Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तब्बल डझनभर दुचाकी चोरल्या

0
0

औरंगाबाद : शहराच्या विविध भागांतून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तेव्हा त्याने साथीदाराच्या मदतीने शहरातून तब्बल १२ दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

गंगापूर भिवधानोरा येथील मंगेश भिकचंद गिरी हा अट्टल वाहन चोरटा असून, तो चोरी केलेल्या वाहनांची कागदपत्रे बदलून शहरात स्वस्तात मोटार सायकल विक्री करीत असल्याची माहिती ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांना मिळाली होती. यावरून उपनिरीक्षक सचिन कापुरे यांच्या पथकाने मंगेश गिरी यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवून विचारपूस करताच त्याने सिडको येथील साथीदार सुमित रामचंद्र राजपूत याच्या मदतीने शहरातील विविध भागात दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून साडेपाच लाख रुपये किमतीच्या तब्बल डझनभर दुचाकी जप्त करीत त्यास गंगापूर पोलिसांच्या हवाली केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सफाई कामगारांनी शोधून दिले मंगळसूत्र

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लगीन घरातल्या गडबडीत कचरा समजून फेकून दिलेले तीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र एका महिला कर्मचाऱ्यांमुळे मिळाले. शनिवारी स्वामी विवेकानंद नगरामध्ये ही घटना घडली.

हडकोतल्या मंजू प्रशांत गायकवाड यांच्या दिराचे २६ जानेवारी रोजी लग्न होते. नवरदेवाला हळद लावण्याच्या दिवशी घरातल्या लक्ष्मीलाही हळद लावण्याची प्रथा आहे. दागिने हळदीच्या पाण्यातून काढले की चमकतात अशी समज आहे. त्यामुळे मंजू यांनी त्यांचे तीन तोळ्याचे मंगळसूत्र २५ तारखेला हळदीच्या पाण्यात भिजत ठेवले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या सासूबाईंनी भांडी आवरत असताना मंगळसूत्र ठेवलेली वाटी कचऱ्याच्या बादलीत रिकामी केली. तेवढ्यात घंटा गाडी आली आणि कचरा घेऊन गेली. लग्नाची वरात निघताना मंजू यांना मंगळसूत्र घालायचे लक्षात आले. मात्र, त्यांना वाटी दिसली नाही. त्यामुळे मंजू गायकवाड यांनी सासूबाईंकडे विचारणा केली. ती वाटी कचऱ्याच्या बादलीत सकाळीच रिकामी केल्याचे उत्तर दिले. वरातीला पुढे पाठवत मंजू आणि त्यांचे पती प्रशांत यांनी कचरा ट्रकचालकाजवळ घडलेली घटना सांगितली. त्यावेळी सफाई कामगार सखाराम म्हस्के, सुरेंद्र भालेराव, रावसाहेब आढावे, रमेश गवई, कडुबा वाघमारे, मधुकर म्हस्के यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत दीड तासात ट्रक रस्त्याच्या कडेला पालथा करून मंगळसूत्र शोधून दिले. मंगळसूत्र मिळाल्याचा आनंद मंजू यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

आयुक्त, महापौरांकडून कौतुक

गायकवाड यांनी कामगारांना बक्षीस देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी गायकवाड यांचे आभार व्यक्त करत बक्षीस घेण्यास नकार दिला. महत्वाचे म्हणजे बचत गटामार्फत पालिकेत हे कामगार काम करत असून, या कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही.

सफाई कामगारांच्या प्रामाणिकपणाची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक, महापौर नंदकुमार घोडेले यांनी सर्व विभाग प्रमुखांच्या बैकठीत सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूक्ष्म सिंचनातून राष्ट्रीय उत्पन्नात वाढ शक्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देशात सर्वाधिक पाणी शेतीसाठी वापरतात, पण राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा फक्त १६ टक्के आहे. सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करून हा वाटा वाढवणे शक्य आहे. सूक्ष्म सिंचन म्हणजे कमी खर्च असे शेतकऱ्यांना सांगितल्यास ते सूक्ष्म सिंचनाकडे वळतील, अशी शिफारस केंद्र सरकारला करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेतील तज्ज्ञांच्या चर्चेनंतर ४२ शिफारशी सादर करण्यात आल्या.

नववी आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद औरंगाबाद शहरात झाली. या चार दिवसांच्या परिषदेत विविध देशातील जलतज्ज्ञ व कृषितज्ज्ञ सहभागी झाले होते. जगभर पाणी टंचाई असल्यामुळे शेतीत सूक्ष्म सिंचन वापरण्याशिवाय पर्याय नसल्याचा मुद्दा तज्ज्ञांनी मांडला. सूक्ष्म सिंचन परिषद केंद्र सरकारच्या पाणीपुरवठा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने घेतली. या परिषदेच्या समारोपाला केंद्रीय सहसचिव यू. पी. सिंग उपस्थित होते. तज्ज्ञांनी मांडलेल्या महत्त्वाच्या सूचनांची नोंद घेऊन ४२ शिफारशी केंद्र सरकारला सादर करण्यात आल्या आहेत. सर्वाधिक पाणी शेतीसाठी वापरले जात असले तरी उत्पन्नात शेतीचा वाटा फक्त १६ टक्के आहे. हा वाटा वाढवण्यासाठी सूक्ष्म सिंचन वापरण्याची मुख्य शिफारस आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर लोक, पर्यावरण आणि अन्न सुरक्षेसाठी पाणी राखून ठेवताना सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करून पाणी वापर घटवणे आवश्‍यक आहे. देशातील सर्वात मोठा ठिबक सिंचन प्रकल्प कर्नाटकमधील रामथल येथे आहे. या भागात तंत्रज्ञान आणि लोकसहभागाद्वारे सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र दुप्पट करण्यात आले. हा प्रयोग प्रयोग देशाच्या इतर भागात राबवावा अशी शिफारस आहे. कमी पाणी लागणारे आणि वातावरण बदलानुसार अनुकूल अशा सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक शेती उत्पादनांची गरज आहे. बोअरवेल्सची सूक्ष्म सिंचन यंत्रणेशी सांगड घालावी. ऊस, केळी, पपई यासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकांसाठी सूक्ष्म सिंचन अनिवार्य करावे असे शिफारशीत म्हटले आहे. शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाकडे आकर्षित करण्यासाठी कमी खर्च, निश्चित उत्पन्न, जास्त उत्पादन, कमी पाणी, सोपे तंत्रज्ञान समजावून सांगणे आवश्यक आहे. कमी पाणी म्हणजे कमी खर्च हे शेतकऱ्यांवर बिंबवले तर अधिक शेतकरी सूक्ष्म सिंचनाकडे वळतील, अशी महत्त्वाची शिफारस आहे.

\Bअंमलबजावणी कधी होणार?\B

आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेत शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन पद्धती खर्चिक असल्यामुळे वापर करीत नसल्याचे सांगितले होते. शेतकऱ्यांना अनुदान मिळत असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्यक्षात दोन वर्षांपासून ठिबकचे अनुदान मिळाले नसल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे शिफारशींची अंमलबजावणी कशी होणार असा पेच आहे.

महाराष्ट्राच्या एकूण शेतीच्या क्षेत्रापैकी फक्त चार टक्के क्षेत्रावर ऊस आहे, पण एकूण पाण्यापैकी ५६ टक्के पाणी उसासाठी वापरतात. केवळ सूक्ष्म सिंचन केल्यामुळे पाणी वाचणार नाही. तर पीक पद्धतीत बदल आवश्यक आहे. शिवाय, सूक्ष्म सिंचनाच्या नावाने उद्योगांना गब्बर करण्याचे हे प्रयत्न आहेत.

- प्रा. एच. एम. देसरडा, अर्थतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर बससाठी मिळणार तीनशेच्या वर ड्रायव्हर कंडक्टर

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी अंतर्गत औरंगाबाद शहरात सुरू करण्यात आलेल्या शहर बस वाहतूक सेवेला अधिक सक्षमपणे चालविण्यासाठी राज्य पहिवहन महामंडळाला (एसटी) ड्रायव्हर आणि कंडक्टरची आवश्यकता आहे. भरती प्रक्रिया राबविण्यासाठी किमान वर्षभराचा अवधी लागणार आहे. त्यावर उपाययोजना म्हणून विदर्भाकडे राज्यातून जाणारे ३४५ ड्रायव्हर आणि कंडक्टर औरंगाबाद शहर बससेवेसाठी मिळणार आहेत.

औरंगाबाद शहर बस एसटी महामंडळाच्या मदतीने चालविण्यात येत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत १०० बस चालविण्यात येणार आहे. यातील २३ बस सध्या औरंगाबाद मार्गावर सुरू आहेत. एसटी महामंडळात आधीच एसटी कंडक्टर आणि ड्रायव्हर यांची संख्या कमी आहे. २६० ड्रायव्हर आणि २७५ कंडक्टरची कमतरता आहे. याबाबतचा आढावा महामंडळाचे अधिकारी माधव काळे यांनी घेतला आहे. औरंगाबाद शहरात सुरू करण्यात आलेल्या शहर बससाठी कर्मचारी कमी पडू नये, यासाठी महामंडळ स्तरावर कारवाई सुरू आहे. शहर बस सेवेसाठी ५६० कर्मचारी भरती करण्याचा विचार सुरू आहे. यासाठी लवकरच प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

महामंडळात एसटी कर्मचारी भरतीच्या प्रक्रियेसाठी किमान सहा ते आठ किंवा वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. ही शक्यता विचारात घेऊन परिवहन मंत्री दिवाकर रावते, व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी शहरासाठी विनंती बदलीवरून विदर्भात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना औरंगाबाद शहरात आणण्याचा निर्णय घेतला आहे. ३४५ ड्रायव्हर आणि कंडक्टर औरंगाबादेत देण्यात येणार आहे.

लेटलतीफ कर्मचाऱ्यांची 'लाईन ऑफ'

नवीन शहर बस सुरू केल्याच्या दिवशी, दोन कर्मचारी हे दिलेल्या वेळेपेक्षा २० ते २५ मिनिचे उशीराने पोचले होते. कर्मचारी उशीरा आल्याने शहर बसच्या वेळापत्रकावर कोणतेही प्रभाव पडू नये. यासाठी त्या दोन कर्मचाऱ्याचे 'लाईन ऑफ' म्हणजे त्या दिवशी कामावर घेण्यात आलेले नाही. शहर बसचे वेळापत्रक ९५ टक्के चांगल्या पद्धतीने राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

………

"एसटी महामंडळाने औरंगाबादची शहर बस सेवा अधिक सक्षम व्हावी. याच्या विस्तारात कोणतीही अडचण होऊ नये. यासाठी ३४५ कर्मचाऱ्यांना औरंगाबाद विभागाला देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हे कर्मचारी शहर बसच्या सेवेत दाखल होतील. "

प्रशांत भुसारी, विभाग नियंत्रक औरंगाबाद

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे प्रवाशांनी केला काळ्या फिती लावून प्रवास

0
0

रेल्वे प्रवाशांनी केला

काळ्या फिती लावून प्रवास

पॅसेंजर उशिरा सुटल्यामुळे केले अनोखे आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेच्या विविध कामांमुळे उशिराने जात आहेत. या पॅसेंजर गाड्या उशिराने धावत असल्यामुळे ग्रामीण भागातून औरंगाबादला येणाऱ्या प्रवाशांना त्रास सोसावा लागतो. 'पॅसेंजर वेळेवर चालवा' या मागणीसाठी नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी काळ्या फिती लावून प्रवास केला आणि रेल्वेप्रशासनाविरोधात अभिनव आंदोलन केले.

सोमवारी २८ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर लासूर, रोटेगाव पोटूळ येथील प्रवासी औरंगाबाद रेल्वेस्टेशनच्या स्थानक व्यवस्थापक कार्यालयाबाहेर जमा झाले. काळ्या फिती लावून आलेल्या प्रवाशांनी

गेल्पासून मनमाड काचीगुडा आणि काचीगुडा मनमाड या गाड्या वेळेवर चालविण्यात येत नाही. यामुळे या रेल्वेने औरंगाबाद ते नगरसोल दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अडचण होत असते. ही अडचण दुर करावी. अशी मागणी रेल्वे प्रवासी सेनेच्या वतीने करण्यात येत होती. याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याकारणाने नियमित प्रवाशांनी गेल्या २७ जानेवारी पासून काळ्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयांतर्गत रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात जालना - शिर्डी - नगरसोल या डेमू ची शिर्डी फेरी बंद करुन जालना - मनमाड, मनमाड - चिकलथाना, चिकलथाना- नगरसोल, नगरसोल -जालना अशी फेरी चालविण्यात यावी. अशी मागणी केली. या आंदोलनात करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या आंदोलनात रेल्वे प्रवासी सेनेचे संतोष सोमाणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर बिलवने पाटील, अंबादास माडवगड ,आसिफ सय्यद ,दादासाहेब घोडके, गोरख गिरी,मनीष मुथा, अरुण भाग्यवंत व महिला व विध्यार्थीनी उपस्थितींची उपस्थिती होती.

………

असं राहणार आंदोलन …

- क्रॉसिंग, इंजीनियरिंग ब्लॉक , मेगाब्लॉक, लेट तर अनअपेक्षित रद्द यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य व शेतकरी यांचे महाविद्यालयात शिक्षण घेण्याकरिता येणारे विद्यार्थी ,विद्यार्थिनी ,रोजगार , दवाखान्याचे काम , नोकरदार यांना प्रचंड त्रास होत आहे. या विरोधात २७ ते ३१ जानेवारी डोक्यास काळ्या रंगाची पट्टी ,रेबिन, टोपी ,मफलर ,उपरने बांधून रेल्वे प्रवास करुण रेल्वे प्रशासन चा निषेध करण्यात येत आहे.

- फेब्रूवारी महिन्यात - १ ते ५ मौन व्रत रेल्वे प्रवास करण्यात येईल.

- औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे ६ ते १० साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

- ११ फेब्रूवारी पासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

……

जनरोषासाठी सोशल मिडीयाचा वापर

रेल्वे विभागाच्या गलथान कारभाराच्या विरोधात जनतेला होत असलेल्या रोष आंदोलनातून समोर येत आहे. यामुळे या आंदोलनाचे फोटो तसेच मागणींची माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री पीयूष गोयल, रेल्वे बोर्डाचे चेअरमन वी. के. यादव यांच्यासह स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिंधींना ट्विटरच्या माध्यमातुन पाठविण्यात येत आहे.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'अरुण गवळींची शिक्षा माफ करा'

0
0

औरंगाबाद

अखिल भारतीय सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरुण गवळी यांची जनसेवा व वय लक्षात घेऊन त्यांची उर्वरीत शिक्षा माफ करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली.

गवळी यांनी १९६६मध्ये अखिल भारतीय सेनेची स्थापना केली. यातून त्यांनी जनसेवकाच्या रुपामध्ये काम सुरू करून लाखो गिरणी कामगारांना न्याय मिळवून दिला. राज्यातील अनेक गोशाळांना चारा पुरवला, गोरगरीबांच्या पन्नास वर्षांपासूनच्या समस्या त्यांनी सोडवल्या. यामुळे त्यांची उर्वरीत शिक्षा माफ करावी, असं निवदेन अखिल भारतीय सेनेनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय. अरुण गवळी सध्या नागपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अरुण गवळींची शिक्षा माफ करण्याची मागणी

0
0

औरंगाबाद

अखिल भारतीय सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरुण गवळी यांची जनसेवा व वय लक्षात घेऊन त्यांची उर्वरित शिक्षा माफ करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

गवळी यांनी १९९६मध्ये अखिल भारतीय सेनेची स्थापना करून जनसेवकाच्या रुपामध्ये काम सुरू केले. लाखो गिरणी कामगारांना न्याय मिळवून दिला, राज्यातील अनेक गोशाळेंना चारा पुरवला, गोरगरीबांच्या ५० वर्षांपासूनच्या समस्या त्यांनी सोडवल्या. त्यांनी तीन वेळेस गांधी विचार परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली व गांधीजी यांच्या अहिंसा मार्गावर असल्याचे यावेळी दाखवून दिले. त्यांचे लोकहिताचे काम व केलेल्या जनसेवेची पावती म्हणून त्यांना जनतेने निवडून देऊन आमदार केले हे दुर्लक्षित करता येणार नाही. त्यांना नाहक आजीवन कारावास भोगावा लागत आहे, यामुळे अरुण गवळी यांचे वय, त्यांनी २० वर्षे केलेली जनसेवा लक्षात घेऊन त्यांना उर्वरित कारावासातून मुक्त करावे, अशी विनंती निवदेनाद्वारे करण्यात आली आहे.

गवळी हे सध्या त्यांनी न केलेल्या गुन्ह्याबद्दल नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असल्याचे अखिल भारतीय सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे. निवेदनावर सतीश म्हस्के, किशोर कांबळे, महेंद्र साळवे, बोधिपाल नितनवरे, प्रेम कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर मसारे पाटील, रफिक शेख, नानाभाऊ दंडे, शुभम देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भांगसी माता गड परिसरात प्लास्टिक बाटल्यांचा खच

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धार्मिक व पर्यटनस्थळ असलेला भांगसी माता गड परिसर प्लास्टिक कचऱ्याच्या विळख्यात सापडला होता. होली हेल्पिंग हँडच्या सदस्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने या परिसरात स्वच्छता मोहिम राबवली आणि परिसर स्वच्छ केला. या मोहिमेत त्यांना पिण्याच्या प्लास्टिक बाटल्यांचा खच आढळून आला. एक हजार बाटल्यांसह अन्य कचरा संकलित करत त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. लावली.

निसर्गभ्रमंतीची आवड असलेल्या तरुणांनी एकत्र येत 'होली हेल्पिंग हँड' संस्थेची स्थापन केली. वन, किल्ले, गड आदी भागात भ्रमंती करण्याबरोबरच या सदस्यांनी आपला परिसर स्वच्छ परिसर हा उपक्रमही राबवते. पार्वतीनगरसह शहरातील अनेक भागात त्यांनी हे उपक्रम राबविले असून प्रजासत्ताक दिन भांगसी माता गडावर अनोख्या पद्धतीने साजरा केला.

संस्थेचे अध्यक्ष अनिल जठार, जमीर अली खान, सतिश कोल्हे, शेख अकबर, बळीराम घोडजकर, राहूल वाघ, रामकिसन खर्डेकर, किर्तीकुमार वैद्य आदी सदस्य गडावर गेले असता पर्यटकांची चांगली वर्दळ होती. परिसरात या सदस्यांनी पाहणी केली असता जागोजागी पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या,कॅरीबॅग, पेपरसह अन्य कचरा दिसून आला. गडावर पिण्याचे पाणी असलेल्या ठिकाणी कचरा विखुरलेला होता. गडावरील विक्रेतेही कॅरीबॅगमधून खाद्यपदार्थ, पूजेचे साहित्य देत असल्याचे आढळून आले, असे जठार यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

पाहणी केल्यानंतर सदस्यांनी स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. प्लास्टिक बाटल्या, कॅरीबॅगसह अन्य कचरा वेगवेगळ्या डिस्पोजल बॅगमध्ये संकलित करत गड परिसर स्वच्छ केला. स्वच्छता मोहिम सुरु असतानाच सदस्यांनी येथील विक्रेते, पर्यटक यांना एकत्रित करत स्वच्छतेविषयी माहिती दिली. गडावरील दर्शनी भागात संस्थेतर्फे 'स्वच्छता राखा' असा संदेश देणारे फलकही लावण्यात आले. त्यानंतर कचरामुक्त राष्ट्रसंबंधी सदस्यांनी शपथ घेतली व राष्ट्रगीताने या उपक्रमाची सांगता केली. हेल्पिंग हँड संस्थेच्या सदस्यांसह सनी फाऊंडेशन, आधार फाऊंडेशनच्या सदस्यांसह काही जागरुक पर्यटकांनी मोहिमेत सहभाग नोंदविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबादेतून निवडणूक लढवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असे साकडे येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घातले आहे. सेनेने यापूर्वीच वंचित बहुजन आघाडी सोबत असल्याचे जाहीर केले असून, आघाडीने उमेदवार म्हणून त्यांना पाठिंबा द्यावा, यासाठी आघाडीच्या नेत्यांची भेट घेण्याचा निर्णयही कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

दादाराव राऊत यांच्या अध्यक्षेतखाली सुभेदारी विश्रामगृहात रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मंगळवारी बैठक झाली. त्यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून पक्षनेते आनंदराज आंबेडकर यांनी निवडणूक लढवावी, अशा मागण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. निवडणूक रिंगणात उतरावे, असे साकडे घालण्यासाठी प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते लवकरच त्यांची लवकरच भेट घेणार आहेत. जिल्हा निमंत्रक रुपचंद गाडेकर, काकासाहेब गायकवाड, शांता धुळे, सचिन निकम, मिलिंद बनसोडे, चंद्रकांत रुपेकर, विजय शिंगारे, अॅड. अतुल कांबळे, अविनाश जगधने, धम्मपाल भुजबळ, मुकेश खिल्लारे, सुबोध जोगदंड, राहुल मुगदल, अशोक दाणेकर, गणेश रगडे आदी उपस्थित होते.

\Bआघाडीच्या नेत्यांशी करणार चर्चा\B

रिपब्लिकन सेनेने यापूर्वीच अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीसोबत असल्याचे जाहीर केले आहे. बहुजन नेते छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविल्यास त्यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचे वंचित बहुजन आघाडीने जाहीर केले आहे. त्याच धर्तीवर आनंदराज आंबेडकर यांना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून पाठिंबा द्यावा, अशी मागणी सेना कार्यकर्त्यांनी करत यासाठी आघाडीच्या नेत्यांच्या भेट घेणार असल्याचे नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंगल.. नाईक कॉलेजचे स्नेहसंमेलन गुरुवारपासून

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वसंतराव नाईक महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवार ३१ जानेवारीपासून सुरू होत आहे. दोन दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठ लोककला विभागाचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होईल. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य राजाराम राठोड अध्यक्षस्थानी असतील. महोत्सवात 'मराठी एकांकिका', 'महाराष्ट्राची लोकधारा', 'गीत बहार' कार्यक्रम रंगणार आहेत. दुसऱ्या दिवशी १ फेब्रुवारी रोजी 'आनंद नगरी', 'नृत्यझंकार', 'अल्पोपहार', 'शेलापागोटे' यानंतर 'पारितोषिक वितरण'चा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला निवेदक प्रेषित रुद्रवार, संस्थेचे सचिव नितीन राठोड, प्राचार्य डॉ. मिलिंद उबाळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. स्नेहसंमेलन यशस्वितेसाठी साहेबराव गायकवाड, सीमा वडते, डॉ. संजय शिंदे, डॉ. कमलेश महाजन, डॉ. वीणा कांबळे, डॉ. बालाजी जोकरे, डॉ. सत्यजीत पगारे, डॉ. स्नेहलता अंकाराम, प्रा. गजानन हनवते, डॉ. वसंत सोनवणे, विद्यार्थी सचिव गजानन जाधव आदी पुढाकार घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमएचटी सीईटीसाठी ८४ हजार अर्ज

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अभियांत्रिकी, फार्मसी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) एमएचटी सीईटीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आजपर्यंत ८४ हजार ६१४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा संख्या वाढणार की, घटणार हे ३१ मार्चला स्पष्ट होणार आहे.

'सीईटी सेल'चे वेळापत्रक तंत्रशिक्षण विभागाने वेबसाइटवरही प्रसिद्ध केले. यंदा ऑनलाइन परीक्षा होणार असल्याने त्या दृष्टिकोनातून तयारी केली जात आहे. सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, नियमित शुल्कामध्ये २३ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत. विलंबशुल्कासह २४ ते ३१ मार्च या कालावधीत संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. यंदा प्रथमच ऑनलाइन सीईटी होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्सुकता आहे, मात्र, राज्यभरात किती विद्यार्थी नोंदणी करणार याबाबत तंत्रशिक्षण विभागही साशंक आहे. महिना अखेरपर्यंत ८४ हजार ६१४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केल्याची नोंद आहे. अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना २५ एप्रिल ते दोन मेपर्यंत त्यांच्या 'लॉग इन'वर हॉलतिकीट उपलब्ध करून घेता येणार आहे. दो मे ते १३ मेदरम्यान ऑनलाइन परीक्षा होणार आहे. यंदाचा निकाल हा पर्सेंटाईल पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. ऑनलाइन होणारी परीक्षा, पर्सेंटाईल पद्धतीने जाहीर होणारा निकाल यामुळे परीक्षेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

\Bअसे असेल परीक्षेचे वेळापत्रक\B

सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात परीक्षा होणार आहे. 'पीसीएम', 'पीसीबी' ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळच्या सत्रात परीक्षा असेल. परीक्षा केंद्रावर सकाळी साडेसातपासून प्रवेश दिला जाईल. पावणेनऊपर्यंत विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश दिला जाईल. विद्यार्थ्यांचे लॉगइन आठ वाजून ५० मिनिटांनी करण्यात येणार आहे. सुरुवातीचे दहा मिनिटे सूचना वाचण्यासाठी असतील. प्रत्यक्ष परीक्षेला नऊ वाजता सुरुवात होईल. ही परीक्षा १२ वाजता संपेल. दुसऱ्या सत्रात साडेबारापासून प्रवेश देण्यात येईल. प्रवेशाची मुदत पावणेदोनपर्यंत असेल. एक वाजून ५० मिनिटांनी लॉगइन दिले जाईल आणि दोन वाजता पेपर सुरू होईल. ही परीक्षा पाचपर्यंत चालेल. 'पीसीएमबी'च्या विद्यार्थ्यांसाठी सका‌ळी साडेसात ते पावणेनऊ यादरम्यान प्रवेश दिला जाईल. आठ वाजून ५० मिनिटांनी लॉग इन केले जाईल. नऊ वाजता प्रत्यक्ष परीक्षेला सुरुवात होईल. दुपारी १२पर्यंत ही परीक्षा होईल. त्यानंतर १५ मिनिटे वर्गात बसून रहावे लागेल. त्यानंतर सव्वाबारा ते पाऊण यावेळेत दुसरा पेपर होईल. दुपारच्या सत्रात साडेबारा ते पाऊण यादरम्यान प्रवेश दिला जाईल. दुपारी एक वाजून ५० मिनिटांनी लॉग इन केले जाईल. त्यानंतर दुपारी दोन ते पाच यावेळे पेपर होईल. १५ मिनिांच्या विश्रांतीनंतर सव्वापाच ते पावणेसात यावेळेत दुसरा पेपर होईल. 'पीसीएम', 'पीसीबी'साठी १८० मिनिटे तर, 'पीसीएमबी' ग्रुपसाठी २७० मिनिटांचा कालावधी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात होतात बालविवाह

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात १८ वर्षांखालील मुलींची लग्न लावली जात असल्याचा खळबळजनक दावा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मंगळवारी केला. देवगिरी कॉलेजमध्ये आयोजित 'फुले-शाहू-आंबेडकर' व्याख्यानमालेत ते बोलत होते.

देवगिरी कॉलेजर्फे आयोजित व्याख्यानमालेत दुसरे पुष्प डॉ. भापकर यांनी गुंफले. कॉलेजच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अॅड. लक्ष्मणराव मनाळ, प्राचार्य डॉ. शिवाजी थोरे, उपप्राचार्य, संयोजक डॉ. अनिल आर्दड यांची प्रमुख उपस्थिती होती. 'प्रशासन : सामाजिक उत्थानाचे प्रभावी साधन' विषयावर पुढे विभागीय आयुक्त डॉ. भापकर म्हणाले, 'मराठवाड्यात फिरताना असे पाहतो की, १८ वर्षांखालील कितीतरी मुलींची लग्न होतात. १८ वर्षांखालील अनेक मुली माता होत आहेत. त्यांचे आरोग्य कसे चांगले राहिल. असे विवाह थांबविण्यासाठी अनेक कार्यक्रम आहेत मात्र, ते कार्यक्रम यशस्वी होत नाहीत. मानव विकासाचे अनेक कार्यक्रम आपले सुरू आहे. मानवी विकासाचा निर्देशांक वाढविण्यासाठी अशा उपक्रमांना बळ देण्याची गरज आहे. प्रशासकीय कामात मी, असे अनेक मानसे पाहिली की, त्यांना त्यांच्या कामात आवड नाही. प्रवृत्ती, धारणा अशा प्रकारची असेल तर हे योग्य नाही. सामाजिक उथ्थानाची जबाबदारी जी माझ्या खांद्यावर आहे, त्यामधल्या कोणत्या गोष्टी मी पाहिल्या पाहिजेत हे अधिकाऱ्यांनी पहायला हवे.'

मराठवाड्यात १५ लाख शौचालय

'स्वच्छ भारत मिशन' मराठवाडा वगळता इतर भागांमध्ये शौचालयांची कामे पूर्ण झाली होती. येथे आलो, तर येथील अवस्था पाहिली आणि या मिशनअंतर्गत आपण कामाला सुरुवात केली आणि मराठवाड्यात दीड वर्षात १५ लाख शौचालय बांधली त्यामुळे महाराष्ट्र हागणदारी मुक्त होऊ शकला, असा दावाही आयुक्त डॉ. भापकर यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत बाळ दगावले, डीनला नोटीस

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

शासकीय वैद्यकिय रुग्णालयात (घाटी) लिप्ट बंद असल्याने तसेच स्ट्रेचर नसल्याने उपचारासाठी गर्भवती महिलेला जिना चढावा लागला होता. दरम्यान महिला प्रसूत झाल्याने २२ जानेवारी रोजी फरशीवर बाळ पडून दगावले होते. यासंदर्भात सादर केलेल्या जनहित याचिकेत घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन), औरंगाबाद विभागाच्या उपसंचालकांसह (वैद्यकीय सेवा) इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे व न्या. आर. जी. अवचट यांनी दिले.

२२ जानेवारीला महिला प्रसूत होऊन बाळ फरशीवर पडून दगावल्याची घटना घडली होती. त्याअनुषंगाने इटखेड्यातील किशोर गायकवाड यांनी खंडपीठात जनहित याचिका केली. याचिकेत २२ जानेवारी रोजीच्या घटनेची खंडपीठातील निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करून दोषी अधिकारी, डॉक्‍टर यांच्यावर कारवाई करावी. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका, नगरपालिका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी आवश्‍यक त्या सोयीसुविधा पुरवाव्यात, तसेच वैद्यकीय सुविधा (औषधी) पुरवण्यात शासनाने कृती अहवाल तयार करून खंडपीठात सादर करावा, अशा रुग्णालयात वैद्यकीय सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी पब्लिक हेल्थ अक्रिडेशन बोर्ड स्थापन करावे जेणेकरून वैद्यकीय सेवांचा दर्जा सुधारेल व वंचितांना त्याचा फायदा मिळेल असे म्हणणे मांडण्यात आले.

\Bवैद्यकीय सेवा मिळणे मुलभूत अधिकार

\Bजसा जगण्याचा मूलभूत अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे तसा राज्यघटनेच्या परिच्छेद २१ नुसार प्रत्येक नागरिकाला वैद्यकीय सेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. प्रकरणात याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली असता खंडपीठाने राज्याचे मुख्य सचिव, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व या खात्याचे सचिव, राज्याचे वैद्यकीय सेवा संचालक, उपसंचालक (वैद्यकीय सेवा औरंगाबाद विभाग) तसेच घाटीच्या अधिष्ठाता यांना नोटीस बजावली. पुढील सुनावणीपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्याची बाजू नितीन गवारे यांनी मांडली. या याचिकेची सुनावणी पाच फेब्रवारी रोजी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्या रिक्षांवर कारवाईच नाही…

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील रिक्षाचालकांमध्ये शिस्त लागावी, नियमानुसार रिक्षा चालविल्या जाव्यात यासंदर्भात सातत्याने प्रशासनाकडे मागणी केली जाते. विविध रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी 'बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करावी,' 'विना परवाना असलेल्या ७०२ नवीन रिक्षांवर कारवाई करावी,' ' रिक्षाच्या मागच्या बाजूला प्रवासी बसून नेले जात आहेत, ' अशांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. मात्र त्यावर अजूनही प्रभावी कारवाई करण्यात आलेली नाही.

शहर पोलिस आयुक्तालयात रिक्षा संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच झाली. पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी उपस्थित होते. शहरात स्मार्ट सिटीची शहर बस सेवा सुरू झाली. ही बस सेवेत रिक्षांचा व्यत्यय नको. याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांना सूचना दिल्या. रिक्षा चालक म्हणाले, की आमचा महापालिका किंवा एसटी महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या शहर बस सेवेला विरोध नाही. विरोध करणाऱ्यांवर पोलिसांनी थेट कारवाई करावी. मात्र अवैध रित्या शहरात चालणाऱ्या रिक्षांबाबत कारवाई करावी, अशी मागणी रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. बैठकीत निसार अहेमद खान,नागरे पाटील,राजू देहाळे, सोनवणे बिसन लोधे, शेख लतिफ, इमरान खान ,शेख मोहसीन, रामदास वाघ, गजेंद्र काळे ,शेख नजीर अहेमद आदी रिक्षा चालक संघाचे पदाधिकारी हजर होते.

पोलिस प्रशासनाकडे शहरात विनापरवाना चालणाऱ्या ७०२ रिक्षांची यादी देण्यात आली. या विना परवाना रिक्षातून होत असलेल्या वाहतुकीमुळे प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ शकतात, अशी शंका व्यक्त करण्यात आली. या मागणीनंतर शनिवारी २२ रिक्षांवर कारवाई करण्यात आली. यानंतर मात्र कारवाई पुन्हा थांबल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

……

आरटीओ आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही बैठकीत बोलवा

पोलिस अधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीत रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आले होते. मात्र या बैठकीसाठी आरटीओ आणि महापालिका अधिकारी गैरहजर होते. या अधिकाऱ्यांनाही बैठकीत बोलवा म्हणजे समस्या मांडता येतील, अशी सूचना रिक्षा चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

……

शहर बसला आमचा विरोध नाही. अवैध रिक्षांवर कारवाई झाल्यास, बेकायदा विना परवाना रिक्षा चालविणाऱ्यांवर कारवाई केल्यास याचा फायदा शिस्तीत रिक्षा चालविणाऱ्या रिक्षा चालकांना होणार आहे. पोलिस आणि आरटीओ प्रशासनाने ही कारवाई करावी.

निसार अहेमद, अध्यक्ष रिक्षा चालक संघटना

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी उपअभियंता, शाखा अभियंत्यांच्या बदल्या केल्या. शासकीय अनुदान प्रकल्प विभागाचे उपअभियंता एस. डी. काकडे यांची बदली वॉर्ड आठचे वॉर्ड अभियंता म्हणून करण्यात आली. शाखा अभियंता एम. एम. खान यांची बदली वॉर्ड अभियंता वॉर्ड क्रमांक आठमधून वॉर्ड अभियंता वॉर्ड क्रमांक दोन पदावर करण्यात आली आहे. शाखा अभियंता फारूख खान यांची बदली वॉर्ड क्रमांक दोनचे वॉर्ड अभियंता या पदावरून प्रभारी उपअभियंता शासन अनुदान प्रकल्प या विभागात करण्यात आली आहे. महिला बालकल्याण अधिकारी, मालमत्ता अधिकारी सविता खरपे वैद्यकीय रजेवर गेल्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या पदांचा अतिरिक्त कार्यभार आयुक्तांनी दोन अधिकाऱ्यांना वाटून दिला आहे. विधी सल्लागार अपर्णा थेटे यांच्याकडे महिला बालकल्याण समितीचे अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. दक्षता कक्षाचे शाखा अभियंता डी. जी. निकम यांच्याकडे मालमत्ता अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जप्त मालमत्तांचा आता करणार लिलाव

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालमत्ता कर वसुलीसंदर्भात महापालिका आता कठोर धोरण अंमलात आणण्याच्या तयारीत आहे. थकित मालमत्ता करापोटी आता मालमत्तांची केवळ जप्ती करू नका, जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करा, असे आदेश आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आयुक्त डॉ. विनायक यांनी मालमत्ता कराच्या वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. दिवाळीच्या सुमारास महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी सात दिवसांची विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी ११ कोटी रुपये जमा झाले होते. त्यानंतर आता १२ जानेवारी ते ३१ जानेवारी यादरम्यान विशेष वसुली मोहीम हाती घेण्यात आली, पण या मोहिमेला फारच कमी प्रतिसाद मिळाला आहे. २७ जानेवारीपर्यंत फक्त साडेचार कोटी रुपयांचा कर या मोहिमेच्या माध्यमातून गोळा झाला. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि मालमत्ता कर वसुलीच्या कामाचा आढावा घेतला. बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश त्यांनी यापूर्वीच दिले आहेत. आता मालमत्ता जप्त करून थांबू नका. जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करा, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात मालमत्ता कर वसुलीची मोहीम अधिक कठोरपणे राबवली जाईल, असे मानले जात आहे.

चालू आर्थिक वर्षात ४५० कोटी रुपये मालमत्ता कराच्या माध्यमातून वसुल करण्याचे उद्दिष्ट आहे, परंतु आतापर्यंत फक्त १७ टक्के वसुली झाली आहे. मार्च अखेरपर्यंत वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याचे आव्हान महापालिकेच्या यंत्रणेसमोर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते यादी तयार करण्याचे अधिकार महापौरांना

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सव्वाशे कोटींच्या रस्त्यांची यादी तयार करण्याचे अधिकार महापौरांना देण्यात आले आहेत. येत्या दोन - तीन दिवसांत रस्त्यांची यादी तयार केली जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील रस्त्यांच्या कामासाठी सव्वाशे कोटींचा विशेष निधी देण्याची घोषणा केली आहे. सव्वाशे कोटींमधून कोणत्या रस्त्यांची कामे करायची या बद्दल गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत खल सुरू आहे. रस्त्यांच्या यादी संदर्भात मंगळवारी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. नगरसेवकांकडून अनेक रस्त्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी शंभर रस्ते महत्वाचे वाटतात. सव्वाशे कोटींमधून यापैकी किती रस्त्यांची कामे करता येतील याचा अभ्यास करून येत्या दोन - तीन दिवसात रस्त्यांची यादी तयार केली जाईल, असे महापौरांनी सांगितले. रस्त्यांची यादी अंतिम करण्याचे अधिकार सर्व पदाधिकाऱ्यांनी महापौरांना दिले आहेत, असा उल्लेख त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुरेशी समाजाच्या विरोधानंतर पडेगावमध्ये आज स्थळ पाहणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्राच्या जागेला कुरेशी समाजाने विरोध केल्यानंतर पालिकेचे अधिकारी संबंधित जागेची बुधवारी (३० जानेवारी) स्थळपाहणी करणार आहेत.

कचराकोंडीला येत्या १६ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण होणार आहे. एक वर्षाच्या काळात कचराकोंडी फोडण्यासाठी महापालिकेच्या समोर विविध समस्या निर्माण झाल्या. अद्यापही या समस्या सुटलेल्या नाहीत. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी संनियंत्रण समितीने चिकलठाणा, हर्सबल, पडेगाव आणि कांचनवाडी येथील जागा निश्चित केल्या. यापैकी आतापर्यंत फक्त चिकलठाणा येथील जागेवरच कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम सुरू झाले आहे. हर्सूल येथील जागेवर अद्याप काम सुरू झाले नाही. पडेगाव येथील जागेवर काम सुरू करण्यात आले होते, पण नागरिकांच्या विरोधामुळे महापालिकेला ते काम बंद करावे लागले. नागरिकांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टाने नागरिकांचे म्हणणे फेटाळून लावले. त्यानंतर महापालिकेने काम सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला तेथील कुरेशी समाजाने विरोध केला. प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार असलेली जागा महापालिकेने कुरेशी समाजाच्या दुकानांसाठी दिली आहे, असा त्यांचा आक्षेप आहे. यासंदर्भात मंगळवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी कुरेशी समाजाच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली. त्यानंतर त्या जागेची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवारी अधिकारी पडेगावच्या जागेची पाहणी करणार आहेत. दक्षता कक्षप्रमुख एम. बी. काजी, घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे, उद्यान अधीक्षक विजय पाटील स्थळ पाहणी करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफाई कर्मचाऱ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले. महापालिका, वर्ल्ड टॉयलेट महाविद्यालय, आयएल अँड एफएस स्किल ट्रेनिंग यांच्यातर्फे या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. २८ जानेवारी ते एक फेब्रुवारी यादरम्यान महापालिकेच्या सरदार करमसिंग ओबेरॉय सभागृहात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. स्किल ट्रेनर परवेज खान यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. झोन क्रमांक तीन व सातच्या सुमारे ११० कर्मचाऱ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिले. दैनंदिन जीवनाबद्दल व साफसफाईबद्दल कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. रागावर नियंत्रण कसे ठेवायचे याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छतेची गरज या बद्दलही कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. एकूण पाच सत्रांत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद दिल्ली विमान प्रवास फक्त २१०५ रूपयांत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

औरंगाबाद ते दिल्ली जाणाऱ्या सचखंड एक्सप्रेसमध्ये एसी टू टिअरच्या रक्कमेत औरंगाबाद दिल्लीसाठी विमान प्रवासाची संधी उपलब्ध झालेली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त एअर इंडिया कंपनीने विशेष योजना जाहीर केले आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशांतर्गत आणि विदेशी विमान प्रवासासाठी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. एअर इंडिया कंपनीकडून २६ जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान एप्रिल महिन्याच्या नंतर विमान प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांसाठी ही योजना जाहीर केली गेली. देशांतर्गत विमान प्रवासासाठी ९७९ रूपये प्रतिप्रवासी दर जाहीर करण्यात आला. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी ७५०० रूपये 'रिटर्न फेअर' देण्यात आले. यात विविध करांचा समावेश करण्यात आला.

ही सवलत जाहीर केल्यामुळे औरंगाबाद ते दिल्लीचा प्रवास हा रेल्वेच्या एसी टू टिअरच्या दरात होत आहे. या प्रवासासाठी प्रतिव्यक्ती २२७५ रूपये लागतात. तर औरंगाबाद ते दिल्ली एअर इंडियाच्या विमान प्रवासासाठी २१०७ रूपये लागणार आहेत. देवगिरी एक्सप्रेसने औरंगाबाद ते मुंबई पर्यंत प्रवास केल्यास टू टिअरसाठी ९०० रूपये तर एसी फर्स्टसाठी १५१० रूपये मोजावे लागतात. तर एअर इंडियाच्या औरंगाबाद ते मुंबई पर्यंत विमान प्रवासासाठी सवलत योजनेंतर्गत १३७० रूपये असे दर प्रती व्यक्ती आकारण्यात येत आहे. योजनेला प्रतिसाद मिळत असल्याने सवलतीची योजना ३१ जानेवारी पर्यंत वाढविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात या देशांतर्गत विमान प्रवासासाठी तिकीट बुकींग केल्यास, विमान प्रवासाच्या नियमित दरापेक्षा पन्नास टक्के कमी दराने विविध विमान कंपन्यांनी विमान तिकीट विक्री सुरू केली आहे. या योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती एअर इंडियाचे औरंगाबाद व्यवस्थापक अजय भोळे यांनी दिली.

जेट एअरवेजला ५० टक्केची सूट

एअर इंडियासह जेट एअरवेजनेही प्रजासत्ताक दिनानिमित्त 'रिपब्लिकन सेल' अशी योजना जाहीर केली आहे. ही योजना २४ जानेवारी २०१९ पासून सुरू करण्यात आली. ३० जानेवारी पर्यंत विमान तिकिट विकत घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात ५० टक्केची सवलत असणार आहे. देशांतर्गत विमान प्रवासासाठी ही सवलत देण्यात आली असून १ फेब्रुवारी नंतरच्या प्रवास करण्यासाठी ही सवलत देण्यात आली असल्याची माहिती जेट एअरवेज कंपनीकडून देण्यात आली . आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाठीही सवलत जाहीर करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images