Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जलील यांना विधानसभेतच ठेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीसाठी आमदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी न देता, त्यांना विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी ठेवणे आवश्यक आहे. आमदार जलील यांच्यापेक्षा अधिक योग्य आणि लोकसभेत पैसा खर्च करणारा नेता लोकसभा निवडणुकीत उभा करावा, अशी मागणी मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन (एमआयएम) पक्षाच्या एका गटाकडून करण्यात आली आहे. यामुळे 'एमआयएम'कडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा करण्यासाठी वेळ लागत असल्याची माहिती पक्षाच्या काही सूत्रांनी दिली.

लोकसभा निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन पक्षाने बहुजन वंचित आघाडीसोबत युती केली आहे. दोन दिवसांपूर्वी आघाडीने ३७ उमेदवार जाहीर केले. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद आणि दक्षिण मुंबई या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केलेली नाही. आंबेडकर यांनी केलेल्या घोषणेमुळे औरंगाबाद आणि मुंबई दक्षिण या जागा ही 'एमआयएम'ला सोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले तर, दुसरीकडे 'एमआयएम'ने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात उमेदवार द्यावा, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. पक्षश्रेष्ठींकडे ही मागणी गेल्यानंतर ओवेसी यांनी पक्ष निरीक्षकांना पाठवून उमेदवारीबाबत अहवाल देण्यासाठी मराठवाडा अध्यक्ष, पक्षाचे निरीक्षक फेरोज लाला यांना पाठविण्यात आले होते.

याबाबत १४ मार्च रोजी अब्बास फंक्शन हॉल येथे पक्षाचे कार्यकर्ते आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत फेरोज लाला यांनी चर्चा केली. 'एमआयएम'च्या आमदारांनी एक ठराव घेऊन पक्ष निरीक्षकांकडे सुपूर्द केला. आमदार इम्तियाज जलील यांनाच उमेदवारी देण्याबाबत आग्रह धरण्यात आला आहे, असे अहवालात नमूद केले आहे. एकीकडे पक्ष कार्यकर्ते, नगरसेवक आमदार जलील यांच्या उमेदवारीची मागणी करीत असताना, काही पदाधिकाऱ्यांनी आमदार जलील यांना विधानसभेतच ठेवण्यात यावे. त्यांचे काम विधानसभेत चांगले आहे. त्यांची गरज राज्यात आहे. या जागी अधिक खर्च करणारा सक्षम उमेदवार शोधून देण्यात यावा, अशी मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षातील काही गटांतील नेत्यांनी या भावना पक्षप्रमुखांपर्यंत पोचवल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे लोकसभेच्या उमेदवारीबाबत घोषणा थांबविण्यात आली असल्याची माहिती 'एमआयएम'च्या सूत्रांनी दिली.

\Bम्हणून झाला उशीर\B

हैदराबाद येथील निवडणूक ११ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी उमेदवारी अर्ज हैदराबादेत सोमवारी (१८ मार्च) दाखल करण्यात आला. यामुळे औरंगाबाद लोकसभेच्या उमेदवारासाठी उशीर झाला असल्याची माहिती 'एमआयएम'च्या सूत्रांनी दिली.

……

औरंगाबाद लोकसभा लढविण्यासाठी पक्षाकडून प्रक्रिया सुरू आहे. पक्षाकडून जो आदेश येईल. ते आम्ही मान्य करू. पक्षातंर्गत गट-तट नाहीत. विरोधकांकडून जाणीवपूर्वक प्रचार सुरू आहे.

- इम्तियाज जलील, आमदार, एमआयएम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘झेडपी’च्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’कडे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेची १०४ वर्षांपूर्वीची निजामकालीन इमारत अतिशय जीर्ण झाली असून तिचे 'स्ट्रक्चरल ऑडिट' गेल्या कित्येक वर्षांत करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. २००८ मध्ये केवळ 'फायर सेफ्टी'च्या दृष्टीने पाहणी करण्यात आली होती. मुंबईत झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद इमारतीच्या 'स्ट्रक्चरल ऑडिट'चा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.

औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषदेची इमारत १०४ वर्षे जुनी आहे. निजामकालीन इमारत मध्यभागी आहे. तिथे मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची दालने, तर सामान्य प्रशासन, अर्थ विभागाचे कार्यालय आहे. पहिल्या मजल्यावर भविष्य निर्वाह निधी विभाग आणि सभागृह आहे. या इमारतीचे बांधकाम चुन्यात करण्यात आलेले आहे. नाही म्हणायला दक्षिण बाजूने एक जिना तयार करण्यात आला आहे. पण इमारतीचा धोका कायम आहे. पहिल्या मजल्यावर काही काम सुरू असेल, तर विविध दालनांमध्ये माती गळते. पावसाळ्यात बहुतांश ठिकाणी गळती लागते. याची वेळीच दखल घेतली नाही, तर मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती कर्मचारी खासगीत बोलताना व्यक्त करतात. प्रशासनाकडून मात्र जिल्हा परिषद इमारतीच्या 'स्ट्रक्चरल ऑडिट'बाबत अजूनही पावले उचलण्यात आलेली नाहीत.

\Bत्यावेळी धोकादायक इमारतचा अहवाल \B

इमारतीची डागडुजी केली जाते. पण त्याची क्षमता किती वर्षांची आहे याची तपासणी मात्र गेल्या कित्येक वर्षांत झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. २००८ मध्ये या इमारतीची 'फायर सेफ्टी'च्या दृष्टीने तपासणी केली गेली. त्यावेळी इमारत धोकादायक असल्याचा अहवाल नोंदविला होता. पण प्रशासनाने आजवर काहीच कारवाई केली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटील महामंडळाचे कर्जवाटप; औरंगाबाद जिल्हा राज्यात अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान योजनेअंतर्गत १४ महिन्यात ३५० जणांना २२ कोटी १५ लाख ४५ हजार रुपयांचे कर्ज संबंधित बँकांनी मंजूर केले आहे. कर्ज वाटप व व्याज परताव्यात येथील कार्यालय राज्यात अव्वल ठरले आहे. आतापर्यंत १९० लाभार्थ्यांना व्याज परतावा दिल्याची माहिती महामंडळाचे जिल्हा समन्वयक प्रवीण आगवन पाटील यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

आर्थिक दुर्बल घटकातील बेरोजगार युवकांना स्वयरोजगारासाठी आर्थिक सहाय्य व्हावे, छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाच्या माध्यमातून महामंडळाने शेतकरी उत्पादक गटासाठी दहा लाखांपर्यंत बिनव्याजी गट प्रकल्प कर्ज योजना आणली आहे. यासह वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना तसेच गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा आदी योजना राबविल्या जातात.

त्यापैकी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेकडे अर्जदारांचा अधिक कल आहे. अर्जदारापैकी गेल्या १४ महिन्यांत ३५० जणांचे कर्जप्रकरणे विविध बँकांनी मंजूर केले आहेत. त्यात २२ कोटी १५ लाख ४५ हजार रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. बँकेचा नियमित हप्ता भरणाऱ्यांना महामंडळाकडून व्याज परतावा दिला जातो. अशा २१६ जणांनी त्यासाठी अर्ज केला असून आतापर्यंत १९० जणांना व्याज परताव्यापोटी २५ लाख रुपये प्रदान करण्यात आले आहे. उर्वरित अर्जदारांना व्याज परतावा देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती जिल्हा समन्वयक प्रवीण आगवन यांनी दिली. कर्जवाटप व व्याज परताव्यात औरंगाबाद राज्यात अव्वल ठरला असून दुसऱ्या क्रमांकावर बुलडाणा कार्यालय आहे. बुलडाण्यात ३४३ जणांना सुमारे २० कोटी रुपयांपर्यंत कर्ज मंजूर झाल्याचे त्यांनी नमूद केले.

\Bसहा हजार अर्ज सादर \B

आतापर्यंत सुमारे सहा हजार जणांनी महामंडळाच्या संकेतस्थळ‌ावर योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी ७०० जणांनी कर्ज प्रकरणांसाठी बँकांकडे अर्ज सादर केले असून १३० प्रकरणे बँकांनी नाकारले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफारी पार्कचा ‘मास्टरप्लान’ आठवडाभरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेतर्फे मिटमिटा येथे विकसित करण्यात येणाऱ्या सफारी पार्कच्या 'मास्टरप्लान' आठवडाभरात प्राप्त होण्याची शक्यता आहे. सफारी पार्कमध्ये कोणत्या जागेवर कोणत्या प्राण्यांसाठी पिंजरा करायचा, त्याचे क्षेत्रफळ काय असावे यासह अन्य बाबींचा समावेश आराखड्यात राहणार आहे.

सिद्धार्थ उद्यानात महापालिकेचे प्राणिसंग्रहालय आहे. या प्राणिसंग्रहालयाला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने आक्षेप घेतला आहे. अपुरी जागा व अपुऱ्या व्यवस्थेमुळे प्राणिसंग्रहालय बंद करण्याची नोटीस बजावून नंतर प्राणिसंग्रहालयाची मान्यता देखील रद्द करण्यात आली. त्याविरोधात महापालिकेने अपिल केल्यावर प्राधिकरणाने प्राणिसंग्रहालयाला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पालिकेने सफारी पार्कच्या कामात आता गांभीर्याने लक्ष घातले आहे.

शासनाने दोन वर्षांपूर्वी महापालिकेला सफारी पार्कसाठी शंभर एकर जागा दिली. जागा ताब्यात मिळाल्यानंतर त्यावर महापालिकेने कोणतेच काम केलेले नाही. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेऊन पालिकेला धक्का दिल्यावर सफारी पार्कसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दिल्ली येथील ब्रिजराज शर्मा अँड असोसिएटस् या संस्थेची 'पीएमसी' म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती करण्यात आल्याचे अधिकृत पत्र मिळाल्यानंतर गेल्या आठवड्यात ब्रिजराज शर्मा यांनी सफारी पार्कच्या जागेची पाहणी केली. दोन दिवसात त्यांनी सफारी पार्कचा शंभर एकरचा परिसर पाहिला. याबद्दल प्राणिसंग्रहालयाचे संचालक विजय पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले, सफारी पार्कच्या जागेत कोणत्या प्राण्यांसाठी कोणती जागा योग्य ठरेल याबद्दल शर्मा यांनी पाहणी केली. पिंजऱ्यांचा आकार कसा असावा याबद्दलही त्यांनी प्राथमिक चर्चा केली आहे. सफारी पार्कमध्ये प्राण्यांसाठी पाणवठे कसे आणि किती असावेत, पर्यटकांना सफारी पार्कमधून फिरण्यासाठी व्यवस्था कशी असावी याचाही विचार त्यांनी केला आहे. या सर्वाच्या आधारे कच्चा आराखडा आठवडाभरात शर्मा महापालिकेला सादर करणार आहेत. कच्च्या आराखड्याचे सादरीकरण आयुक्तांपुढे केले जाईल. आयुक्तांच्या मान्यतेनंतर पक्का आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे पाठवला जाणार आहे. प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे.

\Bजागेभोवती खोदला खंदक \B

सफारी पार्कच्या शंभर एकर जागेभोवती महापालिकेने जेसीबीच्या साह्याने खंदक खोदला आहे. आता या खंदकात बांबूची लागवड केली जाणार आहे. बांबूच्या बनाचे कुंपण शंभर एकर जागेभोवती तयार केले जाणार आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार या कुंपणाबाहेरून संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहेत.

\Bसफारी पार्कमध्ये स्थलांतर होणारे प्राणी \B

पिवळे वाघ - ७

पांढरे वाघ - २

बिबट - ३

तडस - १

कोल्हा - २

उदबिल्ला - ३

सायळ - २

इमू - १

निलगाय - ३

सांबर - ४७

काळवीट - ४८

चितळ - २

माकड - १०

पानपक्षी - १९

मगर - ५

साप - १०१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी नगरसेविकेचे वाढदिवसादिवशी उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको एन ३, ४ वॉर्डाच्या भाजपच्या नगरसेविका तथा महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती अॅड. माधुरी अदवंत आपल्या वाढदिवसाच्या दिवशी मंगळवारी वॉर्डातील पाणीप्रश्नाबद्दल महापालिका मुख्यालयासमोर उपोषण करणार आहेत. याबद्दल माहिती देताना त्या म्हणाल्या, सिडको एन ३, एन ४ आणि गुरुसहानी नगर भागात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. सातव्या दिवशी पाणी येते. कमी दाबाने व अवेळी पाणीपुरवठा होतो. वॉर्डातील पाणीप्रश्नाबद्दल प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या, पण त्यातून काहीच मार्ग निघाला नाही. त्यामुळे मंगळवारी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीप्रश्नातून मार्ग निघत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचे ठरविले आहे, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे अदवंत यांचा मंगळवारी (१९ मार्च) वाढदिवस आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रेनेजमध्ये पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भूमिगत गटार योजनेच्या ड्रेनेज चेंबरमध्ये मोटार दुरुस्तीसाठी उतरलेल्या दोन शेतकऱ्यांचा गुदमरल्याने मृत्यू झाला. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या चार शेतकरी देखील अत्यवस्थ असून, पाण्यात वाहून गेल्याने एकजण बेपत्ता झाला आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास चिकलठाणा भागातील उत्तरानगरीच्या मागे असलेल्या गावठाण भागातील सुखना नदीच्या पात्रात घडला. शेतीसाठी ड्रेनेजचे पाणी या चेंबरमधून विद्युत पंपाद्वारे घेण्यात येते. बेपत्ता झालेल्या रामेश्वर डांबे याचा शोध अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

उत्तरानगरीच्या मागील बाजूला असलेल्या सुखना नदीच्या पात्रालगत शेतजमिनी आहेत. सुखना नदीच्या पात्रात भूमिगत गटार योजनांमधील पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या ड्रेनेज लाइनवर सिमेंटची चेंबर उभारण्यात आले आहेत. येथील काही शेतकऱ्यांनी हे सांडपाणी शेतीला वापरण्यासाठी येथील चेंबरवर विद्युत मोटारी बसवल्या असून, मेनहोलमध्ये पाइप सोडलेले आहेत. हे पंप नादुरुस्त झाल्यास, कचरा अडकल्यास येथील शेतकरी बटाईदार नेहमीच या मेनहोलमध्ये उतरतात. दिनेश जग्गनाथ दराखे आणि जनार्दन साबळे हे दोघे सोमवारी दुपारी मेनहोलमध्ये उतरले होते. यावेळी तेथील गॅसमुळे त्यांना श्वसनास त्रास झाला. ते तेथे गुदमरल्याने बेशुद्ध पडले. हा प्रकार समजताच त्यांना वाचवण्यासाठी तेथील रामकिसन रंगनाथ माने, उमेश जग्गनाथ कावडे, प्रकाश केरुबा वाघमारे, रामेश्वर पेरुबा डांबे आणि नवनाथ रंगनाथ कावडे हे मदतीसाठी मेनहोलमध्ये उतरले. यावेळी ते देखील श्वसनास त्रास होऊन बेशुद्ध पडले. मोनहोलमध्ये सुरुवातीला उतरलेले दिनेश दराखे आणि जनार्दन साबळे यांचा मृत्यू झाला.

हा प्रकार कळताच नागरिकांनी धाव घेतली. ही माहिती अग्निशमन दल आणि सिडको एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. नागरिकांनी प्रयत्न करून यातील चौघांना बाहेर काढले मात्र रामेश्वर डांबे हा ड्रेनेजच्या पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता झाले. अत्यवस्थ असलेल्या रामकिसन माने, उमेश कावडे, प्रकाश वाघमारे आणि नवनाथ कावडे यांना तातडीने उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनास्थळी महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेवक राजू शिंदे, पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, निरीक्षक सुरेंद्र माळाले यांनी भेट दिली. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनेला वाचविताना सासऱ्याचा मृत्यू!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुंडीतील झाडांना पाणी घालताना उच्चदाबाच्या विजेच्या तारांचा धक्का लागल्याने सुनेचे हात भाजले. हे पाहताच सून कोमलला वाचविताना सासरे सेवानिवृत्त विमा अधिकारी जयराज पाथ्रीकर (वय ६४) यांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास सहकारनगर भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जयराज अण्णासाहेब पाथ्रीकर यांचा सहकारनगरातील प्लॉट क्रमांक ३२येथे दोन मजली बंगला आहे. पाथ्रीकर हे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीतून विकास अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. पत्नी, मुलगा अभिजित आणि सून कोमल (वय ३२) यांच्यासह ते या ठिकाणी राहतात. सोमवारी सकाळी त्यांचा मुलगा अभिजित कामानिमित्त नाशिकला गेला होता. कोमल या पहिल्या मजल्यावरील छतावर असलेल्या कुंडीतील झाडांना पाइपद्वारे पाणी घालत होत्या. त्यांच्या घराच्या जवळूनच विजेची उच्चदाबाची तार गेली आहे. पाइपचे पाणी तारेवर पडल्यामुळे सून कोमल यांना विजेचा झटका बसल्याने त्यांचे हात भाजले. त्यांना वाचवण्यासाठी जयराज पाथ्रीकर धावले. यावेळी त्यांना देखील विजेच्या ताराचा जोरदार झटका बसल्याने ते गंभीररित्या भाजल्याने जखमी होत बेशुद्ध पडले. शेजारी राहणारे प्राचार्य उल्हास शिऊरकर यांनी दोघांना तातडीने खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान जयराज पाथ्रीकर यांचा मृत्यू झाला. सून कोमलवर सध्या उपचार सुरू आहेत. घाटी रुग्णालयामध्ये पाथ्रीकर यांचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. प्रतापनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर सोमवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. जयराज पाथ्रीकर हे माजी नगरसेवक दत्ताभाऊ पाथ्रीकर यांचे लहान भाऊ होते.

महावितरणाचा हलगर्जीपणा

पाथ्रीकर यांच्या घरापासून अवघ्या काही फुटांवर उच्च दाबाची तार गेलेली आहे. ही तार येथून हटवण्यासाठी पाथ्रीकर यांनी अनेक वेळा महावितरणाला अर्ज केले होते. मात्र महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे तार हटविण्यात आली नव्हती. या हलगर्जीपणामुळे पाथ्रीकर यांचा बळी गेल्याची चर्चा नातेवाईकांत सुरू होती.

महावितरणकडून तपास सुरू

'लाइनमनने पाहणी केली तेव्हा घराच्या आठ ते दहा फूट दूर वीज खांबाच्या ११ केव्ही वायर आहेत. घराच्या प्रवेशद्वारावर जिना तयार करून खोली केली आहे. शॉक लागल्याने ११ केव्हीचा वीजपुरवठा खंडित नव्हता. प्रकरण गंभीर असल्याने इलेक्ट्रिकल विभागाकडे तपास सोपविला,' अशी माहिती महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान करण्यासाठी सुटी, सवलत

$
0
0

म. टा. प्रतिनधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुटी किंवा दोन तासांची सवलत देण्यात येणार असून, या संदर्भात शासनाने आदेश काढले आहेत.

मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुटी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासांत योग्य ती सवलत देण्यात येते, मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले की संस्था, आस्थापना भरपगारी सुटी किंवा सवलत देत नाहीत. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागले. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकानांमधील कर्मचारी, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापारी, औद्योगिक उपक्रम, खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी किंवा इतर आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स आदींमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी किंवा अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकाऱ्यांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी केवळ दोन, तीन तासांची सवलत देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कोटक महिंद्रा’ला गंडा; आरोपी हर्सूल कारागृहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोटक महिंद्रा बँकेने कर्ज वसुलीसाठी नेमलेल्या अ‍ॅव्हेंन्जल कंपनीच्या प्रतिनिधीने वसूल केलेली तीन लाख १६ हजार ५० रुपयांची रक्कम बँकेत न भरता फसवणूक केली. प्रकरणात आरोपी प्रतिनिधी गणेश बाळकृष्ण जाधव याला अटक करून त्याची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

प्रकरणात मोंढा नाका येथील कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापक मनीष हिराचंद ठाकूर (४०, रा. एन-६, सिडको) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, बँकेने वरील कंपनीमार्फत प्रतिनिधी म्हणून आरोपी गणेश बाळकृष्ण जाधव (३३, रा. विशालनगर) याची १३ जून २०१६ रोजी नेमणूक केली होती. १२ ते १४ मार्च २०१८ दरम्यान आरोपीने कर्जाच्या हप्त्यांची चार लाख २७ हजार ५५० रुपयांची वसूली केली; परंतु ती बँकेत भरणा केली नाही. ही बाब बँकेच्या लक्षात आल्यानंतर बँकेने आरोपीकडे पैशांसाठी तगादा लावला असता ३० मार्च २०१८ रोजी आरोपीने एक लाख ११ हजार ५०० रुपये बँकेत जमा केले व उर्वरित ३ लाख १६ हजार ५० रुपये बँकेत जमा न करता बँकेची फसवणूक केली. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी जाधवला अटक करून कोर्टात हजर केले असता, त्याची रवानगी आधी पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिपिक पदासाठी फसवणूक; आरोपीला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतीय सैन्य दलाच्या लिपिक या पदासाठी घेण्यात आलेल्या भरतीत बारावी बोर्ड प्रमाणपत्रामध्ये इंग्रजी विषयाच्या गुणांमध्ये फेरफार करून सैन्य दलाची फसवणूक करणारा आरोपी राहुल हरिदास मोहिते याला सोमवारी (१८) रात्री अटक करण्यात आली. त्याला मंगळवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी दिले.

या प्रकरणी सैन्य भरती कार्यालयाचे कर्नल सावलशहा कलिया यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीकडे नऊ जिल्ह्यातील सैन्य भरतीचे कामकाज होते. ऑक्टोबर २०१८ मध्ये लिपिक पदासाठी ऑनलाइन फार्म भरण्यात आले होते. भरतीच्या जाहिरातीनुसार इंग्रजी विषयात ५० टक्के गुण अनिवार्य असल्याचे नमूद होते. त्यानुसार पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी जळगाव येथे, तर लेखी परीक्षा औरंगाबाद येथील छावणीत झाली. दोन्ही परीक्षांमध्ये मेरिटमध्ये उतीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात येऊन निवड झालेल्या उमेदवारांचे डॉमीसाइल, जात प्रमाणपत्र, चारित्र प्रमाणपत्र, शैक्षणिक व इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यात आरोपी राहुल हरिदास मोहिते (२१, रा. गोषेगाव, ता. भोकरदन, जि. जालना) याने ऑनलाइन फॉर्म भरतेवेळी दिलेली माहिती व कागदपत्रांची छायांकीतप्रत तसेच भरती झाल्यानंतर दिलेल्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली असता, आरोपीने बारावी बोर्ड प्रमाणपत्रामध्ये इंग्रजी विषयात ४९ टक्के गुण असताना ऑनलाइन अर्ज भरतेवेळी इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण असलेल्या बनावट प्रमाणपत्राची छायांकितप्रत जोडून फसवूणक केली. प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक करण्यात आली होती. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’साठी आज पुन्हा बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीसाठी बुधवारी पुन्हा एकदा बैठक होणार आहे. या बैठकीसाठी कंपनीचे प्रतिनिधी महापालिकेत दाखल झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समांतर जलवाहिनीबद्दल एक एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.

समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी एस्सेल ग्रुपला मुख्य भागीदार न केल्यास कंपनीला काम करणे शक्य होणार नाही, असे एसपीएमएल व औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने स्पष्ट केले आहे. एस्सेल ग्रुपला मुख्य भागीदार करता येत नाही असा अभिप्राय सरकारी वकिलांनी दिल्यामुळे कंपनीने समांतर जलवाहिनीच्या कामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने १३५ कोटी रुपये द्यावेत कंपनी बिनशर्त माघार घेईल, असे कंपनीने पालिकेला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. कंपनी आणि महापालिका यांच्यात सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू आहे. या वादाबद्दल एक एप्रिल रोजी सुनावणी आहे. त्यामुळे तत्पूर्वी चर्चा करण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी मंगळवारी महापालिकेत आले होते. त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांचीही भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. निपुण विनायक यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना बुधवारी चर्चेसाठी बोलावले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांनी घेतले ईव्हीएमचे प्रशिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पूर्व या विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रथम प्रशिक्षण मंगळवारी (१९ मार्च) रोजी संत तुकाराम नाट्यगृह येथे घेण्यात आले. दुपारी झालेल्या या प्रशिक्षणामध्ये कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट हाताळले; तसेच ईव्हीएम मशीनची जोडणी कशी करायची, मतदानासाठी साहित्य कसे स्वीकारायचे आदींबाबत माहिती घेतली. यावेळी उपजिल्हाधिकारी हनुमंत अरगुडे यांनी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. या आठवड्यामध्ये पहिल्या टप्प्यातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येणार असून, एप्रिल महिन्यातील पहिल्या आठव‌ड्यात दुसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी सैनिकांची फसवणूक, आरोपीच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र सरकारच्या सुपरवायजर पदावर नोकरीचे आमिष दाखवून दोन माजी सैनिकांसह तिघांना ३० लाखांचा गंडा घातल्याप्रकरणातील आरोपी सुरेंद्र सुभाष काकडे याच्या पोलिस कोठडीमध्ये सोमवारपर्यंत (२५ मार्च) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी दिले.

या प्रकरणी माजी सैनिक रवींद्र साहेबराव भोसले (३५, रा. आडगाव, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीचा मित्र व माजी सैनिक कैलास रामराव थोरात याच्यामार्फत आरोपी सुरेंद्र सुभाष काकडे (रा. म्हाडा कॉलनी, विठ्ठलनगर) याच्याशी फिर्यादीची ओळख झाली होती. मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत चालणाऱ्या ग्रुप 'सी'मधील प्रायमरी स्कूल सुपरवायजर पदाच्या नोकरभरतीसाठी काम करतो व तुम्हाला नोकरी मिळवून देतो; परंतु त्यासाठी १० लाखांचा खर्च येईल, असे आरोपीने सांगितले. त्यानंतर तिघांना दिल्लीसह वेगवेग‌ळ्या ठिकाणी बोलावून बनावट ऑर्डर, आय कार्ड देत तिघांकडून आरोपीने ३० लाख रुपये घेतले. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा होऊन काकडेला बुधवारी अटक करून मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपीला मंगळवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीच्या पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश कोर्टाने दिले. सहाय्यक सरकारी वकील नितीन ताडेवाड यांनी काम पाहिले.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उधारीवरुन केले जखमी; चौघांची शिक्षा कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

किराणा दुकानाच्या उधारीवरून दुकानदाराच्या डोक्यात पाट घालून गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणात चार आरोपींना सिल्लोड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठाविली होती. त्याविरुद्ध आरोपींनी जिल्हा कोर्टात अपील दाखल केले असता, जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय कुलकर्णी यांनी ते फेटाळले.

या प्रकरणी माधव गांधी जोनवाल यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, किराणा दुकानाची उधारी देण्याच्या कारणावरून शंकर प्रताप ताटू, राजू प्रताप ताटू, प्रेमसिंग प्रतापसिंग ताटू व प्रताप फकीरचंद ताटू (सर्व रा. पळशी ता. सिल्लोड) या आरोपींनी फिर्यादीचा भाऊ जादूसिंग जोनवाल यांना मारहाण करून त्यांच्या डोक्यात लाकडी पाट मारून गंभीर जखमी केले होते व प्रकरणात आरोपींविरोधात सिल्लोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, सिल्लोड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने चौघांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. आरोपींनी शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात अपील दाखल केले असता, कोर्टाने ते फेटाळले. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील अनिल हिवराळे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचव्या दिवशीही कचरा आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा येथील नागरिकांनी पाचव्या दिवशीही कचराविरोधी आंदोलन सुरूच ठेवले आहे. कचरा प्रक्रिया केंद्रावर जाणाऱ्या कचऱ्याने भरलेल्या गाड्या नागरिकांनी परत पाठवल्या. कचऱ्याच्या काही गाड्या मंगळवारी चिकलठाण्याकडे फिरकल्याच नाहीत.

चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्रावर कोणतीच प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर निर्माण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे आश्वासन महापालिकेने चिकलठाणा भागातील नागरिकांना दिले होते. मात्र, अद्याप पूर्ण क्षमतेने प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे चार दिवसांपासून नागरिकांनी कचराविरोधी आंदोलन सुरू केले. मंगळवारी पाचव्या दिवशी देखील आंदोलन सुरूच होते. कचऱ्याने भरलेल्या काही गाड्या नागरिकांनी परत पाठवल्या, तर पालिका प्रशासनाने काही गाड्या चिकलठाण्याला पाठवल्याच नाहीत. चिकलठाण्याऐवजी कचऱ्याने भरलेल्या गाड्या हर्सूल आणि पडेगावला पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


३.३ टक्के नागरिक दरवर्षी दारिद्र्याच्या खाईत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरोग्यावरील न झेपणाऱ्या खर्चामुळे दरवर्षी ३.३ टक्के नागरिक चक्क दारिद्र्यरेषेखाली लोटले जात आहेत. त्यामुळ‌े आरोग्याला प्राधान्य देत शासकीय आरोग्य सेवेचे बळकटीकरण करा, ग्रामीण भागांतील एकूणच आरोग्य सेवा वाढवा, आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांना आरोग्य विम्यात आणा आणि मुख्य म्हणजे आरोग्याचे बजेट हे १.२ टक्क्यांवरून किमान पाच टक्क्यांपर्यंत तरी वाढवा, असे आवाहन राष्ट्रीय 'आयएमए'ने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांना केले आहे. त्याचवेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवण्याबरोबरच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शुल्कांना लगाम घालून वैद्यकीय शिक्षण सामान्यांच्या आवाक्यात येईल, याचीही तजवीज करण्याचे आवाहन संघटनेने केले.

'इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या (आयएमए) राष्ट्रीय पातळीवर संघटनेने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला जाहीरनामाच जनतेसमोर ठेवला असून, वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रात कोणकोणत्या सेवा-सुविधांमध्ये धोरणात्मक बदल गरजेचा आहे, याविषयी देशातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. 'आयएमए' संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंतनू सेन, आरोग्य जाहीरनामा समितीचे अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर, राष्ट्रीय कार्य समितीचे अध्यक्ष डॉ. पिल्लई, महासचिव डॉ. आर. व्ही. अशोकन आदींनी जाहिरनाम्यातून संघटनेच्या अपेक्षा नोंदवल्या आहेत. संघटनेनुसार, व्यापक व प्रभावी प्राथमिक आरोग्य सेवेसह प्रतिबंधात्मक उपाययोजना; तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी देशाचे आरोग्याचे बजेट पाच टक्क्यांपर्यंत वाढवणे गरजेचे आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत सर्व प्रकारच्या घटकांना आणि व्यक्तींना आरोग्य विम्याचे कवच देण्यात यावे. शहरी व निमशहरी भागात प्रत्येक दहा हजार व्यक्तींमागे एक, ग्रामीण भागातील पाच हजार व्यक्तींमागे एक, तर दुर्गम भागातील तीन हजार व्यक्तींमागे एक उपकेंद्र असायला हवे; तसेच 'वेलनेस सेंटर'ची संकल्पना अधिकाधिक व्यापक केली पाहिजे आणि या ठिकाणी 'एमबीबीएस' डॉक्टरांकडून सेवा दिल्या पाहिजे. सर्व नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे आणि मलनि:स्सारण व्यवस्थेमध्ये अधिकाधिक सुधारणा, तर दूषित अन्न-पाण्याला जबाबदार व्यक्ती-घटकांवर कारवाई होणेही तितकेच गरजेचे आहे. मद्य, तंबाखुजन्य पदार्थ, जंक फूड आदी अनारोग्य वस्युंवर 'हेल्थ टॅक्स' लावला पाहिजे आणि प्रिझर्वेटिव्ह व किटकनाशकांच्या वापरावरही कठोर नियंत्रण असले गेले पाहिजे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवण्याबरोबरच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शुल्कांवरही नियंत्रण गरजेचे आहे. वैद्यकशास्त्रात संशोधन वाढवण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते सर्व करणे गरजेचे आहे. 'वन ड्रग, वन पॉलिसी' या धोरणाची अंमलबजावणी लोकांच्या हितासाठी केली पाहिजे, असेही संघटनेने म्हटले आहे. डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा, असेही संघटनेचे म्हणणे आहे.

\B'आयुष्यमान'मध्ये गरज बदलांची

\Bपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आयुष्यमान भारत' या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये अनेक बदल करून ही योजना प्रभावी पद्धतीने कशी उपयोगात येईल, याचा विचार केला पाहिजे. त्यातही या योजनेतील पॅकेजेस वस्तुस्थितीला धरून असावेत, अशीही अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. 'ब्रिज कोर्स', 'क्रॉसपॅथी'ला थारा देण्यात येऊ नये, ही संघटनेची भूमिका कायम असून, या जाहीरनाम्यातही त्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. छोटी व मध्यम रुग्णालये तसेच नर्सिंग होम कशी तग धरुन राहतील, याचाही विचार झाला पाहिजे व त्यासाठी नियम-कायद्यामध्ये गरजेनुसार बदल करावेत, असेही 'आयएमए'चे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवसाला नगरसेविकेचा घसा कोरडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको एन-३, एन-४ वॉर्डच्या नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत यांनी मंगळवारी आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच महापालिकेच्या कार्यालयासमोर वॉर्डातील पाणी प्रश्नासाठी उपोषण केले. त्यांच्या उपोषणामुळे महापालिका ढवळून निघाली. आयुक्त व महापौरांनी अॅड. अदवंत यांच्यासह उपोषणास बसलेल्या नागरिकांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. वॉर्डातील पाणी समस्या सोडविण्याच्या दृष्टीने ३० मार्चपर्यंत काम करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

सिडको एन-३, एन-४ आणि गुरुसहानीनगर या भागातील पाणी प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून ऐरणीवर आला आहे. पुंडलिकनगर येथील जलकुंभापासून जलवाहिनी टाकून या भागाला पाणी पुरवठा करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे, परंतु नगरसेवकांच्या अंतर्गत विरोधामुळे अद्याप हे काम होऊ शकले नाही. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. वारंवार पाठपुरावा करून देखील प्रश्न सुटत नसल्यामुळे नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला. आज (१९ मार्च, मंगळवार) त्यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशीच उपोषण करण्याचे त्यांनी ठरविले आणि सकाळी ११ वाजेपासून वॉर्डातील नागरिकांसह त्यांनी पालिकेच्या मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले.

त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन प्रथम महापौर नंदकुमार घोडेले उपोषणकर्त्यांच्या भेटासाठी आले. त्यांनी अदवंत यांच्याबरोबर चर्चा केली, परंतु निवडणूकीच्याआचारसंहितेमुळे त्यांना ठोस निर्णय किंवा आश्वासन देता आले नाही. दरम्यानच्या काळात भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, उपमहापौर विजय औताडे, भाजपचे पालिकेतील गटनेते प्रमोद राठोड, नगरसेविका शोभा बुरांडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी देखील उपोषणाच्या स्थळी दाखल झाले. पालिका आयुक्तांनी येऊन चर्चा करावी, अशी भूमिका या सर्वांनी घेतली. आयुक्त डॉ. निपुण विनायक चर्चा करण्यासाठी उपोषणाच्या शामियानात दाखल झाले. त्यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनाही बोलावून घेतले. अदवंत यांच्या वॉर्डातील पाण्याची समस्या नेमकी काय आहे हे त्यांनी समजवून घेतले. पुंडलिकनगरच्या जलकुंभापासून जलवाहिनी टाकण्यासाठी पाइप उपलब्ध आहेत, पण काम होत नाही ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी ३० मार्चपर्यंत वेळ द्या, आम्ही ते काम करतो असे आश्वासन दिले. आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानंतर अदवंत यांनी उपोषण मागे घेतले.

मटा भूमिका

सिडको एन-३, एन-४ वॉर्डाचा पाणीप्रश्न गेल्या काही महिन्यांपासून तीव्र बनला आहे. पुंडलिकनगरच्या जलकुंभापासून या भागासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकावी लागणार आहे. जलकुंभापासून जलवाहिनी टाकण्यास पुंडलिकनगर भागातील काही नगरसेवकांचा विरोध आहे. विरोधामुळे नगरसेवकांचा दुसरा गट आक्रमक झाल्याचे चित्र आहे. नगरसेवकांच्या या संघर्षाला पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी पक्षीय भांडणाचे रुप दिले. रुप देणाऱ्यात पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे तत्कालीन अधिकारी आघाडीवर होते असे बोलले जाते. अधिकाऱ्यांमधील राजकारणाचा फटका पाणी पुरवठा व्यवस्थेला सहन करावा लागत आहे आणि त्याचे खापर नगरसेवकांच्या संघर्षावर फोडले जात आहे. अधिकाऱ्यांनी राजकारण न करता त्यांना देण्यात आलेले काम करणे अपेक्षित आहे. काम करताना काही अडचणी येत असतील तर त्याबद्दल आयुक्तांशी चर्चा करून अधिकाऱ्यांनी मार्ग काढला पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदर्श कॉलनीत नवीन जलवाहिनी टाका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाडकर कॉर्नर ते आदर्श कॉलनी दरम्यानची जुनी जलवाहिनी बदलून नवीन जलवाहिनी टाकण्याच्या मागणीसाठी या भागातील नागरिकांनी मंगळवारी महापालिका आयुक्त व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. मोठ्या व्यासाची जलवाहिनी टाका आणि पाणी प्रश्न सोडवा अशी मागणी त्यांनी केली. मोठ्या व्यासाची जलवाहिनी न टाकल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे.

आयुक्तांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनात नागरिकांनी म्हटले आहे की, वॉर्ड क्रमांक ९५ मधील वाडकर कॉर्नर ते आदर्श कॉलनी दरम्यान टाकण्यात आलेली जलवाहिनी ३० ते ४० वर्षे जुनी आहे. या जलवाहिनीचा व्यास चार इंचाचा आहे. या भागात पूर्वीच्या तुलनेत सुमारे २०० पटीने लोकसंख्या वाढली आहे. घरांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे जन्या पाइपलाइनमधून होणारा पाणी पुरवठा अपुरा आहे. जुनी पाइपलाइन बदलून मोठ्या व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्याची मागणी वारंवार करण्यात आली, पण अद्याप ही मागणी मान्य करण्यात आली नाही. जुनी पाइपलाइन न बदलता त्याच पाइपलाइनवरून नळ कनेक्शन दिले जात आहेत. यामुळे पाण्याची चोरी होते, अशी नागरिकांमध्ये भावना निर्माण झाली आहे.

मोठ्या व्यासाची जलवाहिनी न टाकल्यास लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर नागरिक बहिष्कार टाकतील आणि त्याची जबाबदारी पालिका प्रशासनावर असेल असा इशारा नागरिकांनी पालिका आयुक्तांना दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रेनेजमध्ये गुदमरल्याने आणखी एकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

ड्रेनेज लाइनच्या चेंबरमध्ये मोटार दुरुस्तीसाठी उतरलेल्या दोघांचा गुदमरून सोमवारी मृत्यू झाला होता. त्यावेळी आणखी चारजण अत्यवस्थ झाले होते. त्यापैकी उमेश जग्गनाथ कावडे (वय ३२) याचा मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये आणखी दोघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान ड्रेनेज लाइनमध्ये वाहून गेलेल्या तरुणाच्या शोधासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ) मंगळवारी सायंकाळी घटनास्थळी दाखल झाले आहे.

सुखना नदीच्या पात्रातून भूमिगत गटार योजनेची पाइप लाइन गेली आहे. ड्रेनेज चेंबर नदीच्या पात्रात उभारण्यात आले आहे. या चेंबरमध्ये विद्युत मोटारी सोडून शेतीसाठी पाणी उपसण्यात येते. सोमवारी येथील चेंबरमधील मोटारचा फुटबॉल सुधारण्यासाठी येथील शेतकरी बटईदार जनार्दन साबळे, उमेश कावडे, दिनेश दराखे, प्रकाश वाघमारे, रामकिसन माने, नवनाथ कावडे आणि रामेश्वर डांबे हे चेंबरमध्ये उतरले होते. यावेळी गॅसने गुदमरल्यामुळे हे सर्व बेशुद्ध पडले. यामध्ये जनार्दन साबळे आणि दिनेश दराखे यांचा मृत्यू झाला. नागरिकांनी अत्यवस्थ असलेले उमेश कावडे, प्रकाश वाघमारे, रामकिशन माने आणि नवनाथ कावडे यांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. रामेश्वर डांबे हा सोमवारी दुपारीच ड्रेनेजच्या पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता झाला आहे. उपचारादरम्यान उमेश कावडे याचा मृत्यू झाला असून, यामध्ये बळींची संख्या तीनवर गेली आहे. प्रकाश वाघमारे आणि रामकिशन माने यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना व्हेंटिलेंटरवर ठेवण्यात आले आहे. नवनाथ कावडे यांच्या प्रकृतीती सुधारणा झाली असून, त्यांना हॉस्पिटलमधून घरी पाठविण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटलकडून देण्यात आली.

\Bडांबेचा दुसऱ्या दिवशी देखील शोध सुरू\B

ड्रेनेजमध्ये वाहून गेलेल्या रामेश्वर डांबे यांचा दुसऱ्या दिवशी देखील शोध घेण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले नव्हते. त्याच्या शोधासाठी अखेर धुळे येथून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. मोठ्या आपत्तीमध्ये या पथकाचा वापर होतो. एकूण ३० जणांचे हे पथक आहे. या पथकाकडून बेपत्ता डांबे यांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभेच्या माध्यमातून विधानसभेसाठी मशागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचे काम विद्यामान आमदारासह इच्छुकांनी सुरू केले आहे. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातही भारतीय जनता पक्ष आणि ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन (एमआयएम) या पक्षांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांनी जोमाने कामाला सुरुवात केली आहे. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेकडून खासदार चंद्रकांत खैरे रिंगणात असून, युतीच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. दुसरीकडे काँग्रेससह अन्य पक्षांनी मंगळवारपर्यंत उमेदवार जाहीर केले नव्हते. त्यामुळे इच्छुकांसह कार्यकर्त्यांना त्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहेत.

लोकसभेसाठी राजकीय पक्ष कामाला लागलेले असतानाच, या निवडणुकीच्या माध्यमातून अनेकांनी विधानसभा निवडणुकीसाठी मशागतही सुरू केली आहे. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातही हे चित्र आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे अतुल सावे यांनी विजय मिळविला. त्यांना ६४ हजार ५२८ मते मिळाली होती.'एमआयएम'चे डॉ. अब्दुल गफ्फार कादरी यांना ६० हजार २६८ मते मिळाली होती. सावे यांचा चार हजार २६० मतांनी पराभव झाला होता. काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा, शिवसेनेच्या कला ओझा यांना मोठा पराभव सहन करावा लागला होता.

'एमआयए'चे डॉ. कादरी यांनी विधानसभेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. लोकसभेचा उमेदवार येत्या एक दोन दिवसात घोषित होईल, असे सांगतानाच त्यांनी औरंगाबाद पूर्वचा संपूर्ण दौरा पूर्ण झाला असून, नियमित बैठका, भेटीगाठी सुरू असल्याची माहिती दिली.

भाजपचे आमदार अतुल सावे यांनीही लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेचीही तयारी सुरू केली आहे. संपूर्ण मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला असून, बैठका, दौरे सुरू आहेत. मतदारसंघात ३००हून अधिक बुथ आहेत. बुथ, पेज आणि शक्ती केंद्र प्रमुखांची निवड करण्यात आली आहे. यंत्रणा मजबुतीवर भर दिला जात असून, लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून युतीच्या उमेदवारास सर्वाधिक मते मिळतील, असा विश्वासही त्यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केला.

\Bशिवसेना बॅकफूटवर\B

शिवसेनेचे राजू वैद्य यांनी विधानसभेसाठी या मतदारसंघातून गेल्या काही महिन्यांत मोठी तयारी केली होती, पण, शिवसेना भाजप युती घोषित झाल्याने ते बॅकफूटवर गेले आहेत. काँग्रेससह अन्य प्रमुख पक्षांनी लोकसभेचा उमेदवार अद्यापही घोषित केला नसल्याने कार्यकर्त्यांना त्यासाठी वेटिंग करण्याची वेळ आली आहे.

दृष्टिक्षेपात...

- २०१४च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून काँग्रेसला ३३६४ मतांची आघाडी मिळाली होती

- काँग्रेसचे नितीन पाटील यांनी ७१ हजार ९४६ आणि शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना ६८५८१ मते मिळाली होती

- गेल्या लोकसभेला बहुजन समाज पक्षाने औरंगाबाद पूर्व मतदारसंघात ७१४२ आणि आम आदमी पक्षाला २६३८ मते मिळाली होती

- लोकसभेत पिछाडी, विधानसभेला शिवसेना, भाजप यांच्यात युती नाही, अशा प्रतिकूल परिस्थितीत भाजपला पूर्व मतदारसंघात विजय मिळाला होता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images