Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उद्धव ठाकरेंची १९ एप्रिलला सभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी ठाकरे पिता-पुत्रांबरोबच शिवसेना, भाजप नेत्यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय स्थानिक पदाधिकारी, नगरसेवकांची फळी देखील प्रचाराच्या कामात गुंतली आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची १९ एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा १३ ते १५ एप्रिलदरम्यान हडकोतील टीव्ही सेंटर चौकात होणार आहे. त्याशिवाय प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक मोठी सभा व्हावी, असा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिली. शिवसेनेचे नेते दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत, नितीन बानगुडे पाटील, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभा विधानसभा मतदारसंघ निहाय होणार आहेत. चंद्रकांत खैरे जिल्हा परिषद सर्कलनिहाय दौरा करणार आहेत तर, दानवे पंचायत समितीनिहाय प्रचार दौरा करणार आहेत. महिला आघाडी व युवासेनेचे देखील प्रचाराच्या दृष्टीने स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद शहरातील रोज दहा वॉर्डांत नगरसेवक, पदाधिकारी प्रचार फेऱ्या काढणार आहेत. घरोघरी जाऊन प्रचाराचे नियोजन आहे. प्रचार संपण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीची मिरवणूक (महारॅली) काढण्यात येणार आहे.

\Bमंगळवारी 'आदित्य संवाद'\B

शहरातील युवकांशी संवाद साधण्यासाठी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे मंगळवारी (दोन एप्रिल) येत आहेत. स.भु. कला आणि वाणिज्य महाविद्यालयात ते युवकांशी संवाद साधणार असून, या कार्यक्रमाला 'आदित्य संवाद' असे नाव देण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुख्यात गुन्हेगार शेंडी स्थानबद्ध

$
0
0

औरंगाबाद: पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार अरुण भालेराव उर्फ शेंडी (वय ४० रा. मिसारवाडी)याची एका वर्षासाठी हर्सूल कारागृहात झोपडपट्टी दादा कायद्यानुसार स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याच्या विरुद्ध घरफोडी, घातक शस्त्राने दुखापत करणे, शस्त्र बाळगणे, दादागिरी करणे, आदी गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी देखील अरुणवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र गुन्हेगारी कृत्ये कमी होत नसल्यामुळे त्याची एका वर्षासाठी हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, निरीक्षक अशोक गिरी, पीएसआय भरत पाचोळे, जमादार द्वारकादास भांगे, नाना हिवाळे यांनी ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरविकास विभाग ‘समातंर’साठी अनुकूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने समांतर जलवाहिनीसंदर्भात सादर केलेल्या प्रस्तावाबद्दल राज्य शासनाचा नगरविकास विभाग अनुकूल आहे. पुढील आठवड्यात याबद्दल मंत्रालयात बैठक होणार आहे. त्यात समांतर जलवाहिनीच्या कामाबद्दल ठोस निर्णय होऊ शकतो, अशी माहिती मिळाली आहे.

समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एसपीएमएल (सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमीटेड) या कंपनीने समांतर जलवाहिनीचे काम करण्यास असमर्थता दाखवली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे समांतर जलवाहिनीचा नवीन प्रस्ताव सादर केला आहे. समांतर जलवाहिनीच्या कामासाठी शासनाने दिलेल्या निधीतील सुमारे ३५० कोटी रुपये महापालिकेकडे आहेत. या रक्कमेतून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाला मान्यता द्या, असे प्रस्तावात म्हटले आहे. समांतर जलवाहिनीकरिता निर्माण करावयाच्या इतर पायाभूत सुविधांसाठी ४०० कोटींची गरज असून, तो शासनाने द्यावा अशी विनंती प्रस्तावात केली आहे. औरंगाबाद शहराच्या विस्तारित भागात समांतर जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करायचा असल्यास आणखी ४०० कोटींची तरतूद शासनाने करावी, असेही प्रस्तावात नमूद केले आहे. पालिका आयुक्तांनी हा एकत्रित प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी शासनाकडे पाठवला, परंतु शासनाकडून अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

सध्या शहरात निर्माण झालेला पाणीप्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. गळत्या शोधून त्या दुरुस्त करण्यावर भर दिला जात आहे. जलवाहिनीच्या गळत्या बंद झाल्यावर पाणी पुरवठ्यात बराच फरक पडेल, असा विश्वास पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी व्यक्त केला.

\Bअंमलबजावणी आदेश मिळू शकतो: आयुक्त \B

या संदर्भात 'मटा' प्रतिनिधीशी बोलताना डॉ. निपुण विनायक म्हणाले, समांतर जलवाहिनीच्या प्रस्तावाबद्दल शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्याशी चर्चा देखील झाली आहे. महापालिकेने सादर केलेल्या प्रस्तावाबद्दल त्या अनुकूल आहेत. पुढील आठवड्यात त्यांनी चर्चेसाठी बोलावले आहे. त्यांच्याशी चर्चा झाल्यावर अनेक बाबी स्पष्ट होतील आणि प्रस्तावाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आदेश देखील मिळू शकतील, असे संकेत डॉ. विनायक यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाथसागरातून पाणी उपसा घटला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नाथसागरातील पाणी पातळी कमी झाल्यामुळे धरणातून केला जाणारा पाणी उपसाही घटला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्याची मदार आता फ्लोटिंग पंपांवर आहे. दरम्यान, पंपहाउसमध्ये अडकणारे गवत आणि गाळ काढण्यासाठी दोन पाणबुडे रविवारी दाखल झाले आहेत.

औरंगाबाद शहरासाठी जायकवाडी धरणातून रोज १५० ते १५५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याचा उपसा केला जात होता. धरणातील पाणी पातळी कमी झाल्यामुळे आता मृत जलसाठ्यातून पाणी उपसा करावा लागत आहे. त्यामुळे पाण्याच्या उपशावर परिणाम झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; पाण्याचा उपसा १३५ 'एमएलडी'पर्यंत होऊ लागला आहे. त्यामुळे शहरात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. पाण्याचा उपसा कमी होऊ नये, यासाठी महापालिकेने आपत्कालीन पंपहाउस सुरू केले आहे. या पंपहाउसमध्ये ७५ अश्व शक्तीचे आठ फ्लोटिंग पंप आहेत. त्यापैकी सहा पंप सुरू करण्यात आले आहेत. फ्लोटिंग पंपांच्या माध्यमातून जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातील पाणी उपसून, ते मुख्य पंपहाउसपर्यंत आणले जाते. मुख्य पंपहाउसमधून पाणी उपसून ते जलवाहिनीच्या माध्यमातून फारोळा जलशुद्धीकरण केंद्राकडे पाठवण्यात येते. पाणी उपशातील घट फ्लोटिंग पंपांमुळे भरून निघेल, असा दावा केला जात आहे.

धरणातील पाणी पातळी कमी झाल्यामुळे कालव्यातील पाणी देखील कमी झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून मुख्य पंपहाउसमध्ये गवत, गाळ जमा होऊ लागला आहे. गवत आणि गाळामुळे पंपांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ लागला आहे. पंपांमध्ये अडकणारे गवत आणि गाळ काढण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने पुणे येथून दोन पाणबुडे मागवले आहेत. दोन्ही पाणबुडे रविवारी जायकवाडी पंपहाउसमध्ये दाखल झाले. त्यांचे काम सोमवारपासून सुरू होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोषागार कार्यालयाकडून दीडशे कोटींची बिले मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारी (३१ मार्च) सायंकाळी सात वाजेपर्यंत कोषागार कार्यालयात विविध शासकीय कार्यालयांची दीडशे कोटी रुपयांची सुमारे ६७० बिले मंजूर करण्यात आली.

यामध्ये जिल्हा परिषद, पोलिस आयुक्‍तालय, पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी कार्यालयांच्या बिलांची संख्या सर्वाधिक आहे. रात्री उशिरापर्यंत कोषागार कार्यालयातील कामकाज सुरू होते. रविवारी अखेरच्या दिवशी सायंकाळी सातपर्यंत विविध कार्यालयांकडून ६७० बिले मंजुरीसाठी पाठवण्यात आली. बिलांच्या मंजुरीसाठी शासनाने सुरू केलेल्या इस्टिमेट अलोकेशन मॉनेटरिंग संगणकीय प्रणालीचा उपयोग करण्यात आला. या बिलांचे मूल्य दीडशे कोटींवर आहे. रात्री उशिरापर्यंत कार्यालयांकडून बिले स्वीकारण्याचे निर्देश मिळाले असल्याने उशिरापर्यंत कामकाज सुरू होते. यामुळे प्राप्‍त बिलांची संख्या आणि रक्‍कम आणखी वाढण्याची शक्यता आहे.

\Bमार्चमध्ये सर्वाधिक बिले \B

२०१८-१९ या आर्थिक वर्षात ३१ मार्च अखेरपर्यंत ३५० कार्यालयांकडून तब्बल ५७ हजार बिले कोषागार विभागाला प्राप्त झाली. वर्षभर प्रत्येक महिन्यात प्रतिदिन सरासरी दीडशे ते दोनशे बिले मंजुरीसाठी आली. मात्र, अखेरच्या महिन्यात बिलांची संख्या प्रतिदिन ४०० ते ५०० अशी होती. ३० मार्च रोजी ४००, तर ३१ मार्च रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत ६७० बिले विविध कार्यालयांनी सादर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेची ११० कोटींची करवसुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने यंदा मालमत्ता करवसुलीत उच्चांक नोंदवला आहे. ३१ मार्चच्या सायंकाळी सहापर्यंत सुमारे ११० कोटींची वसुली झाली. ही वसुली गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० कोटीने जास्ता आहे. रविवारी (३१ मार्च) दिवसभरात पाच कोटी ६४ लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले.

महापालिकेने यंदा मालमत्ता करवसुलीवर लक्ष केंद्रित करून आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी वॉर्ड अधिकाऱ्यांना वसुलीचे उद्दिष्ट दिले. वसुली वाढवण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दोन वेळा विशेष वसुली मोहीम राबवली, त्यातून २५ कोटी रुपये जमा झाले. कर निर्धारक व संकलक महावीर पाटणी यांनी ३१ मार्चपर्यंतची माहिती दिली. ३१ मार्चमुळे कर भरण्याकरिता सर्व वॉर्ड कार्यालय रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली. सायंकाळी सहापर्यंत एकूण वर्षभरात ११० कोटींची वसुली झाली, हा आकडा रात्री १२ पर्यंत वाढू शकतो, असे त्यांनी सांगितले. मोबाइल टॉवर्सच्या माध्यमातून चार कोटी ५४ लाख ९९ हजार ८४९ रुपये वसूल झाले. रिलायन्स जीओने एक कोटी २६ लाख, इंडस टॉवर्स सहा लाख ६० हजार २७२ रुपये भरले आहेत.

\Bरविवारी पाडेपाच कोटींचा गल्ला \B

मोबाईल टॉवर्स एक कोटी २६ लाख, वॉर्ड क्रमांक १मधून एक कोटी ६० लाख ३१ हजार १३९ रुपये, 'साई' कार्यालयाकडून २९ लाख ३४ हजार रुपयांचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून ८५ लाख ६९ हजार रुपयांचा धनादेश. वॉर्ड कार्यालय क्रमांक २ मध्ये २४ लाख ८१ हजार ९६५ रुपये, वॉर्ड क्रमांक ३ मधून ३० लाख २५ हजार ८७४ रुपये, वॉर्ड क्रमांक ४ मध्ये २१ लाख ५२ हजार ४११ रुपये, वॉर्ड कार्यालय क्रमांक ५ मधून ११ लाख ४० हजार ८४१ रुपये, वॉर्ड कार्यालय क्रमांक ६ मध्ये ३६ लाख १४ हजार २६६ रुपये, वॉर्ड कार्यालय क्रमांक ७ मधून ३६ लाख ९० हजार ५०७ रुपये, वॉर्ड कार्यालय क्रमांक ८ मध्ये ५७ लाख ७१ हजार ८५६ रुपये, वॉर्ड कार्यालय क्रमांक ९ मधून ५८ लाख ९ हजार ९७ रुपये वसूल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अँजिओप्लास्टीनंतरही चांगले आयुष्य शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चांगली व योग्य जीवनशैली अंगीकारुन अँजिओप्लास्टीनंतरही चांगले आयुष्य जगता येऊ शकते. त्यासाठी समतोल आहार व व्यायामासोबतच रक्तदाब, रक्तशर्करा व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे व तंबाखुजन्य आजारांपासून दूर ठेवणे गरजेचे आहे, असा सल्ला हृदयविकारतज्ज्ञांनी धूत हॉस्पिटलमध्ये रविवारी (३१ मार्च) आयोजित 'लाईफ आफ्टर अँजिओप्लास्टी' कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला.

या कार्यक्रमाला प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ व विभागप्रमुख डॉ. विलास मगरकर, डॉ. प्रवीर लाठी, डॉ. देवेंद्र बोरगावकर, डॉ. मुनीर अहमद, डॉ. रिजवान देशमुख यांच्यासह प्रशासकीय अधिकारी डॉ. हिमांशू गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. यानिमित्त क्लिष्ट अँजिओग्राफी झालेल्या निवडक २५ रुग्णांना या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. मगरकर म्हणाले, 'अँजिओप्लास्टीनंतर रुग्णांनी डॉक्टरांनी दिलेली औषधी स्वत:हून बंद करू नये किंवा सल्ल्याशिवाय डोस बदलू नये; तसेच रक्तदाब, रक्तातील साखर नियंत्रित ठेवली पाहिजे. कोलेस्टॉल हे १७०पेक्षा कमी राहील, याकडे कटाक्ष ठेवणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे सिग्ध पदार्थांचे व तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे. सकस आहार घेतला पाहिजे आणि जमेल तेवढा व्यायाम केला पाहिजे.'

रक्तवाहिन्यांत अडथळा निर्माण झाल्याने अँजिओप्लास्टी करण्याची वेळ येते. त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागत नाही. ती हाताच्या अथवा पायाच्या रक्तवाहिनेद्वारे अँजिओप्लास्टी केली जाते. त्यामुळे रुग्णाच्या आयुष्यात फार काही बदल होत नाही. फक्त अँजिओप्लास्टीनंतर योग्य खबरदारी घेतली पाहिजे व अँजिओप्लास्टीचा उगाचच बाऊ करू नये, असे डॉ. मगरकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी विभागात आकडेमोड, जीएसटीत धावपळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मार्च एण्ड'निमित्त कृषी विभाग, राज्य कर विभाग( एसजीएसटी) कार्यालयाचे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू होते. प्राप्त निधीपैकी खर्च झालेला व परत जाणाऱ्या निधीची गोळीबेरीज करण्यात अधिकारी, कर्मचारी गर्क होते. एकूण आकडा रात्री बारापर्यंत सांगतो, असे उत्तर कृषी विभागातून मिळाले, तर जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी रिटर्न भरून घेणे, डिफॉल्टरकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती दिली. आलेला सर्व निधी खर्च झाल्याचे वन विभागाचे उप वनसंरक्षक सतीष वडस्कर यांना सांगितले.

\Bकृषी विभाग \B

औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांसाठी २०१८-१९या आर्थिक वर्षाकरिता ६९ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. प्रत्यक्षात ४९ कोटी ८ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. त्यापैकी विविध योजनांपोटी २९ कोटी ७ लाख रुपये खर्च करण्यात आले. यासह प्राप्त निधीपैकी किती खर्च झाला, याची किती शिल्लक यांचा तपशील रात्री उशिरा देता येईल, अशी माहिती सहसंचालक प्रतापसिंह कदम यांनी 'मटा'ला दिली.

\Bएसजीएसटी\B

राज्य कर विभागाचे रेल्वे स्टेशन येथील कार्यालय रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ज्या करदात्यांनी रिटर्न फाइल केले नाही, डिफॉल्टरकडे पाठपुरावा करून कर भरणा करून घेण्यात अधिकारी, कर्मचारी व्यस्त राहिले. रिटर्न दाखल न करणाऱ्या विरोधात नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्यांचे जावई माझच ऐकतील...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना 'औरंगाबादचा तिढा आहे. तिथं यांचे (खासदार रावसाहेब दानवे) जावाई (आमदार हर्षवर्धन जाधव) यांनीही बंडखोरी केली. दादांनी मला सांगितले,'माझा जावाई काही माझं ऐकत नाही. तो तुमचं ऐकतो...' हो, माझं ऐकतो ही गोष्ट खरी आहे. मी त्यांना मुंबईला बोलावलं तर, जावाई म्हणाले,'खोतकरसाहेब तुम्ही कशाला माघार घेतली. नका घेऊ माघार... तर, मी म्हणालो, नाही बाबा, आपण पक्षाचे बांधील कार्यकर्ते आहोत. तसं चालणार नाही, पण आपणच यांच्या जावायाची समजूत घालू आणि आपल्याला खात्री आहे, यांचे जावाई माझच ऐकतील...,' या शब्दांत शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी नुकताच घडलेला किस्सा सांगितला. खासदार रावसाहेब दानवे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या पूर्व तयारीच्या बैठकीत रविवारी ते बोलत होते. भाजपचे जेष्ठ नेते भास्कर पाटील दानवे, जिल्हाध्यक्ष रामेश्वर पाटील भांदरगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्यासह जालना विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. 'मराठवाडा समन्वयक म्हणून आपण आपली जवाबदारी अतिशय चोख पद्धतीने बजावत आहोत. परवा रात्री दोन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. त्यांनी तातडीने हिंगोलीत जाण्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या आदेशानुसार हिंगोलीचा तिढा सोडवला. परभणी, नांदेड, उस्मानाबाद, सगळीकडचे तिढे सोडवले. आता बीडला जातोय. पंकजाताईंसोबत कार्यकर्त्यांची बैठक घेऊन तिकडे सगळे सुरळीत चालू होईल. त्यानंतर लातूरला एकदा जायचे आहे,' असे खोतकरांनी सांगितले. आपल्या जिल्ह्यात प्रदेशाचे नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांना संपूर्ण प्रदेशात फिरू द्या. आपण आपला मतदारसंघ सांभाळू. आपण जवाबदारी घेतली पाहिजे. जालन्यातील सगळी रचना शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाचफुले सांभाळतील. त्यांना काय वाहने लागतील ती द्या. थोडे कमी-जास्त असेल त्यांनी (भाजपने) काही केले नाही तर, आपण आहोतच, आपल्या सांगा. सांभाळून घ्या काही कमी पडत असेल तर चिंता करू नका. आपल्या घरचे लग्न आहे, हे लक्षात घ्या असे खोतकरांनी शेवटी सांगितले. खासदार रावसाहेब दानवे यांचा विजय हा काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचे प्रतिपादन भास्कर दानवे यांनी केले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, भाजप जिल्हाध्यक्ष रामेश्वर पाटील भांदरगे, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर आणि जेष्ठ उद्योजक किशोर अग्रवाल यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचे पथ संचालन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या अनुषंगाने रविवारी शहरात पोलिसांच्या पथसंचालनाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध भागात पथ संचालन केल्यानंतर पोलिस आयुक्तालयात या संचालनाचा समारोप करण्यात आला.

पोलिस आयुक्तलयापासून सुरू झालेले हे संचालन शहरातील भडकलगेट, सिटीचौक, शहागंज, राजाबाजार, गुलमंडी, टिळकपथ, औरंगपुरा, निराला बाजार, पैठणगेट, सिल्लेखाना, अजबनगर तसेच शहरातील गारखेडा, सिडको हडको आदी भागात करण्यात आले. या पथ संचलनात क्वीक रिसपाँस टिम, राज्य राखीव दल, स्ट्रायकींग फोर्स, वज्र, वरून वाहन आदीचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिमायत बागेत शाळा चालकाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हिमायत बागेच्या परिसरात शाळा चालकाचा गळा चिरून खून केल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. विश्वास चंद्रशेखर सुरडकर (वय ३६, रा. एम - दोन, हडको) असे या शाळा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पैशाच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विश्वास सुरडकर यांची हडको भागात एक खाजगी इंग्रजी शाळा आहे. हिमायत बागेत रविवारी सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना एक व्यक्ती झाडीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. हा प्रकार बेगमपुरा पोलिसांना कळवण्यात आला. पोलिस निरीक्षक राजश्री आडे, उपनिरीक्षक संजय बहुरे, सरवर शेख, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शेख अफरोज यांनी देखील पथकासह घटनास्थळ गाठले. या मृतदेहाचा गळा चिरलेला होता; तसेच गळ्याभोवती दोरी आवळेली होती. मृतदेहाच्या शेजारी त्यांचा मोबाइल पडलेला होता. बेगमपुरा पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाला पाचारण केले. या पथकाने घटनास्थळी नमुने गोळा केले. मृतदेहाशेजारी असलेल्या मोबाइलवरून ओळख पटवण्यात आली. त्याच्या नातेवाइकांना फोन केला असता हा मृतदेह विश्वास सुरडकर यांचा असल्याचे समोर आले. सुरडकर यांच्या घरी ही माहिती देण्यात आली. त्यांच्या भावाने यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये काही संशयितांची नावे त्यांनी आरोपी म्हणून नमूद केली. यावरून पोलिसांनी राजू दीक्षित नावाच्या सुरडकर यांच्या नातेवाइकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.

\Bपैशावरून वाद\B

सुरडकर आणि दीक्षित यांच्यात पैशावरून वाद सुरू होता. सुरडकर यांनी दीक्षितकडून शाळा उभारणीसाठी मोठी रक्कम घेतली होती. ही रक्कम परत करण्यावरून त्यांच्यात खटके उडत होते. या वादातून हा खुनाचा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे.

\Bश्वानाने काढला गेटपर्यंत माग\B

आरोपीचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. या श्वानाने सुरडकर यांच्या मृतदेहापासून काही अंतरावर असलेल्या हिमायत बागेच्या लाकडी गेटपर्यंत माग काढला. यानंतर हे श्वान तेथेच घुटमळले. आरोपी या ठिकाणावरून वाहनाने गेले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड-औरंगाबाद डेमू सुरू करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नांदेड ते औरंगाबाद दरम्यान सर्वाधिक प्रवासी असल्यामुळे एक डेमू रेल्वे सुरू करावी, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात सध्या २२ ते २५ डेमू रेल्वे, तर नांदेड विभागात विभागात फक्त एक डेमू चालविली जाते.

नांदेड-औरंगाबाद, औरंगाबाद-अकोला, औरंगाबाद-उस्मानाबाद, अकोला-उस्मानाबाद या दरम्यान डेमू रेल्वेची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, या मागणीला सतत बगल दिली जात आहे. दरवर्षी मुंबईला जोडून १५ ते २० नवीन रेल्वे गाड्या सुरू केल्या जात आहेत, मात्र नांदेड विभागातून मनमाडमार्गे जाणाऱ्या रेल्वेंना मुंबईत फलाट उपलब्ध होत नाहीत. दक्षिण मध्य रेल्वेने आंध्र प्रदेश आणि तेलंगण विभागात सुरू केलेल्या १२ ते १५ विशेष उन्हाळी रेल्वे रिकाम्या धावत आहे. मात्र विशेष रेल्वेबाबत मराठवाड्याला वंचित ठेवले आहे. औरंगाबाद मार्गे नांदेड-मुंबई, लातूर-मुंबई, नांदेड-पुणे, नांदेड-बिकानेर, नांदेड-कटरा यासह अकोला मार्गे औरंगाबाद-नागपूर, सोलापूर-नागपूर, अकोला आणि औरंगाबाद या दोन्ही मार्गावरून नांदेड-गोरखपूर (व्हाया वारणासी) या व डेमू रेल्वे सुरू करण्याची मागणी महासंघाने केली आहे.

\Bजनआंदोलनचा इशारा \B

सध्या उन्हाळी सुट्या, लग्नसराई यामुळे सर्व रेल्वे आणि एसटी बसमध्ये खूप गर्दी आहे. त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांकरिता मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, बिकानेर, कटरा, गोरखपूर, गोवा येथे उन्हाळी विशेष रेल्वे सुरू करावी. या रेल्वेला पहिली तीन महिने ३० टक्के अधिक भाडे आकारणी केल्यास ठिक आहे, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाल्यास त्या नियमित कराव्यात. विशेष रेल्वेला मुदतवाढ देऊन जादा भाडे आकारणीची पद्धत बंद करावी, ही लूट थांबली नाही तर त्याविरोधात जन आंदोलन करण्याचा इशारा मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंढे, प्रा. सुरेश नाईकवाडे, डॉ. राजगोपाल कालानी, रितेश जैन, रवींद्र मुथा, दिलीपराव दुधाटे, डॉ. अटल पुरुषोत्तम, कादरीलाला हाशमी, श्रीकांत गडप्पा, प्रवीण थानवी, दयानंद दीक्षित आदींनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जेट’ची विमाने बंद झाल्याने २५ कोटींचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जेट एअरवेजचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई हे विमान बंद पडल्याचा फटका औरंगाबाद येथील हॉटेल, ट्रॅव्हल्ससह टुरिस्ट व्यवसायिकांना बसला आहे. विमान बंद झाल्यामुळे आतापर्यंत शहरातील २५ कोटींचा व्यवहार ठप्प झाला आहे.

जेट एअरवेजच्या विमानाच्या औरंगाबाद ते मुंबईकरिता दिवसातून दोन फेऱ्या होत असत. त्यातून २०० पेक्षा जास्त प्रवासी येत होते. शिवाय संध्याकाळच्या दुसऱ्या फेरीतूनही जवळपास तेवढ्याच प्रवाशांची वाहतूक होत होती. पण, गेल्या दहा ते १२ दिवसांपासून विमान बंद झाले आहे. या विमानांद्वारे येणाऱ्या ४०० प्रवाशांपैकी ९० ते ११० जण दिल्ली, जयपूर, उदयपूर व इतर भागातून मुंबईमार्गे येणारे पर्यटक होते. विमानाने येणारे पर्यटक हा शहरातील हॉटेलांत मुक्काम करत असे. पर्यटनाकरिता कारची बुकिंग, भोजन आदी करिता एक पर्यटक सुमारे २० हजार रुपये शहरात खर्च करत असे. याशिवाय पैठण व इतर ठिकाणची खरेदी वेगळी होती. पर्यटकांशिवाय उद्योग, व्यवसाय, विविध कॉन्फरन्सकरिता येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

जळगाव, जालना, परभणी, बुलडाणा जिल्ह्यातील अनेक पर्यटक औरंगाबाद येथून जेटच्या विमानाने विविध शहरांकडे रवाना होत होते. या पर्यटकांच्या गटाची संख्या मोठी असते. जेट एअरवेजचे विमान बंद झाल्यामुळे देशांतर्गत व परदेशातील पर्यटकांचे बुकिंग रद्द होत आहे. त्याचा फटका तिकीट बुकिंग करून देणाऱ्या व्यवसायिकांना बसला आहे. विमान रद्द झाल्याने तिकिटाची पूर्ण रक्कम प्रवाशाला दिली जात आहे, परंतु ऐनवेळी इतर विमानाचे तिकीट काढण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत असल्याने अनेकजण प्रवास रद्द करत आहेत. परिणामी, आतापर्यंत स्थानिक व्यवसायिकांना सुमारे २५ ते ३० कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे.

……

\Bपाच एप्रिलनंतर विमान सुरू होण्याची शक्यता कमी \B

जेट एअरवेजचे विमान ५ एप्रिलनंतर औरंगाबाद विमानतळावरून उड्डाण करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, सहा एप्रिल रोजी जेट एअरवेजचे सकाळी पावणे सात वाजता मुंबईहून येणाऱ्या विमानाची शाश्वती नसल्याची चर्चा पर्यटन व्यावसायिकांत आहे.

जेट एअरवेजचे औरंगाबाद येथील विमान पुन्हा सुरू करावे यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहोत. हे विमान रद्द झाल्याने हॉटेल, टुर्स ऑपरेटर, पर्यटन उद्योगाशी निगडीत व्यवसायिकांचे कोटयवधींचे नुकसान होत आहे. याकडे संबंधित विभाग, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

-आशुतोष बडवे, अध्यक्ष, टुरिस्ट असोसिएशन ऑफ औरंगाबाद

…………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थॅलेसेमियाचा समावेश राष्ट्रीय कार्यक्रमात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

थॅलेसेमिया या दुर्धर आजाराचा समावेश लवकरच आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू असून, या वर्षापासून थॅलेसेमियाचा राष्ट्रीय कार्यक्रमात समावेश होऊ शकतो. त्यामुळे थॅलेसेमियाबाबत व्यापक जनजागृती होऊन या दुर्धर आजारावर अनेक उपाययोजना करणे शक्य होईल, अशी अपेक्षा 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहिमॅटोलॉजी'च्या माजी विभागप्रमुख व संशोधक डॉ. रोशन कोलाह यांनी रक्तविकार व जनुकीय आजारांवरील वैद्यकीय परिषदेत व्यक्त केली.

कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे, 'फिजिशियन असोसिएशन' व 'फोग्सी'च्या सहकार्याने शनिवार व रविवारी (३० व ३१ मार्च) हॉटेल ताज विवांता येथे वैद्यकीय परिषद घेण्यात आली. या परिषदेत 'आयसीएमआर'च्या नामांकित संशोधक डॉ. कोलाह यांनी 'थॅलेसेमिया प्रिव्हेन्शन रोडमॅप २०१९'वर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, थॅलेसेमिया या दुर्धर आजारामुळे व्याधीग्रस्तांना अनंत यातना भोगाव्या लागतात व अजूनही या आजाराबाबत फार कमी जनजागृती आहे. मुळात हा आजार कशामुळे होते आणि हा आजार होऊ नये म्हणून कोणकोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबाबत व्यापक जनजागरण होणे गरजेचे आहे. त्यामुळेच आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रमात थॅलेसेमियाचा समावेश करण्याचा निर्णय झाला आहे आणि लवकरच हा समावेश होईल, असेही डॉ. कोलाह म्हणाल्या. परिषदेत इंग्लंडमधील संशोधक डॉ. आशुतोष वेचलेकर यांचे 'अॅबनॉर्मल प्रोटीन'वर महत्वपूर्ण व्याख्यान ठरले. 'अॅबनॉर्मल प्रोटीन' अर्थात 'पॅरा प्रोटीन'मुळे रक्तवाहिन्यांच्या विविध गंभीर आजारांपासून मूत्रपिंड निकामी होणे, हृदयक्रिया बंद पडणे व इतर अनेक आजार उद्भवतात. त्यामुळे 'पॅरा प्रोटीन'च्या निदानाबाबत अतिशय जागृक राहून गरजेच्या चाचण्या वेळोवेळी केल्या पाहिजे व त्यासाठी डॉक्टरांनी दक्ष राहणे तितकेच गरजेचे आहे, असेही डॉ. वेचलेकर यांनी सांगितले. याच प्रकारच्या गंभीर व दुर्धर आजारांबाबत परिषदेचे संयोजक व 'कमलनयन'च्या हिमॅटोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. व्यंकटेश एकबोटे यांनी व्याख्यान दिले.

\Bतज्ज्ञांनी केले अनुभव कथन

\Bयाच परिषदेत डॉक्टरांनी आपापल्या क्षेत्रातील रुग्णांचे अनुभव कथन केले. यानिमित्ताने विविध चर्चाही रंगल्या. यानिमित्ताने डॉ. सुमित गुजराल, डॉ. समीर मेलनकेरी, डॉ. मयुर परीहार, डॉ. सुनिल भट, डॉ. अलका एकबोटे, डॉ. गजानन पदमवार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या दोन दिवसीय परिषदेत सुमारे ३०० डॉक्टरांनी सहभाग नोंदवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजिंठा एक्स्प्रेस मुंबईपर्यंत नेण्याचा घाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नांदेड येथून औरंगाबादमध्ये मुंबईकरिता नवीन रेल्वे सोडण्याची मागणी मराठवाड्यातून केली जात आहे. पण, नवीन रेल्वे सुरू करण्याऐवजी अजिंठा एक्स्प्रेसचा (मनमाड-सिकंदराबाद) मुंबईपर्यंत विस्तार करण्याचा घाट दक्षिण मध्य रेल्वेकडून घातला जात आहे.

नांदेड येथून मुंबईला जाण्यासाठी औरंगाबादमार्गे देवगिरी व नंदीग्राम या दोनच रेल्वेगाड्या आहेत. त्यामुळे तिसरी रेल्वे सुरू करावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. या मागणीची पूर्तता न करता दक्षिण मध्य रेल्वेकडून अजिंठा एक्स्प्रेसचा विस्तार करण्याचा विचार केला जात आहे. सध्या अजिंठा एक्स्प्रेस सिकंदराबाद येथून सायंकाळी सहा वाजून १० मिनिटाला निघून औरंगाबाद येथे पहाटे साडे पाच, तर मनमाडला येथे सकाळी पावणे सात वाजता पोचते. त्यानंतर ती रात्री आठ वाजून ५० मिनिटांनी मनमाडहून परतीच्या प्रवासाला निघते. या रेल्वेत प्रामुख्याने शिर्डी येथे साईबाबा यांच्या दर्शनासाठी दक्षिणेतून येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. तरीही नांदेड ते मनमाड दरम्यानच्या प्रवाशांना काही प्रमाणात जागा मिळते.

या रेल्वेचा मुंबईपर्यंत विस्तार करण्याचा प्रयत्न तत्कालीन विभागीय रेल्वे व्यवस्थापक ए. के. सिन्हा यांच्या काळात करण्यात आला. पण, मध्य रेल्वेने ही रेल्वे 'सीएसटीएम'पर्यंत नेण्यास नकार दिला. आता पुन्हा नवे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांच्यासमोर हा विषय ठेवण्यात आला आहे. त्यासाठी ही रेल्वे मनमाड येथे १४ तास उभी राहते, असे कारण दिले जात आहे.

दक्षिण मध्य रेल्वेने यापूर्वी देवगिरी एक्स्प्रेसचा विस्तार करत ती सिकंदराबादला नेली. त्यानंतर नंदीग्राम एक्स्प्रेस आधी नांदेडपर्यंत होती, ती आता नागपूरपर्यंत वाढवली आहे. यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना जागा मिळत नाही. आता अजिंठा एक्स्प्रेस सुद्धा मुंबईपर्यंत नेण्याचा घाट घातला जात आहे.

\Bविस्तार निरुपयोगी \B

मुंबईकरिता नवी रेल्वे सुरू करण्याऐवजी अजिंठा एक्स्प्रेसचे विस्तार करून मराठवाड्यातील प्रवाशांच्या मागणीला खो दिला जात आहे. या रेल्वेचा विस्तार केला तर त्याचा लाभ मराठवाड्यातील प्रवाशांना होण्याची शक्यता कमीच आहे, असे मत मराठवाडा रेल्वे समितीचे अरुण मेघराज यांनी व्यक्त केले.

……

\B'राज्यराणी'चे काय झाले ? \B

'सीएसटीएम' ते मनमाड राज्यराणी एक्स्प्रेसला सहा डबे जोडण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. नांदेड ते मनमाड या मार्गावर ही सहा डब्याची रेल्वे चालवण्याचा प्रस्ताव आहे. पण, या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केला जात नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबाद जिल्ह्यात ३०६७ मतदान केंद्रे

$
0
0

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली असून, जिल्ह्यात मतदारांची वाढ झाल्यामुळे मतदान केंद्रांमध्येही वाढ झाली आहे. यापूर्वी जिल्ह्यामध्ये २९५७ मतदान केंद्रे होती. आता निवडणूक आयोगाने नवीन ११० सहाय्यकारी मतदान केंद्रांना मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण ३०६७ मतदान केंद्रे झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी निलेश श्रींगी यांनी सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ३१ जानेवारी २०१९पर्यंत २९५७ मतदान केंद्रे अस्तित्वात होती. आयोगाकडून सहाय्यकारी मतदान केंद्राच्या निकषानुसार ११० सहाय्यकारी मतदान केंद्राना मान्यता मिळाली. त्याचबरोबर सुस्थितीत नसलेल्या १२२ मतदान केंद्रांच्या ठिकाण बदलाचे प्रस्तावही आयोगाकडून मान्य करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती सर्व राजकीय पक्षांना देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमीन एजंटला अटक; उद्यापर्यंत कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट कागदपत्रांआधारे इसारपावती तयार करून जमीन हडपत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात जमीन खरेदी विक्री करणारा एजंट रहेमत खान इमाम खान उर्फ अण्णा याला पोलिसांनी रविवारी (३१ मार्च) पहाटे अटक केली. त्याला कोर्टात हजर केले असता, आरोपीला मंगळवारपर्यंत (२ एप्रिल) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गजाला-अल-अमोदी यांनी दिले.

पार्वताबाई लाला सलामबाद (वय ४६, रा. गोलवाडी) यांनी फिर्याद दिली होती. त्यांची वळदगाव येथे गट क्रमांक ५५ मध्ये वडिलोपार्जित ६० आर शेतजमीन असून २७ डिसेंबर २०१८ रोजी एका वर्तमानपत्रात त्यांच्या नावे जाहीर प्रगटन प्रसिद्ध झाले होते. त्यात सांडूखान मुमताज खान (रा. किराडपुरा), मोहंमद जहीर परवेज मोहंमद जफरउल्लाह (रा. आलमगरी कॉलनी), साजिद गुलाम रसुल पटेल (रा. सिल्कमिल कॉलनी) यांनी मिर्झा निसारबेग अजिजबेग यांच्याकडून खरेदी करण्याचा करारनामा केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे फिर्यादीचा भाचा चेतन तायडे यांनी संबंधित व्यक्तींची भेट घेत त्यांच्याकडून इसारपावतीची छायांकित मिळविली. त्यात २७ डिसेंबर २०१८ रोजी मिर्झा निसारबेग अजिजबेग (४४, रा. गाढेजळगाव) याने फिर्यादीच्या नावावरील शेत जमीन १ कोटी ४० लाख रुपयांत खरेदी केल्याचे नमूद केले होते. इसारपावतीत फिर्यादीऐवजी दुसरी महिला उभी करुन तिचा फोटो व अंगठा लावण्यात आला असून ओळखपत्र म्हणून बनावट आधारकार्ड जोडल्याचेदेखील समोर आले होते. प्रकरणात फिर्यादीच्या सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात यापूर्वी निसारबेग अजीजबेग मिर्झा याला अटक करण्यात आली होती. त्याच्या पोलिस कोठडीदरम्यान, आरोपी एजंट रहेमत खान इमाम खान उर्फ आण्णा (४७, रा. किराडपूरा) याने संबंधित जमीन दाखवून व मालक म्हणून बनावट महिलेची भेट घालून देत जमिनीची इसार पावती करुन दिल्याचे मिर्झा याने पोलिसांना सांगितले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्याप्रकरणी हर्सूलला रवानगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारजीय जनता पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष सुनील प्रल्हाद आहिरे यांच्या आत्महत्याप्रकरणातील आरोपी मोहनलाल उर्फ नाना साळवे याची रवानगी हर्सूल येथील न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले. याप्रकरणी भाजप वॉर्ड अध्यक्ष सुनील प्रल्हाद आहिरे (मृत) यांच्या पत्नीने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, सुनील आहिरे यांनी दोन महिला आरोपींसह आरोपी मोहनलाल उर्फ नाना साळवे याच्या त्रासाला कंटाळून दहा मार्च रोजी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार फिर्यादीने केली होती. फिर्यादीच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आरोपी मोहनलाल उर्फ नाना साळवे हा गुरुवारी स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याला कोर्टात हजर केले असता, कोर्टाने साळवे यास रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला कोर्टात हजर केले असता, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये दरोडेखोरांनी केली वृद्धेची हत्या

$
0
0

बीड:

बीड जिल्ह्यातील गेवराई येथे दरोडेखोरांनी एका घरात घुसून वृद्ध महिलेचा मोबाइल चार्जरनं गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली आहे. तसंच घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पाच लाख रुपये किंमतीचा ऐवज लुटून पोबारा केला.

खडकपुरा भागातील खक्का मार्केट परिसरातील एका घरावर रविवारी रात्री दरोडा पडला. दरोडेखोरांनी घरातील सोने व चांदीच्या दागिन्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल लुटला. तसंच पुष्पाबाई शिवप्रसाद शर्मा या वृद्धेचा मोबाइल चार्जरनं गळा दाबून खून केला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, दरोडेखोरांच्या शोधासाठी पथक तयार केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माँ कर्मादेवीची जयंती उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

श्री संत शिरोमणी माँ कर्मादेवीची १००२ व्या जयंती निमित्त बाथ्री तेली समाजातर्फे जुना मोंढा परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत कर्मादेवी व कृष्णाच्या वेशभूषेत असलेल्या लहान मुलामुलींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

जुना मोढा परिसरातून शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेचे उद्घाटन आमदार अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. शोभायात्रेची सुरुवात देवीच्या आरतीने करण्यात आली. सजविलेल्या रथातून माँ कर्मादेवीची शोभायात्रा चौराहा, संस्थान गणपती, जाधवमंडी मार्गे निघाली. या शोभायात्रेचा समारोप मोंढा येथील बाथ्री तेली समाज भवन येथे करण्यात आला.
बाथ्री तेली समाज येथे महाप्रसादाच्या आयोजनानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी बाथ्री तेली समाजाचे अध्यक्ष अनिल मकरिये, सुरेश बसैय्ये, रोहण परदेशी, गुड्डू बसैय्ये, चेतन रौतल्ले, जितेंद्र नरवैय्ये, निर्भय मकरिये, बंटी टेटवार, मनीष पिंप्रीये, जय सरवैय्ये, शुभम नरवैय्ये, अजय खुदभैय्ये, सुधीर सरवैय्ये, संदीप जडिये, मयुर खुदभैय्ये, सुरज बसैय्ये, आकाश बसैय्ये, विनोद मंडोरे, नीलेश पुरे, वैभव सरवैय्ये, वैभव सरवैय्ये, आशुतोष पिंप्रीये यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images