Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा खंडपीठात रद्द

$
0
0

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील वाघाडी येथील पोलिस पाटील किशोर घटे यांच्यासह तीन आरोपींविरुद्ध दाखल अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. मंगेश एस. पाटील यांनी रद्द केला. सिंधुबाई दादासाहेब कांबळे यांनी चार आरोपींविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, तिला शासकीय योजनेतंर्गत गावात घरकुल मंजूर करण्यात आले होते. जागा नसल्यामुळे ती गायरान जमिनीवर घर बांधण्यासाठी जागा तयार करीत होती. ११ ऑक्टोबर २०१८ रोजी आरोपींनी तिला मारहाण केली. तसेच संध्याकाळी जातीवाचक शिवीगाळ केली. गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपींनी खंडपीठात धाव घेतली होती. सदर गुन्हा पाच दिवस उशीराने दाखल केला असून, फिर्यादी मुलीने जबाबात आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचे कोठेही म्हटलेले नाही, असा युक्तीवाद आरोपीचे वकील सुदर्शन साळुंके यांनी केला. आरोपींविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणे हा कायद्याचा दुरुपयोग असल्याचे मत खंडपीठाने नोंदविले. सुनावणी अंती खंडपीठाने सदर गुन्हा रद्द केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खैरेंच्या प्रचारासाठी आज बानगुडे यांच्या सभा

$
0
0

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या जाहीर सभांचे मंगळवारी (१६ एप्रिल) आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी, सायंकाळी पाच वाजता बजाजनगर आणि सायंकाळी सात वाजता सातारा परिसरात जाहीर सभा होणार आहे. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, चंद्रकांत खैरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पीड ब्रेकरवर आदळून जेष्ठ नागरिकाचा मृत्यू

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्पीड ब्रेकरवर दुचाकी आदळल्याने खाली पडून गंभीर जखमी झालेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. शनिवारी बन्सिलालनगर भागातील पटवर्धन हॉस्पिटलजवळ हा प्रकार घडला होता. सुदाम शंकर भिताडे (वय ८५, रा. इटखेडा) असे मृताचे नाव आहे.

भिताडे शनिवारी दुपारी बन्सिलालनगर भागातून दुचाकीवर जात होते. यावेळी पटवर्धन हॉस्पिटलसमोरील स्पीड ब्रेकरवर त्यांची दुचाकी आदळली. यामध्ये खाली पडून भिताडे यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना शिवाजी भिताडे यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान रविवारी भिताडे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, जमादार जाधव तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात ३१ टक्के पोलचिट वाटप पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीची प्रशासनाने जोरदार तयारी सुरू करण्यात आली असून, शुक्रवारपासून (१२ एप्रिल) घरोघरी पोलचिट वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. चार दिवसांमध्ये जिल्हाभरात तब्बल ३१ टक्के मतदारांपर्यंत पोलचिट प्रशासनाकडून 'बीएलओं'मार्फत पोचवण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून १८ ते १९ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सर्व मतदारांपर्यंत पोलचिट वाटप करण्यात येणार आहेत.

पोलचिट वाटप करण्यासाठी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) नियुक्ती करण्यात आली असून, शुक्रवारपासून घरोघरी पोलचिटचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये २८ लाख १५ हजार २९९ मतदारसंख्या असून, यातील औरंगाबाद मतदारसंघामध्ये १८ लाख ८४ हजार ८६५ मतदारांची संख्या आहे. मतदारयादीच्या भाग क्रमांकानुसार ३०६७ 'बीएलओं'ची नेमणूक करण्यात आली आहे. २०१४मधील लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारांना पोलचिटपासून वंचित राहिले होते. यंदा असा प्रकार होऊ नये म्हणून प्रत्येक मतदारांपर्यंत पोलचिट पोचवण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

९८ टक्के मतदारांकडे ओळखपत्र

जिल्ह्यातील सुमारे ९८ टक्के मतदारांकडे ओळखपत्रे आहेत. मतदान ओळखपत्र दुरुस्तीसाठी किंवा नवीन तयार करण्यासाठी दिलेले आहेत, यांचे वाटप सुरू असल्याचे निवडणूक विभागातील सुत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसची ‘गरिबी हटाव’ची घोषणा म्हणजे पुन्हा जुमला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पणजोबा, आजीपासून 'गरिबी हटाव'ची घोषणा करणाऱ्यांनी पुन्हा 'गरिबी हटाव'ची घोषणा केली. त्यांना लाज कशी वाटत नाही, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. गरिबीविरोधात खरी लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी लढत आहेत. त्यासाठी विविध योजना राबविण्याचे काम हाती घेतले आहे तर, काँग्रेसने गेल्या ६० वर्षांत केवळ त्यांच्या चेलचपाट्यांचीच गरिबी दूर करण्याचा प्रयत्न, असा आरोपही त्यांनी केला. तुम्ही खासदार द्या, आम्ही विकास देऊ, असे म्हणत त्यांनी पाण्यासह अन्य प्रश्नांची सोडवणूक करू, असे ग्वाही यावेळी दिली.

भाजप, शिवसेना युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी गजानन महाराज मंदिर चौकात सोमवारी सायंकाळी आयोजित सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन, आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, संजय शिरसाट, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, भाजप प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, रिपाइंचे बाबुराव कमद, महापौर नंदकुमार घोडले, जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर, राजू वैद्य, दिलीप थोरात आदी उपस्थित होते.

फडणवीस यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवातच देश सुरक्षेच्या मुद्यावरून करताना काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेसने ५५ वर्षे भ्रष्ट राजवट दिली तर, गेल्या पाच वर्षात मोदी यांनी देशात परिवर्तन आणले. ही निवडणूक 'भारत माता की जय' म्हणणारे विरुद्ध त्याच्या विरोधात भूमिका घेणारे यांच्यात आहे. काँग्रेस राजवटीत मुंबईत बाँब स्फोट झाले, पण त्यावेळी पाकला आव्हान देण्याची हिंमत सरकारमध्ये नव्हती. आमच्या सरकारच्या काळात आम्ही कठोर भूमिका घेतली. त्यामुळे हे प्रकार थांबले आहेत. काँग्रेसचे सरकार कमकुवत होते. आता जगात देशाची मान उंचावली आहे. अतिरेक्यांना घरात घुसून मारण्याची क्षमता आपण निर्माण केली आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. बालाकोटचे पुरावे मागणाऱ्या काँग्रेसने आधी सांगितले असते तर, एखाद्या काँग्रेस नेत्याला रॉकेटला बांधूनच पाठविले असते, असा टोलाही त्यांनी मारला.

काँग्रेसने ६० वर्षांत त्यांच्या नेत्यांची चेलचपाट्यांचीच गरिबी दूर करण्याचा प्रयत्न केलेला असतानाच पुन्हा 'गरिबी हटाव'ची घोषणा करताना त्यांना लाज कशी वाट नाही, अशी टीका करताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराला दिलेले विशेष अधिकार, देशद्रोहबाबतचे कलम रद्द हटविण्याबाबत काँग्रेसने जाहीरनाम्यात केलेल्या उल्लेखावरही मुख्यमंत्र्यांनी टीका केली. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच काही कार्यकर्त्यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे पोस्टर झळकावले, त्यावर मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांच्यामुळेच भाजपचा इथपर्यंत विस्तार झाल्याचे नमूद केले.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी, ही निवडणूक देशभक्त आणि देशद्रोहचे नारे देणाऱ्यामधील असल्याचे सांगितले. खासदार चंद्रकांत खैरे यांनी राजाबाजारमधील दंगलीला 'एमआयएम'ला जबाबदार असल्याचा आरोप करून अशा लोकांविरोधात ही लढाई असल्याचे सांगितले. हर्षवर्धन जाधव यांचे नाव न घेता त्यांनी शिवसेना सोडून गेलेला तो आता मोदींना पाठिंबा देतो, असे सांगत अफवा पसरविण्याचे काम करत असल्याची टीका केली. समांतर योजना टीकाटिपणीमुळे अडकली, असे सांगतानाच लवकरच पाणी प्रश्न सुटले, असे त्यांनी नमूद केले.

शहरासाठी निधी देऊ : मुख्यमंत्री

केंद्र आणि राज्य सरकारतर्फे केल्या जात असलेल्या विकास कामांची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. 'तुम्ही खासदार द्या आम्ही विकास देऊ,' असे म्हणत शहरातील पाण्यासह अन्य प्रश्न सोडविण्यासाठी पाहिजे तेवढा निधी देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिना उलटूनही बेपत्ता डांबेचा शोध लागेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पॉवरलूम परिसरातील भूमीगत गटार योजनेच्या ड्रेनेज चेंबरमध्ये पडल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला १८ एप्रिल रोजी महिना होईल. या घटनेत बेपत्ता झालेल्या रामेश्वर डांबे यांचा शोध अजूनही लागलेला नाही. त्यामुळे डांबे हे ड्रेनेज चेंबरमध्येच पडून बेपत्ता झाले का, असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे.

चिकलठाणा परिसरातील सुखना नदीच्या पात्रातून भूमिगत गटार योजनेचे ड्रेनेजचे चेंबर गेले आहे. या भागातील शेतकरी या चेंबरमध्ये पाण्याच्या मोटारी सोडून येथील पाणी शेतीसाठी वापरतात. १८ मार्च रोजी येथील विद्युत मोटारीमध्ये अडकलेला गाळ काढण्यासाठी येथील शेतकरी चेंबरमध्ये उतरले. यावेळी गॅसने गुदमरल्यामुळे दोघांचा जागीच तर, एकाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी रामेश्वर डांबे हा तरुण देखील चेंबरमध्ये उतरला होता. या चेंबरमधून सहा जणांना बाहेर काढण्यात आले होते. मात्र, डांबे याचा शोध लागला नव्हता. डांबेचा अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच धुळे येथून आलेल्या विशेष पथकाने युद्धपातळीवर शोध घेतला. मात्र, त्यांचा मृतदेह किंवा कोणतेही अवशेष पथकाला ड्रेनेजलाइनच्या चेंबरमध्ये आढळले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध गॅस सिलेंडर बाळगणारा गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवैध गॅस सिलेंडर विक्रीसाठी बाळगणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सोमवारी मोतीकारंजा भागात ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून ४१ सिलेंडर जप्त करण्यात आले असून, क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोतीकारंजा अंगुरीबाग भागात एक व्यक्ती अवैधरित्या गॅस सिलेंडरचा साठा विक्रीसाठी बाळगत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पथकाने आरोपीच्या घरी छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी शेख हाफीज शेख हबीब (वय ३९, रा. मोतीकारंजा) याच्या ताब्यातून गॅसने भरलेले ४१ सिलेंडर जप्त करण्यात आले. आरोपीचा कुकर, गॅस रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. टी.व्ही. सेंटर भागातील मराठवाडा सेल्स स्वीस सेंटर या दुकानात हे सिलेंडर विक्रीसाठी ठेवण्यात येणार होते. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे - घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नंदकुमार भंडारे, संतोष सोनवणे, बापूराव बावस्कर, लाला पठाण, नंदलाल चव्हाण, योगेश गुप्ता, रितेश जाधव आणि सरीता भोपळे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी आणखी एक दिवस उशिराने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी येथील पंपहाऊस आणि फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्र या दोन्हीही ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे रविवारी रात्री औरंगाबाद शहराचा पाणी पुरवठा बंद झाला होता. फारोळा येथील वीज पुरवठ्याच्या दुरुस्तीचे काम रात्री दोन वाजता संपल्यावर पाणी पुरवठी सुरू करण्यात आला. त्यामुळे शहराच्या काही भागातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसांनी पुढे सरकेल, असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

वादळी वाऱ्यामुळे रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जायकवाडी पंपहाऊसचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर लगेचच फारोळा जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठाही खंडित झाला. जायकवाडी येथील दुरुस्तीचे काम रात्री नऊ वाजेच्या सुमारास संपले तर फारोळा येथील दुरुस्तीचे काम रात्री दोन वाजेपर्यंत सुरू होते. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर रात्री अडीच वाजेच्या सुमारास पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक सात ते आठ तासांनी पुढे ढकलले गेले. काही भागात तर एक दिवस उशीराने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिका आणि महावितरणचे अधिकारी-कर्मचारी झटत होते.

शहरात पाणी पुरवठ्याबद्दल ओरड सुरू असताना जायकवाडी व फारोळा येथील वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्याचे दिवस लक्षात घेता महावितरण कंपनीने देखभाल दुरुस्तीच्या कामाचे नियोजन सुरुवातीपासूनच केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बंधाऱ्याच्या गोण्या वाहून गेल्या

जायकवाडी येथील पंपहाऊसच्या उदभव विहिरीतील पाणी पातळी कायम रहावी म्हणून उदभव विहिरीच्या तोंडाशी वाळुने भरलेल्या गोण्यांनी बंधारा तयार करण्यात आला होता. या बंधऱ्याला मधोमध भगदाड पडल्यामुळे काही गोण्या वाहून गेल्या. रविवारी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून पुन्हा बंधारा तयार केला आहे. बंधाऱ्यामुळे उदभव विहिरीतील पाण्याची पातळी कायम राखण्यास मदत होत आहे, अशी माहिती पंपहाऊसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणी पुरवठ्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डोळ्यात तेल घालून पाणी पुरवठ्याच्या कामावर लक्ष द्या, अशी सूचना महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सोमवारी अधिकारी - कर्मचाऱ्यांना केली. शहरातील पाणी पुरवठ्याच्या संदर्भात त्यांनी आढावा बैठक घेतली.

शहर व सिडको - हडको भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला आंदोलनांना सामोरे जावे लागत आहे. एमआयडीसीशी संपर्क साधून पाणी पुरवठ्याच्या समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न गेल्या आठवड्यात करण्यात आला. महापालिकेचे टँकर भरण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे एमआयडीसीने मान्य केले व टँकर्स भरण्यासाठी सिडको एन १ येथे जागाही उपलब्ध करून दिली. महापालिकेने सिडको एन ७ येथील जलकुंभावरून भरले जाणारे काही टँकर एमआयडीसीच्या जागेवर हलवले. त्यामुळे सिडको भागातील पाण्याची ओरड काही प्रमाणात कमी झाली. त्यातच रविवारी जायकवाडी येथील पंपहाऊसचा आणि फारोळा येथील जलशुध्दीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे पुन्हा पाणी पुरवठ्यात विस्कळीतपणा निर्माण झाला. शहराचा पाणी पुरवठा सध्या सुरु झालेला असला तरी एकूणच पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी सोमवारी अधिकारी - कर्मचाऱ्यांची बैठक घेतली.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाणी पुरवठ्याचे काम डोळ्यात तेल घालून करण्याची सूचना आयुक्तांनी केली. योग्य प्रकारे नियोजन करा. आयुक्तांनी प्रामुख्याने टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचे योग्यप्रकारे नियोजन करण्याचे आदेश दिले. कार्यकारी अभियंता व उपअभियंत्यांना याबाबत जबाबदाऱ्या देखील त्यांनी वाटून दिल्या. टँकर फिलिंग पॉइंटवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येईल, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. टँकर फिलिंग पॉइंटवर हाणामारीचे, भांडणाचे प्रसंग घडत आहेत, ते टाळण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याचे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सांगितले. पोलिस बंदोबस्तासाठी पोलिस आयुक्तांना विनंती करणार असल्याचे देखील आयुक्तांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत सांगितले.

पाण्याचा अपव्यय, चार हजारांचा दंड

पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांना महापालिकेच्या पथकाने सोमवारी कैलासनगर भागात कारवाई करून ४१०० रुपये वसूल केले. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पालिका आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी आदेश काढले. दंडात्मक कारवाई करण्यासाठी झोन कार्यालय निहाय पथकांची स्थापना केली आहे. या पथकांच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. पाणी पुरवठा ज्या वेळेत होतो त्या वेळेत पथकातील कर्मचारी त्या त्या भागात गस्त घालतात आणि पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांना दंड करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवसांत दोन शिवशाही बसला अपघात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

दोन शिवशाही बसला दोन दिवसात अपघात झाले आहेत. औरंगाबाद पुणे मार्गावर धावणाऱ्या या बस होत्या. या अपघातांमध्ये सहा जण जखमी झाले असून चार जणांची प्रकृती गंभीर आहे.

मुंबई ते औरंगाबाद पुणे मार्गाने येणाऱ्या शिवशाही बस (क्रमांक एमएच १८ बीजी १३६०) अपघात पुण्याजवळील रांजणगाव येथे १५ एप्रिल रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडला. सदर गाडी ही भाडे तत्त्वावरील होती. बसच्या चालकाचे नाव पारवे असे आहे. चालकाने एसटीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार पहाटे चार वाजेच्या दरम्यान रांजणगाव जवळ असताना एक जेसीबी रस्त्यात उभा होता. जेसीबीला शिवशाही बस धडकू नये. यासाठी शिवशाही चालकने बस रस्त्याच्या खाली उतरविली. ही बस रस्त्याच्या खाली उतारावर उतरविल्यामुळे या बसमध्ये असलेल्या प्रवाशांपैकी चार जणांना गंभीर मार लागला आहे. सदर घटनेची माहिती औरंगाबाद आगार क्रमांक एक आणि पुण्याच्या आगाराला देण्यात आली आहे.

त्याआधी १४ एप्रिल रोजीही दुपारी चार वाजेच्या दरम्यान औरंगाबाद ते पुणे जाणाऱ्या शिवशाही बस (क्रमांक एमएच ०४ जे.के. १२६८) चा अपघात झाला ही बसही बस भाडे तत्वावरील होती. ही बस अशोक रखमाजी कोळशे नावाचा चालक चालवित होता. या प्रकरणात एसटी विभागाने दिलेल्या माहितीनुसार गंगापूर जवळील भेंडाळा गावाच्या चौफलीवर डाव्या बाजुला साईड पट्ट्यावर उभ्या असलेल्या एका चार चाकी वाहनाला ही शिवशाहीने धडक दिली. उभ्या असलेल्या चार चाकी वाहनांला धक्का दिल्यामुळे ही गाडी एका हॉटेल मध्ये घुसली. ही गाडी हॉटेलमध्ये घुसल्याने तेथे बसलेले दोन जण जखमी झाले. यात वसंत शंकर शिरसाठ (४०) यांना जास्त मार लागला असून सोनू नाना शिंदे (२५) हे जखमी झाले आहेत. या बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, यामुळे शिवशाही बसचे ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

……

प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष

शिवशाही बसचे अपघात रोखण्यासाठी या बसच्या चालकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रशिक्षणाशिवाय बस चालकांना शिवशाही बस देऊ नये हा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र, भाडेतत्वावरील बस चालविणारे अनेक चालक हे नवीन असतात. अशाच चालकांकडून हे अपघात होत असल्याने या प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र समोर येत आहे.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याच्या बाटलीसाठी हॉटेलचालकाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाण्याची बाटली दिली नसल्याचा राग मनात धरून हॉटेलचालकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. सोमवारी सायंकाळी गारखेडा भागातील रिलायन्स मॉलजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन संशयित आरोपींना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे.

बंडू शेळके (वय ३२ रा. भवानीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शेळके यांची रिलायन्स मॉलजवळ चहाची टपरी आहे. सोमवारी सायंकाळी रवी तायडे आणि अभिजित चव्हाण (दोघे रा. गजानननगर) हे दोन मद्यपी त्यांच्या टपरीवर आले होते. या दोघांनी पाण्याची बाटली शेळके यांना मागितली. शेळके यांनी नकार दिल्याने या दोघांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शेळके यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर एपीआय घनश्याम सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयित आरोपी तायडे आणि चव्हाणचा शोध घेत त्यांना तत्काळ अटक करण्यात आली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत पुंडलीकनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्राच्या ‘डीएनए’मध्ये कॉँग्रेस: राहुल गांधी

$
0
0

नांदेडमधील सभेत खासदार राहुल गांधी यांचे प्रतिपादन

नांदेड : महाराष्ट्राच्या डीएनएमध्येच काँग्रेस आहे. आगामी सरकार एका व्यक्तीचे नव्हे तर, सर्व भारतीयांचे असेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी येथे केले. नांदेड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अशोक चव्हाण, हिंगोलीचे सुभाष वानखेडे व लातूरचे मच्छिंद्र कामत यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते.

नवा मोंढा मैदानावर झालेल्या या सभेस माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, सुरेश वडेट्टीवार, राजेंद्र दर्डा, हर्षवर्धन पाटील, बसवराज पाटील, मुकूल वासनिक, मधुसूदन मिस्त्री, आमदार डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर व्यासपीठावर होते. गांधी यांनी ४० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, निवडणुकीपूर्वी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणा करण्यात आली. १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. भ्रष्टाचारमुक्त भारताची घोषणा करण्यात आली परंतु, या सरकारने जनतेला उल्लू बनविले. नोटबंदी, गब्बरसिंग टॅक्सने भारताची अर्थव्यवस्था ठप्प झाली.

काँग्रेसची सत्ता आली तर, तरूणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन वर्षे कोणत्याही शासकीय खात्याची परवानगी घ्यावी लागणार नाही. न्याय योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली जाईल. २२ लाख शासकीय रिक्त पदांची भरती त्वरित केली जाईल. एक वर्षांत २२ लाख नोकऱ्या देऊ, शिवाय अनुसूचित जाती जमातीच्या दहा लाख तरुणांचा अनुशेष भरून काढला जाईल. सर्व चौकीदार चांगले आहेत, पण एक बेईमान निघाला. अंबानीसारख्यांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करताना शेतकऱ्यांची मात्र उपेक्षा केली जाते. काँग्रेसचे सरकार आले तर, कर्ज न फेडणाऱ्या एकाही शेतकऱ्याला कारागृहात जाण्याची वेळ येणार नाही. अंबानींची तिजोरी महाराष्ट्राच्या तरुणांसाठी खुली करू असे आश्‍वासन राहुल यांनी दिले.

चव्हाण म्हणाले की, मराठवाड्याची उपेक्षा सुरू आहे. नांदेडकरांनी माझ्यावर खूप प्रेम केले आहे. त्यांचे ऋण मी विसरणार नाही. मला राजकीयदृष्टया संपविण्याचा डाव सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारचा कारभार म्हणजे चुनावी जुमले आहेत. वंचित आघाडी ही भाजपची 'बी टीम' आहे. त्यामुळे कोणत्याही भुलथापांना बळी न पडता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावे. काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हाध्यक्ष गोविंद नागेलीकर यांनी आभार मानले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्याला वार्षिक योजनेत अतिरिक्त निधीचे २४८ कोटी

$
0
0

Ramchandra.Vaybhat@timesgroup.com

Tweet : @ramvaybhatMT

ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्याच्या पारड्यात वित्त विभागाने जिल्हा वार्षिक योजनेचा तब्बल २४८ कोटी अतिरिक्त निधी दिला आहे. या निधीमुळे आता जिल्हांतर्गत विकासकामांसाठी आठही जिल्ह्यांना अतिरिक्त निधी मिळणार आहे.

जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये शासनाने कळवलेल्या आर्थिक मर्यादेशिवाय मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांनी तब्बल ७६२ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली होती. या तुलनेत २४८ कोटी रुपये वाढीव निधी देण्यात आला आहे. वाढीव निधीसंदर्भात मुंबई येथे निर्णय घेण्यात आला.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली १७ जानेवारी रोजी झालेल्या नियोजन विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये शासनाने कळवलेल्या आर्थिक मर्यादेनुसार प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री, अधिकाऱ्यांनी आराखडा आणि अतिरिक्त मागणी सादर केली होती. गेल्या काही दिवसांपासून कोणत्या जिल्ह्याच्या पदरात किती अतिरिक्त निधी पडतो, याची उत्सुकता होती. यानुसार आता मराठवाड्याला २४८ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळाला आहे. शासनाने कळवलेली आर्थिक मर्यादा आणि वाढीव मिळालेला निधी असे मिळून औरंगाबाद जिल्ह्याला २८८ कोटी, जालना २१२, परभणी १५४, नांदेड २७१, बीड २५३, लातूर २३२, उस्मानाबाद २४७, हिंगोली १०४ कोटी लाख असे मराठवाड्यासाठी आता एकूण १७६१ कोटी रुपयांचा अंतिम मंजूर झाले आहेत

मागणीनुसार मिळालेला निधी

जिल्हा....... अतिरिक्त मागणी......मिळालेला निधी

औरंगाबाद...........५२.००.............२९.९८

जालना...............१५९.०९...........३६.१०

बीड...................९६.९७.............१७.१७

परभणी...............१०१.००...........१.७०

उस्मानाबाद.........८५.३९.............९०.८४

लातूर.................१३१.००...........४४.३०

हिंगोली...............४०.००.............५.२६

नांदेड.................९७.०८.............२३.०५

एकूण.................७६२.५३...........२४८.४०

(निधी कोटी रुपयांत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोंबड्या विकण्याचा धंदा कॉँग्रेसने बंद करावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

'कॉँग्रेसने ६० वर्ष काय केले. आता गरिबांना प्रत्येकी ७२ हजार रुपये देऊ म्हणत आहेत. हे कोठून व कसे देणार याचे उत्तर दिले जात नाही. त्यामुळे कॉँग्रेसने हा कोंबड्या विकण्याचा धंदा बंद करावा,' अशी टीका मंगळवारी आयोजित प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

युतीचे जालना लोकसभेचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, 'पंजोबा, आजी, वडील, आई व आता राहुल आणि प्रियांका गांधी गरिबी हटावची घोषणा देत आहेत. मात्र, कॉँग्रेसने साठ वर्ष सत्तेत असताना काय केले. टी.व्ही.वर मालिका लागतात त्यापूर्वी अगोदर हे सर्व काल्पनिक असून मनोरंजन म्हणून दाखविले जाते अशी सूचना येते. राहुल गांधींचे भाषण सुरू होण्यापूर्वीही हे मनोरंजन असल्याची सूचना दिली जाईल.' औरंगाबादबद्दल मुख्यमंत्री म्हणाले, '४०० कोटी रुपये अनुदानापोटी दिले. डीएमआयसीत ११ हजार कोटींची गुंतवणूक होत आहे. त्यामुळे तीन लाख लोकांना रोजगार मिळेल,' असा दावा त्यांनी केला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची लातूरमध्येही सभा झाली. यावेळीही त्यांनी कॉँग्रेसवर जोरदार टीका केली.

\Bशिवसेना दूर, खड्डे बुजवले

\Bमुख्यमंत्र्यांच्या सभेकडे तालुक्यातील एकही शिवसेना पदाधिकारी फिरकला नाही. याबाबत शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या सभेचा निरोप नव्हता. जोपर्यंत फुलंब्री नगरपंचायतीतील भाजप-एमआयएमची युती तुटत नाही, तोपर्यंत भाजपशी हातमिळवणी करणार नाही.' दरम्यान, औरंगाबाद-फुलंब्री रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मुख्यमंत्र्यांची सभा असल्यामुळे मंगळवारी हे खड्डे बुजविण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी आ. भुमरेंचे भाषण पाडले बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या तालुक्यातील लिंबगाव येथे रावसाहबे दानवे यांचा प्रचार करण्यासाठी गेलेले आमदार संदीपान भुमरे यांना या गावातील महिलांच्या रोषाचा सामना करावा लागला. संतप्त महिलांनी भुमरे यांची सभा अर्ध्यातच बंद पाडल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली.

पाचोड रस्त्यावरील लिंबगाव सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करत आहे. सोमवारी संध्याकाळी आमदार संदीपान भुमरे हे भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांचा प्रचार करण्यासाठी लिंबगाव येथे आले होते. आमदार भुमरे यांनी त्यांचे भाषण सुरू करताच गावातील महिला रिकामे हंडे घेऊन सभास्थळी पोहचल्या व त्यांनी घोषणाबाजी करत भुमरे यांचे भाषण बंद पाडले. यावेळी गावातील काही नागरिकांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने भुमरे यांना सभा अर्ध्यातच बंद करावी लागली. सध्या, लिंबगावला टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, टँकर चालक फाट्यावर राहणाऱ्या काही राजकीय लोकांच्या नातेवाईकांना ड्रममध्ये पाणी भरून देतात व उर्वरित पाणी सार्वजनिक विहिरीत आणून टाकतात. परिणामी, लिंबगाव येथील महिलांना विहिरीतून गाळ युक्त व दूषित पाणी उपसावे लागत असल्याने मागच्या अनेक दिवसापासून लिंबगावच्या महिला पाणी टंचाई व दूषित पाण्यामुळे त्रस्त आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवकाळी पावसाचाशहरात शिडकावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असलेल्या औरंगाबाद शहरातील नागरिकांनी मंगळवारीही (१६ एप्रिल) उन-सावलीचा खेळ अनुभवला. दुपारी शहरात ढगांच्या गडगडाटासह झालेल्या अवकाळी पावसाच्या शिडकाव्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे उन्हापासून त्रस्त असलेल्या शहरातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून चाळीशीच्या पार असलेले कमाल तापमान मंगळवारी ३४.८ सेल्सियस होते. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार बुधवारीही शहरात ढगाळ वातावरण राहणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहराच्या वातावरणात बदल झाला. १४ एप्रिल रोजी सायंकाळी शहरात अवकाळीच्या सरी बरसल्या होत्या, दरम्यान, मंगळवारीही दुपारी एक वाजेच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. शहर तसेच परिसराच्या बहुतांश भागामध्ये हा पाऊस झाला. ढगाळ वातावरणामध्ये उन्हाचे चटके फारसे जाणवले नसले तरी वातावरणात उकाडा मात्र कायम होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १८ एप्रिलपासून पुन्हा तापमानात मोठी वाढ होणार येत्या आठवड्यात उन्हाचा पारा ४३ अंशापर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटदाराची आयुक्त-महापौरांना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद कामाचे बिल थकल्यामुळे एस. डी. दौडे कंस्ट्रक्शन या कंत्राटदाराने महापालिकेचे आयुक्त, महापौर आणि वॉर्ड अभियंत्याला वकिलामार्फत नोटीस बजावली आहे. १५ दिवसांत पेमेंट द्या, अन्यथा फौजदारी किंवा दिवाणी स्वरुपाची कारवाई करावी लागेल, असा इशाराही नोटीसच्या माध्यमातून देण्यात आला आहे. एस. डी. दौडे कंस्ट्रक्शनचे संजय दौडे यांच्यासाठी अॅड. नागेश सोनुने यांनी बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, दौडे कन्स्ट्रक्शनने वॉर्ड क्रमांक ११० अंतर्गत पोदार शाळा ते गादिया विहार-शिवराज कॉलनी या रस्त्याच्या व्हाइट टॉपिंगचे काम केले आहे. हे काम कंत्राटदाराने मुदतीच्या आत म्हणजे सप्टेंबर २०१८ पर्यंत पूर्ण केले. पूर्ण झालेल्या कामाचे संबंधित अधिकाऱ्यांनी परीक्षण देखील केले आहे. या कामाचे बिल एक कोटी १६ लाख ३२ हजार ८२१ रुपये इतके बिल झाले आहे. बिलाची रक्कम देण्याबाबत दौडे कंस्ट्रक्शनच्या संचालकांनी वेळोवेळी महापालिकेच्या कार्यालयात येऊन विनंती केली आहे, परंतु अद्याप बिल देण्यात आले नाही. रस्त्याच्या व्हाइट टॉपिंगचे काम पूर्ण होवून जवळपास सहा महिने झाले आहेत. बिल न मिळाल्यामुळे पक्षकारावर उपासमारीची वेळ आली आहे. रस्त्याचे काम मुदतीत पूर्ण करण्यासाठी पक्षकाराने कर्ज काढले होते, परंतु बिल न मिळाल्यामुळे पक्षकारास व्याजापोटी विनाकारण मोठी रक्कम भरावी लागत आहे. त्यामुळे पक्षकाराचे आर्थिक नुकसान होत आहे. पंधरा दिवसांत पक्षकारास बिलाची रक्कम व्याजासह देण्यात यावी. पंधरा दिवसात व्याजासह बिलाची रक्कम न मिळाल्यास पक्षकार महापालिका कार्यालयाच्या विरुद्ध फौजदारी किंवा दिवाणी स्वरुपाची कारवाई करतील. नोटीससाठी दहा रुपयांचा खर्च आला असून तो देखील महापालिका कार्यालयावर लावण्यात येत आहे, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची 'जिज्ञासा'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद एमआयटी महाविद्यालयात आयोजित जिज्ञासा प्रकल्प प्रदर्शनात प्रथमवर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधक प्रयोगांचे सादरीकरण केले. दीडशेपेक्षा अधिक प्रकल्पांमध्ये अद्ययावत पाणी पुरवठा व्यवस्थापन, डेअरी, ऑटोमॅटिक वायर कटिंग मशीन अशा विविध प्रकल्पांनी लक्ष वेधले. एमआयटी महाविद्यालयात 'जिज्ञासा' या प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी सामाजिक व औद्योगिक ठिकाणी येणाऱ्या अडचणींवर प्रकल्प तयार करून प्रदर्शनात मांडले. प्रदर्शनाला मंगळवारी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने पाहण्यासाठी गर्दी केली होती. या प्रदर्शनात एकूण ६०० प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी मिळून १५० 'प्रोजेक्ट'चे सादरीकरण केले. विद्यार्थांनी सादर केलेले प्रकल्प सामाजिक व औद्योगिक समस्यांवर अतिशय उपयोगी ठरणारे आहेत. प्रदर्शनात ऑटोमॅटिक लगेज कॅरिंग रोबो, ऑटोमेशन ऑफ डेअरी फार्म, स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट सिस्टिम, ऑटोमॅटिक वायर कटिंग सिस्टिम, सँड फिल्टरिंग सिस्टिम आदी प्रकल्प आकर्षण ठरले. प्रदर्शनाला उद्योजक मिलिंद कंक, शिरीष कुलकर्णी, नंदकुमार भावसार यांनी भेट दिली. यावेळी महासंचालक प्रा. मुनीष शर्मा, प्राचार्य डॉ. संतोष भोसले, प्राचार्य डॉ. निलेश पाटील, प्रा. विश्वास कुरुंदकर उपस्थित होते. नंदकुमार भावसार यांनीही भेट देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रा. सुहास चाटे, प्रा. विनोद दामधर, प्रा. भूषण कुलकर्णी, प्रा. अमोल चित्ते, प्रा. सुहास कंकाळ, प्रा. सुहास तारगे, प्रा. गुणवंत पाटील आदींनी

परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कोसळून गाय मृत्युमुखी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

तालुक्यातील नादी येथे वीज कोसळल्याने गाय मृत्युमुखी पडल्याची घटना मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. नादी येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. डागपिंपळगाव रस्त्यावर गटनंबर १३२मध्ये अंबादास भिकाजी खंडागळे यांच्या गोठ्यात बांधलेल्या गायीवर वीज कोसळून गाय जागीच ठार झाली. तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कांदा गहू व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकोडी सागज येथे निवृत्ती रामचंद्र शिंदे यांच्या शेतातील गट क्रमांक ३८मध्ये झाडावर वीज पडली. मंगळवारी सर्वदूर अवकाळी पाऊस पडला. शहरातही दिवसभर ढगाळ वातावरण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात अवकाळीचा शिडकावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असलेल्या औरंगाबाद शहरातील नागरिकांनी मंगळवारीही (१६ एप्रिल) उन-सावलीचा खेळ अनुभवला. दुपारी शहरात ढगांच्या गडगडाटासह झालेल्या अवकाळी पावसाच्या शिडकाव्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे उन्हापासून त्रस्त असलेल्या शहरातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

गेल्या काही दिवसांपासून चाळीशीच्या पार असलेले कमाल तापमान मंगळवारी ३४.८ सेल्सियस होते. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार बुधवारीही शहरात ढगाळ वातावरण राहणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहराच्या वातावरणात बदल झाला. १४ एप्रिल रोजी सायंकाळी शहरात अवकाळीच्या सरी बरसल्या होत्या, दरम्यान, मंगळवारीही दुपारी एक वाजेच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. शहर तसेच परिसराच्या बहुतांश भागामध्ये हा पाऊस झाला. ढगाळ वातावरणामध्ये उन्हाचे चटके फारसे जाणवले नसले तरी वातावरणात उकाडा मात्र कायम होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १८ एप्रिलपासून पुन्हा तापमानात मोठी वाढ होणार येत्या आठवड्यात उन्हाचा पारा ४३ अंशापर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

असे राहील आठवड्याचे तापमान

दिनांक...........कमाल तापमान

१७ एप्रिल...............३९

१८ एप्रिल...............४०

१९ एप्रिल...............४२

२० एप्रिल...............४३

२१ एप्रिल................४३

२२ एप्रिल...............४३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images