Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आपण बुद्धिहीन उन्मादाचे बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'लेखन मुक्त मनाने करण्याची गोष्ट असताना सामाजिक दबाव लेखकांसाठी अडसर ठरत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुणी कुणाला उचलून देण्याची गोष्ट नाही. पण, हल्ली वैचारिक मतभिन्नता तुम्हाला देशद्रोही ठरवत आहे. आपण सगळेच सवंग व बुद्धिहीन प्रतिकांचे व उन्मादाचे बळी ठरत आहोत,' अशी खंत ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांनी व्यक्त केली. 'रानगंध' साहित्य पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्या बोलत होत्या.

पळसखेडे येथील महात्मा फुले सार्वजनिक ग्रंथालय आणि मंगला व रामलाल घुनावत आर. जी. इंडस्ट्रीज, ठाणे यांचा पहिला 'रानगंध' साहित्य पुरस्कार प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांना प्रदान करण्यात आला. मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहात शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर ज्येष्ठ कादंबरीकार श्याम मनोहर, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, कवयित्री अनुराधा पाटील, प्रसिद्ध समीक्षक चंद्रकांत पाटील, दिलीप धोंडगे आणि बाळासाहेब महानोर यांची प्रमुख उपस्थिती होती. पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या सन्मानार्थ त्यांच्या वाढदिवशी दरवर्षी 'रानगंध' पुरस्कार दिला जाणार आहे. ४५ वर्षे कविता लेखनात मोलाचे योगदान दिल्याबद्दल अनुराधा पाटील यांना श्याम मनोहर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख एक लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंर अनुराधा पाटील यांनी काव्य लेखन आणि सद्यस्थितीवर भाष्य केले. 'कवितेच्या पातळीवर जे वाटते ते लिहिले. माझे मानदंड ठरवून लिहित गेल्याने दृष्टी भिन्न झाली. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न गंभीर आहे. या उन्मादातून बहुजनांच्या साध्या परंपराही सुटल्या नाहीत. श्रद्धेचा भाग असलेली वारी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात होती. ही आध्यात्मिक मार्गाने समानता सांगणारी वारी कुठे दिसत नाही. चार मिनिटे वारीला खांदा देऊन सेल्फी काढणारे नेते आणि कचरा तेवढा दिसतो. सणावारांचा आणि परंपरांचा असा इव्हेंट झाला आहे. राजधर्माच्या नावाखाली त्याला बिनबोभाट पाणी घातले जात आहे. अशा परिस्थितीत साहित्यातही हाताला काही दर्जेदार लागत नाही,' असे पाटील म्हणाल्या.

\Bपुरस्कार का महत्त्वाचा ?

\B'पुरस्कारामुळे आपल्या लेखनात काही बदल घडतो असे वाटत नाही. पण, तुम्हाला आनंद आणि समाधान देणारी ही गोष्ट असते. शिवाय, पुरस्कार मिळाल्यानंतर सजग व गंभीर होऊन वाड्मयीन जाणिवा कशा विस्तारतील हा विचार करता येतो' असे अनुराधा पाटील म्हणाल्या.

वाचन संस्कृतीवर श्याम मनोहर यांनी विचार मांडले. 'भारतातील प्रत्येक गावात एक वाचनालय असावे. भारत हा वाचणाऱ्यांचा देश आहे, अशी ओळख व्हावी असे वाटते. पण, वाचनसंस्कृतीवर कुणी काहीच बोलत नाही. ही संस्कृती इतकी क्षीण आहे की तिच्यावर कुणीच पुस्तक लिहिले नाही. कविता, कादंबरी, वृत्तपत्र कसे वाचावे याचे धडे द्यावे. कारण, प्रत्येकाचे वाचन वेगळे असते' असे मनोहर म्हणाले. नरेंद्र चपळगावकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. श्रीधर नांदेडकर यांनी पाटील यांच्या काव्य लेखनावर भाष्य केले. मनोज बेलपत्रे यांनी सन्मानपत्र वाचले. बाळासाहेब महानोर यांनी प्रास्ताविक आणि रवी कोरडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भगवान फार्मसी स्थलांतर वाद कोर्टात

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

भगवान फार्मसी कॉलेज, औरंगाबाद येथे शिक्षक व संस्था यांच्यातील अंतर्गत वादातून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे येथील विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्याबाबतच्या याचिकेत एआयसीटीई व सहसंचालक तंत्रशिक्षण विभागाला नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. मंगेश पाटील यांनी दिले. फार्मसीचे विद्यार्थी रेणुका अंबेकर, पूजा वारे, उमेश काथार यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'ने २५ सप्टेंबर रोजी याबाबतचे वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध केले, तेव्हा एकच खळबळ माजली होती. त्यानंतर या बातमीचा 'मटा'ने कायम पाठपुरावा केला. या महाविद्यालयातील प्राध्यापकांना सहाव्या वेतन आयोगानुसार नियमित वेतन देण्याचे आदेश उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद व सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेले होते. मात्र, या आदेशांची पूर्तता करण्यास व विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा पुरविण्यास महाविद्यालय प्रशासनाने असमर्थता दाखविली. आश्चर्यकारकरित्या 'एआयसीटीई'ने महाविद्यालयावर कारवाई न करता सदरील महाविद्यालयातील विद्यार्थी इतर महाविद्यालयात स्थलांतरित करण्याची भगवान फार्मसी महाविद्यालय प्रशासनाची विनंती मान्य केली.

डॉ. भागवत कराड व डॉ. राजीव खेडकर हे संस्थेचे अनुक्रमे कोषाध्यक्ष व सचिव आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पुढील काही दिवसात होणाऱ्या अंतर्गत व विद्यापीठाच्या परीक्षा यांचा तसेच राष्ट्रीय स्तरावर होऊ घातलेल्या गेट, जी-पॅट, नाईपर, इ बाबत कुठलाही विचार करण्यात आला नाही. हा निर्णय घेताना एआयसीटीई व शासकीय अधीकारी यांनी फक्त महाविद्यालय प्रशासनास त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली. मात्र, महाविद्यालयातील इतर घटकाची (जसे विद्यार्थी) यांना ती संधी दिली नाही. यामुळे विद्यार्थांचे नुकसान होऊ शकते. या सर्व बाबी लक्षात घेऊन याविषयी या महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने याचिका केली. याप्रकरणी न्या. बोर्डे व न्या. पाटील यांनी एआयसीटीई, सहसंचालक तंत्रशिक्षण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व महाविद्यालय प्रशासनास नोटीस देण्याचे आदेश बजावले तसेच महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्थलांतर प्रकरण बाबतची माहिती न्यायालयास सादर करण्याचे आदेश पारित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत होर्डिंगबद्दल पालिकेचे कानावर हात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनधिकृत होर्डिंगबद्दल महापालिका प्रशासनाने कानावर हात ठेवले असून, जे काही होर्डिंग अस्तित्वात आहेत ते सर्व अधिकृत आहेत, असा दावा करण्यात आला आहे. अनेक होर्डिंग आणि फलक इमारतींवर लावण्यात आले आहेत. या इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटला मात्र फाटा देण्यात आला आहे. त्यामुळे दुर्घटना घडल्यास जबाबदारी कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील होर्डिंग आणि जाहिरात फलकांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महापालिकेच्या मालमत्ता विभागाची आहे. मात्र, या विभागाचे योग्य प्रकारे नियंत्रण नसल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. नगरसेवकांनी सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या बैठकीत अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंगबद्दल वेळोवेळी आवाज उठवला, पण प्रशासनातर्फे त्याचे समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. पालिकेच्या लेखी शहरातील होर्डिंगची संख्या ४४८ आहे. त्याशिवाय सातारा परिसरात फक्त १८ होर्डिंग असल्याची नोंद पालिकेत आहे. ४४८ पैकी ५६ होर्डिंग खासगी आहेत, उर्वरित होर्डिंगची मालकी पालिकेची आहे. अनधिकृत होर्डिंग आणि फलक काढण्याची कारवाई दोन टप्प्यांत महापालिका व जिल्हाप्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली. या दरम्यान आठ हजार होर्डिंग आणि फलक काढल्याचा दावा केला जात आहे. असे असले तरी शहराच्या विविध भागात विनापरवाना होर्डिंगची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे. साठ ते सत्तर टक्के अनधिकृत होर्डिंग व फलक काढण्याची कारवाई झाली आहे, ही कारवाई सुरूच राहणार आहे, असे सांगून मालमत्ता अधिकारी वामन कांबळे यांनी किमान तीस टक्के होर्डिंग आणि फलक अनधिकृत असल्याचे मान्य केले आहे.

इमारतींवरील जाहिरात फलकांच्या संदर्भात पालिकेच्या यंत्रणेकडे उत्तर नाही. ज्या इमारतीवर फलक लावला आहे त्या इमारतीचे

वेळोवेळी स्ट्रक्चरल ऑडिट होते का, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. फलक बसवताना स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येते, पण विशिष्ट कालावधीनंतर नियमितपणे ऑडिट करण्यात येत नसल्यामुळे इमारतीला धोका निर्माण होऊन दुर्घटना घडू शकते असे मानले जात आहे.

\Bआवाज उठवणार

\Bभाजपचे नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या बैठकीत वेळोवेळी होर्डिंगचा मुद्दा उपस्थित केला. 'मटा' शी बोलताना ते म्हणाले, 'चिकलठाणा ते नगरनाका या मार्गावरील अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण खासगी यंत्रणच्या माध्यमातून केले तेव्हा तब्बल ७६५ होर्डिंग अनधिकृत असल्याचे लक्षात आहे. चिकलठाणा ते नगरनाका या रस्त्यावर एवढे होर्डिंग अनधिकृत असतील तर संपूर्ण शहरात किती असतील,' असा सवाल त्यांनी केला. सर्वसाधारण सभेत पुन्हा या संदर्भात आवाज उठवू असे ते म्हणाले.

\Bमहापौरांनी घेतला आढावा

\Bहोर्डिंगच्या संदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांनी शनिवारी आढावा घेतला. ज्या इमारतींवर होर्डिंग आणि जाहिरात फलक लावण्यात आले आहेत त्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश त्यांनी दिले. शहरात विविध चौकात जाहिरातींसाठी कमानी उभारण्यात आल्या आहेत. या कमानींची मजबूती तपासून घेण्याचे देखील अधिकाऱ्यांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पसंख्याकासाठी विशेष ‘आयटीआय’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी जिल्ह्यात 'आयटीआय' स्थापन करण्यासाठी आणि विद्यार्थिनींसाठी विशेष वसतिगृह बांधण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश अल्पसंख्यांक विशेष समितीने शनिवारी जिल्हा प्रशासनाला दिले.

विधिमंडळ नियुक्त अल्पसंख्यांक विशेष समितीची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी समितीचे अध्यक्ष चैनसुख संचेती, आमदार जोगेंद्र कवाडे आणि आमदार इम्तियाज जलील यांची उपस्थिती होती. यावेळी शहरात अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनींसाठी बांधलेल्या वसतिगृहांचा मागील तीन वर्षांचा आढावा घेण्यात आला. या वसतिगृहात अनुक्रमे आठ, नऊ आणि सहा इतकीच विद्यार्थिनी संख्या आहे. यामुळे विद्यार्थिनींसाठी अल्पसंख्यांक महाविद्यालयाजवळ वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय शासनाकडून अल्पसंख्याक विदयार्थ्यांना दिली जाणारी शिष्युवृत्ती झिरो बॅलेन्स नसल्यामुळे बँकेतच जमा करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी संबधीत अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी प्रस्ताव कमी येत असल्याची माहिती सभागृहात समोर आली. याबाबत जिल्हा परिषदेच्या सीईओ पवनित कौर यांना मदरशांच्या प्रमुखांची बैठक घेऊन डॉ. जाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेबाबत माहिती देऊन जास्तीत जास्त मदरशांमधील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्याबाबत आदेश देण्यात आले. वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचे काम अडल्याची माहिती सभागृहात देण्यात आली आहे. लवकरात लवकर या कार्यालयाचे काम सुरू करण्याबाबत सूचना संबंधितांना दिल्या. अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष आयटीआय महाविद्यालय स्थापन करून या मुलांना तांत्रिक शिक्षण देण्याची गरज असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले. त्यासाठी औरंगाबादेत अल्पसंख्यांक समाजासाठी विशेष आयटीआय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागात अनेक उर्दू शाळा या सातवीपर्यंत आहेत. या शाळेतील विदयार्थिनींना सातवीनंतर शिक्षण घेण्यासाठी तालुका किंवा शहरात यावे लागते किंवा शाळा सोडावी लागत आहे. यामुळे सातवी पर्यंतच्या शाळांना दहावीपर्यंत करण्याबाबत शासनाकडे पाठपूरावा करण्याचाही निर्णय समितीने घेतला.

………

\B१३ मधून फक्त तीन सदस्य

\Bशहरातील जालना रोडवरील तसेच प्रस्तावित वक्फ ट्रिब्युनल कार्यालय आणि वक्फ कार्यालयाच्या जागेचीही समितीच्या सदस्यांनी पाहणी केली. वक्फ कार्यालयाच्या मुख्यालय बांधण्याच्या कामाला वेग देण्याचे आदेश समिती अध्यक्ष आणि सदस्यांनी दिले. तसेच ज्या संपत्तीचा वाद आहे, अशा संपत्तीच्या सरंक्षणासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून विशेष कार्यवाही करण्याबाबतही सूचना करण्यात आली. ………अल्पसंख्याकासाठी विधिमंडळाच्या विशेष समितीत एकूण १३ सदस्य आहेत. आजच्या बैठकीला फक्त तीन सदस्यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे यात यात स्थानिक आमदार आमदार इम्तियाज जलील यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीला ६२ हजारांच्या औषधांचे मिळाले दान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तीव्र औषधी टंचाईचा सामना करीत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (घाटी) मागच्या आठ ते दहा दिवसांत किमान ६२ हजार रुपयांच्या औषधांचे दान मिळाले. अन्नदानाऐवजी औषधीदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आता संस्था पुढे येत आहे. श्री धनेश्वरी मानव विकास मंडळाच्या फार्मसी कॉलेजच्या वतीने रविवारी (७ ऑक्टोबर) ५० हजार रुपयांची औषधी घाटीला देण्यात आली. यामध्ये इंजेक्शन, गोळ्या, सलाइनचा समावेश आहे. तसेच आठ ते दहा दिवसांपूर्वी बीएसजीएम शाळेच्या वतीने १२ हजारांची औषधी घाटी रुग्णालयाला देण्यात आली. यामध्ये श्वानदंशावरील एआरव्ही इंजेक्शनसह विविध औषधांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांनी शिकवले स्वच्छतेचे महत्त्व

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गरवारे कम्युनिटी सेंटरच्या गरवारे बालभवनतर्फे आंतरशालेय लोककला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत अंतर्मुख केले.

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त 'स्वच्छता'या विषयावर लोककला स्पर्धा घेण्यात आली. यावेळी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे, शाहीर अजिंक्य लिंगायत उपस्थित होते. शालेय संघांनी स्वच्छतेचे महत्त्व मांडत स्वच्छ भारत अभियान, कचरा विल्हेवाट, कचरा वर्गीकरण, कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती या विषयावर सादरीकरण केले. गाडगे महाराज, महात्मा गांधी यांचे विचार मांडले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नगरसेवक शिवाजी दांडगे होते. विजेत्यांना स्मृतिचिन्ह व सर्व सहभागी संघांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. शिवशाहीर सुरेश जाधव, प्रा. योगिता महाजन, पंडित सुधीर बहिरगावकर, शाहीर रामदास धुमाळ यांनी परीक्षण केले. चैतन्य इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. शिल्पा कुलकर्णी आणि रमाकांत रौत्तल्ले यांनी स्पर्धेच्या यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

\Bस्पर्धेतील विजेते\B

प्रथम-मुकुल मंदिर शाळा, सिडको

द्वितीय-महापालिका शाळा,नारेगाव

तृतीय-बाल विकास विद्या मंदिर विद्यालय

उत्तेजनार्थ प्रथम- सरस्वती भुवन प्रशाला, द्वितीय-जिगीषा इंटरनॅशनल स्कूल, तृतीय-भैरवनाथ तनवाणी स्कूल, वाळूज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपन्न शायरीचे मनोज्ञ दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शायरी, नृत्य आणि गायन यांचा तिहेरी मिलाफ असलेला सहर होने तक हा कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरला. उर्दू-फार्सी शायरीचे वेगळेपण उलगडताना तिची नजाकत जपत कलाकारांनी लक्षवेधी सादरीकरण केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाच्या वतीने 'सहर होने तक' हा उर्दू शायरीचा कार्यक्रम घेण्यात आला. एमजीएम कॅम्पसमधील आर्यभट्ट सभागृहात रविवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. शास्त्रीय नृत्य, शायरी आणि गझल गायन यांचे योग्य संतुलन राखत हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. नीरजा आपटे यांची संकल्पना व दिग्दर्शन असलेल्या कार्यक्रमात मोनिका सिंग यांची शायरी, गायत्री सप्रे-ढवळे यांचे गायन आणि अबोली अभ्यंकर यांचे नृत्य सादर झाले. शायरी लेखनातील शायरांचे महत्त्व सांगत सिंग यांनी शायरी उलगडली. झेबुन्नीसा, ताजगर ते अमृता प्रीतम असा शायरीचा प्रवास उत्तमरित्या सादर झाला. 'अल्फाज को अल्फाज ने छुआ सहर होने तक, बहता रहा एहसास का दरियाँ सहर होने तक' असे नेमके मर्म सांगत कलाकारांनी रसिकांना खिळवून ठेवले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंकुशराव कदम, प्राचार्या डॉ. रेखा शेळके, सुबोध जाधव, गणेश घुले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैन तत्वज्ञानावर चित्र प्रदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जैन धर्माचे तत्वज्ञान, चोवीस तीर्थंकर, सोळा स्वप्नं आणि मोक्ष मार्ग, जैन तत्वज्ञानातील निवडक प्रसंग, शुभंकर, तीर्थंकर यांना

चित्रातून सादर करण्याचा प्रयत्न 'जैनिझम' चित्रप्रदर्शनातून करण्यात आला.

उगम स्केचिंग आणि पेंटिंग क्लासतर्फे हे चित्र प्रदर्शन एमजीएमच्या कला दीर्घा आर्ट गॅलरीमध्ये भरवण्यात आले. सकल मारवाडी सभेचे अध्यक्ष महावीर पाटणी, दिगंबर पंचायत अध्यक्ष ललित पाटणी, यशवंत कला महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र तोरवणे, अखिल भारतीय सैतवाल दिगंबर महिला अध्यक्ष मंगल गोसावी, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष मनीषा भन्साळी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. संचालिका उर्मिला घाणेकर यांच्या संकल्पनेतून २६ चित्रकारांची ४८ चित्रे प्रदर्शन मांडण्यात आली. या चित्रांच्या विक्रीतून मिळणारी रक्कम केरळ पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात येणार आहे, असे उर्मिला घाणेकर यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

\Bया चित्रकारांचा सहभाग \B

उर्मिला घाणेकर, कोमल शर्मा, श्रुती कुलकर्णी, प्रीती बोरा,शलाका गंगवाल, ऋचा तोतला, वैष्णवी मुंडलिक, मयुरी कासलीवाल,

कविता निलावर, पूजा खन्ना, रिया ठोले, खुशी जैन, श्रद्धा जाधव, अश्विनी काळे, सुरेखा दंडार, ज्योती चोटलानी, सदिच्छा कलंत्री,

सई कुलकर्णी, पूजा अजमेरा, अंजली राठी, तेजश्री उदावंत, वैदेही कुलकर्णी, ममता कुलकर्णी, सोनिया खडके, नैनिका काला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रियजनांसाठी नैराश्यावर करा मात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्पर्धा, धकाधकीचे आयुष्य तसेच आयुष्यात येणाऱ्या अनेक वादळांमुळे नैराश्य वाढत आहे आणि पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये नैराश्याचे प्रमाण नक्कीच जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार २०२०मध्ये नैराश्य हा सर्वाधिक दुसरा मोठा व महत्वाचा आजार ठरणार आहे. त्यामुळे निदान आपल्या प्रियजनांसाठी आणि कुटुंबियांसाठी तरी नैराश्यावर मोकळेपणाने बोला, नैराश्याला स्वीकाराला, मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्या आणि नैराश्यावर मात करा, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी रविवारी झालेल्या 'लव्ह यू जिंदगी' कार्यक्रमात केले.

मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त राज्य महिला आयोग व पंख फाउंडेशनच्या वतीने आयएमए हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रसंगी व्यासपीठावर पंख फाउंडेशच्या अध्यक्ष डॉ. मोनाली देशपांडे, मधुरा अन्वीकर, मानसोपचार संघटनेचे डॉ. विक्रांत पाटणकर, उपजिल्हाधिकारी वर्षा ठाकूर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. रहाटकर पुढे म्हणाल्या, 'महिला आयोगाकडे तक्रारी करणाऱ्या ३० टक्के महिला या नैराश्यग्रस्त असतात, असेही लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांना आधी नैराश्यातून बाहेर काढावे लागते. त्याशिवाय त्या स्वतःच्या केससाठी लढू शकत नाहीत. आजच्या एकूणच स्थितीमुळे नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. अर्थात, महिलांबरोबरच पुरुषांमध्येही नैराश्याचे प्रमाण आढळून येत आहे. महिलांमध्ये ५.८ टक्के, तर पुरुषांमध्ये ३.६ टक्के नैराश्याचे प्रमाण आढळ‍ून आले आहे. त्यामुळेच नैराश्याशी दोन हात केले पाहिजेत. निदान आपल्या मुलांसाठी, कुटुंबियांसाठी तर नैराश्यावर मात केलीच पाहिजे. या कामात 'पंख'सारख्या संस्था पुढे येत आहे, ही नक्कीच समाधानाची बाब आहे,' असेही रहाटकर म्हणाल्या. डॉ. देशपांडे यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. अमोल देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याच कार्यक्रमात नैराश्यावर आधारित पथनाट्यानेही लक्ष वेधले.

\B

नैराश्यावर मात केलेले झाले बोलते\B

कार्यक्रमात नैराश्यातून गेलेले आणि नैराश्यावर यशस्वी मात केलेले डॉ. नरेंद्र वैद्य, डॉ. हर्षदा जोशी, सम्यक अंभोरे, विक्रांत दळवी आणि अन्य एकाने आपले वेगवेगळे अनुभव व्यक्त केले. डॉ. शीतल सावंत-इंटोलिकर यांनी त्यांना बोलते केले. या कार्यक्रमाला रसिकांनी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावणी पाइपलाइन अखेर झाली सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छावणी परिसरात मागच्या वर्षी गॅस्ट्रोचा उद्रेक झाल्यानंतर नवीन जलवाहिनी तयार करण्याचे आदेश २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या छावणी परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत तत्कालीन अध्यक्षांनी दिले होते. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे हे काम रखडत गेले आणि तब्बल ११ महिन्यांनी हे काम एकदाचे पूर्ण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून याच जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.

छावणी परिसरात खाम नदीतून गेलेल्या जलवाहिनीतून दूषित पाणीपुरवठा झाल्यामुळे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गॅस्ट्रोचा उद्रेक झाला होता. त्यामुळे तब्बल १० ते १२ हजार नागरिकांना गॅस्ट्रोचा फटका बसला होता. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत कर्णपुरा नाका ते छावणीपर्यंत पुलाला समांतर नवीन जलवाहिनी तयार करण्याचे आदेश तत्कालीन अध्यक्षांनी दिले होते. त्यासाठी ४५ लाखांचा निधीही तात्काळ मंजूर केला होता. मात्र, हे काम वेगवेग‍ळ्या कामांमुळे रखडले आणि काम सुरू होण्यासाठीच उन्हाळा उजाडला. निदान पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा असताना पावसाळा संपल्यानंतरच हे काम पूर्ण झाले. सद्यस्थितीत वेगवेगळ्या तपासणीनंतर या जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरू झाला आहे व सध्या तरी दूषित पाणी पुरवठ्याची तक्रार नसल्याचेही सांगण्यात आले.

\B'लिकेज'ची समस्या कायम

\Bकर्णपुरा नाका ते छावणीपर्यंत नवीन जलवाहिनी कार्यान्वित झाली असली, तरी पुलाजवळ काही प्रमाणात 'लिकेज'ची समस्या कायम आहे. मागे जेसीबीने फुटलेल्या पाईपच्या ठिकाणी क्लॅम्प टाकून दुरुस्ती करण्यात आली असली, तरी त्याच ठिकाही काही प्रमाणात 'लिकेज' होत असलल्याचे समोर येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोऱ्या वाढल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर व परिसरात गेल्या काही दिवसांत चोरट्यानी उच्छाद मांडला आहे. चार घटनांमध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. सातारा, उस्मानपुरा, पुंडलिकनगर व सिटीचौक भागात हे प्रकार घडले असून, सबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चोरीच्या पहिल्या घटनेत उस्मानपुरा येथील नारायण रंगनाथ घुले (वय ७८) हे जेष्ठ नागरिक पत्नीसह २९ सप्टेंबर रोजी यात्रेला गेले होते. ते शुक्रवारी शहरात परतले. यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट उचकटून चोरट्यांनी आतमधील ५२ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी घुले यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरीची दुसरी घटना सातारा परिसरात घडली. येथील महिलेच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यानी आत प्रवेश केला. हा प्रकार २९ सप्टेंबर रोजी घडला. चोरट्यांनी घरातील दहा हजारांचे दागिने या लंपास केले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरीची तिसरी घटना शुक्रवारी सकाळी हडको कॉर्नर भागात घडली. कोंडिराम माधवराव मुरकुटे यांचे घर फोडून चोरट्यांनी साडेदहा हजारांची भांडी लंपास केली. याप्रकरणी मुरकुटे यांच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

\Bपेशंट म्हणून आला १२ हजार लांबवले\B

पेशंट म्हणून आलेल्या भामट्याने मेडिकल दुकानातून १२ हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी सचिन सूर्यकांत जोशी यांनी तक्रार दाखल केली. पुंडलिकनगर भागात जोशी यांचे मेडिकल स्टोअर आहे. तेथे नितीन साळवे हा तरुण डॉक्टरांची औषधांची चिठ्ठी घेऊन आला. जोशी यांच्या वडिलांची नजर चुकवत त्याने गल्ल्यातून १२ हजार रुपये लंपास केले. हा प्रकार जोशी यांच्या लक्षात आला. आरोपी साळवेला अटक करण्यात आली असून, पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी, रस्ता प्रश्न साताऱ्यात तीव्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा, देवळाई आणि बीड बायपास परिसरात सध्या पाणी, रस्ता आणि दिवाबत्तीचे प्रश्न तीव्र झाले असून, ते लवकरात सोडवावेत अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे.

सातारा परिसराचा मुख्य रस्ता म्हणून आमदार रोडची ओळख. मात्र, हा रस्ता उखडला आहे. सातारा पोलिस ठाणे, राधा मंगल कार्यालय, मधु मंगल कार्यालय, छत्रपती संभाजी राजे चौक, कल्याणी साईसृष्टी परिसर, हायकोर्ट कालनी या भागात या रस्त्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या आहेत. ठिकठिकाणी एक फूट, दोन फूट खोल खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून चोवीस तास वाहतूक सुरू असते. रस्ता खराब झाल्यामुळे वाहन गेल्यानंतर धूळ उडते. मुख्य रस्त्यावरील सर्व दुकाने या धुळीने माखले आहेत. विशेष म्हणजे या भागात पाणीप्रश्नही तीव्र आहे. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे आतापासून इथले बोअरवेल आटत आहेत. आमदार रोडवरील विजेचे दिवे रात्री बंद असतात. आणि रात्री या रोडवर कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरतात. त्यामुळे दुचाकीवर येणारे-जाणारे वाहनधारक धास्तावलेले असतात. कधी कुत्रा येईल आणि लचका तोडेल अशी भीती असते. रेणुकामाता मंदिर कमान, देवळाई चौक या भागातही पाणी, रस्ते आणि दिव्याचा प्रश्न कायम आहे. सातारा परिसर आणि गाव महापालिकेत येऊन आता दोन वर्ष झाले. मात्र, महापालिकेने अजूनही इथले प्राथमिक प्रश्न सोडविले नाहीत. आम्ही वेळेवर करत भरतो, मग या सविधा पालिका का देत नाही, असा सवाल नागरिक करत आहेत. आगामी काळात पालिकेने या परिसरातल्या समस्या सोडविल्या नाही तर आंदोलन छेडू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापुरात दोघांना दारू नेताना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

बेकायदा देशी दारू घेऊन जाणाऱ्या एकाला शहरातील येवला नाका परिसरात पोलिसांनी शनिवरी अटक केली. त्याच्या ताब्यातून देशी दारुचे खोके जप्त करण्यात आले असून, जप्त केलेल्या ४८ बाटल्यांची किंमत दोन हजार ८८० रुपये आहे.

राहुल दिलीप कुंदे (रा. यशवंत नगर) असे आरोपीचे नाव आहे. चोरटी विक्री करण्यासाठी एका पोत्यातून दारुच्या बाटल्या घेऊन जातांना पोलिसांनी त्याला आटक केली. याप्रकरणी हवालदार रज्जाक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुंदे याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक पवार हे करीत आहेत. खंडाळा येथेही बेकायदा देशी दारूची विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी रविवारी अटक केली. शिवसिंह धोंडिराम राजपूत असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ८४० रुपये किंमतीच्या १२ देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी लक्ष्मण नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजपूत याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवशाही बसची डिझेल टाकी फुटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको बसस्थानकात शिवशाही बसला रविवारी रात्री अपघात झाला. नागपूरकडे निघालेली शिवशाही बस सिडको बसस्थानकात प्रवेश करताना डिझेलच्या टाकीला धक्का लागला. त्यातून डिझेल गळती होऊ लागली. लागलीच ही बाब लक्षात आल्याने मोठा अपघात टळला.

मध्यवर्ती बसस्थानकातून आलेली ही बस नागपूरकडे निघाली होती. रात्री साडेनऊच्या सुमारास बस सिडको बसस्थानकात प्रवेश करीत होती. त्यावेळी बसच्या डिझेल टाकीला धक्का लागला. त्यामुळे टाकी फुटली व डिझेल खाली गळू लागले. जवळपास असलेल्या नागरिकांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर तात्काळ गाडी थांबविण्यात आली. गतिरोधकाच्या धक्क्यामुळे टाकी फुटली असावी, असा अंदाज आहे. अचानकपण डिझेल खाली पडत आल्याचे लक्षात आल्यानंतर तात्काळ प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर टाकीची दुरुस्ती करण्यात आली. तोपर्यंत डिझेल खाली सांडले होते. बसस्थानकात अशा प्रकारचा अपघात घडल्याने प्रवाशांची गर्दी झाली. अपघातात कोणालाही इजा झालेली नाही; तसेच मोठा अपघात टळल्याची चर्चा ही प्रवाशांमध्ये होती. रात्री उशिरापर्यंत प्रशासकीय पातळीवर याचा आढावा घेण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात पाणीसंकट गहिरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अत्यल्प पावसामुळे यंदाही औरंगाबाद जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असून पाणीसंकट गहिरे झाले आहे. जिल्ह्यात तब्बल १७४ गावांमधील तीन लाख ३५ हजार नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ५९ टँकर गंगापूर तालुक्यात सुरू असून धरणाच्या उशाला असलेल्या पैठण तालुक्यात ४२ टँकर सुरू आहेत.

मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाला असल्याने अडचणी वाढल्या आहेत. अपेक्षित सरासरीच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात केवळ ५६ टक्केच पाऊस झाला आहे. अत्यल्प पावसामुळे पैठण, गंगापूर व वैजापूर तालुक्यामध्ये टँकर सुरू करावे लागले असून, टँकरची मागणी वाढत आहे. जूनपासून जिल्ह्यात पावसाचे दोन मोठे खंड झाले. परतीचा पाऊसही बरसला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. फुलंब्री तालुक्यातील आठ हजार ८५०, पैठण तालुक्यातील ७९ हजार ५४९, गंगापूर तालुक्यातील एक लाख २६ हजार ७२२, वैजापूर तालुक्यातील एक लाख पाच हजार ६५४ तर सिल्लोड तालुक्यातील १४ हजार ८५६ अशा जिल्ह्यातील तीन लाख ३५ हजार ६३१ नागरिकांची तहान टँकरवर अवलंबून आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यात अडीचशेवर टँकर सुरू होते. मात्र, दरम्यानच्या काळात ‌औरंगाबाद, सिल्लोड, खुलताबाद तालुक्यातील सुरू असलेले सर्व टँकर बंद झाले. त्यानंतर पावसाच्या मोठ्या खंडामुळे पैठण, वैजापूर आणि गंगापूर तालुक्याला बसलेला टँकरचा विळखा अद्यापही कायम आहे. जिल्ह्यात टंचाई आराखडा संपुष्टात येण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडे तीव्र टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकर सुरू ठेवण्याची मागणी करण्यात येत होती. यामुळे टँकर सुरू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली होती. त्यानंतरही जिल्ह्यातील टँकरचा चढता आलेख ऑक्टोबर महिन्यातही सुरू आहे. सध्या पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, यामध्ये ८० विहिरी टँकरसाठी तर २१ विहीरींचे टँकरव्यतिरिक्त अधिग्रहण करण्यात आले आहे.

\Bया गावात पाण्यासाठी वणवण

- फुलंब्री -\B आडगाव खुर्द, गेवराई पायगा, नरलाभाववाडी, महाल किन्होळा.

\B

- पैठण - \Bचितेगाव, हर्षी बु., हर्षी खु., वडाळा, सुलतानपूर, रांजनगाव दांडगा अंतर्गत वस्त्या, कडेठाण बु., गेवराई बाशी, बन्नीतांडा, नरसिंह तांडा, बंगलातांडा, दोरखेडा, लाखेगाव, तुपेवाडी, बोकुड जळगाव, पाटोदेवडगाव, वरुडी बु., दिन्नापूर, पाडळीतांडा, वडजी, कापूसवाडी, डोणगाव, मिरखेडा, टेकळीतांडा, पाचलगाव, थेरगाव, कासारपाडळी- ववा, बालानगर, कुतूबखेडा, दादोगाव बुद्रुक व खुर्द, चिंचोली, आंतरवाडली खांडी, आडूळ, टेकळीतांडा, पैठणखेडा.

\B

- वैजापूर - \Bउंदीरवाडी, राहेगाव-सोनवाडी, जळगाव, धोंदलगाव, नालेगाव, खिर्डी हरगोविंदपूर, भायगावगंगा, लोणी बु., आघुर, शिवराई, भगूर, मनूर, पालखेड, रोटेगाव, वाकला, हिंगोणी, सवंदगाव, मकरमतपूरवाडी, तिडी, जिरी- मनोली, बोरसर, संजरपूरवाडी, लाखखंडाळा, जरुळ, पानवी खंडाळा, बल्‍लाळी सागज, कनकसागज, एकोडीसागज, बेंदेवाडी, भायगाव वैजापूर, अमानतपूरवाडी, हडसपिंपळगाव, आंबेवाडी, टाकळीसागज, भिवगाव, परसोडा.

\B

- गंगापूर -\B सावंगी, हर्सूल-अनंतपूर-दायगाव, शिरेगाव, शिल्लेगाव, शंकरपूर, फुलशिवरा, बुट्टेवडगाव, भागाठाण, शहापूर बंजर, टोकी-बर्गीपूर-इब्राहिमपूर, आंबेगाव, हैबतपूर-मुस्तफाबाद, खोजेवाडी, सिंधी सिरगाव- फतुलाबाद, नांदेडा, वडगाव, अंबेलोहळ, तुर्काबाद, शिरोडी- मलकापूर, जिकठाण-मिर्झापूर-सुलतानपूर, बोरगाव, येसगाव, राजूरा, तांदूळवाडी, बोलठाण- हदीयाबाद, शहापूर, घोडेगाव-मंजरपूर, गाजगाव-खादगाव-देर्डा, कनकोरी-कोळघर, भोयगाव-नारायणपूर-कोबापूर, पळसगाव, सिरेगाव-गोपाळवाडी, सिद्धनाथवडगाव, शेकटा-वजनापूर, वडाळी, नारायणपूर-पेकळवाडी, दहेगाव-मुरमी, नरसापूर-नागापूर-पदमपूर, मालूंजा खुर्द, महेबुबखेडा, धामोरी खु., गवळीधानोरा, बाबरगाव, मालूंजा बु., कासोडा.

\B

- सिल्लोड - \Bमांडगाव, बनकिन्होळा, धोत्रा, पालोदवाडी, बहुली, वरुड, आसडी.

\Bटॅँकर सुरू असलेली गावे

\B- फुलंब्री - ४

- पैठण - ३६

- गंगापूर - ६६

- वैजापूर - ४०

- सिल्लोड - ७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजप प्रदेशाध्यक्षांसमोर शेतकऱ्यांचा रोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

तालुक्यातील ब्रह्मगव्हाण जलसिंचन योजनेचा आढावा व पाहणी करण्यासाठी आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना, रविवारी या योजनेवर अवलंबून असलेल्या गावकरी व शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. खासदार दानवे यांना शेतकऱ्यांनी भाषण पूर्ण न करू दिल्याने या भागात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

तालुक्यातील ५५ गावांसाठी अत्यंत महत्त्वाची व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ब्रह्मगव्हाण जलसिंचन योजनेची पाहणी व आढावा घेण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे रविवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत या भागात आले होते. पाहणी केल्यानंतर खेर्डा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना, खासदार दानवे यांनी या योजनेचा पहिला टप्पा एक-दोन महिन्यांत पूर्ण होणार असून शेतकऱ्यांनी या जलसिंचन योजनेच्या कामात अडथळा करू नये, असे आवाहन केले. त्यामुळे सभेत उपस्थित शेतकरी व गावकरी अचानक संतप्त झाले. त्यांनी सभेत एकच गोंधळ घायलायला सुरुवात करत खासदार दानवे यांचे भाषण बंद पाडले. 'गेल्या आठ वर्षांपासून या योजनेचा पहिला टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाही. खासदार दानवे केवळ घोषणा करतात,' अशा संतप्त भावना या सभेत शेतकरी व गावकऱ्यांनी बोलून दाखवल्या.

यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, पाटबंधारे चे विभागीय आयुक्त ई. डी. कोहीरकर, अनिल निंभोरे यांच्यासह भाजप कार्यकर्ते व पंचक्रोशीतील गावकरी व शेतकरी उपस्थित होते.

\Bपाच मिनिटे भाषण बंद\B

या सभेत शेतकरी जवळपास पाच मिनिटे सरकार विरोधी घोषणाबाजी व खासदार दानवेंचा विरोध करत असल्याने दानवे यांना पाच मिनिटे त्यांचे भाषण बंद करावे लागले. यामुळे सभास्थळी तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर गावकरी व शेतकरी शांत झाले व खासदारांनी त्यांचे उर्वरित भाषण पूर्ण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अद्रकावर मर; शेतकरी हवालदिल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

नगदी व भरघोष उत्पन्न देणारे पीक म्हणून अद्रक (आलं) पिकाकडे पाहिले जाते. कन्नड तालुक्यात अद्रकाचे क्षेत्र मोठे आहे. मागील दोन वर्षात या पिकास भाव कमी मिळाला, परंतु कोणत्याही रोगाचा लवलेश आढळून आला नव्हता. २०१५-१६नतंर यंदा २५ टक्के अद्रक पिकाच्या क्षेत्रास मर रोग, कंदसड व मुळकूज या रोगाचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या रोगाच्या प्रार्दुभावाने व लागवड, मशागत, फवारणी व मजुरीचा एकरी खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील एक महिन्यापासून अद्रक पिकाचे प्लॉट बसताना दिसून येत असून, कंदसड, मुळकुज व मररोगाचे प्रमाण वाढते आहे. तालुक्यात कन्नड, बहिरगाव, हतनूर, अंधानेर, नेवपूर, चिंचोली (लिंबाजी), उपळा आदी शिवारात सुमारे आठ हजार हेक्टरवर अद्रक पिकाची गादीवाफा पद्धतीने ठिबक सिंचनाचा वापर करून लागवड झाली आहे. यारोगामुळे उत्पादन घटण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. सध्या या रोगाची लागण सुमारे दोन हजार हेक्टरवर जाणवताना दिसून येत आहे.

\Bरोगाची कारणे\B

- अद्रक बेण्याची काढणीनंतर अयोग्य साठवणूक

- लागवडीसाठी अयोग्य बेण्याची निवड

- पीक फेरपालट न करता एकाच पिकाची सतत लागवड

- जमीन नैसर्गिक पद्धतीने निर्जंतूकीकरणाचा अभाव

- वातावरण बदलाच्या नोंदीकडे दुर्लक्ष

- रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर

जैविक औषधीमध्ये एकरी पाच किलो ट्रायकोडर्मा व्हिरिडी, शेणाची स्लरी, ब्लू-कॉपर, सेप्टोसायक्लिन ठिबक संचाद्वारे १०० लिटर पाण्यातून देण्यात यावी. जैविक औषधीचा वापर केल्यानंतर रासायनिक खते व औषधीचा वापर किमान १२ ते १५ दिवस टाळावा. पाण्यात रासायनिक, आसिडयुक्त औषधी व खताचा अतिवापर टाळावा, रासायनिक प्रकारामध्ये मोरचूद दोन किलो, कळीचा चुना दोन किलो १०० लिटर पाण्यात मिसळून एक एकरसाठी ड्रेचिंग करावे. मेटालॅक्सिल ५०० ग्रॅम, बेनोफिट ५०० ग्रॅम, क्लोरोपायरिफॉस ५०० मिलीलिटर, २०० लिटर पाणी याप्रमाणात ठिबक संचातून देण्यात यावे.

- एस. एन. बेडवाल, मंडळ कृषी अधिकारी, कन्नड

अद्रक हे पिकाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर असल्याने अचानक येणाऱ्या मर व सड रोगाने बाधित शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले जाते. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात अद्रक व हळद पिकांचा समावेश पीक विम्यामध्ये करावा. त्यामुळे होणाऱ्या नुकसानाची काही अंशी व खर्च फिटण्यापुरती तरी भरपाई मिळेल.

- किरण खंडागळे, शेतकरी, हतनूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी, वाहन चालकाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दोन विविध घटनात विद्यार्थ्यासह चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी प्रतापनगर रेल्वे रूळ; तसेच हर्सूल परिसरात या घटना घडल्या. कौटुंबिक समस्यामुळे नितीन सुभाष जाधव (वय २१ रा. जांभरुळा, ता. मंठा) याने, तर आतीबखान नसीरखान (वय ३०, रा. एकबालनगर, हर्सूल) याचे पत्नीच्या विरहाने आत्महत्या केली. याप्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नितीन हा गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या घरची परिस्थीती हलाखीची आहे. प्रतापनगर भागात तो मित्रांसोबत खोली करून राहत होता. शनिवारी रात्री जेवण केल्यानंतर नितीन खोलीबाहेर पडला. रात्रभर तो खोलीवर परतला नाही. त्याच्या मित्रांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात जाऊन ही माहिती पोलिसांना दिली. रविवारी सकाळी नऊ वाजता जवळच असलेल्या रेल्वे रुळावर एका तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळला. त्याच्या खिशातील आयकार्डवरून तो मृतदेह नितीनचा असल्याची ओळख पटली. आर्थिक चणचण व कौटुंबिक समस्यामुळे नितीनने आत्महत्या केल्याची माहिती उस्मानपुरा पोलिसांनी दिली. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

\Bपत्नीच्या विरहामुळे संपविले जीवन\B

आत्महत्येची दुसरी घटना हर्सूल परिसरातील एकबालनगर भागात घडली. येथील आतीबखान नासीरखान या वाहनचालकाची पत्नी घरगुती वादातून १५ दिवसांपासून माहेरी गेली होती. पत्नीचा विरह सहन झाला नसल्याने शनिवारी दुपारी आतीबखानने साडीने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार उघड झाल्यानंतर हर्सूल पोलिसांनी त्याला बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्यासोबतचा संघर्ष थांबणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, तसेच जालना जिल्ह्यातील घनसावंगी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोघांचा जीव गेल्यानंतर वन विभागाने बिबट्या-मानव संघर्ष थांवण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. जुन्नर येथील बिबट निवारा केंद्रात येथील वीस कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार असून प्रत्येक रेंजला 'ट्रँग्युलायझिंग गन', 'सर्च लाइट', जाळ्या यासह इतर साधनसाम्रुगीही पुरविण्यात येणार आहे.

जंगलावरील अतिक्रमणामुळे वन्य प्राण्यांचा अधिवासही धोक्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत जंगल आणि डोंगरी भागांतील बिबट्यांचा वावर ऊस क्षेत्रात वाढला आहे. भक्ष्य व पाण्याच्या शोधार्थ ते मानवी वस्त्यांकडे येत आहेत. त्यातूनच माणसांवरही हल्ले होतात. नुकत्याच घडलेल्या अशा दोन घटनांनंतर वन विभागाने बिबट-मानव संघर्ष थांवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जुन्नर येथील बिबट निवारा केंद्रात कर्मचाऱ्यांना विशेष रेस्क्यू प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पथकात प्रामुखाने माजी सैनिक असलेल्या वन कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. येत्या सोमवारपासून ते प्रशिक्षणाला रवाना होतील, अशी माहिती उप वनसंरक्षक सतीश वडस्कर यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

दरम्यान, आपत्तकालीन परिस्थिती कशी कार्यवाही करावी, हल्ल्यापासून कसा बचाव करावा, जनजागृतीवर भर यासह अन्य प्रकारचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे. बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी वापरली जाणारी 'ट्रँग्यूलायझिंग गन' चालविण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले जाणार आहे. सध्या जिल्ह्यातील दोन ते तीन कर्मचाऱ्यांनाच 'ट्रँग्यूलायझिंग गन' चालवता येते.

\Bबचाव ढाल, 'ट्रँग्यूलायझिंग गन' खरेदी \B

औरंगाबाद विभागाअंतर्गत औरंगाबाद, खुलताबाद, कन्नड, वैजापूर, नागद, सोयगाव, अजिंठा, जालना उत्तर, जालना दक्षिण, सिल्लोड असे दहा वनक्षेत्र आहेत. मानवी वस्ती परिसरात धुमाकुळ घालणाऱ्या, हल्ले करणाऱ्या वन प्राण्यांना जेरबंद करून पुन्हा त्यांना सुरक्षित अधिवासात सोडण्यासाठी वन कर्मचाऱ्यांना विविध साधने पुरविण्यात येतात. गेल्या काही महिन्यात घडलेले प्रकार लक्षात घेत विभागाने प्रत्येक वनक्षेत्रासाठी (रेंज) दोन 'ट्रँग्यूलायझिंग गन', प्रत्येकी दोन बचाव ढाल, जाळ्या, हेड लाइट, सर्च लाइट यासह इतर आवश्यक साधन साम्रुगी पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक, कार अपघातात जमादाराचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ट्रकने धडक दिल्याने कारमधील पोलिस जमादाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी पहाटे साडेपाच वाजता नगर नाक्याजवळ घडला. देवचंद माधवराव कुऱ्हाडे (वय ५० मुळ रा. निमाणी ता. कन्नड, सध्या रा. पडेगाव) असे मृत जमादाराचे नाव असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी ट्रकचालकाला छावणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी छावणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुऱ्हाडे यांचा मुलगा रविवारी पहाटे रेल्वेने बाहेरगावावरून येणार होता. कुऱ्हाडे त्याला आणण्यासाठी पडेगाव येथून एका नातेवाईकासोबत रेल्वे स्टेशनला कारमध्ये निघाले होते. यावेळी टोल नाक्याजवळ त्यांच्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला. कारमधील कुऱ्हाडे व त्यांचे सहकारी यामध्ये गंभीर जखमी झाले. नागरिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील दोघांना घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासून कुऱ्हाडे यांना मृत घोषित केले. दरम्यान, याप्रकरणी ट्रकचालकाला छावणी पोलिसांनी अटक केली असून, मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bवाहतूक थांबली

\Bअपघात घडल्यानंतर अपघातग्रस्त वाहने रस्त्यावर पडून होती. यामुळे रस्त्यांच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. छावणी पोलिस व शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

\Bकर्मचारी हळहळले\B

देवचंद कुऱ्हाडे हे छावणी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. शांत स्वभावाचे व साध्या पद्धतीने राहणारे कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अपघाती निधनामुळे पोलिस दलातील त्यांच्या सहकाऱ्यांना शोक अनावर झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images