Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

काशिबा सुपर सेलला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उस्मानपुरा चौकातील गोपाल कल्चरल हॉलमध्ये सुरू असलेल्या काशिबा सुपर बम्पर सेलला औरंगाबादकरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. याठिकाणी बाजारभावापेक्षा तब्बल ६० टक्के सूट देण्यात येत आहे.

काशिबा चिकन एम्ब्रायडरीमध्ये चिकन साडी, ड्रेस मटेरियल, सलवार, कुर्ती, लेगिन्स, दुपट्टा, ब्लाउज पीस, कटपीस, पँट पीस, शर्ट पीस (ब्रँडेड) यासह चिकन प्लाझो, चिकन पँट, कुर्ती आदी सर्व साइजच्या उपलब्ध करवून देण्यात आल्या आहेत. एम साइजपासून एट-एक्सएलपर्यंत साइज येथे आहेत. याशिवाय लग्नसराईनिमित्त नवनवीन डिझाइन्सचा नवा स्टॉक असल्याने पारंपरिक; तसेच नवीन ग्राहकांना मोठी व्हरायटी मिळत आहे. सर्व प्रकारचे डेबिट-क्रेडिट कार्ड येथे स्वीकारले जातात. श्रेष्ठ गुणवत्ता, वाजवी भाव व बदलण्याची सुविधा यामुळे या सेलला मोठा प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त औरंगाबादकरांनी सेलला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तब्बल १६ तासानंतर विजयी उमेदवाराची घोषणा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवघ्या देशभरात दुपारनंतर मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होऊन विजयी उमदेवारांची नावे जाहीर करण्यात येत असताना औरंगाबाद लोकसभा निवडणुकीचा अधिकृत निकाल देण्यास प्रशासनाला तब्बल १६ तासांचा अवधी लागला. प्रशासनाकडून मध्यरात्री ११ वाजून ५० मिनिटांनी विजयी उमेदवाराची घोषणा करण्यात आली. यावर उलटसुलट चर्चा होत आहे. प्रत्येक मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर निरीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांचे एकमत होण्यासोबतच निवडणूक आयोगाला कळवण्यापर्यंत अनेक तांत्रिक बाबी असल्या तरी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने दक्षता बाळगण्याच्या हेतूने हा निकाल मध्यरात्री जाहीर केल्याचे मानले जात आहे.

गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. एकीकडे टी.व्ही.वर देशभरातील निकाल जाहीर करण्यात येत असताना औरंगाबादच्या निकालाला मात्र उशीर झाला होता. प्रत्येक फेरीअखेर चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्या मतांमधील फरक कमी अधिक होत असल्याने मतमोजणी केंद्राबाहेर दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यांमध्ये दोन्ही उमदेवारांच्या समर्थकांची मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी वाढली होती. प्रत्येक फेरीमधील मतमोजणीच्या घोषणेनंतर समर्थक जोरदार घोषणाबाजीही करत होते. दरम्यानच्या काळामध्ये पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसादही परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते.

यंदा मतमोजणीची प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने काही गोष्टींचा अहवाल तत्काळ पाठवणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार प्रत्येक मतमोजणीच्या फेरीनंतर निवडणूक आयोगाला माहिती पाठवावी लागत होती. कोणताही निर्णय अंतिम करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि निवडणूक निरीक्षकांमध्ये एकमत होणे आवश्यक ठरते. यंदा दोन निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी व दोन्ही निवडणूक निरीक्षक यांचे एकमत होणे व प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्यातही प्रशासनाचा बराच वेळ गेला. शिवाय यंदा ईव्हीएम मतमोजणीनंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील 'व्हीव्हीपॅट' चिठ्ठ्यांची जुळवणी करावयाच्या प्रक्रियेसही अधिक वेळ गेला. मात्र, या गोष्टी देशातील इतर मतदारसंघासाठीही बंधनकारक होत्या. त्यामुळे निकाल उशीर जाहीर करण्याचे कारणे काय याबाबत चर्चा सुरू आहे. विजयी उमेदवार इम्तियाज जलील हे विजयी झाल्याची घोषणा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मध्यरात्री ११ वाजून ५० मिनिटांनी केली. त्यानंतर जलील यांना विजयी प्रमाणपत्र देण्यात आले. शहरातील चिकलठाणा परिसरात असलेल्या मेल्ट्रॉन कंपनीमध्ये प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरु झाली असली तरी, निवडणूक कर्मचाऱ्यांना सकाळी सहा वाजेपासूनच केंद्रावर हजर रहावे लागले होते. निकाल जाहीर करण्यास झालेल्या विलंबामुळे कर्मचाऱ्यांचेही हाल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांमुळेच वाढला मनोविकारांचा स्टिग्मा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मनोविकारांच्या उपचारांमध्ये; तसेच पुनर्वसनात सर्वांत मोठा अडथळा आहे तो मनोविकारांना कलंक (स्टिग्मा) मानण्याचा आणि हा स्टिग्मा वाढण्यास सर्वाधिक कारणीभूत आहेत ते डॉक्टर अर्थात फिजिशियन, जनरल मेडिकल प्रॅक्टिश्नर. जेव्हा कोणत्याही व्यक्तींच्या वर्तणुकीत अचानक बदल होतो तेव्हा त्याला सर्वांत पहिले फिजिशियनकडे नेले जाते आणि संबंधित व्यक्तीमध्ये मनोविकारांची लक्षणे अत्यंत स्पष्टपणे दिसत असतानाही त्याला मनोविकारतज्ज्ञांकडे पाठवले जात नाही. कुटुंबीयांनी मानसिक आजारांची शंका उपस्थित केल्यानंतरही अनेकदा मनोविकारतज्ज्ञांकडे न जाण्याचा सल्ला दिला जातो. परिणामी, मनोविकारांची तीव्रता वाढत जाते आणि संबंधित व्यक्तीसह कुटुंबाचे अतोनात नुकसान होते व उपचार उशिरा सुरू होतात, अशी टीका प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ़. विद्याधर वाटवे यांनी केली.

जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त शांती नर्सिंग होम, स्किझोफ्रेनिया स्वास्थ्य आणि पुनर्वसन प्रतिष्ठान यांच्यातर्फे शुक्रवारी (२४ मे) आयएमए हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी शांती नर्सिंग होमचे डॉ. विनय बाऱ्हाळे, डॉ. विनायक पाटील यांच्यासह आजाराविषयीचे अनुभव कथन करणारे सतीश शिरडकर, माधव भोगले, आशाताई खेडगीकर, विकास टाक, तन्मय धर्माधिकारी, विद्याधर शिनगारे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. डॉ. वाटवे म्हणाले, काही सिनेमांमधून मानसिक आजारांविषयी, उपचारांबाबत चुकीचे चित्र रेखाटले आणि मनोरुग्णांविषयी गैरसमज पसरवले. याच सिनेमांमुळ‌े स्टिग्मा वाढत गेला. अर्थात, अलीकडच्या काही सिनेमांनी अचूक शास्त्रीय माहितीसह मानसिक आजारांचे दृष्य-अदृष्य कंगोरे उत्तमपणे रेखाटले आहेत मात्र, अजूनही फिजिशियन रुग्णांना अत्यंतिक गरज असतानाही मनोविकारतज्ज्ञांकडे पाठवत नाही. अशा फिजिशियनमुळेच स्टिग्मा वाढला. त्याचवेळी एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात मनोविकारांविषयी अगदी १५ दिवसांच्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. त्यामुळेच मनोविकारांविषयी म्हणजेच मानवी मनाविषयी किती आस्था आहे, हे कळून येते. तसेच मेंदुतील जीव रासायनिक बदलांमुळे मनोविकार होतात हे स्पष्ट झाले आहे आणि त्यामुळेच मनोविकार हे मेडिकल आजार आहेत व औषधोपचारांशिवाय ते बरे होणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. अलीकडे दुष्परिणामांची (साईड इफेक्टस) मोठी चर्चा होते, परंतु जिथे साइड इफेक्ट नाहीत तिथे इफेक्टही नाही आणि बहुतांश साईड इफेक्टवर पर्यायी उपचार आहेत, याकडेही डॉ. वाटवे यांनी लक्ष वेधले. या वेळी शांती नर्सिंग होमच्या मनोविकारांबाबत केल्या जाणाऱ्या पुनर्वसनाच्या कामाचेही डॉ. वाटवे यांनी कौतुक केले.

\B'मेंटल अॅक्ट'ची अंमलबजावणी अशक्य

\Bदेशावर 'मेंटल हेल्थ अॅक्ट'ची टांगती तलवार असली तरी हा कायदा भारतामध्ये लागू करणे केवळ अशक्य आहे. या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीच्या विरुद्ध त्याच्यावर मानसिक उपचार करता येणार नाही आणि मानसिक उपचार करू द्यायचे की नाही, हे ठरवण्याचे अधिकार अशा व्यक्ती आपल्या इच्छेनुसार ठरवू शकणार आहेत. तसेच हा कायदा लागू करण्यासाठी ९४ हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी आपल्या देशात अशक्य असल्याचेही डॉ. वाटवे म्हणाले. त्याविरुद्ध इंडियन सायकियाट्री सोसायटीने आपले १०८ पानांचे म्हणणे कोर्टात दाखल केले आहे, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भपिशवी शस्त्रक्रियांचा जिल्ह्यातील अहवाल सादर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड जिल्ह्यातील घटनेनंतर शहरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून औरंगाबाद जिल्ह्यातील गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियांचा आढावा घेण्यात आला. या संदर्भातील अहवाल आरोग्य विभागाला सादर करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील प्रकारानंतर इतरही जिल्ह्यांमध्येही या प्रकाराची भिती व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे या विषयी राज्यस्तरीय आढावा घेण्याचे निर्देश आरोग्य संचालकांनी दिले होते. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातही किती शस्त्रक्रिया कोणकोणत्या कारणामुळे झाल्या, याचा आढावा घेण्यात आला. मात्र अहवाल सध्यातरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आला असून, प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खचून जाऊ नका, उद्धवांचा खैरेंना धीर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'तुम्ही चांगली लढत दिली. पराभवाने खचून जाऊ नका. शिवसेना तुमच्या पाठिशी आहे,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे यांना धीर दिला.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर एकूणच निवडणूकीचा आढावा सादर करण्यासाठी खैरे शुक्रवारी 'मातोश्री'वर गेले. त्यांच्याबरोबर आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, महापालिकेतील सभागृहनेते विकास जैन होते. सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे यांनी दुपारी दीडच्या सुमारास खैरे यांनी ठाकरे यांची भेट घेतली. अर्धातास त्यांनी खैरे यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी ठाकरे यांनी निवडणुकीतील पराभवाबद्दलची माहिती जाणून घेतली. खैरे यांनी केवळ आकडेवारी सादर केली. कुणाबद्दल तक्रारी केल्या नाहीत. ठाकरे यांनी सहानुभूतीने खैरे यांच्याशी चर्चा केली. 'पराभवाने खचून जाऊ नका. नव्या जोमाने आपण काम करू. लवकरच औरंगाबादमध्ये मराठवाडास्तरीय मेळावा घेऊ. जनता आपल्या सोबत आहे. त्यामुळे जनतेत जाऊ. पुन्हा एकदा जनतेला विश्वास देऊ. तुम्ही शिवसेनेचे नेते आहात. आता मराठवाड्यात पक्ष संघटना बांधणीचे काम जोशाने करा,' असे ठाकरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेतील समीकरण बदलणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. त्यामुळे आता महापालिकेतील राजकीय समीकरणे देखील बदलतील असे मानले जात आहे. पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांना खैरे यांचे नियंत्रण होते. त्यामुळे अन्य पक्षाच्या नगरसेवकांना जास्त हालचाल करणे शक्य होत नव्हते. येत्या काळात खैरेंची पक्षीयस्तरावर भूमिका बदलल्यास पालिकेवरील त्यांचे नियंत्रण सैल होऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

खैरे सलग चार वेळा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. वीस वर्ष ते खासदार होते. खासदारकीच्या कार्यकाळात त्यांनी महापालिकेवरची पकड ढिली होऊ दिली नाही. पालिकेत घेतले गेलेले बहुतेक निर्णय खैरे यांच्या संमतीनेच झाले. स्थायी समिती, सर्वसाधारण सभेत घ्यावयाच्या निर्णयांबद्दलची त्यांची भूमिका निर्णायक असायची. पालिकेतील छोट्या मोठ्या नियुक्त्यांमध्ये देखील त्यांचे लक्ष असायचे. पक्षीयस्तरावर देखील त्यांना या संदर्भात फ्री-हँड देण्यात आला होता. आता खैरे यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात पक्षीयस्तरावर त्यांच्या स्थानिक नेतृत्वाबद्दल फेरविचार केला जाऊ शकतो. खासदारकी राहिलेली नसल्यामुळे पालिकेच्या अंतर्गत होणाऱ्या बैठकांमध्ये हस्तक्षेप करण्याचा वाव त्यांना मिळणार नाही. स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभा होण्यापूर्वी खैरे यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होत असे. त्यात सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या बैठकीत कोणते निर्णय घ्यायचे, याचे नियोजन केले जायचे. ही बाब अनेकवेळा उघड झाली आहे. पदाधिकाऱ्यांप्रमाणेच खैरे यांचे पालिकेच्या अधिकाऱ्यांवर देखील नियंत्रण असायचे. आता हे नियंत्रण राहणार नाही. पालिकेचे अधिकारी - पदाधिकारी खैरे मुक्त कारभार करू शकतील अशी चर्चा शुक्रवारी पालिकेत होती. शहराच्या पाणी पुरवठ्यापासून साफसफाईच्या कामापर्यंत खैरेंचा पालिकेच्या कारभारात सर्वदूर हस्तक्षेप होता. आता तो कमी होईल, पालिकेतील राजकारणाचे केंद्र आता सेनेतील दुसऱ्या नेत्याभोवती निर्माण होईल, असे मानले जात आहे.

\Bसभापतींच्या निवडणुकीकडे लक्ष

\Bखैरे यांचा पराभव झाल्यामुळे चार जून रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या व विषय समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खैरेंच्या पराभवाचे खापर अद्याप उघडपणे भाजपवर फोडले गेले नसले तरी, सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का देण्याची रणनीती आखली जात असल्याचे वृत्त आहे. स्थायी समितीचे सभापतिपद यंदा भाजपच्या वाट्याला आले आहे. एक जून रोजी सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या आंदोलनाकडे महापौरांचा कानाडोळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी केलेल्या आंदोलनाकडे महापौर नंदकुमार घोडेले यांनी कानाडोळा केला. त्यांनी या आंदोलनाची दखलच घेतली नाही. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. या पराभवासाठी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. त्यातच घोडेले यांनी आंदोलनाकडे कानाडोळा केल्याने आता राजकीय रंग प्राप्त झाला आहे.

सिडको - हडकोतील पाणीप्रश्न गेल्या काही महिन्यांपासून ऐरणीवर आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले होते. दर दोन - चार दिवसांनी सिडको एन पाच येथील जलकुंभावर आंदोलन व्हायचे. आंदोलन करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने भाजपचे नगरसेवक व त्यांच्या वॉर्डातील नागरिक असायचे. जलकुंभावर झालेल्या प्रत्येक आंदोलनाची दखल महापौर नंदकुमार घोडेले यांनी निवडणूक काळात घेतली होती. त्यापूर्वीही ते अनेकवेळा आंदोलन सोडवण्यासाठी जलकुंभावर आले. शनिवारी भाजपच्या नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत यांनी सकाळी सातपासून जलकुंभावर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यांच्या आंदोलनामुळे जलकुंभावरील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. आंदोलनाची माहिती मिळाल्यावर नेहमीप्रमाणे महापौर चर्चा करण्यासाठी येतील, असे अनेकांना वाटत होते. मात्र, महापौर आलेच नाहीत. शेवटी नगरसेवक शिवाजी दांडगे यांनी आमदार अतुल सावे यांच्याशी व आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याशी संपर्क साधला. ते सावे यांना घेवून जलकुंभावर आले. दरम्यानच्या काळात शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ देखील जलकुंभावर दाखल झाले. आंदोलकांच्या दबावामुळे शिवाजीनगरचे पाणी कपात तर केले जाणार नाही ना, याचा ते अंदाज घेत होते. पाणी कपात करू देणार नाही अशी समज त्यांनी उपस्थितांना दिली. हे सर्व होत असताना देखील महापौर जलकुंभावर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आले नाहीत.

\B'ट्रॅक्टर'चा प्रचार जिव्हारी

\Bसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापौर शहरात होते. त्यांचे काही पूर्व नियोजित कार्यक्रम होते. त्यामुळे ते जलकुंभावर येऊ शकले नाहीत. मात्र, त्यांच्या जलकुंभावर न येण्याच्या व आंदोलनाची दखल न घेण्याच्या भूमिकेचा आता राजकीय अर्थ लावला जात आहे. भाजपच्या काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत 'ट्रॅक्टर'चे काम केल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. त्यामुळेच खैरे यांना पराभवाची धूळ चाखावी लागलीस असेही बोलले जात आहे. खैरे यांचा पराभव शिवसेनेमधील काही जणांना जिव्हारी लागला आहे. त्यातीलच महापौर हे एक असल्याचे मानले जाते. खैरेंच्या झालेल्या पराभवामुळे महापौरांनी भाजपच्या पाणी आंदोलनाकडे कानाडोळा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादमध्ये स्वच्छता अभियान; ३२२ टन कचरा गोळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आओ शहर सुंदर बनाए' या संकल्पनेच्या माध्यमातून महापालिकेने शनिवारी संपूर्ण शहरात स्वच्छता अभियान राबवले. दिवसभर चाललेल्या या अभियानात ३२२ टन कचरा गोळा झाला. या अभियानात महापालिकेचे १२२० अधिकारी - कर्मचारी, १११९ नागरिक असे एकूण २३३९ जण सहभागी झाले.

स्वच्छता अभियानात पालिकेच्या सर्व नऊ झोन कार्यालयांतर्गत जास्त कचरा साचणारे ४९ ठिकाणे निवडण्यात आली होती. याच ठिकाणी अभियान राबवण्यात आले. सकाळी सहा वाजता औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदानातून महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते स्वच्छता अभियानाचा शुभारंभ झाला. अभियानात विविध वॉर्डांमध्ये नगरसेवक राजू शिंदे, गोकुळसिंह मलके, भाऊसाहेब जगताप, सुरेखा सानप, जयश्री कुलकर्णी, कीर्ती शिंदे, अर्चना नीळकंठ, ज्योती मोरे, सायली जामादार, शोभा बुरांडे, शिल्पाराणी वाडकर यांच्यासह आयुक्त डॉ. निपुण विनायक, उपायुक्त मंजूषा मुथा, अतिरिक्त आयुक्त संतोष कवडे, घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे, स्मार्ट सिटी मिशनच्या अंजू उप्पल, ग्रीव्हज कॉटन कंपनीचे प्रशांत नरवडे, पालिकेचे सर्व सहाय्यक आयुक्त, वॉर्ड अधिकारी, पालक अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, जवान, सफाई कामगार, महिला बचत गटाचे प्रतिनिधी, कर्मचारी, शिक्षक सहभागी झाले होते.

सर्वांनी पुढाकार घ्यावा

बीबी-का-मकबरा परिसर, मध्यवर्ती बसस्थानक, जिल्हा परिषद मैदान, रहेमानिया कॉलनी, चिकलठाणा विमानतळाचा परिसर, मुकुंदवाडी गाव, शिवाजीनगर परिसर, एमआयटी कॉलेज ते महानुभाव आश्रम, रेल्वेस्टेशन उड्डाण पूल आदी भागात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. दिवसभरात सव्वातीनशे टन कचरा गोळा करण्यात आला. अभियानात सहभागी झालेल्या सर्वांचे आयुक्तांनी अभिनंदन केले. शहर सुंदर बनवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बहिणीचा विनयभंग, भावाला अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरात घुसून बहिणीचा विनयभंग करून तिला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात आरोपी भावाने दाखल केलेला नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पांडव यांनी शनिवारी फेटाळला.

या प्रकरणात पीडिता ही घरात एकटी असताना आरोपी भाऊ अचानक घरात घुसला व पीडितेचा विनयभंग केला. तसेच तिला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देखील दिली. या प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी भावाला शुक्रवारी रात्री अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर आरोपीने नियमित जामीनीसाठी अर्ज दाखल केला असता न्यायालयाने तो फेटाळला. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईचा खून, मुलासह सुनेचा जामीन फेटाळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालमत्तेसाठी ६५ वर्षीय आईचा मारहाण करून खून केल्याप्रकरणात मानलेल्या मुलासह सुनेने दाखल केलेला नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पांडवी यांनी शनिवारी फेटाळला.

आरोपी मुलगा संजय सोपान पाटील व सून मीरा अशी दोघांची नावे असून, पोलिसांनी त्यांना २० मे रोजी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना २५ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. कोठडीची मुदत संपल्याने दोघा आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणात मृत सुनंदाबाई सोपान पाटील (६५, रा. कामगार चौक, एमआयडीसी वाळूज) यांनी तक्रार दिली होती. सुनंदाबाई व तिचे पती सोपानराव पाटील यांना मुलबाळ नसल्याने त्यांनी आरोपी संजू जाधव याला मुलगा मानून त्याचा संभाळ करत लग्नही लावून दिले होते. दरम्यान, सोपानराव पाटील यांच्या निधनानंतर आरोपी संजय पाटील व त्याची पत्नी मीरा या दोघांनी घर स्वत:च्या नावावर करून देण्यासाठी सुनंदाबाई यांचा मानसिक छळ सुरू केला होता. दरम्यान, २० एप्रिल रोजी सकाळी आठला सुनंदाबाई पाणी भरत असताना, मीरा हिने मुद्दामहून नळ बंद केला. सुनंदाबाई यांनी त्याचा जाब विचारला असता, मीराने त्यांच्या डोक्यात काठी मारली. त्यांनी आरडाओरड सुरू केल्याने दोघांनी त्यांना बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणात सुनंदाबाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपचारादरम्यान २५ एप्रिल रोजी सुनंदाबाई यांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या ३०२, ३२४, ३२३, ५०४, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कवीने सांस्कृतिक हस्तक्षेप करावाः श्रीकांत देशमुख

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कवी-कलाकार समकालाबद्दल लिहीत, बोलत असतो. माझा भवताल वेगळा विचार मांडू देत नसेल आणि ती प्रक्रिया देशद्रोही ठरवत असेल तर कवीची जबाबदारी वाढते. प्रत्येक कालखंडात कवीला हा प्रत्यय येतो. त्यामुळे निर्भीड जगण्याचे भान ठेवत कवीने सांस्कृतिक हस्तक्षेप करावा', असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक श्रीकांत देशमुख यांनी केले. ते कविसंमेलनाचे उदघाटन केल्यानंतर बोलत होते.

शताब्दी काव्य मंडळाच्या वतीने निमंत्रितांचे कविसंमेलन घेण्यात आले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात शनिवारी सायंकाळी कविसंमेलन झाले. या कविसंमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांनी केले. यावेळी प्रसिद्ध साहित्यिक श्रीकांत देशमुख, डॉ. संजीवनी तडेगावकर, कवी सुनील उबाळे उपस्थित होते. देशमुख यांनी कवीच्या जबाबदारीबाबत विचार मांडले. 'औरंगाबाद मराठवाड्याचे सांस्कृतिक केंद्र नसून मराठवाडा हाच महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र आहे. संत परंपरा ते आधुनिक कवी-कादंबरीकारापर्यंत उत्तम साहित्य मराठवाड्यात निर्माण झाले. दुष्काळाच्या परंपरेतून कुणब्यांचे दु:ख समोर आले. कवी दुष्काळावर का लिहितो, कारण कविता जगण्याला प्रेरीत करीत असते. पडीक जमिनीतून उत्तम पीक निघते, तसे अभावातून सृजन निर्माण होते. प्रत्येक कालखंड कवीसाठी विश्वसनीय नसतो. त्या-त्या कालखंडाने कवीला त्रास दिला आहे. तरीसुद्धा आपल्या लेखनाचे महत्त्व ध्यानात घेऊन कवीने लिहिते रहावे', असे देशमुख म्हणाले.

साहित्य व्यवहारावर अनुराधा पाटील यांनी परखड मत मांडले. 'नवोदित कवीचा उत्साह कविता पुस्तकाच्या रुपात प्रकाशित झाल्या पाहिजे, एवढाच असतो. या सर्वोच्च महत्वाकांक्षेत त्याला अपमान, मानहानीला सामोरे जावे लागते. आपले पुस्तक आपणच छापा आणि प्रती विका असे प्रकार घडतात. अन्यथा, प्रकाशकांना पैसे देऊन पुस्तक छापा, या चक्रात कवी अडकतात. काही जणांचा अनुभव चांगला असेल. पण, बहुतेक कवींबाबत हे प्रकार घडतात. अनेक कवी स्वत:चे साहित्य वगळता इतरांचे वाचत नाहीत. त्यातून वाचणारे आणि न वाचणारे ही तफावत अस्वस्थ करणारी आहे. माध्यमात चार ओळींची कविता टाकून चार लाइक घेण्याएवढी कविता मर्यादित झाली. शिकणे आणि प्रगल्भ होण्याचा अभाव असल्याने कवी कविता लिहून फक्त रद्दीत भर घालत आहेत. विवेक शाबूत ठेवून कवी म्हणून उत्तम लेखन करा', असे पाटील म्हणाल्या. सुनील उबाळे यांनी प्रास्ताविक केले आणि महेश अचिंतलवार यांनी आभार मानले.

कविसंमेलन रंगले

डॉ. संजीवनी तडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन पार पडले. बालाजी सुतार, प्रभाकर शेळके, श्रीराम पोतदार, आत्माराम जाधव, डॉ. राज रणधीर, पंजाबराव मोरे, लक्ष्मण खेडकर, गिरीश जोशी, उमेश इंगळे यांनी दर्जेदार कविता सादर करून कविसंमेलन गाजवले. परखड भाष्य करणाऱ्या कवितांना रसिकांची जोरदार दाद मिळाली. या कार्यक्रमाचे संयोजन ध्यास गझल समूह, प्रगतिशील लेखक संघ औरंगाबाद, देवगिरी साहित्य अकादमी, कवी परिवार सिल्लोड, नागसेन मित्रमंडळ पैठणगेट यांनी केले. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याची लाइनमनकडून विक्री

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको एन पाच येथील जलकुंभाचा कारभार पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाइनमनच्या ताब्यात दिल्याच्या तक्रारी नागरिकांनी शनिवारी आयुक्तांकडे केल्या. पाण्याच्या टँकरसाठी दूरदूरहून महिला, पुरुष जलकुंभावर येतात. त्यांना लाइनमनकडून शिवीगाळ केली जाते. जलकुंभावरील पाणी लाइनमनच्या मदतीने विक्री केले जाते, या बाबी देखील आयुक्तांच्या लक्षात आणून देण्यात आल्या. या आरोपांची पडताळणी करून आयुक्तांनी सायंकाळी खेडकर या लाइनमनला तडकाफडकी निलंबित केले.

सिडको एन पाच येथील जलकुंभावरून संपूर्ण सिडको - हडकोसह चिकलठाणा, मुकुंदवाडी, जयभवानीनगर परिसराला पाणीपुरवठा केला जातो. दिवसभरात सुमारे चारशे टँकरच्या फेऱ्या या जलकुंभावरून केल्या जातात. अशा महत्वाच्या जलकुंभावर जबाबदार अधिकारी किंवा अभियंत्यांची नेमणूक करण्याऐवजी पाणीपुरवठा विभागाने लाइनमनच्या ताब्यात जलकुंभाचा कारभार दिला. ही बाब नागरिकांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी तीन लाइनमनची नावे घेत तक्रार केली. हे लाइनमन दादागिरी करतात, टँकर मागण्यासाठी आलेल्यांना उद्धटपणाची वागणूक देतात. टँकरचालकांवर त्यांचे नियंत्रण आहे. अनेकवेळा टँकरचालकांना आंदोलन करण्यास हेच लाइनमन भाग पाडतात. जलकुंभाचा कारभार पाहणारे लाइनमन दारूच्या नशेत तर्र असतात. महिलांना शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल जाते, अशा तक्रारी नागरिकांनी आयुक्तांकडे केल्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत आयुक्तांनी उपायुक्त मंजूषा मुथा यांना त्या लाइनमनची नावे लहून घेण्यास सांगितले. मुथा यांनी लाइनमनची नावे लिहून घेतली. त्यानंतर आयुक्त व अन्य अधिकारी दुपारी एक वाजेच्या सुमारास जलकुंभावरून निघून गेले.

\Bलाइनमन भडकावतात

\Bजलकुंभावरून गेल्यानंतर आयुक्तांनी लाइनमनच्या कारभाराची बारकाईने चौकशी केली. तेव्हा पाणीप्रश्न भडकवण्यात लाइनमनचा मोठा वाटा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी जलकुंभाचा कारभार पाहणाऱ्या खेडकर या लाइनमनला सायंकाळी तडकाफडकी निलंबित केले. पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी आवश्यक ते सर्व कठोर निर्णय घेतले जातील, असे संकेतच त्यांनी या कारवाईच्या माध्यमातून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादः पाण्यासाठी नगरसेविकेचा ७ तास ठिय्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको एन - तीन, एन - चार वॉर्डात सलग नवव्या दिवशी पाणीपुरवठा झाला नसल्याने नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत यांनी जलकुंभावर टँकरच्या चाकाजवळ तब्बल सात तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी पालिकेच्या अभियंत्याला मारहाण केली.

सिडको - हडको भागात अजूनही पाण्याची समस्या सुटलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात या भागातील पाणी आंदोलनाने थोडी विश्रांती घेतली होती. निकालानंतर पुन्हा या आंदोलनांनी उचल खाल्ली. उच्च मध्यमवर्गी, सुशिक्षितांची वसाहत म्हणून सिडको एन तीन, एन चार वॉर्डाकडे पाहीले जाते. या वॉर्डात गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची समस्या तीव्र बनली आहे. पुंडलिकनगर येथील जलकुंभावरून या वॉर्डासाठी जलवाहिनी टाकल्यास पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, अशी या भागातील नागरिकांची धारणा आहे. त्यामुळे या भागासाठी जलकुंभावरून स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याच्या मागणीसाठी आतापर्यंत तीन वेळा आंदोलन झाले. नागरिकांच्या आपापसातील विरोधामुळे जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे या परिसरासाची पाणी समस्या कायम आहे. नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत यांनी शनिवारी सकाळीच एन पाच येथील जलकुंभ गाठला. त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने नागरिक जलकुंभावर आले. त्यात महिलांची संख्या जास्त होती. जलकुंभ गाठल्यानंतर अदवंत थेट टँकरच्या चाकापाशी जावून बसल्या. आमच्या वॉर्डात नऊ दिवसांपासून पाणी आले नाही, जोपर्यंत पाणीपुरवठा सुरू करणार नाही, तोपर्यंत टँकरच्या चाकापासून उठणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे जलकुंभावरील टँकर सेवा ठप्प झाली. आंदोलन सुरू केल्यावर त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हेंसह अन्य अभियंत्यांशी देखील संपर्क साधला. मात्र, सुरुवातीच्या काळात या सर्व अभियंत्यांशी त्यांचा संपर्क झाला नाही, असे त्यांनी आंदोलनाला सामोरे गेलेल्या आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले. नऊच्या सुमारास पाणीपुरवठा विभागाचे अभियंते जलकुंभावर आले. यावेळी नागरिक संतप्त झाले होते. उपअभियंता के. एम. फालक नागरिकांशी चर्चा करीत असताना काही जणांनी त्यांना मारहाण केली. दरम्यानच्या काळात अदवंत यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच भाजप नगरसेवक शिवाजी दांडगे, सत्यभामाबाई शिंदे देखील जलकुंभावर दाखल झाले. दांडगे यांनी आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ते स्वच्छता अभियानात होते. त्यामुळे लगेच त्यांनी जलकुंभावर येण्यास असमर्थता दाखवली. दुपारी साडेबाराच्या सुमारास आयुक्त डॉ. निपुण विनायक जलकुंभावर आले. तत्पूर्वी भाजप आमदार अतुल सावे, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा जलकुंभावर दाखल झाले. त्यांनी माधुरी अदवंत यांच्यासह त्यांच्याबरोबर आलेल्या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. वॉर्डातील पाणी समस्या सुटल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. आयुक्त आल्यानंतर देखील अदवंत आपल्या भूमिकेवर ठाम होत्या. पुंडलिकनगर येथील जलकुंभापासून जलवाहिनी टाकण्याचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू करू असे आश्वासन आयुक्तांनी दिले, पण तोंडी आश्वासन नको, लेखी द्या असे अदवंत म्हणाल्या. आयुक्तांबरोबर उपायुक्त मंजूषा मुथा, सहाय्यक आयुक्त करण चव्हाण देखील होते. मुथा यांनी अदवंत यांच्यासह नागरिकांचे म्हणणे बारकाईने ऐकून घेतले. मात्र, लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, या मुद्यावर अदवंत ठाम होत्या.

लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन घेतले मागे

आयुक्तांच्या सूचनेनुसार मुथा यांनी लेखी हमी देण्याची तयारी दाखवली. पुंडलिकनगर जलकुंभापासून सिडको एन तीन, एन चारपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम आठ दिवसांत पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन अदवंत यांना देण्यात आले. त्यावर मुथा यांच्यासह कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी स्वाक्षरी केली. लेखी आश्वासन मिळाल्यावर अदवंत यांनी आंदोलन मागे घेतले.

पैसे भरूनही पाणी नाही, राजनगरकरांचा घेराव

पाण्याच्या टँकरसाठी पैसे भरूनही पाणी मिळत नाही, या कारणावरून राजनगरच्या महिला देखील सिडको एन पाचच्या जलकुंभावर आल्या होत्या. त्यांनी जलकुंभावरील कर्मचाऱ्यांबद्दल आयुक्तांकडे तक्रारी केल्या. आयुक्तांना घेराव घातला. पैसे भरूनही पाणी मिळत नसल्याचे समजल्यावर आयुक्त संतापले. टँकरचे पाणी नियमित मिळण्याची व्यवस्था करतो, असे सांगून त्यांनी या नागरिकांची समजूत काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुटखा साठेबाजी; जामीन मंजूर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुटखा, सुगंधित सुपारी, पानमसाला, तंबाकू आदी प्रतिबंधित पदार्थ बाळगल्याप्रकरणी प्रभू मकरिये यांचा जामीन उच्च न्यायालयाचे न्या. ए. एम. ढवळे यांनी मंजूर केला.

मकरिये यांनी कायद्याने प्रतिबंधित केलेले गुटखा, पानमसाला बाळगल्याप्रकरणी भारतीय दंड विधानच्या १८८, २७२, ३२८ आणि ३४ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६च्या कलम ५९ अंतर्गत अटक करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये अर्जदाराविरुद्ध कोणत्याही प्रकारचे पुरावे सापडलेले नाहीत. तसेच एफआयआरमध्ये अर्जदाराने सदर मुद्देमाल विक्रीसाठी साठवला होता, हे कोठेही दर्शविले नाही. अर्जदार हा औरंगाबादचा रहिवासी आहे. त्याची संपूर्ण मालमत्ता शहरात आहे. त्यामुळे तो फरार होणार नाही, असा युक्तिवाद अर्जदाराच्या वकिलाने केला. या प्रकरणांमध्ये अर्जदारातर्फे अॅड. सतीश तळेकर व अॅड. श्री अजिंक्य काळे यांनी काम पहिले. सरकारी वकील म्हणून ए. बी. चाटे यांनी काम पहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाडा विद्यापीठाच्या ‘नॅक’उधळपट्टीवर पडदा?

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 'नॅक' मूल्यांकनाच्या खर्चाचा मुद्दा तापला आहे. नियमबाह्य पद्धतीने खर्च केल्याचा आरोप असून व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा करण्याची मागणी आहे. मात्र, कुलगुरूंचा कार्यकाळ पुढील आठवड्यात संपणार आहे. त्यामुळे 'नॅक'वरील खर्चाचा ताळेबंद गुंडाळला जाण्याची दाट शक्यता आहे.

विद्यापीठाच्या 'नॅक' मूल्यांकनावरील खर्च वादग्रस्त ठरला आहे. विद्यापीठ कॅम्पसमधील रस्ते निर्मिती, रंगरंगोटी, नवीन फर्निचर खरेदी, पायाभूत सुविधांवर ५० कोटी रुपये खर्च करण्यात आला. व्यवस्थापन परिषदेत कोणत्याही खर्चावर चर्चा झाली नाही. काही खर्च निविदांशिवाय काढण्याचा आरोप आहे. काही घटकांवर अवाजवी खर्च झाला असल्याचे प्राथमिक पाहणीत आढळले आहे. 'नॅक' कार्यालयावर सहा महिन्यांत एक कोटी रुपये खर्च झाल्याची चर्चा आहे. या खर्चामुळे वित्त व लेखा विभाग चक्रावून गेला आहे. ताळेबंद मांडण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेतील काही सदस्य संतापले आहेत. खर्चावर चर्चा करण्यासाठी व्यवस्थापन परिषद बैठक बोलवा, अशी मागणी होती. मात्र, आचारसंहितेचे तांत्रिक कारण दाखवत विद्यापीठ प्रशासनाने बैठक ऐनवेळी रद्द केली. कुलगुरू चोपडे यांचा कार्यकाळ चार जून रोजी संपणार आहे. त्यामुळे या आठवड्यात बैठक होण्याची शक्यता नाही.

दरम्यान, 'नॅक'च्या अतिरिक्त खर्चाचा तपशिल जाहीर करण्याची मागणी आहे. अन्यथा, कुलगुरूंना सेवानिवृत्तीचे लाभ आणि ना-हरकत प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी संघटनांनी केली आहे. या उधळपट्टीला कुलगुरूंसह व्यवस्थापन परिषदेचे निवडक सदस्य आणि प्रशासकीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप आहे. प्रत्येक खरेदीचे विवरण सादर करुन खर्चाचा उद्देश स्पष्ट करण्याची मागणी आहे. 'नॅक' मूल्यांकन झाल्यानंतर एकाही जबाबदार अधिकाऱ्याने खर्चाबाबत स्पष्टीकरण दिले नाही.

राजभवनकडे तक्रार

कामकाजातील अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहाराचा चोपडे यांच्या आरोप आहे. आरोपांची योग्य शहानिशा करण्यासाठी राज्य शासनाने डॉ. जे. एफ. पाटील चौकशी समिती नेमली होती. या समितीने राज्य शासनाला चौकशी अहवाल सादर करुन आठ महिने झाले आहेत. हा अहवाल जाहीर करण्याची मागणी मराठवाडा संघर्ष कृती समिती आणि मराठवाडा लॉ कृती समितीने केली आहे. या मागणीसाठी दोन्ही संघटना उपोषण करीत असून राजभवनकडे तक्रार करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पत्नीला जाळून मारणाऱ्या पतीला ठोकल्या बेड्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पत्नीला जाळून मारणाऱ्या पतीला शनिवारी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पांडव यांनी दिले. सदाशिव भागाजी शिंदे (वय ३५, रा. गव्हाली, ता. सिल्लोड ह. मु. जाधववाडी, औरंगाबाद) असे आरोपी पतीचे नाव आहे.

या प्रकरणात मृत सोनाली सदाशिव शिंदे (वय ३०) यांचा भाऊ अमोल कौतिकराव वाढेकर(वय २१, रा. तलवाडा, ता. सिल्लोड) याने तक्रार दिली. सोनालीचे लग्न दहा वर्षांपूर्वी आरोपी सदाशिव शिंदे याच्याशी झाले होते. त्यांना दोन मुले देखील आहेत. दरम्यान सदाशिव हा शेंद्रा एमाआयडीसी येथील एका कंपनीच्या उपहागृहात कामाला आहे. सदाशिव हा सोनालीला नेहमी दारू पिऊन मारहाण करीत होता, तसेच तिच्या चारित्र्यावर देखील संशय घेत होता. दोन महिन्यांपासून अमोल वाढेकर हा बहीण सोनालीकडे राहत होता.

२३ मे रोजी सदाशिव, सोनाली व त्यांचा मुलगा गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते. सकाळी सदाशिव खाली आला व अंघोळ करून कामावर निघून गेला. त्यानंतर सकाळी आठ वाजेच्या सुमारास सोनालीचा मुलगा खाली आला. अमोल वाढेकरने बहिणीबाबत विचारपूस केली असता ती गच्चीवर नसल्याने त्याने सांगितले. ही बाब अमोलने आरोपी सदाशिवला फोन करून सांगितली. मात्र, त्याने सोनाली ही मैत्रीणीकडे गेली असेल म्हणत प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अमोल याने त्याचे दुसरे दाजी शिवाजी मगर यांच्यासोबत बहिणीचा शोध सुरू केला. मात्र, ती सापडली नाही. त्यामुळे ते हर्सूल पोलिस ठाण्यात गेले. तेथे पोलिसांना सोनालीचा फोटो दाखविला असता त्यांनी फोटोतील महिला चिकलठाणा परिसरातील पिसादेवी शिवारात जळालेल्या अवस्थेत सापडली आहे, असे सांगत अमोलला घाटी रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यानुसार अमोलने घाटी गाठून मृतदेह सोनालीचा असल्याचे सांगितले. तसेच आरोपी सदाशिव यानेच बहीण सोनालीला जाळून मारल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरुन चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

\B...कारणाचा शोध सुरू

\Bआरोपीला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने पत्नीला कोणत्या कारणावरून जाळून मारले याचा तपास करणे आवश्यक आहे. आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का? याबाबत देखील तपास करणे असून, पत्नीला जाळून मारण्यासाठी कशाचा वापर केला, याचा देखील तपास करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सातत्याने दर्जेदार विनोद करणे आव्हानात्मक!'

0
0

तुषार बोडके
Tushar.bodkhe@timesgroup.com


अभिनय क्षेत्रातील वाटचाल कधी व कशी सुरू झाली ?

कला क्षेत्राबद्दल फारशी माहिती नव्हती. जॉनी लिव्हर यांच्यासारखे कलाकार किंवा राजकीय नेत्यांचे हुबेहूब आवाज काढत होतो. हा मिमिक्रीचा प्रकार असतो हे सुद्धा ठावूक नव्हते. औरंगाबाद शहरात सातवीपर्यंत शालेय शिक्षण झाले. आजारपणात वडीलांचा रोजगार गेला आणि आईचे आजारपण मागे लागले. भावाच्या मदतीने सगळी कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना शहाणपण आले. आईच्या उपचारासाठी मुंबईला नेहमी जाणे-येणे सुरू होते. सेवाभावी संस्था आणि लोकप्रतिनिधींनी उपचारासाठी मदत केली होती. मुंबईत अंधेरी भागात मोठ्या प्रॉडक्शन हाउसचे ऑफिस पाहिल्यानंतर आकर्षण वाटले. खूप वेळ तिथले पोस्टर पाहण्यात घालवत होतो. मात्र, ऑडिशन व अभिनय याची पुरेशी जाणीव नव्हती. एका भल्या माणसाने मिमिक्रीची ऑडिशन घेऊन मला छोटेसे काम दिले. या कामाचे समाधानकारक मानधनसुद्धा दिले. इथूनच अभिनयाची वाट सापडली आणि संघर्ष सुरू झाला.

कॉमेडी शो मधील अनुभव कसा वाटला ?

मिमिक्रीसाठी आवश्यक कौशल्य असूनही योग्य मार्गदर्शन नव्हते. मुंबईत कुणी ओळखीचे नव्हते. या अडचणीत मुमुक्षू मुदगल यांच्या मार्गदर्शनामुळे अभिनय आणि विनोदाची नेमकी जाण झाली. 'सबसे बडा कलाकार', 'छोटे मियाँ बडे मियाँ शो'मधील भूमिका मान्यवरांना आवडली. माझ्या विनोदी अभिनयाचे कौतुक जॉनी लिव्हर, बोमन इराणी यांच्यासह अनेक कलाकारांनी केले. सतत चांगल्या दर्जाचा विनोद करणे खरेच आव्हानात्मक असते. ही तयारी आपल्या पातळीवर करावी लागते. हिंदीनंतर मराठीत काम सुरू केले. मात्र, हिंदी इंडस्ट्रीत असलेला मोकळेपणा मराठीत कमी आढळतो. 'सात फेरो की हेराफेरी', 'सिद्धीविनायक' मालिकेचा अनुभव समृद्ध करणारा होता. काही मराठी चित्रपटात लहान भूमिका मिळाली. आता चांगल्या भूमिका मिळत आहेत. लवकरच 'भोंगा', 'बाबो', 'गांधीजींची सहा माकडं' हे मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 'गौरीशंकर नमो' हा राजकीय सटायर असलेला हिंदी चित्रपटही येत आहे. आयुष्मान खुराणासोबत 'ड्रीमगर्ल' चित्रपट केला. कॉमेडी शोनंतर हा प्रवास पूर्ण झाला.

विनोदी भूमिकेत अडकून पडण्याची भीती वाटते का ?

कॉमेडी शो गाजवल्यामुळे विनोदी अभिनेता अशी प्रतिमा तयार झाली आहे. मालिका, चित्रपट आणि शो अशी तिहेरी वाटचाल सुरू आहे. विनोदी भूमिकांप्रमाणे माझ्यासाठी गंभीर भूमिकाही तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे आश्वासक भूमिकांचा शोध नेहमीच असतो. मालिका आणि चित्रपटात विनोदी भूमिका करीत असलो तरी त्यात अडकून पडणार नाही. हिंदीत काम करीत असल्यामुळे मराठीत काम करण्याबाबत कमी विचारणा होते. पण, दोन्ही इंडस्ट्रीत चांगले काम करण्यासाठी उत्सुक असतो.

'कचरा' ही चाकोरीबाह्य शॉर्टफिल्म कशी सूचली ?

कचरा ही शॉर्टफिल्म सफाई कामगारांच्या बकाल आयुष्यावर आधारीत आहे. या शॉर्टफिल्मचे नारेगाव कचरा डेपो, सूतगिरणी चौक आणि प्रियदर्शनी इंदिरानगर भागात बहुतांश चित्रीकरण झाले. सफाई कामगारांची व्यसनाधीनता, त्यांचे कौटुंबिक आयुष्य आणि सामाजिक स्थान या संवेदनशील विषयांना अत्यंत संवेदनशील पद्धतीने मांडले आहे. 'प्राइम मीडिया' शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये 'कचरा'ला दोन पुरस्कार मिळाले. काही विषय लघुपटातून प्रभावीपणे दाखवता येतात. त्यामुळे हे माध्यम निवडले. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तीन पातळीवर कार्यरत राहण्याचा प्रयत्न आहे. एका महान गायकावर मराठी बायोपिक करीत आहे. या चित्रपटासाठी संशोधन आणि लेखनाचे काम सुरू झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचा ताबा सुटल्याने कारची दुभाजकाला धडक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भरधाव वेगाने जात असलेल्या महिलेचा कारवरील ताबा सुटल्याने कार दुभाजकातील चौकाला धडकली. एपीआय कॉर्नर चौकात रविवारी मध्यरात्री दीड वाजता हा थरारक प्रकार घडला. या महिलेला नागरीकांनी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

मध्यरात्रीच्या सुमारास सिडको बसस्टँड चौकातून ही ४० वर्षांची महिला भरधाव वेगाने एपीआय कॉर्नर चौकात आली. तिचा कारवरील ताबा सुटल्याने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मार्ग असलेल्या चौकातील दुभाजकाला; तसेच फलकाला तिने जोरदार धडक दिली. या धडकेत दुभाजक, फलकासह महिलेच्या कारचे नुकसान झाले. या अपघातात महिलेच्या डोक्याला मार लागून ती बेशुद्ध झाली. तेथे उपस्थित असलेले नगरसेवक मनोज गांगवे आणि इतरांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. महिलेच्या मोबाइलवरून तिच्या मुलाला अपघाताची माहिती देण्यात आली. मुलगा आल्यानंतर महिलेला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. नाइट पेट्रोलिंगला असलेल्या पोलिसांच्या गस्ती पथकांनी देखील घटनास्थळ गाठले. पोलिसांनी महिलेची अपघातग्रस्त कार सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात जमा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वार्ता - मोहम्मद अब्दुल हक्क फारूखी

0
0

निधन वार्ता

अब्दुल हक्क फारुखी

औरंगाबाद : रोहिला गल्ली एकखाना मशिदीच्या समोरील रहिवासी मोहम्मद अब्दुल हक्क फारुखी (वय ८८) यांचे दीर्घ आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांची नमाज ए जनाजा रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सिटीचौक येथील मशिदीत अदा करण्यात आली. त्यांच्यावर पंचकुआ दभनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील ज्येष्ठ फोटोग्राफर, वाहेद कलाम उर्दू साप्ताहिकाचे संपादक वाहेद फारुखी यांचे ते सासरे होतं. त्यांच्या मागे पाच मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बन्सीलालनगरात माथेफिरूने वाहनांच्या काचा फोडल्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बन्सीलालनगर भागात रस्त्यावर उभ्या असलेलया चार वाहनांच्या काचा माथेफिरून फोडल्या. हा प्रकार रविवारी पहाटे घडला. सीसीटीव्हीमध्ये या प्रकाराचे चित्रिकरण झाले असून, याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बन्सीलाल नगर हा उच्चभ्रू परिसर आहे. रविवारी पहाटे एका दुचाकीवर तीनजण या भागात आले. त्यांनी हातातील दांडक्याने रस्त्यात उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडत पसार झाले. यामध्ये कमलकिशोर बजाज, सुजीत देशमुख यांच्यासह इतर दोन नागरिकांच्या कारचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वेदांतनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी घटनास्थळी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images