Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘जलयुक्त’साठी सातत्य आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गावात कायमस्वरुपी मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान योजना राज्यात यशस्वी ठरली आहे. हे यश टिकवण्यासाठी सातत्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी येथे केले.

मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ मध्ये उत्कृष्ट योगदान दिलेल्या जिल्हा, तालुका, गाव, पत्रकार व अधिकारी कर्मचारी यांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा कृषी अधीक्षक टी. एस. मोटे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

बागडे म्हणाले की, पाण्याचा मुबलक साठा ही आजच्या काळात समाधानाची बाब आहे. ग्रामीण भागात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदशर्नाखाली जलयुक्त शिवार अभियान योजना सुरू केली. योजनेच्या पहिल्याच वर्षात यंत्रणा आणि लोकसहभागातून उल्लेखनीय काम उभे केले आहे. त्यामध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांचा आज गौरव होत आहे ही त्यांच्या कामासाठी योग्य पावती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यावेळी, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे यासह इतर सर्व कल्याणकारी योजनांमध्ये जिल्हा कायम अग्रेसर ठेवण्यासाठी सर्वांनी अशाच उत्सूर्फतपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात विभाग तसेच जिल्हास्तरावरील पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात विभाग स्तरावर उत्कृष्ट काम करणारा जिल्हा म्हणून राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कारामध्ये औरंगाबाद जिल्ह्यास द्वितीय पुरस्कार विभागून देण्यात आला. खुलताबाद तालुक्यास विभागून द्वितीय पुरस्कार देण्यात आला.

\Bपुरस्कार प्राप्त तालुके, गावे व व्यक्ती \B

खुलताबाद प्रथम, औरंगाबाद व्दितीय, तर जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांसाठीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार महालपिंप्री (ता. औरंगाबाद) पाचोड बुद्रुक (ता.पैठण) व्दितीय, फुलंब्री (ता. फुलंब्री) तृतीय, बाजार सावंगी(ता. खुलताबाद), चौथा पुरस्कार व पालखेड (ता.वैजापूर) यांना पाचव्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. पत्रकारांसाठीचा प्रथम पुरस्कार विजय एकनाथ चौधरी, तर द्वितीय पुरस्कार प्रतीक्षा श्रीनिवास परिचारक यांना देण्यात आला. उत्कृष्ट अधिकारी म्हणून अशोक साहेबराव कोंडे यांना गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बीआरएसपी’चे राज्यात विभागवार अधिवेशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी) स्थापनेला तीन वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्त राज्यभरात विभागवार अधिवेशन घेण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. डॉ. सुरेश माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. नागपूर येथे १३ व १४ ऑक्टोबर रोजी विदर्भाचे अधिवेशन, २० व २१ रोजी मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राचे अधिवेशन औरंगाबाद येथे, तर २७ व २८ रोजी पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागाचे अधिवेशन कल्याण-डोंबवली येथे होणार आहे.

डॉ. माने म्हणाले की, गेल्या तीन वर्षांच्या कालखंडामध्ये पक्षाने नोटबंदी, शेतकरी पेन्‍शन योजना, शैक्षणिक धोरणे, घटनात्मक आरक्षण, टोलमाफी, रोजगार निर्मिती आदी जनतेच्या विविध प्रश्नांवर सातत्याने जनआंदोलने, संविधान हक्क परिषदा, विविध समाज संमेलने आयोजित केली. या अधिवेशनानंतर 'बीआरएसपी' निवडणूक धोरण जाहीर करणार आहे. आरक्षणाबद्दल ते म्हणाले की, सरकार कोणत्याही समाजाला आरक्षणाबद्दल आश्वासने देत असले तरी घटनेनुसार आरक्षण देणे शक्य नाही. त्याऐवजी सध्याच्या आरक्षण मर्यादेत ढवळाढवळ न करता जो समाज आरक्षण मागत आहे त्या समाजातील प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी द्यावी, असा आम्ही पर्याय सूचवत आहोत.

आगामी निवडणुकांमध्ये कुणासोबत जाणार यावर बोलताना डॉ. माने म्हणाले की, भाजपाला फायदा आणि विरोधी मतांची विभागणी होईल, असे कोणतेही धोरण 'बीआरएसपी' स्वीकारणार नाही. 'एमआयएम' आणि भारिप बहुजन महासंघाची भूमिका जर भाजपला पूरक ठरणार असेल, तर जनता या पक्षांना नाकारणार,असा दावा त्यांनी केला.

'व्हीव्हीपॅट'मधील मतांची मोजणी व्हावी

आगामी निवडणुकांमध्ये ईव्हीएम सोबत 'व्हीव्हीपॅट' लावण्‍यात येणार आहे. मात्र या प्रत्येक मतदानाची मोजणी होत नाही. ही मोजणी करण्यात यावी, अशी मागणी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुभाष माने यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रगडे, पोहनेरकर, साळवे यांना पर्यटन मित्र पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यटनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. राजेश रगडे, भारतीय पुरातत्व विभागाच्या दौलताबाद किल्ल्याचे व्यवस्थापक संजय पोहनेरकर, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक डी. जी. साळवे यांच्यासह दहा जणांना 'पर्यटन मित्र' पुरस्काराने गौरविण्यात आले.

जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालयात 'पर्यटन मित्र' पुरस्काराचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांची विशेष उपस्थिती होती. रगडे, पोहनेरकर, साळवे यांच्यासह फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद जऱ्हाड, मराठवाडा हँडीक्राफ्ट असोसिएशनचे बारेक अली खान, लोकसेवा एज्युकेशन सोसायटीच्या कला - विज्ञान महाविद्यालयाचे डॉ. शेख परवेज असलम शेख, एअर इंडियाचे औरंगाबाद येथील व्यवस्थापक अजय भोळे, हॉटेल रामा इंटरनॅशनलचे सेल्स मॅनेजर श्रीकांत जोगदंड, पैठण येथील गाइड राजीव सातघरे, अल्फा टुर्स अँड ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापकीय संचालक मोहंमद अजीज यांना हा पुरस्कार देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...हम खडे तो सरकारसे बडे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा युवा महोत्सव तरुणाईचा उत्साह द्विगुणित करणारा ठरला. सादरीकरणाच्या शेवटच्या दिवशी संबळावर ठेका धरत विद्यार्थ्यांनी गोंधळाला दाद दिली. या महोत्सवाचा शनिवारी सकाळी समारोप होणार आहे.

युवा महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात गोंधळ कला प्रकाराने झाली. तरुणांनी टाळ्यांच्या कडकडाटात गोंधळाचा आनंद घेतला. लोकरंग मंच गर्दीने फुलून गेले होते. संबळाच्या ठेक्यावर अनेकांनी ताल धरला. 'आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला' अशा लोकप्रिय गोंधळाला सर्वाधिक दाद मिळाली. या गोंधळात शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाच्या संघाने लक्षवेधी सादरीकरण केले. 'कुलगुरूचं नाव गं, औरंगाबाद गाव गं' असा वेगळा गोंधळ स्पर्धेचे आकर्षण ठरला. शिवछत्रपती महाविद्यालयाच्या संघाने हा गोंधळ सादर केला. गोंधळात नवोदित जोडपे देवाची पूजा कशी करते, हा जिवंत देखावा बघायला मिळाला. या लोकप्रिय कला प्रकारात फक्त चौदा महाविद्यालयांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी २५ महाविद्यालयांनी नोंदणी केली होती. मात्र, प्रत्यक्ष रंगमंच्यावर केवळ चौदा महाविद्यालयांनी गोंधळ सादर केल्याने स्पर्धा लवकर आटोपली. नटरंग रंगमंचावर प्रहसन कला प्रकार सादर झाला. व्यसन, सामाजिक वास्तव, स्पर्धा यावर भाष्य करीत प्रहसन लक्षवेधी ठरले. एखाद्या मुलाची प्रेमात फसवणूक झाल्यास तो कसा व्यसनाच्या आहारी जातो हे सांगणारे प्रहसन दाद घेऊन गेले. परीक्षेचे जुगाड, कॅरिऑनचे जुगाड अशा जुगाडावर नेमके भाष्य झाले. स्पर्धक कलाकारांची वैशिष्ट्यपूर्ण बोलीभाषा स्पर्धेचे आकर्षण ठरली. 'हम खडे तो सरकारसे बडे', 'क्या मजा सिगारेट पिने मे असली मजा है जिदंगी जिनें मे' अशा संवादाला भरभरुन प्रतिसाद मिळाला. स्टेज क्रमांक एकवर सकाळी समूह गायन (भारतीय) कला प्रकार सादर झाला. शेतकरी गीत, कोळीगीत, भक्तिगीत या गीतांनी बहार उडवली. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला या गीताचे आकर्षक सादरीकरण झाले. समूह गायन स्पर्धेत उपस्थितांच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले. गुरुवारी सादरीकरण राहिलेल्या लावण्या शुक्रवारी सादर करण्यात आल्या. असं वाजवा की रात गाजवा की, बुगडी माझी, ढोलकीच्या तालावर या लावण्यांनी धमाल उडवली. लावणी ऐकण्यासाठी सर्वाधिक विद्यार्थी उपस्थित होते. लोकआदिवासी नृत्यालाही चांगली दाद मिळाली. 'कोळीवाड्याची शान आई तुझं देऊळ', 'सांग तुझ्या मनात काई हाय गं' 'मी हाय कोली कोली' या लोकनृत्यांचे सादरीकरण झाले. भ्रष्टाचाराचा भस्मासूर विध्वंस करीत असल्याचे एका संघाने बंजारा नृत्याद्वारे दाखवले. वाघ्या-मुरळी गीतावर उपस्थितांनी ठेका धरला. भांगडा नृत्य वेगळे ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांच्या स्वागताला राष्ट्रवादी नेत्यांची पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, समता परिषदेचे सर्वेसर्वा, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे तब्बल तीन वर्षांनंतर शहरात आले. अखिल भारतीय समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत करून विमानतळापासून ताज हॉटेलपर्यंत वाहन फेरी काढली, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही मोठ्या नेत्याने विमानतळावर भुजबळ यांच्या स्वागतासाठी हजेरी लावली नाही.

बीड येथे शनिवारी (२९ सप्टेंबर) भुजबळ यांच्या उपस्थितीत समता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भुजबळ हे शुक्रवारी औरंगाबादेत मुक्कामी होते. सायंकाळी चारपासूनच भुजबळ समर्थकांनी, समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भुजबळ यांच्या स्वागतासाठी गर्दी करणे सुरू केले होते. साडेपाच वाजता विमातळावरून भुजबळ बाहेर पडतातच कार्यकर्त्यांनी गगनभेदी घोषणा दिल्या. यावेळी विमानतळापासून भुजबळांचा मुक्काम असलेल्या ताज हॉटेलपर्यंत मोटारसायकल; तसेच चारचाकी वाहनांची फेरी काढण्यात आली. यावेळी जागोजागी फटाके फोडून त्यांचे स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील एकाही मोठ्या नेत्यांने भुजबळ यांच्या स्वागतासाठी हजेरी लावली नाही, याची चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड विभाग मध्य रेल्वेशी जोडा

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील रेल्वे संदर्भाातील अनेक प्रश्न मुंबईशी सबंधित आहेत. त्यामुळे नांदेड विभाग मध्य रेल्वेशी जोडावा, अशी मागणी शुक्रवारी

नांदेड येथील विभागीय कार्यालयात आयोजित रेल्वे बैठकीत मराठवाड्यातील खासदारांनी केली.

बैठकीला नांदेडचे खासदार अशोक चव्हाण, औरंगाबादचे चंद्रकांत खैरे, परभणीचे संजय जाधव, हिंगोलीचे राजीव सातव, अकोल्याचे संजय धोत्रे यांच्यासह दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव, नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा, अरुणकुमार जैन यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातील रेल्वे विकासात्मक कार्य, सेवेसंदर्भात मुद्दे मांडले. नव्या रेल्वेमार्गाची निर्मिती, नव्या गाड्या सुरू करणे, रेल्वे सेवेचा विस्तार, रेल्वेला अतिरिक्त रस्ता, पूल बांधणे, रस्त्यांचे बांधकाम आणि सुधारित प्रवासी सुविधा आदी विषयावर बैठकीत चर्चा झाली. यावेळी औरंगाबाद, नांदेड या रेल्वे स्टेशनचा विकास करण्यात येणार असून मनमाड परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण २०२४ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकचालकाल लुटणारी टोळी जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रिक्षातून आलेल्या तिघांनी डिझेल भरण्यासाठी आलेल्या ट्रकचालकाला मारहाण करत दहा हजार रुपये लूटले. हा प्रकार बुधवारी रात्री अकरा वाजता बीड बायपासवर घडला. याप्रकरणी तिन्ही आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी भिवा लक्ष्मण जाधवर (वय ४५, रा. वडजी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) या ट्रकचालकाने तक्रार दिली होती. जाधवर यांनी बुधवारी रात्री देवळाई चौकातील ट्रान्सपोर्टच्या कार्यालयातून लोखंड लोड करून घेतले होते. तसेच दहा हजार रुपये अॅडव्हान्स घेतला. यानंतर ते बीड बायपासवरील चौधरी पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी थांबले होते. यावेळी एका रिक्षातून आलेल्या तीन तरुणांनी ट्रकमध्ये घुसून पान्ह्याने मारहाण केली. तसेच जाधवर यांचे दहा हजार रुपये, ट्रकची कागदपत्रे व चावी हिसकावून पळून गेले. याप्रकरणी जाधवर यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, जाधवर यांना लुबाडणारी टोळी जालना रोडवरील केंब्रिज चौकात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. तेथे सापळा रचून अॅटो रिक्षातून आलेले संशयित आरोपी शेख इरफान शेख लाल (वय २५ रा. गारखेडा), सचिन शंकर राठोड (वय १९ रा. देवळाई गाव) व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत जाधवर यांच्या ट्रकची कागदपत्रे पोलिसांना दिली. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, सहाय्यक पोलिस आयुक्त नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय राहुल सूर्यतळ, जमादार संतोष सोनवणे, बापुराव बावीस्कर, लालखान पठाण, नंदलाल चव्हाण, योगेश गुप्ता, रितेश जाधव व शेख बाबर यांनी केली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात गुन्हेगारांने पेटवले शेजाऱ्याचे घर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगारांनी शेजाऱ्याच्या घराचा दरवाजा पेट्रोल टाकून पेटवून दिला. हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री एक वाजता चिकलठाणा येथील चौधरी कॉलनीत घडला. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अशोक लक्ष्मण बनसोडे (वय ३५, रा. चौधरी कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली. बनसोडे यांच्या घराजवळच पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात आरोपी अनिल अंबादास माळवे व अरुण अंबादास माळवे हे दोघे राहतात. माळवे बंधु गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास बनसोडे यांच्या घरासमोर आले. त्यांनी पेट्रोल टाकून बनसोडे यांच्या घराच्या दरवाजा पेटवून दिला व तेथून पळून गेले. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर बनसोडे यांनी तातडीने आग विझवली. या घटनेत बनसोडे यांचे सात हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी माळवे बंधूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एपीआय जाधव हे तपास करत आहेत.

\Bअट्टल गुन्हेगार\B

अनिल अंबादास माळवे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील हिस्ट्रीशीटर आहे. त्याच्या विरुद्ध विविध पोलिस ठाण्यात चोरी, घरफोडी, अवैध दारू विक्री, मारहाण करणे आदी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी यापूर्वी त्याच्यावर हद्दपारीची कारवाई देखील केलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रसूलपुरा ग्रामपंचायतीत कर्मचाऱ्यास मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

करवसुली करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण करत करवसुलीचे रजिस्टरच पळवण्यात आले. हा प्रकार गुरुवारी दुपारी रसूलपुरा ग्रामपंचायतीमध्ये घडला. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध दौलताबाद पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महेंद्र नामदेव गायकवाड (वय ४२, रा. छत्रपतीनगर, सातारा परिसर) यांनी तक्रार दाखल केली. गायकवाड हे गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय कर्तव्य बजावत होते. यावेळी संशयित आरोपी चंद्रभान केशव बनसोडे (रा. रसूलपुरा, ता. खुलताबाद) हे ग्रामपंचायत कार्यालयात आला. बनसोडे याने गायकवाड यांना तुम्ही माझ्या आईच्या घराची करवसुली कशी काय करता, असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. गायकवाड यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र बनसोडे याने मारहाण सुरूच ठेवली. यानंतर तेथील करवसुलीचे रजिस्टर घेऊन बनसोडे पळून गेला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक सूर्यवंशी हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेतीनशे कोटींची उलाढाल थांबली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऑनलाइन व किरकोळ व्यापारातील विदेशी गुंतवणूक त्वरित रद्द करण्यासह अन्य मागण्यांसाठी व्यापाऱ्यांच्या बंदमुळे शुक्रवारी शहरातील प्रमुख बाजारपेठामध्ये शुकशुकाट जाणवत होता. या बंदमुळे तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांची उलाढाल थाबल्याची माहिती व्यापारी क्षेत्रातील अभ्यासकांनी दिली.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) देशव्यापी बंदची हाक दिल्यानंतर व्यापारी महासंघ व त्यांच्या संलग्न ७२ संघटना गेल्या महिनाभरापासून बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत होते. ठिकठिकाणी कॉर्नर बैठका घेऊन, जनजागृती फेरी काढून पदाधिकाऱ्यांनी बंद मागील भूमिका विशद करत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या प्रयत्नांना मोठा प्रतिसाद मिळाल्याचे 'बंद'दरम्यान दिसून आल्याचे महासंघाने नमूद केले.

इलेक्ट्रॉनिक्स, गृहोपयोगी वस्तू विक्रेते, भांडी मार्केट व्यापारी, कपडा मार्केट व्यापारी हार्डवेअर, प्लायवूड, खाद्यतेल विक्रेते, प्लास्टिक विक्रेत यांसह विविध क्षेत्रातील व्यापारी, विक्रेते बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेत. त्यामुळे ग्राहकांची वर्दळ असलेली रंगार गल्ली, सराफा बाजार, शहागंज, चेलीपुरा, निराला बाजार, सिटी चौक, टिळकपथ यासह प्रमुख बाजारपेठेतील दुकाने, प्रतिष्ठाने बंद होती. परिणामी, बाजारपेठेतील सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांवर उलाढाल थांबली, अशी माहिती व्यापार क्षेत्रातील सूत्रांनी दिली. दरम्यान,जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आवारात सकाळी भाजीपाला मार्केट वगळता उर्वरित धान्य मार्केट, किराणा व शॉपिंग सेंटर परिसरात दिवसभर शुकशुकाट होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरूड पुराण कथा आज

$
0
0

औरंगाबाद : पितृपक्षाच्या निमित्ताने जवाहर कॉलनी परिसरातील विश्वशंकर मंगल कार्यालय येथे राष्ट्रीय कीर्तनकार मनोहर दीक्षित यांच्या गरूड पुराण कथा प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. एक ते सात ऑक्टोबरपर्यंत दररोज रात्री आठ वाजता कथेला सुरुवात होईल. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आ‌वाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवनच्या १४ कर्मचाऱ्यांना दिलासा; तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या चौदा कर्मचाऱ्यांना स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गात समाविष्ट करण्यासंदर्भात तीन महिन्यात निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी दिले.

वयाची ४५ वर्षे पूर्ण केल्यानंतर व्यावसायिक परीक्षेतून सूट देण्यासंदर्भात जलसंधारण विभागाने नऊ सप्टेंबर २००२ रोजी निर्णय दिला आहे. त्यामुळे स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गात समाविष्ट करण्यासाठी व्यावसायिक वा विभागीय परीक्षा उत्तीर्ण असण्याची आवश्यकता नाही, असा युक्तीवाद याचिकाकर्त्यांच्यावतीने करण्यात आला. तर याचिकाकर्त्यांकडे या संवर्गात समाविष्ट होण्यासाठी आवश्यक पात्रता नाही, असे म्हणणे जीवन प्राधिकरणाने मांडले. या प्रकरणात मिस्त्री पदावर कार्यरत याचिकाकर्त्यांचा स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गात समावेश करण्याचा निर्णय तीन महिन्यात घेण्याचा आदेश दिला. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना नोटीस न देता त्यांच्या निवृत्ती वेतनातून ५० हजार रुपये कपात केल्याप्रकरणात कपातीची रक्कम तीन महिन्यात परत करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांच्यावतीने हनुमंत जाधव, आर. पी. भूमकर यांनी बाजू मांडली. जीवन प्राधिकरणातर्फे डी. पी. बक्षी तर सहाय्यक सरकारी वकील एस. के. तांबे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार पावती घ्या, समितीचे मतदार व्हा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'दुष्काळी परिस्थितीत भरीव मदत, कर्ज वितरणाचे वाढलेले प्रमाण यासह शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सरकारने अनेक पावले उचले असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निवडण्याची संधीही याच सरकारने थेट शेतकऱ्यांना देऊ केली आहे. तेव्हा समिती आवारात मालाची विक्री करा आणि पक्की पावती घ्या,' असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.

जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा शनिवारी झाली. सभेचे उद्घाटन बागडे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, उपसभापती भागचंद ठोंबरे, दामोधर नवपुते यांच्यासह संचालक, शेतकरी, व्यापारी तसेच हमाल मापाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बागडे म्हणाले, 'बाजार समितीचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ले आउटचा प्रश्न पाठपुराव्यामुळे मार्गी लागल्याने विकासाचे प्रश्न निश्चितच सुटतील. शेतकऱ्यांकडून हमाली, आडत घेऊ नये, असा जुना कायदा आहे. मात्र, अंमलबजावणी गेल्या तीन वर्षांपासून होत आहे,' असा टोलाही त्यांनी कॉँग्रेस आघाडीचे नाव न घेता मारला. '२००८ मध्ये साडेसहा कोटींचे कर्ज माफ झाले होते तर आता दीड लाखापर्यंतचे थकीत कर्ज माफ केले. २१ हजार कोटी रुपये बँकेना देण्यात आले असून, १७ हजार कोटी रुपये प्रत्यक्ष खात्यात जमा केले,' असा दावा बागडे यांनी केला. याप्रसंगी सभापती पठाडे म्हणाले, 'जुना मोंढा जाधववाडीत स्थलांतर करण्याचा मार्ग मोकळा झाला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. पिसादेवी रोड, करमाड आदी ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स, फळ भाजीपाला मार्केटमध्ये कांदा मार्केट आदी कामे तातडीने हाती घेण्यात येणार आहे.'

\Bउत्पन्नात तूट

\Bएप्रिल १०१७ - मार्च २०१८ या आर्थिक वर्षात बाजार शुल्क यासह विविध मार्गाने समितीच्या तिजोरीत तीन कोटी २७ लाख ८३ हजार ६३४ रुपये आले, तर उत्पन्नापेक्षा समितीचा खर्च हा २६ लाख पाच हजार रुपयापेक्षा जास्त झाला आहे. यात समितीच्या मालमत्तेचा घसारा ५२ लाख १६ हजार रुपये असल्याचे सचिव विजय शिरसाठ यांनी नमूद केले.

\Bआदर्श शेतकरी पुरस्कार \B

साईनाथ रिठे, जनार्धन दांडगे, शागीर सय्यद, गोरख कचकुरे, अभय डिघुळे, किशोर गायकवाड या शेतकऱ्यांना विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते आदर्श शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात आले. यासह आदर्श आडतीदार, उल्लेखनीय काम करणारे कर्मचारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ संघ विजेता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अत्यंत उत्कंठावर्धक झालेल्या युवा महोत्सवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने सांघिक विजेतेपद पटकावले. देवगिरी महाविद्यालय व विद्यापीठाच्या संघाला प्रत्येकी १९ पारितोषिके मिळाली. मात्र, प्रथम क्रमांकाची अधिक पारितोषिके पटकावून विद्यापीठाच्या संघाने बाजी मारली. कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयाचा संघ सर्वोत्कृष्ट ग्रामीण संघ ठरला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचा शनिवारी समारोप झाला. सृजनरंग मंच येथे झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाला अभिनेत्री श्रेया बुगडे, अभिनेता संजय कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ. साधना पांडे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. मुस्तजिब खान, परीक्षा संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्यासह प्रभारी अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य व सल्लागार समितीचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. युवा महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या प्रचंड जल्लोषात पारितोषिक वितरण सोहळा रंगला. वेगवेगळ्या वेशभूषा करून आलेल्या विद्यार्थ्यांनी वाद्यांच्या तालावर पारितोषिके स्वीकारली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि देवगिरी महाविद्यालयाच्या संघात चुरशीची स्पर्धा रंगली. दोन्ही संघांनी प्रत्येकी १९ पारितोषिके पटकावली. मात्र, गुणांकनात बाजी मारून 'बामू'चा संघ अव्वल ठरला. कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयाचा संघ सर्वोत्कृष्ट ग्रामीण संघ ठरला. देवगिरी महाविद्यालयाने सलग आठव्या वर्षी सर्वोत्कृष्ट नाट्य संघाचे पारितोषिक पटकावले. दीपक पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

\Bहसताय ना ?

\B'चला हवा येऊ द्या' या मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री श्रेया बुगडे हिचे जोरदार स्वागत झाले. 'कसे आहात सगळे ? हसताय ना' असे म्हणत श्रेयाने विद्यार्थ्यांची मने जिंकली. 'वयाच्या आठव्या वर्षांपासून मी कला क्षेत्रात आहे. तू अभिनेत्री होणार असे तुला वाटले होते का असा प्रश्न कुणी विचारल्यास मी हो असे ठामपणे सांगते. कारण या क्षेत्रात काम करण्याचा निर्धार होता. प्रत्येकाला कुटुंबाचे संस्कार घडवतात. घरात चांगले संस्कार असूनही कुणी वाईट वळणावर गेल्यास दोष त्याचा असतो. कला क्षेत्रात भरपूर संधी आहे. ध्येय निश्चित करून वाटचाल करा' असे श्रेयाने सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

\Bमहाविद्यालयात नाट्यशास्त्र विभाग असावा

\Bप्रत्येक महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्याची गरज अभिनेता संजय कुलकर्णी यांनी व्यक्त केली. 'युवा महोत्सवातून माझी सुरुवात झाली. सुजाण नागरिक घडविण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभाग हवा. प्रत्येकजण कलाकार होऊ शकत नाही. पण, चांगले अभ्यासक होऊ शकतो. प्रत्येकाला शैलीनुसार संधी देण्यासाठी नाट्यशास्त्र विभागाची गरज आहे. त्यातून रोजगार निर्मितीसुद्धा होईल. विद्यार्थ्यांची अभिरुची बदलल्याशिवाय चांगले सादरीकरण होणार नाही. सध्या तुम्ही जे काम करता ते वाजवता आले पाहिजे. प्रत्येक माध्यमाचा योग्य उपयोग करा' असे कुलकर्णी म्हणाले.

\Bनाट्यशास्त्र विभाग की पॉलिटिकल सायन्स

\Bअभिनेता संजय कुलकर्णी यांनी प्रत्येक महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्यासाठी विद्यापीठाने लक्ष द्यावे असा मुद्दा भाषणात मांडला. भाषणाचा धागा पकडत प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी नाट्यशास्त्र विभागावर उपहासात्मक टीका केली. 'प्रत्येक महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभाग असावा हे खरे आहे. पण, मागील १५ वर्षांचे नाट्यशास्त्र विभागातील राजकारण पाहिल्यानंतर या विभागाला 'पॉलिटिकल सायन्स' नाव अधिक समर्पक होईल' असे तेजनकर म्हणताच हशा पिकला.

---उत्कृष्ट संघ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

---उत्कृष्ट ग्रामीण संघ

शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कन्नड

---कै. जगन्नाथराव नाडापुडे सर्वोत्कृष्ट नाट्य चषक विजेता संघ

देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

---संगीत गट उत्कृष्ट संघ

विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद

---नृत्य गट उत्कृष्ट संघ

डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ

---नाट्य गट उत्कृष्ट संघ

देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

---ललित कला गट उत्कृष्ट संघ

डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

--महाराष्ट्राची लोककला उत्कृष्ट संघ

देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

---शोभायात्रा

प्रथम - कालिकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरुर कासार

द्वितीय - श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा

तृतीय - शिवछत्रपती महाविद्यालय, औरंगाबाद

---शास्त्रीय गायन

प्रथम - स. भु. विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद

द्वितीय - डॉ. सौ. इं. भा. पाठक महिला महाविद्यालय, औरंगाबाद

तृतीय - देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

---शास्त्रीय तालवाद्य

प्रथम - सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बीड

द्वितीय - विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद

तृतीय - शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कन्नड

---शास्त्रीय सूरवाद्य

प्रथम - विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद

द्वितीय - देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

तृतीय - डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

--सुगम गायन (भारतीय)

प्रथम - श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा

द्वितीय - बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना

तृतीय - दगडोजीराव देशमुख महाविद्यालय, वाळूज

---सुगम गायन (पाश्चात्य)

प्रथम - देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

द्वितीय - स. भु. महाविद्यालय, औरंगाबाद

तृतीय - शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद

--समूह गायन (भारतीय)

प्रथम - विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद

द्वितीय - शिवाजी महाविद्यालय, कन्नड

तृतीय - डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ

---समूह गायन (पाश्चात्य)

प्रथम - देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

द्वितीय - स. भु. महाविद्यालय, औरंगाबाद

तृतीय - विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद

---लोकवाद्यवृंद

प्रथम - शिवाजी महाविद्यालय, औरंगाबाद

द्वितीय - विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद

तृतीय - देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

---जलसा

प्रथम - विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद

द्वितीय - स. भु. महाविद्यालय, औरंगाबाद

तृतीय (विभागून) - शिवछत्रपती महाविद्यालय, औरंगाबाद, आर. बी. अट्टल महाविद्यालय, गेवराई व शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद

----कव्वाली

प्रथम - देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

द्वितीय - शिवछत्रपती महाविद्यालय, औरंगाबाद

तृतीय (विभागून) - कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अंबड, दगडोजीराव देशमुख महाविद्यालय वाळूज, शिवाजी महाविद्यालय, कन्नड

---लोक/आदिवासी नृत्य

प्रथम - मधुशाली महाविद्यालय, सलगरा

द्वितीय - डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

तृतीय (विभागून) - श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर

---शास्त्रीय नृत्य

प्रथम - स. भु. महाविद्यालय, औरंगाबाद

द्वितीय - डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

तृतीय - देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

---उत्कृष्ट अभिनय (पुरुष)

प्रथम - धीरज शिरसाट (डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ)

द्वितीय - अनिल राठोड (देवगिरी महाविद्यालय)

तृतीय - अभय पिंगळे (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद)

---उत्कृष्ट अभिनय (स्त्री)

प्रथम - शुभांगी देगनाळ (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर)

द्वितीय - भावना काळे (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय)

तृतीय - उर्मिला सपकाळ (देवगिरी महाविद्यालय)

---उत्कृष्ट दिग्दर्शन

प्रथम - तुज आहे लॉजपाशी (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर)

द्वितीय - चने घ्या चने घ्या (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय)

तृतीय - ग्लोबल आडगाव (देवगिरी महाविद्यालय)

----उत्कृष्ट संहिता (विद्यार्थी)

प्रथम - चने घ्या चने घ्या - अभय पिंगळे

द्वितीय - चुत्या साले - सतीश जाधव

तृतीय - भोरपी - विजय खराटे

---एकांकिका

प्रथम - यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर

द्वितीय - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद

तृतीय - देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

----प्रहसन

प्रथम - सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालय, बीड

द्वितीय - स. भु. महाविद्यालय, औरंगाबाद

तृतीय - डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ

----मिमिक्री

प्रथम - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

द्वितीय - शिवछत्रपती महाविद्यालय, औरंगाबाद

तृतीय - देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

---मूकाभिनय

प्रथम - स. भु. महाविद्यालय, औरंगाबाद

द्वितीय - यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, सिल्लोड

तृतीय (विभागून) - विवेकानंद महाविद्यालय औरंगाबाद, देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद

---चित्रकला

प्रथम - शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय

द्वितीय - स्वामी विवेकानंद महाविद्यालय, परळी वैजनाथ

तृतीय - डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

----कोलाज

प्रथम - स्वामी विवेकानंद महाविद्यालय, परळी वैजनाथ

द्वितीय - डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

तृतीय - शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, औरंगाबाद

----पोस्टर

प्रथम - डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

द्वितीय - जीवनदिप महाविद्यालय, बीड

तृतीय - स्वामी विवेकानंद महाविद्यालय, परळी वैजनाथ

---मृदमूर्तीकला

प्रथम - वसंतराव नाईक महाविद्यालय, औरंगाबाद

द्वितीय - आर. जी. बगाडिया महाविद्यालय, जालना

तृतीय - मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद

---व्यंगचित्रकला

प्रथम - डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

द्वितीय - एमजीएम महाविद्यालय, औरंगाबाद

तृतीय - शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय

---रांगोळी

प्रथम - डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

द्वितीय - राजर्षी शाहू महाविद्यालय, पाथ्री

तृतीय - एमजीएम फाइन आर्ट महाविद्यालय, औरंगाबाद

---स्पॉट फोटोग्राफी

प्रथम - राजीव गांधी महाविद्यालय, करमाड

द्वितीय - शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, औरंगाबाद

तृतीय - डॉ. जी. वाय. पाथ्रीकर महाविद्यालय, औरंगाबाद

---शॉर्टफिल्म

प्रथम - डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

द्वितीय - स. भु. महाविद्यालय, औरंगाबाद

तृतीय - डॉ. जी. वाय. पाथ्रीकर महाविद्यालय, औरंगाबाद

---काव्यवाचन

प्रथम - ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब

द्वितीय - देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

तृतीय - आर. बी. अट्टल महाविद्यालय, गेवराई

----वादविवाद

प्रथम - डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

द्वितीय - पार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, जालना

तृतीय (विभागून) - जयप्रकाश नारायण अध्यापक महाविद्यालय औरंगाबाद, विवेकानंद महाविद्यालय औरंगाबाद

---वक्तृत्त्व

प्रथम - डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

द्वितीय - ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब

तृतीय - जयप्रकाश नारायण अध्यापक महाविद्यालय, औरंगाबाद

----प्रश्नमंजुषा

प्रथम - लोकमान्य टिळक महाविद्यालय, वडवणी

द्वितीय - कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी

तृतीय - कालिकादेवी महाविद्यालय, शिरुर कासार

---पोवाडा

प्रथम - देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

द्वितीय - विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद

तृतीय - सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालय, बीड

---भारूड

प्रथम - यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, सिल्लोड

द्वितीय - विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद

तृतीय - शिवछत्रपती महाविद्यालय, औरंगाबाद

---वासुदेव

प्रथम - स. भु. महाविद्यालय, औरंगाबाद

द्वितीय - वैष्णवी महाविद्यालय, वडवणी

तृतीय - श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा

---गोंधळ

प्रथम - देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

द्वितीय - यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, सिल्लोड

तृतीय - श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा

---भजन

प्रथम - देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

द्वितीय - विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद

तृतीय - श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा

---लोकगीत

प्रथम - डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

द्वितीय - श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा

तृतीय - शिवछत्रपती महाविद्यालय, औरंगाबाद

----लोकनाट्य

प्रथम - सौ. केशरबाई क्षीरसागर महाविद्यालय, बीड

द्वितीय - विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद

तृतीय - डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

----लावणी

प्रथम - सौ. केशरबाई क्षीरसागर महाविद्यालय, बीड

द्वितीय - बालाघाट शिक्षण संस्था महाविद्यालय, नळदुर्ग

तृतीय - वसंतराव नाईक महाविद्यालय, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उल्कानगरीत घरफोडी: साततोळे सोने लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बन्सीलाल येथील घरफोडीची घटना ताजी असतानाच उल्कानगरातील कासलीवाल विश्‍व अपार्टमेंटमधील एका फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेसात तोळ्यांचे दागिने लंपास केले. शुक्रवारी दुपारी साडेतीन ते रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून अधिक तपास जवाहरनगर पोलिस करत आहेत.

मनीष मनोहर वाखारकर (वय ३३, रा. फ्लॅट क्र. ५, कासलीवाल विश्व अपार्टमेंट) असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी हे पत्नीसह कामानिमित्त पुण्याला गेले होते. त्यांची वृद्ध आई घरात एकटी होती. शुक्रवारी दुपारी मनीष यांच्या आई जवाहरनगरला मुलीच्या घरी गेल्या. त्यांना रात्री उशीर झाल्याने जावई व्यंकटेश पाटील हे वाखारकर यांच्या घरी झोपण्यासाठी गेले असता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. चोरट्याने फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातून साडेसात तोळ्यांचे दागिने लांबवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२०१९मध्ये दौलताबाद रेल्वे मार्ग होणार सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौलताबाद - चाळीसगाव रेल्वे मार्गासाठी प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वे मंत्रीही हा मार्ग करण्यासाठी अनुकूल आहेत. यामुळे आगामी २०१९मध्ये या रेल्वे मार्गाचे काम सुरू होईल, असा विश्वास मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केला. ते शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकार परिषदेला डॉ. भागवत कराड, रेल्वे समितीचे अनंत बोरकर, प्रल्हाद पारटकर यांच्यासह वैजापूरचे संतोष भाटिया आणि कन्नडचे वर्धमान जैन यांची उपस्थिती होती. पंतप्रधान कार्यालयाने दोन महिन्यांपूर्वी दौलताबाद - चाळीसगाव रेल्वे मार्ग रद्द झाल्याची माहिती

अनंत बोरकर यांनी दिली होती. यानंतर डॉ. कराड यांनी या रेल्वे मार्गाबाबत पुढाकार घेतला. कन्नड येथे सभा घेतल्यानंतर राज्य शासनाच्या पातळीवर पाठपुरावा सुरू केला. शुक्रवारी (२८ सप्टेंबर) डॉ. कराड यांनी चाळीसगाव रेल्वे मार्गाबाबत रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. या भेटीत गोयल यांनी सदर रेल्वे मार्ग तयार करण्याबाबत आवश्यक ती सर्व कारवाई करण्याचे आदेश संबंधीत रेल्वे विभागाला दिले. याशिवाय या पूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटून ८८ किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार करण्याबाबतचे पत्र देण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी एमआरआयडी (महाराष्ट्र रेल्वे इंड्रस्ट्रीयल डेव्हलपमेंट लि.) यांना पत्र पाठवून प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत. हा प्रस्ताव तयार करून रेल्वे विभागाला पाठवून आगामी अर्थसंकल्पात याबाबत तरतूद करून २०१९मध्ये काम सुरू करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येणार आहे, असा विश्वास डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केला. चाळीसगाव रेल्वे मार्गासह रोटेगाव कोपरगाव रेल्वे मार्गही लवकरात लवकर करण्यासाठी पाठपुरावा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

\Bखासदार खैरेंनी काहीच केले नाही : कराड

\Bदौलताबाद - चाळीसगाव रेल्वे मार्ग तीन वर्षांपूर्वी मंजूर झाला. त्याचे सर्वेक्षणही झाले आहे. या सर्वेक्षणानंतर औरंगाबादच्या खासदारांनी पाठपुरावा करून हा रेल्वे मार्ग करण्याची गरज होती. मात्र, त्यांनी या रेल्वे मार्गासाठी काहीच केले नाही, असा आरोप डॉ. कराड यांनी यावेळी केला. एनएचआय २११ सोलापूर - धुळे रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. यासाठी चाळीसगाव घाटातून टनेल तयार केले जाणार आहे. या टनेलचे काम आगामी दोन महिन्यांत सुरू होणार आहे, अशी माहिती कन्नडचे वैजनाथ जैन यांनी यावेळी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातपडताळणी: राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

जातपडताळणी समित्यांच्या अध्यक्षांच्या नियुक्तीबाबतच्या जनहित याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना बी. वराळे आणि न्या. मनीष पितळे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांसह समाज कल्याण, अर्थ, महसूल, सामान्य प्रशासन आणि विधि विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.

ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनचे सचिव अमीनभाई जामगावकर यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका केली आहे. समाज कल्याण विभागाने २०१२मध्ये तयार केलेल्या नियमानुसार जातपडताळणी समितीचे अध्यक्ष अतिरिक्त जिल्हाधिकारी असावेत अशी तरतूद केली आहे. तसेच २८ जुलै २०१६च्या अधिसूचनेनुसारही अध्यक्ष अतिरिक्त जिल्हाधिकारी असावेत असे म्हटले आहे. असे असताना राज्यातील ३६ पैकी केवळ १९ समित्यांचे अध्यक्ष अतिरिक्त जिल्हाधिकारी असून उर्वरित समित्यांच्या अध्यक्षपदी समाजकल्याण विभागाचे संचालक दर्जाचे अधिकारी कार्यरत आहेत.

राज्य शासनाने तीन जुलै २०१८ रोजी नव्याने नियमात बदल केल्याचे प्रलंबित जनहित याचिकांमध्ये दाखल शपथपत्रात म्हटले आहे. त्यानुसार जातपडताळणी समित्यांच्या सदस्य सचिव पदावर समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त (गट-ब) म्हणजेच वर्ग-१ ऐवजी वर्ग-२ चे अधिकारी नियुक्त करता येतील, अशी तरतूद केली आहे. मात्र, वर्ग-२ या संवर्गातील पदे ६० टक्के सरळ नियुक्तीने आणि ४० टक्के पदोन्नतीने भरणे आवश्यक आहे. मात्र, बढतीने भरावयाच्या पदांसाठी विभागाकडे योग्य उमेदवार उपलब्ध नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी वर्ग - ३ च्या अधिकाऱ्यांना तात्पुरती बढती (११ महिन्यांची) देऊन सदस्य सचिव पदाची जबाबदारी सोपविली आहे.

चार आठवड्यांनी सुनावणी

निवडणूक आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. निवडणुकीनंतर सहा महिन्यात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवार 'अपात्र' ठरतो. २८ जुलै २०१६ आणि ३ जुलै २०१८ च्या अधिसूचना आणि नियम ११ रद्द करावेत. माधुरी पाटील प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार जातपडताळणी समित्या स्थापन करण्याची विनंती याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेची सुनावणी चार आठवड्यानंतर होणार आहे. याचिकाकर्त्याची बाजू बी. एल. सगर किल्लारीकर यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वक्फ’ बैठकीत एमआयएमचा राडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्रीय वक्फ प्राधिकरणाकडून मालमत्तेच्या भाडेसुधारासाठी नियुक्त केलेल्या न्या. झकीउद्दीन खान कमिटीच्या बैठकीत शनिवारी 'एमआयएम'च्या कार्यकर्त्यांनी सदस्यांवर चक्क खुर्च्या, बूट फेकून राडेबाजी केली. समिती वक्फ संपत्ती विकण्यासाठी आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

वक्फ मालमत्ता भाडे सुधार समितीची बैठक मौलाना आझाद रिसर्च सेंटरच्या लायब्रेरी हॉल येथे घेण्यात आली. न्या. झकीउद्दीन खान यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. अनिल कुमार गुप्ता, अड. सय्यद शाहेद हुसैन, अॅड टी. डी. नौशाद तसेच वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. तडवी यांची यावेळी उपस्थिती होती. बैठकीत अनेकांनी वकफ बोर्डाच्या ज्या संपत्तीवर सध्या अतिक्रमण झालेले आहे, ते अतिक्रमण हटविण्यासाठी बोर्डाला विशेष अधिकार देण्याची मागणी केली. वक्फ बोर्डाच्या अनेक समस्या आहेत. त्या त्वरित सोडविण्यात याव्यात, असे साकडेही घालण्यात आले.

आमदार इम्तियाज जलील यांनी वक्फ बोर्डाच्या समस्या मांडल्या. ते म्हणाले, चार वर्षांपासून विधानसभेत वक्फ बोर्डाच्या समस्या मांडत आहे. सरकार याकडे लक्ष देत नाही. भाडे सुधार समिती २१०४मध्ये वक्फ बोर्डाची मालमत्ता जास्त बोलीवर भाडेतत्वावर देण्याचे नियोजन आहे. ही तरतूद रद्द करून फक्त मुस्लिम समाजालाच ही संपत्ती जास्त दराने द्यावी. जेणेकरून या समाजातील बेरोजगारी कमी होईल, असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर समिती सदस्यांनी आक्षेप घेत, तुम्ही राजकारण करू नका असे सांगत भाडे करारावर बोला असा सल्ला दिला. तसेच आतापर्यंतच्या इतिहासात केंद्रीय समिती तुमच्याकडे आली होती का, असे मत मांडले. यावरून सभागृहात उपस्थितीतांनी जोरजोरात विरोध सुरू केला. आमदारांनी संतापलेल्यांना शांत केले. तसेच आपले भाषण पूर्ण करण्याआधी जलील यांनी समिती सदस्यांना वर्ष २०१५मध्ये केंद्रीय वक्फ बोर्डाचे उत्पन्न दहा कोटी रूपये होते. ते आता शून्यावर कसे आले, असा सवाल केला. यानंतर एका सदस्याने जलील यांच्या भाषणानंतर तुम्ही आमदार आहात का, असा सवाल केला. केंद्रीय वक्फ समितीच्या सदस्यांकडून लोकप्रतिनिधींचा अपमान केला जात असल्याने 'एमआयएम'चे कार्यकर्ते भडकले. त्यांनी समिती सदस्यांनी माफी मागावी असा मुद्दा लावून धरला. यानंतर खुर्च्यांची फेकाफेकी सुरू झाली. तसेच एकाने आपला बूट समिती सदस्यांच्या दिशेने भिरकावला. यानंतर काही काळ वातावरण अशांत झाले. शेवटी कार्यकर्ते आणखी बिथरू नये, मोठी घटना घडू नये, यासाठी आमदार जलील यांनी स्वत:च्या सुरक्षेमध्ये या समिती सदस्यांच्या गाड्या हॉटेलकडे पाठविल्या.

तुम्हाला लाज वाटली पाहिजे : न्या. खान

वक्फ बोर्डाला तीन वर्षांपासून पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नाही. आतापर्यंत सीईओ देण्यासाठी कारवाई सुद्धा झालेली नाही, अशा समस्यांचा पाढा यावेळी अॅड. नासेर खान यांनी समिती सदस्यांसमोर मांडला. त्यावेळी समितीचे अध्यक्ष न्या. जकीयोद्दीन खान म्हणाले, तुमच्या समाजाकडे आयएएस अधिकारी नाही, याची तुम्हाला लाज वाटायला हवी. जे अधिकारी आहेत ते वक्फ बोर्डावर येण्यास तयार नाहीत. तुमच्याकडे शिक्षण घेणारे नाहीत का, असाही सवाल त्यांनी उपस्थितीत केला. यावरूनही समिती सदस्य व उपस्थितांमध्ये वादावादी झाली.

\Bनोंदविण्यात आलेले आक्षेप \B

- वक्फ बोर्डाच्या सशक्तीकरणासाठी अनेक उपाय योजना राबविल्या नाहीत.

- वक्फ बोर्डाचे अधिकारी, कर्मचारी, बोर्डाचे सदस्य मालमत्ता विकून खात आहेत.

- वक्फ बोर्डाच्या सदस्यांमध्येही वाद सुरू असल्याने बोर्डाच्या बैठका होत नाहीत.

- पूर्ण वेळ सीईओ नसल्याने राज्यभरातील सर्वसामान्यांची कामे होत नाही.

\Bसमिती म्हणते..

\B- जास्त भाडे देणाऱ्यांना वक्फ जमीन द्यावी.

- उत्पन्नातून समाजासाठी योजना राबवाव्यात.

- महिला आणि अपंगांना जमीन किरायाने द्यावी.

- रोजगार सुरू करण्यासाठी मदत करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओबीसींची ताकद कमी समजू नका: भुजबळांचा इशारा

$
0
0

बीड

'आज सत्ताधाऱ्यांच्या मध्ये गर्व वाढला आहे. आज राज्यावर दुष्काळी संकट असताना शेतीच्या वीज जोडण्या बंद केल्या जात आहेत. ओबीसींच्या सवलती या सरकारने बंद केल्या असून ओबीसींची ताकद कमी लेखू नका.' असा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला. बीड येथील अखिल भारतीय समता परिषद आयोजित समता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सुरुवातीलाच दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. ते म्हणाले की, हा समतेचा मेळावा बीडमध्ये होतो आहे. बीडमध्ये बऱ्याच वर्षांनी आलो. समतेच्या कार्यात आमच्या खांद्याला खांदा लावून लढणारे गोपीनाथजी मुंडे आमच्यात नाहीत. त्यांना यावेळी मी आदरांजली अर्पण करतो. समतेचा प्रश्न आला तेंव्हा पक्षाचा पदाचा विचार न करता समतेच्या मागे ताकद उभा करण्याचे काम गोपीनाथराव यांनी केले.

भुजबळ पुढे म्हणाले की, मी जेलमध्ये असताना नाशिक मध्ये मोर्चा निघाल्यानन्तर बीडमध्ये ही माझ्या सुटकेसाठी मोठा मोर्चा झाला. त्यामुळे बिडपासून मी दुसऱ्या इंनिग सुरू केली आहे. आम्हाला तुरुंगात पाठवल्या नंतर अनेकांनी मोर्चे काढले, धरणे धरले, उपास तपास केले. अनेक नेते भेटायला आले. बीडमधील जयदत्त क्षीरसागर, धनंजय, अमरसिंह, पंकजाताई मातोश्री सह दीड तास बसून होत्या. हे सर्वांचे ऋण मी कधी फेडू शकणार नाही. मला अटक महाराष्ट्र सदनातील घोटाळा केला म्हणून झाली. महाराष्ट्र सदन वीस वर्षांपासून पडून होते. त्याचे बांधकाम करण्याचे प्रकरण मी कॅबिनेट कमिटीपुढे नेले. अजित दादांनी मलबार हिल रेस्ट हाऊस बांधून द्या असे सांगितले. मी मंत्री म्हणून शंभर कोटीत या सगळ्या बिल्डिंग चांगल्या बांधून घेतल्या. महाराष्ट्र सदन सुंदर बांधले. आमचे महाराष्ट्राची शान शिवाजी महाराजांचा ,जोतिराव फुले ,डॉक्टर आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, सावित्रीबाई फुले,यांचे पुतळे महाराष्ट्र सदनात बसवले. आता पंतप्रधान मोदी, शहा तिथे मिटिंग घेतात. नुकतीच राहुल गांधींनी तिथे पत्रकार परिषद घेतली. काही लोकांनी सुरुवात केली. मी या महाराष्ट्र सदन बांधकामात पंचवीस हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे सांगितले. सरते शेवटी साडे आठशे कोटींचा घोटाळा झाला असा दर वेळी आकडा खाली आला. शंभर कोटीचे टेंडर आणि हजार कोटींचा घोटाळा कसा, असा प्रश्न मला पडला. सात फुटाची म्हैस आणि पंधरा फुटाचे रेडकू कसे होईल? परवा केंद्र सरकारने व्याज दिले नाही म्हनून प्रॉपर्टी ऍटॅच केली. जरी तुम्ही माझी सगळी प्रॉपर्टी ऍटॅच केली तरी लोकांचे प्रेम अटॅच कसे करणार, असा सवाल भुजबळ यांनी केला .

शेवटी भुजबळ काव्यात्मक शैलीत म्हणाले:

डांबले तुरुंगात जरी मज हा माजा अंत नाही
अडवू शकेल मला अशी कुठली भिंत नाही
रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर
डोळ्यात धूळ जरी थांबण्यास उसंत नाही
अडखळने छगन भुजबलास पसंत नाही .

दुनिया खिलाफ हो शिकायत नही मुझे
तुम्हारे सिवा किसकी जरूरत नही मुझे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गैरसमज दूर करीत स्मृतिभ्रंशावर मंथन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुळात स्मृतिभ्रंश म्हणजे काय, यावर सविस्तर विवेचन करीत स्मृतिभ्रंशाबाबत असलेले विविध प्रकारचे गैरसमज दूर करीत, स्मृतिभ्रंशग्रस्त व्यक्तींची नेमकी काळजी कशी घ्यायची, त्यांचा सांभाळ कसा करायचा या संदर्भात रविवारी (३० सरप्टेंबर) आयएमए हॉलमध्ये झालेल्या कार्यशाळेत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. लवकर निदान होऊन नियमित उपचार व काळजी घेतली तर अशा व्यक्ती दीर्घकाळ कार्यक्षम राहू शकतात आणि त्यांचा वृद्धापकाळ नक्कीच सुकर होऊ शकतो, असे संकेतही कार्यशाळेत देण्यात आले.

पोलिस उपायुक्त दिपाली घाटे-घाडगे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मेंदुविकारतज्ज्ञ डॉ. आनंद सोनी म्हणाले, काही कारणांमुळे तसेच मेंदुतील रसायनांमध्ये विशिष्ट बदल होऊन वृद्धापकाळात किंवा सत्तरीनंतर स्मृतिभ्रंश होऊ शकतो. आयुष्यमान वाढत असल्यामुळे अशा व्यक्तींचे प्रमाण वाढत आहे. सद्यस्थितीत १७ कुटुंबांमध्ये एखादी व्यक्ती स्मृतिभ्रंशग्रस्त असल्याचे दिसून येत असले तरी २०४० पर्यंत ७ कुटुंबांमध्ये एखादी व्यक्ती स्मृतिभ्रंशग्रस्त असू शकते, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. हा मेंदुचा आजार असून, तो पूर्ण बरा होत नसला तरी आजाराची गती नक्कीच कमी करता येऊ शकते. अशा व्यक्तींचे लवकर निदान होऊन त्यांच्यावर योग्य उपचार झाले तर अशा व्यक्ती दीर्घकाळापर्यंत कार्यक्षम राहू शकतात. मात्र अनेक नातेवाईक अशा व्यक्तींना तिसऱ्या-चौथ्या टप्प्यात आणतात, जेव्हा अशा व्यक्ती कोणालाच ओळखत नसतात आणि इतरही प्रश्न-समस्या निर्माण झालेल्या असतात. अशा वेळी फारसे काही करता येत नाही, असे स्पष्ट करीत डॉ. सोनी यांनी या आजाराच्या अवस्था, त्यांची लक्षणे विषद करुन अशा व्यक्तींचा सांभाळ कसा करायचा, याविषयीही त्यांनी नातेवाईकांना मार्गदर्शन केले. मनोविकारतज्ज्ञ डॉ. रचना पोळ यांनी, स्मृतिभ्रंशग्रस्तांच्या वर्तणुकीतील बदल, वर्तणुक समस्या, नैराश्य व इतर मानसिक अवस्थेबाबत मार्गदर्शन केले. छंद जोपासणे, संगीताचा आनंद घेणे अशा व्यक्तींसाठी अतिशय उपयुक्त असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा व्यक्तींची काळजी घेणाऱ्यांमध्ये निर्माण होणाऱ्या ताण-तणावाबाबत नेमके कसे नियोजन केले पाहिजे, याविषयी पुण्याच्या 'तपस फाऊंडेशन'च्या प्राजक्ता वढावकर यांनी मार्गदर्शन केले, तर 'आस्था फाऊंडेशन'चे डॉ. नरेंद्र वैद्य यांनीही रुग्ण तसेच नातेवाईकांशी संवाद साधत बहुमोल मार्गदर्शन केले.

चालण्यामुळे स्मृतिभ्रंशाला दूर ठेवणे शक्य

मुळात चालणे हा जसा हृदयासाठी एक चांगला व्यायाम आहे, तसेच चालणे हा सुदृढ मानसिकतेसाठी खूप उपयुक्त ठरतो. त्याचवेळी चालण्यामुळे स्मृतिभ्रंशासारख्या मेंदुच्या आजारालाही दूर ठेवणे शक्य आहे, हे वैद्यकीय अभ्यासात स्पष्ट झाले आहे. अर्थात, याबाबत आणखी अभ्यास व संशोधन होत असल्याचे डॉ. सोनी यांनी 'मटा'शी बोलताना स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images