Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दुचाकी वाहनांची नवीन मालिका

$
0
0

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयातील दुचाकी वाहनांसाठीची एम एच २० एफ सी ही नोंदणी मालिका संपत आलेली आहे. यामुळे दुचाकी वाहनांसाठी एम एच २० एफ डी १ ते ९९९९ ही मालिका १२ नोव्हेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे. ज्या वाहनधारकांना पसंती क्रमांक घ्यावयाचा असेल त्यांनी आपला विहित नमुन्यातील अर्ज, सदरील आकर्षक क्रमांकाला लागू असलेल्या शुल्कासह प्रादेशिक परिवहन कार्यालय, औरंगाबाद यांच्या नावे धनाकर्ष (डीडी) व ओळखपत्राच्या साक्षांकित प्रतिंसह १२ नोव्हेंबरच्या दुपारी दोन पर्यंत कार्यालयात जमा करावा. या मालिकेतील आकर्षक क्रमांकाचे वाटप महाराष्ट्र मोटार वाहन नियम व परिवहन आयुक्तांचे परिपत्रकानुसार करण्यात येणार आहे. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास आकर्षक क्रमांकांचा दुसऱ्या दिवशी लिलाव करण्यात येणार आहे. लिलावासाठी बंद लिफाफ्यात मूळ शुल्काव्यतिरिक्त अधिक रक्कमेचा धनाकर्ष जमा केल्यानंतर लिलावाची विहित कार्यपद्धती अवलंबून नोंदणी क्रमांकाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाटीत धन्वंतरी पूजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धनत्रयोदशीच्या निमित्ताने धन्वंतरी आणि धनाची पूजा करण्यात येते. शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्‍णालयात (घाटी) अधिष्टाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले. यावेळी उपाधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. कैलास झिने, प्रशासकीय अधिकारी एस.बी. जाधव प्रकाश देहाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशासकीय इमारत आणि रुग्‍णालयामध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी घाटीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा हजारांची खंडणी घेणारा गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाजयुमोचा नेता असल्याचे सांगत कॅन्टीन ठेकेदाराकडून दहा हजारांची खंडणी उकळणाऱ्या आरोपीला सिडको गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली. रविवारी रात्री एन पाच भागात ही कारवाई करण्यात आली. प्रशांत देविदास पंडित (वय २३, रा. दिवाणदेवडी) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी लेखराजसिंह निहालसिंह (वय ६८, रा. श्रीनगर, उल्कानगरी) यांनी तक्रार दाखल केली. लेखराजसिंह हे गेल्या तीन वर्षापासून इंडो जर्मन टुल्स रुमची कँटीन चालवितात. संशयित आरोपी प्रशांत पंडित याने आपण भाजपा युवा मोर्चाचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष असल्याचे सांगत लेखराजसिंह यांना कॅन्टीनच्या व्यवसायात ५० टक्के भागीदारीची मागणी केली होती. तसेच कंपनीकडे कॅन्टीनचे टेंडर लेखराजसिंह यांनाच का दिले जाते याबाबत तक्रार केली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी पंडित याने लेखराजसिंह यांना दर महिन्याला ५० हजार रुपयाची खंडणी मागत सुरुवातीला २५ हजाराची मागणी केली होती. या प्रकरणी लेखराजसिंह यांनी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. रविवारी सायंकाळी खंडणीची रक्कम घेऊन पंडित याने लेखराजसिंह यांना एन पाच भागातील अन्नपूर्णा हॉटेलजवळ बोलावले होते. या ठिकाणी दहा हजारांची खंडणी घेताना पंडित याला पथकाने अटक केली. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, एसीपी गुणाजी सावंत, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भरत पाचोळे, नरसिंग पवार, राजेश बनकर, दिनेश बन, प्रकाश डोंगरे, संतोष मुदीराज, स्वप्नील रत्नपारखी, सुरेश भिसे, किशो गाढे आदींनी केली. याप्रकरणी सहायक फौजदार शेकनाथ आघाने पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे शहर उपाध्यक्षपदी राहुल पाटील

$
0
0

औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर उपाध्यक्षपदी राहुल पाटील यांची निवड करण्यात आली. पूर्वाश्रमीचे मनविसेचे पदाधिकारी असलेले राहुल पाटील दोन वर्षांपूर्वी मनसे सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. त्यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. मनसेचे राज्य उपाध्यक्ष जावेद शेख यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी, वैभव मिटकर, बिपीन नाईक, राजीव जावळीकर, अॅड. निनाद खोचे यांची यावेळी उपस्थीती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीच्या साठ्यात २.८७ टक्के वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी धरणात उर्ध्व भागातील निळवंडे, ओझर वेअर आणि नागमठाण धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एकूण ८.९९ टीएमसी पाण्यापैकी ७.४७ टीएमसी पाणी सोडण्यात आले असून जायकवाडीच्या पातळीत २.८७ टक्के वाढ झाली. सध्या धरणात ३२.१४ टक्के पाणीसाठा झाला आहे.

समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणात ८.९९ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. नगर-नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाच दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दारणा धरणातील विसर्ग सोमवारी दुपारी बारा वाजता बंद करण्यात आला. गंगापूर धरणातून सोडलेले पाणी अचानक बंद केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. या प्रकारात अखेर गंगापूर धरणातून पाणी न सोडता हिश्शानुसार दारणा धरणातून सोडण्याचा निर्णय नाशिक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने (कडा) घेतला आहे. त्यानुसार गंगापूर व मुकणे धरणातून सोडण्यात येणारे पाणी दारणातून सोडण्यात आले. नियमानुसार निश्चित केलेले ३.२४ टीएमसी पाणी सोडण्यात आले अशी माहिती 'कडा'च्या सूत्रांनी दिली. निळवंडे धरणातून १२०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. या धरणातून ३.८५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. सोमवारपर्यंत २.३३ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. मुळा धरणाचा विसर्ग बंद करण्यात आला असून एकूण १.९० टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात आले. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून १६१४ आणि नागमठाण धरणातून सहा हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तर ओझर वेअरमधून तीन हजार ८८३ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. जायकवाडी धरणाचा जलसाठा ३२.१४ टक्क्यांवर पोहचला आहे. पाणी सोडल्यानंतर २.८७ टक्के पाणीसाठा वाढला आहे. निळवंडे धरणातून आणखी १.५२ टीएमसी पाणी पोहचणार आहे. या आठवड्याच्या शेवटी पाण्याचा विसर्ग थांबवण्यात येईल. नगर-नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आणि राजकीय हस्तक्षेपानंतर प्रशासकीय पातळीवरील निर्णयाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, जनरेटा लक्षात घेऊन पाणी सोडण्यात आले.

\Bसाडेपाच टीएमसी पाणी \B

उर्ध्व भागातील धरणातून ८.९९ टीएमसी पाणी सोडण्यात आले. पाण्याचा अपव्यय आणि अनधिकृत उपसा लक्षात घेता किमान साडेपाच टीएमसी पाणी जायकवाडीत पोहचण्याची शक्यता आहे. पाण्याचा आढावा घेऊन डावा व उजवा कालव्याद्वारे किती आवर्तने सोडायची याचा निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत कालवा समितीची लवकर बैठक घेतली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी कुठं मुरतं?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको-हडकोसाठी ३२ दशलक्ष लिटर रोज (एमएलडी) पाणी दिले जाते, पण प्रत्यक्षात या भागात २० 'एमएलडी' पाणीच पोचते. १२ 'एमएलडी' पाणी कुठे जाते याचा शोध घेण्यासाठी आपण स्वत: जलकुंभाची पाहणी करणार आहोत, अशी ग्वाही महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाला दिली.

सिडको, हडको भागात विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याबद्दल आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने सोमवारी दुपारी आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी सुमारे एक तास आयुक्तांशी चर्चा केली. या चर्चेची माहिती भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी दिली. ते म्हणाले, 'सिडको-हडको भागासाठी ३२ 'एमएलडी' पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे, पण प्रत्यक्षात २० 'एमएलडी' पाणीपुरवठाच या भागासाठी होतो. १२ 'एमएलडी' पाण्याची गळती होते. हे पाणी नेमके कुठे जाते याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक सल्लागार डॉ. राजेंद्र होलानी यांची मदत घेतली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. येत्या काही दिवसांत डॉ. होलानी नक्षत्रवाडी ते सिडको एन-पाचपर्यंतच्या पाणीपुरवठा योजनेचा अभ्यास करून त्यातील त्रुटींबद्दलची माहिती देतील. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील. दरम्यानच्या काळात आपण स्वत: प्रत्येक जलकुंभांना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करणार आहोत, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

सिडको एन-पाच येथील जलकुंभात ३२ 'एमएलडी' पाणी पडले तर एक दिवसआड पाणीपुरवठा करणे शक्य आहे, असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिले, ही बाब तपासून पाहण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. शहरात १३० किलोमीटर नव्या जलवाहिन्या टाकण्यात आल्याची बाब कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी लक्षात आणून दिली. शहरात येणारे पाणी मर्यादित आहे आणि जास्तीच्या जलवाहिन्या टाकल्यामुळे पाण्याचे वितरण मर्यादेच्या बाहेर केले जात आहे. त्यामुळे पाण्याची समस्या निर्माण होत आहे, असे ते म्हणाले.

शहरात ११५ वॉर्ड आहेत. प्रत्येक वॉर्डाला समान पाणी मिळाले पाहिजे, अशी भूमिका आम्ही मांडली, असे तनवाणी म्हणाले. पाणीपुरवठ्याचे वॉर्ड निहाय वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी देखील केल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळीच्या सणात पाणीपुरवठा विस्कळित होऊ देऊ नका, अशी सूचनाही आयुक्तांना केल्याचे तनवाणी यांनी स्पष्ट केले.

\Bवेळापत्रक जाहीर करणार\B

वॉर्डनिहाय पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पत्रकारांना दिली. किमान वॉर्ड कार्यालयाच्या स्तरावर वेळापत्रक जाहीरपणे लावले जाईल, असे ते म्हणाले. जाहीर केलेल्या वेळापत्रकात काही बद होणार असले, तर अधिकाऱ्यांनी त्याची माहिती संबंधित नगरसेवकाला द्यावी, असे आदेश दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नक्षत्रवाडी ते सिडको एन-पाचदरम्यान पाणीपुरवठ्यात नेमक्या कोणत्या अडचणी येतात हे तांत्रिकदृष्ट्या तपासण्याचे डॉ. राजेंद्र होलानी यांना सांगितले आहे. ते यासंदर्भातील अहवाल २१ नोव्हेंबरपर्यंत देतील. दरम्यानच्या काळात आपण स्वत: जलकुंभांना भेट देवून पाणी पुरवठ्याची स्थिती जाणून घेणार आहोत, असे डॉ. विनायक म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरळीत पाणीपुरवठ्याची सिडकोतील नागरिकांना प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नगरसेवकाने केलेल्या आंदोलनानंतर सिडको-हडको भागातील पाणीपुरवठा सोमवारी सुरळीत झाला, मात्र हा पुरवठा 'गॅप'मधील आहे, असे नागरिकांचे मत आहे. या भागातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा आहे.

सिडको-हडको भागात सहा-सात दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या भागातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. पवननगर वॉर्डात पाणीपुरवठ्यातील खंड वाढतच चालला होता. त्यामुळे या वॉर्डाचे नगरसेवक नितीन चित्ते यांनी रविवारी सिडको एन-पाच येथील जलकुंभाच्या परिसरात ठिय्या आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन पालिकेच्या आजी-माजी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी धावाधाव केली. पाणीपुरवठा सोमवारपासून सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर चित्ते यांनी आंदोलन मागे घेतले.

पालिकेने सोमवारी सिडको-हडको भागात मुबलक पाणीपुरवठा झाल्याची माहिती दिली. नेहमीपेक्षा किमान दहा मिनिटे पाणी जास्त सोडण्यात आले, परंतु सोमवारी करण्यात आलेला पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांतील खंडांमधील होता. महापालिकेने व महावितरणने देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी सात तासांचा शटडाउन घेतले होता. त्यानंतर जलवाहिनी फुटली. त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्याचा मोठा परिणाम सिडको-हडको भागावर झाला. पाणीपुरवठ्यात दोन दिवसांचा खंड या भागात वाढला. सोमवारी झालेला पाणीपुरवठा दोन दिवसांच्या खंडांमधील होता. पालिकेने नियमितपणे तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सिडको-हडको भागात अद्याप नियमित पाणीपुरवठा करण्यात येतनाही. नागरिकांना नियमित पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात मोगली जालना गुन्हे शाखेच्या जाळ्यात

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात घरफोड्या मोगली उर्फ स्वप्नील कुलकर्णी याला जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. जुना जालना परिसरातील एका घरफोडीत चोरलेले रिव्हॉल्वर आणि एकोनीस काडतूस मोगलीकडून जप्त करण्यात आले. ११ सप्टेंबर रोजी हा गुन्हा घडला होता. औरंगाबाद शहर पोलिसांनी मोगलीला गेल्याच महिन्यात अटक करीत अडीच लाखांचा ऐवज जप्त केला होता.

११ सप्टेंबर रोजी सोनल नगर येथील गणेश राधाकिसन भवर या व्यापाऱ्याचे घर चोरट्यांनी फोडले होते. यामध्ये सोन्याच्या दागीन्यासह एक रिवॉल्वर आणि एकोनीस काडतूस चोरट्यानी लंपास केले होते. या गुन्ह्यामध्ये मोगली उर्फ स्वप्नील रमेश कुलकर्णी (वय २१, रा. नागसेननगर, उस्मानपुरा) याचा हात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंग गौर यांना मिळाली होती. मात्र, मोगलीला औरंगाबाद शहर गुन्हे शाखेने ४ ऑक्टोंबर रोजी अटक केली हेाती. मोगली नुकताच हर्सूल कारागृहातून जामीनावर बाहेर पडला होता. त्याच्यासाठी जालना गुन्हे शाखेने सापळा रचलेला होता. शनिवारी मोगलीला अटक करण्यात आली. चौकशीमध्ये त्याने भवर यांच्या घरी केलेल्या घरफोडीची माहिती देत घरी लपवून ठेवलेले रिवॉल्वर आणि काडतूस पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलिस अधिक्षक एस. चैतन्य, अप्पर अधिक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पीएसआय जयसिंग परदेशी, सॅम्युअल कांबळे, समाधान तेलंगे, कृष्णा तंगे, अंबादास साबळे, सचिन चौधरी, विलास चेके आणि ज्योती खरात यांनी केली.

चौकट

शहर पोलिसांनी ठोकले नाही

जालना पोलिसांना मोगलीने रिव्हॉल्वर चोरल्याची माहिती मिळाली. मात्र, त्यापूर्वीच त्याला औरंगाबाद शहर पोलिसांनी अटक केली होती. औरंगाबाद पोलिस त्याच्याकडून गुन्हा उघडकीस आणतील अशी अपेक्षा जालना पोलिसांना होती. मात्र, तसे घडले नाही. जालना पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर चौकशी केली. यावेळी औरंगाबाद पोलिसांनी मारले नाही म्हणून आपण या गुन्ह्याची माहिती लपवली, अशी कबुली मोगलीने जालना गुन्हे शाखेला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यंदा मागणी प्रदूषणमुक्त फटाक्यांना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिवाळी सणाला रविवारपासून सुरुवात झाली आहे. बुधवारी लक्ष्मीपूजनानंतर मोठया प्रमाणावर नागरीकांकडून फटाके उडवण्यात येतात. शहरात विविध ठिकाणी फटाक्याचे मार्केट थाटण्यात आले आहे. यंदा ग्राहकांकडून प्रदृषण मुक्त व कमी आवाजाच्या फटाक्यांची मागणी करण्यात येत असून मोठ्या आवाजाच्या फटाक्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.

शहरात अयोध्यानगरी, बीड बायपास, कलाग्राम, टिव्ही सेंटर आदी ठिकाणी फटाक्यांची दुकाने थाटण्यात आली आहे. शहरात दरवर्षी शिवकाशी, जळगाव आणि अहमदनगर वरून फटाक्यांचा माल मागवण्यात येतो. सोमवारी सायंकाळपर्यंत या सर्व मार्केटमध्ये ३२ ट्रकचा माल विक्रेत्यांकडून मागवण्यात आला होता. यामध्ये कॉक, स्टँडर्ड, इंद्रा आदी महत्वाच्या कंपन्यांच्या फटाक्यांच्या मालाचा समावेश आहे.

फॅन्सी, कमी आवाजाच्या फटाक्यावर भर

ग्रीन म्हणजे प्रदूषण कमी होणारे फटाके वाजवण्यात यावे असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. या आदेशानुसारच ग्राहकांचा कल देखील यावेळी कमी आवाजाच्या फटाक्यांवर दिसून येत आहे. यामध्ये फॅन्सी फटाक्यांचा समावेश आहे. बच्चे कंपनीकडून रंगीत सुरसुरी, जमीनचक्र, अनार, सेव्हन शॉट यासह आकाशात उडणाऱ्या फटाक्यांची मागणी होताना दिसत असल्याचे व्यापारी गणेश दायमा यांनी सांगितले.

सोमवारपासून गर्दी होण्याची शक्यता

बुधवारी लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. लक्ष्मी पूजनानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर फटाके उडवण्यात येतात. मंगळवारी नरक चतुदर्शी आहे. या दिवशी देखील पहाटे अभ्यंगस्नानानंतर फटाके उडवण्याची परंपरा आहे. त्यामुळे सोमवारी सायंकाळपासून फटाका मार्केटमध्ये गर्दी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

किंमतीत वाढ

यंदाच्या वर्षी जीएसटीचा फटका फटाका व्यापाऱ्यांना देखील बसणार आहे. यामुळे फटाक्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षापूर्वी चायनीज फटाक्यांनी मार्केटमध्ये स्थान पटकावले होते, यावर्षी मात्र चायना मेड फटाक्यांची आवक झाली नसल्याचे व्यापारी गणेश काथार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघड्या ‘डीपी’ला बसविला सरंक्षक बॉक्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वातंत्र्यसैनिक कॉलनीतील मोकळ्या मैदानातील विद्युत 'डीपी' गेल्या अनेक महिन्यांपासून उघडी होती; तसेच या मैदानातील त्रिकोणी विद्युत दिवेही सैल झाल्याने धोकादायक बनले होते. यासंदर्भात 'महाराष्ट्र टाइम्स'ने सोमवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तात्काळ दखल घेत सोमवारी महापालिका व महावितरणने विद्युत डीपीला सरंक्षण बॉक्स बसवण्यात आला; तसेच पुलावरील लाइटची देखील दुरुस्ती केली.

स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील सभागृहाजवळ लहान मुलांना खेळण्यासाठी मोकळे मैदान आहे. या मैदानाजवळ विद्युत 'डीपी' आहे. या 'डीपी'चे झाकण तुटल्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून ही 'डीपी' उघडी पडली होती. या 'डीपी'ला हात लागून लहान मुलांसोबत दुर्घटना होण्याची शक्यता नाकारत येत नव्हती. त्याचप्रमाणे याच मैदानात विद्युत पोल उभारण्यात आला आहे. या पोलवर त्रिकोणी दिवे बसवण्यात आले आहेत, मात्र या दिव्यांची फिटिंग सैल झाली होती. वारा सुटल्यावर हे दिवे गोलाकार फिरत होते. हे दिवे खाली कोसळण्याची देखील शक्यता होती. याबाबत 'मटा'ने सोमवारच्या अंकात सचित्र वृत्त प्रसिद्ध केले. त्याची महावितरण आणि महापालिकेने घेतली. सोमवारी दुपारीच कर्मचारी पाठवून 'डीपी'ला सरंक्षक बॉक्स बसवण्यात आला; तसेच विद्युत खांबावरील दिव्यांची फिटिंग व्यवस्थित करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी कार्यालये आठवडाभर बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिवाळी सणानिमित्त मंगळवारपासून रविवारपर्यंत, असे सहा दिवस सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. केवळ महसूल आणि कृषी विभाग तसेच दुष्काळाशी संबंधित असलेल्या सर्व विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मात्र सहा नोव्हेंबर रोजी कार्यालयात हजर रहावे लागणार आहे.

यंदा जिल्हाधिकारी कार्यालयाने नरक चतुदर्शच्या दिवशीची स्थानिक सुटी जाहीर केली होती. मात्र मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही सुटी रद्द करण्यात आली. त्यामुळे सहा रोजी महसूल तसेच कृषी विभागाचे कामकाज सुरू राहणार आहे. यानंतर मात्र सात रोजी लक्ष्मीपूजन, आठ रोजी दीपावली पाडव्यानिमित्त सुटी आहे. नऊ नोव्हेंबर रोजी भाऊबिजेसाठी शासनाने सुटी जाहीर केली आहे, दहा नोव्हेंबरला दुसरा शनिवार आल्याने व ११ रोजी रविवारची साप्‍ताहिक सुटी आहे. त्यामुळे अख्खा आठवडा सुटी व दिवाळीच्या आनंदात घालवण्याचे नियोजन सरकारी कर्मचाऱ्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ब्रह्मविद्येचा खजिना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मराठीत ब्रह्मविद्येचा सुकाळ होण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर भाष्य करून ब्रह्मज्ञानाचा सुकाळ केला आहे,' असे प्रतिपादन संत साहित्य व वेदांत तत्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. प्रमोद कुमावत यांनी ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गात बोलताना केले.

चैतन्यसाधना अॅड रिसर्च फाउंडेशनच्यावतीने पाच ते नऊ नोव्हेंबर दरम्यान सकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यास वर्गाचे उद्घाटन सोमवारी डॉ. कुमावत यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथपूजनाने करण्यात आली. याप्रसंगी बोलताना डॉ. कुमावत यांनी ज्ञानेश्वरीतील नववा अध्याय राजविद्या राजगुह्य हा आहे. या अध्यायामध्ये सर्व विद्येत श्रेष्ठ असणारी ब्रह्मविद्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक दृष्टांताच्या माध्यमातून विशद केल्याचे नमूद केले. या अध्यायामध्ये एकूण ३४ श्लोक असून ५३५ ओव्यांद्वारे माउलींनी प्रतिपादन केले आहे, म्हणून हा अध्याय भक्तीयोगातील सर्वश्रेष्ठ अध्याय आहे. या अध्यायाचा अभ्यास केल्याने भक्तीचे गुह्य लक्षात येऊन भक्तीची परमोच्च अवस्था गाठता येते असे त्यांनी सांगितले.

ह.भ.प. रामभाऊ महाराज सारडा, नवनाथ महाराज आंधळे, रामकृष्ण महाराज कुमावत, दत्तात्रय पदे, ह.भ.प.रामभाऊ महाराज सारडा, नवनाथ महाराज आंधळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन जयश्री किनारीवाल यांनी केले, तर मंजिरी मुळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनामुळेच पाणीबाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळेच शहराच्या पाणी पुरवठा व्यवस्थेत आणीबाणी निर्माण झाली आहे, असा आरोप नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी 'मटा' राउंड टेबलमध्ये केला. सध्याची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी विशेषाधिकारी नियुक्त केला जाईल, अशी घोषणा महापौर नंदकुमार घोडेले यांनी यावेळी केली.

जायकवाडी धरणात मुबलक पाणी असताना औरंगाबाद शहरात मात्र पाणी पुरवठ्यात अभूतपूर्व समस्या निर्माण झाल्या आहेत. काही भागात तीन दिवसांआड, तर काही भागात सात-आठ दिवसांच्या नंतरही पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांच्या रोषामुळे नगरसेवकही आक्रमक झाले आहेत. पाणी पुरवठ्यात सुसूत्रता येण्याच्या दृष्टीने काय करता येईल यावर साधकबाधक चर्चा होऊन मार्ग निघण्याच्या उद्देशाने 'मटा' तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राउंड टेबलमध्ये महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर भगवान घडमोडे, माजी सभापती व विद्यामान नगरसेवक राजू शिंदे, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, अजीम खान, 'एमआयएम'चे गटनेते नासेर सिद्दिकी, माजी नगरसेवक समीर राजूरकर, रवी कावडे, लायन्स क्लबचे शेख अहेमद, कामगार नेते कृष्णा बनकर, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता किरण धांडे सहभागी झाले होते.

शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी समांतर जलवाहिनीचे काम झाले पाहिजे. हे काम कोणत्याही एजन्सीच्या मार्फत करा, पण लवकर काम झाले पाहिजे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे शहरात सध्या पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे, अशा भावनाही व्यक्त झाल्या. यातून मार्ग काढण्यासाठी ठोस उपाययोजना केली पाहिजे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

सध्या निर्माण झालेल्या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नक्षत्रवाडी ते सिडको एन ५ पर्यंतच्या वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी व त्यात सुधारणा करण्यासाठी विशेष अधिकारी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युडी) नियुक्त केला जाणार आहे, अशी माहिती महापौरांनी दिली. पाणी पुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी महापालिकेने डॉ. राजेंद्र होलानी यांना तज्ज्ञ म्हणून नियुक्त केले आहे. त्यांना नक्षत्रवाडी पासून औरंगाबाद शहरापर्यंत पाणी पुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी तत्काळ काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. नक्षत्रवाडीपर्यंत १२५ एमएलडी पाणी येते, मग पुढे या पाण्याचे काय होते, पाणी कुठे जाते हे डॉ. होलानी तपासतील, त्यानंतर आवश्यक त्या उपययोजना केल्या जातील, असे महापौरांनी स्पष्ट केले.

\Bउद्योगमंत्र्यांना गळ घालणार\B

एमआयडीसीचे पाच एमएलडी पाणी मिळावे यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना गळ घालणार असल्याचे महापौर म्हणाले. एमआयडीसीकडून मिळणारे सर्वच्या सर्व पाणी सिडकोसाठी वापरण्याचे नियोजन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

\B(सविस्तर वृत्त उद्याच्या अंकात) \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचित बहुजन आघाडीला ‘रिपाइं’चे आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वंचित बहुजन आघाडीने उभ्या केलेल्या राजकीय आव्हानाचा सामना करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया औरंगाबाद शहरात लवकरच जाहीर मेळावा घेणार आहे. आघाडीच्या मेळाव्याला लक्षणीय प्रतिसाद मिळाल्यानंतर आंबेडकरी पक्ष नवे राजकीय समीकरण मांडत आहेत. 'रिपाइं'चे रामदास आठवले यांच्या नियोजित मेळाव्याच्या प्रतिसादावर युती-आघाडीचे भवितव्य निश्चित होणार आहे.

भीमा कोरेगाव दंगलीनंतर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर राजकीय वर्तुळात केंद्रबिंदू ठरले आहेत. महाराष्ट्र बंद यशस्वी करून दाखवत भारिपने आंबेडकरी अनुयायांचा जनाधार मिळवला. हा प्रतिसाद इतर पक्षांसाठी गैरसोयीचा ठरला आहे. 'रिपाइं'चे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनासुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या वाटचालीने विचार करण्यास भाग पाडले. तिसऱ्या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेस्टिव्हलमध्ये आठवले यांच्या भाषणात त्याची प्रचिती आली. आठवले व समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले भाजपच्या गोटात असल्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी फेस्टिव्हलकडे अक्षरश: पाठ फिरवली. रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण करण्याची नामुष्की ओढवल्याने आठवले यांनी त्याच मैदानावर जाहीर मेळावा घेऊन लाखोंची गर्दी जमवण्याची घोषणा केली. मोदी यांच्यासोबत असलो तरी भाजपमध्ये जाणार नाही असे सांगत त्यांनी भारिप नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका केली. 'इथं ज्यांना मेळावा घ्यायचा असेल तर घेऊ द्या. मलासुद्धा मेळावा घेऊ द्या. तुम्ही तिकडे का गेलात, असे विचारून माझ्यावर टीका करता. तुम्ही इकडे राहिले म्हणून तिकडे गेलो. मी दररोज ४०० ते ५०० लोकांना भेटतो. तुम्ही विचारवंत आहात. मी फिल्ड वर्कर आहे' अशी उपरोधिक टीका आठवले यांनी केली. भीमा कोरेगाव दंगलीनंतर पुकारलेल्या बंदमध्ये 'रिपाइं' पक्ष आघाडीवर होता. ८० टक्के कार्यकर्ते तुरुंगात होते. मंत्री असल्यामुळे मला बंद पुकारता आला नाही, असा खुलासा आठवले यांनी केला. भीमा कोरेगाव दंगलीची धग कायम असल्यामुळे आठवले यांना सारवासारव करावी लागली. शिवसेना-भाजप युतीतील आंबेडकरी नेत्यांची भूमिका गुलदस्त्यात राहिल्यामुळे अनुयायी नाराज आहेत. त्याचा थेट परिणाम जाहीर सभेकडे पाठ फिरवण्यापर्यंत झाला आहे. नवीन पर्याय ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीला आंबेडकरी जनतेने प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आठवले नवीन राजकीय आडाखे जुळवून कुणाचा राजकीय फायदा करतात याची उत्सुकता वाढली आहे.

\Bभीमा कोरेगावची धग\B

भीमा कोरेगाव दंगलीबाबत ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे रिपाइंचे रामदास आठवले यांना काही ठिकाणी रोषाला सामोरे जावे लागले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापनदिनी १४ जानेवारीला संतप्त जनतेने आठवले यांना भाषण करू दिले नव्हते. तर रविवारी इंटरनॅशनल बुद्ध फेस्टिव्हलकडेही अनुयायांनी पाठ फिरवली. त्यामुळे नाराज अनुयायांचा प्रतिसाद पुन्हा मिळवण्यासाठी आठवले मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याला प्रतिसाद मिळाला तरच राजकीय मांडणी करणे शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सणासुदीतील रेशनचे ‘अच्छे दिन’ इतिहासजमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गोर-गरिब सर्वसामान्य जनतेची पोटाची खळगी भरण्यासाठी आधार असलेल्या रेशन दुकानातील वस्तुंची यादी दिवसेंदिवस कमी होत आहे. दशकापूर्वी गरिबांना दिवाळी साजरी करण्यासाठी रेशन दुकानांमधून साखर, गहू, तांदळासोबत रवा, मैदा, पामतेल व डाळी देण्यात येत होत्या. आता हा इतिहास झाला असून सध्या गहू, साखर, तांदूळही वेळेवर मिळत नसल्याने सण साजरा करण्यासाठी बाजारातून वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत.

गोर-गरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शासनाकडून कार्डधारकांना रवा, मैदा, हरभरा डाळ, तूर डाळ, पामतेल, डालडा आदी वस्तू आवर्जून देण्यात येत होत्या. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून रवा व मैदा तसेच २००९ पासून हरभरा डाळ, तूरडाळ देणे बंद झाले. त्यापाठोपाठ काही वर्षांपासून रेशन दुकानांमध्ये मिळणारे पामतेल ठेवण्यात येत नाही. त्यामुळे गोर-गरिबांना दिवाळी साजरी करण्यासाठी बाजारातून अन्नधान्य विकत घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. शासकीय धोरणात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे रेशन दुकानांतून गरिबांना दिल्या जाणाऱ्या वस्तूंच्या संख्येत घट झाली आहे. आता रेशन दुकानांत केवळ गहू, तांदूळ, साखर आणि रॉकेलचे वितरण केले जाते. विविध योजनांच्या माध्यमातून वाटप करण्यात येणाऱ्या धान्याबाबत शहरी तसेच ग्रामीण भागातील कार्डधारकांच्या नेहमीच तक्रारी असतात. रेशन दुकानांवर काही वर्षांपूर्वी सणासुदीला मिळत असलेले रवा, मैदा, डाळी तसेच पामतेल पुन्हा सुरू करण्यात यावे या मागणीसाठी राज्यात काही ठिकाणी आंदोलनही करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाच मेअरफेलोंची ‘स्मार्टसिटी’साठी निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने सोळा मेअरफेलोंची निवड केली आहे. याच धर्तीवर स्मार्टसिटी मिशनसाठी पाच मेअरफेलोची निवड केली जाणार आहे. या मेअरफेलोंसाठी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी 'औरंगाबाद फर्स्ट' या संस्थेला केले आहे. मेअरफेलोची संकल्पना आयुक्त डॉ. विनायक यांची आहे. विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेवून त्यातून सोळा मेअरफेलो निवडण्यात आले. त्यांच्या नियुक्तीला दोन महिने झाले. दोन महिन्यात त्यांचे काम समाधानकारक असल्याचे लक्षात आले. त्यामुळे स्मार्टसिटी मिशनसाठी आणखीन पाच फेलोंसाठी 'औरंगाबाद फर्स्ट' संस्थेने मदत करावी, असे आयुक्तांनी म्हटले आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर या संदर्भात आयुक्तांनी चर्चा केली आहे.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिह्यातील अॅट्रॉसिटी गुन्ह्यांचा आढावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाखाली (ॲट्रॉसिटी) दाखल गुन्ह्यांचा तपास, कायदेशीर प्रक्रियेबाबत निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवाजी शेळके, अशासकीय सदस्य उत्तमराव गुडेकर, मनोज भारस्कर, चंद्रकांत जाधव, प्रदीप जाधव, शासकीय सदस्य सहाय्यक पोलिस निरीक्षक (गुन्हे शाखा) एस. एम. भुजंग, एस. डी. पठाण यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. घडलेल्या गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंतच्या दाखल गुन्ह्यांचा तपशील जाधवर यांनी माहित करून घेतला. तसेच या प्रकरणांवर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ व सुधारित अधिनियम १९९५ अंतर्गत १ ते ३१ ऑक्टोबर या महिन्यात शहरात एक, ग्रामीण भागात चार, अशा एकूण पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असल्याचे शेळके यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नारेगावात भंगार गोदामांना लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नारेगाव भागात सोमवारी सायंकाळी भंगार सामानांच्या चार गोदामांना भीषण आग लागली. या आगीत फोम, रद्दी, गोण्या व पुठ्ठ्याचा माल जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. तीन तासानंतर ही आग आटोक्यात आली. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

नारेगाव भागात साबेर भाई यांच्यासह इतर दोघांची पत्र्याची गोदामे आहेत. या गोदामामध्ये भंगार साहित्याचा माल ठेवण्यात येतो. सायंकाळी यापैकी एका गोदामाला सुरुवातीला आग लागली. काही वेळाने हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. काही वेळाने शेजारी असलेल्या इतर तीन गोदामांना देखील आगीने विळख्यात घेतले. अग्नीशमन दलाला ही माहिती कळाल्यानंतर आगीच्या चार बंबानी पाण्याच्या टँकरसहित धाव घेतली. बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केल्याने आग विझवण्यामध्ये अडचण निर्माण झाली होती. शेंद्रा एमआयडीसीची फोमविरोधी बंब देखील आग विझवण्यासाठी मागवण्यात आला होता. तीन तासानंतर ही आग आटोक्यात आली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन दिवाळीत रेल्वे लेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वेचे नियोजन नसल्याचा फटका ऐन दिवाळीत रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागत आहे. नंदीग्राम व देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर दोन ते अडीच तास ताटकळावे लागले. ऐन दिवाळीत रेल्वे उशिरा धावत असल्याने अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

नागपूरहून मुंबईकडे जाणारी नंदीग्राम एक्स्प्रेस ही औरंगाबादला रात्री साडेनऊच्या सुमारास येते. त्यातून औरंगाबाद ते मुंबई आणि लासूर, रोटेगाव, मनमाड येथे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या असते. ही रेल्वे पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर वेळेवर आलेल्या प्रवाशांना रेल्वेही उशिरा धावत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. ही रेल्वे नांदेड जवळील मुगट येथे सध्या थांबली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुगट येथे पॉइंटमध्ये बिघाड झाल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. नंदीग्राम पाठोपाठ देवगिरी एक्स्प्रेसलाही चांगलाच उशिरा झाला. ही रेल्वे नियोजित रात्री ११ या वेळेऐवजी मध्यरात्री एकच्या दरम्यान येणार असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले.

……………

\Bमुंबई ते औरंगाबाद १६ तासांचा प्रवास \B

दादर ते जालना जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी अडीच वाजता दादरहून निघते. मात्र रविवारी इगतपुरी येथे रेल्वे लाइनचे काम सुरू असल्याने ती रविवारी रात्री साडे आठ वाजता येण्याऐवजी १६ तासांनंतर सोमवारी सकाळी सात ७ वाजता औरंगाबादला पोहोचली. मुंबईकडे जाणारी जनशताब्दी नियोजित वेळी गेल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिग्मी एजंटला तीन दिवसांची कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नागनाथ अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटीची पाच लाख ४० हजार ८८४ रुपयांची फसवणूक करणारा आरोपी पिग्मी एजंट राजेश जिजाराव गाडेकर (वय २४, रा. शेंद्रा, ता. जि. औरंगाबाद) याला आठ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी सोमवारी दिले. गुन्ह्यात यापूर्वी पोलिसांनी आरोपी पिग्मी एजंट सोपान सूर्यभान श्रीखंडे याला अटक केली होती.

प्रकरणात नागनाथ अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटीचे मॅनेजर दत्तू आण्णाराव कोठाळे (वय ३५) यांनी तक्रार दिली. तक्रारीत, नागनाथ अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेत खातेदारांकडून दररोज ठराविक रक्कम (पिग्मी) बचत म्हणून जमा करण्यात येते. ही बचत रक्कम जमा करण्यासाठी पतसंस्थेने आरोपी राजेश गाडेकर व सोपान श्रीखंडे या दोघांची एजंट म्हणून नियुक्ती केली होती. राजेश गाडेकर हा मागील दोन वर्षांत ८२ खातेदाराकडून दररोज ठराविक रक्कम जमा करत होता. मात्र त्याने पतसंस्थेत काहीच रक्कम जमा केली. उर्वरित तीन लाख १४ हजार ७४६ रुपये स्वत:कडे ठेवून घेतले. तसेच आरोपी सोपान श्रीखंडे याने देखील खातेधारकांकडून रक्कम जमा करून ते पतसंस्थेत न भरता पतसंस्थेची फसवणूक केली. खातेदार पैसे काढण्यासाठी बँकेत आल्यानंतर ही बाब समोर आली. या प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी आरोपी राजेश गाडेकर याला रविवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता आरोपीने पतसंस्थेची फसवणूक करून केलेल्या अपहाराची रक्कम जप्त करणे आहे. आरोपीने ती रक्कम कोठे खर्च केली याचा तपास करणे आहे. आरोपीने अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का याचा तपास करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील आमेर काजी यांनी न्यायालयाकडे केली. ही विनंती कोर्टाने मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>