Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उशिराने दुष्काळ जाहीर; हा तर पैसे वाचवण्याचा धंदा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्या राज्यात दुष्काळ लवकर जाहीर केला. मात्र महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ असताना फडणवीस सरकारने दुष्काळ जाहीर करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत वाट का पाहिली. उशिराने दुष्काळ जाहीर करणे म्हणजे सरकारने हा पैसे वाचवण्याचा धंदा केला आहे,' असा आरोप काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.

एका कार्यक्रमानिमित्त शहरात आले असता माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या दुष्काळ संहितेत मोठ्या प्रमाणावर बदल केले आहेत. या निकषानुसार सरकारला ३१ ऑक्टोबर पर्यंतच दुष्काळ जाहीर करावा लागणार आहे. कर्नाटक सरकारने १७ सप्टेंबर, तर आंध्रप्रदेश सरकारने आठ ऑक्टोबर रोजी दुष्काळ जाहीर केला. महाराष्ट्र सरकारने शेवटच्या दिवशी दुष्काळ जाहीर केला. हा प्रकार पैसे वाचवण्याचा धंदा आहे. शिवाय दुष्काळातून काही काही तालुक्यांना वगळण्यात आले. आता राज्यात दुष्काळाच्या तीव्र झळा बसत असून सरकारने तत्काळ उपाययोजन करण्याची गरज आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. सध्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर असूनही मुख्यमंत्र्यांची चारा छावण्यांबाबत भूमिका नकारात्मक आहे. राज्याबाहेरून १७ लाख टन चारा आणावा लागणार आहे, असा अहवाल पशुसंवर्धन विभागाने दिला आहे. सरकारने केवळ घोषणा करू नये, काम करावे. हा दुष्काळ १९७२ पेक्षाही गंभीर आहे. त्यावेळी रोजगार हमी योजनेची कामे उपलब्‍ध होती. आताही त्याचप्रमाणे कामे उपलब्‍ध करून द्यावीत, चारा छावण्यांचे निकष जारी करून छावण्या सुरू कराव्यात, टँकरचे अधिकार तहसीलस्तरावर द्यावेत, तसेच दुष्काळी उपाययोजनांसाठी मंत्रीमंडळाची दर आठवड्याला बैठक घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. राज्यात तीव्र दुष्काळ असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. केंद्रीय पथकाने काही गावांमध्ये दहा ते पंधरा मिनिटे पाहणी केला. आता शेतकऱ्यांना हे पैसे कधी मिळणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मराठवाड्यात दुष्काळ असताना दुसरीकडे बुलेट ट्रेन सुरू करत आहेत. असे तुघलकी निर्णय रद्द करून लोकोपयोगी निर्णय घ्यावेत, असा सल्ला चव्हाण यांनी दिला. समृद्धी महामार्गाचे काय गौडबंगाल सुरू आहे ते माहित नाही, केवळ कंत्राट दिले एवढेच ऐकत आहोत. राज्यातील तरुणांचे भवितव्य रोजगार नसल्यामुळे अंधकारमय आहे, मोदी सरकाने त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. आज 'मोदी-जेटली टीम'सोबत कोणताही अर्थतज्‍ज्ञ काम करायला तयार नाही, असा टोला लगावताना प्रथम रघुराम राजन, सुब्रमण्यम, सुर्जित भल्ला व आता उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.

'एमआयएम'ला सोबत घेणार नाही

आगामी निवडणुकांबाबत चव्हाण म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षासोबत काँग्रेसची आघाडी व्हावी अशी आमची इच्छा आहे. तसा प्रस्तावही त्यांना पाठवण्यात आला आहे. परंतु, 'एमआयएम' हा जातीवादी पक्ष असल्यामुळे त्यांना आम्ही सोबत घेणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये हिंदी भाषिक राज्यात भाजपचा पराभव झाला. सरकारने दिलेले आश्वासन फोल ठरत आहेत. हे परिवर्तन होत असून आगामी लोकसभा निवडणुकीमध्येही याची प्रचिती येईल. हिंदी भाषिक राज्यामध्ये काँग्रेसची ताकद वाढली असली तरी आम्ही उत्तर प्रदेशमध्ये मायावती आणि मुलायमसिंग यांच्यासोबत आघाडी करणार आहोत, असे पथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

इंधन करापोटी २१ लाख कोटी रुपयांचा डल्ला

सरकारकडे पैसे नसल्याने त्यामुळे सरकारने केवळ पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीतून तब्बल २१ लाख कोटी रुपये कर स्वरुपात जमा करत सर्वसामान्यांच्या ‌खिशातून काढले आहेत. आमच्या वेळी सरकार अबकारी कर लावत होते, या सरकारने १९ वेळेस अबकारी करात वाढ केली आहे. आमच्या सरकारच्या तुलनेत सध्या तिप्पट करवाढ करण्यात आली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

लोकशाहीच्या संस्था धोक्यात

सरकारकडे पैसे नसल्याने रिझर्व्ह बँकेकडून चार लाख कोटी रुपये घ्यायचे आहेत. त्यासाठी गर्व्हर्नरला हुसकावून लावले आहे व त्याच्या जागेवर विश्वासातील माणूस बसवला आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता धोक्यात आली आहे, 'सीबीआय'ची विश्वासार्हता संपवलीच आहे. आज लोकशाहीच्या संस्था धोक्यात आल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंदमान निकोबारमध्ये तीन दिवस जीव टांगणीला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वातावरणातील बदलामुळे औरंगाबादच्या पर्यटकांना अदमान निकोबारच्या एका बेटावर तीन दिवस अडकून पडावे लागले. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीत पर्यटकांनी जीव मुठीत धरून तीन दिवस काढले. हे पर्यटक रविवारी (१६ डिसेंबर) शहरात दाखल झाले.

शहरातील २४ पर्यटक ११ डिसेंबर रोजी अंदमान निकोबार येथे पर्यटनासाठी गेले होते. तेथे जहाजातून पोहोचल्यानंतर ते गुरुवारी (१३ डिसेंबर) अंदमान जवळील हायलॉक या बेटावर पोहोचले. वातावरणातील बदलामुळे त्याच दिवशी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्रात चार ते आठ मिटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. परिणामी, जहाज वाहतूक बंद करावी लागली. यामुळे औरंगाबाद, मुंबई, नाशिकसह राज्यातील सुमारे सहाशे पर्यटक हायलॉक व आर्यलँडवर अडकले. दरम्यान, अनेक हॉटेलचालकांनी पर्यटकांना हॉटेल सोडण्यास सांगितल्याने परिस्थिती बिकट झाली. तसेच संधी साधून या बेटांवरील विक्रेत्यांनी खाद्यपदार्थाचे भाव तिप्पट केले. या परिस्थितीत पर्यटकांनी अदमान येथील पर्यटन विभागाशी मदतीसाठी संपर्क करूनही मदत मिळाली नाही. त्यामुळे या बिकट परिस्थितीचा सामना करत पर्यटकांना दोन दिवस काढावे लागले. अखेर रविवारी पहाटे विशेष जहाज पाठवून औरंगाबादच्या २४, नाशिकचे नऊ, मुंबईच्या २२ व नागपूरच्या आठ पर्यटकांना हायलँडहून पोर्टब्लेअरला येथे आणण्यात आले. हा प्रवास दोन तासांचा होता. त्यानंतर २४ पर्यटक पोर्टब्लेअरहून चेन्नई, मुंबई मार्गे विमानाने औरंगाबाद येथे दाखल झाले.

'उपरसे प्रेशर लाओ…'

रेस्क्यु जहाज किंवा विमानाची व्यवस्था करावी, अशी मदत मागण्यासाठी पर्यटकांनी शिपिंग ऑफिसरची भेट घेतली. त्यावेळी त्या अधिकाऱ्याने 'उपरसे प्रेशर लाओ,' असा सल्ला दिला. 'प्रेशर' वाढविण्यासाठी मारहाण करायची का?, असा प्रश्न पर्यटकांनी केल्यानंतर तो अधिकारी कार्यालय बंद करून निघून गेल्याचे पर्यटकांनी सांगितले.

औरंगाबादसह राज्यातील सहाशेपेक्षा जास्त पर्यटक तीन दिवसांपासून अडकले होते. अदमान पर्यटन विभागाकडून मदत मिळत नसल्याने मुंबई येथे संपर्क केला. त्यानंतर मदत पोहचवण्याचे काम सुरू झाले. अंदमान पर्यटन विभाग व स्थानिक पोलिसांकडून पर्यटकांना कोणतेही सहकार्य मिळाले नाही. मी आणि माझ्या सोबतचे पर्यटक महाराष्ट्र शासनाच्या मदतीने औरंगाबादला पोहोचलो आहोत.

-मंगेश कपोते, संचालक, हेरंब ट्रॅव्हल्स


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कविता गाऊन शिकवणारे शिक्षक दिसत नाहीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पूर्वी चालीत बांधलेल्या कविता ५० वर्षांनंतरही सर्वांच्या लक्षात आहेत. कारण त्या गाऊन शिकविल्या गेल्या. कविता गाऊन, चालीतून शिकविली तर कळते. मात्र, गाऊन, चालीतून शिकवणारे शिक्षक आता दिसत नाहीत, अशी खंत ज्येष्ठ शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी व्यक्त केली. गणेश घुले यांच्या 'सुंदर माझी शाळा' या बालकविता संग्रहाच्या प्रकाशसन समारंभात ते बोलत होते. ग्रामीण भागातील शाळांमध्ये दर्जा आहे, तो सापडला पाहिजे, सांभाळला पाहिजे असेही ते म्हणाले.

गोविंदभाई श्रॉफ सभागृहात झालेल्या प्रकाशन सोहळ्याला व्यासपीठावर विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, कवी डॉ. दासू वैद्य, ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे, ग्रंथाली वाचक चळवळीचे सुदेश हिंगलासपूरकर, विजय कान्हेकर, सुहास तेंडुलकर, अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वैराळकर म्हणाले, आजच्या परिस्थितीत कोणाच्या बोलण्यावर बंदी घालू नये. समाज मौनाकडे जातो आहे ही चिंतेची बाब आहे. समाजाने बोलत व्हायला शिकले पाहिजे. पूर्वीच शिक्षण माणसाला शहाणं करून सोडत आजचे शिक्षण हुशार करून सोडते. शिक्षण पद्धती अवनतीकडे जातेय असे भासत असले तरी अनेक चांगले बदल करण्याचा प्रयत्न ही ग्रामीण भागातून होतो आहे. त्या शाळांमधील सकारात्मक बदल घेण्याची गरज आहे. आयुक्त डॉ. भापकर म्हणाले, शिक्षणातील दर्जा, नितिमत्ता, गुणवत्ता कमी होण्यास प्रशासकीय अडथळेच जबाबदार होते. आता हे चित्र बदलतेय. काव्यसंग्रहावर भाष्य करताना कवी दासू वैद्य म्हणाले, बालकांची मानसिकता जाणून घेतल्याशिवाय बालसाहित्य लिहिता येत नाही. बालसाहित्य हे रिकाम्या वेळेत करायची गोष्ट नाही. ते अत्यंत जबाबदारीने करायचे काम आहे. घुले यांना मुलांची केमिस्ट्री, सायकॉलॉजी समजलेली आहे. प्रास्ताविक घुले यांनी केले. सूत्रसंचालन महेश अचिंतलवार तर आभार श्रीकांत देशपांडे यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी चोरट्यास कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुकानासमोर उभी केलेली दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्योच आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी. साबळे यांनी रविवारी दिले. करण राजु नितनवरे (२१, रा. नक्षत्रवाडी, पैठण रोड) असे आरोपीचे नाव आहे.

प्रकरणात जाहेद खान महेबूब खान (३३, रा. भोईवाडा) यांनी तक्रार दिली. तक्रारीत ९ नोव्हेंबर रोजी रात्री १२. ३० वाजेच्या सुमारास जाहेद खान हे शहानूरमियाँ दर्गा येथील बस पिकअप पॉईंटजवळील भावाच्या चहाच्या टपरीवर गेले होते. त्यांचा भाऊ अजारी असल्याने टपरीवर काम करणाऱ्या मुलाने चहापावडर व साखर संपल्याचे जाहेद खान यांना सांगितले. जाहेद खान यांनी भावाची दुचाकीवर शंभू नगर येथे गेले. ते दुचाकी उभी करुन दुकानात सामान आणण्यासाठी गेले. मात्र, दुकान बंद असल्याने ते परत आले तेव्हा दुचाकी चोरीला गेल्याचे त्यांना दिसले. या प्रकरणी जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तपास करुन आरोपी करण नितनवरे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता सहायक सरकारी वकील एस. बी. वर्पे यांनी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती कोर्टाने मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांडुळाची तस्करी करणाऱ्याला अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुप्तधन व इतर विधीसाठी मांडुळाची तस्करी करणाऱ्याला पोलिसांनी सापळा रचून रविवारी दुपारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी दिले. इरफान खान उस्मान खान (२८, रा. कटकट गेट) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

प्रकरणात गुन्हेशाखेतील पोलिस शिपाई शिवाजी एकनाथ भोसले यांनी तक्रार दिली. १५ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शिवाजी भोसले हे सहकाऱ्यांसह हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना माहिती मिळाली की, कटकट गेट येथील एका फर्निचरच्या दुकानात मांडुळाची अवैधरित्या विक्री करण्यासाठी एक व्यक्ती येत आहे. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून मांडुळाची विक्री करणारा आरोपी इरफान खान याला अटक केली. तसेच त्याच्या ताब्यातील एका पांढऱ्या गोणीत असलेला मांडुळ जातीचा साप देखील पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता सहायक सरकारी वकील एस. डी. वर्पे यांनी आरोपीने मांडुळ जातीचा साप कोठून आणला याची चौकशी करणे आहे. गुन्ह्यात आरोपीचे आणखी साथीदार आहेत का? याचा तपास करणे आहे. आरोपीने अशा प्रकारे आणखी गुन्हे केले आहेत का या बाबत तपास करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती कोर्टाने मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राफेल’मध्ये ३६ हजार कोटींचा भ्रष्टाचार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारताच्या संरक्षण इतिहासातील सर्वात मोठ्या असलेल्या राफेल विमान खरेदी प्रकरणामध्ये ५२८ कोटी रुपये असलेल्या विमानाची किंमत अचानक १६७० कोटी रुपये झाली कशी, असा प्रश्न उपस्थित करत या प्रकरणात ३६ ते ४० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारवर तोफ डागली व विमान खरेदी प्रकरणाची माहिती उघड करण्याची मागणी केली.

या प्रकरणात सरकारने सुप्रिम कोर्टाची दिशाभूल करून वापर केला असल्याचे स्पष्ट होते. कोर्टाला ही माहिती देणाऱ्या संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, निकालामुळे संभ्रम निर्माण झाला आहे, पण यावर चर्चा करावी असेही चव्हाण यांनी सांगितले. 'राफेल विमान खरेदीः भ्रम आणि वास्तव' या विषयावर फ्रेंड्स ऑफ डेमोक्रसी आणि युथ फॉर डेमोक्रसी समूहातर्फे आयोजित परिसंवादात चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून राफेल खरेदी प्रक्रिया आणि त्यात झालेला भ्रष्टाचार झाल्याचा संशय घेण्यास वाव ठरणाऱ्या मुद्यांची माहिती दिली.

प्रथम विमानाची किंमत ५२८ कोटी रुपये होती. दरम्यानच्या कालावधीमध्ये केंद्राचे राज्यमंत्री सुभाष भांबरे यांनी ६७० कोटी रुपये विमानाची किंमत असल्याचे सभागृहात सांगितले, आता किंमत १६७० कोटी झाली कशी, असा प्रश्नही चव्हाण यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी राफेल खरेदीची जून २००१पासूनची अत्यंत गुंतागुंतीची आणि किचकट प्रक्रिया उपस्थितांसमोर मांडली. ते म्हणाले की, भारताने १९८६पासून कोणतेही विमाने खरेदी केली नाहीत, मात्र आतापर्यंत देशामध्ये सुरक्षेसंदर्भात अनेकदा खरेदी करण्यात आली यामध्ये किमतीही जाहीर करण्यात आल्या आहेत. राफेलबाबत गुप्ततेच्या नावाखाली किमती दडवण्याचा प्रकार होत आहे, हा प्रकार मी पहिल्यांदाच पाहत आहे.

सुप्रिम कोर्टामध्ये गुप्‍ततेच्या नावाखाली बंद लिफाफ्यात माहिती देण्यात आली, मात्र ते प्रतिज्ञापत्र नव्हते, त्यावर कोणाचही स्वाक्षरी नव्हती, 'कॅग', लोकलेखा समिती आणि संसदेत राफेलची माहिती पुरवलेली असल्याचे न्यायालयाला खोटे सांगण्यात आले, असा आरोप चव्हाम यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात भुऱ्याचा सिल्लेखान्यात धुडगूस

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

झोपडपट्टी दादा कायद्यातून शासनाने सुटका केलेला सिल्लेखान्यातील कुख्यात गुन्हेगार भुऱ्या उर्फ वाजेद शेख याने शनिवारी मध्यरात्री सिल्लेखान्यात तरुणावर चाकुहल्ला करून पाच हजार रुपये लुबाडले. यानंतर जमावाने त्याला बेदम चोप दिला. घाटी हॉस्पिटलमध्ये देखील भुऱ्याने डॉक्टरांना दमदाटी केली. दरम्यान, त्याला अटक करण्यात आली असून, क्रांतीचौक पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुऱ्या उर्फ वाजेद कुरेशी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याला ऑगस्ट महिन्यात झोपडपट्टी दादा कायद्याखाली एका वर्षासाठी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते, मात्र शासनाच्या समितीने त्याची सुटका केलीा. शनिवारी मध्यरात्री पैठणगेट भागात असद सत्तार कुरेशी (वय ३८, रा. सिल्लेखाना) हे उभे होते. यावेळी भुऱ्याने त्या ठिकाणी येत त्यांना सिगारेट पाजण्याची मागणी केली. सत्तार यांनी नकार दिल्यानंतर भुऱ्याने त्यांच्यासोबत झटापट सुरू करीत खिशात हात घालून पाच हजार घेऊन पसार झाला. सत्तार यांनी त्याचा पाठलाग केला असता भुऱ्याने त्यांच्यावर चाकुने वार केला. यानंतर संतप्त जमावाने भुऱ्याला बेदम चोप दिला. यावेळी सिल्लेखान्यात वातावरणात तणाव निर्माण झाला होता. भुऱ्याला उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी हलवले. यावेळी भुऱ्याने तेथील डॉक्टरांना देखील धमकावले. यावेळी डॉक्टरांनी तेथील सुरक्षा रक्षकांना माहिती दिली. सुरक्षा रक्षकांनी भुऱ्याला ताब्यात घेत क्रांतीचौक पोलिसांना माहिती दिली. क्रांतीचौक पोलिसांनी घाटी हॉस्पिटल गाठून भुऱ्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bसराईत गुन्हेगार

\Bआरोपी भुऱ्या उर्फ वाजेद कुरेशी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी देखील हद्दपार आणि एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली होती. नुकतीच त्याच्यावर ऑगस्ट महिन्यात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती, मात्र दीड महिन्यात शासनाच्या समितीने त्याची सुटका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अस्सल ओडिसी, कथक नृत्याविष्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ओडिसी, कथक नृत्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणाने 'वयम् 'नृत्य व संगीत महोत्सव गाजला. पार्वती दत्ता, सुधा मुखोपाध्याय आणि ममता महाराज यांच्या नृत्यशैलीला रसिकांनी दाद दिली. पखवाज व तबलावादन नवोदित कलाकारांसाठी अभ्यासपूर्ण ठरले.

महागामी गुरुकूलला २२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 'वयम्' नृत्य व संगीत महोत्सव घेण्यात आला. शारंगदेव सदन येथे दोन दिवस आयोजित महोत्सवाची रविवारी सायंकाळी सांगता झाली. पहिल्या दिवशी महोत्सव माजी विद्यार्थिनींच्या ओडिसी नृत्याने सुरू झाला. 'मंगलाचरण'मध्ये सूर्याष्टकम सादर करण्यात आले. थाई, अष्टपदी, जलबिंदू, सावेरी पल्लवी, उडिया अभिनय प्रकारांद्वारे विद्यार्थिनींनी नृत्यरंग उलगडले. लक्षवेधी पदन्यास आणि मुद्राभिनयातून नृत्य विशेष रंगले. या सादरीकरणात दर्शना कणसे, शीतल भामरे, वैभवी पाठक, स्वाती प्रसाद, भार्गवी, ऐश्वर्या, सिया, चंचल यांनी सहभाग घेतला.

दुसऱ्या सत्रात सुधा मुखोपाध्याय यांचे एकल ओडिसी नृत्य झाले. 'माणिक्य विणा' या प्रार्थनेद्वारे सुधा यांनी रसिकांची दाद मिळवली. पल्लवी व ओडिसी अभिनय सादर करुन त्यांनी महोत्सव गाजवला. पार्वती दत्ता यांनी 'छायानट पल्लवी' प्रकाराद्वारे ओडिसीचे नावीन्य सांगितले. गुरु माधवी मुदगल रचित ही रचना मधुप मुदगल यांनी संगीतबद्ध केली होती. 'पुनी तारे आसा' या ओडिया अभिनय प्रकारातून प्रियाराधना उत्तम सादर केली. या नृत्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.

महोत्सवात रविवारी सकाळच्या सत्रात 'वैखरी' लघुपट दाखवण्यात आला. सायंकाळच्या सत्रात पार्वती दत्ता यांच्यासह विद्यार्थिनींनी कथक सादरीकरण केले. त्यानंतर ममता महाराज (दिल्ली) यांचे कथक सादर झाले. गतिमान नृत्याचे बारकावे दाखवत ममता यांनी खिळवून ठेवले. पं. बिरजू महाराज यांची कन्या असलेल्या ममता यांनी कथक परंपरा आणि वैविध्याचे नृत्यातून दर्शन घडवले. या महोत्सवाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\Bतबला व पखवाजवादन रंगले\B

'वयम्' महोत्सवात पहिल्या दिवशी सुखद मुंडे यांचे पखवाजवादन झाले. पखवाज परंपरा आणि कथकाच्या काही रचना सादर केल्या. पखवाजचे शास्त्रीय धडे नवोदित कलाकारांसाठी अभ्यासपूर्ण ठरले. तर दुसऱ्या दिवशी जगदिश व्यवहारे यांचे तबलावादन झाले. या सादरीकरणाला दाद मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षणक्षेत्र भांडवलदारांच्या दावणीला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'देशातील शिक्षणाचे झपाट्याने बाजारीकरण, केंद्रीयकरण, धार्मिकीकरण केले जात आहे. ही धोक्याची घंटा असून ४० हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या शिक्षणाची सूत्रे भांडवालदारांच्या हाती देण्याचा खटाटोप सरकार करत आहे,' असा आरोप स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे (एसएफआय) राष्ट्रीय महासचिव मयुख विश्वास यांनी केला.

महात्मा गांधी भवन येथे एसएफआयचे रविवारी जिल्हा अधिवेशन घेण्यात आले. यावेळी मंचावर राज्य सचिव बालाजी कलेटवाड, राज्य उपाध्यक्ष सुनील राठोड, राज्य कमिटी सदस्य प्राजक्ता शेटे, जिल्हाध्यक्ष सत्यजित म्हस्के, जिल्हा सचिव लोकेश कांबळे, सहसचिव स्टॅलीन आडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना विश्वास म्हणाले की, देशातील विद्यापीठांमधील रिक्त जागा न भरणे, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कमी करणे, वसतिगृहातील सोयीसुविधांना ब्रेक लावला जात आहे. जमीन, पाणी, जंगलानंतर सरकारचे लक्ष शिक्षण क्षेत्र विकण्याकडे लागले आहे. त्याचे खासगीकरण करून हळुहळु मोठ्या उद्योजकांच्या हातात देण्याचे कारस्थान सुरू आहे. सरकारी शाळा बंद करणे, 'पब्लिक प्रायव्हेट पार्टनशिप'(पीपीपी), राष्ट्रीय माध्यमिक उच्च शिक्षा अभियान (रूसा) सारखे मॉडेल हे त्याचाच भाग आहे. एकट्या मध्यप्रदेशात साडे तेरा हजार शाळा बंद करण्याचा घाट घातला तर, महाराष्ट्रात १५ हजार शाळा बंद पाडण्यात येणार आहेत, असा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारने शिक्षणावरील खर्चात कपात करत तो ३.२ टक्क्यावरून गेल्या वर्षी २.१७ टक्क्यांवर आणला आहे. खासगीकरणामुळे शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. भविष्यात ज्यांच्याकडे पैसा त्यांचीच मुले शिक्षण घेतील, अशी परिस्थिती निर्माण केली जाते आहे. संस्थांना स्वायत्तता देाताना सरकार अनुदान देणार नाही, कर्ज देऊ असे सांगते. विद्यापीठे ही कारखाना, दुकाने नाहीत हे सरकारने विचारात घ्यायला हवे. त्यामुळे या धोरणांविरोधात देशभरातल्या तरुणांना एकत्रित लढा उभारावा लागेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

\Bअंबानींचा लेकीच्या लग्नात बाराशे कोटींचा खर्च\B

देशात शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, उद्योगपतींची चंगळ सुरू आहे. मुकेश अंबांनींनी मुलींच्या लग्नावर अंदाजे बाराशे कोटी रुपयांचा खर्च केल्याचा आरोप मयुख विश्वास यांनी केला. दर तीस मिनिटाला एक शेतकरी आत्महत्या करत आहे. त्याच्याकडे पाहण्याची दानत नाही. मात्र, अशा बड्या उद्योगपतींच्या लग्नांमध्ये अभिनेत्यांपासून ते अनेकजण भोजनावळींत वाडप्याचे काम करताना दिसतात याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालवाहतूकदारांचे आरटीओंना साकडे

0
0

औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांची फिटनेस करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. काही अधिकारी हे वेळ काढूपणा करत आहेत. अशा अधिकाऱ्यांना आवर घालून या कामांना वेग द्यावा, अशी मागणी औरंगाबाद गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आरटीओ सतीश सदामते यांच्याकडे केली.

आरटीओ कार्यालयाच्या भूमिकेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून वाहनांची फिटनेस करण्यासाठी असंख्य अडचणी येत आहेत. फिटनेस टेस्टसाठी नेमण्यात आलेले अधिकारी हे वेळकाढू धोरण अवलंबत आहेत. फिटनेससाठी अधिकारी नसल्याने तीन-तीन महिन्यांपर्यंत अपॉइंटमेन्ट मिळत नाही. त्यामुळे अनेक वाहने उभी करावी लागत असल्याने ट्रान्सपोर्ट चालकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. ही अडचण दूर करावी, अशी मागणी औरंगाबाद गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फय्याज खान यांच्या सोबत आलेल्या वाहतूक व्यावसायिकांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत आगामी आठवड्यात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अश्‍वासन त्यांनी दिले. त्यामुळे मालवाहतूकदारांनी आपल्या वाहनांची योग्य देखभाल करून फिटनेससाठी अपॉइंटमेन्ट घेऊन करोडी ट्रॅकवर फिटनेस करून घ्यावे, असे आवाहन फय्याज खान यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपासणी अहवाल दडपला?

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवाजी हायस्कूलमधील विद्यार्थी धावत्या स्कूल बसमधून खाली पडल्याच्या घटनेला पंधरा दिवस उलटत आले आहेत. मात्र, तपासणीत संस्थेचा बनाव समोर येऊनही शिक्षण विभागाकडून शाळेची मान्यता काढून घेण्याचा अहवालच सादरच केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा अहवाल दडपला जात असून प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून शाळेला अभय दिले जात असल्याची चर्चा होत आहे.

गोवर-रुबेला लसीकरणासाठी राजंणगाव येथून खोकडपुऱ्यातील शिवाजी हायस्कूलमध्ये विद्यार्थी आणण्यात आले होते. त्यावेळी स्कूल बसच्या खिडकीची काच निखळून दोन विद्यार्थी धावत्या बसमधून पडले व गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर शाळेने बेकायदा हा प्रकार करत असल्याचे समोर आले. त्यानंतर शाळेची तपासणीही करण्यात आली. या तपासणीत शाळेचा अनागोंदी कारभार समोर आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी शाळेची मान्यता तत्काळ रद्द करण्याचे संकेत दिले. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैयस्वाल, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतंत्र तपासणी केली. त्यांचे अहवालही तयार असून तत्काळ मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया करण्यात येईल सांगण्यात आले. मात्र, घटनेला पंधरा दिवस होत आले तरी मान्यता काढण्याचे प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडून पुढे गेलेले नाहीत. कारवाईबाबत शिक्षणाधिकारी कार्यालयाकडूनच पुढे प्रस्ताव न गेल्याने शाळेला अभय दिले जात असल्याची चर्चा आहे.

\Bशिक्षणाधिकांत समन्वयाचा अभाव \B

प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तपासणीची प्रक्रिया केली. मात्र, अहवाल त्यांच्याच कार्यालयात धुळखात पडून आहे. अहवाल न पाठविण्यामागेही दोघांमध्ये समन्वय नसल्याचे समोर आले आहे. दोन्ही विभागाचा एकत्र अहवाल पाठविणार की, स्वतंत्र याबाबतही दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता नाही. त्यामुळे अहवालाचे गुढ कायम आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या शाळांवर कारवाईबाबत शिक्षणाधिकारी धजावत नसल्याचीही चर्चा आहे.

प्राथमिक विभागाच्या अहवालातील मुद्दे

-शाळा स्थलांतराबाबत पालकांना लेखी सूचना नाही

-शंभर टक्के पाठ्यपुस्तके वाटप केलेली नाहीत

-क्रीडा साहित्य व अध्ययन अध्यापनाबाबतचे अभिलेखे आढळलेले नाहीत

-खर्चाबाबतचे अभिलेख, हजेरीपट नाही

-शाळेने खोटी विद्यार्थी संख्या दाखवून वेतन, वेतनेतर अनुदान, शालेय पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तक व सर्व शिक्षा अभियान -अंतर्गत अनुदान घेऊन शासनाची फसवणूक केली

-सोयीसुविधांच्या निकषाला केराची टोपली

\Bपरस्परविरोधी मते \B

प्राथमिक व माध्यमिक विभागाची वेगवेगळ्या स्तरावर तपासणी झाली. त्यानंतर दोन्ही विभागाचा एकत्र अहवाल तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर कारवाईची प्रक्रिया होईल.

-सूरजप्रसाद जैयस्वाल, शिक्षणाधिकारी (प्राथमिक विभाग)

प्राथमिक व माध्यमिक विभागाचा अहवाल स्वतंत्र पाठविला जाईल. हा अहवाल संचालकांकडे पाठविला जाईल. या अहवालानंतर संचालक कार्यालयातून शाळेवर कारवाईची प्रक्रिया केली जाईल.

-बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक विभाग)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचा भर आता लाभार्थींवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश या तीन राज्यात पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने येत्या लोकसभा निवडणुकीची तयारी अधिक जोमाने सुरू केली आहे. सूक्ष्म नियोजन करतानाच आता बुथ संमेलनासह कर्जमाफी योजनेचा लाभ घेणारे शेतकरी, उज्ज्वला योजनेसह केंद्र व राज्याच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या भेटीगाठीवर भर दिला आहे.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला नुकत्याच झालेल्या राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने भाजप आमदारांची बैठकही मुंबईत आयोजित केली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांच्या उपस्थितीत जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे औरंगाबाद, जालनासह शेजारील अन्य जिल्ह्यातील कामाचा आढावा घेत आता जोमाने कामाला लागा, असा संदेश कार्यकर्त्यांना देण्यात आला.

कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेले शेतकरी, उज्ज्वला योजना, घरकूल, पंतप्रधान आवास योजनेसह केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थी नागरिकांची यादी तयार करण्याचे काम भाजपने हाती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. ही यादी तयार करताना जिल्हा, तालुक्यापासून थेट वॉर्ड, गावस्तरापर्यंतची यादी तयार करण्यात आली आहे. लाभार्थ्यांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधत या माध्यमातून निवडणुकीत भाजपला कसे अधिक बळ मिळेल, यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

\Bविविध २५ समित्या \B

'एक बुथ २५ युथ' हे धोरण आखून विधानसभा मतदारसंघनिहाय सुमारे चार हजारांवर कार्यकर्त्यांचा संच तयार करणे. जाहीरनामा समिती, विधी विभाग, मिडिया प्रभारी, निवडणूक व्यवस्थापन समिती, निवडणूक प्रचार कार्यालय आदी २५ समित्या स्थापन करत सूक्ष्म नियोजन करणाऱ्या भाजपने आता लाभार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौताळा अभयारण्यात वणवा रोखण्यासाठी फायर लाइन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जंगलांत पेटणारा वणवा नियंत्रणात आणण्यासाठी वन्यजीव विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. गौताळा औट्रमघाट अभयारण्यासह वनक्षेत्रात आवश्यक ठिकाणी जाळ प्रतिबंधक रेषा (फायर लाइन) घेण्यावर भर दिला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुका परिसरात गौताळा अभयारण्य २६० चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. मराठवाड्यातील या सर्वात मोठ्या अभयारण्यात बिबट्या, काळवीट, निलगाय, सायाळ अशा आदी प्राणी प्रामुख्याने आढळतात. तसेच अनेक दुर्मीळ औषधी वनस्पती, वनसंपदा येथे आहे. वन, वन्यप्राणी यांचे संरक्षणासाठी वन विभागाकडून प्रयत्न होत असले तरी दर उन्हाळ्यात जंगलात पेटणारा वणवा ही मात्र गंभीर समस्या झाली आहे.

पाटणदेवी जगंल परिसरात, चाळीसगाव तालुक्यातील मौजे लोंजे, शिवतांडा, भिलदरी या गावांच्या शिवारालगत वनक्षेत्रासह अनेक ठिकाणी वणवा पेटल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकदा मानवी चुकांमुळे आगी लागतात. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र जळून खाक होत असते. वनसंपदेचे, वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन वणव्यांची समस्या नियंत्रणात रहावी म्हणून वनविभाग हंगामाच्या प्रारंभीच आग प्रतिबंधक उपायांवर भर देत असतो. वन्यजीव विभागानेही दरवर्षी प्रमाणे यंदाही जाळ प्रतिबंधक रेषा (फायर लाइन) घेण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक आर. आर. काळे यांनी दिली.

\Bवणवा रोखणे शक्य \B

विशिष्ट वन क्षेत्राचा भाग तयार करून त्या भोवती फायर लाइन बनविली जाते. यात संरक्षित झाडांच्या भोवती विशिष्ट अंतरावरील गवत जाळून टाकले जाते. यासह चर घेण्याचे कामही जोमाने सुरू आहे. यामुळे जर कोणी आग लावण्याचा प्रयत्न केला, तर फायर लाइनमुळे जंगल सुरक्षित राहते. वणवा अन्यत्र पसरण्यापासून रोखणे शक्य होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमआयएम’चा मोर्चा ग्रामीण भागाकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, ओरंगाबाद

आगामी निवडणूक 'एमआयएम'ने वंचित बहुजन आघाडीसोबत लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्ष एकत्र येत असले तरी 'एमआयएम'ने पक्षपातळीवर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सध्या 'गाव तिथे 'एमआयएम' ही मोहीम जोरात सुरू असून फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात साडे चारशेपेक्षा जास्त शाखा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'एमआयएम'ने धुळे महापालिका निवडणुकीत १२ उमेदवार उभे करून चार जागांवर य्श मिळवले. त्यापूर्वी जळगाव महापालिकेत दोनच जागांवर समाधान मानावे लागले होते. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सात जागा मिळ‌वल्या. या पार्श्वभूमिवर पक्षाने औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. 'गाव तिथे 'एमआयएम' या मोहिमेत गंगापूर तालुक्यात गेल्या महिन्यात २५ शाखा स्थापन करण्यात आल्या. कन्नड तालुका व शहराध्यक्षांना ग्रामीण भागात शाखा स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. वैजापूर तालुका, सातारा, वाळूज, रांजणगावसह शहराच्या परिसरातील ग्रामीण भागात शाखा स्थापनेची तयारी सुरू आहे. शाखा स्थापन करताना बुथनिहाय पदाधिकारी नियुक्त केले जात आहेत.

………

\Bऔरंगाबाद पश्चिम मतदारसंघात बांधणी \B

लोकसभा निवडणुकीपूर्वी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष अरूण बोर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पंढरपूर, माळीवाडा, दौलताबाद, पडेगाव, साजापूर, करोडी येथे शाखा स्थापन करण्यात आल्या असून सातारा, शिवाजीनगर आदी भागात शाखा स्थापनेची तयारी सुरू आहे.

………

'एमआयएम'ला ग्रामीण भागात उत्तम प्रतिसाद मिळत असून विविध जाती धर्माचे लोक जोडले जात आहेत. फेबुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात साडे चारशे शाखा बुथनिहाय पदाधिकाऱ्यांसह तयार होतील. पदाधिकाऱ्यांच्या यादीसह शाखा स्थापनेचा अहवाल सादर करून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी, अशी मागणी खासदार आवेसींकडे करणार आहोत.

-अब्दुल रहीम नाईकवाडी, जिल्हाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तू मला मी तुला गुणगुणू लागलो…

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकप्रिय हिंदी-मराठी गाण्यांचे बहारदार सादरीकरण करीत गायिका सावनी रवींद्रने 'गानसंध्या' मैफल गाजवली. नव्या-जुन्या गाण्यांची सांगड घालत सावनीने मैफल अविस्मरणीय केली. बालगायिका विश्वजा जाधव हिच्या तरल गाण्यांना रसिकांनी भरभरुन दाद दिली.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या (औरंगाबाद आवृत्ती) सातव्या वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र यांचा 'गानसंध्या' कार्यक्रम घेण्यात आला. जुन्या-नव्या हिंदी व मराठी गाण्यांचे सुश्राव्य सादरीकरण करीत सावनीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. गायक अमित यांच्या बहारदार आवाजातील गणपती स्तवनाने 'गानसंध्या' मैफल सुरू झाली. 'तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता' या गीताच्या तालावर रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या गणानंतर गायिका नेत्रा जाधव यांनी 'कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी' ही लोकप्रिय गवळण गायली. वाद्यवृंदाची अप्रतिम साथ आणि सुरेल आवाजातील ग‌वळणीने रसिकांची भरभरुन दाद मिळवली. संगीत रिअॅलिटी शोद्वारे प्रत्येक घरात पोहचलेली बालगायिका विश्वजा जाधव हिने 'ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे' गीत गायले. या नऊ वर्षाच्या गायिकेने उत्तम गाणी सादर करीत 'गानसंध्या' रंगवली. रसिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या सावनीने 'लग जा गले' या लोकप्रिय हिंदी गाण्यातून साद घालत रंगमंचावर 'एंट्री' केली. रसिकांनीही तेवढाच मोठा प्रतिसाद दिला. मालिका, चित्रपट आणि अल्बमसाठी गायन करीत सावनी सर्वदूर पोहचली आहे. मैफलीत 'होणार सून मी त्या घरची' या मालिकेचे शीर्षकगीत 'तू मला मी तुला गुणगुणू लागलो' गाताच त्याची झलक दिसली. या गाण्याला 'वन्स मोअर' मिळाला. गाणे संपल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता. 'गोऱ्या गोऱ्या गालावरी आली लाजेची लाली' या गाण्यानेही धमाल उडवली. नेत्रा व विश्वजा यांनी 'ये इश्क हाये' या गाण्यातून ठेका धरायला लावला. अमितचे 'तेरी गलियाँ' गाणं लक्षवेधी ठरले. जुनी हिंदी गाणी आणि लावण्यांचे धमाल सादरीकरण करीत सावनीने मैफल जिंकली. 'झुमका गिरा रे', 'पान खायें सैया हमार', 'कुणीतरी बोलवा दाजिबाला', 'मला म्हणत्यात हो पुण्याची मैना' या गाण्यांनी नूर पालटला.

अमोल पालेकर व सावनी रवींद्र यांनी 'अश्विनी ये ना' या गीतासह 'दमा दम मस्त कलंदर', 'सैराट झालं जी', 'दम मारो दम' गात रसिकांना सहभागी करुन घेतले. 'बाहो में चले आ', 'लवलव करी पातं' ही विश्वजाची तरल गाणी दाद घेऊन गेली. 'माऊली माऊली' या गीताने मैफलीची सांगता झाली. श्रीपाद कोतवाल यांनी मैफलीचे निवेदन केले. तेजस देवरे, अमित निर्मळ, रोहीत, प्रवीण मुळे, निखिल खैराते, अमर वानखेडे, अमित ओक व विजय जाधव यांनी संगीत साथसंगत केली. या कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

औरंगाबादकर अस्सल रसिक

संगीत कार्यक्रमानिमित्त अनेक शहरात गेले. मात्र, पुण्यानंतर औरंगाबाद शहरात अस्सल रसिकतेचे दर्शन घडले या शब्दात सावनीने कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी 'महाराष्ट्र टाइम्स'चे वरिष्ठ सहायक संपादक प्रमोद माने यांनी सावनीचा सत्कार केला. 'महाराष्ट्र टाइम्स' ब्रँडचे मुख्य व्यवस्थापक पराग राऊत, वरिष्ठ व्यवस्थापक निखिल देशमुख यांनी इतर कलाकारांचा सत्कार केला. गिरीधर पांडे यांनी सूत्रसंचालन केले.

ढोलकीचा नाद घुमला

'गानसंध्या' कार्यक्रमात वाद्यवृंदाची नेटकी साथसंगत रसिकांसाठी पर्वणी ठरली. बराच वेळ ढोलकी वाजली नसल्याने रसिकांनी लक्ष वेधले. यावर वादक विजय जाधव यांनी ढोलकीचा फर्मास तोडा वाजवून दाखवला. या नादावर अवघ्या नाट्यगृहाने ठेका धरला. रसिक आणि जाधव यांच्यातील ही वेगळी जुगलबंदी काही वेळ सुरू होती. त्यानंतर सावनीने गायलेल्या लावण्यांनी रसिकांना खूष केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठवाड्यातील धरणे कोरडीठाक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम व लघू प्रकल्प पूर्णपणे कोरडे असल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले असून, जायकवाडी प्रकल्पातून आवर्तन सोडण्याचे नियोजन सुरू आहे.

विभागात डिसेंबर महिन्यातच टंचाईच्या झळा जाणवत आहेत. मोठ्या ११ प्रकल्पात २२.९४ टक्के पाणीसाठा आहे. ७५ मध्यम प्रकल्पात १३.९८ टक्के आणि ७४९ लघू प्रकल्पात फक्त १३.९८ टक्के पाणीसाठा आहे. बहुतांश प्रकल्प कोरडेठाक आहेत. मोजक्याच धरणात पाणी असल्यामुळे पाणी वापराचे प्रशासनाने काटेकोर नियोजन केले आहे. सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीत २६ टक्के पाणीसाठा आहे. मांजरा, माजलगाव या धरणांतील जलसाठा जोत्याखाली गेल्याने मोठ्या शहरांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषत: लातूर शहराला पाणीपुरवठा करणे प्रशासनासमोर आव्हान आहे. औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद या जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई आहे. पेरणीयोग्य पाऊस नसल्यामुळे खरीप व रब्बी पिकांची लागवड झाली नाही. सिंचनावर अवलंबून असलेल्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार नगर-नाशिक जिल्ह्यातील धरणातून ८.९९ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्यात आले. प्रत्यक्षात जायकवाडीत ४.६० टीएमसी पाणी पोहचले. त्यामुळे उन्हाळी पिकांसाठीचे आवर्तन देण्याबाबत संभ्रम आहे. डावा व उजवा कालव्याद्वारे आवर्तन सोडण्याबाबत लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) नियोजन करीत आहे. कमी पाणी असल्यामुळे सिंचनासाठी पाणी सोडण्याची शक्यता नाही, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

\Bमध्यम प्रकल्प कोरडे

\Bजिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा आहे. पाच प्रकल्पांत पाणी असून, ११ प्रकल्प पूर्णत: कोरडे आहेत. सुखना (सहा टक्के), अंबाडी (दोन), गडदगड (७५), पूर्णा नेवपूर (७२), अंजना पळशी (पाच) प्रकल्पात पाणीसाठा आहे. लाहुकी, गिरजा, वाकोद, खेळणा, अजिंठा अंधारी, शिवना टाकळी, टेंभापुरी, ढेकू, कोल्ही, नारंगी व बोरदहेगाव प्रकल्पात कोरडेठाक आहेत. त्यामुळे परिसरात पिण्याचे पाणीसुद्धा मिळणे कठीण झाले आहे. सुखना, अंबाडी व अंजना पळशी प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा असून आणखी दोन महिने पाणी पुरण्याची शक्यता आहे.

\Bप्रकल्पातील पाणीसाठा\B

प्रकल्प टक्केवारी

जायकवाडी २६

येलदरी ८

सिद्धेश्वर -२

माजलगाव -११

मांजरा - ५

उर्ध्व पेनगंगा ५३

निम्न तेरणा २३

निम्न मनार ३३

विष्णुपुरी ४७

निम्न दुधना ११

सीना कोळेगाव - ५६

(पाणीसाठा टक्क्यांमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थलांतर टळले, शाळा मिळाली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळी परिस्थितीमुळे अनेकांना गाव सोडून स्थलांतरित व्हावे लागते आहे. अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट सोडण्याची भीती लक्षात घेत शिक्षण विभागाने स्थलांतर रोखण्याची प्रक्रिया तातडीने केली अन् पुन्हा या विद्यार्थ्यांना वसतिगृह आणि हक्काची आपली शाळा मिळाली. अशा पारूंडी तांडा, अब्दुल्लापूर तांडा हंगामी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांनी भेट देत विद्यार्थ्यांना पाठबळ दिले.

औरंगाबाद जिल्ह्यातूनही ऊस तोडणीसह इतर कामांसाठी स्थलांतर होण्याचे प्रमाण आहे. अशा स्थलांतरित कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी हंगामी वसतिगृह संकल्पना पुढे आली. औरंगाबाद जिल्ह्यात अशा वसतिगृहातून साडेतेराशे विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यात यश आले. या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देत विद्यार्थ्यांसोबत स्नेहभोजन केले. अशाच पारुंडी तांडा, अब्दुल्लापूर तांडा हंगामी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत अधिकारी व पदाधिकारी यांचे ऊस तोडकामगारांच्या मुलांसोबत स्नेह भोजन केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारुंडी तांडा येथील हंगामी वसतिगृहास बांधकाम सभापती विलास भुमरे, शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल, गट विकासा धिकारी भास्कर कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य कृष्णा चव्हाण, कमलाकर एडके, पंचायत समिती सदस्य शुभम पिवळ यांनी भेट दिली. दुष्काळी परिस्थिती असल्याने पारुंडी तांडा येथील अनेक कुटुंब स्थलांतरित झाले. त्यापैकी ७० मुलांचे स्थलांतर रोखून त्यांना शिक्षणप्रवाहात टिकवून ठेवल्याचे बालरक्षक मोहन राख यांनी सांगितले. उत्कृष्ट काम करणाऱ्या बालरक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला. सर्व मान्यवरांनी मुलांसोबत स्नेह भोजनाचा आनंद घेतला. यावेळी गट शिक्षणाधिकारी अफजाना खान, शिक्षण विस्ताराधिकारी रामनाथ केदार व अनिल पुदाट, केंद्रप्रमुख सीताराम चव्हाण, सरपंच बाजीराव राठोड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामेश्वर राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

\Bअब्दुल्लापूर तांडा येथेही भेट

\Bअब्दुल्लापूर तांडा येथूनही अनेक कुटुंब ऊस तोडीसाठी स्थलांतरित झाली. त्यापैकी १३० विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यात शिक्षण विभागाला यश आले. शाळेतील विद्यार्थ्यांचे पालकांसोबत स्थलांतर होऊ नये म्हणून बालरक्षकांनी विविध ठिकाणी जात पालकांना समजावून सांगत मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले. या विद्यार्थ्यांना हंगामी वसतिगृहात सहा महिने सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वसतिगृहाला भेट देत विद्यार्थ्यांशी पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी संवाद साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर बससमोर सेल्फी अन् प्रश्नांचा भडिमार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

काही दिवसात धावणारी शहर बस कशी असेल, हे जाणून घेण्यासाठी शहरवासियांचा उत्साह रविवारी पाहायला मिळाला. नागरिकांना पाहण्यासाठी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी ही बस उभी करण्यात आली. या बसमध्ये बसून काहींना, तर काहींना बससोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. बससेवा कधी सुरू होणार व तिचे मार्ग कसे असतील हे जाणून घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. मात्र, त्याचे उत्तर महापालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांकडेही नव्हते.

शहरात सिटी बस सुरू होणार असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून आहे. पालिकेने दिलेले विजयादशमी, दिवाळीचे मुर्हूत हुकले; नवीन वर्ष सुरू होत आले तरी, सिटी बस केव्हापासून धावेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, महापालिका लवकरच शहर बस सुरू होणार असल्याचे सांगते. पालिकेला प्राप्त झालेली एक सिटी बस रविवारी शहरातील विविध भागात उभी करण्यात आल्याने नागरिकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली. ही बस शहरातून चालवत बीबी का मकबरा, निराला बाजार येथे उभी करण्यात आली. यावेळी नवीन सिटी बस पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली. ही बस सकाळी दहापासून बीबी का मकबरा येथे उभी करण्यात आली. तेथे पर्यटक व नागरिकांनी बसमध्ये बसून पाहिले. काहींनी कुटुंब कबिल्यासोबत सेल्फी काढत स्वागत केले. निराला बाजार परिसरातही नागरिकांनी सिटी बसची जवळून पाहणी केली. अनेकांनी बसचे कोणते मार्ग असतील, कोणकोणत्या भागांमध्ये बस जाणार, सेवा नेमकी केव्हा सुरू होणार, तिकिटाचे दर काय असतील, असे अनेक प्रश्न बससोबत उपस्थितांना केले. मात्र या कर्चचाऱ्यांकडे त्यांची उत्तरे नव्हती. लवकरच शहर बस सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक सर्जरी शिबिरात रुग्णांना आधार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरात तिसऱ्या दिवशी रविवारी (१६ डिसेंबर) विविध प्रकारच्या १०३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या तीन दिवसांत एकंदर २५० शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शिबिराचा समारोप सोमवारी (१७ डिसेंबर) होत आहे. हे शिबिर एमजीएम हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आले आहे.

डॉ. शरदकुमार दीक्षित यांनी लायन्स क्लब औरंगाबाद-चिकलठाणा यांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे शिष्य डॉ. राज लाला, डॉ. संजय लाला, डॉ. ललिता लाला, डॉ. मालती दमाणी (सर्व अमेरिका) आणि केरळचे डॉ. ओम अग्रवाल, डॉ. अमित बसन्नवार हे या शिबिरात शस्त्रक्रिया करत आहेत. त्यांना 'एमजीएम'चे सर्जन व सहकारी सहकार्य करत आहेत. गरिबांसाठी स्वप्नवत आणि अशक्य वाटणाऱ्या आणि रुग्णाच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडविणाऱ्या शिबिराचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही औरंगाबाद ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशनतर्फे मोफत औषध पुरवठा केला जात आहे.

शिबिरामध्ये रविवारी पापणी, दुभंगलेले ओठ, चेहऱ्यावरील व्रण आदी प्रकारच्या १०३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांच्या विश्रांतीची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली. वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणाकरिता हे शिबिर एक वेगळी ओळख बनली आहे. ४३ वर्षे सातत्याने आणि वाढत्या प्रतिसादात होणाऱ्या या शिबिरात राज्यभरातून आणि राज्याबाहेरीलही रुग्णांचा सहभाग असतो.

या शस्त्रक्रियांसाठी 'एमजीएम'चे भूलतज्ज्ञ डॉ. वासंती केळकर, डॉ. संहिता कुलकर्णी, डॉ. प्रमोद भाले, डॉ. प्रज्ञा जोशी, डॉ. कुंदा धुळे, डॉ. मंजुषा भुमे, डॉ. शिल्पा लोया, डॉ. सुजाता सोमाणी, डॉ. विदिशा बरुआ, स्टाफ नर्स उमा वाकडमाने, यमुना शेळके, स्मिता चित्ते, शुभक्ती पठारे, परवीन शेख, सुवर्ण महिंद्रकर, विजया पानगळ, सहायक संजय गायकवाड, विकास धरम, राजकुमार देडे, ज्ञानेश्वर शिंदे, मयूर चाकोते, शुभम खेमनार, अंकिता गायकवाड, शुभांगी फुटे, मावशी चंद्रकला राऊत, अंजना राऊत, सुनीता पाटील, माला जाधव, कल्पना राठोड आदींनी सहकार्य केले. 'एमजीएम'चे एम. टी. काझी यांनी समन्वयाचे काम केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश साकला, सचिव डॉ. मनोहर अग्रवाल, प्रकल्प प्रमुख राजेश लहुरीकर यांच्यासह, राजकुमार टिबडीवाला, विमलकुमार टिबडीवाला, जी. एम. बोथरा, भूषण जोशी, रवींद्र करवंदे, डॉ. दत्ता कदम, राजेश जाधव, विनोद चौधरी, राजेश भारूका, ओ. पी. खन्ना, रमेश पोकर्णा, एम. के. अग्रवाल, राजन नाडकर्णी, प्रकाश गोठी, जयकुमार थानवी यांच्यासह इतर सदस्य प्रयत्नशील आहेत.

………

\Bअमेरिकन संस्थेची अशीही मदत \B

या शिबिरात टाळुच्या ऑपरेशनसाठी अमेरिकन संस्थेकडून मदत करण्यात येत असते. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये असे उपचार करण्यात येत असून अमेरिकन संस्थेकडून मोफत उपचारासाठी मदत करण्यात येत असल्याची माहिती जयकुमार थानवी यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

…………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूसाठी मद्यपीने लुबाडले पाच हजार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने मद्यपीने मारहाण करीत पाच हजार रुपये लुबाडले. हा प्रकार शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास उस्मानपुरा, भीमपुरा भागात घडला. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अजय राजू यादव (वय ४५ रा. बौद्ध विहाराजवळ, भीमपुरा, उस्मानपुरा) यांनी तक्रार दाखल केली. यादव हा शुक्रवारी रात्री कामावरून घरी परतत होते. यावेळी त्याला ललित गौतम चित्ते (वय २२, रा. उस्मानपुरा) यांनी अडवले. ललितने यादवला दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. यावेळी यादव यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून ललितने त्यांना फायटरने मारहाण केली. फायटर नाकावर लागल्याने यादव गंभीर जखमी झाले. यावेळी ललितने यादवच्या खिशातील पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन पसार झाला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीएसआय चव्हाण तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images