Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मारहाणीसह दोन हजारांची लूट; कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मजुरीचे दोन हजार रुपये घेऊन घरी पायी निघालेल्या मजुराच्या गळ्याला चाकू लावून जिवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण करुन दोन हजार रुपये लुटल्याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही कोर्टात धाव घेतली असता, कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल होऊन, अक्षय म्हसा जाधव व मनोज श्रीरंग कसबे या आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर केले असता, आरोपींना शनिवारपर्यंत (५ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी दिले.

या प्रकरणी मजुरी काम करणारे फेरोजखान शौकत खान (३२, रा. इंदिरानगर, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा ८ नोव्हेंबर २०१८ रोजी मजुरीचे दोन हजार रुपये घेऊन पायी घरी निघाला असता, इंदिरानगरच्या पुंजाबाई चौकात सायंकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी अक्षय म्हसा जाधव (२२), आरोपी मनोज श्रीरंग कसबे (२५, दोघे रा. प्रियदर्शन कॉलनी, गारखेडा) व त्याच्या दोन साथीदारांनी फिर्यादीला दारु पिण्यासाठी पैसे मागितले. फिर्यादीने नकार देताच, आरोपी अक्षय याने फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून आरोपी मनोज व त्याच्या दोन साथीदारांनी फिर्यादीला लाकडी दांड्यांनी शिविगाळ व मारहाण केली. तसेच चाकूने वार करीत फिर्यादीच्या खिशातील मजुरीचे दोन हजार रुपये हिसकावून घेतले आणि पोलिसांत तक्रार केली तर जिवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणात फिर्यादीने उपचारानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दिली; परंतु पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही म्हणून फिर्यादीने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ प्रमाणे कोर्टात तक्रार दाखल केली होती. कोर्टाने फिर्यादीच्या तक्रारीची दखल घेऊन प्रकरणात भादंवि ३४१, ३२६, ३९४, ५०४, ५०६ कलमान्वये जवाहरनगर पोलिस गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हा दाखल होऊन वरील दोन्ही आरोपींना बुधवारी (२ जानेवारी) अटक करण्यात आली.

\Bफरार आरोपींना अटक बाकी

\Bदोन्ही आरोपींना गुरुवारी कोर्टात हजर केले असता, आरोपींकडून दोन हजार रुपये तसेच चाकू व दांडा जप्त करणे आणि दोन फरार आरोपींना अटक करणे बाकी आहे. त्याशिवाय गुन्ह्याचा तपास होणे शक्य नाही. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सुनिल जोंधळे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने दोन्ही आरोपींना शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खंडणीप्रकरणी मनसे शहराध्यक्षाला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तपोवन एक्स्प्रेस रेल्वेतील पॅन्ट्रीमधील पदार्थ जास्त दराने विक्री केले जातात व त्यांचे बिलदेखील दिले जात नाही, अशी तक्रार करीत, पॅन्ट्री चालकाचे परवाना रद्द करू, आंदोलन करुन पॅन्ट्री बंद करू, अशी धमकी देऊन पॅन्ट्री चालकाला मोबाइलवरुन दोन लाखांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात परभणी जिल्ह्यातील मनसे शहराध्यक्ष सचिन भीमराव पाटील याला औरंगाबाद रेल्वे पोलिसांनी गुरुवारी (३ जानेवारी) अटक केली. त्याला कोर्टात हजर केले असता, आरोपीला सोमवारपर्यंत (७ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. दहातोंडे यांनी दिले.

या प्रकरणात पॅन्ट्री सुपरवायझर अशोक चतुर राठोड (४२, रा. गोपालनगर, सांगवी, नांदेड) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, ३० ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी दहाच्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते तपोवन एक्स्प्रेसने आले. त्यांनी पॅन्ट्रीमधील पदार्थ जास्त दराने विक्री करुन त्याचे बिल देखील दिले जात नाही, अशी कारणे सांगत पॅन्ट्री चालकाचा परवाना रद्द करू व आंदोलन करुन पॅन्ट्री बंद पाडू, अशी धमकी दिली. त्यावेळी उपस्थित पॅन्ट्रीचे कर्मचारी देविदास उगले व रमेश पाठारे यांना फोन करुन पक्षाच्या निधीसाठी एक ते दोन लाख रुपये द्यावे लागतील अन्यथा आंदोलन करुन पॅन्ट्री बंद पाडू, अशी धमकी दिली. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पॅन्ट्रीचे सुपरवायझर अशोक राठोड यांना आरोपी सचिन भिमराव पाटील (३२, रा. साईप्रसाद, शिवरामनगर, परभणी) व उत्तम चव्हाण (रा. संतगाडगेबाबा नगर, परभणी) यांनी फोन करुन तपोवन एक्सप्रेसमधील पॅन्ट्री सुरू ठेवण्यासाठी १ ते २ लाख रुपये खंडणी मागितली, अशा तक्रारीवरुन औरंगाबाद रेल्वे पोलिस ठाण्यात सचिन पाटील व उत्तम चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bआवाजाच्या नमुन्यांचा होणार तपास

\Bरेल्वे पोलिसांनी तपासाअंती आरोपी सचिन पाटील याला गुरुवारी अटक करुन रेल्वे कोर्टात हजर केले असता, आरोपीच्या फरार साथीदाराला अटक करणे बाकी आहे. तसेच खंडणी मागितल्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग रेल्वे पोलिसांनी जप्त केली असून, त्यासाठी आरोपीच्या आवाजाचे नमुने पडताळणीसाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवायचे आहेत. त्याचवेळी आरोपी व त्याच्या साथीदारांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचाही तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायवेवरील एटीएम मशीन फोडणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हायवे वरील एटीएम सेंटरला लक्ष्य करीत गॅस कटरने ते फोडणाऱ्या तिघांच्या टोळीला ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. २३ डिसेंबर रोजी पहाटे करमाड येथील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न या टोळीने केला होता. ट्रेलरचा वापर करीत ही चालक आणि क्लिनरची टोळी एटीएम मशीन फोडत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

२३ डिसेंबर रोजी करमाड जवळील कुंभेफळ फाट्यावरील एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी बँकेचे मॅनेजर विक्रमसिंग नेगी यांनी दिलेल्या तक्रारीवरून करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक तपास करीत होते. तपासामध्ये पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित वाहन आढळले होते. टोलनाक्यावरून या वाहनाची माहिती घेतली असता हा ट्रेलर छत्तीसगड येथील असून सध्या नांदेड येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून ट्रेलरचालक अमरसिंग हजारसिंग (वय ३८, रा. पुराणसाला, जि. गुरूदासपुर, सध्या रा. सचखंडा गुरूद्वारासमोर, नांदेड) याला तसेच क्लिनर जसविंदरसिंग दलविंदरसिंग उर्फ हॅपी (वय २४, रा. खजाला, जि. अमृतसर, पंजाब) आणि हरपालसिंग अमरजितसिंग उर्फ हॅपी (वय ३० रा. गंडीविंड, जि. तरणतारण, पंजाब) यांना वर्धावरून अटक केली. चौकशीमध्ये या टोळीने गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर अधिक्षक उज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पीएसआय भगतसिंग दुलत, गणेश जाधव, सुधाकर दौंड, विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, विठ्ठल राख, सागर पाटील, धीरज जाधव, संजय भोसले, गणेश गांगवे, ज्ञानेश्वर मेटे, विनोद तांगडे, संजय तांदळे, योगेश तरमाळे यांनी केली. या प्रकरणी डीवायएसपी अशोक आमले यांच्या मार्गदर्शनाखाली करमाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक रायकर, पीएसआय प्रदिप भिवसने व पथक तपास करीत आहेत.

ट्रेलरचा वापर करीत चोरी

पकडलेल तीनही आरोपी ट्रेलरवर चालक व क्लिनर आहेत. हायवेवरील ज्या एटीएमवर चोरी करायची त्याची ते आठ ते दहा तासापूर्वी रेकी करीत होते. एटीएम सेंटरमध्ये जाऊन कार्ड स्वाईप करून ते मशीनमध्ये रक्कम आहे का नाही याची खात्री देखील करीत होते. यानंतर एटीएमसमोर ट्रेलर आडवा लावत होते. एक आरोपी एटीएममध्ये जाऊन गॅस कटरने एटीएम मशीन फोडत होता. कुंभेफळ येथील एटीएम मशीन फोडण्याचा कट त्यांनी महिन्याभरापूर्वीच आखला होता. यासाठी त्यांनी रायपूर येथून गॅस सिलिंडर चोरले होते तर नांदेड येथून गॅसकटर विकत घेतले होते.

आरोपींना कोठडी

या प्रकरणात तीनही आरोपींना शुक्रवारी कोर्टात हजर केले असता त्यांना आठ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. ए. पठाण यांनी दिले. सहायक सरकारी वकील शोभा विजयसिन्हानी यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शस्त्र, श्वान पथकाचे काम पाहून भारावले विद्यार्थी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस स्थापना दिनानिमित्त पोलिस मुख्यालयात २ जानेवारी ते ८ जानेवारी २०१९ या आठवड्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिसांच्या कामाची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी यासाठी एका प्रदर्शनाचे आयोजन पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. या प्रदर्शनला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शुक्रवारी दुपारी या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी केले. यावेळी उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे, डॉ. अनिता जमादार, हनुमंत भापकर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. या प्रदर्शनामध्ये जेष्ठ नागरिक कक्ष, भारत बटालीयन, आरमोर शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल, महिला तक्रार निवारण कक्ष, वायरलेस विभाग, नागरिक हक्क सरंक्षण विभाग, पोलिस कल्याण विभाग, बाँब शोधक आणि नाशक पथक, श्वान पथक, मोटार परिवहन विभाग, क्विक रिस्पाँस टिम, महिला बाल सहायक कक्ष आदी विभागांचे स्टॉल लावून माहिती देण्यात येत होती. हे प्रदर्शन रविवारपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

शालेय विद्यार्थी हरखले

या प्रदर्शनाला शुक्रवारी विविध शाळेंच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी त्यांना पोलिसांच्या शस्त्रांची माहिती देण्यात आली. ही शस्त्रे स्वत: हाताळताना हे विद्यार्थी भारावून गेले होते. तसेच बाँब शोधक आणि नाशक पथकाच्या स्वीटी श्वानाने हँडलरने दिलेल्या सूचनांचे आज्ञाधारकपणे केलेले पालन पाहून देखील मुले आनंदी झाली. संशयित आरोपी वस्तूवरून कसा ओळखायचा याचे प्रात्यक्षिक हँडलर जमादार तनपुरे यांनी यावेळी करून दाखविले.

क्विक रिसपाँस टिमचे प्रात्यक्षिक

एखादा दहशतवादी हल्ला झाल्यास त्याचा बिमोड कसा करायचा याचे प्रात्यक्षिक क्विक रिस्पाँस टीमच्या वतीने मुख्यालयाच्या मैदानावर दाखविण्यात आले. यावेळी जवानांनी केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांचा काळजाचा ठोका चुकला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्तालयात पाळणाघराला सुरूवात

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस आयुक्तालय आणि मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघर सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी या पाळणाघराचे उद्घाटन शोभा प्रसाद यांनी केले. यावेळी पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी उपस्थिती होती.

पोलिस दलामध्ये कर्तव्य बजावत असताना महिला पोलिसांना कामाच्या तासापेक्षा जास्त काम करावे लागते. मुले लहान असल्यास त्यांचा कामावर परिणाम होतो. ही अडचण लक्षात घेऊन हे पाळणाघर सुरू करण्यात आले आहे. या पाळणाघरामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांची एक ते आठ वर्षापर्यंतची मुले सांभाळण्याची व्यवस्था करण्यात आली असून सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत हे पाळणाघर उघडे असणार आहे. या कार्यक्रमाला उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे, डॉ. अनिता जमादार आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजच्या बैठकीत ‘समांतर’चा फैसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनी प्रकल्पाचा फैसला करण्यासाठी महापालिकेत शनिवारी (पाच जानेवारी) बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कंपनीने मुख्य भागीदार बदलण्याची मागणी केली आहे, त्याबद्दल सुद्धा या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, भागीदार बदलाच्या मागणीसंदर्भात महापालिकेला सरकारी वकिलांचे मत प्राप्त झाले आहे.

समांतर जलवाहिनीच्या 'पीपीपी'तत्वावरील कराराचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय पालिकेने चार नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेत घेतला. त्यानंतर प्रकल्पाचे काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या 'एसपीएमएल' आणि औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत महापौर, आयुक्तांच्या बैठका झाल्या. 'एसपीएमएल' किंवा औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला बँकेकडून कर्ज मिळण्याची शक्यता नसल्याने मुख्य भागीदार बदलण्याची परवानगी द्या आणि एस्सेल ग्रुपला मुख्य भागीदार करा, अशी मागणी कंपनीने केली आहे. एस्सेल ग्रुपला मुख्य भागीदार केले, तरच काम करणे शक्य होईल असे कंपनीने स्पष्ट केले आहे. निविदा प्रक्रियेत आणि करारात नसलेल्या कंपनीला मुख्य भागीदार करणे शक्य होणार नसल्याचे बोलले जात आहे.

\Bवकिलाचे मत बंद पाकिटात \B

समांतर जलवाहिनीच्या कामाचा करार करताना व निविदा प्रक्रिया पूर्ण करताना एस्सेल ग्रुप कोठेच नव्हते. 'एसपीएमएल' कंपनीसोबतच पालिकेने करार केला होता. निविदा प्रक्रिया आणि करारात नसलेल्या एस्सेल ग्रुपला मुख्य भागादीर करता येते का याबद्दल सरकारी वकिलांचे मार्गदर्शन मागवण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. सरकारी वकिलांनी बंद पाकिटात आपले मत आयुक्तांच्या नावे पाठवले आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. सरकारी वकिलाने नोंदवलेले मत आणि कंपनी अधिकाऱ्यांची भूमिका लक्षात घेवून शनिवारच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माथाडी कामगारांना हवे जाधववाडीत घरकूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आ‌वारात कार्यरत हमाल, मापाडी कामगारांकरिता समिती आवारात घरकूल उभारण्यासाठी जागा द्यावी, अशी मागणी मराठवाडा लेबर युनियनने केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

जाधववाडी येथील बाजार समिती गेल्या २० वर्षांपासून शेकडो माथाडी, मापाडी कष्टकरी कामगार काम करत आहेत. शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी हे कष्टकरी कामगार राहतात. बाजार समितीत येण्यासाठी त्यांना दररोज ५० ते १०० रुपये प्रवास खर्च येतो. पण, त्याच वेळी समिती आवारात रोजच काम मिळेल, असे नाही. अनेकदा पायी घरी जाण्याची वेळ येते. तुटपुंज्या मजुरीमुळे अनेक कामगारांच्या घराची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून घरभाडे थकीत आहे.

बाजार समितीकडे सुमारे ५० एकर जमीन असून ती सध्या पणन महामंडळाच्या ताब्यात आहे. सरकारने त्यापैकी तीन ते चार एकर जमीन या कष्टकऱ्यांच्या घरकुलासाठी उपलब्ध करून द्यावी, तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकूल योजना मंजूर करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे, युनियनचे सरचिटणीस, बाजार समिती संचालक देविदास कीर्तीशाही यांनी केली आहे. या कष्टकऱ्यांच्या घरकूलचा प्रश्न निकाली लावल्यास त्यांची होणारी परवड थांबले, सामाजिक स्थिरता मिळेल, असेही त्यांनी नमूद करत सरकारने याप्रकरणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात वाळूतस्करी जोरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील ३० पैकी केवळ पाच वाळूघाटांमध्ये वाळूउपशाला परवानगी असताना शहरात वाळूच्या इतर ठेक्यांमधूनही सर्रास वाळूची बिनदिक्कतपने सुरू आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये गौणखणिज अवैध उत्‍खनन तसेच वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या २३५ थातुरमातूर कारवायांमधून २ कोटी ९२ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यातील १ कोटी ९५ लाख रुपयांची दंडवसूली करून प्रशासन स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

जिल्ह्यासाठी यंदा वाळू लिलावातून ६० कोटी रुपयांचे महसुली उद्दिष्ट आहे. सरत्या वर्षामध्ये केवळ दोनच वाळुपट्ट्यांना प्रतिसाद मिळाल्याने जिल्ह्याचा मोठा महसूल बुडाला होता. मात्र, यंदाही वाळूपट्ट्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तर दुसरीकडे वाळूतस्करांचा बिनदिक्कतपणे व्यवसाय सुरू आहे.

अवैध उत्‍खणन तसेच वाहतुकीतून करण्यात आलेल्या कारवायांमध्ये सर्वाधिक ६५ प्रकरणे उपविभागीय अधिकारी औरंगाबाद यांनी केले असून सर्वात कमी केवळ ३ प्रकरणे खुलताबाद कार्यालयाअंतर्गत येतात. एकीकडे वाळू जप्तीतून दंडवसुली करून प्रशासन स्वत:ची पाठ थोपटवत असले तरी गेल्यावर्षी बुडालेल्या महसुलाचे काय असा प्रश्न असून येणाऱ्या वर्षातही वाळूठेक्यांचे महसूली टार्गेट पूर्ण होणार काय असा प्रश्न आहे. गेल्या आठ महिन्यांत वाळू तसेच इतर गौणखणिजाचे अवैध उत्‍खनन तसेच वाहतुकीच्या दंडाची रक्कम आणि कारवायांची संख्या पाहता 'तू मारल्या सारखे कर मी रडल्या सारखे करतो', अशी स्थिती असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात केवळ पाच वाळुघाटातून उत्‍खननाला परवानगी असताना शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे होतात कशी? त्यांना वाळू मिळते कुठून? या प्रश्नावर मात्र प्रशासनातील अधिकारी बोलण्यास तयार नाहीत.

२३५ प्रकरणात ७२ गुन्हे

एप्रिल ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीमध्ये जिल्ह्यात अवैध उत्‍खनन तसेच वाहतुकीच्या २३५ कारवायांमध्ये ७२ प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तर ९४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्वाधिक ५५ गुन्हे पैठण-फुलंब्री उपविभागीय अधिकारी कार्यालयाअंतर्गत दाखल करण्यात आले आहेत तर यामध्ये ५४ गुन्हे केवळ पैठण तहसील कार्यालयाअंतर्गत दाखल करण्यात आले आहे. वैजापूर उपविभागीय कार्यालय अंतर्गत ५, औरंगाबाद अंतर्गत ३, सिल्लोड अंतर्गत ३ तर कन्नड उपविभागीय कार्यालया अंतर्गत ६ गुन्हे दाखल करण्यात आली आहेत.

२ कोटी ९२ लाखांचा दंड

या कारवाईअंतर्गत २ कोटी ९२ लाख ११ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. यातील १ कोटी ९५ लाख २० हजार रुपयांची दंड आकारणी करण्यात आली आहे. यामध्ये पाच उपविभागीय अधिकारी कार्यालयांपैकी वैजापूर कार्यालयाअंतर्गत २७ लाख ४३ हजार, औरंगाबाद अंतर्गत ७९ लाख ११ हजार, कन्नडअंतर्गत ११ लाख, सिल्लोड मध्ये ६ लाख १५ हजार तर पैठण- फुलंब्री कार्यालयांअंतर्गत ६६ लाख ७९ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुख्यमंत्र्यांच्या स्वागताच्या फलकांची जप्ती सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले फलक जप्त करण्याची कारवाई महापालिकेने शुक्रवारी सकाळपासून सुरू केली. केवळ २५ फलक लावण्याची परवानगी घेऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शंभरावर फलक लावल्याची माहिती मिळाली आहे.

शासकीय अनुदानातून रस्त्यांच्या व्हाइट टॉपिंगची कामे केली जाणार आहेत. या कामाचा शुभारंभ गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. मुख्यमंत्री रस्त्यांच्या कामांच्या शुभारंभासाठी येणार असल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता. सिडको-हडको भाग शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. शिवसेनेच्या बालेकिल्यात मुख्यमंत्र्यांचा जाहीर कार्यक्रम होणार असल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहराच्या विविध भागात मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे फलक लावले. त्यामुळे मुख्य रस्ते, चौक आणि वाहतूक बेटे फलकांनी झाकून गेली होती. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम झाल्यावर गुरुवारी महापालिकेच्या मालमत्ता विभागाने वॉर्ड कार्यालयांच्या मदतीने फलक जप्त करण्याची कारवाई सुरू केली.

महापालिकेचे मालमत्ता अधिकारी वामन कांबळे यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता ते म्हणाले, 'भारतीय जनता पक्षाने २५ फलक लावण्याची परवानगी घेतली होती. २५ फलकांशिवाय लागलेले फलक अनधिकृत किंवा विनापरवानगी लावलेले होते. सर्वच फलक काढून घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. फलक जप्त करून पालिकेच्या ताब्यात ठेवले जातील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांसाठी मुंबईवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सव्वाशे कोटींच्या रस्त्यांची यादी घेवून महापालिकेचे पदाधिकारी बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. यादीसह रस्त्यांचा प्रस्ताव देखील मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी शंभर कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन झाले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर कार्यक्रमात त्यांनी औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी आणखी १२५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले. विधानसभा निवडणूकीपूर्वी हा निधी महापालिकेला दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणgकीत मतदारांचा आशीर्वाद मिळाल्यावर पुन्हा शंभर कोटी रुपये दिले जातील, असेही त्यांनी जाहीर केले.

सव्वाशे कोटी रुपयांमध्ये कोणत्या रस्त्यांची कामे करता येतील याची यादी तयार करण्याचे आदेश शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अधिकाऱ्यांना दिले. शंभर कोटींच्या अनुदानातून आणि डिफर्ड पेमेंटमधून कामे करण्यात येणाऱ्या रस्त्यांचा समावेश सव्वाशे कोटींमध्ये करू नका आणि यादी लवकर सादर करा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. पत्रकारांशी बोलताना महापौर म्हणाले, 'रस्त्यांची यादी घेऊन महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह आपण बुधवारी मुंबईला जाणार आहोत. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना रस्त्यांची यादी आणि रस्त्यांच्या कामाचा प्रस्ताव सादर केला जाईल. यावेळी सर्वपक्षीय आमदारांनी देखील सोबत यावे, अशी विनंती आपण करणार आहोत. खासदार चंद्रकांत खैरे यांनाही सोबत येण्याची विनंती केली जाईल.'

\B'समांतर'चा निर्णय सांगणार\B

समांतर जलवाहिनीच्या कामाबद्दल शनिवारी (पाच जानेवारी) अंतिम बैठक होत आहे. या बैठकीत झालेला निर्णय देखील रस्त्यांच्या यादीबरोबरच मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाईल आणि मदत करण्याची विनंती केली जाईल, असे महापौर म्हणाले. रस्तांच्या कामासाठी निधी देण्याचे आणि समांतर जलवाहिनी प्रकरणात सर्वती मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाराटंचाईवर साक्षरता अभियानाचा फंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अत्यल्प पावसामुळे मराठवाड्याला यंदाही दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत. मराठवाड्यात मुबलक चारा उपलब्ध असल्याची आकडेवारी प्रशासनाकडे असली तरी दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या मराठवाड्यात येत्या काही दिवसांत चारा छावण्या सुरू करावे लागतील, असा अंदाज प्रशासनाचा आहे. चाऱ्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून चारा साक्षरता अभियान राबवून जनजागृती करण्यात येत आहे. १० ‌जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या अभियानात गावोगावी जाऊन चाऱ्यासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.

येत्या काही दिवसांमध्ये चारा व पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी, पशुपालकांना पशुधनाचा सांभाळ करणे अवघड होणार आहे. १ ते १० जानेवारी दरम्यान राबविण्यात येत असलेल्या या चारा साक्षरता अभियानामध्ये चाऱ्याचे तंत्रज्ञान, चारा प्रक्रिया आणि आधुनिक चारा (अझोला, हायड्रोपोनिक) या विषयांवर मार्गदर्शन करणारे वाहन संपूर्ण जिल्ह्यात फिरून जनजागृती करण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात दोन शिबिरे याप्रमाणे प्रबोधन शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत विविध प्रात्याक्षिके, पीपीटी व चित्रफितींद्वारे चाऱ्याचे प्रकार व लागवड, निकृष्ट चारा व सकस करणे, मुरघास बनविणे, कडबा कुट्टी यंत्राचा वापर, हायड्रोफोनिक चारानिर्मिती, अझोला लागवड व उत्पादन, हंगामी चारा लागवड, खनिज मिश्रणाचा वापर, वैरण विकास योजनांची माहिती याबद्दल प्रबोधन करण्यात येणार आहे, त्यामुळे चारा वर्षभर उपलब्ध होऊन दुष्काळी परिस्थितीवर मात करता येणार आहे.

६७ लाख जनावरांचा प्रश्न

मराठवाड्यात लहान मोठी अशी एकूण ६७ लाख जनावरांची संख्या असून यामध्ये ३६ लाख २५ हजार ४९० मोठी जनावरे, ११ लाख ३६ हजार लहान जनावरे आहेत. तर विभागात शेळ्या मेढ्याची संख्या १९ लाख ४५ हजार ७२८ आहे. मराठवाड्यात जनावरांच्या संख्येच्या तुलनेत दररोज २६ हजार ३३० टन चाऱ्याची आवश्यकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या पिढीतील कवी अरूण कुलकर्णी यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नव्या पिढीतील आश्वासक कवी अरूण गोपाळ कुलकर्णी (वय ५५) यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने गुरुवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्यावर प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

अत्यंत तरल जाणिवेची कविता लिहिणारे कवी अशी ओळख अरूण कुलकर्णी यांनी अल्पावधीत निर्माण केली होती. सेलू आणि नांदेड येथे शालेय व महाविद्यालयीन काळातच ते कविता लेखनाशी जोडले गेले होते. मितभाषी असलेले कुलकर्णी वेगळ्या जाणिवेची कविता लिहित राहिले. मोजक्याच पण सर्वार्थाने दखल घ्यायला लावणारी कविता हे त्यांच्या लेखनाचे बलस्थान होते. मराठवाड्यात साहित्य क्षेत्रात मोठा मित्रपरिवार असलेल्या कुलकर्णी यांची अकाली 'एक्झिट' धक्कादायक ठरली. त्यांचा 'बुजगावणे' हा कवितासंग्रह आणि 'रिमझिम' हा ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. कुलकर्णी यांनी दिवाळी अंक आणि नियतकालिकांसाठी विपुल लेखन केले. ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात कार्यरत होते.

आपल्या कवितेतून मानवतेची प्रार्थना करणारा कवी अचानक जाणे धक्कादायक आहे. अत्यंत सोज्वळ आणि प्रेमळ स्वभाव असलेल्या अरूण कुलकर्णी यांचे प्रत्येक क्षेत्रात मित्र होते. कवितेच्या प्रांतात वेगळी वाट निवडणाऱ्या अरूण यांची नेहमी उणीव भासत राहील.

- डॉ. ऋषिकेश कांबळे, समीक्षक

लेखन आणि साहित्य उपक्रमाविषयी अत्यंत संवेदनशील असलेला हा कवी होता. भरपूर वाचन असलेले आणि वेगवेगळे संदर्भ सहजतेने सांगणारे निगर्वी व्यक्तिमत्त्व होते. नेहमी चांगले लिहिण्याबाबत ते आग्रही असत.

- रवी कोरडे, कवी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निसर्ग संवर्धनाची जबाबदारी सर्वांची’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'निसर्ग, पर्यावरण संवर्धन आणि त्यासाठी पक्षी संरक्षण, संवर्धन ही आपली जबाबदारी आहे. पुढच्या पिढीकरिता हे करणे आपले कर्तव्य आहे,' असे प्रतिपादन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले.

रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशनल अकॅडेमी, वन्यजीव वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय सहाव्या पक्षी महोत्सवाला शुक्रवारी उत्साहात प्रारंभ झाला. एमआयटी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित महोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले. वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील, 'एमआयटी'चे संचालक मुनीष शर्मा, 'एमटीडीसी'चे सरव्यवस्थापक शेखर जैस्वाल, प्राचार्य संतोष भोसले, प्रा. निलेश पाटील, डॉ. दिलीप यार्दी, उप वनसंरक्षक आर. आर. काळे उत्तम कळवणे आदी उपस्थित होते.

'प्रत्येकातच निसर्गप्रेमी दडलेला असून, त्याला बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता हा महोत्सव अत्यंत उपयुक्त आहे,' असे जिल्हाधिकारी म्हणाले. 'भविष्यात या विषयाच्या अभ्यासाला मोठा वाव आहे. हजारो किलोमीटर प्रवास करणारे पक्षी हा एक संशोधनाचा विषयच बनला आहे,' असे प्रा. शर्मा म्हणाले. जैस्वाल यांनी, पक्षी महोत्सवानिमित्त निर्माण होणारी जागरूकता महत्वाची रस्त्याचे सांगितले. डॉ. दिलीप यार्दी यांनी महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. उत्तम काळवणे यांनी प्रास्ताविक, अनुष्का जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

\Bनिसर्गाचे देणे लागतो: बैजु पाटील \B

अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांची किरण परदेशी यांनी मुलाखत घेतली. त्यांनी वन्यप्राणी, पक्षी, पाण्याखालील जीवन या विषयावर, तसेच छायाचित्रे काढताना आलेले अनुभव सांगितले. निसर्ग हा आपल्याला सातत्याने भरभरून देतो. निसर्गाच्या सान्निध्यातील मिळणारी ऊर्जा सतत नवीन प्रेरणा, उत्साह देते. निसर्गाचे आपणही काही देणे लागतो, त्याचे संरक्षण, संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. पक्षी जीवनातून निसर्ग संवर्धनाची प्रेरणा मिळते. त्या दृष्टीने सर्वानीच यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

\Bरविवारी पक्षी निरीक्षण\B

महोत्सवात रविवार पहाटे जायकवाडी पक्षी अभयारण्य येथे पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी वाहन व्यवस्था करण्यात आलेली आहे. सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी करावी, असे आ‌वाहन डॉ. दिलीप यार्दी यांनी केले आहे.

\Bबक्षीस विजेते \B

जायकवाडी पक्षी अभयारण्यात घेण्यात आलेल्या छायाचित्रण स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी बक्षीसे प्रदान करण्यात आली. शिकाऊ गटात विजय ढाकणे यांना प्रथम, द्वितीय सार्थक अग्रवाल, तर तृतीय पुरस्कार विलास भुतेकर, व्यावसायिक गटात सुदर्शन कुंभकर्ण यांना प्रथम, द्वितीय संकेत कुलकर्णी, तर तृतीय पुरस्कार ज्ञानेश्वर गिराम यांना प्रदान करण्यात आला.

\Bछायाचित्र प्रदर्शन

\Bमहोत्सवानिमित्त विविध छायाचित्रकारांनी काढलेल्या पक्षी आणि वैन्यजीवांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महसत्ता होण्यासाठी उद्योगांचे सामर्थ्य वाढवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स'च्या मानांकनानुसार नावीन्यपूर्ण उद्योजकीय संकल्पनेत भारत देश ५७ व्या स्थानावर आहे. जगात अव्वल क्रमांक मिळवायचा असल्यास संशोधनातून उद्योजक निर्माण होणे गरजेचे आहे. उद्योजकीय सामर्थ्य वाढल्याशिवाय भारत महासत्ता होऊ शकणार नाही' असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले. ते आविष्कार महोत्सवात बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी 'आविष्कार' तंत्रज्ञान महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे शुक्रवारी सिफार्ट सभागृहात उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, उद्योजक मुकुंद कुलकर्णी, समन्वयक डॉ. भारती गवळी आणि सहसमन्वयक डॉ. भास्कर साठे उपस्थित होते. आविष्कार महोत्सव नावीन्यपूर्ण संकल्पनांना चालना देणारा असल्याचे चोपडे यांनी सांगितले. 'उद्योजकांच्या नावीन्यपूर्ण मानांकनात डेन्मार्क, नेदरलँड, असे लहानसे देश भारताच्या पुढे आहेत. या देशांनी संशोधनातून उद्योग उभारले आहेत. आपला देश पिछाडीवर पडल्यास महासत्ता होणार नाही. रोबोटिक युगात नोकरीच्या संधी कमी होणार आहेत. त्यामुळे नावीन्यपूर्ण उद्योग हाच पर्याय आहे,' असे चोपडे म्हणाले. विद्यापीठ मागील तीन वर्षांपासून जिल्हा, विद्यापीठ आणि राज्यस्तरीय आविष्कार महोत्सव घेत आहेत. सहा विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांनी नवीन संकल्पना असलेले प्रयोग प्रदर्शनात मांडले आहेत. औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद येथे पार पडलेल्या जिल्हास्तीय आविष्कार महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांचा या महोत्सवात सहभाग आहे. सहभागी २५७ संशोधक विद्यार्थ्यांपैकी ४८ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय आविष्कार महोत्सवासाठी निवड करण्यात येणार आहे. हा महोत्सव गडचिरोली येथे १५ जानेवारीला होणार आहे. या महोत्सवाच्या संयोजन समितीत डॉ. प्रवीण यन्नावार, डॉ. मदन सूर्यवंशी, डॉ. कैलास अंभुरे, डॉ. रमेश मंझा, डॉ. भगवान साखळे, डॉ. विष्णू पाटील, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. तुषार धोंडगे, डॉ. प्रमोद रोकडे, डॉ. सतीश जाधव, डॉ. प्रशांत दीक्षित, डॉ. राम कदम, डॉ. किशन हावळ यांचा समावेश आहे.

-----उद्योगाचे बारकावे शिका

निवडलेल्या विद्यार्थ्यांना उद्योगातील बारकावे सांगितले जाणार आहेत. भारतात कल्पनेवर सुरू करण्यात आलेले उद्योग वर्ष-सहा महिन्यात बंद पडतात. आतापर्यंत तब्बल ९० टक्के उद्योग बंद पडले असून उद्योगाच्या यशस्वितेसाठी कल्पना, जिद्द आणि प्रेझेंटेशन चांगले असावे असा सल्ला उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजेंद्रसिंह हजारी यांचे निधन

$
0
0

औरंगाबाद,

जवाहर कॉलनी येथील रहिवासी राजेंद्रसिंह हजारी (५४) यांचे शुक्रवारी (४ जानेवारी) संध्याकाळी साडेसहा वाजता अल्‍पशा आजाराने निधन झाले. शनिवारी (५ जानेवारी) सकाळी साडेनऊ वाजता त्यांची अंतयात्रा समर्थ हाऊसिंग सोसायटी (जवाहरनगर) येथून निघून कैलासनगर ये‌थे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स.भु.च्या सरचिटणीसपदी डॉ. उकडगावकर यांची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्री सरस्वती भुवन संस्थेच्या नियामक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत सरचिटणीसपदी डॉ. नंदकुमार उकडगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी माधव उर्फ रमेश गुमास्ते, तर कोषाध्यक्षपदी अरुण मेढेकर हे निवडून आले आहेत.

स.भु.च्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राम भोगले हे उपस्थित होते. १८ डिसेंबर २०१८ रोजी नियामक मंडळाच्या निवडणुकीत राम भोगले हे निवडून आले होते. उपाध्यक्ष म्हणून दिनेश वकील यांची बिनविरोध निवड झाली होती. १५ सदस्यांच्या नियामक मंडळाची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीत उपाध्यक्ष आणि कोषाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत माधव गुमास्ते यांनी अॅड. रामेश्वर तोतला यांचा ११-४ अशा मतांनी पराभव केला. सरचिटणीसपदी डॉ. नंदकुमार उकडगावकर हे बिनविरोध निवडून आले.

कोषाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अरुण मेढेकर यांनी बाजी मारली. त्यांनी मावळते कोषाध्यक्ष जुगलकिशोर धूत यांचा ८-७ अशा मतांनी पराभव केला. नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : राम भोगले अध्यक्ष, दिनेश वकील व माधव उर्फ रमेश गुमास्ते उपाध्यक्ष, डॉ. नंदकुमार उकडगावकर सरचिटणीस, अरुण मेढेकर कोषाध्यक्ष.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामतीर्थकर यांचे उद्या व्याख्यान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ब्राम्हण महिला मंचतर्फे 'संक्रांतीचे वाण महिलांचा सन्मान' या विषयावर रविवारी (सहा जानेवारी) अपर्णाताई रामतीर्थकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सिडको येथील जगद्गुरू संत तुकाराम नाट्यगृहात दुपारी तीन वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती राहणार असून, कार्यक्रमासाठी भाजप प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, माजी उपमहापौर संजय जोशी, अनिल पैठणकर यांची उप‌िस्थिती राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूलभूत सुविधांसाठी काँग्रेस सेवादलाचा मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ब्रिजवाडी, भारतनगर, नारेगाव या भागात मूलभूत नागरी सुविधा द्याव्यात या मागणीसाठी औरंगाबाद शहर जिल्हा महिला काँग्रेस सेवादलातर्फे शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाणी मिळालेच पाहिजे, सुविधा मिळाल्याच पाहिजेत, अशा घोषणा देण्यात आल्या.

महापालिका स्थापन झाल्यापासून ब्रिजवाडी, भारतनगर, नारेगाव या भागाचा समावेश महापालिकेत करण्यात आला, पण अद्याप या भागाला महापालिकेने मूलभूत सुविधा दिल्या नाहीत. या संपूर्ण भागात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ड्रेनेज लाइन टाकण्यात आलेल्या नाहीत, रस्ते नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता क्रांतीचौकातून मोर्चा निघाला आणि महापालिकेवर येऊन धडकला. महिला काँग्रेस सेवादलाच्या संघटक मृणालिनी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सुवर्णा हिवराळे,शोभा साबळे, अनुसया काजळे, अरुणा मोरे, धबूबाई मगरे, रंजना खाडे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग या निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ यादीत आणखी २३४ गावे

$
0
0

म. टा. प्रति‌निधी, औरंगाबाद

शासनाने पहिल्यांदाच दुष्काळ निकषांमध्ये बदल करून ट्रिगरच्या निकषानुसार दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता टप्प्याटप्प्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येत असून आता दुष्काळ जाहीर करण्याच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील २३४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या चार जिल्ह्यातील पूर्ण गावांचा समावेश झाला आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील ४७ तालुके, दुसऱ्या टप्प्यामध्ये २६८ महसूली मंडळामध्ये तर आता तिसऱ्या टप्प्यामध्ये २३३ गावांचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यात आल्यामुळे आता विभागातील ४२१ महसुली मंडळांपैकी ३५० मंडळांचा दुष्काळात समावेश करण्यात आला असून अद्यापही ७१ महसुली मंडळे दुष्काळाबाहेर आहेत.

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार परभणी जिल्ह्यातील ८० गावांचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, यामध्ये गंगाखेड महसुली मंडळातील २० गावे तर जिंतूर तालुक्यातील बामनी मंडळातील ३० तर सांगवी मंडळातील ३० गावांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील ५८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून यामध्ये मंठा तालुक्यातील मंठा मंडळातील २८ व ढोकसाळ मंडळातील ३० गावांचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मोठी मागणी होती तालुक्यातील ९६ गावांचा दुष्काळात करण्यात आला असून याअंतर्गत उमरगा मंडळातील १७, मुरुम १७, नांगरवाडी १९, मुळज २२ तर दाळिंब मंडळातील २१ गावांचा समावेश झाला आहे.

तिसऱ्या टप्प्यानंतर मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील ४, नांदेड ५०, लातूर ५८ तर हिंगोली जिल्ह्यातील ९ महसुली मंडळांव्यतिरिक्त मराठवाड्यातील इतर मंडळांचा समावेश दुष्काळाच्या यादीमध्ये करण्यात आला आहे.

मराठवाड्याची जिल्हानिहाय स्थिती

जिल्हा............. एकूण मंडळे.......... दुष्काळाबाहेर

औरंगाबाद.............६५...........................००

जालना..................४९...........................००

परभणी.................. ४०.........................०४

हिंगोली...................३०.........................०९

नांदेड....................८०...........................५०

बीड.......................६३...........................००

लातूर....................५३...........................०८

उस्मानाबाद............४२...........................००

----------------------------------------.

एकूण...................४२१............................७१

--------------.

महसुली मंडळ - ४२१

दुष्काळात समावेश - ३५०

दुष्काळाबाहेर - ७१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बन्सीलालनगरात उद्या भजनसंध्या कार्यक्रम

$
0
0

औरंगाबाद: बन्सीलालनगरातील चैतन्य मित्र मंडळ व वाचनालयातर्फे रविवारी (६ जानेवारी) समर्थनगरातील अभिनव भजनी मंडळाचा 'भजन संध्या' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बन्सीलालनगरातील जागृती शाळेच्या मैदानावर सायंकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. डॉ. मेघना आपटे आणि सहकारी भजन, अभंग, भारुड, भक्तीगीते, गवळण असा एकत्रित कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन चैतन्य मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>