Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘ध्यास’च्या वार्षिकोत्सवात मोहक अदाकारीची मेजवानी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दरवर्षीप्रमाणे यंदाही 'ध्यास परफॉर्मिंग आर्ट्स'चा वार्षिंक नृत्योत्सव तापडिया नाट्यमंदिर येथे रसिकांच्या प्रतिसादात पार पडला. एकापेक्षा एक अशा मोहक नृत्याच्या अदाकारीची रसिकांना मेजवानी मिळाली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत अष्टपुत्रे व रूपाली अष्टपुत्रे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात 'भरतनाट्यम्'मधील अडवू,

हस्तमुद्रा विनियोग, श्लोकम, अलारीपू, मल्लरी, कौतुकम, पदम्, तिल्लाना या पारंपरिक रचनांनी झाली. लयबद्ध व तालबद्ध हालचालींसह भावपूर्ण अभिनय तसेच विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद, यामुळे उत्तरोत्तर या कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. यानंतर सादर झालेल्या 'कृष्णकथा' या नृत्याद्वारे कृष्णजन्म, कालिया मर्दन, लोणी चोरणारा कृष्ण, गोपीची छेड काढणारा कृष्ण, गोवर्धनधारी, कंसवध असे कृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंग बालकलाकारांनी लिलया सादर केले. सचिन नेवपूरकर यांनी संगीतबद्ध केलेल्या रचनेला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. यानंतर सादर झालेला अरुंधती पटवर्धनदिग्दर्शित 'कृष्णरंग' या नृत्याविष्काराने कार्यक्रमाची रंगत टिपेला पोहोचली. एक भक्त कृष्णाच्या अनेक रुपांवर भक्ती करतो, पण सर्वार्थाने जनमानसात प्रिय असलेला भगवान कृष्ण वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी भूतलावर अवतरला आहे, याची प्रचिती 'कृष्णरंग'मधून देण्याचा प्रयत्न झाला. केतकी नेवपूरकर, उज्ज्वल गाडगीळ-कश्यप, प्राजक्ता राजूरकर, रिद्धी बारपांडे, मानसी कुलकर्णी यांनी सादर केलेल्या 'कृष्णरंग'ने रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा रुपाल यांनी केले, तर ध्वनी व्यवस्था अविनाश थिगळे यांनी सांभाळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झाडे जगविण्यासाठी पाचोळ्याचे आच्छादन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळामुळे झाडे जगविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत जमिनीत ओलावा राहावा म्हणून पालापाचोळ्याचे आच्छादन करून वृक्षसंवर्धानसाठी पुढाकार घेऊन 'प्रयास'तर्फे पाण्याची बचत केली जात आहे.

शहरात वृक्षराजी असावी, वातावरण प्रदूषणमुक्त राहावे, सिमेंटच्या जंगलात जगणे सुसह्य व्हावे यासाठी प्रयास फाऊंडेशनने गेल्या काही वर्षांपासून 'ग्रीन औरंगाबाद' हा उपक्रम हाती घेतला आहे. गेल्या पावसाळ्यात 'प्रयास'ने रेल्वे स्टेशन परिसरातील अमृतसाई सोसायटी, जलसंपदा विभाग परिसर, कारगिल उद्यान, पुंडलिकनगर येथील अंलकार सोसायटी, जालाननगर आदी परिसरात स्थानिकांच्या सहकार्याने वृक्षारोपण केले. या झाडांच्या जतन व संवर्धनासाठी स्वंयसेवकांनी खास लक्ष दिले जात आहे. मात्र, यंदा दुष्काळामुळे लावलेली झाडे जगवायची कशी, असा प्रश्न प्रयास संस्थेच्या स्वंयसेवकांनाही पडला. त्यावर चर्चेअंती पालापाचोळ्याचे आच्छादनाचा पर्याय समोर आला, अशी माहिती प्रयासचे रवी चौधरी यांनी दिली. जमिनीतील पाणी बाष्पीभवनाद्वारे तर, झाडातील पाणी पानामधून होणाऱ्या उत्सर्जन क्रियेमुळे झपाटयाने कमी होते. या दोन्ही क्रियांना प्रतिबंध करण्यासाठी आच्छादनाचा वापर करणे फायदेशीर ठरते. या उपक्रमात कृणाल चौधरी, पुष्पक हुरपडे, सचिन दराडे, शिवानी देशपांडे, प्रीती शहा, धनंजय गोखले यांच्यासह अनेक स्वंयसेवकांनी पुढाकार घेतला.

लावलेल्या रोपांच्या बाजूला पालापाचोळ्याचे आच्छादन टाकले. त्याचा मोठा फायदा हा गारवा निर्माण करण्यासाठी झाला. त्यातून जमिनीची धूप थांबली. राणानगर व दर्गा रोड परिसरातील स्थानिक नागरिक तसेच महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे पालापाचोळ्याचा प्रश्न सुटला. रोपांना पालापाचोळा टाकल्यामुळे पाण्याची बचत झाली तसेच कंपोस्ट खत म्हणून ते फायदेशीर ठरले.

- रवी चौधरी, प्रयास

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवशाही’ला अपघाताचे दुष्टचक्र

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विभागात गेल्या चार महिन्यांत शिवशाही बसला एक-दोन नव्हे तर, तब्बल २७ अपघात झाले असून यात चार जणांचा बळी गेला. त्यात वीसपेक्षा जास्त प्रवासी जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून शिवशाही बस सेवा सुरू करण्यात आली. औरंगाबाद विभागात १७ डिसेंबर २०१८ पासून या बस सुरू झाल्या. राज्यभरात १५०० गाड्या शिवशाही बसमध्ये वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागात शिवशाही बसची संख्या ३६च्या वर पोहोचली. या सर्व बस टप्प्याने वाढविण्यात आल्या आहेत. सध्या औरंगाबाद - पुणे, औरंगाबाद - नाशिक, औरंगाबाद - मुंबई औरंगाबाद - जळगाव या मार्गासह नागपूर, बीड आणि लातूरसह अन्य मार्गावर या शिवशाही बसमधून प्रवासी वाहतूक केली जात आहे. एसटी विभागाकडून शिवशाही बसचा वापर वाढल्याने त्यांच्या अपघाताचेही प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या चार महिन्यांत शिवशाही बसचे आतापर्यंत एकूण २७ अपघात झाल्याची नोंद आहे. अपघात झालेल्या बसमध्ये २२ बस एसटी महामंडळाच्या मालकीच्या असून, उर्वरित पाच बस भाडेतत्वावरील आहेत. यात चार अपघात गंभीर असून आतापर्यंत चार जणांना जीव गमवावा लागला. अन्य अपघातात वीसपेक्षा जास्त प्रवासी जखमी झाल्याची नोंद 'एसटी' विभागात आहे.

\B'एसटी'ला फटका

\Bशिवशाही बसचे अपघात वाढत असल्यामुळे मृत आणि जखमींना एसटी विभागाकडून अपघाती मदत करण्यात येत आहे. शिवाय 'एसटी'च्या शिवशाही बस दुरुस्तीचा खर्चही महामंडळाला करावा लागत आहे. हा खर्च लाखो रुपयांच्या घरात पोहोचला आहे. भाडेतत्वावर असलेल्या गाड्यांच्या दुरुस्तीचा खर्च संबंधित मालकाकडे असल्याकारणाने पाच शिवशाही सुधारण्याचा खर्चातून एसटीला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. …

\B---

मटा भूमिका

---

उत्तम सुविधा द्यावी

\B---

राज्यात 'एसटी'चे उत्पन्न वाढावे आणि खासगी ट्रॅव्हल्सला जोरदार टक्कर देता यावी म्हणून शिवशाही बस सुरू करण्यात आल्या. या प्रवासाचे दरही महागडे ठेवण्यात आले. मात्र, त्या प्रमाणात प्रवाशांना सुविधा देण्यात आल्या नाहीत. शिवशाही बस आल्यापासून सुरू झालेल्या समस्यांचे रडगाणे थांबायला तयार नाही. सुरुवातीला या बस गरम होऊन वारंवार बंद पडायच्या. आता त्यात अपघातांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे या बससाठी खास प्रशिक्षित चालक नेमण्यात आले आहेत. मात्र, शिवशाहीच्या प्रवासाचा दर्जा सुधारत नाही. जोपर्यंत उत्तम सुविधा पुरविल्या जात नाहीत, तोपर्यंत शिवशाहीचे बस्तान बसणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान केंद्रावरील रॅम्प शोभेचे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बहुतेक मतदान केंद्रात मतदारांच्या रांगा कायम राहिल्या. उन्हाची तमा न बाळगता मतदारांनी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रांवर नुकतेच बांधलेले रॅम्प शोभेचेच ठरले. हा देखावा का निर्माण केला, असा प्रश्न मतदार विचारत होते.

कडा कार्यालयाच्या मुख्य इमारतीत तीन मतदान केंद्रांवर सकाळी सातपासून लागेल्या रांगा दुपारी रणरणच्या उन्हात कायम होत्या. येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसला. शिवाजीनगर परिसरातील विविध शाळांमधील मतदान केंद्रावर हेच चित्र दिसले. ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी निवडणूक आयोगाने रिक्षांची व्यवस्था केली होती. याशिवाय काही कार्यकर्त्यांनी देखील वाहनांची व्यवस्था केल्याने त्यांना मतदान केंद्रापर्यंत येणे सुसह्य ठरले.

कांचनवाडी, नक्षत्रवाडी, ईटखेडा येथील मतदान केंद्रांवर सुद्धा मतदारांच्या रांगा होत्या. कडक ऊन असले तरी डोक्याला रुमाल, स्कार्फ गुंडाळून महिला व पुरूष मतदारांनी रांगा लाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदार यादीत नाव शोधून देण्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्याला सुद्धा ऊन-सावलीचा खेळ सोसावा लागला. ते झाडांचा सावलीप्रमाणे टेबल, खुर्ची फिरवत होते. साताऱ्यात अरूंद रस्त्यावर शेजारी-शेजारी व आमने-सामने प्रमुख उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचे शामियाने होते. येथे शेडनेट टाकल्याने मतदारांचीही सोय झाली. जिल्हा परिषद शाळा, चाटे स्कूल आणि रेणुका शाळेत मतदान केंद्र होते. येथे उन्हामुळे मतदारांचे हाल झाले. शाळेच्या आवारात सावली असली तरी बाहेर उन्हातच उभे रहावे लागले.

\Bपायऱ्याच बऱ्या \B

ज्येष्ठ, वयोवृद्ध मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर रँपची व्यवस्था करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. परंतु, बहुतेक मतदान केंद्रांवर रॅम्पची स्थिती 'ताजी' होती. नुकतेच रॅम्प बांधलेले असल्याने त्यावरून चालणे कठीण होते. त्यामुळे मतदारांनी पायऱ्या चढून जाण्याचा पर्याय निवडला. हा देखावा का केला, असा प्रश्न विचारला जात होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडी नेसलेल्या चोराने पळवले लाखो रुपये

0
0

औरंगाबाद:

साडी घातलेल्या चोरट्याने झाडाच्या सहायाने घरात शिरून एक लाख ९० हजाराची रोकड लांबवली. बुधवारी पहाटे पावणेतीन वाजता हा प्रकार गजानननगर, पुंडलिकनगर भागात घडला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गारखेडा, गजानननगर भागात विनोद शंकर काकडे वय ४१ हे आई वडील, पत्नी, भाऊ आणि मुलांसह राहतात. काकडे हे मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घरी आले. चॅनल गेटला कुलूप लावल्यानंतर ते घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये झोपण्यासाठी निघून गेले. घराच्या पहिल्या मजल्यावरील समोरील खोलीत त्यांची आई झोपलेली होती तर बाजूच्या हॉलमध्ये मुलगी वडील आणि पुतण्या झोपलेले होते. पहाटे पावणेतीन वाजेच्या सुमारास त्यांच्या मुलीला घरात कोणी तरी आल्याची चाहूल लागली. तिने आरडाओरड करताच काकडे आणि त्यांचे भाऊ खाली आले. यावेळी घरात साडी घातलेल्या चोरट्याने लोखंडी पेटीचे कुलूप तोडून आतमधील पैशाची बॅग काढली होती. काकडे यांनी बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने बॅगमधील एक लाख ९० हजाराची रक्कम घेत गॅलरीतून उडी मारून पलायन केले. गॅलरीला लागून असलेल्या सीताफळाच्या झाडावरून चढत आतमध्ये प्रवेश केला असल्याचे यावेळी दिसून आले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साथीदारांची पाळत

काकडे यांच्या घरात साडी घातलेल्या चोराने प्रवेश केला. यावेळी चोरट्याचे दोन साथीदार गल्लीच्या दोन कोपऱ्यावर उभे असल्याची माहिती मिळाली आहे. चोरट्याने गॅलरीतून उडी मारल्यानंतर या साथीदारासोबत पलायन केले असल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशाच्या वादातून होमगार्डचा गळा चिरून खून

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैशाच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून होमगार्ड तसेच गॅस डिलेव्हरीचे काम करणाऱ्या तरुणाचा चाकुने वार करीत खून करण्यात आला. बुधवारी सव्वाआठ वाजता रहेमानिया कॉलनी भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी संशयित आरोपीला जिन्सी पोलिसांनी अटक केली आहे.

मृत होमगार्डचे नाव काझी शफी अहेमद काझी शकील अहेमद (रा. नागसेन कॉलनी) असे आहे. काझी हा रहेमानिया कॉलनी भागातील औरंगाबाद हॉटेलजवळ उभा होता. यावेळी संशयित आरोपी जमीलखान (रा. बारी कॉलनी) त्या ठिकाणी आला. पैशाच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी जमीलखानने स्वत:जवळील चाकूने काझीच्या गळ्यावर वार केला. गंभीर झालेला काझी खाली कोसळल्यानंतर आरोपी पसार झाला. काझीला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पसार आरोपी जमीलखानचा शोध घेत त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात उशीरापर्यंत गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती. घटनास्थळी रात्री उशीरापर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस उपायुक्त राहूल खाडे यांनी या घटनेला दुजोरा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक मतीन हर्सूल कारागृहात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेत शिपाईची नोकरी लावून देतो म्हणत ३० वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिच्यासह कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणातील आरोपी नगरसेवक सय्यद मतीन याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी सोमवारी (२२ एप्रिल) दिले. पया प्रकरणात मतीनला शुक्रवारी (१९ एप्रिल) रात्री अटक करून कोर्टात हजर केले असता, सोमवारपर्यंत (२२ एप्रिल) पोलिस कोठडी सुनावली होती. तीच्या मृत्यूनंतर ही महिला २०१५ मध्ये परभणीहून औरंगाबादला राहण्यासाठी आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुदखेड-परभणी दुहेरी रेल्वेमार्ग ऑक्टोबर अखेरीस

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुदखेड ते परभणी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या चुडवा ते पुर्णा दरम्यान काम सुरू आहे. मुदखेड ते मालटेकडी आणि मालटेकडी-नांदेड-लिंबगाव दरम्यान इंटरलॉकिंगचे काम पूर्ण झाले आहे.

मुदखेड ते परभणी या ८१.४३ किलोमिटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणाचे काम सध्या करण्यात येत आहे. परभणी ते मिरखेल दरम्यानचा टप्पा २०१७च्या अखेरीस पूर्ण करण्यात आले होते. यानंतर मुदखेड ते मालटेकडी आणि मालटेकडी-नांदेड-लिंबगाव या दरम्यानचे काम गेल्या वर्षी पूर्ण करण्यात आले. या कामासाठी १४ दिवसांचा इंटरलॉकिंग पिरियड घेण्यात आला होता. सध्या पुर्णा शहराबाहेरील रेल्वेपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम जागेची उपलब्धता नसल्याने थांबले होते. काही महिन्यापूर्वी जागेचा प्रश्न सुटला. येथील पूल काही महिन्यांत बांधून पूर्ण होण्याची शक्यता आहे. चुडावा ते पुर्णा दरम्यानचे दुपदरीकरणाचे काम पुढील दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती रेल्वे विभागातील सूत्रांनी दिली.

……

\Bमहाव्यवस्थापकांचे आदेश \B

औरंगाबादसह नांदेड विभागाच्या दौऱ्यावर दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी मुदखेड ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाचा आढावा घेतला. या कामातील दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून हे काम येत्या ऑक्टोबर ते नोव्हेबरपर्यंत पूर्ण करावे, असे आदेश त्यांनी दिल्याची माहिती मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाटीत रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या एका रुग्णाने बुधवारी (२४ एप्रिल) घाटी रुग्णालयातील मेडिसिन विभागाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत संबंधित रुग्णाचे प्राण वाचविले. दुर्धर आजाराचे निदान झाल्याने डॉक्टर व कुटुंबीयांची नजर चुकवून रुग्णाने पळ काढला होता. 'मला जगायचे नाही,' असे म्हणत तो धावत सुटल्याने एकच गोंधळ उडाला. त्याचवेळी जवानांनी धाव घेऊन सर्व गेट बंद केले. त्यानंतर रुग्णाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला असता जवानांनी त्याला पकडून पुन्हा वॉर्डात दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळसूत्र चोरांचा शहरात शिरकाव

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात बऱ्याच कालावधीनंतर दुचाकीस्वार मंगळसूत्र चोरट्यांनी डोकेवर काढले आहे. सिडको आणि सातारा येथील घटनांत बुधवारी सकाळी दोन ठिकाणी सोनसाखळी पळविण्यात आली. या प्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मंगळसूत्र चोरीची पहिली घटना बुधवारी सकाळी साडेसहा वाजता बीड बायपास रोडवर घडली. कमलाबाई रामगोपाळ राठी (वय ८०, रा. अय्यपा मंदिराजवळ) या सकाळी साडेसहा वाजता पायी फिरण्यासाठी जात होत्या. यावेळी लाल रंगाच्या पल्सर दुचाकीवर दोन अनोळखी तरुण त्यांच्या जवळ आले. या दोघांनी राठी यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची सोनसाखळी हिसकावून पसार झाले. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळसूत्र चोरीची दुसरी घटना सिडको एन - ६ परिसरातील विजयश्री कॉलनी येथे बुधवारी सकाळी घडली. पुष्पाबाई बंठा (वय ७२, रा. सत्यमनगर) या विजयश्री कॉलनीतून पायी जात होत्या. यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील साडेसहा तोळ्याची सोनसाखळी हिसकावत पसार झाले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे प्रमुख कार्यकर्ते मुंबईकडे होणार रवाना

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर 'आता लक्ष मुंबईकडे' म्हणत भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी प्रचारानिमित्ताने मुंबईला जाणार आहेत.

लोकसभा निवडणुकीनिमित्ताने गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले होते. मंगळवारी मतदान झाले. त्यानंतर भाजपचे अनेक प्रमुख कार्यकर्ते 'चलो मुंबई' म्हणत प्रचारासाठी सज्ज झाले आहेत. भाजप कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर बुधवारीच मुंबईला रवाना झाले असून, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी आज रवाना होणार आहेत. त्यांच्या समवेत शहर सरचिटणीस जगदीश सिद्ध हेही असणार आहेत. यासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल मकरिये, शहर सरचिटणीस दिलीप थोरात यांच्यासह अन्य काही प्रमुख पदाधिकारी मुंबईला प्रचारार्थ जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेत क्लोरिन युनिट गैरव्यवहाराचा आरोप

0
0

क्लोरिन युनिट खरेदीत दीड कोटींचा गैरव्यवहार

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत आरोप

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हातपंपावर बसविण्यात आलेल्या क्लोरिन युनिट खरेदीमध्ये दीड कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. राज्यातील अन्य जिल्हा परिषदांमध्ये हे युनिट ज्या किमतीत खरेदी केले गेले. त्यापैक्षा सहा पट जास्त दराने आपल्या जिल्हा परिषदेत खरेदी केले. कंत्राटदाराची ३० टक्के देयके थांबविण्याचे सांगूनही प्रशासनाने हे देयक अदा केल्यावरून जिल्हा परिषद सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

यशवंतराव चव्हाण सभागृहात बुधवारी सर्वसाधारण सभा झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे, सीइओ पवनीत कौर, अतिरिक्त सीइओ अशोक शिरसे, कॅफो अप्पासाहेब चाटे आदींसह अधिकारी, सदस्य उपस्थित होते.

जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने २०१७ -१८ मध्ये नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत ग्रामीण भागात १९००हातपंप बसविले. ते पाणी शुद्ध राहावे, यासाठी क्लोरिन युनिट लावण्यात येते. हे युनिट बसवण्यासाठी दीड कोटींचा निधी जिल्हा परिषदेस प्राप्त झाला होता. त्यातून हातपंपांना क्‍लोरीन युनिट बसवण्यात आले. हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी सदस्यांनी केल्या होत्या. औरंगाबाद जिल्हा परिषदेने खरेदी केलेल्या युनिटची किंमत राज्यातील अन्य झेडपीने खरेदी केलेल्या युनिटच्या तुलनेत सहापट असल्याचे काही सदस्यांनी पुराव्यानिशी दिले होते. संबंधित कंत्राटात ३० टक्के रक्कम ही वर्षभरानंतर क्लोरिन युनिटची दुरुस्ती करून अदा करण्याचे ठरले होते. ही रक्कम थांबवावी, असे सदस्यांनी म्हटले होते. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी हे काम करणार्‍या कंत्राटदाराचे ५० लाख रुपयांचे बिल रोखले होते. अर्दड गेल्यानंतर सीइओ पवनीत कौर यांना कळू न देता अधिकाऱ्यांनी हे बिल दिल्याचा आरोप उपाध्यक्ष केशवराव तायडे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या विषयावर सभागृहात जोरदार चर्चा झाली. किशोर बलांडे, मधुकर वालतुरे, रमेश गायकवाड, एल. जी. गायकवाड आदींनी चर्चेत सहभाग घेतला. आम्हाला लेखी आश्वासन देऊनही प्रशासनाने अंधारात ठेवल्याचा आरोप केला. आम्ही सांगूनही बिल देण्यात आले, हे खरे आहे काय ? असा सवाल एल.जी. गायकवाड यांनी उपस्थित केला. त्यास उपाध्यक्ष केशवराव तायडे पाटील यांनीही दुजोरा दिला.

यावर उत्तर देताना प्रभारी कार्यकारी अभियंता अशोक घुगे म्हणाले, की योजनेचा निधी मार्चमध्ये परत जाणार होता. त्यासाठी रक्कम कंत्राटदाराला देण्यात आली.

सर्वसाधारण सभेत क्‍लोरिन युनिटच्या किमतीसंदर्भात प्रश्‍न उपस्थित झाला होता. आपल्याकडेच या युनिटची किंमत कशी काय वाढली, सर्वांचे हात त्याला लागल्यानेच किंमत वाढली काय ? असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला. यावरुन जोरदार चर्चा झाली. याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे तायडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकर फेऱ्यांमध्ये गैरप्रकारांचा आरोप

0
0

झेडपी सदस्यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे. ९०० हून अधिक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र हे तपासण्याची यंत्रणा सक्षम नाही. फेऱ्या खोट्या नोंदविल्या जातात. ग्रामसेवक व टँकरचालक यात सहभागी आहेत, या गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी केली.

याच्या चौकशीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात येईल, असे अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी जाहीर केले. जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी

डोणगावकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी

समिती नेमण्यात येईल असे जाहीर केले.

जिल्हा परिषदेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणीप्रश्नावर दीर्घ काळ चर्चा झाली. ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. मात्र त्याच्या फेऱ्यांमध्ये गडबड होत असल्याचा आरोप जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे, किशोर बलांडे, रमेश गायकवाड, मधुकर वालतुरे यांनी केला. अनेक गावांमध्ये आठ - आठ दिवस टँकर येत नसल्याचे तायडे यांनी सांगितले.एक खेप टाकून बिले मात्र दोन खेपांची उचलली जात आल्याचा आरोप त्यांनी केला. टॅंकरचालक व ग्रामसेवक संगनमत करुन अर्धे पाणी गावाला तर अर्धे पाणी ढाब्यांवर विकत असल्याचा आरोप केला. एल.जी. गायकवाड यांनी केला. बाजारसावंगी गावाला २० हजार लिटरच्या टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे मंजूर झाले असताना प्रत्यक्षात १२ हजार लिटरच्या टॅंकरनेच पाणीपुरवठा केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. पुरावे दिले तरी तालुकास्तरावरचे अधिकारी ठेकेदाराची बाजू घेत असल्याचे सांगून मंजूर खेपा व प्रत्यक्षात टाकण्यात येत असलेल्या खेपा तपासाव्यात, अशी मागणी करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य कलीम कोदन म्हणाले, की त्यांच्या सर्कलमधील साजापूरमध्ये टॅंकरचालक व ग्रामसेवक टॅंकरचे पाणी कंपन्यांना विकतात. साजापूरमध्ये कोणत्या ठिकाणी टॅंकर रिकामे केले जातात याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवू असे सांगून त्यांनी प्रशासनाला आव्हान दिले.

सीइओंच्या अध्यक्षतेखाली समिती

सीईओ पवनीत कौर म्हणाल्या, की यासंदर्भात माझ्याकडे व विभागीय आयुक्‍तांकडे तक्रारी आल्या आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरचालकांचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. टॅंकर पुरवठ्याबाबत सदस्यांनी उपअभियंता व गट विकास अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्याच्या सूचना केल्या. साजापूर प्रकरणात एका कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी टॅंकरसंदर्भातील सदस्यांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी सीईओंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल असे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शास्त्रीय नृत्यातून उलगडले तुकोबा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पांडुरंग, विठ्ठला'..'वृक्षवल्ली' ते 'सुंदर ते ध्यान' असे विविध अंभग भरतनाट्यम सेमीक्लासिकलमध्ये सादर करत तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र कलाकरांनी उभे केले. निमित्त होते देवमुद्रा संस्कृती सौभाग्य प्रतिभा शास्त्रीय नृत्य महोत्सवाचे. अभिनय-नृत्य अविष्कार असलेला 'विठ्ठल तुकयाचा' हा कार्यक्रम रसिकांना मंत्रमुग्ध करणारा ठरला.

तापडिया नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक महोत्सवात कलाकारांनी अभिनय-नृत्याचा अविष्कार असलेला 'विठ्ठल-तुकयाचा' ही नृत्यनाटिका सादर केली. तुकारामांच्या आत्मचरित्रपर अभंगांवर आधारित नृत्यनाटिकेतून कलाकारांनी तुकाराम महारांजांचा जीवनपट उलगडला. तुकारामांच्या आत्मचरित्रपर अभंगांवर आधारित या कार्यक्रमास सुरुवात झाली ती 'पांडुरंग विठ्ठला' अभंगाने. यासह वृक्षवल्ली, सुंदर ते ध्यान, खेळ मांडियला अशा अभंग, गीतावर कलाकारांनी महाराजांचा जीवनचरित्र मांडले. त्याकाळची परिस्थिती, दुष्काळ, विठ्ठलाचा केलेला धावा, विठ्ठल भक्तीत रममाण झालेले तुकोबाराय अन् भक्तीला पावलेला विठ्ठल अशा विविध रुप अभिनय, नृत्यातून सादर केले. रामदास पवार रचित या नृत्यनाटिकेत व्ही. सौमश्री यांच्या मार्गदर्शनाखाली मयुरी पानसे, क्षीतिजा कुलकर्णी, ईशीता कुलकर्णी, इशानी कुलकर्णी, चैत्राली दाभोळकर, तृप्ती कुर्ले, वेदांगी हिसवणकर, सागर कारके, विनोद चव्हाण, सुहासिनी पठारे, विनोद चव्हाण, सई घाडगे या कलाकारांनी सहभाग घेतला. ४५ मिनिटांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. यानंतर विष्णुचे दशावतार सादर केले. गायन विश्वनाथ दाशरथे तर निवेदन रामदास पवार व योगेश इरतकर यांनी केले. महोत्सवाच्या प्रारंभी केतकी नेवपूरकर यांनी भरतनाट्यम सादर केले. महोत्सवात गुरुवारी दुपारी दोन नंतर भरतनाट्यम स्पर्धा रंगणार आहे. राज्यभरातून आलेले स्पर्धक यात सहभागी होणार आहेत. यानंतर डॉ. राजलक्ष्मी सेठ कुचीपुडी सादर करणार आहेत. वैभव आरेकर यांचा सोलोडान्स असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवशाही’ला अपघाताचे दुष्टचक्र

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विभागात गेल्या चार महिन्यांत शिवशाही बसला एक-दोन नव्हे तर, तब्बल २७ अपघात झाले असून यात चार जणांचा बळी गेला. त्यात वीसपेक्षा जास्त प्रवासी जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून शिवशाही बस सेवा सुरू करण्यात आली. औरंगाबाद विभागात १७ डिसेंबर २०१८ पासून या बस सुरू झाल्या. राज्यभरात १५०० गाड्या शिवशाही बसमध्ये वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागात शिवशाही बसची संख्या ३६च्या वर पोहोचली. या सर्व बस टप्प्याने वाढविण्यात आल्या आहेत. सध्या औरंगाबाद - पुणे, औरंगाबाद - नाशिक, औरंगाबाद - मुंबई औरंगाबाद - जळगाव या मार्गासह नागपूर, बीड आणि लातूरसह अन्य मार्गावर या शिवशाही बसमधून प्रवासी वाहतूक केली जात आहे. एसटी विभागाकडून शिवशाही बसचा वापर वाढल्याने त्यांच्या अपघाताचेही प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या चार महिन्यांत शिवशाही बसचे आतापर्यंत एकूण २७ अपघात झाल्याची नोंद आहे. अपघात झालेल्या बसमध्ये २२ बस एसटी महामंडळाच्या मालकीच्या असून, उर्वरित पाच बस भाडेतत्वावरील आहेत. यात चार अपघात गंभीर असून आतापर्यंत चार जणांना जीव गमवावा लागला. अन्य अपघातात वीसपेक्षा जास्त प्रवासी जखमी झाल्याची नोंद 'एसटी' विभागात आहे.

\B'एसटी'ला फटका

\Bशिवशाही बसचे अपघात वाढत असल्यामुळे मृत आणि जखमींना एसटी विभागाकडून अपघाती मदत करण्यात येत आहे. शिवाय 'एसटी'च्या शिवशाही बस दुरुस्तीचा खर्चही महामंडळाला करावा लागत आहे. हा खर्च लाखो रुपयांच्या घरात पोहोचला आहे. भाडेतत्वावर असलेल्या गाड्यांच्या दुरुस्तीचा खर्च संबंधित मालकाकडे असल्याकारणाने पाच शिवशाही सुधारण्याचा खर्चातून एसटीला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. …

\B---

मटा भूमिका

---

उत्तम सुविधा द्यावी

\B---

राज्यात 'एसटी'चे उत्पन्न वाढावे आणि खासगी ट्रॅव्हल्सला जोरदार टक्कर देता यावी म्हणून शिवशाही बस सुरू करण्यात आल्या. या प्रवासाचे दरही महागडे ठेवण्यात आले. मात्र, त्या प्रमाणात प्रवाशांना सुविधा देण्यात आल्या नाहीत. शिवशाही बस आल्यापासून सुरू झालेल्या समस्यांचे रडगाणे थांबायला तयार नाही. सुरुवातीला या बस गरम होऊन वारंवार बंद पडायच्या. आता त्यात अपघातांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे या बससाठी खास प्रशिक्षित चालक नेमण्यात आले आहेत. मात्र, शिवशाहीच्या प्रवासाचा दर्जा सुधारत नाही. जोपर्यंत उत्तम सुविधा पुरविल्या जात नाहीत, तोपर्यंत शिवशाहीचे बस्तान बसणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मटा’च्या ‘किड्स कार्निवल’ला शुक्रवारपासून

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सगळीकडे उन्हाळी सुट्यांची धम्माल सुरू असताना 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे २६, २७ आणि २९ व ३० एप्रिल रोजी सिडकोतील गरवारे कम्युनिटी सेंटर (एन-सात) याठिकाणी 'किड्स कार्निवल'चे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये जास्तीत जास्त मुलांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कार्टून्स हा तर मुलांचा अतिशय आवडीचा विषय असतो. दिवसभर टीव्हीवरचे कार्टून्स बघताना मुले थकत नाहीत, पण हे कार्टून तयार कसे होतात, त्यासाठी कोणते तंत्र वापरले जाते, हे जर शिकायचे असेल तर 'मटा किड्स कार्निवल'मध्ये नक्की यायला पाहिजे. असेच कार्टून्स, भरपूर गोष्टी आणि बरेच काही उन्हाळ्याच्या सुटीमध्ये मुलांना या 'कार्निवल'मध्ये शिकायला मिळणार आहे.

वर्षभर शाळा, क्लासेस, परीक्षांमुळे थकलेल्या मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. या सुट्यांमध्ये काय धम्माल करायची याचे प्लॅनिंग 'मटा'ने मुलांसाठी केले असून, त्यातून मुलांना भरपूर आनंद मिळणार आहे. यावर्षीचा 'किड्स कार्निवल' शुक्रवारपासून (२६ एप्रिल) सुरू होत आहे. या कार्निवलमध्ये मुलांसाठी कार्टून्स तयार करण्यापासून गोष्टी सांगणे, म्युझिकल इंस्ट्युमेन्ट व संगीत, हस्ताक्षर कार्यशाळा असे अनेक धमाल उपक्रम घेतले जाणार आहे.

किड्स कार्निवल सिडको एन-सात येथील गरवारे कम्युनिटी सेंटर येथे दररोज सकाळी दहा ते दुपारी १२ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. मुलांना गोष्ट ऐकायला फार आवडते. परी, राक्षस, राजा यांच्या गोष्टी म्हणजे मुलांसाठी पर्वणीच असते, पण कथेतून विज्ञानाला अधिक सोपे करणाऱ्या कथा मुलांना या कार्निवलमध्येही ऐकायला मिळणार आहेत. या कथांमधून मुलांचे मनोरंजन, शिक्षण तर होईलच शिवाय संस्कारही मिळतील. २६ एप्रिल रोजी फिटनेस वर्कशॉप आणि कथा, गोष्टींचे वाचन होणार आहे. २७ एप्रिल रोजी कार्टून्स कसे तयार करायचे आणि त्यात रंग कसे भरायचे, याचे मार्गदर्शन लाभणार आहे. तर २९ एप्रिल रोजी विविध पक्ष्यांविषयीची माहिती देण्यात येईल. पक्षी कशा पद्धतीने घरटी तयार करतात यासह त्यांच्या आवाजांचे वैशिष्टये सांगण्यात येतील. ३० एप्रिल रोजी वाद्ये वाजविण्यासह शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण दिले जाईल.

कार्निवलमधील या विविध कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी नावे नोंदणी करणे आवश्यक आहे. सोमवारपासून सुरू होणारा 'मटा किड्स कार्निव्हल' मुलांसाठी पूर्णत: मोफत आहे. त्यामुळे वर्षभर अभ्यास करून कंटाळलेल्या आपल्या मुलांना या कार्निव्हलसाठी अवश्य पाठवा. दिवसभर टीव्हीसमोर बसणाऱ्या तुमच्या मुलाच्या चेहऱ्यावर हा कार्निव्हल झाल्यावर बघा कसे वेगळेच तेज आलेले तुम्हाला जाणवेल. तेव्हा त्वरित तुमच्या पाल्याची नोंदणी पुढील दूरध्वनीवर करा. अधिक माहितीसाठी व नावे नोंदणीसाठी ९८२२६३०५५५ या मोबाइलवर किंवा ०२४०-६६३०२०० या क्रमांकांवर संपर्क साधावा.

असे आहे वेळापत्रक

स्थळ : गरवारे कम्युनिटी सेंटर, एन-७ सिडको

वेळ : सकाळी दहा ते दुपारी १२

२६ एप्रिल : फिटनेस वर्कशॉप आणि कथा, गोष्टींचे वाचन

२७ एप्रिल : कार्टून्स बनवण्याचे प्रशिक्षण

२९ एप्रिल : विविध पक्ष्यांविषयीची माहिती

३० एप्रिल : वाद्य वादन व शास्त्रीय संगीत

नोंदणीसाठी संपर्क : ९८२२६३०५५५ किंवा ०२४०-६६३०२००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राखीव दलाची तुकडी एसटीतून बंदोबस्तासाठी रवाना

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादमधील मतदान संपल्यानंतर राज्य राखीव दलाच्या तुकड्या चौथ्या टप्प्यातील मतदान असलेल्या मतदारसंघाकडे एसटी बसमधून रवाना झाल्या. जिल्ह्यातून बुधवारी (२४ एप्रिल) ३३ बस राज्यातील विविध भागांकडे पाठविण्यात आल्या.

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी राज्य राखीव दलाच्या विशेष तुकड्या शहर आणि जिल्ह्यातील विविध भागात तैनात करण्यात आल्या होत्या. २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. त्यासाठी राखील पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. निवडणूक प्रक्रियेसाठी एसटी बसची व्यवस्था करण्यात आली होती. मतदानानंतर बुधवारी औरंगाबाद विभागातील ३३ बस पोलिसांच्या वाहतुकीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. त्यातील २४ बस सीबीएस येथून पाठविण्यात आलेल्या आहेत. या बस औरंगाबादहून धुळे, नंदुरबार, मुंबई आदी ठिकाणी २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. तेथे या कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक किशोर सोमवंशी यांनी दिली.

……

१७ तारखेपासून विशेष रेल्वे उभी

केंद्र आणि राज्य राखीव दलाची तुकडी घेऊन विशेष रेल्वे औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे १७ एप्रिल रोजी दाखल झाली होती. ही रेल्वे अजूनही औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक चारवर उभी आहे. या रेल्वेतून राखीव दलाची तुकडी पाठविण्यात येणार आहे, मात्र संबंधित शहराची माहिती देण्यात आलेली नाही, अशी माहिती रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिली.

……

आतापर्यंत मिळाले ७७ लाख

निवडणूक कामासाठी एसटी बसचा वापर करण्यात आला आहे. शिवाय पोलिसांच्या वाहतुकीसाठीही एसटीचा वापर करण्यात आला. त्यातून एसटी विभागाला पहिल्या टप्प्यात ६५ लाख तर, आताच्या टप्प्यात १२ लाख असे एकूण ७७ लाख रुपये मिळाल्याची माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली आहे.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यात टक्का कमी, मात्र मतदानात वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जालना लोकसभा मतदारसंघात ६४.५५ टक्के मतदान झाले असून गेल्यावेळच्या तुलनेत टक्का घसरलेला असली तरी प्रत्यक्षात मतदानाच्या संख्येत एक लाख ३५ हजार ४६१ मतांची वाढ झाली आहे. ही वाढलेली मते कोणाच्या पारड्यात पडली यावर विजयी उमेदवाराचे मताधिक्य असेल, असे बोलले जाते. २०१४च्या निवडणुकीत ६७. ४४ टक्के मतदान झाले होते व १० लाख ६६ हजार २५९ मतदारांनी मतदान केले होते. २०१४ च्या तुलनेत यंदा दोन लाख ८४ हजार १३३ नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली.

यावेळी सर्वात कमी मतदान जालना विधानसभा मतदारसंघात ५२.७७ टक्के झाले आहे. जालना शहरात निवडणूक चिठ्ठ्यांचे वाटप झाले नसल्याचा परिणाम मतदान कमी होण्यात झाले असावे, असा अंदाज आहे. मतदानाच्या एक दिवस आधी बीएलओंकडे सुपरवायझर मार्फत मतदान चिठ्ठ्यांचे गठ्ठे पाठवित आले. एका दिवसात एका वार्डात दीड हजार चिठ्ठ्यांचे वाटप करणे अशक्य होते.

सर्वाधिक मतदान भोकरदन विधानसभा मतदारसंघात ६९.६६ टक्के झाले आहे. भोकरदन विधानसभा मतदारसंघात २ लाख १० हजार २७१ मतदारांनी मतदान केले, त्यापैकी ९७ ५७० महिलांनी मतदान केले.

\Bविधानसभा मतदारसंघनिहाय मतदान \B

भोकरदन ६९.६६ टक्के

फुलंब्री ६६.२८ टक्के

बदनापूर ६७.५० टक्के

सिल्लोड ६३.१९ टक्के

पैठण ६९.०३ टक्के

जालना ५२.७७ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्थायी’साठी फिल्डिंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या स्थायी समितीत वर्णी लागावी म्हणून काही नगरसेवकांनी 'फिल्डिंग' लावणे सुरू केले आहे. विषय समितीचे सदस्य म्हणून काम करण्यास नगरसेवक उत्सुक नसल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी केलेल्या कामाचे मोजमाप करूनच नगरसेवकांची स्थायी समितीवर वर्णी लावण्याच्या दृष्टीने नेते आणि बडे पदाधिकारी विचार करू लागले आहेत. शुक्रवारी (२६ एप्रिल) स्थायी समितीच्या आठ आणि विषय समितीच्या ४५ सदस्यांची निवड केली जाणार आहे.

स्थायी समितीमध्ये १६ सदस्य असतात,त्यापैकी आठ सदस्य एक मे रोजी निवृत्त होत आहेत. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये रुपचंद वाघमारे (अपक्ष, शिवसेना पुरस्कृत), स्वाती नागरे (अपक्ष, शिवसेना पुरस्कृत), ऋषिकेश खैरे, रेणुकादास वैद्य, सिद्धांत शिरसाट (सर्व शिवसेना), सय्यद मतीन रशीद, शेख नर्गीस सलीम (एमआयएम), राणी देसरडा (भाजप) या नगरसेवकांचा समावेश आहे. शिवसेनेचे पाच, एमआयएमचे दोन आणि भाजपचा एक सदस्य स्थायी समितीमधून निवृत्त होणार आहे. त्यामुळे त्याच प्रमाणात स्थायी समितीत नवीन सदस्य जातील. सर्वात जास्त म्हणजे पाच सदस्य शिवसेनेतून स्थायी समितीवर जाणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; लोकसभा निवडणुकीत कोणत्या नगरसेवकाने कसे काम केले, याचे मूल्यमापन शिवसेनेच्यास्तरावर सुरू आहे. कोणत्या नगरसेवकांनी खरोखर काम केले आणि कोणत्या नगरसेवकांनी तोंडदेखलेपणाने काम केले याबद्दलचा 'होमवर्क' केला जात आहे. त्या आधारावर स्थायी समितीत वर्णी लावली जाणार आहे. त्यात काही जेष्ठ व काही प्रथमच निवडून आलेल्या नगरसेवकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. येत्या काळात विधानसभेची आणि त्यानंतर महापालिकेची निवडणूक होणार आहे. शहरातील विकास कामांसंदर्भात स्थायी समितीच्या सदस्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे अभ्यासू व सर्व विषयांत प्रशासनावर पकड ठेवू शकणाऱ्या नगरसेवकांना शिवसेनेतून स्थायी समितीवर पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एमआयएम आणि भाजपमध्ये देखील अशाच प्रकारचा मतप्रवाह असल्याची चर्चा जात आहे. लोकसभा निवडणूकीत एमआयएमचे काही नगरसेवक इम्तियाज जलील यांच्यापासून लांब होते. या नगरसेवकांना स्थायी समितीपासून देखील लांब ठेवण्याची व्यूहरचना एमआयएममध्ये आखली जात असल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे.

\Bविषय समित्यांसाठी ४५ सदस्य\B

महापालिकेत पाच विषय समित्या आहेत. प्रत्येक विषय समितीमध्ये नऊ सदस्यांची निवड केली जाते. पाच समित्यांसाटी ४५ नगरसेवक शुक्रवारी निवडले जातील. त्यात सर्वपक्षीय नगरसेवकांचा समावेश असेल. विषय समितीचे सदस्यपद हे फक्त नामधारी पद असल्यामुळे विषय समितीवर सदस्य म्हणून जाण्यासाठी नगरसेवक फार उत्सुक नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांगीर बाबा यात्रेला उत्साहात सुरुवात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेंद्रा कमंगर येथील मांगीरबाबा यात्रेनिमित्ताने दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. चैत्र पौर्णिमेपासून या यात्रेला सुरुवात झाली असून गळ टोचून घेण्यास प्रतिबंध करण्यात आला असून प्रभावी जनजागृतीमुळे त्यास भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामु‌ळे गळ टोचून घेतल्याची एकही घटना गेल्या दोन दिवसांत घडली नाही, अशी माहिती पोलिस प्रशासन तसेच देवस्थान समितीने दिली.

'नवसाला पावणारा देव', अशी ख्याती असलेल्या मांगीरबाबा यात्रेसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पंरपरेनुसार, रात्री १२ वाजता आरती करण्यात आली आणि विधीवत महापूजेनंतर यात्रेला सुरुवात करण्यात आली. नवस फेडण्यासाठी म्हणून येथे कोंबडी, बकरी यांचा बळी देण्याची प्रथा आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येथे भाविक येतात. अनेक जण दोन ते चार दिवस येथे मुक्कामी असतात. मिळेल त्या जागी ते पाल टाकतात. भाविकांसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून १५ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष भास्कर कचकुरे व सरपंच शुभांगी तांबे यांनी 'मटा'शी बोलताना दिली. पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात रांगा लावल्या. ग्रामस्थांनी भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तीव्र उन्हामुळे दर्शन रांग परिसरात मंडप टाकण्यात आला असून सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर जिल्हा प्रशासनाकडून पाण्यासह अन्य आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश चव्हाण यांनी केली.

गेल्या अनेक वर्षापासून येथे नवस फेडण्यासाठी गळ टोचून घेण्याची प्रथा जोपासली जाते. त्या विरोधात गेल्या काही वर्षात विविध संघटनांनी जनजागृती करत लोकांचे प्रबोधन केले. यंदाही पोलिस प्रशासनानेही फलक लावले तसेच पत्रकांचे वाटप करत जनजागृती केली. त्याचा चांगला परिणाम होत असून येथील इतिहासात प्रथमच गळ टोचणी पूर्णपणे बंद झाली. गेल्या दोन दिवसांत कोणीही गळ टोचला नाही, अशी माहिती समिती अध्यक्ष कचकुरे व चिकलठाणा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images