Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

झांबड यांच्याकडे ३४ कोटींची संपत्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार आमदार सुभाष झांबड व कुटुंबाकडे स्थावर व जंगम मिळून ३३ कोटी ९४ लाख ५२ हजार ९०९ रुपयांची मालमत्ता आहे. झांबड यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या शपथपत्रात ही माहिती दिली आहे.

झांबड कुटुंबियांकडे १८ कोटी ९८ लाख रुपयांच्या आसपास स्थावर मालमत्ता आहे, तर १५ कोटी जंगम मालमत्ता आहे. यामध्ये कुटुंबियांच्या नावेही मालमत्तेचा समावेश आहे. झांबड यांच्याकडे ४ लाख ८४ हजार ४८८ रुपयांची रोख रक्कम, तर पत्नी सीमा झांबड यांच्याकडे ३ लाख ८२ हजार ५५८ रुपयांची रक्कम आहे. शेतजमीन व इतर मालमत्तेमध्ये झांबड यांच्याकडे ९ कोटी १० लाख २२ हजार ६०० रुपयांची तर, पत्नीच्या नावे ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता आहे. कुटुंबियाच्या नावे १ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता आहे. झांबड यांच्याकडे २१ लाख रुपयांचे सोने असून ४ लाख ९४ हजार किमतीची १३ किलोची चांदी आहे. तर त्यांच्या पत्नीकडे १५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत.

\B८० एकरपेक्षा जास्त जमीन

\Bझांबड यांच्यावर १३ कोटी ५८ लाख रुपये तर, पत्नीवर ५ कोटी ४८ लाख १८ हजार ५१२ रुपयांचे कर्ज आहे. कुटुंबाच्या नावे ७७ लाख ९२ हजार ५२९ रुपयांचे कर्ज आहे. झांबड यांनी स्वत, पत्नी आणि कुटुंबियांसह मिळून ८० एकरपेक्षा अधिक जमीन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा टक्के वाढ करूनच पाणीपट्टी वसूल करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

अनियमित पाणी पुरवठा आणि दुष्काळामुळे निर्माण झालेली पाणी टंचाई यामुळे जनतेत महापालिकेबद्दल तीव्र संताप असताना, पालिकेच्याच शहर अभियंत्यांनी नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. 'दहा टक्के वाढ करूनच पाणीपट्टी वसूल करा,' अशा आशयाचे आदेश त्यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना दिले आहेत.

समांतर जलवाहिनीचा 'पीपीपी' तत्वावरचा प्रकल्प शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या हातावरच मंजूर झाला. हा प्रकल्प मंजूर करताना पाणी पुरवठ्यासाठीचे उपविधी देखील मंजूर केले. त्यात पाणीपट्टीत दरवर्षी दहा टक्के वाढ करण्याचा उल्लेख केला. कालांतराने सर्वसाधारण सभेने समांतर जलवाहिनीचा प्रकल्प रद्द केला. त्यामुळे पाणीपट्टीत दरवर्षी दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय देखील महापौरांनी रद्द केला. कोणत्याही प्रकारची वाढ न करता पाणीपट्टी वसूल करा, असे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले. त्यानुसार वॉर्ड अधिकाऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल केली जाऊ लागली. दरम्यान शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी २५ फेब्रुवारी २०१९ रोजी पाणीपट्टी वसुलीबद्दल कार्यकारी अभियंता व वॉर्ड अधिकारी यांच्या नावे पत्र काढले. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, '२०१८ - १९ साठी आपण कोणत्या दराने पाणीपट्टी वसूल केली आहे. त्याचा व्यासनिहाय वसुली अहवाल सादर करावा. तसेच २०१८ - १९मध्ये पाणीपट्टी वसुलीसाठी एकूण किती रक्कम जमा झाली आहे व उर्वरित रक्कमेच्या वसुलीचे काय नियोजन आहे, याची माहिती सादर करावी. पाणीपट्टी वसुली मंजूर पाणीपट्टी उपविधीनुसार प्रतिवर्ष दहा टक्के वाढ करून करावयास पाहिजे. मात्र, प्राप्त माहितीनुसार आपण दहा टक्के दरवाढ न करता पाणीपट्टी वसूल केल्याचे समजते. सदर वसुली कोणत्या नियमानुसार, कोणाच्या आदेशानुसार आकारली आहे याबाबतचा सविस्तर खुलासा करावा. तसेच पुढील वर्षीसाठी पाणीपट्टी वसुलीबाबत नियोजन सादर करावे.' त्यांच्या या पत्रामुळे असंतोष वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झांबडांवर प्रशासन मेहेरबान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एका उमेदवारासोबत जास्तीत जास्त चार जण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात जाण्याची परवानगी असताना काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांच्यासोबत मात्र एकूण १५ जणांना दालनात जाण्याची परवानगी पोलिस प्रशासनाने दिली. झांबड यांनी दोन अर्ज सादर केले असले तरी, पहिला अर्ज दाखल करून आल्यानंतरच दुसरा अर्ज देण्यासाठी उमेदवारांसोबतच्या इतर व्यक्तींना जाण्यास परवानगी देण्यात येते. हा नियम पोलिसांनी तसेच जिल्हाप्रशासनाने धाब्यावर बसवल्याचे चित्र होते.

काँग्रेस- राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात दोन ठिकाणी मोठे बोर्ड लावण्यात आले आहेत. यामध्ये एका उमेदवाराला चार जण सोबत घेऊन उमेदवारी अर्ज भरता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. उमेदवाराने दोन अर्ज भरले तर, प्रथम अर्ज भरून दालनाबाहेर आल्यानंतर इतर चार लोकांनी सोबत जाऊन दुसरा अर्ज भरावा असे संकेत आहेत. मात्र, सोमवारी जिल्हा प्रशासन तसेच पोलिस प्रशासनाने या नियमाकडे डोळेझाक केली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार झांबड यांच्यासह त्यांच्या पत्नी तसेच अन्य एक महिला, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, सतीश चव्हाण, राजेंद्र दर्डा, डॉ. कल्याण काळे, कदीर मौलाना, कैलास पाटील, काशीनाथ कोकाटे, नामदेव पवार, गंगाधर गाडे, सूर्यकांता गाडे, समद पटेल या लोकांना पोलिस प्रशासनाने एकत्र दालनामध्ये जाण्यास परवानगी दिली. दोन दिवसांपूर्वी महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनीही दोन अर्ज भरले. त्यांच्यावेळेस मात्र एक फॉर्म भरताना उमेदवारासोबत चार लोकांनाच चॅनल गेटमधून आत सोडण्यात आले होते. या प्रकारावरून जिल्हाप्रशासन काँग्रेसला मेहेरबान झाले असल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात होती. दरम्यान, याबाबत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

\Bघोषणाबाजीने पोलिसांची तारांबळ

\Bउमेदवारी अर्ज दाखल करून आल्यानंतर झांबड समर्थक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात 'झांबड साहब तुम आगे बढो' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी बंदोबस्तासाठी उन्हाची सावलीत बसलेले पोलिस अचानक जागे झाले आणि घोषणा देऊ नका, अशी विनंती कार्यकर्त्यांना केली. मात्र, झांबड यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी पुन्हा जोदार घोषणाबाजी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलग सहाव्या दिवशी पाणी न आल्याने आगडोंब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडकोतील गुलमोहर कॉलनी वॉर्डात सलग सहाव्या दिवळी पाणी पुरवठा न झाल्यामुळे सोमवारी (१ एप्रिल) उद्रेक झाला. संतप्त नागरिकांनी सिडको एन ५ येथील जलकुंभासमोर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी टायर जाळून चिश्तिया चौकातील सर्व रस्ते बंद करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला.

सिडको, हडकोला सिडको एन ५ येथील जलकुंभावरून पाणी पुरवठा केला जातो. या जलकुंभापासून जवळ असतानाही गुलमोहर कॉलनीत नियमीत पाणी पुरवठा होत नाही. सोमवारी सलग सहाव्या दिवशी पाणी पुरवठा न झाल्यामुळे या भागातील नागरिक गेले. त्यांच्यासोबत भाजपचे नगरसेवक शिवाजी दांडगे हे होते. महापालिकेने तीन दिवसआड पाणी पुरवठ्याचे नियोजन केले असल्याने चौथ्या दिवशी पाणी पुरवठा झाला पाहिजे. परंतु सिडकोत बहुतांश ठिकाणी पाचव्या, सहाव्या दिवशी पाणी पुरवठा होतो. गुलमोहर कॉलनी वॉर्डात, तर सहाव्या दिवशी देखील पाणी आले नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी जलकुंभाचा ताबा घेतला. सकाळी सहा वाजताच ते जलकुंभावर धडकल्यामुळे कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. कोणीही जबाबदार अधिकारी जलकुंभावर नसल्याने नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर काय द्यायचे, असा प्रश्न त्यांना पडला. ते उत्तर देत नव्हते व अधिकारी येत नसल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली. त्यांनी अचानक 'रास्ता रोको' सुरू केला. रस्त्याशेजारी पडलेले टायर आणून पेटून दिले. त्यामुळे चिश्तिया चौकातील सर्व रस्त्यांवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.

या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले हे जलकुंभ परिसरात दाखल झाले. त्यांनी भाजप नगरसेवक दांडगे यांच्यासह नागरिकांसोबत चर्चा केली. पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांना महापौरांनी पाचारण केले. गुलमोहर कॉलनी वॉर्डाला तत्काळ पाणी पुरवठा करण्याची सूचना त्यांनी अभियंत्यांना केली. सिडको भागातील पाणीप्रश्नाबद्दल दुपारी आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, असे आश्वासन महापौरांनी दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. हे आंदोलन सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत सुरू होते. गुलमोहर कॉलनीत दुपारी कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात आल्याची माहिती नगरसेवक दांडगे यांनी दिली.

पाणी पुरवठ्याचे कसलेही नियोजन नाही. पालिका प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचे वाटते. काही भागांना जास्त, तर काही भागांना कमी पाणी दिले जाते. आमच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. सर्वांना समान पाणी देण्याचे नियोजन करावे.

-शिवाजी दांडगे, भाजप नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बडोदा बँकेत विजया, देना बँकेचे विलिनीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विजया बँक आणि देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनिकरण झाल्यामुळे विभागातील शाखांची संख्या दुपटीने वाढली आहे. १२ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या बँकेच्या विभागातील व्यवहार दहा हजार कोटींवरून १७ हजार कोटींवर पोहचतील, अशी महाव्यवस्थापक सुरेंद्र शर्मा यांनी दिली. मात्र, विलीनिकरणानंतर प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी एक वर्ष लागण्याची शक्यता आहे.

विजया बँक आणि देना बँकेचे सोमवारी (१ एप्रिल) अस्तित्व संपले, आता तीन बँकांची मिळून एकच बँक झाली आहे. 'या विलीनिकरणानंतर बँक ऑफ बडोदा ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक झाली आहे. देशातील ८५ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी, १३ हजार ४०० पेक्षा जास्त एटीएम आणि १२ कोटी ग्राहक असलेली ही बँक आहे. देना आणि विजय बँकेच्या दोन कोटी पेक्षा जास्त ग्राहकांना सेवा दिली जाणार आहे. प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया पूर्ण होण्यास १२ ते १८ महिन्यांचा कालवधी लागेल,' असे महाव्यवस्थापक शर्मा यांनी सांगितले.

'तीन बँका एकत्र झाल्यामुळे विभागातील शाखांची संख्या वाढली असून येत्या काळात शाखा नसलेल्या गावांत नवीन शाखांचा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या १२ जिल्ह्यांचा विभाग असून या प्रक्रियेमुळे मराठवाड्याचा स्वतंत्र विभाग होण्याची शक्यता नाकराता येत नाही. मराठवाड्यात बँकेच्या ६८ शाखा असून कर्ज प्रक्रिया तसेच इतर सेवा या बँक ऑफ बडोदाच्या नियमानुसार दिल्या जात आहेत,' शर्मा यांनी सांगितले. यावेळी सहायक महाव्यवस्थापक के. सुब्रमोहन, विभागीय व्यवसाय विकास संचालक नितीन जामनिक, विभागीय मार्केटिंग मॅनेजर रोहित कांबळे यांची उपस्थिती होती.

\Bविभागातील शाखा\B

८९ वरून १९०

\Bविभागातील जिल्हे \B

औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, नंदुरबार, नाशिक, धुळे आणि अहमदनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रीतम मुंडे १३ कोटींच्या मालकीण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

लोकसभेच्या बीड मतदार संघातून ३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाच्या प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बजरंग सोनवणे यांचा समावेश आहे. उमेदवारी दाखल केलेल्या प्रीतम मुंडे यांची जंगम व स्थावर संपत्ती तेरा कोटींच्या वर आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार प्रीतम यांची जंगम मालमत्ता १० कोटी ४७ लाख ७० हजार ९४९ रुपये आहे. स्थावर मालमत्ता ३ कोटी ८७ लाख ४८ हजार ६५४ रुपये एवढी आहे. त्यांच्या नावावर विविध वित्तीय संस्थांचे ८ कोटी ६२ लाख ७७ हजार ७९४ रुपये कर्ज आहे. प्रीतम यांचे पती गौरव खाडे यांच्याकडे २ कोटी २१ लाख २ हजार ३२३ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. १८ लाख ५६ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यावर १ कोटी २५ लाख ५६ हजारांचे कर्ज आहे.

बजरंग सोनवणेंची ४ कोटींची मालमत्ता

बीड मतदार संघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याकडे ४ कोटींहून अधिक रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे.
सोनवणे यांची जंगम मालमत्ता २ कोटी ५२ लाख ११ हजार ४०९ रुपये आहे. १ कोटी ६३ लाखाची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या नावावर ६४ लाख २३ हजार ३०१ रुपयांचे कर्ज आहे. त्यांची पत्नी सारिका सोनवणे यांची जंगम मालमत्ता १ कोटी १२ लाख ३६ हजार आहे. त्यांची स्थावर मालमत्ता ५८ लाख ५० हजार असून, १४ लाख ३९ हजार ८०१ रुपयांचे कर्ज त्यांच्या नावावर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद विमानतळ ग्राहक सेवेत टॉप टेन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्राहक सेवेत औरंगाबाद विमानतळ देशभरात टॉप टेनवर आले आहे. प्रवाशांसाठी असलेल्या सुविधा, त्यांच्यासोबतचा व्यवहार या आधारावर हा क्रमांक काढण्यात आला आहे.

विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने त्रयस्थ संस्थांद्वारे औरंगाबाद विमानतळाच्या सुविधांची पाहणी व सर्वेक्षण करण्यात आले होते. विमानतळ प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ३३ मापदंड तयार करण्यात आली होती. यात विमानतळ, परिसरातील स्वच्छता, पार्किंग, बॅग डिलिव्हरी स्पीड, वॉशरूम, ट्रॉली सुविधा, चेक इन लाइन, सुरक्षा आदींसह विमानतळावरील कर्मचाऱ्यांची वागणुकीचे सर्वेक्षण करण्यात आले. यात फ्लाइट इन्फॉर्मेशन स्क्रीन, सुरक्षा तपासणीत लागणारा वेळ, शिष्टाचार आणि निरीक्षणात सुरक्षा कर्मचाऱ्यांची वर्तवणूक, इंटरनेट सुविधा, वायफाय, रेस्टॉरेंट, एटीएम, मनी एक्सचेंज आदींसह विमानतळावरील विविध सुविधांची महिती घेण्यात आली. त्यात औरंगाबादच्या विमातळाने बाजी मारली.

औरंगाबाद विमानतळावर आलेल्या ग्राहकांकडूनही अभिप्राय घेण्यात आले. या सर्वेक्षणानंतर औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाला देशभरातील नॉन मेट्रो विमानतळाच्या यादीत दहावा क्रमांक मिळाला आहे.

- डी. जी. साळवे, विमानतळ संचालक

टॉप १० विमानतळ

१. रायपूर, २. उदयपूर, ३. त्रिची, ४. वडोदरा, देहरादून, ५. गया, ६. जोधपूर, ७. मदुरई, ८. पोर्ट ब्लेअर, ९. जम्मू. १०. औरंगाबाद


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंडे भगिनीचे स्वत:चे कर्तृत्व काय?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'बीडची निवडणूक माझ्यासाठी प्रतिष्ठेची आहे. ही निवडणूक मोठ्यांचे लेकरू विरुद्ध सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलगा अशी आहे. मुंडे भगिनींचे स्वत:चे कर्तृत्व काय आहे,' अशी जोरदार टीका करत मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे यांच्यावर तोफ डागली.

सिडको परिसरातील शिवछत्रपती कॉलेजमध्ये मंगळवारी समस्त बीड जिल्हा मित्र मंडळातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ बैठकीचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार सतीश चव्हाण, अभिजित देशमुख, ज्येष्ठ विधीज्ञ व्ही. डी. सांळुके यांच्यासह औरंगाबादेत राहणारे बीड येथील मूळ रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मुंडे यांनी मोदींवर तोड डागली. '२०१४च्या निवडणुकीत केलेले भाषण नरेंद्र मोदी यांनी पुन्हा ऐकले तर, निवडणूक प्रचारासाठी कसे जावे, असा प्रश्न त्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. मोदीची अवस्था गजनी चित्रपटातील नटासारखी झाली आहे. खोटी आश्वासन देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने जनतेची घोर फसवणूक केली आहे. देशात एक प्रकारची हुकुमशाही सुरू आहे,' असा आरोप त्यांनी केला. 'बीडमध्ये एकाच कुंटुबांकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता आहे. असे असतानाही बीडचा विकास का झाला नाही. रेल्वे प्रश्नांसह अन्य प्रश्न का सुटले नाहीत. मुंडे भगिनीचे स्वत:चे कर्तृत्व काय?' असा सवाल त्यांनी केला. यावेळी आमदार चव्हाण यांनीही मत मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अठराव्या वर्षी निवडणूक लढवू द्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'वयाच्या अठराव्या वर्षी मतदानाचा अधिकार मिळाला. मग अठराव्या वर्षी निवडणूक लढविण्याचा अधिकार का नाही,' असा सवाल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी केला.

वयवर्ष १८ ते ३० पर्यंतच्या युवकांशी संवाद साधण्यासाठी स. भु. शिक्षण संस्थेच्या मैदानावर 'आदित्य संवाद' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील या पहिल्याच कार्यक्रमाबद्दल कमालीची उत्सुकता होती. मोठ्या संख्येने युवक - युवती यावेळी उपस्थित होते. नोंदणी केलेल्यांची नावे कागदाच्या चिठठ्यांवर लिहून ती एका काचेच्या भांड्यात ठेवली होती. एक - एक चिठ्ठी काढून, त्या चिठ्ठीवर असलेले नाव पुकारून त्या नावाच्या युवकाला किंवा युवतीला आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली जात होती.

सुरुवातीला आदित्य यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, 'तुम्ही मतदानाला तयार आहात का, आता बोट दाखवून चालणार नाही. मूठ आवळली पाहिजे. आपण आपले पहिले मत देतो. मत देताना मतदानाचा काही अर्थ आहे का, असा प्रश्न आपल्या मनात असतो. आपल्या मनात काही कल्पना असतात. त्या प्रत्यक्षात येतात का, असा आपल्या मनात प्रश्न असतो. तुम्ही तुमच्या कल्पना आम्हाला सांगा आम्ही त्यांचा आमच्या वचननाम्यात समावेश करू आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.' कुणाल रेंगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यांनी पहिला प्रश्न विचारला. 'यंदा ५५ कोटी नव मतदार आहेत. तुम्ही त्यांच्याकडे कसे पाहता?' यावर आदित्य म्हणाले, 'पहिले मतदान फार महत्त्वाचे असते. तुम्ही कुणाला मत देता हे देखील महत्त्त्वाचे असते. वयाच्या १८व्या वर्षी मी मतदान करू शकत असेल, तर १८व्या वर्षी निवडणूक का लढवू शकत नाही. तरुणांमध्ये जोश आणि होश असतो.' या उत्तरानंतर कुणाल रेंगे यांनी काचेच्या भांड्यात ठेवलेल्या चिठ्ठ्यांपैकी एक - एक चिठ्ठी उचलून तरुण - तरुणींची नावे उच्चारण्यास सुरुवात केली. पहिली चिठ्ठी विद्या कोठावळे यांच्या नावाची निघाली. कोठावळे यांनी 'महिला व मुलींच्या सुरक्षेकडे आपण कसे पाहता,' असा प्रश्न विचारला. आदित्य म्हणाले, 'मुंबईत आम्ही मुलींसाठी सेल्फ डिफेंस सेंटर सुरू केले. तुम्ही सुरक्षित असलेच पाहिजे. तो तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. मुलांना देखील मुलींबरोबर कसे वागायचे हे शिकवले पाहिजे.' प्रशांत माहोरे यांनी 'प्लास्टिक बंदी योग्य की अयोग्य,' असा प्रश्न विचारला. आदित्य म्हणाले, 'तुम्हीच सांगा या बद्दल तुम्हाला काय वाटते.' यावर माहोरे म्हणाले, 'प्लास्टिक बंदी मला योग्य वाटते.' त्यानंतर ठाकरे म्हणाले, 'तुम्हाला प्लास्टिक बंदी योग्य वाटते म्हणजे प्रश्नच संपला. सिंगल डिस्पोजेबल प्लास्टिकवर आम्ही बंदी घातली आहे. सर्व प्लास्टिकवर बंदी घातलेली नाही. पर्यावरण सुस्थितीत ठेवण्यासाठी हे प्लास्टिक दूर ठेवले पाहिजे.'

'पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम मराठीत होऊ शकतो का, अभ्यासक्रमात सुधारणा केल्या जाऊ शकतात का,' असा सवाल वैष्णवी पाठक यांनी केला. या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, 'आपण शिकतो तो अभ्यासक्रम रोजगार देणारा असला पाहिजे. त्यासाठी अभ्यासक्रमामध्ये देखील सुधारणा झाली पाहिजे. रोजगाराचे स्वरुप बदलत आहे, तसे शिक्षण देखील बदलले पाहिजे. मला बिजगणित कधीच समजले नाही, पण आता राजकारणात आकड्यांचा खेळ खेळावा लागतो.' 'औरंगाबाद पर्यटनाचे शहर म्हणून जगभरात पोचत नाही, त्यासाठी आपण काय कराल,' असा प्रश्न प्रतीक्षा थोरात यांनी विचारला. यावर आदित्य म्हणाले, 'पर्यटनाच्या क्षेत्रात औरंगाबाद जागतिक पातळीवर पोचले पाहिजे हा प्रश्न महत्वाचा आहे. पर्यटनाला अर्थकारणाशी जोडले पाहिजे. याच उद्देशाने मुंबईत नाइट लाईफचा आग्रह मी धरला. मुंबईत रेस्टॉरंटमध्ये पाच लाख लोक काम करतात. रेस्टॉरंट तीन शिफ्टमध्ये चालवले तर तिप्पटीने रोजगार वाढतील. सिद्धी कटारिया, अक्षय खेडकर, दिनेश वंजारे यांच्यासह अन्य युवकांनी देखील आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारले. सागर कुलकर्णी, तुषार आहिरे या दोन खेळाडूंचा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विशिष्ट टोपी देवून गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा उमेदवारांचे अर्ज दाखल

$
0
0

औरंगाबाद : लोकसभेची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून, उमदेवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमदेवारांच्या संख्येतही भर पडत आहे. मंगळवारी (२ एप्रिल) सहा उमदेवारांनी आपले अर्ज दाखल केले. तर चार जणांनी दहा उमेदवारी अर्ज घेतले असून, यामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्यासाठीही अर्ज घेऊन जाण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये प्रदीप कुमार दत्त, मधुकर त्रिभुवन, दीपाली मिसाळ, खाज एजाज महेमुद, अरविंद कांबळे व जियाउल्लाह अकबर शेख यांचा समावेश आहे. औरंगाबाद लोकसभेसाठी २८ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला, त्यानंतर आतापर्यंत ९१ जणांनी १८१ उमेवारी अर्ज घेऊन गेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच घेणाऱ्या सहाय्यक फौजदारास सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दारुच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच घेणारा तत्कालिन सहाय्यक फौजदार अशोक गोविंदराव साळवे व लाच प्रत्यक्षात स्वीकारणारा गणपत बाबुराव वाघ यांना तीन वर्षे सक्तमजुरी व एकूण चार हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी ठोठावली.

याप्रकरणी गणेश बद्रीलाल जैस्वाल (४२, रा. चौका, ता. जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीचा पूर्वी दारूचा व्यवसाय होता व त्याच्याविरुद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात विविध स्वरुपांचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तत्कालिन सहाय्यक फौजदार अशोक गोविंदराव साळवे (५४) यांनी फिर्यादीला पाच हजार रुपयांची लाच मागितली होती; तसेच सहा जानेवारी २०१२ रोजी फुलंब्री न्यायालयासमोर असलेल्या झेरॉक्सच्या दुकानात गणपत बाबुराव वाघ (३७, रा. चौका, ता. जि. औरंगाबाद) याने साळवेच्या सांगण्यावरून फिर्यादीकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्याला रंगेहाथ पकडले होते. फिर्यादीच्या तक्रारीवरून फुलंब्री पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावे‌ळी, सहाय्यक सरकारी वकील अरविंद बागुल यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदवले.

\Bएकूण चार हजारांचा दंड

\Bदोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष पुराव्यांवरून न्यायालयाने साळवे यास लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या सात कलमान्वये तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी, १३ (२) कलमान्वये तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी तर, वाघ यास लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या १२ कलमान्वये तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनीची आत्महत्या; आरोपीस पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात आरोपी स्वप्निल रमेश डिब्बे याला सोमवारी (एक एप्रिल) अटक करून मंगळवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीला गुरुवारपर्यंत (चार एप्रिल) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. राठोड यांनी दिले.

याप्रकरणी आत्महत्या केलेल्या पूजा मच्छिंद्र गायकवाड (१८, रा. अंबिकानगर) या विद्यार्थिनीचे वडील मच्छिंद्र कोंडीराम गायकवाड (५५) यांनी फिर्याद दिली होती. पूजा हिने रविवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी स्वप्निल रमेश डिब्बे (२५, रा. अंबिकानगर) याला अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर केले असता, प्रकरण गंभीर असून, पूजा ही आरोपीला केव्हापासून ओळखत होती व आत्महत्येमागे नेमके कोणते कारण घडले, गुन्ह्यात आणखी कुणाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग आहे का, अटक आरोपीने पूजाला ब्लॅकमेल केले होते का किंवा धमकावले होते का आदी बाबींचा सखोल तपास करणे बाकी असून, आरोपीविरुद्ध सबळ पुरावे हस्तगत करायचे असल्याने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील एस. एल. दास (जोशी) यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिक्षणाधिकाऱ्यांचे हेडमास्तरांस पत्र’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अमेरिकेचे थोर राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी मुख्याध्यपकांना पत्र लिहून त्यांच्या मुलाच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल अवगत केले होते. हे पत्र 'अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र' म्हणून जगप्रसिद्ध आहे. त्याचे पोस्टर अनेक शाळांमध्ये लावलेले असते. नुकत्याच झालेल्या दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्यात मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षकच पुढाकार घेत असल्याचे पाहून

औरंगाबादचे शिक्षणाधिकारी व्यथित झाले आहेत. त्यांनी मुख्याध्यापक, प्राचार्यांना पत्र लिहून परीक्षेतील कामकाजाबद्दल चांगलीच कानउघाडणी केली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षा नुकत्याच संपल्या. या परीक्षेत जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना भेट दिल्यास काय स्थिती होती याबाबत शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण यांनी मुख्याध्यापक, प्राचार्यांना खुले पत्र लिहिले आहे. या पत्राची शिक्षण क्षेत्रात जोरदार चर्चा आहे. कॉपी प्रकरणे कशी समोर आली, संस्थाचालकांचा कॉपी पुरविण्यात कसा उत्साह होता यापासून काय करायला हवे याच्या सूचनाही केल्या आहेत. पत्रातून मुख्याध्यापक, प्राचार्य शिक्षणांना 'शालजोडी' लगावली असून काही ठिकामी चिमटे काढले आहेत. हे पत्र म्हणजे एकूणच शिक्षण व्यवस्थेतील गैरकारभार चव्हाट्यावर मांडणारे आहे.

विद्यार्थी अहोरात्र आणि कठोर मेहनत करून परीक्षेला बसले होते, अशी जाणीव करून देत त्यांनी व्यवस्थेला खडे बोल सुनावले आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण येथील विद्यार्थी ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रावर प्रवेश घेत असल्याकडे लक्ष वेधले आहे. यावर त्यांनी थेट दक्षिण अफ्रिकेतील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरील एका संदेशाचा उल्लेख केला आहे. 'एखाद्या देशाला नष्ट करायचे असेल, तर त्यासाठी 'अॅटम बॉम्ब' किंवा लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागावी लागत नाहीत. केवळ शिक्षणाचा दर्जा खालावण्याची व्यवस्था केली आणि परीक्षेत कॉपी करण्याची मोकळीक दिली तरी हे शक्य होते,' या संदेशाचा त्यांनी पत्रात उल्लेख केला आहे.

\Bपत्रात असे आहे म्हटले...\B

काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांपेक्षा संस्थाचालक, संस्था प्रतिनिधी, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षक हेच कॉपी पुरविण्यासाठी अग्रेसर पाहून मन विष्ण्ण झाले. कॉपी पुरविण्यासाठी संस्थाचालक आणि शिक्षकांचा उत्साह वाखणण्यासारखा दिसून आला. जोपर्यंत कॉपी हा प्रकार शिक्षकांच्या डोक्यातून जाणार नाही तोपर्यंत कॉपीमुक्त परीक्षा हे एक स्वप्न म्हणूनच राहणार आहे. दहावीच्या गुणांवर कुठल्याही प्रकारची प्रवेश परीक्षा नाही, हे माहीत असूनही शिक्षक कॉप्या पुरवण्यात का अग्रेसर असतात याचे उत्तर मुळात जाऊन शोधणे गरजेचे आहे. ६० ते ६५ टक्के गुणांची ऐपत असलेल्या विद्यार्थ्याला ८५ ते ९० गुणांपर्यंत नेऊन ठेवून कोणता पुरुषार्थ आपली मंडळी साध्य करणार आहे. कृतीपत्रिका असल्यामुळे कॉपी कमी होईल, अशी अपेक्षा होती. रेडीमेड पुस्तकातून कॉपी करणे शक्य नसल्यामुळे आता परीक्षेच्या प्रत्येक दालनातून 'सामूहिक डिक्टेशन' करण्यात आल्याचे दिसून येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीने २५ लाख भरावेत; पालिकेने सील

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीने मोकळी जागा, संकुलाचा मालमत्ता कर न भरल्यामुळे महापालिकेने प्रशासकीय इमारतीला सील लावले होते. याविरोधात कृषी उत्पन्न बाजार समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. या याचिकेवर मंगळवारी (दोन एप्रिल) सुनावणी होऊन खंडपीठाने थकबाकीपोटी बाजार समितीने २५ लाख रुपये भरावेत, असे निर्देश दिले. त्यानुसार, बाजार समितीने 'आरटीजीएस'द्वारे रक्कम भरली. पुन्हा २५ लाख रुपये १५ दिवसांत भरण्यात यावेत, असेही निर्देश न्या. संजय गंगापूरवाला व न्या. अरुण ढवळे यांनी दिले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन कोटी ७९ लाख रुपयांचा मालमत्ता कर भरला थकविल्यामुळे महापालिकेने प्रशासकीय इमारतीला सील लावले. या कार्यवाहीला बाजार समितीने दिवाणी अर्ज दाखल करून आव्हान दिले. २०१६ मध्ये देखील पालिकेने अशीच कार्यवाही केली होती, त्यावेळी समितीने दाखल केलेली याचिका प्रलंबित आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान बाजार समितीने २५ लाख रुपये पालिकेकडे मालमत्ता करापोटी जमा करण्याचे अंतरिम आदेश दिले होते. बाजार समितीच्या विरोधात कारवाई करू नये, असे आदेशात म्हटले होते. असे आदेश असताना देखील पालिकेने ३० मार्च रोजी बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीला सील ठोकले. वास्तविक पाहता बाजार समितीने ८५० गाळे भाडेतत्वावर (लीवर) दिले आहेत. बाजार संकुलात व्यापारी व्यवसाय करतात, ते मालमत्ता कर भरतात. समितीच्या आवारात शेतकरी व्यवसाय करत असेल, तर त्याच्याकडून बाजार समिती कोणत्याही प्रकारचे शुल्क वसूल करीत नाही. व्यापाऱ्ंयाकडून मिळालेल्या शुल्कातून बाजार समितीमध्ये मुलभूत सुविधा पुरविते, असे दिवाणी अर्जात म्हटले होते. या दिवाणी अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. सुनावणीनंतर सील काढण्याचे आदेश खंडपीठाने दिले. समितीतर्फे सिद्धेश्वर ठोंबरे यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चक्क २० टक्के पाणी कपातीचा टंचाईवर उतारा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

टंचाईवर उपाय शोधण्यासाठी शहरातील पाणीपुरवठ्यात चक्क २० टक्के कपात करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारपासून काही भागांमध्ये याची अंमलबजावणी झाल्याचे समजते. सोबतच समान पाणी वाटपाच्या नावाखाली संपूर्ण शहरात पाचदिवसांआड पाणीपुरवठा करता येतो का, याबद्दल देखील गांभीर्याने विचार केला जात आहे.

औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. सिडको - हडकोतले नागरिक सहासहा दिवस पाणीपुरवठा होत नसल्यामुळे आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सोमवारी गुलमोहर कॉलनीतील नागरिकांनी सिडको एन ५ येथील जलकुंभावर जावून आंदोलन केले. रास्तारोको करून टायर जाळले. हे आंदोलन हिंसक होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे महापौर नंदकुमार घोडेलेंनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून समजूत काढली. सिडको एन पाच येथील जलकुंभावर आंबेडकरनगरमधील नागरिकांनी टँकर चालकांशी हुज्जत घालून धक्काबुक्की केली. पावसाळा सुरू होण्यासाठी तीन महिने आहेत. त्यामुळे नागरिकांचे आंदोलन शमविण्यासाठी महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. परस्पर समन्वय ठेवून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवा, नागरिकांना त्रास होऊ देऊ नका, अशी सूचना त्यांनी केली. या बैठकीनंतर सायंकाळी शहराच होणाऱ्या सध्याच्या पाणीपुरवठ्यात वीस टक्के कपात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. तशा आशयाचे आदेश सर्व संबंधितांना दिले आहेत. पाणी कपातीची कार्यवाही लगेचच मंगळवारपासून सुरू केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

\Bकिती, काय भरायचे!

\Bसध्या शहराच्या काही भागात चौथ्या दिवशी पाणी पुरवठा होतो. काही भागात पाचव्या किंवा सहाव्या दिवशी पाणी पुरवठा होतो. चौथ्या, पाचव्या किंवा सहाव्या दिवशी येणारे पाणी केवळ ४५ मिनीटे येते. त्यातही वीस टक्के कपात झाल्यास नागरिकांनी पाणी कसे आणि किती भरायचे असा प्रश्न निर्माण होणार आहे. दरम्यान, वीस टक्के पाणी कपात न करता सर्व भागांना समान पाणी वाटप करण्याच्या दृष्टीने संपूर्ण शहरातच पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करता येतो का, याबद्दल देखील उच्च पातळीवरुन गांभीर्याने विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वीस टक्के पाणी कपातीचे थेट आदेश काढलेले नाहीत. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जलकुंभांवर उपस्थित रहावे. जलकुंभातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार कार्यक्षेत्रातील पाणी वाटपाचे नियोजन करावे असे आदेश मी काढले आहेत.

- हेमंत कोल्हे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मराठवाडा संपर्क क्रांती’चा लूज टाइम एक तासांने कमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नांदेड ते दिल्ली मराठवाडा संपर्क क्रांती एक्स्प्रेसचा (औरंगाबाद मार्गे) लूज टाइम कमी करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ही रेल्वे नांदेड येथून नऊ एप्रिल रोजी सकाळी आठ ऐवजी नऊ वाजता निघणार असून ती औरंगाबादला दुपारी एक वाजून १० मिनिटाला येणार आहे.

ही रेल्वे आठवड्यातून एकदा धावते. हा रेल्वेचा औरंगाबाद ते मनमाड दरम्यान, तीन तासांचा लूज टाइम ठेवण्यात आला होता. त्याबद्दल 'मटा'ने वृत्त प्रकाशित केले होते. लूज टाइम कमी करण्याची मागणी मराठवाड्यातील रेल्वे संघटनेकडून करण्यात येत होती. रेल्वेने या एक्स्प्रेसचे नवीन वेळापत्रक जारी केले आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार, रेल्वे नांदेड येथून आठ वाजता निघून १२ वाजून १० मिनिटाला औरंगाबादला येत होती. औरंगाबादहून १२ वाजून २० मिनिटाला निघून दुपारी तीन वाजून २० मिनिटांना मनमाड येथे पोहचत होती. पूर्वी औरंगाबाद ते मनमाड दरम्यान तीन तासांचा वेळे लागत होता. नवीन वेळापत्रकानुसार, दोन तासांत ती मनमाडला पोहोचणार आहे. मराठवाडा संपर्क क्रांती एक्स्प्रेसचा मनमाड ते निझामोद्दीन (दिल्ली) दरम्यानच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला नाही, असे रेल्वे विभागाकडून कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महागाई, जीएसटी, दुष्काळाचा वाहन उद्योगास फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद प्रादेशिक वाहतू कार्यालयांतर्गत (आरटीओ) असलेल्या तीन जिल्ह्यांत गेल्या आर्थि वर्षाच्या तुलनेत यंदा ११ हजार वाहनांची विक्री कमी झाली आहे. विक्री घटल्यामुळे आरटीओ कार्यालयाच्या महसूलचे उद्दिष्ट २७ कोटींनी घसरले आहे. जीएसटी, महागाई आणि दुष्काळामुळे वाहन विक्री घटल्याचे वाहन विक्रेते सांगत आहेत.

येथील आरटीओ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात या तीन जिल्ह्यांत ९० हजार ८८७ नवीन वाहने विकली गेली. २०१७-१८ मध्ये एक लाख तीन हजार ६६९ वाहनांची नोंद झाली. मात्र २०१८-१९ या आर्थिक वर्षात ९१ हजार ८४७ वाहनांची विक्री झाली आहे. २०१७-१८च्या तुलनेत २०१८-१९ मध्ये वाहनांच्या विक्रीत ११ हजार ८२२ ने घट झाली आहे.

२०१७-१८ मध्ये आरटीओ कार्यालयाला १८९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. वाहन विक्री वाढल्याने २३३ कोटी रुपयांची वसुली करत उद्दिष्टापेक्षा ४४ कोटी रुपये जादा महसूल जमा करण्यात आला. २०१८-१९ या आर्थिक वर्षांत २२९ कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यंदा वाहन विक्री कमी झाल्यामुळे २७ कोटी रुपये कमी वसुली झाल्याची माहिती समोर आली आहे.

……

गेल्या वर्षी उद्दिष्ट साध्य झाले होते. यंदा वाहन विक्री घटल्याचा परिणाम महसुलावर झाला आहे. विक्री घटल्याचे कारण वाहन विक्रेते सांगू शकतात. महसुलाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध मोहिमा राबविण्यात आल्या. यासाठी सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सामूहिक प्रयत्न केले.

- सतीश सदामते, आरटीओ, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

एका अविवाहित तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली. ही घटना तालुक्यातील वडोदचाथा येथे मंगळवारी (दोन एप्रिल) सकाळी आठच्या सुमारास उघडीस आली. राजू नारायण चाथे (२४, रा. वडोदचाथा) असे विहिरीत मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचे नाव आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी की, मृत तरुणाचे वडील भुसार मालाचे व्यापारी आहे. गावाशेजारी रस्त्यावर त्यांचे गोदाम आहे. दररोज रात्री मृत तरुण व त्याचा लहान भाऊ गोदामामध्ये झोपायला जात होते. नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री दोघे भाऊ झोपायला गेले. मंगळवारी सकाळी उठल्यावर राजू त्याच्या भावाला आंथरूणावर दिसला नाही. लवकर उठून तो घरी गेला असावा, असे त्याला वाटले. म्हणून त्याचा भाऊ घरी परतला, परंतु राजू घरी आलेला नाही, असे त्याला आई-वडिलांनी सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला.

याचदरम्यान वडोदचाथा शिवारात गट क्रमाकं ४८७मध्ये एका शेतकऱ्याचा मुलगा सकाळी जनावरांना चारा-पाणी करण्यासाठी शेतात गेला असता त्याला विहिरीत राजूचा मृतदेह दिसून आला. त्यांनी ही माहिती तत्काळ गावातील नागरिकांना दिली. नागरिकांना धाव घेत मृतदेह बाहेर काढला व सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणला. तेथील डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार विठ्ठल चव्हाण करीत आहेत. दरम्यान, मृत तरुणावर मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

\Bखून की आत्यहत्या?\B

मृत तरुणाचे वडील भुसार मालाचे व्यापारी असून, राजू मनमिळाऊ स्वभाचा होता. त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याचे कळताच गावात शोककळा पसरली. त्याच्या अकाली मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, त्याच्या मृत्यूचे कारण मात्र समजू शकले नाही. त्याचा कुणी घात केला? की त्याने आत्महत्या केली? या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिनी घाटीत रुग्णांना जेवण

$
0
0

औरंगाबाद : मिनी घाटी अर्थात जिल्हा सामान्य रुग्णालयात आता दाखल करण्यात येणाऱ्या सर्वच रुग्णांना दोन वेळचे जेवण, नाष्टा व दोन वेळचा चहा दिला जाणार आहे. रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या पाकगृहामार्फत भोजनाची सोय केली जाणार आहे. या पाकगृह विभागाचे मंगळवारी उद्घाटन झाले. या वेळी आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर वाहतूक शाखा आता कॅशलेस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर वाहतूक शाखेने मंगळवारपासून कॅशलेस व्यवहाराकडे पाऊल टाकले आहे. वाहतूक नियम तोडणांना मंडळींना आता ई-चालान यंत्रणेद्वारे दंड आकारण्यात येत आहे. पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांनी या उपक्रमाची मंगळवारी (दोन एप्रिल) सकाळी सुरुवात केली. पहिल्याच दिवशी ई-चालान यंत्राचा वापर करत ६२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

शासनाने आता कॅशलेस व्यवहराला प्राधान्य दिले आहे. वाहतूक पोलिसांनी देखील दंडाची रक्कम आता ई-चालान पद्धतीने भरून घ्यावेत, असे आदेश पोलिस महासंचालक कार्यालयाने दिले आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकाकडून दंडाची रक्कम ई-चालान पद्धतीने भरून घेण्यात येणार आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्ड स्वॅप करून दंड भरून घेण्यात येत आहे. नवीन आर्थीक वर्षाच्या पहिल्या आठवड्यापासून हा उपक्रम राबवण्याच्या सूचना महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, मंगळवारी सकाळी पोलिस आयुक्तालयात या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी ज्ञानोबा मुंडे, शहर वाहतूक शाखेचे भारत काकडे, अशोक मुदिराज यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

\Bकाय आहे ई-चालान\B

कॅशलेस व्यवहारासाठी वाहतूक पोलिस ई-चालान या यंत्राचा वापर करत आहेत. नियम तोडणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी पकडल्यानंतर ई-चालान यंत्रात वाहनांचा क्रमांक, वाहन चालकाचे लायसन्स क्रमांक, संपूर्ण नाव, पत्ता, वाहतूक नियम तोडल्याचे ठिकाण, तारीख आदी माहिती टाकण्यात येणार आहे. ही माहिती ई-चालानच्या सॉफ्टवेअरमध्ये कायमस्वरुपी साठवण्यात येणार येणार आहे. त्यामुळे वाहनचालकाने यापूर्वी किती वेळा वाहतूक नियमचभंग केला हे तत्काळ समजणार आहे.

१००

उपलब्ध ई-चालान यंत्र

२५ शहर विभाग १

२५ सिडको विभाग

२० शहर विभाग २

१५ छावणी, वाळूज

वाहतूक नियमाचा भंग केल्यास वाहनधारकांना पूर्वी जागेवर पावती किंवा सेफसिटीच्या प्रोजेक्टमध्ये घरपोच पावती देण्यात येत होती. ई-चालान पद्धतीत त्यांना डेबिट, क्रेडिट कार्ड स्वॅप करून जागेवर पावती भरता येणार आहे. बँकेत किंवा पोस्टात दंड भरण्याची गरज नाही. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे.

-डॉ. दीपाली धाटे घाडगे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images