Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘दयाशंकर की डायरी’तून प्रभूला श्रद्धांजली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नाटकाच्या प्रयोगाद्वारे आपल्या नाट्य कलावंत असलेल्या संतोष नवरखेले उर्फ प्रभू या मित्राला नाट्यशास्त्राचे विद्यार्थी आदरांजली वाहणार आहेत. १४ नोव्हेंबर रोजी त्यासाठी 'दयाशंकर कि डायरी' या हा नाट्यप्रयोग विनामूल्य सादर केला जाणार आहे.

संतोष नवरखेले या नाट्य कलावंताचे १७ ऑक्टोबर रोजी मुंबईत नाटकाची तालिम संपवून लोकलने परतत असताना अपघाती निधन झाले होते. अत्यंत मनमिळावू, हसतमुख आणि दर्जेदार नाट्य कलावंत असलेल्या प्रभूचा मृत्यू नाट्य कलावंतांना चटका लाऊन गेला. निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड या छोट्याशा गावातून अभिनेता होण्यासाठी आलेल्या संतोषने विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात अभिनयाचे धड गिरविले होते. मुंबईत व्यावसायिक रंगभूमीवर नशीब आजमावण्यासाठी गेला होता.

संतोषच्या मृत्यूसमयी त्याच्याजवळ 'दयाशंकर की डायरी' या नाटकाची संहिता होती. त्यामुळे त्याच्या मित्रांनी याच दीर्घांकाचा प्रयोग करून त्याला श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता तापडिया नाट्यमंदिरात हा प्रयोग होईल. नादिरा बब्बर लिखित व सय्यद अल्ताफ दिग्दर्शित या नाट्यप्रयोगात रमाकांत भालेराव आणि प्रेरणा खरात यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विनोद आघाव, वाल्मिक जाधव, अनिल मोरे, योगेश म्हेत्रजकर, अनिल बडे, राजेश आगुंडे हे कलावंत संगीत, नेपथ्य, प्रकाशयोजनेची बाजू सांभाळणार आहेत. प्रा. डॉ. राजू सोनवणे यांचे मार्गदर्शन या कलावंतांना मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्हीव्हीपॅटची आज प्रथमस्तरीय तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या व्हीव्हीपॅट यंत्रणेची प्रथमस्तरीय तपासणी मंगळवारी करण्यात येणार आहे. या तपासणीला सकाळी दहा पासून शासकीय कला महाविद्यालय, किलेअर्क येथे सुरुवात होत आहे. औरंगाबादला ३३३९ व्हीव्हीपॅट मशीन पाठवल्या आहेत. तपासणीसाटी इव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशीन जोडावे लागणार आहे. यापूर्वी ३३३९ कंट्रोल युनिट, ५५३२ बॅलेट युनिटची तपासणी करण्यात आली आहे. व्हीव्हीपॅटच्या प्राथमिक तपासणीवेळी, तसेच ईव्हीएम मशीनची योग्यता व सचोटी, मॉकपोलबद्दल खात्री करता यावी यासाठी राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीपीआर’ ३०० कोटींचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा, देवळाई परिसरांत ड्रेनेज लाइन आणि जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) सुमारे ३०० कोटी रुपयांचा होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात 'डीपीआर' शासनाला सादर केला जाणार आहे.

सातारा, देवळाई परिसराचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर या संपूर्ण परिसरात आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी महापालिकेतर्फे खासगी संस्थेच्या माध्यमातून 'डीपीआर' तयार केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; 'डीपीआर' तयार करण्याचे काम डिसेंबरच्या मध्यापर्यंत पूर्ण होईल. सातारा, देवळाई भागांत जलवाहिन्या आणि ड्रेनेज लाइन टाकण्याच्या कामाचे सर्वेक्षण ड्रोन कॅमेऱ्याद्वारे करण्यात आले. यश इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स या संस्थेला हे काम देण्यात आले होते. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून १८० मीटर उंचीवरून फोटो घेण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्यात सलग १५ दिवस हे सर्वेक्षण करण्यात आले. त्याचबरोबर या परिसराचा सॅटेलाइट इमेज घेण्यात आल्या. त्यांच्यावर सॉफ्टवेअर प्रोसेसिंगचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. येत्या १५ दिवसांत सॉफ्टवेअर प्रोसेसिंगचे काम पूर्ण होऊन आवश्यक ती छायाचित्र यश इनोव्हेटिव्ह या संस्थेच्या ताब्यात मिळण्याची शक्यता आहे. छायाचित्र ताब्यात मिळाल्यावर त्याच्या आधारे 'डीपीआर' तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हे काम संपेल आणि जानेवारी महिन्यात 'डीपीआर' शासनाला सादर केला जाऊ शकेल.

हा 'डीपीआर'सुमारे २५० ते ३०० कोटींचा असण्याची शक्यता आहे. महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या नवीन वसाहतींमध्ये पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यासाठी शासनातर्फे महापालिकांना विशेष अनुदान दिले जाते. 'डीपीआर'च्या माध्यमातून सातारा, देवळाईसाठी शासनाकडून अनुदान मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, सातारा, देवळाई परिसरात एक हजार पथदिवे लावण्याचे काम पालिकेतर्फे केले जाणार आहे. पथदिवे लावण्याच्या कामाच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ दिवाळीच्या मुहूर्तावर खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले देखील उपस्थित होते. सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत ५०० पथदिवे सातारा भागात लावण्याचे काम सुरू केले जाणार आहे. सिडको प्रशासनाकडून मिळालेल्या साडेआठ कोटींच्या निधीतून पाच प्रमुख रस्त्यांची कामे सातारा, देवळाई परिसरात महापालिकेतर्फे सुरू करण्यात आली आहेत. बीड बायपासला मिळणाऱ्या प्रमुख रस्त्यांचा यात समावेश आहे.

\Bविकास आराखडा गुलदस्त्यात

\Bसातारा, देवळाई ही गावे सिडकोच्या झालर क्षेत्रातील आहेत. सिडकोने झालर क्षेत्रातील २८ गावांचा विकास आराखडा (डीपी) तयार केला. त्यात सातारा, देवळाई या गावांचाही समावेश होता. या दोन्ही गावांचा औरंगाबाद महापालिकेत समावेश झाल्यामुळे सिडकोने सातारा, देवळाई यांचा आराखडा महापालिकेकडे सुपूर्द केला. त्या आराखड्याबाबत महापालिकेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. या परिसरातील रस्त्यांची कामे महापालिकेने सुरू केली आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचेच मजबुतीकरण, डांबरीकरण करण्यात येत आहे. विकास आराखड्यात दर्शविलेल्या रुंदीनुसार रस्त्यांची कामे करण्यात येत नाहीत. रस्त्यांलगत भविष्यात मोठी बांधकामे झाल्यास रुंदीकरण करणे अवघड जाणार आहे. त्यामुळे महापालिकेने सातारा, देवळाई गावे व परिसराच्या विकास आराखड्यावर तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'हिटलरशाही नही चलेगी', 'गली गली में शोर है, चौकीदार चोर है', 'नोटबंदीमुळे देशात आली मंदी', यासह भाजप विरोधात जोरदार घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन केले.

केंद्रातील मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेऊन नऊ नोहेंबरला दोन वर्षे उलटली आहेत. या नोटबंदीमुळे देशात मंदी आली. देशाच्या प्रगतीला अडथळा निर्माण झाला, असा आरोप करत या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसने क्रांतीचौकात जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.

यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नोटबंदीच्या निर्णयाचा विरोध करण्यात आला. शहराध्यक्ष माजी आमदार नामदेव पवार, नितीन पाटील, जगन्नाथ काळे, किरण पाटील डोणगावकर, महापालिकेतील गटनेते भाऊसाहेब जगताप, डॉ. पवन डोणगावकर, नगरसेवक सोहेल शेख, नवीद शेख, रवींद्र काळे, मिलिंद पाटील, जीतसिंह करकोटक यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

प्रतीक्षा जिल्हाध्यक्षांची

आंदोलनाची नियोजित वेळ दुपारी दोनची होती. त्याआधीच बऱ्यापैकी कार्यकर्ते जमले होते, परंतु जिल्हाध्यक्ष नियोजित वेळेत न आल्याने कार्यकर्त्यांना प्रतीक्षा करावी लागली. जास्त वेळ झाल्याने अखेर कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. त्याचवेळी जिल्हाध्यक्षांचे आंदोलनस्थळी आगमन झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खदानी बंद करण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

खंडाळा, कोल्ही व जानेफळ शिवारात सुरू असलेल्या दगड उत्खननामुळे पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक होत असून, ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या अमोनिया व धुळीमुळे कोल्ही तलावातील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे या परिसरातील खदानींचे परवाने त्वरित रद्द करून त्या बंद करण्यात याव्यात. अन्यथा १९ नोव्हेंबर रोजी स्टोन क्रशर विरोधी शेतकरी समितीतर्फे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली वैजापूर तहसील कार्यालयापासून खंडाळा येथे धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके पाटील, बाळासाहेब मगर, बाळासाहेब गोरे, विलास पवार, बाळासाहेब शिंदू, भीमराव बागुल, संतोष जाधव, बबन शिंदे, रवींद्र सूर्यवंशी, आप्पासाहेब मगर, रंजित सूर्यवंशी, ज्ञानेवर भागवत यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी उपविभागिय अधिकारी डॉ. संदीपान सानप व तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. यापूर्वी सोपान सूर्यवंशी व इतर २० शेतकऱ्यांनी जानेफळ ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व तहसीलदारांना खंडाळा परिसरातील खदानी, दगड उत्खनन बंद करण्याबाबत निवेदन दिले होते. त्याला अखिल भारतीय समता परिषदेनेसुद्धा पाठिंबा दिला होता.

खंडाळा या साधारणपणे १८ हजार लोकसंख्या असलेल्या गावच्या उत्तरेस व जानेफळ, कोल्ही शिवारात मागील २५ वर्षांपासून दगडाच्या खदानी सुरू असून, येथे नियम पायदळी तुडवून उत्खनन होत आहे. शिवाय ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या अमोनियामुळे तलावतील पाणी दूषित होत असून, परिसरतील नागरिकांना दमासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. दगड उत्खननामुळे या परिसरात २५० ते ३०० फूट खोल खड्डे झाले असून मानवासहित प्राणीमात्रांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या खदानी त्वरित बंद करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सध्या सहारा इफ्रा कंपनीला प्रशासनाने जानेफळ शिवारातील गट क्रमांक ३६मध्ये दगड उत्खनन व वाळू प्लांट उभारण्यासाठी परवानगी दिली आहे.

खदानींमुळ‌े निर्माण झालेल्या प्रश्नांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. विद्यमान आमदारांनी यात लक्ष घातल्यास क्रशरला सील लागू शकते. प्रहार सैनिक न्याय हक्कासाठी लढायला तयार आहेत,

- ज्ञानेश्वर घोडके, तालुकाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नॅक’च्या सूचनेवर प्रशासनाची बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 'नॅक' मूल्यांकनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महत्त्वाची बैठक घेतली. 'एसएसआर' सादर केल्यानंतर 'नॅक'ने काही त्रुटी काढल्या आहेत. या त्रुटींची पूर्तता करणे आणि आवश्यक कागदपत्रे तयार करण्याबाबत बैठकीत सूचना करण्यात आली.

विद्यापीठात 'नॅक' मूल्यांकनाची जोरदार तयारी सुरू आहे. मागील महिन्यात प्रशासनाने 'एसएसआर' सादर केला आहे. या अहवालानुसार 'नॅक'ने कागदपत्रे पडताळणी सुरू केली आहे. वेगवेगळ्या २६ त्रुटी 'नॅक'ने दाखवल्या असून विद्यापीठ प्रशासनाला त्यांची पूर्तता करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ. साधना पांडे आणि 'नॅक'चे समन्वयक डॉ. एम. डी. शिरसाट यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि प्राध्यापक उपस्थित होते. नवीन नियमानुसार 'नॅक'चे ७५ टक्के मूल्यांकन ऑनलाइन, तर २५ टक्के मूल्यांकन प्रत्यक्ष भेटीत केले जाणार आहे. 'नॅक'ने एकूण २६ विषयांबाबत अतिरिक्त माहिती मागवली आहे. रिफ्रेशर कोर्स, स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांची यादी, नेट-सेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी आदींचा त्यात समावेश आहे. प्रशासनाने दोन दिवसांत ही माहिती सादर करण्याचा निर्णय घेतला. तसेच पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनची तयारी, संचिका निर्मिती आणि इतर तांत्रिक कामे त्वरित पूर्ण करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 'नॅक' समिती मूल्यांकनासाठी दाखल होण्याची शक्यता आहे.

\Bप्राध्यापकांच्या सुट्या रद्द\B

'नॅक' मूल्यांकन पू्र्वतयारीच्या पार्श्वभूमीवर प्राध्यापकांच्या दिवाळीच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या २० नोव्हेंबरपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली होती. मात्र, सुटी रद्द करून १२ नोव्हेंबरला रूजू होण्याची सूचना प्रशासनाने दिवाळीपूर्वी केली होती. त्यानुसार प्राध्यापक रूजू झाले. प्राध्यापकांना 'नॅक'नंतर सुट्या देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफआरपी’च्या प्रश्नावर ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद विभागातील सर्वच साखर कारखान्यांनी एकरकमी 'एफआरपी' (फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस), २०० रुपये आणि एफआरपीची मागील वर्षाची थकबाकी देण्यास भाग पाडावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (१२ नोव्हेंबर) साखर सहसंचालकांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली.

यावेळी प्रादेशिक साखर सहसंचालकांना निवेदन देण्यात आले. कोल्हापूर, सातारा, सांगली पॅटर्नप्रमाणे औरंगाबाद विभागातील सर्व साखर कारखान्यांना 'एफआरपी'ची रक्कम एकरकमी द्यावी. साखरेचे भाव वाढल्यास प्रतिटन २०० रुपये देण्यास भाग पाडावे. गेल्या काही वर्षांतील थकित एफआरपीची रक्कम देण्यात यावी. काही साखर कारखान्यांनी साखर आयुक्त कार्यालयाची दिशाभूल करून शेतकऱ्यांना मागील वर्षाची एफआरपीची रक्कम दिल्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात मात्र एफआरपीची रक्कम मिळालेला नाही. अशा कारखान्यांची चौकशी करून दोषी कारखान्यांवर कारवाई करावी आमि बाकी आसलेली रक्कम देण्यास भाग पाडावे. काही कारखान्यांन गाळप परवाना न घेता गाळप सुरू केले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या संघटनेने या निवेदनाद्वारे केल्या आहेत.

औरंगाबाद विभागातील काही कारखान्यांनी मागील वर्षाची एफआरपीची रक्कम दिलेली नाही. ती त्यांना व्यासासह देण्यास भाग पाडावे. काही कारखान्यांनी थकबाकी न देता गाळप सुरू केले आहे. त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत, असेही या निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर, मारोती वराडे, चंद्रशेखर साळुंके, अब्दुल रऊफ, कृष्मा साबळे आदींनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज धनगर समाजाचा धडक मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धनगर समाजाला त्वरित अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करा, यासह अन्य मागण्यांसाठी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्यतर्फे आज विभागीय आयुक्तालयावर 'पिवळं वादळ धडक मोर्चा' काढण्यात येणार आहे. ही माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ रिठे यांनी दिली. सत्तेत आल्यावर धनगर आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी काढू, असे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले होते, पण चार वर्ष झाल्यानंतरही दिलेला शब्द न पाळल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात धनगर समाजाचा रोष वाढत आहे. हा संताप व्यक्त करण्यासाठी व आरक्षण प्रश्न तातडीने मार्गी लागावा, यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणवाडी येथील अहिल्यादेवी होळकर चौकातून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होईल. क्रांती चौक, पैठणगेट, गुलमंडी, सिटी चौक मार्गे 'पिवळं वादळ धडक मोर्चा' विभागीय आयुक्तालयावर धडकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुलमंडी येथे आंदोलन केले.

छत्तीसगड येथील जगदलपूरच्या सभेमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल अपशब्द वापरत वादग्रस्त विधान केले. हे विधान संतापजनक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हणत गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला.

गुलमंडी मंडळ अध्यक्ष सुधीर नाईक, दयाराम बसैये बंधू, सचिन वाडे पाटील, सिद्धार्थ साळवे, विनय सूर्यवंशी, केदार ठाकरे, अमित घनघाव, शिवाजी इंजे पाटील, विशाल कोहली, गणेश उपाध्ये, कैलास फुसे, धर्मवीर लाहोट, सुनील शरणागत, राहुल घोडके, प्रवीण पंडित, रणधीर होलीये उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विशेष वसुली मोहिमेत फक्त ३९ लाखांची वसुली

$
0
0

औरंगाबाद : महापालिकेच्या विशेष वसुली व नियमितीकरण मोहिमेत सोमवारी पहिल्याच दिवशी दिवसभरात फक्त ३९ लाख ५८ हजार रुपयांची वसुली झाली. वास्तविक पाहता मोहिमेदरम्यान रोज एक कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट नऊ झोन कार्यालयांना देण्यात आले आहे.

तिजोरीत खडखडाट असल्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी विशेष वसुली व नियमितीकरण सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहाला सोमवारपासून सुरूवात झाली. मोहिमेदरम्यान कमीत कमी ५० कोटी व जास्तीत जास्त १०० कोटी रुपयांची वसुली व्हावी, असे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक झोन कार्यालयाला रोज एक कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सोमवारी मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ३९ लाख ५८ हजार रुपयांची वसुली झाली.

मोहिमेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी कर वसुलीची स्थिती स्पष्ट केले. ते म्हणाले, 'ऑक्टोबर अखेरपर्यंत गेल्यावर्षी ४१ कोटी आठ लाख रुपयांची मालमत्ता कराची वसुली होती. यंदा ५४ कोटी ८६ लाख रुपये वसूल झाले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत १३ कोटींनी वसुली जास्त आहे. गेल्यावर्षी पाणीपट्टीची वसुली नऊ कोटी ५२ लाख रुपये होती, यंदा आतापर्यंत २० कोटी रुपये वसुल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. कराड यांचा दुष्काळी दौरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी जिल्ह्यात दुष्काळी दौरा सुरू केला असून, त्यासंदर्भातील माहिती त्यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे दिली.

बीड येथील आढावा बैठकीसाठी जाण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस चिकलठाणा येथील विमानतळावर आले होते. त्याप्रसंगी डॉ. कराड यांनी दुष्काळी दौऱ्याबाबत त्यांना; तसेच ग्रामविकास मंत्री पकंजा मुंडे यांना निवेदन सादर केले. यावेळी आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, भगवान घडमोडे आदी उपस्थित होते. दुष्काळग्रस्त भागासाठी सरकारने जाहीर केलेल्या सवलती, योजना याबाबत ग्रामस्थांना माहिती देणे. शेतकऱ्यांसाठी सरकारच्या विविध योजनांची माहिती देणे, मनरेगा संबंधित माहिती देऊन अर्ज क्रमांक चार भरून घेणे, असे काम या दौऱ्याअंतर्गत सुरू असल्याची माहिती डॉ. कराड यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्सल विभागातून मोटारसायकलची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोल्हापुरला रेल्वेने पाठविण्यात येत असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पार्सल विभागातून चोरल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात रेल्वे सुरक्षा दलाकडे तक्रार देण्यात आली आहे.

या प्रकरणात रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिस निरीक्षक अरविंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार; औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे एक ग्राहकाने कोल्हापूर - धनबाद या रेल्वेने दुचाकी वाहन पाठविण्यासाठी बुकिंग केली होती. संबंधित ग्राहकाने आठ नोव्हेंबरला आणून बुकिंग कार्यालयात जमा केली. या ठिकाणी पार्सल विभागात आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करून दुचाकी संबधित विभागाकडे जमा केली. वाहनाची तोडफोड होऊ नये त्यावर रॅपर लावले.

ही दुचाकी रेल्वे स्टेशन पार्सल विभागात लावली. ही गाडी दुसऱ्या दिवशी पाठविण्यात येणार असल्याने कर्मचाऱ्यांनी बुकिंग झालेल्या गाडीचा शोध घेतला असता, ती आढळून आली नाही. यामुळे पार्सल विभागाचे बुकिंग करणारे कर्मचारी महेश कुमार यांच्या फिर्यादीवरून रेल्वे सुरक्षा दलात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरिक्षकांकडून केला जात आहे.

………

\Bसीसीटीव्ही चित्रिकरणाची तपासणी\B

मोटारसायकल पार्सल विभागातून चोरी गेल्याची तक्रार दाखल केल्यानंतर रेल्वे परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करण्यात आली. रेल्वे फलाटासह अन्य कॅमेऱ्याच्या नजरेतून ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरल्याची माहिती समोर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारकडून शपथपत्राव्दारे न्यायालयास खोटी माहिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासंदर्भात मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचचे अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील यांनी २०१७ मध्ये याचिका दाखल करून दुष्काळी उपाय योजनांबाबत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. या याचिकेवर अनेकदा सुनावण्या झाल्यानंतरही राज्य सरकारने कुठलीही उपाय योजना न करता उलट न्यायालयाला शपथपत्राव्दारे खोटी माहिती पुरवल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतरही दुष्काळी उपाय योजना राबवण्यात येत नसल्याने न्यायालयाने सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. दरम्यान, हा न्यायालयाचा अवमान असल्याचे नमूद करत सदरील आदेश (याचिका) राखून ठेवत पुढील सुनावणी आता २१ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे, अशी माहिती मराठवाडा अनुशेष निर्मुलन व विकास मंचचे अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील यांनी दिली. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदींची अंमलबजावणी दुष्काळग्रस्त भागासाठी लागू करण्यात याव्यात, याविषयीचे निर्देश शासनास दिले जावेत, अशी अपेक्षा डॉ. लाखे पाटील यांनी या याचिकेव्दारे न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने या विषयी शासनाला अनेकवेळा शपथपत्राव्दारे सत्य कथन करण्यास सांगितले होते. मात्र सरकारने वस्तुनिष्ठ माहिती न देता खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती न्यायालयास सादर केल्याने न्यायालयाने या प्रकरणी अनेकवेळा सरकारची कानउघाडणी केली.

सविस्तर वृत्त पान ७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेतीन हजार गावे जलयुक्त!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळाशी कायम दोन हात करत असलेल्या मराठवाड्यावर यंदाही दुष्काळसंकट कायम आहे. शिवारातील पाणी शिवारात जिरवून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी युती सरकारने राबवलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गेल्या चार वर्षांत तब्बल दोन हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले तरीही यंदा अत्यल्प पावसामुळे दुष्काळाला सामोरे जावे लागले. अभियानांतर्गत आतापर्यंत तीन हजार ७९२ गावे जलयुक्त झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारने डिसेंबर २०१४मध्ये जलयुक्त शिवार अभियानाचा श्रीगणेशा केला. या कालावधीमध्ये मराठवाड्यात अभिसरण व लोकसहभाग असे मिळून सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला. त्यानंतरही यंदा मराठवाडा दुष्काळाच्या दावणीला बांधला गेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये २०१५-१६ या वर्षामध्ये जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या २२८ या गावात अभियानाची कामे शंभर टक्के पूर्ण करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले, मात्र यापैकी पहिल्या वर्षी ५५ तर गेल्यावर्षी तब्बल ४३ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवावे लागले. त्यावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. जिल्ह्यात सध्या २९९ टँकर सुरू आहेत. अशीच स्थिती विभागातील इतर जिल्ह्यांची आहे. २०१५-१६ या वर्षामध्ये मराठवाड्यात १६८२ गावे निवडण्यात आली होती, यावर्षी १०७८ कोटी रुपये खर्च करुन १६७६ (९९.४६ टक्के) गावांमध्ये कामे पूर्ण करण्यात आली, २०१६-१७मध्ये गावांची संख्या कमी करण्यात आली. या वर्षी निवडलेल्या १५१८ गावांमध्ये ७८५ कोटी रुपये खर्च केला मात्र यापैकी आतापर्यंत १४८९ गावांमध्ये (९८.०९ टक्के) कामे पूर्ण करण्यात आली. २०१७-१८ या वर्षात गावे निवडीमध्ये सर्वात मोठी कात्री मारण्यात आली, यावर्षी निवडलेल्या १२४८ गावांपैकी आतापर्यंत ६२८ गावांमध्ये (५०.४८ टक्के) कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यासाठी १५८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

प्रशासनाच्या अहवालानुसार २०१५ ते १८ या कालावधीमध्ये एक लाख ५९ हजार ५९९ कामे पूर्ण करण्यात आली असून, यामधून साडेतीन हजार गावे जलपरिपूर्ण करण्यात आली आहेत, राज्य सरकारने दुष्काळमुक्तीची पिटवलेली दवंडी पाण्याबाबतची जनजागृती करण्यात यशस्वी झाली खरी, मात्र या योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतरही दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. अभियानात गावे निवडण्यात आल्यानंतर गावाची पाण्याची गरजेचे मोजमाप करण्यात आले होते. यानुसार जलयुक्त शिवार अभियनाअंतर्गत निवडलेल्या प्रत्येक गावात पूर्ण करण्यात आली आहेत, त्यामुळे ही गरज पूर्ण झाली असल्यामुळे निवडलेली गावे जलयुक्त झाल्याचे अहवालातून सांगण्यात येत आहे.

जलयुक्त शिवार अभियान दृष्टीक्षेप

वर्ष................ निर्माण पाणीसाठा......विहिरींच्या पाणीपातळी वाढ

२०१५-१६.............३.२३..................२.५० मीटर

२०१६-१७.............३.१०..................२.०० मीटर

२०१७-१८.............१.८५..................२.०० मीटर

एकूण.....................८.१८.................२.०० मीटर

(पाणीसाठा : टीसीएम)

यंदाची टँकरस्थिती

जिल्हा.................सुरू असलेले टँकर

औरंगाबाद.................२९९

जालना.....................४५

नांदेड.......................०२

बीड.........................१०

उस्मानाबाद................०१

एकूण.......................३५७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पसार आरोपी चांदचा शोध लागेना

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊन पसार झालेला आरोपी शेख चांद पाशा याच्या पलायनाला चार दिवस उलटले आहे. यासंदर्भात क्रांतीचौक पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. चार दिवस उलटले तरी पसार आरोपी चांदचा शोध लावण्यामध्ये पोलिस यंत्रणेला अपयश येत आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री कुख्यात गुन्हेगार शेख चांद पाशा याला ताब्यात घेतले होते. त्याने शुक्रवारी सकाळी पलायन केले. मध्यवर्ती बसस्टँडवर तुटलेली हाथकडी आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिस कर्मचारी शिवाजी भोसले यांनी याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी चांद हा नेमका कोठून पळाला याची उलटसुलट चर्चा आयुक्तालयात सुरू आहे. या घटनेला आता चार दिवस उलटले आहे, मात्र शेख चांदचा अद्यापही शोध लागलेला नाही. चांदच्या शोधासाठी एक पथक बाहेरगावी जाऊन आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अडीच हजारांची लाच घेताना पोलिस नाईक गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिटीचौक पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक सुनील नारायणराव जहागीरदार (वय ४८, रा.जटवाडा रोड) याला अडीच हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी होनाजीनगर भागात ही कारवाई केली. वाळूच्या वाहनावर पोलिस केस न करण्यासाठी ही लाच घेण्यात आली होती.

या घटनेतील तक्रारदार यांचा वाळू वाहतूकीचा व्यवसाय आहे. त्यांची वाळूची वाहतूक करणारी वाहने सिटीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाणे येणे करतात. या वाहनांवर पोलिस केस न करण्यासाठी जहागीरदार याने दर महिन्याला साडेतीन हजार रुपये देण्याची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. मंगळवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या लाचेची पडताळणी केली. यामध्ये तडजोडीअंती जहागीरदारने अडीच हजार रुपये घेण्याचे मान्य केले. याप्रकरणी दुपारी होनाजीनगर भागातील गायत्री वॉशिंग सेंटर येथे सापळा रचण्यात आला. अडीच हजारांची लाच घेताना सुनील जहागीरदार याला पोलिसांनी जागेवर अटक केली. त्याच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर अधीक्षक शंकर जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नितीन देशमुख, निकाळजे यांच्या जालना आणि औरंगाबाद येथील संयुक्त पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

साडे अठरा कोटींच्या बिल प्रकरणात महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी चार अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली आहे. या समितीला दोन आठवड्यात अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आयुक्त डॉ. निपुण विनायक दहा दिवसांच्या रजेवर होते. या काळात महापालिकेच्या लेखा विभागाने तब्बल साडे अठरा कोटींची बिले काढली. या बिल प्रकरणाचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. ज्येष्ठता यादी डावलून कंत्राटदारांची बिले काढण्यात आली, या सर्व प्रकरणात गैरव्यवहार झाला, असे आरोप नगरसेवकांनी केले. महापौरांनी देखील बिल काढण्याचा प्रकार संशयास्पद असल्याचा उल्लेख करून या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

महापौरांच्या आदेशानंतर आयुक्तांनी बिल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांची समिती नेमली. या समितीमध्ये उपायुक्त मंजुषा मुथा, मुख्य लेखापरिक्षक दिपाराणी देवतराज आणि उपअभियंता एम.बी. काजी यांचा समावेश आहे. दोन आठवड्यात चौकशी पूर्ण करून अहवाल द्या, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांची मेगा आढावा बैठक

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापौर नंदकुमार घोडेले यांनी महापालिकेच्या विविध विभागांची मेगा आढावा बैठक घेण्याचे ठरविले आहे. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळात महापालिकेच्या मुख्य सभागृहात बैठक होणार आहे. या बैठकीच्या संदर्भात महापालिकेचे सर्व संबंधित अधिकारी, शासकीय कार्यालयाचे प्रतिनिधी यांना माहिती देऊन त्यांना बैठकीला उपस्थित राहण्यास सांगा, असे महापौरांनी आयुक्तांना कळविले आहे. विविध ५२ विषयांवर आढावा बैठकीत चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यापासून तीन दिवस उद्योजक विकास परिषद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्रीय सूक्ष्म, लघु-मध्यम उपक्रम मंत्रालय व उद्योग विभाग, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उद्योजकांसाठी गुरुवारपासून तीन दिवसीय उद्योजक विकास परिषद व औद्योगिक उत्पादन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त उद्योग संचालक विकास जैन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती, जमाती हब उपक्रमांतर्गत ही परिषद पी. ई. एस. अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात आयोजित करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माहिती व जनसंपर्क संचालक यशवंत भंडारे, एमसीइडीचे कार्यकारी संचालक ब. सू. जोशी, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, सुदाम थोटे, पी. पी. देशमुख यांची उपस्थिती होती.

या परिषदेत बुद्धिस्ट इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर आणि ट्रेडर्स असोसिएशन, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज असोसिएशन, व मासिआ आदी संघटनांनी सहभाग नोंदविला आहे. एससी, एसटी प्रवर्गातील राज्यभरातील सुमारे ५०० उद्योजक सहभागी होणार आहेत. उद्योजकांच्या क्षमता वृद्धीसाठी नामांकित संस्था, उद्योजकांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले असून शासनाच्या खरेदी प्रक्रियेत एससी, एसटी प्रवर्गातील उद्योजकांचा सहभाग वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सार्वजनिक उपक्रमाव्दारे सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तसेच व्यावसायिक ते व्यावसायिक, व्यावसायिक ते ग्राहक बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक उपक्रम ज्यामध्ये रेल्वे, हिंदुस्थान एरोनोटिक, मुंबई पोर्ट ट्रस्ट, राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर, बीपीसीएल, महाजेनको, राज्य परिवहन महामंडळ आदी नामांकित शासकीय उपक्रम व नामांकित उद्योग घटक यामध्ये सहभागी होणार आहेत.

दरम्यान, सहभागी उद्योजकांसाठी सिपेट, आयजीटीआर, ऑटो क्लस्टर, रबर क्लस्टर आदींना भेटी व चर्चा आयोजित करण्यात आल्या आहेत. या परिषदेत जास्तीत जास्त उद्योजकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जैन यांनी केले. परिषदेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उद्योजकांनी www.mced.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूज महानगरात छठ पूजा उत्साहात

$
0
0

वाळूजमहानगर : वाळूज महानगरातील उत्तर भारतीयांनी येथील रामलीला मैदानावर मंगळवारी (१३ नोव्हेंबर) सायंकाळी मावळत्या सूर्याला अर्घ्य देत छठ पूजा उत्साहात साजरी करण्यात आली़ या पूजेसाठी वाळूजमहानगर, रांजणगाव, पंढरपूर, वडगाव, सिडको या परीसरातील उत्तर भारतीयांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

छठ पूजेसाठी महिला व्रत पाळतात. या पूजेसाठी छोटे तळे तयार करण्यात आले होते. त्यातील पाण्यात उभे राहून मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यात आले; तसेच नैवेद्य दाखवून पूजा केली़ यासाठी उसाच्या मंडपाचे यापूजेला महत्त्व असल्याने त्यासाठी महिलानी पाण्यात ऊस उभे करून सुपातील नैवद्य सूर्याला अर्पण केला. येथील रामलीला मैदानावर बुधवारी सकाळी उगवत्या सूर्याची पूजा करण्यात येणार असल्याची माहिती नरेंद्रसिंह यादव यानी दिली़ यावेळी हिंदी सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष आर. के. सिंह, नरेंद्रसिंह यादव, आर. पी. सिंह, राम जयप्रकाश सिंग, राधेशाम शर्मा, कैलास यादव, राजेश सिंह, संजय सिंह, रामजपम सिंह, भुपेंद्रसिंह परिहार, प्रदीप सिंह, अकवाल बहादूर सिंह, अमाघ प्रजापती, राहुल सिंह, राघवेंडर सिंह, गुड्डु सिंह, माया भूमिहार शुभम सिंह, सनीसिंह, रोहनसिंह, सिद्धार्थसिंह यांच्यासह परिसरातील उत्तर भारतीयांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images