Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बैलगाडी चोरांच्या हल्ल्यात वृद्ध ठार

$
0
0

वाळूज महानगर: बैलगाडी चोरांनी केलेल्या चाकू हल्ल्यात गंगापूर तालुक्यातील डोमेगाव येथील एक वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत शेतात असलेला १३ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (२६ सप्टेंबर) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली.

या घटनेतील मृताचे नाव दामोधर किसन महानोर (वय ६५ रा़ डोमेगाव), असे असून जखमी मुलाचे नाव दादाराव आण्णा महानोर, असे आहे. महानोर हे नेहमीप्रमाणे मलकापूर शिवारातील गट नंबर २१मधील शेतात गेले होते. तेथे सकाळी साडे दहाच्या सुमारास आलेल्या चार जणांनी त्यांची बैलगाडी व गाडीला बांधलेली गाय घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना महानोर यांनी अडवले असता त्यांच्यावर हल्ला करून बैलगाडी घेऊन राजुरा गावाच्या दिशेने गेले. राजुरा येथे त्यांनी बैलगाडी घेऊन जाण्यासाठी चारचाकी वाहनाची चौकशी केली. त्यावेळी नागरिकाना बैलगाडीवरील नाव बघून संशय आला. त्यांनी पंढरीनाथ महानोर यांना फोनवरून ही माहिती दिली. चौकशी केली असता ही बैलगाडी त्यांचीच असल्याचे एकाने सांगितले़ मात्र, नागरिकांनी बैलगाडी घेऊन आलेल्या शंकर नंदू जगताप (वय २० रा. येसगाव ता़ गंगापूर) याला पकडून ठेवले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आणखी तीन साथीदारासह चोरीच्या उद्देशाने गेलो असता, महानोर व मुलाने विरोध केल्याने त्यांना बाजरीच्या पिकात नेऊन त्यांच्यावर चाकूने वार केल्याची माहिती दिली. किशोर धोंडिराम महानोर यांच्या तक्रारी वरून वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक अमितकुमार बागुल हे तपास करत आहेत.

मुलावर उपचार सुरू

दामोधर महानोर व दादाराव महानोर यांना उपचारासाठी घाटी हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता दामोधर याना डॉक्टरानी तपासून मृत घोषित केले. गंभीर जखमी दादाराव याला उपचारासाठी औरंगाबाद येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘लॉ’ची उत्तरे लिहा मराठीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेची उत्तरपत्रिका इंग्रजीसह मराठी या पर्यायी भाषेत लिहण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परवानगी दिली आहे. विधी अभ्यासक्रमातील हा बदलाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले, तर कॉलेजांसमोर नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. उपलब्ध नसलेली पुस्तके, निर्देशांमध्ये नसलेली स्पष्टता यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका मराठीत सोडविण्यासह, ४० टक्क्यांना उत्तीर्णतेची अट, कॅरिऑन अशा विविध मागण्यांबाबत लावून धरल्या होत्या. विविध कॉलेजांमधील विद्यार्थ्यांनी निदर्शने, उपोषण केल्यानंतर विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांसमोर झुकले अन् त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्यांवर निर्णय घेतले. ४० टक्के उत्तीर्णतेची अट करत, विद्यार्थ्यांना परीक्षेत इंग्रजीसह मराठी भाषेत लिहण्याची परवानगी दिली आहे. २०१८-१९पासून हा निर्णय लागू असेल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले. त्यावरून कॉलेजांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निर्णय यंदा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपासून लागू असेल की, सर्व सत्रातील विद्यार्थ्यांसाठी याबाबत विद्यापीठाने स्पष्ट केले नसल्याचे कॉलेजांचे म्हणणे आहे. तर, अशा प्रकारच्या निर्णयाने विद्यार्थ्यांचा स्पर्धेत कसा निभाव लागणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या निर्णयामुळे विद्यापीठ प्रशासनाला मराठीत पुस्तके उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. परीक्षा काही दिवसावर आली असताना हे शक्य कसे होणार, असा प्रश्नही आहे. या सगळ्या गोंधळात विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये संभ्रम आहे. विद्यापीठाअंतर्गत विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोन हजारापेक्षा जास्त आहे.

विद्यापीठ प्रशासन विधी अभ्यासक्रमाच्या बाबतीत प्रत्येकवेळी चुकीचे निर्णय घेते. त्याचा फटका अभ्यासक्रमाला बसत आहे. त्याचबरोबर त्याचे परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहेत. उत्तरपत्रिकेत मराठीत उत्तरे लिहण्यास मुभा दिली. मात्र, ते कोणत्या वर्षापासून लागू असेल याबाबत स्पष्टता नाही. बार कौन्सिलचे कॉलेजांना इंग्रजीत शिकवण्याचे निर्देश आहेत. मराठीत पुस्तकेही उपलब्ध नाहीत. अशावेळी हा निर्णय राबवायचा कसा हा प्रश्न आहे.

-डॉ. सी. एम. राव, प्राचार्य, एम. पी. लॉ. कॉलेज.

इंग्रजीसह मराठी पर्यायी भाषेत उत्तरे लिहण्याचा पर्याय देण्यात यावा यासाठी आम्ही आंदोलन केले. त्यानंतर हा न्याय मिळाला. स्पर्धेत विद्यार्थी टिकणार नाहीत, असे बोलणे किंवा मराठीत उत्तरे लिहू दिले म्हणजे गुणवत्ता ढासळेल असे वाटत नाही. आम्ही निर्णयाचे स्वागत करतो. निर्णय राबविण्याची जबाबदारी विद्यापीठे, कॉलेजांची आहे.

-नवनाथ देवकते, विद्यार्थी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन दिनानिमित्त आज परिसंवाद

$
0
0

औरंगाबाद : जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने गुरुवारी पर्यटन विकास महामंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. 'पर्यटन आणि संगणकीय परिवर्तन' असा परिसंवादाचा कार्यक्रम आहे. विद्यापीठाच्या पर्यटनशास्त्र विभागात दुपारी दोन वाजता हा परिसंवाद होणार आहे. विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. राजेश रगडे यांचे यावेळी विशेष भाषण होणार आहे. दुपारी अडीच वाजता महामंडळाच्या कार्यालयात नेत्र तपासणी शिबिर होणार आहे. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता 'पर्यटन मित्र' प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे, विजय जाधव यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिस्सा न मिळाल्याने दिली चोरीची माहिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुकान फोडल्यानंतर इतर आरोपींनी हिस्सा दिला नसल्याने एका आरोपीने दुकानदाराच्या मुलाला चोरीची माहिती दिली. हा प्रकार रविवारी रात्री वडाची वाडी, जटवाडा भागात घडला होता. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात पाच संशयित आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रमेश रिपला राठोड (वय ३५ रा. वडाची वाडी) यांनी तक्रार दाखल केली. राठोड यांचे गावातच छोटेसे किराणा दुकान आहे. रविवारी रात्री चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून, तसेच शटर उचकटून प्रवेश केला. दुकानातील रोख रक्कम, किराणा माल, चिवडा, गुलाबजामचे पाकीट, खोबरेल तेल, साबण आदी अकरा हजारांचा ऐवज चोरला. हा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आला. दरम्यान ही चोरी गावातीलच पाच संशयित आरोपींनी केली होती. यापैकी एकाला चोरीमधील हिस्सा मिळाला नाही. त्यामुळे त्याने दुकानदार राठोड यांच्या मुलाची भेट घेऊन चोरीची सविस्तर माहिती व संशयित आरोपींची नावे सांगितली. या माहितीनंतर दुकानदार राठोड यांनी हर्सूल पोलिस ठाणे गाठले. संशयित आरोपी निलेश हिरामन राठोड, प्रेमचंद मागीलाल राठोड, निलेश बाबुलाल राठोड, सतीश मगन राठोड व युवराज देवीचंद राठोड (सर्व रा. वडाची वाडी) यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक बिरारी हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणावर हातोडा

$
0
0

औरंगाबाद : घाटी परिसरातील सुमारे चार हजार चौरसफूट जागेवरील अतिक्रमण बुधवारी महापालिकेच्या पथकाने हटविले. टीन पत्र्यांचे दोन शेड, कच्चे बांधकाम झालेल्या एका खोलीचे बांधकाम यावेळी पाडण्यात आले. भडकलगेट - काजीवाडा येथे हे अतिक्रमित अनधिकृत बांधकाम होते. वारंवार नोटीस बजावूनही ते हटवले जात नसल्यामुळे पालिकेच्या पथकाने ही कारवाई केली. पदनिर्देशित अधिकारी पी. डी. पाठक, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, रवींद्र देसाई यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवयवदानाचे ‘महारॅली’तून जागरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) वतीने बुधवारी (२६ सप्टेंबर) सकाळी घाटी हॉस्पिटलमधून क्रांतीचौकापर्यंत काढण्यात आलेल्या 'महारॅली'तून अवयवदानाचे जनजागरण करण्यात आले. यात एक हजारापेक्षा जास्त वैद्यकीय, दंत, परिचर्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते.

'महारॅली'ला महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक, झेडटीसीसी अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, मुख्य संयोजक व उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, संयोजक डॉ. अरविंद गायकवाड आदींच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. मान्यवरांनी सहभागी झालेल्यांना मोलाचे मार्गदर्शन करीत अवयवदानाचे महत्त्व विषद केले तसेच अवयवदानाचे आवाहनही केले. ही 'महारॅली' घाटी हॉस्पिटलपासून निघून ज्युबली पार्क, मिल कॉर्नर, औरंगपुरा, गुलमंडी, पैठणगेट मार्गे क्रांतीचौकात आली. येथे 'महारॅली'चा समारोप झाला. समारोपावेळी डॉ. येळीकर यांनी अवयवदानाबाबत शास्त्रीय माहिती देत तब्बल आठ व्यक्तींचे आयुष्य पालटून टाकणाऱ्या अवयवदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. काशिनाथ गर्कळ, डॉ. प्रतिमा तुंगीकर, डॉ. दीपक कावळे, डॉ. स्वप्ना अंबेकर, डॉ. दिनेश पाटील, निलेश कोतकर, यशवंत कांबळे, कैलास तेलबोटे आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मिनी घाटी’त दर शुक्रवारी कॅन्सर ओपीडी

$
0
0

औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात चिकलठाण्यातील 'मिनी घाटी'मध्ये दर शुक्रवारी कॅन्सर ओपीडी सुरू होणार असून, शहरातील चार कॅन्सरतज्ज्ञांशी तसा करार करण्यात आला आहे. पुढच्या टप्प्यात 'किमोथेरपी युनिट'ही सुरू होणार आहे. किमोथेरपीची औषधे उपलब्ध होताच किमोथेरपी युनिट सुरू होईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी स्वतंत्र स्वाइन फ्लू वॉर्ड सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल स्टोअर्स शुक्रवारी बंद

$
0
0

औरंगाबाद: ऑनलाइन औषध विक्री व ई-पोर्टलसंदर्भात सरकारने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेच्या विरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने येत्या शुक्रवारी औषधी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यास प्रतिसाद देत बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती औरंगाबाद केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे देण्यात आली आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांना असोसिएशनतर्फे बंद मागील कारणाचे एक निवेदन सोमवारी सादर करण्यात आले. असोसिएशनचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर, उपाध्यक्ष शैलेद्र रावत, सचिव दिलीप ठोळे-जैन, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष शेखर गाडे, कपिल टिबडीवाला, वल्लभ भंडारी, किरण जोशी, रितेश छाजेड, प्रवीण अग्रवाल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेट्रोल वाढले नाही; काँग्रेसने वाटले पेढे

$
0
0

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दररोज पेट्रोल - डिझेलचे दर वाढत आहेत. बुधवारी मात्र दोन्हीचे भाव वाढले नाहीत. केंद्र सरकार दरवाढ करण्यास विसरले. अच्छे दिन सुरू झाले, अशा उपहासात्मक विधानांचे फलक घेऊन शहर काँग्रेसने पेढे वाटून अभिनव आंदोलन केले.

पेट्रोल - डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोलने नव्वदी पार केल्याने नागरिक त्रस्त आहेत. देशभर याविरोधात आंदोलने सुरू आहेत. बुधवारी मात्र पेट्रोल - डिझेलचे दर वाढले नाहीत. कदाचित सरकार आज दर वाढवायला विसरले. अच्छे दिन सुरू झाले की काय ? असे उपहासात्मक फलक घेऊन शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी अभिनव आंदोलन केले. पेट्रोलपंपावर जाऊन वाहनधारकांना पेढे वाटून सरकारचे आभार मानले. यावेळी माजी शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, शिक्षक नेते प्रा. मनोज पाटील, संजय जाधव, मोहमंद मुशविक, इलियास फारुक, शेख इफ्तेखार, अमोल रेड्डी, गणपत जाधव, राहुल चावरिया, जितेंद्र खाडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रेयाच्या वादात तपास रखडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हायवाचालक बाळू घुगे खुनप्रकरणाला पाच दिवस उलटूनही मुख्य संशयित आरोपी नील पाटील व त्याचे दोन साथीदार पोलिसांना अद्याप सापडलेले नाहीत. आरोपीला पकडण्याच्या श्रेयावरून सिडको पोलिस व गुन्हे शाखेच्या पथकातील वादात तपास रखडल्याचे दिसून येत आहे.

गेल्या गुरुवारी बाळू भीमराव घुगे (वय २४ रा. जाधववाडी) या हायवाचालकाला मालकाच्या मित्राने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. फॅन चोरल्याचा आरोपावरून त्याला काल्डा कॉर्नर येथील फ्लॅटमध्ये नील काकासाहेब पाटील याने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सिडको पेालिस ठाण्यात मनोज डव्हारे, नील पाटील, दत्ता भांगे व शुभम साळूंके यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी गुन्हे शाखेने हायवामालक मनोज डव्हारे याला अटक केली करून केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा कबुल केला. दरम्यान, नील पाटील व त्याचे साथीदार पळून गेले. घुगे याच्या मृत्यूनंतर सिडको पोलिस व गुन्हे शाखेने सोबतच तपास सुरू केला. डव्हारे याला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने खुनाच्या गुन्ह्याची माहिती दिली. दरम्यान, सिडको पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक देखील या गुन्ह्याचा तपास करीत होते. एका आरोपीला पकडल्यानंतर उर्वरित आरोपी शोधण्यासंदर्भात संथगतिने तपास होत असल्याचे दिसून येत आहे.

\Bनील पाटीलची गुन्हेगारी पार्श्वभूमी

\B

संशयित प्रमुख आरोपी नील पाटील याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. यापूर्वी एका पेट्रोल पंपावर कारमध्ये पेट्रोल भरल्यानंतर पैसे न देताच तो पळून गेला होता. त्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून अटक केली होती. तो मनसेचा माजी पदाधिकारी असून त्याने संजयनगरमधून महापालिकेची निवडणूक देखील लढवली होती. नील पाटील हा बॉक्सिंगचा राष्ट्रीय खेळाडू आहे. त्याने पोटात ठोसा मारल्याने बाळू हॉस्पिटलमध्ये वारंवार पोटात दुखत असल्याची तक्रार करीत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मठामध्ये आंघोळ करून आरोपी पसार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पत्नीचा खून करून मृतदेत नालीत फेकणारा संशयित आरोपी बाळासाहेब शिंदे हा पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरत आहे. त्याने बुधवारी सकाळी वैजापूरजवळ एका मठात आंघोळ केली, मात्र तेथे पोलिस पोचण्यापूर्वीच पोबारा केला. शिंदे नाशिकला गेल्याचे गृहित धरून तपास करण्यात येत आहे.

सिडको एन २ भागात मंगळवारी पहाटे संशयित आरोपी बाळासाहेब शिंदे याने पत्नी ज्योतीच्या पोटात धारदार शस्त्र खुपसून गळा आवळून खून केला होता. यानंतर तो मृतदेह घरासमोरील नालीमध्ये टाकून स्कुटीवर पळून गेला. दररोजपेक्षा वीस किलोमीटर जास्त कोठे फिरली या कारणावरून वाद घालत बाळासाहेबने ज्योतीचा खून केला आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे एक पथक वैजापूर तालुक्यात गेले होते. तो एका मठामध्ये थांबला होता. तेथे आंघोळ केरून तो दुचाकीवरून पळून गेल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्याच्या शोधासाठी एक पथक नाशिकला पाठवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्थायी’च्या पेल्यातले बंड महापौरांच्या ‘विश्वासा’ने शमले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तोंडात साखर आणि हातात जादू असलेल्या महापौरांनीच 'विश्वासात' घेतल्याने स्थायी समितीच्या सदस्यांचे बंड अचानक शमले असून, सभापतींच्या विरोधात एकत्र आलेल्या चक्क १५ सदस्यांनी एकदम तलवार म्यान केली. त्यामुळे आता पालिकेत संशयकल्लोळाच्या दुसऱ्या अध्यायात हे बंड कसे शमले, याच्या सुरस चर्चा सुरू आहेत.

चिकलठाणा आणि पडेगाव येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येकी १५० मेट्रिक टन क्षमतेची यंत्र बसवून त्याच्या पाच वर्षांच्या देखभाल दुरुस्तीचे कंत्राट मायो वेसल्स कंपनीला देण्यावरून तीन सप्टेंबरपासून स्थायी समितीचे सभापती आणि सदस्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. छत्तीस कोटींचा हा प्रश्न असल्यामुळे वादालाही तशीच धार होती. स्थायी समितीत सोळा सदस्य असतात. त्यापैकी पंधरा सदस्य एका बाजूला आणि सभापती एका बाजूला असे चित्र होते. सदस्यांचा विरोध असताना पालिका प्रशासनाने मायो वेसल्स या कंपनीला यंत्र पुरवठा करण्याची वर्क ऑर्डर देखील दिली. यामुळे सदस्यांचा विरोध तीव्र झाला. मायो वेसल्स कंपनीने अमरावती, बेंगळुरु, उज्जैन येथे काम केले आहे. या ठिकाणी केलेल्या कामाचा अहवाल सादर करा, तोपर्यंत कंपनीला काम देण्याचा मंजूर केलेला प्रस्ताव स्थगित करा, अशी मागणी सदस्यांनी लावून धरली. या मागणीला कुणी थारा देत नाही असे लक्षात आल्यावर मंगळवारी सायंकाळी पंधरा सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र तयार करण्यात आले. त्यात सभापतींचे अधिकार गोठवा आणि नगरसचिवांना निलंबित करा अशी मागणी केली. हे पत्र बुधवारी आयुक्त आणि महापौरांना देण्यात येणार होते, पण तोपर्यंत सदस्यांनी बंडाचे हत्यार म्यान केले. त्यामुळे पालिका वर्तुळात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, महापौर नंदकुमार घोडेले यांनी दुपारी तातडीने पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, 'मायो वेसल्स कंपनीबद्दल स्थायी समितीच्या सदस्यांमध्ये काही गैरसमज होते. यंत्र खरेदी प्रस्ताव तयार करून तो 'स्थायी'समोर आणण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. प्रशासनाने योग्य ती माहिती घेवूनच प्रस्ताव 'स्थायी'समोर ठेवला. सभापतींनी देखील खात्री करूनच मान्यता दिली. असे असले तरी पुन्हा एकदा खात्री करून घ्या, असे सदस्यांचे म्हणणे होते. हा पेच सोडवण्यासाठी महापौरांनी लक्ष घालावे असे खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, आमदार इम्तीयाज जलील, सभागृहनेते विकास जैन यांनी सांगितले. त्यानुसार सर्वांशी चर्चा केली. सर्वांना विश्वासात घेतले. अमरावती येथे मायो वेसल्स कंपनीचे काम सुरू आहे. त्या कामाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचा शब्द सदस्यांना दिला. त्यामुळे सदस्यांचे समाधान झाले आहे.'

\Bपत्रकार परिषदेला यांची उपस्थिती\B

सभापती रेणुकादास (राजू) वैद्य, सभागृहनेता विकास जैन, स्थायी समितीचे सदस्य सिद्धात शिरसाट, रुपचंद वाघमारे, पूनम बमने, अब्दुल नवीद, स्थायी समिती सदस्या जयश्री कुलकर्णी यांचे पती सुरेंद्र कुलकर्णी, स्वाती नागरे यांचे पती किशोर नागरे, शिल्पाराणी वाडकर यांचे दीर पंकज वाडकर, नसरीन यार खान यांचे भाऊ रफत यार खान हे पत्रकार परिषदेला उपस्थित होते. राखी देसरडा, गजानन बारवाल, ऋषिकेश खैरे पत्रकार परिषदेला हजर नव्हते, पण ते आमच्या सोबत आहेत, त्यांच्याशी फोनवरून बोलणे झाले आहे असे महापौर म्हणाले. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी स्थायी समितीमधील एमआयएमचे काही नगरसेवक सभागृहनेता विकास जैन यांना भेटून गेले. मात्र, ते पत्रकार परिषदेला नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्तीसाठी ‘फिल्डिंग’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्यावर पुन्हा मानधनावर पालिकेतच नियुक्ती मिळावी म्हणून काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी 'फिल्डिंग' लावली आहे. यासाठी काही पदाधिकारी व बड्या नगरसेवकांची मदत घेतली जात असल्याची चर्चा आहे.

पालिकेच्या सेवेतून दर महिन्याला अधिकारी-कर्मचारी निवृत्त होतात. निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी काही अधिकारी पालिकेच्या सेवेत पुन्हा राहावेत, असा प्रयत्न काही पदाधिकाऱ्यांचा आहे. अधिकारी देखील त्याला अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. निवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या अधिकाऱ्यांची प्रदीर्घ सेवा झाली आहे. त्यांच्या सेवेचा 'लाभ' आपला कार्यकाळ संपेपर्यंत मिळावा या उद्देशाने काही पदाधिकारी व बडे नगरसेवक फिल्डिंग लावून तयार आहेत. मनुष्यबळाची कमतरता, कामाचा वाढता व्याप, अर्धवट योजनांचा विचार करता अनुभवी व्यक्तीच मानधनावर किंवा कंत्राटी पद्धतीने पालिकेच्या सेवेत नियुक्त केला, तर कामांच्या सध्याच्या गतीत फरक पडणार नाही, असे मानून निवृत्त अधिकाऱ्यांसाठी आयुक्तांकडे शिफारस करण्याची तयारी काही जणांनी केली आहे. मानधनावर किंवा कंत्राटी पद्धतीवर नियुक्तीनंतर त्यांना फायलीवर स्वाक्षरीचे अधिकार राहणार नाहीत, पण फाइल तयार करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होईल. त्यामुळे साचेबद्ध पद्धतीने फाइल तयार होतील आणि त्यांच्या मंजुरीसाठी विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोहिनी मराठी लोककलांची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

युवा महोत्सवात पहिल्या दिवशी लोकगीत, शास्त्रीय नृत्य, भजन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेने रंगत आणली. शास्त्रीय तालवाद्य स्पर्धेला नगण्य प्रतिसाद मिळाला. पारंपरिक लोककलांचे सादरीकरण करीत स्पर्धकांनी बहार उडवली.

मराठी लोककलेची समृद्ध परंपरा अधोरेखित करीत विद्यार्थी कलाकारांनी युवा महोत्सव गाजवला. नटरंग स्टेजवर दुपारी तीन वाजता लोकगीत स्पर्धा सुरू झाली. 'जय देवी मंगळागौरी', 'काय तुझ्या मनात घडतंय', 'जागली जागली सृष्टी', 'आईची आई सावित्रीआई', 'आईची माया विसरू नको' अशा जुन्या लोकगीतांचे सादरीकरण झाले. काही कलाकारांनी संगीत साथसंगत न घेता लोकगीत उरकले. तर काही कलाकारांनी वाद्यांची अचूक साथ घेत बहार उडवली. लोकरंग स्टेजवर दुपारी भजन स्पर्धा रंगली. ग्रामीण भागातील महाविद्यालयांनी भजनात अधिक दाद मिळवली. 'धरीला पंढरीचा चोर', 'निरंजनी आम्ही बांधियले घर', 'मी गातो नाचतो आनंदे' अशा अवीट अभंगांना दाद मिळाली. ललितरंग येथे निसर्गचित्र व व्यंगचित्रकला स्पर्धा पार पडली. स्पर्धेत अडीच तासात विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचा निसर्गरम्य परिसर कुंचल्याने साकारला. जवळपास ६० स्पर्धकांनी सहभाग घेतल्याचे डॉ. शिरीष अंबेकर यांनी सांगितले. शब्दरंग स्टेजवर वक्तृत्व स्पर्धा रंगली. नाट्यरंग स्टेजवरील शास्त्रीय नृत्य स्पर्धेला प्रतिसाद मिळाला. सायंकाळच्या सत्रात लोकवाद्यवृंद, पोवाडा, लोकनाट्य, पोस्टर स्पर्धा रंगली. लोकवाद्यवृंद स्पर्धा पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची सर्वाधिक गर्दी झाली. किमान आठ वाद्यांचे एकत्रित सादरीकरण ऐकणे पर्वणी ठरले. या स्पर्धेतून पारंपरिक लोककला अनुभवता आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. बहुतेक संघ वेळेत पोहचत नसल्यामुळे मधल्या वेळेत सादरीकरण झाले नाही. वेळेचा नियम पाळला जात नसल्यामुळे स्पर्धेची वेळ विनाकारण वाढली. शिवाय पुढील वेळापत्रकात बदल करावा लागला.

दरवर्षीप्रमाणे युवा महोत्सव उत्साह वाढवणारा आहे. लोकगीत प्रकारात सहभागी झालो. पारंपरिक वाद्ये वाजवली. नवोदित कलाकारांसाठी हा हक्काचा मंच आहे.

गजानन धुमाळ, स्पर्धक

भजन स्पर्धेत सहभागी झालो आहोत. मागील तीन वर्षांपासून महोत्सवात सहभागी होतो. मागील वर्षी आमच्या संघाला कमी पारितोषिके मिळाली. यावर्षी चांगली कामगिरी करणार आहे.

अंकुश केदार

युवा महोत्सव इतका वैविध्यपूर्ण आणि आनंददायी आहे की मला फोटोग्राफी करण्याचा मोह आवरता आला नाही. माझ्यासाठी ही चांगली संधी आहे.

आकाश कोल्हे, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळी स्थितीवर वरुण यंत्राचा उपाय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संपूर्ण मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागांत पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. परतीच्या पावसाचे केवळ २५ ते ३० दिवस उरले आहेत. बहुतांश धरणे रिकामी आहेत. यापूर्वी पाऊस जाताना जी काही भौगोलिक स्थिती होती, तीच कायम आहे. त्यामुळे शिल्लक दिवसांत वरुण यंत्राद्वारे प्रत्येक पाच किलोमीटरवर दहा हजार लिटर क्षमतेच्या ५०० टँकर भरेल इतका पाऊस पाडून घेणे शक्य आहे, असा दावा वरुण यंत्राचे निर्माते, प्रसारक व मुंबई आयआयटीचे संशोधक डॉ. राजा मराठे यांनी केला.

मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या डॉ. मराठे यांनी या संदर्भात बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. मराठवाड्याला पावसाची नितांत गरज आहे. आजघडीला जायकवाडीसह बहुतांश धरणे रिकामी आहेत. ही स्थिती कायम राहिली, तर भविष्यात हमखास दुष्काळ ठरलेला आहे. त्यामुळेच पावसाच्या उरलेल्या दिवसांचा वरुण यंत्राद्वारे लाभ घेतला, तर आपल्या भागात पाऊस पाडून घेणे शक्य आहे. अवघ्या २०० रुपयांमध्ये हा वरुण यंत्राचा प्रयोग होऊ शकतो. त्यासाठी तीन क्विंटल लाकूड किंवा ट्रक-ट्रॅक्टरचे दोन ते तीन मोठे टायर यांची होळी करून त्यात ५० किलो मीठ टाकून मीठाची वाफ करणे अपेक्षित आहे. ही वाफ ढगात जाऊन ढगातील पाण्याचे थेंब एकत्र येण्याची व एकमेकांवर आपटण्याची क्रिया होते. त्यातून पाण्याचे मोठमोठे थेंब तयार झाले की होळी केलेल्या साधारणतः पाच ते सहा किलोमिटरच्या परिसरात पाऊस पडतो. २००९ पासून मी चारशे ठिकाणी हा प्रयोग केला असून, आतापर्यंत ८० टक्क्यांपेक्षा जास्त ठिकाणी पाऊस पडला आहे. झाडे तोडून लाकडांची होळी करण्यापेक्षा टायरची होळी करणे अधिक संयुक्त ठरते आणि पावसाच्या माध्यमातून मिळणाऱ्या पाण्याच्या मोठ्या व व्यापक लाभाच्या तुलनेत होळीतून होणारे वायू प्रदूषण हे नक्कीच कमी आहे, असेही डॉ. मराठे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘टीडीएस’,‘टीसीएस’ सोमवारपासून लागू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जीएसटी कायद्याअंतर्गत तरतूद असलेल्या टॅक्‍स डिडक्‍शन एट सोर्स (टीडीएस) व टॅक्‍स कलेक्‍शन एट सोर्स (टीसीएस)ची अमंलबजावणीची सोमवारपासून (एक ऑक्‍टोबर) करण्यात येणार आहे. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज संस्थांच्या कंत्राटदारांनाकडून दोन टक्के टीडीएस, तर ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या (ई-कॉमर्स) कंपन्यांना सेवा व उत्पादनांवर एक टक्का टीसीएस द्यावा लागणार आहे.

देशात जीएसटी (वस्तू व सेवा कर)ची अंमलबजावणी एक जुलै २०१७ पासून सुरू झाली. मात्र, त्यावेळीस टीडीएस संदर्भातील कार्यवाही स्थगित ठेवण्यात आली होती. दरम्यान, जीएसटी कायद्यातील तरतुदीनूसार टीडीएस संदर्भातील प्रत्यक्ष अंमलबजावणी आता येत्या एक ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे. या संदर्भातील परिपत्रक काढण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय जीएसटीचे सहआयुक्‍त अशोक कुमार यांनी दिली.

केंद्र,राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत निविदा काढून विविध कामे, वस्तू पुरवठा, सेवा कंत्राटदारांमार्फत करून घेतल्या जातात. जीएसटी कायद्याच्या तरतुदीनुसार ज्या निविदेच्या कामाची किंमत ही अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, त्या निविदेच्या देय रक्कमेतून दोन टक्के टीडीएस कपात करुन ती रक्कम संबंधित सरकारी कार्यालयास जीएसटीकडे भरावी लागणार आहे.

आनॅलाइन व्यवहार करणाऱ्या (ई-कॉमर्स) कंपन्यांना त्यांनी दिलेली सेवा, पुरवठा केलेल्या वस्तूच्या पेमेंटवर एक टक्का टीसीएस कापून सरकारच्या तिजोरीत भरावी लागणार आहे. यात २० लाखांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या ई कॉमर्स कंपन्यांनाचाही समावेश राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ महिन्यात फक्त दहा टक्के कर वसुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आठ महिन्यात मालमत्ता कराची फक्त दहा टक्के वसुली झाल्याने महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. महिन्याला कमीत कमी १५ टक्के वसुली कठोरपणे करा, असे आदेश त्यांनी दिले.

आयुक्त डॉ. निपुण विनायक बुधवारी सकाळी आठ वाजताच पालिकेत आले. त्यांनी सुरुवातीला नगररचना विभागाची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी मालमत्ता कर वसुलीबद्दल अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, करमूल्य निर्धारक व संकलक वसंत निकम, सर्व वॉर्ड अधिकारी, पथक प्रमुखांची बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालमत्ता कर वसुलीचे सर्वसाधारण सभेने दिलेले ४५० कोटींचे टार्गेट पूर्ण करण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. आतापर्यंत फक्त चाळीस कोटींचीच वसुली झाली आहे. कर वसुलीसाठी झोन कार्यालयनिहाय पथकांची स्थापना केली. पथकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र प्रमुख नेमले. तरीही वसुली का वाढत नाही असा सवाल त्यांनी केला. वसुलीचे काम करताना शिफारस करणाऱ्या कुणाचेही फोन घेऊ नका, कठोरपणे वसुली करा, असे आदेश दिले. विशेष पथकांनी रोज दहा मोठ्या थकबाकीदारांकडून वसुली करावी. ऑक्टोबरपासून प्रत्येक महिन्याला पंधरा टक्के वसुली झालीच पाहिजे, असे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना बजावले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारक करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथील भिडेवाडा येथे सुरू केलेल्या मुलींच्या शाळेची दुरावस्था झाली आहे. या जागेचे सरकारने तातडीने जतन व संवर्धन करावे, या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारावे, या मागणीसाठी व मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ क्रांतीचौकात बुधवारी 'आई सावित्रीबाई फुलेवाडा संघर्ष समिती'तर्फे 'पुंगी बजाओ' आंदोलन करण्यात आले.

समितीतरफे भिडेवाडा बचाव मोहीम दोन महिन्यांपासून सुरू करण्यात आले आहे. सध्याचे सरकार बहुजनांवर अन्याय करत आहे. भिडेवाडा प्रश्नी बोलायला, पहायलाही तयार नाहीत. म्हणून पुंगी वाजवून त्यांना जागे करण्याचा प्रयत्न म्हणून आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आल्याचे समितीचे देव राजाळे, कल्याण जाधव यांनी सांगितले. या ऐतिहासिक शाळेचे, जागेचे महत्त्व लक्षात घेता सरकारने तातडीने येथे राष्ट्रीय स्मारक उभारावे, अशी मागणी त्यांनी केली. सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करू, निवडणुकीत गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. निलेश आंबेवाडीकर, मोहित जाधव, किरण राजाळे, शुभम दहिवाल, विजय कांबळे, माधुरी राऊत, अश्विनी जाधव, सागर खलसे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुलीभंजनला ‘तारांगण’ , म्हैसमाळला अद्ययावत रिसॉर्ट

$
0
0

जागतिक पर्यटनदिन विशेष

Unmesh.deshpande@timesgroup.com

Tweet - @UnmeshMT

औरंगाबाद -

महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटकांच्या सोईसाठी दोन नवीन प्रकल्प हाती घेण्याचे ठरविले आहे. त्यातील एक प्रकल्प शुलीभंजनला 'तारांगण' च्या रुपाने विकसीत केला जाणार आहे, तर म्हैसमाळला अद्ययावत रिसॉर्ट उभारण्याचे काम देखील सुरू केले जाणार आहे. याशिवाय निवास आणि न्याहरी योजनेचा लाभ देखील पर्यटकांना घेता येणार आहे.

पर्यटनवाढीच्या दृष्टीने एमटीडीसीने वेरुळ - म्हैसमाळ - शुलीभंजन - खुलताबाद विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यातील काही कामे सुरू करण्यात आली आहेत, तर काही कामांचा आराखडा तयार केला जात आहे. शुलीभंजन हे ठिकाण पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचे ठिकाण आहे. उंच डोंगरावर असलेले दत्त मंदिर, मंदिराच्या परिसरात असलेले कुंड, खोल दऱ्या हे शुलीभंजनचे वैशिष्ट्य आहे, परंतु आता एमटीडीसीकडून तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यानुसार शुलीभंजनची ओळख 'तारांगणचे गाव' अशी होणार आहे. शुलीभंजनच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर शासकीय जमीन आहे. यापैकी सहा एकर जमीन तारांगण प्रकल्पासाठी देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. सुमारे १०० कोटींचा निधी देखील शासनाने मंजूर केला आहे. या निधीतून शुलीभंजन बरोबरच म्हैसमाळला देखील कामे केली जाणार आहेत. एमटीडीसीच्या हॉलीडे रिसॉर्टचे व्यवस्थापक विजय जाधव यांनी याबद्दल माहिती दिली. एमटीडीसीचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक नितीन मुंडावरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन योजनांचे काम केले जात आहे, असे ते म्हणाले. प्रख्यात आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे शुलीभंजनच्या तारांगणसह अन्य विकास योजनेचा आराखडा तयार करीत आहेत. शुलीभंजन येथे सूर्यकुंड आणि चंद्रकुंड आहे. या दोन्हीही कुंडांच्या विकासाची योजना आखण्यात आली आहे. त्याशिवाय भव्य तारांगण (प्लॅनोटोरियम) तयार करण्याचे नियोजन देखील करण्यात आले आहे. तारांगण प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सहा एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाबरोबरच सूर्यकुंड आणि चंद्रकुंडच्या विकासासाठी शासनाने निधी मंजूर केल्याचा अध्यादेश देखील काढला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जागा प्राप्त होताच ही कामे सुरू केली जाऊ शकतील.

म्हैसमाळ येथे अद्ययावत रिसॉर्ट उभारण्याचे नियोजन देखील एमटीडीसीने केले आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या म्हैसमाळमध्ये पर्यटकांसाठी राहण्याची विशेष व्यवस्था नाही, त्यामुळे पर्यटकांची हेळसांड होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी रिसॉर्टची योजना आखण्यात आली आहे. शुलीभंजन आणि म्हैसमाळ येथे एकाच वेळी काम सुरू केले जाण्याची शक्यता आहे.

निवास - न्याहरी योजना

औरंगाबाद जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना निवासाची व्यवस्था माफक दरात व्हावी यासाठी एमटीडीसीने निवास आणि न्याहरी योजना सुरू केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पहाडसिंगपुरा, वेरुळ, अजिंठा, साई मंदिरासमोर जालनारोड औरंगाबाद, खंडाळा येथे आठ ठिकाणी निवास आणि न्याहरीची योजना आहे. हॉटेल्सचे भाडे अनेक पर्यटकांना परवडत नाही, शिवाय तेथील आहार देखील सहन होतोच असे नाही. त्यामुळे खासगी व्यक्तीच्या घरी माफक दरात पर्यटकांची राहण्याची व नाष्ट्याची योजना या माध्यमातून आखण्यात आली आहे. ज्या व्यक्तीच्या घरात ही योजना सुरू करायची आहे त्या व्यक्तीचे घर मोठे असावे, वाडा असावा किंवा बंगला असावा. किमान चारपेक्षा जास्त बेडस् आणि स्वतंत्र किचन असावेत असा या योजनेचा निकष आहे. पर्यटकांकडून घ्यायचे शुल्क त्या व्यक्तीनेच ठरवायचे असून त्याला एमटीडीसीची मान्यता घ्यायची आहे. या योजनेचे काम एमटीडीसीच्या औंरगाबाद येथील कार्यालयातील रामदास क्षीरसागर पहात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेत दलाल नाहीत; महापौरांचे आयुक्तांना उत्तर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महापालिकेत दलाल नाहीत. दलाल असण्याचेही कारण नाही. आयुक्त अनावधानाने बोलले असतील,' असे उत्तर महापौर नंदकुमार घोडेले यांनी डॉ. निपुण विनायक यांना देत भ्रष्ट कारभारावर एकप्रकारे पांघरुण घातले.

'महापालिकेत प्रश्न घेवून येणाऱ्या सामान्य नागरिकांची संख्या फार कमी असते. दलालच जास्त भेटायला येतात,' असे खळबळजनक विधान आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले होते. 'दलाल भेटायला येत असल्यामुळे पालिका मुख्यालयातील कार्यालयात आपण बसत नाही. नागरिकांच्या समस्या त्यांच्या वॉर्डात जावून ऐकतो,' असेही ते म्हणाले. आयुक्तांच्या विधानाबद्दल पत्रकारांनी बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते म्हणाले, 'पालिकेत दलाल नाहीत आणि ते असण्याचे कारण देखील नाही. आयुक्त चांगले काम करीत आहेत. दलाल हा शब्द त्यांनी कुणाला उद्देशून म्हटलेला नाही. कुणाला दुखवण्याचा त्यांचा हेतू नव्हता. आयुक्त तसे अनावधानाने बोलले असतील. या प्रकरणाबाबत आपण स्वत: त्यांच्याशी चर्चा करणार आहोत.' मात्र, महापौरांनी केलेला खुलासा किती विश्वासपात्र आहे, याबद्दल लगेचच पालिकेच्या वर्तुळात उलटसलट चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images