Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

साधेपणाने शुभमंगल; खर्च दुष्काळ निवारण समितीला

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना चिंता व्यक्त होत आहे. दुष्काळाला तोंड देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. पण, आता नागरिकही सरसावले आहेत. सिल्लोड तालुक्यात एक लग्न अत्यंत साधेपणाने करून सर्व रक्कम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दुष्काळ निवारण समितीला देणगीदाखल देण्यात आली.

यावर्षी सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असली तरी अनेक विवाह सोहळे मोठ्या थाटामाटात सुरू आहेत. त्यावर अकारण खर्च केला जात आहे. पण, सारोळा येथे झालेला एक विवाह याला छेद देणारा ठरला.

माजी आमदार सांडु पाटील लोखंडे याचे पुतणे व रमेश आनंदा लोखंडे यांचा मुलगा सतीश व सारोळा येथील सुधाकर नारायण वराडे यांची मुलगी अश्विनी या दोन्ही परिवारांनी साखरपुड्याचा कार्यक्रमासाठी पाहुण्यांना निमंत्रने दिली होती. पण, पाहुण्यांनी दुष्काळी परिस्थिती पाहता दोन्ही परिवारांकडे साधेपणाने लग्न करावे, अशी विनंती केली. त्यानंतर माजी आमदार लोखंडे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पालोदकर यांनी अर्ध्या तासात हा विवाह सोहळा घडवून आणला. कोणताही गाजावाजा न करता सनई चौघड्याच्या सुरात व वायफळ खर्च टाळत लग्न लाऊन आदर्श उभा केला. पालोदकर यांनी दोन्ही परिवारांना व वधु-वरांना शुभेच्छा देऊन या पद्धतीने विवाह करण्यास तयार केले. लग्न सोहळ्यासाठी येणारा खर्च राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दुष्काळ निवारण निधीला प्रदान करण्यात आला. दुष्काळ निवारण समितीचे देवगिरी प्रांत प्रमुख शंकर डापके यांनी ही रक्कम स्वीकारली.

यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. मछिद्र पाखरे, सुरेश बनकर, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोटे, गजानन राऊत, दिलीप दाणेकर, पुंडलिक लोखंडे, प्रकाश वराडे, प्रा. शिवराम साखळे, रामदास हिवाळे, संजय डमाळे, संजय कळात्रे, शंकर डापके यांच्यासह नातेवाईक व गावकरी उपस्थित होते.

चार वर्षांपासून तालुक्यातील दुष्काळ व नापिकी यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे सर्वांनी लग्न सोहळे साध्या पद्धतीने पार पाडावेत. यामुळे दोन्ही परिवाराला लागणाऱ्या खर्चाला आळा बसेल

- सांडू पाटील लोखंडे, माजी आमदार

लग्न सोहळ्यानिमित्त तालुक्यात फिरत असताना भरमसाठ खर्च, डीजे, बँड-बाजा असा थाटमाट दिसतो. मात्र, हे लग्न हा बडेजाव टाळून अर्धा तासात पार पडला. तालुक्याने वराडे व लोखंडे परिवारांचा आदर्श घ्यावा.

-प्रभाकर पालोदकर, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उलटून बोलणाऱ्या पत्नीचे डोके फोडले

0
0

औरंगाबाद: नारेगाव येथील रुपाली प्रवीण थोरात हिने घरगुती कारणावरून पतीला उलटुन बोलल्याच्या कारणावरून पती प्रवीण थोरात, सुरेश गोविंदराव थोरात, अर्चना थोरात यांनी मारहाण करत स्टिलच्या डब्याने डोके फोडले. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काश्मिरात प्रेम, विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता

0
0

सामाजिक कार्यकर्ते अधिक कदम यांनी मांडला जीवनप्रवास

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘तुम्ही निखळ असाल तर संकट टळते, याची अनुभूती वारंवार आली. काश्मिरमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात प्राण गमवाव्या लागणाऱ्या कुटुंबातील मुलांसाठी काम करताना अनेकदा संकटे आली. अतिरेक्यांचा लक्ष झाले, परंतु डमगलो नाही. जिद्द घेऊन काम सुरू केले अन् आज अनेकांनी मदतीचा हात पुढे केला प्रेम, विश्वास निर्माण केल्यामुळे हे शक्य झाले’, अशा शब्दात काश्मिरमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या अधिक कदम यांनी आपला जीवन प्रवास मांडला. निमित्त होते ‘विवेकानंद व्याख्यानमालेचे’. काश्मीरची संस्कृती तसेच सद्यस्थिती सादरीकरणातून उलगडून दाखवली. शस्त्रांच्या आवाजात सर्वाधिक नुकसान स्त्री व लहान मुले यांचे होत असते आणि हीच व्यथा काश्मीरची सुद्धा असल्याचे त्यांनी सांगितले.

विवेकानंद कॉलेजतर्फे पंढरीनाथ पाटील (भाऊ) ढाकेफकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. शेवटचे तिसरे पुष्प अधिक कदम यांनी गुंफले. त्यांनी‘काश्मिरचे नवनिर्मिती: नव्या नंदनवनाची शोधयात्रा’ विषयावर संवाद साधला. व्यासपीठावर संस्थेचे सचिव श्रीमंत शिसोदे, प्राचार्य डॉ. श्याम शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला कदम यांनी मार्गदर्शन केल्यानंतर प्राचार्य डॉ. श्याम शिरसाठ आणि प्रा. दिलीप महालिंगे यांनी त्यांची मुलाखत घेतली. दहशतवादाचे केंद्र असणाऱ्या कुपवाडा येथे काम करत असताना आलेल्या अनुभवांना त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, काश्मिरला मित्रांसह गेलो, जम्मू ओलांडता आले नाही. सोबत मित्र होते ते गावाकडे परतले. त्याचवेळी ठरविले की, अतिरेकी हल्ल्यात प्राण गमावाव्या लागलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी तेथील मुलांसाठी काम केले पाहिजे. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या अनेकांना विश्वास बसत नव्हता. काही चांगले, वाईट अनुभव आले. अनेक चांगली माणसे भेटली. त्यांनी आसरा दिला तेव्हापासून मागे वळून पाहिले नाही. बॉडरलेस संस्थेच्या माध्यमातून तेथील मुलांना मदतीचा हात दिला. काम पाहून अनेकांचे मदतीचे हात पुढे आले यातून कार्य घडत गेले. आजपर्यंत अतिरेकी हल्ल्याची झळ पोहचलेल्या कुटुंबातील ११३ मुलींना शिक्षण देऊन लग्न लावून दिले. आजघडीला २३० मुलींना शिक्षण देणे सुरू आहे. त्यांची जबाबदारी घेतली सांभाळ करत आहोत. अनेकदा अतिरेक्यांनी अपहर केले. एका वेळी बंदुकीची नळी कानावर लावण्यात आली. तेव्हा डोळे मिटून घेतले. मात्र, अतिरेक्यात सकारात्मक बदल झाला त्याने मारले नाही. असे अनेक प्रसंग घडले मात्र त्यातून सुखरूप परतलो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनील लहाने यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज बिल दुरुस्तीसाठी महावितरणतर्फे सप्ताह

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महावितरणने वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. त्याचबरोबर विजेच्या बिलांसंदर्भात असलेल्या तक्रारी, बिलांतील दुरुस्तीसाठी महावितरणने सप्ताहाचे आयोजन केले आहे.

वीज बिलासंबंधी तक्रार असल्यास ग्राहकांनी वाळूज उपविभाग, छावणी उपविभाग, पॉवर हाउस उपविभाग, शहागंज उपविभाग, क्रांती चौक उपविभाग, गारखेडा उपविभाग, सिडको उपविभाग, चिकलठाणा उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित तक्रारीची शहानिशा करून ती सोडविण्यात येणार आहे. औरंगाबाद शहरातील वीज ग्राहकांसाठी १७ ते २५ जानेवारी यादरम्यान कार्यालयीन वेळेत महावितरण उपविभागस्तरावर वीज बिल दुरुस्ती सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहात वीज बिलासंदर्भात तक्रारी असतील, त्यांनी जवळच्या महावितरण उपविभाग कार्यालयात तक्रार दाखल करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरण वीज ग्राहकांसाठी अत्याधुनिक सेवा देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. वीज ग्राहकांना मोबाइल संदेशाद्वारे वीज बिलाची माहिती, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित होण्याची पूर्व सूचना, वीज मिटर वाचन सूचना आदी सेवा देण्यात येत आहेत. मोबाईल क्रमांकात बदल केला असेल किंवा बिलावर चुकीचा नंबर येत असेल अशा ग्राहकांनी आपला नवीन मोबाइल क्रमांक महावितरणकडे नोंद करावे. त्यामुळे महावितरणच्या सेवा सुविधांची माहिती वीज ग्राहकांना देणे शक्य होईल. यासाठी वीज ग्राहकांनी आपले नवीन मोबाईल क्रमांकाची नोंद महावितरणकडे करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगळे काही करण्यासाठी युवकांनी झोकून द्यावे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर काहीतरी जगावेगळे करावे लागेल आणि त्यासाठी स्वतःला झोकून द्यावे लागेल, असे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व माजी लेफ्टनंट कर्नल आणि एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले.

महाविद्यालयातील उमंग टीम व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंतीचा कार्यक्रम घाटीच्या महात्मा गांधी सभागृहामध्ये नुकताच झाला. या वेळी ते बोलत होते. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

डॉ. ढगे, 'जिंदगी मे कुछ करना है तो कुछ हटके करना पडेगा, भेड-बकरी के चालसे जिंदगी मे कुछ हासील नही हो पायेगा,' असे सांगत त्यांनी तरुणांनी जगावेगळे काहीतरी करून दाखवण्याचे आवाहन केले. डॉ. येळीकर यांनीही स्वतःचा जीवनप्रवास उलगडून सांगितले. या कार्यक्रमात सुरभी देवरे हिने राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यश गंगापूरकर याने स्वामी विवेकानंदांवर भाषण केले. या वेळी राजमाता जिजाऊ यांचे जीवनप्रसंग नाट्यातून सादर करण्यात आले. त्यात तेजल बोरडे, उत्कर्ष देशमुख , अभिषेक थोरात व निकिता आळंदे यांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमासाठी उपअधीष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, कर्करुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. एस. के. टी. जैन, शल्यचिकित्सा विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. सरोजिनी जाधव, मेडिसिन विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. गजानन सुरवडे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे डॉ. गायकवाड, फिजियॉलॉजी विभागाचे डॉ. थोरात आदींची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांती लोभे, कृष्णा येवारे , सायली अवचार, वैभव नागरे, श्रावणी काद्रे, धरती कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमासाठी कपिल मरशिवणे, धर्मराज बुलबुले, पृथ्वीराज घुगे, ज्ञानेश्वर काजळे, विशाखा चौधरी, आदित्य पाटणे, प्रतीक्षा जैसवाल, ईश्वरी आवंढेकर, दीपाली भालेराव, शिवानी पावडे, अमिता लाखे, सोहम बरकुले आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेकॉम इलेक्ट्रिसिटी एक्स्पो येत्या २५ जानेवारीपासून

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्युत क्षेत्रातील नवनवीन उत्पादने पाहण्याची संधी औरंगाबादकरांना उपलब्ध झाली आहे. 'फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र' तिसरे महाअधिवेशन व राज्यस्तरीय फेकॉम इलेक्ट्रिसिटी एक्स्पो येत्या २५ ते २७ जानेवारीदरम्यान होणार आहे. या प्रदर्शनात विविध उत्पादने मांडण्यात येणार आहे.

प्रदर्शनानिमित्त विविध विषयांवर परिसंवाद आणि चर्चासत्र कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन शाहनूरमिया दर्गा परिसरातील श्रीहरि पॅव्हेलियन येथे होणार आहे. फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या एक्स्पोमध्ये राज्यातील कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा विभागांतील ३५ जिल्ह्यातील हजारो विद्युत कंत्राटदार सहभागी होणार आहेत. या अधिवेशानिमित्ताने विद्युत क्षेत्रातील नवनवीन उत्पादने व नवीन संशोधने यांचे प्रदर्शन असलेले फेकॉम इलेक्ट्रिसिटी एक्स्पो २०१९ हे विद्युत प्रदर्शन आयोजित करण्यात आलेली आहे. या पूर्वी पहिले अधिवेशन २०११मध्ये शेगावला, तर दुसरे महाअधिवेशन २०१५मध्ये सांगली येथे पार पडले होते. या माध्यमातून विद्युत क्षेत्रातील नवनवीन संशोधित उत्पादनाचे प्रदर्शन पाहाण्यासाठी व विविध विषयांवरील परिसंवाद व खुले चर्चासत्रामध्ये सहभागी होण्याचे आवाहन फेकाम अध्यक्ष अरूण अवघड पाटील, औरंगाबादचे अध्यक्ष वीरेंद्र धूत, संजयकुमार वाघमारे, शेरखान पठाण, हेमंत कपाडिया यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच लाख वीज ग्राहक थकबाकीदार

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

नियमित ग्राहकांचे एक किंवा दोन महिने बिल थकल्यास वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई केली जाते, मात्र औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयातंर्गत पाच लाख दोन हजार वीज ग्राहकांनी वर्षभरापासून एकही रुपया वीज बिल जमा केले नसल्याची माहिती समोर आली आहे.

महावितरण कार्यालयातर्फे वारंवार वीज बिल वसुली मोहीम राबविण्यात येत असते. या मोहिमेत नियमित वीज बिल भरणारे ग्राहक कारवाईच्या भितीने आपले बिल भरत असतात. बिल भरण्यासाठी उशीर झाल्यास ग्राहकांचे वीज कनेक्शन खंडित करून वसुली मोहीम राबविण्यात येत असते. औरंगाबाद परिमंडळात ८६ हजार २३६ वीज ग्राहकांनी एक एप्रिल २०१८पासून जानेवारी २०१९पर्यंत एकही रुपया महावितरण विभागाकडे भरलेला नाही. जळगाव परिमंडळात एक लाख २२ हजार १०२ वीज ग्राहकांकडे दहा महिन्यांची थकबाकी १८ कोटींवर आहे. लातूर विभागात एक लाख २७ हजार ७१२ वीज ग्राहकांकडे ४७ कोटी ६१ लाख रुपयांची थकबाकी आहे. वीज बील न भरणाऱ्यांमध्ये नांदेड विभागाचा क्रमांक पहिला असून, या परिमंडळातील एक लाख ६६ हजार ९० वीज ग्राहकांकडे ६६ कोटी ६६ लाख रूपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.

\B७७९८ वीज ग्राहकांकडे १९२ कोटी थकित\B

गेल्या दहा महिन्यांपासून वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांसोबत ७७८९ ग्राहकांकडे एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणची एकूण थकबाकी १९२ कोटी ३४ लाख रुपयांपर्यंत पोचली आहे.

\Bअशी आहे थकबाकी

\Bशहर ग्राहकांची संख्या थकबाकी

औरंगाबाद शहर १३०७ २९ कोटी ६६ लाख

औरंगाबाद ग्रामीण ५२२ १३ कोटी ०७ लाख

जालना ३९१ ९ कोटी ६७ लाख

धुळे ३५६ ९ कोटी ४७ लाख

जळगाव ८९७ २६ कोटी ३५ लाख

नंदूरबार १५७ ३ कोटी ९२ लाख

बीड ११०७ २६ कोटी १२ लाख

लातूर ५३५ १५ कोटी ०१ लाख

उस्मानाबाद ३९९ ९ कोटी ९९ लाख

हिंगोली २२५ ६ कोटी ७१ लाख

नांदेड ७०० १८ कोटी ७३ लाख

परभणी १२०२ २३ कोटी ७३ लाख

………

गेल्या दहा महिन्यांपासून वीज बिल न भरलेल्या वीज ग्राहकांची संख्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत सुमारे पाच लाख आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांची संख्या ७७९८ इतकी आहे. या वीज ग्राहकांवर मार्च अखेरपर्यंत कारवाई करून बिलाची वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही कारवाई न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याच्याही सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.

- ओमप्रकाश बकोरिया, सहसंचालक, औरंगाबाद प्रादेशिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकाश्रयावर साहित्य संमेलन भरवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याचा प्रकार साहित्य क्षेत्राचा आर्थिक मिंधेपणा दाखवतो. आयोजकांच्या आर्थिक नाड्या आवळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. आर्थिक मिंधेपणामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सुरू आहे. त्यामुळे लोकाश्रयावर साहित्य संमेलने घेण्याची गरज आहे' असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. ते परिसंवादात बोलत होते.

स्वातंत्र्यसेनानी कॉ. व्ही. डी. देशपांडे स्मृतिदिन आणि शायर कैफी आझमी जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने 'साहित्य, संविधान आणि अभिव्यक्ती' या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात गुरुवारी सायंकाळी परिसंवाद झाला. माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख अध्यक्षतेखाली प्रा. जयदेव डोळे, बालाजी सुतार आणि पत्रकार संजय आवटे परिसंवादात सहभागी झाले. देशमुख यांनी नयनतारा प्रकरण, आणीबाणी, शीख हत्याकांड या विषयांवरही प्रखर मते मांडली. नयनतारा भाजपविरोधक नसून लोकांच्या बाजूने बोलतात. त्यांचे मत ऐकण्याची सहिष्णूता बाळगणे गरजेचे होते. साहित्य संमेलनात निषेध करणारे कुणीच गेले नसते तर हा अश्लाघ्य आणि अगोचरपणा करणारांचे अधिक फावले असते, म्हणून आपण तेथे गेलो आणि निषेध व्यक्त केला' असे देशमुख म्हणाले.

माध्यम विस्तारत आहेत. पण अभिव्यक्ती आक्रसते आहे, अशी खंत कवी बालाजी सुतार यांनी व्यक्त केली. माणसांनी बोलू नये म्हणून आपल्याकडे यंत्रणा सज्ज आहे, विचारांचे जातीयवादी कप्पे तयार केले जात असून वेगळ्याच प्रकारची अस्पृश्यता साहित्यिकांमध्ये दिसते, असे सुतार म्हणाले. कवी इक्बाल मिन्ने यांनी प्रास्ताविक केले आणि समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.

संघवादी विचारसरणीचा विरोध

संघवादी विचारसरणी मुळातच स्वातंत्र्याच्या आणि स्वातंत्र्यासाठी लढलेल्या साहित्याच्या विरोधात आहे. संघ परिवाराची मोठी ताकद साहित्यात उतरली असून यांच्या मनात साहित्याविषयी प्रचंड नाराजी, तिरस्कार आहे. साहित्याची मूल्यव्यवस्था, अभिव्यक्तीला नामोहरम करण्याची वृत्ती वाढत असून साहित्य क्षेत्रातली ही संकुचितता महाराष्ट्राला शोभणारी नाही, अशी टीका प्रा. जयदेव डोळे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जडवाहनांच्या फिटनेस टेस्टसाठी वाढविला कोटा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

जड वाहनांच्या फिटनेस (योग्यता) टेस्ट करण्यासाठी आता ट्रक चालकांना जास्त दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही. ट्रक चालकांच्या वाहनांचे फिटनेस लवकर व्हावे यासाठी जड वाहनांच्या अपॉइंमेंटचा कोटा ४० ने वाढविण्यात आला असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी दिली.

आरटीओ कार्यालयात ट्रक चालकांना फिटनेस टेस्ट देण्यासाठी महिनाभर वेटिंग करावी लागत असल्याची माहिती औरंगाबाद ट्रान्सपोर्ट असोसीएशनकडून करण्यात आली होती. यानंतर आरटीओ कार्यालयातर्फे १ जानेवारीपासून फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरणापूर्वी फिटनेस तपासणीसाठी अपॉइटमेंटचा कोटा १२० वरून १४० करण्यात आला. ट्रक चालकांना जास्त दिवस अपॉइटमेंटची प्रतीक्षा करावी लागू नये. यासाठी आता अवजड वाहनांच्या फिटनेससाठी अपॉइमेंटचा कोटा आणखी ४० ने वाढविण्यात आला असून यासाठी दोन मोटार वाहन निरिक्षकाची नेमणूक करण्यात आली.

या नवीन बदलामुळे जड वाहनधारकांची प्रतीक्षा कमी होणार आहे. यापूर्वी अपॉइंमेंट घेतलेल्या वाहनधारकांना अपॉइमेंट तारीख बदलून घेण्याची सुविधा देण्यात येत आहे. ही सुविधा शुक्रवार (१८ जानेवारी) पासून लागू राहणार असल्याची माहिती आरटीओ सदामते यांनी दिली.

भारक्षमता वाढविण्यासाठी भरावा लागणार कर

ज्या वाहनांचे फिटनेस संपले आहे अशा वाहनधारकांना भारक्षमता वाढविण्यासाठी कर भरावा लागणार आहे. ही भारक्षमता वाढविल्याशिवाय आणि नोंदणी पुस्तकात नोंद केल्याशिवाय पासिंग केली जात नव्हती. अशा फिटनेस संपलेल्या वाहनधारकांना भारक्षमता वाढविण्याची सुविधाही आरटीओ कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा घेण्यासाठी वाहनधारकाला अर्ज, शासकीय शुल्काचा धनाकर्ष (डीडी) आणि कर भरून पुन्हा अपॉइंमेंट घेता येणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंचन बजेटबाबत गडकरींचा गैरसमज

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तेलंगना तसेच इतर लहान राज्यांमध्ये पाणी या विषयावरील सर्व तरतुदी एकत्रपणे बजेटमध्ये दाखविल्या जातात, त्या तुलनेत तुलनेत महाराष्ट्र राज्यात जलयुक्त शिवार, जलसंधारण, वॉटरग्रीड, कोल्हापुरी बंधारे यासह इतर बाबींसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात येते. त्यामुळे महाराष्ट्रातील सिंचन बजेटबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गैरसमज झाला असावा, असे म्हणत वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गडकरी यांचे बुधवारी केलेले वक्तव्य खोडून काढले.

गुरुवारी (१७ जानेवारी) वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना २०१९-२० चा प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बुधवारी औरंगाबाद शहरात आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी गडकरी यांनी महाराष्ट्राच्या सिंचन बजेटची तुलना इतर राज्यांसोबत करत तेलंगनासारख्या लहान राज्यांनी सिंचनासाठी बजेटमध्ये महाराष्ट्रापेक्षा तिप्पट तरतूद केली आहे. राज्य पाणीटंचाईच्या मोठ्या अडचणींना सामोरे जात असल्याचे सांगत महाराष्ट्राने सिंचनाचे बजेट वाढवावे, अशी सूचना केली होती. या विधानावरून महाराष्ट्रात सिंचन बजेट वाढेल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, मुनगंटीवार यांनी गडकरी यांचे विधान खोडून काढल्याने ही आशा मावळली आहे.

याबाबत मुनगंटीवार म्हणाले की, 'राज्य सरकार सिंचन हा विषय गंभीरतेने घेत असून बजेटमध्ये राज्य सरकारकडून करण्यात येणारी तरतूद ही स्वतंत्र स्वरुपाची असते. राज्याच्या बजेटमध्ये वेगवेगळ्या तरतुदी वेगवेगळ्या हेडअंतर्गत घेण्यात येतात म्हणून गडकरी यांचा गैरसमज झाला असावा, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. जलसंपदा या विभागाला कधीही निधीची तरतूद कमी पडू दिली नाही.

संशोधनासाठी १०० कोटी

कमी पावसामध्ये जास्त उत्पन्न देण्याऱ्या पिकांच्या, बियाणांच्या जातींचा शोध घेणे आता आवश्यक आहे. कमी पाणी देऊन अशा जातींचा शोध लावता येतो, म्हैसूरमध्ये भारत सरकारच्या इन्‍स्टिट्यूटने या विषयीचे शोध लावले असून पर 'ड्रॉप मोअर क्रॉप' अनुषंघाने काही बियाणांच्या जातीचा शोध लावला आहे. अशा जातींचा शोध आपण करतोय, विद्यापीठांमध्ये अशा जातींच्या संशोधनासाठी विषेश निधी १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यपालांकडे बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण, रोजगार, आरोग्यावर भर द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यांनी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी प्राधान्य क्षेत्रामध्ये खर्च करून सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण कराव्यात या दृष्टीने आढावा घेण्यात आला आहे. मराठवाड्यात शिक्षण, रोजगार आणि आरोग्यावर भर द्यावा, अशा सूचना केल्या असल्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. या बैठकीत आठही जिल्ह्यांचे पालकमंत्री तसेच विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासनाने कळवलेल्या १५१२ कोटी ६० लाख या आर्थिक मर्यादेपेक्षा ७६२ कोटी ५३ लाख रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी केली.

मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (१७ जानेवारी) विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा वार्षिक योजनेची (सर्वसाधारण) बैठक घेण्यात आली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जून खोतकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे, कामगार राज्यमंत्री संभाजी पाटील निलंगेकर या मंत्र्यांसह आमदार संदीपान भुमरे यांची उपस्थिती होती.

या बैठकीबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, घृष्‍णेश्वर, परळी वैजनाथ तसेच औंढा नागनाथ या तीर्थक्षेत्रासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. या तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील निजामकालीन शाळांचे बांधकाम येत्या चार वर्षांत करण्यात येणार असल्याचे सांगितले. मराठवाड्यात वन हा चिंतेचा विषय आहे, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये विभागात चांगले काम झाले आहे. त्यासाठी प्रोत्साहन म्हणून भारत सरकारच्या इको बटालियनचा विस्तार करण्यात येणार असून त्यात बीड आणि लातूर जिल्ह्याचा समावेश करण्यात येणार आहे. यासह मराठवाड्यात 'अटल आनंदवन' अंतर्गत विशिष्ट संकल्पनेतून झाडे लावण्यात येणार आहेत. साधारणपणे एका एकरमध्ये ३५० ते ४०० झाडांची लागवड करण्यात येते. मात्र मराठवाड्यात वनक्षेत्र वाढवण्यासाठी या संकल्पनेअंतर्गत एका एकरात १२ ते २० हजार झाडे लागतात. यामुळे मराठवाड्यात वनक्षेत्र दाट वाढेल व प्रदूषण कमी होणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

\Bदुष्काळ अनुदानाबाबत सारवासारव\B

दुष्काळ जाहीर झाले, मात्र शेतऱ्यांना अनुदान कधी मिळणार या प्रश्नावर मुनगंटीवार यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. मागच्या सरकारच्या तुलनेत आम्ही लवकर दुष्काळ जाहीर केला. आम्ही शेतकऱ्यांबाबत संवेदनशील आहोत. आम्ही बोंडअळीचे पैसे दिले, आगामी काळातही शेतकऱ्यांना पैसे कमी पडू देणार नाही, असे म्हणत दुष्काळी अनुदानाबाबत मुनगंटीवार यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही.

मराठवाड्याची स्थिती (रक्कम कोटीत)

जिल्हा................ शासनाने कळवलेली मर्यादा.............जिल्ह्याची अतिरिक्त मागणी

औरंगाबाद..................२५८.०२..............................५२.००

जालना.....................१७५.९०...............................१५९.०९

बीड.......................२३५.८३.................................९६.९७

परभणी.....................१५२.३०..............................१०१.००

उस्‍मानाबाद................१५६.१६............................८५.३९

लातूर.........................१८७.७०..........................१३१.००

हिंगोली.....................९८.७४............................४०.००

नांदेड........................२४७.९५.........................९७.०८

----------------------------------------------------.

एकूण.......................१५१२.६...........................७६२.५३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीसाठी भाजप अनुकूल: मुनगंटीवार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होणार की नाही?, या बाबत चर्चा सुरू असताना भाजप युतीसाठी अनुकूल असून शिवसेनेला निर्णय घ्यायचा असल्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीसाठी मुनगंटीवर गुरुवारी (१७ जानेवारी) शहरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजप युतीबाबत चर्चा सुरू आहे, आमची युती निश्चित होणार आणि पुढील मुख्यमंत्रीही देवेंद्र फडणवीस असतील, असा दावा मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. काँग्रेस आघाडीचेही अद्याप 'ही जागा आमची आणि ही जागा तुमची,' असे सुरू आहे, असे ते म्हणाले. शिवसेना-भाजप युतीबद्दल सध्या राज्यातील व देशपातळीवरील नेत्यांकडून विविध प्रकारची विधाने केली जात आहेत. यामुळे दोन पक्षांत सर्वकाही ठीक नसल्याचे वातावरण राज्यात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटी, दंत, ‘कॅन्सर’ला १२ कोटींचा निधी मंजूर

0
0

औरंगाबादः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी), शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय आणि राज्य कर्करोग संस्थेच्या वेगवेगळ्या यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी १२ कोटी रुपयांच्या निधीला गुरुवारी (१७ जानेवारी) अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवा कंदील दाखवला. विविध यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी 'डीपीसी'कडे १८ कोटींची मागणी करण्यात आली होती. यात घाटी रुग्णालयासाठी १० कोटींची मागणी होती. मात्र केवळ ६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. विभागीय आयुक्तालयात गुरुवारी झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत मुनगंटीवार यांच्याकडे आणखी ६ कोटींचा निधी मंजूर करण्यासाठी आमदार अतुल सावे यांनी जोर लावल्यामुळे अर्थमंत्र्यांनी १२ कोटींचा निधी मंजूर केला. यामुळे तिन्ही संस्थांना विभागून १२ कोटींचा निधी मिळणार आहे. घाटीचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजन बिंदू, डॉ. वर्षा रोटे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौलताबाद-चाळीसगाव रेल्वे मार्गासाठी प्रयत्न करणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दौलताबाद ते चाळीसगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी आता खान्देशच्या आमदारांनी जोर लावण्याचा निर्णय घेतला आहे. चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांनी या मार्गासाठी मुख्यमंत्र्यांसह रेल्वेमंत्री यांच्यासोबत बैठका घेऊन सदर मार्गासाठी निधी उपलब्ध करून हा रेल्वे मार्ग सुरू करावा. यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील हे सोमवारी औरंगाबाद येथे एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी मराठवाडा रेल्वे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांनी भेट घेतली. या भेटीत आमदार पाटील यांनी दौलताबाद चाळीसगाव व रोटेगाव-कोपरगाव कॅडलाइनच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. रेल्वे कृती समितीचे अनंत बोरकर, प्रल्हाद पारटकर, कन्नडचे चंद्रकांत मेणे, बी. टी. अमृतकर, महेश मेणे, प्रमोद ब्राह्मणकर, पंकज चव्हाण, पाटील आबा, अॅड. मंगेश मेणे यांची उपस्थिती होती.

दौलताबाद-चाळीसगाव रेल्वे प्रकल्पाची गरज, त्याचे लाभ याची माहिती पाटील यांनी घेतली. सध्या मनमाड-चाळीसगाव-भुसावळ हा रेल्वे मार्ग असून चाळीसगाव परिसरातील गावांमधील नागरिकांना चाळीसगावपर्यंत खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो. यामुळे या रेल्वे मार्गाचे महत्त्व असून आगामी अर्थसंकल्पापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निधी उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती पाटील यांनी दिली. खान्देशातील इतर आमदार आणि खासदारांनासुद्धा या मागणीसाठी संपर्क साधणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्काय बसच्या डीपीआरचे काम वॅपकॉस कंपनीला काम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्काय बस उपक्रमाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी महापालिकेने तातडीने ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. डीपीआर तयार करण्याचे काम शासनमान्य वॅपकॉस कंपनीला देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबाद शहरात स्काय बस सुरू करण्याची घोषणा बुधवारी केली. यासाठीचा डीपीआर महापालिकेने तयार करावा, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर लगेचच महापालिकेने स्काय बससाठीचा डीपीआर तयार करण्यासाठी ५० लाखांच्या खर्चाला मान्यता दिली. वॅपकॉस कंपनीला हे काम देण्याचा निर्णय देखील घेतल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

ते म्हणाले की, 'अत्यंत गर्दीच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी स्काय बसचा उपक्रम राबविला जाणार आहे. १५ किलोमीटरच्या परिघात स्काय बसचे कार्यक्षेत्र असणार आहे. शहागंज, टीव्ही सेंटर, बसस्थानक, रेल्वेस्टेशन आदी भागांचे या उपक्रमासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. मेट्रो रेल्वेला पर्याय असणारी स्काय बसची सेवा असेल. प्रदूषण मुक्त प्रवास नागरिकांना करता येईल. १०० किलोमीटर प्रती तास या वेगाने स्काय बसचा प्रवास असेल. एका वेळी २३० प्रवासी यातून प्रवास करू शकणार आहेत. जुने आणि नवीन शहर जोडणारा हा उपक्रम असणार आहे. ९०० कोटींचा हा प्रकल्प असून तीन वर्षांत तो पूर्ण करण्याचे शासनाने ठरविले आहे. बस प्रवासापेक्षा स्काय बसचा प्रवास स्वस्त असेल, असा उल्लेख महापौरांनी केला.

पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्वावर ही सेवा चालवली जाणार असून ३० वर्षांच्या करारावर संबंधितांना स्काय बस चालवण्यासाठी दिली जाणार आहे. स्काय बसची सेवा उभी करताना शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, असा दावा त्यांनी केला. या उपक्रमासाठी ४० कोटी रुपये महापालिका आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने द्यावे लागतील, त्याचे नियोजन केले जाईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकसभेसाठी काँग्रेसकडून डझनभर इच्छुक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी कॉँग्रेसकडून आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, किरण पाटील डोणगावकर, मिलिंद पाटील, राजेंद्र दर्डा यांच्यासह डझनभर उमेदवार इच्छुक आहेत. पक्षाने गुरुवारी लोकसभा निवड मंडळाची बैठक घेत इच्छुकांच्या मुलाखती घेत चाचपणी केली. ही सर्व नावे प्रदेश कमिटीकडे पाठविण्यात येणार आहेत.

शहागंज येथील गांधी भवनात जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा निवड समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. निरीक्षक भीमराव डोंगरे, शहराध्यक्ष नामदेव पवार, कार्याध्यक्ष डॉ. कल्याण काळे, माजी आमदार नितीन पाटील, ज्येष्ठ नेते प्रकाश मुगदिया, विलास औताडे, अशोक सायन्ना, माजी मंत्री अनिल पटेल, बाबा तायडे, डॉ. पवन डोंगरे उपस्थित होते. जास्त प्रयोग करू नका, सर्वांना सोबत घेऊन जाणारा उमेदवार द्या, अशी मागणी माजी मंत्री पटेल यांनी केली. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, चाचपणी सुरू असतानाच माजी मंत्री राजेंद्र दर्डा, जिल्हाध्यक्ष सत्तार, डॉ. कल्याण काळे, नामदेव पवार यांच्या नावाचाही उमेदवार म्हणून समर्थक कार्यकर्त्यांनी उल्लेख केला. विशेष म्हणजे यापैकी अनेकांना लोकसभा, नव्हे तर विधानसभा लढवायची आहे. यात डॉ. काळे यांनी लोकसभेसाठी नावाचा उल्लेख होताच त्यांनी आमदार सत्तार हेच सक्षम असल्याचे सांगत उमेदवारीचा चेंडू त्यांच्या कोर्टात टाकला. शहराध्यक्ष पवार यांनीही सत्तार यांच्या नावाला पसंती दिली. तर माजी आमदार पाटील यांनीही विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे स्पष्टपणे नमूद करत लोकसभेसाठी सर्व गुण कौशल्य असलेले उमेदवार म्हणून सत्तार हेच सक्षम असल्याचे सांगितले.

\Bरणछोडदास नाही...

\Bपत्रकारांशी बोलताना आमदार सत्तार म्हणाले, 'मी रणछोडदास नाही. श्रेष्ठींचा आदेश असेल तर प्राणपणाने लढू,' म्हणत लोकभेसाठी तयारी दाखवली. 'अर्ज करणारे तसेच कार्यकर्त्यांकडून आग्रह धरण्यात आलेली सर्व इच्छुकांची नावे प्रदेश समितीकडे पाठविण्यात येणार आहेत. इच्छुकांकडून कोणत्याही प्रकारचा पक्षनिधी घेण्यात आला नाही,' अशी माहितीही सत्तार यांनी यावेळी दिली.

\Bयांचे आले अर्ज

\Bआमदार सुभाष, प्रा. रवींद्र बनसोड, मिलिंद पाटील, इब्राहिम पठाण, प्रा. मोहन देशमुख, किरण पाटील डोणगावकर, अरुण दापकेकर, पृथ्वीराज पवार, मोहम्मद युसुफ मो. हारुण मुकाती आणि अन्सारी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खून प्रकरणात दोघांना जामीन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचऱ्याच्या हायवावरील चालक नितीन ऊर्फ बाळू घुगे याचा पंखा व गोधडी चोरल्याच्या क्षुल्लक कारणावरुन खून केल्याच्या प्रकरणातील आरोपी नील ऊर्फ सुनील काकासाहेब काकडे पाटील (३४, रा. बसय्येनगर, बायजीपुरा) व शुभम कारभारी साळुंके (२०, रा. संजयनगर, गल्ली क्र. ६) यांना ४० हजारांच्या बंधपत्रावर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी सर्शत जामीन मंजूर केला.

फ्लॅटमधील पंखा व गोधडी चोरल्याच्या कारणावरुन आरोपी नील ऊर्फ सुनील काकासाहेब काकडे पाटील (३४, रा. बसय्येनगर, बायजीपुरा) याने चालक नितीन ऊर्फ बाळू घुगे (२३, रा. जाधववाडी) याला लाकडी दांडा आणि लोखंडी सळईने बेदम मारहाण केली होती. यात बाळुचा मृत्यू झाला. २० सप्टेंबर रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपींना अटक होऊन त्यांची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी नील पाटील याच्यासह आरोपी शुभम कारभारी साळुंके (२०, रा. संजयनगर, गल्ली क्र. ६) यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीवेळी, कोर्टाने दोन्ही आरोपींना शहरात राहण्यासाठी बंदी घालत, दोघा आरोपींची ४० हजारांच्या बंधपत्रावर जामीन मंजूर केला. आरोपी नील पाटील याच्या मार्फत अ‍ॅड. अभयसिंह भोसले यांनी बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. मयुर बोरसे व अ‍ॅड. मोहसीन पटेल यांनी सहकार्य केले, तर आरोपी शुभम साळुंखे याच्या मार्फत अ‍ॅड. निलेश घाणेकर यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक हनुमंत गिरमे यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तक्रारदार योगेश मसलगे पाटील यांनी उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांची शिष्टमंडळासह भेट घेत निवेदन सादर करीत ही मागणी केली.

पाटील हे १२ जानेवारी रोजी सेव्हनहील उड्डाणपुलाखालून जात होते. यावेळी सिग्नलवर थांबलेले असताना त्यांना वाहतूक पोलिसांनी अडवले. यावेळी निरीक्षक गिरमे यांनी त्यांना सिटबेल्ट लावला नसल्याचे सांगत दंड भरण्यास सांगितले. मसलगे पाटील दंड भरण्यासाठी तयार असतानाही त्यांच्यासोबत वाहतूक पोलिसांनी अरेरावीची भाषा करीत त्यांचा अपमान केल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. निरीक्षक गिरमे यांच्यावर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. या शिष्टमंडळामध्ये योगेश मसलगे पाटील, सरोज योगेश मसलगे पाटील, राहुल सावंत, सर्जेराव चव्हाण, अनुराग शिंदे, विजय जाधव, किरण कांबळे आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाचू न दिल्याने घातक हल्ला; दोघांना कोठडी

0
0

औरंगाबाद:

लग्नानंतरच्या स्वागत समारंभात नाचू दिले नाही म्हणून वधुच्या आईचा विनयभंग करीत मारहाण करणारे व वधुच्या भावावर प्राणघातक हल्ला करणारे शेख जुनेद शेख रऊफ व शेख आवेज शेख युनूस यांना बुधवारी (१६ जानेवारी) अटक करुन त्यांना गुरुवारी (१७ जानेवारी) कोर्टात हजर केले असता, दोन्ही आरोपांना सोमवारपर्यंत (२१ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी दिले.

या प्रकरणी शहरातील ३७ वर्षीय वधुच्या आईने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीच्या मुलीचे लग्न १३ जानेवारी रोजी झाले व १६ जानेवारी रोजी स्वागत समारंभ होता. स्वागत समारंभाचा कार्यक्रम सुरू असताना, आरोपी शेख जुनेद शेख रऊफ (१८, रा. यासीन नगर, हर्सूल) व शेख अवेज शेख युनूस (१९, रा. रोशनबाग, हर्सूल) व त्यांचे आणखी दोन साथीदार तिथे आले व आम्हाला समारंभात नाचू द्या, असे म्हणाले. तेव्हा फिर्यादी महिलेने 'येथे महिलांचा कार्यक्रम सुरू असल्याने तुम्हाला नाचता येणार नाही' असे सांगितले. नकार मिळताच आरोपींनी फिर्यादीचा विनयभंग करीत धुम ठोकली. काही वेळाने वरील आरेापींसह ८ ते १० जण तिथे लाठ्या-काठ्या घेऊन आले व त्यांनी नाचू देत नाही म्हणून पीडितेच्या भाच्याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. तसेच पीडिता व नातेवाईकांनाही जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी शेख जुनेद व शेखच आवेजला बुधवारी अटक करुन गुरुवारी कोर्टात हजर केले असता, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले लाकडी दांडे जप्त करणे व आरोपींच्या साथीदारांना अटक करणे बाकी असल्याने दोघा आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती विशेष सहाय्यक सरकारी वकील सय्यद शहनाज यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने दोन्ही आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोमल इंगळे, सूर्या राजपूतला पदके

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

जिल्हा कुडो असोसिएशनच्या पाच खेळाडूंनी मुंबईत झालेल्या दहाव्या राष्ट्रीय अक्षय कुमार कुडो स्पर्धेमध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटाकावले. यात कोमल इंगळेने सोळा वर्षांखालील वयोगटात ४७ किलो वजन गटात सुवर्णपदक तर सूर्या राजपुतने चौदा वर्षांखालील वयोगटात ४५ किलो वजन गटात रौप्यपदक मिळविले. तसेच देवांश नरवडे, हुजेफा शेख, निकुली इंगळे यांनी लक्षवेधक कामगिरी नोंदवली. या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक नीलेश नरवडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. महाराष्ट्र कुडो असोसिएशनचे सचिव जास्मिन मकवाना, राजेश सोनले, जिल्हा कुडो असोसिएशनचे चेअरमन पारस घाटे, किरण आगाज, आसिफ शेख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images