Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शिवसेनेकडून आचारसंहितेचा भंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापौरांच्या शासकीय निवासस्थानी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिवसेनेने निवडणूक आचारसंहितेचा भंग केला आहे. महापौर बंगल्यात मंगळवारी दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते.

निवडणुकीची घोषणा झाल्यावर आचारसंहिता लागू होते. आचारसंहितेच्या काळात पदाधिकाऱ्यांना शासकीय सेवा, सुविधा मिळत नाहीत. प्रशासनाकडून सेवा, सुविधा काढून घेतल्या जातात. महापौरांना शासकीय निवासस्थान देण्यात आले आहे. आचारसंहितेच्या काळात या निवासस्थानाचा वापर केवळ निवासासाठीच करावा, असे संकेत आहेत. शासकीय निवासस्थानात आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षाच्या बैठका घेता येत नाहीत. मंगळवारी मात्र आचारसंहितेला न जुमानता महापौर बंगल्यात शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी यांची प्रमुख उपस्थिती होती. महापालिका, नगरपालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. याशिवाय पदाधिकारी देखील बैठकीला उपस्थित होते. महापौर बंगल्यात वेगवेगळ्या सत्रात बैठकांचे सत्र सुरू होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; संघटनात्मक कामाबद्दल बैठकीत चर्चा करण्यात आली. वॉर्ड निहाय व सर्कलनिहाय प्रचार यंत्रणा कशी असावी. कोणत्या सर्कलमध्ये सभांचे आयोजन करायचे, कोणत्या सभेसाठी कोणत्या नेत्याला पाचारण करायचे, सभेची ठिकाणे कोणती असावीत याबद्दल लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या सूचना ऐकून घेण्यात आल्या. लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रचार यंत्रणा राबवली जाणार आहे. १६ आणि १७ मार्च रोजी शहर व ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले जाणार आहेत. या मेळाव्यांना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीचा एक टप्पा आणि उमेदवारी अर्ज भरल्यानंतरचा एक टप्पा अशा दोन टप्प्यांत शिवसेनेची प्रचार यंत्रणा राबवली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

\Bठाकरेंच्या सभा होणार

\Bप्रचाराच्या शेवटच्या टप्यात १८ किंवा १९ एप्रिल रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा औरंगाबाद शहरात होणार आहे. त्याशिवाय युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचीही सभा व्हावी यासाठी स्थानिक नेते प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व्हावे, असाही आग्रह धरला जात आहे.

\B'निवासस्थानाला आचारसंहिता नसते'\B

मुख्यमंत्री सुद्धा 'वर्षा' या त्यांच्या निवासस्थानी बैठका घेतच आहेत. तशीच महापौर बंगल्यावर बैठक झाली आहे. बंगला म्हणजे निवासस्थान आहे, कार्यालय नाही आणि आज झालेली शिवसेना लोकप्रतिनिधींची बैठक निवडणुकीची नव्हती. ही बैठक विकासकामांवर चर्चा करण्यासाठीची होती.

- नंदकुमार घोडेले, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आचारसंहितेचा फटका; महापौरच झाले चालक

0
0

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा पहिला फटका महापौर नंदकुमार घोडेले यांना बसला आहे. चालकच नसल्यामुळे त्यांना स्वत: कार चालवत महापालिकेत यावे लागले. दिवसभरात महापालिकेत त्यांच्या दोन - तीन चकरा झाल्या. प्रत्येकवेळी ते स्वत:च कार चालवत होते.

महापालिकेने महापौरांना गाडी दिली आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागल्यावर त्यांना महापालिकेची गाडी सोडून द्यावी लागली. सध्या ही गाडी महापालिकेत उभी आहे. गाडीबरोबरच प्रशासनाने चालक देखील काढून घेतला आहे. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागू होताच महापौरांनी महापालिकेची गाडी सोडली. गाडीबरोबरच चालकही सोडून द्यावा लागला. त्या दिवशीपासून त्यांनी स्वत:ची खासगी कार वापरणे सुरू केले आहे. मंगळवारी महापौरांच्या कारवर महापालिकेचा चालक नव्हता. त्यांचा खासगी चालक देखील सुट्टीवर होता. त्यामुळे महापौरांना स्वत:च कार चालवत महापालिकेत यावे लागले.

सायंकाळी महापौरांनी पालिका प्रशासनाला पत्र दिले. आचारसंहितेचे पालन करताना महापौरांनी नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कोणत्या मुद्यांचे पालन केले पाहिजे, कोणत्या सुविधा आचारसंहितेच्या काळात महापौरांना दिल्या जाणार आहेत याचा लेखी खुलासा प्रशासनाने करावा, असे त्यांनी आयुक्तांना कळवले आहे. आचारसंहितेच्या काळात पाणीपुरवठा, रस्ते, दिवाबत्ती, साफसफाई, आरोग्य या कामांकडे दुर्लक्ष होऊ नये. या सर्व क्षेत्रातील कामे करण्याबद्दल निवडणूक आयोगासह अन्य प्राधिकरणाशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्या आणि कामांमध्ये खंड पडू देऊ नका, असेही महापौरांनी आयुक्तांच्या नावे दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधीअभावी विनाशवेळा!

0
0

गणेश जाधव, फुलंब्री

औरंगाबाद - जळगाव राष्ट्रीय महामार्गाचे काम निधीअभावी काम बंद पडले असून, उखडून टाकलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांचा प्रवास अक्षरश: मरणाच्या दारातून सुरू आहे. त्यामुळे लवकर काम पूर्ण करा, अशी मागणी होत आहे.

खरे तर औरंगाबाद - फुलंब्री - सिल्लोड - अजिंठा हा राज्य महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केंद्रीय रस्ते विकास महामंडळाकडे (राष्ट्रीय महामार्गाकडे) हस्तांतरित करण्यात आला. या रस्त्याला राष्ट्रीय दर्जा मिळाला. या रस्त्याचे चौपदरीकरण असल्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी, हॉटेल व्यावसायिक समाधान व्यक्त करीत होते. मात्र, आजघडीला या कामाची गती पाहता पूर्वीचाच रस्ता बरा होता, असे म्हणण्याची वेळ या सर्वांवर आली आहे. आघाडी सरकारच्या कार्यकाळापासून हा रस्ता रूंद होणार अशी चर्चा होती. २०१४च्या निवडणुकीपूर्वीच या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर युती सरकार आले. त्यांनीही या चौपदरी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन खामगाव फाटा येथे केले. त्यानंतर कामास सुरुवात झाली. संबंधित गुत्तेदाराने एका बाजुने खोदकाम करायला हवे होते. मात्र, त्याने काम आटोपते घ्यायचे म्हणून दोन्ही बाजूने पूर्ण रस्ता खोदला. पर्यायी रस्ताही व्यवस्थित केला नाही. धड पाणीही मारले नाही. त्यामुळे आता रस्त्यावर फक्त खड्डे आहेत. येथून प्रवास करताना अंग खिळखिळे होते. सबंध प्रवासभर थरथराट अनुभवायला मिळतो. वाहनेही खिळखिळी होत आहेत. रस्त्यावर अनेक वाहने नादुरुस्त झाल्याची पाहायला मिळतात. या मार्गावर परिसरातील खेडे, वाड्या वस्त्यांसह शहरातून ग्रामीण भागात येणारे शिक्षक कर्मचारी तसेच जगप्रसिध्द अजिंठा लेणीकडे जाणारे पर्यटकांचा राबता असतो. त्यामुळे रस्ता वर्दळीचा आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकाम केल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांच्या अंगावर काटा येतो. कधी कोणते वाहन येऊन आदळेल हे सांगता येत नाही. चोवीस तास धुळीचे लोट उठतात. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या मरणाच्या दाढेतून सुटका करा आणि रस्त्याचे काम लवकर पूर्ण करा, अशी मागणी होत आहे.

\Bनाना, दादांचा मतदार संघ; तरीही पैसा मिळेना

\Bऔरंगाबाद - जळगाव राष्ट्रीय महामार्गाचा बराचसा भाग हा जालना लोकसभा मतदार संघात येतो. आळंद ते सावंगी (हर्सूल) पर्यंत फुलंब्री विधानसभा मतदार संघात येतो. या विभागाचे खासदार व आमदार दोघेही सत्ताधारी पक्षाचे आहेत. खासदार रावसाहेब दानवे हे सत्ताधारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तर या मतदार संघाचे आमदार हरिभाऊ बागडे हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. दोघेही सत्तेत असताना या रस्त्याला निधीची कमतरता भासतेच कशी, असा सवाल नागरिक करत आहेत.

औरंगाबाद - जळगाव या राष्ट्रीय महामार्गाचे काम निधी नसल्यामुळे सध्या बंद आहे. निधी लवकरच मिळेल, अशी शक्यता आहे. निधी मिळताच आम्ही तातडीने काम सुरू करणार आहोत. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येईल.

- एल. एस. जोशी, अधिक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग

सध्या औरंगाबाद - जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागते आहे. रस्ता जागोजागी खोदून ठेवल्याने प्रवास करताना मणक्याचा आजार जडण्याची संभावना आहे. त्यापेक्षा पूर्वीचा रस्ता तरी बरा होता. काम लवकर पूर्ण करावे.

- अनिल जाधव, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्यागीसह दोघांचा जामीन फेटाळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कंटेनरमधील ८४ लाख ८२ हजार ३२२ रुपयांच्या कॉपर रोलची चोरी केल्याच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी मनोज ऋषिपालसिंग त्यागी व आरोपी शिवदत्त रामकिशन शर्मा यांचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी मंगळवारी (१२ मार्च) फेटाळला.

वाळूज परिसरातील साऊथ सिटी येथील मोकळ्या मैदानात कॉपर वायर बंडलची विक्री करण्यासाठी काही लोक येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने सापळा रचून कॉपर वायर चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या. गुजरात येथील शक्ती फॉरवर्ड कंपनीने औरंगाबादमधील भारत इन्सुलेशन कंपनीसाठी पाठविलेल्या कॉपर वायरची कंपनीत पोहोच न करता त्याची परस्पर विक्री करण्यासाठी ही टोळी घेऊन जात होती. या टोळीच्या ताब्यातून ८४ लाख ८२ हजार ३२२ रुपये किमतीच्या कॉपर वायरच्या सहा बंडलसह मोबाइल फोन, रोख रक्कम असा मिळून ८५ लाख ३५ हजार ५०२ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. प्रकरणात ट्रान्सपोर्ट कंपनीचे हनुमानलाल पोकरराम चौधरी (३२, रा. सूरत, गुजरात) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मनोज ऋषीपालसिंग त्यागी (५०, रा. गुडगाव, दिल्ली), शिवदत्त रामकिशन शर्मा (४८, रा. उत्तर प्रदेश), मुकीम फेकुखान (३६, रा. मुंबई, मूळ रा. उत्तर प्रदेश), धर्मेंद्र रामतीर्थ पाल (३२, रा. उत्तर प्रदेश), योगेश तुळशीराम पठाडे (३३, रा. नाईकनगर, दवळाई परिसर, औरंगाबाद) या आरोपींना २३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

\Bआरोपींवर परराज्यातही गुन्हे

\Bआरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्यानंतर आरोपी त्यागी व आरोपी शिवदत्त शर्मा यांनी नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, मनोज त्यागी याच्यावर औरंगाबादसह राज्यात व परराज्यातही वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत आणि त्यागीसह शर्मा व इतर आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. तसेच आरोपींना जामीन मंजूर केल्यास ते आणखी गुन्हे करू शकतात. त्यामुळे आरोपींना नियमित जामीन मंजूर करू नये, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने दोन्ही आरोपींचा नियमित जामीन अर्ज फेटाळला. जिल्हा सरकारी वकील देशपांडे यांना अॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोतकर रिंगणा बाहेरच, ‘मातोश्री’ हून येणार आदेश

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यमंत्री अर्जुन खोतकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणाबाहेरच राहणार असल्याची माहिती शिवसेनेच्याच एका ज्येष्ठ नेत्यांनी दिली आहे. लोकसभेचा हट्ट खोतकरांनी सोडावा यासाठी लवकरच 'मातोश्री'हून आदेश येईल, अशीही माहिती त्या नेत्याने दिली.

जालना लोकसभा मतदारसंघात अर्जुन खोतकर विरुद्ध भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे असा संघर्ष गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर या संघर्षाला अधिकच धार चढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोतकर-दानवे यांच्यात समेट घडविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना देखील खोतकर-दानवे यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी पाठविले होते. मुख्यमंत्र्यांसह खोतकरांनी देशमुखांचीही शिष्टाई धुडकावली. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपण सज्ज आहोत आणि आपण निवडणूक लढवणारच, असे त्यांनी निक्षूण सांगितले होते. या उपरही 'मातोश्री' हून आदेश आला तर त्याचा आदर करू, अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली होती.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघाचे काय होणार, खोतकर खरोखरच निवडणुकीच्या रिंगणात राहणार का याबद्दल राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेच्या मुंबईस्थीत एका ज्येष्ठ नेत्याने या संदर्भात 'मटा' प्रतिनिधीशी बोलताना खोतकर यांची भावना रास्त असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी आता भाजपबरोबर युती झाली आहे. त्यामुळे शिवसेनेला युतीचा धर्म पाळावा लागणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात 'मातोश्री' हून आदेश दिले जातील आणि खोतकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणाच्या बाहेर राहतील, असे संकेतही त्या नेत्याने दिले आहेत. खोतकर यांच्या भावनेची दखल 'मातोश्री'ने घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांना योग्य तो न्याय देखील दिला जाईल, असेही त्या नेत्याने स्पष्ट केले. दानवेंबद्दल सर्वसामान्यांमध्ये असलेली भावना खोतकरांच्या भूमिकेमुळे व्यापक झाली, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूषित पाण्यामुळे संताप

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या अडीच महिन्यांपासून होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी सिडको एन-सात येथील महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयाच्या समोर 'रास्ता रोको' आंदोलन केले. 'निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काम करता येत नाही,' असे अजब उत्तर अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिले. काम करता येत नसल्याचे लेखी द्या, अशी मागणी नागरिकांनी केल्यावर आठ दिवसांत जलवाहिनी दुरुस्ती करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिले.

सिडको एन सात भागातील अयोध्यानगर येथे गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबद्दल नागरिकांनी वेळोवेळी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे खोदून दूषित पाणीपुरवठ्याची समस्या सोडवत असल्याचा दिखावा पाणीपुरवठा विभागातर्फे केला गेला. खड्डे खोदूनही दूषित पाणीपुरवठ्याचे कारण सापडत नाही, असे लक्षात आल्यावर नागरिकांनी मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास सिडको एन-सात येथील पाणीपुरवठा कार्यालय गाठले. कार्यालयासमोर निदर्शने सुरू केली. त्यानंतर 'रास्ता रोको' आंदोलन देखील सुरू केले. या प्रकारामुळे पाणीपुरवठा विभागाचे काही अधिकारी कार्यालयात दाखल झाले. दूषित पाणी कोठून येत आहे, याचा शोध आम्ही घेत आहोत, पण त्यात यश येत नाही, असे उत्तर त्यांनी नागरिकांना दिले. आता निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे काम करता येणार नाही, असे त्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आचारसंहितेचे कारण सांगितल्यामुळे नागरिक संतापले. काम करता येत नाही, असे लेखी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर अधिकारी नरमले. आठ दिवसांत दूषित पाण्याचा प्रश्न सोडवतो. आम्हा थोडा वेळ द्यावे, अशी विनंती त्यांनी नागरिकांना केली. नागिरकांनी आठ दिवसांचा वेळ देण्याचे मान्य केले. याबद्दल माहिती देताना रवी तांगडे म्हणाले, 'आठ दिवसांत दूषित पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर सहकुटुंब पुन्हा पाणीपुरवठा कार्यालयाच्या समोर स्वयंपाक आंदोलन केले जाईल,' अशा इशारा देण्यात आला आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, रवी तांगडे यांनी केले. यावेळी दत्ता भारती, सतीश खेडकर, जाधव, संजिवनी हत्ते, राहुल खरात, ताराबाई जाधव, रुक्मिणी ढाकणे, गोदावरी बोर्डे, जयश्री लांडे, जयश्री म्हस्के, शशिकला सोळंके यांच्यासह महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दूषित पाण्याचे स्त्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत दूषित पाण्याचे स्त्रोत सापडतील. ही समस्या दोन दिवसांत सुटेल.

- हेमंत कोल्हे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्म्या महिला तणावाखाली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कामाचा ताण, कौटुंबिक कलह; तसेच आहाराबाबत न घेतलेली काळजी यामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे. महिलांबाबतही हे प्रमाण वाढले आहे. ५० टक्के महिला तणावाखाली जीवन जगत असल्याची माहिती मनोविकारतज्ज्ञ डॉ. अजीज अहेमद कादरी यांनी दिली.

रविवारी (११ मार्च) डॉ. सना कादरी खिल्जी यांनी लिहिलेल्या 'वुमन्स सायक्रॉट्री वर्ल्ड' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. अजीज अहेमद कादरी हे बोलत होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. अब्दुल माजीद, डॉ. सारा माजीद, डॉ. फैसल खिल्जी, डॉ. जफर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी या पुस्तकाच्या लेखिका डॉ. सना कादरी खिल्जी यांनी सांगितले की, त्यांच्या पुस्तकात महिलांवर विविध आजाराने काय परिणाम होतात. लैंगिक छळ, बलात्कार, मनोरुग्ण, ताणतणाव यामुळे काय परिस्थिती उद्भवते? याची माहिती उदाहरणांसह देण्यात आली आहे. अनेक महिलांना होणारे आजार हे मनोविकार असल्याचे लक्षात येत नाही. त्या अंधश्रद्धा आणि बाबागिरीला बळी पडतात. अशा उपायामुळे अशा रुग्णांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी. यासाठी पुस्तक लिहिण्यात आले आहे.

या पुस्तकाचे उर्दू, हिंदीमध्ये भाषांतर केले जाणार असल्याची माहितीही यावेळी संयोजकांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुदान वाढीची दूध उत्पादकांची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करता शासनाने दूध अनुदानाच्या रक्कमेत वाढ करावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. प्रती लिटरमागे किमान पाच रुपयापेक्षा अधिक अनुदान दिले जावे, असे उत्पादकांची मागणी आहे.

शासनाने राज्यातील दूध भुकटी व द्रवरुपी दुधाची निर्यात करण्यासाठी सहकारी; तसेच खासगी दूध भुकटी प्रकल्पांना अनुदान योजना पुन्हा पुढील काही काल‌वधीसाठी सुरू केली आहे. पूर्वी प्रती लिटरमागे पाच रुपये अनुदान दिले जात होते. आता तीन रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर पैठण तालुक्यातील नांदर येथील पुष्पाबाई काळे दूध उत्पादक संस्थाचे चेअरमन रवींद्र काळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अपुऱ्या पडलेल्या पावसामुळे खरीप पाठोपाठ रब्बीचे मोठे नुकसान झाले. सततच्या दुष्काळामुळे दुग्ध व्यवसायकडे शेतकरी करत आहे, पण तोही परवडत नाही. त्यात सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी व चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. महागडा चारा घेणे शक्य नाही. ही परिस्थिती लक्षात घेता शासनाने दुष्काळी भागातील दूध उत्पादकांना दिलास देत अनुदानाच्या रक्कमेत वाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला दूध पुरवठा करणाऱ्या माऊली दूध उत्पादक सहकारी संस्थेचे रामकृष्ण खलसे यांनीही अनुदान रक्कमेत वाढ करण्याची मागणी 'मटा'शी बोलताना केली. जनावरांसाठी चाऱ्या पाण्याची सोय करावी, त्यासाठी चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. संघाचा खरेदी दर हा प्रती लिटर २० रुपये आहे. अनुदान पूर्वीप्रमाणे किमान पाच रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मिळाल्यास दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात मदत मिळ‌ाले, असे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाइक रॅलीत कर्तबगार महिला सत्कार

0
0

'ऑल वुमन मटा बाइक रॅली'निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना गौरविण्यात आले. यामध्ये वंदना कसारे, निकिता अग्रवाल, वैशाली लांबे, दीपाली मुळे, प्रा. निर्मला जाधव आणि शिवगंगा पोफळे यांचा समावेश आहे. या महिलांनी आपल्या कार्यातून समाजाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. या सन्मानाबद्दल त्यांची व्यक्त केलेल्या भावना...

ब्रीजवाडी, मिसारवाडी, नारेगाव, सिंधीबन येथे गेल्या नऊ वर्षांपासून काम सुरू आहे. आतापर्यंत ५० बालविवाह रोखण्यात आतापर्यंत यश आले आहे; तसेच मुलींच्या शिक्षणासाठी कार्य सुरू आहे. 'मटा'ने केलेल्या या सत्कारामुळे आम्हाला अधिक बळ मिळाले आहे. आगामी काळात असेच काम चालू ठेवण्यात येणार आहे.

- वंदना कसारे

'मटा'च्या बाइक रॅलीचा उत्साह खरोखरच चैतन्यमयी होता. 'मटा'कडून सन्मान स्वीकारताना आणि रॅलीमध्ये भाग घेताना खरोखर मजा आली. यंदा महिला दिनाची संकल्पना 'बँलन्स फॉर बेटर' होती. मी पण माझी मुलगी आणि नातीला घेऊन ते संतुलन साधण्याचा प्रयत्न केला. तीन पिढ्यांनी रॅलीचे प्रतिनिधित्व केले.

- मंजुषा राऊत, म्युझिक थेरेपिस्ट

विशेष काम करणाऱ्या स्त्रियांची 'मटा'ने कायम दखल घेतली आहे. त्यामुळे आमचाही उत्साह वाढतो. तेजस्विनी ग्रुप रॅलीमध्ये सातत्याने सहभागी होत आला आहे. यंदाही आम्ही कर्तत्ववान स्त्रियांच्या वेशभूषेत आलो. प्रत्येकीलाच रॅलीची उत्सुकता असते.

- वैशाली लांबे, दीपाली मुळे, तेजस्विनी समूह

इरव्हिल क्लब ऑफ औरंगाबाद लोटसच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम राबविले आहे. या उपक्रमाला 'मटा'ने गौरवपूर्ण थाप दिली आहे. त्यासाठी आभार. आगामी काळात अधिक उपक्रम राबवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचे काम आम्ही करू. या गौरवाबाबत 'मटा'चे आभार.

- निकिता अग्रवाल

ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या माध्यमातून महिला प्रश्नांवर काम करीत आहे. 'मटा'ने केलेला हा गौरव केंद्रातर्फे चालविण्यात येणाऱ्या कार्याचा गौरव निश्चित ही बाब आनंददायी आहे.

- प्रा. निर्मला जाधव

…………

'मटा'तर्फे करण्यात झालेल्या गौरव व सत्काराबाबत आम्ही ऋणी आहेत. आतापर्यंत अनेक पुरस्कार घेण्याचा योग मला मिळाला, मात्र महिला दिनानिमित्त 'मटा'ने केलेला सत्कार हा पहिल्यांदाच झालेला आहे. निश्चितच ही बाब माझ्यासाठी महत्त्वाची आहे.

- शिवगंगा पोफळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालवैज्ञानिक स्पर्धेत विश्वजीतला सुवर्ण पदक

0
0

औरंगाबाद : डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक राज्यस्तरीय स्पर्धेत येथील विश्वजित जाधव याने सुवर्ण पदक पटाविले आहे. मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशनतर्फे सातवी व नववी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी या राज्यस्तरीय परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. लेखी, प्रात्याक्षिक व संशोधन प्रकल्प आणि तोंडी अशा चार टप्प्यांत ही परिक्षा घेण्यात आली. त्यात नववीच्या मराठी व इंग्रजी माध्यमाची मिळून राज्यातून २८ हजार ८४० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये वुडरिज हायस्कूलचा विद्यार्थी विश्वजीत प्रशांत जाधव याला सुर्वण पदक मिळाले आहे. शिक्षक रश्मी बाहेती, डॉ. मेघना जाधव, डॉ. प्रशांत जाधव यांनी त्याला मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांड्यावरील तरुणीने लिहिल्या भावस्पर्शी कथा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तांड्यावर आपले आयुष्य घालवणाऱ्या, शिक्षण पूर्ण करणाऱ्या अनिता जाधव या तरुणीने भावस्पर्शी कथा लिहिल्या असून, त्या ‘सृजनसकाळ’ कथासंग्रहाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. जगदीश कदम होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. भगवान अंजनीकर व प्रा. डॉ. सुरेश सावंत, पुंडलिक राठोड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रकाशक दत्ता डांगे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रा. डॉ. भगवान अंजनीकर यांच्या हस्ते ‘सृजनसकाळ’ कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अनिता जाधव यांनी तांड्यावरील अनुभव सांगत आपणास या कथा कशा सुचल्या व कथा लिहिण्यामागची भावना काय सांगितली. पंडित पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर अरुण बडूरवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास नितीन राठोड, लक्ष्मण जाधव, भास्कर शिंदे, विजयकुमार चित्तरवाड, मीनाक्षी आचमे, प्रदीप पाटील उपस्थित होते.

‘पथिक’चे प्रकाशन
वसुंधरा सुत्रावे यांच्या ‘पथिक’ ललितलेख संग्रहाचे साहित्यिक प्रा. डॉ. जगदीश कदम, शंकर वाडेवाले, पंडित पाटील, दत्ता डांगे यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले. वसुंधरा सुत्रावे या ललितलेखनाची सशक्त परंपरा पुढे सुरू ठेवतील, असा आशावाद यावेळी प्रा. कदम यांनी व्यक्त केला. सुत्रावे यांच्या लिखाणात चिंतनशीलता आणि संवेदनशीलता असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. लेखिकेची शैली काव्यात्मक असल्याचे वाडेवाले म्हणाले. मीनाक्षी आचमे-चित्तरवाड यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रतिमा मसारे-रोकडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शोभा सुत्रावे, दशरथ सुत्रावे, प्रा. भगवान अंजनीकर, देवदत्त साने, बरडे, प्रा. कमलाकर चव्हाण, भास्कर शिंदे, विलास ढवळे, प्रा. राजेश मुखेडकर उपस्थित होते.


जाधव यांच्या कथांमध्ये शैक्षणिक मूल्य आहे. लेखिकेकडे समाजाला घडविण्याचे सामर्थ्य आहे. काळाचे आव्हान या लेखिकेने पेलले आहे. माणूस घडविण्याचे कार्य ती करते आहे. प्रतिभेची कोवळी किरणे या कथांमध्ये आहेत.
- प्रा. डॉ. सुरेश सावंत

तांड्यावरील लेखिकेने आपल्या आई-वडिलांच्या तळपायांच्या भेगांमधील इतिहास वाचला आणि कथा लिहायला लागली. लेखिकेला जे दिसले ते तिने लिहिले. हे वास्तवदर्शी लेखन आहे. या कथांमधून स्त्रीच्या स्वतंत्र अस्तित्वाचे दर्शन घडते.
- प्रा. डॉ. जगदीश कदम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटक होत नसल्याने डॉक्टरचे उपोषण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तीन वर्षांपासून अन्याय, अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना अटक होत नसल्याचा आरोप करीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा गोवर्धन गायकवाड यांनी सोमवारपासून (११ मार्च) विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध वेळोवेळी तक्रारी करुनसुद्धा कुठलीच कारवाई झाली नाही. त्यांच्या चौकशीचे शासनाने आदेश देऊनही तत्कालिन उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळ‌े, यापूर्वीचे उपसंचालक डॉ. कंदेवाड यांनीही त्यांना पाठीशी घातले. डॉ. लाळे यांनी मला व माझ्या पतीला धमकी दिली. प्रकरणात डॉ. लाळे, डॉ. गोविंद चौधरी, रत्नकला मोहिते यांच्याविरुद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र १३ दिवस होऊनही त्यांना अटक झालेली नाही व मला धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव उपोषण सुरू केल्याचे डॉ. रेखा गायकवाड यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीयूसी आता ऑनलाइन

0
0

औरंगाबाद : पीयूसी केंद्रांवरील यंत्रणा लवकरच ऑनलाइन करण्यात येणार आहे. यामुळे पीयूसी केंद्रांवर तपासणी केल्यानंतर त्याची माहिती ऑनलाइन प्रणालीद्वारे थेट आरटीओ कार्यालयाकडे येईल. त्यामुळे बनावट पीयूसी वाटपावर लगाम बसेल, अशी अपेक्षा व्यत होत आहे. सध्या पीयूसी केंद्रांवर तपासणी केल्यानंतर देण्यात येणारी कागदपत्रे आरटीओ कार्यालयात जमा केली जातात. त्यानंतर त्या कागदपत्रांची तपासणी करून आरटीओ कार्यालयात नोंद होते. यावर नियंत्रण येण्यासाठी पीयूसी केंद्रांना आता ऑनलाइन यंत्रणा बंधनकारक केली जाणार आहे. त्यासाठी या केंद्रांच्या यंत्रणेत बदल करावा लागणार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अव्वलगाव शिवारात वाळूसह टेम्पो जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

औरंगाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री अव्वलगाव (ता. वैजापूर) शिवारात बेकायदा वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला. या कारवाईत दोन ब्रास वाळू व टेम्पो, असा चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सागर केशव उगले (रा. अव्वलगाव) याच्यावर गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.

गेल्या आठवड्यात वीरगाव पोलिसांनी वाळूने भरलेला टेम्पो (एम एच २० ई जे ८२०६) पकडला आहे. त्याला तहसील प्रशासनाने पावणे दोन लाखाचा दंड ठोठावल्याने ते वाहन ठाण्यातच उभे आहे. ही दोन्ही वाहने एकाच मालकाची असल्याची माहिती मिळाली आहे.सोमवारी रात्री ऑल आऊट ऑपरेशन मोहिमेत पोलिस उपनिरीक्षक सचिन कापुरे, सहायक फौजदार गफ्फार खान पठाण, रतन वारे, किरण गोरे, साळवे व खरात यांच्या पथकाने टेम्पोची (एम एच ०४ एफ डी ९९५५) तपासणी केली असता अवैध वाळू वाहतूक उघडकीस आली. चालक सागर उगले याच्याकडे वाळू वाहतूक परवाना आढळला नाही. उगले याला अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद, परभणीत सेनेचे जुनेच चेहरे

0
0

उस्मानाबाद, हिंगोलीचे ठरेना

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उस्मानाबाद आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी कुणाला द्यायची या बद्दल शिवसेनेमध्ये घोळ सुरुच आहे, तर औरंगाबाद व परभणी मतदारसंघातून जुनेच चेहरे नव्याने देण्याचा निर्णय शिवसेनेने केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. येत्या दोन दिवसांत उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल, असे मानले जात आहे.

शिवसेना-भाजप युतीचा विचार करता मराठवाडा विभागात शिवसेनेकडे औरंगाबाद, परभणी, हिंगोली आणि उस्मानाबाद हे चार लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सुटलेले आहेत. चारपैकी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे आणि परभणी मतदारसंघात संजय (बंडू) जाधव यांची उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जात आहे. या दोघांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नसली तरी त्यांना कामाला लागण्याचे संदेश प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

हिंगोली आणि उस्मानाबाद मतदार संघाबद्दल मात्र शिवसेनेच्या नेतृत्वासमोर पेच कायम आहे. हिंगोलीत जयप्रकाश मुंदडा यांना संधी द्यायची की हेमंत पाटील यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवायचे याबद्दल खल सुरू आहे. मुंदडा यांच्या विजयाबद्दल साशंकता असल्यामुळे नवीन पर्याय शोधावा का याचा विचार केला जात असल्याचे बोलले जात आहे. उस्मानाबाद मतदारसंघात देखील अशीच स्थिती आहे. प्रा. रवी गायकवाड यांच्याबद्दल या मतदारसंघात नाराजीचा सूर आहे. नवीन चेहरा या मतदारसंघात देण्यात यावा अशी मागणी होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची चर्चा उस्मानाबादमधून नव्याने सुरू झाली आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात हिंगोली-उस्मानाबादचे चित्र स्पष्ट होईल, त्याची घोषणा रविवारी औरंगाबादेत होणाऱ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर केली जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

खोतकर समन्वयक

जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणारे शिवसेनेचे आमदार तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना शिवसेनेने मराठवाडा विभागातील लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना-भाजपचे समन्वयक म्हणून नियुक्त केले आहे. समन्वयक म्हणून शिवसेनेतर्फे खोतकर तर भाजपतर्फे पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खोतकर यांना समन्वयक केल्यामुळे लोकसभा निवडणूकीसाठीचा त्यांनी केलेला दावा संपुष्टात आल्याचे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाटीला ११९ कोटींचा निधी

0
0

औरंगाबाद: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी (घाटी) राज्य शासनाने २०१९-२० या वर्षासाठी व्हाईट बुकमध्ये ११९ कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे. त्यासाठी घाटी प्रशासनाने १४२ कोटींची मागणी केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ कोटींचा निधी अधिक मिळाला आहे. मागील वर्षापेक्षा १० टक्के वाढ झाली असून एप्रिलमध्ये निधी मिळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१९ दिवसांत ५६ वाहने चोरीला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराच्या विविध भागातून वाहन चोरी होण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या १९ दिवसांत तब्बल ५६ वाहने चोरीस गेली आहेत. शहरातून सहा महिन्यात सहाशेपेक्षा जास्त वाहने चोरीस गेली आहेत. याशिवाय वाहनांच्या डिक्कीतून रोख रक्कम पळवण्याच्या पाच घटना घडल्या आहेत. साताऱ्यासह शहरातील इतर चोऱ्यांचा पोलिस तपास संथगतीने सुरू आहे.

शहरातील वाहन व इतर चोऱ्यांचा तपास वेगाने होत नसल्याने चोरांची भीड चेपली आहे. संपूर्ण पोलिस दल रस्त्यावर असताना सुद्धा भरदिवसा कारमधून लाखो रुपयांच्या थैल्या पळवण्यात आल्या आहेत. तसेच दुचाकीच्या डिक्कीतूनही लाखो रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. हे चोरटे सीसीटीव्ही फुâटेजमध्ये दिसत असूनही त्यांना अद्याप अटक करण्यात अपयश आलेले आहे. मोंढ्यातील व्यापाऱ्याची कार पंक्चर झाल्याची थाप मारून सव्वा दोन लाख, तर सेव्हन हिल जवळ ऑइल लिकेज होत असल्याची थाप मारून पाच लाखांची रक्कम असलेली बॅग कारमधून लंपास करण्यात आली. तसचे जय टॉवर येथून एका कंत्राटदाराचे साडेचार लाख रुपये कारमधून प‌ळवण्यात आले. या पाठोपाठ समर्थनगर आणि एका बँकेसमोरून दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाखांची रक्कम लंपास करण्यात आली. या चोऱ्या करताना चोरटे सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले आहेत.

शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असताना वाहन चोरीच्या घटना ‌वाढत आहेत. गेल्या १९ दिवसांत शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून सुमारे ५६ मोटारसायकली व तीन चाकी वाहने चोरीला गेल्याची नोंद करण्यात आलेली आहे. या चोऱ्यांच्या तपास संथगतीने सुरू आहे.

पोलिस रस्त्यावर; चोऱ्या सुरूच

चोऱ्या व घरफोड्या वाढल्यामुळे पोलिस आयुक्तांनी गुन्हे शाखा आणि संबधित पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरम पथकाचे (डीबी पथक) कान टोचले. त्यांना दिवस-रात्र आळीपाळीने गस्त घालण्याची ताकीद देण्यात आली. त्यानंतरही चोरी, घरफोडी आणि लूटमारीच्या घटनांत वाढ होत आहे.

गेल्या सहा महिन्यांत

४०० घरांत चोऱ्या

६०० वाहने चोरीस \B

पोलिस महासंचालक जैस्वाल आज शहरात

राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल गुरुवारी (१४ मार्च) शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पोलिस अधिकाऱ्यांची पोलिस आयुक्तालयात बैठक घेणार आहेत. ते दुपारी चार वाजता विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडेखोराचा नियमित जामीन नामंजूर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण तालुक्यातील पाचोड येथे २००३ मध्ये एका घरावर दरोडा टाकून कुटुंबियांना मारहाण करीत एक लाख ३८ हजारांचा ऐवज लांबवणारा आणि तब्बल १६ वर्षे फरार राहिलेला संशयित आरोपी राजूभाऊ उर्फ राजा गंगाराम शिंदे याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश सी. एस. दातीर यांनी बुधवारी (१३ मार्च) फेटाळला.

या प्रकरणी मंदाबाई राजेंद्र शेळके (वय ३०, रा. पाचोड, ता. पैठण, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, ३१ जानेवारी २००३ रोजी रात्री त्या कुटुंबासह घरी झोपल्या होत्या. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास दरवाजाचा आवाज आल्यामुळे त्या खोलीबाहेर आल्या असता, सासू-सासरे व दिराला तीन ते चार जण मारहाण करत असल्याचे दिसून आले. त्यांचे पती राजेंद्र यांना उठवून दरोड्याची माहिती दिली; परंतु तोपर्यंत दरोडेखोरांच्या आणखी तीन ते चार साथीदारांनी पतीला मारहाण करीत दरोडेखोरांनी एक लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात दरोडेखोरांविरोधात भारतीय दंड संहितेच्या ३९५, ३८०, ४४२ व ४५७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी राजूभाऊ उर्फ राजा गंगाराम शिंदे (वय ३७, रा. मंगळूर, ता. घनसावंगी, जि. जालना) हा फरार होता. त्याला ६ फेब्रुवारी २०१९ रोजी अटक करून त्याची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

\Bपुन्हा पळून जाण्याची शक्यता\B

संशयित आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, तो तब्बल १६ वर्षे फरार होता. तसेच तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करणे बाकी असून जामीन दिल्यास पुन्हा फरार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विहिरीत पडलेल्या कोल्ह्याच्या पिलाला नागरिकांनी सृष्टी संवर्धन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने जीवदान दिले. आता हे पिल्लू वन विभागाच्या स्वाधीन केले जाणार आहे.

नक्षत्रवाडी, विजयनगर येथील एका पडक्या विहिरीत कोल्ह्याचे पिल्लू पडले होते. विहिरीत पिल्लू पडल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी सृष्टी संवर्धन संस्थेचे डॉ. किशोर पाठक व सर्पमित्र मनोज गायकवाड यांच्याशी संपर्क साधला व मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर डॉ. पाठक व गायकवाड विजयनगरात पोचले. त्यांनी अजय दुबे, सुनील दाभाडे, कृष्णा दाभाडे यांच्या मदतीने कोल्ह्याच्या पिल्याला बाहेर काढले. सुमारे ४० फूट खोल विहिरीत ते पिल्लू पडले होते. हे पिल्लू चार महिन्यांचे असल्याचे डॉ. पाठक यांनी स्पष्ट केले. 'इंडियन फॉक्स' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रजातीचे हे पिल्लू असून उसाच्या मळ्यात त्याचे वास्तव्य असते. छोटे सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी, अंडी हे त्याचे प्रमुख खाद्य असते. विहिरीतून काढलेले पिल्लू सृष्टी संवर्धन संस्थेच्या ताब्यात ठेवण्यात आले. त्याला आवश्यक ते औषधोपचार करण्यात आले. आता त्याला वन विभागाच्या ताब्यात दिले जाईल असे डॉ. पाठक यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाल साहित्य संमेलन’ गेवराईत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे पहिले 'शब्दस्पंदन' बाल साहित्य संमेलन गेवराईत गुरुवारी होणार आहे. हे संमेलन सहारा अनाथालयातील (बालग्राम, गोविंदवाडी) विद्यार्थ्यांसोबत होणार आहे. शिक्षकांचा 'आधार परिवार'ने यासाठी पुढाकार घेतला आहे. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध बालसाहित्यिक डॉ. विशाल तायडे तर स्वागताध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गौंडगावची शाळेची पूनम ढोले ही विद्यार्थिनी असणार आहे.

गेवराई तालुक्यातील शिक्षकांचा 'आधार परिवार' विविधांगी शैक्षणिक उपक्रम राबवित आहे. या शिक्षकांकडून यंदा पहिले बाल साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संतोष गर्जे, प्रीती गर्जे यांच्यातर्फे अनाथ मुलांसाठी चालविण्यात येणाऱ्या सहारा अनाथलयात हे संमेलन होणार आहे. साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे या संमेलनाचे पूर्ण नियोजन विद्यार्थी करणार आहेत. साहित्य संमेलनासाठी स्वागताध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गौंडगावची शाळेची पूनम ढोले या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे. बालकाव्य संमेलनाची अध्यक्षा गौरी पानखडे तर बाल कथाकथन सत्राचा अध्यक्ष शेखर वाटमोडे यांची निवड निवड समितीने केली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मन्यारवाडी येथून ग्रंथदिंडीने संमेलनास सकाळी सात वाजता प्रारंभ होणार आहे. दहा वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. ११ वाजता पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या साहित्यिकांमध्ये शंकर कसबे (सोलापूर ), सुरेखा गावंडे, ( मुंबई ) शिल्पा परुळेकर ( कल्याण ), संदीप कांबळे, अपर्णा बनगरे व संजय पाटील (वसई) यांचा समावेश असणार आहे. त्यानंतर संतोष गायकवाड यांचा 'गोष्टरंग' हा विशेष कार्यक्रम होणार आहे. दुपारी दीड वाजता २० चिमुकल्यांचे कथाकथन होणार आहे. दुपारी तीन वाजता होणाऱ्या बाल कवी संमेलनानंतर संमेलनाचा समारोप होईल. तालुक्यात प्रथमच होत असलेल्या या विद्यार्थी साहित्य संमेलनाला विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आधार परिवार, शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images