Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गोविंदभाईंच्या तैलचित्रावरून वादंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्याच्या विकासाचे प्रणेते पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांचे तैलचित्र सरस्वती भुवन संस्थेतून हटविल्यामुळे वादंग निर्माण झाले असून, स्वातंत्र्यसैनिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र, या संतापानंतर मंगळवारी नवीन कार्यकारिणीने हे तैलचित्र पुन्हा संस्थेत लावले आहे.

सरस्वती भुवन संस्थेला नावारूपाला आणण्यात गोविंदभाईंचा मोठा वाटा होता. निर्मोही, सैद्धांतिक भूमिकेचा आग्रह धरणारे तपस्वी मार्क्स व महात्मा गांधी यांच्या विचारांचा समन्वय साधणारे भाई हे शेकडो कार्यकर्त्यांची व शिक्षकांची प्रेरणा आहेत. त्यांच्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या सरस्वती भुवन संस्थेत नवीन कार्यकारिणीने त्यांचे तैलचित्र काढले. त्यामुळे शहरातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनी विद्यमान अध्यक्ष राम भोगले यांना पत्र पाठवित या घटनेबाबत संताप व्यक्त केला. 'गोविंदभाईंचे तैलचित्र कार्यालयातून काढल्याने धक्का बसला. भाईंना जाऊन १६ वर्षे झाली. त्यांच्या हयातीतच दिनकर बोरीकर, रमणभाई पारिख, ना. वि. देशपांडे या सर्वांनी मिळून भाईंची संमती घेऊन तैलचित्र लावले. संस्थेला स्थापन होऊन १०४ वर्षे झाले. त्यामध्ये अनेक अध्यक्ष होऊन गेलेले. मात्र, गोविंदभाईंनी संस्थेसाठी सामाजिक दृष्टीकोन स्वीकारला आणि मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी चालवली. त्यामुळे ही संस्था मराठवाड्याच्या विकासाचे केंद्र झाले. गोविंदभाईंच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची स्मृती जपण्यासाठी गोविंदभाई श्रॉफ ललित अकादमी स्थापन करण्यात आली. अशा थोर व्यक्तीचे तैलचित्र काढणे हा त्यांचा अपमान समजतो,'असा संताप व्यक्त करण्यात आला. निवेदनावर ना. वि. देशपांडे, ताराबाई, अॅड. काशिनाथ नावंदर, रामभाऊ फटांगळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संस्थेच्या सगळ्या अध्यक्षांचे फोटो एकाच रांगेत एकखारख्या आकारात लावण्यासाठी आम्ही हा फोटो काढला होता. त्यामुळे हा फोटो कायमस्वरूपी काढला असे नाही. अनेक अध्यक्ष होऊन गेले. त्यांचे फोटो इतरत्र ठेवण्यात आले आहेत. त्यांचेही फोटो लावणे आवश्यक आहे.

- राम भोगले, अध्यक्ष, सरस्वती भुवन शिक्षण संस्था

'सभु' संस्था मराठवाड्यातील दोन कोटी जनतेचे श्रद्धास्थान आहे. गोविंदभाईची प्रतिमा काढणे हे अविवेकी, वेदनादायी कृत्य आहे. आज प्रतिमा काढली उद्या भाईंच्या स्मृतिस्थळावर हातोडा पडेल. घरातील आजी-आजोबा, आई-वडिलांचे फोटो काढायचे नसतात. त्यांना वंदन करायचे असते.

- ज्ञानप्रकाश मोदाणी, सदस्य, सरस्वती भुवन शिक्षण संस्था

गोविंदभाईंचे तैलचित्र हटवणे हा प्रकार धक्कादायक आहे. गोविंदभाईंच्या कार्याचा गौरव म्हणून हा फोटो यापूर्वीच्या सदस्यांनी लावला. त्यामुळे इतर अध्यक्षांच्या रांगेत त्यांनाही बसवणे ही बाब नवीन कार्यकारिणीकडून अभिप्रेत नव्हती. मात्र, त्यांनी ही कृती का केली माहिती नाही.

- सुभाष लोमटे, सामाजिक कार्यकर्ते

---

मटा भूमिका

---

\Bअगोचरपणाच

\B---

सरस्वती भुवन संस्थेच्या १०४ वर्षांच्या वाटचालीत गोविंदभाई श्रॉफ यांचा सिंहाचा वाटा आहे. ते संस्थेत सर्वाधिक काळ अध्यक्ष व सरचिटणीस होते. त्यांच्यामुळे 'सभु' नावारूपाला आली. आता निवडून आलेले नवनिर्वाचित अध्यक्ष राम भोगले यांनी गोविंदभाईंचे तैलचित्र हटविण्याचा निर्णय घेतला. हा शुद्ध अगोचरपणा आहे. त्यामुळे अनेक स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या भावना दुखावल्या आहेत. इतर अध्यक्षांचे फोटो लावायचे होते, तर त्यासाठी गोविंदभाईचा फोटो हटविण्याची काहीएक गरज नव्हती. गोविंदभाईंचे तैलचित्र अशापद्धतीने हटविणे नक्कीच अपमानास्पद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाकीट मारले; आरोपीला कोठडी

$
0
0

औरंगाबाद : रेल्वेत चढताना प्रवाशाचे पाकीट मारल्याप्रकरणातील आरोपी बाबासाहेब श्यामराव शिंदे याला सुमारे महिनाभरानंतर अटक करुन कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीला गुरुवारपर्यंत (२८ फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. राठोड यांनी मंगळवारी दिले. या प्रकरणी बाबासाहेब दिलीप निंबाळकर (३०, रा. अंबड, जि. जालना, ह.मु. म्हडा कॉलनी, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. यातील पहिला आरोपी काशिनाथ पिंपळे याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्यानंतर पसार आरोपी शिंदेचा शोध घेऊन त्याला सोमवारी रात्री अटक करण्यात आली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, आरोपीकडून फिर्यादीचे पाकीट व त्यातील ऐवज जप्त करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सहाय्यक सरकारी वकील एस. एल. दास (जोशी) यांनी कोर्टात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेटमध्ये महिलाराज!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीला यंदा तब्बल आठ कोटी साठ लाखांचे बजेट मिळाले असून, या समितीला प्रथमच एवढी मोठी आर्थिक तरतूद झाल्याचे मानले जात आहे. या निधीतून विविध कामांचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे महिलांसाठी येत्या काळात नवीन उपक्रम राबवले जाण्यास वाव आहे.

महिला बालकल्याण समितीसाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या वार्षिक महसुली उत्पन्नातून बांधील खर्च वगळता उर्वरित खर्चाच्या पाच टक्के निधी राखून ठेवणे बंधनकारक आहे. शासनाने या संदर्भात जुलै १९९३मध्ये निर्णय घेतला. मात्र, या निर्णयानुसार पालिकेत आर्थिक तरतूद केली जात नव्हती. त्यामुळे पालिका प्रशासनाने निर्णय घेत शासनाच्या निर्णयानुसार आर्थिक तरतूद करण्याचे ठरविले. २०१८ - १९ या वर्षात महापालिकेच्या अर्थसंकल्पात महिला बालकल्याण समितीसाठी सहा कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. अर्थसंकल्पाच्या पाच टक्के निधी या समितीसाठी राखून ठेवायचा असल्यामुळे यंदा आठ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करण्याचे प्रशासनाने निश्चित केले. या तरतुदीनुसार महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्याचे नियोजन देखील करण्यात आले आहे. या नियोजनानुसार सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन व डिस्पोजल मशिनसाठी एक कोटींची तरतूद प्रशासनाने केली आहे. महिला व विद्यार्थ्यांसाठी शासकीय किंवा अशासकीय संस्थांमार्फत तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यासाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महिला व बालकांसाठीच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी व महिला कल्याणाच्या योजना सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राबवण्यासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे. शिलाई मशीन, सायकल वाटप, पिठाची गिरणी अशा विविध वस्तूंच्या स्वरुपात लाभ न देता लाभार्थींच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या कामासाठी एक कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

\Bफिनिक्स प्रकल्प राबवणार

\Bमहापालिकेच्या हद्दीत पंधरा महिला स्वच्छतागृह आहेत. या स्वच्छतागृहांचा खर्च महिला बालकल्याण समितीच्या निधीतून केला जाणार आहे. एका स्वच्छतागृहासाठी वर्षाला दहा लाख रुपये या प्रमाणे एक कोटी पन्नास लाखांची तरतूद करण्यात आली आहे. महिला व मुलींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी पन्नास लाख रुपये. विधवा आणि वृद्ध महिला, दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी पन्नास लाखांची तरतूद करण्यात आली आहे. महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी फिनिक्स प्रकल्प राबवण्यासाठी साठ लाख रुपये तरतूद करण्याचा उल्लेख देखील प्रशासनाने केला आहे.

महिला बालकल्याण समितीसाठी सहा कोटींची तरतूद होतीच. आता त्यात दोन कोटी साठ लाखांची भर पडली आहे. या समितीसाठी एवढी मोठी तरतूद प्रथमच झालेली आहे. सहा कोटींचे नियोजन झालेले आहे. आता दोन कोटी साठ लाखांचे नियोजन करायचे आहे. निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी त्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे महिलांना लाभ होईल. प्रशासनाने काम आणि योजनानिहाय तरतूद केल्यामुळे आता फाइलींचा प्रवास थांबेल. निर्णय लवकर होतील.

- अॅड. माधुरी अदवंत, सभापती, महिला - बालकल्याण समिती, महापालिका

---

\Bमटा भूमिका

\B---

\Bस्वागतार्ह निर्णय

\B---

महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांसाठी आठ कोटी साठ लाखांची रक्कम अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. या निर्णयाचे सर्वप्रथम स्वागत. खरे तर महिला बालकल्याण समितीसाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या वार्षिक महसुली उत्पन्नातून बांधील खर्च वगळता उर्वरित खर्चाच्या पाच टक्के निधी राखून ठेवणे बंधनकारक आहे. या नियमामुळे ही तरतूद करावी लागली. यापुढे महिलांचा कोणताही प्रश्न असो त्यासाठी निधी राखीव ठेवण्यासाठी अशा नियमांच्या कुबड्या घेण्याची गरज नसावी. त्यासाठी राजकीय नेत्यांनी, प्रशासनातील मंडळींनी तेवढी दूरदृष्टी, सामाजिक भान ठेवावे. आज लोकसंख्येचा पन्नास टक्के महिलांचा आहे. आपली आई, बहीण, ताई अशी अनेक नातलग घरातच असतात. त्यांच्यासाठी म्हणून तरी आपण काही करावे, याची जाण राजकीय नेत्यांनी ठेवावी. तसे प्रयत्न केले तर नक्कीच महिलांची सामाजिक प्रगती झपाट्याने होईल. त्यांना कसल्याही आरक्षणाची गरज सुद्धा राहणार नाही. त्यासाठी तशी पावले आत्तापासूनच उचलली जावीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी चोरीप्रकरणात दोघांना अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इमारतीच्या पार्किंगमध्ये लॉक करून ठेवलेली दुचाकी चोरल्याप्रकरणातील आरोपी ऋषिकेश बिसन जाधव व शेख तोसिफ शेख यांना मंगळवारी (२६ फेब्रुवारी) अटक करून कोर्टात हजर केले असता, त्यांना गुरुवारपर्यंत (२८ फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले.

या प्रकरणी प्रदीप दयाराम पाटील (वय ४८, रा. सेव्हन हिल्स) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीने त्याची दुचाकी वर्षभरापूर्वी इरविन इकबाल मेघानी (रा. राणानगर) हिला वापरण्यासाठी दिली होती. २२ जानेवारी २०१९ रोजी इरविन ही आई-वडिलांना भेटण्यासाठी वापी (गुजरात) येथे गेली होती व तिने पार्किंगमध्ये लॉक करुन ठेवलेल्या दुचाकीची चोरी झाली होती. हा प्रकार २ फेब्रुवारी रोजी लक्षात आला होता. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी ऋषिकेश बिसन जाधव (२२. रा. विशालनगर) व शेख तोसिफ शेख लाल (२२. सादातनगर) यांना मंगळवारी अटक करुन कोर्टात हजर केले असता, आरोपींकडून दुचाकी जप्त करणे बाकी असून, आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याचाही तपास करावयाचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने दोघा आरोपींना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात भरदिवसा घरफोडी, दागिने लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात चोरट्यांचा हैदोस सुरूच असून चोरांनी सोमवारी (२५ फेब्रुवारी) भरदुपारी साताऱ्यात घरफोडी करून एक लाख ७० हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय उद्धवराव तौर (वय ३३, रा. घर नंबर २४-बी सर्वे नंबर ९५, सातारा) हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. त्यांचा घराला सोमवारी (२५ फेब्रुवारी) रोजी कुलूप लावलेले होता, ही संधी साधून दुपारी साडे बारा ते सव्वाच्या सुमारास अज्ञात चोराने घराचा कडीकोंडा तोडला. बेडरूममधील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील ५१ हजार रुपयांचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस, ८५ हजार रुपयांचे पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण, १७ हजार रुपयांचे एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, १७ हजार रुपयांचे एक तोळ्याचे झुंबर यासह बँकेच्या लॉकरची चावी, असा एकूण एक लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या चोरीनंतर घटनास्थळी सातारा पोलिस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शाखेच्या पथकाने पाहणी केली.

……

\Bबेन्टेक्सचे दागिने ठेवले \B

या घरातील फक्त सोन्याचे दागिने चोरांनी नेले. बेन्टेक्सचे दागिने सोडून चोर निघून गेले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेवर भरोसा नाय!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आर्थिक तरतूद केलेली असूनही तब्बल ३० उद्यानांच्या कामांना कंत्राटदार मिळत नसल्याने, या कामाची पाचव्यांदा निविदा काढण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढावली आहे. त्यानंतरही कंत्राटदार मिळतील की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे.

महापालिकेची शहरातील विविध वॉर्डांत सुमारे सव्वाशे उद्याने आहेत. नगरसेवकांच्या आणि नागरिकांच्या मागणीवरुन ही उद्याने तयार करताना पाण्याचा स्त्रोत तपासण्यात आला नाही. त्यामुळे ती भकास झाली आहेत. यापैकी तीस उद्यानांचा विकास करण्याची योजना पालिकेने आखली आहे. ज्या ठिकाणी पाण्याचा स्त्रोत आहे व काम केल्यावर उद्यान बहरू शकते अशी ही उद्याने आहेत. या कामासाठी साडेचार कोटींची तरतूद देखील प्रशासनाने केली. या कामासाठी प्रशासनाने आतापर्यंत चार वेळा निविदा काढली. मात्र, प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता पाचव्यांदा निविदा काढण्यात आली आहे. हे काम केल्यावर बिल मिळण्याची शाश्वती नसल्यामुळे आर्थिक तरतूद केलेली असताना देखील कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती मिळाली आहे. या उद्यानांबरोबच १८ थीमपार्क करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. या कामासाठी देखील कंत्राटदार मिळत नाहीत. त्यामुळे उद्याने आणि थीम पार्कची कामे रखडली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूमिगत’ च्या कामाला ३१ मार्चची डेडलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भूमिगत गटार योजनेचे काम संपवण्यासाठी कंत्राटदाराला आता ३१ मार्चची डेडलाइन देण्यात आली आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. या कामासाठी टाकलेल्या ड्रेनेजलाइन जोडण्याचे काम करण्यासाठी महापालिकेच्या वॉर्ड अभियंत्यासह पीएमसी व कंत्राटदाराच्या प्रतिनिधीचे पथक तयार करण्यात आले आहे. भूमिगत गटार योजनेचे काम आहे त्या स्थितीत संपवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काम संपवण्यापूर्वी बारा ठिकाणच्या दुरुस्तीचे काम कंत्राटदाराने करावे, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दुरुस्तीचे काम करण्यात कंत्राटदाराने हलगर्जीपणा केला. त्यामुळे कंत्राटदाराचे बिल थांबवण्यात येऊन बँक गॅरंटी जप्त करण्याचे आदेश स्थायी समितीने प्रशासनाला दिले. त्यावर काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. कंत्राटदाराशी केवळ पत्रव्यवहार करण्यात आला. त्यामुळे आता कंत्राटदाराला भूमिगत गटार योजनेचे काम संपवण्यासाठी डेडलाइन देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तरपत्रिका तपासणी; बहिष्कार मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार शिक्षणमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मागे घेण्यात आला आहे. 'असहकार आंदोलन' सुरू केल्यामुळे बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणी केंद्रावरच पडून होते. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत मंगळवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात अनेक मागण्यांबाबत निर्णय झाल्याचे संघटनेने कळविले आहे. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले असून उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात करण्यात येणार आहे. आंदोलनामुळे मंगळवारपर्यंत अनेक ठिकाणी गठ्ठे स्वीकारले जात नसल्याने मंडळ हतबल झाले होते. विभागातील केंद्रांवर आजपर्यंत तीन लाखांपेक्षा अधिक उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविल्या आहेत. आंदोलन मागे घेण्यात आल्याने उत्तरपत्रिका तपासणीला बुधवारपासून सुरुवात होईल, असे औरंगाबाद जुक्टाचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी 'मटा'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उर्दूच्या अंगणात मराठीच्या उत्कर्षासाठी प्रयत्न

$
0
0

deelip.waghmare@timesgroup.com
@deelipwMT

औरंगाबाद :

शहरातील उर्दू भाषिक विद्यार्थ्यांमध्ये मराठीबद्दल आस्था, प्रेम निर्माण करण्याकरिता काही महिन्यांपासून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. उर्दू शाळांमधील मराठी विषयाबद्दल प्रचंड अनास्था आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मराठी शिकविण्याकरिता प्रोत्साहन देण्याकरिता मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी हे काही महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राची मराठी ही राजभाषा असल्याने उर्दू भाषक विद्यार्थ्यांना मराठी आलीच पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे.

मराठी आणि उर्दू भाषकांमध्ये राजकीयदृष्ट्या तेढ आहे. शिवाय निजाम राजवटीमुळेही मराठवाड्यात मराठी भाषकांचा उर्दू भाषकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. सध्या वयाच्या ८० मध्ये असलेल्या अनेकांचे शिक्षण उर्दू माध्यमातून झालेले असूनही उर्दूबद्दलचा दृष्टिकोन बदललेला नाही. अर्थात याला राजकीय कारणे आहेत, मात्र यामुळे उर्दू भाषक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. हे हेरून मिर्झा अब्दुल कय्यून नदवी यांनी काही महिन्यांपासून उर्दू माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये मराठीबद्दल अधिक प्रेम निर्माण होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

उर्दू भाषक विद्यार्थ्यांनी मराठी का शिकावे, या प्रश्नावर मिर्झा का शिकू नये, असा प्रतिप्रश्न करतात. ‘मटा’शी बोलताना त्यांनी उर्दू भाषक विद्यार्थ्यांनी मराठी शिकण्याची गरज कशी आहे, ते सांगितले. मिर्झा म्हणाले,‘आम्ही महाराष्ट्रीयन आहोत, मराठी राज्याची राजभाषा आहे. उर्दू भाषकाला सरकारी नोकरीसाठी किंवा शासकीय कामांसाठी किमान मराठीमधून अर्ज लिहिता आला पाहिजे. त्यांना मराठीमधून व्यवहार करता आला पाहिजे. मुस्लिमांना शासकीय नोकऱ्यांत आरक्षण मागत आहोत. मग, मराठी यायला नको?,’ असा प्रतिप्रश्न ते करतात.

सहा हजार पोस्टकार्ड
मिर्झा यांनी शहरातील काही उर्दू शाळांमध्ये जाऊन मराठीतून पोस्टकार्ड लिहिण्याचा उपक्रम राबविला. या उपक्रमात मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त व महापौरांना एकूण सहा हजार पोस्टकार्ड पाठविली. या शिवाय दिवाळीच्या काळात काही मुलांना घेऊन मराठीतूनच बोलू या, असा प्रयोग केला. मराठी राजभाषा दिनानिमित्त शहरातील सुमारे तीनशे शाळांत मराठीतूनच बोलू हा उपक्रम आखला आहे.

मराठीच्या अडचणी
उर्दू शाळात पहिलीपासून व पाचवीपासून अशा दोन इयत्तात मराठीचा अभ्यास सुरू होतो. मात्र, दोन्ही प्रकारात आठवड्यात फक्त दोन तास आहेत. शिवाय मराठी शिकवणारे शिक्षक मुळात उर्दू माध्यमाचे आहेत. त्यामुळे ते मराठी भाषा विषयात लक्ष घालत नाहीत. याकरिता मराठी भाषकांनी उर्दू भाषक विद्यार्थ्यांकरिता मराठी शिकवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी वेब-सीरिजने वाढवला बोलीभाषेचा गोडवा

$
0
0

Tushar.bodkhe@timesgroup.com

औरंगाबाद -

बोलीभाषांचा मुक्त वापर असलेल्या मराठी वेब-सीरिज ग्रामीण भागात सर्वाधिक लोकप्रिय ठरल्या आहेत. ग्रामीण अनुभवविश्व दिसत असल्यामुळे तरुण प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढला आहे. विशेष म्हणजे बोलीभाषेचा न्यूनगंड झटकून युवा दिग्दर्शक-लेखकांनी बोलीभाषेला जगभर पोहचवले आहे. येत्या काळात बोलीभाषा संवर्धनात वेब-सीरिज महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.

सध्या तरुणांमध्ये मराठी-हिंदी वेब-सीरिजची प्रचंड लोकप्रियता आहे. विशेषत: ग्रामीण पार्श्वभूमीवरील अनेक वेब-सीरिज अल्पावधीत गाजल्या आहेत. ‘गावरान मेवा’, ‘गावाकडच्या गोष्टी’, ‘हॉलिवूड’, ‘लफडं’, ‘एक गाव तेरा भानगडी’, ‘उलटसुलट’, ‘होतं असं कधी कधी’, ‘कार्टून कॉलनी’ अशा मराठी वेब-सीरिज पाहणारा मोठा प्रेक्षकवर्ग तयार झाला. बोलीभाषेचा मुक्त वापर या वेबसिरीजचे वैशिष्ट्य आहे. गाजलेले मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये बोलीभाषा सहजतेने वापरली गेली. त्यांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर हा ट्रेंड वेब-सीरिजने स्वीकारुन अधिक रुजवला. ग्रामीण कथानकाच्या वेब-सीरिजचे सर्व कलाकार, लेखक, दिग्दर्शक ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे बोलीभाषेचा सर्वाधिक वापर सुरू झाला. खेड्यातील दैनंदिन व्यवहारात वापरात असलेले शब्द, शिव्या, म्हणी, उत्सवाचे नेमके दर्शन घडल्यामुळे लाखो प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. वेब-सीरिजच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहतात. किमान पाच ते दहा लाख व्ह्यूज असलेल्या वेब-सीरिजची दखल मोठ्या चित्रपट कलाकारांनाही घ्यावी लागली. बोलीभाषेतील भूमिकेत रमणाऱ्या कलाकारांनी मिळून वेब-सीरिजची निर्मिती केली. यातून अनेक कलाकारांना संधी मिळत आहे. फक्त प्रमाण मराठी भाषेतच कलाकृती करावी तरच ती लोकप्रिय ठरते हा प्रचलित समज वेब-सीरिजने मोडीत काढला आहे. औरंगाबाद, नांदेड, जालना, फुलंब्री, परभणी, बीड अशा लहान-मोठ्या शहरात वेब-सीरिजची निर्मिती वाढली आहे. मराठी भाषेच्या संवर्धन आणि जतनाबाबत नेहमी चिंता व्यक्त होते. वेब-सीरिज थेट भाषा संवर्धनाचे काम करीत आहे. खुमासदार बोली वापरुन प्रेक्षक टिकवण्यावर कलाकारांचा भर आहे. प्रेक्षकसंख्या वाढल्यास व्यावसायिक फायदा असल्यामुळे चांगल्या दर्जाचे मनोरंजन गरजेचे असते असे दिग्दर्शकांनी सांगितले.

मराठवाडी शब्दांची खुमारी

मोबाइलमध्ये मनोरंजनाची साधने आल्यानंतर वेब-सीरिजचा नवीन प्रेक्षक खेड्यात तयार झाला. यात १५ ते ३० वयोगटातील प्रेक्षकांना आवडणारे विषय वेब-सीरिज हाताळत असतात. गावाच्या पार्श्वभूमीवर रंगणारी प्रेमकथा आणि राजकारण हेच मध्यवर्ती विषय आहेत. इरसाल नमुने आणि एका जिल्ह्याची बोलीभाषा एवढ्या सामुग्रीवर वेब-सीरिज गाजल्या आहेत. ‘रुमण्या’, ‘गैबान्या’, ‘हिंग’ असे खुमासदार मराठवाडी शब्द यू-ट्यूबद्वारे जगभर पोहचले आहेत.

'कोणत्याही प्रदेशातील बोलीभाषा कोणत्याही प्रदेशातील प्रेक्षकाला ऐकायला आवडते. काही मराठी सिनेमे आणि मालिकांनी हा ट्रेंड रुजवला. वेब-सिरीजने प्रेरणा घेत बोलीभाषा सर्वदूर पोहचवल्या. हा गोडवा आवडत असल्याचे अनेक प्रेक्षक सांगतात.'
प्रदीप पवार, अभिनेता-दिग्दर्शक

'संधीच्या शोधात असलेल्या तरुणांनी शोधलेला हा मार्ग आहे. आतापर्यंत चित्रपटात किंवा मालिकेत कधीही न दिसलेले आपले खेडे, भाषा, प्रसंग वेब-सीरिजमध्ये दिसत असल्याने प्रतिसाद मिळतो एवढेच.'
यश जाधव, दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादेतील म्हाडाची घरे स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सर्वसामान्य नागरिकांना वाजवी दरात घरे मिळण्यासाठी म्हाडाने शहरातील अल्प व मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांचे दर २० ते ४७ टक्केपर्यंत कमी केले आहेत. या निर्णयामुळे तिसगाव येथील म्हाडाच्या २ बीएचके सदनिकेची किंमत २३ लाख ६७ हजारावरून १६ लाखात एवढी झाली आहे, अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली.

औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातंर्गत (म्हाडा) ९१७ सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे उद्‌घाटन बुधवारी (२७ फेब्रुवारी) सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले. औरंगाबाद शहरात अल्प उत्पन्न गटातील ४९९ आणि मध्यम उत्पन्न गटातील ४१८ सदनिका, अशा एकूण ९१७ सदनिका रिक्त आहेत. त्या सर्वसामान्य नागरिकांना खरेदी करता याव्यात, या उद्देशाने म्हाडाने किंमती कमी करण्याचा निर्णय जानेवारीत झालेल्या बैठकीत घेतला. त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. नवीन किमंतीनुसार सदनिकांचे अर्ज ऑनलाइन स्वीकारले जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

म्हाडाच्या सदनिकांची सध्याची किंमत


योजना सदनिकेचे क्षेत्र रिक्त सदनिका पूर्वीची किंमत नवीन किंमत

२४८ सदनिका, तिसगाव - २ बीएचके, ९१५ चौ. फूट १६९ २३. ६७ लाख १६ लाख

२५६ सदनिका, मध्यम, वाळूज - २ बीएचके,९१५ चौ. फूट २४९ २२.९५ लाख १६ लाख

१६० सदनिका, एमआयडीसी पैठण १ बीएचके, ५९६ चौ. फूट ९५ १२.४४ लाख ७ लाख

४०४ सदनिका, देवळाई १ बीएचके, ५८९ चौ. फूट ४०४ १५. ९५ लाख ते ९.५५ लाख हजार ११ लाख ते ७. ५० लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसबीआय’ला ७४ लाखांचा चुना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'एसबीआय'कडून एक कोटी रुपयांचे कर्ज घेऊन सहा महिन्यानंतर हप्ते भरणे बंद केले. तसेच मशीन खरेसाठी एका कंपनीला 'आरटीजीएस'द्वारे दिलेल्या रकमेपैकी ३५ लाख रुपये स्वत:च्या खात्यावर वळते करुन घेतले आणि माल खरेदीसाठी खेळते भांडवल म्हणून बँकेने दिलेले ३४ लाख रुपयेदेखील काढून घेत बँकेची ७४ लाखांची फसवणूक केली. प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी लक्ष्मण विश्वनाथ वाघमारे याने सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी बुधवारी (२७ फेब्रुवारी) फेटाळला.

या प्रकरणी 'एसबीआय'च्या क्रांतीचौक शाखेच्या सहाय्यक महाव्यवस्थापक ज्योती बन्सीलाल कांबळे (५२) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, आरोपी लक्ष्मण विश्वनाथ वाघमारे (४४, रा. रामराई, वाळूज) हा बँकेचा खातेदार असून, आरोपीच्या वाळूज येथील 'मे. अमित एन्टेरप्रायजेस' नावाने चालू असलेल्या कंपनीच्या मशीन खरेदीसाठी ६६ लाख व माल खरेदीसाठी ३४ लाख असे एक कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते. त्यासाठी आरोपीला एक लाख ३४ हजार रुपये मासिक हप्ता होता. कर्ज मंजूर झालेल्या रकमेपैकी ४० लाख रुपये आरोपीने 'आरटीजीएस'द्वारे कोल्हापूरच्या केल्सन इंजिनिअर्स अँड फॅब्रिकेटर्स'ला दिले होते. मात्र आरोपीने सहा महिन्यानंतर हप्ते भरणेच बंद केले. त्यानंतर बँकेने आरोपीला नोटीस पाठवली. २६ नोव्हेंबर २०१८ रोजी बँकेच्या फिल्ड ऑफिसरने प्लँटला भेट दिली असता, तिथे आरोपी आढळून आला नाही. तसेच खरेदी केलेले मशीनही आढळून आले नाहीत. बँकेने केलेल्या तपासणीमध्ये आरोपीने 'केल्सन'ला दिलेल्या रकमेपैकी ३५ लाख रुपये स्वत:च्या खात्यामध्ये वळते करुन घेतल्याचे व खे‌ळते भांडवल म्हणून बँकेने दिलेले ३४ लाख रुपयेदेखील आरोपीने काढून घेतल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात फिर्यादीने तक्रार दिल्यावरुन वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bबँकेची रक्कम जप्त करणे बाकी

\Bप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला असता, आरोपीकडून ७४ लाख रुपये हस्तगत करणे बाकी असून, गुन्ह्यात बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे का, याचाही तपास करावयाचा असल्याने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळ‌ला. जिल्हा सरकारी वकील देशपांडे यांना अॅड. सिद्धार्थ वाघ यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौदा हजारांची लाच घेताना चतुर्भुज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातील वरिष्ठ सहायकाला साडेचौदा हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. संजीव रामभाऊ इंगळे (वय ३५, रा. हर्सूलसावंगी) असे या त्याचे नाव असून बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आंतरजिल्हा बदलीचे काम करून घेण्यासाठी ही लाच घेण्यात आली होती.

या घटनेतील तक्रारदार हे नांदेड आरोग्य विभागात परिचर पदावर कार्यरत आहेत. आंतर जिल्हा बदलीसाठी लागणाऱ्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी इंगळे यांनी तक्रारदाराला पंधरा हजाराची लाच मागितली होती. यापैकी पाचशे रुपये त्याने पूर्वीच घेतले होते. उर्वरित साडेचौदा हजाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. बुधवारी लाचेची उर्वरित रक्कम घेऊन इंगळे यांनी तक्रारदाराला जिल्हा परिषदेत बोलाविले होते. दुपारी साडेचौदा हजाराची लाच घेतल्यानंतर इंगळे यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर अधिक्षक शंकर जिरगे, उपअधिक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपधिक्षक सुजय घाटगे, अश्वलिंग होनराव, भीमराव जिवडे, बाळासाहेब राठोड, मिलिंद इप्पर, संदीप चिंचोले आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुत्तेदारीत नफ्याचे आमीष; महिलांना ८५ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

साडीच्या व्यवसायात तसेच गुत्तेदारीत आकर्षक नफा देण्याचे आमीष दाखवित दोन महिलांनी महिलांना ८५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दोन्ही महिला आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहेत.

या प्रकरणी शुभांगी चंद्रकांत कुलकर्णी (वय ४५, रा. दशमेशनगर) यांनी तक्रार दाखल केली. कुलकर्णी यांचा 'वेदांत डिझायनर साडी' नावाने पूर्वी साडी विक्रीचा व्यवसाय होता. त्यांची दहा वर्षांपासून अनुराधा सुरेश पवार आणि त्यांची बहीण सुवर्णा संजय मनगटे यांच्यासोबत ओळख आहे. जानेवारी २०१७ मध्ये अनुराधा पवार हिने अनुज कलेक्शन नावाने दुकान सुरू केले होते. यावेळी कुलकर्णी आणि त्यांची मैत्रीण ज्योती देशमुख यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी आपण भागीदारीत व्यवसाय करू, तुम्ही गुंतविलेल्या रक्कमेच्या दुप्पट रक्कम परत देते असे आमीष यावेळी पवार यांनी कुलकर्णी यांना दिले. या आमिषाला भुलून ११ लाख ७० हजार रुपये कुलकर्णी यांनी अनुराधा पवार यांना दिले. ही रक्कम कुलकर्णी यांनी परत मागितली असता पवार हिने ही रक्कम त्यांची बहीण सुवर्णा संजय मनगटे (रा. एन ३) यांच्या शासकीय गुत्तेदारीच्या व्यवसायात गुंतविल्याची माहिती दिली. कुलकर्णी ह्या पवार यांच्यासोबत त्यांच्या बहिणीकडे गेल्या असता त्यांनी अनुराधा पवार यांनी रक्कम गुंतविल्याची माहिती दिली. तसेच गुत्तेदारीच्या व्यवसायात देखील फायदा असून तुम्ही आणखी रक्कम असेल तर ती देखील गुंतविल्यास नफ्यासह परत करण्याचे आमीष दाखविले. या आमिषाला देखील कुलकर्णी बळी पडल्या. त्यांनी चौदा लाख पंचवीस हजार रुपये मनगटे यांना दिले. कुलकर्णी यांच्या मैत्रीण ज्योती देशमुख यांच्याकडून देखील अकरा लाख रुपये तसेच सुनंदा सुराणा यांच्याकडून २८ लाख ५० हजार रुपये पवार यांनी घेतले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये अनुराधा पवार यांनी त्याचे दुकान बंद केले. यानंतर कुलकर्णी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केल्यानंतर पोलिस ठाण्यात अनुराधा पवार आणि सुवर्णा मनगटे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अरुण वाघ याप्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमआयडीसी’चे पाणी द्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पाण्याची वाढती मागणी आणि जायकवाडी धरणातील पाण्यात होत असलेली घट लक्षात घेता टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी 'एमआयडीसी'चे पाणी द्या अशी मागणी आपण मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांच्याकडे करणार आहोत', अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.

महापौर म्हणाले, '२३ दशलक्ष लिटरने पाण्याची मागणी वाढली आहे. जलवाहिन्या टाकून ही मागणी पूर्ण करणे शक्य होईल, असे वाटत नाही. त्यामुळे नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. जायकवाडी धरणातून औरंगाबादला मिळणारे पाणी मर्यादित आहे. त्यामुळे 'एमआयडीसी'चे पाणी शहरातील नागरिकांसाठी द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहे. उद्योगमंत्र्यांना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या माध्यमातून साकडे घालणार आहोत. बीड बायपास भागातील काही वसाहतींना पाणीपुरवठा व्हावा यासाठी 'एमआयडीसी'चे चार 'एमएलडी' पाणी मिळावे, अशी मागणी उद्योगमंत्र्यांकडे केली आहे. आता आणखीन चार 'एमएलडी'ची मागणी करणार आहोत', असे महापौरांनी सांगितले. 'टँकरच्या खर्चासाठी देखील शासनाने दहा कोटींची मदत पालिकेला करावी, अशी विनंती मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे करणार आहोत. पाणी पुरवठ्याची स्थिती भीषण आहे. त्यामुळे टँकरची संख्या वाढवावी लागेल. सध्या ९४ टँकरच्या माध्यमातून सुमारे ५५० फेऱ्या दररोज केल्या जात आहेत. टँकरच्या माध्यमातून दहा लाख लिटर पाणी पुरवठा केला जात आहे. पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता ही संख्या वाढवावी लागेल. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनाचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेत सादर करावा', अशी सूचनाही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महावितरणचा महापालिकेला ठेंगा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचरा प्रक्रिया केंद्रावर अखंड वीजपुरवठा सुरू रहावा, यासाठी एक्स्प्रेस फिडर बसवून देण्यास महावितरणने महापालिकेला नकार दिला आहे. त्यामुळे या कामासाठी पालिकेने एक कोटीची निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे असून, संतप्त महापौरांनी महावितरणला कितीपत सहकार्य करायचे याचा विचार करू, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाद सुरू असलेल्या महापालिका आणि महावितरण या संस्थांमध्ये पुन्हा एकदा कुरबुर सुरू झाली आहे. कचरा प्रक्रिया केंद्रासाठी एक्स्प्रेस फिडर देण्याच्या मुद्यावरून या दोन संस्थांमध्ये भांडणाला तोंड फुटले आहे. महापालिकेने चिकलठाणा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पासाठी एक्स्प्रेस फिडरची आवश्यकता आहे. फिडर उभारल्यास प्रक्रिया केंद्राला विनाखंड वीजपुरवठा होणे शक्य आहे. त्यामुळे एक्स्प्रेस फिडरसाठी जो काही खर्च येईल तो खर्च महापालिका देण्यास तयार आहे. महावितरणने फिडर लावण्याचे काम करावे, असे महापालिकेने महावितरणला कळवले होते. दीड महिन्यापासून महापालिका आणि महावितरण यांच्यात याबद्दल पत्र व्यवहार सुरू होता. आता महावितरणने महापालिकेला पत्र पाठवून एक्स्प्रेस फिडरचे काम तुम्हीच करून घ्या, आम्हाला फक्त देखभाल दुरुस्तीचे पैसे द्या, असे कळवले आहे. फिडरच्या कामाच्या किमतीच्या १.३ टक्के रक्कम देखरेखीच्या कामासाठी देण्याची मागणी महावितरणने केली आहे. ही रक्कम महावितरणकडे भरून एक्स्प्रेस फिडरचे काम करण्यासाठी एक कोटीची निविदा काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सध्या कचरा प्रक्रिया केंद्राचे काम जनरेटरवर सुरू आहे.

\Bजुने भांडण, नव्याने उकळी

\B'भूमिगत' केबल, महापालिकेचे वीजबिल यावरून यापूर्वी महावितरण आणि महावितरणमध्ये जुंपली होती.विशेष म्हणजे महापालिकेच्या जागेवर महावितरण कंपनीने वीजेचे खांब आणि डीपी बसवल्या आहेत. त्यामुळे महावितरणे या जागांचे भाडे द्यावे, अशा आशयाची नोटीस यापूर्वी तत्कालीन महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी महावितरणला बजावली होती. त्यानंतर हे प्रकरण थंड बस्त्यात गेले. विशेष म्हणजे आता महावितरणने महापालिकेला एक्स्प्रेस फिडर बसविण्यास नकार दिला असून, सध्या हेच बकोरिया महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक आहेत.

शहरात कचरा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे कचरा प्रक्रियावर अखंड वीजपुरवठा व्हावा यासाठी एक्स्प्रेस फिडर बसविण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता महावितरणने या कामास नकार दिला. महावितरण पालिकेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे महावितरणला किती सहकार्य करायचे याचा विचार करू.

\B- नंदकुमार घोडेले, महापौर\B

सध्या महावितरणकडून मार्च महिन्यातली वसुलीची कामे सुरू आहेत. आमचे सर्व अधिकारी, कर्मचारी या कामात व्यस्त आहेत. चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प शहरासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्हाला देखरेख कामासाठी चार्जेस देऊन काम करून घ्यावे, अशी विनंती आम्ही महापालिकेल केली आहे.

\B- सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, महावितरण\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटी, पालिकेच्या बैठका गाजणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटीच्या औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या स्पेशल पर्पज व्हेकलची (एसपीव्ही) बैठक गुरुवारी व्हिसीच्या माध्यमातून होणार आहे. या बैठकीबरोबरच महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक आणि सर्वसाधारण सभा देखील घेतली जाणार आहे.

स्मार्ट सिटीच्या एसपीव्हीचे मेंटॉर संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एसपीव्हीची बैठक होणार होती, परंतु सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे संजयकुमार यांना मुंबई सोडणे शक्य नसल्यामुळे त्यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक घेण्याचे ठरविले आहे. तसा निरोप त्यांनी आयुक्त तथा 'एसपीव्ही'चे मुख्याधिकारी डॉ. निपुण विनायक यांना दिला आहे. त्यानुसार 'एसपीव्ही'च्या सर्व संचालकांना कल्पना देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक सकाळी अकरा वाजता होण्याची शक्यता आहे. स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी देखील साडेअकरा वाजता स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. स्थायी समितीची बैठक असल्यामुळे स्मार्ट सिटीच्या 'एसपीव्ही'ची बैठकनंतर आयोजित करा, असे पत्र सभापतींनी आयुक्तांना दिले होते. मात्र, या पत्राचा विचार करण्यात आला नाही. कामकाजाच्या पद्धतीवरून सभापती - आयुक्त असा वाद सुरूच आहे. त्यातच स्मार्ट सिटीच्या 'एसपीव्ही२ची आणि स्थायी समितीची बैठक एकाच वेळेस होत असल्यामुळे व स्थायी समितीचे सभापती 'एसपीव्ही'चे संचालक असल्यामुळे सभापती - आयुक्त वाद तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

\Bनगरसेवक संतप्त

\Bस्मार्ट सिटी व स्थायी समितीची बैठक झाल्यावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी दुपारी अडीच वाजता सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. या सभेत पाणीप्रश्न, दिवाबत्ती यासह अन्य विषयांवर चर्चा होईल, असे मानले जात आहे. पाणी प्रश्नावरून नगरसेवक संतप्त आहेत. दूषित पाण्याची समस्या काही वॉर्डांमध्ये कायम आहे. त्याचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटतील असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेगमपुरा वॉर्डात रस्त्याचे लोकार्पण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बेगमपुरा वॉर्डातील गोगाबाबा मंदिर गल्लीमध्ये तयार करण्यात आलेल्या काँक्रिट रस्त्याचे लोकार्पण महापौर नंदकुमार घोडेले व गोगाबाबा मंदिराच्या भक्तांच्या हस्ते करण्यात आले. वॉर्डाचे नगरसेवक सचिन खैरे यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. लोकार्पण कार्यक्रमाच्या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, गोगाबाबा मंदिराचे सूरज फत्तेलष्कर, सेजू बरेटिया, विजू बरेटिया, दिलीप रोकडे, जीवन डोंगरे, अनिल पठारे, रजन गहिरे, लखन भातेवाले, दिलीप शेळके, सोनू काबलिये, विजय फत्तेलष्कर, अनिल पांडे, विलास संभारे, जयराज पांडे, सुरेश कचरे, नानासाहेब पवार, संदेश वाघ, बाला कचरे, रामलाल पहाडिये, योगेश पवार, लखन कोकणे, विनोद जगताप उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीपी’ याचिकेवर निवडणुकीचे सावट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या विकास आराखड्याच्या (डीपी) याचिकेवर आता निवडणुकीचे सावट निर्माण झाले आहे. त्यातच 'डीपी'बद्दलच्या महापौरांच्या शपथपत्राबद्दलही पालिका वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापौर शपथपत्र देणार का, अशी चर्चा सुरू आहे.

औरंगाबादच्या विस्तारित भागाचा सुधारित विकास आराखडा महापालिकेने सुमारे तीन वर्षांपूर्वी तयार केला. या आराखड्याबद्दल अनेक आक्षेप होते. आरक्षण ठेवणे व आरक्षण उठवणे या बद्दलच्या सर्वाधिक तक्रारी होत्या. त्याशिवाय झोन बदलाच्या तक्रारी देखील होत्या. त्यामुळे सुधारित विकास आराखडा वादात सापडला. दरम्यान, आराखड्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. त्यामुळे विकास आराखड्याच्या मसुद्यावर व नकाशावर तत्कालीन आयुक्तांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्यामुळे तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे यांच्या स्वाक्षरीने आराखडा आणि नकाशा कोर्टात सादर करण्यात आला. यावेळी तुपे यांनी आराखडा आणि नकाशाशी आपण सहमत असल्याचे शपथपत्र देखील कोर्टात सादर केले. त्यानंतर तुपे यांचा महापौरपदाचा कार्यकाळ संपला. त्यानंतर भाजपचे भगवान घडमोडे महापौर झाले. त्यांनी देखील विकास आराखड्याच्या बाजूने कोर्टात शपथपत्र दाखल केले. घडमोडे यांचा महापौरपदाचा कार्यकाळ संपल्यावर आता शिवसेनेचे नंदकुमार घोडेले महापौर आहेत. एकुणात सुधारित विकास आराखडा तयार झाल्यावर तिसरा महापौर महापालिकेत विराजमान झाला आहे, पण आराखड्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात निकाल लागलेला नाही. विद्यमान महापौरांनी विकास आराखड्याबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. १४ जानेवारी रोजी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात तारीख होती, परंतु महापौरांनी भूमिका स्पष्ट करणारे शपथपत्र दाखल न केल्यामुळे तारीख वाढली आहे. नवीन तारखेबद्दल पालिका प्रशासनाकडे माहिती नसली, तरी विद्यमान महापौरांच्या शपथपत्राबद्दल पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

\B'ठोस मार्ग' निघावा म्हणून प्रयत्न

\Bमहापौरांच्या संभाव्य शपथपत्राला निवडणुकांचा संदर्भ जोडला जात आहे. एप्रिल किंवा मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान विधानसभेची निवडणूक होईल, असे मानले जात आहे. या दोन्हीही निवडणुका महापौरांच्या शपथपत्राशी 'जोडण्याचा' प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. या जोडणीसाठी संबंधितांच्या बैठकांचे सत्रही पार पडले, पण त्यातून 'ठोस मार्ग' निघाला नाही. त्यामुळे शपथपत्राचा निर्णय लांबणीवर पडल्याचे बोलले जात आहे. 'ठोस मार्ग' निघावा म्हणून स्थानिक पातळीवरील काही बडे नेते प्रयत्न करीत आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी 'मार्ग' काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिता-पुत्रास कुऱ्हाडीने मारहाण; आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतात बकऱ्या चारण्याचा वाद विकोपाला जाऊन पिता व पुत्रावर कुऱ्हाडीच्या तुंब्याने गंभीर मारहाण करणारा आरोपी बाबू रूपा आडे याला तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी बुधवारी (२७ फेब्रुवारी) ठोठावली.

या प्रकरणी राजू उमा आडे (३०, रा. डोणगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १ एप्रिल २०१४ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास फिर्यादी व फिर्यादीचे वडील उमा वालू आडे हे शेतातून येत असताना आरोपी बाबू रूपा आडे (४२, रा. डोणगाव) याने दोघांना अडवले आणि 'शेतात बकऱ्या का चारता' असे म्हणत त्यांच्याशी वाद घातला. वाद विकोपाला जाऊन संतापलेल्या आरोपीने फिर्यादीचे वडील उमा आडे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. त्याचवेळी फिर्यादीने आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने फिर्यादीच्याही डोक्यात कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण करुन फिर्यादीला गंभीर जखमी केले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या ३०७, ५०६ कलमान्वये एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. खटल्यावेळी, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात फिर्यादी व उमा आडे यांची साक्ष महत्वाची ठरली.

\B... तर आणखी तीन महिने शिक्षा

\Bदोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने आरोपी बाबू रूपा आडे याला भारतीय दंड संहितेच्या ३२६ कलमान्वये तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. प्रकरणात तपासी अंमलदार म्हणून तत्कालिन पोलिस निरीक्षक अरुण डोंगरे, तर पैरवी अधिकारी म्हणून कॉन्स्टेबल युसुफ पठाण यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images