Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वीजशुल्कमाफीचे उद्योजकांकडून स्वागत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा व विदर्भातील उद्योगांना २०२४ पर्यंत वीजशुल्क माफी (सबसिडी) देण्याचा निर्णय राज्य मंत्रमंडळाने नुकताच घेतला आहे. उद्योजक या निर्णयाची वाट मार्चपासून पाहत होते. आचारसंहिता संपताच पहिल्याच बैठकीत झालेल्या निर्णयाचे उद्योजकांनी स्वागत करताना उद्योगांना विनाखंड वीज पुरवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिज (सीआयआय)चे मराठवाडा अध्यक्ष हर्षवर्धन जाजू म्हणाले, की राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे. हा निर्णय उद्योगांना निश्चित फायदेशीर आहे. आपल्या राज्यातील विजेचे दर देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत. मराठवाड्यातील उद्योगांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. भविष्यात आणखी पारदर्शी पद्धती अंमलात आणली पाहिजे. अन्य घटकांच्या बाबतीत जसे धोरण ठरविले जाते. तसे विजेच्या बाबतीतही सरकारने ठरविले पाहिजे त्याचा अधिक फायदा होईल.

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए)चे अध्यक्ष राम भोगले म्हणाले, औरंगाबादसह मराठवाड्यात विजेवर आधारित उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यात स्टिल, पेपर उद्योगांचा समावेश होतो. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे उद्योगांना फायदा होईल. विजेवर चालणारे उद्योग विकसित झाले, तर विकासाला अधिक चालना मिळेल. आपला दळणवळण खर्च खूप आहे. त्यात वीज व अन्य सुविधांचे दर वाढले, तर स्पर्धात्मकतेवर परिणाम होतो. स्पर्धात्मकता संपली, तर उद्योग अडचणीत येतील. मात्र २०२४ पर्यंत वीजबिलाची सबसिडी वाढविल्याने जुन्या उद्योगांना दिलासा मिळेल, तर तसेच नवीन उद्योग आकर्षित होण्यास मदत मिळेल.

उद्योजक विनोद नांदापूरकर यांनी सांगितले, की मराठवाड्याचा अनुशेष मोठा आहे. त्यासाठी या भागात अशा सुविधा वाढविणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे उद्योगांना चालना मिळले. नवीन उद्योग येण्यास मदत मिळेल. निर्णयास दोन महिने उशीर झाला पण झालेला निर्णय स्वागतार्ह आहे. उद्योजक प्रशांत नानकर म्हणाले, सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. वीजबिलासाठी जशी सबसिडी दिली त्यासह वीजपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठीही आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये वीजपुरवठ्याची मोठी अडचण आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. सबसिडीमुळे दिलासा मिळताना खंडित वीजपुरवठ्याने उद्योजकांची अडचण होत असेल तर त्याचा फायदा काय? या अडचणीकडेही सरकारने लक्ष दिले पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुख्यमंत्री फेलोशिपसाठी प्रक्रिया सुरू करणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यात मुख्यमंत्री फेलोशिपसाठी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. फेलोशिपची अमंलबजावणी २०१९-२० करिता सुरू करायची आहे.

फेलोंच्या नियुक्तीबाबत अटी याप्रमाणे आहेत. अर्जदार कोणत्या ही शाखेचा पदवीधर आणि किमान ६० टक्के गुण आवश्यक आहेत. अर्जदाराचे पदवी परीक्षापर्यंतचे गुणपत्र एक जून २०१९पूर्वीचे असावे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आणि संगणक ज्ञान आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय ३१ मे २०१९ रोजी किमान २१ वर्षे व कमाल २६ वर्ष असावे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून त्यासाठी ५०० रुपये शुल्क आहे. ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या १५० उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी करण्यात येईल. फेलोशिपचा कलावधी हा ११ महिन्यांचा असणार आहे. या अकरा महिन्यात फेलोशिप धारकांना दरमहा मानधन ४० हजार रुपये, प्रवास खर्च ५००० रुपये आणि एकत्रित ४५००० रुपये छात्रवत्तीच्या स्वरुपात देण्यात येणार आहेत. सुरुवातीला निवड झालेल्या उमेदवारांना सात दिवसांचे प्रशिक्षणही देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादेतून लवकरच आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून इमिग्रेशन सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता 'बीओआय'च्या (ब्युरो ऑफ इमिग्रेशन) विशेष समितीने विमानतळाला भेट दिली. आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली इमिग्रेशन सुविधा लवकरच सुविधा मिळणार असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली.

'बीओआय'चे अधिकारी पाठक यांच्यासह अन्य एका अधिकाऱ्याने बुधवारी (२९ मे) विमानतळाला भेट दिली. यावेळी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. 'बीओआय' च्या अधिकाऱ्यांनी विमानतळावरील सुविधांची पाहणी केली. येथे येणारे प्रवासी, पर्यटकांची संख्या आदींची माहिती घेतली. येथून हज यात्रेकरिता आंतरराष्ट्रीय विमान सुविधा सुरू असते. त्यावेळी तात्पुरत्या स्वरुपात इमिग्रेशन सुविधा देण्यात येते. ही व्यवस्था कायम झाल्यास औरंगाबाद येथून तीन ते चार विमाने सुरू होण्याची शक्यता विमानतळ संचालकांकडून व्यक्त करण्यात आली. इमिग्रेशनची सुविधा देण्यासाठी आवश्यक कर्मचारी, आगामी काळात किती आंतरराष्ट्रीय विमाने वाढू शकतात, आदींचा आढावा अधिकाऱ्यांनी घेतला.

दीड वर्ष पाठपुरावा

दीड वर्षापूर्वी इमिग्रेशन सुविधा सुरू करण्यासाठी औरंगाबाद विमानतळाला कस्टम सुविधेकरिता मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, इमिग्रेशन सुविधा नसल्याने आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्यास अडचणी आहेत. साधारणत: दीड वर्ष पाठपुरावा केल्यानंतर बुधवारी या समितीने औरंगाबाद विमानतळाला भेट देऊन आढावा घेतला.

देशांतर्गत सेवा वाढणार

औरंगाबाद विमानतळावरून सध्या एअर इंडिया आणि ट्रु जेट या दोन कंपन्यांचे विमान उड्डाण घेते. जेट एअरवेज बंद पडल्यानंतर काही विमान कंपन्यांनी सेवा सुरू करण्याची तयारी दाखविली आहे. आगामी काही दिवसात येथून देशांतर्गत तीन ते चार विमान सेवा सुरू होण्याची शक्यता विमानतळ प्राधिकरणाकडून व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लेखाना हाणामारीप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिल्लेखाना भागात गुरुवारी दुपारी दोन गटांत झालेल्या जोरदार हाणामारीप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरून परस्पराविरोधात खुनाचा प्रयत्न आणि दंगल केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मारहाणीत बंदुकीसह तलवारीचा वापर करण्यात आल्याचा आरोप एका तक्रारीत करण्यात आला आहे.

कोर्टात साक्ष देण्याच्या कारणावरून दोन गटांत सिल्लेखाना येथे तुंबळ हाणामारीची घटना घडली होती. याप्रकरणी पहिल्या गटाकडून परमेश्वर सखाराम वाघ (वय २५, रा. वानखेडेनगर, हडको कॉर्नर) याने तक्रार दाखल केली. यामध्ये वाघ याच्या कारला संशयित आरोपी नितीन जाधव आणि इतरांनी अडवले. नितीन जाधव याने तलवारीने वाघ यांच्यावर हल्ला केला; तसेच दुसरे आरोपी बंटी दीक्षित आणि प्रशांत थोरात यांनी बंदुकीने कारची काच फोडली, पाठीमागून बंदुकीने वाघ यांच्यावर हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीवरून आरोपी नितीन जाधव, बंटी दीक्षित आणि प्रशांत थोरात यांच्यासह इतर पाच जणांवर खुनाचा प्रयत्न, दंगल करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सोनटक्के तपास करीत आहेत.

दुसऱ्या गटाकडून नितीन प्रकाश जाधव (वय ३२, रा. शिवाजीनगर) याने तक्रार दाखल केली. यामध्ये नितीन जाधवची कार अडवून आरोपी परमेश्वर वाघ आणि इतरांनी 'तू जवाहरनगर पोलिस ठाण्यात आमच्याविरुद्ध केलेली केस मागे घे, नाही तर तुला ठार मारू,' असे म्हणत खंजीरने वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नितीनच्या तक्रारीवरून आरोपी परमेश्वर वाघ, रामेश्वर तुकाराम गवारे आणि दोन अनोळखी आरोपीविरुद्ध गंभीर जखमी करणे, रस्ता अडवणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएसआय गायकवाड तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक देवघेवीवर मौन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाविद्यालय संलग्नीकरण प्रक्रियेत प्राध्यापक संघटनांचा वाढता हस्तक्षेप विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्षित केला आहे. मात्र, विद्यापीठाची प्रतिमा मलिन करणारी ही ढवळाढवळ आणि आर्थिक देवघेव शैक्षणिक संघटनांनी लक्ष्य केली आहे. या आर्थिक गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राज्यपाल कार्यालयाकडे करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची वार्षिक संलग्नीकरण प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेसाठी प्राध्यापकांच्या समित्या नेमण्यात आल्या आहेत. महाविद्यालयाच्या पायाभूत व शैक्षणिक सुविधांचा आढावा घेत गुणांकन करणे क्रमप्राप्त आहे. चार जिल्ह्यातील फक्त १०० महाविद्यालये उत्तम स्थितीत असून इतर महाविद्यालयांची अवस्था बिकट आहे. या महाविद्यालयांना दरवर्षी सूचना करुनही परिस्थिती सुधारत नाही. विद्यापीठ कायद्यानुसार निर्धारित सुविधा व पात्रता नसल्यास महाविद्यालयाचे संलग्नीकरण रद्द करणे अपेक्षित आहे. मात्र, आर्थिक देवघेव वाढल्यामुळे कॉलेज या प्रक्रियेतून सहीसलामत सुटत आहेत. विद्यापीठाने नियमबाह्य पद्धतीने समित्या नेमल्याचा आरोप झाला आहे. समित्या पैसे मागत असल्याची तक्रार प्राचार्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे. काही प्राध्यापक तीन किंवा चार महाविद्यालयांच्या पाहणी समितीत आहेत. जास्त महाविद्यालये मिळवण्यासाठी लॉबिंग वाढली आहे. ही प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवणे अशक्य झाल्याचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मान्य केले होते. दबावातून प्रक्रिया होत असल्यास वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी काय करतात, असा सवाल इतर संघटनांनी केला. अधिकाराचे आणि कायद्याचे भान नसलेले अधिकारी विद्यापीठाचा दर्जा कसा राखणार असा परखड सवाल पदाधिकाऱ्यांनी केला.

दरम्यान, कुलगुरू व प्र-कुलगुरू यांचा कार्यकाळ तीन जून रोजी संपणार आहे. शेवटच्या टप्प्यात विविध स्तरावर अनागोंदी वाढूनही ठोस कारवाई झाली नाही. महाविद्यालय संलग्नीकरण प्रक्रियेत गैरव्यवहार झाले असून उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी संघटनांनी केली आहे. व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. उल्हास उढाण यांनी शुक्रवारी कुलगुरूंना निवेदन देऊन संबंधित दोषींवर कारवाईची मागणी केली. आवश्यक सुविधा आणि मान्यताप्राप्त शिक्षक नसलेल्या महाविद्यालयांना संलग्नीकरण देऊ नये. या बाबीकडे दुर्लक्ष करून संलग्नीकरणाची शिफारस करणाऱ्या समितीविरुद्ध नियमानुसार कारवाई करावी, असे उढाण यांनी निवेदनात म्हटले आहे.

\B'अॅकॅडमिक ऑडिट'चा देखावा

\Bविद्यापीठाने काही दिवसांपूर्वी ४० महाविद्यालयांचे अॅकॅडमिक ऑडिट केले. मात्र, या महाविद्यालयांना 'नॅक'चे चांगले मानांकन आहे. या महाविद्यालयात सुविधा आणि कर्मचारी आहे. त्यामुळे त्यांना ऑडिटमध्ये चांगले गुण अपेक्षितच होते. ऑडिटसाठी दुसरी महाविद्यालये घेतली असती तर, कदाचित सुमार कॉलेजांवर कारवाई करता आली असती. विशेष म्हणजे ऑडिटसाठी इतर विद्यापीठांचे तज्ज्ञ बोलावले होते. शैक्षणिक दर्जा उंचावण्याची संधी असूनही चांगल्या महाविद्यालयांचेच अॅकॅडमिक ऑडिट करबन विद्यापीठाने स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेतल्याची टीका प्राध्यापक संघटनांनी केली.

संलग्नीकरण समित्यांबाबत प्राचार्य आणि संस्थाचालकांनी गंभीर स्वरुपाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकाराची चौकशी करुन संबंधित दोषीविरुद्ध कारवाई करावी.

- डॉ. उल्हास उढाण, माजी सदस्य, व्यवस्थापन परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापती निवडणूकः शिवसेना, भाजपने घेतले अर्ज

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका स्थायी समिती सभापतिपदासाठी शिवसेना आणि भाजप व 'एआयएमआयएम'च्या गटनेत्यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज ताब्यात घेतले. उमेदवारी अर्ज भरण्याचा शनिवार (एक जून) हा शेवटचा दिवस आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज भरला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

स्थायी समितीच्या सभापती व पाच विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी चार जून रोजी निवडणूक होणार आहे. याकरिता उमेदवारी अर्ज घेण्यासाठी शुक्रवार (३१ मे) निश्चित केला होता. स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजप गटनेते प्रमोद राठोड यांनी तीन अर्ज, शिवसेनेचे गटनेते तथा सभागृहनेते विकास जैन, अपक्ष आघाडीचे गटनेते गजानन बारवाल आणि 'एआयएमआयएम'चे गटनेते नासेर सिद्दिकी यांनी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज नगरसचिव विभागातून नेले आहेत. शिवसेना-भाजप मध्ये झालेल्या करारानुसार यंदाचे स्थायी समितीचे सभापतिपद भाजपच्या वाट्याला आले आहे. भाजपमध्ये या पदासाठी राजू शिंदे, जयश्री कुलकर्णी आणि पूनम बमने हे इच्छुक आहेत. विशेष म्हणजे स्थायी समितीमध्ये भाजपचे तीनच नगरसेवक आहेत. बमने यांना पालिकेत आतापर्यंत कोणतेच पद मिळाले नसल्याने त्यांनी पदावर दावा केला आहे. जयश्री कुलकर्णी यांच्यासाठी भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. राजू शिंदे यांनी सभापतिपद मिळवण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून फिल्डिंग लावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे यांची दानवे यांच्याशी जवळीक वाढल्याचे बोलले जाते.

\B'मातोश्री'हून आदेश आला, तरच माघार?\B

देश आणि राज्य पातळीवर शिवसेना-भाजपची युती घट्ट झालेली असली, तरी महापालिका स्थायी समिती सभापतिपदासाठी शिवसेनेने दोन उमेदवारी अर्ज ताब्यात घेतले आहेत. भाजपमधील काही घटकांमुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना पराभव पत्करावा लागल्याची भावना शिवसेनेत आहे. या पराभवाचा वचपा स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून काढण्याची संधी शिवसेनेचे स्थानिक नेते शोधत आहेत. त्यामुळेच शिवसेना गटनेत्याने दोन अर्ज नेल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या दिवशी 'युतीधर्म' पाळण्याचा आदेश 'मातोश्री'हून आल्यास शिवसेनेचा उमेदवार माघार घेऊ शकेल. विषय समिती सभापतिपदासाठी एकूण ४४ उमेदवारी अर्ज नेण्यात आले आहेत.

स्थायी समितीमधील पक्षीय बलाबल

शिवसेना - ६

एमआयएम - ४

भाजप - ३

अपक्ष आघाडी - २

काँग्रेस - १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमिनीच्या वादातून मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात कुऱ्हाड व लोखंडी गजाने चौघांनी दोघांना मारहाण केल्याची घटना तालुक्यातील घाटनांद्रा येथे गुरुवारी घडली. या मारहाणीच्या घटनेत दोन जण जखमी झाले असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रामेश्वर सर्जेराव मोरे व गणेश सर्जेराव मोरे (दोघे रा. घाटनांद्रा) असे मारहाणीत जखमी झालेल्यांची नावे आहेत. यात रामेश्वर मोरे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. बाबूराव विठ्ठल मोरे, जिजाबाई बाबूराव मोरे, योगेश बाबूराव मोरे, दैवशाला योगेश मोरे (सर्व रा. घाटनांद्रा) असे या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सर्जेराव विठ्ठल मोरे व बाबूराव विठ्ठल मोरे या दोघा भावांमध्ये बऱ्याच वर्षांपासून जमिनीचा वाद सुरू आहे. गुरुवारी शेतात काम करीत असताना जमिनीच्या वादातून आरोपींनी रामेश्वर मोरे व गणेश मोरे या दोघा भावांना कुऱ्हाड व लोखंडी इंगलने मारहाण केली. यात दोघे भाऊ जखमी झाले. शेजारील शेतकऱ्यांनी जखमींना तत्काळ सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मारहाणीत रामेश्वर मोरे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले.

याप्रकरणी रामेश्वर मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चार जणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार काकासाहेब मोरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संत एकनाथ’ बंद पाडण्याचा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

पैठण तालुक्यातील काही विघ्नसंतोषी लोक संत एकनाथ साखर कारखाना बंद पडावा, यासाठी गेल्या एक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत मात्र, आम्ही इमानदारीने कारखाना चालवत असून, यावर्षी दोन लाख टन उसाचे गाळप करून 'एफआरपी'च्या ४४ कोटींपैकी जवळपास ४२ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप केले असल्याची माहिती कंपनीचे चेअरमन सचिन घायाळ यांनी दिली.

'एफआरपी'चे पैसे थकवल्याप्रकरणी व अन्य काही नियमांचे पालन न केल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी 'संत एकनाथ'ची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर कारखाना भाडेतत्वावर घेणाऱ्या कंपनीचे चेअरमन घायाळ यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावर्षी कंपनीने दोन लाख दोन हजार टन उसाचे गाळप केले. यातून ९.८९ एवढा साखर उतारा मिळाला व एक लाख ९९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. 'एफआरपी'प्रमाणे कंपनीला शेतकऱ्यांचे ४४ कोटी एक लाख एवढे देणे होते. यापैकी कंपनीने एफआरपीचे ४१ कोटी ८६ लाख रुपये शेतकऱ्यांना दिलेले आहे. 'एफआरपी'चे उर्वरित दोन कोटी रुपयाचे या आठवड्यात वाटप करण्यात आहोत, अशी माहिती चेअरमन घायाळ यांनी दिली.

विपरीत परिस्थितीत 'संत एकनाथ' चालवत असताना तालुक्यातील काही विघ्नसंतोषी हा कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र, आम्ही कोणत्याही परिस्थितीत १८ वर्षे हा कारखाना चालवणार असून, याकाळात कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यासाठी चार कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती घायाळ यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

संत एकनाथ ची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यापूर्वी साखर आयुक्तांसमोर 'संत एकनाथ'संबंधी अपूर्ण माहिती सादर करण्यात आली. साखर आयुक्तांना भेटून कारखान्याची सर्व माहिती देणार आहोत.

- सचिन घायाळ, चेअरमन, घायाळ कंपनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कापूसवाडगावात एकाला चोरी करताना पकडले

0
0

वैजापूर : कापूसवाडगाव (ता. वैजापूर) येथील शेतवस्तीवर चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्यास ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना बुधवारी रात्री घडली. गणेश कचरू सोनवणे (१९, रा. कापूसवाडगाव) असे आरोपीचे नाव आहे.

रात्री दहाच्या सुमारास आरोपी सोनवणे याने कापूसवाडगाव शिवारातील गट क्रमांक ५१मधील शेतातील भगवान आण्णासाहेब आसने यांच्या घराचा दरवाजा फावड्याच्या सहाय्याने चोरी करण्याच्या उद्देशाने उचकटत होता. आसने यांच्या ही घटना लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे आरोपी पळून गेला. पोलिस पाटील गणेश कदम व ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी ही घटना पोलिसांना कळवली. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिश बोराडे, फौजदार संदीप काळे, पोलिस नाईक बाबासाहेब धनुरे, संदीप गायकवाड हे घटनास्थळी दाखल झाले. ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांनी परिसर पिंजून काढून घटनेनंतर एक तासात आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी भगवान आसने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश सोनवणे याच्याविरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार संदीप काळे हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्तनदा मातेचा पालिका प्रशासनाकडून छळ; रजेचे वेतन देण्यासाठी टाळाटाळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सर्वसामान्य नागरिकांची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिकेत स्तनदा मातेचा मानसिक छळ केला जात असल्याचे प्रकरण शुक्रवारी उघड झाले. शासनाच्या पती-पत्नी एकत्रिकरणाअंतर्गत महापालिकेत बदली मिळावी म्हणून आठ महिन्यांपासून प्रयत्न करणाऱ्या मातेस प्रशासनाने बदलीला मान्यता मिळाल्यानंतर सुद्धा सेवेत सामावून घेतले नाही. त्यानंतर आता प्रसुती काळातील रजेचे वेतन देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे या मातेने तान्हुल्यासह महापालिकेत ठाण मांडले. महापौरांची भेट घेऊन त्यांना आपली कैफियत मांडली.

मोनिका चव्हाण या वैजापूर नगर पालिकेच्या शिक्षण विभागात सहशिक्षिका आहेत. त्यांचे पती औरंगाबाद महापालिकेच्या शाळेत शिक्षक आहेत. त्यामुळे त्यांनी पती-पत्नी एकत्रिकरण धोरणाच्या अंतर्गत महापालिकेच्या शाळेत बदली मिळावी, असा अर्ज केला होता. त्यांच्या अर्जाला सर्वसाधारण सभेने मंजुरी देखील दिली. सध्या मोनिका चव्हाण प्रसुती रजेवर आहेत. २ जून २०१९ पर्यंत त्यांनी प्रसुती रजा घेतली होती. रजेच्या काळातील आठ महिन्यांचे वेतन मिळावे म्हणून त्यांनी विनंती अर्ज प्रशासनाला दिला. विनंती अर्ज केल्यानंतरही अद्याप वेतन मिळाले नसल्याने त्यांनी तान्हुल्यासह पालिकेत महापौरांकडे धाव घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय होते. वेतन देण्यास आयुक्तांनी मान्यता दिलेली असताना देखील वेतन दिले जात नाही, असे त्यांनी महापौरांना सांगितले.

\Bमहापौर घोडलेंनी सांगूनही टोलवाटोलवी \B

महापौरांनी या प्रकरणाबद्दल शिक्षण विभागाकडून माहिती घेतली असता हे प्रकरण उपायुक्त मंजुषा मुथा यांच्याकडे असल्याचे सांगण्यात आले. महापौरांनी मुथा यांना फोन करून चव्हाण यांच्या वेतनाचे प्रकरण तातडीने निकाली काढण्यास सांगितले. त्यानंतर चव्हाण उपायुक्त मुथा यांना भेटण्यासाठी गेल्या तेव्हा बघते, करते, असे उत्तर त्यांनी दिले. तुमचा अर्ज अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात जमा करा, असे त्यांनी चव्हाण यांना सांगितले. अतिरिक्त आयुक्तांची केबिन माहीत नसल्यामुळे चव्हाण पुन्हा महापौरांकडे आल्या. शेवटी महापौरांनी आपल्या कर्मचाऱ्याच्या हस्ते चव्हाण यांचा अर्ज अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात पोचवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसरा फिलिंग पॉइंट देण्यास नकारघंटा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

टँकर भरण्यासाठी दुसरा पॉइंट देण्यास एमआयडीसीने महापालिकेला नकार दिला आहे. सिडको एन १ येथे एकच पॉइंट दिला असून तेथूनही फारच कमी पाणी मिळत आहे. जास्त पाणी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला असता दुसरा पॉइंट देता येणे शक्य नाही, पाणी हवे असेल, तर वाळूज येथून घ्या, असे एमआयडीसीने पालिकेला कळविले आहे.

शहरातील पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी पालिकेने एमआयडीसीकडे सिडको एन ५ येथील जलकुंभातून रोज भरल्या जाणाऱ्या सुमारे ३५० टँकरखेपांएवढे तीन एमएलडी मागितले होते. हे बचत झालेले पाणी सिडकोला देता येईल, असा विचार त्यामागे होता. त्यासाठी एमआयडीसीने आढेवेढे घेतल्यामुळे पालिकेने विभागीय आयुक्तांना पाणीप्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना पालिकेला पाणी देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वाळूज येथून पाणी घेवून जा, असे एमआयडीसीने कळविले. अंतर जास्त असल्यामुळे पालिकेच्या विनंतीनंतर सिडको एन १च्या फिलिंग पॉइंटहून टँकरसाठी पाणी देण्याचे मान्य केले. मात्र, येथून तीन एमएलडीऐवजी प्रत्यक्षात फक्त ०.३ एमएलडी पाणी मिळत आहे. त्यातून ६० ते ७० टँकरच भरले जातात. परिणामी, सिडको एन ५च्या जलकुंभावर टँकरचा ताण वाढला आहे. त्यामुळे टँकर भरण्यासाठी आणखी एक पॉइंट सिडको किंवा चिकलठाण्यात देण्याची विनंती केली. त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने महापौरांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांची विनंती अधिकाऱ्यांनी मान्य केली नाही. आणखीन एक पॉइंट देणे शक्य नसून वाळूज येथून पाणी घ्या, असे सांगितले. वाळूजहून पाणी आणणे शक्य नसल्याने पालिकेला ०.३ एमएलडी पाण्यावरच समाधान मानावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटील, महाजन, लोणीकर, मुंडेंची चर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजप प्रदेशाध्यपदासाठी चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, बबनराव लोणीकर आणि पंकजा मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक दिग्गजांची नावे चर्चेत असून, आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता महिनाभरात नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड होईल, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ गटातील सूत्रांनी 'मटा'शी बोलताना दिली. महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर आणि ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी प्रामुख्याने आघाडीवर आहेत. सोबतच शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, आशिष शेलार यांचीही नावे चर्चेत असल्याचे समजते. आगामी विधानसभा निवडणुका पाहता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरही काही नावाची चर्चाही सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. संघटनात्मक पातळीवर भाजपमध्ये आधी वॉर्ड समिती, मंडळ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि नंतर प्रदेशाध्यक्ष अशी निवड प्रक्रिया आहे. मात्र, विधानसभा निवडणूक जवळ आल्याने आधी प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल. वरिष्ठ पातळीवर त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून, केंद्रीय अध्यक्ष निवडीपाठोपाठ नूतन प्रदेशाध्यक्षची निवड अपेक्षित आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे अवघ्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुका असल्याने तूर्तास दानवे यांच्याकडेच जबाबदारी ठेवावी का, असाही एक मतप्रवाह असल्याचे समजते. मात्र, त्याची शक्यता कमी असल्याचेही सूत्रांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास सुटेना; ५ महिन्यांत ३१३ शेतकरी आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळामुळे करपलेले खरीप आणि रब्बीने केलेल्या घोर निराशेमुळे मराठवाड्यातील शेतकरी यंदाही बेजार झाला असून, गेल्या पाच महिन्यांमध्ये तब्बल ३१३ शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा मार्ग पत्करला. बिघडलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी काढलेले कर्ज व सावकारी ओझ्याखाली दबल्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.

जगाचा पोशिंदा असलेला बळीराजाचे मराठवाड्यातील आत्महत्या सत्र सुरूच आहे. यंदा जानेवारी ते १९ मे या कालावधीदरम्यान विभागातील तीनशे तेरा शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यातील सर्वाधिक ६९ आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या असून, त्या खालोखाल उस्मानाबाद जिल्ह्यात ४९ तर, जालना जिल्ह्यातील ४५ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. परभरणी जिल्ह्यात २५, हिंगोली १८, नांदेड ३५ तर लातूर जिल्ह्यातील ३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद सरकारी दप्तरात आहे. गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांची संख्या एक हजार पेक्षा जास्त होत आहे. दुष्काळी मराठवाड्यात दोन वर्षांपूर्वी पावसाने दमदार हजेरी लावली होती. शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणीही जोमात केली. मात्र, सर्वात मोठे पीक असलेल्या कपाशीवर बोंडअळीने हल्ला केला. या धसक्यातून शेतकरी कसाबसा सावरत नाही तोच अत्यल्प पावसामुळे मराठवाड्याला यंदा दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे. या फटक्यात शेतकऱ्यांची संपूर्ण आर्थिक घडी बिघडली आहे. सावकारी पाश आणि कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे सत्र यावर्षीही सुरूच आहे.

एक कोटी ४४ लाखांची मदत

हातचे पीकही गेले आणि घरातील कर्ता माणूसही गेला असल्याची परिस्थिती अनेक घरांमध्ये आहे. अवघ्या पाच महिन्यातच आत्महत्यांची संख्या तीनशेच्या पार गेली आहे. दरम्यानच्या या प्रकरणांपैकी चौकशीअंती त्यापैकी २११ प्रकरणे प्रशासनाने मदतीसाठी पात्र ठरवली असून, ६७ प्रकरणांना अपात्र ठरवले आहे तर, ३५ प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. पात्र असलेल्या २११ प्रकरणांमध्ये मृतांच्या वारसांना एक कोटी ४४ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.

जिल्हानिहाय नोंद

- ६९ बीड

- ४९ उस्मानाबाद

- ४५ जालना

- ३५ नांदेड

- ३३ लातूर

- २५ परभरणी

- १८ हिंगोली

- २११ मदतीस पात्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यावर पाण्यासारखा पैसा; २३४ कोटी खर्च!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात दुष्काळाने ठाण मांडले आहे. प्रकल्प कोरडे ठाक असल्याने गावागावापर्यंत पाणी पोचविण्यात प्रशासनाची अडचण झाली असून, आतापर्यंत पाण्यावर चक्क २३४ कोटी २० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

आर्थिक वर्षात खर्च करण्यात आलेल्या २३४ कोटी रुपयांपैकी सर्वाधिक १२९ कोटींचा खर्च औरंगाबाद जिल्ह्यात करण्यात आला आहे. तर सर्वात कमी दोन कोटी रुपये लातूर जिल्ह्यामध्ये खर्च झाले आहेत. यामध्ये तात्पुरत्या नळयोजना, नळयोजनांची दुरुस्ती तसेच टँकरद्वारे पुरवण्यात आलेल्या पाण्याचा खर्चामध्ये समावेश आहे. यंदाही मराठवाड्यातील चार महापालिका, ५० नगरपालिका आणि २५ नगरपंचायतींपैकी बहुतांश शहरे तहानलेली असून, विभागातील ३३ शहरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यापैकी १३ शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पातील संपूर्ण पाणी संपल्यामुळे येथे अतितीव्र तर, मे महिन्याअखेरपर्यंत पुरेल इतकेच पाणी शिल्लक असलेल्या २० शहरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याची आवश्यकता लक्षात घेता प्रशासनाकडून टँकर, तात्पुरत्या नळयोजना, प्रकल्पात चर घेणे आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, मराठवाड्यातील नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये सध्या पाणीपुरवठ्याच्या २३ योजना राखडलेल्या अवस्थेत आहेत. यातील ज्या योजना तत्काळ पूर्ण होतील, अशांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. यापैकी काही योजना सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. गेल्या पाच वर्षात तब्बल चारशे कोटी रुपये फक्त टँकरवर खर्च करण्यात आल्याची नोंद शासन दप्तरी आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी वर्षभरात खर्च

जिल्हा............................ रक्कम

औरंगाबाद..................१२९ कोटी ६६ लाख

जालना......................३८ कोटी १८ लाख

परभणी.......................५कोटी ६४ लाख

हिंगोली......................३ कोटी ६२ लाख

नांदेड......................३२ कोटी ३२ लाख

बीड.........................१४ कोटी ४ लाख

लातूर.......................२ कोटी ०७ लाख

उस्मानाबाद...............८ कोटी ६३ लाख

एकूण.....................२३४ कोटी २० लाख

गेल्या पाच वर्षातील टँकर खर्च

वर्षे........................ रक्कम

२०१३ - १४...........७८ कोटी ५८ लाख

२०१४ - १५.............४४ कोटी ६४

२०१५ - १६...........२२९ कोटी ७२ लाख

२०१६ - १७...........२५ कोटी ३८ लाख

२०१७ - १८.............२५ कोटी ३५ लाख

एकूण...............४०३ कोटी ६७ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायर एनओसीसाठी १२ संस्था नियुक्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील सहा हजार २०८ व्यावसायिक प्रतिष्ठाने असून त्यापैकी केवळ १७९० प्रतिष्ठानांकडे अग्निशमन विभागाचे तात्पुरते ना हरकत प्रमाणपत्र आहे. त्यामुळे सर्व व्यावसायिक प्रतिष्ठानांना 'फायर एनओसी' देण्यासाठी महापालिकेने शासनमान्य १२ खासगी संस्थांची नियुक्ती केली आहे.

महापालिकेचा स्वतंत्र अग्निशमन विभाग असला या विभागाकडे फायर ऑडिटची यंत्रणा नाही. त्यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालयांचे फायर ऑडिट झालेले नाही. त्यामुळे शासनमान्य खासगी संस्थांच्या माध्यमातून फायर ऑडिट करून घेण्याचा निर्णय सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीमध्ये घेतलेल्या निर्णयाची पालिकेने सहा महिन्यानंतर अंमलबजावणी केली आहे. पालिकेने १२ संस्थांना फायर एनओसी देण्यासाठी नियुक्त करून कार्यारंभ आदेश दिले. या संस्थांनी व्यापारी प्रतिष्ठानांची जागा पाहणे, बांधकाम परवानगी, मालकी, बांधकाम नकाशा, मालमत्ता कर भरल्याची पावती, बेबाकी प्रमाणपत्र आदींचा तपासणी करणे बंधनकारक केले आहे. त्याशिवाय अग्निशमन उपकरणांची तपासणी या संस्था करणार आहेत. या तपासणीनंतर विनामूल्य फायर एनओसी दिली जाणार आहे. परंतु, व्यापारी प्रतिष्ठानांना आवश्यक अग्निशमन उपकरणे त्या त्या संस्थांकडूनच खरेदी करावी लागणार आहेत.

'पालिका हद्दीत ११५ वॉर्ड असून प्रत्येक संस्थेला दहा वॉर्ड फायर एनओसीसाठी दिले आहेत. या संस्थांना व्यापाऱ्यांच्या सर्व संघटनांची बैठक घेऊन संकल्पना स्पष्ट करावी लागेल,' असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय खासगी संस्थांद्वारे फायर एनओसी देण्याचे काम करता येणार नाही. फायर एनओसीकरिता पोलिस, अन्न औषध प्रशासन, महावितरणचे सहकार्य घ्यावे लागणार असून संबंधितांना तशी विनंती केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

\Bतर, सुरतपेक्षा भयानक स्थिती \B

सुरत येथे एका कोचिंग क्लासला आग लागून १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शहरातील ४१ कोचिंग क्लासला अग्निशमन विभागाने नोटीस बजावली. फायर एनओसीबद्दल शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत अग्निशमन अधिकाऱ्यांनी शहरातील कोचिंग क्लासची स्थिती सांगितली. बहुतेक कोचिंग क्लासच्या इमारतींची स्थिती आग लागल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर पडता येईलस, अशी नाही. इमारतीच्या पायऱ्या चिंचोळ्या असून चेंगराचेंगरी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सुरतपेक्षा भयंकर अवस्था होऊ शकते, असे तम अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिडकोत भर दिवसा घरफोडी

0
0

वाळूज महानगर : वाळूज महानगर सिडको येथे भर दिवसा चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोख ३० हजार रुपये लंपास केल्याची घटना शुक्रवारी (३१ मे) दुपारी एकच्या सुमारास घडली.

याविषयी अधिक माहिती अशी की, अमोल पांडुरंग हापसे (४३, रा. डोंगरकवडा, जि. हिंगोली) हे गेल्या दोन वर्षांपासून कुटुंबासह सिडको वाळूज महानगर-एकमधील श्री साई रेसीडेन्सी (गट क्रमांक १४०) येथे राहतात. शाळेला सुट्या असल्याने हापसे यांच्या पत्नी वैशाली हापसे १५ दिवसांपूर्वीच मुलांसह मूळ गावी डोंगरकडा येथे गेल्या आहेत. त्यामुळे अमोल हापसे हे एकटेच घरी होते. शुक्रवारी सकाळी आठ वाजता ते नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून कामाला गेले होते. घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सामान उचकले मात्र, हाती काहीच न लागल्याने चोरट्यानी कपाटीतील लॉकर उघडून आत ठेवलेले रोख ३० हजार रुपये लंपास केले आहेत.

दरम्यान, शेजारी रहाणारे गणेश कोथिंबिरे यांना हापसे यांच्या घराला एक अनोळखी तरुण कडी लावून खाली जात असताना दिसला. त्यांनी लगेच घरच्याकडे हापसे यांच्याकडे कोणी नातेवाईक आले आहेत का, याची चौकशी केली व गच्चीवर जाऊन हापसे यांचा शोध घेतला. हा प्रकार संशयास्पद दिसून आल्याने त्यांनी हापसे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधून याविषयी माहिती दिली. माहिती मिळताच हापसे यांनी तात्काळ घरी येऊन पाहिले असता घराचे कुलूप तुटलेले दिसले. आत जाऊन पाहिले असता कपाटीतील सामान अस्ताव्यस्त पडलेले व कपाटातील रोख ३० हजार रुपये गायब असल्याचे दिसून आले. दरम्यान, हापसे यांच्या पत्नी वैशाली यांनी गावी जाताना सोने-चांदीचा किंमती ऐवज सोबत घेऊन गेल्याने तो बचावला गेल्याचे हापसे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनी सुरक्षा समिती नेमा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात एकाच दिवशी दोन विद्यार्थिनींनी ब्लॅकमेलिंगमुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकार घडले आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पोलिस आयुक्तांना भेट घेऊन निवेदन सादर केले. शाळा व कॉलेजमध्ये विद्यार्थिनी सुरक्षा समिती स्थापन करण्याची मागणी मनविसेने केली आहे.

गारखेडा भारतनगर भागात २४ मे रोजी पूनम वाघले या १६ वर्षांच्या विद्यार्थिनीने गावातील तरुण आणि मावसभाऊ ब्लॅकमेल करतो म्हणून गळफास घेत आत्महत्या केली आहे. गारखेडा परिसरातीलच गौरी खवसे या जेएनईसीमध्ये कम्प्युटर सायन्स विभागात अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थिनीने देखील गळफास घेत जीवनयात्रा संपवली. गौरीच्या वर्गमित्रांनी तिचा लॅपटॉप हॅक करीत तिचे खासगी फोटो चोरून ते इतरांना शेअर करून बदनामी केली होती. यामुळे गौरीने आत्महत्येचे पाऊल उचलले. याबाबत मनविसेने पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात विविध मागण्या केल्या आहेत.

दामिनी पथकाच्या माध्यमातून विद्यार्थिंनींशी संवाद वाढवून त्यांना विश्वासात घ्यावे व अडचणी समजून घ्याव्यात, शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थिनी सुरक्षा समिती स्थापन करावी, या समितीच्या अध्यक्षपदी पोलिस उपनिरीक्षक दर्जाची महिला अधिकारी नियुक्त करावी, तज्ज्ञ समुपदेशक नेमावे, या समितीने महिन्यातून एकदा शाळा कॉलेजमध्ये बैठक घेणे अनिवार्य करावे, याचा आढावा स्वत: पोलिस आयुक्तांनी घ्यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. मनविसेच्या या शिष्टमंडळाला पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत या मागण्याबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष राजीव जावळीकर, शहराध्यक्ष मंगेश साळवे, कार्तिक फरकाडे, सचिन कुंटे, उमेश काळे, सागर कासुरे, शुभम घोरपडे, रवीराज कांबळे आणि विशाल गोंधळे आदींचा समावेश होता.

ब्लॅकमेलिंगला कंटाळून दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या करणे ही चिंताजनक बाब आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसंदर्भात पोलिसाांकडे मागणी केली आहे. मनविसेतर्फे विविध महाविद्यालये आणि शाळांत जाऊन याबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे.

- राजीव जावळीकर, जिल्हाध्यक्ष, मनविसे, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एज्युकेशन फेअर’चे गुरुवारपासून आयोजन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'एमजीएम'च्या वतीने येत्या ३० मेपासून १ जूनपर्यंत एमजीएम क्लोव्हरडेल शाळेच्या मैदानावर (एमजीएम कॅम्पस, एन-६) सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत एज्युकेशन फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स प्लॅनेट कॅम्पस'च्या सहभागाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यावेळी होणाऱ्या सेमिनारमध्ये सर्वांसाठी मोफत प्रवेश असला तरी नोंदणी आवश्यक आहे.

यूपीएसई, एमपीएसई, स्टडी अब्रॉड यासह स्पर्धात्मक परीक्षांची तयारी कशा पद्धतीने करावी याचे मार्गदर्शन या एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून मिळणार आहे. तज्ज्ञ मार्गदर्शक या फेअरमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयाला अनुसरून मार्गदर्शन तर करतीलच शिवाय विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन देखील करतील. ३० मे रोजी सायंकाळी ६ वाजता 'यूपीएसई, एमपीएसई आणि अन्य स्पर्धात्मक परीक्षा' या विषयावर डॉ. लेफ्ट. कर्नल सतीश ढगे मार्गदर्शन करतील. त्यानंतर ७ वाजता 'तांत्रिक शिक्षणातील संधी' यावर डॉ. महेश शिवणकर संवाद साधतील. ३१ मे रोजी सकाळी १० वाजता 'स्टडी अब्रॉड (विदेशातील शिक्षण)' यावर अनिरुद्ध हातवाळने मार्गदर्शन करतील. तर सायंकाळी ६ वाजता 'दहावीनंतर करिअर ऑप्शन (संपूर्ण विश्लेषण)' यावर अजित थेटे प्रकाश टाकतील. १ जून रोजी सकाळी १० वाजता 'सिनेमानिर्मिती क्षेत्रात करिअर संधी' या विषयावर शिव कदम हे विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. सायंकाळी ६ वाजता 'दहावीनंतर काय?' यावर गोविंद काबरा हे मार्गदर्शन करणार आहेत.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ९८२२६३०५५५, ९८२३५८३२२२ या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्थळ- एमजीएम क्लोव्हरडेल शाळेचे मैदान, एमजीएम कॅम्पस, एन-६, सिडको, औरंगाबाद

३० मे २०१९

वेळ- सायंकाळी ६ वाजता

विषय- यूपीएसई, एमपीएसई आणि अन्य स्पर्धात्मक परीक्षा

वक्ते- डॉ. लेफ्ट. कर्नल सतीश ढगे

..

वेळ- ७ वाजता

विषय- तांत्रिक शिक्षणातील संधी

वक्ते- डॉ. महेश शिवणकर

..

३१ मे २०१९

वेळ- सकाळी १० वाजता

विषय- स्टडी अब्रॉड (विदेशातील शिक्षण)

वक्ते- अनिरुद्ध हातवाळने

..

वेळ- सायंकाळी ६ वाजता

विषय- दहावीनंतर करिअर ऑप्शन (संपूर्ण विश्लेषण)

वक्ते- अजित थेटे

..

१ जून २०१९

सकाळी १० वाजता

विषय- सिनेमानिर्मिती क्षेत्रात करिअर संधी

वक्ते- शिव कदम

..

वेळ- सायंकाळी ६ वाजता

विषय- दहावीनंतर काय?

वक्ते- गोविंद काबरा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलआयसी फसवणूक; आरोपींच्या कोठडीत वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद

बनावट मृत्यू प्रमाणपत्रे व कागदपत्रे सादर करून भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) जनश्री योजनेंतर्गत ९९ लाख ३० हजार रुपयांच्या मृत्यू दाव्याच्या रकमेचा गैरव्यवहार करून 'एलआयसी'ची फसवणूक केल्याप्रकरणात अली खान दौड खान (५४, रा. जहांगीर कॉलनी, यासीन नगर, हर्सूल) व शंकर लक्ष्मण गायकवाड (४३, रा. जवाहर कॉलनी, विष्णुनगर) आणि एलआयसीचा सहाय्यक लिपिक विनोद सखाराम बत्तीसे याच्यासह मुरलीधर विठ्ठल खाजेकर यांच्या पोलीस कोठडीत तीन जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

या प्रकरणाची शुक्रवारी (३१ मे) मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. एस. काकडे यांच्यासमोर सुनावणी झाली. पुढील सखोल तपासासाठी आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती सरकारी पक्षाने केली. खान आणि गायकवाड यांना २८ मे तर, बत्तीसे आणि खाजेकर यांना २९ मे रोजी न्यायालयाने ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.

या प्रकरणात भारतीय आयुर्विमा महामंडळाचे पेन्शन व समूह विमा विभागातील अधिकारी भीमराव संपतराव सरवदे (६०) यांनी तक्रार दिली होती. वेगवेगळ्या आठ सामाजिक संस्थांचे (एनजीओ) अध्यक्ष व सचिवांनी ११ जुलै २०१४ ते नऊ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत बनावट कागदपत्राआधारे मृताच्या नावे रक्कम उचलल्यानंतर त्याच व्यक्तीला पुन्हा जिवंत दाखवून त्याची पॉलिसी काढली. त्याला पुन्हा त्याला मृत दाखवून विमा कंपनीला ९९ लाख ३० हजार रुपयांचा गंडा घातला. जनश्री योजनेंतर्गत ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणुकीच्या गुन्ह्यातील पसार आरोपी जाळ्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट कागदपत्रांआधारे फायनान्स कंपनीला साडेनऊ लाखांना फसवून पसार झालेल्या आरोपीला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. गुंगारा देणाऱ्या या आरोपीला दहा महिन्यांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी २० ऑगस्ट २०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी आयकेएफ फायनान्स कंपनीचे अधिकारी किरण गायकवाड यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या सेव्हन हिल्स येथील कार्यालयात २०१५मध्ये आरोपी अमोल अशोक लोखंडे आणि अजय अशोक लोखंडे (दोघे रा. अंतरवाला, जालना) यांनी दुसऱ्याच्या नावावर असलेल्या आयशर वाहनाचे खोटे आरसी बुक सादर केले. या बनावट कागदपत्राआधारे त्यांनी साडेनऊ लाखांचे कर्ज उचलले. या कर्जाचे परतफेड न केल्याने फायनान्स कंपनीने या कागदपत्राची पडताळणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पसार झाले होते.

दरम्यान, गुरुवारी आरोपी गावामध्ये असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पथकाने आरोपीचे गाव गाठले. यावेळी आरोपी अमोल अशोक लोखंडे (वय २८) हा शेतात लपून बसला होता. साध्या वेशातील पोलिसाला पाहून त्याने धूम ठोकली. पोलिसांनी अमोलचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले व अटक केली. ही कामगिरी पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त रामचंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विनायक कापसे, गणेश डोईफोडे, कल्पना जामोटकर यांनी केली.

\Bयापूर्वी तीन वेळा दिला गुंगारा\B

गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी पसार झाले होते. पोलिसांचे पथक यापूर्वी तीन वेळा त्यांना पकडण्यासाठी जालना येथे गेले होते मात्र, आरोपी चतुर असल्याने पोलिसांना गुंगारा देत पसार होण्यात यशस्वी झाले होते. पसार असताना आरोपी इंदूरला होता. लग्नासाठी तो गावाकडे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून अमोलला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images