Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

घरात घुसून विनयभंग; एक वर्ष सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरात घुसून २४ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करणारा आरोपी शेख मोयीनोद्दीन शेख अफरोद्दीन याला एक वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी ठोठावली. तसेच दंडाची रक्कम पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही कोर्टाने बजावले आहेत.

या प्रकरणी पीडित विवाहितेने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, विवाहितेचा पती कामानिमित्त बाहेरगावी गेला होता व १८ मे २०१५ रोजी विवाहिता आपल्या मुलांसह घरात होती. दुपारी तीनच्या सुमारास आरोपी शेख मोयीनोद्दीन शेख अफरोद्दीन (३६, रा. पडेगाव) याने विवाहितेच्या घराचे दार वाजविले. तिने दरवाजा उघडला असता आरोपीने विवाहितेचा विनयभंग केला. विवाहितेने आरडा-ओरड केल्याने आरोपी पळून गेला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन भादंवि ४५२ व ३५४ कलमान्वये छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यातील दोन साक्षीदार फितूर झाले, तरीही कोर्टाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद व साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीला भादंवि ४५२ कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, तर भादंवि ३५४ कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सराईत गुन्हेगारांच्या टोळ्याविरुद्ध मोक्का

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुबाडणाऱ्या दरोडेखोरांच्या दोन टोळ्यांविरुद्ध ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या आदेशावरून मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.

दरोड्याची पहिली घटना २५ मे २०१८ रोजी गंगापूर पोलिस ठाणे हद्दीत घडली होती. या प्रकरणी संपत नारायण फड (रा. नाशिक) यांनी तक्रार दाखल केली होती. यामध्ये गौतम हिरामण काळे, शिवाजी नाना गिऱ्हे, रवी उर्फ रमेश फुलसिंग भोसले, विकी फुलसिंग भोसले, सचिन उर्फ खरजुल्या फुलसिंग भोसले व अतुल सुनील काळे (सर्व रा. नेवासा) यांना अटक करण्यात आली होती. तसेच दुसरा गुन्हा शिल्लेगाव पोलिस ठाण्यात नऊ मे २०१८ रोजी अनिल भुतेकर (रा. बजाजनगर) यांनी दाखल केला होता. यामध्ये आरोपी मिजेस निजाम काळे, कार्तिक निजाम काळे, बबन निजाम काळे, रमेश दिनकर काळे, लाकर करमत उर्फ गजानन काळे आणि लक्ष्मण उर्फ सोपान भानू भोसले (सर्व रा. गंगापूर परिसर) यांना अटक करण्यात आली होती. या दोन्ही टोळ्यांवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालकाला मारहाण करून कार पळवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रवासी म्हणून बसलेल्या दोन तरुणांनी कारचालकाला मारहाण करत रोख रक्कम लुबाडत कार घेऊन पसार झाले. शनिवारी रात्री सव्वादहा वाजता भांगसी माता गडाच्या मागे हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध दौलताबाद पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल जगन्नाथ मुळे (रा. सातपूर कॉलनी, नाशिक) या कारचालकाने तक्रार दाखल केली. शनिवारी सायंकाळी सहा वाजता नाशिक येथून औरंगाबादला करोडीला येण्यासाठी दोन प्रवासी त्यांच्या कारमध्ये बसले. मुळे याने निफाड, येवला, वैजापूर, शिवूर बंगला मार्गे शरणापूर फाट्यापर्यंत आले. यावेळी रात्रीचे दहा वाजले होते. आरोपींनी करोडीकडे कार घेण्यास सांगितली. रेल्वेरूळ पार केल्यानंतर भांगसी माता गडाच्या मागच्या बाजूने कार कच्च्या रस्त्याला वळवण्यास सांगितली. पुढे रस्ता खराब असल्याने मुळेने कार पुढे नेण्यास नकार दिला. यावेळी दोन्ही प्रवासी खाली उतरले. मुळे याला शिवीगाळ करीत त्यांनी मारहाण सुरू केली. त्याला बाजूला ढकलून देत त्याच्या जवळील रोख रक्कम आणि कार घेऊन पसार झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात विद्यार्थिनींना अमानुष वागणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 'कमवा व शिका' योजना अत्यंत अमानुष आहे. विद्यार्थिनींना कौशल्ययुक्त काम देण्याची गरज असताना तळहाताचे रक्त काढणारे खुरपणीचे काम देतात. मुलींच्या वसतिगृहात कोणत्याही सुविधा नाही. हा प्रकार संतापजनक असून, कुलगुरू नेहमी दौऱ्यावर असल्यामुळे दाद कुणाकडे मागणार,' अशी टीका आमदार सतीश चव्हाण यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

विद्यापीठातील 'कमवा व शिका' योजनेबाबत विद्यार्थिनींनी आमदार सतीश चव्हाण यांच्याकडे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी सोमवारी सकाळी दोन तास विद्यापीठ परिसराची पाहणी केली. 'कमवा व शिका' योजनेच्या कामाचे स्वरूप जाणून घेतले. यावेळी विद्यार्थिनींनी तळहात दाखवत खुरपणीचे काम वेदनादायी आहे. कौशल्ययुक्त कामाची गरज असल्याचे चव्हाण यांना सांगितले. वसतिगृहात पिण्याचे पाणी नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत पत्रकार परिषद घेत चव्हाण यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. 'कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थिनींनी खुरपायचे असते का? उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या हातात खुरपे देऊन प्रशासन काय सिद्ध करीत आहे, असा सवाल चव्हाण यांनी केला. ग्रामीण भागातील बहुजनांच्या मुलींशी अमानुष व्यवहार सुरू असल्याची टीका केली. विशेष म्हणजे परीक्षेच्या दिवशी सकाळी दोन तास विद्यार्थिनींनी खुरपणीचे काम केले. काम आटोपून विद्यार्थिनी परीक्षेला जातात. परिणामी अभ्यासावर परिणाम होऊन शैक्षणिक नुकसान होते, असे चव्हाण यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात महिला डॉक्टर नाही. दीड वर्षांपासून पाण्याची टाकी धुतली गेली नाही. मुलींच्या वसतिगृहात मेस नाही. लोखंडी कॉटवर सतरंजीसुद्धा नाही. विद्यार्थ्यांचे हाल सुरू असताना प्रशासन एकतर्फी कारभार करीत आहे, असे चव्हाण म्हणाले. प्रशासनाने १५ दिवसात समस्या दूर कराव्यात. अन्यथा, विद्यापीठात आंदोलनाचे कायमस्वरुपी केंद्र सुरू करू, असे चव्हाण यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, प्रा. सुनील मगरे, डॉ. भारत खैरनार, शेख जहूर, डॉ. उल्हास उढाण, अमोल दांडगे, मयूर सोनवणे, दीक्षा पवार, दीपक बहीर, मंगेश शेवाळे आदी उपस्थित होते.

\Bपैसे घेऊन केंद्र बदलतात

\Bपरीक्षा मंडळात निमंत्रित सदस्य घेण्याचा कायदा नाही, मात्र या विद्यापीठाने निमंत्रित सदस्य घेतले. पैसे घेऊन अचानक एका रात्रीत परीक्षा केंद्र बदलत आहेत. ही विद्यापीठाची नामुष्की आहे अशी टीका आमदार चव्हाण यांनी केली. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजनभत्ता सुरू करावा आणि शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

\Bकुलगुरू दौऱ्यावर कसे?\B

'नॅक' मूल्यांकनापूर्वी कुणीही विदेश दौऱ्यावर जाऊ नये, असे परिपत्रक प्रशासनाने काढले आहे, मात्र कुलगुरू चोपडे नेहमीच दौऱ्यावर असतात. सध्या अधिकाऱ्यासह गेले आहेत. त्यांच्या चौकशीचा अहवाल उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यापर्यंत पोहचला नाही. मी पत्र दिल्यानंतर त्यांनी शोध घेण्याचे आदेश दिले, असे चव्हाण सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी कामगाराला घरी राबवले

$
0
0

Tushar.bodkhe@timesgroup.com

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील काही प्राध्यापक व प्रशासकीय अधिकारी कंत्राटी कामगारांची पिळ‌वणूक करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर झाला आहे. वरिष्ठ प्राध्यापकाने वृद्ध महिला कामगाराला स्वत:च्या घरकामासाठी पाठवून अपमानास्पद वागणूक दिली. नोकरी जाण्याच्या भितीपोटी महिलेने तक्रारी केली नाही, मात्र या घटनेमुळे प्रशासनाचा माणूसकीशून्य व्यवहार चव्हाट्यावर आला आहे.

विद्यापीठात एकूण ४८८ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. कुशल आणि अकुशल अशी विभागणी करून त्यांच्यावर वेगवेगळ्या कामांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अकुशल कामगार उद्याने व फळबागांची निगा राखणे, झाडांना पाणी घालणे, खुरपणी अशी कामे करतात. वनस्पतीशास्त्र विभागाचे स्वतंत्र उद्यान असून, कामगार नियमित काम करतात. या उद्यानाची देखभाल करण्यासाठी अकुशल महिला कामगार कार्यरत आहेत. भावसिंगपुरा येथील रहिवासी असलेल्या वृद्ध महिला कामगाराला एका वरिष्ठ प्राध्यापकाने घरकामासाठी पाठवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. प्राध्यापकाच्या घरी संबंधित महिला कामगाराने धुणीभांडी केली, मात्र हा प्रकार काही दिवस सुरू असल्याने कंटाळलेल्या महिलेने पुन्हा विद्यापीठात काम सुरू केले. या प्रकाराचा राग मनात धरून किरकोळ कारणावरून हजेरी न नोंदवणे, अपमानास्पद वागणूक देण्याचे प्रकार घडले. ही मानसिक कुचंबणा संबंधित महिलेने घरी सांगितली, पण नोकरी जाण्याच्या धास्तीने तक्रार देण्याचे टाळले. तरीही त्रास असल्यामुळे सुपरवायझरला विनंती करून महिला कामगाराने दुसऱ्या विभागात बदली करून घेतली. कामगारांची नियुक्ती विद्यापीठ परिसरातील कामासाठी आहे. वैयक्तिक कामासाठी प्राध्यापक किंवा अधिकारी या कामगारांना राबवून घेऊ शकता का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वृद्ध महिलेची कुंचबणा झाल्याचा प्रकार विद्यार्थी संघटनेला समजला. ही संघटना कुलसचिव डॉ. साधना पांडे यांची भेट घेऊन रितसर तक्रार करणार आहे. वेतन आणि हक्काच्या मागण्यांवर ठाम असलेल्या कामगार संघटना कामगार महिलेची मदत करण्यास कचरल्या आहेत. वाद वाढवल्यास कंत्राटी नोकरी जाण्याची भीती कामगारांनी व्यक्त केली. विद्यापीठात कामगारांचे शोषण सुरू असल्यामुळे प्रशासन पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

\Bपिळवणूक नित्याची बाब

\Bकंत्राटी कामगारांना घरगुती कामासाठी राबवण्याचा प्रकार उघड झाल्यामुळे हा त्रास अनेक कामगारांना सहन करावा लागत असण्याची शक्यता आहे. प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकारी वैयक्तिक कामासाठी कामगारांना राबवून घेतात. काही प्राध्यापक कामगारांकडून विद्यापीठात कार धुवून घेतात. बँकेचे काम आणि घरगुती कामेसुद्धा कामगारांना सांगतात. अत्यल्प मोबदल्यात कामगारांचे आर्थिक शोषण सुरू आहे. आता पिळ‌वणूक सुरू झाल्यामुळे कामगारांचा संताप वाढला आहे.

हा प्रकार घडला असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. पीडित कामगाराने न घाबरता तक्रार करावी. वरिष्ठ पदावरील व्यक्तीने कामगारांशी माणुसकीने वागण्याची गरज आहे.

- डॉ. अशोक तेजनकर, प्र-कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीडीआर घोटाळा, जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

टीडीआर घोटाळा प्रकरणातील आरोपी व माजी नगरसेवक अब्दुल सिकंदर याचा नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गजाला अल-अमुदी यांनी सोमवारी (२९ ऑक्टोबर) फेटाळला.

या प्रकरणी महापालिकेचे शाखा अभियंता प्रभाकर पाठक यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, मृत अब्दुल साजेद याने नगर भूमापन क्रमांक ६२१२ या सराफा रोडवरील रस्ते विकास योजनेत बाधित क्षेत्राचा टीडीआर मोबदला २०१४ मध्ये घेतला होता. तरीही त्याचा मुलगा अब्दुल सिकंदरने तोच भूखंड २००८ मध्ये बाधित झाल्याचे पुन्हा दाखवत टीडीआर मोबदल्यासाठी प्रमाणपत्र व मोबदला घेतला. नंतर हे टीडीआर प्रमाणपत्र आदित्य कन्स्ट्रक्शनला १८ लाख ९० हजारांत विकून महापालिकेची फसवणूक केली. या व्यतिरिक्त टीडीआर मोबदला मिळविण्यासाठी आरोपीने दोनदा महापालिकेच्या फसवणुकीचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यामध्ये शुक्रवारी पोलिसांनी अब्दुल सिकंदरला अटक केली. त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपीला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, कोर्टाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, आरोपीने केलेला गुन्हा हा आर्थिक व गंभीर स्वरुपाचा असल्याने आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहायक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीचा जामीन फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात वाहनचोराला बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आंतरराज्य चारचाकी वाहन चोरांच्या टोळीचा सूत्रधार राजेश पाटील (रा. सातारा परिसर) याला गुन्हे शाखेने शनिवारी जेरबंद करीत अकोला पोलिसांच्या स्वाधीन केले. २५ ऑक्टोबर रोजी रात्री अकोला शहरातून पाटीलने साथीदाराच्या मदतीने इनोव्हा कार चोरली होती. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अकोल्यातील बोहरा कॉलनीत हुजेफा अब्दुल हुसैन बत्तीवाला (वय ३७) हे राहतात. २५ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यानी त्यांची इनोव्हा (एमएच ३४ एए ८३९६) चोरली. हा प्रकार घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला. या प्रकरणी हुजेफा बत्तीवाला यांनी अकोला पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान अकोला जुने शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कैलास नागरे यांनी सीसीटीव्ही फुटेजवरून संशयित आरोपींचा तपास सुरू केला. शहर गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांना त्यांनी संशयिताचे फोटो पाठवले. फोटोवरून हा संशयित कुख्यात वाहनचोर राजेश पाटील असल्याचे निष्पन्न झाले. शनिवारी गुन्हे शाखेच्या पथकाने सातारा परिसरातील आरोपी राजेशचे घर गाठले. त्याला ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने चोरलेली इनोव्हा कार एन सहा परिसरातील एका कचरा कुंडीच्या बाजूला उभी केल्याची माहिती दिली. गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला पोलिसांच्या मदतीने ही कार जप्त केली. आरोपी राजेश पाटीलला अकोला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय अजबसिंग जारवाल, शिवाजी झिने, राजेंद्र सोळूंके, विशाल सोनवणे आदींच्या पथकाने केली.

\Bइतर गुन्हे उडकीस येणार

\Bआरोपी राजेश पाटील हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत वाहनचोर आहे. महाराष्ट्रासहीत इतर राज्यात देखील या टोळीवर चारचाकी वाहने चोरल्याचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी पाटीलकडून चोरीचे इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता गुन्हे शाखेच्या सुत्रांनी वर्तवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते निविदांना ग्रीन सिग्नल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्यांच्या निविदांना पालिका प्रशासानेन ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मंगळवारी या निविदा प्रशासनाकडून स्थायी समितीकडे दिल्या जाण्याची शक्यता आहे. निविदांबद्दल स्थायी समितीमध्ये दोन दिवसात निर्णय घेतला जाईल असे बोलले जात आहे. यामुळे ब्लॅकलिस्टचा आरोप असलेल्या कंत्राटदारांना क्लिनचीट दिल्याचे स्पष्ट होणार आहे.

राज्य शासनाने शहरातील रस्त्यांच्या कामासाठी शंभर कोटींचे अनुदान दिले आहे. त्यातून ३१ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे करण्याचे ठरविण्यात आले आहे. पालिका प्रशासनाने ३१ रस्ते चार पॅकेजमध्ये विभागले आहेत. यापैकी पॅकेज एक आणि तीनच्या निविदा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दहा दिवसांच्या रजेवर जाण्यापूर्वीच मंजूर केल्या. उर्वरित दोन पॅकेजमधील कंत्राटदारांवर ब्लॅकलिस्टचे आरोप असल्यामुळे त्या कंत्राटदारांकडून खुलासे मागवण्यात आले होते. आयुक्त रजा संपवून सोमवारी पालिकेत पुन्हा रुजू झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी रस्त्यांच्या निविदांबद्दल अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर प्रशासनाने सायंकाळी उशारी चारही पॅकेजच्या निविदांना हिरवा कंदील दाखवला. चारही पॅकेजच्या निविदा मंगळवारी स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठवल्या जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी या निविदा स्थायी समितीकडे आल्यातर पुढील दोन दिवसांत सभापती स्थायी समितीची बैठक घेवून निविदा मंजूर करतील असे बोलले जात आहे. एक नोव्हेंबरपर्यंत निविदांना मंजुरी मिळेल असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुष्काळमुक्त झालेल्या १६ हजार गावांची यादी द्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला, मात्र सरकारचा दावा फोल असून, दुष्काळमुक्त गावांची यादी द्या, अशी मागणी 'जलयुक्त शिवार योजने'च्या विरोधातील याचिकाकर्ते प्रा. एच. एम. देसरडा यांनी केली आहे. याबाबत देसरडा मंगळवारी (३० ऑक्टोबर) मुंबई हायकोर्टात मांडणी करणार आहेत.

राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी 'जलयुक्त शिवार योजने'वर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. 'माथा ते पायथा' ही शास्त्रशुद्ध पद्धती टाळून नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करून पर्यावरणाचे नुकसान करण्यात आल्याचा आक्षेप घेत प्रा. देसरडा यांनी २०१५मध्ये हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर राज्य सरकारने जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने योजनेची पाठराखण केल्याचा आरोप करीत देसरडा यांनी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यावर पर्यावरण आणि जलतज्ज्ञांची समिती पुनर्गठित करण्याचे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिले होते. सरकारने मिहीर देसाई यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली होती. देसरडा यांनी घेतलेल्या आक्षेपांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे देसाई यांनी सांगितले. याबाबत सहा सप्टेंबरला सुनावणी झाली होती. हायकोर्टाने सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सूचना केली आहे. या याचिकेवर मंगळवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. शिर्डी येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाल्याचा दावा केला होता; तसेच आणखी पाच हजार गावे दुष्काळमुक्त करणार असल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा हा दावा केला, मात्र सरकारचा दावा फोल असून, १६ हजार गावांची गावनिहाय यादी द्या. म्हणजे प्रत्येक गावाची पडताळणी करता येईल असे प्रा. देसरडा यांनी म्हटले आहे. याबाबत देसरडा गावांच्या यादीची न्यायालयात मागणी करणार आहेत.

योजनेतील त्रुटी दूर करण्याची सारवासारव सरकार करीत आहे. तीन हजार किलोमीटर नदीपात्राचे उद्ध्वस्तीकरण करण्याची मुभा सरकारला कुणी दिली होती. चुकीच्या कामाला जबाबदार कोण, असा सवाल देसरडा यांनी उपस्थित केला. 'जलयुक्त शिवार योजना' हा निसर्गावरचा आघात असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

'जलयुक्त शिवार योजने'च्या त्रुटींवर विधीमंडळात चर्चा आणि मंत्रालयात शहानिशा होत नाही. म्हणून न्यायपालिकेकडे दाद मागितली. शाश्वत विकासाची दृष्टी नसल्याचे हे परिणाम आहेत.

प्रा. एच. एम. देसरडा, अर्थतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अप्सरा आली; इंद्रसभेतून खाली....

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सौंदर्य, कलागुण आणि बुद्धिमत्तेचा कस लावणारी आणि खास विवाहितांसाठी असणारी 'मटा मिसेस औरंगाबाद २०१८' स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारे परफॉर्मन्स पाहून स्पर्धेची विजेती कोण असेल याचा अंदाज बांधणे कठीणच होते. अखेर तो क्षण आलाच आणि १८ ते ३५ वयोगटात प्रणाली अंबोरे, ३६ ते ४९ वयोगटात शीतल काळुंगे आणि ५० ते पुढील वयोगटात ज्योती मालपाणी या 'मटा मिसेस औरंगाबाद २०१८'च्या विजेत्या ठरल्या.

'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'मटा मिसेस औरंगाबाद'चे दुसरे पर्व हॉटेल मॅनोर येथे रविवारी पार पडले. उद्योजिका ज्योती दाशरथी, शिवाई महिला मंडळाच्या नीता देशमुख आणि अॅड. उमा भोसले प्रमुख पाहुण्या होत्या. यावेळी महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक संपादक प्रमोद माने, 'मटा'चे ब्रँड हेड पराग राऊत, ब्युरो चीफ मकरंद कुलकर्णी, सहाय्यक वरिष्ठ संपादक श्रीपाद कुलकर्णी, 'मटा'चे रिस्पॉन्स हेड महेश जहागीरदार हे उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण दिग्दर्शक शिव कदम, संजय इंगळे,

डॉ. चारूलता रोजेकर आणि रश्मी कराड यांनी केले.

गेल्या वर्षी स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळला होता. यंदाही १८० स्पर्धकांनी नोंदणी केली. ऑडिशननंतर ६० स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या. यंदा १८ ते ३५, ३६ ते ४९ आणि खास महिलांच्या आग्रहास्तव ५० ते पुढील अशा तीन वयोगटात स्पर्धा घेण्यात आली. इन्ट्रोडक्शन राउंड, रँम्पवॉक, कोणताही एक कलाप्रकार तीन मिनिटांत सादर करणे व प्रश्नोत्तर फेरी हे चार राउंड घेण्यात आले.

'हा आगळावेगळा इव्हेंट आहे. सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांचा मिलाफ करताना बाह्यसौंदर्यांइतकेच आंतरिक सौंदर्य महत्त्वाचे आहे,' असे उद्योजिका ज्योती दाशरथी म्हणाल्या. नीता देशमुख यांनी महिलांसाठीच्या या व्यासपीठाचे कौतुक केले. अॅड. उमा भोसले यांनी आंतरिक सौंदर्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच वैशाली गाडेकर यांनी हॉरर स्टंट सादर करून चकित केले.

'हर्षा अँड संजय' हे स्पर्धेचे प्रायोजक होते. ज्वेलरी पार्टनर 'तनिष्क', फिटनेस पार्टनर 'फिट मी स्टुडिओ', हेल्थ पार्टनर 'कमलनयन बजाज हॉस्पिटल', सक्सेस पार्टनर 'सोनपरी गोल्ड' आणि टायटल स्पॉन्सरर 'गगन डेव्हलपर्स' हे होते.

कमलनयन बजाज हॉस्पिटलचे सीईओ आलोक श्रीवास्तव आणि 'फिट मी'च्या संचालिका संजना नानीवडेकर यांनीही मार्गदर्शन केले. तिन्ही गटातील प्रथम विजेत्यांना सोनपरी गोल्डतर्फे एक ग्रँम गोल्डचे नेकलेस आणि दुसऱ्या व तिसऱ्या विजेतीला एक ग्रँम गोल्डची कोल्हापुरी ठुशी मिळाली.

---------

कलागुणांची बकेटलिस्ट

तिन्ही वयोगटात अटीतटीची स्पर्धा झाली. निकालाची वेळ जशीजशी जवळ येत होती, विजेत्या कोण म्हणून स्पर्धकांची धाकधूक वाढली होती. अखेर तो क्षण आला आणि सर्वप्रथम ५० ते वरील वयोगटातील विजेत्यांची घोषणा झाली. ज्योती मालपाणी यांनी या गटात बाजी मारली. चारही राउंडमध्ये त्यांचे सादरीकरण हटके होते. टँलेंट राउंडमध्ये सादर केलेली विनोदी नाटिका आणि रँम्पवरचा एकूणच वावर परीक्षकांना भावला. शर्मिष्ठा रोडगे यांनीही परीक्षकांची दाद मिळवली. तर पारंपरिक राजस्थानी वेशभूषेत राजस्थानी नृत्य सादर करणाऱ्या हसतमुख किरण शर्मा यांनी या गटात तिसरे स्थान पटकावले. ३६ ते ४९ गटात शीतल काळुंगे यांनी बाजी मारली. 'नगारे संग ढोल बाजे..' या गाण्यावर त्यांनी नृत्य सादर केले. तर 'मला जावू दे' या गाण्यांवर ठसकेबाज नृत्य सादर करून बेरील सांचिस यांनी दुसरे स्थान पटकावले. कपील शर्माचा प्रसिद्ध कार्यक्रमातील सर्व पात्रांची मिमिक्री त्यांनी मराठीतून सादर केली. १८ ते ३५ वयोगटात प्रणाली अंबोरे विजेत्या ठरल्या. त्यांनी 'बाबूजी जरा धीरे चलो' या गाण्यावर नृत्य सादर केले. तर अंजली शर्मा व सविता साळवे यांचे परफॉर्मन्स हटके ठरले.

\Bमटा मिसेस औरंगाबाद स्पर्धा - २०१८\B

\Bयांनीही गाजवली स्पर्धा

\B

मुख्य पुरस्कारांचे स्पर्धकांमध्ये आकर्षण होतेच. पण स्पर्धकांचे टँलेंट आणि एकूणच सादरीकरणाच्या आधारे विविध श्रेणीत पुरस्कार देण्यात आले.

सर्वोत्कृष्ट अप्सरा: कादंबरी देशमुख

सर्वोत्कृष्ट नृत्य: शीतल पंचारिया

सर्वोत्कृष्ट अभिनय: शरयू ठिगळे

सर्वोत्कृष्ट सादरीकरण: वैशाली गाडेकर

सर्वोत्कृष्ट गायन: दीपिका चौहान

सुंदर डोळे (बेस्ट आइज): गायत्री बनकर

सुंदर हास्य: रूपा साबळे

सर्वोत्कृष्ट रँम्पवॉक: धनश्री ठाकूर

सर्वोत्कृष्ट पेहराव: नेहा पंडित

सौंदर्य ही व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, शाब्दिक, अध्यात्मिक असे अनेक सौंदर्य निकष असतात. स्पर्धेमुळे महिलांचे सुप्त गुण वाढीस लागतात, आत्मभान मिळते व ती सजग होण्यासाठी मदत होते. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या या उपक्रमातून एक सक्षम स्त्री तयार निर्माण व्हावी हा उद्देश आहे. स्त्रियांनी फक्त शारीरिक सौंदर्य हा उद्देश न ठेवता 'शालीन सौंदर्य' हा उद्देश ठेवावा.

-डॉ. चारूलता रोजेकर

औरंगाबाद शहर बदलत आहे, हे 'मटा मिसेस औरंगाबाद' स्पर्धेतून जाणवले. पूर्वीच्या तुलनेत महिला आता खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेत आहेत. 'मटा'ने सुसंस्कृत व्यासपीठ मिळवून दिले. आता मराठवाड्याची सांस्कृतिक भूक भागवण्याचे काम आमचे आहे.

-शिव कदम, परीक्षक

'मटा मिसेस औरंगाबाद' स्पर्धेचे परीक्षण करणे खूप आवडले. स्पर्धकांना पाहून या विवाहित आहेत असे वाटलेच नाही. मी स्वतःही 'मिस औरंगाबाद' असल्याने सौंदर्यस्पर्धांचा अनुभव होता. परीक्षक म्हणून स्पर्धकांशी छान कनेक्ट करता आले. परीक्षणाचा अनुभव छान होता.

-रश्मी कराड, परीक्षक

'मटा मिसेस औरंगाबाद' स्पर्धेसाठी स्पर्धकांनी खूप मेहनत घेतली. लग्नानंतर त्यांनी घेतलेली मेहनत दिसून आली. तुम्हाला जे आवडते ते करा असेच मी म्हणेल.

-संजय इंगळे, परीक्षक

......

'मटा मिसेस औरंगाबाद' स्पर्धा खूप छान पद्धतीने घेण्यात आली. स्पर्धेकांनी खूप एन्जॉय केले. गृहिणींनी मोठ्या आत्मविश्वासाने व्यासपीठ गाजवले.

-संजना नानीवाडेकर, संचालिका, फिट मी स्टुडिओ

-----

५० ते पुढील वयोगट विजेत्या

मलाही अजिबात विश्वास वाटला नाही की मी ही स्पर्धा जिंकेल. ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना संधी दिल्याबद्दल 'महाराष्ट्र टाइम्स'चे खूप खूप आभार. माझ्यासाठी हे स्वप्न होते.

-ज्योती मालपाणी, प्रथम

विजेत्यांमध्ये मी असेल असे मला अजिबात वाटले नाही. एका गृहिणीला 'मटा' थेट व्यासपीठ दिले. कुटुंबाच्या पाठबळातून हे शक्य झाले.

-शर्मिष्ठा रोडगे, द्वितीय

मी 'मटा मिसेस औरंगाबाद' स्पर्धेत भाग घेणार हे सांगताच सुरुवातीला सगळे हसायचे. पण मी पर्वा केली नाही. सौंदर्यस्पर्धेची हौस फिटली.

-किरण शर्मा, तृतीय

३६ ते ४९ वयोगट

स्पर्धेत सामील होऊन मला खूप आनंद झाला. माझ्या कुटुबियांनी मला छान प्रोत्साहन दिले. या वयात 'टायटल विनर' होणे खूप महत्त्वाचे आहे. हा अनुभव माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे.

-शीतल काळुंगे, प्रथम

जीवनात बरेच काही करायचे होते. हळुहळु त्या इच्छा पूर्ण होत आहेत. म्हणूनच मी गेल्या वर्षी या स्पर्धेत भाग घेतला होता. यावर्षी पूर्ण तयारीनिशी स्पर्धेत आले.

-बेरिल सांचिस, द्वितीय

सौंदर्य स्पर्धेत भाग घेणे माझे बालपणीचे स्वप्न होते. विजेत्यांमध्ये स्वतःला पाहून खूप आनंद झाला. 'मटा'ने दिलेले व्यासपीठ खूप छान होते.

-शिल्पा नरवडे, तृतीय

१८ ते ३५ वयोगट

माझा परफॉर्मन्स छान झाला. पण सर्वच स्पर्धक तयारीचे होते. मी 'नर्व्हस' झाले होते. पण यशाचे श्रेय सर्व कुटुंबियांसोबत माझी मेकअप आर्टिस्ट सोनाली वाघमारेचे आभार मानते.

-प्रणाली अंबोरे, प्रथम

बेस्ट अप्सरा पुरस्कार जाहीर झाल्यावर झालेला आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. ही स्पर्धा माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकते. मला खूप आत्मविश्वास मिळाला.

-कादंबरी देशमुख, बेस्ट अप्सरा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीबाबत न्यायपूर्ण निर्णय घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा म्हणजे शत्रू राज्य आहे, असे समजून पाण्याच्या समन्यायी पाणी वाटपाला भाजप-शिवसेनेचे नाशिक-नगरमधील लोकप्रतिनिधी विरोध करीत आहेत. भाजपला अतिप्रिय असलेल्या नदीजोड प्रकल्पाचे प्रत्यक्षात काय होईल याची झलक दाखवत आहेत. मुख्यमंत्र्यांनी एकात्मिक राज्य जल आराखडा मार्गी लावला. जायकवाडी प्रकल्पात वरच्या धरणातून पाणी सोडण्याबाबत न्यायपूर्ण भूमिका घ्या, अशी मागणी जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र लिहिले आहे.

जायकवाडी धरणात नगर-नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले. मात्र, दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे पाणी सोडण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. याबाबत प्रा. प्रदीप पुरंदरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला गती दिली. पण, 'मजनिप्रा'च्या आदेशाला भाजप-शिवसेनेचे लोकप्रतिनिधी जुमानत नाहीत हा संदेश सर्वत्र जात आहे. 'हर खेतको पानी' ही संकल्पना मराठवाड्याला लागू नाही का, असा सवाल पुरंदरे यांनी पत्रात केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा निवाडा, मेंढेगिरी समितीच्या शिफारशी आणि महामंडळाच्या कामातील तफावत दाखवत पुरंदरे यांनी मुख्यमंत्र्यांना जायकवाडीबाबत न्यायोचित निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जायकवाडी’च्या तिढा कायम

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

नाशिक आणि नगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी जायकवाडीत पाणी सोडून नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली नाही. जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या याचिकेची सुनावणी ३१ ऑक्टोबरला होणार असल्यामुळे राज्य शासन आणि गोदावरी महामंडळाने तोपर्यंत पाणी सोडले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

पद‌्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने जायकवाडीत पाणी सोडू नये, यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्याअंतर्गत गोदावरी पाटबंधारे मंडळाने जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातील नऊ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला कारखान्याच्यावतीने आव्हान देण्यात आले आहे. या निर्णयाला स्थगिती मिळावी, अशी विनंती कारखान्याचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केली, परंतु स्थगितीसाठी राज्य शासनाचे ज्येष्ठ वकील श्याम दिवाण, गोपाल सुब्रमण्यम‌् आणि निशांत कातनेश्वरकर यांनी विरोध केला. स्थगिती देण्यास नकार दिला असला तरी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी होईपर्यंत ऊर्ध्व भागातून जायकवाडीत पाणी सोडले जाणार नाही, अशी भूमिका राज्य शासनाने घेतली आहे.

जालन्याचे संजय लाखे पाटील यांनीही आक्षेप अर्ज दाखल केलेला आहे. पाणी सोडण्यास स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. नगरच्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यानेही जायकवाडीत पाणी देण्यास विरोध केला आहे. दोन्ही कारखान्यांच्यावतीने कपिल सिब्बल, संजय खर्डे, शेखर नाफडे, संजय कौल, एम. वाय. देशमुख हे बाजू मांडत आहेत.

\B'सरकारकडून विलंब'\B

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जनतेची बाजू आक्षेप अर्जाच्या माध्यमातून मांडण्यात आली. शारदा प्रतिष्ठान आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी आक्षेप अर्ज दाखल केला आहे. जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी राज्य शासनाकडून विलंब केला जात आहे, असा आक्षेप अर्जात नोंदविण्यात आला आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि कायद्यातील तरतुदी लक्षात घेऊन ऊर्ध्व खोऱ्यातील धरणांमध्ये अतिरिक्त पाणीसाठा असल्याचे पुरावे शारदा प्रतिष्ठाणतर्फे कोर्टात सादर करण्यात आले. जायकवाडी धरणाचा डावा आणि उजवा कालवा बंद आहे. नगर, नाशिक भागातसुद्धा पाणी उपलब्ध नाही. जायकवाडीत जवळपास ३४ 'टीएमसी' पाणी उपलब्ध असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. शारदा प्रतिष्ठाणचे वकील दिलीप तौर यांनी आक्षेप नोंदवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता कर वसुली फक्त १२ टक्के

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या मालमत्ता कराची वसुली फक्त १२ टक्के झाली असून, त्यामुळे विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मालमत्ता कराच्या वसुलीत महापालिकेचा पाय खोलात असल्याचे चित्र आहे.

सर्वसाधारण सभेने पालिका प्रशासनाला कर वसुलीचे सुमारे साडेचारशे कोटींचे उद्दीष्ट दिले आहे. या तुलनेत आतापर्यंत फक्त बारा टक्के वसुली झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण १३ कोटी ५० लाख रुपयांनी जास्त असले, तरी पालिकेच्या तिजोरीत खडखडाटच आहे. कंत्राटदारांनी केलेल्या विविध कामांचे सुमारे १७० कोटींची बिले पालिका प्रशासानाकडे प्रलंबित आहेत. थकित बिले न मिळाल्यास कंत्राटदार काम बंद करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका आणि शहरवासीयांसमोर नवीनच संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. मालमत्ता कराच्या वसुलीसाठी सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र स्टाफ देण्यात आला. विशेष वसुली अधिकारी देखील नियुक्त केले आहेत, परंतु वसुलीचे प्रमाण मात्र वाढले नाही.

\Bगुरुवारी सर्वसाधारण सभा

\Bमहापौर नंदकुमार घोडेले यांनी कर वसुलीच्या संदर्भात गुरुवारी (१ नोव्हेंबर) विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. या सभेच्या तयारीसाठी लेखा विभागाने सर्व नगरसेवकांना २७ ऑक्टोबरपर्यंत जमा - खर्चाचा तपशील, पालिकेवर असलेली देणी याची माहिती पुस्तकरुपाच द्यावी असे आदेश दिले होते. मात्र, अद्याप एकाही नगरसेवकाला ही माहिती मिळाली नाही.

\Bदिवाळीनंतर वसुली अभियान

\Bदिवाळीनंतर १२ ते २० नोव्हेंबर दरम्यान मेगा वसुली अभियान राबवण्याचे महापौरांनी ठरविले आहे. या अभियानात पदाधिकारी, अधिकाऱ्यांसह महापौर कर वसुलीसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. आठ दिवसांत किमान शंभर कोटी रुपयांची वसुली व्हावी, असे टार्गेट ठेवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शटडाउनंतरही पाणीपुरवठा विस्कळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शटडाउनच्या तिसऱ्या दिवसानंतरही शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत आहे. यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. प्रामुख्याने सिडको - हडको भागातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

जायकवाडी येथील पंपहाउस परिसरात असलेल्या उपकेंद्रात देखभाल दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यासाठी महावितरण आणि महापारेषण कंपनीने २६ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच असा सात तासांचा शटडाऊन घेतला. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मिलिमीटर आणि १४०० मिलिमीटर व्यासाच्या अशा दोन्ही जलवाहिन्या बंद करण्यात आल्या. त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा खंडीत झाला. दुरुस्तीची कामे झाल्यामुळे शहरात येणाऱ्या पाण्यात दोन एमएलडी वाढ होईल, असा दावा करण्यात आला होता.

शहरात येणाऱ्या पाण्यात दोन एमएलडी वाढ झाली की नाही याचा अंदाज शहरातील नागरिकांना आलेला नाही. शटडाउननंतर तिसऱ्या दिवशीही पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको एन-पाच येथील जलकुंभावर काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना सोमवारी रात्री काही नागरिकांनी मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी जलकुंभाच्या समोरच मंगळवारी सकाळी सुमारे तीन तास आंदोलन केले. महापौर, आयुक्तांनी जलकुंभावर धाव घेऊन मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. संबंधित कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी पोलिस आयुक्तांची देखील भेट घेतली. यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

सिडको-हडको भागात पाणी पुरवठा विस्कळित झाला आहे. महावितरणने देखभाल दुरुस्तीसाठी शुक्रवारी सात तासांचा शटडाउन घेतला होता. त्यामुळे शुक्रवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद होता. शटडाउन संपल्यावर पाणीपुरवठा सुरू झाला आणि सिडको भागातील जलवाहिनीला गळती लागली. त्याच्या दुरुस्तीसाठी पुढील दोन दिवस सिडको-हडको भागात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे सिडको एन १२मधील काही नागरिकांनी सोमवारी रात्री ११च्या सुमारास सिडको एन-पाच येथील जलकुंभावर धाव घेतली. आमच्या परिसराला पाणीपुरवठा का करीत नाहीत, असा जाब विचारत त्यांनी तेथील कर्मचारी भीमसिंह परदेशी, काशिनाथ राठोड, तानाजी पोटकुळे, देवदत्त दांडगे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती शाखा अभियंता पद्मे यांना दिली. ते रात्री साडेअकरा-बाराच्या सुमारास जलकुंभावर दाखल झाले.

या घटनेचे मंगळवारी सकाळी मारहाणीच्या पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. सकाळी काही वेळ कर्मचाऱ्यांनी पाण्याचे टँकर न भरण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर साडेदहापासून जलकुंभासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचे नेतृत्व बहुजन शक्ती कामगार संघटनेचे नेते कृष्णा बनकर यांनी केले. दरम्यान, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता के. एम. फालक जलकुंभावर दाखल झाले. त्यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. आंदोलनाची माहिती मिळाल्यावर महापौर नंदकुमार घोडेले, सभापती रेणुकादास (राजू) वैद्य, सभागृहनेते विकास जैन, आयुक्त डॉ. निपुण विनायक देखील जलकुंभावर आले. मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ते पोलिस आयुक्तांच्या भेटीसाठी रवाना झाले. मारहाण करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे महापौरांनी सांगितले. जलकुंभाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले व सिडको - हडको भागाचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.

\Bसीसीटीव्ही चित्रिकरण ताब्यात घेतले\B

सोमवारी रात्री जलकुंभाच्या परिसरात झालेल्या मारहाणीच्या घटनेचे सीसीटीव्ही चित्रिकरण पोलिसांनी ताब्यात घेतले. मारहाण करणारे कोण होते हे स्पष्टपणे त्यातून लक्षात येते. या चित्रिकरणाच्या मदतीने संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस अधिकाऱ्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हल रविवारी

$
0
0

(सिंगल)

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जगभरातील बौद्ध राष्ट्रांशी भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर सौहार्दपूर्ण संबंध वाढवण्यासाठी तिसरा इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हल आयोजित केला आहे. गौतम बुद्धाचा विश्वशांतीचा संदेश जगभर पोहचवण्यासाठी महोत्सव महत्त्वपूर्ण ठरेल अशी माहिती भिख्खू एम. धम्मज्योती थेरो यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

तिसरा इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हल चार नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे. बीड बायपास परिसरातील जबिंदा लॉन्स येथे सकाळी आठ ते रात्री १० पर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवाचे उदघाटन आयबीसीचे सरचिटणीस खेंसूर रिंपोचे जांगचुप करणार आहेत. यावेळी भदन्त प्राचार्य डॉ. खेम्मधम्मो महाथेरो, कुसला महाथेरो (म्यानमार), भदन्त विनयबोधी थेरो, भदन्त अनालयो थेरो, भदन्त चंद्रबोधी महाथेरो (इंग्लंड) यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले, समाजकल्याण राज्यमंत्री राजकुमार बडोले, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पशूसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आयबीसीचे संचालक अशोक वांगडी उपस्थित राहणार आहेत. सकाळी आठ वाजता धम्म ध्वजारोहण, धम्म प्रवचन, भोजनदान होईल. दुपारी बारा वाजता फेस्टिव्हलचे उदघाटन होणार आहे. दुपारी एक वाजता धम्मदेसणा होईल. तर सायंकाळी चार वाजता मान्यवरांची भाषणे होणार आहेत. औरंगाबाद शहराची जागतिक पातळीवर पर्यटनस्थळ अशी ओळख आहे. अजिंठा व वेरुळ लेणीचा वारसा कौतुकाचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर होणारा बुद्धिस्ट फेस्टिव्हल इतर बौद्ध देशांशी सामाजिक व सांस्कृतिक पातळीवर सहकार्याचे संबंध वाढवण्यास अनुकूल ठरेल असे धम्मज्योती थेरो यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला भंते बोधीरत्न, भंते संघरत्न, भंते रत्नबोधी, भंते विजयानंद उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुराज्य रथ यात्रेच्या माध्यमातून भाजपचा निवडणूक प्रचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाजपाच्या केंद्रातील आणि राज्यातील सरकारांच्या मागील चार वर्षांच्या कामगिरीची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतुने भारतीय जनता पार्टीच्या उत्तर भारतीय मोर्चातर्फे काढण्यात आलेला सुराज्य रथ मंगळवारी शहरात दाखला झाला.

मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली काढण्यात आलेली ही रथयात्रा उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयासमोर सायंकाळी दाखल झाली. स्थानिक कार्यकर्त्यांनी यात्रेचे स्वागत केले. त्यानंतर रात्री शहानूरमियॉ दर्गा परिसरात आयोजित मेळाव्यात उत्तर भारतीय मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मोदी सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या गेल्या चार वर्षातील विविध लोक कल्याणकारी योजनांची व कामगिरीची माहिती देत या रथयात्रेच्या माध्यमातून निवडणूक प्रचाराचे काम केले.

ज्येष्ठ नेते आर. डी. यादव, मोर्चाचे सरचिटणीस प्रद्युम्न शुक्ला, नितीश वर्मा, शैलेश मिश्रा, अर्जुन गुप्ता, लेखराज सिंग, जनक सिंह, राकेश दहीया, राकेश विश्वकर्मा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंबई येथून २० ऑक्टोबरपासून सुरू झालेली ही रथयात्रा पिंपरी-चिंचवड, अहमदनगर मार्गे औरंगाबादेत दाखल झाली. पुढे जालना, अकोला, जळगाव, धुळे, नाशिक, डहाणूमार्गे जाणारी ही यात्रा १ नोव्हेंबरला नालासोपारा पोहचेल. त्याठिकाणी यात्रेची सांगता होईल, अशी माहिती प्रद्युम्न शुक्ला यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसी’मध्ये बसून काम करू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामीण भागात लोंबकळलेल्या तारांमुळे आगीच्या घटना वाढलेल्या आहेत. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना 'डीपी' मिळत नाही. आधीच दुष्काळ आहे. हाताशी आलेले पीक जगविण्यासाठी 'डीपी'अभावी पाणी देता येत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे? असा प्रश्न शेतकऱ्यांनी मांडला. याची गंभीर दखल घेत. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी महावितरणाच्या अभियंत्यांना फैलावर घेतले. 'एसीमध्ये बसून काम करू नका. बाहेर पडा. ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांचा विजेच्या समस्या सोडवा,' अशा सूचना त्यांनी केल्या. विजेच्या समस्येमुळे शेती जळाल्या तर त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अभियंत्याच्या पगारीतून द्यावा लागेल, असाही इशारा गणेशकर यांनी दिला.

जिल्हा विद्युतीकरण समितीची बैठक खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (३० ऑक्टोबर) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड. देवयाना डोणगावकर, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता संजय सरग यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत गळनिंब (ता. गंगापूर) येथील शेतकरी भाऊसाहेब पाचपुते, शांताबाई तांबे यांच्या शेतातील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला. याशिवाय वैजापूर, पैठण व अन्य तालुक्‍यांमध्ये विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले, अशी तक्रार करीत महावितरणचे उपअभियंते, कनिष्ठ अभियंते यांचा शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष असल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केला. याशिवाय 'डीपी' जळाल्यानंतर अनेक महिने नव्या 'डीपी'ची प्रतीक्षा करावी लागते. शेतकरी चकरा मारून त्रस्त झाले आहे. दुष्काळामुळे पावसाने पाठ फिरविली. आता महावितरणामुळे हातातील पिके वाया जाण्याचा धोका असल्याची व्यथाही त्यांनी मांडली.

जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत प्रत्येक वेळी हेच मुद्दे मांडले जात आहेत. तरीही शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटत नाही? असा आरोप कृष्णा पाटील डोणगावकर यांनी केला. शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. विजेच्या लाइनही ओढलेल्या नाहीत. ग्रामीण भागातील अनेक डीपींवर क्षमतेपेक्षा जास्त भार झालेला आहे. ही बाबही शेतकऱ्यांनी लक्षात आणून दिली.

खासदार खैरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्येबाबत संबंधितांवर कारवाई करावी लागेल, अशी सूचना केली. यानंतर मुख्य अभियंता गणेशकर यांनीच वारंवार होत असलेल्या तक्रारीमुळे अभियंत्यांना चांगलेच फैलावर घेतले. असे काम चालणार नसल्याचे स्पष्ट करीत, ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या विजेच्या समस्या सोडविण्यासाठी फिल्डवर जाऊन पाहणी करण्याचा सल्लाही यावेळी दिला.

……………

\Bबावनकुळे कसे आहेत हे माहिती\B

शहरात भारनियमन सुरू आहे. औरंगाबाद विभागीय कार्यालय असल्यामुळे हे शहर भारनियमनातून वगळण्यात आले होते. तरीही औरंगाबादला भारनियमन का? असा प्रश्न खासदार खैरे यांनी केला. याबाबत मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी हा नियम आता बदलण्यात आला आहे. आता वीज वसुलीनुसार जी-वन, जी-टू आणि जी-थी फीडरवर लोडशेडिंग सुरू असल्याचे स्पष्ट केले. यावर खासदारांनी नाशिक येथे लोडशेडिंग का नाही? असा सवाल खैरे यांनी उपस्थितीत केला. कोळसा नाही म्हणून वीज निर्मिती नाही. त्याचा त्रास जनतेला कशाला? असे म्हणत,'आम्हाला माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कसे आहेत. हे आपल्याला माहिती आहे,' असे सूचक विधान या बैठकीत केले.

……………

\B'दिवाळीत लोडशेडिंग करू नका'\B

दिवाळी सण उत्सवात एका मिनिटाचेही लोडशेडिंग न करता अखंड वीज पुरवठा करा, असा आदेश शिवसेना नेते, खासदार चंद्रकांत खैरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांची विमानाची सफर अखेर प्रत्यक्षात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची विमान सफर अखेर प्रत्यक्षात आली असून, दहा गुणवंत विद्यार्थी मंगळवारी सकाळी विमानाने दिल्लीला रवाना झाले आणि दिल्लीत ते रमले देखील.

पालिकेचे तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दोन वर्षांपूर्वी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षा घेतली. या परिक्षेत गुणानुक्रमे पहिल्या दहात येणाऱ्या विद्यार्थ्यांना विमानाने दिल्लीची सफर घडविण्याचे देखील त्यांनी जाहीर केले. मात्र, दोन वर्षांत काही न काही कारणांमुळे विद्यार्थ्यांची विमान सफर पुढे ढकलली होती. अखेर सकाळी पावणेसातच्या विमानाने या विद्यार्थांच्या पहिल्याच हवाईसफरीसाठी त्यांच्या कुटुंबियांनी निरोप दिला. औरंगाबादहून उडालेले विमान मुंबईत पोचले. मुंबईतून सकाळी पावणे नऊ वाजता विमानाने दिल्लीच्या दिशेने झेप घेतली. पावणे अकराच्या सुमारास ते दिल्लीत पोचले. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर या विद्यार्थ्यांसाठी खास बसची व्यवस्था करण्यात आली होती. बसने हे विद्यार्थी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या बंगल्यावर रवाना झाले. त्यांचा तीन दिवसाचा मुक्काम याच ठिकाणी असेल. येथे फ्रेश झाल्यानंतर त्यांचे दिल्ली दर्शन सुरू झाले. कुतुबमिनार, राजघाट, इंडियागेट, लोटस टेंपल ही ठिकाणे त्यांनी आज पाहिली. बुधवारी ही सर्व मंडळी आग्रा येथील ताजमहल पाहून रात्री दिल्लीत मुक्कामाला परतणार आहेत. गुरुवारी राष्ट्रपतीभवन, संसदभवन, इस्कॉनचे श्रीकृष्ण मंदिर, अक्षरधाम मंदिर पाहून विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांसोबत शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, शिक्षण सभापती मनोज बल्लाळ, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, वैद्यकीय अधिकारी स्मिता नळगीरकर, मुख्याध्यापिका रजनी हिवाळे, सर्वशिक्षा अभियानचे ज्ञानदेव सांगळे आहेत.

विमानातील प्रवासाचा पहिलाच अनुभव होता. भीती वाटली नाही. खूप मजा आली. विमानतळावर सोडण्यासाठी आई - बाबा आले होते. कुतुबमिनार पाहून छान वाटले. सोबतचे शिक्षक आमची काळजी घेत आहेत.

- रेणुका पंदे, विद्यार्थिनी, मिटमिटा शाळा

विमानात सुरुवातीला थोडी भीती वाटली, पण एकदा झेप घेतल्यावर काहीच वाटले नाही. विमानात खाण्यापिण्याची सोय चांगली होती. मी शाकाहारी नाष्टा केला. उपमा आणि बनपाव सारखा पदार्थ नाष्ट्यात होता.

- संतोष शिंदे, विद्यार्थी, सिडको एन ७ शाळा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेसह मुलांना मारहाण, दोघांना दंडासह सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सामायिक जागेच्या वादातून विवाहितेसह तिच्या दोन मुलांना लाकडी दांडा व लोखंडी सळईने मारहाण करुन गंभीर जखमी करणारे आशीद रामचंद्र पंडित व पटीशन रामचंद्र पंडित या दोघा भावांना एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभ‍ळे यांनी मंगळवारी ठोठावली.

या प्रकरणी अनिता रतिराम संदोकर (रा. नागसेननगर, उस्मानपुरा) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, दोन ऑगस्ट २०१३ रोजी दुपारी चारच्या सुमारास फिर्यादी ही सामायिक जागेवर भांडे घासत असताना, रामचंद्र ज्योतिराम पंडित (वय ६१), सुमनबाई रामचंद्र पंडित (वय ५०), आशीद रामचंद्र पंडित (वय २३) व पटीशन रामचंद्र पंडित (वय २०, सर्व रा. नागसेननगर) या आरोपींनी सामायिक जागेच्या वादातून संगनमत करून फिर्यादीला लाकडी दांडा व लोखंडी साखळीने मारहाण केली व गंभीर जखमी केले. त्याचवेळी फिर्यादीचा मुलगा हा भांडण सोडवण्यासाठी आला असता, त्याला आरोपींनी मारहाण करुन त्याचे डोके फोडले. तिथे धावत आलेल्या फिर्यादीच्या मुलीलाही आरोपींनी मारहाण करुन गंभीर जखमी केले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन भादंवि ३२६, ३२३, ५०४, ३४ कलमान्वये उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bजखमींना दंडाची रक्कम

\Bखटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील बी. एम. राठोड यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदविले. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राहूल चव्हाण यांनी तपास करुन कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपी आशीद व आरोपी पटीशन यांना भादंवि ३२४ कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच दंडाची रक्कम जखमी साक्षीदारांना देण्याचेही आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images