Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

छत्रपतींच्या पुतळ्याचे तत्काळ काम सुरू करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अखेर वर्षभरानंतर शिवप्रेमींनी केलेल्या आंदोलनामुळे शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम मार्गी लागले असून, निविदा मंजुरीच्या आधीन राहून हे काम तत्काळ सुरू करा, अशी भूमिका स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी मंगळवारी स्पष्ट केली.

क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामासंदर्भात शिवप्रेमींनी सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले यांना त्यांच्याच दालनात घेराव घातला होता. स्थायी समितीची बैठक लवकरात लवकर घेऊन पुतळ्याच्या कामाची निविदा मंजूर करण्याबद्दल सभापतींना विनंती करू, असे आश्वासन महापौरांनी शिवप्रेमींना दिले होते. मंगळवारी सर्वसाधारण सभेत नगरसेवक राजू शिंदे यांनी पुतळ्याचा विषय काढला. ते म्हणाले, 'सभागृहात महापौर आणि सभापती दोघेही आहेत. त्यामुळे पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामाला मंजुरी देण्याचा निर्णय येथेच झाला पाहिजे.' यावर सभापती रेणुकादास (राजू) वैद्य म्हणाले, 'पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामाची निविदा आम्ही स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करू. आठ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीची बैठक सुरू झाल्यावर त्या कामाची फाइल आली होती. त्यामुळे त्या बैठकीत निर्णय झाला नाही. स्थायी समितीत निविदा मंजूर होणारच आहे. त्यामुळे तत्काळ काम सुरू करा असे संबंधित विभागाला कळविले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घृष्णेश्वर विकास आराखडा; निविदा आचारसंहितेपूर्वी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घृष्णेश्वर तीर्थक्षेत्रास भेट देणाऱ्या पर्यटक व भाविकांना सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याच्या कामाच्या निविदा आचारसंहितेपूर्वी प्रसिद्धा करा, असे निर्देश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले आहेत.

मंगळवारी (१२ फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात श्रीक्षेत्र घृष्णेश्वर विकास आराखडा आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. विकास आराखडयातील पहिल्या टप्प्यात पायाभूत सुविधा पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. पर्यटन केंद्राचे काम सुरू होताना पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र जल प्रधिकरणाने तत्काळ निविदा प्रक्रिया पूर्ण कराव्यात. तसेच पर्यटन विभागाच्या जागेतील असणाऱ्या रस्त्यांच्या परवानगीसाठी पर्यटन विभागाने तत्पर कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजपुरवठा उद्या राहणार बंद

$
0
0

औरंगाबाद : महावितरणच्या बायजीपुरा उपकेंद्रातील रोहित्र बदलण्याच्या कामामुळे या उपकेंद्रातील वाहिन्यांवर असलेल्या वसाहतींचा वीजपुरवठा गुरुवारी ( १४ फेब्रुवारी) काही काळ बंद राहणार आहे. ११ केव्ही रोशनगेट, ११ केव्ही मोंढा, ११ केव्ही वॉटर वर्क फिडरवरील निझामुद्दीन, दर्गा रोड, चंपा चौक, मोंढा, जिन्सी, गंजेशाहीदा, शहागंजचा काही भागाचा वीजपुरवठा फिडर सकाळी सहा ते दुपारी चार या वेळेत बंद राहील. तर ३३ केव्ही सिडको फिडरवरील ३३/११ केव्ही रोशनगेट व ३३/११ केव्ही बायजीपुरा, वॉटर वर्क फिडरवरील संपूर्ण भाग सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत बंद राहील. वीजपुरवठा कामाच्या वेळेनुसार दिलेल्या वेळेपूर्वी किवा नंतर पूर्ववत होऊ शकतो. तरी ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. सध्या बायजीपुरा ३३/११ केव्ही उपकेंद्रात दहा एमव्हीए क्षमतेचा जुना पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे. मात्र, या ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइल गळती व तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे अखंडित वीजपुरवठ्यात अडथळे येत होते. त्यामुळे महावितरणने हा ट्रान्सफॉर्मर बदलून त्या जागेवर याच क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम गुरुवारी करण्याचे नियोजन केले आहे. नवीन ट्रान्सफॉर्मर बसवल्यानंतर बायजीपुरा, शहा बाजार, राजाबाजार, चाऊस कॉलनी, कैसर कॉलनी, शहागंज, जाधवमंडी, जिन्सी, खास गेट, मोंढा, अहिंसानगर, मीना बाजार, नागसेन कॉलनी, अंगुरीबाग या परिसरात अखंडित व सुरळीत वीजपुरवठा राहण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'कमवा व शिका'साठी १ कोटींची तरतूद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेने २०१९-२० या वर्षाच्या ४२ कोटी ४२ लाख रुपये तुटीच्या अर्थसंकल्पाला मंगळवारी (१२ फेब्रुवारी) मंजुरी दिली. ३१९ कोटी २३ लाख रुपये खर्चाच्या या अर्थसंकल्पात गरीब विद्यार्थ्यांना काम करून शिकता यावे (कमवा व शिका) यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, प्र कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ. साधना पांडे आणि राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांच्या उपस्थितीत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. विविध मुद्यांवरून वादविवाद झाल्यामुळे अर्थसंकल्पाचा विषय दुपारच्या सत्रात चर्चेला आला. मागील अर्थसंकल्पाच्या तुलनेत हा अर्थसंकल्प ३ कोटी ४७ लाख रुपये कमी खर्चाचा आहे. उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांतून विद्यापीठाला २७६ कोटी ८१ लाख रुपये मिळणार आहेत. मात्र, उत्पन्नापेक्षा खर्च अधिक अपेक्षित असल्यामुळे तुट निर्माण झाली आहे. वेतनावर ६७ कोटी ३५लाख रुपये, विद्यापीठ अध्यापन आणि संशोधनावर ११ कोटी ४ लाख, स्वयंनिर्वाही अभ्यासक्रमांवर २ कोटी ९ लाख रुपये, इमारत बांधकामावर ३१ कोटी ५५ लाख रुपये, शैक्षणिक आणि प्रशासकीय देखभाल २७ कोटी तर परीक्षेवर २७ कोटी ७४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विद्यापीठ उपपरिसरासाठी ३ कोटी ५३ लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.

------

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना १ फेब्रुवारीपासूनच जेवण

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पालकांचे आर्थिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंतचे आहे अशा विद्यार्थ्यांना मोफत जेवण देण्याचा निर्णय अॅड. संजय काळबांडे यांनी मांडला. एक फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांना जेवण देण्यात येणार असून मदतीसाठी सदस्यांनी पुढे यावे, असे आवाहन केले. त्यावर तत्काळ काही सदस्यांनी मदतीचा हात पुढे केला. सदस्य तथा माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी ५१ हजार रुपये देण्याची घोषणा केली. तर राम चव्हाण यांनी १५ विद्यार्थ्यांचा चार महिन्याचा जेवणाचा खर्च उचलण्याची तयारी जाहीर केली. प्र-कुलगुरू डॉ. तेजनकर यांनी मदतीसाठी काही उद्योजकांची बैठकही घेतली असून एक बँक खातेही काढण्यात आल्याचे सांगितले. तर १ फेब्रुवारीपासूनच जेवणाची सोय करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना थेट जेवणाचे पैसे देण्याचाही एक पर्याय असल्याचे अॅड. संजय काळबांडे यांनी माध्यमांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुतळा समितीवरून अधिसभा बैठकीत खडाजंगी

$
0
0

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाच्या अधिसभा बैठकीत विद्यापीठात बसवण्यात येणाऱ्या शिवाजी महाराज पुतळा समितीवरून सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विद्यापीठ अधिसभा समिती की व्यवस्थापन समिती महत्त्वाची यावरून प्रा. डॉ. संभाजी भोसले व प्रा. डॉ. राजेश करपे यांच्यात वाद झाला.

अखेर कुलगुरूंनी एक समिती गठित करून त्याचे प्रमुखपद डॉ. नरेंद्र काळे यांना करण्याचा निर्णय घेतला. त्याला संजय निंबाळकर यांनी अनुमोदन दिल्यानंतर हा वाद शमला. वेगवेगळ्या प्रश्नांवरून अधिसभा बैठकीत सदस्यांनी मांडलेल्या विविध मुद्यांच्या प्रश्नावर वाद रंगला. सायंकाळी पाचच्या सुमारास सदस्यांनी प्रश्न मांडण्याचा कायम आग्रह धरल्यामुळे अर्थसंकल्प सादर करतानाही अडथळे येतच होते. कुलगुरू प्रो. डॉ. बी. ए. चोपडे, प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी वारंवार विनंती करूनही प्रश्न मांडून त्यावर अपेक्षित किंवा लेखी उत्तर मिळाल्याशिवाय अर्थसंकल्प सादर होऊ देणार नाहीत, अशीच भूमिका काही सदस्यांनी घेतली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा, देवळाईसाठी स्वतंत्र जलवाहिनी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या हद्दीत काही वर्षांपूर्वी समाविष्ट केलेल्या सातारा, देवळाई या भागासाठी जायकवाडी प्रकल्पातून स्वतंत्र पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर या भागासाठी ड्रेनेज व्यवस्थाही तयार करण्यात येणार आहे. ड्रेनेज आणि पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (डीपीआर) महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. सुमारे ६०० कोटी रुपये खर्चाचा हा 'डीपीआर' २६ फेब्रुवारीपर्यंत शासनाकडे मंजुरीसाठी पाठवणार आहे. मंजुरीनंतर ८० टक्के रक्कम राज्य सरकारकडून मिळेल. महापालिकेला उर्वरित २० टक्के खर्च उचलावा लागणार आहे.

शहरालगतची एखादी वसाहत शासनाने महापालिकेत समाविष्ट केल्यास संबंधित वसाहतीच्या विकासासाठी शासन निधी उपलब्ध करून देईल, असे १२ जून २०१५ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे. त्याचा आधार घेत महापालिकेने सातारा, देवळाई भागात पाणीपुरवठा योजन व ड्रेनेजची योजना करण्यासाठी यश इनोव्हेशन या संस्थेने चार महिन्यांत 'डीपीआर' तयार केला. हा 'डीपीआर' मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता. यश इनोव्हेशन्सचे समीर जोशी यांनी 'डीपीआर'चे महापालिका सभागृहात सादरीकरण केले.

सातारा देवळाईचा परिसरत ३३.१७ चौरस किलोमीटर आहे. सध्या या भागातील लोकसंख्या सुमारे ५० हजार आहे. १९९१ ते २०११ या काळात सातारा, देवळाई भागातील विकासाचा दर १३७ टक्के होता. ड्रेनेज लाइनसाठी २८३ किलोमीटरचे नेटवर्क उभे करावे लागणार आहे. १५ हजार प्रॉपर्टी चेंबर्स या 'डीपीआर'मध्ये प्रस्तावित करण्यात आले आहेत. कांचनवाडी येथील सिवरेज ट्रिटमेंट प्लांटला (एसटीपी) सातारा, देवळाईची ड्रेनेज योजना जोडली जाणार आहे. यासाठी दोन पंपिंग स्टेशनची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व कामांसाठी १८० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

सातारा, देवळाई भागातील पाणीपुरवठा योजनेबद्दलही सविस्तर सादरीकरण करण्यात आले. जायकवाडीपासून सातारा, देवळाईसाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचा उल्लेख 'डीपीआर'मध्ये करण्यात आला आहे. जायकवाडी धरणात 'डीएमआयसी'साठी उभारलेल्या पंपहाउसजवळ सातारा, देवळाईसाठी पंपहाउस बांधण्याचे 'डीपीआर'मध्ये प्रस्तावित करण्यात आले आहे. तेथे दहा पंप बसवण्यात येतील. ६०० मीटर लांब आणि १५ मीटर खोल अशी पंपहाऊसची रचना असेल. जायकवाडीपासून १०९४ मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येईल. गांधेली शिवारात १७ एकर गायरान जमीन आहे. या ठिकाणी शासनाची परवानगी घेऊन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारता येईल. हा प्रकल्प साई टेकडीच्या परिसरात असेल. या ठिकाणाहून गुरुत्वाकर्षणाने सातारा आणि देवळाई भागात पाणी आणता येणार आहे.

जायकवाडी ते साई टेकडी येथील जलशुद्धीकरण प्रकल्प हे अंतर ४१.५ किलोमीटर इतके असेल. सातारा भागात पाच, तर देवळाई भागात चार जलकुंभ बांधण्याचे प्रस्तावित आहे. जलशुद्धीकरण केंद्रापासून जलकुंभांपर्यंत २१ किलोमीटरची जलवाहिनी टाकावी लागणार आहे. याशिवाय १९९ किलोमीटरची अंतर्गत जलवाहिनी टाकावी लागणार आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी ४२० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सर्वसाधारण सभेने 'डीपीआर'ला मंजूरी दिली. २६ फेब्रुवारीपर्यंत 'डीपीआर' शासनाकडे पाठवण्यात येईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी जाहीर केले. 'डीपीआर'बद्दल नगरसेवक राजू शिंदे, राजेंद्र जंजाळ यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले.

\B८० टक्के निधी शासन देणार\B

सातारा, देवळाईसाठी ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्याचा मिळून ६०० कोटींचा 'डीपीआर' तयार करण्यात आहे. त्याला शासनाने मंजुरी दिली, तर 'डीपीआर'च्या एकूण किंमतीच्या ८० टक्के निधी शासन देणार आहे. ड्रेनेज व्यवस्थेचा ३६ कोटी रुपये आणि पाणीपुरवठा व्यवस्थेचा ८३ कोटी रुपये खर्च महापालिकेला करावा लागेल.

...

सातारा देवळाई परिसर ३३.१७ चौरस किलोमीटर

लोकसंख्या सुमारे ५० हजार

जायकवाडीपासून १०९४ मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी

पाणी पुरवठा योजनेचा खर्च ४२० कोटी

ड्रेनेज लाइन योजनेचा खर्च १८० कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चेक क्लिअरिंग’ची प्रक्रिया शहरात संथ गतीने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'चेक क्लिअरिंग'ची प्रक्रिया शाखास्तरावर होत असल्याने 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये ग्राहकांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. 'चेक क्लिअरिंग' वेळेत होत नसल्याने ग्राहकांना तीन-चार दिवसांची प्रतीक्षा करावी लागते आहे. बँकेने पूर्वीच्या प्रक्रियेत बदल करत त्या-त्या शाखांमध्ये काम विभागून दिले आहे.

पूर्वी औरंगाबाद शहरात विभागीय स्तरावर 'चेक क्लिअरिंग'ची प्रक्रिया केली जात होती. त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आले होते. शहरात बँकेच्या ५४ शाखा आहेत. त्या-त्या शाखा पातळीवर ही प्रक्रिया होत आहे. त्यात अनेक शाखांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आणि इतर कामांचा व्याप यामुळे नियमित कामांना प्राधान्य द्यायचे की, या कामांना, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. यामुळे 'चेक क्लिअरिंग' वेळेत पूर्ण होत नसल्याचे शाखेतील अधिकारी सूत्रांनी सांगितले. ७ तारखेपासून तर अनेक शाखांमध्ये 'चेक क्लिअरिंग'चे गठ्ठे तसेच पडून आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या व्यवहारावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येते. पूर्वी एका दिवसाला साडेतीन हजार किंवा त्यापेक्षा अधिक चेक वटविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात होती. विक्रेंदीकरण करून वेळ वाचण्याऐवजी वेगळा परिणाम समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. देशभरातील मोठ्या शहरांच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला. मात्र, औरंगाबादसारख्या शहरात त्याचे परिणाम प्रभावीशाली नसल्याचे समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई

$
0
0

औरंगाबाद : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने मंगळवारी नारेगाव येथील गट क्रमांक २४, २५ व ब्रिजवाडी येथील सर्वे क्रमांक ४,५,६,७,८ या भागातील अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई करीत प्लॉटिंग उध्वस्त केली. या ठिकाणी अनधिकृत रेखांकनामध्ये ड्रेनेज चेंबर, ड्रेनेज लाइन, सिमेंट काँक्रिटचे रस्ते, कच्चे रस्ते तयार करण्यात आले होते. याशिवाय तारेचे २२ फेंसिंग देखील होते. दगड , पोल लावून प्लॉट निश्चित केले होते. सुमारे २२ एकरात अनधिकृत ले आऊट पाडण्यात आले होते. अतिक्रमण हटाव पथकाने संपूर्ण प्लॉटिंग काढून टाकले. ही कारवाई उपायुक्त डॉ. डी. पी. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख ए. बी. देशमुख, पदनिर्देशित अधिकारी प्रभाकर पाठक, वामन कांबळे, एस. एस. कुलकर्णी यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘घृष्णेश्वर विकास’ची निविदा आचारसंहितेपूर्वी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घृष्णेश्वर तीर्थक्षेत्रास भेट देणाऱ्या पर्यटक व भाविकांना सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याच्या कामाच्या निविदा आचारसंहितेपूर्वी प्रसिद्धा करा, असे निर्देश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (१२ फेब्रुवारी) श्रीक्षेत्र घृष्णेश्वर विकास आराखडा आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. विकास आराखडयातील पहिल्या टप्प्यात पायाभूत सुविधा पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. पर्यटन केंद्राचे काम सुरू होताना पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र जल प्रधिकरणाने तत्काळ निविदा प्रक्रिया पूर्ण कराव्यात; तसेच पर्यटन विभागाच्या जागेतील असणाऱ्या रस्त्यांच्या परवानगीसाठी पर्यटन विभागाने तत्पर कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औद्योगिक कोर्टाचे न्यायाधीश र. शि. घाटपांडे यांना निरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश र. शि. घाटपांडे यांना निवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला. या वेळी कामगार न्यायालयाचे न्यायाधीश डी. व्ही. जोशी आणि व्ही. एस. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र शिरसाट होते. या प्रसंगी दोन्ही न्यायाधीश तसेच वरिष्ठ विधिज्ञ जे. एस. भोवते व अ‍ॅड. बी. एम. वावळकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव अ‍ॅड. सागरदास मोरे यांनी केले, तर अ‍ॅड. सुरेश वाघचौरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी अ‍ॅड. सचिन गंडले आणि अ‍ॅड. आर. के. मोकळे यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमास वरिष्ठ वकील एम. पी. टाकसाळ, जी. एम. जाधव, रामनाथ चोभे, निशिगंधा चोभे, एस. एस. पवार, बी. एस. सोनटक्के, अनिल सुरवसे, आर. के. खंडेलवाल, अभय टाकसाळ, क्रांती भोवते, सुनील जोंधळे, यतीन ठोळे, जी. एस. गाडीवान, उद्धव भवलकर, भगवान भोजने, सपना तांगडे, आर. के. ढगे, एस. आर. तारु, पी. बी. खेडकर आदी वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिसऱ्यांदा निविदा काढण्याची नामुष्की

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डिफर्ड पेमेंटच्या रस्त्यांसाठी महापालिकेला तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध करण्याची नामुष्की ओढावली असून, या कामाच्या पेमेंटची हमी द्या, अशी मागणी कंत्राटदारांनी आयुक्तांकडे केली आहे.

डिफर्ड पेमेंटच्या माध्यमातून ६९ कोटींचे रस्ते करण्याचा निर्णय महापालिकेने यापूर्वीच घेतला आहे. या निधीतून २१ रस्त्यांची व्हाइट टॉपिंगची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी पालिकेने आतापर्यंत दोन वेळा निविदा प्रसिद्ध केली, पण कंत्राटदारांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे प्रशासनाने तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध केली. कंत्राटदारांनी निविदा प्रक्रियेत भाग घ्यावा यासाठी आयुक्तांनी स्वत: काही कंत्राटदारांशी चर्चा केली. केलेल्या कामाचे पेमेंट मिळण्याची हमी प्रशासन देणार असेल, तर निविदा भरण्याबद्दल विचार करू असे कंत्राटदारांनी स्पष्ट केले. यासाठी त्यांना ट्रायपार्टी अॅग्रीमेंट हवे आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. तिसऱ्यावेळेस काढलेल्या निविदेलाही प्रतिसाद मिळाला नाही, तर काय करायचे हे योग्य वेळी ठरवले जाईल. दुसरा पर्यायदेखील आमच्याकडे तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सव्वाशे कोटींमधून करावयाच्या रस्त्यांच्या कामांची यादी देखील तयार आहे. तांत्रिक मान्यतेसह ही यादी मुख्यमंत्र्यांना सादर केली जाईल. यादी योग्य वेळी जाहीर करू, असे महापौर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुथ्थुट’ला २८ लाखांचा गंडा; आरोपीच्या कोठडीमध्ये वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुथ्थुट होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला बनावट कागदपत्रांच्या आधारे २८ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणातील आरोपी इम्रान आरेफ खान याच्या पोलिस कोठडीमध्ये शनिवारपर्यंत (१६ फेब्रुवारी) वाढ करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी बुधवारी (१३ फेब्रुवारी) दिले.

या प्रकरणी मुथ्थुट होम फायनान्स (इंडिया) लिमिटेडचे क्लस्टर सेल्स मॅनेजर विजयकुमार तात्याराव चव्हाण (२९, रा. अलोकनगर, बीड बायपास) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २१ फेब्रुवारी २०१७ रोजी कंपनीत आरोपी इम्रान आरेफ खान (२८, रा. कैसर कॉलनी) व त्याची पत्नी रेश्मा इम्रान खान (रा. खासगेट) यांनी गृहकर्जासाठी अर्ज दिला होता. त्यासाठी त्यांनी शांतीलाल चौधरी व सुदर्शन कालिके यांच्याकडून जयसिंगपुरा येथील मालमत्ता खरेदी करीत असल्याची कच्ची इसारपावती सादर केली होती. त्याआधारे कंपनीने २८ लाख ६३ हजार ३१० रुपयांच्या कर्जावर ३० हजार ५३६ रुपयांचा हप्ता ठरवून दिला होता. आरोपींनी सुरवातीचे सात हप्ते भरल्यानंतर मासिक हप्ते भरणे बंद केले. त्यामुळे आरोपींचे कर्ज खाते अनुत्पादक म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर आरोपींनी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता आरोपी नोकरीला असलेली कंपनीच अस्तित्वात नसल्याचे समोर आले. तसेच आरोपींनी कर्ज घेण्यासाठीची कंपनीचे रिलेशिनशिप ऑफीसर विजयकुमार शंकरराव राठोड यांच्याशी संगनमत करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे २८ लाख ६३ हजार ३१० रुपयांचे कर्ज घेऊन कंपनीची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात आरोपी इम्रान खान याला सोमवारी अटक करुन बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपीला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीने गुन्ह्यात दाखविलेल्या कंपनीचा मालक अझहर अली याची विचारपूस करणे बाकी असून, आरोपीची पत्नीदेखील सहअर्जदार आहे व ती गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. तिचा शोध घेऊन अटक करणे बाकी आहे. तसेच आरोपींनी आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचाही तपास करावयाचा असल्याने आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती कोर्टात करण्यात आली. ही विनंती ग्राह्य धरुन कोर्टाने आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये शनिवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नशेच्या गोळ्यांची विक्री; आरोपीला अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नशेच्या गोळ्यांची विक्री करणारा आरोपी रिक्षाचालक शेख अब्दुल हक्क शेख अब्दुल कादर याला गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (१३ फेब्रुवारी) मध्यवर्ती बसस्थानकासमोरुन अटक केली. त्याला कोर्टात हजर केले असता, शुक्रवारपर्यंत (१५ फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी दिले.

या प्रकरणी गुन्हे शाखेचे शिपाई अशरफ नवाब सय्यद यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, मध्यवर्ती बसस्थानकासमोर रिक्षामध्ये एक व्यक्ती नशेच्या गोळ्यांची विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून आरोपी रिक्षाचालक शेख अब्दुल हक्क शेख अब्दुल कादर (वय ३२, रा. अब्दीमंडी, दौलताबाद) याला पकडले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून गुंगी आणणाऱ्या अॅलिटिस गोळ्यांच्या ३४ स्ट्रिप्स व रिक्षा, असा सुमारे ५१ हजार १९० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीने आणखी काय काय गुन्हे केले आहेत, आरोपीचे कोणी साथीदार आहेत का, आरोपीने गुंगी आणणारी औषधी कुठून आणली आदींचा तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती कोर्टात करण्यात आली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीटीएड’, ‘बीएड’धारकांची सरकारकडून थट्टा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आठ वर्षांपासून शिक्षक भरतीसाठी राज्यातील लाखो डीटीएड, बीएडधारक बेरोजगार आंदोलन करत आहेत. मात्र, आठ वर्ष भरती न होऊनही अनेक जिल्ह्यांमध्ये भरतीसाठी शून्य जागा आहेत. सोमवारी राज्यातील शिक्षण विभागाची बैठक झाली. यात, मराठवाड्यात बीड, हिंगोलीत तर शून्य जागा रिक्त आहेत. लातूर, नांदेड, उस्मनाबाद केवळ दहा, वीस जागाच रिक्त आहेत. त्यामुळे बेरोजगरांची घोर निराशा होणार आहे.

राज्यात दरवर्षी १४ हजार शिक्षकांची भरती होत होती. २०१० नंतर राज्यात भरतीची प्रक्रिया झालेली नाही. २०१३मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा व २०१७मध्ये अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली. त्यातून पात्र ठरलेल्या डीटीएड, बीएडधारकांची संख्या लाखात आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे करण्याची प्रक्रिया तीन वर्षापासून सुरू आहे. त्यानंतरही प्रत्यक्ष भरतीची प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यात पवित्र पोर्टलवर जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकासह खासगी संस्थांमधील रिक्त जागांवर भरती केली जाईल, असे शासनाकडून सांगण्यात आले. त्यासाठी बिंदुनामावलीची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. सोमवारी शिक्षण आयुक्त, संचालक यांनी उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्याकडून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधत आढावा घेण्यात आला. त्यात रिक्त जागांची माहिती, बिंदुनामावलीची प्रक्रियाची स्थिती जाणून घेण्यात आली. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया राहिल्याचे समोर आले. एकीकडे भरतीची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू असली तरी रिक्त जागा अतिशय कमी असल्याने बेरोजगारांच्या संख्येच्या तुलनेत अत्यल्प असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयुक्त कार्यालयासमोर बेरोजगारांचे आंदोलन सुरू आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी १२ हजार जागा भरण्याबाबत आश्वासन दिल्याचे आंदोलकांनी 'मटा'ला सांगितले.

समायोजन, 'टीईटी'अपात्रांना संधी अन् शून्य जागा

आठ वर्ष भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यानंतरही रिक्त जागांचा आकडा अत्यल्प आहे. मराठवाड्यात बीड, हिंगोलीसारख्या जिल्ह्यात शून्य जागा असे चित्र आहे. लातूर, नांदेड, उस्मनाबाद जिल्ह्यांमध्येही तुरळक जागांवर भरती होणार आहे. त्या तुलनेत बेरोजगारांची संख्या हजारोंमध्ये आहे. त्यामुळे जागांची भरतीची जाहिरात आली तरी बेरोजगारांची निराशा होणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. उर्दू माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी झाल्याने या शाळांमधील रिक्तचा आकडा मर्यादित झाला आहे. समायोजन, टीईटी पात्र नसतानाही शिक्षक म्हणून २०१३नंतर खासगी संस्थांमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी नियुक्त्या दिल्याने रिक्त जागांचा आकडा कमी झाला आहे.

'रोस्टर' प्रक्रिया पुन्हा..

रिक्त जागा विविध प्रवर्गनिहाय कशा आहेत. त्यासाठी बिंदुनामावली निश्चित करण्यासाठी आणखी कालावधी लागणार आहे. आरक्षणातील बदलामुळे पुन्हा रोस्टर पूर्ण करावे लागणार आहे. त्यासाठी आणखी दोन दिवसाची वाढीव मुदत देण्यात आल्याचे शिक्षण विभागातील सुत्रांनी सांगितले. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलघटकासाठी नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण लागू करण्यात आले. नवीन भरती प्रक्रियेत खुल्या प्रवर्गातील रिक्त जागांमधून या जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत.

प्राथमिक रिक्त जागा

जिल्हा रिक्त जागा

औरंगाबाद ७४८

जालना ४०६

परभणी ४१७

बीड ०

हिंगोली ०

लातूर ९३

नांदेड ३०

उस्मनाबाद ८४

मनपा.............२१

नप.................१७

खासगी संस्था....

औरंगाबाद........ ५४

जालना.............१६

परभणी..............३९

हिंगोली..............१२

बीड..................३२

मराठी माध्यम....१५५२

उर्दू...................२५७

बिंदुनामावलीची प्रक्रिया केली. लातूर विभागात २०७ जागा रिक्त आहेत. अतिरिक्त झालेल्यांचे समायोजन करण्यात आले. रिक्त जागांबाबत आम्ही वरिष्ठांना कळविले आहे.

एस. एम. तेलंग,

उपसंचालक, लातूर

औरंगाबाद विभागाची बिंदुनामावलीची प्रक्रिया आम्ही पूर्ण केलेली आहे. त्यानुसार रिक्त जागांबाबत ही स्पष्टता आहे. नवीन काही बदल असतील तर त्यासाठीही दोन दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे.

वैजनाथ खांडके,

उपसंचालक, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी पिण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र लांबवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात शिरून अनोळखी तरुणाने ३५ हजाराचे मंगळसूत्र लंपास केले. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान हडको एन अकरा भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक राधेशाम अग्रवाल (रा. श्रीकृष्णनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अग्रवाल यांचा हॉटेल व्यवसाय आहे. मंगळवारी सकाळी अग्रवाल यांच्या घरी त्यांची आई व वडील दोघेच होते. यावेळी एका अनोळखी तरुणाने त्यांना पिण्यासाठी पाणी मागितले. अग्रवाल यांच्या आई पाणी आणण्यासाठी स्वंयपाक घरात गेल्या. तेव्हा ही संधी साधून चोरट्याने घरात प्रवेश करत काचेच्या स्लाइडिंग कपाटात ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र घेऊन धूम ठोकली. संशयिताचे अंदाजे वय बावीस वर्ष आहे. त्याचा रंग सावळा, उंची पाच फूट चार इंच, अंगात हाफ शर्ट, पँट आणि पायात सँडल घातली होती.…

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेना नगरसेवक कुलकर्णीवर विनयभंगाचा गुन्हा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गणेशनगर वॉर्डाचा शिवसेना नगरसेवक मकरंद कुलकर्णीवर सिडको पोलिस ठाण्यात विनयभंगाचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलकर्णीवर ११ जानेवारी २०१८ रोजी देखील एक विनयभंगाचा गुन्हा दाखल असून, याच पीडितेने ही तक्रार दिली आहे.

चाळीस वर्षाच्या पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिने जानेवारी २०१८मध्ये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यामध्ये कुलकर्णी याने एमजीएम स्पोर्टस कॉम्पलेक्समध्ये तिची छेडछाड केल्याचा आरोप त्यात केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यापासून कुलकर्णी हा या महिलेचा वाईट हेतूने पाठलाग करीत होता. मंगळवारी दुपारी ही महिला सोसायटीसमोर असलेल्या मेडिकलमधून औषधी घेऊन मोपेडवर घरी जात होती. यावेळी सोसायटीच्या गेटवर कुलकर्णी याने तिला अश्लील इशारे केले. महिलेने कुलकर्णीला जाब विचारला असता, माझ्या नादी लागू नकोस नाहीतर तुझे मी काहीतरी बरेवाईट करून टाकेन, असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मकरंद कुलकर्णीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीएसआय सी. व्ही. ठुबे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैधरित्या वाळू उपसा; सातबाऱ्यावर दंडाचा बोजा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

खासगी जमिनीतून बेकायदा वाळू उपसा केल्याबद्दल दंड न भरल्याचा फटका शेतजमीन मालकाला बसला आहे. तहसील प्रशासनाने या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर ७६ लाख २० हजार रुपये दंडाच्या रकमेचा बोजा चढवला आहे. नदी-ओढ्या काठच्या काही जमिनीत मातीखाली वाळू असते.

तालुक्यातील वाकोद येथील गट क्रमांक ३२७ मध्ये मंदाबाई विष्णू लहाने यांची शेतजमीन आहे. या गटातील खासगी जमिनीमधून ८ ऑक्टोबर २०१८ रोजी विनापरवानगी वाळू उत्खनन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार संगीता चव्हाण यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी मंडळ अधिकारी व तलाठ्यासह या खासगी जमिनीची पाहणी केली असता येथून अंदाजे ३०० ब्रास वाळू अवैधरित्या वाहतूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जमीन मालक मंदाबाई विष्णू लहाने यांना ७६ लाख २० हजार रुपये दंड भरण्याची नोटीस पाठवण्यात आली. लहाने यांना वेळोवेळी दंड भरण्यास सांगण्यात आले, मात्र त्यांनी दंड भरला नाही. परिणामी, तहसील प्रशासनाने आदेश काढून २६ डिसेंबर २०१८ रोजी मंदाबाई लहाने यांच्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर ७६ लाख २० हजार रुपयांचा बोजा चढवला आहे. या कारवाईने फुलंब्री तालुक्यात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३५ लाखांची दारू चोरी; आरोपीला कोठडी

$
0
0

औरंगाबाद : बजाजनगरातून ३५ लाखांची दारू व दारूचा ट्रक चोरून नेल्याप्रकरणात आरोपी भगवान बन्सी बडे याला अटक करून कोर्टात हजर केले असता, आरोपीला शनिवारपर्यंत (१६ फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी बुधवारी (१३ फेब्रुवारी) दिले.

या प्रकरणी प्रमोद यादव चोरमारे (३३, रा. वडीबुद्रुक, ता. भोकरदन, जि. जालना, ह. मु. बजाजनगर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीने १८ जानेवारी रोजी दारुने भरलेला ट्रक घराजवळ उभा केला असता, दारुसह ट्रकची चोरी झाली होती व फिर्यादीच्या तक्रारीवरुन वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी गणेश गोरखनाथ पवार याला अटक करण्यात आली होती व त्याने साथीदाराच्या मदतीने ट्रक व दारुचे बॉक्स चोरल्याची कबुली दिली होती. त्याच्या जबाबानुसार, आरोपी पवार याचा साथीदार भगवान बन्सी बडे (४०, रा. भिलवडे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) याला दुसऱ्या गुन्ह्यातून अटक करून कोर्टात हजर केले असता, आरोपीकडून १६ लाख ४१ हजार ६०० रुपये किंमतीचे २६६ दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले. आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याच्या तपासासह आरोपींच्या ब्यातून चोरी गेलेला अर्धामाल जप्त करणे बाकी आहे व उर्वरित माल हस्तगत करण्यासाठी आरोपीच्या पोलिस कोठडीची गरज आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय घनकचरा संकलन खोलीचे घाटीत उद्घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वैद्यकीय घनकचरा संकलनासाठी घाटीत तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र कक्षाचे उद्घाटन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी डॉ. गजानन खाडीकर यांच्या हस्ते बुधवारी (१३) झाले. या स्वतंत्र कक्षामध्ये सहा बाय सहा क्षमतेचे चार क्युबिकल्स तयार करण्यात आले असून, वेगवेगळ्या पद्धतीच्या वैद्यकीय घनकचऱ्याचे संकलन कक्षात होणार आहे. या छोटेखानी कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपाधिष्ठाता डॉ. राजन बिंदू, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, डॉ. भारत सोनवणे, उपअधीक्षक डॉ. विकास राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिती मुसाडे, डॉ. ज्ञानेश्‍वर दांडेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पस हॅपनिंग्ज

$
0
0

शासकीय अभियांत्रिकीत उद्योजकतेवर कार्यशाळा (फोटो आहे)

औरंगाबाद : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागाकडून उद्योजकता आणि नाविन्यता विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. उपसंचालक डॉ. महेश शिवणकर यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. प्राणेश मुरणाळ, डॉ. उमेश कहाळेकर, डॉ. विवेक क्षीरसागर, र. प. चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. तीन दिवस झालेल्या कार्यशाळेत डॉ. क्रीश संकरण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रम करून घेण्यात आले. दीडशे विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला. कार्याशाळेचे आयोजन डॉ. मेघना नागोरी क्षीरसागर, प्रशांत पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यशाळेसाठी कपिल चांदोरीकर, आदित्य पाटिल, सौरभ देशमुख, ऋषिकेश जाचक, देवयानी कुलकर्णी, मुस्तफा काज़ी, गौरी वैद्य, पूर्वा चौधरी, प्रभलीन बिंद्रा, हृषिकेष मुळावेकर यांनी परिश्रम घेतले.

...तरच भारत महासत्ता : डॉ. खरात(फोटो आहे)

औरंगाबाद : भारतामध्ये गरिबी, बेरोजगारी, जातिवाद, प्रांतवाद, भाषावाद, भ्रष्टाचार यांसारख्या अनेक समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या समस्या दूर झाल्याशिवाय भारत महासत्ता होणार नाही, असे प्रतिपादन डॉ. एकनाथ खरात यांनी केले. लोकसेवा कला व विज्ञान महाविद्यालयात आयोजित 'भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व्याख्यानमाले'त ते बोलत होते. कॉलेजच्या लोकप्रशासन विभागाद्वारे ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. प्राचार्य डॉ. लियाकत शेख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी संयोजक डॉ. संतोष काकडे, डॉ. एस. एस. देशमुख, ग्रंथपाल मुदस्सीर अहमद डॉ. परवेज शेख यांची उपस्थित होती. यावेळी डॉ. खरात म्हणाले, विज्ञान-तंत्रज्ञान व संशोधनावर भर देऊन योग्य तो विकास साधल्यास डॉ. कलाम यांच्या स्वप्नातील भारत शक्य आहे. डॉ. शेख यांचेही यावेळी भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक, लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ. संतोष काकडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. परवेज शेख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. अस्मा परवीन सय्यद यांनी करून दिला तर आभार डॉ. मनीषा भिसे यांनी मानले.

राष्ट्रीय सेवा योजनेचे आठवडाभर शिबिरात (फोटो आहे)

औरंगाबाद : पैठण येथील ताराई महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाचे सात दिवसांचे निवासी शिबिर मुधलवाडी येथे घेण्यात आले. सात दिवसात सहभागी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबवित आपला सहभाग नोंदविला. समारोप प्रसंगी प्रसिद्ध इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रंजना पटेल होत्या. व्यासपीठावर पोलिस निरीक्षक ज्ञारेश्वर पायघन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. राजेश करपे आदींची उपस्थिती होती. डॉ. गणेश शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. गणेश इंगळे यांनी आभार मानले. यावेळी गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

मिलिंद कॉलेजमध्ये दंत तपासणी(फोटो आहे)

औरंगाबाद : मिलिंद कला महाविद्यालयात प्राध्यापक, विद्यार्थ्यांसाठी दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गणपती दंत रुग्णालयाच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करण्यात आली व दातांच्या आजाराविषयी माहिती देण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान, उपप्राचार्य डॉ. संतोष बुरकूल, डॉ. अनिकेत बडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

देवगिरी इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचे यश(फोटो आहे)

औरंगाबाद : देवगिरी अभियांत्रिकी महाविदयालयातील डायनॅमिक बुस्टर्स संघाने भारत फॉर्मुला कार्टिंग स्पर्धेत व्हर्चूअल राउंडमध्ये देशात तिसऱ्या क्रमांक पटकाविला. स्पर्धेची अंतिम फेरी २८ फेब्रुवारी रोजी कोईम्बतूर येथे होणार आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या कौशल्य व गुणांना वाव देणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील विद्यार्थी सहभागी होत असतात. ऑटोमोबाइल डिझाइन, निर्मिती, रेसिंग अशा घटकांवर भर देण्यात येतो. पर्यावरणाच्या विविध पातळीवर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कारची तपासणी केली जाते. तीस विद्यार्थ्यांचा हा संघ असून यात पंधरा विद्यार्थी हे प्रथम वर्षातील आहेत. यामध्ये संघप्रमुख म्हणून मनोज जंगले याच्यासह किरण जगताप, ओंकार जोशी, महेश जाधव, बाळासाहेब ताठे, जतिन अजमेरा, शशांक काळे, तेजस धुप्पड, सागर घुसळकर, भावेरा भगत, अभया आरक, प्रतिक्षा नाईक, श्रावणी मुंगीकर, हर्षदा डोंगरे, आशुतोष जोशी, अथर्व खेकाळे, शौनक पुर्णपात्रे, पियुष खेमनार, वरद जयवळ, ऋतिक गडकर, पुण्णेश नागोरी, आदित्य घरटे, नेहाल खान, नकुल पाटील, प्रमोल तुपे, अनिकेत आढावे यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे कॉलेजतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव सतिश चव्हाण यांच्यासह शेख सलिम शेख अहमद, सदस्य विवेक भोसले, स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य विश्वास येळीकर, महाविदयालयाचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर, उप्राचार्य प्रा. संजय कल्याणकर विभागप्रमुख डॉ. सत्यवान धोंडगे, डॉ. राजेश औटी, प्रा. प्रकाश तौर, प्रा. उमेश पाटील, प्रा. रुपेश रेब्बा, डॉ. सुनील शिंदे यांनी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images