Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नवाबपुरा दंगलीच्या वर्षानंतरही मिळेना नुकसान भरपाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोट्यवधी रुपयांची हानी करणाऱ्या राजाबाजार नवाबपुरा येथील दंगलीला ११ मे रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या दंगलग्रस्तांना वर्षभरानंतरही कोणतीही नुकसान भरपाई दिली नसल्याचे दिसून येत आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेली ही दंगल सुमारे सात तास सुरू होती. या दंगलीत दोघांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी झाले होते.

११ मे २०१८ रोजी किरकोळ कारणावरून सुरुवातीला मोतीकारंजा भागात दोन गटात तणाव निर्माण झाला होता. या तणावाचे लोण काही वेळातच राजाबाजार, नवाबपुरा भागात पोहचले. यानंतर दोन गटात यावेळी तुफान दगडफेक, जाळपोळ झाली. या दगडफेकीत पेट्रोल बाँबचा देखील वापर करण्यात आला. जमावाने या दंगलीत अनेक दुकानांना आग लावत लक्ष्य केले. या दंगलीत सुमारे दहा कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. शहागंज चमन येथील चप्पल मार्केट या दंगलीत पूर्ण पेटवण्यात आले होते. पोलिसांच्या कमतरतेमुळे ही दंगल रात्रभर आटोक्यात आली नव्हती. सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर, पोलिस निरीक्षक हेमंत कदम, श्रीपाद परोपकारी या दंगलीत जखमी झाले होते. जमावाने एका घराला पेटवल्यामुळे तेथील ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. तसेच पोलिसांनी केलेल्या फायबर बुलेटच्या गोळीबारात एक तरुण ठार झाला होता. तत्कालीन पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पहाटे मुंबईवरून परतल्यानंतर कौशल्याने ही दंगल आटोक्यात आणली होती. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. विशेष पथकाने या दंगलीप्रकरणी नगरसेवक राजेंद्र जंजाळ, लच्छु पहेलवान, एमआयएमचा नगरसेवक फिरोजखान यांच्यासह इतरांना अटक केली होती. वर्ष उलटल्यानंतरही या दंगलीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याची माहिती येथील सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मराठवाडा ही लोककलेची खाण असून लोककलांचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे. भारुड आणि कीर्तन ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी 'महाराष्ट्र रंग'सारख्या महोत्सवाचा उपयोग होईल', असे प्रतिपादन भारुडकार निरंजन भाकरे यांनी केले. ते महोत्सवात बोलत होते.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील लोककलांना वाव देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय कलामंच यांच्या वतीने महाराष्ट्र रंग महोत्सव घेण्यात आला. स. भु. महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी महोत्सव रंगला. महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला भारुडकार निरंजन भाकरे, राष्ट्रीय कला मंचचे प्रसाद जाधव, प्राचार्य डॉ. प्रदिप जब्दे, शिवा देखणे उपस्थित होते. भाकरे यांनी कलाकारांच्या सादरीकरणावर भाष्य केले. 'तव्यावरील भाकरी ही अनुभवातूनच व्यवस्थितपणे भाजली जाते. त्याप्रमाणे कलाकारांचे व्यक्तिमत्व लोककलेचे सादरीकरण आणि अनुभवातून फुलते. कलाकारांनी आमिष आणि व्यसनापासून दूर राहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना व्यसन लोककला जतन आणि संवर्धनाचे असावे', असे भाकरे म्हणाले. समारोप सत्रात कीर्तनकार भरतबुवा रामदासी व अभाविपचे पश्चिम क्षेत्रीय संघटनमंत्री देवदत्त जोशी उपस्थित होते. या महोत्सवाला रसिक आणि कलाकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

महोत्सव रंगला

'महाराष्ट्र रंग' लोककला महोत्सवात युवा भारुडकार कृष्णाई उळेकर (पुणे) यांचा लोककला क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. महोत्सवात शताक्षी देशपांडे, धनश्री जोशी, अजिनाथ खिल्लारे, मयूर झाल्टे, प्रवीण गायकवाड, संतोष चव्हाण, गणेश गलांडे आदींनी सहभाग घेतला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूज पोलिस ठाण्यातून आरोपी पसार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज महानगर

औरंगाबाद-पुणे महामार्गावर लुटमारी प्रकरणात अटक केलेल्या संशयित आरोपीने शुक्रवारी (१० मे) सव्वा दोनच्या सुमारास वाळूज पोलिस ठाण्यातून पळून गेला. गणेश आण्णासाहेब बनसोडे (वय २७, रा. नांदलगाव, ता. पैठण), असे त्याचे नाव आहे.

लुटमारीच्या प्रकरणात गणेश बनसोडे याला ८ मे रोजी वाळूज पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली होती़ अटकेनंतर त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनविण्यात आली. त्याला शुक्रवारी सव्वा दोनच्या सुमारास वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या लॉकअपमधून टु मोबाइल व्हॅनने वाळूज पोलिस ठाण्यात तपासाकरिता आणले होते. त्यांनतर तपास अधिकारी फौजदार रामचंद्र पवार यांच्याकडे पोलिसांनी सोपविले़ पोलिस ठाण्याच्या वरच्या मजल्यावरील खोलीत त्याची चौकशी सुरू होती. या चौकशी दरम्यान त्याने पोलिस ठाण्यामागील सुरक्षक भिंतीवरून उडी मारुन पोबारा केला. तो पळलेल्या दिशेने पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, पण तो सापडला नाही. 'गणेश बनसोडे याचा शोध सुरू असून तो लवकरच पकडला जाईल,' असे वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रमझानमध्ये पाणी...पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

रमजान महिना सुरू झाल्याने पाण्याची अधिक गरज भासत आहे. तालुक्यातील पीरबावडा येथे ग्रामस्थांनी ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांना धारेवर धरत किमान रमजानमध्ये तरी पाणी उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली.

पीरबावडा येथे टँकरच्या अपेक्षित खेपा होत नसून गावाची लोकसंख्या जास्त असल्याने टंचाई भेडसावत आहे. त्यातच रमजान महिन्याचे उपवास सुरू झाले आहेत. काही दिवसांपासून अशुद्ध, गढूळ पाणी येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असता ग्रामस्थ, ग्रामसेवक व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यात खंडांजगी झाली. माजी सभापती डॉ. सारंग गाडेकर यांनी मध्यस्थी करून

शुद्ध पाणी पुरवावे, टँकरच्या खेपा वाढवाव्यात, अशा सूचना ग्रामसेवक व ग्रामपंयायत सदस्यांना केल्या. पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास लोकशाही मार्गाने वरिष्ठांकडे न्याय मागण्यात येईल, असा इशारा दिला.

\Bजगणे मुश्किल \B

ग्रामपंचायत सदस्य वसीम शेख यांनी सांगितले की, काही दिवसांपासून अतिशय दुर्गंधीयुक्त पाणी येत असून त्यात साधे ब्लिचिंग पावडरही टाकले जात नाही. ऐन रमजानमध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. वाड्या वस्त्यांवर परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. शेत वस्तीवरील नागरिकांना भीषण पाणी टंचाई सामना करावा लागत असून वेळोवेळी मागणी करूनही पाणी दिले जात नसल्याने जगणे मुश्किल झाल्याची खंत निवृत्ती काळे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'एनडीए' निवड परिक्षेत औरंगाबादचा ओम गुप्ता देशात तिसरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) व नेव्हल अकॅडमीच्या निवड परीक्षेची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामध्ये सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (एसपीआय) व औरंगाबादचा विद्यार्थी ओम गुप्ताने देशात तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. ओम गुप्तासह एसपीआय मधील एकूण २२ विद्यार्थ्यांना या निवड परिक्षेत यश मिळाले आहे.

एनडीए आणि नेव्हल अकॅडमीसाठी सप्टेबर २०१८ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. लेखी, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखत, आरोग्य तपासणी आणि त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येते. या सर्व चाचण्या व परीक्षेसाठी एसपीआय संस्थेतून ५९ मुलांनी सहभाग घेतला होता. यापैकी ४० उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मध्ये १६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली तर अन्य सहा विद्यार्थी हे यापुर्वीच्या बॅचचे आहेत. यामध्ये ओम गुप्ता, अथर्व सुर्वे, यशवंत नागरे, प्रथमेश इंगळे, सोहम अपराजित, हर्षवर्धन शॉ, अमीत गायकवाड, आशितोष हारपुडे, राजशेखर जाधव, राहुल अल्वारिस, दिव्याश पाटील, प्रथम डोले, तन्मय राजदेव, प्रज्वल थोरात, प्रगल्भ संवत्सरकार व शौनक भावे या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

कठोर परिश्रमासोबतच व्यक्तिमत्व विकास महत्त्वाचा - ओम गुप्ता

एनडीए साठी यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रमासोबतच व्यक्तिमत्व विकास हवाच. या यशामध्ये औरंगाबाद येथील एसपीआय संस्थेमध्ये झालेल्या ट्रेनिंगचे सर्वात मोठे योगदान असल्याचे ओम गुप्ताने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा होर्डिंगवर आता थेट फौजदारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरभरात जागोजागी, प्रमुख रस्त्यांवर बेकायदा होर्डिंग लावण्यात आले असून, त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. महापालिकेने कारवाई केल्यानंतरही पुन्हा काही दिवसांनी पुन्हा त्याच जागी नवीन होर्डिंग लावले जात आहे. त्यामुळे आता बेकायदा होर्डिंगधारकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापौरांनी शुक्रवारी (दहा मे) पालिका प्रशासनाला दिले.

शहरात गल्लीमधील नेतेमंडळींचे वाढदिवस, नियुक्ती, विविध पक्ष संघटनांचे कार्यक्रम, सत्कार सोहळ्यांचे जागोजागी बेकायदा होर्डिंग लावण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाने यापूर्वी अनेकदा कारवाई करूनही पुन्हा काही दिवसांनी त्याच जागेवर होर्डिंग लावून शहर विद्रूप करण्याचे काम सुरूच होते. आता न्यायालयाने शहरातील बेकायदा होर्डिंग हटवून शहराचे विद्रुपीकरण थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शासनाने परिपत्रक काढून महापालिकांना आदेशितही केले आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेत बेकायदा होर्डिंग जप्त केले होते, मात्र त्यानंतरही शहरात होर्डिंग लावण्याचे प्रकार सर्रास सुरू होते. आता पुन्हा एकदा होर्डिंग हटवण्याची मोठी मोहीम हाती घेण्याची प्रशासन तयारी करत आहे. याप्रकरणी महापौर घोडेले यांनी यावेळी कारवाई करताना थेट संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रशासनाला बजावले आहे.

\Bउत्पन्न वाढीचा फंडा\B

शहरात आज ४४८ अधिकृत होर्डिंग आहेत. यातून पालिकेला दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील काही बेकायदा होर्डिंग अभय योजनेतून अधिकृत करण्याचाही फंडा पालिकेने राबविला मात्र, त्यास अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता अनधिकृत होर्डिंगची संख्या वाढवून उत्पन्न वाढविण्याचाही विचार पालिका करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच लाखांचा गुटख्याचा साठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुटखाबंदी असताना शहरात अवैधरित्या गुटख्याचा साठा बाळगणाऱ्या आरोपीला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शुक्रवारी गजानननगर भागात करण्यात आली असून अडीच लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला.

गारखेडा, गजानननगर गल्ली क्रमांक ७ येथील महेंद्र सोमनाथ बियाणी हा घरामध्ये अवैधरित्या गुटख्याचा साठा बाळगून असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पथकाने बियाणी याच्या घरावर छापा टाकला. यावेळी छाप्यामध्ये पोलिसांना रजनीगंधा, राजनिवास, विमल, आरएमडी आदी गुटख्याचा माल आढळून आला. अन्न भेसळ अधिकारी प्रशांत अजिंठेकर यांना बोलावून पोलिसांनी पंचनामा केला. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, एसीपी रामचंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय घनश्याम सोनवणे, पीएसआय खटके, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, विलास डोईफोडे, जालींदर मांटे, रवि जाधव, शिवाजी गायकवाड, राजेश यदमळ, माया उगले, कोमल तारे आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक गांगवेविरुद्ध धमकी दिल्याची तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विठ्ठलनगर वॉर्डाचे नगरसेवक मनोज गांगवे यांच्याविरुद्ध तरुणाला धमकी दिल्याप्रकरणी पोलिस आयुक्तांकडे शुक्रवारी तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, या तक्रारीत काही तथ्य नसून आपण वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे स्पष्टीकरण नगरसेवक मनोज गांगवे यांनी दिले आहे.

याप्रकरणी शुक्रवारी पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. राज्यपाल गवई आणि राष्ट्रपाल गवई या तरुणांचा ३ मे रोजी निलेश गवई याच्यासोबत वाद झाला होता. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी राज्यपाल गवई याच्यावर हल्ला करणारा निलेश गवई हा नगरसेवक मनोज गांगवे यांच्यासह इतर २८ लोकांना पोलिस ठाण्यात दबाव टाकण्यासाठी घेऊन आल्याचा उल्लेख आहे. तसेच राज्यपाल गवई याचा भाऊ राष्ट्रपाल गवई हा स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असून त्याचे करिअर खराब करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. दरम्यान, या प्रकरणी बोलताना नगरसेवक मनोज गांगवे यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने आपण वाद मिटवण्यासाठी गेलो होतो. कोणाला धमकी दिली नाही, तसेच आपली पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची नसून या आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भोंदूबाबा पठाण गुन्हा करून पसार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून हैदराबादच्या व्यापाऱ्यांची फसवणूक करणारा नारेगावचा कुख्यात भोंदूबाबा साहेबखान पठाण गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाला आहे. पाच वर्षांपूर्वी याच भोंदूबाबाने पोलिसांच्या मदतीने अनेकांना गंडा घालण्याचे प्रकार घडलेले आहेत.

याप्रकरणी डोडू सत्यनारायण या हैदराबादच्या व्यापाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. पैशाचा पाऊस पाडून पाच ते दहा कोटी रुपये देतो, असे आमिष दाखवत साहेबखानने सत्यनारायण यांची ४ मे रोजी फसवणूक केली आहे. २०१४ मध्ये साहेबखानने कर्नाटक येथील व्यापाऱ्याची फसवणूक केली होती. यावेळी साहेबखान पठाण याच्या टोळीला अटक करण्यात आली होती. साहेबखान पठाण याने तत्कालीन सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्याला हाताशी धरून हा प्रकार केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने तपास केला होता. यावेळी साहेबखानला अटक करून हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली होती. यावेळी साहेबखानने तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांवर देखील त्रास दिल्याचा आरोप केला होता. सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर साहेबखान पठाण हा पसार झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन परीक्षेत सहकेंद्रप्रमुखांचा गुंगारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत सहकेंद्रप्रमुखांनी पुन्हा दांडी मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अर्ध्यापेक्षा जास्त सहकेंद्रप्रमुख परीक्षा केंद्रावर गैरहजर होते. या परीक्षेत ७० टक्के सहकेंद्रप्रमुख हजर झाले नसल्याचे प्राथमिक माहितीत आढळले आहे. विद्यापीठ प्रशासन कारवाई करीत नसल्यामुळे दरवर्षी गैरहजेरीत वाढ होत आहे.

पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेतील गलथानपणा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील २२३ परीक्षा केंद्रावर झाली. या परीक्षेसाठी एकूण २२३ सहकेंद्रप्रमुख नेमण्यात आले होते. यातील फक्त ५८ सहकेंद्रप्रमुख रूजू झाले. इतर १६५ जणांशी परीक्षा विभागाचा संपर्क झाला नाही. तसेच त्यांनीही विद्यापीठाशी संपर्क साधला नाही. परीक्षेसारख्या महत्त्वाच्या कामात सहकेंद्रप्रमुखांचा हलगर्जीपणा धक्कादायक ठरला आहे. पदव्युत्तर परीक्षा एकूण ७४ केंद्रावर पार पडली. या केंद्रावर फक्त २७ सहकेंद्रप्रमुख हजर झाले. इतर ४७ जणांशी अजूनही संपर्क झाला नसल्याचे परीक्षा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मागील वर्षी सहकेंद्रप्रमुख रूजू झाले नसल्यामुळे परीक्षेत अडचणी आल्या होत्या. संबंधित प्राध्यापकांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे तत्कालीन परीक्षा संचालकांनी सांगितले होते. प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी दखल घेत कारवाईचे संकेत दिले होते. मात्र, विद्यापीठाच्या शिरस्त्याप्रमाणे कारवाई करण्यात आली. परिणामी, यावर्षीही निम्म्यापेक्षा जास्त प्राध्यापकांनी सहकेंद्रप्रमुखांची 'ड्यूटी' करण्यास गैरहजर राहून नकार कळवला.

दरम्यान, काही प्राध्यापकांशी संपर्क साधला असता त्यांनी महाविद्यालयीन पातळीवरील अडचणी सांगितल्या. प्राचार्य परवानगी देत नाही, कॉलेजचे अतिरिक्त काम असते, सहकेंद्रप्रमुख होण्यास संस्थाचालकांचा नकार असतो अशी कारणे आढळली. प्राचार्य परवानगी देत नसल्यास विद्यापीठ काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

----कारवाई फक्त ठरावापुरती

परीक्षा केंद्रावर सहकेंद्रप्रमुख हजर राहत नसल्याचे प्रकार वारंवार घडत होते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेत २४ एप्रिल २०१७ रोजी ठराव घेतला होता. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ ४८ (४) नुसार कारवाई करण्याचे निश्चित झाले होते. मात्र, अद्याप एकाही सहकेंद्रप्रमुखावर कारवाई करण्यात आली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड हजार मतपत्रिका टपालाद्वारे प्राप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून प्रशिक्षणादरम्यान फॉर्म १२ व १२ ए भरून घेण्यात आले होते त्यानुसार 'ईडीसी' (इलेक्शन ड्यूटी सर्टिफिकेट) व टपाली मतपित्रका पाठविल्या होत्या. यापैकी पाच हजार ५९५ ईडीसी व चार हजार ७७५ पोस्टल बॅलेट वाटप करण्यात आले होते. आतापर्यंत एक हजार ५५८ टपाली मतपत्रिका मत नोंदवून कार्यालयास प्राप्त झाल्या असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली; तसेच टपाल कार्यालयाद्वारे काही विलंब होत असल्यास त्याबाबत आढावा घेऊन योग्य कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हा निवडणूक अधिकारी औरंगाबाद यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषिपूरक व्यवसायात तरुणांना संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शेतीवरचा ताण कमी करण्यासाठी कृषिपूरक व्यवसाय व स्वयंरोजगार महत्त्वाचा आहे. युवकांनी कौशल्य विकास व पतपुरवठा योजनांचा स्वयंरोजगारासाठी लाभ घ्यावा', असे प्रतिपादन सहाय्यक संचालक निशांत सूर्यवंशी यांनी केले. ते युवक स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते.

ग्रामविकास संस्थेच्या वतीने युवकांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. सिडकोत ग्रामविकास भवन येथे गुरुवारी शिबीर झाले. शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमाला जिल्हा स्वयंरोजगार व मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक निशांत सूर्यवंशी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक प्रवीण आगवन पाटील, ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे, बळीराम घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात स्वयंरोजगाराच्या संधी व पतपुरवठा, कृषिपूरक उद्योग, ग्रामीण विकासात युवकांचे योगदान या विषयावर विजय काळे, हिंदप्रकाश जयस्वाल, डॉ. अनिल जाधव, योगेश सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. दीपक बजारे यांनी सूत्रसंचालन केले आणि बापूराव भोसले यांनी आभार मानले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी बालाजी बिरादार, रवी सातदिवे, सुनिता दुथडे, संतोष मिसाळ, पवन मुराडे आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याचे पडसाद वसतिगृहात !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यापीठाच्या वसतिगृहातील पाणीप्रश्नाचे आंदोलन विद्यार्थ्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईच्या तक्रारी वाढल्यानंतर वसतिगृहातील खोली सोडण्याचे परिपत्रक विद्यापीठ प्रशासनाने काढले आहे. तर स्पर्धा परीक्षा आणि नेट-सेट परीक्षा असल्यामुळे जून महिन्यापर्यंत वसतिगृहात राहू देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. दुष्काळी परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या राहण्याची व मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात येईल, अशी घोषणा कुलगुरूंनीच केली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात जवळपास दीड हजार विद्यार्थी राहतात. विद्यार्थिनींच्या सात वसतिगृहात दूषित पाणीपुरवठा झाल्यामुळे १६६ विद्यार्थिनी आजारी पडल्याची घटना घडली होती. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. तसेच अभ्यासिकेत नियमित पाणीपुरवठा नसल्याची तक्रार करीत मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर घोषणाबाजी केली होती. विद्यार्थिनींच्या तक्रारीचे प्रतिकूल पडसाद उमटल्याने प्रशासन जेरीस आले होते. सततच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना वसतिगृहे सोडण्यास बजावले आहे. परीक्षा झाल्यानंतर वसतिगृहाच्या नियमानुसार खोली सोडावी, अशी स्पष्ट सूचना करण्यात आली आहे. महापालिकेचे पाणी नियमित मिळण्यात अडचणी येत आहेत. विद्यापीठातील विहिरीतील पाणी संपले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पाच दिवसात खोली सोडावी असे सूचनेत नमूद केले आहे. या सूचनेमुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असून बहुतेक विद्यार्थी शेतकरी-शेतमजूर कुटुंबातील आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना ऐनवेळी दुसरीकडे राहणे परवडणार नाही. त्यामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहू देण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली. याबाबत विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना निवेदन दिले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे, राहुल म्हस्के, किशोर शितोळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांची सेट-नेटसह स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू आहे. या परीक्षा मे आणि जून महिन्यात होणार आहेत. या परीक्षेपर्यंत विद्यार्थ्यांना नियमात सवलत द्यावी असे विद्यार्थ्यांनी सांगितले. यावेळी 'राविकाँ'चे विद्यापीठ अध्यक्ष दीपक बहिर, मंगेश शेवाळे, दीक्षा पवार, पवन राजपूत, हरिभाऊ विटोरे, रवी माने, परमेश्वर कास्टे, सचिन बोराडे शरद शिंदे उपस्थित होते.

दरम्यान, विद्यार्थी विकास संचालक यांच्याशी चर्चा करुन योग्य निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांची गैरसोय होईल असा निर्णय घेतला जाणार नाही असे कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले. सध्या विद्यार्थ्यांना मोफत जेवण प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे.

कुलगुरूंच्या घोषणेचा विसर

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला विद्यापीठात प्रा. प्रतिमा परदेशी यांचे व्याख्यान झाले होते. या व्याख्यानात दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह खुले करा, असे आवाहन परदेशी यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कुलगुरू चोपडे यांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मात्र, ऐन मे महिन्यात प्रशासनाला घोषणेचा विसर पडला असून नोटीस बजावली आहे.

नियमानुसार विद्यार्थी परीक्षा झाल्यानंतर दरवर्षी वसतिगृह सोडतात. मात्र, यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांना जास्तीचे दोन महिने राहण्याची परवानगी देण्याची गरज आहे. पाण्याचे कारण दाखवून त्यांना रूम सोडायला लावू नये.

दीपक बहिर, अध्यक्ष, 'राविकाँ'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमेरिकन लष्कर अळी, हुमणीचे संकट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'खरीप हंगामासाठी बियाणे, खते मुबलक प्रमाणात आहे. यंदा प्रामुख्याने मका पिकावर अमेरिकन लष्कर अळीचे, तर उसावर हुमणीचे संकट आहे. त्याचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. क्रॉपसॅप योजना तसेच शेतीशाळेच्या माध्यमातून पेरणीपूर्व ते काढणीपश्चात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे नियोजन आहे,' अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. औरंगाबाद व जालना वगळता मराठवाड्यात अन्य जिल्ह्यात ठिबक सिंचन योजना प्रभावीपणे राबविली जात नसल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

मराठवाडास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक शुक्रवारी कृषी आयुक्त दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डीपीडीसी सभागृहात घेण्यात आली. यावेळी संचालक (फलोत्पादन) प्रल्हाद पोकळे, पाणलोट व व्यवस्थापन विभागाचे संचालक के. पी. मोते, संचालक कृषी विस्तार व प्रशिक्षण विभागाचे विजय घावटे, औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, लातूरचे विभागीय सहसंचालक तुकाराम जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे आदी उपस्थित होते. औरंगाबाद व लातूर विभागाने खरीप हंगामासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर कृषी आयुक्त दिवसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खरीप पेरणीसाठी कृषी खात्याने संपूर्ण तयारी केली आहे. बियाणे, खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. तुटवडा कुठेही भासणार नाही, असे त्यांनी स्पष्ट करतानाच सोयाबीनचे अतिरिक्त बियाणे उपलब्ध असल्याचे नमूद केले.

\Bएका रात्रीत ९० ते ५०० किमीचा प्रवास \B

यंदा खरीप हंगामात पिकांवर अमेरिकन लष्कर अळीचे संकट असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. ही अळी अत्यंत घातक असून मका, ऊस, सोयाबीन, ज्वारीसह इतर पिकांवरही हल्ला करते. या अळीचा पतंग एका रात्रीत ९० ते ५०० किलोमीटर प्रवास करतो. धोकादायक बाब म्हणजे उगवणीच्या २० ते २५ दिवसांत या अळीचा जास्त प्रादुर्भाव होतो, असे समोर आल्याने ही अळी नियंत्रणात आणणे आव्हान असल्याचे कृषी आयुक्त दिवसे यांनी नमूद केले. यासह उसावर हुमणीचे संकट आहे. कापूस पिकावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी काम झाले. त्याप्रमाणे गुलाबी बोंडअळीसह अन्य कीड रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना हाती घेतल्याचे कृषी आयुक्तांनी नमूद केले.

\Bविमा कंपनीचा प्रतिनिधी आता तालुक्यात\B

पीक विमा योजना महत्त्वाची ठरली परंतु, अनेकांकडे या योजनेबाबत माहिती योग्य व पुरेशी नसल्याचे दिसून आले. त्यामुळे कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी १३ व १४ मे रोजी प्रशिक्षण शाळेचे नागपूर येथे आयोजन करण्यात आल्याचे आयुक्त दिवसे यांनी सांगितले. पीक विम्याबाबत जिल्हा, तसेच विभागवार समित्या स्थापन केल्या जातील. पूर्वाप्रमाणे तक्रारीसाठी आता आयुक्तालयात येण्याची गरज भासणार नाही. जिल्हा प्रशासन, कृषी, बँक आणि कंपनी यांच्या योग्य तो समन्वय राखण्यासाठी यंत्रणा तयार केली जात असून संबंधित विमा कंपनीचा प्रतिनिधी त्या त्या तालुक्यात उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

\B...तर बदल्यासाठी अर्ज करा\B

नेहमी पाणी टंचाई भासणाऱ्या मराठवाड्यात ठिबक सिंचन योजनाचा प्रभावीपणे राबविणे आवश्यक होते. परंतु, औरंगाबाद व जालना जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात प्रभावीपणे काम झाले नसल्याचे बैठकीत लक्षात येताच अधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. २०१८-२०१९ या वर्षात सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी त्यासाठी देण्यात आला होता. पण, अपेक्षित काम का होत नाही, असा सवाल अधिकाऱ्यांनी करताना उद्दिष्ट देऊनही काम होत नसेल, तर यापुढे तुम्हीच कामाचे उद्दिष्ट द्या, असा टोला मारला. ठिबक व तुषार सिंचन योजना प्रभावीपणे राबवा. शक्य नसेल तर बदलीसाठी अर्ज करा, असा इशाराही यावेळी कर्मचाऱ्यांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराणा प्रताप जयंती लासूरमध्ये साजरी

$
0
0

वैजापूर: 'महाराणा प्रताप यांच्या जीवनातील विविध प्रसंगातून आजच्या तरुणांनी संघटन, निर्व्यसनता, परिश्रम व प्रयत्नांची पराकाष्ठा हे गुण घेण्याची गरज आहे,' असे प्रतिपादन प्रा. रवींद्र बनसोड यांनी केले. महाराणा प्रताप यांच्या ४७९ व्या जयंतीनिमित्त ग्रामस्वराज्य प्रतिष्ठाणतर्फे लासूर (ता. वैजापूर) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी खासदार उत्तमसिंह पवार, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, जिल्हा परिषद सदस्य मनाजी मिसाळ, खुशालसिंह राजपूत, स्वच्छतादूत धोंडिरामसिंह राजपूत, खुशालसिंह राजपूत, सुनील गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमापूर्वी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेची विद्युत रोषणाईने सजविलेल्या जीपमधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘संत एकनाथ’च्या चेअरमनच्या अधिकारावरून पेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन तुषार शिसोदे यांचे आर्थिक व प्रशासकीय अधिकारी काढून घ्यावेत, असा ठराव कारखान्याच्या नऊ संचालकांनी घेतला आहे. ठराव घेणाऱ्यांत चार संचालक अपात्र असून त्यांना माझ्या विरोधात असा ठराव घेण्याचा अधिकार नसून मीच ठराव घेणाऱ्या संचालकांच्या विरोधात कार्यवाही करणार आहे, असा इशारा चेअरमन शिसोदे यांनी दिल्याने पेच निर्माण झाला आहे.

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांची शुक्रवारी मासिक बैठक पार पडली. कारखान्याशी संबंधित विविध विषयांवर या बैठकीत चर्चा सुरू असताना माजी चेअरमन व विद्यमान संचालक अप्पासाहेब पाटील हे त्यांचे समर्थक संचालक ज्ञानेश औटे, अहिल्याबाई झारगड व आसाराम शिंदे यांच्यासोबत बैठकीत उपस्थित झाले. सध्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता सुरू असून ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, तोडणी कामगार, वाहतूकदार यांच्या देणी विषयीचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यामुळे विद्यमान चेअरमन यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसून त्यांचे सर्व अधिकार काढून घेण्यात यावेत, अशी मागणी केली. पाटील यांनी मागणी केल्यानंतर संचालक विजय गोरे यांनी चेअरमन तुषार शिसोदे यांचे आर्थिक, प्रशासकीय व उर्वरित सर्व अधिकार काढून घेण्याचा ठराव मांडला. संचालक गोपीकिशन गोर्डे यांनी अनुमोदन दिले व उपस्थित चौदा संचालकापैकी नऊ संचालकांनी मान्यता दिल्यानंतर हा ठराव मंजूर करण्यात आला.

दरम्यान, अप्पासाहेब पाटील, ज्ञानेश औटे, अहिल्याबाई झारगड व आसाराम शिंदे या कारखान्याच्या चार संचालकांना अपात्र करण्यात आलेले आहे. यामुळे यांना मासिक बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. निमंत्रण नसतानाही हे बैठकीत आले व दादागिरी करून आमच्या विरोधी गटांच्या संचालकांच्या मदतीने माझ्या विरोधात बेकायदा ठराव मंजूर केला. बेकायदा कृत्य करणाऱ्या या संचालकांच्या विरोधात मी कार्यवाही करणार असल्याची माहिती चेअरमन शिसोदे यांनी दिली आहे.

\Bअपात्रतेवरून दोघांचेही दावे \B

कारखान्याचे संचालक अप्पासाहेब पाटील, ज्ञानेश औटे, अहिल्याबाई झारगड व आसाराम शिंदे यांनी कारखान्याच्या हिताच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत सहकार मंत्र्यांनी या चार संचालकांवर अपात्रतेची कार्यवाही केली होती. अपील केल्यानंतर आमच्यावरील अपात्रतेची कार्यवाही मागे घेण्यात आली, अशी माहिती अप्पासाहेब पाटील देत आहेत. मात्र, या अपात्र संचालकांच्या विरोधातील कार्यवाही मागे घेण्यात आली असल्याचे कुठलेही पत्र आम्हाला प्राप्त झाले नसल्याची माहिती चेअरमन तुषार शिसोदे देत असल्याने सध्या कारखान्यासमोर पेच निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक कॅरिबॅगचा ६६० किलो साठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोतिकारंजा भागातील तीन दुकानांवर ठापे टाकत शुक्रवारी महापालिकेच्या पथकाने तब्बल ६६० किलो प्लास्टिक कॅरिबॅगचा साठा जप्त केला. या कारवाईमध्ये पथकाने ३० हजार रुपयांचा दंडही वसूल केला.

शासनाने प्लास्टिक बंदी जाहीर केली असली तरी कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही. शहरात या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने झोननिहाय प्रत्येकी एक अशी नऊ पथके स्थापन केली आहे. महापालिका मुख्यालयात एक केंद्रीय पथक स्थापन करण्यात आले. या पथकातील अधिकारी - कर्मचाऱ्यांकडून शहरातील विविध भागात प्लास्टिक बंदीसंदर्भात कारवाई करण्यात येते. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारात झोन क्रमांक दोनच्या पथकाने मोतिकारंजा भागातील तीन दुकानांवर धाड टाकली. तिन्ही दुकानांची तपासणी करताना सुमारे ६६० किलो बंदी असलेला प्लास्टिकचा साठा पथकाच्या हाती लागला. हा साठा जप्त करून पथकाने तिन्ही प्लास्टिक विक्रेत्यांकडून प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला. घनकचरा कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या नेतृत्वाखाली वॉर्ड अधिकारी प्रकाश आठवले, स्वच्छता निरीक्षक सचिन भालेराव, दानिश सिद्दिकी, विशाल खरात, विकास मोहाडे यांच्यासह नागरी मित्र पथकाचे माजी सैनिकांनी ही कारवाई केली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडको पाणीबाणीवरून रणकंदन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पूर्व मतदारसंघातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने आमदार अतुल सावे यांनी बोलावलेल्या बैठकीत रणकंदन झाले. आम्हाला बैठकीला का बोलावले नाही, असे म्हणत 'एमआयएम'च्या नगरसेवकांनी बैठकीत वाद घातला. यावेळी आमच्या आमदारांनी बैठक बोलावली तुमच्या आमदारांना बोलवा, असे भाजपच्या नगरसेवकांनी त्यांना सुनावले. दरम्यान, सिडको-हडको भागातील पाणीपुरवठा तीन दिवसात सुरळीत करण्याचे आश्वासन यावेळी प्रशासनाने दिले; तसेच एन सात, एन-पाच येथील पाण्याच्या टाकीचे नियोजन करण्यासाठी एकच अधिकारी देण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान पाणीटंचाई लक्षात घेता शहरातील सर्व्हिस सेंटर, मंगल कार्यालयांचे पाणी बंद करण्यात येणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. पाणीपुरवठा करताना भेदभाव होते असल्याचा भाजप आमदार अतुल सावे यांचा आरोप होता. त्यासाठीच त्यांनी ही बैठक बोलावली होती. आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात सिडको-हडकोतील विस्कळीत पाणीपुरवठा या विषयावर बैठक घेण्यात आली़ बैठकीसाठी माधुरी अदवंत, प्रशांत देसरडा, राजू शिंदे, शिवाजी दांडगे, मकरंद कुलकर्णी, वीरभद्र गादगे, उपायुक्त मंजुषा मुथा, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्यासोबतच अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती़

मागील तीन-साडेतीन महिन्यांपासून सिडको-हडकोतील पाणीप्रश्न गंभीर वळणावर पोचला आहे़ अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही यात तोडगा निघत नाही़ संयमाचा बांध सुटल्याने नागरिकांसह नगरसेवकही रस्त्यावर येत असल्याचे सांगत भाजपचे लोकप्रतिनिधी बैठकीत आक्रमक झाले़ सिडको-हडको भागात कुठेही समान पाणीवाटप करण्यात येत नाही यासह अनेक प्रश्नांची सरबत्ती करत आयुक्तांसह महापालिका पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले़ तब्बल दोन तासांच्या चर्चेअंती आयुक्त डॉ़ निपुण विनायक यांनी आगामी तीन दिवसांत सिडको-हडको भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन दिले़ आठवड्याभरात संपूर्ण शहरात समान पाणीवाटप होईल याचा पुनरुच्चार केला़ यासंदर्भात महापौर घोडेले यांनीही प्रशासनाला आठ दिवसांचे अल्टिमेटम दिले.

बैठक संपत असतानाच 'एमआयएम'चे फिरोज खान, अरुण बोर्डे यांच्यासह काही मंडळींनी बैठकीच्या ठिकाणी धाव घेतली. आमच्या भागात पाणी येत नाही, तेव्हा आम्हालाही का बोलावले नाही, असा त्यांचा आरोप होता. तुमच्या आमदाराला बैठक बोलावण्यास सांगा, असे भाजपच्या सदस्यांनी सुनावले.

\Bआम्ही अडचणी, व्यथा सांगितल्या\B

या बैठकीविषयी 'मटा'शी बोलताना आमदार अतुल सावे म्हणाले की, सिडकोच्या अनेक वॉर्डांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होतो. एन-पाच येथील पाण्याच्या टाकीवरून पाण्याचे समान वितरण होत नाही, एन सात पाण्याच्या टाकीवरूनही अशीच अवस्था आहे. बार चार्ट (पाण्याचे वेळापत्रक) अजून मिळालेला नाही आणि तो मिळतही नाही. यासर्व अडचणी आम्ही प्रशासनासमोर मांडल्या.

- पाणीपुरवठ्यात भेदभाव होत असल्याचा बैठकीत आरोप

- तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन

- महापौरांचे पाणीपुरवठ्याबाबत आठवड्याभराचे अल्टिमेटम

- सर्व्हिस सेंटर, मंगल कार्यालयांचे पाणी बंद करण्यात येणार

- यापुढे नागरीकांचे मोर्चे अधिकाऱ्यांच्या घरी : आमदार सावे

- अधिकाऱ्यांवर पाणीपुरवठ्याबाबत बेजबाबदारपणाचा ठपका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात लाखांसाठी आईने केले मुलाचे अपहरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सात लाख रुपयांसाठी आईने मुलाचे अपहरण केल्याचा आरोप करीत आजीने मुलीविरुद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हा प्रकार गुरुवारी सकाळी वेदांतनगर भागात घडला. मृत पतीच्या विम्याच्या पैशासाठी अपहरण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी ४४ वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या महिलेला दोन मुली व एक मुलगा आहे. मोठ्या मुलीचे लग्न २०११ मध्ये शिवाजी आहेर (ता. नांदगाव, जि. नाशिक) यांच्यासोबत झाले होते. या मुलीला आयुष (वय ६) आणि संचित (वय २), अशी दोन मुले आहेत. या मुलीच्या पतीचे २०१७ मध्ये अपघातात निधन झाले आहे. यानंतर या महिलेने मुली आणि नातवांना स्वत:कडे राहण्यासाठी आणले होते. २०१८ मध्ये या महिलेच्या मुलीचे शेजारी बांधकाम सुरू असलेल्या राजू खोदुलाल रायकवार (रा. एसटी कॉलनी, सिडको) याच्यासोबत प्रेम जुळल्यामुळे ती पळून गेली होती. या मुलीचा पती शिवाजी आहेर याच्या निधनानंतर विम्याचे सात लाख रुपये आले होते. आजीने ही रक्कम आयुषच्या नावावर जमा केली होती. या घटनेनंतर मुलीने आईच्या विरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात माझ्या वडिलांनी माझ्या दोन्ही मुलांना बळजबरीने ताब्यात घेतले असल्याबाबत तक्रार दाखल केली होती. वेदांतनगर पोलिसांनी चौकशी केली असता आजीने सविस्तर घटना पोलिसांना सांगितली. यावेळी पोलिसांनी समुपदेशन केल्यानंतर मुलगी घरी परत येण्यासाठी तयार झाली, मात्र आली नाही. यानंतर मुलीने कोर्टात आयुषचा ताबा मिळण्याबाबत दावा दाखल केला. बुधवारी कोर्टाने हा दावा फेटाळून लावला.

\Bरिक्षातून अपहरण \B

दावा फेटाळल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी आयुष मामासोबत खेळत असताना त्याच्या आईने रिक्षामध्ये येऊन त्याला फूस लावून पळवून दिल्याची तक्रार त्याच्या आजीने दिली आहे. याप्रकरणी आजीच्या तक्रारीवरून आयुषची आई आणि राजू रायकवार यांच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट खत निर्मिती प्रकरणी कठोर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट खत निर्मिती प्रकरणी जालन्यातील संबंधित कंपनीवर कठोर कारवाई होईल, त्यांचे परवाने रद्द केले जातील, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली.

खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत निमित्ताने आयुक्त शुक्रवारी शहरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे दोन कंपन्यावर धाडी टाकत बनावट सेंद्रीय खत निर्मिती होत असल्याचे उघड केले. सेंद्रीय खताच्या नावाखाली बाजारात जाण्याच्या तयारीत असतानाच हे बोगस खत पकडल्यामुळे हजारो शेतकऱ्यांची होणारी फसवणूक वाचली. दरम्यान, याबाबत कृषी आयुक्त दिवसे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, दोन महिन्यात अशा स्वरुपाच्या चार कारवाया करण्यात आलेल्या आहेत. या प्रकरणातही बोगस बियाणे व खत निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल. जालना येथील प्रकरणातही संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कंपनीचा परवानाही रद्द केला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images