Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

प्रवाशाची चोरली बॅग; आरोपीच्या कोठडीत वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पत्नी व मित्रांसह देवदर्शनाहून रेल्वेने घरी परतणाऱ्या प्रवाशाची बॅग लांबविल्या प्रकरणात आरोपी शेख सोहेल शेख शादुल याच्या पोलिस कोठडीत शुक्रवारपर्यंत (२४ मे) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी मंगळवारी (२१ मे) दिले.

या प्रकरणी व्यंकटेश्वरलू सिरानी सुब्रमण्यम नायडू (३८, रा. आंध्रप्रदेश) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, नायडू हे पत्नी व मित्रांसह १७ एप्रिल रोजी शिर्डी येथे देवदर्शन घेऊन साईनगर शिर्डी विशाखापट्टणम एक्सप्रेसने घरी परतत होते. १८ मे रोजी पहाटे मुदखेड ते शिवनगाव स्थानकादरम्यान नायडू व त्यांच्या पत्नीला झोप लागली. ही संधी साधत चोरट्यांनी त्यांची बॅग चोरली. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन नांदेड लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी शेख सोहेल शेख शादुल (२४, रा. नांदेड) याला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता, आरोपीला मंगळवारपर्यंत (२१ मे) पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीच्या साथीदारांना अटक करणे बाकी असून, गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करावयाचा असल्याने आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीच्या पोलिस कोठडीत शुक्रवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिला सुरक्षा समिती सदस्याची गळफास घेऊन आत्महत्या

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको पोलिस ठाण्याच्या महिला सुरक्षा समिती सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या लता अशोक पाटील (वय ५४) या महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी सिडको एन सात येथे हा प्रकार उघडकीस आला. पाटील यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लता पाटील यांचे सिडको पोलिस ठाण्याच्या जवळच महाराष्ट्र मेडिकल स्टोअर्स आहे. त्यांचे पती कामानिमित्त सकाळी घराबाहेर गेले होते. त्यांचा लहान मुलगा आणि भाऊ दोघे घरीच होते. पाटील या सकाळपासून दुसऱ्या मजल्यावरील बेडरुममधून बाहेर आल्या नव्हत्या. दुपारी त्यांचा मुलगा आणि भाऊ त्यांना उठवायला गेले. यावेळी दरवाजा वाजवूनही प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा तोडल्यानंतर पाटील ह्या पलंगावरील झोक्याच्या नायलॉन दोरीने छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्या. कुटुंबियांनी सिडको पोलिसांना ही माहिती दिली. पोलिस निरीक्षक अशेाक गिरी यांच्यासह पथकाने पाटील यांचे निवासस्थान गाठले. त्यांचा मृतदेह खाली उतवरून घाटी हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आला. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. लता पाटील यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी सहायक फौजदार महेमूद पठाण तपास करीत आहेत.

चौकट

महिला सुरक्षा समिती सदस्य

लता पाटील या सिडको पोलिस ठाण्यात महिला सुरक्षा समिती सदस्य म्हणून कार्यरत होत्या. ठाण्यातील अनेक प्रकरणात त्यांनी पोलिसांना मदत करीत समुपदेशनाचे कार्य देखील केले आहे. पोलिसांना मदतीसाठी तत्पर असलेल्या पाटील यांच्या आत्महत्येमुळे पोलिस कर्मचाऱ्यात देखील हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याच्या निर्णयात राजकीय आडकाठी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई असताना जलसंपदा विभागाने पाणी सोडण्याचा निर्णय राखीव ठेवला आहे. पैठण, शेवगाव, गेवराई तालुक्यासाठी हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडा, वैजापूर-गंगापूर तालुक्यासाठी नांदूर मधमेश्वर कालव्यात पाणी सोडण्याची मागणी आहे. शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केल्यानंतर कडा प्रशासनाने निर्णयासाठी प्रस्ताव जलसंपदा विभागाला पाठवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

जायकवाडी धरणात शून्य टक्के पाणीसाठा असल्याचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जाहीर केले आहे. मृतसाठ्यात पुरेसे पाणी असून डाव्या आणि उजव्या कालव्यात एक आवर्तन सोडणे शक्य असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. अन्नदाता शेतकरी संघटना पंधरा दिवसांपासून पाण्यासाठी आंदोलन करीत आहे. हिरडपुरी बंधाऱ्यात १५ दलघमी पाणी सोडणे अपेक्षित आहे. या पाण्यावर पैठण, शेवगाव आणि गेवराई तालुक्यातील ४५ गावे अवलंबून आहेत. पिण्यासाठी पाणी नसल्याने ७५ हजार लोकांना टंचाईची झळ बसली आहे. फळबागांचे नुकसान झाले असून चारा पिके आणि फळबागांसाठी पाणी गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला सांगितले. यावर पाटबंधारे विभागाने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना परिस्थिती सांगितली आहे. दुसरीकडे वैजापूर-गंगापूर तालुक्यासाठी नांदूर-मधमेश्वर कालव्यात पाणी सोडण्याची मागणी आहे. उर्ध्व भागातील दारणा, मुकणे, भाम, भावली, वाकी धरणात ४५२ दलघफू पाणी आहे. त्यामुळे तातडीने पाणी सोडणे शक्य नसल्याचे 'कडा'ने स्पष्ट केले आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी जिल्ह्यांसाठी उजव्या व डाव्या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी वाढली आहे. ठिकठिकाणी शेतकरी आक्रमक झाले असून पाटबंधारे विभागावर दबाव वाढला आहे.

दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जायकवाडीचे पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात लोकप्रतिनिधी व्यग्र आहेत. राजकीय लाभासाठी निर्णयाचे भांडवल करण्यात येईल. या सर्व दिरंगाईत दुष्काळग्रस्त मेटाकुटीला आल्याची टीका अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी केली.

\Bपाण्याचा अपव्यय कुणी केला?\B

खरीप व रब्बी हंगामात जायकवाडी धरणातील पाण्याचा अपव्यय झाल्याचे निदर्शनास आले. पाण्याची गरज नसताना पाणी कुणी सोडले, किती सोडले याचा अहवाल सादर करण्याची मागणी आहे. पाण्याचा हिशेब जुळत नसल्याने योग्य चौकशी करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. पाण्याचा अपव्यय आणि काटेकोर नियोजनातील हलगर्जीपणा याबाबत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस ठाण्यात गोंधळ; आरोपीचा जामीन फेटाळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदाराच्या कक्षात गोंधळ घालून शिविगाळ करत ठाणे अंमलदाराला धक्काबुक्की केल्याच्या प्रकरणात आरोपी विनित विनोद खरे याने दाखल केलेला नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. राठोड यांनी फेटाळला.

या प्रकरणी हवालदार दिनेश गजेसिंह गुसाई (५३) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, गुसाई हे शुक्रवारी (१७ मे) रात्री बेगमपुरा पोलिस ठाण्यात ठाण्यात अंमलदार म्हणून कार्यरत असताना तिथे अमोल पवार व त्याची पत्नी तक्रार देण्यासाठी आले होते. गुसाई हे तक्रार घेत असताना आरोपी विनित विनोद खरे (३४, रा. बेगमपुरा), त्याची पत्नी ज्योती व चंद्रकांत राऊत हे तिथे आले आणि 'आमची तक्रार आधी घ्या', असे म्हणत ठाण्यात गोंधळ घातला. कक्षातील काचेच्या टेबलावर हात आदळून तिघांनी ठाणे अंमलदारास शिविगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच राऊत याने मोबईलमध्ये ठाणे व परिसरातील चित्रण केले. त्याचवेळी आरोपी महिलेनेही ठाणे अंमलदारास 'तुम्ही माझी छेड काढली अशी खोटी तक्रार देऊन तुमची वर्दी उतरवीन' अशी धमकी दिली. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन विनित खरे व चंद्रकांत राऊत यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, दोघा आरोपींची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी विनित खरे याने नियमित जामिनासाठी दाखल केला असता, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वंचित’च्या मतांवर हिंगोतील चुरशीच्या लढतीचा निकाल अवलंबून

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

काँग्रेस आणि शिवसेनेची तुल्यबळ लढत झालेल्या हिंगोली मतदारसंघात विजयी होण्याचा दावा दोन्ही पक्षांनी केला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहन राठोड यांच्या मतांवर निकाल अवलंबून असल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे हेमंत पाटील आणि काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांनी ताकदीने निवडणूक लढवली. पण, 'वंचित' किती मते घेणार यावर चुरशीच्या लढतीचा निकाल अवलंबून आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहणार की शिवसेना वर्चस्व प्रस्थापित करणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. एकूण २३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेचे हेमंत पाटील, काँग्रेसचे सुभाष वानखेडे, बसपचे डॉ. दत्ता धनवे, वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड आणि अपक्ष उमेदवार संदेश चव्हाण प्रमुख उमेदवार आहेत. नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार असलेल्या हेमंत पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. तर ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत सुभाष वानखेडे यांनी उमेदवारी मिळवली. पूर्वानुभव आणि नात्यागोत्याची यंत्रणा कामाला लावत वानखेडे यांनी हेमंत पाटील यांच्यासमोर आव्हान उभे केले. सोशल मीडिया, जनसंपर्क आणि जाहीर सभा या आघाड्यांवर हेमंत पाटील यांनी टक्कर दिली. मागील निवडणुकीत काँग्रेसचे राजीव सातव यांच्याकडून सुभाष वानखेडे अवघ्या १६०० मतांनी पराभूत झाले होते. या मतदारसंघाचा पूर्ण अभ्यास असल्याने वानखेडे विजयी ठरतील असा दावा काँग्रेसने केला आहे. मतदारांना आश्वासक तरुण उमेदवार मिळाल्यामुळे हेमंत पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. सुभाष वानखेडे आणि हेमंत पाटील यांनी पूर्ण ताकद पणाला लावून निवडणूक लढवली आहे. बाहेरचा उमेदवार अशी पाटील यांच्यावर टीका झाली. तर पक्षांतर केल्यामुळे वानखेडे टीकेचे लक्ष्य ठरले होते.

\Bमतविभाजनावर गणित \B

मतदारसंघात मराठा, आदिवासी आणि बंजारा मतदार सर्वाधिक आहेत. वंचित बहुजन आघाडीने मोहन राठोड यांना उमेदवारी दिली. बंजारा, दलित व मुस्लिम मते राठोड यांच्याकडे वळणार असल्याचा अंदाज आहे. या नवीन समीकरणाचा फटका काँग्रेसला बसू शकतो. पण, वंचित प्रभावी ठरणार नसल्यास वानखेडेंची सरशी होऊ शकते. मतदानातून उमेदवार विजयी ठरण्याऐवजी मतांच्या विभाजनातून विजय निश्चित होणार आहे. मतदारसंघात सुभाष वानखेडे नावाचे सहा उमेदवार आहेत. मत विभाजनासाठी खेळलेली ही खेळी किती यशस्वी ठरणार याची उत्सुकता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध देशी दारुच्या साठ्यासह एक अटकेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ड्रायडेच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या देशी दारुचा साठा विक्रीसाठी बाळगणाऱ्या आरोपीला सिडको पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली. सोमवारी टिव्ही सेंटर रात्री टिव्ही सेंटर चौकात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी रात्री पावणेआठ वाजता टीव्ही सेंटर चौकातून एका रिक्षातून अवैध देशी दारुचा साठा नेण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पथकाने सापळा रचून संशयित रिक्षाचालक विक्रम आगाजी साळुंके (वय २७, रा. विजयनगर, गारखेडा) याला ताब्यात घेतले. त्याच्या रिक्षाची झडती घेतली असता रिक्षामध्ये देशी दारुचे सात बॉक्स आढळून आले. पोलिसांनी साडेसतरा हजाराच्या दारुसह ९५ हजाराची रिक्षा जप्त केली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त राहुल खाडे, एसीपी गुणाजी सावंत, पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे राजेश बनकर, प्रकाश डोंगरे, सुरेश भिसे, किशोर गाढे आणि विजय भानुसे आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणी मागणाऱ्या साप्ताहिकाच्या संपादकाला अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुंभेफळ येथील कला केंद्र चालकाला बातमी छापायाची धमकी देत दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या साप्ताहिक भ्रष्टाचार बंदीचा संपादक शरद दाभाडे आणि साथीदार विजय जाधव यांना अटक करण्यात आली. सोमवारी एन-११ भागातील एका हॉटेलवर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार बाबासाहेब किसनराव गोजे (वय ५६, रा. कुंभेफळ) यांचे कुंभेफळ येथे साई लोकनाट्य कला मंदिर नावाने कला केंद्र आहे. गेल्या एक वर्षापासून त्यांना शरद दाभाडे आणि विजय जाधव हे दोघे तुमच्या कला केंद्रामध्ये अवैध व्यवसाय चालतो, तुमची बातमी छापून बदनामी करतो, कला केंद्र कायमचे बंद करतो, अशी धमकी देत होते. कला केंद्र सुरू ठेवायचे तर आम्हाला दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हणत त्यांनी खंडणीची मागणी केली. या प्रकरणी गोजे यांनी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मंगळवारी सिडको पोलिसांनी एन-११ भागातील कृष्णा फास्टफूड या हॉटेलवर सापळा रचला. हे दोन्ही आरोपी एका अलीशान कारमधून हॉटेलजवळ आले. गोजे यांच्याकडून ३० हजाराची खंडणी घेताना या दोघांना रंगेहात पकडण्यात आले. आरोपी शरद भीमराव दाभाडे (वय ४२, रा. एन बारा, स्वामी विवेकानंद गार्डनजवळ, हडको) तसेच विजय रामभाऊ जाधव (वय ५८, एन १३, हडको) यांना अटक करण्यात आली. आरोपीकडून ३० हजारासह दहा लाखांची कार जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, एसीपी गुणाजी सावंत, पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बाळासाहेब आहेर, राजेश बनकर, प्रकाश डोंगरे, सुरेश भिसे, किशोर गाढे आणि विजय भानुसे यांनी केली.

गुन्हेगारी पार्श्वभूमी

आरोपी शरद दाभाडे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती सिडको पोलिसांनी दिली. तसेच दुसरा आरोपी हा शासकीय सेवेतून कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादचा गड शिवसेना राखणार?

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्वच प्रमुख उमेदवारांनी आपणच जिंकणार, असा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला दोन दिवस शिल्लक असताना प्रमुख उमेदवारांचे विजयाचे गणित काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सर्वांनीच विजयाचा गुलाल उधळणार असल्याचा दावा केला.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुभाष झांबड, एमआयएम- बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव या चार प्रमुख उमेदवारांमध्ये लढत आहे. या चारही उमेदवारांशी संपर्क साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. जाधव वगळता उर्वरित तिन्ही उमेदवारांशी संपर्क झाला. जाधव यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकला नाही. या मतदारसंघात जाधव यांच्या उमेदवारीमुळे शेवटपर्यंत अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. शिवाय खासदार खैरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर जावयाला मदत केल्याचा आरोप केल्याने सुद्धा शिवसेना गड राखणार का, याची राज्यात उत्सूकता आहे.

लोकसभा मतदारसंघातील सर्वच मतदान केंद्रांवर मला मते मिळाली आहेत. सर्वांच्या सहकार्याने व आशीर्वादाने मी कमीत कमी ५५ हजार आणि जास्तीत जास्त एक लाख मतांनी निवडून येणार आहे. मतदानानंतर आम्ही आमच्या यंत्रणेमार्फत संपूर्ण मतदारसंघाची माहिती घेतली तेव्हा हे गणित स्पष्ट झाले आहे. शिवसेनाप्रमुखांचा औरंगाबादचा गड अभेद्य राहणार आहे.

चंद्रकांत खैरे, शिवसेना-भाजप महायुती

लोकसभा निवडणुकीत मीच शंभर टक्के विजयी होणार आहे. मीच विजयी होणार हे मी अगदी पहिल्या दिवशीपासून म्हणत आहे. हे माझे मत बदललेले नाही. आम्ही अभ्यासपूर्ण रितीने ग्राउंड लेव्हलचा सर्व्हेक्षण केला आहे. प्रत्येक समाजातून मला मते मिळाली आहेत. सर्वच्या सर्व मतदानकेंद्रांवर मते मिळवणारा मी एकमेव उमेदवार असेल.

-सुभाष झांबड, काँग्रेस

लोकसभा निवडणूकीत मला मतदारसंघातील दलित- मुस्लिम मतदारांसह अन्य समाजाच्या मतदारांनी देखील साथ दिली आहे. त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरेल आणि २३ मे रोजी मीच निवडून येईल. मला माझ्या विजयाबद्दल थोडीही शंका नाही. विजयी झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकासाच्या योजना राबवल्या जातील.

-इम्तियाज जलील, एमआयएम-बहुजन वंचित आघाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आज रंगीत तालीम, उद्या निकाल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादचा खासदार कोण, कोण बाजी मारणार... तब्बल महिनाभराची चर्चा आणि गणित जुळवल्यानंतर आता प्रत्यक्ष निकालासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. लोकसभेच्या मतमोजणीची बुधवारी (२२ मे) रंगीत तालीम होणार असून, गुरुवारी (२३ मे) सकाळी आठपासून मतमोजणीला प्रारंभ होणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी यांनी दिली.

चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेल्ट्रॉन इमारतीमध्ये मतमोजणी होणार आहे. प्रत्यक्ष मतमोजणीच्या एक दिवस आगोदर बुधवारी दुपारी तीन वाजता मतमोजणी केंद्रावर मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थित राहणार आहेत. मतमोजणीच्या दिवशी उमेदवार, प्रतिनिधींसमोर सकाळी सात वाजता स्ट्रॉग रुम उघडण्यात येऊन सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ करण्यात येणार आहे. सर्वप्रथम टपाली मतदान, ईटीपीबीएसद्वारे करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात येईल व त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणीस प्रारंभ करण्यात येणार आहे. औरंगाबाद मतदारसंघामध्ये औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद मध्य, गंगापूर - खुलताबाद, वैजापूर - गंगापूर, कन्नड - सोयगाव असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी सर्वाधिक २६ फेऱ्या कन्नड विधानसभा मतदारसंघासाठी होणार आहेत तर, औरंगाबाद पश्चिमसाठी २५, औरंगाबाद मध्य २४, औरंगाबाद पूर्व २३, गंगापूर २३ व वैजापूर विधानसभा मतदारसंघासाठी २५ फेऱ्या होणार आहेत. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १४ यानुसार ८४ टेबलवर मतमोजणीची प्रक्रीया राबवण्यात येणार आहे, प्रत्येक टेबलावर मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, सूक्ष्म निरीक्षक राहतील. प्रक्रियेसाठी १३० मतमोजणी सहाय्यक, १३७ मतमोजणी पर्यवेक्षक; तसेच १३२ सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारसंघातील औरंगाबाद मध्य, कन्नड आणि औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी निवडणूक निरीक्षक ब्रजमोहन कुमार यांच्या निदर्शनाखाली तर, औरंगाबाद पूर्व, गंगापूर आणि वैजापूर मतदारसंघाची मोजणी देवेंद्र सिंह यांच्या देखरेखीखाली पार पडणार असल्याचे श्रींगी यांनी सांगितले.

\Bप्रत्येक फेरीला अर्धा तास\B

मतमोजणीची प्रत्येक फेरी पूर्ण करण्यासाठी ३० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. यामध्ये मतमोजणी प्रक्रियेसह नोंदी घेऊन संपूर्ण कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेऊन फेरी पूर्ण करावी लागणार आहे. मतदानाची संख्या कमी असल्यास ही वेळ आणखी कमी होऊ शकते. मतदारसंघात मतमोजणीच्या २६ फेऱ्या होणार असल्याने आठ ते दहा तास पूर्ण मतमोजणीसाठी लागण्याची शक्यता आहे. ईव्हीएमवरील मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच अशा ३० मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मतांचा ताळमेळ घेण्यात येणार आहे.

\B२११२ टपाली मतपत्रिका प्राप्त\B

निवडणुक विभागाकडून ४७७५ टपाली मतपत्रिका मतदरांना पाठवण्यात आल्या होत्या, त्यापैकी आतापर्यंत २११२ टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये ९९२ सैनिकांच्या मतपत्रिका असून, उर्वरित मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मतपत्रिकांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेचार लाखांचा गंडा; मॅनेजरच्या कोठडीत वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पिग्मी खात्यातून हॉटेल मालकाचे ४ लाख ४९ हजार रुपये घेऊन पसार झाल्याप्रकरणातील आरोपी व्यवस्थापक शंकर उर्फ रेड्डी शिवाजी बोंबे याने दाखल केलेला नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी मंगळवारी (२१ मे) फेटाळला.

या प्रकरणी हॉटेल मालक किरण सुदंरराव उबाळे (४०, रा. उत्तमनगर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीच्या हॉटेलात शंकर उर्फ रेड्डी शिवाजी बोंबे (३५, रा. विशालनगर, लातूर) हा व्यवस्थापक म्हणून कामाला होता. हॉटेल परवान्याच्या नूतनीकरणासाठी पैसे लागत असल्याने फिर्यादीने पिग्मी खाते असलेल्या देवगिरी बँकेतून ४ लाख ४९ हजार रुपये काढण्यासाठी हॉटेलमधील काऊंटरच्या ड्रॉव्हरमध्ये स्लीप भरून ठेवली होती. आरोपी बोंबे याने ही स्लीप चोरुन त्या आधारे देवगिरी बँकेतून ४ लाख ४९ हजार रुपये काढले होते. त्यानंतर तो पसार झाला होता. प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन बोंबे याला १६ मे रोजी अटक केली होती व मंगवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, न्यायालयाने तो फेटाळला. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समर्थकांवर करडी नजर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी जालना रोडवरील मेल्ट्रॉन कंपनीमध्ये होणार आहे. या मतमोजणीसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. मतमोजणीदरम्यान उमेदवारांच्या समर्थकांमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीने समर्थकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. त्याचप्रमाणे मतमोजणीदरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

मतमोजणीदरम्यान शहर पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये मतमोजणीच्या ठिकाणी एक पोलिस उपायुक्त, दोन सहायक आयुक्त, दहा पोलिस निरीक्षक, ३० सहायक निरीक्षक, २०० कर्मचारी, ६० महिला कर्मचारी याच्यासह केंद्रीय राखीव दल आणि राज्य राखीव दलाचे प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. या ठिकाणी १२ कॅमेरामन देखील राहणार आहेत; तसेच शहरात दोन पोलिस उपायुक्त, दोन सहायक आयुक्त, १९ पोलिस निरीक्षक, ८३ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, १५० महिला कर्मचारी असा बंदोबस्त राहणार आहे.

…शहरात लोकसभेसाठी प्रथम चौरंगी लढत होणार आहे. या लढतीमध्ये काय होते, याची सर्वांनाचा उत्सकुता आहे. मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवारांच्या समर्थकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने या ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. साध्या वेशातील पोलिसांचा यामध्ये समावेश आहे. या समर्थकांमध्ये काही बाचाबाचीसारखे प्रकार होऊ नये यादृष्टीने देखील पोलिसांच्या वतीने दक्षता घेण्यात येणार आहे.

\B२० स्ट्रायकींग फोर्स\B

मतमोजणीदरम्यान पोलिस आयुक्तालयात २० स्ट्रायकींग फोर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. मतमोजणीच्या फेरीनिहाय वातावरण पाहून हा बंदोबस्त संबंधित ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. पोलिसांनी बंदोबस्तासाठी जय्यत तयारी केल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

\Bवाहतूक व्यवस्थेत बदल\B

मतमोजणी शहरातील महत्त्वाचा मार्ग असलेल्या जालना रोडवरील विमानतळासमोर होणार आहे. या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेत वाहतुकीला अडचण होण्याची शक्यता पोलिसांनी गृहित धरली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. गुरुवारी पहाटे पाच ते रात्री १२ या कालावधीत हा मार्ग बंद असणार आहे. बंद मार्ग आणि पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे आहे.

बंद मार्ग

- जालना रोडवरील वाहतूक बंदोबस्तावरील प्रभारी अधिकारी त्यांच्या आवश्यकतेनुसार बदल करतील आणि वळवतील

- वाहनधारकांनी जळगाव टी पॉइंट ते केंम्ब्रिज नाका या मार्गाचा वापर टाळावा

पर्यायी मार्ग

- जालनाकडून धुळे व जळगावकडे जाणारी वाहतूक ही केंम्ब्रिज चौक ते सावंगी बायपास अथवा केंम्ब्रिज चौक ते बीड बायपास रोड, महानुभाव आश्रम चौक या मार्गाने जातील

- अहमदनगरकडून जालन्याकडे जाणारी वाहने ही नगरनाका, रेल्वे स्टेशन, महानुभाव आश्रम चौक, बीड बायपास, झाल्टा फाटा, केंम्ब्रिज चौकामार्गे जातील

- जळगाव टी पॉइंट, सिडको बसस्टँडपर्यंत येणारी वाहने हर्सूलमार्गे शिवाजीनगर, बीड बायपास मार्गाचा वापर करतील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ हजाराची लाच घेताना शेंदुरवाद्याचा कोतवाल गजाआड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाळुच्या पकडलेल्या ट्रॅक्टरवर तलाठ्याला सांगून गुन्हा न दाखल करण्यासाठी आठ हजाराची लाच घेणाऱ्या शेंदुरवाद्याच्या कोतवालाला अटक करण्यात आली. अनिल यशवंत फाजगे (वय ४१, रा. शेंदुरवादा) असे या कोतवालाचे नाव असून मंगळवारी दुपारी शेंदुरवादा येथे ही कारवाई करण्यात आली.

यातील तक्रारदार हे शेतकरी आहेत. घराच्या बांधकामासाठी ते वाळुचा ट्रॅक्टर घेऊन जात होते. यावेळी हा ट्रॅक्टर तलाठी संजय राठोड यांनी पकडला. कोतवाल अनिल फाजगे याने या ट्रॅक्टरवर तलाठ्याला सांगून गुन्हा दाखल करीत नाही. मात्र, त्यासाठी आठ हजाराच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून मंगळवारी सापळा रचून आठ हजाराची लाच घेताना कोतवाल फाजगे यांना पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर अधिक्षक शंकर जिरगे, उपअधिक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश धोकरट, गणेश पंडूरे, गोपाल बरंडवाल, सुनील पाटील, मिलिंद इप्पर, संदीप चिंचोले यांनी केली. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवस उलटले तरी आगीचा पंचनामा नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रविवारी दुपारी ब्रीजवाडी येथील मनपा ठेकेदाराच्या एलईडी बल्बच्या गोदामाला आग लागून लाखोचे नुकसान झाले आहे. या घटनेला दोन उलटले असून अद्यापही या घटनेचा पंचनामा झाला नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

मनपाचे शहरातील पथदिवे बदलण्याचे काम दिल्ली येथील इलेक्ट्रॉन कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीचे तीन मजली गोदाम ब्रीजवाडी येथे आहे. या गोदामाला रविवारी दुपारी बारा वाजता भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या पाच बंबांनी ही आग आटोक्यात आणली. ही आग लागल्याचे नेमके कारण दोन दिवसानंतरही स्पष्ट होऊ शकले नाही. सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात या घटनेची फक्त नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या आगीचा पंचनामा दोन दिवस झाले तरी करण्यात आला नसल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये मुंडे भावंडांच्या लढाईत कोणाची सरशी

0
0

म. टा. प्रतिनिधी बीड

बीड जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक अत्यंत चुरशीची होत असते. त्यामुळे यावेळच्या लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रसचे बजरंग सोनवणे यांच्यात संघर्ष तीव्र झाला होता.

राष्ट्रवादीचे माजी मंत्री व आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षात अन्याय होत असल्याचे सांगत युतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना पाठिंबा दिला, तर महायुती मधील घटक पक्ष शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पाठिशी राहण्याची भूमिका घेतली. विकास निधी, नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाची सोलापूरवाडी पर्यंत झालेली चाचणी, याच्या बळावर मुंडे भगिनी निवडणुकीस सामोरे गेल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारात विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी झोकून दिले होते. चुलत भाऊ-बहिणींमधील ही लढाई राज्यभर गाजली. ही निवडणूक सोनवणे यांच्याऐवजी धनंजय मुंडे यांच्या प्रतिष्ठेची झाली आहे.

आम्ही जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला. विकास निधी आणला, जिल्ह्यात रेल्वेची चाचणी झाली. हेच आमच्या प्रचाराचे मुद्दे होते. बीडच्या जनेतेने गोपीनाथ मुंडे यांच्यावर भरभरून प्रेम केले. त्यांचा मतरूपी आशीर्वाद आमच्या पाठिशी आहे. निवडणुकीत पहिल्या दिवशीपासून आम्हाला विजयाचा विश्वास आहे. सर्व विधानसभा मतदारसंघात आम्हाला आघाडी मिळेल.

-डॉ. प्रीतम मुंडे, भाजप उमदेवार

यंदा बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे. परळी विधानसभा मतदारसंघात आम्ही विरोधकांची बरोबरी करू. आष्टी विधानसभा मतदार संघात थोडे मागे राहू, मात्र उर्वरित चार मतदारसंघात मोठी आघाडी आम्हाला मिळेल. या निवडणुकीत शंभर टक्के विजयी होणारच.

-बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीतील कचरा उचलण्यात पुन्हा एकदा अनियमितपणा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) कचऱ्याच्या प्रश्‍नाचे भिजत घोंगडे कायम राहते की काय, अशी शंका महापालिकेच्या दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. महापौरांसोबत अलीकडेच झालेल्या बैठकीनंतर कचरा उचलण्यास प्रारंभ झाला होता; परंतु पुन्हा एकदा कचरा उचलण्यात अनियमितता आल्याचे स्पष्ट झाले आहे.

घाटीचा कचरा प्रश्न वर्षभरापासून सुटलेला नाही. वर्षभरापासून घाटीच्या मैदानातच घाटीचा कचरा टाकला जात आहे. याबाबत पालिकेने कचरा उचलावा, अशी मागणी घाटी प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात आली होती. निवेदनेही देण्यात आली होती. वर्ष लोटल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कचरा उचलण्याचे मान्य केले व गेल्या दोन आठवड्यांपासून कचरा उचलण्यास सुरुवातही झाली. मात्र काही दिवसांपासून कचरा उचलण्यात अनियमितता आली आहे. दरम्यान, घाटीच्या कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्याची तक्रार आहे, तर रोज जमा होणाऱ्या दीडशे किलोंच्या कचऱ्याचे वर्गीकर‌‌ण का होत नाही, हा प्रश्नच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नांदेडमध्ये भाजपला कमळ फुलण्याची आशा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. हा गड काँग्रेस कायम राखणार, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, उमेदवार अशोक चव्हाण यांनी केला आहे, तर भाजपसह वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनीही आपलाच विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी, गवई गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीतर्फे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाजप शिवसेना रिपाइं, रासप महायुतीतर्फे आमदार प्रतापराव चिखलीकर, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. यशपाल भिंगे यांच्यासह एकूण १४ उमेदवार रिंगणात होते. चव्हाण व चिखलीकर या कट्टर राजकीय विरोधकांमुळे या लढतीकडे राज्याचे लक्ष वेधले गेले. त्यातच 'वंचित'चे डॉ. भिंगे यांनी आव्हान दिल्यामुळे निवडणूक रंगतदार ठरली. आपलाच विजय निश्चितच, असा दावा आता काँग्रेस, भाजपसह वंचित बहुजन आघाडीने असला तरी मतदारांनी कोणाला कौल दिला हे मात्र २३ मे रोजी मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

एक्झिट पोल हे वस्तुस्थितीला धरून नाहीत. 'अंडर कंरट' काय हे पाहणे आवश्यक आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे राज्यातील सर्व प्रस्थापित पक्षांना निश्चितच धक्का बसेल. सुमारे ३५ हजाराच्या मताधिक्याने माझा विजय होईल.

-डॉ. यशपाल भिंगे, वंचित बहुजन आघाडी

नांदेड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा काँग्रेस व मित्रपक्षाचाच विजय होईल. किती मताधिक्य मिळेल, हे आत्ताच सांगता येणार नाही. पण, मोदींविरुद्धचा असंतोष, मतदारांचा पाठिंबा, सहकारी पक्षांनी केलेली मदत यामुळे काँग्रेसचाच विजय होईल.

-अशोक चव्हाण, काँग्रेस

यंदाचा शंभर टक्के विजय भाजप, शिवसेना महायुतीचाच होणार. विजय किती मतांनी होणारच याबाबत आकडेमोड केली नाही. पण निश्चितपणे नांदेडमध्ये यंदा कमळच फुलणार. काँग्रेसच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकावर राहावे लागणार आहे.

-प्रताप पाटील चिखलीकर, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीला मुदतवाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ घेण्यात येणाऱ्या तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा विशेष दुरुस्ती तसेच अन्य उपाययोजनांना आता १५ जून पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे. ज्या उपाययोजना ३० जून २०१९ पूर्वी पूर्ण होऊन ज्यातून पाणीपुरवठा सुरू होऊ शकेल, अशा उपाययोजनांना विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी स्तरावरून १५ जूनपर्यंत मान्यता देता येऊ शकणार आहे.

यंदा राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळामुळे होरपळ आहे. या कालावधीमध्ये प्रशासनाकडून नागरिकांना पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत होते. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईअंतर्गत येणाऱ्या तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना व नळ योजनांची विषेश दुरुस्ती या उपाययोजनांना क्षेत्रीय स्तरावर ३१ मार्चनंतर मान्यता देण्यात येऊ नये असे शासनाचे परिपत्रक होते. मात्र, यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या उपाययोजनांना ३१ मार्च २०१९ पूर्वी मान्यता देता येऊ शकली नाही. यासाठी १५ मे पर्यंत मुदवाढ देण्यात आली होती. मात्र, प्रशासकीय मान्यता देण्यास तसेच निविदा प्रक्रिया, अन्य बाबी तसेच यावर्षीची तीव्र पाणीटंचाई विचारात घेता याही कालावधीस मुदतवाढ देण्याची बाब तसेच यावर्षी तीव्र पाणीटंचाई विचारात घेता याही कालावधीस मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंघाने सर्व संबंधितांना टंचाई अंतर्गत उपाययोजनांना प्रशासकीय मंजूरी देण्यासाठी आता १५ जून २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

'त्याच' योजनांना मंजुरी

शासन परिपत्रकानुसार ८ मे २०१९ मधील सूचनांनुसार टंचाई अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरुन १५ मे २०१९ पर्यंत मान्यता देता येऊ शकेल, असे कळविण्यात आले होते. मात्र, आता पुनर्विचार करून टचांईअंतर्गत घेणाऱ्या सर्व उपाययोजनांकरीता ज्या उपाययोजना ३० जुन २०१९ पूर्वी पूर्ण होऊन ज्यातून पाणीपुरवठा सुरू होऊ शकेल, अशा उपाययोजनांना विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरुन १५ जून २०१९ पर्यंत मान्यता देता येऊ शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रक्रिया केंद्राला पुन्हा नवा मुहूर्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्राच्या चाचणीचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकण्याची शक्यता आहे. महापौरांनी यापूर्वी चाचणीसाठी पालिका प्रशासनाला दोन वेळा डेडलाइन दिली होती. या दोन्ही वेळेस चाचणी झाली नाही. आता त्यांनी तिसरी डेडलाइन दिली आहे. ही डेडलाइन देखील पाळली जाणार नसल्याचे बोलले जात आहे.

चिकलठाणा शिवारात दुग्धनगरीच्या जागेवर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या ठिकाणच्या प्रकल्पाचे काम मायोवेसल्स या कंपनीला देण्यात आले आहे. यंत्रसामग्री लावण्याचे कंपनीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. प्रक्रिया प्रकल्पाला वीज जोडणी न मिळाल्यामुळे प्रकल्प सुरू करणे शक्य होत नाही. चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल आणि कांचनवाडी येथील प्रक्रिया प्रकल्पांसाठी वीज जोडणी मिळावी म्हणून महापालिने महावितरणकडे सुमारे साडेतीन कोटी रुपये भरले आहेत. निवडणूक आचारसंहितेमुळे महावितरणने कचरा प्रक्रिया केंद्रासाठीच्या एक्स्प्रेस फीडरसाठी निविदा काढली नव्हती. गेल्या आठवड्यात अत्यावश्यक कामांसाठी आचारसंहिता शिथील केल्यावर महावितरणने निविदा काढली. निविदेवर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. निविदेवर निर्णय झाल्यावर लगेचच एक्स्प्रेस फीडरचे काम पूर्ण होण्याची शक्यता नाही. महापौरांनी दोन जून रोजी प्रकल्पाची चाचणी घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत, चाचणी यशस्वी झाल्यानंतर दहा जूनदरम्यान प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन करू, असे त्यांनी जाहीर केले होते, परंतु एक्स्प्रेस फीडर दोन जूनपर्यंत कार्यान्वित होणे शक्य नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या चाचणीसाठी प्रशासनाने सात जून ही तारीख ठरवली आहे. चाचणी लांबणार असल्यामुळे प्रकल्पाचे उद्घाटन देखील लांबणीवर पडणार आहे.

युजर्स चार्जेस वसुलीचे खासगीकरण

कचरा संकलन आणि वाहतुकीच्या कामाचे खासगीकरण केल्यानंतर आता कचऱ्यासाठी युजर्स चार्जेस वसूल करण्याच्या कामाचेही खासगीकरण करण्याचे महापालिकेने ठरविले आहे. हे चार्जेस वसूल करण्यासाठी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यावर लगेचच निविदा काढण्यात येणार आहे. खासगी संस्थेमार्फेत युजर्स चार्जेस वसूल केले जाणार आहेत. कचरा संकलन आणि वाहतुकीचे खासगीकरण करण्याच्या निर्णयाबरोबरच या कामासाठी येणारा खर्च भरून काढण्यासाठी नागरिकांकडून युजर्स चार्जेस वसुल करण्याचा निर्णय देखील महापालिकेने सर्वसाधारण सभेत घेतला. निवासी क्षेत्रातून दररोज एक रुपया तर, व्यावसायिक क्षेत्रातून दररोज दोन रुपये याप्रमाणे चार्जेस वसूल केले जाणार आहेत. कचरा संकलन व वाहतुकीचे काम सुरू झाल्यावर नागरिकांकडून हे चार्जेस वसूल करण्याचे देखील ठरविण्यात आले होते. आता कचरा संकलन व वाहतुकीचे काम नऊपैकी सहा झोन कार्यालयाच्या क्षेत्रात सुरू झाले आहे. त्यामुळे युजर्स चार्जेस वसूल करण्यासाठी निविदा काढण्याचे महापालिकेने ठरविले असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. निवडणुकीच्या निकालानंतर आचारसंहिता संपेल त्यामुळे लगेचच निविदा काढून युजर्स चार्जेसच्या वसुलीसाठी खासगी संस्था नियुक्त केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकाला आधीच विजयोत्सवाचे होर्डिंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी दोन दिवस बाकी असताना औरंगाबाद शहरात शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या विजयाचे होर्डिंग लावण्यात आले आहेत. खैरे समर्थकांच्या अतिउत्साहाची यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

चंद्रकांत खैरे यांना शिवसेनेने पाचव्यांचा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रसेचे सुभाष झांबड, एमआयएमचे इम्तियाज जलील आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हे तीन प्रमुख उमेदवार देखील आहेत. त्यामुळे औरंगाबादची लढत तुल्यबळ होईल असे चित्र सुरुवातीपासूनच होते. त्यातच औरंगाबाद शहरातील पाणीप्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, रस्त्यांचे रखडलेले काम यामुळे खैरे यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. नाराज नागरिकांची समजूत काढता काढता शिवसेनेच्या नेते, पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या नाकीनऊ आले होते. त्यामुळे खैरेंच्या विजयाबद्दल ठामपणे बोलायला कुणीच तयार नव्हते.

राजकीय पटलावर असे चित्र असताना मंगळवारी औरंगाबाद शहराच्या काही भागात खैरे यांच्या विजयाचे होर्डिंग झळकले. ' ना हरा, ना पिला संभाजीनगरात फक्त भगवा' असे घोषवाक्य लिहिलेले होर्डिंग आता चर्चेचा विषय बनले आहेत. होर्डिंगवर खैरे यांचे विजयी मुद्रेतले छायाचित्र देखील टाकण्यात आले आहे. खैरे समर्थकांचा हा उत्साह आहे की अतिउत्साह अशी चर्चा होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसच्या कामगिरीकडे लातूरमध्ये लक्ष

0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

विलासराव देशमुख यांच्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपने गेल्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतरच्या जिल्ह्यातील झालेल्या सर्व निवडणुकांवर भाजपचाच वरचष्मा राहिला आहे. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हा गड ताब्यात घेईल की भाजपच विजयी होणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे डॉ. सुनील गायकवाड यांनी विजय मिळवला होता. मात्र, यावेळी त्यांची उमदेवारी कापून जिल्हा परिषदेचे सदस्य सुधाकर शृंगारे यांना देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या मच्छिंद्र कामत यांच्या गळ्यात काँग्रेसने उमेदवारीची माळ घातली. या दोन प्रमुख उमेदवारातच लातूर मधील लढत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राम गायकर हे कशी कामगिरी करतात, याकडेही मतदारांचे लक्ष राहणार आहे. शृंगारे यांची मालमत्ता व कामत हे मसाले उद्योजक असल्याने या मतदारसंघात शेवटपर्यंत 'माल' आणि 'मसाला'ची चर्चा रंगली. औसा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यात आली. दुसरीकडे मोठ्या सभा न घेता थेट मतदारांपर्यंत पोचण्याचे तंत्र काँग्रेसने अवलंबिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांचा जनतेला मोठा लाभ झाला आहे. त्यामुळे जनता भाजपच्या पाठीशी आहे, त्याचा फायदा मला होणार आहे. सर्व विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाणार असल्याचा विश्वास वाटतो. जनतेने मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठीच मतदानासाठी पुढाकर घेतला असल्याने विजय निश्चित आहे.

-सुधाकर शृंगारे, भाजप

नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधातील सार्वत्रित असंतोषाचा लाभ मला होणार आहे. उदगीर मतदारसंघात गेल्या विधानसभेला निवडणूक लढवण्याचा उपयोग झाला आहे. सुशिक्षित, सुसंस्कृत उमेदवार असल्याची भावना सर्व समाजातील नागरिकांमध्ये होती. त्यामुळे सर्व समाजाने मला पाठिंबा दिलेला आहे. विजयाची अपेक्षा आहे.

मच्छिंद्र कामत, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images