Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अतिक्रमणावरून अधिकाऱ्यांची भंबेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवाजीनगर परिसरातील जलकुंभाजवळ महापालिकेच्या जागेवर करण्यात येत असलेल्या अतिक्रमणाच्या मुद्यावरून नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देता देता अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.

माजी महापौर भगवान घडमोडे यांनी त्यांच्या वॉर्डातील अतिक्रमणांचा विषय मांडला. 'रस्त्यांवर हातगाड्यांचे अतिक्रमण आहे. त्यावर कारवाई करण्याची मागणी आपण अनेकवेळा केली, पण त्याची दखल अतिक्रमण हटाव विभागाने घेतली नाही. हा विभाग अस्तित्वात आहे की नाही,' असा सवाल त्यांनी केला. यावर अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख ए. बी. देशमुख यांनी 'आपण उद्या स्वत: स्थळ पाहणी करून कारवाई करू,' असे आश्वासन दिले. त्यानंतर घडमोडे यांनी शिवाजीनगर परिसरातील जलकुंभाजवळ पालिकेच्या जागेवर करण्यात येत असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा मांडला. 'या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमित बांधकाम केले जात आहे. त्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. पालिकेच्या जागेवर होत असलेल्या अतिक्रमणावर कारवाई का केली जात नाही,' असा सवाल त्यांनी केला. या सवालाला उत्तर देता देता ए. बी. देशमुख आणि पाठक यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागली. पाठक म्हणाले, 'ज्या व्यक्तीने बांधकाम केले आहे त्याने पालिकेच्या कारवाईला कोर्टातून स्टे मिळवला आहे.' यावर 'स्टेचे स्वरुप काय आहे,' असा प्रश्न राजू शिंदे यांनी विचारला तेव्हा 'थर्ड पार्टी स्टे आहे,' असे विधी सल्लागार अपर्णा थेटे यांनी सांगितले. यावर नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत म्हणाल्या, 'थर्डपार्टी स्टे येईपर्यंत आपण थांबलो कसे काय. महापालिकेचा वकील हजर न झाल्यामुळे थर्डपार्टी स्टे मिळाला,' ही बाब त्यांनी लक्षात आणून दिली. या मुळे अधिकारी पुढे काहीच बोलू शकले नाहीत. महापौरांनी त्या अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परीक्षा शुल्क हडप करणाऱ्या कॉलेजांवर कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

परीक्षा शुल्क माफीचा पैसा येऊनही कॉलेजांनी पैसे विद्यार्थ्यांना परत दिले नाहीत. परीक्षा शुल्क हाडप करणाऱ्या कॉलेजांवर कारवाई करा, अशी मागणी करत विद्यार्थी बुधवारी रस्त्यावर उतरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठावर मोर्चा काढत याबाबत प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली. 'हक्काचे पैसे परत करा', 'असक्षम कुलगुरू राजीनामा द्या', अशा घोषणांनी परिसर दणाणला.

विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. हाती विविध मागण्यांचे फलक, घोषणाबाजीने परिसर दणाणला. मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेत २०१४-१५ शैक्षणिक वर्षात परीक्षा शुल्क माफी करण्यात आली होती. मात्र, त्याचा लाभ विद्यार्थ्यांना अद्यापही मिळाला नाही. उशिराने सरकारी अद्यादेश निघाला तोपर्यंत विद्यार्थ्यांनी परीक्षांचे परीक्षा शुल्क विद्यापीठाकडे जमा केले होते. शुल्क माफी होऊनही परीक्षेचे शुल्क परत न मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी सहसंचालक, कुलगुरूंना निवेदनही दिले. मात्र, प्रशासनाकडून कॉलेजांवर कारवाई होत नसल्याने संतापलेले विद्यार्थी बुधवारी रस्त्यावर उतरले. परीक्षा शुल्क परत करा, परीक्षा शुल्क हडप करणाऱ्या कॉलेजांवर कारवाई करा, असक्षम कुलगुरू राजीनामा द्या, पैसे आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, विद्यार्थ्यांचे हक्काचे पैस परत करा, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीसमोर घोषणाबाजी केली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. विद्यापीठ नियमाप्रमाण पुनर्तपासणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्तपासणी शुल्क ७५ टक्के परत करण्याचा नियम न राबविणाऱ्या कॉलेजांवर कारवाई करा, पेपर पुनर्तपासणीत दोन पेपरची अट रद्द करा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी नवनाथ देवकते, राम टकले, विश्वजीत बडे, रवी गिते, अजहर पटेल, दत्ता पाटील, शेख माजेद, दीपक बहीर, लोकेश कांबळे, परमेश्वर इंगोले, गोपाळ पवार, सिद्धेश्वर बिराजदार, ऋषभ लोहाडे, शिल्पा मुंडे, ऋचा कुलकर्णी, आरती राजपूत, स्नेहल कांबळे, दिपक डोईफोडे, अर्जून डुकरे, विकी काळे, मंगेश शेवाळे आदींची उपस्थिती होती.

चार वर्ष प्रशासन झोपेत

यावर्षी प्रमाणे सरकारकडून २०१४-१५, २०१६-१७ अशा दोन वर्षात शुल्क माफीचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळीही यंदाप्रमाणे शुल्क माफीचा अद्यादेश विद्यापीठांच्या परीक्षा सुरू झाल्यावर आला. दहावी, बारावीबाबतही असेच झाले. त्यानंतर सरकारकडून विलंबाने निधी आला. निधीचे वितरण झाल्याचे सहसंचालक, विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, विद्यार्थ्यांना तो मिळाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत निधी पोहचला की, नाहीयाबाबत विद्यापीठ, सहसंचालक कार्यालयाने विचारणाही केली नाही.

कॉलेजांनी निधी घेऊनही विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत केलेले नाही. अनेक विद्यार्थी कॉलेजमधून शिक्षण घेऊन बाहेर पडले की, शुल्कासाठी परत येत नाहीत अशावेळी हे सगळे शुल्क कॉलेजकडेच राहते. अनेकदा विद्यार्थी जाऊनही कॉलेज प्रशासन पैसे परत करत नाही.

परमेश्वर इंगोले

अशाप्रकारे परीक्षा शुल्क स्वत:कडेच ठेऊन घेणाऱ्या कॉलेजांवर विद्यापीठ प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची गरज होती. मात्र, कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

नवनाथ देवकते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट कागदपत्रांद्वारे ४५ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट कागदपत्राच्या आधारे मुथ्थुट फायनान्स कंपनीला ४५ लाखांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. या गुन्ह्यात कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय आहे. गहाण मालमत्ता परस्पर विकण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी कंपनीच्या तीन अधिकारी, मृत बिल्डरसह सहा जणांविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बिल्डर मुझ्झम्मिल मंजूर अहेमद याने पडेगांव परिसरात अपार्टमेंट बांधून विकले होते. येथे फ्लॅट घेणारे शेख अथर शेख अहेमद, फरिदा अहेमद शेख, फरहिना बेगम मुझ्झफर अली, मुज्जफर अली नुसरत अली यांनी खोटी कागदपत्रे दाखल करून मुथ्थुट फायनान्स कंपनीच्या भाग्यनगर शाखेतून १६ लाख २८ हजारांचे कर्ज घेतले. विजयकुमार राठोड व स्थळपाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कर्ज घेताना सादर केलेल्या कागदपत्रांची शहनिशा न करता कर्ज मंजूर केले. कर्जाचे दोन हप्ते भरून त्यांनी हफ्ते भरण्यास टाळाटाळ केली. बँकेचे अधिकारी विजय चव्हाण यांनी कागदपत्रांची तपासणी केली असता त्यांना ते बनावट आढळले. तसेच गहाण ठेवलेली मालमत्ताही दुसऱ्या व्यक्तीला परस्पर विकल्याची माहिती समोर आली. यासह जिन्सी ठाण्याशेजारील फातेमा मंजिल येथील इम्रान आरिफ खान आणि रेशमा इम्रान खान यांनी सादर केलेल्या कागदपत्राची तपासणी न करताच विजयकुमार राठोड यांनी फायनान्स कंपनीकडून गेल्या वर्षी २८ लाख ६३ हजारांचे कर्ज मंजूर केल्याचे निषन्न झाले. या दोन्ही कर्ज प्रकरणात बनावट कागदपत्रे दाखल करणे, कागदपत्राची शहनिशा न करता ४५ लाखांचे कर्ज दिल्याचे उघड झाल्याने क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक के. टी. शिंदे हे करित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमजीएम रुग्णालयात होमिओपॅथीची ओपीडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमजीएम मेडिकल सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील (एमसीआरआय) रुग्णालयातील होमिओपॅथीच्या बाह्य रुग्ण विभागाचे (ओपीडी) उद्घाटन उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांच्या हस्ते नुकतेच झाले. या प्रसंगी डॉ. दिनेश राव, डॉ. राजेश कदम, होमिओपॅथिक तज्ञ डॉ. मुकेश तांदळे व डॉ. अरुण गावंडे पाटील यांची उपस्थिती होती.

रुग्णांच्या सोयीसाठी होमिओपॅथिक तज्ञ डॉ. मुकेश तांदळे, डॉ. अरुण गावंडे व डॉ. दिनेश राव हे रोज तपासणीसाठी ओपीडी क्रमांक १२ येथे दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत उपलब्ध असणार आहेत. या विभागामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ व २७ जानेवारी २०१९ रोजी मोफत होमिओपॅथी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात २६ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मणक्यांचे व सांध्यांचे विकार, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, मानेत गॅप (सुज येणे), मणक्यांची व सांध्यांची झीज होणे आदी व्याधींची तपासणी, उपचार व मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच २७ जानेवरी २०१९ रोजी पोटाचे विकार, आम्लपित्त (अॅसिडिटी), अपचन/ अजीर्ण होणे, गॅस, पोट फुगणे, मलावरोध/बद्धकोष्ठता, मूळव्याध, फिशर, पोटातील अल्सर, कोलायटीस/मोठ्या आतड्यांचा आजार, वारंवार तोंड येणे, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, भूक मंदावणे आदी आजारांची तपासणी, उपचार व मार्गदर्शन होईल. रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांसाठी कंत्राटदारांबरोबर बैठक घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शंभर कोटींच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन होवून पंधरा दिवस उलटून गेले, पण अद्याप रस्त्यांची कामे सुरू झाली नाहीत. या बद्दल नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत धारेवर धरले. त्यानंतर रस्त्यांची कामे सुरू करण्यासाठी कंत्राटदारांबरोबर बैठक घ्या आणि लवकरात लवकर कामे सुरू करा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटींचे विशेष अनुदान दिले. तीन जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी रस्त्यांच्या कामासाठी आणखी सव्वाशे कोटींचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या निधीतून कोणत्या रस्त्यांची कामे करायची यावर पालिकेच्या सभेत चर्चा सुरू झाली. माजी महापौर त्र्यबक तुपे यांनी डिफर्ड पेमेंटच्या रस्त्यांचा समावेश या कामात करण्याची मागणी केली. असे केले तर महापालिकेचे ३० कोटी वाचतील असे ते म्हणाले. नगरसेवक राजू शिंदे यांनी मात्र डिफर्ड पेमेंटच्या रस्त्यांचा समावेश करण्यास विरोध केला. सातारा - देवळाईतील रस्त्यांसाठी २५ कोटींची तरतूद करा, अशी मागणी त्यांनी केली. माजी महापौर भगवान घडमोडे यांनीही सव्वाशे कोटींच्या रस्त्यांमध्ये डिफर्ड पेमेंटच्या रस्त्यांचा समावेश करा, अशी मागणी केली. शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शंभर कोटींच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन झाले, पण अद्याप रस्त्यांची कामे सुरू झाली नाहीत. ही कामे केव्हा सुरू केली जाणार याचा खुलासा प्रशासनाने केला पाहिजे. पुढचे पाठ आणि मागचे सपाट असे होऊ देऊ नका, अशी सूचना त्यांनी केली. सभापती रेणुकादास (राजू) वैद्य म्हणाले, मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात बारशाचे ठरवित आहोत असेच वाटत आहे. डिफर्ड पेमेंटच्या रस्त्यांसाठी निविदा स्वीकारण्याची अंतिम तारीख २५ जानेवारी आहे. निविदा प्राप्त न झाल्यास या रस्त्यांचा समावेश सव्वाशे कोटींच्या रस्त्यांमध्ये करा, अशी सूचना त्यांनी केली. जमीर कादरी, अब्दुल नाईकवाडी, भाऊसाहेब जगपात, दिलीप थोरात, सीताराम सुरे, प्रमोद राठोड, सायली जमादार, विकास जैन यांनीही रस्त्यांच्या कामाबद्दल आपले मत व्यक्त केले. उपमहापौर विजय औताडे यांनीही सूचना केल्या.

\Bआठ दिवसांत यादी

\Bमहापौर म्हणाले, 'शंभर कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू करण्यासाठी उद्याच आयुक्तांनी संबंधित कंत्राटदारांची बैठक घ्यावी व त्यांना काम सुरू करण्यास सांगावे. सव्वाशे कोटींमधून ज्या रस्त्यांची कामे करायची आहेत, त्या रस्त्यांची यादी आठ दिवसात तयार केली जाईल. यासाठी सर्व पदाधिकारी व गटनेत्यांशी चर्चा करण्यात येईल. सर्वांना विश्वासात घेवून यादी तयार करू.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचे दोन कर्मचारी निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आमदार सुभाष झांबड यांच्याकडे मालमत्ता कराची थकबाकी नसताना त्यांचे नाव थकबाकीदारांच्या यादीत टाकले व चौकाचौकात लावण्यात आलेल्या फलकांवरही त्यांचे नाव प्रसिद्ध केल्याप्रकरणी दुय्यम आवेक्षक एस. बी. संगेवार व कनिष्ठ लिपीक मोहम्मद अब्बास आबेदी यांच्यावर आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी निलंबनाची कारवाई केली.

झांबड यांच्या झांबड हाइटस्, जाधववाडी येथील मालमत्तेवर तीन लाख ४८ हजार ५७६ रुपयांची थकबाकी असल्याचे दर्शवण्यात आले. वास्तविक पाहता ही मालमत्ता झांबड यांनी विकली आहे. याच मालमत्तेवर महापालिकेतर्फे डबल कर आकारणी करण्यात आली आहे. या बाबी आयुक्तांनी केलेल्या चौकशीत स्पष्ट झाल्या. झांबड यांच्या नावे कोणतीही थकबाकी नसताना त्यांच्या नावे थकबाकी असल्याचे जाहीर केले व एकाच मालमत्तेला दोन वेळा वेगवेगळी कर आकारणी केली. यामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन झाली, असे नमूद करून आयुक्तांनी संगेवार व मोहम्मद अब्बास आबेदी यांच्यावर कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाऊबाईचे डोके फोडणाऱ्या महिलेची हमीपत्रावर मुक्तता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतात जनावरे चारल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला शिविगाळ करून मारहाण करीत डोके फोडणारी आरोपी जाऊ यमुनाबाई शिवाजी गिरी हिला दोषी ठरवून दोन वर्षे चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर मुक्त करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी दिले. तसेच जखमी महिलेला पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

याप्रकरणी वंदना सोमगर गिरी (वय ३०, रा. महालपिंपरी ता.औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी व आरोपी यमुनाबाई शिवाजी गिरी (वय ३८, रा. महालपिंपरी) या नात्याने जावा आहेत. सात जानेवारी २०१६ रोजी सायंकाळी दीर व जाऊ यमुनाबाई यांनी वंदना यांच्या शेतात जनावरे चरण्यासाठी सोडले होते. त्यामुळे 'आमच्या कापसाच्या शेतात जनावरे का सोडली, का बांधली,' असा जाब त्यांनी यमुनाबाईला विचारला. त्यातून वादावादी होऊन यमुनाबाईने फिर्यादीला शिविगाळ करत काठीने मारहाण केली. या प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. विशेष सहाय्यक सरकारी वकील जरिना दुर्राणी यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदविले. कोर्टाने आरोपी यमुनाबाई हिला ३२४ कलमान्वये दोषी ठरवले. मात्र हा तिचा पहिलाच गुन्हा असल्याचे निरीक्षण नोंदवत दोन वर्षे चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर मुक्त केले व फिर्यादीला पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांजा बाळगलेल्या दोघांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भगवान लादुराम मेघवंशी व पप्पुलाल लादुराम मेघवंशी या दोघांना ६० ग्रॅम गांजा बाळगल्याप्रकरणी मंगळवारी (१५ जानेवारी) अटक करून बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना गुरुवारपर्यंत (१७ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. साळुंके यांनी दिले.

याप्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक जगदीश वसंत मोरे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, भगवान लादुराम मेघवंशी (वय २२) व पप्पुलाल लादुराम मेघवंशी (वय ३५, दोघे रा. राजस्थान) हे मजूर असून मंगळवारी दुचाकीवरून (एम एच २०, सी जी ६८३०) कसाबखेड्याहून वेरूळकडे येत होते. मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांची झडती घेतली असता, ६० ग्राम वाळलेला गांजा सापडला. त्यांना अटक करून त्यांच्याकडून गांजा व दुचाकी, असा ३० हजार ४८० रुपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करून दोघांना बुधवारी कोर्टात हजर केले. आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिका सभेत मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. शहरातील रस्त्यांसाठी सव्वाशे कोटींचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव भाजपचे नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी मांडला.

माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. 'क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामासाठी देखील शासनातर्फे आर्थिक मदत करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. याबद्दलही त्यांचे अभिनंदन करून आभार मानले पाहिजेत,' असे तुपे म्हणाले. 'सिडको भागातील मालमत्ता लीज होल्डच्या फ्री होल्ड करण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि नागरिकांना मोठा दिलासा दिला. त्याबद्दलही त्यांचे अभिनंदन केले पाहिजे,' असे माजी महापौर भगवान घडमोडे, राजू शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर महापौरांनी मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केला.

रस्त्यांच्या कामासाठी जाहीर केलेले अनुदान, पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी आर्थिक मदत करण्याची दिलेली ग्वाही आणि सिडको मालमत्ता लिज होल्डच्या फ्री होल्ड करण्याचा घेतलेला निर्णय याबद्दल महापालिकेतर्फे मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करून अभिनंदन करण्यात आले.

- नंदकुमार घोडेले, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्कृत संमेलनाचे रविवारी आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संस्कृत भारती देवगिरीप्रांताद्वारे रविवारी (२० जानेवारी) संस्कृत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात मिरवणूक, परिसंवाद, तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

'संस्कृत भारतम् समर्थ भारतम्' हे ब्रीदवाक्य घेऊन होणारे हे संमेलन उस्मानपुरा परिसरातील यशोमंगल कार्यालयात होणार आहे. सकाळी आठ वाजता या संमेलनाचे उद्घाटन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांच्याहस्ते होणार आहे. प्रमुख मार्गदर्शन म्हणून संस्कृत भारतीचे केरळ येथील संपर्क प्रमुख डॉ. नंदकुमार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रारंभी मिरणूक, परिसंवाद, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, नवीन उपक्रमांचा परिचय, संशोकांचा सत्कार, संस्कृत वस्तुप्रदर्शिनी, छायाविष्कार, पथनाट्य, लोकगीत अशा प्रकारचे विविध कार्यक्रम होणार आहेत. संस्कृत कार्यकर्ते, संस्कृतप्रेमी, संस्कृतशिक्षक, संस्कृत शिकणारे युवा विद्यार्थी यांचे एकत्रित व्हावे, या उद्देशाने आयोजित संमेलनाला उपस्थित रहावे, असे आवाहन औरंगाबादच्या संस्कृत भारतीतर्फे करण्यात आले आहे. संमेलनासाठी शुभदा धांडे, अविनाश गोहाड, राजलक्ष्मी झंवर, अबोली देशमुख आदी परिश्रम घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांनी पळवली तीन तोळ्यांची बांगडी

$
0
0

औरंगाबाद : बांगड्या खरेदीच्या बहाण्याने दोन महिला व पुरुषांनी सेल्समनची नजर चुकवून सव्वा लाख रुपये किंमतीची तीन तोळयांची सोन्याची बांगडी हातचलाखीने लंपास केली. हा प्रकार जालना रोडवरील मोंढा नाका उड्डानपुलानजिकच्या तनिष्क ज्वेलर्समध्ये सोमवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुकानात ३५ ते ४० वर्षे वयोगटातील दोन महिला व सोबत एक पुरूष बांगड्या खरेदीसाठी आले होते. बांगड्या पाहताना त्यांनी सेल्समन मारुती कचरू दांडगे यांची नजर चुकवून बांगड्यांच्या ट्रे मधील सव्वा लाख रुपये किंमतीची तीन तोळे वजनाची एक सोन्याची बांगडी हातचलाखीने लंपास केली. रात्री दुकानात दागिन्यांची तपासणी करताना एक बांगडी नसल्याचे लक्षात आले. यापूर्वीही चोर महिलांनी खरेदीच्या बहाण्याने सिटी चौकातील सराफा दुकानातून दोन अंगठ्या लंपास केल्या होत्या. या प्रकरणी उपनिरीक्षक संदीप शिंदे हे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादेत विजयाची तयारी करा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी या चार लोकसभा मतदारसंघापैकी दोन मतदार संघ भाजपच्या ताब्यात आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदार संघात पक्षाला यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी संपूर्ण शक्तीनिशी कामाला लागावे, असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास मंत्री व पक्षाच्या चार लोकसभा मतदारसंघ कल्स्टर प्रमुख पंकजा मुंडे यांनी केले.

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील शक्ती केंद्रप्रमुखांची बुधवारी (१६ जानेवारी) भानुदास चव्हाण सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मतदारसंघाचे प्रभारी श्रीकांत देशपांडे, आमदार अतुल सावे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, राज्य प्रवक्ते शिरीष बोराळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थिती होते.

यावेळी मंत्री मुंडे म्हणाल्या की, आगामी ४५ दिवसांत प्रत्येक शक्ती केंद्रप्रमुख, तसेच पान प्रमुखांना त्यांच्याकडील कामे पूर्ण करायची आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास दोन आमदार भाजपचे, एक राष्ट्रवादी काँग्रेसचा व उर्वरित शिवसेनेचे आहे. यामुळे या मतदारसंघात काँग्रेसची शक्ती कमी आहे. निवडणूक जिंकण्यासाठी बुथपर्यंत मतदारांत केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना पोहोचविणे आवश्यक आहे. औरंगाबादमध्ये आपली ताकद वाढवायची आहे. यासाठी बुथ कार्यकर्त्यांनी संपूर्ण शक्तीनिशी काम करावे, भाजपसोबत कोणत्या पक्षाची युती होणार की नाही, याची काळजी करू नये, असे त्या म्हणाल्या.

\Bआधुनिक तंत्रज्ञान हाताळणे गरजेचे \B

'आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचा वापर न करता येणाऱ्या दोनशे ते तीनशे जणांना निवृत्त करून त्यांना वरिष्ठ पदावर काम करण्याच्या सूचना केल्या आहेत,' अशी माहिती मुंडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षित बस चालविणे हीच इंधन बचत

$
0
0

(फोटो वेगळा सोडत आहे.)

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

सुरक्षितपणे वाहन चालविल्यामुळे इंधन बचत होते, असे प्रतिपादन एसटी विभागाचे विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी व्यक्त केले. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत इंधन बचत मोहीम राबविण्यात येत आहे. या इंधन बचत सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी प्रशांत भुसारी बोलत होते.

यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार, यंत्र चालक अभियंता किशोर सोमवंशी, कनिष्ठ आगार व्यवस्थापक अमोल भुसारी, बसस्थानक प्रमुख योगेश गिते यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बसचालकांनी योग्य पद्धतीने गाडी चालविल्यास कशाप्रकारे इंधन बचत होते. या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सांगण्यात आले की, गाडी बसस्थानकाच्या बाहेर काढताना अनेक बसचालक हे तिसऱ्या गिअरवर गाडी चालवितात, परंतु ती जर पाहिल्या गिअरवर बाहेर घेतली. तर दिवसाकाठी जवळपास ३ लिटर इंधन वाचू शकते. या मोहिमेदरम्यान चालकाच्या गाडी चालविण्यासंदर्भातील विविध बाबींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने बसचालकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाडगाव सोसायटीचे दहा संचालक अपात्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

विविध सेवा सहकारी सोसायटीचे थकबाकीदार असल्याने तालुक्यातील लाडगाव येथील सोसायटीच्या १३ पैकी १० संचालकांना सहकार विभागाने अपात्र ठरविले. ही कारवाई सहायक निबंधक विनय धोटे यांनी केली. अध्यक्ष उपाध्यक्षासह संचालक अपात्र ठरल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

अध्यक्ष वसंत चांगदेव रक्ताटे, उपाध्यक्ष सुधीर खंडेराव थोरात, संचालक अन्ना गजाबा देवकर, दिलीप रंगनाथ निंबाळकर, दिलीप बाबुराव जाधव, साहेबराव रायभान रक्ताटे, प्रमिला अशोक निंबाळकर, अप्पासाहेब रखमाजी उपाध्ये, मुंशी सुभान सय्यद, व साहेबराव गणपत डोंगरे अशी अपात्र ठरलेल्या संचालकांची नावे आहेत. या संचालकांनी २०१६ व २०१७ मध्ये लाडगाव सोसायटीतून पीककर्ज घेतले होते. त्याची ठरवून दिलेल्या तारखेस परतफेड न करता तारीख उलटून गेल्यानंतर रकमा सोसायटीत जमा केल्या. याबाबत संचालक असलेले साहेबराव डोंगरे यांनी चार ऑक्टोबर २०१८ रोजी सहकार विभागाकडे तक्रार करून या संचालकाना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. त्यानुसार सहाय्यक निंबधक विनय धोटे यांनी सोसायटीचा खाते उतारा, सचिव व संबंधित संचालकांचे जबाब घेतले. त्यात सोसायटीच्या संचालकांनी विहित दिनांकानंतर रक्कम भरल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या अधिनियम १९६०चे कलम ७३ क अ (अ१)(१) तरतुदीनुसार १० संचालकाना अपात्र ठरवत पदावरून कमी करण्याचे आदेश दिले आहेत.

\Bतक्रारदारही अपात्र \B

विशेष म्हणजे थकबाकीदार संचालकावर कारवाई करण्याची मागणी केलेल्या साहेबराव डोंगरे हे सुद्धा थकबाकीदार असल्याची तक्रार संजय सरोदे व वसंत रक्ताटे यांनी केली होती. त्यामुळे डोंगरे हे थकबाकीदार सिद्ध झाल्याने त्यांना पण अपात्र ठरविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सूक्ष्म सिंचन साहित्याचे अनुदान वाढवण्याची गरज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'सूक्ष्म, ठिबक सिंचन हे खर्चिक आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांची परिस्थिती विचारात घेता हा खर्च आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे सूक्षम सिंचनासाठी सबसिडी वाढविण्याची गरज आहे,' अशा भावना शेतकऱ्यांनी सिंचन परिषदेत व्यक्त केल्या. विविध राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी आपले अनुभव कथन केले.

सूक्ष्म सिंचन करून पाणीटंचाईवर मात करणारे विविध राज्यातील १४ प्रगतशील शेतकऱ्यांनी परिषदेला हजेरी लावली आहे. त्यांनी बुधवारी अनुभव कथन केले. यावेळी व्यासपीठावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. एस. धवण, सचिव डॉ. सुरेश कुलकर्णी, संचालक पी. देवेंद्र राव यांची प्रमुख उपस्थिती होती. सूक्ष्म, ठिबक सिंचन राबविताना आलेले अनुभव, अडचणी व भविष्यात अपेक्षित बदल याची मांडणी शेतकऱ्यांनी केली. शेती उत्पादनाला मिळणारा भाव आणि होणारा खर्च याचा विचार करता सूक्ष्म सिंचनाचा खर्च परवडत नाही. त्यामुळे सवलत वाढवून द्यावी, मिळणारे साहित्य दर्जेदार असावे, कमी शेती असलेल्यांनाही ही सवलत द्यावी, अशा सूचना शेतकऱ्यांनी केल्या. या सत्राला वाल्मी शेतकरी प्रशिक्षण वर्गातील सहायक प्रा. बाळासाहेब शेटे यांची उपस्थिती होती. हे प्रगतीशील शेतकरी गुरुवारी वाघाड येथील पाणी वापर संस्थेला भेट देणार आहेत.

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शांती ग्रुपतर्फे रविवारी महारक्तदान शिबिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शांती ग्रुप अँड फाऊंडेशनच्या वतीने रविवारी (२० जानेवारी) सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत उल्कानगरी (खिवंसरा पार्क) परिसरातील रिद्धी सिद्धी हॉलमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यंदा १५०० युनिट रक्तदानाचे उद्दिष्ठ ठरवण्यात आल्याचे ग्रुपच्या वतीने बुधवारी (१६ जानेवारी) पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

शांती ग्रुपचे श्रद्धास्थान असलेले कचरुलालजी चोपडा व शिवरामजी निकम यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याचबरोबर फाऊंडेशनच्या वतीने दुष्काळात टँकर वाटप, थंडीच्या दिवसांमध्ये गोरगरीबांना ब्लँकेट वाटप, दिवाळीत गरीबांना किराणा वाटप आदी उपक्रम राबवण्यात येत आहेत. रक्तदान शिबिरासाठी प्रत्येक वर्षी प्रतिसाद वाढत असून, चेलीपुरा व्यापारी मंडळाच्या सहकार्याने रक्तदानाचा उपक्रम यशस्वी होत आहे. शिबिरासाठी नवीनचंद्र चोपडा, दामोधर निकम यांच्यासह करण कोठारी ज्वेलर्स, रवी मसाले, जे. के. ट्रेडर्स, राम बंधू, संतोष डेकोरेटर्स, रेडिओ मिर्ची यांचे सहकार्य मिळत आहे. या शिबिरात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे आणि रक्तदान करावे, असे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल कांकरिया, सचिव मनोज शिंगवी, तसेच यंदाच्या रक्तदान समितीचे अध्यक्ष केतन साहुजी, कार्याध्यक्ष मनोज चोपडा, सचिव अतुल कासलीवाल, उपाध्यक्ष उमेश देवडा, सहसचिव कुणाल ठोले, डॉ. चितेंद्र कासलीवाल, महेंद्र बंब आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका आयुक्तांची विदेशवारी रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची विदेशवारी व्हिसा न मिळाल्यामुळे रद्द झाली. त्यामुळे नगरसेवकांना दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

'परवडणारी घरे' या संदर्भातील प्रशिक्षणासाठी डॉ. निपुण विनायक यांची शासनाने निवड केली. कॅलिफोर्निया येथे हे प्रशिक्षण होते. १८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या प्रशिक्षणासाठी डॉ. विनायक १७ जानेवारी रोजी रवाना होणार होते. मात्र, त्यांना व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे त्यांना आपला दौरा रद्द करावा लागला. निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त अठरा दिवस विदेशात जाणार असल्यामुळे व विदेशातून परतल्यावर त्यांच्या बदलीची शक्यता असल्यामुळे नगरसेवक व राजकीय नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आता आयुक्तांचे विदेशात जाणे रद्द झाल्यामुळे या सर्वांना दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी औरंगाबादेत भेट घेतली. 'पालिका आयुक्तपदावर डॉ. निपुण विनायक यांना कायम ठेवा, त्यांची बदली करू नका, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली,' अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. 'महापालिकेच्या विविध प्रश्नांबद्दल चर्चा करण्यासाठी वेळ द्या, अशी गळ मुख्यमंत्र्यांना घातली. तेव्हा पुढील आठवड्यात वेळ देतो. मुंबईत या,' असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे महापौर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुरेसे पाणी नसल्यास देशांमध्ये वाद’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जागतिक पातळीवर पाण्याची मागणी आणि उपलब्धता लक्षात घेता तातडीने 'सूक्ष्म सिंचन'सारख्या उपायांची गरज आहे. जगात पाण्यावरून तिसरे युद्ध होईल की नाही, हे माहिती नाही. मात्र, २०६० पर्यंत जगाची पाण्याची मागणी ५५ टक्क्यांनी वाढेल. त्यावेळी पुरेसे पाणी नसेल, तर देशा-देशांमध्ये वाद होतील, असे भाकित नवव्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेत जगभरातून आलेल्या तज्ज्ञांनी व्यक्त केले.

केंद्र शासनाच्या जलसंधारण विभागातर्फे आयोजित परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर हे चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात 'आयसीआयडी'चे अध्यक्ष फेलिक्स रिऐंडर्स, केंद्रीय सचिव यू. पी. सिंग, 'एफआयओ'चे टोमॅरिओ स्केरी, 'सीडब्ल्यू'चे संचालक आदित्य शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

'आयसीआयडी'चे रिऐंडर्स म्हणाले की, पाणी हे जीवन आहे. जागतिक पातळीवर अनेक देशांचा विचार केला तर, सध्या अनेक देशांत पाणीटंचाई आहे. २०३०मध्येच पाण्याची उपलब्धता कमी होणार असून त्यावेळी याचे गांभीर्य, तीव्रता लक्षात येईल. २०६० पर्यंत जगातील पाण्याची मागणी ५५ टक्क्यांनी वाढणार आहे. तेव्हा देशा-देशांत वाद होऊ शकतात. त्यामुळे संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे, असे रिऐंडर्स म्हणाले. केंद्रीय सचिव सिंग यांनी पाणी बचतीकडे लक्ष वेधले. सूक्ष्म सिंचनाला सध्या तरी पर्याय नाही. इतर उपाययोजनाही करण्याची गरज असून भविष्याचा विचार करत पाणी वापराबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

सायंकाळी झालेल्या सत्रात 'आयएनसीडब्ल्यू'चे अध्यक्ष मसूद हुसैन, नाबार्डचे व्यवस्थापक ए. आर. खान, इस्लामिक डेव्हलपमेंट बँकेचे बखोद्दीर मिर्झइव्ह, राज्याचे सचिव राजेंद्र पवार, 'सीडब्ल्यूसी'चे संचालक मनोज तिवारी यांची उपस्थिती होती. नाबार्डचे व्यवस्थापक खान म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्यामागे हवामानातील बदल हे एक कारण आहे. या दृष्टीकोनातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. इस्लामिक डेव्हलपमेंट बँकेचे मिर्झइव्ह म्हणाले, हवामान बदलाचा परिणाम पाणी उपलब्धतेवर दिसून येते आहे. जागतिक पातळीवर अनेक देशांनी त्याबाबत काम सुरू केले असून त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत.

\Bपडिक जमिनीवर प्रयोग; केंद्रीय सचिव निरुत्तर

\B

पहिले सत्र प्रश्न-उत्तरांनी गाजले. उपस्थितांपैकी काहींनी भाषणानंतर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले. पहिल्या सत्रात 'आयसीआयडी'चे ए. बी. पांड्या, जैन एरिगेशनचे अतुल जैन, 'सीडब्ल्यूसी'चे डी. एस. चास्कर, वर्ल्ड बँकेचे आय जसब्रँड डी. डे. ज्वाँग यांची उपस्थिती होती. यावेळी तमिळनाडूमधील एका अधिकाऱ्याने विचारले की, विविध राज्यांमधील सरकारी संस्थांकडे लाखो एकर जमीन पडून आहे. या जमिनींमध्ये सूक्ष्म सिंचनाचे प्रकल्प राबवून ते इतरांसमोर दाखविता येतील का?, अशी विचारणा केली. आपण सांगत असल्याप्रमाणे प्रत्यक्ष शेती करणे कितपत शक्य आहे, असा प्रश्न एकाने विचारला. व्यासपीठावर उपस्थितांना या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे देता आली नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासासाठी राज्य फेररचनेची गरज!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'छोट्या राज्यांचा विकास वेगाने होत आहे. त्यामुळे ६३ वर्षांनंतर पुन्हा एकदा राज्य फेररचनेची गरज निर्माण झाली आहे,' असे सडेतोड प्रतिपादन बुधवारी संत तुकडोजी महाराज विदयापीठाचे माजी कुलगुरू तसेच कुरूलकर समितीचे सदस्य डॉ. विनायक देशपांडे यांनी व्यक्त केले.

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने 'मराठवाड्याची बलस्थाने आणि दुर्बलता' या ग्रंथाचे प्रकाशन एमजीएम परिसरातील आइनस्टॉल हॉलमध्ये झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, मराठवाडा जनता विकास परिषदेचे अॅड. प्रदीप देशमुख, प्राचार्य प्रतापराव बोराडे, डॉ. शरद अदवंत, डॉ. के. के. पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. देशपांडे म्हणाले, 'मराठवाडा आणि विदर्भागाचा विकास राज्याच्या अन्य भागाच्या तुलनेत खूप कमी झाला. यामुळेच शासनाला या भागाच्या असमतोलपणाच्या अभ्यासासाठी कुरूलकर समिती नेमावी लागली. या समित्यांच्या शिफारशी शासन १०० टक्के लागू करेल याबाबत शंका आहे. यामुळे महाराष्ट्राच्या आसपासच्या मोठ्या राज्याच्या विभाजनानंतर तेथे छोट्या राज्यांचा विकास वेगाने होत आहे. आधी भाषेच्या आधारावर राज्याचे विभाजन करण्यात आले. मात्र आता न झालेला विकास, त्या भागातील लोकांची गरज याचा विचार केल्यास ६३ वर्षानंतर पुन्हा राज्य फेररचनेची गरज निर्माण झाली आहे,' असे डॉ. देशपांडे म्हणाले. 'सध्याचे मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत म्हणून या भागाचा विकास होत आहे, असे काहीही नाही. मेट्रो होणे म्हणजे विकास नाही. आताही विदर्भाच्या अनेक भागात विकास विषयक कामे झालेली नाहीत. मराठवाड्यातही तशीच परिस्थिती आहे. कागदावर मिळालेला निधी प्रत्यक्षात कधीही मिळालेला नाही. या अविकसित भागांच्या विकासासाठी दांडेकर समितीनंतर २३ वर्षांनी पुन्हा कुरूलकर समिती नेमली. या समितीने पाण्यासह अन्य क्षेत्रांचाही अभ्यास करून आपला अहवाल सादर केला. निधी मिळण्यासह मराठवाडा आणि विदर्भ विकास महामंडळांना क्रियाशील करण्याची गरज आहे,' अशी अपेक्षाही डॉ. देशपांडे यांनी व्यक्त केली. कुलगुरू डॉ. ढवण म्हणाले, 'मराठवाड्यातील तरुणांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये प्रंचड उर्जा आहे. मात्र, त्याला तंत्रज्ञानाची जोड आवश्‍यक आहे. योग्य तंत्रज्ञान व सरकारचे प्रेरक धोरण असेल, तरच मराठवाड्याच्या विकासाची गाडी पुढे नेता येईल.'

\B

मराठवाड्यात आठ टक्केच गुंतवणूक

\Bडॉ. देशपांडे यांनी आपल्या भाषणात आतापर्यंत झालेल्या गुंतवणुकीची आकडेवारी मांडली. यातही मराठवाडा व विदर्भाची पिछेहाट असल्याचे सांगितले. मुंबई ७४ टक्के, मराठवाडा ८ टक्के, विदर्भ १८ टक्के तर राज्यात मिळालेल्या रोजगारांमध्ये मुंबई ८४.८ टक्के, मराठवाडा ६ टक्के, विदर्भ १०.२ टक्के इतकी नोंदविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. अॅड. प्रदीप देशमुख म्हणाले, 'मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाकडे आवश्यक तेवढे लक्ष देण्यात आलेले नाही. हा असमतोल दूर करण्यासाठी निधीसह आगामी भरती प्रक्रियेतही २० टक्के जागा या मराठवाड्यातील पात्र तरुणांना देण्यात येऊन 'अभाव'ग्रस्त भागाला भाव देण्याची गरज आहे,' अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्याचे सिंचन बजेट वाढवा: गडकरी

$
0
0

औरंगाबाद:

'राज्य पाणीटंचाईच्या मोठ्या अडचणींना सामोरे जात आहे. या गंभीर स्थितीतून यशस्वीरित्या बाहेर येण्यासाठी पाणी वाचवणे व पाण्याचे योग्य नियोजन महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रापेक्षा लहान राज्यांनी सिंचनासाठी बजेटमध्ये आपल्यापेक्षा तिप्पट तरतूद केली असून महाराष्ट्रानेही सिंचनासाठी बजेट वाढवावे,' अशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्या.

केंद्र शासनाच्यावतीने बुधवारपासून (१६ जानेवारी) हॉटेल अजंता ॲम्बेसेडर येथे तीन दिवसीय नवव्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते. या परिषदेत देश-विदेशातील तज्‍ज्ञांनी सहभाग घेतला आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय राज्यमंत्री अर्जून राम मेघवाल, कर्नाटकचे कृषीमंत्री डी. के. शिवकुमार, फिजीचे जलसंधारण मंत्री डॉ. महेंद्र रेड्डी, राज्यमंत्री सत्येंद्र जैन, सूर्यप्रताप साही, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदींची उपस्थिती होती.

यावेळी गडकरी म्हणाले की, सूक्ष्म सिंचनाशिवाय कृषी क्षेत्राचा विकास होणे अशक्य आहे. राज्यातील टंचाईच्या परि‌स्थितीला सामोरे जाण्यासाठी ठिबक, सूक्ष्म सिंचन हा पाण्याचा कमीत कमी वापर करून चांगले उत्पादन घेण्याचा योग्य पर्याय आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांनी देशात चांगले काम केलेले आहे. बंदिस्त पाइपव्दारे पाणीपुरवठ्याची योजना या दोन्ही राज्यांनी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला जाणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पाणी हे देवाचं देणं असून ही आपली संपत्ती आहे, असे आपण समजतो. आपण पाण्याकडे आर्थिकदृष्ट्या पाहत नसल्यामुळे आज आपल्याला पाण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे. वातावरण बदलामुळे जगभरात पाण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. वातावरण बदलाचा भारतावरही मोठा परिणाम होत आहे. गेल्या चार वर्षांमध्ये राज्यातील सिंचन क्षेत्र वाढले असून जलयुक्त शिवार सारख्या योजनांच्या माध्यमातून सरकारने अनेक गावे पाणीदार केली आहेत. दुष्काळावर मात करायची असल्यास पाण्याचा वापर आणि नियोजन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दमणगंगा-पिंजरचे पाणी जायकवाडीत आणणार

देशाच्या इतिहासात प्रथमच केंद्र सरकारने राज्यांना सिंचन प्रकल्पासाठी अर्थसहाय्य दिले असून नदीजोड प्रकल्पासाठीही मोठा निधी देण्यात येत आहे. मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी दमणगंगा-पिंजर नदीजोड प्रकल्पाचे पाणी जायकवाडीमध्ये आणण्यात येणार आहे. यामुळे जायकवाडी धरणात ८० ते ९० टक्के पाणीसाठा निर्माण होईल. यामुळे मराठवाड्याला पाणी मिळणार असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images