Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पालिकेच्या कारवाईत ११५ किलो प्लास्टिक जप्त

$
0
0

मोतीकारंजा, जाफरगेट भागात कारवाई

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने मोतीकारंजा, जाफरगेट येथे कारवाई करीत ११५ किलो प्लास्टिक जप्त केले. या विक्रेत्यांकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

राज्य शासनाने २३ जूनपासून संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी आदेश लागू केला आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात आली आहे. बंदीची घोषणा झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस पालिकेने कारवाई केली, त्यानंतर पालिका प्रशासन मूग गिळून गप्प बसले. दरम्यान, बुधवारी (१२ डिसेंबर) अचानक पुन्हा प्लास्टिकविरोधी कारवाई सुरू करण्यात आली आहे. उपायुक्त रवींद्र निकम यांच्या नेतृत्वाखाली मोतीकारंजा आणि जाफरगेट येथे कारवाई करण्यात आली. या पथकासोबत माजी सैनिकांचे मित्र पथक देखील होते. यावेळी २२ दुकानांची तपासणी केली असता पाच दुकानांत कॅरिबॅग सापडल्या. या पाच दुकानदारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या दुकानांतून ११५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. या पथकात बारा कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेततळ्यांची ७७ हजार अर्ज प्रलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी 'मागेल त्याला शेततळे' योजना राबविण्यात येत असून, या योजनेसाठी विभागात तब्बल ७७ हजार ६७६ अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. या योजनेंतर्गत मराठवाड्यात ३६ हजार ५९ शेततळी पूर्ण झाले असून, चालू वर्षात आठ हजार ७८० शेततळी पूर्ण केल्याची माहिती कृषी विभागांकडून देण्यात आली. या शेततळ्यांसाठी आतापर्यंत १५ कोटी ७५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

औरंगाबादसह मराठवाड्याला सततच्या दुष्काळाचा नेहमीच सामना करावा लागतो. पाणी टंचाईचा फटका फळबागांना बसतो. विकतचे पाणी देणेही अवघड झाल्याने अनेक शेतकऱ्यांवर नाइलाजाने फळबागावर कुऱ्हाड चालविली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता फायदेशीर ठरणाऱ्या शेततळे योजनेवर कृषी विभागाने अधिक भर दिला आहे. या शेततळ्यासाठी कृषी विभागाकडून ५० हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर दिले जाते.

मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांतून एक लाख १३ हजार ७३५ अर्ज प्राप्त झाले आहेत. विभागात ४६ हजार १०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. विभागात ३६ हजार ५९ शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. दरम्यान, मराठवाड्यात शेततळ्यांच्या निर्मितीत औरंगाबाद जिल्हा आघाडीवर असून, जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल दहा हजार २९८ शेततळी पूर्ण झालू आहेत. २६६ शेततळ्यांची कामे सुरू आहेत. जालना जिल्ह्यात सात हजार २५०, बीडमध्ये सात हजार १६१, लातूरात दोन हजार १३, उस्मानबादेत दोन हजार ५४६, नांदेड जिल्ह्यात एक हजार ९१६, परभणीत दोन हजार २४३ व हिंगोली जिल्ह्यात दो हजार ६३२ शेततळी पूर्ण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिवाशी खेळणाऱ्या ४० स्कूल बस जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरटीओ कार्यालयाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी (१२ डिसेंबर) शहरातील चार ठिकाणी स्कूल बसची विशेष तपासणी केली. अचानक झालेल्या या तपासणीत विद्यार्थ्यांच्या जिवासोबत खेळणाऱ्या व धोकादायक असलेल्या ४० स्कूल बस जप्त करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या स्कूल बसविरोध कारवाई सुरूच राहणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी दिली.

आरटीओ कार्यालयाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश असलेले एकूण ३५ जणांच्या चार पथकांनी बुधवारी सकाळी साडे सातपर्यंत तपासणी केली. ही तपासणी वाळूज, हर्सूल, मुकुंदवाडी आणि पैठण रोडवरील महानुभव आश्रम येथे करण्यात आली. या मोहिमेत एकूण १३४ स्कूल बसची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९७ स्कूल बसचालकांना, बसमध्ये महिला अटेन्डट नसणे, बझर नसणे यासह इतर कारणांवरून मेमो देण्यात आला. याशिवाय फिटनेस प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या ४० स्कूल बस जप्त करण्यात आल्या आहेत. रेयॉन इंटरनॅशनल, पोदार इंग्लिश स्कूल यासह इतर शाळांच्या बसचा या ४० बसमध्ये समावेश आहे, अशी माहिती संजय मैत्रेवार यांनी दिली.

……………

\Bएक किलोमीटर पाठलाग \B

पडेगाव येथील पथकाने सरोश उर्दू शाळेच्या २० विद्यार्थिनींना घेऊन जाणाऱ्या बसला (एम एच १२ सी एच ४६३९) थांबण्याचा इशारा करण्यात आला. मात्र, चालकाने बस न थांबवली नाही. त्यामुळे सुमारे एक किलोमीटर पाठलाग करून या बसला पकडण्यात आले. या स्कूल बसचे फिटनेस प्रमाणपत्र २०१५ पासून घेतले नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. ही स्कूल बस खासगी कंत्राटदाराकडून चालविण्यात येत आहे. खासगी कंत्राटदारांच्या स्कूल बसची तपासणी दोन दिवसांत करून फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या बसमधून विद्यार्थी वाहतूक बंद करण्यात येईल, अशी माहिती सरोश शाळेच्या प्रशासनाने दिली.

\Bबस चालवताना मोबाइलवर संभाषण

\B

स्टेपिंग स्टोन स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा बसचालक बस चालवताना मोबाइलवर बोलताना आढळून आला. त्यामुळे या बसवर कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्य लेखाधिकाऱ्यांचे निलंबन; मुख्यमंत्री, सचिवांना पत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचे मुख्याधिकारी सुरेश केंद्रे यांना निलंबित करा, अशी मागणी करणारे पत्र स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याच्या सचिवांना पाठवले आहे.

सभापतींनी पत्रात म्हटले आहे की, लेखा विभागात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली आहे. नगररचना विभागाचा निधी त्याच विभागासाठी वापरणे बंधनकारक असताना अन्य कामांसाठी वापरण्यात आला, ही गंभीर बाब आहे. या संदर्भात स्थायी समितीच्या तीन डिसेंबर आणि दहा डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत चर्चा झाली आणि केंद्रे यांना निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. स्थायी समितीने आदेश देऊनही प्रशासनाने व प्रामुख्याने आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली नाही. त्यामुळे आपण आपल्या स्तरावर आयुक्तांना निर्देश देवून केंद्रे यांना निलंबत करण्याची कार्यवाही करावी, असे या पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्या. पाटील यांच्या तैलचित्राचे अनावरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे सदस्य राहिलेले नरेश पाटील हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले आहेत. त्यांच्या तैलचित्राचे अनावरण बुधवारी करण्यात आले.

औरंगाबाद खंडपीठ वकील संघाच्या वाचनालयात मुख्य न्या. नरेश पाटील यांच्या तैलचित्राचे अनावरण न्या. संभाजी शिंदे, न्या. प्रसन्ना वराळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अतुल कराड व सचिव कमलाकर सूर्यवंशी उपस्थित होते. औरंगाबाद खंडपीठाच्या स्थापनेनंतर प्रथमच खंडपीठात वकिली करणारे न्या. नरेश पाटील हे मुख्य न्यायमूर्ती झाले आहेत. नरेश पाटील हे मुख्य न्यायमूर्तीपदी विराजमान झाल्याची बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे, असे न्या. प्रसन्ना वराळे यांनी सांगितले. वकिलांनी कष्टाने व सचोटीने काम केल्यास उच्च पदापर्यंत पोहचता येते, असे अतुल कराड यांनी सांगितले. यावेळी शशिकुमार चौधरी, पी. जी. देशमुख, सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, असिस्टंट सॉलिसेटर जनरल संजीव देशपांडे, ग्रंथालयाचे अध्यक्ष विनायक सोळुंके, सचिव श्रीनिवास गणाचारी आदी उपस्थित होते.

\Bआज सत्कार

\Bमुख्य न्या. नरेश पाटील यांचा गुरुवारी सायंकाळी पाच वाजता औरंगाबाद खंडपीठ वकील संघाच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. न्या. पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात वकिली केली आहे. याच खंडपीठात न्यायमूर्ती म्हणूनही त्यांनी काम केले आहे. हा कार्यक्रम खंडपीठाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नडमध्ये दुष्काळी कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बुधवारी (१२ डिसेंबर) तालुक्यातील शिवराई येथे शेततळे व सिरसगाव येथे पाणंद रस्त्याच्या कामांचे उद्घाटन करून शहरातील वाणी मंगल कार्यालयात दुष्काळाबाबत करावयाच्या उपाययोजना यासाठी विविध शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक घेतली.

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बुधवारी सकाळी साडेआठ वाजता 'मागेल त्याला शेततळे' या उपक्रमाअंतर्गत शिवराई येथील दिलीप मुठ्ठे यांच्या गट क्रमांक ३८मध्ये शेततळे व पशूसंवर्धन विभागांतर्गत जिल्हा उपायुक्त बी. डी. राजपूत यांच्या उपस्थितीत जिल्हयातील पहिल्या अंडी उबवणूक केंद्रास भेट देऊन फित कापली. सिरसगावांतर्गत हतनूर शिवारात बंद असललेले शिव रस्ते (पाणंदरस्ते) मोकळे करून शेतकऱ्यांच्या सोयीसुविधासाठी या रस्त्यांचा कामांचा शुभारंभ जिल्हाधिकारी चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.

कन्नड तालुक्यात प्रथमच दुष्काळाची दाहकता डिसेंबर महिन्यातच जाणवत असल्याने टंचाईग्रस्त गावातील पदाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषिसेवक यांच्याशी उपाययोजना यावर चर्चा केली. टँकरची सध्यस्थिती, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मागेल त्याला कामा, सिंचन प्रकल्पातील गाळपेरा क्षेत्रात वैरण विकास प्रकल्पांतर्गत गुरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याबाबत, पीक पद्धतीत फेरबदल करत रेशीम उद्योगाकडे वळण्यासाठी तुतीची लागवड, हमी योजनेंतर्गत पाणंद रस्यांचा विकास, जलयुक्त शिवार कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, तहसिलदार महेश सुधळकर, तालुका कृषी अधिकारी एस. एम. पेंडभाजे, गटविकास अधिकारी विजय परदेशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व तालुक्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राणिसंग्रहालय परवाना रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाचा परवाना रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या आदेशाला केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण खात्याच्या सचिवांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे औरंगाबादकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात विविध त्रुटी असल्याचे स्पष्ट करून २०१५मध्ये पालिकेला नोटीस बजावली होती. सिद्धार्थ उद्यानातील मिनीट्रेन बंद करा, प्राणिसंग्रहालयाची हद्द वाढवा, उद्यान परिसरात केलेले वाहतूक उद्यान बंद करा, प्राणिसंग्रहालयात लांडगा आणि माकड विना परवानगी ठेवले आहे, अशा त्रुटी काढल्या होत्या. या त्रुटींचा खुलासा करून त्या दूर करण्याचे आदेशही दिले होते. मात्र, पालिकेने त्रुटी दूर केल्या नाहीत. त्यामुळे २६ एप्रिल २०१८ रोजी पुन्हा एक नोटीस बजावली. त्यानंतरही प्राणिसंग्रहालयात काहीच सुधारणा न झाल्यामुळे २८ नोव्हेंबर रोजी प्राधिकरणाचे संचालक डॉ. डी. एन. सिंग यांनी प्राणिसंग्रहालयाचा परवाना रद्द केला. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी नियमानुसार तीस दिवसांचा अवधी होता. या निर्णयाविरोधात अपिल दाखल करण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाचे सचिव सी. के. मिश्रा यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभापती रेणुकादास वैद्य, सभागृहनेता विकास जैन, विरोधीपक्षनेता जमीर कादरी, उपायुक्त वसंत निकम, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. विजय पाटील यांचा समावेश होता. निवेदन स्वीकारल्यावर मिश्रा यांनी वस्तूस्थिती जाणून घेतली आणि प्राधिकरणाच्या निर्णयाला स्थगिती देत तसे अधिकृत पत्र आठ - दहा दिवसांत पालिकेसह प्राधिकरणाला पाठवू, असे स्पष्ट केले. मॉनेटरिंग ऑफिसर ब्रिज केशर गुप्ता यावेळी उपस्थित होते. मिश्रा यांच्याबरोबर दहा ते पंधरा मिनिटे चर्चा झाली. खासदार खैरे यांची खूप मदत झाली, असे घोडेले व वैद्य म्हणाले.

\Bत्रुटी दूर करण्याच्या सूचना

\B'मिश्रा यांनी प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे संचालक डॉ. ए. के. नायक यांना फोन लावला व औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयाचा परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात येत आहे असे सांगितले. त्यामुळे प्राणिसंग्रहालयावरील संकट टळले आहे. प्राणिसंग्रहालयातील त्रुटी दूर करा. सफारी पार्कचा डीपीआर लवकर तयार करून त्याला मान्यता घ्या आणि काम सुरू करा, असे सांगण्यात आले आहे,' असे महापौर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्ष, वन्यप्राण्यांचे सवंर्धन करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वृक्ष, पर्यावरण, प्राणीमात्रांचे संरक्षण व जतन करा, असा संदेश देत दहा बालकांनी महापौर नंदकुमार घोडेल यांची भेट घेत सिद्धार्थ उद्यानातील वन्यप्राण्यांची अधिक चांगल्या पद्धतीने देखभाल व्हावी, जतन व्हावे, अशी अपेक्षा केली. दरम्यान, विषयावर श्री गुरू जम्भेश्वर पर्यावरण वन्यजीव संवर्धन संस्थेचे पदाधिकारी तसेच या बालकांनी मंगळवारी महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयातही सदिच्छ भेट देत उपक्रमबाबत माहिती दिली.

बिश्नोई समाज हा प्राणी, वृक्ष यावर विशेष प्रेम करणार आहे. वृक्षाचे जतन व संरक्षण करण्यासाठी समाजबांधवांनी वेळप्रसंगी बलिदान दिले आहे. प्राण्यांच्या शिकार, मांसाहार, वृक्ष तोडणे हा गंभीर गुन्हाच मानला जातो. दरम्यान, पर्यावरण, वृक्ष, वन्यप्राण्यांचे संरक्षण याच विषयावर श्री गुरू जम्भेश्वर पर्यावरण वन्यजीव संवर्धन संस्थेच्या माध्यमातूनही कार्य केले जात आहे. संस्थेतील काही शाळकरी मुले नुकतेच सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात सहलीनिमित्ताने गेले होते. त्यावेळी तेथील वन्यप्राण्यांची अवस्था बिकट असल्याचे त्यांना जाणवले. त्यांना राहण्यासाठी चांगला अधिवास निर्माण करा, जतन व संवर्धन करा, अशी मागणी करत या मुलांसह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेत चर्चा केली. विशेष म्हणजे सर्व बालक विविध वन्यप्राण्यांच्या वेशभूषेत या भेटीला आले होते.

या भेटीनंतर संस्थेचे पदाधिकारी व या मुलांनी 'महाराष्ट्र टाइम्स' कार्यालयास सदिच्छा भेट दिली. वृक्ष, वन्यप्राणी वाचवा, त्यांचे जतन व सवंर्धन करा अन्यथा ते नाहीसे होतील. पर्यावरणाचा ऱ्हास होईल, असे म्हणत मुलांसह संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या जनजागृती अभियानाबाबत संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा करताना माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष संदीप बिश्नोई, उपाध्यक्ष ओमाराम बिश्नोई, सचिव रमेश बिश्नोई, कोषाध्यक्ष गोकुल बिश्नोई यांच्यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

\B'प्राणिसंग्रहालयत बंद होणार नाही'\B

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय बंद होणार, अशी चर्चा होत असून, ते बंद होऊ देऊ नका तर तेथील प्राण्यांना राहण्यासाठी चांगली व्यवस्था करा, अशी मागणी यावेळी या मुलांनी केली. त्यावर बोलताना महापौर घोडेले यांनी प्राणी संग्रहालय बंद होणार नाही, असे नमूद करत अनेक दुर्मिळ प्राणी येथे असून, सर्व प्राण्यांची योग्य पद्धतीने काळजी घेतली जाते, अशी माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकी मेकॅनिक संघटनेचा मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक असोसिएशनतर्फे गुरुवारी (२० डिसेंबर) सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात मराठवाडास्तरीय ईद आणि दीपावली मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत चालणार आहे. कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सय्यद चाँद यांनी दिली. कार्यक्रमाचे उद्घाटन कॅन्सर हॉस्पिटलचे विशेष अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, महाबँक प्रशिक्षण संस्थेचे संचालक प्रकाश जैस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ज्येष्ठ प्रशिक्षक विनोद पटवा हे मेकॅनिक तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत. नोंदणी केलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यातून किमान १२०० मेकॅनिक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार, दादासाहेब तांबे, इस्माईल भाई, शेख मुन्ना, शेख अर्शद, शेख वसीम आदी परिश्रम घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकनेते मुंडे यांना अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वृंदावन निवासी बालयोगी संत गोपालनंद महाराज यांच्या संगीतमय भागवत कथा सप्ताहालाही यानिमित्ताने सुरुवात करण्यात आली.

मुंडे यांच्या जयंतीनिमित्त सजवलेल्या रथातून बालयोगी संत गोपालनंद महाराज परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सजवलेल्या रथात गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढून स्वागत करण्यात आले. मिरवणूक सोहळ्यानंतर सायंकाळी बालयोगी संत गोपालनंद महाराज यांच्या संगीतमय भागवत कथेला प्रारंभ झाला. याप्रसंगी भाविकांची मोठी गर्दी होती. १९ डिसेंबरपर्यंत चालणारा कथा सप्ताह दररोज दुपारी दोन वाजता सुरू होईल, अशी माहिती संयोजक शिवाजी घुगे, डॉ. गजानन सानप, संगीता घुगे यांनी दिली.

\Bभाजप कार्यालय

\Bउस्मानपुरा येथील भाजप कार्यालयात आयोजित अभिवादन सभेत शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, आमदार अतुल सावे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी सरचिटणीस कचरू घोडके, माजी महापौर भगवान घडमोडे, उपमहापौर विजय औताडे, जगदीश सिद्ध, सुरेंद्र कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष मुकुंद दामोधरे, जलिंदर शेंडगे, अशोक जगधने, बाळासाहेब गायकवाड, सागर नीलकंठ, युवा मोर्चाचे सचिन जवेरी, अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तम अंभोरे, मंडल अध्यक्ष सुधीर नाईक, लक्ष्मण कुलकर्णी, मंगलमूर्ती शास्त्री, राजेश पाटील, महिला मोर्चाच्या मनीषा भन्साळी, ज्योती पांडे, सुनंदा कुडले आदी उपस्थित होते.

\Bसमता परिषद\B

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे सुभेदारी विश्रामगृह येथे आयोजित कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी याप्रसंगी गोपीनाथ मुंडे व छगन भुजबळ या दोघांनी मिळून ओबीसी समाजासाठी केलेल्या कार्यासंदर्भात उपस्थितांना माहिती दिली. यावेळी पार्वता शिरसाठ, जयराम साळुंके, गजानन सोनवणे, गणेश काळे, संदीप घोडके, निशांत पवार, प्रसन्ना राऊत, चंद्रकांत पेहरकर, अनिता देवतकर, संजिवनी घोडके, सुभद्रा जाधव, रंजना गायके, संगीता पवार, विलास ढंगारे, गणेश पवार, प्रा. संतोष वीरकर, सुनील धाडगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२३ वर्षांनंतर म्हाडाचे घर मालकाकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'म्हाडा'कडून १९९०-९१मध्ये मिळालेले घर १९९५मध्ये बळकावण्यात आले आणि तब्बल २३ वर्षांच्या खटल्यानंतर तेच घर पुन्हा घर मालकाला मिळाले, तर घर बळकाविणारा आरोपी शेषराव उर्फ विजय भिकाजी साळवे याला दोन वर्षे सक्तमजुरी व साडेआठ हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी ठोठाविली.

याप्रकरणी कडुबा अर्जून खैरनार (रा. म्हाडा कॉलनी, रंजितनगर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा केंद्रीय उत्पादन शुल्क, सीमा शुल्क मंडळात कामाला होता. १९९०-९१दरम्यान म्हाडाने उच्च उत्पन्न गटासाठी रंजितनगर (शहानूरवाडी) परिसरात घरे तयार करून वाटप केली होती. त्यातील घर क्रमांक १५/२६ हे फिर्यादीला मिळाले होते. दरम्यान, फिर्यादीची बदली मुंबईला झाली व फिर्यादी अधून-मधून औरंगाबादला येत होता. २५ डिसेंबर १९९५मध्ये तो औरंगाबादला आला असता, घराचे कुलूप तोडून घराचा ताबा आरोपी शेषराव उर्फ विजय भिकाजी साळवे (रा. धरतीधन सोसायटी, रंजितनगर, शहानूरवाडी) याने घेतल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. आरोपी शेषराव याने फिर्यादीकडून ते घर खरेदी केल्याचे बनावट खरेदीखत तयार केले होते. ज्या वेळी खरेदीखत तयार करण्यात आले होते, त्यावेळी फिर्यादी मुंबईत कामावर होते. आरोपी शेषराव याने बनावट खरेदीखताच्या आधारे दिवाणी कोर्टात दावा दाखल केला असता, तो कोर्टाने फेटाळला होता. तीन जानेवारी १९९७ रोजी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते.

\Bदंडाच्या रकमेतून नुकसान भरपाई

\Bखटल्यावेळी, सहाय्यक सराकरी वकील सुनिल जोंधळे यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या ४६८ कलमान्वये दोन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरी, भारतीय दंड संहितेच्या ४७१ कलमान्वये सहा महिने सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरी, तर भारतीय दंड संहितेच्या ४४८ कलमान्वये तीन महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस सक्तमजुरीची शिक्षा ठोठाविली; तसेच ठोठावण्यात आलेल्या दंडापैकी आठ हजार रुपये हे नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीला, तर ५०० रुपये सरकारकडे जमा करण्याचे आदेशही कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोजगार हमीची कामे सुरू करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

दुष्काळी परिस्थितीत खुलताबाद तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारीउदय चौधरी यांनी दिले. प्रत्येक ग्रामपंचायत कमीतकमी २० कामांचा सेल्फ तयार ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले; तसेच कृषी विभागाच्या जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामांचा गावनिहाय आढावा घेऊन जलयुक्त शिवार योजनेत मागे पडलेल्या गावांना तहसीलदारांनी भेटी द्याव्यात व कामांची गती वाढवावी, असेही आदेश त्यांनी दिले.

खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयाच्या सभागृहात दुष्काळ निवारण व पाणीटंचाई विषयी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले की, पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रस्त्याची कामे करावीत. शेत रस्ते हे शेतकऱ्यांचे गरजेची बाब असून, या योजनेत रस्ते झाल्यास शेतमाल बाजरात आणण्यासाठी लाभ होऊ शकतो. योजनेत रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या सहमतीने रस्ते केल्यास शासनाकडून प्रती किलोमीटर ९० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय वैरण विकास कार्यक्रम व गाळ पेरा अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडून तलाठी व कृषी सहाय्यक यांनी अर्ज घेऊन योजना प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन त्यांनी केले. तालुक्यातील मध्यम व लघू प्रकल्पांच्या बुडित क्षेत्रात गाळपेऱ्यासाठी किती क्षेत्र उपलब्ध होऊ शकते, याचा आढावा घेऊन चाऱ्याचे नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले. दुष्काळ परिस्थितीमुळे तालुक्यातील दुष्काळ निवारण आणि पाणीटंचाई प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक या तिन्ही घटकांची महत्त्वाची भूमिका आहे. गावपातळीवरील या तिन्ही घटकांनी समन्वयाने काम करावे , असे त्यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा जिल्हाधिकाऱ्यांनी ३९ ग्रामपंचायतींतर्गत ७६ गावांचा गावनिहाय आढावा घेतला.

या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी ज्ञानोबा मोकाटे,महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यू. बी. खान, प्रभारी तालुका कृषी अधिकारी अशोक अहिरे, पशूधन विकास अधिकारी डॉ. शिल्पा चौधरी, वनपरीक्षेत्र अधिकारी यशपाल दिलपाक, नायब तहसीलदार महेंद्र गिरगे उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, मंडळ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\B'कारवाईची वेळ येऊ नये'\B

जिल्हा पातळीप्रमाणे गावपातळीवर एकत्रितपणे काम करावे. पुढील सहा महिने दुष्काळी परिस्थितीत आपल्या गावात काय काय करायचे ते समजून घेतले पाहिजे. लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. शेततळे जास्तीत जास्त प्रमाणात काम करावेत. जिल्ह्यात सर्वात जास्त शेततळे झाले आहेत. दुष्काळ निवारण करण्यासाठी चिरस्थायी नियोजन करावे. गंधेश्वर प्रकल्पातून तातडीची पाणीपुरवठा योजना आखण्यात आली असून, खुलताबाद तालुक्यातील टँकरमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करा. दंडाची वेळ येऊ देऊ नका. तशी वेळ आली तर कडक कारवाई होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी निक्षून सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमजीएम’मध्ये विद्यार्थिनीचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यभर नावलौकिक कमावलेल्या महात्मा गांधी मिशन संस्थेच्या 'एमजीएम' कँपसमधील वसतिगृहात राहणाऱ्या फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीचा खून झाल्याचे उघड झाल्याने शैक्षणिक क्षेत्र ढवळून निघाले आहे. आकांक्षा अनिल देशमुख (वय २२, रा. झेंडा चौक, माजलगाव) असे या तरुणीचे नाव असून, सध्या ती गंगा हॉस्टेलमध्ये खोली क्रमांक ३३४ मध्ये राहत होती.

आकांक्षा ही सोमवारी रात्री सव्वानऊ वाजता जेवण करून वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या तिच्या खोलीत परतली. तिची रूममेट सोमवारीच गावाकडे निघून गेल्याने ती खोलीत एकटीच होती. मंगळवारी दिवसभर आकांक्षा रूमबाहेर पडली नाही. रात्री ती हजेरीसाठी देखील आली नसल्याने हॉस्टेल रेक्टरच्या हा प्रकार लक्षात आला. रेक्टरने तिची रूम गाठून दरवाजा ढकलला असता तो केवळ लोटला असून, आतून दरवाजाला खुर्ची लावल्याचे दिसून आले. आत पाहिले असता आकांक्षा जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडलेली होती. रेक्टरने 'एमजीएम'च्या

नर्सिंग कॉलेजमध्ये लेक्चरर असलेला तिचा चुलत भाऊ राहुल देशमुख यांना ही माहिती दिली आणि आकांक्षाला तातडीने 'एमजीएम' रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिला तपासून रात्री साडेदहा वाजता मृत घोषित केले. बुधवारी सकाळी घाटीच्या शवविच्छेदनगृहात आकांक्षाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. तेव्हा तिचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

\Bखोलीची घेतली झडती

\Bसिडको पोलिसांनी मंगळवारी रात्री आकांक्षाची खोली सील केली होती. बुधवारी दुपारी या खोलीची पोलिस उपायुक्त राहुल खाडे, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी तीन तास झाडाझडती घेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिडको पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पोलिसांनी तिच्या खोलीची बुधवारी दुपारी झडती घेतली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास करणार आहोत. आकांक्षाच्या मृत्यूप्रकरणात अनेक संशयास्पद बाबी आढळल्या आहेत. सध्या तिचे नातेवाईक नसल्यामुळे पोलिसांच्या वतीने तक्रार दाखल करून तपास करण्यात येणार आहे.

- राहुल खाडे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेची बॅटरी दोन वर्षांत चार्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'विभागातून जाणाऱ्या रेल्वेचा वेग वाढावा यासाठी मनमाड ते मुदखेड दरम्यान रेल्वे विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी दोन वर्षांत नांदेड रेल्वे विभाग १०० टक्के विद्युतीकरण होईल,' अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोद कुमार यादव यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

यादव यांनी आज औरंगाबाद रेल्वे स्थानकाची पाहणी केली. पाहणीनंतर बोलताना ते म्हणाले, 'नांदेड रेल्वे विभागातील रेल्वे वाहतूक वेगात व्हावी, यासाठी विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत मनमाड ते मुदखेड दरम्यान रेल्वेचे विद्युतीकरण करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. २५ नोव्हेंबर रोजी ही निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात आली. महिनाभरात विद्युतीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येणार आहे. हे काम अतिशय वेगात होणार असून, ते दोन वर्षांत पूर्ण होईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर नांदेड रेल्वे विभागाचे शंभर टक्के विद्युतीकरण होणार आहे,' असेही यादव म्हणाले.

\Bपरभणी-मुदखेड मार्ग मार्चमध्ये पूर्ण

\B'नांदेड विभागात परभणी ते मुदखेड दरम्यान रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. यात दोन पुलांचे काम प्रगती पथावर आहे. यातील दुहेरीकरणाचे काम मार्च २०१९पर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच परभणी ते मनमाड रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास आगामी तीन वर्षात मनमाड ते परभणी दरम्यान रेल्वे मार्ग दुहेरी होणार आहे,' अशी माहितीही यावेळी यादव यांनी दिली.

(संबंधित वृत्त : पान ३)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाया भक्कम ठेवा; शर्यत जिंकाल!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्वत:तील क्षमता, कमतरता ओळखत, अडथळ्यांवर मात करत संधी निर्माण करणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे. इमारत कोणतीही असू द्या, पाया भक्कम असेल तर शर्यतीतील टप्पे सहज पार करता येतात,' अशा शब्दांत आपल्या यशाचा आलेख मांडत उद्योजक प्रशांत देशपांडे व सुनील किर्दक यांनी बुधवारी 'मटा संवाद' कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना निर्माण केली.

विवेकांनद कॉलेजच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर एक्स्पर्ट ग्लोबलचे सीईओ प्रशांत देशपांडे, टूल टेकचे एम.डी. सुनील किर्दक, प्राचार्य डॉ. श्याम शिरसाठ, प्राचार्य डॉ. अशोक गायकवाड, महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहायक संपादक प्रमोद माने यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांसमोर प्रवास उलगडताना किर्दक म्हणाले, 'आपल्या घरातील कोणी उद्योग क्षेत्रात नाही. अतिशय सामान्य कुटुंबातील मी. वडील प्राध्यापक, तर आई शेती करत होती. मोठ्या मेहनतीने त्यांनी आम्हा भावंडाना शिकवले. आई-वडिलांची निष्ठा, शिक्षणावरचे प्रेम पाहिले. अशा असंख्य वातावरणातून विश्वास निर्माण झाला की, आपण काहीतरी करू शकतो. मेकॅनिकलचे शिक्षण पूर्ण करत सुरुवातीला नोकरी केली. त्यावेळी इतरांना पाहताना, त्यांना येणारे अनुभव पाहत गेलो. तेव्हा लक्षात आले की, ते या क्षेत्राला आपलंसं मानत नसल्याने त्यांच्यासमोर अडचणी आहेत. अशावेळी क्षेत्राला आपलंसं मानलं आणि पुढे चालत राहिलो. अनुभवातून उद्योग उभारण्याचा निर्णय घेतला. अनेक अडचणी आल्या. मात्र, येणाऱ्या आव्हानांना तोंड देत पुढे जायचा निश्चय केला. पुढे पुढे जात राहिलो. उद्योग क्षेत्रात लाखो, करोडो संधी आहेत. मात्र, आपल्याला माहिती नसते आपण त्या रस्त्यावरून न जाता केवळ चर्चा करत राहतो. त्यापेक्षा कृती करण्यावर आपला भर असायला हवा. मानसाची यशस्विता ही उलाढालीवर, नफ्यावर नसते ती स्वत:वरील विश्वास, ग्राहकांचा विकास यावर अवलंबून असते. उद्योजक होण्यासाठी पहिला प्रवास आपणच करायचा असतो. उद्योग उभारणीसाठी आपल्याला कोणी मदत करेल, सरकारी यंत्रणा मदत करेल हे मनातून काढून टाका. स्वत:वर विश्वास असणे महत्वाचे. वर्तमानात जगात स्वत:ला सिद्ध करता आले पाहिजे. त्यासाठी स्वत:मध्ये विश्वास, ताकद, मेहनत आणि त्याला आवश्यक क्षमता विकसित करता यायला हव्यात. विद्यार्थीदशेत बेस निर्माण करा. आपल्याला हे करायचे असे निश्चित करा आणि त्या दृष्टकोनातून पावले टाका. स्वत:ला विकसित, विस्तारीत करत स्किल निर्माण करत रहा. उद्योगात स्पर्धेपेक्षा स्वत:ला घडवित पुढे जाता आले पाहिजे. विश्वासहर्ता निर्माण करता आली पाहिजे. अशी टप्प्या टप्प्याची शर्यत पुढे पुढे चालत रहा यश तुमचेच असेल.'

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रशांत देशपांडे म्हणाले, 'आपल्याकडील अनेक विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेची भीती, आपल्याला जमेल का असे अनेक न्यूनगंड असतात. ते आधी घालवले पाहिजेत. आपल्या प्रत्येकात प्रचंड क्षमता असते. ती ओळखत न्यूनगंड दूर करता आला पाहिजे. उद्योग उभारताना, चालविताना अनंत अडचणी येतात. मात्र, त्या अडचणींवर मात करत पुढे जाता आले पाहिजे. अथक प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. त्यातून यश मिळविणे, यशाची एक-एक पायरी चढत राहणे गरजेचे असते. त्यातूनच आपण पुढे जात राहतो. सुरुवातीला कंपनीत नोकरी करताना आपण स्वत: काहीतरी करायचे हे ध्येय निश्चित केले. त्यातून औरंगाबादेत 'आयटी' कंपनी सुरू केली. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. मात्र, मेहनतीच्या बळावर आलेल्या अडचणींवर मात करत पुढे चालत राहिलो. आज जर्मन, युरोपातील अनेक कंपन्यांना अद्ययावत तंत्रज्ञान औरंगाबादमधल्या तंत्रज्ञानाकडून पुरवतो. ही आमच्यासाठी, विभागासाठी अभिमानाची गोष्ट आहे. उद्योगामध्ये आवश्यक असते ती ग्राहकाची विश्वाहर्ता. त्यासाठी स्वत:वर विश्वास असायला हवा. मी, मला पाहिजे ते यश प्राप्त करेल हा आत्मविश्वास असेल तर रिझर्ल्ट ओरिएंटेड काम करू अन् त्यातून पुढचा प्रवास सुखकर होतो. कौशल्य, ज्ञानाच्या बळावर जगात कोठेही आपल्याला संधीची कमी नाही हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे स्वत:वर विश्वास निर्माण करत मार्गक्रमण करा. प्रत्येकात क्षमता असते. तिला ओळखता आणि वाव देता आले पाहिजे. करिअरमध्ये यशस्वी होणारच ही खूणगाठ बांधा. तुम्ही जे ठरवाल ते आयुष्यात घडेल. ठरविणे आणि त्याच्यावर मेहनत घेणे आपल्या हाती असते. जे कराल ते जीव ओतून काम करा. मदतीला अनेकजण असतात फक्त स्वत:बाबतचा आत्मविश्वास आणि तसे मार्गक्रमण करा यश निश्चित मिळेल,' असे आवाहन देशपांडे यांनी केले.

अतिशय कठिण परिस्थितीतून मार्ग काढत यशस्वी ठरलेल्या उद्योजकांचा प्रवास त्यांच्या शब्दात ऐकणे हा आमच्यासाठी वेगळा अनुभव ठरला. उद्योग उभारण्यापासून ते प्रत्येक टप्प्यावरील त्यांचे अनुभव खडतर होते. प्रेरणा देणारा त्यांचा प्रवास आमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल.

- अजिंक्य दुबे

केवळ पदवी घेऊन बाहेर पडून नोकरीच्या शोधात फिरण्यापेक्षा स्वत: उद्योजक होऊन इतरांना प्रेरणादायी व्हावे. असा या उद्योजकांचा प्रवास विद्यार्थ्यांना उद्योजक म्हणून घडविण्यासाठी उपयुक्त ठरेल. व्यक्ती म्हणून सांघिक पातळीवर काम करतानाचे अनुभवही मोलाचे होते.

- मयुरी राठाड

प्रत्येकाने ध्येय निश्चित करत त्या दृष्टिकोनातून कृतीयुक्त, रचनात्मक काम करण्याची गरज आहे. उद्योग उभारताना, चालविताना येणाऱ्या अडचणी. त्यात जागतिक स्पर्धेत आपले स्थान आणि संधी याबाबत उत्कृष्ट मार्गदर्शन ऐकायला मिळाले. याबाबत 'मटा'चे आभार.

- ऋतुजा राठोड

उद्योजकांच्या प्रेरणादायी प्रवासाचे अनुभव थक्क करणारे आहेत. त्यासह काहीतरी नव्याने करण्याची प्रेरणा दोघा व्यक्त्यांच्या भाषणातून मिळाली. उद्योग उभारणीसाठी काय तयारी असावी, ध्येय कसे असावेत, अडचणी यासह विद्यार्थी दशेपासून कशी तयारी करावी हे कळले.

- माहेश्वरी सदावर्ते

उद्योग उभारणी असेल किंवा उद्योजकांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. त्या प्रश्नांची उकल तर झालीच त्यासह दोघांचा उद्योजक म्हणूनचा प्रवास बोलका आहे. अतिशय सोप्या शब्दात त्यांनी केलेली मांडणी, प्रेझेंटेशनही माहितीपूर्ण होते. त्यातून बोध मिळाला.

- अश्विनी काळे

विद्यार्थी शिकतानाच करिअरबाबतच्या विविक कल्पना रंगवतो. तशावेळी त्याला योग्य ते मार्गदर्शन मिळाले, तर तो तशा प्रकारे वाटचाल करू शकतो. त्यामुळे अशा उपक्रमांची गरज आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ने विद्यार्थी आणि उद्योजक यांचा जो संवाद घडवून आणला त्याबाबत धन्यवाद.

- पूजा कालभिले

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगणे काही कामाचे नाही. येथील विद्यार्थ्यांमध्ये अतिशय क्षमता आहे, अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन हे एक नवी उर्जा, प्रेरणा देणारे ठरले. विद्यापीठ, शिक्षणाबाबतही त्यांची मते अतिशय स्पष्ट आहेत.

- अश्विनी जाधव

'महाराष्ट्र टाइम्स'ने संवादाच्या माध्यमातून विद्यार्थी, उद्योगांची थेट भेट घडवली. उद्योजक म्हणून घडताना त्यांचा प्रवास हाच प्रेरणादायक आहे. त्यातून आमच्यासारखे विद्यार्थी एक नवी उर्जा घेऊन त्या दिशेने पाऊल टाकतील, हे निश्चित आहे.

- प्रवीण वैद्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हॉटेलवरील छाप्यात दारूचा साठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

भराडी- आमठाणा रस्त्यावरील चिंचवन फाट्याजवळील हॉटेल शिवनेरीवर उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी बुधवारी रात्री छापा मारून १४ हजार रुपयांचा देशी- विदेशी दारुचा साठा जप्त केला. याप्रकरणी दोन जणांविरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चिंचवन फाट्याजवळील हॉटेल शिवनेरी येथे अवैद्य देशी-विदेशी दारुची विक्री केली जाते, अशी गोपनीय माहिती उपविभागीय अधिकारी विशाल नेहूल यांना खबऱ्यामार्फत मिळाली. या माहितीवरून विशाल नेहूल, पोलिस नाईक भागवत शेळके, सचिन भुमे, कृष्णा उगले, शांताराम सापकाळ, गणेश जाधव, रमेश काजाळे यांनी छापा मारून देशी-विदेशी दारुचा साठा जप्त केला. याप्रकरणी कृष्णा उगले यांनी दिलेल्या फिर्यादिवरून सिल्लोड ग्रामण पोलिस ठाण्यात हॉटेल चालक भगवान पंढरीनाथ शिंदे (रा. जांभई), हॉटेल मालक राहुल सपकाळ (रा. आमठाणा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भगवान शिंदे याला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पथदिव्यांवर तोडगा काढा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील पथदिव्यांची वीज बंद करण्याचे संकट उभे आहे. यावर महापालिका आणि महावितरणला योग्य ते आदेश देण्यात यावे, अशी विनंती करणाऱ्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील व न्या. नितीन जामदार यांनी राज्याच्या नगर विकास विभागाचे प्रधान सचिव आणि महापालिका आयुक्तांनी बैठक घेऊन यावर दोन आठवड्यात तोडगा काढावा असे निर्देश दिले.

महापालिकेकडे महावितरण कंपनीचे बिल थकल्याने दोन ते सात फेब्रुवारी २०१७ रोजी पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. खंडपीठात जनहित याचिका दाखल केल्यानंतर प्रकरणात त्वरित आदेश देण्यात आले होते आणि वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. महावितरण विरोधात महापालिकेने स्वतंत्र याचिका दाखल करून वीज पुरवठा खंडित करू नये अशी विनंती केली होती. तेव्हा चालू वीज बिल महापालिकेने भरावे आणि थकबाकीपोटी एक कोटी प्रतिमाह द्यावे, असे आदेश देण्यात आले होते. महापालिकेने वीजबिलाचा परतावा नियमित केला नसल्याने आताही पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण झाली. पुन्हा वीज खंडित केल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. महापालिका आणि महावितरणला तोडगा काढण्यासाठी आदेशित करावे यासाठी खंडपीठात समीर राजूरकर यांनी जनहित याचिका दाखल केली. महापालिकेतर्फे अॅड. राजेंद्र देशमुख यांनी सांगितले की, मनपाची आर्थिक स्थिती ठिक नाही. वीज बिल भरण्याचा प्रयत्न करणार आहोत. याचिकाकर्त्यांकडून अॅड देवदत्त पालोदकर यांनी कोर्टाच्या निर्दशनास महापालिकेची आर्थिक बाजू स्पष्ट केली. एक लाखांच्या वर मालमत्ता धारक मालमत्ता कर भरीत नसल्याची माहिती दिली. महावितरणतर्फे श्रीकांत अदवंत यांनी स्पष्ट केले की, महापालिकेस वेळोवेळी संधी देण्यात आलेली आहे. महावितरणकडे असलेल्या एलबीटीच्या रकमेचे समायोजन करण्यात आले. उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात आले नाही. महापालिकेकडे ३६ कोटींची थकबाकी आहे. नियमित बिल मनपा भरत नसल्याने त्याचा महावितरणला तोटा सहन करावा लागतो. यातून बाहेर निघण्यासाठी महावितरणला दर वाढवावे लागतात आणि त्याचा भार सामान्य नागरिकांवर पडतो, असे त्यांनी सांगितले.

\Bइस्त्रोची मदत घ्या

\Bशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंगचा पुरवठा खंडित करण्याची नोटीस पालिकेला दिल्याचे अॅड. पालोदकरांनी निदर्शनास आणून दिले. खंडपीठाने असे वारंवार का होते, अशी विचारणा केल्यावर पालिकेच्या सव्वालाख मालमत्तांची नोंद नसल्याचे सांगण्यात आले. अनेक निवासी मालमत्तांचा वाणिज्य वापर सुरू आहे. यावर काय तोडगा काढता येईल, अशी विचारणा सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांना करण्यात आली. यासंबंधी नगरविकास विभागाचे सचिव व पालिका आयुक्तांनी तोडगा काढाला असे निर्देश देण्यात आले. बंगळुरू आणि नाशिकप्रमाणे गुगल मॅपिंग आणि इस्त्रोसारख्या कंपनीची मदत घेऊन इमारतींचे सर्वेक्षण का केले जात नाही, अशी विचारणाही खंडपीठाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधी विद्यापीठाचे कुलगुरू राजीनामा देणार

$
0
0

ashish.choudhari@timesgroup.com

औरंगाबाद : औरंगाबाद येथील 'महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ'चे कुलगुरू डॉ. एस. सूर्य प्रकाश राजीनामा देणार आहेत. विशाखापट्टणम येथील 'दामोदरम संजीवय्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी'चे कुलगुरू म्हणून त्यांची निवड झाली आहे. विद्यापीठाच्या विस्तारीकरणाकडे राज्य सरकारकडून होणारे दुर्लक्ष आणि त्याचवेळी झालेली निवड यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. एस. सूर्य प्रकाश यांची आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम येथील 'दामोदरम संजीवय्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी'चे (डीएसएनएलयू) कुलगुरू म्हणून नियुक्ती झाल्याचे बुधवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आले. तेथील कुलगुरू डॉ. केशवा राव यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती झाली आहे. या पदासाठी देशभरातून तीन जणांची नावे निवड समितीने दिली होती. त्यातून कुलपती चीफ जस्टीस ऑफ आंध्रप्रदेश अँड तेलंगणा टी. बी. राधाकृष्णण यांनी ही निवड केल्याचे सूत्रांनी सांगितले. निवडीनंतर कुलगुरू डॉ. एस. सूर्य प्रकाश जाण्याचे निश्चित केल्याचे कळते. औरंगाबाद येथील 'महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ'चे पहिले कुलगुरू म्हणून डॉ. एस. सूर्य प्रकाश यांची मार्च २०१७मध्ये निवड झाली आहे. दोन वर्षांत विद्यापीठ उभारू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नऊ डिसेंबर २०१७ रोजी विद्यापीठाच्या उदघाटन कार्यक्रमात केली होती. मात्र, वर्षपूर्ण झाल्यानंतरही विद्यापीठाच्या विस्तारीकरणाकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. जागेसह, निधीची चणचण विद्यापीठाला भासते. त्यात अनेकदा पाठपुरावा करूनही सरकारकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने कुलगुरू नाराज आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता या निवडीनंतर त्यांनी येथील कुलगुरू पदाचा राजीनामा देत 'डीएसएनएलयू' चे कुलगुरू म्हणून जाण्याचे निश्चित केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. पुढील आठवड्यात ही प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

\Bदोन महिन्यातील दुसरे कुलगुरू?

\Bऑक्टोबरमध्ये अशाच प्रकारे सरकारी कारभाराला कंटाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) कुलगुरू डॉ. विलास गायकर यांनी राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा राज्यपालांनी नामंजूर केला होता. त्यात आता कुलगुरू डॉ. एस. सूर्य प्रकाश यांची 'डीएसएनएलयू'येथे निवड झाल्याने आणि येथील विस्ताराकडील दुर्लक्षामुळे राजीनामा देण्याचा निश्चित केल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काकासाहेब शिंदे यांच्या भावाला नोकरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे यांचे भाऊ अविनाश दत्तात्रय शिंदे यांना मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने नोकरी दिली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला होता. भरतीवरील निर्बंध लक्षात घेत 'खास बाब' म्हणून शासनाने प्रस्तावाला मंजुरी दिली. संस्थेने त्यांना लिपिक पदावर नोकरीची संधी दिली आहे.

संस्थेचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांनी याबाबत सांगितले की, अविनाश दत्तात्रय शिंदे यांना संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या माध्यमिक शाळेत कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्त करण्यात आली आहे. शिक्षकेतर पदांच्या भरतीवरील निर्बंध लक्षात घेत, त्यांच्या शैक्षणिक पात्रतेस अनुसरून त्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास बाब म्हणून प्रस्ताव मंजूर केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामात कुचराई केल्यास कठोर कारवाई करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

टंचाई काळात ग्रामस्तरावर क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम करणारे ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांनी समन्वय साधून नागरिकांसाठी काम करावे. टंचाई काळात हयगई केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सिल्लोड येथे आयोजित टंचाई बैठकीत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिला.

सिल्लोड येथे दुष्काळ व टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीस उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी तुकाराम मोठे, तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रबोध चव्हाण, नायब तहसीलदार संजय सोनवणे, किरण कुलकर्णी, सहाय्यक गटविकास अधिकारी ज्योती राठोड तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी यांच्यासह तालुक्यातील यंत्रणेचे प्रमुख व कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

टंचाईच्या काळात गावशिवारातच लोकांना काम देण्याच्या सूचना दिल्या. याबरोबरच शेततळे तयार करण्याच्या कामाला प्राधान्य देऊन जास्तीत जास्त शेततळी तयार करावीत. ग्रामस्थांना शेतात गावात रोजगार मिळावा म्हणून बांधबंदिस्तीच्या कामावर भर द्यावा, त्याचबरोबर विहीर फेरभरण, मातीनालाबांध,गॅबियन बंधारे, समतलचर ही जलसंधरणाची कामे जास्त प्रमाणात करावी. आगामी काळात चाराटंचाई निर्माण होऊ नये. जनावारांना संरक्षित चारा मिळावा यासाठी राष्ट्रीय वैरण विकास योजनेतून गाळपेरा करून चारा निर्मितीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. पालकमंत्री पाणंद रस्त्याच्या कामावर जास्त भर द्यावा शेत-शिवारातील अतिक्रणीत रस्ते अतिक्रमण हटवून कच्चे रस्ते मोठ्या प्रमाणात तयार करावे. अवैध पाणी उपशावर बारकाईने लक्ष ठेवावे. जिल्ह्यात चराबंदी आहे त्यामुळे या तालुक्यातून दुसऱ्या जिल्ह्यात चाऱ्याची वाहतूक होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.

\Bकेळगाव धरणात २४ तास टँकर भरणार\B

केळगाव धरणातून जांभई फीडर येथून ३० ते ४० गावचे पाण्याचे टँकर भरले जातात, मात्र येथे २४ तास वीजपुरवठा नसल्यामुळे टँकर भरण्यासाठी अडचणी येतात त्यामुळे येथे एक्स्प्रेस फीडरची लाइट द्यावी अथवा जनरेटरची व्यवस्था करावी, अशी मागणी पंचायत समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आली होती. ही मागणी मान्य करून येथे २४ तास टँकर भरण्यासाठी उपाययोजना करू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images