Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शिवजयंतीनिमित्त झेंडा विक्री केंद्र सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा क्रांतीमोर्चातर्फे शिवजयंतीनिमित्त यंदाही 'ना नफा ना तोटा' तत्वावर शिवराज्याचे प्रतीक असलेल्या झेंड्यांची विक्री करण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अभिजित देशमुख यांच्या हस्ते टीव्ही सेंटर येथे झेंडाविक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

मराठा क्रांतीमोर्चातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (१९ फेब्रुवारी) शहरात लाखो शिवप्रेमी शिवराज्याचे प्रतीक असलेला झेंडा घरावर, आपल्या वाहनांवर लावतात. गेल्या काही वर्षांपासून या झेंड्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे यंदाही झेंडे विक्रीचे केंद्र उभारण्याचा निर्णय मराठा क्रांतीमोर्चाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार या केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.

टीव्ही सेंटर परिसरातील जयस्वाल हॉल शेजारी हे विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी बाळासाहेब थोरात, सुरेश वाकडे, विजय काकडे, सतीश वेताळ, मनोज गायके, सुनील कोटकर, रवी तांगडे, प्रदीप हारदे, गणेश तुपे, योगेश औताडे, श्रीकांत गाडेकर, अनिल तुपे, मिलिंद साखळे, नामदेव चव्हाण, अनिल देशमुख, गिरीश झाल्टे, प्रकाश भोकरे, विशाल वेताळ आदींची उपस्थिती होती. या केंद्रावरून शिवप्रेमी नागरिकांनी झेंडे खरेदी करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतीच्या तंत्रावर तज्ज्ञांचा सल्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाअॅग्रो कृषी प्रदर्शनाला शेतकरी, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांचा लक्षणीय प्रतिसाद मिळाला. शेतकरी गट, महिला बचतगट आणि कृषी उद्योजकांच्या दालनावर खरेदीसाठी झुंबड उडाली. फळबागांसाठी उपयुक्त असलेल्या यंत्रणेची माहिती घेण्यास शेतकऱ्यांनी पसंती दिली.

मराठवाडा शेती सहाय्य मंडळ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, सीड इंडस्ट्री असोसिएशन आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अॅग्रिकल्चर असोसिएशन यांच्यातर्फे महाअॅग्रो प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम झाले. पहिले सत्र तांत्रिक विषयावर झाले. मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त विजयअण्णा बोराडे यांनी मृद व जलसंधारण, नियंत्रित शेती व कृषी यांत्रिकीकरण या विषयावर मार्गदर्शन केले. 'सूक्ष्म सिंचन व्यवस्थापन' या विषयावर बाळासाहेब चव्हाण यांनी माहिती दिली. 'सिंचनात अग्रेसर महाराष्ट्रात सूक्ष्म सिंचन वाढले आहे. शेतकऱ्याला सिंचनासाठी एकरी ४८ ते ५० हजार रुपये खर्च होता. आता केंद्र व राज्य सरकार समान वाटा ठेवून अनुदान देत आहे. शिवाय कृषी आयुक्त ते कृषी सहायक साखळी जोडल्यामुळे प्रशासकीय दिरंगाई थांबली. त्यामुळे ठिबक संयंत्राचे महत्त्व ओळखून शेतकऱ्यांनी सिंचनावर भर द्यावा' असे चव्हाण म्हणाले. कृषी अभियंता पंडीत वासरे, डॉ. एस. डी. गोरंटीवार, प्रा. पंडीत मुंडे व उद्धव खेडेकर यांनीही मार्गदर्शन केले.

कृषी प्रदर्शनात शेतकरी गट, महिला बचत गट, कृषीपूरक उद्योगांच्या दालनांची सर्वाधिक संख्या आहे. पापड, चटण्या, गूळ, डाळी, धान्य, आवळा उत्पादने, चिक्की, काकवीसह अनेक उत्पादनांची दुकाने आहेत. या ठिकाणी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली. राज्यभरातील उत्पादक प्रदर्शनात सहभागी झाले असून उत्पादनांची चांगली विक्री झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतीसाठी उपयुक्त असलेल्या यंत्रांच्या स्टॉलला शेतकऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली. कापूस, मका बियाण्यांचे स्टॉल सर्वाधिक आहेत. जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिल्याचे संयोजकांनी सांगितले.

\Bसमारोप आज

\Bकृषी प्रदर्शनाचा सोमवारी समारोप होणार आहे. विविध विषयांवर आयोजित मार्गदर्शन सत्रात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे, तंत्र अधिकारी गोविंद हांडे, डॉ. भगवान साखळे आणि विजय कातोरे मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीच्या खूनप्रकरणात आरोपी पतीची मुक्तता

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीचा साडीने गळा आवळून खून केल्याप्रकरणात आरोपी गणेश जानकिराम सानप याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी दिले.

सटला (ता. जि. परभणी) येथील आरोपी गणेश सानप याचे १३ वर्षांपूर्वी रुख्मिणी दराडे हिच्याशी विवाह झाला होता. त्यांना दोन अपत्य देखील आहेत. आरोपीने पत्नीला काही दिवस चांगले नांदविले; पण दारूचे व्यसन जडल्यामुळे तो तिला दारूसाठी पैसे मागत होता. शिविगाळ करून मारहाण करत होता. तसेच तिला जिवे मारण्याची धमकी देत होता. घटनेच्या दोन महिन्यांपूर्वी आरोपी हा कुटुंबाला घेऊन कडेठाण तांडा (ता. पैठण) येथे राहण्यासाठी आला होता. २४ ऑगस्ट २०१६ रोजी गणेशने पत्नीसोबत वाद घातला व दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर गणेशने पत्नीच्या अंगावरील साडीच्या पदराने तीचा गळा आवळून खून केला. प्रकरणात आरोपीवर पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्याच्या सुनावणीनंतर कोर्टाने गणेश सानपची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुलताबाद तहसीलमध्ये तिसरा डोळा कार्यरत

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

तहसील कार्यालयाच्या मुख्य इमारतीत गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेला तिसरा डोळा सुरू झाला आहे. विशेष म्हणजे तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या मोबाइलवर इंटरनेटच्या माध्यमातून सीसीटीव्हीचे फुटेज दिसणार आहे. त्यामुळे कार्यालयातील सर्व हालचालींवर तहसीलदारांची करडी नजर असणार आहे.

तहसीलदार गायकवाड यांच्या पुढाकाराने बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहेत. कार्यालयातील व्हरांड्यांसह महत्त्वाची ठिकाणे टप्प्यात आली आहेत. त्यामुळे या कार्यालयाची सुरक्षा वाढीस लागली आहे. कार्यालयात प्रवेश करणारा प्रत्येक व्यक्ती, रेकॉर्ड विभाग, निवडणूक शाखा, संजय गांधी निराधार योजना कक्ष, मुख्य इमारतीच्या पुढील आणि आतील बाजूवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे.

\Bनियंत्रण कक्ष \B

हे कॅमेरे दिवस आणि रात्र काम करू शकणारे आहेत. नियंत्रणाचा कक्ष तहसीलदारांच्या कक्षात आहे. रेकॉर्डिंग सुरू असतानाच डिजिटल झुमची व्यवस्था आहे. सीसीटीव्हीचे एक महिन्याचे फुटेज उपलब्ध होऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हतनूर शिवारातील दीड एकर ऊस खाक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

तालुक्यातील हतनूर शिवारातील एका शेतकऱ्याचा दीड एकर ऊस वीज तारांमध्ये घर्षण होऊन उडालेल्या ठिणग्यामुळे जळाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजता घडली.

काशीनाथ नामदेव शहरवाले यांचे गट क्रमांक ७३ मध्ये शेत आहे. या दीड एकर क्षेत्रातील ऊस पिकावरून विजेच्या तारा गेलेल्या आहेत. शुक्रवारी दुपारच्या सुमारास उच्च दाबाच्या वीज वाहिनीच्या तारा कृषी पंपाच्या वीज वाहिन्यांच्या लोखंडी खाबावर अचानक टेकल्याने घर्षण होऊन ठिणग्या पडल्या. त्यामुळे ऊस पेटून सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. या शेताशेजारी वस्ती व इतर पिके नसल्याने मोठी जीवितहानी टळली. घटनास्थळाला पोलिस पाटील प्रकाश पवार, हतनूर सजाचे तलाठी दीपक एरंडे, लाइनमन संदीप चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. या घटनेमुळे ऐन दुष्काळात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भारपाईची मागणी संबंधित शेतकऱ्याने महसूल विभाग व महावितरणकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते कामाच्या धुळीमुळे दाणादाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

अजिंठा-बुलडाणा राज्य रस्ता तयार करताना पाण्याचा वापर होत नसल्याने उडणाऱ्या धुळीमुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. धुळीचे लोट घरात घुसत असल्याने शिवना येथे अनेकांनी घरे झाकून घेतली आहेत. धुळीचे कण नाकातोंडात जाऊन सर्दी, खोकला व घशाचा त्रास सुरू झाला आहे.

अजिंठा-बुलडाणा राज्य रस्ता चौपदरीकरणाचे काम सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. संबंधित कंत्राटदारांने पूर्ण रस्ता खोदून ठेवल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्याच्या वापर न करता मुरूम दबाई करण्यात येत असल्याने धुळीचे मोठे लोट उठत आहे. डोळ्यात धूळ गल्याने एका पाठोपाठ चालणारी वाहने दिसेनाशी होऊन अंदाज येत नसल्यामुळे अपघात होत आहेत. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना तर हा मार्ग खडतर झाला आहे. रस्त्यावर पाण्याचा वापर करूनच दबाई करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.

जड वाहनांमुळे दिवसभर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या घरात धूळ घुसत आहे. त्यामुळे घरातील उपकरणे, सोफा, दिवाण आदी साहित्य खराब होत आहे. धुळीचे कण नाकातोंडात जाऊन सर्दी, खोकला व घसा दुखण्याच्या त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे अनेकांनी घरे ताडपत्रीने झाकून घेतली आहेत.

\B४० किमीसाठी दोन तास\B

धुळीच्या लोटामुळे कंटाळलेले वाहनधारक अजिंठा येथून बुलडाणा येथे जाण्यासाठी शिवना-अन्वा-पिंपळगाव रेणुकाई-पारध-धाड या मार्गाने जात आहेत. हा रस्ता लांब पल्याचा असला तरी धुळविरहीत आहे. अजिंठा-बुलडाणा राज्य रस्ता हा जगप्रसिद्ध अजिंठा लेणीस जोडणारा मार्ग असल्याने या रस्त्यावरून वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे धुळीचे लोट काही करता थांबत नसल्याने अनेकजण मिळेल त्या मार्गाने धावत आहेत. रस्त्याचे काम सुरू असल्याने ४० किमी प्रवासाकरिता दोन ते अडीच तास लागत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूतस्कर मोकाट; फक्त १७ लाखांचा दंड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोट्यवधी रुपयांची वाळूचोरीचा धंदा करून गडगंज झालेले वाळूतस्कर जिल्ह्यात मोकाट सुटले आहेत. औरंगाबाद तहसील अंतर्गत गेल्या नऊ महिन्यांत केवळ १६ कारवाया करण्यात आल्या असून फक्त १७ लाख रुपयांची तुटपुंजी दंडवसुली सरकारी तिजोरीत जमा करण्यात आली.

एकीकडे शहरातील रस्त्यावरून वाळूचे ट्रक, हायवा सर्रास फिरताना दिसत आहेत, शहरात अनेक ठिकाणी वाळूचे अड्डेही तयार करण्यात आले आहेत. दुसरीकडे पोलिस आणि महसूल प्रशासन याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसते. नेहमीप्रमाणे यंदाही औरंगाबाद जिल्ह्यात कोट्यवधींच्या वाळूपट्ट्यांच्या लिलाव नाकारून वाळूची चोरी करण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्वेक्षणानंतर निश्चित केलेल्या २२ वाळूपट्ट्यांपैकी आतापर्यंत केवळ सहा वाळूपट्ट्यांचा लिलाव झाला आहे. यंदा ६० कोटी रुपयांचे महसुली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची दमछाक होत आहे. वाळूसाठ्यांची भरसमाठ किंमत, किचकट नियमांमुळे कंत्राटदारांनी चार महिन्यांपासून लिलावाला प्रतिसाद दिलेला नाही. नदीपात्रात बेकायदा वाळूउपसा करून त्याची बिनबोभाटपणे विक्री सुरू आहे. औरंगाबाद तहसील अंतर्गत एक एप्रिल २०१८ ते डिसेंबर २०१८ पर्यंत करण्यात आलेल्या १६ कारवायांमधून १७ लाख ६० हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. यापैकी दोन वाहने अवैधरित्या मुरूम वाहतुकीच्या आहेत. १६ प्रकरणांपैकी तीन प्रकरणांतच गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये मे व जुलै महिन्यात प्रत्येकी एक कारवाई करण्यात आली असून, जूनमध्ये पाच, ऑगस्टमध्ये दोन व त्यानंतर थेट डिसेंबरमध्ये पाच कारवाया करण्यात आल्या.

\Bलिलावाकडे पाठ\B

महसूल विभागाचा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत असलेल्या वाळूपट्ट्यांच्या लिलावाकडे काही वर्षांपासून कंत्राटदार पाठ फिरवत आहेत. वाढलेली रक्कम त्यामागचे एक कारण आहे. त्यामुळे कंत्राट घेण्यापेक्षा चोरट्या मार्गाने वाळू विक्रीचा फंडा वाळूतस्करांनी स्वीकारला आहे. त्यामुळे कंत्राट न घेता वाळूची चोरी करण्याचे काम केवळ औरंगाबाद जिल्ह्याच नव्हे, तर संपूर्ण मराठवाडयात सुरू आहे. आतापर्यंत विभागातील स्वतंत्र आणि संयुक्त अशा १९४ वाळूपट्ट्यांपैकी केवळ सहा वाळूपट्ट्यांचा लिलाव झाला आहे. १९४ वाळुपट्ट्यातून अपेक्षित उत्पन्न १२१ कोटी रुपये असताना आतापर्यंत फक्त ३९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तंबाखू, मद्यसेवनावर निर्बंध हाच कॅन्सरमुक्तीचा मार्ग

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तंबाखू, मद्यसेवनावर निर्बंध व लठ्ठपणावर नियंत्रण आणल्यास आणि लवकर निदान व उपचार केल्यास कॅन्सरवर मात करणे शक्य आहे. कोणतीही गाठ ही कॅन्सरची असू शकते आणि कोणत्याही वयात कॅन्सर होऊ शकतो, हे लक्षात घेऊन तज्ज्ञांकडून तपासून घेणे जास्त महत्त्वाचे ठरते. अजूनही महिला लाजेमुळे गाठीची तपासणी करत नाहीत किंवा खूप उशिरा करतात. त्यामुळेच कॅन्सर पसरत जातो आणि आजार तिसऱ्या-चौथ्या पायरीवर जातो व आजारातून मुक्तता मिळवणे कठीण जाते, असे कर्करोगतज्ज्ञ डॉ. बालाजी बन्सवाल, मेंदू शल्यचिकित्सक डॉ. जीवन राजपूत व छातीविकारतज्ज्ञ डॉ. बालाजी बिरादार यांनी कर्करोग दिनानिमित्त रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

देशात २००पेक्षा जास्त प्रकारचे कर्करोग असून, कार्सिनोमा, सोरकोमा, लिम्फोमा, ल्युकेमिया या प्रकारचे कर्करोग अधिक प्रमाणात आढळतात. देशात १२ लाखांपेक्षा जास्त कर्करुग्ण आहेत. प्रत्येक गाठ ही कर्करोगाची नसते, परंतु कोणती गाठ ही कर्करोगाची आहे आणि कोणती नाही, याची तज्ज्ञांकडून खात्री करुन घेणे गरजेचे आहे. अलीकडे अगदी तिशीत तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण दिसून येत आहेत आणि तंबाखू, गुटखा, पान मसाला, सिगारेट आदींचे व्यसन त्यामागे आहे. शहरी महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे, तर ग्रामीण महिलांमध्ये गर्भपिशवीच्या मुखाचे कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे, मात्र अजूनही महिला लाजेपोटी तपासणी करण्यास उशिरा येतात. अनेक ग्रामीण महिला गाठ वाढल्यानंतर किंवा फुटल्यानंतर किंवा रक्तस्त्राव सुरू झाल्यावर येतात. त्यावेळी मात्र कर्करोग शरीराच्या इतर भागांमध्ये पसरलेला असतो व उपचार करणे कठीण होऊ बसते. चाळीशीपुढील प्रत्येक महिलेने वर्षातून एकदा मॅमोग्राफी व पॅपस्मिअर तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. शौच्चावाटे रक्तस्त्राव होत असेल तर कोलोनोस्कोपी करुन घेणे गरजेचे ठरते, असेही डॉ. बन्सवाल म्हणाले. आता दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपी) कॅन्सरची शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आहे. त्यामुळेच मोठी जखम होत नाही, छोटी जखम लवकर भरुन निघते आणि खर्चदेखील कमीत कमी लागतो. आता अवयव वाचवणेही शक्य झाले आहे आणि कमीत कमीत त्वचेचे नुकसान करणारे किरणोपचारही उपलब्ध झाले आहेत, असेही डॉ. बन्सवाल म्हणाले.

\Bकचऱ्यामुळे दम्याच्या त्रासात वाढ

\Bशहरातील कचऱ्याच्या समस्येमुळेच निदान बालकांमध्ये तरी दम्याचे प्रमाण नक्कीच वाढले आहे. वारंवार श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारीही वाढत असल्याचे श्वसन व छातीविकारतज्ज्ञ डॉ. बालाजी बिरादार म्हणाले. 'ब्रेन ट्युमर'बाबत अजूनही जनजागृती नाही. रात्री डोके दुखणे, उलटी होणे, फिट्स येणे, बोलताना संतुलन जाणे, लुळेपणा येणे आदी 'ब्रेन ट्युमर'ची लक्षणे आहेत, असेही डॉ. राजपूत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पीएफ’मध्ये डल्ला; कंपनीमालकास अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) रक्कमेत २७ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी रेल्वे स्टेशन एमआयडीसीमधील त्रिमूर्ती फूड प्रा. लि. कंपनीच्या मालकाविरुद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी कंपनीमालक अतुल दत्तात्रय बंगीनवार (रा. हिराखान हौसिंग सोसायटी, वेदांतनगर) याला अटक करण्यात आली.

भविष्य निर्वाह निधी विभागीय कार्यालयातील अंमलबजावणी अधिकारी शेख रशीद शाबुमिया शेख (वय ५८) यांनी तक्रार दाखल केली. अतुल बंगीनवार यांची रेल्वे स्टेशन एमआयडीसीमध्ये त्रिमूर्ती फुडस प्रा. लि. ही कंपनी आहे. 'पीएफ' कार्यालयाने कंपनीतील कामगारांच्या वेतनाचे जुलै-ऑगस्ट २०१७ मधील रेकॉर्डची तपासणी केली होती. यामध्ये बंगीनवार यांनी कामगारांच्या पगारातून १२ टक्के प्रमाणे 'पीएफ फंड' ऑक्टोंबर २०१४ ते जून २०१७ या काळात कपात केली होती. त्याची एकूण रक्कम २६ लाख ९४ हजार ३२२ रुपये आहे. ही रक्कम त्यांनी कपात करूनही 'पीएफ' कार्यालयाकडे भरणा केली नाही. ही बाब तपासणीमध्ये निष्पन्न झाली.

\Bमंगळवापर्यंत कोठडी \B

शेख रशीद यांनी या संदर्भात बंगीनवार यांना भेटून तसेच फोन करून ही रक्कम भरण्यासंदर्भात सांगितले होते. मात्र, बंगीनवार यांनी टाळाटाळ केली. अखेर याप्रकरणी शनिवारी बंगीनवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी बंगीनवार यांना अटक केली असून त्यांना पाच फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी उपनिरीक्षख पाटील हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंग दांपत्याला मारहाण; तीस हजारांचा ऐवज लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घराचा दरवाजा तोडत अपंग दांपत्याला चाकुचा धाक दाखवून मारहाण करत तीस हजारांचा ऐवज लांबवण्यात आला. हा प्रकार रविवारी मध्यरात्री दीड वाजता बिडकीन येथील नानकनगर भागात घडला. याप्रकरणी बिडकीन पेालिस ठाण्यात आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नानकनगर परिसरात क्रांतीकुमार जाधव हे पत्नीसह राहतात. जाधव दांपत्य शनिवारी रात्री जेवण करून झोपी गेले होते. मध्यरात्री दीड वाजता तीन दरोडेखोरांनी खिडकीतून शिवीगाळ करीत घराचा दरवाजा उघडण्याची धमकी दिली. जाधव यांनी दरवाजा उघडला नाही, त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. चाकुचा धाक दाखवत त्यांनी तुमच्या जवळ काय आहे, लवकर काढा, अशी धमकी दिली. जाधव यानी प्रतिकार केला असता त्यांना मारहाण करून पत्नी कल्पना जाधव यांच्या गळ्यातील पोत, कानातले, कपाटातील रोख नऊ हजार रुपये आणि दोन मोबाइल, असा तीस हजारांचा ऐवज लुबाडला. जाधव यांची आरडाओरड ऐकूण शेजाऱ्यांनी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच चोरटे पळून गेले. याप्रकरणी क्रांतीकुमार जाधव यांच्या तक्रारीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लासूर ते पोटूळदरम्यान थंडीमुळे रेल्वे रूळ तुटले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अजिंठा एक्स्प्रेस शनिवारी पहाटे (तीन फेब्रुवारी) लासूर रेल्वे स्टेशनहून गेल्यानंतर लासूर ते पोटूळदरम्यान रेल्वे रुळांची वेल्डिंग तुटल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेचा वेग कमी करण्यात आला आहे.

याप्रकरणी रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंकदराबाद ते मनमाड जाणारी अजिंठा एक्स्प्रेस लासूरहून निघाली. काही अंतर पार केल्यानंतर रेल्वेच्या गार्डला आवाज आला. त्यांनी त्याबाबत लासूर स्टेशनवरील कर्मचाऱ्यांना माहिती दिली. या माहितीनंतर संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांनी पाहिले असता. त्या ठिकाणी रेल्वे रूळाचे वेल्डिंग तुटलेली असल्याचे लक्षात आले. या रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्पुरते काम केले असून, या रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेचा वेग ताशी ३० किलोमीटर करण्याचे आदेश रेल्वे विभागाने दिले आहेत.

थंडीमुळे रेल्वे रूळ तुटण्याच्या घटना वाढत आहेत. यापूर्वी औरंगाबाद ते नगरसोलदरम्यान रेल्वे रूळ तुटल्याच्या तीन घटना झालेल्या आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून वेळीच उपाय योजना करण्यात आल्याने या मार्गावर मोठा अपघात टळला असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हायपरथर्मिया’द्वारे कर्करोगावर स्वस्त उपचार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कर्करोगावर प्रचलित तीन उपचार पद्धती खर्चिक, वेळखाऊ आणि दुष्परिणाम करणाऱ्या आहेत. 'मॅग्नेटिक फ्लुइड हायपरथर्मिया' उपचार पद्धती वैद्यकीय क्षेत्रात आवश्यक आहेत. सुलभ, स्वस्त आणि सुरक्षित इलाजासाठी नवीन पद्धतीची गरज असल्याचे संशोधन डॉ. प्रशांत खरात यांनी केले. त्यांना संशोधनासाठी नुकतीच पीएच. डी. प्रदान करण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने भौतिकशास्त्र विषयात डॉ. प्रशांत खरात यांना पीएच. डी. प्रदान केली. 'सिंथेसिस, कॅरक्ट्रायझेशन अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सम नॅनो फेराइट्स फ्लुइडस' या विषयावर डॉ. के. एम. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खरात यांनी शोधप्रबंध सादर केला होता. कर्करोगावरील उपचार पद्धतीवर खरात यांचे संशोधन आहे. २०१८ या वर्षात जवळपास ९.६ दशलक्ष नागरिकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. कर्करोगाचे उपचार खर्चिक, दीर्घकालीन आणि वेदनादायी आहेत. शस्त्रक्रियेद्वारे बाधित भाग काढणे, किरणोत्सर्गी (रेडिएशन) उपाय आणि औषधे (केमोथेरपी) या तीन प्रकारे उपचार होतात. रेडिएशन पद्धतीत क्ष-किरणे अचूक नेम धरून कॅन्सरच्या गाठीवर मारतात. या लहरीतील ऊर्जेमुळे कर्करोगाच्या पेशींची अंतर्गत रचना ढासळते आणि पेशी नष्ट होतात. या माऱ्यात चांगल्या पेशींनाही इजा पोचते. केमोथेरपीच्या उपचारात आरोग्याच्या तक्रारी वाढतात, असे खरात यांनी संशोधनात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर 'हायपरथर्मिया' ही कर्करोगाच्या उपचारासाठी महत्त्वाची पद्धत आहे. उष्णता वाढवणे त्यात अपेक्षित आहे. कॅन्सरग्रस्त पेशींचा विकास ४१ ते ४६ अंश सेल्सिअस तापमानात नष्ट करता येतो. मॅग्नेटिक नॅनोपार्टीकल्स उष्णता निर्माण करण्यासाठी तयार करतात. 'हायपरथर्मिया'चा प्रभावी उपयोग होऊ शकतो. त्यासाठी मॅग्नेटिक नॅनोपार्टीकल्सला बिनविषारी ऑर्गेनिक पदार्थाने लेपित करतात. पाणी, इथिलीन, ग्लायकॉल इत्यादी मिश्रण करतात. त्याला मॅग्नेटिक नॅनोफ्लुइडस म्हणतात. कॅन्सर पेशीजवळ इंजेक्शन देऊन एसी मॅग्नेटिक फिल्ड देतात. त्यामुळे मॅग्नेटिक नॅनोपार्टीकल्स एसी मॅग्नेटिक फिल्डसोबत फिरुन उष्णता निर्माण करू शकतात. त्यातून ट्यूमरला थर्मल एनर्जीची मात्रा देतात. परिणामी कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात. या संशोधनात भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर (मुंबई), इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटॉमिक रिसर्च (कल्पक्कम), कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव) या राष्ट्रीय प्रयोगशाळेची मदत झाली.

\Bदृष्टिपथातील फायदे

\Bरेडिएशन पद्धतीत एका वेळेस तीन ते २५ हजार रुपये उपचाराचा खर्च होतो. 'मॅग्नेटिक फ्लुइड हायपरथर्मिया' वापरल्यास अत्यल्प दरात उपचार शक्य आहे. रेडिएशनने डीएनएला होणारी संभाव्य हानी या पद्धतीत नाही. 'हायपरथर्मिया' पद्धतीत फक्त कर्करोगग्रस्त पेशीच नष्ट होतात. इतर सुदृढ पेशींना इजा होत नाही.

'मॅग्नेटिक नॅनोफ्लुइडस' कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी सक्षम आहे. कमी प्रमाणात आणि कमी वेळेत कर्करोगाच्या पेशी नष्ट होतील एवढे तापमान वाढवू शकतात, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

-डॉ. प्रशांत बाबुराव खरात, संशोधक विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षपदी गोर्डे

0
0

पैठण: शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक दत्ता गोर्डे यांची भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे नियुक्तीपत्र प्रदान केले. दत्ता गोर्डे यांनी एक वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. पक्षाने मोठी जबाबदारी टाकली असून या पदाच्या माध्यमातून राज्यातील युवक भाजपकडे कसे वळतील यासाठी कार्य करणार असल्याचे गोर्डे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मनसंधारण झाले, तेच जलसंधारण’

0
0

खुलताबाद: पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ मध्ये सहभागी होण्यापूर्वी ग्रामस्थांनी मनसंधारण करणे गरजेचे आहे. तसे झाले तरच श्रमदानातून जलसंधारण व्हायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन तहसीलदार राहुल गायकवाड यांनी केले. ममुराबाद येथे ते ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना बोलत होते. ममुराबाद येथे आयोजित विशेष गावसभा घेण्यात आली. यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले की, ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्पर्धेच्या माध्यमातून गाव पाणीदार कसे करता येईल, शेतकरी व गावे समृद्ध व संपन्न कसे करता येईल, यासाठी मनसंधारण करण्याची अत्यंत गरज आहे. पुरस्कारापेक्षा पाणी किती बहुमुल्य आहे, यासाठी विविध दाखले देत गावकऱ्यांची मने जिंकली. जिल्हा समन्वयक प्रल्हाद अडसूळ यांनीही मार्गदर्शन केले. ग्रामस्थांनी डिझेलकरिता लोकवर्गणी जमा केली. तालुका समन्वयक सुनीता साळुंके यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुनंदा भोईटे, लीना जाधव, कृषी सहायक जाधव, सरपंच कृष्णा गावंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीडशे सर्जन्सनकडून अवयवदानाची हाक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मॅसिकॉन परिषदेच्या समारोपाच्या दिवशी परिषदेत सहभागी झालेले १५० शल्यचिकित्सक रविवारी (३ फेब्रुवारी) आयोजित 'गेट गोईंग'मध्ये अवयवदानाची हाक देत जनजागृतीसाठी धावले. गरवारे स्टेडियमजवळील कलाग्रामपासून सुरू झालेल्या मॅरेथॉनमध्ये 'स्वर्गात हवे स्थान, करा अवयवदान' असा संदेश दिला. विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे प्रमुख डॉ. सुधीर कुलकर्णी व परिषदेचे आश्रयदाते डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी फलक झळकावला, तर परिषदेच्या संयोजन समितीचे सचिव डॉ. राजेंद्र शिंदे, कोषाध्यक्ष डॉ. भास्कर मुसांडे, औरंगाबाद सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विकास देशमुख आदींनी पुढाकार घेतला.

परिषदेच्या शेवटच्या दिवशी विविध सत्रांमध्ये दोन व्याख्याने झाली. पहिले व्याख्यान मुंबईच्या के. ई. एम. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी केले. त्यांनी 'शस्त्रक्रियेतल्या चुकांशी झुंजणे' या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. दुसरे व्याख्यान 'असोसीएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया'चे माजी अध्यक्ष डॉ. संतोष जॉन यांचे झाले. यात त्यांनी 'शस्त्रक्रियातज्ञाच्या दृष्टिकोनातून व्यवसाय आणि जीवनातील संघर्ष' यासंबंधी मार्गदर्शन केले. समारोप सोहळ्यात राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिषदेच्या संयोजन समितीने केलेल्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल गौरवोद्गार काढले. या परिषदेने अनेक उच्चांक प्रस्थापित करून एक नवे मानक निर्माण केले आहे. त्यामुळे यापुढील काळात होणाऱ्या परिषदांसाठी संबंधित संयोजन समित्यांना हा अनुभव मार्गदर्शक ठरेल, अशी भावानाही माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिलीप गोडे यांनी व्यक्त केली.

डॉ. क्षीरसागर, डॉ. गाला

यांचे शोधनिबंध सर्वोत्कृष्ट\B

\Bपरिषदेत सादर करण्यात आलेल्या शोधनिबंधापैकी डॉ. केतन क्षीरसागर यांच्या 'व्रणविरहित थायरॉईड शस्त्रक्रिया: अवास्तव आहे का?' या शोधनिबंधाला सर्वोत्कृष्ट, तर व्हिडिओ सत्रातील डॉ. जैनी गाला यांच्या व्हिडिओ सादरीकरणाला सर्वोकृष्ट पारितोषिके मिळाली. प्रथेप्रमाणे समारोपात पुढील कार्याची सुत्रे राज्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. रॉय पाटणकर यांच्या स्वाधीन करण्यात आली. परिषदेसाठी परिषदेचे आयोजन सचिव डॉ. राजेंद्र शिंदे, डॉ. सूर्यवंशी, संयोजन अध्यक्ष डॉ. मिलिंद देशपांडे, संयोजन प्रमुख डॉ. पुरुषोत्तम दरख, कोषाध्यक्ष डॉ. भास्कर मुसांडे, वैज्ञानिक समिती अध्यक्ष डॉ. नुसरत फारुकी, औरंगाबाद सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विकास देशमुख, उपाध्यक्ष डॉ. केदार साने, सचिव डॉ. निखिल चौहान, कोषाध्यक्ष डॉ. मो. अन्सारी, सोसायटीचे सर्व सदस्य, एमजीएमचे कर्मचारी आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुकुंदवाडीत गुंडाचा धुडगूस

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुकुंदवाडी येथील शिवाजी कॉलनी भागात जुन्या वादातून सबंध नसताना व्यापाऱ्याला गावगुंडानी बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या व्यापाऱ्यावर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. गेल्या दोन दिवसापासून लहान बालकांना मारण्याच्या कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाला आहे.

मुकुंदवाडीमध्ये आनंद सुरेश डांगे (वय २५, रा. मुकुंदवाडी) याचे अभिषेक ईलेक्ट्रिक्स हे दुकान आहे. आनंद हा शनिवारी सायंकाळी दुकानात बसलेला असताना आठ ते दहा तरुणांचा जमाव लाठ्या-काठ्या घेऊन दुकानावर चालून आला. आनंदला या जमावाने दुकानाबाहेर काढले. जमावाने आनंदला शिवीगाळ करीत लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवला. या घटनेत आनंद गंभीर जखमी झाला. मारहाणीनंतर हा जमाव पळून गेला. जखमी अवस्थेत आनंदला उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आनंदच्या जबाबानंतर आरोपींवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bवातावरण भयग्रस्त\B

सायंकाळच्या वेळेस मुकुंदवाडी बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती. लाठ्याकाठ्या हातात असलेल्या जमावाने अचानक धुडगूस घातल्याने नागरिकांत एकच धावपळ उडाली. शेजारील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. आनंदला सोडवण्यासाठी आलेल्या नागरिकांना देखील या जमावाने शिवीगाळ करीत धमक्या दिल्या. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी सकाळी घटनास्थळाचा पंचनामा केला.

\Bजुन्या वादातून हल्ला\B

शालेय विद्यार्थ्यांना काही टवाळखोरांनी ठाकरेनगर भागात मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या किरकोळ घटनेमुळे दोन गटात वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल होऊन अटक आणि जामिनावर सुटका करण्यात आली. दरम्यान, आनंद डांगे याचा या प्रकरणाशी काही सबंध नसताना देखील त्याच्यावर हल्ला करण्यात आला असल्याचे यावेळी दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकरे स्मारक कामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा

0
0

मोठी सिंगल

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात उभारण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामांबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करा, आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी काम सुरू होईल असा प्रयत्न करा, अशा सूचना दिल्या. दोन वर्षांपूर्वी पालिकेने 'स्मारक आणि स्मृतीवन' विकसित करण्याचा निर्णय झाला होता.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले, सभापती राजू वैद्य यांच्यासह पालिकेतील संबंधित अधिकारी आणि सेनेचे काही नगरसेवक उपस्थित होते. मनपाने सिडकोतील प्रियदर्शनी उद्यानाच्या १७ एकर जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि स्मृतीवन विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी त्यासाठी पालिकेला स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला. पालिकेने स्मारकारच्या आरखड्यासाठी मुंबईच्या पीएमसीची नियुक्ती केलेली आहे. त्याचा डीपीआर उशीरा दिल्यामुळे निविदा काढण्यास उशीर झाल्याचे पालिका सूत्रांकडून सांगण्यात येते. त्यानंतर पालिकेने स्मारकाचा आराखडा तयार करण्यासाठी वास्तुविशारदाची नियुक्‍ती केली होती. स्मारकासाठी ६५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना दिले. स्मारकाची तातडीने निविदा प्रसिद्ध करा, शक्य झाल्यास त्यासाठी अल्प अवधीची निविदा काढा, जेणेकरून आचारसंहितेपूर्वी कामाला सुरू करा असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसईबीसी’ची साडेतीन हजार प्रमाणपत्रे प्रदान

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

कन्नड येथील उपविभागीय कार्यालयातून कन्नड व खुलताबाद तालुक्यातील तीन हजार ४०५ मराठा समाजाचे विशेष मागास प्रवर्गाचे (एसईबीसी) जात प्रमाणपत्र दोन महिन्यात वितरित करण्यात आले. यामध्ये कन्नड तालुक्यातील दोन हजार ६४२, तर खुलताबाद तालुक्यातील ७६२ प्रमाणपत्रांचा समावेश आहे. महाऑनलाइन व सेतू सुविधा केंद्राकडे अजून एक हजार अर्ज प्रलंबित आहेत.

ऑक्टोबर २०१८ पासून उपविभागीय कार्यालयात काही जाती व तत्सम प्रमाणपत्रे वगळून सर्व जात प्रमाणपत्रे ऑनलाइन पोर्टल डेस्कच्या माध्यमातून मिळत आहेत. ऑनलाइन दाखल कागदपत्रांची छाननी होताच बायोमेट्रिक डेस्क पद्धतीने जलद गतीने प्रमाणपत्रांचा निपटारा होत आहे. यामुळे अर्जदारांना प्रतीक्षा करावी लागत नाही. ओबीसी जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, एसईबीसी प्रमाणपत्र यासह इतर प्रमाणपत्र ऑनलाइन पोर्टल डेस्कच्या माध्यमातून, तर ठाकूर, राजपूत (भामटा), महादेव, मल्हार कोळी, मुस्लिम खाटीक, मुजावर, छप्परबंद, फकीर, मन्नेरवारलू या जातीची प्रमाणपत्रे ऑफलाइन पद्धतीने देण्यात येत आहेत. या सर्व प्रमाणपत्रासाठी कन्नड शहरात दोन महाऑनलाइन व एक सेतू सुविधा केंद्र, तर तालुक्यातील २९ ऑनलाइन केंद्रामार्फत, तर खुलताबाद तालुक्यातील १५ ऑनलाइन केंद्रामार्फत अर्ज स्वीकृत करण्यात येत आहेत. अर्जदारांनी अर्ज दाखल करताना मुळ कागदपत्रे स्कॅन करावयाची आहेत, अशी माहिती कन्नड उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून अभिजित पानट यांनी दिली आहे.

\Bआवश्यक कागदपत्रे \B

मागणीदार सज्ञान नसल्या‍स पालकांच्या नावे अर्ज सादर करावा (स्वयंघोषणापत्र, बंधपत्र, शपथपत्र, वंशावळ व इतर घोषणापत्रे व स्वाक्षरी) याच पद्धतीने, आईच्या नावे सुद्धा अर्ज सादर करता येतो. शैक्षणिक पुराव्यामध्ये प्रथम प्रवेश निर्गम उतारा, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, बोनाफाइड प्रमाणपत्र यापैकी एक पुरावा, तहसीलदाराचा राहिवासी पुरावा, वडील अशिक्षित असल्या‍स जवळच्या रक्तनात्यातील सख्खे आजोबा, काका, आत्या यापैकी एका व्‍यक्तीचा जात नोंद असलेला पुरावा व वंशावळीमध्ये नमूद करून वंशावळ जुळणेसाठी वंशावळीतील सर्व व्यक्तींचे ओळख पुरावे, सर्व कागदपत्रे स्कॅन करतांना मुळ प्रतिवरून स्कॅन करावेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बस ठरणार फलदायी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी योजनेतंर्गत शहरात सुरू करण्यात आलेल्या सिटी बसला नागरिकांकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बसमधून २३ ते २९ जानेवारी या आठवडाभराच्या काळात ५२ हजार औरंगाबादकरांनी प्रवास केला आहे. आर्थिकदृष्ट्याही सिटीबस फलदायी ठरत असून या काळात चार लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. सिटी बसला दररोज प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. त्यासोबतच सिटी बसमधून उत्पन्नही चांगले मिळत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेतून सुरू झालेली सिटी बससेवा औरंगाबादकरांसाठी सर्वार्थाने फलदायी ठरू लागली आहे.

औरंगाबाद शहरात २३ जानेवारीला नवीन सिटी बससेवा सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवसापासून २३ सिटी बस औरंगाबादच्या विविध रस्त्यांवरून धावू लागल्या आहेत. सिटी बस सुरू झालेल्या पहिल्या दिवशी (२३ जानेवारीी) ६८०२ प्रवाशांची प्रवास केला. त्यानंतर दररोज सिटी बसमधून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढच होत आहे. २७ जानेवारी या रविवारच्या सुट्टीच्या दिवशी ३७२७ प्रवाशांनी प्रवास केला. या एका दिवसाचा अपवाद वगळता अन्य दिवसांत सिटी बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. २८ जानेवारीला आतापर्यंत सर्वाधिक ९ हजार ४१३ प्रवाशांनी प्रवास केला. या दिवशी सिटी बसला ८९ हजार ३५४ रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. पहिल्या सात दिवसात कंपनीला एकूण ५२ हजार २१८ प्रवाशांच्या वाहतुकीतून एकूण ४ लाख ४० हजार ८६५ रुपयांची कमाई झाली आहे.

………

असे मिळाले उत्पन्न

दिनांक प्रवासी संख्या मिळालेले उत्पन्न

२३ जानेवारी ६८०२ ५२,४८४

२४ जानेवारी ७६८२ ६२९०२

२५ जानेवारी ८६०६ ७६५१६

२६ जानेवारी ६७५० ६७३८२

२७ जानेवारी ३७२७ ४३१६३

२८ जानेवारी ९४२३ ८९३५४

२९ जानेवारी ९२३८ ८९२२६

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बेरोजगार भत्ता; रोहयोची कामे द्या’

0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

तीन महिन्यांपासून कामाची मागणी करूनही कामे देण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनतर्फे शनिवारी (२ फेब्रुवारी) फुलंब्री तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार संगीता चव्हाण यांच्याशी १६ जानेवारी रोजी व एक फेब्रुवारी रोजी चर्चा करण्यात आली होती.

शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष प्रा. राम बाहेती, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अशोक जाधव, युनियनचे फुलंब्री तालुका सचिव संजय गायकवाड, सोमीनाथ ढमाले, राजाराम आव्हाड, दौलत जाधव आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. आक्टोबर २०१८पासून हे मजूर कामाची मागणी करीत आहेत. दोन नोव्हेंबर रोजी औरंगाबादेतील उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता व उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव याच्याशी चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा गटविकास अधिकारी यांना ३१ डिसेंबर रोजी सुमारे चारशे मजुरांनी काम मागणीचे चार नंबरचे अर्ज गटविकास अधिकारी व तहसीलदार संगीता चव्हाण यांना देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर लालबावटा शेतमजूर युनियनच्या निषेध मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मनरेगा कायद्याप्रमाणे १५ दिवसांत कामे न दिल्यास बेरोजगार भत्ता देण्याचा नियम आहे. यावेळी पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हुसेन व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

\Bआज चर्चा \B

तहसीलदार संगीता चव्हाण यांना प्रशासकीय कामासाठी अचानक पुणे येथे जावे लागल्याने नायब तहसीलदार कचरू काथार हे मोर्चासमोर आले व मागण्यांचे निवेदन स्वीकारले. तहसीलदार संगीता चव्हाण यांच्या उपस्थितीत सोमवारी (४ फेब्रुवारी) रोजी चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण नायब तहसीलदारांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images