपर्यंत आल्यानंतर तिचा भाऊ तिला आणण्यासाठी गेला. घरी आल्यावर आईने मुलीला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली असता, तिने घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार झाला होता. आरोपी हा बुलडाणा जिल्ह्यातील सौलानी बाबा दर्ग्यामध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला गुरुवारी अटक करण्यात येऊन शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीने गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करावयाचे असून, त्याची वैद्यकीय तपासणी करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील कैâलास पवार खंडाळकर यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीतील दुर्दशेची उच्च न्यायालयाकडून दखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील आरोग्याचे प्राण असलेल्या औरंगाबादेतील घाटीच्या (शासकीय रुग्णालय) दुर्दशेबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'मधील 'सिटी स्कॅन मृतप्राय; घाटी खड्ड्यात' या वृत्ताची दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे व न्या. मनीष पितळे यांनी घेतली. या वृत्ताचे रुपांतर याचिकेत करण्यात येईल. खंडपीठाने अॅमिकस क्युरी (न्यायालयाचे मित्र) म्हणून राजेंद्र देशमुख यांची नियुक्ती केली आहे. त्यांना याचिका तयार करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला मराठवाड्यात घाटी असे संबोधले जाते. याबाबत शुक्रवारी (२१ सप्टेंबर) 'मटा'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली. २४ कोटींची बिले थकल्यामुळे गंभीर स्थिती रुग्णालयावर ओढवली आहे. मराठवाड्यासह १२ ते १४ जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा जास्त गोरगरीब रुग्ण दररोज घाटीसह 'राज्य कर्करोग संस्थे'मध्ये निदान-उपचारासाठी येतात. मात्र घाटीमध्ये एक ते दोन वर्षांपासून बहुतांश दैनंदिन औषधे, प्रतिजैविके, इंजेक्शन, ग्लोज, कॉटन, शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य तसेच इतरही वैद्यकीय साहित्याचा शब्दशः ठणठणाट आहे. अपघातग्रस्त-अत्यवस्थ रुग्णांना दाखल केल्या जाणाऱ्या 'ट्रॉमा'तील आठ पैकी फक्त दोन व्हेंटिलेटर सुरू आहेत, तर पॅरासिटामोलसारखी अत्यंत मूलभूत औषधी, श्वानदंशावरील एआरव्ही-एआरएस, सर्पदंशावरील एएसव्ही इंजेक्शनचाही रुग्णालयात वारंवार गंभीर तुटवडा निर्माण होत आहे. मनोरुग्णांना लागणाऱ्या महत्वाच्या औषधींचा तुटवडादेखील त्यांच्या नातेवाईकांना त्रासदायक ठरत आहे.

\Bनिम्मे व्हेंटिलेटर नादुरस्त \B

धक्कादायक बाब म्हणजे घाटीतील ५० ते ६० टक्के व्हेंटिलेटर नादुरुस्त झाले आहेत. तब्बल ७० ते ८० टक्के औषधी रुग्णांना बाहेरून आणावी लागतात. अधिकृत माहितीनुसार, दहा कोटी रुपयांची औषधींची, तर उपकरणांच्या वार्षिक देखभालीची १२ ते १४ कोटी रुपयांची बिले थकली आहेत. रेडिओलॉजी विभागातील ६४ स्लाईस सिटी स्कॅनची ट्यूब, सिक्स स्लाईस सिटी स्कॅन मशीन नादुरुस्त आहेत. बिले थकल्याने कंपनीने दुरुस्तीस नकार दिला आहे. या परिस्थितीची दखल खंडपीठाने घेतली असल्याने घाटीमध्ये सोयी-सुविधा निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुलर कंपनीत आग; कोट्यवधीचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा एमआयडीसीमधील आनंद कुलर कंपनीला शुक्रवारी दुपारी आग लागली. तब्बल दोन तास सुरू असलेल्या अग्नितांडवात कंपनी जळून खाक झाली, असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून कोणतीही जिवीतहानी झाली नाही. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

चिकलठाणा एमआयडीसीमधील गरवारे कंपनीच्या मागे कुंदन रेड्डी यांची कुलर उत्पादन करणारी कंपनी आहे. ही कंपनी साप्ताहिक सुटीनिमित्त शुक्रवारी बंद होती, तसेच एमआयडीसीचा वीज पुरवठा देखील बंद होता. कंपनीचे अकाउंटन्ट काही कामानिमित्त शुक्रवारी कंपनीत गेले होते. गणपतीच्या आरतीनंतर ते कंपनीसमोरील टपरीवर चहा पिण्यासाठी गेले. यावेळी कंपनीच्या मुख्य भागात आग लागल्याचे त्यांना दिसले. त्यांनी ही बाब तत्काळ अग्निशमन दलाला कळवली, समोरच असलेल्या गरवारे कंपनीचा बंब तत्काळ आला. काही वेळातच अग्निशमन दलाचे तीन व शेंद्रा एमआयडीसीचा बंब घटनास्थळी दाखल झाला. या आगीवर नियंत्रण मिळ‌ण्यासाठी अग्निशमन दलाला दोन तास प्रयत्न करावे लागले. कंपनीमधील रसायनांच्या कॅन वेळीच बाहेर काढल्याने मोठी हानी टळली. अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी आर. के. सुरे, डी. डी. साळुंके, अब्दुल अजीज, संजीव कुलकर्णी, व्ही. बी. कदम

यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, सहाय्यक उपनिरीक्षक एस. बी. केदारे, विक्रम वाघ यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीमध्ये कोटयवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्रमाचे आयोजन

$
0
0

औरंगाबाद: बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत क्रांतीनगर येथील धम्मरत्न बुद्धविहार येथे राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्रम घेण्यात आला. नगरसेविका सरिता बोर्डे या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. बालविकास प्रकल्पाच्या हर्षा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी किशोरी, गरोदर माता, स्तनदामाता, सहा महिने ते सहा वर्ष वयाची मुले, सेविका, मदतनीस उपस्थित होते. 'लिंबू, आवळा, संत्री आहेत दाताचे मंत्री', 'सर्व डाळीचे सुप बाळाला येई रुप', 'उसळ खा मोडाची वाढ होईल हाडाची,' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवामुळे साताऱ्यात चैतन्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गणरायाच्या आगमनामुळे सर्वत्र मंगलमय व जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सातारा परिसरातील अनेक छोट्या मोठ्या वसाहतींतही असेच चैतन्य पसरले असून, येथील मीनाताई ठाकरे नगरातील ओंकार गणेश मंडळाने आंनदनगरी, विविध स्पर्धासोबतच स्वच्छता मोहीम, चर खोदणे, यासह विविध सामाजिक उपक्रमावर भर दिला आहे.

कॉलनी नव्हे तर एक परिवार, कुटुंब म्हणून वावरणाऱ्यांची वसाहत अशी ओळख सातारा परिसरातील मीनाताई ठाकरे नगराची आहे. या वसाहतीतील रहिवासी धार्मिक उत्सवात सदैव रममाण असतात. यंदाही येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. २००६मध्ये कॉलनी परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन ओंकार गणेश मंडळाची स्थापना केली. सुरुवातील ज्येष्ठ मंडळी मंडळाचे कामकाज पाहात. गेल्या दोन वर्षांपासून येथील युवकांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. इच्छेनुसार नागरिक मंडळाला आर्थिक हातभार लावतात. त्यातून जमा होणाऱ्या निधीतून यंदाही विविध सामाजिक कार्यावर भर देण्यात आला आहे.

परिसरात वृक्षारोपण करण्यात आले असून, लावलेले प्रत्येक रोपांचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारीही नागरिकांनी घेतली आहे. यासह परिसर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून, त्यासाठी खास जेसीबी भाड्याने आणण्यात आले होते. पावसाचे पडणारे पाणी कॉलनी परिसरातच जिरवण्यासाठी छोटेखानी तळे तयार करण्यात आले आहे. सविता कुलकर्णी यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष यशवंत पाटील, उपाध्यक्ष शुभम लातूरकर, कोषाध्यक्ष वैभव शिंदे, ईशान द्याडे, विक्रांत बिलपे, संकेत पवार, अभिजित साळुंके, अभिषेक निळेकर, पियूष देव आदी कार्यकर्ते काम करत आहेत.

\Bस्पर्धाची रेलचेल\B

बच्चेकंपनीला प्रोत्साहित करणाऱ्यासाठी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी मंड‌ळातर्फे चित्रकला, हस्ताक्षर यासह अन्य स्पर्धा घेण्यात आल्या असून महिलावर्गासाठी रांगोळी, होममिनिस्टर यासह अन्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तर बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या आनंदनगरीला सर्वांनीच मोठी धम्माल केल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश विसर्जन मिरवणूकीनिमीत्त वाहतूक मार्गात बदल

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रविवारी अनंत चतुदर्शी रोजी शहरात लाडक्या गणरायाचे विसर्जन करण्यात येणार आहे. या दिवशी जिल्हा गणेश महासंघाच्या मुख्य मिरणवणुकीसोबतच सिडको हडको, नविन औरंगाबाद गणेश महासंघाच्या वतीने देखील मिरवणुका काढण्यात येतात. या पार्श्वभूमीवर रविवारी शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. या दरम्यान बंद करण्यात आलेले वाहतूक मार्ग व पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे आहेत.

मुख्य मिरवणूक

बंद मार्ग

- संस्थान गणपती ते गांधीपुतळा, सिटीचौक, गुलमंडी, बाराभाई ताजीया, बळवंत वाचनालय, एसबी कॉलेज मार्गे जिल्हा परिषद मैदान हा मुख्य मिरवणुकीचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद राहील.

- संस्थान गणपती ते शहागंज चमन, गांधी पुतळा, सिटीचौक, जुनाबाजार मार्गे भडकलगेट

- जिन्सी चौक ते संस्थान गणपती, जाफरगेट - मोंढा ते राजाबाजार

- निजामोद्दीन दर्गा रोड ते निजामोद्दीन चौक व डावीकडे शहागंज चमन

- भुरे पहेलवान यांचे घर ते निजामोद्दीन चौक व उजवीकडे शहागंज चमन

- चेलीपुरा चौक ते गांधी पुतळा, मंजूरपुरा चौक ते गांधी पुतळा

- लोटाकारंजा ते सराफा रोड, रोहीला गल्ली ते सराफा रोड

- कामाक्षी लॉज ते सिटीचौक पुढे गुलमंडी, बाराभाई ताजीया, गोमटेश मार्केट मार्गे पैठणगेट या रस्त्यावरील सर्व पुर्व पश्चीम गल्ल्या बंद राहतील.

- सिटीचौक पोलिस स्टेशन पश्चीमेकडील बुऱ्हानी हायस्कुलकडे जाणारी गल्ली.

- बुढीलाईन, जुने तहसील कार्यालय, जुना बाजार - बारुदगरनाला.

- सिल्लेखाना चौक, पैठणगेट, बाराभाई ताजीया, रंगारगल्ली, सिटीचौक

- सावरकर चौक, एमपी लॉ कॉलेज, महात्मा फुले पुतळा, बळवंत वाचनालय चौक

- अंजली टॉकीज, महात्मा फुले चौक, बाबुराव काळे चौक

- रॉक्सी कॉर्नर, जिजामाता कॉलनी, बाबुराव काळे चौक

....

पर्यायी मार्ग

- रोशनगेटकडून शहागंजकडे जाणाऱ्या सर्व वाहनांसाठी चेलीपुरा चौक, लोटा कारंजा, सिटीचौकच्या पाठीमागील रोडने वाहतूक चालू राहील.

- शहागंजकडे येणाऱ्या सिटी बसेस या अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत येवून तेथून परत टाऊन हॉल उड्डाणपुलमार्गे भडकलगेटकडे जातील.

- मिलकॉर्नरकडून औरंगपुऱ्याकडे येणारी सर्व वाहने अंजली टॉकीज जवळून उजवीकडे नागेश्वरवाडी. डॉ. खनाळे हॉस्पीटल, निराला बाजार,समर्थनगर मार्गे तसेच डावीकडे खडकेश्वर, मनपा मार्गे जातील.

- क्रांतीचौकाकडून येणारी सर्व वाहने सिल्लेखाना चौक, समर्थनगर चौक मार्गे बसस्थानकाकडे जातील.

....

सिडको हडको, नविन औरंगाबाद, गारखेडा मिरवणूक

बंद मार्ग

- चिश्तिया कॉलनी चौक, बजरंग चौक, ओंकार चौक, सिडको पोलिस स्टेशन समोरून, एन सात बस स्टॉप, जळगाव रोड, आंबेडकर चौक, एन ९, एम २, एन ११, टिव्ही सेंटर चौक, एन बारा येथील स्वर्ग हॉटेल जवळील विहीर असा असून हा मार्ग मिरवणूकी दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील.

- चांदणे चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, टीव्ही सेंटरकडे जाणारा रस्ता

- एन १ चौक ते चिश्तीया कॉलनी, अविष्कार चौक, सेंट्रल नाका ते अविष्कार चौक, हिंदूस्तान पेट्रोलीयम कार्यालय, द्वारकादास साडी सेंटर ते अविष्कार चौक

- आझाद चौक ते बजरंग चौक, देवगिरी बँक ते बजरंग चौक, बळीराम पाटील हायस्कुल ते ओंकार चौक, वेणुताई चव्हाण हायस्कुल, एन सात पोलिस ठाणे सिडको ते ओंकार चौक, आंबेडकर चौक ते बळीराम पाटील चौक, पार्श्वनाथ चौक ते जिजाऊ चौक, शरद टी ते टिव्ही सेंटर चौक

- गजानन महाराज मंदिर परिसरातून निघणाऱ्या व शिवाजीनगर विसर्जन पॉइंटकडे जाणाऱ्या मिरवणूकीदरम्यान गजानन मंदिर,जवाहरनगर पोलिस ठाण्यासमोरील चौक, गारखेडा, सुतगिरणी, शिवाजीनगर विसर्जन पॉइंट तसेच सेव्हन हील ते गजानन मंदिर, त्रिमुर्ती चौक ते गजानन मंदिर, पटियाला बँक ते गजानन मंदिर, सुतगिरणी रस्ते व गल्ल्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहतील.

पर्यायी मार्ग

- जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गणेश कॉलनीमार्गे टिव्ही सेंटरकडे जाणारी वाहतूक हडको कॉर्नर मार्गे जाईल.

- पटीयाला बँकेकडून गजानन महाराज मंदिर चौकाकडे येणारी वाहने हिंदू राष्ट्र चौक, विजयनगर, गजानन कॉलनी, रिलायंस मॉलमार्गे जातील.

- जवाहरनगर पोलिस ठाण्याकडून गजानन महाराज मंदिराकडे येणारी वाहने माणिक हॉस्पिटल, डॉ. हेडगेवार हॉस्पीटल, जवाहरनगर मार्गे जातील.

- त्रिमुर्ती चौकाकडून गजानन मंदिराकडे येणारी वाहने डॉ. हेडगेवार हॉस्पीटलमागील रोड, माणिक हॉस्पीटल, जवाहरनगर पोलिस ठाण्यामार्गे जातील.

- सेव्हनहील उड्डाणपुलाकडून गजानन मंदिराकडे येणारी वाहने जालना रोड, आकाशवाणी मार्गे जातील.

मिरवणूकीत सहभागी होणारी वाहने, बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी, कर्मचारी, दंडाधिकारी, अग्नीशमन दल, आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवेसाठी हा आदेश लागू राहणार नाही.

….

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर

$
0
0

मुख्य मिरवणुकीत वॉच टॉवर : ७

व्हिडिओ कॅमेरे : १७

...

मुख्य मिरवणुकीतील पोलिस संख्या

उपायुक्त : १

एसीपी : ७

पोलिस निरीक्षक : ४१

सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक : १०६

राज्य राखीव दल कंपनी : २

पुरुष पोलिस कर्मचारी : २,४२२

महिला पोलिस : २७३

पुरुष होमगार्ड : २२३

महिला होमगार्ड : ५६

पेट्रोलिंग पथके : ११

बॉम्ब स्कॉड पथके : ३

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रविवारी शहरात गणेश विसर्जन होणार आहेत. या दिवशी शहरातून मुख्य मिरवणूकीसह विविध ठिकाणावरून विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. या निमित्ताने शहर पोलिस दलाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून जय्यत तयारी केली आहे. तब्बल चार हजारावर अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गावर व्हिडिओ कॅमेऱ्यांची नजर असणार असून ९१ ठिकाणी फिक्स पॉइंट तैनात करण्यात आले आहेत.

जिल्हा गणेश महासंघाची मुख्य मिरवणूक संस्थान गणपती ते औरंगपुरा या मार्गावर काढण्यात येते. तसेच शहरात सिडको हडको, नविन औरंगाबाद, मुकुंदवाडी, चिकलठाणा आदी ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात. मुख्य मिरवणुकीच्या मार्गावर एकूण सात ठिकाणी वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. तसेच या मिरवणुकीसाठी एक उपायुक्त, सात एसीपी, ४१ पोलिस निरीक्षक, १०६ सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, राज्य राखीव बलाच्या दोन कंपन्या, २ हजार ४२२ पुरुष कर्मचारी, २७३ महिला पोलिस कर्मचारी, २२३ पुरुष होमगार्ड, ५६ महिला होमगार्ड आदी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या शिवाय बाहेरून अतिरिक्त बंदोबस्तामध्ये राज्य राखीव बलाचे एक उपअधिक्षक व सात पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. या शिवाय गुन्हे शाखा व विशेष शाखेचे चार अधिकारी व १५० कर्मचारी साध्या वेशात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. शहरात विविध आठ सेक्टरमध्ये हा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये विविध ठिकाणी ९१ फिक्स पॉइंट उभारण्यात आले आहेत. यामध्ये एक अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच पायी पेट्रोलिंग करण्यासाठी ११ पथके तैनात करण्यात आली आहे. बाँब स्क्वॉडची तीन पथके मिरवणुकी दरम्यान सज्ज ठेवण्यात आली आहे. या शिवाय वरुण, वज्र वाहन तसेच क्वीक रिसपाँस टिमचा देखील बंदोबस्तामध्ये समावेश आहे. मिरवणूक मार्गावर एकूण १७ व्हिडियो कॅमेऱ्यांची मिरवणूकीवर नजर असणार आहे. विशेष पोलिस अधिकारी, एनसीसीचे विद्यार्थी यांचा बंदोबस्तासाठी वापर सबंधीत पोलिस ठाण्याकडून करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. रोडरोमीयोंना आळा घालण्यासाठी सतरा पथके नेमण्यात आली असल्याची माहिती विशेष शाखेकडून देण्यात आली

वाहतूक शाखेचा वेगळा बंदोबस्त

मिरवणुकी दरम्यान वाहतूक शाखेचा वेगळा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये एक पोलिस उपायुक्त, चार पोलिस निरीक्षक, सात सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक व दोनशे कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images