Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कोर्टाने पालिकेला फटकारले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन हा रस्ता स्मार्ट करण्यासाठी ३७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, याचा उल्लेख होताच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांनी 'आधी कपडे घाला, नंतर फॅशन करा,' अशा शब्दांत महापालिका प्रशासनाला फटकारले.

औरंगाबाद खंडपीठातील वकील रुपेश जैस्वाल, शिवराज कडू, हिरामण झांबरे यांनी जनहित याचिका केली आहे; तसेच प्रभाकर औरंगाबादकर यांनी सातारा परिसरातील नागरिकांना पाणी मिळण्यासाठी याचिका सादर केली आहे. या सर्व याचिकांची सुनावणी शुक्रवारी झाली. सुनावणी सुरू असताना रुपेश जैस्वाल यांनी क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्यावर निवेदन केले. २०१५मध्ये क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन हा रस्ता तयार करण्यात आला. त्यावेळी ३४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. एकीकडे पालिका म्हणते विकास कामांसाठी पैसा नाही. मग हा रस्ता स्मार्ट करण्यासाठी खर्च करण्याची गरज नाही, असा युक्तीवाद जैस्वाल यांनी केला. हे पैसे सर्व जनतेचे आहे. तुम्ही पैसे खर्च करू शकत नाही, असे कोर्टाने सांगितले. याचिकाकर्ते जैस्वाल यांना या रस्त्यासंदर्भात नव्याने अर्ज करण्याचे आदेश कोर्टाने दिले.

क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या अडीच किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे क्राँक्रिटीकरण करण्यात आले. त्यावेळी ३४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. या रस्त्याला प्रारंभी डॉ. पुरुषोत्तम भापकर मार्ग असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर हा निर्णय बदलून पालिकेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी 'शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महामार्ग' असे केले. औरंगाबाद शहराचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाल्यानंतर स्मार्ट रोडची संकल्पना पुढे आली. क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन, रेल्वेस्टेशन ते महावीर चौक आणि महावीर चौक ते क्रांतीचौक असा त्रिकोण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रस्तावित स्मार्ट रस्ता

पहिल्या टप्प्यात क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्याचे काम स्मार्ट रोडच्या धर्तीवर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी ३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. डिसेंबरमध्येच या कामाची निविदा काढण्यात येणार आहे. या रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात येईल. रस्त्याच्या दुभाजकात झुंबर आणि आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे. सायकल ट्रॅकशिवाय संदेश देणाऱ्या पाट्या, वैशिट्यपूर्ण फूटपाथ आणि फुलझाडे, अशी स्मार्ट रस्त्याची संकल्पना असणार आहे.

'कोर्टाच्या आदेशानूसार हा रस्ता स्मार्ट करण्याला आक्षेप घेत नव्याने अर्ज दाखल करणार आहे.'

- रुपेश जैस्वाल, याचिकाकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एसजीएसटी’ची १३ वाहनांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ई-वे बिल न बनविता मालवाहतूक करणाऱ्या १३ वाहनांवर सीजीएसटी विभागाने (राज्य वस्तू व सेवा कर) कारवाई करत त्यांच्याकडून दंडासह १३ लाख रुपयांचा कर वसूल केला.

जीएसटी कायद्यातील ई-वे बील नियमांचे पालन न करता करचुकवेगिरी करणाऱ्यां विरोधात राज्य कर विभागाने (एसजीएसटी) कारवाईचा बडगा उगारला आहे. 'जीएसटी'तील नव्या व्यवस्थेनुसार अर्थात, ई-वे बिलनुसार राज्यांतर्गत ५० हजार रुपयांहून अधिक, तर परराज्यात एक लाख रुपयांहून अधिक मूल्याच्या सामानाची ने-आण करण्यासाठी ई-वे बिल घ्यावा लागतो.

मालाची वाहतूक करण्यापूर्वी संबंधितास त्याचे पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून (ई-वे बिल) सरकारला त्याची माहिती देणे बंधनकारक आहे. ज्या वाहनातून या मालाची वाहतूक सुरू होईल त्यांना ई-वे बिलसोबत बाळगावे लागते. ई-वे बिलावर दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्ष मालवाहतूक नसेल किंवा दिशाभूल केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद कायद्यात आहे. दरम्यान, राज्यकर सहआयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर उपायुक्त संतोष श्रीवास्तव, धनंजय देशमुख, तुषार गावडे, माधव कुंभारवाड, राज्यकर अधिकारी संदीप नलावडे यांनी दौलताबाद टी पॉइंट येथे गेल्या दोन दिवसांत माल वाहतूक वाहनांची तपासणी केली. त्यात १३ वाहनधारक ई-वे बिल नसतानासह करपात्र मालाची वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्याकडून दंडासह १३ लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजीनगर भुयारी मार्गावर ७ दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद महापालिकेने रेल्वेकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार शिवाजीनगर येथे 'भुयारी मार्ग' अथवा 'उड्डाणपूल' यापैकी तांत्रिकदृष्ट्या योग्य असेल ते करण्याबाबत सात दिवसात निर्णय घेण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. व्ही. व्ही. कंकणवाडी यांनी रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला शुक्रवारी दिले.

खंडपीठातील वकील रुपेश जैस्वाल यांनी (पार्टी-इन-पर्सन) केलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. शिवाजीनगर ते देवळाई चौक हा सातारा, देवळाई परिसराला औरंगाबाद शहराशी जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. रेल्वेच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे येथे भुयारी मार्ग करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या रस्त्यावर गेल्या काही महिन्यांत अपघातात नागरिकांचे बळी गेले. त्यामुळे बीड बायपासला सर्व्हिस रोड गरजेचा आहे. सर्व्हिस रोडबाबत आश्वासन देण्यात आले होते, मात्र त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही, १०० कोटी निधीमधून येत्या १२ महिन्यांत ३१ रस्त्यांचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्या कामांचा कार्यादेश (वर्क ऑर्डर) देण्यात आला आहे. तसेच ५० कोटी निधीतून रस्त्यांचे काम करण्याबाबत निविदा काढल्या असल्याचे पालिकेचे वकील राजेंद्र देशमुख यांनी कोर्टाला सांगितले. शहरातील रस्त्यांवर अन्य खात्यांना खोदकाम करावयाचे असल्यास त्याबाबत ३० दिवसांपूर्वी कळवावे, असे निर्देश खंडपीठाने यापूर्वी दिले आहेत. त्या अनुषंगाने महापालिकेने जाहीर प्रकटन प्रसिद्ध केल्याचेही अ‍ॅड. देशमुख यांनी सांगितले.

सिडको बसस्थानक ते हर्सूल टी पॉइंट आणि महानुभाव आश्रम ते झाल्टा फाटा या दोन रस्त्यांची देखभाल केली जात नसल्याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडुन खंडपीठाने पुढील सुनावणीच्यावेळी स्पष्टीकरण मागविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९० टक्के शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. विभागातील सुमारे ४८ लाख हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ३३ लाख ७१ हजार हेक्टरवरील पिकांची दुष्काळामुळे धूळधाण झाली असून, एकूण ३६ लाख २७ हजार शेतकऱ्यांपैकी तब्बल ३२ लाख ५५ हजार (९० टक्के) शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला आहे. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर ही माहिती महसूल विभागाने सादर केली.

मराठवाड्यात खरीपाचे ५० लाख चार हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी हंगामात ४८ लाख ६१ हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक पेरणी ही सोयाबीन व कापसाची झाली. मराठवाड्यात यंदा १९ लाख ३३ हजार हेक्टरवर सोयाबीन तर १५.८१ लाख हेक्टरवर क्षेत्रावर कापसाची पेरणी करण्यात आली, तर ८९ लाख हेक्टरवर ज्वारी, १.०३ लाख हेक्टरवर बाजरी आणि २.५८ लाख हेक्टरवर मका हे पीक घेण्यात आले होते. मात्र पावसाच्या मोठ्या खंडामुळे पीके वाळून गेली.

एक जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीमधील १५३ दिवसांपैकी ४१ दिवस पाऊस, तर तब्बल ११२ दिवस कोरडे ठरले. जुलै आणि सप्टेबर महिन्यांत पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे पिकांची वाढ खुंटली. काही ठिकाणचे पूर्ण पीक करपून गेले. जून महिन्यात चांगला पाऊस झालेल्या ठिकाणी कापसाच्या एक, दोन वेचण्या झाल्या, मात्र त्यानंतर कापूस आला नाही. सोयाबीनचीही अवस्था अशीच होती. शेंगा आल्या, मात्र त्यात दाणे काही भरले नाही. पावसाच्या या अवस्थेमुळे रब्बीची अनेक शेतकऱ्यांनी पेरणीच केली नाही. गावोगावात पाण्याअभावी शेतकऱ्यांचे हाल आहेत, पाणी नसल्यामुळे सध्या विभागात पाचशे पेक्षा अधिक टँकर सुरु आहेत. या सर्व बाबींचा तपशील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर मांडण्यात आला.

जिल्हानिहाय स्थिती

जिल्हा..............बाधित क्षेत्र ................शेतकऱ्याची संख्या

औरंगाबाद..........७ लाख......................६ लाख ६२ हजार

जालना..............६ लाख १ हजार .........६ लाख ५२ हजार

बीड..................८ लाख ४६ हजार........८ लाख ५६ हजार

लातूर................२४ हजार...................२५ हजार

उस्मानाबाद.........४ लाख ४१ हजार.......४ लाख ७३ हजार

नांदेड................१ लाख ७१ हजार.......१ लाख ५९ हजार

परभणी..............३ लाख ४४ हजार .......२ लाख ६४ हजार

हिंगोली..............२ लाख ४५ हजार........१ लाख ६५ हजार

एकूण...............३३ लाख ७१ हजार.......३२ लाख ५५ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमबाह्य खरेदी प्रक्रिया वादात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शैक्षणिक विभागांच्या खरेदी प्रक्रियेत सोयीच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. कमी किमतीच्या निविदा डावलून ई-निविदेतही गैरप्रकार झाल्याचा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मागासवर्गीय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने केला आहे. खरेदी प्रक्रियेची माहिती संकेतस्थळावर जाहीर करण्याची मागणी संघटनेने केली.

विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागातील खरेदी प्रक्रिया वादात आहे. कमी किमतीच्या निविदा डावलून सोयीच्या निविदांना मंजुरी दिल्याचा आरोप आहे. ई-निविदेतही हस्तक्षेप केला जात असून या नियमबाह्य प्रकार भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मागासवर्गीय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष बोरीकर यांनी केला. याबाबत बोरीकर यांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना निवेदन दिले. नियमबाह्य खरेदी प्रक्रियेला संघटना कायदेशीर मार्गाने प्रतिकार करणार आहे. संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाईसाठी प्रयत्न करण्यात येईल. न्यायालयात दाद मागून वसुली करण्यासाठी पाठपुरावा करू, असे बोरीकर यांनी निवेदनात म्हटले आहे. विद्यापीठाने प्रशासकीय निर्णयांची सविस्तर माहिती संकेतस्थळावर दिल्यास माहितीच्या अधिकाराची गरज राहणार नाही. या प्रशासकीय पारदर्शकतेसाठी प्रशासनाने प्रयत्न करावे अशी मागणी बोरीकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती शनिवारी शहरात मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त महाआरती, अन्नदान कार्यक्रमासह वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले होते.

संस्थान गणपती येथे संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती करण्यात आली. याप्रसंगी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. माजी नगरसेवक अनिल मकरिये यांनी वाहनफेरीला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले. विश्वनाथ गवळी, कृष्ण ठोंबरे, मनोज संतान्से, कचरू वेळंजकर, रमेश क्षीरसागर, भारत कसबेकर, दीपक राऊत, नारायण गवळी, राजू मगर, निर्भय मकरिये, कृष्ण वाडेकर, नीलिमा आंबेकर, अलका शिंदे, बद्रीनाथ ठोंबरे आदी यावेळी उपस्थित होते. सिटी चौक, गुलमंडी, पैठणगेट, क्रांती चौक, आकाशवाणी मार्गे काढण्यात आलेल्या या फेरीची सांगता पुंडलिकनगर येथील संताजी चौकात करण्यात आली. संताजी महाराज याचा जयघोषाने संपूर्ण फेरीमार्ग दुमदुमून गेला होता. वाहनफेरीनंतर अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रल्हाद पवार, हरिभाऊ भुजाडे, शंकरराव चौथे, लक्ष्मी महाकाल, रंजना वेळजकर, गणेश पवार, साई शेलार, राजू वाडेकर, नीलेश धारकर, संदीप हिरे, नितीन मिसाळ, संतोष पवार यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक चालकांना लुटणारी टोळी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लिंक रोडवर ट्रक चालकांना अडवून लुटणाऱ्या टोळीतील सहा जणांना सातारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यातील एक जण फरार झाला आहे. गुन्हेगारांकडून तलवारही जप्त करण्यात आली आहे.

सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या ट्रक चालकांना लुटण्याचे प्रकार वाढले होते. याबाबत पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी रात्री या मार्गावर टोळीच्या मागावर दोन पथकांचा फौजफाटा तैनात केला. रात्री दोनच्या दरम्यान पाच ते सहा जण दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिस कर्मचाऱ्यांना दिसले. त्यांनी ट्रक थांबविण्याचा प्रयत्न करतानाच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी धाड टाकून टोळीतील चौघांना अटक केली. यात विजय भगवान काळे (वय २८, रा. एमआयडीसी वाळूज), सलीम मोहमद यार शेख (वय २२, रा. एकतानगर, एमआयडीसी वाळूज), सोमीनाथ श्रीराम चंदेले (वय २२, कदीम टाकळी, ता. गंगापूर), अजय मुरलीधर आदमाने (वय २०, मुकुंदवाडी) यांचा समावेश होता. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिस उपनिरीक्षक चेतन ओगले यांनी पहाटे पाच वाजता अनिकेत रावसाहेब हिवाळे (वय २०, जयभवानीनगर) आणि आशिष सुरेश काळे (वय २१, सम्राट हॉटेल पाठीमागे, मुकुंदवाडी) या दोघांना त्यांच्या घरातून अटक केली. या टोळीतील किशोर शिंदे (रा. मुकुंदवाडी) हा अद्याप फरार आहे. या टोळीकडून तीन फूट लांबीची तलवार, मिरची पूड, नायलॉन दोरी, दोन मोबाइल आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. आरोपींना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता, कोर्टाने १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

…………

\Bयांनी केली कारवाई

\Bसहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज बहुरे, उपनिरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक चेतन ओगले, उपनिरीक्षक रतन डोईफोडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल कैसर पटेल, प्रदीप ससाणे, मोहन चव्हाण, शेषराव चव्हाण, सुनील धुळे, कारभारी नलावडे, कपिल खिल्लारे, तळपे, देठे, अशोक वारे, चंपालाल डेडवाल यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

\Bरस्त्याचे खड्डे चोरांना लाभदायी

\Bपैठण लिंक रोडवर अनेक खड्डे पडले आहेत. यामुळे ट्रक चालकांना मालाची वाहतूक करताना वेग कमी ठेवावा लागत होता. कमी वेगात चालणाऱ्या या ट्रक चालकांना थांबवून लुटीच्या घटना होत होत्या. या रस्त्यावर वर्दळ आणि नागरी वस्ती नसल्याने ट्रक चालकांच्या मदतीलाही कोणी येत नव्हते. प्रसंगवधान ठेवून या रस्त्याशेजारच्या शेतातून पळ काढण्यासाठीही या लुटमारीच्या सदस्यांना जागा होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नादमाधुर्याने भारावलेला ‘स्वरझंकार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आनंद भाटे यांचे मनाचा ठाव घेणारे गायन, राकेश चौरसिया यांचे नादमाधुर्य असलेले बासरीवादन आणि अभिजित पोहनकर यांच्या उपशास्त्रीय गायनाने 'स्वरझंकार महोत्सव' श्रवणीय ठरला. नावीन्यपूर्ण सादरीकरणाला रसिकांनी भरभरुन दाद दिली.

व्हायोलिन अकादमीच्या वतीने आयोजित स्वरझंकार महोत्सवाला शनिवारी सायंकाळी प्रोझोन लॉ़न्सवर सुरुवात झाली. प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांच्या गायनाने महोत्सवाची सुरुवात झाली. शास्त्रीय गायकीच्या अनवट चिजा ऐकवत भाटे यांनी मैफलीत रंग भरले. मिश्र काफी रागातील टप्पा आणि तराण्याने भाटे यांनी रसिकांना खिळवून ठेवले. 'तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल' या दर्जेदार अभंगाने सांगता केली. या अभंगावर रसिकांनी ठेका धरला. तबल्यावर प्रशांत पांडव आणि हार्मोनिअमवर राहुल गोळे यांनी साथसंगत केली. दुसऱ्या सत्रात राकेश चौरसिया यांचे बासरीवादन झाले. बासरीच्या नादमाधुर्याने अ‌वघे वातावरण भारून गेले. या वादनाला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवसाची सांगता पं. अजय पोहनकर यांच्या शास्त्रीय-उपशास्त्रीय गायनाने झाली. चौरसिया व पोहनकर यांना पं. विजय घाटे यांनी तबल्यावर साथसंगत केली. या कार्यक्रमाला आयोजिक अतुलकुमार उपाध्ये व राजस उपाध्ये उपस्थित होते.

\Bउधास यांचे आज गायन

\Bस्वरझंकार संगीत महोत्सवात रविवारी सायंकाळी पंकज उधास यांचे गझल गायन होणार आहे. 'चिठ्ठी आयी है' सारख्या लोकप्रिय रचना उधास सादर करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लॉटिंग एजंटचा खून, दोन फरार आरोपींना बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल परिसरात व्हॉट्सअप ग्रुपवरील पोस्टमुळे झालेल्या वादातून अठरा जणांनी प्लॉटिंग एजंटचा खून केला. या प्रकरणात फरार आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी शिर्डी येथून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभळे यांनी शनिवारी दिले. शेख नदीम रहिम पटेल (२२, पटेल गल्ली, हर्सूल) व जुबैर उर्फ जुबेद नबी पटेल २२, रा. फुलेनगर, हर्सूल) अशी आरोपींची नावे आहेत.

व्हॉटस अ‍पवरील वादग्रस्त पोस्टच्या कारणावरून हर्सूल परिसरातील फातेमानगरात प्लॉटिंग एजंट मोईन पठाण (३५, रा. फातेमानगर, हर्सूल ) यांची हत्या करण्यात आली होती. प्रकरणात इरफान रहिम शेख (२४, रा. बेरीबाग, हर्सूल) यांच्या तक्रारीवरून हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी शेख रहीम पटेल, आबेद पटेल, शेख जावेद पटेल, तौफिक पटेल, आमेर पटेल, सद्दाम पटेल, शोहेब पटेल, मेहराज नुर पटेल व आसेफ पटेल या आरोपींना अटक केली होती. दरम्यान गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना दोन आरोपी शिर्डी परिसरात असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी शनिवारी दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या.

\Bइतर साथीदारांचा शोध

\Bपोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले लाकडी दांडे व दगड जप्त करणे आहे. आरोपींच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांना अटक करायची आहे. तसेच आरोपींच्या मोबाइलचा शोध घेऊन तो जप्त करणे असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती कोर्टाने मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीए कौन्सिल’साठी मतदान उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया'च्या विभागीय पातळीवरील रिजनल कौन्सिल व सेंट्रल कौन्सिल वरील सदस्यासाठी शनिवारी निवडणूक पार पडली. रिजनल कौन्सिलच्या २२ जागांसाठी तब्बल ४६ उमेदवार रिंगणात आहेत, तर सेंट्रलच्या ११ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात आहेत. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत कोण बाजी मारेल याकडे लक्ष लागले आहे. औरंगाबादमध्ये दोन मतदान केंद्रावर मतदान झाले.

मुंबई, गुजरात आणि गोवा मिळून एक विभाग आहे. देशपातळीवरील विविध विभागांमध्येही निवडणूक सकाळी आठपासून मतदान सुरू झाले. सायंकाळीपर्यंत मतदारांना मतदानासाठी वेळ देण्यात आला. औरंगाबादमध्ये आयकर विभागात सकाळी मतदान सुरू झाले. दहानंतर मतदारांनी रांगा लावल्या. रिजनल कौन्सिलसाठी ४६ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये औरंगाबादमधूनही उमेदवार आहेत. सेंट्रल कौन्सिलवर औरंगाबादमधून उमेदवार नाही. पंसती क्रमांकानुसार मतदान होते. औरंगाबादसह, बीड, लातूर, परभणी, जालना, नांदेड अशा शहरांमध्येही निवडणूक होते. रिजनल कौन्सिलमध्ये निवडून आलेल्या २२ उमेदवारांपैकी पाच जणांची इंडिया रिजनल कौन्सिलवर निवड होते. मतमोजणीची प्रक्रिया १९ ते २२ डिसेंबर दरम्यान होणार असून, २२ ला निकाल जाहीर होणार आहे. मतदान संख्या व उमेदवार यांच्यानुसार एक कोटा निश्चित करण्यात आलेला असतो. निर्धारित कोट्यात प्रथम क्रमकांची मते मिळवणारा उमेदवार विजयी ठरविला जातो.

\Bशहर...... मतदार संख्या

\Bऔरंगाबाद...७५४

बीड............४६

नांदेड..........१२०

परभणी..........५४

लातूर............१६९

जालना...........८५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका वर्धापन दिन उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचा ३६वा वर्धापन दिन शनिवारी क्रिकेट, रस्सीखेच, संगीत खुर्ची स्पर्धांनी उत्साहात साजरा झाला. या स्पर्धेत महापौरांसह पदाधिकारीही एकमेकांवर विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते. दोरीवरच्या उड्यांनी तर रंगत आणली.

पालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. गरवारे स्टेडियमवर या स्पर्धा पार पडल्या. पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकारांसाठी विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये रस्सीखेच, संगीत खुर्ची स्पर्धा, महिलांसाठी फन गेममध्ये वाटर रनिंग, दोरीवरच्या उड्या, फुगे घेऊन चालणे अशा स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त डॉ. निपुण विनायक, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समिती सभापती रेणुकादास वैद्य, सभागृहनेते विकास जैन , नगरसेवक शिवाजी दांडगे, उपायुक्त मंजुषा मुथा, विधी सल्लागार अपर्णा थेटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर, घनकचरा विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, दक्षताकक्ष प्रमुख एम. बी. काझी, पाणीपुरवठा अभियंता हेमंत कोल्हे, क्रीडा अधिकारी संजीव प्रसाद बालय्या, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, ए. बी. देशमुख, के. डी. देशमुख आदींसह अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध स्पर्धांमध्ये पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांची धम्माल अनुभवायला मिळाली. या स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोघींनी चोरल्या पाण्याच्या २२ मोटारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचरा वेचण्याचा बहाणा करून पाण्याच्या मोटारी पळवणाऱ्या दोन महिलांना सिडको पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्या ताब्यातून चक्क २२ मोटारी जप्त करण्यात आल्या.

पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिला कचरा वेचण्याच्या बहाण्याने पहाटे तीन ते पाच्या सुमारास वेगवेगळया भागात फिरतात. त्या दरम्यान कचरा न वेचता उघड्या जागेवर लावलेल्या पाण्याच्या मोटारी व्हेक्सा ब्लेडच्या सहाय्याने कापून गोणीत टाकून लंपास करतात, अशी माहिती मिळाली. या दोघी चोरीची मोटार विकण्यासाठी आंबेडकर चौक ते जाधववाडी मोढ्यांकडे जाणाऱ्या रस्त्यावर असल्याची माहिती मिळाली. पोलिस कर्मचारी त्या रस्त्यावर पोहोचले. या ठिकाणी दोन महिला पांढऱ्या गोणीसह जाताना दिसल्या. या महिलांना थांबवून त्यांचे नाव गाव विचारले. राधाबाई राजू चांदणे (रा. जाधववाडी), व सुंदरबाई सुखलाल डोकले (रा. आंबेडकरनगर) असे त्यांनी नाव सांगितले. त्यांच्या गोणीची तपासणी केली असता त्यात एक पाण्याची मोटार मिळाली. या मोटारीबाबत विचारले असता या महिलांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या महिलांकडे अधिक तपास केला असता, त्यांनी या मोटारी चोरीच्या असल्याची कबुली दिली. राधाबाई चांदणेच्या घरी जाऊन तपासणी केली असता, त्या ठिकाणी विविध कंपनीच्या २२ मोटारी सापडल्या. या मोटारीच्या किंमत ८० ते ९० हजार रुपये इतकी आहे,' असे परदेशी म्हणाल्या. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक प्रतिभा आबूज, पोलिस उपनिरीक्षक सी. व्ही. ठुबे, जयश्री काकडे, दिनेश बन, संतोष मुदीराज, ईरफान खान, राजू सुरे यांनी केली.

प्लॉस्टिक पाइपच्या मोटारीकडे लक्ष

कचरा उचलण्यासाठी निघालेल्या या महिला आधी कचरा उचलण्याच्या बहाण्याने मोटारी पाहून घेत होत्या. प्लॉस्टिक पाइपला लावलेली पाण्याची मोटार कापण्यास सोपी असते. त्यामुळे ती कापून कमी वेळेत त्या गोणीमध्ये टाकून निघायच्या, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये ५३ टँकरने पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

बीड जिल्ह्यात यंदा दुष्काळ दाह मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. या दुष्काळी परिस्थितीत तहानलेल्या जनतेला पाणी पुरवठा करण्याचे आव्हान असणार आहे. ऐन हिवाळ्यात जिल्ह्यात ५३ टँकर सुरू आहेत. टंचाईस्थिती तीव्र होणार असून दोन महिन्यानंतर जिल्ह्यात हजारो टँकरच्या खेपा करून पाणी पुरवठा करावा लागणार आहे.

बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात या वर्षी केवळ ३३४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पीक आले नाही व रब्बीची पेरणी झाली नाही. जिल्ह्यातील सर्व १४०० गावांची पैसेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आली आहे. पावसाळ्याचे चार महीने कोरडे गेले असल्याने जिल्हा प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. येत्या काळात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार असल्याने पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.

बीड जिल्ह्यातील मांजरा, बिंदुसरासह अनेक सिंचन प्रकल्पातील पाण्याने तळ गाठला आहे. जिल्ह्यातील १४४ प्रकल्पांत पाणीसाठा दोन टक्क्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे यावर्षी तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे. ऐन हिवाळ्यात जिल्ह्यात ५३ टँकर सुरू आहेत. जिल्ह्यात आगामी काळात टंचाईस्थिती आणखी तीव्र होणार आहे.

काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये आले होते तेंव्हा त्यांनी टंचाईस्थितीचा आढावा घेतला होता. बीड जिल्ह्यात आगामी काळात जास्त अंतरावरून पाणी पुरवठा करावा लागेल, असे सांगून त्यांनी प्रशासनास कामाला लावले. जिल्ह्यात जरी सध्या ५३ टँकर सुरू असले तरी फेब्रुवारी, मार्चमध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार मार्चनंतर जिल्ह्यातील १४०२ गावांपैकी तब्बल १३८७ गावांत पाणी पुरवण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. या एक हजार ८७ गावात तब्बल पिण्याचे ८९१ टँकर सुरू करावे लागतील असा अंदाज आहे. या ८९१ टँकरच्या दोन ते तीन खेपा प्रत्येक गावात होतील. त्यामुळे दुष्काळी बीड जिल्ह्यात तहानलेल्या जनतेसाठी हजरावर टँकरच्या खेपा करून पाणी पुरवावे लागणार आहे. त्यासाठी आगामी काळात स्रोत शोधण्याचे काम ही प्रशासनाला करावे लागणार आहे.

४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

यामध्ये आष्टी, शिरूर, पाटोदा तालुक्यात सरासरी ६० किलोमीटर अंतररावर असलेल्या स्त्रोतावरून टँकरमध्ये पाणी आणावे लागेल. या टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी अंदाजे ४० कोटी रुपयांचा खर्च येणे अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’ फेसबुक कविसंमेलन आज

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जाणकार वाचकांचे प्रेम लाभलेले ‘महाराष्ट्र टाइम्स’ (औरंगाबाद आवृत्ती) सातव्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त रविवार, ९ डिसेंबर २०१८ रोजी फेसबुक कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कवींनी दोन स्वरचित कविता ‘मटा कविसंमेलन’ या फेसबुक पेजवर अपलोड कराव्यात.

मान्यवर कवी परीक्षण करणार असून पाच सर्वोत्कृष्ट कवितांची निवड करण्यात येईल. सर्वोत्कृष्ट कवितेसाठी कवीला प्रमाणपत्र आणि पारितोषिक देण्यात येणार आहे. या कविसंमेलनात तुमचा सहभाग अपेक्षित आहे. राज्यभरातील कवींसाठी ‘मटा फेसबुक कविसंमेलन’खुले आहे.

सहभागी होण्यासाठी लिंक :
https://www.facebook.com/मटा-कविसंमेलन-217802095326586/

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्नधान्य लागवडीत ३४ टक्क्यांची घट

$
0
0

Ramchandra.vaybhat@timesgroup.com

twitter : @ramvaybhatMT

गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळामुळे पाण्याची मोठी अडचण, त्यातही एखाद्यावर्षी चांगला पाऊस झाला, तर गारपीट, बोंडअळी, अतिवृष्टीसरख्या नैसर्गिक संकटांना शेतकरी तोंड देत असतो. यामुळे आर्थिक घडी सावरण्यासाठी शेतकरी आता नगदी पिकांकडे वळला असून, गेल्या २० वर्षांत ज्वारी, बाजरी, गहू आदी अन्नधान्यांचे उत्पादन करण्याऐवजी शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन या नगदी पिकांकडे वळाला आहे. या कालावधीत अन्नधान्यलागवड ४० टक्‍क्यांवरून सहा टक्क्यांवर आली आहे.

दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर महसूल प्रशसनाने मराठवाड्याचे संपूर्ण चित्र मांडले. गेल्या २० वर्षांपासून पीकपद्धतीत झालेला बदल, बदलेले ऋतूचक्र, उत्पादनात झालेली घट त्यामुळे बदललेली पीकपद्धती पथकातील अधिकाऱ्यांनी जाणून घेतली. मराठवाड्यात ८० टक्यांपेक्षा अधिक क्षेत्र कोरडवाहू असून, दहा टक्के भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. खात्रीशीर पाऊस पडणाऱ्या भागातही दोन ते तीन वेळेस 'ड्राय स्पेल' येतात. हाच प्रकार यावर्षीही घडला, पावसाच्या मोठ्या खंडामुळे पिकांची धुळाधाण उडाली. पावसाचे आगमन आणि समाप्ती यामध्ये झालेले बदलामुळे पिकांच्या उत्पादनात घट येत असल्याचे चित्र मराठवाड्यात काही दिवसांपासून आहे. उत्पादनाची खात्री नसल्यामुळे शिवाय अन्नधान्याला नसलेल्या भावामुळे गेल्या २० वर्षांमध्ये बहुतांश कोरडवाहू शेतीक्षेत्रातून किफायतशीर उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी कापसाला पसंती दिली, तर केवळ एक टक्का उत्पादन घेण्यात येणारे सोयाबीनच्या लागवडक्षेत्रात तब्बल ३६ टक्के वाढ झाली आहे, या कालावधीमध्ये ज्वारी, बाजरी या पिकांच्या लागवडीमध्ये मोठी घट झाली आहे.

\Bखरिपाचे क्षेत्र वाढले

\Bमराठवाड्यामध्ये १९९७ - ९८मध्ये ३० लाख ९० हजार हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात आली होती, मात्र बदलते ऋतूचक्रातील बदलामुळे २०१७ - १८पर्यंत खरिपाच्या क्षेत्रामध्ये १८.२१ लाख हेक्टरची भर पडली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रब्बीचे क्षेत्र होते, मात्र या कालावधीमध्ये जिल्ह्यातील भूम, परंडा भागातील बहुतांश रब्बी क्षेत्रात खरिपाची लागवड करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आली.

\Bनऊ लाख हेक्टरवरून ज्वारी, बाजरी गायब\B

ज्वारी, कडधान्याचे मोठे उत्पादन करणारा प्रदेश अशी मराठवाड्याची ओळख होती, मात्र सरकारी धोरण; तसेच समाधानकारक भाव नसल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये या परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. १९९७-९८च्या तुलनेत ज्वारी आणि बाजरी पिकांच्या लागवड क्षेत्राची तब्बल ९.३५ लाख हेक्टरने घट झाली आहे. १९९७-९८मध्ये १२.२६ लाख हेक्टरवर ज्वारी- बाजारीची लागवड करण्यात आली होती, २०१७-१८ मध्ये हे क्षेत्र केवळ २.९१ इतके शिल्लक राहिले आहे.

\Bमराठवाड्यातील खरिपाच्या पिकांचे क्षेत्र\B

पीक.........................१९९७ - ९८.................२०१७-१८

कापूस..................१०.७२ लाख हेक्टर..........१५.९२ लाख हेक्टर

सोयाबीन..............०.३१ लाख हेक्टर...............१७.२५ लाख हेक्टर

मका.....................१.९९ लाख हेक्टर.............२.७९ लाख हेक्टर

ज्वारी...................७.९९ लाख हेक्टर...............१.५५ लाख हेक्टर

बाजरी...................४.२७ लाख हेक्टर..............१.३६ लाख हेक्टर

गहू........................०.८९ लाख हेक्टर.............०.०७ लाख हेक्टर

भुईमूग....................०.५६ लाख हेक्टर............०.१८ लाख हेक्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२ हजार ८९५ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा (एनएमएमएस) घेण्यात आली. शहरात २ हजार ८९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी या हेतुने ही शिष्यवृत्ती केंद्र सरकारतर्फे दिली जाते. रविवारी परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता आठवीसाठी विविध शहरात परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना बौद्धिक क्षमता, शालेय क्षमता अशा स्तरावरील प्रश्नांची उत्तरे सोडताना कस लागतो. परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक असते. औरंगाबादमधील ९ केंद्रावरून परीक्षा झाली. परीक्षेसाठी ३ हजार ५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ हजार ८९५ विद्यार्थी उपस्थित होते. सकाळी १०.३० ते १२ या दरम्यान बौद्धिक क्षमता चाचणी (एमएटी) दुपारी १.३० ते ३ वाजे दरम्यान शालेय क्षमता चाचणी (एसएटी) अशा दोनस्तरावर परीक्षा झाली. परीक्षेला औरंगाबाद केंद्राहून १६२ विद्यार्थी अनुपस्थित होते, असे जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक वाय. एस. दाभाडे यांनी 'मटा'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेन्टॉर’ घडवित आहेत नवीन उद्योजक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

नवीन उद्योग उभारण्याची इच्छा असलेल्या युवकांसोबत शहरातील अनुभवी उद्योजक मेन्टॉर म्हणून काम करीत आहेत. आपल्या अनुभवातून नवे उद्योजक घडविण्याचे काम ते करू लागले आहेत.

देशात उद्योजक तयार व्हावे, या संकल्पनेतून भारतीय युवा शक्ती ट्रस्ट युवा उद्योजकता कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. औरंगाबादेत या ट्रस्टसोबत बजाज कंपनी सोशल रिस्पॉन्सीबिलीटी अंतर्गत काम करीत आहे. माजी राष्ट्रपती वेकंटरमन यांची कन्या लक्ष्मी वेकंटरमन यांनी भारतीय युवा शक्ती ट्रस्ट सुरू केली आहे. औरंगाबादमध्ये भारतीय युवा शक्ती ट्रस्टचे काम २०१६ पासून सुरू झाले आहे.

या ट्रस्टमध्ये १८ ते ३५ वयोगटातील युवकांना रोजगार सुरू करण्यासाठी मदत करण्यात येते. या ट्रस्टमध्ये आलेल्या युवकांकडून त्यांच्या उद्योगाची कल्पना समजून घेऊन ते उद्योग कसा सुरू करतील? याची माहिती देण्यात येत आहे. यासाठी शिक्षणाची अट फक्त युवक साक्षर असावा, त्याला लिहिता वाचता यावे एवढीच आहे. या युवकांना कोणत्या बँकेतून उद्योगाला अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे याची माहिती दिली जाते. याशिवाय प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा, हे मार्गदर्शन या संस्थेत देण्यात येते. शिवाय ट्रस्टच्या वतीने प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून त्याची तपासणी करून तो बँकेकडे पाठविण्यात येतो. या संस्थेच्या वतीने १ लाख ते ५० लाखांपर्यंत कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

नवीन उद्योजकाला कर्ज मिळाल्यानंतर त्याने व्यवसाय सुरू केल्यानंतर या उद्योजकांसाठी संस्थेच्या वतीने मेन्टॉर नेमण्यात येतो. हे मेन्टॉर म्हणजे शहरातील उद्योजकांमधून एक उद्योगपती आहे. नवीन उद्योजक आपले काम कसे करीत आहे? त्यांना काही अडचणी येत आहेत का? या अडचणीतून कसा मार्ग काढावा, व्यवसायाचा विकास व्हावा, त्याची भरभराट, विपणन, व्यवस्थापन, हिशोब ठेवणे, अशा विविध बाबींवर हे मेन्टॉर मार्गदर्शन करीत आहेत. मेन्टॉर किंवा संबंधित ट्रस्ट नवीन उद्योजकांकडून बँक लोन किंवा प्रशिक्षण यासाठी एकही रुपया आकारत नाही. हे सर्व मोफत केले जात आहे.

एक उद्योजक घडल्यास त्याच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळतो. यामुळे नवे उद्योजक घडविले जात आहेत. या माध्यमातून अनेक नवीन उद्योजक घडले आहेत. आगामी काळात ही संख्या वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

सचिन जोशी, प्रकल्प प्रमुख, भारतीय युवा शक्ती ट्रस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक समितीच्या उपाध्यक्षपदी अंकुश वाहूळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षक समितीच्या उपाध्यक्षपदी अंकुश वाहूळ यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र त्यांना अध्यक्ष विजय साळकर, सरचिटणीस रंजित राठोड यांनी दिले. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे त्यावेळी सांगण्यात आले. निवडीबद्दल मोहमंद गौस, जावेद अन्सारी, कडुबा साळवे, विलास चव्हाण, अंकुश इथर, संजय शेळके, बबन चव्हाण, संतोष पवार, शेषराव दाडगे, शिला बहादुरे, वनीता घेर, डी. एम. खाडे, नितीन नवले, चंदू लोखंडे, गणेश सोनवणे, कैलास ढेपळे, विजय पवार, भाऊसाहेब बोर्डे, राजेंद्र मुळे, कालीदास रणनवरे, रऊफ पठाण, काकासाहेब रोठे, गणेश पेहेरकर, सीताराम आहेर, रमेश पांचाळ, प्रभाकर डहाणे, सतीश कोळी, लिंबा साळुंके, अर्जून पिवळ, जहांगीर देशमुख यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे विभागाला पालिकेची नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद :

रेल्वेस्टेशन परिसरातील झाडांच्या बेकायदा छाटणीप्रकरणी रेल्वे प्रशासनाला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती महापालिकेचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी दिली.

रेल्वेस्टेशनवरील झाडांवर 'दमरे'च्या महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यापूर्वी झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा प्रकार समोर आला. यासाठी महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगीच घेण्यात आलेली नसल्याने पर्यावरणप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वेस्टेशनवर १२ डिसेंबर रोजी दक्षिण-मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा पाहणी दौरा आहे. त्यामुळे रेल्वेस्टेशनवर विविध कामांचा सपाटा सुरू आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयाच्या परिसरात 'की मॅन'साठी इमारत बांधण्यात येत आहे. औरंगाबाद रेल्वेस्टेशन परिसरात असलेल्या झाडांची विनापरवानगीच छाटणी करण्यात आल्याचे समोर आले. या सगळ्याची गंभीर दखल घेत मनपाने रेल्वे प्रशासनाला नोटीस बजावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्याचे अवशेष नारंगी धरणात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

वैजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारंगी तलावात जुन्या रस्त्याची डांबरमिश्रित खडी टाकली जात आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने तलावात वेगवेगळ्या ठिकाणी डांबराचे ढीग रचून ठेवल्याने भविष्यात पिण्याचे पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे रामचंद्र पिल्दे यांनी उपविभागिय अधिकारी डॉ. संदीपान सानप व अन्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वैजापूर शहरातून जाणाऱ्या येवला हद्द ते शिऊरपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असून, हे काम पुणे येथील कन्स्ट्रक्शन्स कंपनीला देण्यात आले आहे. रस्त्याचे काम करताना जुना रस्ता उखडल्यानंतर त्यातून उरणारे रस्त्याचे अवशेष हा जवळच्या नारंगी धरणाच्या पिचिंगवर, धरणक्षेत्रात ढीग रचून ठेवला जात आहे. त्यामुळे आधीच गाळामुळे पाणीसाठवण क्षमता कमी झालेल्या नारंगी तलावात अडचणीची भर पडत आहे. शिवाय भविष्यात नारंगी तलावात पाणी आल्यास हे पाणी डांबरामुळे दूषित होऊन आरोग्यास घातक होण्याची शक्यता वाढली आहे. हे पाणी शहरवासीयांना पिण्यासाठी पुरवल्यास अनेक आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणक्षेत्रात टाकलेले रस्त्याचे अवशेष त्वरित हटवून त्याचा वापर ग्रामीण भागातील रस्ते व इतर बांधकामासाठी करण्यात यावा, अशी सूचना प्रहारच्या कार्यकर्त्यांनी उपविभागिय अधिकारी. डॉ. सानप यांच्याकडे केली आहे. याबाबत सूचना देऊनही कंत्राटदाराने रस्त्याचे अवशेष काढले नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर अरुण कुमावत, अभय त्रिभुवन, अभिषेक देशमुख, रामेश्वर साळुंके, नामदेव दाणे, राम साळुंके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images