Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

टेकडीवरून घसरून तरुणी ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाल्मीच्या टेकडीवरून घसरून एक १८ वर्षीय तरुणी ठार झाली. याप्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रविवारी दुपारी पार्वती गोरेलाल जमरे (वय १८, रा. गोगलवाडी, जि वडवाणी, मध्यप्रदेश, सध्या रा. कांचनवाडी) ही मुलगी वाल्मी टेकडीवर फेरफटका मारण्यासाठी गेली होती. यावेळी तिचा पाय घसरल्याने ती खाली कोसळली. यावेळी तिच्या डोक्याला गंभीर मार लागला. तिच्या वडिलांनी तिला तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी पार्वतीचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वृद्धेचा जळून मृत्यू

औरंगाबाद : शॉर्टसर्किट झाल्याने वृद्धेचा जळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी रात्री आठ वाजता बिलाल कॉलनी, एन तेरा भागात ही घटना घडली. जयनफबी रहीम सय्यद (वय ९०) या घरात एकट्या होत्या. यावेळी शॉर्टसर्किट झाल्याने घरातील सामानाने पेट घेतला. यावेळी जयनफबी जळाल्याने जखमी झाल्या. त्यांना सय्यद वसीम याकूब यांनी बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुख्य लेखाधिकाऱ्यांचे चौकशीला असहकार्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लेखा विभागातील कारभाराच्या चौकशीसाठी मुख्य लेखाधिकारी सहकार्य करीत नाहीत, अशी कबुली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सोमवारी दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे चौकशीचे काम पूर्ण करून अहवाल सादर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांनी तब्बल साडे अठरा कोटी रुपयांचे विविध कंत्राटदारांना पेमेंट केले आहे, त्यावरून ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कंत्राटदारांची ज्येष्ठता यादी न पाळता पेमेंट केल्याचा आरोप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. स्थायी समिती सभापती रेणुकादास वैद्य यांनी मुख्य लेखाधिकाऱ्यांनी केलेले पेमेंट न्यायालयाचा अवमान करणारे आहे, असा मुद्दा उपस्थित केला. नगररचना विभागाच्या माध्यमातून जमा होणारा महसूल नगररचना विभागाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामांवरच खर्च करणे बंधनकारक आहे, तसे हायकोर्टाचे आदेश असताना मुख्यलेखाधिकाऱ्यांनी यातील साडे आठ कोटी रुपये कंत्राटदारांना दिले. त्यांची ही कृती न्यायालयाचा अवमान करणारी असून त्यांना निलंबित करा, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले होते. सभापतींच्या आदेशानंतर तडकाफडकी कारवाई न करता आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नियुक्त केली.

\Bसमितीला जुजबी माहिती सादर \B

चौकशी समितीने करण्यात आलेल्या पेमेंटची सर्व माहिती मुख्यलेखाधिकाऱ्यांकडून मागवली. परंतु, आवश्यक माहिती अद्याप मिळालेली नाही, तर जुजबी माहिती देण्यात आली आहे. माहिती देण्यास मुख्य लेखाधिकारी सहकार्य करीत नसल्याने प्राप्त माहितीच्या आधारे अहवाल तयार करून तो आयुक्तांना सादर केला जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्तांनी पत्रकारांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अक्षरमात्र तितुकें नीट’चे उद्या प्रकाशन

$
0
0

औरंगाबाद - श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था आणि राजहंस प्रकाशनाच्या वतीने डॉ. नागेश अंकुश यांच्या 'अक्षरमात्र तितुकें नीट' या लेखनविषयक अभिनव मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. मध्यवर्ती कार्यालय सभागृहात बुधवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, डॉ. श्रीरंग देशपांडे व श्याम देशपांडे उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागीय महोत्सवात पाच पारितोषिके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने पश्चिम विभागीय युवक महोत्सवात पाच पारितोषिके पटकावली. पाच कला प्रकारातील विद्यार्थ्यांची चंदीगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय महोत्सवासाठी निवड झाली आहे. यानिमित्त विद्यापीठाचा एकांकिका संघ पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवर पोहचला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १९ ते २३ डिसेंबर या कालावधीत पश्चिम विभागीय युवक महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवात चार राज्यातील ४० विद्यापीठे सहभागी झाली होती. 'बामू'च्या ३७ विद्यार्थ्यांच्या संघाने विविध कला प्रकारात सादरीकरण केले. पाच प्रकारात विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली. शास्त्रीय गायनात सावनी गोगटे हिने दुसरा क्रमांक पटकावला. कोलाज प्रकारात अमृता रजियाने दुसरा, मृदमुर्तीकला प्रकारात दुसरा आणि चित्रकला प्रकारात तिसरा क्रमांक सचिन करंजाळे या विद्यार्थ्याने पटकावला. प्रवीण पाटेकर लिखित-दिग्दर्शित 'मॅट्रिक' एकांकिका दुसरी आली. या एकांकिकेत मुग्धा देशकर, संतोष पैठणे, पृथ्वी काळे, शुभम खरे, रामेश्वर पडुळे, रंगनाथ अडगळे, धीरज शिरसाट व आकाश थोरात यांनी भूमिका साकारल्या. राष्ट्रीय महोत्सवात विद्यापीठाची एकांकिका प्रथमच पोहचली आहे. विजेत्या विद्यार्थ्यांना चंदीगड येथे एक ते पाच फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय महोत्सवात सादरीकरणाची संधी मिळणार आहे. या संघाचे नेतृत्व गौतम सोनवणे, प्रकाश आकडे आणि प्रवीण पाटेकर यांनी केले.

दरम्यान, विजेत्या विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, कुलसचिव डॉ. साधना पांडे, प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर व विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. मुस्तजीब खान यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी अधिक तयारी करुन राष्ट्रीय पातळीवरील महोत्सवात चमकदार कामगिरी करावी अशा शुभेच्छा तेजनकर यांनी दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्ली दरवाजास ट्रकची धडक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव

दौलताबाद घाटातील दिल्ली दरवाजाला सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ट्रकने (एम.एच.२० ई.जी.५८५८) जोरदार धडक दिली. या घटनेत कसलिही जीवित हानी झाली नाही. मात्र, जवळपास एक ते दोन किलोमीटर वाहतूक तुंबल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.

दौलताबाद घाटात कन्नडहून औरंगाबादकडे येणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे तो ट्रक दिल्ली दरवाजावर जाऊन धडकला. यात दरवाजाचे किरकोळ नुकसान झाले. दरवाजाच्या दोन्ही बाजूने दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. सध्या नाताळच्या सुट्या असल्याने अनेक प्रवासी वेरूळ, खुलताबाद परिसरात आले आहेत. तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाल्याने त्यांची कोंडी झाली. वेळेवर इच्छितस्थळी पोहचण्यासाठी अनेक पर्यटक पायी चालताना दिसले. अपघाताची माहिती कळताच छावणी वाहतूक पोलिसचे सहायक पोलिस उपनिरीक्षक इलियास पठाण, श्रीकांत राठोड, आर. पी. जाधव, अब्दुल चाउस, अनिल पवार आणि दौलताबाद पोलिस सचिन त्रिभुवन, अशोक शेळके व स्थानिक जमिल शेख, सय्यद खलील, वसीम शेख, शेख जुनेद यांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. क्रेन आणून ट्रक हटविण्यात आला. काही काळासाठी घाटातील वाहतूक वॉटर पार्क, मोमीन आरीफ दर्गा, अब्दीमंडी येथून वळवण्यात आली. दोन तासानंतर या मार्गावरून सुरळीत वाहतूक सुरू झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखान्याची जमीन कुटुंबाच्या नावे; मंत्री लोणीकर यांना नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकरांनी प्रस्तावित चतुरेश्वर साखर कारखाना सुरू करण्यासाठी समभाग जमा करून मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केली. कारखाना अद्याप सुरू केला नसून, त्यानावाने घेतलेली जमीन मात्र कुटुंबियांच्या नावे केली जात असल्याचा आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका करण्यात आली आहे. या याचिकेत मंत्री लोणीकरांसह इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश न्या. संभाजी शिंदे व न्या. अरुण ढवळे यांनी दिले आहेत.

लोणीकरांनी २०००मध्ये जालना जिल्ह्यात चतुर्वेदश्वर साखर कारखाना मर्यादित लोणी खुर्द (ता. परतूर) नावाने सुरू करण्यासाठी समभाग (शेअर्स) जमा करण्यास प्रारंभ केला. शेअर्सच्या पैशातून लोणीकर मुख्य प्रवर्तक असलेल्या चतुर्वेदश्वर कारखान्याच्या नावे जमिनी घेतल्या. असे असले तरी कारखाना मात्र अद्यापपर्यंत अस्तित्वात आला नाही. जमिनी घेतल्यानंतर त्यांची नोंद कारखान्याच्या नावे फेरफार व सातबारावर घेण्यात आली. त्यानंतर २०१७मध्ये सदरील जमिनी लोणीकर व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे करण्यास सुरूवात झाली. ही माहिती बळीराम कडपे यांनी माहिती अधिकारात मिळविली. कारखानासंबंधी सहसंचालक औरंगाबाद (साखर), साखर संचालक पुणे यांच्याकडे माहिती मागविली असता चतुरेश्वर नावाने कुठल्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. राज्यशासनानेही कारखान्याच्या नावावर खासगी अथवा सहकारी तत्वावर परवानगी दिली नसल्याचे समोर आहे. शेअर्सधारकांची फसवणूक करण्यात आली असल्याने याविरोधात जालना पोलिस अधीक्षकांना लोणीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंबंधी दिलेल्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे बळीराम कडपे यांनी खंडपीठात फौजदारी याचिका केली.

\Bयांना केले प्रतिवादी

\Bयाचिकेत लोणीकरांसह राज्यशासन, गृह विभाग, साखर आयुक्त पुणे, सहकार आयुक्त पुणे, विभागीय सहसंचालक (साखर) औरंगाबाद, जिल्हा पोलिस अधीक्षक जालना, पोलिस निरीक्षक आष्टी आदींना प्रतिवादी करण्यात आले. याचिकाकर्त्याची बाजू सिद्धेश्वर ठोंबरे यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलांच्या माध्यमातून जगाला करा कनेक्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कलांच्या माध्यमातून देश-समाज कनेक्ट होणे शक्य आहे आणि त्यामध्येच अवघ्या जगाचे कल्याण आहे. त्यासाठीच जगातील समस्त कलांचे अभिसरण व्हायला पाहिजे,' असे मत अमेरिकेतील कलावंत तसेच सामाजिक उद्योजक उदय शरद जोशी यांनी 'रेअर शेअर'मध्ये नोंदविले.

'औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशन'च्या (आयएमए) वतीने आयोजित कार्यक्रम सोमवारी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विश्वकर्मा हॉलमध्ये झाला. या प्रसंगी एमजीएमच्या 'क्लोव्हर डेल' शाळेच्या संचालिका डॉ. अपर्णा कक्कड, सी. पी. त्रिपाठी, प्राचार्य डॉ. उल्हास शिऊरकर, डॉ. सुनील देशपांडे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. मूळचे महाराष्ट्रातील व 'हार्वर्ड'मध्ये शिक्षण घेतलेल्या उदय जोशी यांनी त्यांचा कलाप्रांतातील प्रवास विषद केला. वडिलांना असलेल्या शास्त्रीय संगीताच्या आवडीतून संगीतामध्ये मुशाफिरी सुरू झाली. त्याचवेळी वेगवेगळ्या 'परफॉर्मिंग आर्टस'विषयीच्या आवडीतून अभ्यास करत गेलो आणि 'द केनेडी सेंटर'मध्ये प्रोड्युसर म्हणून पहिला प्रोजेक्ट मिळाला. त्यानंतर जगातील विविध संस्कृतींना एकत्र आणणाऱ्या कलांविषयक विविध प्रकल्पांसाठी वाहून घेतले. विशेषतः अधिकाधिक युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या कलांविषयीच्या प्रकल्पांना अमेरिकेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला. न्युयॉर्कमधील 'बकेट बॉईज'च्या धर्तीवर मुंबईत 'अंधेरी रॉक्स' हा प्रकल्पदेखील विशेष गाजला. याच वेगवेगळ्या कलांमधून जगाला एकत्र आणणे, देश-समाजाचे कल्याण साधणेही शक्य होईल, याची खात्री पटल्यानंतर त्या दिशेने काम करीत आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे प्रकल्प सुरू करण्याचाही प्रयत्न असेल, असेही उदय जोशी यांनी नमूद केले. कार्यक्रमात सुमन शरद जोशी यांनी उदय जोशी यांचा परिचय करुन दिला. डॉ. कक्कड, त्रिपाठी यांनीही मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... तर डॉ. भापकर, भांड कसे तयार होतील ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आज शैक्षणिक पात्रता असताना तरुणांना नोकरी नाही, खेड्यातील सुशिक्षित तरुणांकडे उद्योग व्यवसायासाठी भांडवल नाही येणाऱ्या काळात परिस्थिती अशीच राहिली तर खेड्यातून शिक्षण घेतलेले विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रकाशक बाबा भांड कसे तयार होतील, असा सवाल करत ज्येष्ठ साहित्यीक रा.रं. बोराडे यांनी वाढत्या बेरोजगारीबद्दल चिंता व्यक्त केली. डॉ. पुरुषोत्तम भापकर लिखित व संपादित 'भाऊ-दीदी साथी नव्या युगाचे', 'शैक्षणिक षटकार', 'माझा शालेय परिपाठ भाग एक', 'माझा शालेय परिपाठ भाग दोन' , 'शासकीय योजनांचा खजिना- कॉलेज-नॉलेज-व्हिलेज' या पाच पुस्तकांचे प्रकाशन सोमवारी (२४ डिसेंबर) करण्यात आले. यावेळी बोराडे बोलत होते. व्यासपीठावर राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. बी. ए. चोपडे, प्रकुलगुरू अशोक तेजनकर, माजी विभागीय आयुक्त भास्कर मुंडे, उपायुक्त डॉ. विजयकुमार फड यांची उपस्थिती होती.

यावेळी बोराडे म्हणाले की, डॉ. भापकर यांनी महापालिकेत असताना शाळाबाह्य मुले सर्व्हे करून शोधून काढली होती. मात्र, आज आपल्यासमोर नोकरीबाह्य मुलांचा मोठा प्रश्न आहे, नोकरीबाह्य मुलांचा शासनाने सर्व्हे केला काय? प्राध्यापक होण्यासाठी आज एम.ए., सेट, नेट सारख्या सर्व पात्रता पुर्ण केल्या असतानाही नोकरी का मिळत नाही हा प्रश्न आहे. डॉ. भापकर यांनी कष्ट करुन दहा- दहा किलोमीटर चालत शिक्षण पूर्ण केले. खेड्यातून पुढे येत आज ते प्रशासनाच्या महत्त्वाच्या पदावर कार्य करत आहेत. बाबा भांड हे देखील ग्रामीण भागातून शिक्षण घेऊनच प्रकाशक झाले. मीही खेड्यातून शिक्षण घेऊन प्राचार्य होऊन निवृत्त झालो आहे. मात्र, आज खेड्यातील तरुणांना नोकरी नाही. नोकऱ्या नाही असे म्हणून चालणार नाही, तर तुम्हाला निर्माण कराव्या लागतील, असेही बोराडे म्हणाले. डॉ. भापकरांची ही पुस्तके नव्या पीढीला प्रेरणादायी ठरतील, असे बोराडे यांनी सांगितले. डॉ. भापकर यांनी आपल्या पाचही पुस्तकांबद्दल माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली धानोरकर यांनी केले.

गोवर्धन पर्वत

कथा, कादंबऱ्या, कवीतांच्या पुस्तकांचे प्रकाशन होते मात्र ते केवळ एकच पुस्तक असते. मात्र, आज आयुष्यात पाच पुस्तकांचे प्रकाशन हा पहिलाच प्रसंग असून मला आज हा गोवर्धन पर्वत उचलावा लागला. महसूल आयुक्त या जबाबदारीच्या पदावर असताना या पुस्तकाचे लेखन तसेच संपादन करणे म्हणजे त्यांनी किती वाचन केले असेल, हे उदाहरण घेण्यासारखे असल्याचे म्हणत प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी डॉ. भापकर यांचे कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. कडेठाणकरांनी रसिकांना केले मंत्रमुग्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. अनंत कडेठाणकर यांनी हवाईन गिटारच्या माध्यमातून जुन्या मराठी-हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला आणि रसिकांना मंत्रमुग्ध केले.

सदाचार संवर्धन ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे रविवारी विश्वभारती कॉलनीमधील श्री विश्वेश्वर महादेव मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. कडेठाणकर यांनी हवाईन गिटारवर विविध गाणे वाजवून ज्येष्ठांच्या त्यांच्या तारुण्याच्या दिवसात नेले. पुकारता चला हू मै, ए शाम मस्तानी, चला जाता हूँ किसी की धुन मे, का रे दुरावा - का रे अबोला, अशी एकाहून एक हिट गाणी त्यांनी सादर केली. दृकश्राव्य माध्यमातून त्यांनी इटली देशाचे सामाजिक जीवन व प्रेक्षणीय स्थळांबद्दलची माहिती उपस्थितांना दिली. संस्थेचे डॉ. अरविंद खाडीलकर यांना सहस्त्रचंद्र दर्शन सत्कार यावेळी करण्यात आला. ओमप्रकाश भारतीया, अशोककुमार बोरसे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अविनाश देशपांडे होते. सूत्रसंचालन संस्थेचे सचिव अनिल चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मधुसुदन कुलकर्णी, भालगावकर, शास्त्री, मधुकरराव देशपांडे, बाळासाहेब देशपांडे, स्मीता गानू यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओबीसी आरक्षणाला धक्का नको!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

'मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशी आमची भूमिका आहे. ओबीसींची जनगणना कायद्याच्या चौकटीत न करता ५४ टक्के असलेल्या ओबीसींची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची जणगणना करा. देशात मंदिर मशिद वाद व राज्यात मराठा ओबीसींमध्ये फूट पाडून त्यांना मते मिळवायची आहेत,' असा घणाघाती हल्लाबोल सोमवारी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांनी केला. ते वैजापूर येथे आयोजित समता मेळावा व बहुजन परिषदेत बोलत होते.

जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. याप्रसंगी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आमदार सतीश चव्हाण, नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी घाडगे, प्रदेश समन्वयक रवी सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, अभय पाटील चिकटगावकर, एकलव्य संघटनेचे शिवाजी ढवळे, समता परिषदेचे सहसंघटक एल. एम. पवार यांची उपस्थिती होती. प्रारंभी भुजबळ यांच्या हस्ते विषमता निर्माण करणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले. त्यानंतर भुजबळ यांनी चौफेर टोलेबाजी केली. 'दिल्लीतील महाराष्ट्र सदनचे काम शंभर कोटींचे होते. मग त्यात साडेआठशे कोटींचा भ्रष्टाचार कसा होईल? न्याय मागितला तर तुरुंगात टाकणारे हे सरकार आहे. आताही देशात एक प्रकारे मनुवृत्ती जागी झाली असून उसळी मारत आहे. समतेचे चक्र उलटे फिरत आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांनी समतेचा संदेश दिला. फुले, शाहू आंबेडकरांनी विज्ञानाची कास धरण्यास सांगितले आहे. मात्र, आज संभाजी भिडेसारखी माणसे संतती होण्यासाठी आंबे खाण्याचा सल्ला देतात. कायद्याचा आज संकोच होतोय. साठ वर्षांच्या लढाईनंतर ओबीसींना २७ टक्के आरक्षण मंडल आयोगामुळे मिळाले, पण आता मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशी आमची भूमिका आहे. ओबीसींची जनगणना कायद्याच्या चौकटीत न करता ५४ टक्के असलेल्या ओबीसींची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची जणगणना करा. मांजरपाडा भागात डोंगरावर पडणारे पाणी गुजरातमध्ये जात असल्याने हे पाणी बोगदा करून मराठवाड्यात वळवण्यात येणार आहे. केंद्रातील मोदी सरकार नोटबंदी, स्मार्टसिटी, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आदी सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. त्यांना आंबेडकरांचे संविधान हटवून हुकुमशाही आणायचे आहे,' अशी टिका त्यांनी केली.

\Bहनुमानाची जात; मोदींची नक्कल

\B२०१४मध्ये नरेंद्र मोदी यांनी नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे भाषण केले होते. त्या भाषणात मोदींनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांदा व कापूस या पीकांबद्दल कसे आश्वासन दिले याची भुजबळ यांनी हुबेहुब नक्कल करून दाखवली. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. 'हे लोक हनुमानाची जात काढत आहेत. तेव्हा उद्या ३३ कोटी देवांच्या जाती ठरवून वर्गवारी करावी लागेल,' असा टोला त्यांनी लावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महायोग सेमिनार आज

$
0
0

औरंगाबाद: महायोग परिवाराच्या वतीने वार्षिक सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मंगळवारी सायंकाळी सहा वाजता सनईवादन व महायोग प्रवर्तक प. पू. श्री कल्कीजी यांचे प्रवचन होणार आहे. रेल्वे स्टेशन रोड परिसरातील तिवारी लॉन्स येथे सोहळा होईल. भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणीजन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रेखा बैजल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बाराव्या गुणीजन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका रेखा बैजल यांची निवड करण्यात आली आहे. भानुदास चव्हाण सभागृहात १२ जानेवारी रोजी हे संमेलन होणार आहे.

संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव, प्राचार्य सुरेश वाघमारे, डॉ. शेख इक्बाल मिन्ने, प्राचार्य मिलिंद उबाळे, अॅड. महेश मुठाळ उपस्थित राहणार आहेत. यंदाचा धोंडीराम माने लेखन पुरस्कार प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर यांना 'वसुधैव कुटुंबकम्' पुस्तकासाठी दिला जाणार आहे. डॉ. महेश खरात यांना 'लोकसाहित्य जीवन आणि संस्कृती', आशिष निनगूरकर यांना 'हरवलेल्या नात्याचं गाव' या पुस्तकासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. गंगाबाई माने सामाजिक कृतज्ञता पुरस्कार विवेक लगड, सुदाम तागडमामा, सोनिया गांगुर्डे यांना दिला जाणार आहे. विशेष गुणीजन सन्मानाने श्रीकांत देशमुख व स्व. सुदेश लोटलीकर यांना सन्मानित केले जाणार आहे. जीवन गौरव पुरस्कार अॅड. शशीकुमार चौधरी यांना प्रदान करण्यात येईल. यावेळी ज्येष्ठ कवी प्रा. फ. मुं. शिंदे व रा. रं. बोराडे उपस्थित राहणार आहेत. या साहित्य संमेलनात कलाविष्कार व कविसंमेलन होणार आहे, असे संयोजक सुभाष माने कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सध्या मनुस्मृतीला अच्छे दिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्त्रियांवर गुलामी लादून जात व वर्णव्यवस्था प्रस्थापित करण्यात आली. या गुलामीची संहिता म्हणजेच मनुस्मृती आहे. या गुलामीचे प्रथम विश्लेषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी करुन मनुस्मृतीचे नव्वद वर्षांपूर्वी दहन केले. मात्र, हा व्हायरस पूर्ण नष्ट झाला नसून वर्तमानकाळात मनुस्मृतीला अच्छे दिन आले आहेत' असे प्रतिपादन कवयित्री डॉ. प्रतिभा अहिरे यांनी केले. त्या व्याख्यानात बोलत होत्या.

सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने मनुस्मृती दहन अर्थात भारतीय स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मंगळवारी झालेल्या कार्यक्रमाला डॉ. प्रतिभा अहिरे, प्रा. कमलेश बेडसे, प्रबुद्ध म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. 'मनुस्मृती - स्त्रियांवरील जात व पितृसत्ताक हिंसा' या विषयावर अहिरे यांचे व्याख्यान झाले. सद्यस्थितीत स्त्रियांच्या अवस्थेवर अहिरे यांनी भाष्य केले. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री ही जाती व्यवस्थेचे प्रवेशद्वार असल्याचे म्हटले होते. या विश्लेषणाचे यथार्थ आकलन होऊ शकले नाही. त्यामुळे परिवर्तनवादी आंबेडकरी चळवळीनेही स्त्रीमुक्ती चळवळीचा प्रश्न अग्रस्थानी घेतला नाही. स्त्री ही जात, धर्म वर्गविहीन असूनही विषमता पुढील पिढीकडे हस्तांतरीत करण्याचे काम स्त्री करते. सध्या संविधानाचा निव्वळ आभास निर्माण करुन मनुस्मृतीची अंमलबजावणी सुरू आहे. दलित, वंचित, स्त्रिया यांच्यावरील हिंसा मनुस्मृतीनेच लागू केली आहे. जातव्यवस्था उखडून फेकल्याशिवाय बाबासाहेबांना अभिप्रेत क्रांती अस्तित्वात येणार नाही' असे अहिरे म्हणाल्या.

वर्गीय शोषणावर प्रा. बेडसे यांनी विचार मांडले. 'स्त्रीमुक्ती चळवळ, जातीव्यवस्था आणि वर्गीय शोषण या प्रश्नांकडे वेगळ्या स्वरुपात बघून तशा पद्धतीने व्यूहरचना केल्याने भारतात अपेक्षित क्रांती होऊ शकली नाही. बाबासाहेबांनी आपल्या समग्र लढ्याचे केंद्र स्त्रीमुक्तीलाच केले होते. बाबासाहेबांनी इतिहासाचे जे सम्यक आकलन करुन लढा उभारला, त्याचे भान परिवर्तनवादी चळवळीने ठेवले नाही. त्यातून ब्राह्मणी पितृसत्ता प्रबळ झाली' असे बेडसे म्हणाले.

संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अमोल खरात यांनी प्रास्ताविक केले. स्वाती आदोडे, बाबासाहेब जावळे, प्रवीण चिंतोरे, कल्पना बडे, सुरेश सानप यांनी परिवर्तनवादी गिते सादर केली. मेघना मराठे यांनी सूत्रसंचालन केले आणि निशिकांत कांबळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला डॉ. मिलिंद बनकर, सोनाली म्हस्के, नीलेश जाधव, उजमा शेख, जया शिंदे, सुनिता खरात, कल्पना जाधव, सुलभा भालेकर, कोमल जाधव, रवी गाडेकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलास लुटले, आरोपीला कोठडी

$
0
0

औरंगाबाद : मकबऱ्याचा पत्ता सांगण्याचा बहाणा करून १६ वर्षीय मुलाला लुटणारा आरोपी इरफान शेख बशीर शेख याला सोमवारी (२४ डिसेंबर) अटक करून त्याला मंगळवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीला गुरुवारपर्यंत (२७) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. पाटील यांनी दिले.

लासूर स्टेशन येथे राहणारा १६ वर्षीय मुलगा हा सोमवारी वडिलांसोबत औरंगाबादला आला होता. वडील कामानिमित्त गावात असताना त्याने बीबी - का - मकबरा पाहण्याचा हट्ट केल्यानंतर वडिलांनी त्याला होकार दिला. त्यामुळे हा मुलगा एकटाच दुपारी बेगमपुरा परिसरात विचारणा करत मकबऱ्याकडे जात असताना, रस्त्यात आरोपी इरफान शेख बशीर शेख (१९, रा. बेगमपुरा) त्याला भेटला. त्याने 'मी मकबऱ्याकडे जात आहे, तू माझ्यासोबत चल', असे म्हणत मुलाला आसाराम बापू आश्रमाकडे घेऊन गेला. तिथे त्याला धमकी देत त्याच्याकडील १६५० रुपये काढून घेत आरोपी इरफान निघून गेला. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी इरफानला सोमवारी रात्री अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरगुती वादातून महिलेला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरगुती वादातून नातेवाईक महिलेला घरात शिरून मारहाण करत तिचे गंठण हिसकावण्यात आले. रविवारी रात्री नारळीबाग भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सहा आरोपींविरुद्ध जबरी चोरी, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ३४ वर्षांच्या पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. ही महिला व तिचा पती घरी असताना तिचे नातेवाईक त्यांच्या घरात जबरदस्तीने शिरले. या महिलेच्या पतीला डांबून ठेवत त्यांना मारहाण केली. महिलेचा हात धरून ओढत तिला देखील शिवीगाळ करीत अश्लील कृत्य केले. या महिलेच्या गळ्यातील गंठण देखील आरोपींनी हिसकावले. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी नीतेश सुरळे, रत्नाकर सुरळे, मधुकर सुरळे आणि तीन महिला आरोपींविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक भांगे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोरांना रान मोकळे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात चोरट्यांनी धुडगूस घातला आहे. गेल्या दोन दिवसांत दोन घरफोड्या, लुटमार, खिसाकापणे, पर्स पळविणे आणि मोबाइल चोरीच्या घटनांनी नागरिक अक्षरश: मेटाकुटीस आले असून, पोलिस नेमके करतायत काय, असा सवाल करत आहेत.

घरफोडीची पहिली घटना रविवारी मध्यरात्री मुकुंदवाडी, विठ्ठलनगर भागात घडली. येथील नरेंद्र प्रकाश ढासळेकर (वय ४०) हे रविवारी रात्री जेवण केल्यानंतर खालच्या खोलीला कुलूप लावून वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. सोमवारी सकाळी सहा वाजता ढासळेकर खाली आले असता त्यांना खालच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. आतमध्ये पाहणी केली असता चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता. त्यांनी कपाट उघडले. मात्र, लॉकर उघडता आले नव्हते. जाताना चोरटे भिंतीला लावलेला ३२ इंची एलईडी घेऊन पसार झाले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार हारुण तपास करीत आहेत. घरफोडीची दुसरी घटना शनिवारी सायंकाळी समर्थनगर भागात घडली. अभिषेक राजनारायण राजभर (वय २४, रा. महेश अपार्टमेंट) हे फ्लॅटला कुलूप लावून कामाला गेले होते. मात्र, घराचा मागील दरवाजा लावण्यास ते विसरले. चोरट्यांनी मागच्या दरवाज्यांनी घरात प्रवेश केला. घरातील लॅपटॉप आणि चार्जर असा चाळीस हजारांचा ऐवज घेऊन पसार झाले. राजभर हे वाळूजवरून घरी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी त्यांनी क्रांतीचौक पोलिस ठाणे गाठून अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.

शहरात मोबाइल चोरांनीही धुमाकूळ घातला आहे. मोबाइल चोरीची पहिली घटना शुक्रवारी रात्री पुंडलिकनगर गल्ली क्रमांक बी चार येथे घडली. येथील संतोष अंकुश रेडे हे शुक्रवारी रात्री घराचा दरवाजा लोटून झोपले होते. यावेळी चोरट्यांनी दरवाजा उघडून प्रवेश केला. घरातील सोनी कंपनीचा एलईडी, सेटअप बॉक्स आणि दोन मोबाइल असा एकूण साडेचौदा हजाराचा ऐवज लंपास केला. शनिवारी पहाटे हा प्रकार संतोषच्या लक्षात आला. या प्रकरणी संतोषच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस नाईक चौरे तपास करीत आहेत. उघड्या घरातून मोबाइल चोरीची दुसरी घटना नाथनगर भागात शनिवारी सकाळी घडली. राहुल श्रीचंद गोकलानी यांच्या पत्नी घरात टेबलावर मोबाइल हँडसेट ठेवून स्वंयपाक करण्यासाठी गेल्या. यावेळी चोरट्याने चार हजार रुपयांचा मोबाइल लंपास केला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जमादार दाभाडे तपास करीत आहेत.

\Bआठवडी बाजारात ग्राहकांना फटका

\Bसोमवारी शहानूरमिया दर्गा चौकात आठवडी बाजारात तुकाराम देवराम ठाकूर (वय ५६, रा. म्हाडा कॉलनी, देवळाई परिसर) हे खरेदीसाठी गेले होते. ठाकूर व त्यांचे मित्र भाजीपाला खरेदी करीत असताना चोरट्यांनी त्यांच्या शर्टच्या वरच्या खिशातून एकूण बावीस हजारांचे दोन मोबाइल लंपास केले. या प्रकरणी ठाकूर यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bनायब तहसीलदाराचे ३५ हजार लांबवले

\Bनायब तहसीलदार प्रमोद वसंत सावंत (वय ४५, रा. भूम, उस्मानाबाद) सोमवारी दुपारी शहरात आले होते. मुलीसह हॉटेल मंजिरी येथे जेवण केल्यानंतर ते पायी मध्यवर्ती बसस्थानकाकडे असलेल्या रिक्षा स्टँडकडे जात होते. यावेळी खिसेकापूनी त्यांच्या खिशातील पिशवीत ठेवलेले ३५ हजार नकळत काढून घेत पसार झाले. या प्रकरणी सावंत यांच्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bलग्नातून सोळा हजारांची पर्स पळवली\B

बहिणीच्या मुलाच्या लग्नात आलेल्या महिलेची सोळा हजारांचा ऐवज असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली. रविवारी रात्री साडेअकरा वाजता मुकुंदवाडी येथील इडन गार्डन लॉन्स येथे हा प्रकार घडला. या पर्समध्ये साडेअकरा हजारांचा मोबाइल, पाच हजार रुपये असा साडेसोळा हजारांचा ऐवज होता. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीएसटी’च्या तिढ्यातून रस्ते मुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'जीएसटी'चा प्रश्न सुटला असून आता रस्त्यांच्या कामांना शुभारंभाच्या कार्यक्रमाची प्रतीक्षा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. नवीन वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात रस्त्यांची कामे सुरू होतील, अशी माहिती मिळाली आहे.

राज्य शासनाने शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी शंभर कोटी रुपयांचे विशेष अनुदान दिले आहे. या अनुदानातून ३१ रस्त्यांची कामे व्हाइट टॉपिंगच्या माध्यमातून केले जाणार आहेत. रस्त्यांच्या कामांसाठी महापालिकेने चार कंत्राटदार निश्चित केले आहेत. या कंत्राटदारांना सुरक्षा अनामत रक्कमेसह 'जीएसटी'ची रक्कम भरण्यास सांगण्यात आले होते. एकूण कामाच्या किंमतीच्या १८ टक्के रक्कम 'जीएसटी'साठी भरावी लागणार असल्यामुळे त्यास कंत्राटदारांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी कंत्राटदारांची बैठक घेवून त्यांच्या शंकांचे निसरण केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर कंत्राटदारांनी काम सुरू करण्याची तयारी दाखवल्याचे कळते.

\Bपालिकेत उत्सूकता \B

काम करण्यास कंत्राटदार तयार झाल्यामुळे आता रस्त्यांची कामे केव्हा सुरू होणार याची उत्सुकता पालिका वर्तुळात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंत्राटदारांनी रस्त्यांची कामे सुरू करण्याच्या दृष्टीने रस्त्यांच्या लेव्हल घेतल्या आहेत. रस्त्याखालच्या ड्रेनेज लाइन, पाणी पुरवठ्याची लाइन, केबल याचे नियोजन करण्यात आले आहे. रस्त्याच्या कामात डक्ट कुठे घ्यायची याचेही सर्वेक्षण झाले आहे. रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामे सुरू होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जादा रक्कम उकळणाऱ्या पर्पल ट्रॅव्हल्सला दणका

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

औरंगाबाद ते नागपूर ट्रॅव्हल्सचे भाडे ९६६ रुपये असताना सुट्यांमध्ये प्रवाशांकडून जास्तीचे भाडे उकळणाऱ्या पर्पल नागपूर ट्रॅव्हल्स कंपनीस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने जास्तीचे ८७४ रुपये प्रवाशाला परत करण्याचे आदेश दिले आहेत. मंचाच्या अध्यक्ष स्मिता कुलकर्णी,

सदस्य संध्या बारलिंगे व किरण ठोले यांनी खर्चापोटी पाचशे रुपये प्रवाशास देण्याचे आदेशित केले आहे.

अॅड. डी. व्ही. खिल्लारे यांच्याकडून पर्पल ट्रीप्स नागपूर यांनी नागपूर ते औरंगाबाद या प्रवासासाठी ८७४ रुपये जास्तीचे घेतले होते. भाडे केवळ ९६६ रुपये असताना जास्तीची रक्कम घेऊन विनाकारण ग्राहकास आर्थिक व मानसिक त्रास दिल्याबद्दल खिल्लारे यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेतली होती. सुटीच्या काळातही ट्रॅव्हल्स कंपन्या अशाप्रकारे प्रवाशांना जास्तीची रक्कम वसुल करून वेठीस धरण्याचे काम करतात. नागपूरहून दुर्ग ट्रॅव्हल्सची बस होती. पर्पल ट्रॅव्हल्समधून तिकीट काढण्यात आले होते. व्हॉल्वो एसी मल्टी एक्सेल स्लीपर अशी गाडी होती. तिकीटाची रक्कम ९६६ रुपये होती. मात्र, ग्राहक प्रवाशाकडून १८४० रुपये घेण्यात आले होते. सुनावणीच्या वेळी तिकीट सादर करण्यात आले होते. बस बोले पेट्रोल पंप नागपूर येथून निघाल्यानंतर पाच किलोमीटर अंतरावर नादुरुस्त झाली होती. बसला दुरुस्तीसाठी सुमारे दोन तास वेळ लागला होता. मंचाने जादा रक्कम उकळणे अनुचित असल्याचे मान्य करून ती रक्कम परत करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोपरगावचा निधी; शासनास नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

कोपरगाव नगरपालिकेचा चार कोटींचचा निधी कोणतेही कारण न देता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविण्याच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. याचिकेत राज्य शासनास नोटीस बजावण्याचे आदेश न्या. संभाजी शिंदे व न्या. के. के. सोनवणे यांनी दिले.

कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून कोपरगावातील नाट्यगृह दुरुस्तीसाठी तसेच रस्त्यासाठी निधीची मागणी केली होती. नगरविकास विभागाने नाट्यगृह व रस्त्यासाठी प्रत्येकी दोन कोटी रूपये मंजूर केले होते. नगरपालिकेला कार्यान्वयन यंत्रणा म्हणून आदेश दिले होते. वहाडणे अपक्ष नगराध्यक्ष असल्याने स्थानिक सत्ताधारी मंडळींकडून त्यांना सतत त्रास दिला जातो. कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सदरील निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठी पत्र दिले होते. त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने सदरचा निधी बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला. या निर्णयाला खंडपीठात आव्हान देण्यात आले. एकदा कार्यान्वयन यंत्रणा घोषित केल्यानंतर कोणतेही कारण न देता शासनास सदर यंत्रणा बदलता येत नाही, असा युक्तीवाद करण्यात आला. याचिकाकर्त्यांची बाजू सतीश तळेकर यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेसबुक पोस्टवरून दाखल गुन्हा खंडपीठात रद्द

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

मित्तलकुमार तवले यांनी त्यांच्या फेसबुकवर टाकलेल्या पोस्टवरून गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांनी रद्द ठरविला. नंदूरबार जिल्ह्यातील तळोदा पोलिस ठाण्यात प्रकरणात भा.द.वि. कलम १५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे संरक्षण शासनाकडून होत नसेल, तर किमान

त्यांच्या अधिकारांवर गदा तरी आणू नका, असे म्हणत त्यांना खंडपीठाने ठणकावले आहे.

मित्तलकुमार तवले यांनी त्यांच्या फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टवरून वादंग निर्माण झाले होते. संवाद व्हावा अथवा खुली चर्चा व्हावी यासाठी सदरील पोस्ट शेअर करण्यात आली होती. फेसबुकवर टाकलेली पोस्ट ही प्रश्नार्थक होती. मात्र, चुकीचा अर्थ लावून काही डोकेफिरू तरुणांनी मित्तलकुमार यांच्याविरोधात राण उठविले होते. तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा रद्दसाठी मित्तलकुमार यांनी खंडपीठात अर्ज सादर केला होता. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद क्रमांक १९मध्ये नमूद असलेल्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा योग्य आणि खराखुरा अर्थ तसेच त्याचे संवर्धन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांचा आधार घेतला. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर खंडपीठाने मित्तलकुमार यांचा अर्ज मंजूर करीत विरोधातील गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले. तवले यांची बाजू मोहनीश थोरात यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images