Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘ना खान, ना बाण’; विकासाला संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'ना खान, ना बाण' ही कॅचलाइन घेऊन आमदार इम्तियाज जलील यांनी प्रचारात शहराचा विकास व विविध प्रश्नांकडे मतदारांचे लक्ष वेधून घेतले. वंचित बहुजन आघाडीने दिलेली साथ आणि 'एमआयएम'वर मुस्लिम मतदारांनी पुन्हा टाकेलेल्या विश्वासामुळे आमदार जलील यांनी लोकसभेत प्रवेश केला आहे.

'वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसची आघाडी होत असेल, तर औरंगाबादमधून एमआयएम उमेदवार देणार नाही,' असे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी स्षप्ट केले होते. यानंतर जनता दल धर्मनिरपेक्षचे पक्षाध्यक्ष माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी संपर्क केल्यामुळे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमधून माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची उमेदवारी घोषित केली होती. पण, जनता दलाचे शहरात काहीच अस्तित्व राहिले नसताना ही उमेदवारी एमआयएमच्या स्थानिक कार्यकर्त्यांना पचनी पडली नाही. येथे एक आमदार आणि २६ नगरसेवक असल्यामुळे ही जागा एमआयएमने लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी खासदार ओवेसी यांच्याकडे धरला. एमआयएमचा उमेदवार द्यावा की नाही, याचा आढावा घेऊन खासदार ओवेसी यांनी अखेर मुंबई येथील एका सभेनंतर आंबेडकर यांची भेट घेऊन एमआयएमला महाराष्ट्रात एक जागा देण्याची गळ घातली. आंबेडकरांनी त्याला संमती दिल्यानंतर आमदार जलील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय हैदराबाद येथून जाहीर करण्यात आला.

आमदार जलील यांनी 'ना खान, ना बाण' या मुद्यावर निवडणूक प्रचार सुरू केला. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्यामुळे समता सैनिक दलापासून गाव पातळीवरील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जलील यांच्या प्रचारासाठी दिवसरात्र एक केला. आंबेडकर यांनी शेवटच्या टप्प्यात जलील यांच्या प्रचारात भाग घेतल्यामुळे, जलील यांना बळ मिळाले. मुस्लिम मतदारांत सुरुवातीला एमआयएमबद्दल काही प्रमाणात नाराजी होती. पण, तीन दिवस शहरात प्रचार करत खासदार ओवेसी यांनी ही नाराजी दूर केली. आमदार जलील यांनी शहर विकासावर प्रचार केंद्रीत केल्याने सर्व धर्मीय मतदारांनी त्यांच्या पारड्यात मत टाकले.

……

\Bराजा भैय्यांची सभा एमआयएमच्या पथ्यावर \B

एमआयएमला डिवचण्यासाठी, तसेच एका धर्माची मते एकत्रित करण्यासाठी हैदराबादचे आमदार राजा भैय्या यांची सभा सिडकोमध्ये घेण्यात आली. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेनेला हिंदूंची मते एकत्र करण्यात यश आले असले तरी, काँग्रेसकडे जाणारी मुस्लिम मते एमआयएमकडे वळली. ही सभा एमआयएमच्या पथ्यावरच पडली. त्याचवेळी काँग्रेसचे नवज्योतसिंग सिद्धू यांच्या आझाद चौकात झालेल्या सभेचा मतदारांवर काहीही परिणाम झाला नाही.

\B'एमआयएम'मध्ये आमदारकीसाठी गर्दी \B

'एमआयएम'चे औरंगाबाद मध्यचे आमदार इम्तियाज जलील यांना लोकसभा निवडणुकीत प्रमोशन मिळाले आहे. यामुळे औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे.

नाराजांचा गट आणखी नाराज

आमदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी देऊ नये यासाठी काही नेते कार्यरत होते. ते लोकसभेत पराभूत होतील असा त्यांचा विश्वास होता. जलील यांचा विजय झाल्याने नाराजांचा गट अधिक नाराज झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वंचित बहुजन आघाडी ठरली ‘गेमचेंजर’ !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीत दहापेक्षा जास्त मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाला वंचित बहुजन आघाडी कारणीभूत ठरली. पारंपरिक मतांचे विभाजन झाल्यामुळे काँग्रेस आघाडीचे उमेदवार पराभूत झाले. मराठवाड्यात तीन मतदारसंघात वंचित आघाडी 'गेमचेंजर' ठरली. औरंगाबाद मतदारसंघात 'वंचित'चे उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाले. नांदेड व परभणीत 'वंचित'च्या उमेदवारांनी लक्षणीय मते घेतल्याने आघाडीच्या तुल्यबळ उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.

औरंगाबाद शहरातील जाहीर सभेनंतर वंचित बहुजन आघाडी राज्यभर चर्चेत आली. दलित-मुस्लिम मतदारांसह वंचित घटकाला जोडणारा हा राजकीय प्रयोग होता. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची पारंपरिक मतपेटी फोडण्यासाठी भाजपने 'बी टीम' उभी केल्याची टीका सुरू झाली. आघाडीसोबत जाण्याचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहिले, पण दोन्ही बाजूने चर्चा सफल होऊ शकली नाही. या विसंवादाचे परिणाम लोकसभा निवडणुकीच्या निकालात उमटले. राज्यात काँग्रेस आघाडीने हक्काच्या दहा जागा गमावल्या. मराठवाड्यात वंचित बहुजन आघाडी तेवढीच परिणामकारक ठरली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात वंचित आणि एमआयएम आघाडीचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील विजयी झाले. दलित आणि मुस्लिम एकगठ्ठा मतांच्या जोरावर जलील यांचा विजय सोपा झाला. नांदेडमध्ये 'वंचित'चे उमेदवार प्रा. यशपाल भिंगे यांनी एक लाख ६६ हजार १९६ मते मिळवली. या मतदारसंघात भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांचा ४० हजार १४८ मतांनी पराभव केला. आतापर्यंत चव्हाण यांना आघाडी मिळत असलेल्या मतदारसंघात भिंगे यांनी आघाडी मिळवली. परिणामी, चव्हाण यांचा पराभव झाला. परभणी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांनी लक्षणीय मते मिळवली. शिवसेनेचे संजय जाधव यांनी विटेकर यांचा ४२ हजार १९९ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात 'वंचित'चे उमेदवार आलमगीर खान यांना एक लाख ४९ हजार ९४६ मते पडली आहेत. नवीन चेहरा मतदारसंघात दिल्यानंतर राष्ट्रवादीने प्रचाराचा धडाका उडवला होता. त्यामुळे विटेकर विजयी होतील अशी शक्यता होती, पण आलमगीर खान यांनी लक्षणीय मते मिळ‌वत विटेकर यांचा रस्ता रोखला. या तीन जागांवर वंचित बहुजन आघाडी प्रभावी ठरल्याने निकालाचे चित्र पालटले.

'वंचित'ची सर्वव्यापी चर्चा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांच्या सभा आणि वंचित बहुजन आघाडी या दोन घटकांची जोरदार चर्चा होती. राज यांच्या सभांचा परिणाम कमी जाणवला, पण जोरदार मते मिळवत 'वंचित' आघाडी निकालानंतर चर्चेचा केंद्रबिंदू ठरली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यात निकालावरुन वादविवाद सुरू झाले आहेत. या निकालाचे दूरगामी परिणाम राजकीय समीकरणांवर झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीत एक जागा जिंकून आम्ही काँग्रेसची बरोबरी केली. बहुतेक मतदारसंघात लक्षणीय मते मिळाली असून विधानसभा मतदारसंघनिहाय विश्लेषण करीत आहोत. ही निर्णायक मते समाधानकारक आहेत.

- सिद्धार्थ मोकळे, प्रवक्ता, 'वंबआ'

उमेदवारांची मते

औरंगाबाद - इम्तियाज जलील - तीन लाख ८९ हजार ४२ (३२.४७ टक्के)

- जालना - शरदचंद्र वानखेडे - ७७ हजार १५८ (६.३९)

- बीड - प्रा. विष्णू जाधव - ९२ हजार १३९ (६.८१)

- हिंगोली - मोहन राठोड - एक लाख ७४ हजार ५१ (१५.४)

- लातूर - राम गारकर - एक लाख १२ हजार २५५

- नांदेड - प्रा. यशपाल भिंगे - एक लाख ६६ हजार १९६ (१४.७२)

- उस्मानाबाद - अर्जुन सलगर - ९८ हजार ५७९ (८.१८)

- परभणी - आलमगीर खान - एक लाख ४९ हजार ९४६ (११.९७)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीचे निवासी डॉक्टर विद्यावेतनाच्या प्रतीक्षेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयातील पदव्युत्तर कनिष्ठ निवासींना विद्यावेतन मिळाले, परंतु रुग्णालय अस्थापनेवरील ५१ तर, सप्टेंबरपासून ८१ डॉक्‍टरांना विद्यावेतन मिळालेले नाही. दोन डॉक्‍टरांचे जुलैपासून तर, उर्वरित कनिष्ठ निवासी डॉक्‍टरांचे सप्टेंबरपासूनचे विद्यावेतन निधी अभावी रखडले आहे. विद्या वेतनासाठी निधी उपलब्ध झाल्यावर ऑनलाइन बिले सादर करण्याच्या सूचना होत्या मात्र, त्यात तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे ट्रेझरीने मॅन्युअल बिलांवर विद्यावेतन देण्याचे मान्य केले असून, लवकरच विद्यावेतनाचा प्रश्न मार्गी लागेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्यान योग कक्षाचे मिनी घाटीमध्ये उद्घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिनी घाटी अर्थात चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ध्यान योग कक्षाचे उद्घघाटन चेतना एम्पवर फाऊंडेशनच्या मिताली लाठी यांच्या हस्ते शुक्रवारी (२४ मे) झाले. या प्रसरंगी आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. व्ही. भोसले, डॉ. पद्मा बकाल, डॉ. भारती नागरे, डॉ. प्रदीप कुलकर्णी, रेणुका कंधारकर, सुरेखा नाईक, सुजाता मोरे, डॉ. कांबळे, डॉ, अश्‍विन कांबळे, डॉ. मनोहर वाकळे, श्रीमती नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रेरणा प्रकल्पाचे श्री. मरकड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर भारती नागरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. कुलकर्णी व डॉ. लाळे यांनी स्ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी योगा उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरामुळे जलील यांचा विजय सुकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या औरंगाबाद लोकसभेमध्ये 'एआयएमआयएम' वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी विजय मिळवून शिवसेनेची विजयी घोडदौड रोखली. जलील यांच्या गळ्यात विजयाची माळ पडण्यामध्ये ग्रामीणच्या तुलनेत औरंगाबाद शहरातील मध्य आणि पूर्व विधानसभा मतदारसंघात मिळालेले मताधिक्य महत्त्वाचे ठरले.

जलील यांना औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक ९९ हजार ४५० तर, खैरे यांना ५० हजार ३२७ मते मिळाली. शहराच्या पूर्व मतदारसंघामध्येही जलील यांनी जोरदार मुसंडी मारत तब्बल ९२ हजार ३४७ मते मिळवली. या मतदारसंघात खैरे यांना केवळ ५५ हजार ४१७ मतांवर समाधान मानावे लागले. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जातो. मात्र, या मतदारसंघामध्येही इम्तियाज जलील यांनी तब्बल ७१ हजार २३९ तर, खैरेंना ७७ हजार २७४ मते मिळाली. जलील यांना औरंगाबादच्या तिन्ही मतदारसंघामध्ये मिळालेल्या मोठ्या मताधिक्यामुळे त्यांचा विजय सुकर झाल्याचे मिळालेल्या मतांवर स्पष्ट होते. जलील यांना ग्रामीण भागातून अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले. नेहमीच शिवसेनेच्या बाजूने उभा असलेल्या कन्नड आणि गंगापूर मतदारसंघाने जलील यांना साथ दिली. त्यांना कन्नडमधून ३४ हजार २६३ तर, गंगापूरमधून ५६ हजार २३ मते मिळाली. या शिवाय वैजापूरमधून जलील यांना ३५ हजार ४६२ मते मिळाली.

\B'पूर्व - मध्य' युतीसाठी धोक्याची घंटा

\Bलोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर विधानसभानिहायही चित्र स्पष्ट झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये इम्तियाज जलील यांना विजय मिळाला होता तर, पूर्वमध्येही 'एमआयएम'च्या उमेदवाराने प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवाराला जबरदस्त टक्कर दिली. लोकसभा मतदारसंघातील मतदान पाहता दोन्ही मतदारसंघामध्ये चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांना मिळालेल्या एकूण मतांपेक्षा जलील यांना जास्त मतदान आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसना - भाजप युतीसाठी ही धोक्याची घंटा आहे.

---

\Bप्रमुख उमेदवारांना मिळालेले मतदान\B

---

मतदारसंघ....................चंद्रकांत खैरे...........सुभाष झांबड............... इम्तियाज जलील.............. हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद पूर्व................५५४१७.....................१४०९६.....................९२३४७...........................२५६१९

औरंगाबाद पश्चिम...........७७२७४....................१५५९५.......................७१२३९..........................३८०८७

औरंगाबाद मध्य..............५०३२७....................१४१५५........................९९४५०.........................३०२१०

कन्नड.........................७३९८८....................१११८५......................३४२६३...........................६९३७४

गंगापूर..........................६००८२....................१२७८१........................५६०२३........................६४३९३

वैजापूर.........................६६६७१......................२३८७६.......................३५४६२.........................५५५५४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरींच्या अधिग्रहणाला जिल्हा प्रशासनाची मंजुरी; सोमवारपासून टँकरने पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या विहिरींच्या अधिग्रहणाच्या प्रस्तावाला जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सोमवारपासून या विहिरींवरून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. विहिरींवरून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाल्यास शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल, असे मानले जात आहे.

शहरातील ३४ विहिरींच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. त्यापैकी २९ विहिरींच्या अधिग्रहणाला जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती उपायुक्त मंजुषा मुथा यांनी शुक्रवारी दिली. शहरात गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पुरेसे आणि नियमित पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांनी व काही नगरसेवकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने महापालिकेने हालचाली सुरू केल्या. विहिरींच्या अधिग्रहणाची कल्पाना त्यातून पुढे आली. वॉर्ड अधिकाऱ्यांच्या मदतीने विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले आणि ३४ विहिरींच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव जिल्हाप्रशासनाकडे पाठविण्यात आला. यामध्ये प्रभाग एकमधून ती, प्रभाग चारमधून दहा, प्रभाग आठमधून ११ आणि प्रभाग नऊमधून दहा या विहीरींचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने हा प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला. तहसीलदार रमेश मुंनलोड यांनी तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या मार्फत विहिरींची तपासणी केली. त्यातील ११ विहिरी सार्वजनिक असल्याचे निदर्शनास आले. तर १८ विहिरी खासगी आहेत. या सर्व विहिरींचे अधिग्रहण करण्यास तहसीलदारांनी मंजुरी दिली. सोमवारपासून या विहिरींवरून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असे उपायुक्त मुथा यांनी सांगितले. अकरा विहिरींवर स्टँडपोस्ट उभारण्याचे काम देखील केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अग्निशमन केंद्रांचे काम रखडले, नवीन निधी मिळण्याचा मार्गही बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता नवीन पाच अग्निशमन केंद्र उभारण्याच्या कामाला दहा वर्षांपूर्वी शासनाने मंजुरी दिली होती. या कामासाठी निधीदेखील देण्यात आला, पण केंद्रांच्या बांधकामासाठी पालिकेला अद्याप जागा निश्चित करण्यात आली नाही. त्यामुळे मिळालेला निधी देखील खर्च होऊ शकला नाही. या कारणामुळे अग्निशमन विभाग व आपत्कालीन व्यवस्थापनासाठी शासनाकडून नवीन निधी मिळण्याचा मार्ग बंद झाल्याचे मानले जात आहे.

महापालिकेचे पदमपुरा येथे मुख्य अग्निशमन केंद्र आहे. त्याशिवाय सिडको भागात एक उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे. शहराची लोकसंख्या पाच लाख असताना हे केंद्र सुरू करण्यात आले. आता लोकसंख्या १६ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. शिवाय शहराचा विस्तार देखील मोठ्या प्रमाणावर झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने शासनाकडे वाढीव अग्निशमन केंद्रांचा प्रस्ताव पाठविला. शासनाने २००९ यावर्षी पाच केंद्रांचा प्रस्ताव मंजूर केला. २०१२ या वर्षी केंद्रांच्या बांधकामासाठी दोन कोटी ८६ लाख रुपयांचा निधी देखील देण्यात आला होता. शहागंज, हडको एन-नऊ, कांचनवाडी, हर्सूल या चार केंद्रांची कामे करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे, तर एका केंद्रासाठी पडेगाव भागात जागेचा शोध सुरू आहे. ज्या जागा अंतिम करण्यात आल्या त्या जागांसाठी पालिकेच्याच नगररचना विभागाकडून बांधकामासाठी मार्किंग देण्यात आलेले नाही. अग्निशमन विभागाला शासनाने दिलेला निधी अखर्चिक राहील्यामुळे लोकलेखा समितीने ठपका ठेवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल पंपासाठी प्रतीक्षा महापालिकेची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बाजार समिती आर्थिकदृष्ट्या बळकट व्हावी, यासाठी आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने पेट्रोल पंप चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व कार्यवाही पूर्ण झाली असून, पोलिस प्रशासनाकडून 'एनओसी'ही मिळाल्याने पंपाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महापालिकेकडून बांधकामासाठी हिरवा कंदील मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरु होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शॉपिंग कॉम्प्लेक्स, कोल्ड स्टोरेज उभारणीसह विविध विकासकामे हाती घेतली आहे. शेतकरी, व्यापारी, ग्राहकांना विविध सोयी सुविधा देताना बाजार समितीचे आर्थिक उत्पन्न कसे वाढले, यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पेट्रोल पंप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यास पणन मंडळाने मंजुरी दिल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ, अग्निशमन दल, वीज वितरण कंपनी व इतर संबंधित विभागाकडून समितीला 'ना हरकत' प्रमाणपत्र मिळाले. पाठपुराव्यानंतर पोलिस प्रशासनाकडूनही समितीला नुकतीच 'एनओसी' मिळाली आहे. बांधकाम परवानगीसाठी महापालिका प्रशासनाकडे फाइलही दाखल करण्यात आली आहे. महापालिकेकडून हिरवा कंदील मिळताच प्रत्यक्षात काम सुरू होईल, अशी माहितीही त्यांनी देत पंप उभारणीला मुहूर्त लवकरच लागेल, असा विश्वासही बाजार समितीने व्यक्त केला आहे.

\Bचांगल्या उत्पन्नाची अपेक्षा\B

पेट्रोल पंप चालविणारी मराठवाड्यातील ही पहिलीच बाजार समिती ठरणार आहे. जाधववाडी बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारशेजारील भागात पंप सुरू करण्यात येणार आहे. सुमारे पाच हजार चौरस फूट जागेत हा पंप असेल. एचपी कंपनीने पंप उभारणीसाठी मंजुरी दिली आहे. बाजार समिती आवारात दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. यासह पिसादेवी रोड व परिसरात वाहनांची मोठी वर्दळ असते, परंतु या परिसरात जवळपास कोणतेही पेट्रोल पंप नाही. अशा परिस्थितीत बाजार समितीच्या पंपामुळे वाहनधारकांची मोठी सोयी होईल आणि त्यातून समितीला चांगले उत्पन्न प्राप्त होईल, असा विश्वास समितीला आहे. त्यात समिती आ‌वारात वाहतूक नगरही उभारले जाणार असल्याने त्याचाही फायदा होईल, असे सूत्रांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिटीबससाठी भुसारी यांची चिफ ऑपरेशन्स मॅनेजरपदी निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी मिशनच्या औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसाठी एसटी महामंडळाचे निवृत्त विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांची चिफ ऑपरेशन्स मॅनेजर या पदावर निवड करण्यात आली आहे. कॉर्पोरेशनतर्फे चालवण्यात येणाऱ्या सिटीबस सेवेचे प्रमुख म्हणून ते आता काम करणार आहेत.

प्रशांत भुसारी यांच्या निवडीची माहिती महापालिकेचे आयुक्त, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्याधिकारी डॉ. निपुण विनायक यांनी दिली आहे. चिफ ऑपरेशन मॅनेजर या पदासाठी शुक्रवारी सहा उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून भुसारी यांची निवड करण्यात आली. भुसारी यांनी एसटी महामंडळाच्या सेवेत डेपो मॅनेजर, विभागीय वाहतूक अधीक्षक, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळाच्या केंद्रीय कार्यालयात प्लॅनिंग ऑफिसर ऑपरेशन्स आणि औंरगाबाद विभागाचे विभाग नियंत्रक म्हणून काम केले आहे. आता स्मार्ट सिटीच्या सिटीबस सेवेचे प्रमुख म्हणून ते काम करणार आहेत.

निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना भुसारी म्हणाले, 'स्मार्टसिटीची सिटीबस सेवा लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करू. अत्यंत चांगल्या दर्जाची सिटीबस सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असेल. राज्यातील महत्त्वाच्या शहरातील सिटीबस सेवेच्या व एसटी महामंडळाच्या सिटीबस सेवेच्या तिकीटदरापेक्षा निम्मे तिकीट दर औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने ठेवले आहेत. सिटीबस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होईल त्यावेळी नागरिकांना आपली खासगी वाहने वापरण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे नागरिकांचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल, त्याचबरोबर प्रदूषणाचे प्रमाण देखील कमी होईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेचा गळा आवळून मृतदेह अर्धवट जाळून खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सावंगी बायपासवरील पिसादेवी पोखरी रोडवर शुक्रवारी सकाळी दहा वाजता महिलेचा मृतदेह आढळला. या महिलेचा गळा आवळून खून करीत तिचा मृतदेह अर्धवट जळाल्याचे दिसून येत आहे. सोनाली सदाशिव शिंदे (वय ३०, रा. जाधववाडी) असे या महिलेचे नाव असून संशयावरून चिकलठाणा पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतले आहे.

सोनालीचा विवाह दहा वर्षांपूर्वी सदाशिव शिंदे यांच्यासोबत झाला होता. सदाशिव हे शेंद्रा एमआयडीसी भागातील एका कंपनीत कॅन्टीनमध्ये कामाला आहेत. या जोडप्याला दोन मुले आहेत. शुक्रवारी सकाळी पिसादेवी रोडवर सोनालीचा मृतदेह आढळून आला. तिची ओळख पटली नव्हती. घटनास्थळी चिकलठाणा पोलिस ठाण्याचे एपीआय सत्यजीत ताईतवाले तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट दिली. विविध पथके तयार करीत या पथकांना जवळच्या पोलिस ठाण्यामध्ये कोणी महिला बेपत्ता असल्याची नोंद आहे का हे तपासण्यासाठी पाठविण्यात आले. दरम्यान, हर्सूल पोलिस ठाण्यात सोनालीचा भाऊ ती बेपत्ता असल्याची नोंद करण्यासाठी आला असताना या तपासणी पथकाला भेटला. तिच्या नातेवाईकांनी सोनालीची ओळख पटविली. पोलिसांनी सोनालीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी घाटी हॉस्पिटलमध्ये रवाना केला. पोलिसांनी सोनालीच्या पतीचा शोध घेत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सदाशिव हा शरीरसंबधासाठी सोनालीचा छळ करीत असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. सोनालीचा पोस्टमार्टम अहवाल रात्री उशिरापर्यंत पोलिसांना प्राप्त झाला नव्हता. या अहवालानंतर चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० उमेदवारांची अनामत जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद मतदारसंघामध्ये एकुण २३ उमेदवारांपैकी २० जणांचे अनामत (डिपॉझिट) जप्त झाली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एकूण वैध मतांच्या एक सष्टांश मतेही न मिळवणाऱ्या उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त केली जाते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ११ लाख ९८ हजार ७२७ वैध मते होती. डिपॉझिट वाचवण्यासाठी उमदेवाराला १ लाख ९९ हजार ७०३ मतांची आवश्यकता होती मात्र मतांचा हा टप्पा केवळ इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांनाच पार करता आला त्यामुळे काँग्रेसचे सुभाष झांबड यांच्यासह उर्वरित सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पॅकेज्ड ड्रिकिंग वॉटर’चे ४९६ बॉक्स शेंद्रामध्ये जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एक लाख १९ हजार रुपये किमतींचा पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचा साठा शुक्रवारी (२४ मे) जप्त करण्यात आला आहे. गुप्त माहितीवरून शेंद्रा एमआयडीसीमधील बाटलीबंद पाण्याचे उत्पादन करणाऱ्या 'बालाजी इंडस्ट्रीज' कंपनीवर छापा टाकून अन्न व औषध प्रशासनच्या अधिकाऱ्यांनी ४९६ बॉक्स जप्त केले. अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर, फरीद सिद्दीकी व सुलक्षणा जाधवर यांनी कंपनीची तपासणी केली असता, कंपनीने परवान्याचे नूतनीकरण केले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे उत्पादनाच्या दर्जाबाबत संशय आल्याने नमुना तपासणीसाठी साठा जप्त करण्यात आला. संबंधित कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त उदय वंजारी व सहाय्यक आयुक्त मिलिंद शाह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचे कळवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू माफिया गटकाळ टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार लहू गटकाळ आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. गटकाळ आणि त्याचे साथीदार खुनाच्या गुन्ह्याच्या आरोपात सध्या हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

लहू श्रीरंग गटकाळ (वय ४२, रा. नाथनगर, जवाहर कॉलनी) हा बडतर्फ पोलिस कर्मचारी आहे. गटकाळ आणि त्याच्या साथीदारांनी दोन महिन्यांपूर्वी जवाहर कॉलनी भागात पितापुत्रांवर तलवारीने प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात आरोपींवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी आरोपी लहू गटकाळ, रविंद्र बाळासाहेब तोगे (रा. विष्णुनगर), अंकुश रामभाऊ मंडलिक (रा. आयप्पा मंदिराजवळ, सातारा परिसर) आणि गणेश रामनाथ जोशी (रा. द्वारकानगरी, बजाजनगर) यांना अटक करण्यात आली आहे. या टोळीवर यापूर्वी देखील संघटितपणे टोळी स्थापन करून शस्त्राचा वापर करीत दुखापत करणे, जबरी चोरी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, शस्त्राचा वापर करीत दंगल करणे, बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणे आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी या गोष्टीची गंभीर दखल घेत या टोळीविरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली. ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, परिमंडळ दोनचे उपायुक्त राहुल खाडे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे, एसीपी एच.एस. भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय श्रद्धा वायदंडे, जमादार द्वारकादास भांगे, सुनील बडगुजर, नाना हिवाळे, अजय आवले यांनी केली.

एमपीडीएखाली झाली होती कारवाई

आरोपी लहू गटकाळ याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. वाळू माफिया म्हणून त्याच्यावर तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी एमपीडीए कायद्यानुसार हर्सूल कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्धतेची कारवाई केली होती. न्यायालयात धाव घेतल्यानंतर काही महिन्यानंतर गटकाळची सुटका झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन महिन्यानंतर पोलिसांनी सोडला बंदोबस्तातून नि:श्वास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली होती. या तीन महिन्यांत पोलिसांवर दैनदिन कामाशिवाय निवडणुकीच्याही बंदोबस्ताचा ताण होता. गुरुवारी निवडणुकीच्या मतमोजणीचा अंतिम टप्पा पार पडला असून पोलिसांची तीन महिन्याच्या बंदोबस्तातून सुटका झाली आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली. यानंतर पोलिसांचे प्रचंड वाढले होते. निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्तालयात स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला होता. निवडणुकीच्या काळात समाजकंटकावर प्रतिबंधात्मक कारवाया मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्या. याशिवाय प्रचारासाठी येणाऱ्या व्हिआयपी मंडळीच्या बंदोबस्ताचा भार पोलिसांवर होता. तसेच मोठ्या प्रचार सभेचे नियोजन आणि बंदोबस्ताची जबाबदारी देखील पोलिसांवर होती. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेऊन गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी देखील पोलिसांवर होती. स्थानिक पोलिसांसोबत परराज्यातून देखील मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त शहरात मागविण्यात आला होता. यांच्या राहण्याचे तसेच जेवणाचे देखील नियोजन योग्यरित्या करण्यात आले. २३ एप्रिल रोजी मतमोजणीचा महत्त्वाचा टप्पा शहरात शांततेत पार पडला. महिन्याभराच्या विश्रांतीनंतर २३ मे रोजी मतमोजणीचा अंतिम आणि कसोटीचा दिवस देखील शांततेत पार पडला. काही किरकोळ घटना वगळता कोणतीही गंभीर घटना शहरात घडली नसल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेतर्फे आज महास्वच्छता अभियान

$
0
0

औरंगाबाद : 'आओ शहर सुंदर बनाए' या उपक्रमांतर्गत महापालिकेने शनिवारी झोन कार्यालयनिहाय महास्वच्छता अभियानाचे आयोजन केले आहे.

तीन टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात पहिल्या टप्प्यात शहर स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे. त्याची जबाबदारी झोन अधिकाऱ्यांवर आहे. प्रत्येक झोन कार्यालयासाठी सहाय्यक आयुक्तांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यासोबत नगरसेवक, पदाधिकारी, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी, पालिकेशी निगडित बचतगट कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आहे. शहरातील ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात कचरा साचलेला असतो त्या भागात ही मोहीम राबविली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात शहराच्या प्रवेश मार्गावरील भिंतींवर शहराची ओळख स्पष्ट करणारी चित्रे काढली जातील. तिसऱ्या टप्प्यात चौकांचे सुशोभीकरण, रस्ता दुभाजक रंगवणे ही कामे केली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विजयाच्या फरकापेक्षा ‘नोटा’ अधिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्याचे लक्ष लागलेल्या औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत चार वेळेस खासदार असलेल्या चंद्रकांत खैरे यांना 'एआयएमआयएम'च्या इम्तियाज जलील यांनी केवळ चार हजार ४९२ मतांनी धूळ चारली. अत्यंत अटीतटीच्यालढतीमध्ये खैरे यांचा अत्यल्प मतांनी पराभव झाला. मात्र, या विजयाच्या फरकापेक्षा 'नोटा' ला मिळालेल्या मतांची संख्या अधिक आहे. तब्बल चार हजार ९२९ मतदारांनी खैरेंसह २३ उमेदवारांना नापसंत करत 'नोटा'ला मतदान करणे पसंत केले.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादमध्ये गेल्या काही वर्षांपासून कचरा, पाणी, रस्ते आदी समस्यांमुळे नागरिक त्रस्त होते. त्यामुळे नवीन उमदेवाराला मतदारांकडून पसंती मिळते की ईव्हीएमवरील सर्वच उमेदवारांना मतदार नापसंत करत नोटाला पसंती मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार होते. आता मतमोजणीच्या निकालानंतर हे स्पष्ट झाले असून, नोटाला पडलेल्या मतदानापेक्षा कमी मतदान पराभूत उमेदवाराला विजयासाठी हवे होते. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये मतमोजणीच्या प्रत्येक फेरीमध्ये निकाल काय लागणार ? विजयी कोण होणार याची उत्कंठा वाढली होती. मतांच्या फरकावरून जो उमेदवार निवडून येईल तो अत्यंत कमी फरकाने हे जवळपास निश्चित झाले होते. दरम्यान मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या एआयएमआयएम- वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी बाजी मारली.

---

विधानसभानिहाय 'नोटा'ला पडलेली मते

---

कन्नड.......................१०४७

औरंगाबाद मध्य...........७१७

औरंगाबाद पश्चिम..........९६३

औरंगाबाद पूर्व...............७६७

गंगापूर........................७९१

वैजापूर.......................६३४

-------------------------

एकूण........................४९१९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांच्या तक्रारींची आयुक्तांकडून दखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको एन सहा भागात जलवाहिनी फुटली. त्यामुळे फारच कमी पाणी आहे. ड्रेनेज लाइन फुटल्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले होते. याची तक्रार नागरिकांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून महापालिका आयुक्तांकडे केली. या तक्रारीची तातडीने दखल घेत त्यांनी दुरुस्तीचे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी देखील लगेचच दुरुस्तीचे काम देखील सुरू केले. या प्रकारामुळे नागरिकांना सुखद अनुभव आला.

सिडको एन सहा भागात शुक्रवारी पाणीपुरवठा होणार होता. त्यानुसार सकाळी पाणी आले, पण लगेच पाच मिनिटांनी पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे या भागातील नागरिकांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याकडे या प्रकाराची तक्रार केली. यानंतर आयुक्तांनी पाच मिनिटांत पाणीपुरवठा का बंद झाला याची माहिती घेतली असता जलवाहिनीला मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाल्याचे लक्षात आले. पाणी वाया जाऊ नये म्हणून पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याचेही त्यांना समजले.

तक्रार करणाऱ्या नागरिकांना त्यांनी याची माहिती दिली व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी दुरुस्तीचे काम देखील लगेचच सुरू केले. सिडकोतील कुलस्वामिनी मंगलकार्यालयाच्यासमोर ड्रेनेज लाइन फुटली. त्यामुळे रस्त्यावर घाण पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले. त्याची तक्रार नगरसेवक मकरंद कुलकर्णी यांनी आयुक्तांकडे केली. आयुक्तांनी या तक्रारीची देखील लगेचच दखल घेतली आणि दुरुस्तीचे आदेश दिले आणि दुरुस्तीचे काम देखील सुरू करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरूंची चौकशी गुलदस्त्यात?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या चौकशीचा अहवाल जाहीर करण्याची मागणी मराठवाडा लॉ कृती समितीने केली आहे. योग्य चौकशी झाल्याशिवाय चोपडे यांना सेवानिवृत्तीचे लाभ आणि ना-हरकत प्रमाणपत्र देऊ नये, असे समितीने म्हटले आहे. या मागणीसाठी समिती येत्या मंगळवारपासून मुंबईत उपोषण करणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ चार जून रोजी संपणार आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात चोपडे यांच्या कामकाजात अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप आहेत. चौकशी समिती नेमूनही चोपडे यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. योग्य चौकशी करूनच चोपडे यांना सेवानिवृत्तीचे लाभ व ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी मराठवाडा लॉ कृती समितीने केली आहे. या मागणीसाठी समितीचे अध्यक्ष नवनाथ देवकते यांनी १६ मे रोजी उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले; तसेच मुख्यमंत्र्यांच्या सचिवांनाही निवेदन पाठवले होते. शासनाने दखल घेतली नसल्याने येत्या मंगळवारपासून (२८ मे) कृती समितीचे पदाधिकारी मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत, अशी माहिती नवनाथ देवकते यांनी दिली. आपल्या निवेदनात समितीने चोपडे यांच्या गैरकारभाराचा पाढा वाचला आहे. २०१४-१५ व २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांत शासनाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ केले होते. या सात कोटी ७० लाख रुपये रकमेचा चोपडे यांनी हिशेब दिला नाही. विद्यार्थ्यांनाही रक्कम वाटप केली नाही. निविदांशिवाय 'नॅक' मूल्यांकनावर ५० कोटी रुपये खर्च करण्यात आला. जाहिरात न देता विद्यापीठात नियमबाह्य नियुक्त्या करण्यात आल्या, संलग्नित महाविद्यालयात प्राचार्य व उपप्राचार्यांची नियुक्ती करताना ज्येष्ठांना डावलण्यात आले; तसेच यूजीसीच्या नियमांचे उल्लंघन करून मर्जीतील प्राध्यापकांना बेकायदा नियुक्त्या दिल्याचे देवकते यांनी निवेदनात म्हटले आहे. व्यवस्थापन परिषदेवर प्राध्यापकांची नियमबाह्य नियुक्ती करण्यात आली. या सदस्य प्राध्यापकांनी परीक्षेत गैरव्यवहार करूनही कारवाई झाली नाही. दूषित पाण्यामुळे वसतिगृहातील १६६ विद्यार्थिनी आजारी पडल्या, मात्र दोषींना पाठीशी घालण्यात आल्याचा आरोप देवकते यांनी केला आहे. राज्य शासनाने चोपडे यांच्या चौकशीसाठी डॉ. एस. एफ. पाटील समिती नेमली होती. या समितीचा अहवाल जाहीर करून कुलगुरू दोषी आढळल्यास तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली.

दरम्यान, या गंभीर प्रकारांना जबाबदार असूनही चोपडे इतर विद्यापीठात पुन्हा कुलगुरू होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. चौकशी झाल्याशिवाय त्यांना ना-हरकत प्रमाणपत्र आणि सेवानिवृत्तीचे लाभ देऊ नये, अशी मागणी समितीने केली. या मागणीसाठी मुंबईत उपोषण करण्यात येणार आहे. या समितीत अजहर पटेल, परमेश्वर इंगोले, सुदर्शन धुमक, कृष्णा घुले, सुमेध आवारे, विकी कामिठे, कृष्णा साबळे, विजय घुगे, शेख माजिद यांचा समावेश आहे.

\Bसंघर्ष समितीचा पाठपुरावा\B

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या चौकशीचा अहवाल जाहीर करण्याची मागणी मराठवाडा संघर्ष कृती समितीने केली आहे. या मागणीसाठी एक मेपासून विभागीय आयुक्तालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. प्रशासनाने उपोषणाची दखल घेत राजभवन कार्यालयापर्यंत माहिती पोचवली मात्र, योग्य दखल घेतली गेली नसल्याने समिती उपोषण करीत आहे. या प्रकारामुळे चोपडे यांचा कार्यकाळ पुन्हा चर्चेत आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेतील समीकरणे बदलणार ?

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्हा परिषदेतील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. पुढील अडीच वर्षांसाठी भाजप - शिवसेनेची जिल्हा परिषदेत युती असेल. मात्र, काँग्रेसमधून दहा ते ११ सदस्यांचा गट स्वतंत्रपणे अस्तित्वात येणार आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसची ताकद घटणार आहेच, पण भाजप काय करणार याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.

जिल्हा परिषदेत २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने सर्वाधिक २२ जागा जिंकल्या. शिवसेनेने १८, काँग्रेस १६, राष्ट्रवादी ३ मनसे, रिपाइं व अपक्ष एक असे संख्याबळ आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसची आघाडी जिल्हा परिषदेत झाली. शिवसेनेचा अध्यक्ष आणि दोन सभापतिपदे तर, काँग्रेसचा उपाध्यक्ष व दोन सभापतिपदे अशी वाटणी करण्यात आली. लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. पुढील विधानसभेसाठीही ही युती कायम राहणार आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही युती करावी, काँग्रेससोबतची आघाडी तोडावी, अशी मागणी भाजपने केली होती. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही कार्यवाही झाली नाही. विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत चार महिन्यांत संपणार आहे. त्यानंतर युतीच्या फॉर्म्युल्यानुसार पदवाटप होईल, असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात आले होते. दरम्यान काँग्रेसच्या १६ पैकी १० ते ११ सदस्य स्वतंत्र गट स्थापण्याच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यात वेग येईल, असे सांगण्यात आले होते. निकाल लागल्यानंतर काँग्रेसमधील सूत्रांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'आमचे ११ सदस्य स्वतंत्र गट स्थापन करण्यास तयार आहेत. पुढील अडीच वर्षांसाठी काय फॉर्म्यूला राहणार ? याची चाचपणी करून पुढील निर्णय घेतला जाईल, पण आम्ही काँग्रेससोबत राहणार नाहीत.' त्यामुळे जिल्हा परिषदेतील राजकारणातही लवकरच मोठे फेरबदल अपेक्षित आहेत.

---

\Bजिल्हा परिषदेतील संख्याबळ

\B---

शिवसेना - १८

भाजप - २२

काँग्रेस - १६

राष्ट्रवादी - ३

मनसे - १

रिपाइ - १

अपक्ष - १

………---

एकूण ६२

---

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एज्युकेशन फेअरचे गुरुवारपासून आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'एमजीएम'च्या वतीने येत्या ३० मेपासून एक जूनपर्यंत एमजीएम क्लोव्हरडेल शाळेच्या मैदानावर (एमजीएम कॅम्पस, एन-६) सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत एज्युकेशन फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स प्लॅनेट कॅम्पस'च्या सहभागाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

यूपीएसई, एमपीएसई, स्टडी अब्रॉड यासह स्पर्धात्मक परीक्षांची तयारी कशा पद्धतीने करावी, याचे मार्गदर्शन या एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून मिळणार आहे. तज्ज्ञ मार्गदर्शक या फेअरमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयाला अनुसरून मार्गदर्शन तर करतीलच शिवाय विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन देखील करतील. उपक्रमात सहभागी होण्यासाठी ९८२२६३०५५५, ९८२३५८३२२२ या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images