Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

व्यापाऱ्याला पाच लाखांची टोपी; पाच आरोपींना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कारमधून इंजिनचे ऑइल गळत असल्याचे सांगून व्यापाऱ्याच्या कारमध्ये ठेवलेली पाच लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पळवून नेल्याप्रकरणात संजय मुनियांदी, बबलू फकिरा, किसन सेलुराज, करण गणेश व अभिमन्यू बबलू या आरोपींना मंगळवारी (१४ मे) अटक करून बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, सर्व आरोपींना सोमवारपर्यंत (२० मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी ऋतुजा भोसले यांनी सुनावली.

या प्रकरणी डॉ. मनोहर रतनलाल अग्रवाल (६०, रा. सिडको एन-एक) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १६ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास फिर्यादी हा बॅगेत पाच लाख रुपये रोख घेऊन कारमधून जात होता. त्यावेळी मोंढा नाका परिसरात 'तुमच्या गाडीचे इंजिन ऑइल गळत आहे' असे एका व्यक्तीने फिर्यादीसह चालकाला सांगितले. मात्र, त्याकडे दोघांनी दुर्लक्ष केले. थोड्या अंतरावर आणखी दुसऱ्या एका व्यक्तीने गाडीतून ऑइल गळत असल्याचे सांगितल्यानंतर फिर्यादी कारमधून उतरला आणि ऑइल कुठून गळत आहे हे पाहात असतानाच त्याच्या कारमधून बॅग लंपास करण्यात आली. बॅगची चोरी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, नाशिक येथे दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले संजय मुनियांदी (३०), बबलू फकिरा (३५), किसन सेलुराज (३०), करण गणेश (३०), अभिमन्यू बबलू (१९, सर्व रा. नवी दिल्ली) यांनी शहरातील मोंढा नाका परिसरातून पाच लाखांची बॅग चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर सर्व पाच आरोपींना मंगळवारी अटक करून बुधवारी शहरातील न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपींकडून पाच लाख रुपये जप्त करणे बाकी असून, आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का, आरोपींनी रकमेची विल्हेवाट कशी लावली आदी बाबींचा तपास करावयाचा आहे. तसेच आरोपींची आंतरराज्य टोळी कार्यरत असण्याची शक्यता असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने सर्व आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाल्मीसह बँकेची फसवणूक; एक वर्षाची सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वैयक्तिक कर्जप्रकरणात वाल्मीच्या लेखाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीद्वारे वेतन हमीपत्र तयार करून वाल्मीसह बँकेची फसवणूक करणारा प्रकाश सांडूजी शिंदे याला एक वर्ष सक्तमजुरी व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभळे यांनी ठोठावली.

या प्रकरणी वाल्मी प्रशासनाचे अधिकारी विलास शंकरराव देशपांडे (वय ५३) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २००५मध्ये प्रकाश शिंदे (४१, रा. एकता अपार्टमेंट, सातारा) याने औरंगाबाद-जालना ग्रामीण बँकेच्या समर्थनगर शाखा येथे वैयक्तिक कर्ज प्रकरणासाठी वाल्मीच्या लेखाधिकारी यांच्या बनावट स्वाक्षरीद्वारे वेतन हमीपत्र तयार करून ते खरे असल्याचे भासवत कर्ज प्रकरणी ते बँकेत दाखल केले आणि वाल्मी प्रशासन व बँकेची फसवूणक केली. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ४२०, ४६८, ४७१, २०१ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी सहाय्यक सरकारी वकील बी. एम. राठोड यांनी दहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या ४२० कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, ४६८ कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, तर ४७१ कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस नाईक श्रीराम चौधरी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पादचाऱ्याचा मोबाइल पळवला; दुसऱ्या आरोपीला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पादचाऱ्याचा मोबाइल हिसकाविल्याप्रकरणी दुसरा आरोपी रणजित उर्फ थारो प्रेमचंद गोठवाल याला बुधवारी (१५ मे) अटक करून न्यायालयात हजर केले असता, आरोपीला शुक्रवारपर्यंत (१७ मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी ऋतुजा भोसले यांनी दिले. याच प्रकरणात यापूर्वी आरोपी अहमद खान अजहर खान याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण ४३ हजार रुपये किमतीचे चार मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणी बालाजी सुनील जाटवे (२६, रा. पदमपुरा) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा शनिवारी (११ मे) रात्री साडेअकराला संत रविदास चौक येथून मोबाइलवर बोलत घरी जात होता. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा आरोपींनी त्यांचा मोबाइल हिसकावून घेत पळ काढण्याच्या प्रयत्नात दोघांची दुचाकी एका घराच्या ओट्याला धडकली. या अपघातात दोघे मोबाइल चोरटे जखमी झाले. फिर्यादीने मित्र व इतर नागरिकांच्या मदतीने दोघा चोरट्यांना पकडले व घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना उपचारासाठी घाटीत दाखल केले होते व वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यातील आरोपी अहमद खान याला घाटीतून सुटी देण्यात आल्यानंतर त्याला रविवारी (१२ मे) अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडीदरम्यान त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चोरी केलेला मोबाइल जप्त करण्यात आला. तसेच घाटीत उपचार सुरू असलेला आरोपी गोठवाल याला बुधवारी सुटी देण्यात आल्यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनावरे विकू नका, छावणीत आणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

चाऱ्या अभावी जनावरे बाजारात विकू नका. चारा छावणीत आणा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शेतकऱ्यांना केले. दरम्यान, या छावणीत दिवसअखेर २५० जनावरे दाखल झाली.

कृषी उत्पन्न बाजार समितीने करमाड येथील उप बाजार समितीच्या आवारात बुधवारी चारा छावणी सुरू केली. त्यावेळी ते बोलत होते. बागडे यांच्यासह बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, उपसभापती भागचंद ठोंबरे, संचालक दामोधर नवपुते, बाळासाहेब मुगदल, देविदास कीर्तीशाही, राम शेळके, रघुनाथ काळे, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, समितीचे सचिव विजय शिरसाठ आदी उपस्थित होते. चारा छावणीची पाहणी केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.

छावणीत चारा, पाण्याची सोय बाजार समितीने करून दिली आहे. शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी चाऱ्या अभावी आपली जनावरे बाजार विकू नये तर, अशा चारा छावणीमध्ये जनावारे आणावीत, असे आ‌वाहनही बागडे यांनी यावेळी केले. दुष्काळी मदतीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी उपाययोजना राबविण्यात येत असून दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, या छावणीच पहिल्या दिवशी करमाड, दुधड, हिवरा यासह परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे आणली. दिवसभरात २५० जनावरे छावणी दाखल झाले, अशी माहिती सचिव शिरसाठ यांनी दिली. जनावरांसाठी दिवसभरात दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला असून, चारा मुबलक प्रमाणात आणण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक शिस्तीच्या अभावामुळे पालिका घबघाईला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आर्थिक शिस्तीच्या अभावामुळे महापालिका डबघाईला आली आहे. महापालिकेची घडी बसवण्यासाठी किमान ३०० कोटींचे कायमस्वरुपी कर्ज घ्यावे लागेल, अन्यथा हा गाडा चालवणे शक्य होणार नाही, अशा शब्दात आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा देणाऱ्या नगरसेविकांना व उपस्थित असलेल्या पदाधिकारी-नगरसेवकांना उत्तर दिले.

नगरसेवक व नगरसेविकांच्यासमोर भूमिका स्पष्ट करताना आयुक्त म्हणाले, १हातावरची नित्याची कामे करणे शक्य आहे, पण जेथे आर्थिक विषयाचा प्रश्न येतो तेव्हा काहीच करता येत नाही. कंत्राटदार व अन्य माध्यमातून महापालिकेवर सध्या ३०० कोटी रुपयांचे देणे आहे. हे देणे देण्यासाठी कायमस्वरुपी कर्ज काढावे लागणार आहे. कर्ज काढले तरच महापालिकेच्या कामकाजाची घडी बसेल.

'एलईडी दिवे बसविण्याच्या कामात देखील निकषानुसार काम झाले नाही. सर्किटनिहाय हे दिवे बसवायला हवे होते, पण तसे झाले नाही. जसे वाटेल तसे दिवे लावण्यात आले, त्यामुळे एलईडी लाईट लावल्यावर वीज बिलात बचत होते की नाही हेच कळत नाही. या बेजबाबदार कारभाराला जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे', असे आयुक्त म्हणाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला. बीडबायपास रस्त्याच्या बाजूची बांधकामे पाडण्याचे काम थांबले असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर ते म्हणाले, 'उर्वरित बांधकामे पाडण्याची सूचना अतिक्रमण हटाव विभागाला केली आहे. बांधकामे पाडण्यात आलेल्या जागांचे संपादन करण्यासाठी नगररचना विभागाला देखील सूचना केली आहे. टीडीआर किंवा एफएसआय देऊन जागा ताब्यात घेतली जाईल. जागा ताब्यात घेण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, सर्व्हिस रोडचे काम करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे.'

१२५ कोटींच्या अनुदानातून किती रस्त्यांची कामे करायची हे लवकरच ठरवले जाईल, रस्त्यांची यादी देखील सर्वसाधारण सभेसमोर लवकरच ठेवली जाईल, महापौरांनी परवानगी दिली तर आगामी सर्वसाधारण सभेत रस्त्यांची यादी मंजूरीसाठी ठेऊ, असे आयुक्तांनी सांगितले. शासनाच्या निकषानुसारच रस्त्यांची कामे केली जातील, त्यात विकास आराखड्यातील रस्त्यांचा समावेश असेल, असे संकेत त्यांनी दिले. १०० कोटींच्या निधीतून चौदा रस्त्यांची कामे सुरू आहेत, योग्य तो दर्जा राखूनच ही कामे केली जात आहेत, असा दावा आयुक्तांनी केला. चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प लवकरच सुरू होईल, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुपारनंतर अनेक अधिकाऱ्यांची दांडी; महापौरांनी केली अचानक पाहणी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी दुपारी अचानकपणे महापालिका मुख्यालयातील विविध विभागांना भेटी दिल्या. त्यावेळी अनेक अधिकारी गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले. गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबद्दलचे पत्र महापौर आयुक्तांना देणार आहेत.

पालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना सकाळी पावणे दहा ते सायंकाळी पावणे सहा वाजेपर्यंत कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे, पण अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित नसतात अशा तक्रारी प्राप्त झाल्यामुळे महापौरांनी बुधवारी दुपारी अचानक पालिका मुख्यालयातील विविध विभागांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी सहायक आयुक्त करणकुमार चव्हाण, उपायुक्त रविंद्र निकम, कर निर्धारण व मूल्यांकन अधिकारी महावीर पाटणी, विधी सल्लागार अपर्णा थेटे, मुख्यलेखाधिकारी सुरेश केंद्रे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर हे दालनात गैरहजर असल्याचे आढळून आले. तर उपायुक्त मंजुषा मुथा, लेखाधिकारी संजय पवार, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी हे हजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर बंगल्यावर मोर्चा काढण्याचा इशारा देताच पालिकेने जलवाहिनीसाठी शोधला कंत्राटदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाण्यासाठी महापौर बंगल्यावर मोर्चा काढण्याचा इशारा देताच महापालिका प्रशासनाने जलवाहिनी टाकण्यासाठी कंत्राटदार शोधला. आठ दिवसांत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले जाईल, असे लेखी आश्वासन देखील दिले.

बापूनगरमधील काही गल्ल्यांना पाणी पुरवठाच होत नसल्यामुळे या भागातील नागरिक भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव अभय टाकसाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत आहेत. त्यांनी महापौर व अधिकाऱ्यांची यापूर्वी भेट घेऊन जलवाहिनी टाकण्याचे काम करण्याची विनंती केली होती. काम तात्काळ सुरू केले जाईल, असे आश्वासन देखील त्यांना देण्यात आले होते. आश्वासनाच्या नंतरही काम सुरू न झाल्यामुळे बुधवारी दुपारी महापौर बंगल्यावर हंडा मोर्चा काढण्याचे नियोजन टाकसाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तसे पत्र महापौर व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. महापौर बंगल्यात जाऊन आम्ही एक-एक हंडा पाणी आणणार आहोत, असे पत्रात नमूद करण्यात आले होते. या मोर्चासाठी बापूनगर येथील बौद्ध विहाराच्या जवळ महिला हंडी घेऊन जमा झाल्या. त्याचवेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी टाकसाळ यांना पत्र दिले. बापूनगर भागात जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी चारवेळा निविदा काढल्या, पण कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. आता याच कामासाठी शेख आसिफ शेख आरेफ या कंत्राटदाराला देखभाल दुरुस्तीअंतर्गत काम करण्याचे आदेश दिले आहेत. सात ते आठ दिवसांत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होईल. प्रशासनाने दिलेल्या या पत्रानंतर महापौर बंगल्यावर हंडा मोर्चा काढण्याचा निर्णय स्थगीत करण्यात आला.

यावेळी अ‍ॅड. अभय टाकसाळ यांच्यासह सुभाष गायकवाड, सुनीता होर्शिल, जकी सलामी, सकुबाई पवार, रेखा वाघ, मंडाबाई नवगिरे, सुरेखा गवळे, रंजना बनसोडे, कडुबाई बनसोडे, रंजना भालेराव, शालुबाई कांबळे, शिलाबाई दिवे, कविता होरशिळ, सुनिता होरशीळ, उज्वला नरवडे यांच्यासह अन्य महिला सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी पुरवठ्याचा एकत्रित प्रस्ताव महिनाभरात शासनदरबारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणी पुरवठ्याचा एकत्रित प्रस्ताव महिनाभरात शासनदरबारी सादर केला जाईल, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पत्रकारांना दिली. प्रस्ताव तयार करताना संपूर्ण शहरासह सातारा - देवळाई भागाचा विचार केला जात आहे, असे ते म्हणाले.

महापालिकेने समांतर जलवाहिनीबद्दलचा सुधारित प्रस्ताव शासनाला सादर केला होता. त्यानंतर सातारा-देवळाईसाठीचा प्रस्ताव देखील शासनाला सादर करण्यात आला. पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव तुकड्या तुकड्यात सादर न करता तो एकत्रित सादर करा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्त व पदाधिकाऱ्यांना केली आहे. त्या अनुशंगाने आयुक्तांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, एकत्रित प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण शहरासह सातारा-देवळाई भागात पाणी पुरवठा करण्याचा उल्लेख प्रस्तावात असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. गुंठेवारीसह नो नेटवर्क एरियाचा देखील समावेश एकत्रित प्रस्तावात करणार का, असे त्यांना विचारले असता सर्वच भागांचा समावेश प्रस्तावात असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. समांतर जलवाहिनीचा प्रस्ताव २०१६ यावर्षी सर्वसाधारण सभेत रद्द करण्यात आला. प्रस्ताव रद्द झाला तेव्हाच पर्यायी योजनेचे काम सुरू व्हायला हवे होते, पण तसे झाले नाही. त्यामुळे शहरात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे स्पष्ट करताना आयुक्त म्हणाले, पाणी पुरवठ्यात सुसूत्रता आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्य जलवाहिनीमधून येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात वाढ झाली पाहिजे हे उद्दीष्ट समोर ठेवून काम सुरू आहे. महापालिकेच्या निधीतून काम करण्यासाठी कंत्राटदार पुढे येत नसल्यामुळे स्मार्ट सिटीच्या निधीतून काम करण्याचे ठरवले आहे. हे काम झाल्यावर किमान ३० एमएलडी पाणी वाढेल, असा दावा त्यांनी केला.

जलकुंभांवर पोलिस बंदोबस्त देण्यासाठी पोलिस आयुक्तांशी नुकतीच चर्चा झाली आहे. महत्त्वाच्या प्रत्येक जलकुंभावर पोलिस बंदोबस्त देण्याचे त्यांनी मान्य केले आहे, अशी माहिती देखील आयुक्तांनी दिली.

ना नफा, ना तोटा चा विचार

पाणीपट्टी कमी करण्याचा प्रस्ताव आगामी सर्वसाधारण सभेत प्रशासनातर्फे मांडला जाणार आहे का, असे आयुक्तांना विचारले असता ते म्हणाले, पाणीपट्टीचे सुसुत्रिकरण झाले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. ना नफा, ना तोटा नुसार पाणीपट्टी आकारण्याबद्दल आमचा विचार सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टँकर हजार किलोमीटर फेरा वाचला

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्हा अतिगंभीर दुष्काळाला तोंड देत आहे. जिल्ह्यात हजारहून अधिक टँकरने पाणीपुरवठा करून लाखो नागरिकांची तहान भागविली जात आहे. वैजापूर तालुक्यातील नाशिक जिल्ह्यालगत असलेल्या गावांना नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी उपलब्ध करून प्रशासनाने नागरिकांची तर, सोय केली पण सरकारच्या निधीचीही बचत केली आहे. टँकर फेऱ्यांमधून दररोजच्या एक हजार किलोमीटरची बचत यामुळे झाली आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाला. गंगापूर व वैजापूर तालुक्यात तर भर पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. गेल्या दोन महिन्यांत पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर वाढली. वैजापूर तालुक्यातील नाशिक जिल्हालगतच्या गावांमध्ये विहिरी अधिग्रहित केल्या होत्या. ते पाणी मे महिन्यात आटले. त्यामुळे या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने चाचपणी केली. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मदतीने वाळूज, साजापूर, शेंद्रा, पैठण येथून टँकर भरले जातात. महापालिका फारोळा केंद्रातून टँकर भरून देते. वैजापूर तालुक्यात नाशिक लगत असलेल्या गावांना साजापूरहून पाणी टँकरने द्यायचे तर, एका टँकरला किमान ४५ ते ५० किलोमीटर अंतर कापावे लागते. टँकरची संख्या, भरण्यासाठी लागणारी रांग आणि अंतर याचा विचार केला तर नागरिकांना पाणी पोचण्यास अनेक अडचणी येत होत्या. अशीच परिस्थिती २०१२मध्ये उद्भवली होती. त्यावेळी ढेकू प्रकल्प कोरडा पडला होता. नागरिकांची अडचण दूर करण्यासाठी प्रशासनाने कळमोडी (जि. नाशिक) येथील प्रकल्प अधिग्रहित करून टँकरद्वारे वैजापूर तालुक्यातील नागरिकांना पाणीपुरवठा केला होता. यंदा २०१२पेक्षा गंभीर परिस्थिती आहे.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अशोक घुगे आणि टीमकडून पाणीपुरवठ्यावर सातत्याने लक्ष दिले जात आहे. जिल्ह्यालगतच्या गावांमधील पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी २०१२प्रमाणे कळमोडी प्रकल्पातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर केला. त्यात मान्यता मिळाली. टँकर भरण्यासाठी ई निविदा पद्धतीने प्रस्ताव मागविले गेले. कळमोडी परिसरातील एका शेतकऱ्याने याबाबत निविदा भरली त्यास मंजुरी मिळाली. त्या शेतकऱ्याकडे इंजिन आहे. एक टँकर भरण्याचा खर्च साधारणपणे ५० ते ५६ रुपये येत आहे. २०१२मध्ये हा खर्च १६० रुपये येत होता. त्यामुळे सरकारची टँकरमागे शंभर रुपयांची बचत झाली. सध्या ६९ टँकरद्वारे १२० टँकरफेऱ्या कळमोडी प्रकल्पातून केल्या जातात. याच फेऱ्या साजापूर फिलिंग पॉइंटवरून कराव्या लागल्या असत्या तर, दररोज १२०० किलोमीटरहून अधिक अंतर कापावे लागले असते. प्रशासनाच्या निर्णयामुळे दररोज किमान एक हजार किलोमीटर अंतराचीही बचत झाली आहे. त्यातून पैशाची तर बचत झालीच पण नागरिकांचीही मोठी सोय झाली आहे. पावसाळा सुरू होण्यास महिनाभराचा कालावधी आहे. या काळात कळमोडी प्रकल्पाचा मोठा आधार वैजापूर तालुक्यातील नागरिकांना झाला आहे.

\Bवाळूजमध्ये आणखी दोन पॉइंट\B

गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, औरंगाबाद तालुक्यातील गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसीने वाळूज, साजापूर येथे फिलिंग पॉइंट उपलब्ध करुन दिले आहेत. महिनाभरापूर्वी या पॉइंटची संख्या वाढविण्यात आली, पण आता विहिरींचे पाणी आटल्याने टँकरची मागणी वाढली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाळूज येथील पाणीपुरवठा केंद्रात आणखी दोन पॉइंट वाढविण्यात येणार आहेत. ते गुरुवारपासून कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुटुंब देशदर्शनासाठी गेले; घर फोडून ७० हजार नेले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घराला कुलूप लावून कुटुंब देवदर्शनासाठी गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधून, घरात ठेवलेले सत्तर हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना हडकोतल्या स्वामी विवेकानंद नगरमध्ये घडली.

सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश हनुमंत जोगदंड (रा. हडको, एन १२, स्वामी विवेकानंद नगर) हे आपल्या परिवारासोबत ११ मे ते १३ मे दरम्यान देवदर्शनासाठी गेले होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप, कडी कोंडा तोडून प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटाचे लॉक तोडून सोन्याची पोत, अंगठी, कानातील बाळ्या, वेल आदी सत्तर हजारांचा ऐवज लंपास केला. आसपासच्या लोकांनी कडीकोंडा तोडल्याचे पाहिल्यानंतर घटनेची माहिती जोगदंड यांना दिली. जोगदंड आणि त्यांचे परिवार औरंगाबादला आले. त्यांनी चोरी झाल्याचे पाहिल्यानंतर सिडको पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टपालाद्वार केवळ दीड हजार मिळाल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीचे मतदान होऊन तीन आठवडे पूर्ण झाले असले तरी जिल्ह्यातील सहा हजार १२३ टपाली मतदानापैकी प्रशासनाला आतापर्यंत एक हजार ५५८ मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये ८०० मतपत्रिका सैनिकांच्या मतपत्रिका आहेत.

निवडणूक कर्तव्यास नियुक्त करण्यात आलेल्या मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर न जाता मतपत्रिका टपालामार्फत पाठवुन आपले मत नोंदवता येते. निवडणूक कर्तव्‍यार्थ नियुक्‍त केलेल्‍या आणि टपालाने मतदान करू इच्छिणाऱ्या मतदाराने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍याकडे '१२' व '१२ अ' अर्ज करणे आवश्‍यक असते. या प्रपत्रामध्ये अर्जदाराने स्वत:चे नाव असलेला मतदार संघ, मतदान केंद्र, मतदार यादी क्रमांक व टपाली मतपत्रिका पाठविण्याचा पत्ता नमूद करून स्वाक्षरी करावी लागणार होती. अर्जदार हा निवडणूक कर्तव्‍यार्थ नियुक्‍त केलेला मतदार आहे, अशी खात्री झाल्‍यानंतर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत अर्जदारास टपाली मतपत्रिका देण्‍यात येते. औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडे चार हजार ७७५ कर्मचाऱ्यांचे टपाली मतपत्रिकेसाठी अर्ज आले होते. त्यानुसार त्यांना मतपत्रिका पाठवण्यात आल्या होत्या. पाच हजार ९७ कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्यूटी सर्टिफिकेट (ईडीसी) देण्यात आले होते. यानुसार जिल्हा प्रशासनाकडून वाटप करण्यात आलेल्या चार हजार ७७५ टपाली मतपत्रिका आणि सैनिकांना दिलेल्या एक हजार ४१८पैकी केवळ एक हजार ५५८ मतपत्रिका प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. २०१४ लोकसभा निवडणुकीमध्ये देण्यात आलेल्या दोन हजार ५१९ टपाली मतपत्रिकेपैकी केवळ ५७७ मतपत्रिका प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच हजारांची लाच; झेडपी अधिकाऱ्याला बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अपंग प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्याचा रजा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी मीना अशोक अंबाडेकर व समाज कल्याण विभागातील लिपीक हनिफ शेख याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ बेड्या ठोकल्या. याप्रकरणी दोघांवर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्रात नोकरी करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने पाच डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१८ तसेच १६ जून २०१९ ते ३१ जानेवारी २०१९ याकालावधीत एकूण ४२ दिवस अर्जित रजा घेतली होती. ही रजा मंजूर करून घेणे आवश्यक असल्याने त्यांनी फेब्रुवारी २०१९मध्ये रजा मंजूर करण्यासाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात दाखल केला. या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्याने जिल्हा समाज कल्याण अधिकारी मीना अशोक अंबाडेकर यांची भेट घेतली. त्यांनी रजा मंजूर करण्यासाठी पाच हजारांच्या लाचेची मागणई केली. लाच देण्याची इच्छा नसलेल्या अर्जदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. विभागाने १४ मे रोजी लाचेची पडताळणी केली असता, संबंधित अधिकाऱ्याने पाच हजार रुपये या विभागात लिपीक असलेले शेख मोहम्मद हनिफ यांच्याकडे देण्याबाबत सूचना केली. यानंतर बुधवारी (१५ मे) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात सापळा लावला. तेव्हा शेख मोहम्मद हनीफ याने अर्जदाराकडून पाच हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. ही रक्कम समाज कल्याण अधिकारी मीना अशोक अंबाडेकर यांनी स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलिस अधीक्षक एस. आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलिस निरीक्षक अश्वलिंग होनराव, कल्याण सुरासे, दिगंबर पाठक, बाळासाहेब राठोड, पुष्पा दराडे, संदीप चिंचोले यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभियांत्रिकीची आजपासून परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांना गुरुवारपासून (१६ मे) सुरू होत आहेत.

विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी २४ केंद्रांवर ५० हजार ३०८ परीक्षार्थी असणार आहेत. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे हॉलतिकीट दोन दिवसांपूर्वीच संबंधित महाविद्यालयांकडे पाठविण्यात आले आहेत. औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकानासाठी दाखल केलेल्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांपन झाले आहे मात्र, मूल्यांकनानंतर काही निकालात बदल होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना हॉलतिकीट देण्यात गोंधळ उडण्याची शक्यता असल्यामुळे या परीक्षा तीन दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. १६, १७ आणि २० मे रोजी होणारी परीक्षा ११, १२ आणि १३ जून रोजी घेण्यात येणार आहे. हा केलेला बदलही विद्यापीठाच्या वेबसाइटवर टाकण्यात आला आहे. अभियांत्रिकीच्या परीक्षा दहा जूनपर्यंत चालणार आहेत. औषधनिर्माणच्या परीक्षा २१ मे ते १३ जूनदरम्यान होणार आहेत. या परीक्षेसाठी अभियांत्रिकीचे १३ आणि औषधनिर्माणशास्त्रसाठी ११ परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. या परीक्षाकेंद्रांवर सहकेंद्रप्रमुखांची नेमणूक परीक्षा विभागाने केली आहे. कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची स्थापनाही केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या जायकवाडी येथील पंप हाउसला पोलिस संरक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी येथील महापालिकेच्या पंप हाउसला बुधवारी पोलिस संरक्षण देण्यात आले. आंदोलनकांनी पंप हाउसचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिल्यामुळे संरक्षण देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

जायकवाडी धरणातून हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी बुधवारी पालिकेच्या पंप हाउसला लक्ष्य करण्याचे ठरविले. त्याची कुणकुण पोलिसांना लागली. पोलिस निरीक्षक पायघन यांनी त्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. ही माहिती मिळताच अधिकारी दुपारी औरंगाबादहून पैठणच्या दिशेने निघाले. दरम्यानच्या काळात पंप हाउसला पोलिस संरक्षण देण्यात आले. दोन सशस्त्र पोलिस या ठिकाणी तैनात करण्यात आले. ही माहिती महापालिकेच्या जायकवाडी पाणीपुरवठा योजनेचे उपअभियंता बी. डी. घुले यांनी दिली. सायंकाळी चारपासून घुले देखील पोलिसांसह पंप हाउसवर बसून आहेत.

'मटा'शी बोलताना ते म्हणाले, 'आंदोलन करणाऱ्यांनी पंप हाउसवर येऊन आंदोलनाचा इशारा दिल्याचे पोलिसांकडून कळाल्यामुळे आम्ही तातडीने पंप हाउसवर दाखल झालो आहोत. पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी आहे. सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलक पंप हाउसवर आले नव्हते. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त घेतला आहे. सध्या पंप हाउसमधून होणारा पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंगी ठाण मांडून, तरीही ‘अंडर रिपोर्टिंग’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जगभरातील शंभर देशांमध्ये डेंगीचा फैलाव असल्याचे स्पष्ट झाले असतानाच, डेंगीचा फटका बसलेले ७५ टक्के नागरिक हे आशियायी देशांमध्ये वास्तव्यास असल्याचेही पुरते उघड झाले आहे. अर्थातच, भारतात, महाराष्ट्रात व अगदी औरंगाबादसारख्या शहरांना डेंगीचा किमान एक ते दोन दशकापासून विळखा कायम आहे. एकीकडे डेंगी ठाण मांडून बसल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे सरकारी आरोग्य यंत्रणांच्या उपाययोजना परिणामकारक नसल्याने डेंगी प्रत्येक वर्षी जवळजवळ तितक्याच ताकदीने डोके वर काढत आहे. तिसरीकडे डेंगीचे सरकारी पातळीवर चक्क 'अंडर रिपोर्टिंग' होत आहे, तर डेंगीविषयी नागरिकांमध्ये अनाठायी भीती व गैरसमजांचे पिक दरवर्षीच येत असल्याची चौथी बाजूही राष्ट्रीय डेंगी दिनानिमित्त समोर येत आहे.

देशभर डेंगीचा फैलाव वाढत असल्यानेच या आजाराविषयी व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या हेतुने १६ मे रोजी राष्ट्रीय डेंगी दिन पाळला जातो. काही दशकांपूर्वीपर्यंत डासांमुळे होणाऱ्या मलेरियाशिवाय इतर कोणत्याही आजारांची नावे लोकांच्या कानावर आदळत नव्हती. मात्र गेल्या एक ते दीड दशकापासून चिकनगुन्या व डेंगीची जणू दहशत निर्माण झाली आहे. त्यातही सुरुवातीची काही वर्षे केवळ पावसाळ्यामध्ये दिसणारा डेंगी आता जवळजवळ बारा महिने दिसू लागला आहे आणि प्रत्येक शहरात डेंगीच्या शेकडो केसेस ढळढळीतपणे दिसून येत आहेत. तरीही डेंगीचे सरकारी आकडे फार कमी दाखवले जात आहेत. आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या नोंदीनुसार, औरंगाबाद शहर व जिल्ह्यामध्ये गेल्या चार वर्षांत ३८४ डेंगी पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आहे, तर औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांमध्ये ६१६ डेंगी पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आहे. वस्तुत: या चार जिल्ह्यांच्या एकूण आकड्यांपेक्षाही कितीतरी पटींनी जास्त आकडे हे एकट्या शहराचे असू शकतात, अशी एकंदर परिस्थिती असल्याचे समोर येत आहे. मुळात डेंगीचे सरकारी पातळीवर 'अंडर रिपोर्टिंग' होते, असा स्पष्ट आक्षेप वैद्यकतज्ज्ञांकडून घेतला जातो. डेंगीच्या पहिल्या तीन दिवसांत 'एनएस-१' चाचणीद्वारे निदान होऊ शकते; परंतु ही चाचणी सरकारी पातळीवर ग्राह्य धरली जात नाही आणि डेंगीच्या चौथ्या ते सातव्या दिवसादरम्यान कोणत्याही चाचणीद्वारे डेंगीचे निदान होऊ शकत नाही. या चाचण्यांच्या मर्यादा एकीकडे आहेत, तर दुसरीकडे डेंगीची लक्षणे दिसताच आधी चाचणी करण्यापेक्षा आधी उपचारांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच ५० टक्क्यांपेक्षा जास्त केसेसमध्ये डेंगीच्या चाचण्या केल्या जात नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे डेंगीने मृत्यू झाला तरी 'डेंगी'ऐवजी वेगळ्या वैद्यकीय नावाने मृत्युची नोंद होते; किंबहुना तशी नोंद करण्यास भाग पाडले जाते, जेणेकरुन डेंगीमुळे मृत्युचा गाजावाजा होणार नाही, असेही सूत्रांनी सांगितले.

\Bप्राथमिक चाचणी सरकारला अमान्य

\Bया संदर्भात बालरोगतज्ज्ञ डॉ. केदार सावळेश्वरकर म्हणाले, निम्म्या किंवा त्यापेक्षा जास्त केसेसमध्ये डेंगीची तपासणी न होता थेट उपचार होतात. तसेच आजाराच्या प्राथमिक अवस्थेत स्थानिक पातळीवर केली जाणारी तपासणी सरकारी यंत्रणेकडून ग्राह्य धरली जात नाही आणि फार कमी केसेसमध्ये सरकारी यंत्रणेला अपेक्षित लॅबकडून डेंगीची मुख्य चाचणी होते. त्यातही उपचार सुरू झाला असल्यास ही चाचणी 'निगेटिव्ह' येऊ शकते मात्र, याचा अर्थ असा नाही की संबंधित रुग्णाला डेंगी नव्हताच, असेही डॉ. सावळेश्वरकर म्हणाले. फिजिशियन व इन्टेसिव्हिस्ट डॉ. आनंद निकाळजे म्हणाले, 'फॉल्स निगेटिव्ह' असा प्रकार असतो, ज्यात रुग्णाला डेंगी असला तरी किंवा होऊन गेला असला तरी ती चाचणी 'पॉझिटिव्ह' न येता 'निगेटिव्ह' येते. त्यामुळेच डेंगीचे प्रमाण खूप जास्त असताना त्याचे सरकारी पातळीवर 'अंडर रिपोर्टिंग' होते. त्याचवेळी डेंगीच्या निर्मूलन-नियंत्रणासाठी मिळणारा निधी, मनुष्यबळ व व्यवस्थेच्या अकार्यक्षमतेमुळे आणि अपयशामुळेच डेंगी सतत वाढत आहे. नागरिकांमध्ये डेंगीविषयी अनेक गैरसमज आहेत. एखादे फळ खाल्याने प्लेटलेट वाढतात, एखादे फळ डेंगीसाठी उपयुक्त ठरते, असाही गैरसमज आहे. मुळात अशा कोणत्याही बाबींना शास्त्रीय आधार नाही, असेही डॉ. निकाळजे यांनी स्पष्ट केले.

\Bरक्तस्त्रावाशिवाय प्लेटलेट नकोत

\Bडेंगी हा दहा दिवसांचा आजार आहे. औषधे देऊनही चार ते पाच दिवस कायम राहणारा तीव्र ताप, अंगदुखी, डोकेदुखी, डोळ्यापाठीमागे असह्य वेदना होणे, पूरळ येणे अशी काही डेंगीची लक्षणे असतात. संबंधित डेंगीच्या रुग्णाला पाच ते सहा दिवस ताप राहू शकतो. त्यानंतर अचानक ताप कमी होतो व याच काळात रुग्णामध्ये गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ नये म्हणून जास्त काळजी घ्यावी लागते. या काळात शरीरातील पाण्याचे योग्य प्रमाण राखणे खूप महत्वाचे ठरते. त्याचवेळी जोपर्यंत रक्तस्त्राव होत नाही तोपर्यंत रुग्णाला प्लेटलेट देण्याची गरज नसते. उलट गरज नसताना प्लेटलेट दिल्यास प्रकृती बिघडण्याची शक्यता असते. वेगवेगळ्या टप्प्यांवर तज्ज्ञांचा सल्ला; तसेच निरीक्षण आवश्यक असते. मुळात डेंगीच्या केवळ पाच ते दहा टक्के केसेस गंभीर स्वरुपाच्या असतात. हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र खडके यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्यासाठी उपसरपंचास गावकऱ्यांची मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी उपसरपंचास लाठ्या, काठ्या आणि बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना चारनेर (ता. सिल्लोड) येथे घडली आहे. जखमी उपसरपंच रवीसिंग राजपूत यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसापासून चारनेर येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना कडक उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पाणी नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना गावकऱ्यांना करावा लागत आहे. या प्रश्नी ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तक्रारी करूनही पाणी पुरवठ्याची समस्या सुटत नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या काही गावकऱ्यांनी उपसरपंच रवीसिंग राजपूत यांना मंगळवारी लाठ्या, काठ्या, चापट, बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर नळाला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसला कुलूप ठोकले. जखमी उपसरपंचावर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून औरंगाबादला हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी गावात जाऊन हा प्रश्न सामंजस्याने मार्गी लावण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गावकऱ्यांचे जवाब नोंदविले आहेत. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात ग्रामसेवक शिंदे यांनी तक्रार नोंदविली आहे.

आम्ही मंगळवारी पाणी पुरवठ्याचे नियोजन करीत असतांना दहा ते बारा जण माझ्या घराजवळ आले. त्यांनी मला काही न विचारता लाठ्या काठ्यांनी व बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

- रविसिंग राजपूत, उपसरपंच

चारनेर येथील पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊसला फकिरा देशमुख व त्यांचे भाऊ हरून देशमुख यांनी कुलूप लावून पाणी पुरवठा कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

- विश्वास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी पाटबंधारे विभागाचा ताबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

आपेगाव हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडा, या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करणारे शेतकरी आक्रमक झाले असून, बुधवारी त्यांनी जायकवाडी येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाचा ताबा घेत स्वतःला कोंडून घेतले.

गोदावरी नदीवरील आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडा, या मागणीसाठी तीन तालुक्यातील तालुक्यातील जवळपास चाळीस गावातील शेतकऱ्यांनी सोमवारपासून धरणाच्या पायथ्याजवळ आंदोलन सुरू केले आहे. मात्र, शासनाकडून पाणी सोडण्यासंबंधीचे ठोस आश्वासन मिळत नसल्याने बुधवारी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी उत्तर जायकवाडी येथील पाटबंधारे विभागाचे कार्यालयच ताब्यात घेतले व स्वतःला कोंडून घेतले. त्यामुळे पोलिस व पाटबंधारे विभागाची एकच धावपळ उडाली. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, तहसीलदार महेश सावंत व पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन दोन्ही बंधाऱ्यात पाणी सोडण्यासंबंधीचे प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठवले असून, याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली.

\Bकार्यकारी अभियंत्यांना फटकारले

\B'मी पण एक शेतकरी असून शेतकऱ्यांच्या व्यथा मला माहित आहेत. यामुळे बंधाऱ्यात पाणी सोडावे यासाठी मी प्रयत्न करत असून, आपण आंदोलन मागे घ्यावे,' अशी विनंती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी केली. तेव्हा 'आपण खरंच शेतकरी असता व आमची व्यथा माहीत असती तर, आम्हाला पाण्यासाठी तीन दिवसांपासून आंदोलन करण्याची गरज पडली नसती. सध्या, शेती विकत घेणारा अभिनेता अमिताभ बच्चनही स्वतःला शेतकरी म्हणओ,' असे म्हणत शेतकऱ्यांनी त्यांना फटकारले.

तीन दिवसांपासून दिवसरात्र आंदोलन केल्यावरही अद्याप शासन आमच्या आंदोलनाला गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे आम्ही पाटबंधारे विभागाच्या कार्यलयात कोंडून घेतले. यापुढे आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत.

- जयाजीराव सूर्यवंशी, शेतकरी नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदा कालवा पाण्याने वैजापूरकरांना दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

नाशिक पाटबंधारे विभागाने गोदावरीच्या डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी मंगळवारी मध्यरात्री वैजापूर नगरपालिकेच्या घोयगाव (ता. कोपरगाव) येथील साठवण तलावात पोहचले. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळित होण्यास मदत होणार आहे.

घोयगाव साठवण तलाव कोरडा पडल्यामुळे मागील काही दिवसांपासून शहरवासीयांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचे चटके जाणवत होते. नगरपालिकेतर्फे दर आठ दिवसानंतर नळाद्वारे पाणी पुरवले जात असल्याने नागरिकांना टँकरचे पाणी विकत घेण्याची नामुष्की ओढावली होती. शहराला एकाच वेळी पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे पावणे दोन कोटी लिटर पाण्याची आवश्यकता भासते. नाशिक पाटबंधारे विभागाशी झालेल्या करारानुसार दर दोन महिन्यांनी डाव्या कालव्याच्या पाण्यातून साठवण तलाव भरून घेतले जातात व तेथून पंपिंग करून शहरातील जलकुंभात पाणी आणले जाते. यावेळी डाव्या कालव्याद्वारे प्राप्त झालेले पाणी नगरपालिकेने अतिशय नियोजनपूर्वक दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी वापरले. मात्र, पाणी संपल्यानंतरही दुसरे आवर्तन मिळण्यास उशीर झाल्याने नगरपालिकेची चिंता वाढली होती. नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, मुख्याधिकारी विठ्ठल डाके, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, पालिका अभियंता प्रकाश पाटील यांनी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर डाव्या कालव्यातून साठवण तलावात पाणी सोडण्यात आले.

\Bएका भागाला केला पुरवठा

\Bवैजापुरातील चार साठवण तलावात हे पाणी सोडण्यात येणार आहे. मंगळवारी मध्यरात्री बारा वाजेपासून साधारणपणे २०० क्युसेक या वेगाने साठवण तलावात पाणी दाखल होत आहे. एक तलाव भरण्यास साधारणपणे २४ ते २६ तासांचा कालावधी लागत असल्याने चार ते पाच दिवस भरण्यास लागणार आहे. पाण्याची पातळी गाठल्यानंतर लगेचच नगरपालिकेतर्फे साठवण तलावातून जलकुंभाकडे पाणी पंपिग करण्यात आले. लाडगाव रस्ता व मोंढा मार्केट (गावठाण) येथील जलकुंभ भरण्यात येत असून बुधवारी शहरातील एका भागाला पाणीपुरवठा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारने चिरडल्याने चुलत भावांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भावाला जेवणाचा डब्बा देण्यासाठी बायपासवरून जाताना दुभाजकाला धडकून विरुद्ध बाजूला पडल्यानंतर समोरून येणाऱ्या कारने दोघा चुलत भावांना चिरडले़ ही घटना बुधवारी (१५ मे) दुपारी दीडच्या सुमारास मास्टरकूक हॉटेलजवळ घडली़ या अपघातात अतुल अरुण हतागळे (१२, रा. छोटा मुरलीधरनगर, उस्मानपुरा), आदित्य कैसराम हतागळे (१५, रा. ज्ञानेश्वरनगर, सातारा) या चुलत भावांचा मृत्यू झाला़

अतुल व अदित्य बुधवारी दुपारी दीड वाजता दुचाकीवरून बीड बायपास रस्त्यावरील निशांतपार्कजवळ एका अपार्टमेंटमध्ये सफाई काम करणारा त्यांचा मोठा भाऊ खंडू हतागळे याच्यासाठी जेवणाचा डब्बा घेऊन जात होते. मास्टरकूक हॉटेलजवळ दुचाकी चालविणाऱ्या अदित्यचे नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी दुभाजकावर आदळली व दोघे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पडले. यावेळी समोरून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या वॅगनआर कारच्या चालकाने दोघांना चिरडले. यामध्ये अतुलच्या अंगावरून कारचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला तर, आदित्य गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब डोईफोडे व हवालदार शेषराव चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना घाटी रुग्णालयात आणले़ जखमी आदित्यचाही उपचारादरम्यान रात्री प्राणज्योत मालवली़ याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उपनिरीक्षक डोईफोडे अधिक तपास करत आहेत.

आईच्या भेटीसाठी आला होता अतुल

अतुलला एक भाऊ व तीन बहिणी असून, एक बहीण बीड जिल्ह्यातील मादळमोही येथे ऊसतोडीचे काम करते. अतुलही तिच्यासोबत राहत होता. गेल्या आठवड्यात त्याची आई आजारी असल्याचे त्याला समजल्यावर तो भेटण्यासाठी आला होता़

कारचालकाचा शोध घेणार

अतुल व आदित्य हे दोघेही अल्पवयीन आहेत. त्यांना डब्बा देण्यासाठी दुचाकी कोणी दिली, याची चौकशी करण्यात येणार आहे. अपघात घडल्यानंतर कारचालक पसार झाला असून, त्याचा शोध घेणार असल्याचे पोलिस हवालदार शेषराव चव्हाण यांनी सांगितले.

पाच महिन्यांत ११ जणांचा बळी

गेल्या पाच महिन्यांत बीड बायपास रोडवर झालेल्या अपघातांत तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला आहे़ गेल्या एप्रिल महिन्यात १३ तारखेपर्यंत दोन जणांचा अपघात मृत्यू झाला होता़ या महिन्यात १५ तारखेलाच दोन युवकांचा या रस्त्याने बळी घेतला आहे़ सर्व्हिस रोडसंदर्भात शासन, महापालिका यांनी अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाचा खून; जन्मठेपेसह दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैशांसाठी आधी गळा भेट घेऊन नंतर मित्राचाच गळा चिरून खून करणाऱ्या जावेद खान वसी खान याला जन्मठेप व १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी गुरुवारी (१६ मे) ठोठावली. घटनास्थळासह दुचाकी, कपडे व पादत्राणांवरील रक्ताचे डाग, लाळेचे नमुने, बोटांचे ठसे आणि स्पॉट पंचनाम्यात सापडलेल्या नऊ वस्तुंचे ठोस पुरावे आणि त्याचवेळी २० साक्षीदारांची साक्ष या क्लिष्ट खटल्यात महत्वपूर्ण ठरली, हे विशेष.

या प्रकरणी मृत अक्षय ज्ञानेश्वर गुळसकर (वय २२) याचे वडील व खुलताबाद कोर्टाचे लिपिक ज्ञानेश्वर सोनाजी गुळसकर यांनी फिर्याद दिली होती व छावणी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. प्रकरणात आठ डिसेंबर २०१६ रोजी रात्री आठच्या सुमारास अक्षय हा घराच्या बाहेर पडला होता. त्यानंतर अक्षय व त्याचे मित्र जबिंदा मैदानाजवळ दारू प्याले. तिथून ते सर्व रेल्वेस्टेशन परिसरात अंडाभुर्जी खाण्यासाठी गेले. काही वेळेत अक्षय याला परिचित असलेला जावेद खान वसी खान (वय ३३, रा. सादातनगर) हा तिथे आला व त्याने अक्षयची गळाभेट घेतली. तसेच पुन्हा दारू पिण्यासाठी जावेद हा अक्षयला दुचाकीवर घेऊन गेला. जावेदसोबत त्याने स्वत:च चोरलेला चाकू होता. दरम्यान, जावेद हा अक्षयला मिटमिटा परिसरात घेऊन गेला आणि पैशांसाठीच जावेदने त्याचा गळा चिरून खून केला, असे तपासात निष्पन्न झाले. दुसऱ्या दिवशी मिटमिटा परिसरातील सरोश उर्दू शाळेलगत अक्षयचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी करण्यात आलेल्या स्पॉट पंचनाम्यात अक्षयची पॅँट, बुटाचा जोड, दोन पेन, एक पूर्ण सिगारेट, एक अर्धवट जळालेली सिगारेट, स्टेट बँकेची जळालेली कागदपत्रे, घड्याळ, बेल्ट अशा नऊ वस्तू सापडल्या. तसेच घटनास्थळापासून दीड किलोमीटरवर अक्षयची दुचाकी आढळून आली. या दुचाकीवर, जावेदच्या बुटावर, कपड्यांवर आढळून आलेले रक्ताचे डाग तसेच विविध ठिकाणचे बोटांचे ठसे हे अक्षय याचेच असल्याचे तपासणीत आढळून आले. प्रकरणात जावेदला दहा डिसेंबरला अटक करण्यात आली. अटकेनंतर जावेदने ज्या चाकूने अक्षयचा खून केला तो चाकू तसेच गुन्हा करतेवेळेचे घातलेले कपडे जावेदने पोलिसांच्या हवाली केले. त्या चाकूवर तसेच जावेदच्या कपड्यांवरही अक्षय याच्याच रक्ताचे डाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याचवेळी ज्या गाडीवरून जावेदने चाकू चोरला होता, त्या गाडीमालकाने तो चाकू आपलाच असल्याची कबुली दिली. तपासाअंती कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

\Bसुनावणीवेळी सादर केले २० दाखले

\Bखटल्यावेळी, विशेष सरकारी वकील राजेंद्र मुगदिया यांनी २२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यात दोन साक्षीदार फितूर झाले. सुनावणीवेळी, मुगदिया यांनी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे २० दाखले न्यायालयात सादर केले व आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी विनंती केली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने जावेद याला भारतीय दंड संहितेच्या ३०२ कलमान्वये जन्मठेप व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरी, तर भारतीय दंड संहितेच्या २०१ (पुरावा नष्ट करणे) कलमान्वये तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images