Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महावितरण कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महावितरणच्या यंत्रचालक कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, शिविगाळ करीत कार्यालयाबाहेर काढून कार्यालयाला कडी लावून घेणारा आणि विभागप्रमुख अभियंत्यांनाही फोनवर शिविगाळ करणारा आरोपी रमेश सांडू दाभाडे याला सोमवारी (२५ फेब्रुवारी) अटक करण्यात आली. आरोपीला कोर्टात हजर केले असता, आरोपीला बुधवारपर्यंत (२७ फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी दिले.

या प्रकरणी महावितरणचा यंत्रचालक शिवाजी यादव लिजडे (३७, रा. सिडको वाळूज महानगर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २४ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी ४ ते रात्री १२ या वेळेत फिर्यादीची सिडको वाळूज महानगर येथील उपकेंद्रात ड्युटी होती. त्याचदिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपी रमेश सांडू दाभाडे (५५, रा. खवड्या डोंगर, तिसगाव शिवार) हा कार्यालयात आला व 'मोठे वायरमन कुठे आहेत, फोन उचलत नाहीत' असे म्हणत आरोपीने फिर्यादीचा हात पकडून फिर्यादीला कार्यालयाबाहेर काढले व कार्यालयाची कडी लावून घेतली. त्याला विरोध केला असता, आरोपीने फिर्यादीला शिविगाळ व धक्काबुक्की केली. या प्रकाराबाबत फिर्यादीने प्रमुख अभियंता सचिन उकंडे यांना फोन करून माहिती दिली असता, आरोपीने फिर्यादीच्या हातातील मोबाइल हिसकावून घेत त्यांनाही शिविगाळ केल्याची तक्रार फिर्यादीने केली. त्यावरुन एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bगुन्ह्याच्या उद्देशाचा होणार तपास

\Bप्रकरणात आरोपीला सोमवारी अटक करून कोर्टात हजर केले असता, आरोपीचा गुन्हा करण्याचा नेमका उद्देश कोणता होता, आरोपीला कोणी गुन्हा करण्यास प्रवृत्त केले का, आरोपीला गुन्ह्यात कोणी मदत केली का आदींचा तपास करणे बाकी असल्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२५ लाख डिपॉझिट केल्याच्या बोगस बाँडद्वारे केली फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

२५ लाख रुपयांचे डिपॉझिट प्रत्यक्षात केलेले नसताना, तेवढी रक्कम डिपॉझिट केल्याचा बनावट बाँड तयार करून वर्षभराचे एक लाख ९२ हजार ४०० रुपयांचे मेडिकल दुकानाचे भाडे न भरता डिपॉझिट परत देण्याची मागणी करून शहरातील डॉक्टरची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी वैभव दिलिपराव दिग्रसकर याला अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर केले असता, आरोपीला मंगळवारपर्यंत (२६ फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी दिले.

या प्रकरणी डॉ. सारंग श्याम चोबे (४०, रा. तारामंडल सोसायटी, झांबड इस्टेट, चेतनानगर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ३० मार्च २०१७ रोजी फिर्यादीने त्याच्या मालकीचे चेतनानगर परिसरातील दुकान पाच वर्षांच्या भाडेतत्वावर आरोपी वैभव दिलीपराव दिग्रसकर (३४, रा. दिग्रस, ता. कंधार, जि. नांदेड, ह.मु. प्रतापनगर, औरंगाबाद) याची आरोपी पत्नी अमृता वैभव दिग्रसकर हिला चेतना मेडिकल अँड स्टोअर्स हे दुकान भाडेतत्वावर चालवण्यासाठी दिले. त्यावेळी शंभर रुपयांच्या बाँडवर करारनामा करण्यात आला होता व परिचित फार्मासिस्टच्या नावावर मेडिकल दुकान चालवण्याचा परवाना घेतला व दुकान चालवण्याचा व्यवसाय सुरू केला. मात्र जानेवारी २०१८ पासून दुकानाचे भाडे आज देतो, उद्या देतो करीत भाडे दिलेच नाही. २० डिसेंबर २०१८ रोजी आरोपी वैभव याने '२५ लाखांचे डिपॉझिट परत दिल्याशिवाय दुकानाचे भाडे देणार नाही व दुकान खाली करणार नाही, काय करायचये ते करुन घ्या' असे म्हणत करारनामा केलेल्या बाँडची छायांकित प्रत दाखवली. त्यात २५ लाखांची अनामत रक्कम दिल्याचा उल्लेख होता. शंका आल्याने फिर्यादीने अन्न व औषध प्रशासनाकडून माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असता, आरोपींनी दुकानाच्या परवानगीवेळी सादर केलेल्या करारनाम्याच्या बाँडची छायांकितप्रत प्रशासनाने सत्यप्रत करुन दिली. त्यात २५ लाखांच्या अनामत रकमेचा उल्लेख नव्हता. त्याचबरोबर वर्षभराचे एक लाख ९२ हजार ४०० रुपयांचे भाडे न देता आर्थिक फसवणूक केली व मानसिक त्रास दिल्याची तक्रार दिल्यावरुन भारतीय दंड संहितेच्या ४२०, ४६८, ५०६, ३४ कलमान्वये उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bआरोपीच्या पत्नीला अटक करणे बाकी

\Bप्रकरणात आरोपी वैभव दिग्रसकर याला २४ फेब्रुवारी रोजी अटक होऊन कोर्टात हजर केले असता, आरोपीच्या ताब्यातून बाँड पेपर, कागदपत्रे तसेच वादग्रस्त मजकूर ज्या संगणकावर टंकलिखित केले, ते संगणक व प्रिंटर जप्त करणे बाकी आहे. तसेच आरोपीची पत्नी अमृता दिग्रसकर हिला अटक करावयाची असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील मनिषा गंडले यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशाचा मोबाइल, पैसे चोरले; आरोपीला कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ट्रॅव्हल बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाच्या मोबाइलसह पैसे लांबविणाऱ्या चोरट्याला सहप्रवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले; परंतु चोरट्याचा साथीदार हा चोरलेला मोबाइल व पैसे घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. या प्रकरणात आरोपी तौफिक इस्माईल शहा याला अटक करून सोमवारी (२५ फेब्रुवारी) कोर्टात हजर करण्यात आले असता आरोपीला बुधवारपर्यंत (२७ फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी दिले.

या प्रकरणी सुभाष विठ्ठलराव पळशीकर (५५, रा. एन-५, सिडको) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीचे व्याही अनंतराव देशपांडे व त्यांची पत्नी यांना अमरावतीला जायचे होते. त्यासाठी फिर्यादी, फिर्यादीचा मुलगा, व्याही व त्यांची पत्नी असे चौघे रविवारी (२४ फेब्रुवारी) रात्री ११.२० वाजता वसंतराव नाईक महाविद्यालयाजवळील ट्रॅव्हल्सच्या पिकअप पॉइंटकडे गेले होते. त्या ठिकाणी देशपांडे हे ट्रव्हल बसमध्ये चढत असताना त्यांच्या खिशातील मोबाइल व पैसे चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी एक व्यक्ती ट्रव्हल्समधून खाली उतरत असताना त्याने दुसऱ्या व्यक्तीच्या हातात चोरलेला मोबाइल व पैसे देताना देशपांडे यांना दिसले. त्यामुळे त्यांनी चोर-चोर असा आरडा-ओरड केल्याने सहप्रवाशांनी दोघा चोरट्यांपैकी एकाला पकडले, तर दुसरा चोरटा संधी साधत मोबाइल व पैसे घेऊन पसार झाला. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी तौफिक इस्माईल शहा (२८, रा. जहांगीर कॉलनी) याला अटक करुन सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीच्या साथीदाराचा शोध घेऊन त्याला अटक करणे तसेच गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल जप्त करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरेश पाटील : प्रतिक्रिया

0
0

सुरेश पाटील हे गेली २५ वर्षे जिल्हा बँकेचे चेअरमन होते. त्यांच्या कार्यकाळात बँकेचा मोठा विस्तार व प्रगती झाली. मध्यतंरी बँक अडचणीत आली होती. योग्य नियोजन करत त्यांनी या अडचणीतून बँक बाहेर काढली. सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, ठेवीदार, कर्जदार तसेच विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील घटकांशी त्यांचे चांगले संबंध राहिले. सहकार क्षेत्रातील अभ्यासक एक चांगला माणूस आज आपल्यातून निघून गेला आहे.

हरिभाऊ बागडे, अध्यक्ष विधानसभा

-

सुरेश पाटील यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची व काँग्रेस पक्षाशी मोठी हानी झाली आहे. हिशोबात अत्यंत काटेकोर असलेल्या सुरेश पाटील यांनी अडचणीत सापडलेल्या बँकेला वर काढले. माझे त्यांच्याशी व्यक्तिगत संबंध होते. त्यांची निवडणूक असो की त्यांचा मुलगा नितीन वा माझी आम्ही एकमेकांचे हक्काने काम केले. सहकार क्षेत्रातील मोठ्या व्यक्ती आपल्यातून गेली आहे.

राजेंद्र दर्डा, माजी मंत्री

--

माझे वडील व सुरेश पाटील यांची घनिष्ठ मैत्री होती. आमच्या कुटुंबीयांचे त्यांच्याशी जिव्हाळ्यांचे संबंध होते. मी लहानपणापासून सुरेश पाटील यांना अगदी जवळून पाहत आलो. एक कुशल प्रशासक अशी त्यांची स्वत:ची ओळख होती. कौटुंबिक व राजकीय दृष्ट्या ते माझे मार्गदर्शक होते. त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे.

सतीश चव्हाण - आमदार

--

सहकार क्षेत्रामध्ये अत्यंत उल्लेखनीय काम त्यांच्या हातून झाले. त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

नंदलाल काळे, उपाध्यक्ष, जिल्हा सहकारी बँक

--

कडक शिस्त व वेळेचे बंधन पाळणाऱ्या सुरेश पाटील यांनी बँकेच्या कारभाराला एक शिस्त लावून दिली. ते एवढ्या टोकाचे पाऊल उचलतील, असे वाटले नाही.

जावेद पटेल, संचालक, जिल्हा सहकारी बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका आयुक्तांकडून ११ अभियंत्यांची नियुक्ती

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी महापौर नंदकुमार घोडेले व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अकरा कनिष्ठ अभियंत्यांना सोमवारी नियुक्ती पत्र दिले. या उमेदवारांची रविवारी परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेला २०९३ उमेदवार बसले होते.

महापालिकेतील विविध विभागांच्या कनिष्ठ अभियंतापदासाठी पालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला २०९३ उमेदवार बसले होते. त्यानंतर सोमवारी तोंडी परीक्षा घेण्यात आली. तोंडी परीक्षेसाठी एका जागेसाठी तीन उमेदवार बोलावण्यात आले होते. त्यातून अकरा उमेदवारांची निवड कनिष्ठ अभियंता म्हणून करण्यात आली. यातील नऊ जणांना महापौर घोडेले, सभागृहनेता विकास जैन व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले. दोन उमेदवार एससीबीसी प्रवर्गातील असल्यामुळे त्यांना प्रमाणपत्र आणण्यास सांगण्यात आले. तोपर्यंत त्यांचे नियुक्तीपत्र स्थगित ठेवण्यात आले. संदेश इरगेवार (नांदेड), आरती नवगिरे (आंबेडकरनगर,औरंगाबाद), राहुल मालखेडे (अमरावती), किरण सुखदेव (राहुरी), मिलिंद भामरे (धुळे), श्रद्धा मानकर (अमरावती), प्रियांका दिनकर, महेश चौधरी, लक्ष्मीकांत खोत, शामली लोहारे (औरंगाबाद), अमर अरगडे (बार्शी) अशी नियुक्ती पत्रासाठी निवड केलेल्यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंत्यसंस्कार योजना अधांतरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना महापौरांनी घोषणा केलेली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची मोफत अंत्यसंस्कार योजना अद्याप अधांतरीच आहे. याबद्दल नगरसेवकांनी प्रश्न विचारल्यावर महापौरांनी उत्तर देण्याचे टाळले. या योजनेबद्दल प्रशासन देखील उदासीन आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने तत्कालीन उपमहापौर संजय जोशी यांनी मोफत अंत्यसंस्कार योजना सुरू केली होती. एक वर्ष ही योजना चालली आणि त्यानंतर प्रशासनाने आर्थिक तरतुदीचे देत बंद केली. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून मोफत अंत्यसंस्कार योजना बंदच आहे. विद्यमान महापौर नंदकुमार घोडेले यांनी ही योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा दोन महिन्यांपूर्वी केली. महापालिकेच्या फंडातून यासाठी खर्च केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे योजना पुन्हा सुरू होईल असे मानले जात होते, परंतु प्रत्यक्षात योजना अद्याप सुरू झाली नाही. शहरात महापालिकेच्या हद्दीत महापालिका आणि वक्फ बोर्डाच्या मालकीचे मिळून ५१ स्मशानभूमी आणि कब्रस्तान आहेत. दरवर्षी सुमारे सात हजार ते साडेसात हजार मृत्यूची नोंद या ठिकाणी होते. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी साधारणपणे तीन ते साडेतीन हजार रुपये खर्च येतो. हा खर्च महापालिकेने करावा, अशी सूचना महापौरांनी प्रशासनाला केली आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप यात पुढाकार घेतला नाही. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपचे नगरसेवक नितीन चित्ते यांनी मोफत अंत्यसंस्कार योजनेचा मुद्दा उपस्थित केला. महापौरांनी ही योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली असली, तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिक स्माशनभूमीत जातात आणि तेथून फोन करून पैसे भरण्याबद्दल विचारतात. मोफत अंत्यसंस्कार योजना सुरू करण्यात आली आहे की नाही याचा खुलासा करा, अशी मागणी त्यांनी केली होती. महापौरांनी सर्वसाधारण सभेत याचा खुलासा करणे टाळले. सर्वसाधारण सभा झाल्यावर चित्ते यांनी महापौरांना अँटीचेंबरमध्ये पुन्हा हाच प्रश्न विचारला तेव्हाही त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. एखाद्या योजनेवरचा खर्च कमी करून मोफत अंत्यसंस्कार योजना सुरु करावी अशी चित्ते यांची मागणी आहे.

\Bखर्चातही 'वाटाघाटी'

\Bसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पालिकेचे प्रशासन अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या खर्चातही वाटाघाटी करण्यात गुंतले आहे. साडेतीन हजार रुपयांऐवजी दोन ते अडीच हजार रुपयांत हे काम होते का, याची चाचपणी केली जात आहे. अंत्यसंस्कारासारख्या विधीमध्ये येणाऱ्या खर्चाबद्दल प्रशासन इतके 'सतर्क' असेल तर अन्य कामांवर केल्या जाणाऱ्या खर्चाबद्दल प्रशासनाची 'सतर्कता' दिसून येत नाही, असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना ५ हजार रुपये निवृत्ती वेतन द्या

0
0

म. टा. औरंगाबाद

राज्यातील ६० वर्षांवरील शेतकरी, शेजमजूर, असंघटित कामगारांना प्रतिमाह ५ हजार रुपये निवृत्ती वेतन द्या, या मागणीसाठी जनता दलाच्यावतिने (सेक्युलर) अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

२०११ मध्ये जनता दल (सेक्युलर)च्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये राज्यातील ६० वर्षांवरील शेतकरी, शेतमजूर व असंघटित कामगारांना दरमहा पेन्शन मिळाली पाहिजे म्हणून माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत ठराव पारित करण्यात आला होता व राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट ५ हजार रुपये निवृत्ती वेतन मिळावे यासाठी जनता दलाने सातत्याने प्रयत्न केले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, गोवा, सिक्कीम, उत्तराखंड राज्यामध्ये शेतकऱ्यांना पेन्शन मिळत आहे, ओरीसामध्ये मिटक फाउंडेशनमार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांना पेन्शन मिळते. आता मध्यप्रदेश, दिल्ली व हरियाणा सरकारनेही शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची घोषणा केली असल्याचे अपर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे. निवेदनावर अजमल खान, अॅड. आसाराम लहाने पाटील, भाऊसाहेब जाधव, मुख्तार खान, शेख रसूल फूलसिंह राजपूत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशोधक विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात स्पर्धा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विज्ञान दिनानिमित्त संशोधक विद्यार्थ्यांसाठी संशोधन सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. २८ फेब्रुवारी आणि एक मार्च रोजी ही स्पर्धा होणार आहे. सर्वोत्कृष्ट संशोधनाला मान्यवर शास्त्रज्ञाच्या नावाचे पारितोषिक देण्यात येईल, अशी माहिती समन्वयक डॉ. गुलाब खेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेचे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता सिफार्ट सभागृहात मान्यवर शास्त्रज्ञाच्या हस्ते उदघाटन होणार आहे. या उपक्रमात पूर्णवेळ संशोधक विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. तसेच स्कोपस प्रमाणित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये एक मार्च २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत शोधनिबंध प्रकाशित असावा. लाइफ अँड एन्व्हॉयर्नमेंट, केमिकल अँड फार्मास्युटीकल्स, फिजीकल अँड स्मार्ट मटेरियल, कम्प्युटर अँड मॅथेमेटीकल सायन्स या चार गटात स्पर्धा होईल. मागील पाच वर्षांपासून विभागनिहाय हा उपक्रम घेण्यात येत होता. यावर्षी एकत्रित विज्ञान दिन साजरा होणार आहे. गटनिहाय तीन हजार, दोन हजार आणि एक हजार रुपये पारितोषिक आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी 'सायन्स फॉर सोसायटी' हा विशेष कार्यक्रम होईल. या पत्रकार परिषदेला डॉ. विक्रम खिल्लारे, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. बापू शिंगटे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अबब...२० कोटींचे वीजबिल थकले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शहरात ११ हजार वीज ग्राहकांकडे २० कोटींचे वीजबिल थकले आहे. त्यांनी बिल न भरल्यास कडक कारवाई करू,' अशा इशारा महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिला आहे.

औरंगाबाद परिमंडलात जानेवारीअखेर ४५ हजार ५८४ वीजग्राहकांकडे ४७ कोटी ५५लाख रुपये थकबाकी आहे. यात औरंगाबाद शहर मंडलात ११ हजार ५३२ ग्राहकांकडे २० कोटी ३० लाख, औरंगाबाद ग्रामीण मंडलात १९ हजार ३६२ ग्राहकांकडे १५ कोटी ४ लाख, तर जालना मंडलात १४ हजार ६९० ग्राहकांकडे १२ कोटी २१ लाख रुपये थकबाकी आहे. गेल्या तीन आठवड्यांत ७३६ ग्राहकांचा वीजपुरवठा एक कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. तसेच ४९२१ ग्राहकांचा वीजपुरवठा चार कोटी ६२ लाखांच्या थकबाकीसाठी तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. या मोहिमेत १३ हजार ७११ ग्राहकांकडून सहा कोटी ३५ लाख रुपये वसुली झाली.

दरम्यान, थकबाकीदारांविरोधात सुरू असलेली धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणने विविध पथके स्थापन केली आहेत. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर महावितरणकडे थकबाकीच्या संपूर्ण रकमेसह पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच वीजपुरवठा पूर्ववत जोडला जात आहे. तसेच वीजपुरवठा खंडित केल्यावर थकबाकी न भरता परस्पर वीजपुरवठा जोडणाऱ्या ग्राहकांवर थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा इशाराही महावितरणने दिला आहे.

\Bऑनलाइन बिल भरणा सोयीचा

\B'वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीदारांनी वीजबिलांचा त्वरीत भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. वीजबिलांचा भरण्यासाठी स्थानिक वीजबिल भरणा केंद्रांसह व घरबसल्या ऑनलाइन पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाइट तसेच महावितरणच्या मोबाइल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे,' असे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदारांच्या ‘पुडी’विरोधात आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाआरोग्य शिबिरात सुप्रसिद्ध डॉक्टरांसमोर 'आपण जप आणि भस्माची पुडी देऊन रुग्ण बरे करतो' असा दावा करणारे खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात सोमवारी क्रांतीचौकात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आंदोलन करण्यात आले.

शहरातील कचरा प्रश्न, खड्डे, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आदी प्रश्नांबाबत खासदारांनी पुडीतंत्र वापरावे, अशी घोषणाबाजी करत यावेळी निषेध करण्यात आला. आंदोलनात राजीव जावळीकर, मंगेश साळवे, कार्तिक फरकाडे, रितेश देवरे, संदीप राजपूत, उमेश काळे, गजाजन गोमटे, सागर कस्तुरे, विशाल गोंधळे, नितीन कल्याणकर, शुभम घोरपडे, किरण म्हस्के, प्रशांत आटोळे, रविराज कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. जप किंवा पुडी प्रयोगाची भाषा करून खासदारांनी नामांकित डॉक्टरांना वेड्यात काढले. त्यांनी घाटी रुग्णालयाच्या आयसीयूबाहेर बसून जप करावा किंवा रुग्णांना पुडी द्यावी. त्यामुळे घाटीत कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होणार नाही, असे आवाहनही आंदोलकांनी केले.

गुन्हा दाखल करावा…

खासदार चंद्रकांत खैरे यांचे जप व पुडी प्रयोगाबाबत केलेले वक्तव्य हे अंधश्रद्धा पसरविणारे आहे. यामुळे खासदारांच्या वक्तव्याची दखल घेऊन पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३मधील कलम २ व कलम ११ (अ) अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याच्या खात्यातील रक्कम बँकेने घेतली परत

0
0

नांदेड:

पंतप्रधान शेतकरी सन्माननिधीचे सकाळी वाटप झाल्यानंतर सायंकाळी अनेक खात्यातील रक्कम बँकेने परत घेतली. तांत्रिक कारणामुळे हा विचित्र प्रकार घडल्याने अनेक शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, या शेतकऱ्यांना पुन्हा पैसे मिळणार असल्याचे शासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले.

पाच एकर किंवा त्यापेक्षा कमी शेत जमीन असलेल्या शेतकरी कुटूंबांना वर्षाला सहा हजार रूपये अनुदान देण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला. ही योजना यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारनेही दिवस रात्र एक केला. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर येथून या योजनेची सुरुवात करण्यात आली. हे करताना दोन हजार २१ कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचे जाहीर केले होते. नांदेड जिल्ह्यात दोन लाख ६० हजार ३०४ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, आमदार राम पाटील-रातोळीकर यांच्या प्रमुख उपस्थित या योजनेची सुरुवात करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील एक हजार ५७५ गावांतील शेतकऱ्यांना या योजनाचा लाभ मिळाला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते सुरुवात झाल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात आली. या योजनेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर सनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

अनेक शेतकऱ्यांना या योजनेसाठी आपण पात्र आहोत की नाहीत. याची कल्पानाही नव्हती. बँकेत दोन हजार रुपये जमा झाल्याचा संदेश मिळाल्यानंतर आनेकांना सुखद धक्का बसला. केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या योजनेतील अनुदान हस्तांतरित करतांना तांत्रिक चूक झाल्याचे सांगून काही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केलेली रक्कम परत सरकारच्या खात्यात जमा करण्याची सूचना दिली. जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत एकूण आठ हजार १८२ शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आले होते. त्यापैकी दोन ते अडीच हजार शेतकऱ्यांचे अनुदान परत सरकार तिजोरी जमा करण्याचे आदेश झाली. त्यापुढे काही शेतकऱ्यांसाठी हे अनुदान क्षणभंगुर ठरले.

लवकरच पैसे जमा होणार
ज्या शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे परत घेण्यात आले आहेत. त्यांना लवकरच पैसे पुन्हा मिळतील असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. तांत्रिक कारणामुळे घडलेल्या या प्रकारामुळे अनेक शेतकऱ्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला. या संदर्भात नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेनीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार जलील यांनी विधानसभेत दाखविले गुटख्याचे पाकीट

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

राज्यात गुटखा विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आलेला आहे. तरीही हा गुटखा बाजारात विक्रीला कसा येतो? असा सवाल करीत आमदार इम्तियाज जलील यांनी विधानसभेत गुटख्याचे पाकीट सादर केले.

राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, गुटखा सह प्रतिबंधित पदार्थांची विक्री सर्रास होत आहे. याला पोलिस विभाग आणि अन्न व औषधी प्रशासन जबाबदार आहे. हफ्ता वसूल करून हा व्यवसाय सुरू असल्याचाही आरोप जलील यांनी केला.

विशेष पॅकेज द्या

औरंगाबाद शहर ऐतिहासिक दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जात आहे. या ऐतिहासिक दरवाजांची अवस्था दयनीय झाली आहे. या ऐतिहासिक दरवाजांचे संरक्षण करण्यासाठी विशेष पॅकेज देण्याचीही मागणी आमदार इम्तियाज जलील यांनी केली.

अनुदानाच्या पैशातून विद्यापीठाचा विकास करा

शासनाकडून हज यात्रेवर अनुदान देण्यात येत होते. हे अनुदान बंद करण्यात आले आहे. अनुदानावर होणाऱ्या खर्चातून औरंगाबाद शहरात कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करावे, जेणेकरून कौशल्य विकास विद्यापीठाचा भार शासनावर येणार नाही, असा प्रस्ताव आमदार जलील यांनी विधानसभेत सरकारसमोर ठेवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोठ्याचेच लाड का होतात?, धाकट्याने केला भावाचा खून

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आपल्याकडे सर्वच जण दुर्लक्ष करतात, मोठ्या भावाचेच जास्त लाड होतात, हा राग मनात धरून जुळ्यांमधील धाकट्या भावाने झोपेत असलेल्या मोठ्याच्या डोक्यात हातोडीने वार करत खून केला. ही घटना मंगळवारी (२६ फेब्रवारी ) दुपारी कैलासनगर भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी खून करणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलासनगरात एक महिला १५ वर्षीय जुळ्या मुलांसह राहते. ही दोन्ही मुले पेपर विकतात व त्यावरच हे कुटुंब उदरनिर्वाह करते. या मुलांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र दहा वर्षांपूर्वीच हरवले होते. ते गुजराती शाळेत दहावीचे विद्यार्थी आहेत. मोठ्याचेच जास्त लाड होतात, माझ्याकडे सर्वजण दुर्लक्ष करतात, अशी खंत धाकट्याला होती. या रागातूनच मोठ्या भावाला धडा शिकविण्याचा निर्णय धाकट्याने घेतला. त्यांची आई मंगळवारी सिल्लोड येथे नातेवाईकांकडे लग्नासाठी गेली होती. दुपारी दोघे एकाच पलंगावर झोपले होते. घरी कोणी नाही व आई सुद्धा गावाला गेल्याची संधी साधून धाकट्याने हातोडी घेऊन झोपेत असलेल्या मोठ्याच्या डोक्यात घातली. हातोडीचा वार वर्मी लागल्याने मोठा भाऊ बेशुद्ध पडला. डोक्यातून रक्ताच्या धारा लागल्याने काही वेळातच त्याचा जागीच मृत्यू झाला.

काकाच्या घरी जाऊन सांगितले खोटे

यात आपण पकडले जाऊ या भीतीने धाकट्या भावाने बनाव केला़. त्याने दुपारी साडे चारच्या दरम्यान शेजारी राहणाऱ्या काकाचे दार ठोठावले. मोठ्या भावाला कोणीतरी मारल्याचे त्याने काकाला सांगितले. त्यांनी घरात येऊन पाहिल्यानंतर पलंग व फरशीवर रक्ताचे थारोळे दिसले. काकाने माहिती कळवताच सहायक पोलिस आयुक्त गुणाजी सावंत, जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंह जारवाल, उपनिरीक्षक दत्ता शेळके यांच्यासह जिन्सी आणि गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी भेट दिली.

माहितीत तफावत असल्याने संशय

घटनेची माहिती घेताना पोलिसांना धाकट्या भावाच्या बोलण्यात तफावत असल्याचे जाणवले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी घरातून हातोडी जप्त केली आहे. त्याच्या आईला घटनेची माहिती न देता तत्काळ औरंगाबादला येण्याचा संदेश दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघोबाचे हस्तांतरण लांबले!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द झाल्यामुळे या प्राणिसंग्रहालयातील वाघाचे हस्तांतरण लांबले आहे. मुंबईतील भायखाळा येथील प्राणिसंग्रहालयात औरंगाबादच्या वाघाची मागणी होती.

विविध त्रुटींमुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाची मान्यता तीन महिन्यांपूर्वी रद्द केली. त्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ दिल्लीत वन व पर्यावरण मंत्रालयाच्या सचिवांना भेटले. मान्यता रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याचे सचिवांनी मान्य केले, पण अद्याप तसे पत्र महापालिकेला प्राप्त झाले नाही. त्यामुळे प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्दच असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, मुंबईतील भायखाळा येथील प्राणिसंग्रहालयाने औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार करून एका पिवळ्या वाघाची मागणी केली आहे. प्राणिसंग्रहालयात सध्या सात पिवळे वाघ आहेत. त्यामुळे त्यापैकी एक वाघ मुंबईला पाठवण्यास हरकत नसल्याचे मत प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाने व्यक्त केले आहे. मात्र, प्राणिसंग्रहालयातील एखादा प्राणी दुसऱ्या प्राणिसंग्रहालयाला पाठवायचा असेल तर त्याला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची परवानगी लागते. औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यताच रद्द झालेली असल्यामुळे वाघाच्या हस्तांरणास प्राधिकरणाने अद्याप मान्यता दिली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनाप्रमुखांच्या शिल्पाचे दोन मार्चला उद्घाटन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिल्पाचे उद्घाटन दोन मार्च रोजी केले जाणार आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. जालना रोडवरील महर्षी दयानंद चौकात बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे, पण अद्याप त्याला मुहूर्त लागलेला नाही. गेल्या महिन्यात या कामाची निविदा काढण्यात आली. आता दोन मार्च रोजी उद्घाटन होईल, असे महापौरांनी स्पष्ट केले. याच दिवशी रस्ता दुभाजक, सौंदर्यबेट विकसित करण्यासाठी दत्तक देण्याचा कार्यक्रम देखील घेण्यात येणार आहे. सुमारे पंचेवीस रस्ता दुभाजक आणि सौंदर्यबेट विकासकांना दत्तक दिले जाणार आहेत. याच दिवशी पंधरा सुलभ शौचालयांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पन्नास हजारांसाठी सीसीटीव्ही बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने केवळ पन्नास हजारांची तरतूद गेल्या काही महिन्यांपासून न केल्यामुळे सिद्धार्थ उद्यानातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. उद्यानातील पंधरा पैकी फक्त एक कॅमेरा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

सिद्धार्थ उद्यान शहरवासियांच्या आकर्षणाचा विषय आहे. या उद्यानात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कॅमेऱ्यांची नियमित देखभाल दुरुस्ती करावी लागते. मात्र, देखभाल-दुरुस्ती न केल्यामुळे १५ पैकी १४ सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. या कॅमेऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी केवळ पन्नास हजारांचा खर्च येणार आहे. या खर्चाची फाइल काही महिन्यांपासून लेखा विभागात पडून आहे. अद्याप त्यावर निर्णय झाला नाही. दुसरीकडे सफारी पार्कसाठी वेगळी तरतूद उपलब्ध नसल्यामुळे सध्या सिद्धार्थ उद्यानाच्या उत्पन्नातून सफारी पार्कचे काम करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. यासाठी शंभर एकर जागेभोवती खंदक खोदून त्यात बांबूची लागवड केली जाणार आहे. मिटमिटा परिसरात सफारी पार्क विकसित करण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला शंभर एकर जागा दिली. या जागेवर आवश्यक तो विकास करण्यासाठी महापालिकेने ब्रिजलाल शर्मा या एजन्सीची नियुक्ती केली आहे.

\B'सिद्धार्थ'च्या उत्पन्नातून वृक्षारोपण

\Bविकासकामे करण्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद नसल्यामुळे सिद्धार्थ उद्यानाच्या उत्पन्नातून वृक्षारोपणासारखी कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालय आणि सिद्धार्थ जलतरण तलाव याचे मिळून वर्षाला पाच कोटींचे उत्पन्न मिळते. हे उत्पन्न सिद्धार्थ उद्यानाचे काम करण्यासह सफारी पार्कमधील कामांसाठी खर्च केले जाणार आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी ही माहिती दिली. सफारी पार्कच्या जागेभोवती खंदक खोदण्यात आले आहेत. त्यात बांबूची लागवड केली जाणार आहे. हे काम येत्या काही दिवसात सुरू केले जाणार जाणार आहे. महापालिकेला यंदाच्या पावसाळ्यात वीस हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट राज्य शासनाने दिले आहे. त्याशिवाय अमृत योजनेमधून सात हजार वृक्षांची लागवड महापालिकेला करावी लागणार आहे. महापालिकेच्या नर्सरीत साठ हजार रोपे तयार आहेत. त्यातून ही लागवड केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्जिकल स्ट्राइकने जुन्या आठवणी जाग्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कंदहार विमान अपहरण प्रकरणात 'जैश'चा म्होरक्या मसूद अझहरचा मोठा भाऊ इब्राहिम अझर याला भारतीय हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यात यमसदनी धाडले. कंदहार विमान अपहरणात याच दहशतवाद्यांनी औरंगाबादमधील जेएनईसीचा माजी विद्यार्थी रूपीन कट्याल याची हत्या केली होती.

जुन्या आठवणींना उजाळा देताना प्राचार्य प्रताप बोराडे म्हणाले, 'भारतीय हवाई दलाने लढाऊ विमानांच्या सह्याने पाकिस्तानात घुसून बालाकोटमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाले. काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा मुख्य सुत्रधार असलेला 'जैश'चा दहशतवादी मुफ्ती अझर खान आश्मिरी आणि जैशचा म्होरक्या मसूद अझहर मोठा भाऊ इब्राहिम अझर हा आजच्या हल्ल्यात मारला गेला. १९९९मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या आयसी ८१४ या विमानाचे अपहरण ज्या दहशतवाद्यांनी केले होते, त्यात इब्राहिमचा समावेश होता. या विमानातील ज्या प्रवाशाला अतिरेक्यांनी मारले तो रूपीन कट्याल औरंगाबादच्या जेएनईसी अभियांत्रिकी कॉलेजचा माजी विद्यार्थी. १९९५च्या बॅचचा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर असलेला रूपीन लग्नानंतर हनिमूनसाठी काठमांडू येथे गेला. अतिरेक्यांनी त्याची हत्या केल्यानंतर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना ही बातमी समजली. त्यावेळी गॅदरिंग सुरू होते. सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण करत त्याची आठवण केली. त्या अपहरणात जो अतिरेकी होता त्याचा भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात खात्मा झाला,' अशी आठवण त्यांनी सांगितली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगार खेळणाऱ्या दहा जणांवर गुन्हे दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात दोन विविध ठिकाणी जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करत दोन प्रकरणात दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी दोन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नारेगाव येथील बंद पडलेल्या देवगिरी टेक्सटाइल कंपनीच्या मोकळ्या जागेवर सोमवारी काही जण जुगार खेळत होते. या प्रकरणी संतोष लक्ष्मण ससाणे, समीर शेख कडू, शेरू मुकीम शेख, दगडू लक्ष्मण ससाणे (सर्व रा. मिसारवाडी) या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी कारवाईत रविवारी वळदगाव शिवारात माता मंदिराजवळ करण्यात आली. येथे झन्ना मन्ना जुगार खेळणाऱ्या योगेश अंबादास क्षीरसागर, बाळु मगन पिंपळे, (दोघे रा. पंढरपूर), विजय चंदनमल मुनोत, मधुकर नाथुजी मोहिते (दोघे रा. अहमदनगर), राजाराम जगनाथ धोडके (रा. वळदगाव) यांच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन विविध अपघातात सहा जण जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात झालेल्या तीन विविध अपघातात सहा जण जखमी झाले. यात मिल कॉर्नर येथील सिग्नलवर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. मोंढा नाका सिग्नलवरील एका अपघातात दोन जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

महापालिकेचे कर्मचारी हैदर बेग जमील (रा. हर्षनगर) हे २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे पाच वाजता दुचाकीवरून (एम एच २० ए के ६३८१) पत्नी आणि दोन मुलींना घेऊन कांचनवाडी येथे लग्न समारंभासाठी जात होते. मिल कॉर्नर येथील सिग्नल सुटल्यानंतर जाताना मागून आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत चार जण जखमी झाले. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विनायक सोपानराव तोरणे (वय ६०, रा. हिमांशू अपार्टमेंट, ज्योतीनगर) हे २३ फेब्रुवारी रोजी पत्नी सह एमजीएम हॉस्पिटल येथे उपचारासाठी जात असताना सकाळी पावणे सात वाजता मोंढा नाका उड्डाणपुलावर मागून आलेल्या ट्रॅव्हल्स बसने (जी जे १४ क्यू ३३९९) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या दोघे जखमी झाले. अनंत उमाकांत देशमुख (वय ६०, रा. प्लॉट नंबर ६, तळेश्वर कॉलनी, मकबरा रोड) हे ७ फेब्रुवारी रोजी पावणे नऊ वाजता कोकणवाडी मार्गे जिल्हा न्यायलयाकडे जाताना एम एच २० बी वाय ९९४७ च्या चालकाने स्कूटरचे (एम एच २० बी एफ २५८९) नुकसान केले, देशमुख हे जखमी झाले. या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौर पंपासाठी भरले ४३३३ शेतकऱ्यांनी पैसे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील ४३३३ शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा योजनेत सौर पंप बसविण्यासाठी महावितरणाकडे पैसे भरलेले आहेत. विभागातून एकूण ४४ हजार ३७४ अर्ज आले असल्याची माहिती महावितरण विभागाकडून देण्यात आली. सध्या या योजनेत अर्ज स्वीकारण्याची कारवाई तूर्तास थांबविण्यात आली आहे.

यंदा मराठवाड्यात पाऊस कमी पडलेला आहे. शेतकऱ्यांना शाश्वत वीज उपलब्ध व्हावी, यासाठी महावितरण विभागाने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. या योजनेत ज्या शेतकऱ्यांच्या शेतात महावितरणाची वीज केबल नाही किंवा अन्य पायाभूत सुविधांचा विकास झालेला नाही. अशा शेतकऱ्यांना सौर पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेत औरंगाबादसह सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी सौर पंप मिळविण्यासाठी अर्ज दाखल केले आहे. मराठवाड्यातून ४४ हजार ३७४ अर्ज आले आहेत. या अर्जातून ११ हजार ११० अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले. या आठ जिल्ह्यात १३ हजार ४८० शेतकऱ्यांना सौर पंपासाठी कोटेशन देण्यात आले आहेत. सदर कोटेशन दिल्यानंतर ४३३३ शेतकऱ्यांनी कृषिपंप मिळविण्यासाठी महावितरण विभागाकडे पैसेही भरले असल्याची माहिती महावितरण विभागाकडून देण्यात आली आहे. आगामी काही महिन्यात पैसे भरणाऱ्या शेतकऱ्यांना कृषिपंप बसविण्याची कारवाई संबंधीत एजन्सीकडून केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

……

मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना ही महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेत सध्या अर्ज स्वीकारण्यात येत नाहीत. लवकरच अर्ज स्वीकारण्यात येतील. ज्या अर्जदारांचे अर्ज ज्या कारणामुळे बाद झालेले आहेत, त्या अर्जदारांना पुन्हा आपले अर्ज दुरुस्त करून अर्ज करण्याचीही संधी देण्यात येणार आहे.

- ओमप्रकाश बकोरिया, सहसंचालक, औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय, महावितरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images