Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

खोडसाळपणावर शुद्धीपत्रकाची मात्रा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पाणीपट्टीत दरवर्षी केली जाणारी दहा टक्के दरवाढ रद्द करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला. मात्र, या निर्णयाविरोधात जावून पाणीपट्टी वाढ रद्द न करण्याचे अधिकाऱ्यांनी काढलेले पत्र संतापजनक व खोडसाळपणाचे आहे. त्यामुळे ही वाढ रद्द केल्याचे शुद्धीपत्रक तत्काळ काढा,' असे आदेश शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले.

पाणीपट्टीत दरवर्षी दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने पाच वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र, हा निर्णय गतवर्षी सर्वसाधारण सभेत रद्द करण्याचे ठरविण्यात आले. तसा ठराव सर्वसाधारण सभेने मंजूर केला. त्या ठरावाची प्रत अंमलबजावणीसाठी प्रशासनाला दिली, पण प्रशासनाने त्यावर काहीच अंमलबजावणी केली नाही. उलट शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी कार्यकारी अभियंता व वॉर्ड अधिकारी यांच्या नावे पत्र पाठवून दहा टक्के वाढीनुसारच पाणीपट्टी वसुलीचे आदेश दिले व तसे नियोजन सादर करण्यास सांगितले. 'मटा' ने या संदर्भात सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर महापालिकेत नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. शहर अभियंत्यांच्या पत्राचा आणि प्रशासनाच्या एकूणच कार्यवाहीचा अंदाज महापौरांनी घेतला आणि दहा टक्के पाणीपट्टी वाढ रद्द करण्याबद्दल त्यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याशी चर्चा केली. सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शुद्धीपत्र काढण्याचे त्यांनी आयुक्तांना सांगितले. आयुक्तांनी देखील ते मान्य केले. याच संदर्भात महापौरांनी शनिवारी सर्वसाधारण सभेत निवेदन केले. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना उद्देशून महापौर म्हणाले, 'पाणीपट्टी वाढ रद्द करण्याचा सर्वसाधारण सभेने घेतलेला निर्णय अंमलात आणण्याबद्दल आयुक्तांशी चर्चा झाली आहे. सर्वसाधारण सभेच्या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. पाणीपट्टी वाढ रद्द करण्यात आल्याचे शुद्धीपत्र काढण्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे. त्यामुळे तत्काळ शुध्दीपत्र काढून पाणीपट्टी वाढ रद्द केल्याचे जनतेला कळवा. जनतेच्या भावनांशी खेळू नका. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही मर्यादा आलेल्या आहेत. आचारसंहिता संपल्यावर या संदर्भात आणखी निर्णय घेऊ. सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयाविरोधात पत्र काढणे हा अधिकाऱ्याचा खोडसाळपणा आहे. हे कृत्य संतापजनक आहे,' असा उल्लेखही महापौरांनी केला.

\Bगैरहजर अधिकाऱ्यांना नोटीस

\Bशनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेला अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. पी. कुलकर्णी, उपायुक्त मंजुषा मुथा, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता शेख खमर, उपअभियंता के. डी. देशमुख, सहाय्यक आयुक्त करणसिंह चव्हाण, विधीसल्लागार अपर्णा थेटे उपस्थित होते. गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या जास्त होती. या सर्व अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश महापौरांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहराचे पहिले महापौर डॉ. काळे यांचे निधन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादचे पहिले महापौर डॉ. शांताराम यशवंत काळे (वय ७३) यांचे शनिवारी (२० एप्रिल) सकाळी आजारपणामुळे निधन झाले. १९८८ ते ८९ या काळात ते महापौर होते. त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. काळे यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

महापालिकेच्या १९८८च्या निवडणुकीत शिवसेनेचा शिरकाव झाला होता. त्यावेळी पालिकेच्या सभागृहात साठ नगरसेवक निवडून आले. त्यापैकी शिवसेनेचे २८ तर, काँग्रेस आघाडीचे ३२ नगरसेवक होते. काँग्रेस आघाडीत काँग्रससह मुस्लिम लीग, भारिप आणि आरपीआय गाडे गट यांचा समावेश होता. पालिकेच्या पहिल्या महापौरपदाची निवडणूक जाहीर झाली, तेव्हा विलासराव देशमुख आणि अमानउल्ला मोतीवाला यांच्या प्रयत्नातून शांताराम काळे यांना महापौरपदाची उमेदवारी मिळाली, असे त्यावेळी सक्रिय राजकारणात असलेले सांगतात. महापौरपदाची निवडणूक ज्या दिवशी होती, त्या दिवशी निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यावर शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांनी प्रक्रियेवर आक्षेप घेतला. मात्र, त्यांचा आक्षेप पिठासन अधिकारी म्हणून काम करणाऱ्या आयुक्तांनी ग्राह्य धरला नाही. त्यामुळ‌े जैस्वाल यांनी सभागृहातील मतपेटीच पळवली व ते सभागृहाच्या बाहेर आले. त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेच्या सर्वच नगरसेवकांनी सभात्याग केला. त्यामुळे सभागृहात उरलेल्या अन्य नगरसेवकांनी काळे यांची महापौरपदी एकमताने निवड केली. मुस्लिम लीगचे तकी हसन खान उपमहापौर झाले. महापौरपदाच्या या निवडणुकीनंतर शहरात दंगल उसळली होती. जायकवाडीपासून औरंगाबादपर्यंत १४०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम डॉ. काळे यांच्या महापौरपदाच्या काळात झाले. त्यामुळे शहराचा पाण्याचा प्रश्न सुटला. रस्ता रुंदीकरणाची महत्त्वाची कात्ही त्यांच्या काळात झाली. त्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत झाली. महापौर आणि नगरसेवकपदाचा कार्यकाळ संपल्यावर शांताराम काळे सक्रिय राजकारणातून स्वत:हून बाहेर राहिले.

शांताराम काळे यांचे व्यक्तिमत्व उदार होते. हसमुख चेहरा म्हणून आम्ही त्यांच्याकडे पहायचो. त्यांच्यात अहंभाव नव्हता. विकासाची दृष्टी घेवून त्यांनी काम केले. शहरासाठी आपले योगदान असले पाहिजे अशी त्यांची भावना होती.

- तकी हसन खान, माजी उपमहापौर

काळे यांची महापौर म्हणून आम्ही एकमताने निवड केली. शांत स्वभावाचा, विकासाची कास धरलेला हा माणूस होता. त्यांच्या कार्यकाळात शहर विकासावरून कधीच मतभेद झाले नाहीत. त्यांनी घेतलेले निर्णय शहरासाठी हितकारक ठरले.

- रतनकुमार पंडागळे, माजी सभापती, महापालिका

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमचा आक्षेप ऐकून घेतला नाही म्हणून त्यावेळी आम्ही मतपेटी पळवली. काळे महापौर झाले. त्यानंतर पंधरा दिवस तणाव होता, पण त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून शहरासाठी काम केले. महत्वाचे निर्णय घेतले. आमचा संघर्ष तेवढ्यापुरता होता. शहर विकासाच्या कामात आम्ही तो येऊ दिला नाही. शांताराम काळे सर्वांना सोबत घेवून काम करायचे त्यामुळे त्यांच्या काळात निर्णय देखील चांगले झाले.

- प्रदीप जैस्वाल, माजी महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खैरेंच्या प्रचारासाठी आज दुचाकी फेरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी रविवारी (२१ एप्रिल) दुचाकी फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही फेरी शहराच्या सर्व भागातून जाणार आहे.

क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून फेरीला सुरुवात होणार आहे. महर्षी दयानंद चौक, काल्डा कॉर्नर, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, वर्मा चौक, दशमेशनगर, शिव मंदिर, चौरसनगर चौक, एकता चौक, जवाहर नगर पोलिस स्टेशन, गजानन महाराज मंदिर, पुंडलिकनगर, जयभवानी नगर, सिडको बसस्थानक, चिश्तीया चौक, बळीराम पाटील हायस्कूल, एम २, जिजामाता चौक, टी. व्ही. सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय, चांदणे चौक चेलिपुरा, संस्थान गणपती ,पानदरिबा, मछली खडक, गुलमंडी, औरंगपुरा, खडकेश्वर, मिलकॉर्नर, मध्यवर्ती बसस्थानक, महावीर चौक, रेल्वेस्थानक, बन्सीलालनगरर, कोकणवाडी, क्रांतीनगर, अदालत रोड, सतीश मोटर्स मार्गे समर्थनगर येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयात फेरीचा समारोप होईल. फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, भाजप जिल्हाअध्यक्ष किशनचंद तनवाणी, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, जिल्हापरिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा हक्काचा मतदार ढळला?

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दर निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिशी राहणारा परंपरागत तरुण मतदार या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव आणि इम्तियाज जलील यांच्याकडे खेचला गेला आहे. भावनिक आवाहनाला सर्वाधिक प्रतिसाद देणारा नवा मतदारवर्ग प्रथमच तरुण उमेदवारांच्या विकासाच्या राजकारणाला प्रतिसाद देत आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात तरुणांचे मतदान निर्णायक ठरणार आहे. या स्थितीत शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या दोन सभा घेऊन तरूण मतदारांना खेचण्याचा प्रयत्न केला.

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात तरुण मतदार प्रचाराच्या केंद्रस्थानी राहून नेहमीच शिवसेनेला फायदा झाला आहे. या निवडणुकीत हे चित्र लक्षणीय बदलले आहे. भावनिक प्रचाराला सर्वाधिक प्रतिसाद देणारा तरुण मतदार नेहमी शिवसेनेची मतपेढी राहिला आहे. या लोकसभा निवडणुकीत शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव व 'एमआयएम'चे इम्तियाज जलील यांच्याकडे तरुण मतदार वळले आहेत. ग्रामीण भागातील तरुणात जाधव यांच्या 'फॅक्टर'ची सर्वाधिक चर्चा आहे. विशेष म्हणजे शेकडो तरुण उत्स्फूर्तपणे जाधव यांच्या प्रचारात उतरले आहेत. बूथनिहाय नियोजनात मागे असलो तरी हिंमत कायम आहे, असे जाधव यांनी मान्य केले आहे. ही हिंमत तरुण कार्यकर्त्यांच्या बळावर वाढल्याचे प्रचाराची आघाडी सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील बहुतांशी गावात जाधव यांच्या प्रचारात तरुण अधिक आहेत. मराठा आरक्षण आंदोलनात जाधव यांनी घेतलेली आक्रमक भूमिका निवडणुकीत उपयुक्त ठरल्याचा दावा केला जात आहे. मात्र, सर्व समाजातील तरुण जाधव यांच्या प्रचारात सहभागी झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा बहुतांशी मतदारवर्ग शहरात आहे. मुस्लिम आणि दलित तरुण मतदारांची वंचित बहुजन आघाडीकडे गर्दी दिसत आहे. औरंगाबाद शहरात शुक्रवारी 'एमआयएम'चे खासदार बॅ. असदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा झाली. या सभेला तरुणांचा लक्षणीय प्रतिसाद मिळाला. तरुणांच्या बळावर जलील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. कॉर्नर सभा, पदयात्रा आणि जाहीर सभेच्या नियोजनात तरुण कार्यकर्ते सक्रिय आहेत. जाधव आणि जलील हे दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित आणि तरुण आहेत. विकासाच्या मुद्द्यांवर दोघांचा भर असून भावनिक आवाहन टाळत आहेत. परिणामी, शहराच्या चांगल्या प्रतिमेच्या शोधात असलेल्या तरुण दोघांकडे वळले आहेत. काँग्रेसकडे तरुण कार्यकर्त्यांची वाणवा आहे. त्यामुळे १८ ते ३५ या वयोगटातील मतदार कुणाला मतदान करणार याची उत्सुकता वाढली आहे. तरुण मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्यात शिवसेना व पर्यायाने चंद्रकांत खैरे किती यशस्वी होतात, यावर निकालाचा कौल अवलंबून आहे.

\Bविकासाचं काय ते बोला!

\Bकाही दिवसांपासून धार्मिक मुद्द्यांचा प्रचारात समावेश झाला आहे. 'खान की बाण', 'संभाजीनगर की औरंगाबाद', 'शिवशाही की रझाकारी' हे मुद्दे समोर आणले जात आहेत. मात्र, अशा मुद्द्यांची सोशल मीडियावर प्रचंड खिल्ली उडवण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात मागील वीस वर्षात नवे उद्योग, केंद्र सरकारच्या योजना, राष्ट्रीय शिक्षणसंस्था किती आणल्या असा प्रश्न तरुण नेटकरी करीत आहेत. तसेच, कचराप्रश्न, पाणी टंचाई, खराब रस्ते या स्थानिक मुद्द्यांवरही तरुणांचा रोख आहे.

\Bआदित्य ठाकरे यांच्या सभा\B

शिवसेनेसोबत तरुण मतदार जोडण्यासाठी तेवढाच तरुण चेहरा शिवसेनेने समोर आणला. शिवसेनेने खुबीने युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या दोन सभा मतदारसंघात घेतल्या. पहिल्या सभेत फक्त तरुणांशी आदित्य यांनी संवाद साधला. दुसरी सभा बजाजनगर येथे झाली. तरुण मतदार जोडण्यासाठी सभांचा उपयोग होईल, असा विश्वास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मस्जिदीमधून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करू नये

0
0

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे मुस्लिम समाजाला आवाहन

म. टा. प्रतिनिधी, जालना

मुस्लिम समाज हा धार्मिक समाज आहे. हा समाज मस्जिदीमध्ये नमाज अदा करीत असतो. हे पवित्र ठिकाण आहे. या ठिकाणावरून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करू नका, अशा पवित्र जागेचा वापर राजकाणासाठी करू नका असे आवाहन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जालना येथील जाहीर सभेत मुस्लीम मौलवी आणि समाजाला केले.

मुस्लिम समाज धोक्यात आहे. मुस्लिम समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एमआयएम ही राजकीय संघटना संघर्ष करीत आहे. त्यामुळे तमाम मुस्लीमांनी एमआयएमसोबत रहावे आणि एमाआयएम जो निर्णय घेईल, तो मान्य करावा असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.

ज्या प्रमाणे दोन चार जण सोडले तर भगवी वस्त्र परिधान करणारे लोकं राजकीय भूमीका घेत नाहीत, तसे मौलवीने देखील काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करू नये, मुस्लीम समाजासाठी काम करणाऱ्यांना त्यांनी पाठिंबा द्यावा. ओबीसी आणि मराठा समाजात भाजपने भांडणे लावली आहेत. त्यामुळे मराठा उमेदवाराला ओबीसी मतदान करणार नाही. कारण त्यांना त्यांचे आरक्षण वाचवायचे आहे. त्यांच्या नौकऱ्या त्यांना वाचवायच्या आहेत. त्यामुळे हा सर्व ओबीसी आता जागृत झाला आहे आणि तो वंचित बहुजन आघाडीसोबत आहे. जालन्यातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शरदचंद्र वानखेडे यांना विजयी करण्यासाठी बहुजन पुढे आले आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असेही आवाहन अॅड. आंबेडकर यांनी केले. यावेळी वानखेडे, प्रा. किसन चव्हाण, दीपक डोके, माजेद भाई, दीपक बोराडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास, रोजगार निर्मिती हेच लक्ष्य …

0
0

अब्दुल वाजेद, औरंगाबाद

'लोकसभेच्या औरंगाबाद मतदार संघाचा विकास हेच माझे लक्ष्य आहे. पर्यटन, रोजगार, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि इथला पाणी प्रश्न सोडविण्यावर मी निवडून आलो तर भर देईन. त्याचा कसलाही बोजा सामान्य नागरिकांवर पडणार नाही, याची खबरदारी घेईन,' असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी 'मटा'शी बोलताना केले. त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

- औरंगाबाद मतदार संघाच्या परिपूर्ण विकासाचे तुमच्याकडे काय धोरण आहे?

- विकासासाठी काही प्रमुख मुद्यांकडे लक्ष केंद्रीत करू. यात जिल्हयातील तरुणांसाठी रोजगार, पर्यटन विकास, आरोग्य सुविधा, शिक्षण, उद्योगांचा विकास, पायाभूत सुविधा, विमान दळणवळण यासह शहराचा पाणी प्रश्न सोडवू. नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा बोजा न टाकता दररोज पाणी मिळेल अशी व्यवस्था निर्माण करू. कचरा व्यवस्थापन करून औरंगाबाद व जिल्हा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी व्यवस्थापन केले जाईल.

- वाढत्या धार्मिक व जातीय प्रचाराबाबत काय भूमिका आहे?

- माझ्या प्रचारात मी जिल्ह्याचा विकास हा मुद्दा घेतला आहे. ही निवडणूक जेवढी आमच्यासाठी महत्त्वाची आहे, त्यापेक्षा जास्त या मतदार संघातील प्रत्येक मतदारांसाठी आहे. त्यांचीही ही परीक्षाच राहणार आहे. एकमेकांची किंवा जातीपातींची, धर्माची भीती दाखवून मतदान घेण्याचा पायंडा जुना झाला. वारंवार केले जाणारे हे प्रयोग मतदारांच्या लक्षात आलेले आहेत. निश्चितच या जिल्ह्याचे मतदार यंदा धार्मिक व जातीय प्रचाराला बळी न पडता जिल्ह्याच्या विकासासाठी आणि स्वत:च्या सन्मानासाठी मतदान करतील.

- जिल्ह्यात रोजगार वाढविण्यासाठी कोणते प्रयत्न करणार?

- औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना मोठा इतिहास आहे. या पर्यटनस्थळांचा विकास करून त्याकडे पर्यटकांना आकर्षित केले जाईल. यातून मोठी रोजगार निर्मिती होऊ शकते. यासोबत औद्योगिक विकासासाठीही आमचे प्रयत्न राहणार आहेत. उद्योगांना प्रशिक्षित कामगारांची गरज असते. यासाठी उद्योगांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना कर्मचारी उपलब्ध होतील असे अभ्यासक्रम, प्रशिक्षण वर्ग तयार करून होतकरू तरुणांना चांगले रोजगार उपलब्ध करून देण्यात येतील. कौशल्य आधारित प्रशिक्षणामुळे शहर आणि जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. पर्यटन, उद्योगाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे.

- कृषी विकास आणि ग्रामीण विकासावर भर असेल का?

- सध्या प्रचारात गावागावांमध्ये जात आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न भयावह आहेत. एक हंडा पाणी आणण्यासाठी घरातल्या महिलांना करावी लागणारी कसरत ही भयावह आहे. ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी त्या भागाच्या गरजेनुसार तेथे योजना राबविण्यात येतील. पाण्याचे नियोजन, पीक पद्धतीबाबत जनजागृती करण्याबाबत प्रयत्न करू.

- पाच वर्षांत औरंगाबाद मतदारसंघात कोणते लक्षणीय बदल दिसतील ?

- औरंगाबाद जिल्ह्यात करण्यासारखे खूप काही आहे. शहरातील पर्यटनस्थळांचा विकास, रेल्वे - विमान कनेक्टिव्ही वाढविणे, उद्योग वाढीसाठी अपेक्षित वातावरणाची निर्मिती करून जास्तीत जास्त स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देणे. औरंगाबादचे नाव उद्योगात करणे. पर्यटनातून रोजगार निर्मिती करून औरंगाबादकरांना एक सन्मान मिळवून देणे, असे बरेच काही करता येईल. त्यासाठी फक्त इच्छाशक्ती हवी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओवेसी ‘वक्फ’ची जागा विकणारे चोर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांना त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न अद्याप सोडविता आले नाहीत. ओवेसी हे वक्फ बोर्डाच्या जागा विकणारे चोर आहेत,' असा आरोप तेलंगणातील भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी केला.

शिवसेना भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ सिडको परिसरातील आविष्कार चौक येथे शनिवारी सायंकाळी टी. राजा सिंह यांची प्रचार सभा झाली. यावेळी खासदार खैरे, आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडले, अनिल मकरिये, राजू वैद्य, त्र्यंबक तुपे, माधुरी अदवंत यांच्यासह युतीचे पदाधिकारी उपस्थित होते. एमआयएम व त्यांच्या नेत्यांवर प्रखर टीका करत राजा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. 'उडू पाहणाऱ्या पतंगाचा धनुष्य बाण कुठे वेध घेईल हे समजणारच नाही,' असा टोला त्यांनी मारला. 'ओवेसी यांना त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न अद्याप सोडविता आले नाहीत. ओवेसी हे वक्फ बोर्डाच्या जागा विकणारे चोर आहेत. ओवेसी बौद्ध विहारात का गेले नाही. ओवेसी फुकट काहीच देत नाहीत, मग जलील यांना तिकीट कसे दिले,' असा सवाल त्यांनी केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पप्पू तसेच विदूषक असा उल्लेख करत 'काँग्रेसने देशाला गेल्या ६० वर्ष लुटले,' असा आरोप त्यांनी केला. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचे थेट नाव न घेता त्यांनी 'जातीपातीचा आधार घेत हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी घरभेद्यांना पुढे करून षडयंत्र रचले आहे,' असा आरोपही राजा यांनी केला. दरम्यान, आमदार सावे, शिरसाट यांनी आपल्या भाषणात 'गेल्यावेळी मध्यमध्ये झालेली एक चूक भोगावी लागत आहे,' असा उल्लेख केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षेच्या माध्यमातून विकासाचा दृष्टिकोन

0
0

Unmesh.deshpande@timesgroup.com

Tweet - @UnmeshdMT

औरंगाबाद : 'सुरक्षेच्या माध्यमातून जिल्हा आणि औरंगाबादचा विकास करू. पर्यटनाची राजधानी असलेल्या शहराला येत्या काळात टॉपमोस्ट शहर म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू,' असा दावा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेना - भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी 'मटा' शी बोलताना दिली. त्यांच्याशी साधलेला संवाद...

\B- मतदारसंघाच्या परिपूर्ण विकासाचे तुमच्याकडे कोणते धोरण आहे?

\B- औरंगाबादचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न महत्वाचा आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना करण्याचे नियोजन केले आहे. या संदर्भात केंद्र सरकारमधील अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्रीही निधी देणार आहेत. त्यातून सातारा - देवळाईसाठी पाणीपुरवठा योजना करू. कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून 'डीएमआयसी'मध्ये चाळीस एकर जागा आरक्षित केली आहे. त्यापैकी दहा एकरात सुसज्ज प्रक्रिया प्रकल्प उभारला जाईल. रेल्वेचा दौलताबाद - चाळीसगाव प्रकल्प येत्या काळात मार्गी लावू. सोलापूर - धुळे महामार्गासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. औरंगाबादसाठी नवीन रेल्वे सुरू व्हाव्यात, रेल्वेची डबल लाइन व्हावी व त्याचसोबत विद्युतीकरण देखील व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहे.

\B- वाढत्या धार्मिक व जातीय प्रचाराबद्दल काय भूमिका आहे?

\B- १९९०मध्ये औरंगाबादचा पहिला हिंदू आमदार म्हणून मी निवडून आलो. तेव्हापासून शहरात दंगल झाली नाही. शहर शांत ठेवण्याचाच मी प्रयत्न केला आहे. मध्यंतरी राजाबाजार भागात दंगल घडवण्यात आली. त्यालाही आम्ही समर्थपणे तोंड दिले. लोकांमध्ये धार्मिकता वाढली पाहिजे. धार्मिकता वाढली तरच नैतिकता आपोआप निर्माण होते, पण धार्मिकतेच्या आडून जातीय प्रचार केला जात असेल तर, तो योग्य नाही.

\B- कृषी विकास व ग्रामीण विकासावर भर असेल का?

\B- शेती विकासासाठी विविध संशोधनाची गरज असते. त्यासाठी अद्ययावत संशोधन केंद्र स्थापन करण्याचे ठरविले आहे. संशोधन केंद्राच्या माध्यमातून शेतीसाठीच्या सर्व योजना औरंगाबाद जिल्ह्यात आणल्या जातील. शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. येत्या काळात सरकारला यासाठी ठोस निर्णय घेण्यास भाग पाडू. रस्ते विकासासह ग्राम विकास हा अजेंडा समोर ठेवला आहे.

\B- रोजगार निर्मितीसाठी कोणते प्रयत्न करणार आहात?\B

- शासनाकडे पाठपुरावा करून 'डीएमआयसी' प्रकल्प औरंगाबादसाठी मंजूर करून घेतला. आता या प्रकल्पात मोठमोठे उद्योग येऊ घातले आहेत. त्यामुळे मोठी रोजगार निर्मिती होईल. 'साई' केंद्र परिपूर्ण व्हावे असाही प्रयत्न सुरू आहे. हे केंद्र परिपूर्ण झाले तर, रोजगाराला लाभ होईल. सध्या औरंगाबादेत एकच केंद्रीय विद्यालय आहे. या विद्यालयांची संख्या वाढली पाहिजे यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे पाठपुरावा करीत आहे. पालिकेच्या बंद पडलेल्या शाळा केंद्रीय विद्यालयासाठी शासनाच्या ताब्यात देवून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याची देखील योजना आहे. विद्यालयांची संख्या वाढली तर शिक्षकांची संख्या देखील वाढेल.

\B- पाच वर्षात औरंगाबाद मतदारसंघात कोणते लक्षणीय परिवर्तन दिसेल?

\B- शहारची पाणी पुरवठ्याची योजना मार्गी लागेल. कचरा प्रक्रियेचे प्रकल्प देखील सुरू होतील. रस्ते विकासाला अधिक महत्त्व देण्याचा मानस आहे. चांगले रस्ते असले तर, विकासाचा आलेख उंचावतो हे लक्षात घेतले पाहिजे. येत्या काळात रेल्वेचे जाळे देखील वाढणार आहे. शिवाय डबल लाइन देखील होणार आहे. त्यामुळे प्रवाशांची अडचण दूर होईल. उद्योग - व्यवसायाच्या दृष्टीने देखील ही सुविधा महत्त्वाची ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकमुळे एलईडी कंत्राटदाराचे कर्ज थांबले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महापालिकेने बँक गॅरंटी न दिल्यामुळे कर्ज प्रकरण होऊ शकले नाही. त्यामुळे कामाची गती देखील मंदावली आहे,' असे एलईडीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने महापालिकेला कळवले आहे.

शहरातील विजेच्या खांबांवर एलईडी दिवे लावण्याचे कंत्राट महापालिकेने इलेक्ट्रॉन एनर्जी सेव्हिंग लिमिटेड कंपनीला दिले. शहरात ६५ हजार पथदिवे आहेत. त्यापैकी चाळीस हजार पथदिवे या कंपनीला एलईडी दिवे लावण्यासाठी देण्यात आले आहेत. त्यापैकी २८ हजार दिवे कंपनीने लावले. एक वर्षात चाळीस हजार दिवे लावण्याचे कंत्राटात नमूद करण्यात केले होते, परंतु या मुदतीत दिवे लावणे शक्य होत नसल्यामुळे पालिकेच्या आयुक्तांनी कंपनीला नोटीस बजावली आणि ९३ लाख रुपयांचा दंड भरण्यास सांगितले. या नोटीसला कंपनीने उत्तर दिल्याची माहिती कार्यकारी अभियंता शेख खमर यांनी दिली. 'कंपनीसाठी पालिकेने बँक गॅरंटी द्यायला हवी होती. बँक गॅरंटीच्या आधारे कंपनी कर्ज काढणार होती, परंतु पालिकेने अद्याप बँक गॅरंटी दिलेली नाही. त्यामुळे कर्ज प्रकरण देखील होऊ शकले नाही. या कारणामुळे एलईडी दिवे लावण्याचे काम रेंगाळले,' असे कंपनीने नमूद केल्याचे शेख खमर यांनी सांगितले.

\B३६ कोटी द्यावे लागणार

\Bमहापालिकेला बँक गॅरंटीपोटी सुमारे ३६ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता एवढी मोठी रक्कम पालिका एकाचवेळी गुंतवू शकेल या बद्दल खात्री नाही. जोपर्यंत कर्ज प्रकरण मंजूर होत नाही, तोपर्यंत एलईडीच्या कामाला गती येण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील १६ गावांचा मतदानावर बहिष्कार

0
0

औरंगाबाद:

आमच्या गावाला रस्ता नाही, असलेल्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे, पुलाचे बांधकाम अपूर्ण आहे, यांसह इतर तक्रारी करत जिल्ह्यातील तब्बल १६ गावांतील नागरीकांनी २३ एप्रिल रोजीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील विविध गावामधील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात या गावातील नागरिकांनी जिल्हा प्रशासन; तसेच विभागीय आयुक्तांनाही पत्रव्यवहार केला होता. बहिष्कार टाकण्यात आलेल्या गावांमध्ये सिल्लोड, फुलंब्री, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व व वैजापूर या तालुक्यांतील प्रत्येकी एक तर, कन्नड, पैठण तालुक्यांतील प्रत्येकी दोन आणि गंगापूर तालुक्यातील पाच तक्रारींचा समावेश आहे. यामध्ये पोखरीच्या (ता. वैजापूर) ग्रामस्थांनी दळणवळणासाठी बारामाही पक्का रस्ता नसल्याने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासह विहामांडवा (ता. पैठण) येथील ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी रस्ते व पुलाचे काम पूर्ण करण्यात न आल्याने बहिष्कार टाकण्यात येत असल्याचे निवेदन प्रशासनाला दिले आहे. यासह जवळी खुर्द व बुद्रुक, बाभुळखेडा, सासेगाव, साळेगाव व मनूर येथील ग्रामस्थांनी रस्ता पूर्ण झाला नाही म्हणून तर, गंगापूर तालुक्यातील पेंडापूर, पदमपूर ग्रुप ग्रामपंचायतने राज्य मार्ग २६ ते पोटूळ स्टेशन रांजणगाव (पोळ), बोरगाव, डोमेगाव, येसगाव दिघी, पदमपूर, पेंडापूर, ढोरेगाव रस्त्याच्या कामाची सुरुवात झाली नसल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे निवदेन जिल्हा प्रशासनाला दिले आहे. या गावकऱ्यांचे शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांचीही भेट घेतली होती. औरंगाबाद तालुक्यातील लाडगाव हिवरा, फुलंब्री तालुक्यातील कविटखेडा, गंगापूर तालुक्यातील येसगाव, ग्रामपंचायत कार्यालय पाटोदा, वाळूजवाडी (ता. गंगापूर), सावळदबारा (ता. सोयगाव), कन्नड येथील शेतकरी, खादगाव (ता. गंगापूर), जयसिंगनगर (ता. गंगापूर), बोरगाव (पुनर्वसन, ता. पैठण) या गावांतील गावकऱ्यांनी; तसेच काही शेतकऱ्यांनी व इतर नागरिकांनी स्वतंत्ररित्या प्रशासनाकडे अर्ज दिले आहेत.

प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून संवाद

बहिष्कार टाकण्यात आलेल्या सर्व गावकऱ्यांच्या अडचणी या वेगवेगळ्या आहेत, अडचण दूर करण्याच्या दृष्टीने प्रशासनातील तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचाही प्रयत्न केला असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आकर्षक व्याजाचे आमिष; ३६ लाखांची फसवणूक

0
0

औरंगाबाद:

आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवत जेष्ठ नागरिकासह इतरांची ३६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट २०१७ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत घडला.

या प्रकरणी शेषराव नारायणराव माहोरकर (वय ६१, रा. राधामोहन कॉलनी, खोकडपुरा) यांनी तक्रार दाखल केली. माहोरकर यांना शुभसन पावर प्रा. लि. आणि पावर ट्रान्स इन्फ्रा प्रा. लि. यांच्या संचालकांनी वेगवेगळे आमिष दाखवत त्यांना आणि इतरांना ठेवी ठेवण्यास भाग पाडले. काही रक्कमेचा परतावा आणि व्याज या कंपनीच्या संचालकांनी ठेवीदारांना दिला. मात्र, त्यानंतर मूळ ठेवीची रक्कम ३० लाख ३० हजार रुपये आणि त्यावरील व्याज पाच लाख ८४ हजार रुपये न देता फसवणूक केली. या प्रकरणी माहोरकर यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी संचालक संतोष सदाशिव दाते, सौरभ संतोष दाते आणि एका महिला आरोपी (रा. मुथीयान कॉर्नर, न्यू एसबीएच कॉलनी, उस्मानपुरा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव सानप हे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मिडियावर पोस्ट टाकताना जरा जपून

0
0

औरंगाबाद:

लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार रविवारी सायंकाळी संपला. मात्र, जाहीर प्रचार संपल्यानंतर मतदारांपर्यंत पोचण्यासाठी गेल्या लोकसभा निवडणुकीपासून सोशल मिडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या परिस्थिती दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकणाऱ्या पोस्ट सोशल मिडियावर टाकल्या जाऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी सोशल मिडियावर कोणतीही पोस्ट टाकतांना सावधगिरी बाळगा, आक्षेपार्ह, दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकू नका, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. सोशल मिडियावर देखील आपआपल्या पक्षाचा, उमेदवारांचा प्रचार जोरात केला जात आहे. जाहीर प्रचार रविवारी सायंकाळी पाच वाजता थांबला. सोशल मिडियाशी सबंधित फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटसअॅपवर जातीयवादी, दोन समाजात तेढ निर्माण होऊन जातीय सलोखा नष्ट होईल, अशी पोस्ट टाकू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये आणि शेअर देखील करू नये. जर कोणी अशा पोस्ट टाकत असतील, तर पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सायबर सेलची करडी नजर

आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक करवाईचा इशारा देण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी अशी पोस्ट टाकणाऱ्या तरुणावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. सोशल मिडियावर पोलिसांच्या सायबर सेलची करडी नजर आहे.

सोशल मिडियावर सायबर सेलची करडी नजर आहे. आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कोणी तक्रार दिली नाही तरी पोलिसांच्या वतीने सबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

-डॉ. दीपाली धाटे घाडगे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फाइव्ह स्टार जलतरण तलाव बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या काही दिवसांपासून जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यातून उपसा करण्यात येत असून शहराला आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या भीषण पाणीटंचाईच्या काळात पुढे शहराला पाणीपुरवठा होऊ शकेल की नाही याची खात्री नसल्याने प्रशासनाने शहरातील ९ जलतरण तलाव तत्काळ बंद करण्याचे आदेश अप्प्पर तहसीलदार रमेश मुनलोड यांनी काढले आहेत. सिद्धार्थ जलतरण तलाव महापालिकेने यापूर्वीच बंद केला आहे.

यामध्ये हॉटेल द मिडॉज, हॉटेल विवांता औरंगाबाद, हॉटेल लेमन ट्री, हॉटेल अंम्बेसेडर अजंता, हॉटेल वेलकम रामा इंटरनॅशनल, हॉटेल विट्स, औरंगाबाद जिमखाना क्लब हॉटेल, एमजीएम स्पोर्ट्स क्लब अॅण्ड स्टेडियम अॅण्ड हेल्थ क्लब व हॉटेल एएस क्लब येथील जलतरण तलाव तत्काळ बंद करण्याचे आदेश अप्पर तहसीलदारांनी काढले आहेत.

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून अत्यल्प पाऊस झाला असून यंदाही पावसाअभावी दुष्काळी परिस्थती आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे, येणाऱ्या काळात आणखी बिकट परिस्थिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणीसाठा पाहता पाऊस पडेपर्यंत ही हे जलतरण तलाव बंद ठेवण्यात येणार आहे.

\Bतलाव बंद न केल्यास कारवाई

\B

हे जलतरण तलाव तत्काळ बंद केले नाहीत, किंवा आदेशाचे उल्लंघन केल्यास नैसर्गिक आपत्ती कायदा २००५नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्र अप्पर तहसीलदारांनी या आस्थापनांच्या व्यवस्थापनांना दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचाराच्या तोफा थंडावल्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. औरंगाबाद मतदारसंघासाठी २३ उमदेवार रिंगणात असून, २३ एप्रिल रोजी या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे. रविवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी रिंगणातील काही उमेदवारांनी काढून वातावरण निर्मिती केली तर, काहींनी प्रत्यक्ष मतदारांना भेटण्यावर भर दिला.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यामध्ये मतदान होणार असून, विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे आणि रावसाहेब दानवे यांचे भवितव्य २३ रोजी मतदान यंत्रात बंद होणार आहे.

आरोप- प्रत्यारोपांमुळे शहरात निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली. या काळामध्ये आपापल्या पक्षाच्या उमदेवाराच्या प्रचारासाठी बड्या नेतेमंडळींनी हजेरी लावली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, पंकजा मुंडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नवज्योतसिंग सिद्धू, बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, सचिन सावंत, नितीन बानगुडे पाटील, आरेफ नसीम खान, बॅ. असदोद्दिन ओवेसी, प्रकाश आंबेडकर, वारीस पठाण, जफर हुसेन आदींनी मतदारसंघातील विविध भागामध्ये प्रचार केला. निवडणूक जाहीर झाल्यानंतर शहरात प्रचारात जोर धरला नव्हता मात्र एआयएमआयएम-वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर निवडणुकीत रंगत आली. प्रारंभी सर्वच उमेदवारांचा धिम्या गतीने प्रचार सुरू होता, मात्र मतदानाला तीन-चार दिवस राहिल्यानंतर प्रचाराने वेग घेतला. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, असदोद्दिन ओवेसी यांच्या मोठ्या सभा झाल्या. प्रारंभी औरंगाबाद मतदारसंघातील सर्वच उमदेवारांनी ग्रामीण भागातील प्रचारावर लक्ष केंद्रित केले तर शेवटच्या टप्प्यामध्ये शहरी भागातील तीन विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराला जोर लावला. यंदा उन्हाच्या तीव्रतेमुळे फारश प्रचारफेऱ्या दिसल्या नसल्या तरी, शेवटच्या दिवशी दिवसभर वाहनफेऱ्या काढून शहरात वातावरण निर्मिती केली. २३ एप्रिल रोजी औरंगाबाद मतदारसंघातील नऊ लाख ९३ हजार ९६९ पुरूष तर, आठ लाख ९२ हजार २८९ स्त्री असे एकूण १८ लाख ८६ हजार २८३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासासाठी सर्व समाज एकत्रित

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

यंदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षाचे उमेदवार म्हणून प्रचार करीत असताना शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व समाजातील जातीपातीतील लोक एकत्र येत असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली. जलील यांनी त्यांचा जाहिरनामा आज पत्रकार परिषदेत मांडत आपले विकासाबाबतचे धोरण स्पष्ट केले.

गेल्या २३ दिवसाच्या प्रचारात समाजातील सर्वांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व समाजाचे लोक एकत्र येत आहेत. आमच्या भूमिकेला सर्व समाजाकडून प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. एमआयएम रझाकार असल्याबाबतच्या आरोपावर उत्तर देताना हा रझाकारांचा पक्ष नाही. त्याच्याशी आमचा संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील एका पक्षाचे काही कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. निवडणूक आयोगाने या क्लिपगची दखल घ्यावी, असे मत जलील म्हणाले.

... तर 'नोटा' वापरा

लोकशाही टिकविण्यासाठी मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा. यंदाच्या निवडणुकीत फक्त ५० टक्के मतदार मतदानासाठी येत असल्याचे दिसत आहे. जर तुम्हाला कोणताच उमेदवार पसंत नसेल तर मतदात्यांनी मतदान केंद्रावर जाऊन नोटाचे बटन वापरून उमेदवाराबाबत नापसंती व्यक्त करावी, असा सल्लाही जलील यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेक्सपिअरचे ‘हॅम्लेट’ सर्वश्रेष्ठ नाटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शेक्सपिअरचे 'हॅम्लेट' नाटक सर्वश्रेष्ठ मानतात. कारण, त्याने सूडकथेत सद्सदविवेक पेरला आणि नाटकाचे आयाम बदलले. त्यामुळे तीस वर्षांनंतर पुन्हा 'हॅम्लेट' करण्याचे आव्हान स्वीकारले', असे नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि नाटककार प्रशांत दळवी यांनी सांगितले. ते परिवर्तन संस्थेच्या वतीने आयोजित पाचव्या शेक्सपिअर महोत्सवातील 'मुक्त संवाद' कार्यक्रमात बोलत होते.

हा कार्यक्रम रविवारी सायंकाळी गोविंदभाई श्रॉफ सभागृहात पार पडला. प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि नाटककार प्रशांत दळवी यांची 'मुक्त संवाद' कार्यक्रमात प्रा. अजित दळवी आणि डॉ. दासू वैद्य यांनी मुलाखत घेतली. 'हॅम्लेट' नाटक पुन्हा मराठी रंगभूमीवर आणण्याचा प्रवास कुलकर्णी यांनी मांडला. 'तीस वर्षांपूर्वी स. भु. महाविद्यालयातील जालान सभागृहात 'हॅम्लेट'चा प्रयोग केला होता. या प्रयोगाने खूप काही शिकवले. मर्यादित स्वरुपात रंगावकाश उभारण्याची जाणीव झाली. आता भव्य स्वरुपात 'हॅम्लेट' करताना जुना अनुभव पाठिशी होता', असे कुलकर्णी म्हणाले.

'महोत्सवात 'हॅम्लेट', 'लिअर' पाहून भारावलो होतो. कोणतीही छटा उचलून शेक्सपिअर सर्जनशीलतेला आवाहन करतो. त्याने ४०० वर्षांपूर्वी नाटकात मूर्त स्वरुपात काळ उभा केला. तो कालातीत झाला नसून कायम जिवंत राहिला. 'हॅम्लेट'ची रंगावृत्ती करताना अलौकिक आनंद मिळाला', असा अनुभव प्रशांत दळवी यांनी सांगितला. या नाटकात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत राघवनच्या अभिनय शैलीवर कुलकर्णी यांनी भाष्य केले. या नाटकात रहस्य, अतिमानवी शक्ती, प्रेम, विरह, तलवारबाजी, शौर्य हे घटक असून ते एकात्म झाले आहेत. त्यामुळे 'हॅम्लेट' करण्याचा मोह आवरला नाही, असे दोघांनी सांगितले. शेक्सपिअरच्या नाटकाची बलस्थाने, कलाकारांबाबत असलेली भूमिका, नाटकाचे विषय यावर कुलकर्णी व दळवी यांनी सविस्तर मते मांडली.

दरम्यान, मुक्त संवादानंतर ज्ञानदा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 'मच अॅडो अबाउट नथिंग'चा नाट्य प्रवेश सादर केला. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\Bनाट्यगृह नसल्याने औरंगाबादेत प्रयोग नाही \B

'राज्यभरात भव्य स्वरुपातील 'हॅम्लेट'चे ८७ प्रयोग झाले. प्रेक्षकांची मागणी असूनही औरंगाबादेत प्रयोग झाला नाही. कारण, आपल्या शहरात नाट्यगृह नाही. लंडनच्या ग्लोब थिएटरमध्ये नाटक पाहून तेवढाच भव्य प्रयोग करण्याचे माझे ध्येय होते. त्यात यश आले तरी औरंगाबादेत कधी प्रयोग होईल ही उत्सुकता आहे. मे महिन्यात प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे', असे चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धा परीक्षांची तयारी करताना उच्च ध्येय आवश्यक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्पर्धा परीक्षांची तयारी करताना उच्च ध्येय बाळगा. तत्त्वांशी तडजोड करू नका, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले. स्पर्धा परीक्षाच म्हणजे सर्वस्व, असे काही समजण्याचे कारण नाही, असेही त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा, पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा द युनिक अॅकॅडमीतर्फे बुधवारी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या. तापडिया नाट्यमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर कपील हांडे, प्रशांत पाटील यांची उपस्थिती होती. पोलिस अधीक्षक पाटील म्हणाल्या, 'या परीक्षा म्हणजेच सर्वस्व, असे समजून घेऊ नका. महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढी ताकद आहे की, कोणेतही आव्हान आपण स्वीकारू शकतो. आव्हान स्वीकारून ते यशामध्ये परावर्तित करू शकतो.'

स्वत:ला यशस्वी करू शकतो. प्रत्येकाला अडचणी येतात. त्यांचे स्वरूप वेगवेगळे असते. त्यावर मात करत पुढे जातो तोच यशस्वी होतो. भाषा ही स्पर्धा परीक्षेसाठी बंधन नाहीत. त्यासाठी आवश्यकता असते ती तुमची जिद्द, मेहनत, सचोटी आणि योग्य मार्गदर्शनाची. भरपूर महेनत करा, स्वत:शी प्रामाणिक रहा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांच्या हस्ते यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मधूर पोफळे, अक्षय गुरूभैये, फैज मिर्झा, धीरज देशमुख, डॉ. भागवत वाघ यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रकांत खैरे- हर्षवर्धन जाधव आमनेसामने

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महायुतीचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन या दोघांच्याही प्रचारार्थ निघालेल्या रॅली कॅनॉटमध्ये समोरासमोर आल्या. यावेळी दोन्ही बाजुंच्या कार्यकर्त्यांनी त्वेषाने प्रचंड घोषणाबाजी केली. त्यामुळे काहीवेळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र, दोन्ही उमेदवारांनी कार्यकर्त्यांना समजावून सांगत रॅली पुढे नेली.

महायुतीचे उमदेवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ रविवारी शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. क्रांती चौकातून निघालेली ही रॅली शहरातील विविध भागातून नेण्यात आली. 'कोण आला रे कोण आला' अशा आशयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. भगव्याची लढाई असल्याचे सांगत, यापुढे निवडणूक लढवणार नाही, या वृत्ताचे खंडनही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केले.

क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत ही रॅली निघाली. भाजप-शिवसेनेचे स्थानिक नेत्यांनी रॅलीला हजेरी लावली. महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, संजय सिरसाट, अंबदास दानवे, प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेना, भाजप युतीच्या घोषणा, भगवे झेंडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक हाती घेत कार्यकर्ते सहभागी झाले होते. क्रांती चौकातून निघालेली ही रॅली जालना रोडवरील अमरप्रीत हॉटेल मार्गे काल्डा कॉर्नर, रोपळेकर चौक मार्गे गजानन महाराज मंदिर चौकमार्गे पुंडलिकनगर, सिडको बसस्टँड रोडवरून कॅनॉटमध्ये रॅली पोहचली तेथून चिश्तिया पोलिस चौकी मार्गे अविष्कार चौक, बळीराम पाटील हायस्कूल, टीव्ही सेंटर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय, चांदणे चौक, चेलीपुरा संस्थान गणपती, पानदारीबा मछली खडक, गुलमंडी, औरंगपुरा, खडकेश्वर, मिलकॉर्नर, मध्यवर्ती बस स्थानक, पेट्रोल पंप रेल्वे स्टेशन, बन्सीलाल नगर, कोकणवाडी क्रांतीनगर, अदालत रोड, सतीश मोटर्समार्गे समर्थनगर येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयात विसर्जित करण्यात आली.

आमने-सामने उमेदवार

महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे दुचाकी रॅली आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांची टॅक्टर रॅली सिडकोत कॅनॉटमध्ये आमने-सामने आली. खैरे यांची रॅली सिडको बसस्थानकाकडून एसबीआय बँकपासून कॅनॉटमध्ये आली अन् चिश्तिया चौकातून जाधव यांची रॅली आली. दोन्ही रॅली समोरासमोर आल्यानंतर दोन्ही बाजुंच्या कार्यकर्त्यांनी गाड्या थांबवित एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. काहीजण हातात झेंडे घेऊन एकमेकांसमोर नाचत होते, जोरदार घोषणाबाजी, हुल्लडबाजी असे चित्र होते. नागरिक रस्त्याच्या बाजूला उभे राहून हे दृष्य पाहत होते. समर्थकांची घोषणाबाजी अन् वातावरण तणावपूर्ण होईल असे चित्र दिसताच दोन्ही उमेदवारांनी समयसुचकता दाखवित आपापल्या कायकर्त्यांना पुढे जाण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर दोन्ही रॅली पुढे आपापल्या मार्गाने निघाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाधव यांची ट्रॅक्टरफेरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद लोककसभा मतदारसंघाचा प्रचार सोमवारी (२१ एप्रिल) थंडावला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांच्या प्रचारार्थ रविवारी भव्य ट्रॅक्टरफेरी काढण्यात आली.

दुपारी टीव्ही सेंटर चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून फेरीला सुरुवात करण्यात आली. शहर परिसरातून यावेळी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचा फेरीमध्ये समावेश होता.

ही फेरी पुढे एम-२, बळीराम पाटील हायस्कूल, बजरंग चौक, चिश्तिया कॉलनी, जयभवानीनगर, पुंडलिकनगर, गजानन महाराज मंदिर, सूतगिरणी चौक, शाहनूर मियॉ दर्गा, पीरबाजार, उस्मानपुरा, क्रांतीचौक, पैठणगेट, गुलमंडी, सीटीचौक, भडकलगेट, दिल्लीगेट, हडको कॉर्नर ते संभाजी महाराज पुतळा येथे फेरीचा समारोप करण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात तसेच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शहरी भागात हर्षवर्धन जाधव यांनी प्रचार केला. प्रचार संपण्याच्या काही तास आगोदर शहरात त्यांनी वाहनफेरी काढली. या फेरीसाठी शहरातील चौकाचौकातील तरुणांनी भरभरून प्रतिसाद दिला. सकाळपासून टीव्ही सेंटर चौकामध्ये रांगेत ट्रॅक्टर उभे करण्यात येत होते. दुपारी हर्षवर्धन जाधव यांचे आगमन झाल्यानंतर एका रांगेत आणि शिस्तीत ट्रॅक्टर फेरीमार्गावर निघाली. पहिल्याच ट्रॅक्टरमध्ये हर्षवधर्नन जाधव बसून जनतेला अभिवादन करत होते. या ट्रॅक्टरफेरीमागे दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचाही समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंगल बातम्या क्राईम

0
0

सिडकोत विद्यार्थ्याचा

लॅपटॉप पळवला

…औरंगाबाद : सिडकोतून मोहम्मद झोयेब जाहीद हसन (वय २० रा. एन चार, सिडको) याचा लॅपटॉप चोरट्यांनी खोलीमधून लांबवला. हा प्रकार पाच मार्च रोजी सिडको, एन एक भागात घडला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी लांबवली

औरंगाबाद : भावसिंगपुरा भागात शेख सुफियान शेख तुराब (वय २०, रा. बाबर कॉलनी, कटकटगेट) याची दुचाक चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार शुक्रवारी भीमनगर, भावसिंगपुरा भागात घडला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारू विक्रेता गजाआड

औरंगाबाद : अवैधरित्या देशी दारुची विक्री करणारा आरोपी कृष्णा भास्कर पवार (वय २३, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. हा प्रकार शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास इंदिरानगर भाजी मंडईमध्ये घडला. आरोपीच्या ताब्यातून १९०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली.

डीजे वाजवल्याने गुन्हा

औरंगाबाद : मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याप्रकरणी कमलेश कैलास आहेर (रा., एन ११, हडको) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकरा १३ एप्रिल रोजी सिडको एन सातमधील कम्युनिटी सेंटरजवळ घडला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्याचे जमादार गोकुळ लोधवाल यांनी तक्रार दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images