Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

स्तनाच्या ७० टक्के गाठी कॅन्सरच्या नव्हेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्तन कर्करोगाच्या जनजागृतीचा अतिरेक होत असून, ब्रेस्ट कॅन्सरचा बागलबुवा उभा राहात आहे. त्यामुळे लोकांमध्ये मोठी भीती असून, भीतीपोटी आणखी वेगळे त्रास होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. खरे म्हणजे स्तनाच्या ७० टक्के गाठी या कर्करोगाच्या नसतातच, हे आधी महिलांनी लक्षात घेतले पाहिजे, असे मत 'असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया'चे भावी नियोजित अध्यक्ष डॉ. पी. रघुराम यांनी मॅसिकॉन परिषदेत व्यक्त केले आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या अतिरेकी जनजागृतीकडेही लक्ष वेधले.

'मॅसिकॉन परिषद २०१९'मधील निरंतर वैद्यकीय शिक्षण (सीएमई) सत्राचे उद्घाटन गुरुवारी (३१ जानेवारी) एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात झाले. या वेळी एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, 'सर्जन्स ऑफ इंडिया'चे राज्य शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रताप वरुटे व डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. सतीश धारप, महाराष्ट्र शाखेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. उमेश भालेराव, उपाध्यक्ष डॉ. रॉय पाटणकर, संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. मिलींद देशपांडे, सचिव डॉ. राजेंद्र शिंदे, औरंगाबाद सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विकास देशमुख, मानद सचिव डॉ. निखील चौहान यांची उपस्थिती होती. परिषदेच्या पहिल्या दिवशी व्याख्याने, चर्चासत्रे व परिसंवाद झाले. 'डायबेटिक फुट'वरील परिसंवादासाठी डॉ. मिलिंद रुके हे निमंत्रक होते, तर डॉ. सिद्धार्थ दुभाषी, डॉ. सुनील करी व डॉ. तुषार रेगे यांनी परिसंवादात सहभाग नोंदवला. 'ट्रॉमा केस कॅप्सुल'वरील चर्चासत्रात निमंत्रक डॉ. सतीश धारप यांनी, आपत्कालिन परिस्थितीत रुग्ण लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचला पाहिजे आणि सक्षम डॉक्टरांकडून असा रुग्ण हाताळला गेला पाहिजे तेव्हाच रुग्ण वाचण्याची व बरा होण्याची शक्यता अधिकाधिक वाढेल, असे मत नोंदविले. डॉ. विजय शिवपुजे, डॉ. गिरीश बक्षी आणि डॉ. ए. एम. कुरेशी यांचा चर्चासत्रात सहभाग होता. या व्यतिरिक्त सौम्य स्तनविकारावरील चर्चासत्रात डॉ. अनघा अवरुडकर, डॉ. मीनाक्षी येवला, डॉ. अंजली डावले, डॉ. वर्षा रोटे-कागीनाळकर व डॉ. अरुणा कराड यांचा सहभाग होता, तर डॉ. रघुराम निमंत्रक होते. परिषदेसाठी डॉ. शिंदे, डॉ. सूर्यवंशी, डॉ. देशपांडे, संयोजन प्रमुख डॉ. पुरुषोत्तम दरख, कोषाध्यक्ष डॉ. भास्कर मुसांडे, वैज्ञानिक समिती अध्यक्ष डॉ. नुसरत फारुकी, डॉ. देशमुख, डॉ. केदार साने, डॉ. चौहान, डॉ. अन्सारी आदींनी पुढाकार घेतला.

\Bअर्थपूर्ण संशोधनासाठी एकत्र यावे

\Bदैनंदिन जीवनात उपयोग होईल अशा अर्थपूर्ण संशोधनासाठी डॉक्टर, इंजिनिअर व बायोटेक्नॉलॉजिस्ट यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे मत एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम यांनी परिषदेच्या उद्घाटनावेळी व्यक्त केले. या प्रसंगी डॉ. रघुराम यांनी परिषदेला शुभेच्छा देताना 'सर्जन्स ऑफ इंडिया'च्या २०१९ ते २०२१ या कालावधीच्या दृष्टीकोन विधानाबद्दल उपस्थितांना अंतर्मुख केले.

\Bआज 'मीट द एक्स्पर्ट'

\Bपरिषदेत शुक्रवारी शस्त्रक्रियांची प्रात्याक्षिके होतील आणि दुपारी तीन ते साडेचार या वेळेत 'मीट दी एक्स्पर्ट' हा कार्यक्रम द्योतन हॉलमध्ये होणार असून, कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टर आम्लपित्त व बद्धकोष्ठता या विषयावर जनसामान्यांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वे मार्ग दुहेरीकरण रद्द होणे हा मराठवाड्यावर अन्याय

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

परळी वैजनाथ ते नगर नवीन रेल्वे मार्ग आणि दौंड मनमाड रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण होत आहे. यामुळे मनमाड-औरंगाबाद-परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरण रद्द करण्यात आले आहे. ही माहिती माहितीच्या अधिकारामध्ये उघड झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी हा निर्णय म्हणजे मराठवाड्यावर अन्याय असल्याची प्रतिक्रिया 'मटा'ला दिली.

मनमाड-परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणाबाबत दक्षिण मध्य रेल्वेच्या तत्कालिन महाव्यवस्थापकांनी प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविल्याची माहिती दिली होती. हा रेल्वे मार्ग मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने तो मंजूर होईल, असे सांगण्यात आले होते. केंद्र शासनाकडे बुलेट ट्रेन चालवायला पैसे आहेत. महत्त्वाच्या रेल्वे मार्गासाठी नाहीत का? हा मराठवाडयावर अन्याय आहे. मनमाड ते परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी मी पाठपुरावा करणार आहे. उद्याच्या अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गासाठी निधी जाहीर नाही झाला तर लोकसभेत रेल्वेमंत्र्यांना जाब विचारणार आहे.

चंद्रकांत खैरे, खासदार, औरंगाबाद

रेल्वेबाबत मराठवाड्यावर नेहमीच अन्याय होत आलेला आहे. हा अन्याय आताही सुरू आहे. ही मागणी गेल्या २५ वर्षांपासूनची आहे. हाच रेल्वे मार्ग जर नागपुरात असला असता तर चार रेल्वे लाइन झाल्या असत्या. संसदेत आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारे लोकप्रतिनिधी फक्त निवेदन देण्यात व्यस्त आहेत.

सतीश चव्हाण, आमदार, पदवीधर मतदार संघ, मराठवाडा

मनमाड ते परभणी हा रेल्वे मार्ग आवश्यक आहे. सिंगल लाईनमुळे रेल्वे उशिराने धावत आहेत. यामुळे या मार्गावर विशेष रेल्वेही दिल्या जात नाही. हा रेल्वे मार्ग दुहेरी झाला असता, तर औरंगाबाद सह मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांचाही विकास झाला असता. यामुळे पर्यटन, औद्योगिक क्षेत्राचा विकास झाला असता. आताही वेळ गेलेली नाही. यासाठी प्रभावीरित्या प्रयत्न करण्याची गरज आहे.

इम्तियाज जलील, आमदार, मध्य

मनमाड ते परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचा विषय अनेक वर्षापासून पेंडिंग आहे. याबाबत आमच्या पक्षाकडूनही प्रयत्न सुरू आहेत. या रेल्वे मार्गाचा विचार करून यासाठी निधी आणण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांनी एकत्र यावे.

संजय शिरसाठ, आमदार, पश्चिम

मराठवाड्याच्या महत्त्वाच्या या रेल्वे मार्गासाठी आमच्या पक्षाकडून आम्ही जोरदार प्रयत्न करू. मात्र पीटलाईनचा विषय असो की दौलताबाद चाळीसगाव रेल्वे मार्गाचा विषय असो. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे हे जिल्ह्यातील रेल्वे मार्गाचा विकास करण्यात अपयशी ठरत आहेत. आम्ही पियुष गोयल यांना भेटून याबाबत पाठपुरावा करू.

डॉ. भागवत कराड, अध्यक्ष, मराठवाडा विकास मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४५ हजारांची बॅग केली परत

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाची विसरलेली ४५ हजारांची बॅग पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्याने परत केली. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल पर्यटकांनी आभार मानत कौतुक केले.

केरळ येथील पर्यटक जेम्स थॉमस हे गुरुवारी आपल्या सहकाऱ्यांबत वेरुळ येथील बुद्ध लेणी पाहण्यासाठी आले होते. दुपारी दोन वाजता लेणी क्रमांक दहा जवळ थॉमस यांनी हातातील बॅग ठेवली आणि ती घेण्यास ते विसरले. इतर लेणी पाहाताना बॅग कुठेतरी विसल्याचे थॉमस यांच्या लक्षात आले. त्यावेळी कर्तव्यावर असणारे पुरातत्व विभागाचे कर्मचारी कचरू जाधव यांना एक बेवारस बॅग दिसली. नंतर त्यांनी ही बॅग कोणाची, अशी विचारपूस सुरू केली. बॅगवर कोणीही दावा न केल्याने जाधव यांनी संबंधित बॅक स्वत:कडे सुरक्षित ठेवून दिली. दुसरीकडे थॉमस हे आपली बॅग शोधत होते. ते दहा क्रमांकाच्या लेणीजवळ पोहोचले. त्यांनी पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे विसलेल्या बॅगविषयी चौकशी केली. तेव्हा जाधव यांनी ओळख पटवून थॉमस यांच्याकडे बॅग सुपूर्द केली. त्यांनी आपली बॅग उघडून पाहिली असता त्यात ४५ हजार रुपये सुरक्षित होते. थॉमस यांनी जाधव यांचे आभार मानले आणि पुढील प्रवासास निघून गेले. संवर्धन सहाय्यक आर. यू. वाकळेकर व सहकारी कर्मचाऱ्यांनी जाधव यांच्या प्रामाणिकपणाबद्दल अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्जन्समध्ये सर्वोत्कृष्टता वृद्धींगत करण्याचे ध्येय

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'रुग्णांची सुरक्षितता वाढवणे, शल्यचिकित्सकांचे कौशल्य विकसित करणे, पूर्णत: डिजिटल व्यवहाराला प्राधान्य देणे, संख्यात्मकदृष्ट्या प्रभावी बनणे आणि दर्जेदार रुग्णसेवेसाठी धोरणाची अंमलबजावणी करणे या प्रमुख पाच वैशिष्ट्यांबरोबर देशभरातील शल्यचिकित्सकांत सर्वोत्कृष्टता अधिकाधिक वृद्धींगत करणे, हेच 'असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया'चे (एएसआय) ध्येय आहे,' असे प्रतिपादन 'एएसआय'चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अरविंद कुमार यांनी 'मॅसिकॉन' राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केले.

या परिषदेला गुरुवारपासून (३१ जानेवारी) सुरुवात झाली असून तिचे औपचारिक उद्घाटन शुक्रवारी (एक फेब्रुवारी) एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. कुमार यांनी शल्यचिकित्सकांना 'एक्सलन्स'कडे वाटचाल करण्याची दिशा दिली. याप्रसंगी 'एएसआय'चे माजी अध्यक्ष डॉ. दिलीप गोडे, एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, विश्वस्त अंकुशराव कदम, परिषदेचे आश्रयदाते आणि एमजीएमचे उपअधिष्ठाता, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण सूर्यवंशी, 'एएसआय'चे राज्य सचिव डॉ. उमेश भालेराव, डॉ. रॉय पाटणकर, डॉ. सतीश धारप, डॉ. मिलिंद देशपांडे, डॉ. शशांक दळवी, डॉ. भास्कर मुसांडे आदींची मंचावर उपस्थिती होती.

डॉ. अरविंद कुमार म्हणाले, हॉस्पिटलमध्ये होणारा जंतुसंसर्ग व गुंतागुंत कमी करणे, प्रतिजैविकांचा वापर कमी करणे व रुग्णांच्या समाधानाची पातळी उंचावणे गरजेचे आहे. त्यासोबतच शल्यचिकित्सकांच्या कालबाह्य कौशल्यांना आधुनिक कौशल्यांची जोड देणे, सॉफ्ट स्किल्स वाढवणे, पेपरलेस सोसायटीकडे वाटचाल करणे हे संघटनेचे उद्दिष्ट आहे. सध्या संघटनेचे देशात २३ हजार सदस्य आहेत; पण देशात ५० हजारांवर शल्यचिकित्सक असल्याने संघटनेची ताकद वाढवण्यासाठी संख्या वाढवणे गरजेचे आहे. परिषदेतील 'सायन्टिफिक सेशन्स'चा गौरव करत परिषदेसाठी महाराष्ट्र शाखेने व डॉ. सूर्यवंशी यांच्या सहकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. गोडे यांनी वैद्यकीय संशोधन वाढवण्याची गरज व्यक्त केली. वैद्यकीय क्षेत्रात दर्जेदार व उपयुक्त संशोधन होत नसल्याची खंत व्यक्त करीत, हल्ली पैसे देऊन रिसर्च पेपर छापून देणारी मासिकेही उदयास आल्याचे डॉ. जाधव म्हणाले. परिषदेला रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद मिळाल्याचे डॉ. सूर्यवंशी म्हणाले, तर डॉ. राजेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. याच परिषदेत संघटनेची विविध पारितोषिकेही देण्यात आली.

\Bएकही रुग्ण न पाहता 'पीजी'ला

\Bअलिकडे वैद्यकीय विद्यार्थी कसे आहेत, याचे उदाहरण देताना डॉ. जाधव म्हणाले, एक रेसिडेन्ट सहा-सात दिवसांपासून अपघात विभागात ड्युटीला येत नसल्याची तक्रार माझ्याकडे आली होती. संबंधित एमडी-मेसिसिन करणाऱ्या विद्यार्थ्यास जाब विचारला. 'तू रुग्ण का तपासत नाहीस, त्याशिवाय अनुभ‌व कसा मिळेल,' असे विचारल्यावर तो विद्यार्थी म्हणाला, 'मी आजपर्यंत एकही रुग्ण तपासला नाही.' एमडी-मेडिसिन करणाऱ्याचे ते उत्तर माझ्यासाठी धक्कादायक होते, असे डॉ. जाधव म्हणाले. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी २६ शस्त्रक्रिया झाल्या. यात एका कोरियाच्या डॉक्टरने कर्करोगाची शस्त्रक्रिया केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छाजेड हल्लाप्रकरणी पोलिस अजूनही अंधारात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उद्योजक छाजेड कुटुंबावरील हल्ल्यास दोन दिवस उलटले असून पोलिसांना अद्याप हल्लेखोराचा माग काढता आलेला नाही. दरम्यान हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हल्ल्यामागील कारणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

जालना रोडवरील रामदासनगर येथील पारस छाजेड यांच्या आकांक्षा बंगल्यात बुधवारी रात्री घुसून हल्लेखोराने हल्ला केला होता. यामध्ये पारस छाजेड, त्यांची पत्नी शशिकला छाजेड आणि नातू पार्थ छाजेड जखमी झाले आहेत. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेला आहे. त्याच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. तपास पथकांनी शुक्रवारी जालना रोडवरील स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. जॅकेट घातलेल्या एका संशयिताचे फुटेज मिळाले असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच या भागात गेल्या काही दिवसापासून फिरत असलेल्या संशयितांचा देखील शोध घेण्यात येत आहे.

\Bजुन्या प्रकरणाची देखील चौकशी\B

दोन वर्षांपूर्वी आशिष छाजेड याने पिता-पुत्रांवर ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींचे ९५ लाख रुपये असलेले बँक खाते पोलिसांच्या सांगण्यावरून सिल करण्यात आले होते. या प्रकरणाचा छाजेड यांच्यावर झालेल्या हल्ल्याशी काही सबंध आहे का याचा देखील तपास करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कृषी क्षेत्रात प्रयोगशिलता महत्त्वाची’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कृषी क्षेत्रात प्रयोगशिलता महत्त्वाची असून कृषी प्रदर्शनाला भेटी द्या, वेळ काढा आणि प्रयोगशील व्हावा. पाण्याचा वापर काटकसरीने करा,' असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, मराठवाडा शेती सहाय्य मंडळ, सीडस् इंडस्ट्रिज असोसिएशन, कृषी विभाग तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज अॅग्रीकल्चर असोसिएशनतर्फे आयोजित 'महा अॅग्रो' पाचव्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे चार दिवसांचे प्रदर्शन पैठण रोडवरील कृषी तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शन व पीक प्रात्यक्षिकाचे उद्घाटन बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार सतीश चव्हाण, कुलगुरू डॉ. अशोक ढवण, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जगन्नाथ काळे, मुख्य समन्वयक अॅड. वसंत देशमुख, उमेश दाशरथी, विजय अण्णा बोराडे आदी उपस्थित होते.

'नवतंत्रज्ञान, नवे वाण, नवीन योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी कृषी प्रदर्शन महत्त्वाचे ठरते. कीर्तनच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी असते. पण, अशा प्रदर्शनाला आले की जबाबदारी अंगावर येते. प्रयोग करा किंवा करू नका पण वेळ काढून अधिक संख्येने प्रदर्शनात या, ही माहिती इतरांनाही सांगा,'असे आवाहन बागडे यांनी केले. शेताचे क्षेत्र कमी कमी होत असल्याने कमी जागेत जास्त उत्पन्न कसे घेता येईल, यावर भर द्यावा,असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान पीक विमा योजनेसह विविध शासकीय योजनांचा शेती क्षेत्र व शेतकऱ्यांना कसा फायदा होत आहे, यांची माहिती त्यांनी भाषणातून दिली.

आमदार चव्हाण म्हणाले की, १९७२ पेक्षा भीषण दुष्काळ असून औरंगाबाद हे दुष्काळाची राजधानी झाले आहे. पैठण रोडवरील जिल्हा परिषदेची जागा कृषी विद्यापीठांकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी त्यांनी केली. 'शेती म्हणजे केवळ शेतीमाल उत्पादन करण्यापुरताच मर्यादित विषय नसून शेतकऱ्यांला सन्मानाचे जीवन जगता आले पाहिजे यासाठी सार्वत्रिक प्रयत्नाची गरज आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे. त्यासाठी शेतमालाच्या बाजार पेठेतील दोष दूर करणे, ती बळकट करणे, प्रक्रिया, मुल्यवर्धन करणे, मध्यस्ताची साखळी मोडून काढणे, आदी प्रयत्नाची गरज आहे,' असे मत कुलगुरू डॉ. ढवण यांनी व्यक्त केले.

\Bप्रदर्शनाला गर्दी

\B

प्रदर्शनात विविध प्रकारचे १७५ स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यात बियाणे, लागवड तंत्रज्ञान, कीड नियंत्रण, शेतमाल विपणन, शेतीपूरक उद्योग, यासह आधुनिक तंत्रज्ञान यांची माहिती दिली जात आहे. शेती पीक प्रात्यक्षिक पाहण्याची संधीही यानिमित्ताने करून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन दिवसांत सव्वा कोटींची वसुली

0
0

(अँकर करणे. फाइल फोटो वापरणे)

औरंगाबाद : वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांविरोधात राबविलेल्या धडक मोहिमेत महावितरणने औरंगाबाद शहरात गेल्या तीन दिवसांत सव्वा कोटी रुपये वसूल केले आहेत. थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ८४० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी ही माहिती दिली.

वीजबिल थकबाकीदारांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश २८ फेब्रुवारीला शहरातील सर्व ८ उपविभागीय अभियंत्यांना देण्यात आले होते. त्यानंतर शहर मंडलातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी २९ ते ३१ जानेवारी या तीन दिवसांत धडक मोहीम राबविली. यात औरंगाबाद शहर-१ विभागातील १५३४ ग्राहकांनी ६२ लाख ४१ हजार रुपये भरले तर औरंगाबाद शहर-२ विभागातील १३१८ ग्राहकांनी ६१ लाख २ हजार रुपये भरले. तर ७२ लाख ९३ हजार रुपयांच्या थकबाकीपोटी औरंगाबाद शहर-१ विभागातील ४४५ ग्राहकांचा व ४२ लाख ३१ हजार रुपयांच्या थकबाकीपोटी औरंगाबाद शहर-२ विभागातील ३९५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. औरंगाबाद शहर विभागाचे अधीक्षक अभियंता बिभिषण निर्मळ, औरंगाबाद शहर-१ विभागाचे कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत व औरंगाबाद शहर-१ विभागाचे कार्यकारी अभियंता सिद्धार्थ जाधव यांच्यासह क्षेत्रीय अभियंते-कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला.

अनेक ग्राहकांकडून वीज चोरी

महावितरणने रेल्वे स्टेशन शाखेअंतर्गत ३० व ३१ जानेवारी रोजी व्यावसायिक ग्राहकांच्या पडताळणीची विशेष मोहीम राबवली. यात मंडळ कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची दोन तर विभाग कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची सहा पथके बनवून ही पडताळणी करण्यात आली. मोहिमेत एकूण १७७ ग्राहकांची तपासणी करण्यात आली. यात १७ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. अनधिकृत वीज वापर करणारे २ तर थेट मीटर बायपास करून वीज चोरी ३ ग्राहक आढळले. सामान्य वीज वापर असलेले १०७ ग्राहक आढळले. बिल थकविणाऱ्या ४८ ग्राहकांनी ९ लाख २५ हजार रुपये भरले. मोहिमेत ६ ग्राहकांच्या मीटरवर डिस्प्ले नसल्याचे आढळले. हे मीटर बदलण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘खासदारांनी सांगितले, नानांचे कौतुक करा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे व भाजप नेते विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यात कुलगीतुरा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात या नेत्यांतील शाब्दिक वाद उफाळला होता. असे असतानाच खासदार खैरे यांचे निकटवर्तीय महापौर नंदकुमार घोडले यांनी कृषी प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमात शुक्रवारी गुगली टाकली. 'खासदार खैरे यांनी युती होणार असल्याचे सांगितले असून आता नानांचे (हरिभाऊ बागडे) कौतुक करा,' असे विधान त्यांनी केल्याने उपस्थित आवक् झाले.

केंद्र, राज्य व औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. मात्र, विविध कारणांवरून या दोन पक्षांच्या नेत्यांत वाद होत आहेत. शिवेसनेचे खासदार खैरे व भाजप नेते, विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्यात काही महिन्यांत खटके उडाले आहेत. खैरे व बागडे यांच्यातील वाद शमलेला नसतानाच महापौर घोडले यांनी कृषी तंत्रज्ञान महाविद्यालया जवळील जिल्हा परिषदेची जागा कृषी विभागाला न देता पालिकेला द्या, असे सांगतानाच मी नानाच्या (हरिभाऊ बागडे) जवळचा आहे, असे नमूद केले. त्यावर डॉ. कराड यांनी नानांचे तुम्ही कौतुक करतात हे खासदार खैरे यांना सांगतो, असा टोला लगावला. त्यावर महापौर घोडले यांनी खासदार खैरे यांनीच सांगितले आहे की युती होणार आहे, नानांचे कौतुक करा, अशी गुगली टाकली. युती झाली तरी बेबनाव महागात पडू शकतो, हे लक्षात आल्यानेच खैरे यांच्याकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे का, अशी चर्चा यानिमित्ताने रंगत आहे.

\Bवादाची पार्श्वभूमी \B

राजाबाजार परिसरातील एका कार्यक्रमात खैरे यांनी बाजार समितीतील प्लॉट विक्री प्रकरणावरून बागडे यांचा लक्ष्य करत जमिनी विकून पैसे खाल्याचा आरोप केला होता. याचा वचपा बागडे यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत डिसेंबरमध्ये झालेल्या शहर बससेवा लोकार्पण सोहळ्यात काढला. खैरे हे अद्याप नगरसेवकाच्याच भूमिकेत असून त्यांनी खासदार म्हणून काम करावे, असे सुनावले होते. त्यानंतर तीन जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रस्ते भूमिपूजन सोहळ्यातही या दोघांत कलगीतुरा रंगला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कंपोस्ट पीट‌्स कुचकामी

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील घनकचरा विल्हेवाटीसाठी बांधण्यात आलेल्या पीट‌‌्सचा उपयोग होत नाही, पालिकेच्या या मतावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या वाहनांमधून शनिवारपासून घनकचरा संकलन करण्याची हमी पालिकेतर्फे खंडपीठात देण्यात आली.

औरंगाबादच्या नागरिकांना मुलभूत नागरी सुविधा देण्यात पालिका अपयशी ठरत आहे. त्यामुळे महानगर पालिका बरखास्त करून त्यावर प्रशासक नियुक्त करावा, अशी विनंती करणाऱ्या याचिकेसह घनकचरा, प्रदूषित पाणी या जनहित याचिकांवर एकत्रित सुनावणी शुक्रवारी न्या. संभाजी शिंदे व न्या. आर. जी अवचट यांच्यासमोर करण्यात आली. कचरा संकलनाच्या याचिकेवर पालिकेने शपथपत्राद्वारे खंडपीठात माहिती सादर केली. प्रादेशिक परिवहन कार्यालयास कचरा वाहनाच्या नोंदणीसंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. शासनाने प्रतिज्ञापत्र सादर करून १२३ वाहनांची नोंदणी झाल्याचे नमूद केले. उर्वरित ११७ वाहनांची नोंदणी रविवारीही करण्यात येईल, असे खंडपीठातील सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी सांगितले.

नोंदणी करण्यात आलेले आणि सध्या पालिकेकडे उपलब्ध असलेल्या १०० वाहनांद्वारे नवीन एजन्सीमार्फत दारोदार जाऊन कचरा संकलनाचे काम शनिवारपासूनच केले जाईल, असे पालिकेचे वकील राजेंद्र देशमुख यांनी खंडपीठात सांगितले. सोमवारपासून नोंदणी झालेल्या वाहनांतून संपूर्ण कचरा संकलनाचे काम सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हर्सूलमधील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी प्रदुषित झाले आहे. त्यासंदर्भात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला अहवाल सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. या आदेशानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हर्सूलमधील विहिरीच्या पाण्याचे नमुने घेतले आणि हे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती प्रदूषण मंडळाचे वकील उत्तम बोंदर यांनी दिली. जून आणि जुलै २०१८मध्ये कचरा डेपोजवळील हर्सूल-सावंगीच्या विहिरीतून पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. हे पाणी अयोग्य असल्याचे सिद्ध झाल्याची माहिती याचिकाकर्त्याचे वकील प्रज्ञा तळेकर यांनी कोर्टाला दिली.

याचिकाकर्त्यांतर्फे प्रज्ञा तळेकर, देवदत्त पालोदकर, पालिकेतर्फे जयंत शहा, राजेंद्र देशमुख, संभाजी टोपे, शासनातर्फे अमरजितसिंह गिरासे, सिद्धार्थ यावलकर यांनी काम पाहिले. आता पालिकेच्या संदर्भात प्रलंबित असलेल्या सर्व जनहित याचिकांवर मंगळवारपासून रोज सुनावणी होणार आहे.

\B

शासनाचे नियंत्रण नाही का?\B

घनकचऱ्यातून खतनिमिर्ती होणाऱ्या पीट‌्सचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पालिकेने तयार केलेल्या या कंपोस्ट पीट‌्सच्या कचऱ्याच्या विलिनीकरणासाठी उपयोग होत नसल्याचे पालिकेच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. या खड्ड्यांवर जो खर्च करण्यात आला आहे. त्याचे काय?, असा सवालही कोर्टाने केला. उद्या मशीनही काम करणार नाहीत, असे उत्तर दिले जाईल. या संदर्भात राज्य सरकारलाही कोर्टाने तोंडी फटकारले. शासनाने दिलेल्या पैशांवर नियंत्रण नाही का?, असा सवाल कोर्टाने केला.

\Bमहापालिकेची माफी\B

औरंगाबाद शहरात कचरा संकट निर्माण होण्याला औरंगाबाद खंडपीठाचा आदेश कारणीभूत आहे, असे पालिकेतर्फे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. यावर कोर्टाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. या विवादित विधानाबद्दल पालिकेचे वकील राजेंद्र देशमुख यांनी कोर्टाची माफी मागितली आणि माफीनामा सादर करण्यात येईल, असे सांगितले. हे प्रतिज्ञापत्र घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सादर केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओ कार्यालयात लेखणीबंद आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रादेशिक परिवहन कार्यायातील मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेतर्फे शुक्रवारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी लेखणीबंद आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली.

परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध आणि कार्यालयीन रचना आदी महत्त्वाच्या मागण्या प्रलंबित आहेत. संघटनेतर्फे आकृतीबंध सादर करूनही शासन दुर्लक्ष करत आहे. यामुळे परिवहन विभागातील वर्ग तीन कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महसूलसह इतर विभागांत पदोन्नत्या दिल्या जातात, आरटीओत मात्र पदोन्नती मिळत नाही. कर्मचारी कपात करू नये, खासगीकरण करू नये आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात संघटनेचे संघटक तुषार बावस्कर, राज्य सहसचिव विश्‍वा राऊत, रेखा कदम, विक्रमसिंग राजपूत, रमेश सोमवंशी, मिलिंद सव्वासे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुनाच्या गुन्ह्यातील पसार आरोपी जेरबंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खुनाच्या गुन्ह्यातील पसार संशयित आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री समर्थनगर भागात जेरबंद केले. हा खून तीन महिन्यांपूर्वी गारखेड्यात झाला होता. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून गारखेड्यात गुंडानी दोन भावांना बेदम मारहाण केली होती. त्यात एकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कुख्यात गुन्हेगार टिप्याला पोलिसांनी अटक केली होती. प्रतीक उर्फ बिट्टू सुभाष आडे (वय २२, रा. गारखेडा परिसर) हा पळून गेला होता. तो समर्थनगर येथील वरद गणेश मंदिरासमोर गुरुवारी रात्री येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून प्रतीकला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख, नंदकुमार भंडारे, विकास माताडे, शिवा बोर्डे, ओमप्रकाश बनकर आणि धर्मराज गायकवाड यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुढील वर्षी मालमत्ता कर ‘जैसे थे’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालमत्ता करात कोणत्याही प्रकारची वाढ न करण्याचा महापालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या शुक्रवारी बैठकीत ऐनवेळी मांडला. या प्रस्तावाला बैठकीत मंजुरी देण्यात आली. २०१२ वर्षापासून पालिकेने मालमत्ता करात वाढ केलेली नाही.

मालमत्ता कराचे दर आणि मर्यादांबद्दलचा निर्णय दरवर्षी २० फेब्रुवारीपर्यंत स्थायी समितीला घ्यावा लागतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने ऐनवेळचा प्रस्ताव बैठकीत मांडला. २०१८-१९ या वर्षाचा मालमत्ता कराचा दर २०१९-२० या वर्षी देखील कायम ठेवावा, असा उल्लेख प्रस्तावात असल्याची माहिती करमूल्य निर्धारक व संकलक महावीर पाटणी यांनी बैठकीत दिली. हा प्रस्ताव मंजूर करून सर्वसाधारण सभेसमोर सुधारणेसाठी पाठवा, अशी सूचना प्रशासनाला करण्यात आली. याबद्दल पत्रकारांशी बोलताना सभापती रेणुकादास वैद्य म्हणाले, शहरात कचरा, पाणी, रस्ते हे प्रश्न कायम आहे. सुविधा नाही, तर कर वाढ नाही, अशी भूमिका आम्ही घेतली आहे. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग म्हणाले, नवीन ३५ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण झाले आहे. त्या मालमत्तांना कर आकारणी झाल्यानंतर उत्पन्नात वाढ होणार आहे. त्यामुळे मालमत्ता करात बदल न करण्याचा प्रस्ताव समितीच्या समोर ठेवला आहे.

\Bविशेष मोहिमेत ११ कोटींचा गल्ला

\B

मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीच्या विशेष मोहिमेत पालिकेच्या तिजोरीत ११ कोटी ४३ लाख ९९ हजार ५२० रुपयांची भर पडल्याची माहिती महावीर पाटणी यांनी दिली. १२ ते ३१ जानेवारी दरम्यान राबवलेल्या मोहिमेच्या काळात पाणीपट्टीचे एक कोटी २७ लाख ४१ हजार ३२६ रुपये वसूल झाले. गतवर्षी मार्च अखेर मालमत्ता करापोटी ८० कोटी रुपये वसूल झाले होते, यंदा ३१ जानेवारीपर्यंत ८६ कोटी ६८ लाख ८४ हजार २६६ रुपयांची वसुली झाली आहे. मार्च अखेरपर्यंत ११० ते ११५ कोटींपर्यंत वसुली होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एक फेब्रुवारीपासून जप्तीची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे पाटणी यांनी सांगितले. मालमत्ता जप्तीनंतर मालमत्ताधारकाने कर न भरल्यास त्या मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे. गतवर्षी जप्त केलेल्या मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

\B'बीड बायपासच्या सर्व्हिस रोडची खात्री करावी लागेल'\B

बीड बायपासच्या सर्व्हिस रोडची खात्री करावी लागेल, असे अजब उत्तर अतिक्रमण हटाव विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले. या संदर्भात नगररचना विभागाला पत्र दिल्याचे स्पष्टीकरणही करण्यात आले. सिद्धांत शिरसाट यांनी सर्व्हिस रोडचा विषय उपस्थित केला. ते म्हणाले, या रोडवरील अतिक्रमणे हटण्याबद्दल मी वारंवार प्रश्न विचारत असून प्रशासन काहीच करीत नाही. अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस स्टेशनला पत्र दिल्याची खोटी माहिती का दिली जाते? बीड बायपास रस्त्यावर भीषण अपघात होतात हे अधिकाऱ्यांना माहिती नाही का?, अशी विचारणा त्यांनी केली. अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख ए. बी. देशमुख म्हणाले की, बीड बायपास भागातील लोकांचे म्हणणे आहे की तेथे रस्ता नाही. त्यामुळे रस्ता आहे की नाही याची खात्री करण्याबद्दल नगररचना विभागाला पत्र दिले आहे. खात्री झाल्यानंतर कारवाई केली जाईल. कचरा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन फार धिम्यागतीने काम करत असल्याने पालिकेची बदनामी होत आहे. कचरा प्रकरणात आपल्याला लक्ष घालावे लागेल, असे गजानन बारवाल म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंगली घडवण्याचा सरकारचा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'काही राज्यात निवडणुकीचे निकाल विरोधात गेल्यानंतर साडेचार वर्षे कुंभकर्णी झोपेत असलेल्या सरकारला जाग आली. म्हणूनच राम मंदिर बांधण्याची घोषणा झाली. हे सरकार परत सत्तेत येणार नाही. सध्या हिंदू-मुस्लिम तेढ वाढवून दंगली घडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दंगली होऊ नये म्हणून बहुजन वंचित आघाडी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शांती मार्च काढणार आहे,' असे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. आंबेडकर मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सुभेदारी विश्रामगृहावर शुक्रवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काँग्रेसवर टीका केली. 'मागील दोन महिन्यांपासून आरएसएस आणि मोहन भागवत यांनी राम मंदिर बांधण्याचा धोशा लावला आहे. कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वीच २१ फेब्रुवारीपासून मंदिर बांधण्याची घोषणासुद्धा केली. पुन्हा सत्तेत येण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा पुढे करीत आहेत. पण, हे सरकार परत सत्तेत येणार नाही. प्रादेशिक पक्ष विरुद्ध आरएसएस अशी लढाई आहे. प्रादेशिक पक्षांचा दबदबा पाहता काँग्रेसने २०१९चा विचार न करता २०२४ ची तयारी करावी. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार भारतात दंगलीची तयारी झाली आहे. शस्त्रे वाटली असून कल्याण येथे संघ कार्यकर्त्याकडे शस्त्रसाठा सापडला. पण, सरकारने चौकशी दाबली,' असा आरोप त्यांनी केला. देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी बहुजन वंचित आघाडी २१ फेब्रुवारीपूर्वी जिल्ह्यानिहाय शांती मार्च काढणार आहे, असे आंबेडकर यांनी जाहीर केले. राष्ट्रपतीचे नेतृत्व असलेले प्रशासन एकही मंत्री मानत नाही. ही स्थिती भयावह असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला प्रा. किसन चव्हाण, हरिभाऊ भदे, लक्ष्मण माने, अमित भुईगळ उपस्थित होते.

\Bलोकसभेच्या बारा जागांवर ठाम \B

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानिक चौकटीत आणण्याचा आराखडा काँग्रेसला दिला आहे. इंदिरा गांधी यांच्यानंतर हा प्रयत्न काँग्रेसने थांबवला. संघाची मनमानी रोखण्यासाठी संविधानिक ढाच्यात आणणे गरजेचे आहे. या मुद्द्यावरच राज्यात लोकसभेच्या जागांची चर्चा अडली आहे. आम्ही राज्यात १२ जागा मागितल्या आहेत. काँग्रेसचा उमेदवार सलग तीन वेळेस हरलेले मतदारसंघ आणि काँग्रेसकडे उमेदवारच नसलेल्या मतदारसंघाचा त्यात समावेश आहे. आमची चर्चा काँग्रेसशी असून राष्ट्रवादी काँग्रेसशी नाही असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. संघाबाबतचा आराखडा दिला तरच आघाडीत जाणार असे त्यांनी सांगितले. आरएसएसशी मराठा समाज लढू शकत नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. राज्यात वंचित बहुजन आघाडीचे सहा उमेदवार विजयी होतील असा दावा आंबेडकर यांनी केला.

\Bगांधीजी ओबीसींचे नेते\B

'टिळकांच्या काळात सवर्णांची असलेली काँग्रेस महात्मा गांधी यांनी गावागावात पोहचवली. सर्वसामान्यांच्या हातात काँग्रेसचा झेंडा दिला. ओबीसींची काँग्रेस करण्यासाठी योगदान दिले. त्यामुळे गांधीजींवर अनेक हल्ले झाले. कारण ओबीसींचे नेतृत्व संपले की वर्णवर्चस्ववादी लोकांच्या हाती पक्ष जाणार होता. हिंदू महासभेने गांधीजींच्या पुतळ्यावर झाडलेल्या गोळ्याच्या घटनेकडे ओबीसींनी गांभीर्याने पहावे,' असे आंबेडकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युती झाली तरी शिवसेनेसोबत लढू द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाली तरी औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेसोबत मैत्रीपूर्ण लढू द्या अशी मागणी पक्षनेतृत्वाकडे केली आहे, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

तनवाणी म्हणाले की, भाजपने औरंगाबाद लोकसभा लढवण्याची संपूर्ण तयारी केली असून मतदान केंद्रापर्यंत यंत्रणा उभारण्यात आली आहे. युती तुटली तर लढवण्यासाठी भाजप सक्षम आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल अँटी इन्कमबन्सी असल्याने औरंगाबादची जागा भाजपला सोडवून घ्यावी, असे निवेदन पक्षश्रेष्ठींना जालना येथे झालेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीवेळी दिले आहे. निवडणूक लढवण्यासाठी मी स्वत: इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. मैत्रीपूर्ण लढतीकरिता परवानगी नाकारली तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते खैरे यांना निवडून आणतील, असे तनवाणी यांनी स्पष्ट केले.

\Bभाजपने केली रस्त्यांची यादी

\B

मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या सव्वाशे कोटींच्या निधीतून करावयाच्या रस्त्यांच्या कामांचा निर्णय पालिकेने अद्याप घेतला नाही. त्यामुळे भाजपने रस्त्यांची यादी तयार केली असून त्यात विकास आराखड्यातील, भूसंपादन व अतिक्रमणाची समस्या नसलेले रस्ते आहेत. ही यादी महापौरांना देणार आहोत. प्रशासनाने रस्त्यांची यादी अंतिम करून तत्काळ शासनास सादर न केल्यास भाजप पदाधिकारी सोमवारी ती मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहेत. पालिका आता शंभर कोटींच्या रस्त्यांची कामे करणार असल्याने नवीन सव्वाशे कोटींची कामे करण्याचा भार पडणार आहे. त्यामुळे हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा इतर विभागाकडून करून घ्यावीत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचेही तनवाणी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय घनकचऱ्यासाठी घाटीमध्ये संकलन खोली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) वैद्यकीय घनकचरा संकलनासाठी मॉर्च्युरीलगत विशेष संकलन खोली तयार करण्यात आली असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाने हिरवा कंदील दाखवताच या खोलीमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय घनकचऱ्याचे संकलन सुरू होणार आहे. त्यामुळे जंतुसंसर्ग रोखण्यासह कुत्री, उंदिर, घुशींकडून अधून-मधून होणारी वैद्यकीय घनकचऱ्याची हेळसांड रोखणेही शक्य होणार आहे.

वैद्यकीय घनकचऱ्याच्या संकलनासाठी ही विशेष खोली तयार करण्यात आली आहे. या खोलीचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले असून, काही किरकोळ कामे वगळता ही खोली पूर्णपणे सज्ज झाली आहे. या खोलीमध्ये पिवळा, लाल आदी रंगांचे छोटे-छोटे कक्ष तयार करण्यात आले असून, त्या त्या प्रकारच्या कचऱ्याची विभागणी होऊन येथे संकलन होईल आणि या खोलीतूनच सर्व प्रकारचा वैद्यकीय घनकचरा उचलला जाईल. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या खोलीच्या वापराला परवानगी मिळताच या खोलीचा प्रत्यक्ष वापर सुरू होईल. लवकरच मंडळाकडून या खोलीची पाहणी होण्याचीही शक्यता आहे. या खोलीमुळेच जनावरांकडून या कचऱ्याची हेळसांड थांबवणे शक्य होणार असल्याची सुचिन्हे आहेत. या संदर्भात, लवकरच या खोलीचा प्रत्यक्ष वापर सुरू होईल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांनी सांगितले. दरम्यान, संपूर्ण घाटी परिसरात स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले असून, हे अभियान सुमारे दोन आठवडे सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘डीएमईआर’ पथकाची घाटीमध्ये चौकशी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटीत बाळ दगावल्याच्या प्रकरणात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (डीएमईआर) पथकाने शुक्रवारी (एक फेब्रुवारी) चौकशी केली. मात्र चौकशीत कोणी दोषी आढळले किंवा नाही, याविषयी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत पथकाने बोलण्यास नकार दिला. याबाबत सरकारला अहवाल सादर करणार असल्याचेही पथकाने स्पष्ट केले.

हा प्रकार घाटीत २१ जानेवारी रोजी मध्यरात्री घडला होता. या प्रकरणाची खंडपीठाने दखल घेऊन स्युमोटो याचिका दाखल करून घेतली होती. त्यानंतर डीएमईआरचे सहसंचालक डॉ. तात्यासाहेब लहाने व पथकाने शुक्रवारी घाटीत भेट देऊन, त्या घटनेच्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या निवासी डॉक्‍टर, परिचारिका, कर्मचारी, विद्युत अभियंता व छावणीच्या डॉक्‍टरांसह परिचारिकांचे जबाब नोंदवून घेतले. तसेच घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही तपासून घटनास्थळाची व संबंधित विभागांची पाहणीदेखील केली. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. राजन बिंदू, डॉ. मोहन डोईबळे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनांसाठी शहरात आता ४० किलोमीटर वेगमर्यादा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अपघात टाळण्यासाठी आता औरंगाबाद महापालिका हद्दीतील वाहनांच्या वेगावर शहर पोलिस आयुक्तांनी मर्यादा आणली आहे. सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आता ४० किलो मीटर प्रतितास ही वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी शुक्रवारी यासंदर्भात आदेश जारी केले.

औरंगाबाद शहर ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाते. शहरात पर्यटकांची गर्दी असते. त्याचबरोबर सहली मोठ्या प्रमाणावर येतात. शहरातील रस्त्यावर वाहनांच्या जास्तीच्या वर्दळीमुळे व भरधाव वेगाने वाहने चालविल्याने मोठ्या प्रमाणावर प्राणांतिक, गंभीर अपघात होत आहेत. या अपघाताना आळा घालण्यासाठी; तसेच वेगाने वाहने चालवणाऱ्या वाहनधारकांवर अंकुश ठेवण्यासाठी महापालिका हद्दीतील सर्व प्रकारच्या वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्याचा निर्णय पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी घेतला आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या वाहनांची वेगमर्यादा ४० किलो मीटर प्रतितास असणार आहे. अत्यावश्यक सेवा असलेल्या पोलिस, रुग्णवाहिका व अग्निशमन दल यांच्या वाहनांना यातून वगळण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलिस कायदा; तसेच मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अपघात वाढले

सिडकोतील टीव्ही सेंटर चौकात गुरुवारी कंपनीच्या कामगारांची वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या धकडेने एका दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाला. काही महिन्यांपूर्वी उस्मानपुरा भागातील भाजीवाली बाई पुतळा चौकातही अपघातात दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांचाही वाहनांच्या धडकेने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरात वाहनांच्या वेगावर नियंत्रण आवश्यक होते. पोलिस आयुक्तांच्या निर्णयामुळे शहरात वाहनांच्या वेगावर नियंत्रण येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीसह सर्व पंपहाऊससाठी १५ दिवसांत रिंग मेन युनीट

0
0

मटा इम्पॅक्ट

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडीसह ढोरकीन, फारोळा आणि नक्षत्रवाडी येथील पंपहाऊससाठी १५ दिवसांत रिंग मेन युनीट बसविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करणार असल्याची माहिती शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. हे युनीट बसविल्यावर पंपहाऊसला अखंड वीज पुरवठा सुरू राहील आणि पाणी पुरवठा विस्कळीत होणार नाही. जायकवाडी, ढोरकीन, फारोळा, नक्षत्रवाडी येथील पंपहाऊसचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्याचे तीनतेरा वाजले असल्याचे वृत्त 'मटा' ने शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध केले. या वृत्ताचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले.

भाजपच्या नगरसेविका राखी देसरडा यांनी 'मटा' च्या बातमीचा उल्लेख करून पंपहाऊसवर वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा प्रश्न मांडला. त्या म्हणाल्या, 'पंपडाऊसला एक्सप्रेस फिडर बसवावे यासाठी एक-दीड वर्षापासून महापालिकेने महावितरणकडे पैसे भरल्याचे समजते. पैसे भरलेले असताना अद्याप एक्सप्रेस फिडर का लावण्यात आले नाही? जायकवाडीच्या पंपहाऊसचा वीज पुरवठा एक तास खंडित झाला तर औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठ्यावर पाच-सहा तासांचा परिणाम होतो. अगोदरच चौथ्या-पाचव्या दिवशी पाणी पुरवठा होत आहे. त्यात वीड पुरवठा खंडित झाल्यामुळे येणाऱ्या अडथळ्याची भर पडत आहे. एक्सप्रेस फिडरचा विषय फार महत्त्वाचा आहे. असे असताना त्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे, याचा खुलासा अधिकाऱ्यांनी केला पाहिजे.'

सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता के. एम. फालक यांना खुलासा करण्यास सांगितले. फालक म्हणाले, एक्सप्रेस फिडरचा विषय उपअभियंता घुले पाहतात. घुले स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे सभापतींनी घुले यांना फोन लावण्याचे आदेश फालक यांना दिले. फालक यांनी फोन करून घुले यांच्याकडून माहिती घेतली. दरम्यानच्या काळात देसरडा म्हणाल्या, 'महत्त्वाच्या कामाकडे लक्ष दिले जात नाही ही गंभीर बाब आहे.' गजानन बारवाल म्हणाले, 'एक्सप्रेस फिडरसाठी महावितरणकडे पैसे भरलेले असताना ते बसविण्यासाठी इतका वेळ का लावला जात आहे.'

घुले यांच्याकडून माहिती घेतल्यावर फालक यांनी खुलासा केला. ते म्हणाले, 'पंपहाऊससाठी रिंग मेन युनीट बसवायचे आहे. त्यासाठी महावितरणकडे पैसे भरले आहेत. येत्या १५-२० दिवसांत हे युनीट बसविले जाईल. महावितरणकडून युनीट बसवण्याची तयारी केली जात आहे. युनीट बसविण्यासाठी शटडाऊन घ्यावा लागणार आहे.' शटडाऊन २४ ते ३६ तासांचा असू शकतो, असा उल्लेख त्यांनी केला. युनीट बसवण्यासाठी १५-२० दिवस लागण्याची गरज नाही, लवकर काम होऊ शकते, असे बारवाल म्हणाले. आतापर्यंत नऊवेळा शटडाऊन घेतले, पुन्हा शटडाऊन कशासाठी असा सवाल त्यांनी केला.

सभापती म्हणाले, 'रिंग मेन युनीट बसविण्यासाठी शटडाऊन घेत असाल तर शटडाऊनच्या काळात देखभाल दुरुस्तीची कामे देखील करून घ्या, त्यासाठी पुन्हा नव्याने शटडाऊन घेऊ नका.' महावितरणकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर रिंग मेन युनीट बसविण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

पाटणींनी मूळ जागीच काम करावे

सहाय्यक लेखापरीक्षक असलेले महावीर पाटणी यांना लेखाधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून धनादेश काढण्याचे काम त्यांना देण्यात आले आहे. यावर गजानन बारवाल यांनी आक्षेप घेतला. पाटणी लेखा विभागात काम करीत असल्यामुळे मुख्य लेखापरीक्षकांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, असे ते म्हणाले. यावर सभापती म्हणाले, 'ज्याच्याकडे खर्च तपासण्याची जबाबदारी आहे त्यानेच खर्च करावा, असे नियोजन चालणार नाही.' प्रशासनाला आदेश देताना ते म्हणाले, 'मनमानी कारभार करू नका, पाटणी यांना मूळ जागीच काम करू द्या.'

पार्किंगचे धोरण 'जीबी'त ठरणार

पार्किंगच्या धोरणाबद्दल नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी प्रश्न विचारला. त्या म्हणाल्या, 'हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर देखील पार्किंगबद्दलचे धोरण का ठरविले जात नाही. अतिक्रमणांवरही कारवाई होत नाही. अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख ए. बी. देशमुख म्हणाले, पार्किंगच्या जागांचा शोध घेण्याचे आदेश नगररचना विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांना दिले आहेत. ५ फेब्रुवारी ही त्यांच्यासाठी डेडलाइन आहे. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग म्हणाले, पार्किंगचे धोरण ठरविण्याची फाइल आयुक्तांकडे सादर केली आहे. त्यांच्या स्वाक्षरीनंतर पार्किंगच्या धोरणाचा ठराव सर्वसाधारण सभेत मांडला जाईल.

रस्त्यांच्या कामांसाठी क्वालिटी कंट्रोल लॅब

महापालिकेतर्फे वॉर्डांतर्गत मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. आता १०० कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे होणार आहेत. त्यानंतर १२५ कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे होतील. रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासण्यासाठी महापालिकेची स्वतंत्र क्वालिटी कंट्रोल लॅब असावी, अशी मागणी नगरसेविका राखी देसरडा यांनी केली. रस्त्यांच्या कामाचा दर्जा तपासण्याची पद्धत काय आहे असा सवाल त्यांनी केला. उपअभियंता नितीन गायकवाड यांनी याबद्दल खुलासा केला. त्यानंतर सभापती म्हणाले, 'क्वालिटी कंट्रोलची स्वतंत्र लॅब महापालिकेची असली पाहिजे ही चांगली सूचना आहे. प्रशासनाने याबद्दल विचार करावा.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लायन्स रुग्णालयात होणार रेटिना, कॉर्नियाचे उपचार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या १३ वर्षांमध्ये हजारो रुग्णांवर उपचार-शस्त्रक्रिया केलेल्या लायन्स नेत्र रुग्णालयाची परिपूर्ण नेत्र रुग्णालयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून, यापुढे ग्लुकोमा, डायबेटिक रेटिनोपॅथी व कॉर्नियाच्या विविध आजारांवर उपचार तसेच शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. 'लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणा'चा उपक्रम असलेल्या सिडको एन एक परिसरातील लायन्स नेत्र रुग्णालयाच्या अद्ययावतीकरणाचे लोकार्पण शुक्रवारी (१ फेब्रुवारी) झाले.

लायन्स रुग्णालयाच्या आतापर्यंतच्या सेवेत अनेक रुग्ण हे ग्लुकोमा, डायबेटिक रेटिनोपॅथी व कॉर्नियाचे आढळून आले. त्यामुळेच रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव 'लायन्स इंटरनॅशनल'कडे पाठवण्यात आला होता व हा प्रस्ताव स्वीकारुन ४ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी मंजूर करण्यात आला. त्यापैकी २ कोटी १६ लाखांचा निधी हा 'अरुण अभय ओसवाल ट्रस्ट'च्या वतीने देण्यात आला. तसेच लायन्स चिकलठाणाने २ कोटी ३८ लाखांचा निधी जमा केला आणि ६ कोटी ७० लाख रुपये रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी उपलब्ध झाले. या निधीतून अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात आले असून, रुग्णालयात नेत्ररोगासंबंधी सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध होणार आहेत, असे अरुणा अभय ओसवाल ट्रस्टच्या अध्यक्षा अरुणा ओसवाल, प्रकल्प अध्यक्ष एम. के. अग्रवाल, हॉस्पिटल कमिटीचे अध्यक्ष बी. एस. राजपाल, सुरेश साकला, डॉ. मनोहर अग्रवाल, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष व लायन्स सदस्य डॉ. भागवत कराड आदींनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

\Bनेत्रपेढीही सुरू होणार

\Bविविध आधुनिक उपचारांबरोबरच लायन्स नेत्र रुग्णालयात नेत्रपेढी सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वेगवेगळ्या क्लिष्ट-कठीण शस्त्रक्रियांसाठी ३ कोटींची उपकरणेही लवकरच रुग्णालयात उपलब्ध होतील, असे हॉस्पिटल कमिटीचे सहसमन्वयक प्रकाश गोठी यांनी सांगितले. तर, रुग्णालयासाठी मराठवाडा विकास मंडळाच्या माध्यमातून विविध प्रकारची मदत केली जाणार आहे, असे डॉ. कराड यांनी सांगितले. तसेच 'अरुणा अभय ओसवाल ट्रस्ट'च्या वतीने मुलांच्या शाळांपासून ते पर्यावरणापर्यंत आणि अन्नदानापासून पर्यावरणापर्यंत विविध कामे केली जात असल्याचे अरुणा ओसवाल म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास मंडळ करणार जलवाहिनीचा डीपीआर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा विकास मंडळाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत शहरासाठी जलवाहिनी टाकण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. तीन दिवसांत त्याचे काम पूर्ण होणार आहे.

मराठवाड्यातील विविध प्रश्नांबाबत आयोजित बैठकीमध्ये शहर पाणीपुरवठा योजनेप्रकरणी चर्चा झाली. समांतर जलवाहिनीचे काम रेंगाळले आहे. त्यामुळे शहरासाठी करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी एमजीपीकडून डीपीआर करून घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. प्राधिकरणाकडे काम दिल्यास ते मंडळामार्फत करून घेण्यात येणार आहे.

महापालिकेकडे अनामत म्हणून असलेल्या सुमारे २५० कोटी रुपयांतून शहरातील वितरण व्यवस्थेसाठी हायड्रोक्लोरिक मॅपनुसार काम करण्यात यावे, मुख्य जलवाहिनी एमजीपी आणि विकास मंडळाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल. हा प्रस्ताव घेऊन मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, तज्ज्ञ सदस्य शंकर नागरे व इतर सदस्य मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. महापालिकेकडे जे अनुदान आहे त्यात त्यांनी शहरातील वितरण व्यवस्थेचे काम करावे, असे यावेळी डॉ. कराड यांनी सांगितले.

या डीपीआरमध्ये दोन योजना प्रस्तावित करण्यात येणार आहेत. २०५० पर्यंत शहराला लागणाऱ्या पाण्याची गरज समोर ठेऊन किती प्रमाणात पाणी उपसा करावा लागेल, याचा अंदाज सदरील डीपीआरमध्ये बांधण्यात येणार आहे. योजनेसाठी लागणारा खर्च, तसेच किती व्यासाची जलवाहिनी टाकण्यात यावी, कोणत्या प्रकारची जलवाहिनी वापरावी. काम पूर्ण करण्यासाठी कालावधी आदी बाबी डीपीआरमध्ये समावेश असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images