Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पैठण मतदारसंघ काँग्रेसला सोडवून घ्यावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आगामी विधानसभा निवडणुकीत पैठण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेससाठी सोडवून घ्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी केली.

प्रदेश काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी मुंबईत राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलाविली होती. राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळच्या सत्रात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा या नेत्यांनी घेतला. प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, शहराध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, ज्येष्ठ नेते केशवराव औताडे, विलास औताडे, विनोद तांबे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, नेतेमंडळी उपस्थित होती. लोकसभा निवडणुकीत मतदारसंघनिहाय मिळालेल्या मतांचा आढावा घेण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी केल्यानंतर कोणत्या पद्धतीचा फॉर्म्युला ठेवायचा यावर विचारणा झाल्यानंतर काँग्रेसकडे सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तीन मतदारसंघ द्यावेत, यावर एकमत झाले पण पैठण मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस ऐवजी काँग्रेसकडे घ्यावा, अशी मागणी अनिल पटेल यांनी श्रेष्ठींसमोर केली. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करण्याची सूचनाही काही नेत्यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्याच्या टँकरची १३जूनपासून तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जयभवानीनगर येथे पाण्याच्या टँकरखाली चिरडल्याने नऊ वर्षांची चिमुकली ठार झाली. या घटनेची पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली. तातडीने शहरातील पाण्याच्या टँकर मालक चालकांची बैठक घेत त्यांना विविध सूचना करण्यात आल्या. पाण्याच्या टँकरची १३ जूनपासून तपासणी करण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त भारत काकडे यांनी ही बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी टँकरचालकांनी वाहन अद्यावत करून कागदपत्रे सोबत बाळगावी, विना लायसन्स वाहन चालवू नये, वाहनाची नंबर प्लेट चारही बाजूने असावी, वाहन मर्यादित वेगात चालवावे, वाहनावर रिफेल्क्टर पट्टी असावी, वाहनावर चालकाव्यतिरिक्त एक मदतनीस असावा, दारू प्राशन करून वाहन चालवू नये, टँकरमधून गळती रोखावी यामुळे वाहन घसरणे कमी होईल, सर्व प्रकारच्या पाण्याच्या टँकरची १३ जूनपासून तपासणी करण्यात येणार आहे. या बैठकीला पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज, निर्मला परदेशी, शरद इंगळे, नाथा जाधव आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस स्वातंत्र्य सैनिकांचे ३४ पाल्य नोकरीतून बडतर्फ

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील बोगस स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांविरुद्ध कारवाई करून ३४ जणांना बडतर्फ केल्याचा अहवाल मुंबई उच्च न्यायायलाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आला. त्याचवेळी सेवेतून बडतर्फ केलेल्या ३४ जणांनी दाखल केलेल्या 'पुनर्विलोकन याचिका' त्यांनी मागे घेतल्या आहेत.

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील बोगस स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांविरुद्ध पुढील योग्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचा आदेश खंडपीठाने २५ फेब्रुवारी २०१९ रोजी औरंगाबाद आणि जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार चौकशीत दोषी ठरलेल्या ४८ जणांपैकी ३४ लोकांना सेवेतून बडतर्फ केल्याचा अहवाल शासनाने शपथपत्राद्वारे शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. एस. के. कोतवाल यांच्या खंडपीठात सादर केला. स्वातंत्र्य सैनिकांच्या बोगस पाल्यांविरुद्ध कार्यवाही करण्याबाबतच्या २५ फेब्रुवारी २०१९ च्या आदेशाविरुद्ध सेवेतून बडतर्फ केलेल्या ३४ जणांनी दाखल केलेल्या 'पुनर्विलोकन याचिका' त्यांनी शुक्रवारी मागे घेतल्या. शासनाने शपथपत्रात म्हटल्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील बोगस पाल्यांना बडतर्फे केले आहे. इतर विभागांमध्ये कार्यरत बोगस पाल्यांविरुद्ध बडतर्फीची कार्यवाही चालू आहे. पुनर्विलोकन याचिकाकर्त्यांतर्फे सिद्धेश्वर एस. ठोंबरे, मूळ याचिकाकर्ता पांडुरंग मोने यांच्यावतीने अंगद कानडे आणि शासनाच्या वतिने सहायक सरकारी वकील महेंद्र नेरलीकर यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँक गैरव्यवहार; पुनर्विलोकन अर्ज रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आठ कोटी ५२ लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला पुनर्विलोकन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी रद्द केला. या निर्णयामुळे बँकेसह आर्थिक गुन्हे शाखेला चांगलाच दणका बसला. त्यामुळे बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात पुन्हा एकदा आर्थिक गुन्हे शाखेला चौकशी करावी लागणार आहे.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आठ कोटी ५२ लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणात तत्कालीन अध्यक्षांसह उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक व इतर संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ४६३, ४६८, ४७१ व १२० (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करून न्यायालयात 'सी' समरी दाखल केली होती. मात्र तत्कालीन मुख्य न्यायादंडाधिकारी यांनी ती फेटाळून लावत, अपहार झालेल्या रकमेची जबाबदारी ठरविण्याचे आदेश ३० डिसेंबर २०१७ रोजी दिले होते. दरम्यान, मुख्य न्यायदंडाधिकारी यांची बदली होऊन त्यांच्या जागी नवीन न्यायाधीश रुजू झाले होते. ८ ऑक्टोबर २०१८ रोजी गुन्हे शाखेने प्रकरणात दुसऱ्यांदा 'सी' समरी दाखल केली असता, नवीन न्यायाधीशांनीही ती नामंजूर केली. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने प्रकरणात गुरुवारी (६ जून) जिल्हा व सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज दाखल केला असता, त्या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने पुनर्विलोकन अर्ज रद्द केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शासकीय दंत’ १३ व्या स्थानावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देशपातळीवरील दंत महाविद्यालयांच्या सर्वेक्षणात खासगी व शासकीय गटांत शहरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने १३वे स्थान पटकाविले आहे, तर शासकीय महाविद्यालयांच्या यादीत औरंगाबादच्या महाविद्यालयाने पाचवा क्रमांक पटकावला आहे. हे सर्वेक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. विशेष म्हणजे पहिल्या १३ महाविद्यालयांमध्ये राज्यातील मुंबई व औरंगाबाद या महाविद्यालयांचा समावेश आहे.

दरवर्षी देशातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांची यादी जाहीर केली जाते. यंदा २०१८-१९ मध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये दंत महाविद्यालय व रुग्णालयातील उपलब्ध पायाभूत सोयी-सुविधा, महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा, शिक्षक-विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शैक्षणिक पेपर प्रेझेन्टेशन, दंत परिषदांमधील शिक्षकांचा सहभाग, रुग्णांसाठीच्या सेवा-सुविधा व अद्ययावत उपकरणे, देशासाठी-समाजासाठी संबंधित महाविद्यालय किती उपयुक्त आहे आदी निकषांच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात येते. यंदाच्या सर्वेक्षणात दिल्लीच्या मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सने ५८५ स्कोअरच्या आधारे देशातून पहिले स्थान पटकाविले. मुंबईच्या 'नायर हॉस्पिटल डेंटल'ने ४४८ स्कोअरच्या आधारे चौथे स्थान पटकाविले, तर औरंगाबादच्या 'शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालया'ने ३१० स्कोअरच्या आधारे १३ वे स्थान पटकाविले आहे. सर्वेक्षणातील १३ महाविद्यालयांच्या यादीमध्ये एकूण आठ महाविद्यालये ही खासगी, तर पाच महाविद्यालये ही शासकीय असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईनंतर राज्यात केवळ औरंगाबादेतील महाविद्यालयाचा समावेश असल्याचेही समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेरच्या दिवशी रोहिण्या बरसल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या वर्षी झालेला कमी पाऊस आणि यंदाचा कडक उन्हाळा यामुळे त्रस्त असलेल्या औरंगाबादकरांना रोहिणी नक्षत्राच्या शेवटच्या दिवशी वरुणराजाने थोडा दिलासा दिला. शुक्रवारी दुपारी शहराच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणातील उष्मा थोडा कमी झाला.

गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट औरंगाबादसह मराठवाड्यात आहे. दररोज ४१ अंशांवर तापमानाचा पारा असतो. शुक्रवारी सकाळपासून ऊन तापले होते. दुपारी दीडच्या सुमारा आभाळ भरून आले. साडेतीनच्या सुमारास दक्षिण औरंगाबादच्या काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. झांबड इस्टेट परिसरात एक झाड उन्मळून पडले. जबिंदा लॉन्सवर असलेल्या सर्कसचा एक तंबूही वाऱ्याने उडून गेला. साधारणपणे दहा मिनिटे हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. रोहिणी नक्षत्राच्या अखेरच्या दिवशी पावसाने हजेरी लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ उपकेंद्रातील विकासकामांचा आढावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापाठाच्या उस्मानाबाद उपपरिसर विकासासाठी कटीबद्ध आहे. येत्या आर्थिक वर्षात तरतूद केलेली सर्व विकासकामे लवकरच सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले. ते उपपरिसरात बोलत होते.

विद्यापीठाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी उस्मानाबाद उपपरिसराची शुक्रवारी पाहणी केली. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापन परिषद कक्षात उपपरिसर मंडळाच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर, डॉ. जयसिंग देशमुख, डॉ. अशोक मोहेकर, डॉ. गोविंद काळे, प्रा. संभाजी भोसले, नितीन बागल, संचालक डॉ. मनार साळुंके, उपकुलसचिव आय. आर. मंझा उपस्थित होते. अर्थसंकल्पातील तरतुदीनूसार उपपरिसराचा शैक्षणिक व गुणात्मक विकास करण्यावर चर्चा झाली. विज्ञान भवन इमारतीचा पहिला मजला बांधणे, अतिथीगृह, संरक्षण भिंत बांधणे, नवीन विभागासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पद निर्मिती करणे, मुलांचे वसतिगृह, उपहारगृह, क्रिडागंण, मूल्यांकन भवन व गोदाम, व्यवस्थापनशास्त्र विभागाची स्वतंत्र इमारत, जल व भूमी व्यवस्थापन विभागासाठी जल व मृदा प्रयोगशाळा तयार करणे, नगरपालिकेच्या वतीने किमान तीन इंच मुख्य जलकुंभातून पाणी पुरवठ्याबाबत मागणी करणे, तलावाचे खोलीकरण करणे, अंतर्गत रस्ते तयार करणे आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी 'आय क्वॅक'च्या वतीने 'नॅक' मूल्यांकनात सहभागी प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीजी सीईटी’चा पेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पदव्युत्तर वर्गाच्या प्रवेशासाठी 'सीईटी' घेण्यास विद्यापीठ प्रशासनाने सुरुवात केली आहे. महाविद्यालयांची 'सीईटी' पाच दिवसात पूर्ण होणार आहे. बहुतेक महाविद्यालयांच्या विषयनिहाय 'सीईटी' एकाच दिवशी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे महाविद्यालय निवडीचे पर्याय बंद झाले आहेत. या अडचणीच्या वेळापत्रकामुळे जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि कॅम्पसमधील विभागात पदव्युत्तर वर्गांसाठी प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) घेण्यास सुरुवात झाली आहे. विद्यापीठातील प्रत्येक विभागाच्या 'सीईटी'चे वेळापत्रक वेगवेगळे आहे. तर महाविद्यालयातील 'सीईटी' १७ ते २१ जून दरम्यान होणार आहे. परीक्षेच्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्याला एकाच महाविद्यालयात परीक्षा देण्याची संधी आहे. महाविद्यालयांची संख्या जास्त असून, अनेक महाविद्यालयांची सीईटी एकाच दिवशी होणार आहे. 'सीईटी'साठी विद्यापीठ प्रशासनाने फक्त पाच दिवसांचा कालावधी दिला आहे. हा कालावधी किमान दहा दिवस करण्याची मागणी होती. पण, त्यावर निर्णय झाला नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. वेगवेगळ्या टप्प्यात सीईटी घेतली असती तर जास्त पर्याय खुले झाले असते, असा मुद्दा अधिसभा सदस्यांनी उपस्थित केला होता. एकूण ५० गुणांच्या सीईटीसाठी एक तासाचा वेळ आहे. एका विषयाची परीक्षा एकाच दिवशी आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महाविद्यालयातही क्रमांक नसल्यास विद्यार्थ्याला परजिल्ह्यात सीईटी द्यावी लागणार आहे. 'सीईटी'चा निकाल २२ जून रोजी जाहीर होणार असून प्रवेश प्रक्रिया २४ जून रोजी सुरू होणार आहे. प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर विद्यापीठ प्रशासन प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्पॉट अॅडमिशनचा पर्याय खुला ठेवण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अनेक महाविद्यालयाचे वेळापत्रक एकाच दिवशीचे असल्यामुळे विद्यार्थी एकाच महाविद्यालयात परीक्षा देऊ शकणार आहेत. पर्याय शिल्लक नसल्याने तांत्रिक अडचणी उपस्थित झाल्या आहेत. इतर महाविद्यालयात प्रवेश घेण्याची संधी मिळणार नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन महाविद्यालयात जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. सामाईक सीईटी रद्द करुन स्वतंत्र 'सीईटी'चा घाट घालूनही ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याचे आव्हान आहे.

\B'सीईटी'ला प्रतिसाद

\Bविद्यापाठातील रसायनशास्त्र विभागाची प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) शुक्रवारी झाली. एकूण ९४ जागांसाठी एक हजार ५६ विद्यार्थ्यांनी 'सीईटी' दिली, अशी माहिती विभागाप्रमुख डॉ. सुरेश गायकवाड यांनी दिली. यंदा रसायनशास्त्र विषयाच्या ७० व अ‍ॅनालिटीकल केमेस्ट्रीच्या २२ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली. कॅम्पसमधील १५ विभागातील ४० कक्षात दुपारी १२ ते २ या वेळेत परीक्षा घेण्यात आली. कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी विभागांना भेट देऊन परीक्षेची पाहणी केली. यावेळी डॉ. अंजली राजभोज, डॉ. मच्छिंद्र लांडे, डॉ. सुनील शंकरवार, डॉ. गिरीबाल बोंदले, डॉ. बापू शिंगटे, डॉ. भास्कर साठे, प्रा. अनुसया चव्हाण उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आइसक्रीम घेऊन जाणाऱ्या मुलीला टँकरने चिरडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तिने दुकानात जाऊन आइसक्रीचा कोन हातात घेतला. त्याच आनंदात ती बहिणीच्या घराकडे निघाली. तितक्यात चालकाने निष्काळजीपणाने पाण्याचा टँकर वळविल्यामुळे नऊ वर्षांची मुलगी चाकाखाली चिरडून जागीच ठार झाल्याची ह्रद्यद्रावक घटना शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास जयभवानीनगरमध्ये घडली. नेहा गौतम दंडे असे मृत मुलीचे नाव असून, घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

जयभवानीनगरच्या गल्ली क्रमांक ११मध्ये नगरसेवक प्रमोद राठोड यांच्या वॉर्डात पाण्याचा टँकर येतो. या गल्लीत रंजना रामदास वाघमारे यांच्याकडे अनिता रवी गायकवाड भाड्याने राहतात. तीन दिवसांपूर्वी त्यांची आई पार्वतीबाई आणि छोटी बहीण नेहा (रा. मोधलके, ता. औराद, जि. बिदर) त्यांना भेटायला आल्या होत्या. शुक्रवारी सुमेश किराणा अँड स्टेशनर्स या दुकानातून नेहाने आइस्क्रीम घेतले आणि पुढच्या क्षणातच पाण्याचे टँकर थेट तिच्या अंगावर आले. डोक्यावरून चाक गेल्याने ती जागीच गतप्राण झाली. अरुंद गल्ल्यांमधून टँकर रिव्हर्स घेता येत नाही. याचा अंदाज येऊनही टँकरचालक देविदास जाधवने निष्काळजीपणा दाखवला आणि टँकर वळवण्याच्या नादात नेहाचा नाहक जीव गेला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी टँकरचालक जाधवला चोप दिला. पोलिस आणि स्थानिकांच्या सहाय्याने तो गर्दीतून बाहेर पडला आणि मुकुंदवाडी पोलिस ठाण्यामध्ये हजर झाला. घटनेची माहिती मिळताच नागरिक जमा झाले आणि त्यांनी पालिकेवर आपला रोष व्यक्त केला. तासाभराने महापौर नंदकुमार घोडेले यांनीही घटनास्थळी भेट दिली. मात्र, नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

\B...लोक ओरडले पण, त्याने पाहिलेही नाही!

\Bचालक देविदास जाधव निष्काळजीपणे टँकर रिव्हर्स घेत होता. त्यावेळी तिथे उपस्थित नागरिकांनी पोटतिडकीने त्याला हाका मारल्या. मागे मुलगी असल्याचे सांगितले. मात्र, त्याने लोकांकडे सोडून द्या, टँकर वळविताना साधे मागे वळून पाहिलेही नाही, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्यामुळे घटना घडताच संतापलेल्या नागरिकांनी जाधवची धुलाई केली. तर महापौरांनी त्याच्या निलंबनाची घोषणा करत कुटुंबाला नुकसानभरपाईचे आश्वासन दिले.

\Bसंबंधित वृत्त : पान ३

\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटकाळसह तिघांना न्यायालयीन कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सोनपापडी व्यावसायिकासह त्याच्या मुलाला लोखंडी रॉडने जबर मारहाण व चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणात आरोपी लहू गटकाळसह रवींद्र बाळासाहेब तोगे व अंकुश रामभाऊ मंडलिक या तिघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी दिले.

या प्रकरणी सोनपापडीचा व्यवसाय करणारे रतन हिरालाल अग्रवाल (वय ३०, रा. विष्णुनगर) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, १६ मार्च रोजी मध्यरात्री तोगे, गटकाळ व त्याच्यासोबत पाच ते सहाजण फिर्यादीचा मुलगा शुभम याला मारहाण करीत होते. ते मुलाला वाचवण्यासाठी गेले असता त्यांनाही जबर मारहाण करण्यात आली. त्याचवेळी गटकाळ याने पिस्तुल रोखत जिवे मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणात लहू गटकाळ, रवींद्र तोगे, अंकुश मंडलिक व गणेश रामनाथ जोशी या चौघांविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जोशी वगळता तिघांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत केली होती. दरम्यान, तिघा आरोपींविरुद्ध संघटीत गुन्हेगारी केल्याप्रकरणात पोलिस आयुक्तांच्या आदेशान्वये 'मकोका'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तिघांना 'मकोका'अंतर्गत २९ मे रोजी न्यायालयीन कोठडीतून अटक करण्यात आली, न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत (६ जून) पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यायाविरोधात लेखणी झिजवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सध्या सामाजिक स्थिती अत्यंत विदारक असून लेखक विचारवंतांचे स्वातंत्र्य हिरावून घेणारी आहे. या स्थितीचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे. लेखक-विचारवंतांनी अन्यायग्रस्तांच्या बाजूने आपली लेखणी झिजवावी असे प्रतिपादन साहित्यिक के. ओ. गिऱ्हे यांनी केले. ते पुरस्कार प्रदान कार्यक्रमात बोलत होते.

'भटक्यांचे भावविश्व' मासिकाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा राज्य स्तरावर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात रविवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते माधव बोर्डे, साहित्यिक प्राचार्य ग. ह. राठोड, प्राचार्य हसन इनामदार, पत्रकार स. सो. खंडाळकर, संपादक के ओ. गिऱ्हे, प्रा. शिवाजी वाठोरे, टी. एस. चव्हाण, अंबादास रगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कवी, लेखक आणि कार्यकर्त्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या मान्यवरात डॉ. नारायण पंडुरे, प्रा. सतीश पद्मे, बाळासाहेब निकाळजे, आनंदा साळवे, सचिन चव्हाण, कडूबा बनसोडे, प्रभावती गोंधळी, लता मुसळे, सुमंत गायकवाड, लक्ष्मी एखंडे, गोविंद बामणे, डॉ. द्रौपदी पांदिलवाड, गजानन गिरी, सतीश पाटील, प्रा. गजानन मकासरे यांचा समावेश होता. शिवाजी वाठोरे यांनी सूत्रसंचालन केले आणि एकनाथ खिल्लारे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवनाचे नियोजन करणारा कार्यकर्ता माणसे जोडतो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जीवनाचे एक वर्षाचे नियोजन करणारा धान्याचे पीक घेतो. दहा वर्षांचे नियोजन करणारा फळबागा लावून फळे घेतो, पण आपल्या अनमोल जीवनाचे समग्र नियोजन करणारा कार्यकर्ता केवळ माणसे जोडण्याचेच काम करतो, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सत्संग प्रमुख दादा वेदक यांनी केले.

विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मत्री व्यंकटेश आबदेव यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन डॉ. हेडगेवार रुग्णालयातील दामूअण्णा दाते सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक दाजी जाधव, नवनाथ महाराज आंधळे, अनिलदास महाराज, विश्व हिंदू परिषदेचे महानगर उपाध्यक्ष पंकज वालतुरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. दादा वेदक यांनी (कै.) आबदेव यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व, वक्तृत्व आणि कुशल नेतृत्वगुण असलेले (कै.) आबदेव आपल्यातून निघून गेले. ही पोकळी भरून निघणार नाही, असे त्यांनी नमूद केले. सभेच्या सुरुवातीला राजीव जहागिरदार, नवनाथ महाराज आंधळे, दाजी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. शैलेश पत्की यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्णपुरा मैदानावर पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कर्णपुरा मैदानावर पेटवून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान घाटी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. अनिता भीमसिंग महेर (वय २७, रा. सिडको एन ६), असे या महिलेचे नाव आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिता महेर या पतीपासून विभक्त राहत होत्या. त्या दोन जून रोजी कर्णपुरा परिसरात नातेवाईकांच्या घरी गेल्या होत्या. यानंतर सायंकाळी त्यांनी निराशेतून स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेतले. त्यांना उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेयसीसाठी केला वेश्येचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सोनाली शिंदे या महिलेचा २४ मे रोजी सकाळी खून झाल्याच्या घटनेला कलाटणी मिळाली आहे. सोनाली शिंदे जीवंत असून तिच्यासाठी प्रियकराने एका वेश्येला भुलवून घेऊन जात तिचा पोखरी पिसादेवी शिवारात जाळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटविली असून तिचे नाव ती हर्सूल येथील रहिवासी आहे.

पिसादेवी पोखरी शिवारात २४ मे रोजी एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. चिकलठाणा पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात मृत महिला ही सोनाली सदाशिव शिंदे (रा. जाधववाडी) असल्याची ओळख तिच्या भावाने पटविली होती. या महिलेच्या पायातील चैनजोड, अंगठ्या, बांगड्या तसेच घटनास्थळी एका सुसाइड नोट आढळली होती. यावरून ही महिला सोनाली असल्याचे तिच्या भावाने ओळखले होते. दरम्यान, सोनालीचा भाऊ अमोल वाढेकर याने दिलेल्या तक्रारीवरून तिचा पती सदाशिव शिंदे याला चिकलठाणा पोलिसांनी अटक केली होती. मात्र, हे प्रकरण संशयास्पद असल्याचे पोलिसांना सुरुवातीपासून वाटत होते. सोनाली शिंदे हिचे छबादास भावलाल वैष्णव (रा. बोधेगाव, रा. फुलंब्री) याच्या सोबत प्रेमसंबध असल्याची माहिती खबऱ्याने दिली होती. घटना घडल्यापासून छबादास सुद्धा बेपत्ता होता. तो चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छबादासला शोध ताब्यात घेतले असता त्याच्यासोबत एक महिला आढळली; ती मूळ सोनाली शिंदे असल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले.

हा गुन्हा उकल करण्यासाठी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधीक्षक गणेश गावडे, डीवायएसपी विशाल नेहुल, स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय महेश आंधळे, सत्यजीत ताईतवाले, पीएसआय आस्मान शिंदे, सहायक फौजदार नारायण कटकुरी आदींनी प्रयत्न केले.

\B'क्राईम पेट्रोल' आणि वेश्येचा खून \B

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छबादास आणि सोनालीचे प्रेमसंबध होते. तिला कायमची मिळ‌विण्यासाठी छबादास प्रयत्न करत होता. तो गुन्हेगारीवर आधारित 'क्राईम पेट्रोल' ही टीव्ही मालिका नेहमी पाहत होता. त्याने हर्सूल भागातून एका वेश्येला सोबत नेले व तिचा गळा आवळून खून करून तिचा चेहरा जाळण्यात आला. तसेच ती महिला सोनाली शिंदे आहे हे भासवण्यासाठी सोनालीच्या पायातील चप्पल, चैन जोड, अंगठ्या, बांगड्या तसेच तिने लिहिलेली चिठ्ठी तेथे ठेवली. मात्र, सिडको परिसरातील एक महिला बेपत्ता असल्याची माहिती खबऱ्याने एपीआय महेश आंधळे यांना दिली होती. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल आहे. पोलिसांनी छबादासने खून केलेल्या महिलेच्या नातेवाईकांना तिचे फोटो, साडी, ब्लाउज, क्लीप दाखवली असता त्यांनी तिची ओळख पटवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नळाचे काम रखडल्याने बालिकेचा बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जयभवानीनगरमधील नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवावे लागते. हे काम रखडल्यानेच बालिकेचा टँकरखाली चिरडून मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळी संतप्त नागरिकांनी महापौरांना घेराओ घालून पाणी योजनेचा प्रश्न प्रलंबित असल्याने आजची दुर्घटना घडल्याचे सुनावले.

जयभवानीनगरच्या गल्ली क्रमांक ११ हा भाग नगरसेवक प्रमोद राठोड यांच्या वॉर्डात येतो. या गल्लीत रंजना रामदास वाघमारे यांच्या घर आहे. वाघमारे यांच्याकडे अनिता रवी गायकवाड

भाड्याने राहतात. तीन दिवसांपूर्वी त्यांची आई पार्वतीबाई आणि छोटी बहीण नेहा (रा. मोधलके, ता. औराद, जि. बीदर) त्यांना भेटायला आल्या होत्या. शुक्रवारी सुमेश किराणा अँड स्टेशनर्स या दुकानातून नेहाने आईस्क्रिम घेतले आणि पुढच्या क्षणातच पाण्याचे टँकर थेट तिच्या अंगावर आले. डोक्यावरून चाक गेल्याने ती जागीच गतप्राण झाली.

या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी टँकरचालकाला चोप दिला. पोलिस आणि स्थानिकांच्या सहाय्याने चालक गर्दीतून बाहेर पडला आणि त्याने मुकुंदवाडी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. घटनेची माहिती मिळताच हळूहळू नागरिक जमा झाले आणि त्यांनी महापालिकेवर आपला रोष व्यक्त केला. या वेळी एमआयएमचे नेते डॉ. गफार कादरी, भाकप नेते मधुकर खिल्लारे, सामाजिक कार्यकर्ते राहुल इंगळे यांनीही नागरिकांची समजूत घातली. तासाभराने महापौर नंदकुमार घोडेले यांनीही घटनास्थळी भेट देत नागरिकांचे सांत्वन केले मात्र, नागरिक काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. महापौरांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत टँकरचालकाच्या निलंबनाची घोषणा केली. या भागाला सुरळीत पाणीपुरवठा का होत नाही याची माहिती घेऊ; तसेच पालिकेच्या सर्वसाधारण सभेत दंडे कुटुंबाला नुकसानभरपाई म्हणून आर्थिक मदत करू, असे आश्वासन दिले. त्यानंतरही नागरिकांनी महापौरांना खडे बोल सुनावले. 'आमच्या भागात महा पालिकेची नळयोजना पोचली नाही. त्यामुळे येथील नागरिक पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून आहेत. जयभवानीनगर, विश्रांतीनगर येथे नेहमीप्रमाणेच नागरिकांनी टँकरद्वारे पाणी भरावे लागते. २५ वर्षांपासून येथील नळयोजनेचा प्रश्न प्रलंबित असूनही महापालिका आमची दखल घेत नाही. आज एका लहान मुलीचा जीव गेला. तरीही महापालिका आम्हाला नळ देत नसेल तर अशा घटना वारंवार घडतील. आम्हाला आता आश्वासन नको तर नळ द्या,' अशी मागणी नागरिकांनी केली.

नागरिकांचा हा गोंधळ वाढतच होता. जागोजागी नागरिक महापौरांना थांबवून समस्या सांगत होते. आपण या भागातील प्रत्येक निवेदनाची दखल घेतली असून, अतिरिक्त आयुक्त आणि शहर अभियंता यांना पाचारण करण्यात येईल, असे ते म्हणाले. नगरसेवक राठोड यांनी मात्र गल्ली क्रमांक ११पर्यंत पाइप लाइन टाकली असून, केवळ महापालिका अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे नळ सुरू झाले नसल्याचे 'मटा'शी बोलताना सांगितले. 'महापालिका अधिकारी फालक यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही नळ देण्यात आले नाही. आता ते उन्हाळ्यानंतर नळ देऊ असे म्हणाले. या भागात नळ सुरू झाले असते तर ही घटना टाळता आली असती,' असेही ते म्हणाले.

'आम्ही दुप्पट पैसे भरतो, पण नळ द्य"

टँकरच्या खाली येऊन मरण पावलेली मुलगी आमची कुणी नव्हती पण, त्या मुलीच्या जाण्याने आम्हाला पण खूप वाईट वाटले. अशी घटना या भागात कुणासोबतही होऊ शकते. महापालिकेने २५ वर्षांपासून आमची नळयोजना प्रलंबित ठेवली. आता तरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखावे. अन्यथा आम्हाला पाण्याच्या टाकीत उतरून जीव द्यावा लागेल, या शब्दांमध्ये नागरिकांनी महापौरांना फैलावर घेतले. महिलांनी पाण्यापायी होणारी फजिती सांगत, टँकरचालक पाणी विकतात, असे आरोप केले. या भागात पिण्याच्या पाण्यासाठी एक कुटुंबाला टँकरच्या पाण्यासाठी पाच हजार रुपये मोजावे लागतात. तरीही टँकरचालक मनमानी करतात. खाडा करतात. बहुतांश टँकरचालक दारू पिऊन असतात. टँकरवर दोन माणस अपेक्षित असताना केवळ ड्रायव्हर असतो. त्यामुळे आवश्यक ती सावधगिरी बाळगली जात नाही. महापालिका एका दिवसात नळयोजना आणू शकत नाही पण, महापौरांनी लक्ष घातले तर, २५ वर्षांची समस्या सुटू शकते. टँकरपेक्षा आम्ही दुप्पट पैसे मोजू पण आम्हाला नळ द्या, अशी प्रतिक्रिया भीमराज भुजंग यांनी दिली.

झालेली घटना दुर्दैवी आहे. पाण्यावर होणारे राजकारण याला कारणीभूत आहे. महापालिकेने प्रलंबित ठेवलेल्या समस्या आता हाताळण्यासारख्या राहल्या नाहीत.

- डॉ. गफार कादरी, एमआयएम

झालेली घटना मी माझ्या डोळ्यांनी पाहली. पाणी कुणाकडे नेत आहे, म्हणून मी त्याला हटकले होते. मागे मुलगी आहे म्हणून त्याला थांब थांब म्हणेपर्यंत त्याने होत्याचे नव्हते

केले. माझ्या भाडेकरूकडे आलेल्या लहान मुलीचा माझ्यासमोर जीव गेला.

- रंजना वाघमारे

घटना घडली तेव्हा मी घराच्या गॅलरीत उभा होतो. मी पण त्याला थांब म्हणालो पण, त्याने काही ऐकले नाही. ही घटना मी कधीच विसरू शकत नाही.

- विठ्ठल शिंदे

संपूर्ण शहर टँकरमुक्त करणे आवश्यक आहे. अशा घटनांमध्ये सर्वसामान्य लोकांचा नाहक बळी जातो. महापालिका अधिकारी, चालक यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हायला हवे. विश्रांतीनगरला दोन वर्षांपासून पाइप लाइन आणली पण, नळ दिले नाहीत.

- मधुकर खिल्लारे

या भागाकडे महापालिकेने साफ दुर्लक्ष केले. या भागाला पुंडलिकनगरच्या पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा करा, अशी मागणी केली. तोपर्यंत या भागाला दीड हजार रुपये वार्षिक दराने ड्रमने पाणी द्यावे.

- राहुल इंगळे, सामाजिक कार्यकर्ते

पालिकेच्या टँकरचालकाच्या चुकीमुळे जीव गेला. या घटनेचे मला खूप दुःख आहे. मी दंडे कुटुंबासोबत आहे. महापालिका आपली जबाबदारी टाळत नाही. टँकरचे दर कमी करून या भागात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करू. या घटनेनंतर सर्व नियमांचा अभ्यास केला जाईल.

- नंदकुमार घोडेले, महापौर

ही घटना घडली तेव्हा मी मी शहरात नव्हतो. झालेल्या घटनेचे दुःख आहे मात्र, टँकरच्या नियमांचे उल्लंघन कसे होते याचा हा पुरावा आहे. टँकरचालक बेकदारपणे टँकर चालवतात. याकडे महापालिका अधिकारी लक्ष देत नाहीत. चालकाकडे परवाना नसतो किंवा अल्पवयीन चालक हमखास दिसतात. येथे नळयोजना आवश्यक आहे. सोबतच वाहतूक नियमांचे पालन झाले पाहिजे यासाठी पालिकेचे स्वतंत्र हेल्पलाइन असावी.

प्रमोद राठोड, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकीच्या डिक्कीतून एक लाख ६५ हजार लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

मोटार सायकलच्या डिक्कीमधून चोरट्यांनी एक लाख ६५ हजार रुपये असलेली बॅग शुक्रवारी लंपास केली. ही घटना शहरातील दुय्यम निंबधक कार्यालयासमोर घडली.

तालुक्यातील रोटेगाव येथील रणजीतसिंग चंदनसिंग राजपूत यांनी शेत जमीन विकली असून त्याची नोंदणी करण्यासाठी ते शुक्रवारी मुलगा सम्राट व मुलगी कीर्ती यांच्यासह दुय्यम निंबधक कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी बँकेतून एक लाख ६५ हजार रुपये रक्कम काढली. ही रक्कम त्यांनी मोटार सायकलच्या डिक्कीत ठेवली होती. डिक्कीला कुलूप लाऊन मोटारसायकल कार्यालयासमोर उभी केली. मुलगी कीर्तीला त्यांनी मोटार सायकलजवळ उभे केले व ते मुलासह कार्यालयात गेले. त्यावेळी एक युवक मुली जवळ आला व त्याने तुम्हाला आत बोलावले आहे, अशी थाप मारली. कीर्ती या कार्यालयात निघाल्या असतानाच त्याने लगेच डिक्की तोडून बॅग बाहेर काढली. कीर्ती यांनी चोरास बघून आरडाओरड केली, मात्र दोन मोटारसायकलवर तीन चोरटे पिशवी घेऊन पळून गेले. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरतनाट्यम अरंगेत्रम रंगले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मल्लारी शिवस्तुती' व 'वर्णम'च्या बहारदार सादरीकरणाने अरंगेत्रम विशेष रंगले. आरुषी शिंदे व सिद्धी तोरणाळे यांनी भरतनाट्यमचे पारंपरिक दर्शन घडवत रसिकांची दाद मिळवली.

देवमुद्रा संस्थेच्या व्ही. सौम्यश्री यांच्या शिष्या आरूषी शिंदे व सिद्धी तोरणाळे यांचे भरतनाट्यम अरंगेत्रम सादर झाले. तापडिया नाट्यमंदिरात बुधवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी तंजावरचे संस्थानचे प्रतापसिंह सरफोजीराजे भोसले, राज्यलक्ष्मी सेठ, रामदास पवार, दिलीप घारे, शशिकांत बऱ्हाणपूरकर, जयंत शेवतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 'मार्गम पुष्पांजली'ने सुरुवात झाली. त्यानंतर मल्लारी शिवस्तुती, छ. शिवाजी महाराजांवर आधारीत तीस मिनिटांचा 'वर्णम' सादर करण्यात आला. या सादरीकरणाला रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. शिवकल्याण राजा व अभंग सादरीकरण उत्कटतेने सादर करण्यात आले. अखेरच्या भागात सिद्धीने महिषासुरमर्दिनी व जावली आणि आरुषीने भोशंभो व अष्टपदी एकल नृत्य सादर केले. तिल्लाना व मंगलमद्वारे नटराज, गुरुवर्य, गायक, वाद्यवृंद व प्रेक्षकांचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाला रसिकांची लक्षणीय उपस्थित होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका उभारणार मिटमिट्यात पाच हजार घरकुले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे प्रकल्पाचा पहिला टप्पा हाती घेण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. खासगी विकासकांकडून पडेगाव परिसरात मिटमिटा येथील शासकीय जागेवर ५० एकरात पाच हजार घरांचा हा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यातून गरीब लाभार्थींना घरांचे वाटप केले जाणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया तत्काळ राबविण्याचे आदेश राज्याच्या गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव संजय कुमार यांनी महापालिकेला दिले.

स्मार्ट सिटी योजना राबविण्यासाठी मेंटॉर म्हणून राज्याच्या गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव संजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी गुरुवारी स्मार्ट सिटी योजनेतील प्रस्तावित विविध प्रकल्पांच्या कामाचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. या बैठकीत पंतप्रधान आवास योजनेतील सर्वांसाठी घरे प्रकल्पाबाबतही चर्चा झाली. यावेळी त्यांनी या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यास मंजुरी दिली. ज्यांना स्वतःचे घर नाही आणि ज्यांचे उत्पन्न हे तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारने २०१५ मध्ये ही योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत प्रती लाभार्थी अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. पडेगाव-मिटमिटाप्रमाणेच शहराभोवती सातारा-देवळाई, चिकलठाणा, नारेगाव, हर्सूल, जटवाडा, कांचनवाडी, भावसिंगपुरा आदी शहराभोवतीच्या विविध भागात प्रत्येकी पाच-पाच हजारांचे दहा प्रकल्प आगामी काळात हाती घेतले जाणार आहे. पडेगाव प्रकल्पांतर्गत ५० एकरात पाच हजार घरे विकासकाकडून बांधली जातील. त्यातील अडीच हजार घरे ही विकासकाला स्वतः विकून त्यातून नफा कमवता येईल मात्र, याही घरांची किंमत ९ लाख ८० हजार रुपयांपेक्षा जास्त असणार नाही, अशी अट पालिकेची आहे. उर्वरित अडीच हजार घरे मनपा विकासकाडून घेऊन ती लाभार्थींना मोफत वाटप करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच फ्लोटिंग पंपांची दुरुस्ती पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी येथील पालिकेच्या पंपगृहासाठी पाणी उपसा करण्याकरिता बसविलेल्या आपतकालीन सहा फ्लोटिंग पंपापैकी पाच पंप वारंवार ट्रिप होत असल्याने फारोळा येथील पाणी पुरवठा वारंवार खंडित होत होता. दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर पालिका अभियंत्यांनी पाणी पुरवठ्यातील तांत्रिक दोष शोधून दुरुस्ती केल्याची माहिती कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी दिली.

दुष्काळी परिस्थितीमुळे जायकवाडीच्या मृतसाठ्यातून पाणीउपसा करण्यात येत असल्याने शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० एमएलडीची घट झाली आहे. प्रामुख्याने सिडको-हडको भागातील पाणीपुरवठा सर्वाधिक विस्कळीत झाला आहे.

दोन दिवसांपूर्वी जायकवाडी धरणावरील पंपगृहाच्या तारेवर वीज कोसळल्यामुळे साडेतीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या दुरुस्तीनंतर वीज पुरवठा सुरुळीत झाला, परंतु शहराचा पुरवठा एक दिवसाने पुढे गेला. दरम्यान यानंतर धरणावरील सहापैकी पाच आपतकालीन फ्लोटिंग पंप ट्रीप होऊन बंद पडत होते. परिणामी, कर्मचाऱ्यांना हे पंप सुरू करावे लागत होते. दिवसभरातून वारंवार हा प्रकार होत असल्यामुळे पाण्याचा दाब कमी होत असे. धरणावरील पाचही इर्मजन्सी पंपाच्या सर्व पाँइंट, व्हॉलची तपासणी केल्यानंतर अभियंत्यांना तांत्रिक बिघाड समजला. त्याची दुरुस्ती पूर्ण होताच पाचही पंप पुन्हा त्याच गतीने सुरू झाले आहेत.

\Bदहा एमएलडीची घट \B

पाण्याची तूट भरून काढण्यासाठी महापालिकेने जायवाडीच्या कॅनॉलमध्ये सहा फ्लोटिंग पंप लावले. मात्र, दोन दिवसांपूर्वी विजेची तांत्रिक अडचण निर्माण झाली होती, त्याच दिवशी वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर दोन फ्लोटिंग पंपाच्या विद्युत मोटारी जळाल्या. तसेच इतर पंपाच्या पॅनलमध्येही बिघाड झाल्याने पाच पंप बंद पडले होते. कॅनॉलमधून उपसा कमी झाल्याने शहराचा पुरवठा दहा एमएलडीने घटला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रकल्पास पर्यायी वीजजोडणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पास महावितरणने बुधवारी युद्धपातळीवर काम करून पर्यायी वाहिनीतून वीजजोडणी करून दिली. या कामाला तीन आठवडे लागले असते, अशी माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली. गुरुवारी सकाळी साडेसात वाजता या प्रकल्पाचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी एक्स्प्रेस फिडरवरून ६०० केव्हीए क्षमतेच्या वीजजोडणीसाठी महापालिकेने मार्चमध्ये महावितरणकडे पैसे भरले. दरम्यान, लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागल्याने निविदा प्रक्रिया राबवता आली नाही. महावितरणने निविदा काढण्यासाठी खास बाब म्हणून विभागीय आयुक्तांकडे परवानगी मागितली. त्यांनंतर निविदा काढून रेनबो इलेक्ट्रिकल्सला कार्यादेश देण्यात आले. एक्स्प्रेस फिडरचे काम करायला महिना लागला असता, पण ६ जून रोजी कचरा प्रक्रिया प्रकल्पाची चाचणी घेण्याचे पालिकेने नि‍श्चित केले होते. कचरा समस्येचे ज्वलंत स्वरूप लक्षात घेऊन महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी स्वत: पालिका अधिकाऱ्यांसह स्थळ पाहणी करून एक्स्प्रेस फिडर होईपर्यंत पर्यायी विद्युतवाहिनीतून वीज देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी नवीन १० विद्युत खांब टाकण्याचे नियोजन करण्यात आले. टेस्टिंगचे उपकार्यकारी अभियंता अविनाश सानप व त्यांचे सहकारी, विमानतळचे शाखा अभियंता शरद ढाकणे व कर्मचाऱ्यांनी या कामासाठी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images