Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वाहतूक नियमाचे मोडल्यास आता लायसेन्स होणार रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनधारकांचा आता वाहन परवाना धोक्यात येणार आहे. पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांनी हे आदेश जारी केले आहेत. यामध्ये विविध सहा प्रकारच्या गुन्ह्याचा समावेश असून, तीन महिन्यांच्या कालावधीसाठी हे लायसेन्स रद्द करण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती के. एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सुरक्षा समितीची स्थापना केली आहे. ही समिती देशातील सर्व राज्यांना रस्ते सुरक्षेसंदर्भात वेळोवेळी निर्देश देते. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये राज्यांमधील अपघात, मृत्यूचे प्रमाण यावर चिंता व्यक्त करण्यात आली; तसेच पोलिस विभागातर्फे वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या चालकांचा वाहन परवाना निलंबित स्पष्ट निर्देश दिले आहेत.

यामध्ये खालील सहा प्रकारच्या गुन्ह्याचा समावेश आहे. त्यात विहित मर्यादापेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे, मद्य प्राशन करून वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे आदी कलमांचा समावेश आहे. पोलिस विभाग प्रादेशिक परिवहन कार्यालयाला वाहनचालकाच्या गुन्ह्याची माहिती देत परवाना रद्द करण्यासंदर्भात अहवाल पाठवणार आहे. याच्या नोंदी संगणक प्रणालीत घेण्यात येणार असून, यामुळे वाहनचालकांना भविष्यात शासकीय सुविधा, पासपोर्ट काढण्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. वाहनचालकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा दिवसांत आठ हजार ग्राहकांची वीज खंडित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वीजबिल थकबाकीदारांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने तीव्र केली आहे. या मोहिमेत औरंगाबाद परिमंडळातील सुमारे आठ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे, अशी माहिती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

परिमंडळात समावेश असलेल्या औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण व जालना या तिन्ही मंडळात थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ४३ हजार ३०६ ग्राहकांकडे १३२ कोटी आठ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी औरंगाबाद शहरात ११ हजार ४५९ ग्राहकांकडे ३२ कोटी ९४ लाख, औरंगाबाद ग्रामीणमध्ये १७ हजार ग्राहकांकडे ५१ कोटी ६६ लाख, तर जालना मंडळात १४ हजार ८४४ ग्राहकांकडे ४७ कोटी ४८ लाख रुपये थकित आहेत. सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या १७७९ जोडण्यांची ५४ कोटी ५० लाख रुपये, तर शहरी भागातील पथदिव्यांच्या ४४८ जोडण्यांची आठ कोटी ७९ लाख रुपये थकबाकी आहे.

यापैकी ११४६ ग्राहकांचा वीजपुरवठा गेल्या दहा दिवसांत एक कोटी ९६ लाखांच्या थकबाकीसाठी कायमस्वरूपी खंडित केला आहे. त्यात औरंगाबाद शहर मंडळातील ८४ (थकबाकी ३८ लाख), औरंगाबाद ग्रामीण ५९४ (थकबाकी ८५ लाख), जालना मंडळातील ४६८ (थकबाकी ७३ लाख) ग्राहकांचा समावेश आहे. तसेच ६७९८ ग्राहकांचा वीजपुरवठा १४ कोटी ७८ लाखांच्या थकबाकीसाठी तात्पुरता खंडित केला आहे. त्यात औरंगाबाद शहर मंडळातील १९०३, औरंगाबाद ग्रामीण २५०६ व जालना मंडळातील २३८९ ग्राहकांचा समावेश आहे. वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी वीजबिलांचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन गणेशकर यांनी केले आहे.

\Bमोहिमेतील वसुली\B

\Bमंडळ रुपये \B

\Bऔरंगाबाद शहर १ कोटी ६८ लाख

औरंगाबाद ग्रामीण ३ कोटी ३५ लाख

जालना २ कोटी ७७ लाख

एकूण ७ कोटी ८० लाख \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेबर कॉलनीची लवकरच पाडापाडी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल १३ एकर मोक्याच्या जागेवर उभ्या असलेल्या लेबरकॉनलीचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, ही कॉलनी लवकरच पाडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या जागेवर मंत्रालयाच्या धर्तीवर विभागीय प्रशासकीय संकुल उभारण्यात येणार आहे.

गेल्या आठवड्यात लेबर कॉलनी येथील घरांमध्ये सध्या कोण राहत आहे, सदनिका कुणासाठी देण्यात आली होती, किती जागेवर अतिक्रमण केले आहे, अतिरिक्त बांधकाम किती आहे याबाबतचे सर्वेक्षण बांधकाम विभाग, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे केली. लेबर कॉलनीचे संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. यामध्ये अनेक मुद्द्यांची पाहणी केली मात्र त्यातील काही मुद्दे गोपनीय असल्याचे त्यांनी सांगितले. लेबर कॉलनीचा ताबा कायदेशीररीत्या घेता यावा, यासाठी तज्ज्ञांनी मागील तीन महिने काम केले आहे. या ठिकाणी मुळ नागरिक राहत नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मध्यंतरी पावसाळा आणि दिवाळीमुळे प्रशासनाने कारवाई केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासकीय संकुलासाठी लेबर कॉलनीतील १३ एकर जागेवर ४० कोटींच्या जवळपास खर्च होण्याची शक्यता असून, येत्या काही महिन्यांमध्ये इमारतीचा आराखडाही तयार करण्याची शक्यता आहे. लेबर कॉलनीतील जागेचा कायदेशीररीत्या ताबा मिळताच अंदाजपत्रक तयार करून शासनाकडून मंजुरी घेण्यात येणार आहे. तीन वर्षांपर्यंतचा कालावधी ते संकुल बांधण्यासाठी लागणार असून, या संकुलामध्ये ४५हून अधिक सरकारी कार्यालये, अद्ययावत सभागृह राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिवे मारण्याचा प्रयत्न; दोघांना अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुलाला मारल्याचा जाब विचारणाऱ्यांवर चाकुने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहाजणांपैकी शाहरुख उर्फ फिरोज शेख अकबर शेख व अल्ताफ अकबर पठाण यांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले असता, दोघांना शनिवारपर्यंत (१५ डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी दिले.

या प्रकरणात मज्जित चंदू शेख (४५, रा. जोगेश्वरी, ता. गंगापूर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीचा मुलगा समीर शेख हा ब्रुकबॉन्ड परिसरातील मशिदीमध्ये मौलाना असून, तो मशिदीमधील मुलांना शिकवतो. नऊ डिसेंबर रोजी सकाळी समीरचा फिर्यादीला फोन आला. मुलांना शिकवताना एका मुलाला चापट मारली म्हणून त्या मुलाच्या नातेवाईकांनी मला मारहाण केली असून, मला घ्यायला या, असे समीरने फिर्यादीला फोनवर सांगितले. त्यानंतर फिर्यादी हा शेजारी राहणाऱ्या दोन मुलांसह दुचाकीवर समीरला आणण्यासाठी मशिदीमध्ये गेला अलता, तिथे अन्सार अकबर पठाण, एजाज अकबर पठाण, रज्जाक अकबर पठाण, मन्सूर अकबर पठाण, अजहर शेख, शेख शाहरुक शेख अकबर व इतर जमले होते. त्यांना फिर्यादीने मारहाणीचा जाब विचारला असता, अन्सार अकबर पठाण व एजाज अकबर पठाण यांनी समीर, वसीम व फिर्यादीच्या सोबत असलेल्या फरहान शेख यांच्यावर चाकुने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच रज्जाक पठाण, मन्सूर पठाण, अजहर शेख व शेख शाहरुक यांनी काठ्यांनी मारहाण केली. प्रकरणात सहाजणांवर चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी शाहरूख उर्फ फिरोज शेख अकबर शेख (२४) व अल्ताफ अकबर पठाण (२६, दोघे रा. आलाना गेवराई ब्रुकबॉन्ड) यांना अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपींच्या साथीदारांना अटक करणे बाकी आहे. तसेच आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करावयाचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील जरिना दुर्राणी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने दोघांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण येथील संतपीठाचा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या २० वर्षांपासून रखडलेला पैठण येथील नियोजित संतपीठ सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर येथील पावसाळी अधिवेशानात राज्य सरकारने संतपीठासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने मंगळवारी राज्य सरकारला संतपीठाचा अहवाल सादर केला.

राज्य शासनाने नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात संत-महंतांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन संतपीठाचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर प्र-कुलगुरू डॉ. तेजनकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीत उच्च शिक्षण सहसचिव डॉ. सिद्धार्थ खरात, माजी उपमहापौर संजय जोशी यांचा समावेश होता. या समितीने संतपीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्याचा अहवाल तयार केला. हा अहवाल राज्य शासनाच्या वतीने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयलयाला पाठवला जाणार आहे. संतपीठासाठी आवश्यक इमारत व वसतिगृहांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तेथे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि निधी देण्याची गरज आहे. याबाबत सविस्तर अहवाल डॉ. तेजनकर यांनी विविध तज्ज्ञांच्या सहाय्याने तयार केला. हा अहवाल मंगळवारी मंत्रालयात झालेल्या संत परिषदेत विनोद तावडे यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर उपस्थित होते. संतपीठाला केंद्रीय दर्जा मिळवण्यासाठी प्रस्ताव तत्काळ पाठविण्यात येईल. राज्य शासन येत्या जूनपासून संतपीठात अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी निधी देणार असून पदांना मंजुरी देण्यात येईल, असे तावडे यांनी जाहीर केले.

\Bशंभर कोटींची मागणी \B

संतपीठ विकासासाठी १०० कोटी रुपये निधीची गरज आहे. येत्या जूनपासून अभ्यासक्रम सुरू करणे आवश्यक असून प्राध्यापकाच्या दोन, सहयोगी प्राध्यापकांच्या चार आणि सहायक प्राध्यापकांच्या सहा जागा आणि शिक्षकेतर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ११ जागांना मान्यता देण्याबाबतचे मत अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या परवाना शुल्कास व्यापाऱ्यांचा प्रखर विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका हद्दीत व्यवसाय करणाऱ्यांना परवाना व त्यापोटी शुल्क आकारणीला व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. महापालिकेने हा प्रस्ताव मंजूर करू नये, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हा व्यापारी महासंघाने दिला आहे.

महापालिका शहरातील व्यापाऱ्यांवर व्यवसाय परवाना घेण्याचे बंधन आणू पाहात आहे. परवाना व त्यासाठी भरसाठ शुल्क आकारले जाणार आहे. शिवाय दरवर्षी नूतनीकरण शुल्क द्यावे लागणार आहे. हा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळताच तो लागू होणार आहे. प्रस्तावाला विरोध करत व्यापाऱ्यांनी मंगळवारी आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेतली. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, सचिव लक्ष्मीनारायण राठी, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) राज्य प्रतिनिधी अजय शहा, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी, कचरू वेळंजकर, सहसचिव जयंत देवळाणकर, गुलामी हाकाणी, आनंद बोरकर आदी उपस्थित होते.

\Bनवीन कर नको \B

प्राप्तिकर, जीएसटी, शॉप अॅक्ट, मालमत्ता कर, स्वच्छता-ड्रेनेज-साफसफाई व कचरा संकलन कर व्यापारी अदा करतात. त्यात दुकानाचे भाडे, वीजबिल, कर्मचाऱ्यांचा पगार आदी खर्च असून व्यवसाय स्पर्धा ‌वाढत आहे. परिणामी अडचणीत आलेल्या व्यापाऱ्यांवर आणखी एका कराचा भार टाकू नये, अशी मागणी व्यापारी महासंघाने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्ष, वन्यप्राण्यांचे सवंर्धन करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वृक्ष, पर्यावरण, प्राणीमात्रांचे संरक्षण व जतन करा, असा संदेश देत दहा बालकांनी महापौर नंदकुमार घोडेल यांची भेट घेत सिद्धार्थ उद्यानातील वन्यप्राण्यांची अधिक चांगल्या पद्धतीने देखभाल व्हावी, जतन व्हावे, अशी अपेक्षा केली. दरम्यान, विषयावर श्री गुरू जम्भेश्वर पर्यावरण वन्यजीव संवर्धन संस्थेचे पदाधिकारी तसेच या बालकांनी मंगळवारी महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयातही सदिच्छ भेट देत उपक्रमबाबत माहिती दिली.

बिश्नोई समाज हा प्राणी, वृक्ष यावर विशेष प्रेम करणार आहे. वृक्षाचे जतन व संरक्षण करण्यासाठी समाजबांधवांनी वेळप्रसंगी बलिदान दिले आहे. प्राण्यांच्या शिकार, मांसाहार, वृक्ष तोडणे हा गंभीर गुन्हाच मानला जातो. दरम्यान, पर्यावरण, वृक्ष, वन्यप्राण्यांचे संरक्षण याच विषयावर श्री गुरू जम्भेश्वर पर्यावरण वन्यजीव संवर्धन संस्थेच्या माध्यमातूनही कार्य केले जात आहे. संस्थेतील काही शाळकरी मुले नुकतेच सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात सहलीनिमित्ताने गेले होते. त्यावेळी तेथील वन्यप्राण्यांची अवस्था बिकट असल्याचे त्यांना जाणवले. त्यांना राहण्यासाठी चांगला अधिवास निर्माण करा, जतन व संवर्धन करा, अशी मागणी करत या मुलांसह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेत चर्चा केली. विशेष म्हणजे सर्व बालक विविध वन्यप्राण्यांच्या वेशभूषेत या भेटीला आले होते.

या भेटीनंतर संस्थेचे पदाधिकारी व या मुलांनी 'महाराष्ट्र टाइम्स' कार्यालयास सदिच्छा भेट दिली. वृक्ष, वन्यप्राणी वाचवा, त्यांचे जतन व सवंर्धन करा अन्यथा ते नाहीसे होतील. पर्यावरणाचा ऱ्हास होईल, असे म्हणत मुलांसह संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या जनजागृती अभियानाबाबत संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा करताना माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष संदीप बिश्नोई, उपाध्यक्ष ओमाराम बिश्नोई, सचिव रमेश बिश्नोई, कोषाध्यक्ष गोकुल बिश्नोई यांच्यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

\B'प्राणिसंग्रहालयत बंद होणार नाही'\B

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय बंद होणार, अशी चर्चा होत असून, ते बंद होऊ देऊ नका तर तेथील प्राण्यांना राहण्यासाठी चांगली व्यवस्था करा, अशी मागणी यावेळी या मुलांनी केली. त्यावर बोलताना महापौर घोडेले यांनी प्राणी संग्रहालय बंद होणार नाही, असे नमूद करत अनेक दुर्मिळ प्राणी येथे असून, सर्व प्राण्यांची योग्य पद्धतीने काळजी घेतली जाते, अशी माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चे जानेवारीत आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे तिसरी 'नॅशनल टीचर्स काँग्रेस' चार ते सहा जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. 'भविष्यदर्शी उच्च शिक्षणाकडे झेपावताना' हा परिषदेचा मुख्य विषय असणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय समन्वयक डॉ. सुधीर गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हा कार्यक्रम पुणे येथील विद्यापीठाच्या परिसरात होणार आहे. या परिषदेला देशभरातून पाच हजार शिक्षक येणार आहेत. परिषदेचे अध्यक्ष व जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे बीजभाषण करणार आहेत. यावर्षी चेन्नई येथील 'ग्रेट लेक्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट'चे प्रा. बाला बालचंद्रन, 'एआयसीटीई'चे चेअरमन प्रा. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, 'वेल्लूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'चे डॉ. जी. विश्‍वनाथन यांना 'जीवन गौरव पुरस्काराने' सन्मानित करण्यात येणार आहे. परिषदेत विविध शैक्षणिक संस्थांचा सहभाग असणार आहे. परिषदेत 'उच्च शिक्षणाची भविष्य काळातील झेपः संधी आणि आव्हाने', 'वैश्‍विक मुल्याधिष्ठित उच्च शिक्षण', 'भविष्यकालीन उच्च शिक्षणाची पूर्वतयारी', 'शाश्‍वत विकासाची उद्दिष्टे आणि युनिसेफ', 'भविष्याकाळासाठी योग्य शिक्षण आणिः उच्च शिक्षणाचा योग्य मार्ग', 'भारतामधील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेची चळवळः वर्तमान आणि भविष्य' आदी विषयांवर मार्गदर्शन, चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे, डॉ. गव्हाणे यांनी सांगितले.

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बँकेस फसविणाऱ्याचा कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बँक स्टेटमेंट, इन्शुरन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, रसिस्ट्रीची प्रत आदी सर्व बनावट कागदपत्रे सादर करून कारसाठी कर्ज घेऊन इंडसइंड बँकेला नऊ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणात अटक आरोपी मंगेश सदन फुंगसकर याच्या पोलिस कोठडीत शुक्रवारपर्यंत (१४ डिसेंबर) वाढ करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एम. काकडे यांनी मंगळवारी (११ डिसेंबर) दिले.

याप्रकरणी इंडसइंड बँकेच्या अदालत रोड शाखेचे व्यवस्थापक भागवत प्रभाकर दसपुते यांनी तक्रार दिली होती. फिर्यादीनुसार, कृष्णा धनसिंह ठाकूर व सुजीत सुनीलराव देशमुख अशी स्वतःची नावे सांगून दोघांनी कारसाठी कर्जाची मागणी केली व सर्व आवश्यक कागदपत्रे बँकेत सादर केली. कागदपत्रांची तपासणी थर्ड फाइंडर सर्व्हिंसेस या एजन्सीने केली व सर्व कागदपत्रे योग्य असल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर बँकेने ११ जून २०१८ रोजी सहा लाख ९७ हजार रुपयांचे कर्ज कृष्णा धनसिंह ठाकूर व सहकर्जदार सुजीत सुनील देशमुख यांना मंजूर केले होते. कारचा दुसरा हप्ता मुदतीत न भरल्याने बँक कर्मचारी कृष्णा ठाकूर याच्या पत्त्यावर गेला असता, त्या ठिकाणी कोणीही कृष्णा ठाकूर राहात नसल्याचे आढळून आले. सहकर्जदार सुजीत देशमुख याच्या फोनवर संपर्क साधला असता, कृष्णा ठाकूर याला ओळखत नसल्याने देशमुख याने सांगितले, मात्र स्वतःच्या कर्जासाठी एकाकडे कागदपत्रे दिल्याचेही देशमुख याने सांगितले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपी मंगेश सदन फुंगुसकर (३०, रा. सातारा परिसर) याने सर्व बनावट कागदपत्रे सादर करुन कर्ज मिळवल्याचे समोर आले. आरोपी मंगेश याला त्याच्या मोबाइल क्रमांकाच्या आधारे गोव्यातून ताब्यात घेत अटक करण्यात आली होती व मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आरोपीला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीच्या पोलिस कोठडीत शुक्रवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिनी घाटीत लवकरच सिझेरियन शस्त्रक्रिया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिनी घाटी अर्थात चिकलठाणा परिसरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसुती सेवा सुरू झाली असून, शनिवारी (८ डिसेंबर) रुग्णालयात पहिली प्रसुती झाली आणि आता एकामागोमाग एक प्रसुती होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचबरोबर आता सिझेरियन शस्त्रक्रियाही होणार आहे. स्त्रीरोग विभागाच्या शल्यचिकित्सागृहाच्या निर्जंतुकीकरणाचा अपेक्षित अहवाल प्राप्त होताच सिझेरियन शस्त्रक्रिया सुरू होणार आहेत. पुढच्या टप्प्यात अपघात विभागासह २१ विभाग टप्प्याटप्प्याने सुरू होण्याचे प्रशासकीय संकेत आहे.

दोनशे खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उद्घाटनाचा मुद्दा बाजुला पडला असला तरी रुग्णालयातील एक-एक विभाग कार्यान्वित होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. रुग्णालयात काही महिन्यांपूर्वी बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) आणि आंतररुग्ण विभाग (आयपीडी) सुरू झाला. विशेष म्हणजे 'ओपीडी'मध्ये आतापर्यंत ४२ हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर, तर सुमारे २०० रुग्णांवर 'आयपीडी'मध्ये उपचार झाले. सध्या दोन्ही वेळच्या 'ओपीडी'मध्ये दररोज सुमारे ६०० रुग्णांवर उपचार होत आहे. आयुर्वेद ओपीडी, किमोथेरपी सेंटर रुग्णालयात सुरू झाले असतानाच लसीकरण विभागही रुग्णालयात कार्यान्वित झाला आहे. सिटी स्कॅन मशीनसाठीचे गरजेचे काम सुरू असून, लवकरच सिटी स्कॅनची सुविधा रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. रुग्णालयामध्ये तीन शल्यचिकित्सागृह (ओटी) असणार आहेत. त्यातील 'जनरल सर्जरी' व 'स्त्रीरोग'ची 'ओटी' सज्ज असून, डोळ्यांसाठी अत्याधुनिक प्रकारच्या 'मॉड्युलर ओटी'चेही काम रुग्णालयामध्ये सुरू आहे. आतापर्यंत अस्थिरोगासंबंधीच्या सुमारे ६५ किरकोळ शस्त्रक्रिया रुग्णालयात झाल्या असून, निर्जंतुकीकरणाच्या अपेक्षित अहवालानुसार सिझेरियन शस्त्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. रुग्णालयाच्या सेवेत स्त्रीरोगतज्ज्ञ, कान-नाक-घसातज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ असल्याने रुग्णालयामध्ये 'सुपरस्पेशासिटी'वगळता इतर अनेक उपचार-शस्त्रक्रिया होऊ शकतील. अर्थात, पहिल्या टप्प्यात सिझेरियन शस्त्रक्रिया सुरू होतील, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

\B'स्त्रीरोग'च्या इतर शस्त्रक्रियाही होणार

\Bसिझेरियन शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर गर्भपविशवी काढणे, संतती नियमन आदी स्त्रीरोगासंबंधीच्या शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहेत. त्यापुढच्या टप्प्यात अपघात विभाग व त्यानंतर हळूहळू सर्व २१ विभागही सुरू होतील. त्याची सुरुवात 'स्त्रीरोग'च्या सेवांपासून होईल. निर्जंतुकीकरणाचा अहवाल लवकरच उपलब्ध होईल व शस्त्रक्रियांचा श्रीगणेशा होईल, असेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

......

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मौलानाला मारहाण, आणखी तिघांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुलाला मारल्याचा जाब विचारणाऱ्यांवर चाकुने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात रज्जाक अकबर पठाण, मन्सूर अकबर पठाण व एजाज अकबर पठाण या आरोपींना बुधवारी (१२ डिसेंबर) कोर्टात हजर करण्यात आले असता, तिघांना शनिवारपर्यंत (१५ डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी दिले.

या प्रकरणात मज्जित चंदू शेख (४५, रा. जोगेश्वरी, ता. गंगापूर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीचा मुलगा समीर शेख हा ब्रुकबॉन्ड परिसरातील मशिदीमध्ये मौलाना असून तो मशिदीमधील मुलांना शिकवतो. मुलांना शिकवताना एका मुलाला चापट मारली म्हणून त्या मुलाच्या नातेवाईकांनी मला मारहाण केली, असे समीर याने नऊ डिसेंबर रोजी फिर्यादीला फोन करून सांगितले होते. त्यानंतर फिर्यादीने शेजारी राहणाऱ्या दोन मुलांसह घटनास्थळी धाव घेतली असता, तेथे अन्सार अकबर पठाण, एजाज अकबर पठाण, रज्जाक अकबर पठाण, मन्सूर अकबर पठाण, अजहर शेख, शेख शाहरूख शेख अकबर यांनी फिर्यादी, समीर व इतरांना गंभीर मारहाण केली होती. प्रकरणात सहाजणांवर चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी शाहरुख उर्फ फिरोज शेख अकबर शेख व अल्ताफ अकबर पठाण (दोघे रा. आलाना गेवराई ब्रुकबॉन्ड) यांना यापूर्वीच अटक करून दोघांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात रज्जाक अकबर पठाण (२१), मन्सूर अकबर पठाण (३२), एजाज अकबर पठाण (२४, सर्व रा. आलाना गेवराई ब्रुकबॉन्ड) या आरोपींना बुधवारी अटक करून कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांनाही शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सहायक सरकारी वकील जरिना दुर्राणी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमजीएम’मध्ये विद्यार्थिनीचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यभर नावलौकिक कमावलेल्या महात्मा गांधी मिशन संस्थेच्या 'एमजीएम' कँपसमधील वसतिगृहात राहणाऱ्या फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीचा खून झाल्याचे उघड झाल्याने शैक्षणिक क्षेत्र ढवळून निघाले आहे. आकांक्षा अनिल देशमुख (वय २२, रा. झेंडा चौक, माजलगाव) असे या तरुणीचे नाव असून, सध्या ती गंगा हॉस्टेलमध्ये खोली क्रमांक ३३४ मध्ये राहत होती.

आकांक्षा ही सोमवारी रात्री सव्वानऊ वाजता जेवण करून वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या तिच्या खोलीत परतली. तिची रूममेट सोमवारीच गावाकडे निघून गेल्याने ती खोलीत एकटीच होती. मंगळवारी दिवसभर आकांक्षा रूमबाहेर पडली नाही. रात्री ती हजेरीसाठी देखील आली नसल्याने हॉस्टेल रेक्टरच्या हा प्रकार लक्षात आला. रेक्टरने तिची रूम गाठून दरवाजा ढकलला असता तो केवळ लोटला असून, आतून दरवाजाला खुर्ची लावल्याचे दिसून आले. आत पाहिले असता आकांक्षा जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडलेली होती. रेक्टरने 'एमजीएम'च्या

नर्सिंग कॉलेजमध्ये लेक्चरर असलेला तिचा चुलत भाऊ राहुल देशमुख यांना ही माहिती दिली आणि आकांक्षाला तातडीने 'एमजीएम' रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिला तपासून रात्री साडेदहा वाजता मृत घोषित केले. बुधवारी सकाळी घाटीच्या शवविच्छेदनगृहात आकांक्षाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. तेव्हा तिचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

\Bखोलीची घेतली झडती

\Bसिडको पोलिसांनी मंगळवारी रात्री आकांक्षाची खोली सील केली होती. बुधवारी दुपारी या खोलीची पोलिस उपायुक्त राहुल खाडे, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी तीन तास झाडाझडती घेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिडको पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पोलिसांनी तिच्या खोलीची बुधवारी दुपारी झडती घेतली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास करणार आहोत. आकांक्षाच्या मृत्यूप्रकरणात अनेक संशयास्पद बाबी आढळल्या आहेत. सध्या तिचे नातेवाईक नसल्यामुळे पोलिसांच्या वतीने तक्रार दाखल करून तपास करण्यात येणार आहे.

- राहुल खाडे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

साताऱ्याचे ग्रामदैवत आणि पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या खंडोबा यात्रेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. यानिमित्त अभिषेक, महाआरती, महानैवैद्य, पालखी सोहळा आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी आजपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून यळकोट, यळकोट, जय मल्हारच्या गजराने परिसर दुमदुमला आहे.

सातारा येथे जुने हेमाडपंती खंडोबा मंदिर आहे. खंडेरायाच्या चंपाषष्ठी महोत्सवाची मंदिराच्या विश्वस्त मंडळाने जय्यत तयारी केली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून अभिषेक केला जाईल. त्यानंतर पहाटे चंपाषष्ठी निमित्ताने प्रथेप्रमाणे भरीत व रोडगा असा नैवद्य दाखविण्यात येतो, अशी माहिती पुजारी दिलीप धुमाळ यांनी दिली. देवस्थान मंडळाचे अध्यक्ष साहेबराव पळसकर व सचिव गंगाधर पारखे म्हणाले, महानैवैद्य झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते महाआरती होणार आहे. त्यानंतर पंरपरेनुसार सकाळी आठनंतर खंडोबाच्या मूर्तीची पालखी दांडेकर वाड्यापर्यंत काढण्यात येईल. तेथे रुद्राअभिषेक घालून नैवैद्य दाखविला जाईल. त्यानंतर रात्री आठ वाजता पुन्हा मिरवणूक मंदिरात येईल. मंदिर व परिसरात रंगरंगोटी करण्यात आली असून, सर्वत्र रोषणाई करण्यात आली आहे. परिसरात साफसफाई करण्यात केली आहे. पाणी, स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेच्या पुढाकाराने आरोग्य तपासणी केंद्रही उभारण्यात आले आहे. पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. यात्रेनिमित्त येतील मैदानावर पूजा साहित्य, खेळणी व इतर दुकाने थाटण्यात आली आहेत.

\Bरस्त्याचे काम अपूर्ण

\Bभाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. दर्शन सुलभरित्या घेता यावे, यासाठी खास रांग व्यवस्था केली असून गावातील शेकडो स्वंयसेवकांची मदत घेतली जात आहे. दरम्यान, एमआयटी कॉलेज ते खंडोबा मंदिरापर्यंत सिमेंट रस्त्याचे काम महापालिकेने हाती घेतले होते. मात्र, ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. परिणामी, या अर्धवट झालेल्या कामामुळे वाहनधारकांना येथून ये जा करताना कसरत करावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेची बॅटरी दोन वर्षांत चार्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'विभागातून जाणाऱ्या रेल्वेचा वेग वाढावा यासाठी मनमाड ते मुदखेड दरम्यान रेल्वे विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी दोन वर्षांत नांदेड रेल्वे विभाग १०० टक्के विद्युतीकरण होईल,' अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोद कुमार यादव यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

यादव यांनी आज औरंगाबाद रेल्वे स्थानकाची पाहणी केली. पाहणीनंतर बोलताना ते म्हणाले, 'नांदेड रेल्वे विभागातील रेल्वे वाहतूक वेगात व्हावी, यासाठी विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत मनमाड ते मुदखेड दरम्यान रेल्वेचे विद्युतीकरण करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. २५ नोव्हेंबर रोजी ही निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात आली. महिनाभरात विद्युतीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येणार आहे. हे काम अतिशय वेगात होणार असून, ते दोन वर्षांत पूर्ण होईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर नांदेड रेल्वे विभागाचे शंभर टक्के विद्युतीकरण होणार आहे,' असेही यादव म्हणाले.

\Bपरभणी-मुदखेड मार्ग मार्चमध्ये पूर्ण

\B'नांदेड विभागात परभणी ते मुदखेड दरम्यान रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. यात दोन पुलांचे काम प्रगती पथावर आहे. यातील दुहेरीकरणाचे काम मार्च २०१९पर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच परभणी ते मनमाड रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास आगामी तीन वर्षात मनमाड ते परभणी दरम्यान रेल्वे मार्ग दुहेरी होणार आहे,' अशी माहितीही यावेळी यादव यांनी दिली.

(संबंधित वृत्त : पान ३)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माथाडी कायद्याची मोडतोड थांबवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माथाडी कायद्याची मोडतोड थांबून सर्वत्र काटेकोर अंमलबजावणी करा, यासह अन्य मागण्यांसाठी मराठवाडा लेबर युनियनने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

हमाल मापाड्यांना न्याय मिळालाच पाहिजे यासह अन्य घोषणाबाजी करत सकाळी दहा वाजल्यापासून महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरुवात झाली. आंदोलनकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. बाजार समिती क्षेत्रात कार्यरत मापाडी (तोलाईदार) यांच्या नोकरीवर गदा आणण्याचा डाव पणन विभागाने आखला आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यासंदर्भात पणन संचालकांनी एक डिसेंबर २०१८ रोजी काढलेले परिपत्रक त्वरीत रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली. सर्व मापाडी कामगारांना बाजार समित्यामध्ये कायम स्वरुपी नोकरीत सामावून घेण्यात यावे. शासकीय गोदामातील माथाडी कामगारांच्या पाठीला लीलाव तत्काळ बंद करा. बेकायदेशीरपणे कामावरून कमी केलेल्या माथाडी कामगारांना पूर्ववत कामावर घ्या, माथाडी कामगारांची विविध आस्थापनाकडे असलेली थकबाकी त्वरित वसूल करा, यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. अॅड. विष्णू ढोबळे, युनियनचे सरचिटणीस देविदास कीर्तीशाही, कोषाध्यक्ष प्रवीण सरकटे, उपाध्यक्ष छगन गवळी, अली खान, किरण पगारे, संजय पाटील यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाबाजानी दुर्राणी, हबीब यांना दिलासा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी , औरंगाबाद

वक्फ बोर्डाच्या काही मालमत्ता भाडेतत्वावर देण्याचा ठराव वक्फ बोर्डाचे सदस्य बाबाजानी दुर्राणी, हबीब फकी आदींनी घेतला होता. त्याअनुषंगांने सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश अल्पसंख्यांक विभागाच्या अवर सचिवांनी १४ सप्टेंबरला दिला होता. त्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाचे न्या. रोहिंग्टन फली नरीमन आणि न्या. नवीन सिन्हा यांनी स्थगिती दिली. या याचिकेत प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील एस. एस. काझी यांनी दिली.

ठरावाच्याअनुषंगाने वक्फ बोर्ड सदस्य दुर्राणी अब्दुल्ला खान लतीफ खान उर्फ बाबाजानी दुर्राणी, हबीब फकी, जमील अहेमद जानी मिया, जैनुद्दिन जवेरी, अ‍ॅड. आसीफ शौकत कुरेशी, गुलाम वसनवी व इतर यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश अल्पसंख्यांक विभागाच्या अवर सचिवांनी १४ सप्टेंबर २०१८च्या पत्रालाद्वारे महाराष्टÑ राज्य वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला होता. त्या पत्राच्या नाराजीने हबीब फकी आणि बाबाजानी दुर्राणी यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सुनावणीअंती खंडपीठाने चार ऑक्टोबर २०१८ रोजी याचिका फेटाळली होती. या आदेशाविरुद्ध दोघांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष परवानगी अर्ज (एसएलपी) दाखल केला होता.

ज्येष्ठ विधिज्ञ सलमान खुर्शीद यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना निदर्शनास आणून दिले की, वक्फ बोर्ड सदस्यांनी त्यांच्या कार्यकाळात कायद्याने दिलेल्या अधिकारांचा वापर केला. सदस्यांनी पारीत केलेला ठराव अयोग्य असेल तर त्या ठरावाला वक्फ न्यायाधीकरणात अथवा उच्च न्यायालयात आव्हान देता येऊ शकते. सदस्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश हा वक्फ कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. वक्फ कायद्याने सदस्यांना आणि वक्फ मंडळाला ठराव घेण्याचे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे पूर्ण अधिकार दिले आहेत, असे काझी यांनी निदर्शनास आणून दिले. ज्येष्ठ विधिज्ञ सलमान खुर्शीद, एस. एस. काझी आणि शकील अहेमद सय्यद याचिकाकर्त्यातर्फे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटार चोरीप्रकरणात दोघींना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको एन चार परिसरातून सहा हजारांच्या दोन मोटारींची चोरी झाल्याच्या प्रकरणात आरोपी राधाबाई राजू चांदणे व आरोपी सुंदरबाई सुखलाल डोकळे यांना न्यायालयीन कोठडीतून ताब्यात घेऊन बुधवारी (१२ डिसेंबर) कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांना गुरुवारपर्यंत (१३ डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले.

याप्रकरणी कृष्णकांत रत्नेश्वर चौधरी (४६, रा. तिरुपती पार्क, ए-१३, एन-४ सिडको) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २८ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी पाण्याच्या मोटारीची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले; तसेच फिर्यादीच्या शेजारी राहणारे सदाशिव जगदाळे यांच्याही पाण्याच्या मोटारीची चोरी झाल्याचे आढळून आल्यानंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात सहा डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याच प्रकारच्या दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या राधाबाई राजू चांदणे (४५, रा. जाधववाडी) व सुंदरबाई सुखलाल डोकळे (४५, रा. आंबेडकरनगर) या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना बुधवारी कोर्टात हजर केले असता, आरोपींनी यापूर्वी आणखी काही गुन्हे केले आहेत का, या प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असून, आरोपींचा त्या गुन्ह्यांशी संबंध आहे का आदींबाबत तपास करणे बाकी आहे; तसेच आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत करायचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने दोन्ही आरोपींना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका शाळेचे यू ट्युबवर ६० व्हिडिओ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांचे तब्बल ६० व्हिडिओ आता यू ट्युबवर पाहण्यास मिळणार आहेत. हसत खेळत, गाणे गात शिक्षण कसे असू शकते आणि यात विद्यार्थी कसे रममाण होतात याचे दर्शन यातून घडते.

विद्यार्थ्यांना हसत खेळत, गोष्टी सांगत, गाणे गात शिक्षण दिले गेले, तर ते विद्यार्थ्यांच्या पटकन लक्षात राहते ही संकल्पना आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या लक्षात आली. त्यांनी यासाठी सर्व शिक्षकांना कामाला लावले. शिक्षकांकडून गोष्टी लिहून घेतल्या. गोष्टींचे पुस्तक देखील प्रसिद्ध करण्यात आले. महापालिकेच्या शाळेत गरीब घरातील मुले आणि मुली प्रवेश घेतात. त्यांना शिक्षणाबद्दल लळा लागला पाहिजे. गणित - विज्ञानासारख्या विषयात गोडी निर्माण झाली पाहिजे या उद्देशाने शैक्षणिक खेळ, कथा - कविता तयार करण्यात आल्या आहेत. या कामात आयुक्तांना त्यांच्या पत्नी डॉ. निधी विनायक यांनी देखील सहकार्य केले आहे. सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल गोडी निर्माण होऊ लागली आहे. शैक्षणिक उपक्रमात स्मरणशक्ती वाढवणारे खेळ, शब्द कसे ओळखायचे, वाक्य रचना कशी करायची, शब्दांचे सामर्थ्य कसे वाढवायचे या बद्दलचे धडे विविध खेळांमधून विद्यार्थ्यांना दिले जात आहेत. शाळांमध्ये राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमांचे चित्रिकरण करून ते यू ट्युबवर टाकण्यात आले आहे. त्यामुळे लोकल लेव्हलवर असलेली महापालिका आता ग्लोबल होत आहे. महापालिकेच्या ७२ शाळा आहेत. त्यापैकी २२ ते २५ शाळांचे उपक्रम यू ट्युबवर पाहण्यास मिळतात.

\Bशिक्षक - विद्यार्थ्यांनीच केले शूटिंग

\Bयू ट्युबवर टाकण्यात आलेल्या उपक्रमांचे चित्रिकरण महापालिका शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीच केले आहे. चित्रिकरणासाठी एक 'प्रोफेशनल कॅमेरा' आणला होता. त्याच्या सहाय्याने शिक्षक - विद्यार्थ्यांनी चित्रिकरण केले, असे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले. अशा उपक्रमामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचा उल्लेख त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस कार्यकर्त्यांचा मुकुंदवाडीत जल्लोष

$
0
0

औरंगाबाद: मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भरघोस यश मिळाल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुकुंदवाडी परिसरात ढोलताशांच्या गजरात मिठाई वाटून व फटाके फोडून जल्लोष केला. शहराध्यक्ष माजी आमदार नामदेवराव पवार, आमदार सुभाष झाबंड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, महापालिका गटनेते भाऊसाहेब जगताप, तालुकाध्यक्ष रामू शेळके, नगरसेवक मोहन साळवे, राहुल सावंत, अशोक डोळस, अंकुशराव चौधरी, राधाकृष्ण गायकवाड, कैसर पठाण, रफिक पटेल, कैलास जुमडे आदी उपस्थित होते. तर सिडको एन २ सिडको येथे ही कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रहस्यमय खुनाचा युद्धपातळीवर तपास

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमजीएम संस्थेच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीच्या खुनप्रकरणाचा पोलीसांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे. सिडको पोलिसांनी मंगळवारी रात्री टाळे लावलेल्या आकांक्षा देशमुख हिच्या खोलीची बुधवारी दुपारी दोनपासून झाडाझडती घेण्यात आली. वसतिगृहात असलेल्या सीसीटीव्हीचे पाच दिवसांचे चित्रिकरण पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

आकांक्षाच्या मृतदेहाचे घाटी हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी पोस्टमार्टम करण्यात आले. त्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी माजलगाव येथे नेण्यात आला. यावेळी तिच्या वडिलांसह नातेवाईकांची उपस्थिती होती. आकांक्षाचा मृतदेह रवाना झाल्यानंतर सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी पथकासह वसतिगृह गाठले. घटनेचे गांर्भीय ओळखून उपायुक्त राहुल खाडे यांनी देखील भेट दिली. सायंकाळी उशिरापर्यंत निरीक्षक परदेशी आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी वसतिगृहाच्या खोलीत पंचनामा करीत होते. चौकशीमध्ये मंगळवारी दुपारी १२ वाजता आकांक्षा हॉस्टेलच्या जिन्यातील आल्याचे सीसीटीव्हीमधील चित्रिकरणात दिसून आले.

\Bअशी होती खोलीतील परिस्थिती

\Bआकांक्षाच्या रुममध्ये तीन बेड आहेत. तिची रुममेट सोमवारीच गावाला गेली असल्यामुळे इतर दोन बेडवरच्या गाद्या गुंडाळलेल्या होत्या. रेक्टर रुममध्ये तिला पाहण्यासाठी गेल्या त्यावेळी रुमचा दरवाजा केवळ लोटलेला होता. दरवाजाच्या पाठीमागून खुर्ची लावण्यात आली होती. रुममध्ये असलेले टेबल आडवे होते. तिच्या गळ्यातील स्ट्रोल तसाच खाली पडलेला होता. रुममधील आरसा देखील काढून खाली जमिनीवर ठेवण्यात आलेला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

\Bसीसीटीव्ही चित्रिकरण, मोबाइल ताब्यात

\Bआकांक्षाची रुम हॉस्टेलमध्ये तिसऱ्या मजल्यावर आहे. या मजल्यावरील कॅरिडोरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले नाहीत. तिसऱ्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्यामध्ये मात्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. हॉस्टेल व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे पाच दिवसांचे चित्रिकरण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची तपासणी करण्यात येत आहे. आकांक्षाचा मोबाइलदेखील पोलिसांनी जप्त केला असून, त्याची देखील तपासणी सुरू आहे.

\Bहॉस्टेल केले रिकामे\B

आकांक्षाच्या मृत्यूनंतर एमजीएम प्रशासनाने गंगा हॉस्टेलचा तिसरा मजला रिकामा केला. या मजल्यावर राहणाऱ्या विद्यार्थिनींना इतरत्र हलवण्यात आले. या घटनेनंतर हॉस्टेलमधील विद्यार्थी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. हॉस्टेलमध्ये सुरक्षेसाठी अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. पोलिसांनी आकांक्षाच्या वर्गातील तिच्या मैत्रिणी; तसेच शिक्षकांची देखील चौकशी केली. यावेळी चौकशीमध्ये आकांक्षा अबोल असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

\Bएकुलती एक मुलगी

\Bआाकांक्षा ही तिच्या आई वडिलांना एकुलती एक मुलगी होती. तिचे वडील शेतकरी असून, आई शिक्षिका आहे. तिच्या मृत्युमुळे नातेवाईक शोकाकुल झाले होते. एमजीएच विश्वस्त अंकुशराव कदम देखील तिच्या वडिलांच्या सांत्वनासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये आले होते.

\Bघटनाक्रम\B

- सोमवारी रात्री ९ वाजून १५ मिनिटे : आकांक्षाचा जेवण करून तिच्या रुममध्ये प्रवेश

- मंगळवारी दुपारी १२ सुमार : जिन्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आकांक्षा दिसल्याची नोंद

- मंगळवारी रात्री साडेनऊ ते दहा : आकांक्षा रूम क्रमांक ३३४मध्ये बेशुद्धावस्थेत आढळली

- मंगळवारी रात्री साडेदहा : एमजीएम हॉस्पीटलमध्ये तपासून आकांक्षा मृत घोषित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images