Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

घाटीत आहार आरोग्याचा नवीन अभ्यासक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुपोषणापासून ते स्थुलत्वापर्यंत आरोग्यापासून ते आहारापर्यंतचे प्रश्न हाताळत आरोग्य क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची निर्मिती करणारा 'मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ (न्युट्रिशन)' हा पदव्युत्तर अभ्यासक्रम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) सुरू झाला आहे. राज्यातील सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या अभ्यासक्रमाचे १२० जागा निर्माण झाल्या असून, घाटीच्या वाट्याला २० जागा उपलब्ध झाल्या आहेत. या अभ्यासक्रमाचे औपचारिक उद्घाटन सोमवारी (२४ जून) झाले.

घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते या अभ्यासक्रमाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी ज्या विभागाअंतर्गत हा अभ्यासक्रम सुरू झाला त्या जनवैद्यकशास्त्र (पीएसएम) विभागाचे प्रमुख डॉ. मोहन डोईबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, डॉ. रेषाकिरण शेंडे, डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य, डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. प्रभा खैरे, अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. विनोद मुंदडा, डॉ. तृप्ती गुजराती, डॉ. वैजयंती हरदास, डॉ. विजय कल्याणकर आदींची उपस्थिती होती. हा अभ्यासक्रम नाशिकच्या 'महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा'शी संलग्न असून, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग (मुंबई) आणि युनिसेफच्या सहभागातून हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. घाटीत हा अभ्यासक्रम २०१९-२० या वर्षापासून सुरु करण्यात आला आहे. या संदर्भात जनवैद्यकशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. डोईबळे हे 'मटा'शी बोलताना म्हणाले, राज्यातील अनेक भागात गंभीर कुपोषण आहे, तर संपूर्ण शहरी भागात स्थुलत्वाची समस्या ही अगदी लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्रास दिसून येत आहे. पारंपरिक खाद्यसंस्कृती बिघडली असून, त्याची जागा जंक फुड, फास्ट फुडने घेतली आहे आणि त्यामुळेच आजारांची मालिका सुरू झाली आहे. नेमकी हीच गरज ओळखून आहारातून आरोग्याचे महत्त्व पटवून देत थेट समाजामध्ये जाऊन कुणाचा आहार नेमका कसा, किती हवा, हे शास्त्रीयदृष्ट्या सांगत आहार आरोग्य क्षेत्रात संशोधन करणाऱ्या मनुष्यबळाची निर्मिती या अभ्यासक्रमातून होणार आहे.

\B'आरोग्य विज्ञान'चा पदवीधर पात्र

\Bनाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा कोणताही पदवीधर या अभ्यासक्रमासाठी पात्र आहे. दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी घाटीमध्ये २० जागा आहेत आणि त्यापैकी १७ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या अभ्यासक्रमाचे चार सेमीस्टर असतील व या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया डीएमईआर पातळीवरुन होणार आहे. वेगवेगळ्या सरकारी रुग्णालयांमध्येही यापुढच्या काळात हे कुशल मनुष्यबळ कार्यरत होईल, असेही सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मसाप’चे ग्रंथ पुरस्कार जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा साहित्य परिषदेचे २०१८ यावर्षीचे ग्रंथ पुरस्कार डॉ. एस. बी. वराडे, दत्ता घोलप, सुचिता खल्लाळ, अनिल कुलकर्णी, किरण गुरव आणि प्रेमानंद गज्वी यांना जाहीर झाले आहेत. येत्या २१ जुलै रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

२०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या दर्जेदार साहित्यकृतींना मराठवाडा साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. 'पहिल्या सरीचा मृदगंध' या आत्मचरित्रासाठी डॉ. एस. बी. वराडे यांना 'नरहर कुरुंदकर वाङ्मय' पुरस्कार जाहीर झाला आहे. वराडे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मृद संशोधक आहेत. 'मराठी कादंबरी - आशय आणि आविष्कार' या ग्रंथासाठी डॉ. दत्ता घोलप यांना म. भि. चिटणीस पुरस्कार जाहीर झाला आहे. कथात्म वाङ्मय समीक्षेतील घोलप उदयोन्मुख समीक्षक आहेत. 'प्रलयानंतरची तळटीप' कवितासंग्रहासाठी सुचिता खल्लाळ यांना कुसुमावती देशमुख काव्यपुरस्कार जाहीर झाला आहे. कथाकार किरण गुरव यांच्या 'जुगाड' कादंबरीला बी. रघुनाथ वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे. गुरव यांचे तीन कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. प्रेमानंद गज्वी यांना 'छावणी' नाटकासाठी कुमार देशमुख नाट्यपुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ग्रंथ व्यवहारात लक्षणीय कामगिरी केलेल्या व्यक्तीला दिला जाणारा रा. ज. देशमुख स्मृती पुरस्कार अनुबंध प्रकाशन संस्थेचे अनिल कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रसिद्ध समीक्षक डॉ. वसंत पाटणकर यांच्या हस्ते येत्या २१ जुलै रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, असे 'मसाप'चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, प्रा. किरण सगर, डॉ. दादा गोरे व डॉ. कैलास इंगळे यांनी कळविले आहे. ग्रंथ पुरस्कार निवडीचे काम प्रा. शेषराव मोहिते, डॉ. सुरेश सावंत, डॉ. जयद्रथ जाधव, डॉ. संगीता मोरे व डॉ. ज्ञानदेव राऊत यांनी केले. रा. ज. देशमुख पुरस्कार निवडीचे काम प्रकाशक कुंडलिक अतकरे, डॉ. ऋषीकेश कांबळे व संतोष तांबे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शो रूम डिलर्सची नवीन वाहने आरटीओ कार्यालयात होणार पास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

शहरातील वाहन विक्रेत्यांकडून विक्री होणाऱ्या नवीन वाहनांची पासिंग 'करोडी' येथे न करता, औरंगाबाद आरटीओ कार्यालयात दुपारी ४ ते ६ या वेळेत करण्याचा निर्णय असोसीएशन आणि आरटीओ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, वाळूज येथील शो रूम मध्ये विक्री होणाऱ्या वाहनांची पासिंग करोडी येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

औरंगाबाद शहरातील वाहन विक्री करणाऱ्या शो रूम चालकांसाठी नवीन वाहनांची पासिंग करोडी येथे करावी, असे आदेश आरटीओ औरंगाबाद यांच्याकडून शुक्रवारी (२१ जून) काढण्यात आले होते. याबाबत चेंबर्स ऑफ मोटार व्हेईकल डिलर्स असोसीएशनचे अध्यक्ष राहुल पगारिया, हेमंत खिवंसरा, माजी अध्यक्ष मनीष धूत, योगेंद्र जैन, राहुल मिश्रीकोटकर, दिनेश गांधी, शेख इमरान यांच्यासह अन्य शो रूम चालकांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांच्याशी भेट घेतली. या भेटीत असोसीएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शोरूम मध्ये विकलेल्या गाड्या शोरूम ते करोडीपर्यंत नेण्यासाठी अडचणी येणार आहेत. यामुळे गाड्यांचे नुकसान झाल्यास ग्राहक गाडी घेतील का? असा प्रश्न उपस्थितीत केला.

शहरात दर महिन्याला पाच हजार गाड्यांची विक्री होत असते. पाच हजार गाड्या करोडीपर्यंत नेण्यासाठी शोरूम चालकांकडे मनुष्यबळ नाही. तसेच करोडीपर्यंत गाड्या नेणे शोरूमचालकांना जमणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या विषयावर सदर निर्णय हा कमी मनुष्यबळ असल्यामुळे घेण्यात आला आहे. मनुष्यबळ उपलब्ध असताना, शोरूममध्ये गाड्यांची पाहणी केली जात होती. आता मनुष्यबळ नसल्याने ही पाहणी होत नाही. शिवाय शोरूमच्या गाड्या पासिंगसाठी मोटार वाहन निरीक्षकांना पाच ते सहा तास घालवावे लागत आहेत. यामुळे करोडी येथे पासिंगचा निर्णय घ्यावा लागला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी दिली.

वाहन विक्रेत्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद ते करोडी नॉन रजिस्ट्रेशन गाड्यांची वाहतूक शक्य नाही. यामुळे वाहन विक्री करताना ग्राहकांना सात दिवसांची टेम्पपरी पासिंग देण्यात यावी. या सात दिवसात शोरूम चालकांकडून या गाड्यांची पासिंग करून घेण्यात यावी अशीही चर्चा करण्यात आली. या विषयावर आरटीओ सतीश सदामते यांनी वाहन विक्रेत्यांची अडचण लक्षात घेता मंगळवार (२५ जून) पासून शहरातील नवीन वाहन विक्रेत्यांनी दुपारी ४ ते ६ या काळात औरंगाबाद आरटीओ कार्यालयात नवीन वाहने घेऊन यावीत. आरटीओ कार्यालयात या वाहनांची पासिंग केली जाईल. मात्र, वाळूज येथील शोरूम चालकांनी त्यांची वाहने करोडीतच पासिंग करावीत असा निर्णय घेण्यात आला आहे.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमान कंपन्यांसाठी इंधनावरील ‘व्हॅट’ माफ करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातून विमान सेवा वाढविण्यासाठी विमान कंपन्यांना आकर्षित करण्याची गरज आहे. यासाठी एअर फ्युएलवर असलेला पाच टक्के व्हॅट कमी करावा. या मागणीसाठी मराठवाडा विकास मंडळाच्या पदाधिकारी, उद्योजक आणि टूर्स ऑपरेटर यांच्या माध्यातून मुंबईत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन एटीआर एअर फ्युएलवरील मुल्यवर्धित कर (व्हॅट) माफ करावा यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय विमान विस्तारीकरणाबाबत मराठवाडा विकास मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

मराठवाडा विकास मंडळाच्या सभागृहात विमान विस्तारीकरणाबाबत सोमवारी (२४ जून) बैठक घेण्यात आली. यावेळी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक डी. जी. साळवे यांच्यासह सीएमआयचे अध्यक्ष राम भोगले, उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. या बैठकीत औरंगाबाद विमानतळावरून सध्या उपलब्ध असलेल्या विमान सेवासह विस्तारीकरणाच्या अडचणीबाबतची चर्चा करण्यात आली. उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी एका सादरीकरणातून विमान सेवा विस्तारीकरणाची गरज ही आकडेवारीतून मांडली. अध्यक्ष राम भोगले यांनी विस्तारीकरणासाठी पर्यटन उद्योजकांकडून प्रयत्न केले जात आहेत. विस्तारीकरणासाठी उद्योजक, हॉटेल व्यवसायिक, टूर्स ऑपरेटर यांचे संयुक्त प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.

विमानतळ संचालक साळवे यांनी विमान कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी 'व्हॅट'बाबत निर्णय घेण्याबाबत उपस्थितांना सुचविले. यावेळी मध्य प्रदेश आणि अन्य काही राज्यात महत्त्वाच्या विमान सेवेच्या विस्तारीकरणासाठी फ्युएल व्हॅट कमी केल्याची माहिती देण्यात आली. सध्या पाच टक्के एअर फ्युएल व्हॅट चार्जेस आकारण्यात येत आहे. व्हॅट शून्य करण्यासाठी २६ जून रोजी राज्याचे अर्थमंत्र्यांशी २६ जून रोजी भेटून याबाबत चर्चा करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे दोन ते तीन कोटी रुपयांचा महसूल कमी होण्याची शक्यता आहे.

……औरंगाबाद विमानतळावरून विमान सेवा वाढविण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच विस्तारा, स्पाइस जेट, इंडिगो यासह अन्य विमान कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत बैठक घेण्याचाही निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका करणार सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणी पुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी महापालिकेला उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे केली होती. प्राधिकरणाचे अधिकारी देणे शक्य नाही, प्राधिकरणाच्या सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी पालिकेच्या सेवेत मानधनतत्त्वावर घ्या, अशी सूचना लोणीकर यांनी केली आहे. त्यानुसार निवृत्त अधिकारी पालिकेच्या सेवेत घेण्याची जबाबदारी शहर अभियंता सखाराम पानझडे व उपायुक्त मंजुषा मुथा यांच्यावर देण्यात आली आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. सहा निवृत्त अधिकारी पालिकेच्या सेवेत घ्यायचे आहेत, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. शंकर अंभोरे यांचे सदस्यत्व रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. शंकर अंभोरे यांचे सदस्यत्व कुलपतींनी रद्द केले. व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीतील मनमानीवर प्रा. विलास खंदारे यांनी आक्षेप घेतला होता. या निकालामुळे नियमबाह्य नियुक्त्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे.

राज्यपाल कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या व्यवस्थापन परिषदेवरील नियमबाह्य नियुक्तीचे प्रकरण अखेर निकाली निघाले आहे. त्यानुसार डॉ. शंकर अंभोरे यांचे व्यवस्थापन परिषद सदस्यत्व राज्यपालांनी रद्द केले आहे. याबाबत प्रा. विलास खंदारे यांनी राज्यपालांकडे अपील केले होते. विद्यापीठाच्या प्राध्यापकांमधून प्रा. विलास खंदारे निवडून आलेले विद्या परिषदेचे सदस्य आहेत. जून २०१८ मध्ये विद्या परिषदेतून व्यवस्थापन परिषद सदस्य निवडण्यासाठी निवडणूक झाली होती. डॉ. विलास खंदारे व डॉ. शंकर अंभोरे यांच्यासह चार उमेदवारांनी निवडणूक लढवली. प्रा. खंदारे यांनी अंभोरे यांच्या नामनिर्देशनास आक्षेप घेतला होता. व्यवस्थापन परिषद सदस्यत्वाची निवडणूक विद्यापीठ कायदा कलम ३० (४१) नुसार फक्त विद्या परिषदेवर प्रत्यक्ष निवडून आलेले सदस्यच लढवू शकतात, असा खंदारे यांचा दावा होता. डॉ. अंभोरे अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असल्यामुळे ते विद्या परिषदेचे सदस्य आहेत. ते निवडून आलेले सदस्य नाहीत. तसेच विद्यापीठ कायदा ३२ (३) नुसार निवडून आलेल्या सदस्यांबाबत स्पष्ट तरतूद आहे. प्रा. अंभोरे कलम ४० नुसार अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आलेले असले तरी ते कलम ३० अंतर्गत विद्या परिषदेवर निवडून आलेले नाहीत. प्रा. खंदारे यांनी हा आक्षेप निवडणुकीत घेतला होता. मात्र, कुलसचिव डॉ. साधना पांडे आणि कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सबळ कारणाशिवाय आक्षेप फेटाळला होता. त्यामुळे खंदारे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने खंदारे यांना कलम १४० अंतर्गत कुलपती (राज्यपाल) यांच्याकडे दाद मागण्याचे आदेश दिले होते. प्रा. खंदारे यांनी अपील दाखल केल्यानंतर कुलपती यांनी १८ मार्च रोजी सुनावणी घेतली. तसेच २० जून रोजी खंदारे यांचा आक्षेप मान्य करुन प्रा. शंकर अंभोरे यांचे नामनिर्देशन व व्यवस्थापन परिषदेची निवडणूक अवैध ठरवली. तसेच अंभोरे यांचे व्यवस्थापन परिषद सदस्यत्व रद्द केले.

दरम्यान, अंभोरे यांच्या अभ्यास मंडळ सदस्यत्व व अध्यक्ष पदाबाबत डॉ. खंदारे यांनी कुलपती यांच्याकडे अपील करण्यात आले आहे. तसेच उच्च न्यायालयात अवमान याचिका प्रलंबित आहे. खंदारे यांच्या वतीने अॅड. शंभूराजे देशमुख यांनी बाजू मांडली.

कुलसचिवांना धक्का

प्रा. खंदारे यांच्या आक्षेपाला फेटाळल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने याचिकेवर प्रचंड खर्च केला. कायद्याच्या अभ्यासक कुलसचिव डॉ. साधना पांडे यांच्यासाठी राज्यपालांनी दिलेला निकाल धक्कादायक ठरला आहे.

अभ्यास मंडळावर नियमबाह्य नियुक्त्या केल्याचा आरोप तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, कुलसचिव डॉ. साधना पांडे यांच्यावर करण्यात आला होता. अंभोरे यांचे सदस्यत्व रद्द झाल्यामुळे नियमबाह्य नियुक्त्यांवर चर्चा सुरू झाली आहे.

एखाद्या व्यक्तीला पाठिशी घालण्यासाठी कुलसचिव आणि कुलगुरू कायद्याची किती पायमल्ली करू शकता याचे हे उत्तम उदाहरण आहे. मनमानी पद्धतीने निवडणूक घेऊन कुलसचिवांनी लोकशाहीचा गळा घोटला. या प्रकरणात विद्यापीठाने केलेला खर्च कुलसचिवांच्या वेतनातून वसूल करावा, अशी मागणी करणार आहे.

डॉ. विलास खंदारे, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी प्रवेश: बायोफोकल रिक्त राहण्याची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकरावी प्रवेश प्रक्रियेत अर्ज-१, अर्ज-२ भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर द्विलक्षी विषय, एचएसव्हीसी शाखेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया संपली. बायफोकलमध्ये औरंगाबादमध्ये २६०१ जागांवरील प्रवेश रिक्त राहण्याची शक्यता आहे. शहरात केवळ १३७२ विद्यार्थ्यांनी बायफोकल विषय घेतला. सहा शहरांमध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तीन लाख ९२ हजार ६१ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

राज्यातील सहा शहरांमध्ये अकरावी प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होते आहे. एक जूनपासून प्रक्रिया सुरू झाली असली तरी, आठ जून रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला. निकालात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. त्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेत इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या समकक्ष आणण्यासाठीची प्रक्रिया निश्चित होवू शकली नाही. त्यात प्रक्रिया काही दिवस अडकली. हा तिढा सुटल्यानंतर १९ जूननंतर प्रक्रियेला गती आली. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत भाग-१, भाग-२ भरणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या तीन लाखांपेक्षा अधिक आहे. भाग-१मध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तीन लाख ९२ हजार ६१ एवढी आहे. भाग-२ प्रक्रिया पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तीन लाख १७ हजार ८८२ एवढी आहे. बायफोकलला प्रवेश घेण्यासाठीची मुदत संपली. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित आहे.

\Bबायफोकलच्या निम्म्यापेक्षा अधिक जागा रिक्त\B

बायफोकलसाठी अर्ज करण्याची मुदत रविवारपर्यंत होती. औरंगाबादमध्ये बायफोकलला तीन हजार ९७३ एवढ्या जागा आहेत. १९ ते २३ जूनपर्यंत बायफोकलसाठी १३७२ विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविली आहे. २६०१ जागा रिक्त आहेत. प्रक्रिया लांबल्याने निम्म्या जागांपेक्षा अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

\Bऔरंगाबादमध्ये अर्ज भाग-१ची स्थिती..\B

नोंदणी.... १७३६७

अर्ज निश्चिती.. १५९०७

\Bअर्ज भाग-२ची स्थिती..\B

प्रक्रिया पूर्ण.............१२४५९

बायफोकल.............१३७२

केंद्रीय पर्यायी विषय...........१२२०१

\Bराज्यातील स्थिती...\B

ऑनलाइन भाग-१ नोंदणी...३९२०६१

भाग-१ अर्ज निश्चिती.........३७०८३५

..

भाग-२ प्रक्रिया पूर्ण...३१७८८२

बायफोकल.............२६८९०

केंद्रीय पर्यायी विषय...३१३२३६

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांजणगाव येथून विद्यार्थ्यांचे अपहरण

$
0
0

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथून १५ वर्षांच्या विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याची घटना शनिवारी (२२ जून) दुपारी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली. चैतन्य अशोक पवार (१५, रा. गेंदायीनगर, रांजणगाव शेणपुंजी, ता. गंगापूर) असे अपहरण केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो दहावीत नापास झाला होता. यामुळे त्याचे वडील त्याला,'तू दहावीत दोन विषयांत नापास झाला आहेस. आता तरी अभ्यास कर,' असे सांगत असताना तो,'बाहेर जाऊन येतो,' असे म्हणत निगून गेला. यासंदर्भात राजकन्या अशोक पवार यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हवलदार देवरे हे करत आहेत.

बजाजनगरात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

वाळूज महानगर : बजाजनगर येथे एका ३० वर्षांच्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. प्रितीलता अशोक सरकार (३० रा. जयभवानी चौक, बजाजनगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच सहायक फौजदार आर. डी. वडगावकर, पोलिस हवालदार दशरथ खोसरे, सोनाजी बुट्टे आदींनी घटनास्थळी जाऊन सरकार याना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. प्रितीलता सरकार यांनी आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस नाईक चंद्रकांत सोनवणे हे करत आहेत.

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीत अज्ञात वाहनाने एका दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात २८ वर्षांच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास वाळूज एमआयडीसीतील स्टरलाइट कंपनीसमोर घडला. प्रमोद बाबुसिंह राठोड (२८, रा. बकवालनगर, वाळूज, मूळ रा. रुपनाईक तांडा, ता. माहूर जि. नांदेड) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचा नाव असून, ते त्यांच्या भावासोबत येथे राहत होता. ते रांजणगाव शेणपुंजीकडून वाळूजकडे जात असताना रात्री दहाच्या सुमारास स्टरलाइट कंपनीसमोर मुख्य रस्त्यावर पुलाचे काम सुरू असल्याने तेथे खोदकाम केले आहे. याचा अंदाज न आल्याने दुचाकीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली या अपघातात प्रमोद याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी आकाश पवार व सपना संजय राठोड यांनी जखमी अवस्थेत उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यावेळी उपचार सुरू असताना प्रमोद याचा रात्री एकच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस हवालदार सुखदेव भागडे हे करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बँकेने पुरवली गुन्हे शाखेला कागदपत्रे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनिवासी भारतीयाची आठ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उद्योजक सोमनाथ साखरे यांच्याविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अमरप्रीत चौकातील बँक ऑफ इंडियात हा प्रकार घडला होता. गुन्हे शाखा याप्रकरणी तपास करीत आहेत. या प्रकरणात बँक ऑफ इंडियाकडून पोलिसांनी तपासासाठी दस्ताऐवज मागवले आहेत. हस्ताक्षर तज्ज्ञांच्या मदतीने सह्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

याप्रकरणी जयेश हसमुख शहा (रा. हरारे, झिंबाबे, सध्या रा. सांताक्रुझ) यांनी तक्रार दाखल केली आहे. शहा हे अलमश ग्लोबल लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. शहांनी २००८मध्ये सोमनाथ साखरे यांच्या कंपनीला दहा कोटीचे कर्ज दिले होते. यातील काही रक्कम त्यांनी अमरप्रीत चौकातील येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शहा यांच्या नावाने फिक्स डिपॉझिट करण्याबाबत सांगितले होते. ही रक्कम डिपॉझिट केल्यानंतर त्याची पावती देखील शहा यांच्या नावावर आहे. दरम्यान, साखरे यांनी शहा यांच्या नावाने बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बनावट खाते उघडून आठ कोटींची रक्कम परस्पर काढल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत करीत आहेत. शहा यांच्या दोन वेगवेगळ्या सह्या असताना बँकेने खाते कसे उघडले याचा तपास करण्यात येत आहे. यापैकी एक सही बनावट असल्याचा पोलिसांना संशय आहे. यासंदर्भात गुन्हे शाखेने बँकेला पत्र पाठवत तपासासाठी या खात्यांची कागदपत्रे पुरवण्याच्या सूचना केल्या होत्या. बँकेने ही कागदपत्रे गुन्हे शाखेला पुरवली आहेत. या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. खरी सही आणि बनावट सही तपासण्यासाठी शहा यांच्या सह्यांचे नमुने हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.

\Bसाखरे यांची दोन वेळा चौकशी\B

या गुन्ह्यात संशयित आरोपी असलेले सोमनाथ साखरे यांना चौकशीसाठी गुन्हे शाखेने बोलावले होते. साखरे यांनी दोन वेळा गुन्हे शाखेत हजेरी लावली असून त्यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा पावसाकडे डोळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दोन दिवस जोरदार कोसळलेल्या पावसाने सोमवारी दडी मारली. मराठवाड्यात पाऊस सहा दिवसानंतर सक्रिय होईल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. विभागातील सात महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून, इतर ठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे.

मराठवाड्यात गेल्या तीन दिवसांपासून समाधानकारक पाऊस सुरू आहे. दीर्घकाळ विश्रांती घेतलेल्या पावसाचे दमदार आगमन सुखावणारे ठरले आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात रविवारी (२३ जून) पावसाने दमदार हजेरी लावली. फुलंब्री तालुक्यात सर्वाधिक ८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. औरंगाबाद (५२.७० मिमी), पैठण (२३.४० मिमी), सिल्लोड (१६.७५ मिमी), सोयगाव (२१.३३ मिलीमीटर), वैजापूर (४१.९०), गंगापूर (३१.११), कन्नड (१३.३८) आणि खुलताबाद (२५.६७ मिलीमीटर) या तालुक्यांत पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात रविवारी सरासरी ३४.३६ मिलीमीटर पाऊस झाला. पावसाचा जोर सोमवारी सकाळपर्यंत कायम राहिला. खुलताबाद, गंगापूर तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे खुलताबाद व फुलंब्री तालुक्यातील तलावात पाणीसाठा झाला आहे. फुलमस्ता, गिरिजा नदीला पूर आला असून पावसाचा जोर वाढला आहे. सिल्लोड, कन्नड तालुक्यात तुलनेने कमी पाऊस झाला. पुरेसा पाऊस झालेल्या भागात पेरणीयोग्य वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे काही दिवसात शेतकरी पेरणीला सुरुवात करणार आहेत. अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या वायू वादळामुळे लांबलेला मान्सून लांबणीवर पडला होता. त्यामुळे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले होते. रोहिण्या आणि पूर्वमोसमी पाऊसही झालेला नाही. हवामान विभागाच्या सरासरीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६७५.४६ मिमी पाऊस होणे अपेक्षित होते. अर्धा जून संपल्यानंतरही सरासरीच्या फक्त १०५.१४ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. पावसात सहा दिवस खंड पडणार असल्याचे हवामान अभ्यासक डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

\Bअतिवृष्टीची नोंद\B

मराठवाड्यातील अनेक भागात रात्रभर पाऊस कोसळत होता. सोमवारी सकाळी साडेआठपर्यंत विभागातील सात महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या मंडळात सेलू (जि. परभणी), केज, होळ, हनुमंत पिंपरी (जि. बीड), उदगीर (जि. लातूर) आणि जळकोट, वाशी (जि. उस्मानाबाद) यांचा समावेश आहे. वाशी मंडळात सर्वाधिक ११४ मिलिमीटर पाऊस झाला. उदगीर महसूल मंडळात ८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुल्कवाढीविरोधात पालक रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पालकांना पूर्वकल्पना न देता लिटल फ्लावर इंग्रजी शाळेने शुल्क वाढविल्याने पालकांनी सोमवारी शाळेत धाव घेतली. शाळा प्रशासनाविरोधात एकत्र येत पालकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.

पालकांना विश्वासात न घेता शाळांकडून शुल्कवाढीचे प्रकार समोर येत आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू होताच शाळांच्या या प्रकाराविरोधात पालकांनी नाराज व्यक्त केली आहे. लिटल फ्लावर इंग्रजी शाळेनेही विश्वासात न घेता शुल्कवाढ केल्याचा पालकांनी आरोप केला. दरमहा सुमारे साडेचारशे रुपयांची वाढ केल्याचे पालकांनी सांगितले. शुल्कवाढ झाल्याचे समजताच पालकांनी सोमवारी शाळेत धाव घेतली. पालकांनी एकत्र येऊन शाळा प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावरून काहीवेळ शाळेत तणाव निर्माण झाला होता. वाढीव शुल्कामुळे वर्षाला एका विद्यार्थ्यामागे पाच हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागेल, असे पालकांनी सांगितले. शाळा प्रशासनाने मनमानी करू नये, पालकांना विश्वासात न घेता शुल्कवाढ करू नये, वाढविलेली शुल्कवाढ रद्द करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. याबाबत निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करू, असा इशारा शाळा प्रशासनाला देण्यात आला आहे. याबाबत शाळा प्रशासन पालकांना मंगळवारी याबाबत माहिती देणार असल्याचे पालकांनी सांगितले. या चर्चेनंतर शुल्कवाढ रद्द होणार नाही, तोपर्यंत भरणा करू नये, असा निर्णय पालकांनी सर्वानुमते घेतला. येत्या दोन दिवसांत पालकांची बैठक होणार आहे. यात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे पालकांनी सांगितले.

\Bशाळा नेमतात मर्जीतील शालेय समिती!\B

राज्य शिक्षण मंडळाने खासगी अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित या शाळांमध्ये शुल्कवाढीवरून निर्माण होणारे वाद संपुष्टात आणण्यासाठी शाळास्तरावर शिक्षण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अनेक शाळांचे व्यवस्थापन आपल्या मर्जीत राहणाऱ्या पालकांनाच समितीवर घेते, असे आरोप होत आहेत. अशा पालकांची समितीत निवड केली की, शुल्कवाढ करण्यास फार अडथळे येत नसल्याचा समज आहे.

शाळा शुल्कवाढीबाबत मनमानी करत आहे. पालकांना विचारात न घेता अशा प्रकारे शुल्कवाढ करणे योग्य नाही. शाळांनी पालकांच्या खर्चाचा विचार करायला हवा.

-आनंद दाभाडे, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माउलीच्या पालखीचे आपेगाव येथून प्रस्थान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

मोठ्या भक्तिमय वातावरणात रविवारी संध्याकाळी, माउलीचे जन्मस्थान असणाऱ्या आपेगाव येथून ज्ञानेश्वर माउलीच्या पालखीने आषाढी वारी महोत्सवात सामील होण्यासाठी पंढरपूरकडे प्रस्थान केले. माउलीची पालखी १८ दिवसांच्या पायी प्रवासानंतर ११ जुलैला पंढरपूर येथे पोचणार आहे.

आपेगाव येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी मंदिरातील टाळ, मृदंग, वीणा व माउलीच्या पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. उपस्थित वारकरी, गावकरी व पंचक्रोशीतील नागरिकांच्या दर्शनासाठी पालखी रथात ठेवण्यात आली. या वेळी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. संध्याकाळी सहा वाजता माउलीच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. १८ दिवसांच्या पायी प्रवासानंतर माउलीची पालखी आषाढी वारी महोत्सवात सामील होण्यासाठी ११ जुलैला पंढरपूर येथे पोचेन. पालखीचा मार्ग पुढीलप्रमाणे : बोरगाव, बोधेगाव, दराडे वस्ती, बोरगाव संस्था चकला, आर्वी, नागरेची वाडी, नालवंडी, येवले, पाटोदा, पारगाव घुमरे, जायभायेवाडी, खेर्डा, आंबी, कंडारी, परंडा, आरण मेढापूरमार्गे पंढरपूर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध दारू अड्डे गांधीगिरी करून बंद

$
0
0

वाळूज महानगर : जोगेश्वरी येथे अनेक दिवसांपासून सुरू असलेले अवैध दारू विक्रीचे अड्डे ग्रामपंचायच्या पदाधिकाऱ्यांनी गांधीगिरी करत उद्ध्वस्त केले. दारू विक्रेत्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांची जगजागृती केली.

येथे असलेले परवानाधारक देशी दारूचे दुकान येथील महिलांच्या विरोधामुळे पाच ते सहा वर्षांपूर्वी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे येथे दारू दुकानाला परवानगी देण्यात येत नाही, मात्र गावात जवळपास १५ ठिकाणी दारूची अवैध विक्री केली जाते. जवळच एमआयडीसी असल्याने कामगार महिला कामगार विद्यार्थिनी याना रस्त्यावरच सुरू असलेल्या या अड्ड्यामुळे मद्यपीचा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे येथील महिलांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेऊन २९ मे रोजी ग्रामसभेत हा विषय घेऊन दारुंबदी करण्याचा महिलांनी मांडलेला ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता. या निर्णयानंतर ग्रामपंचायतीने दारूची अवैध विक्री बंद करण्यासाठी वाळूज एमआयडीसी पोलिसांना निवेदन दिले होते मात्र, त्यावर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने व महिलांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची दारू विक्री बंद करण्यासाठी स्वत:च मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी भीमराव भालेराव, माजी सरपंच योगेश दळवी, अमोल लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पंडित पनाड, सूर्यभान काजळे, सुरेश वाघमारे, ज्ञानेश्वर कर्डिले, सुनील वाघमारे, विलास चव्हाण, सुरेश सरोदे, कर्मचारी मनोहर पारधे, अश्पाक बेग, सतीश देवकर, राहुल जोशी, भागचंद काबरा आदींनी सहभाग घेतला.

\B२०० बाटल्या जप्त\B

या मोहिमेंतर्गत पथकाने १५ ठिकाणी भेटी दिल्या. यात आठ जण दारू विक्री करताना आढळले तर, सात जण मोहिमेची माहिती मिळाल्याने कुलूप लावून पसार झाले होते. यावेळी विक्रेत्यांना समज देऊन गांधीगिरी करत दारू विक्री करू नये यासाठी जनजागृती केली. त्यांना गुलाबपुष्प दिले. या मोहिमेत जवळपास दीडशे ते दोनशे दारुच्या बाटल्या मिळून आल्या हा मुद्देमाल जप्त करून वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटी पार्कचे भाडे कमी, अंमबजावणी शून्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत असलेल्या राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान पार्कमध्ये असलेल्या गाळ्यांचे भाडे राज्य सरकारने डिसेंबर २०१८मध्ये कमी केले. मात्र, त्याच्या अंमलबजावणीची सूचना अजूनही एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी कार्यालयात पोचलेली नाही. त्यामुळे उद्योजक संभ्रमात आहेत.

औरंगाबाद येथील आयटी पार्कमधील गाळ्यांच्या भाड्यात जीवघेणी वाढ केली. सात रुपये प्रति चौरस फुटापासून ४६ रुपये दर करण्यात आला. आयटी उद्योजकांनी यावर नाराजी व्यक्त करत भाडे कमी करण्याची मागणी केली होती. वेळोवेळी उद्योगमंत्र्यांकडे मागणी केली गेली. आयटी उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ११ ऑक्टोबर २०१८ रोजी समिती स्थापन करण्यात आली. या समितीने १६ ऑक्टोबर रोजी आयटी उद्योजक आणि उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून अहवाल सादर केला. त्यानुसार २८ डिसेंबर २०१८ रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सुधारित दर मंजूर करण्यात आले. त्यानुसार, गाळ्यांचा मासिक दर २७ रुपये प्रति चौरस फूट, तर सेवा शुल्क साडे पाच रुपये प्रति चौरस फूट, असा निश्चित करण्यात आला. त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

\Bकोणाचे खरे? \B

या विषयावर विधिमंडळात आमदार सतीश चव्हाण, धनंजय मुंडे, हेमंत टकले, विक्रम काळे, अब्दुल्ला खान दुर्रानी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्या अनुषंगाने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी वरील माहिती दिली. आश्चर्य म्हणजे सुधारित दराची माहिती एमआयडीसी मुख्यालयातून अजूनही औरंगाबाद कार्यालयात मिळालेली नाही. त्यामुळे स्थानिक कार्यालय आणि आयटी उद्योजकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भराडीत दारूचे दुकान फोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दारुचे दुकान फोडून ७३ हजार रुपयांचे दारुचे ४५ बॉक्स लांबवल्याची घटना तालुक्यातील भराडी येथे सोमवारी (२४ जून) रोजी सकाळी उघडीस आली. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भराडी येथील बाजारपट्टीत असलेल्या देशी दारुच्या दुकानावर अशोक जगनाडे (रा. भराडी) कामाला आहेत. रविवारी रात्री दहा वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले व घरी गेले. रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने गावात अंधार होता. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून आत प्रवेश केला. बियरचे ४४ आणि, देशी दारुचा एक बॉक्स, ७०० रुपये रोख व सीसीटीव्हीचे डीव्हीआर असा एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला केला आहे.

सोमवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी जगनाडे आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ही माहिती तत्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार पवार करीत आहेत.

\B चोरट्यांचे पोलिसांनासमोर आव्हान

\Bभराडी मोठे बाजारपेठेचे गाव असून कृषी सेवा केंद्र, कापड दुकान, बँका अशा अनेक सुविधा आहेत. त्यात दारुचे दुकान कायम वर्दळ असणाऱ्या बाजारपट्टीच्या शेजारी आहे. तरी देखील चोरट्यांनी दारुचे दुकान फोडून ७३ हजार रुपयांचे दारुचे ४५ बॉक्स लांबवले. चोरट्यांनी दुकान फोडून एका प्रकारे पोलिसांना आव्हान दिले आहे. दरम्यान, या घटनेमुळे व्यवसायिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाथांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

हरिनामाचा जयघोष व टाळ मृदंगाच्या गजराने संपूर्णपणे भक्तिमय बनलेल्या वातावरणात सोमवारी ऐन सूर्यास्ताच्या वेळी गोदातीरावरून आषाढीवारी महोत्सवात सामील होण्यासाठी पैठण येथील संत एकनाथ महाराज यांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले.

गावातील नाथ मंदिरात सोमवारी सकाळी संत एकनाथ महाराज यांच्या पालखीला सजवून व विधिवत पूजन करून पालखीत नाथांच्या पादुका ठेवण्यात आल्या. नाथांच्या पालखीची गावातील नाथ मंदिरापासून समाधी मंदिरापर्यंत पायी मिरवणूक काढण्यात आली व समाधी मंदिरात ही पालखी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली. संध्याकाळी चार वाजता नाथांची पालखी गागाभट्ट चौकातील पालखी ओट्यावर वारकरी, भाविक व गावातील नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. ऐन सूर्यास्ताच्या वेळेस हजारो भाविक, वारकरी व पैठण शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत नाथांची पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले

दरम्यान, नाथांच्या पालखीत सहभागी होण्यासाठी रविवारपासूनच विदर्भ, खान्देश व मराठवाडा भागातील अनेक दिंड्या शहरात दाखल झाल्या होत्या. १९ दिवसांच्या प्रवासानंतर, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या भागातील १९ गावांमध्ये मुक्काम केल्यावर ११ जुलैला संत एकनाथ महाराज यांची पालखी पंढरपूरला पोचेल.

संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे मार्गक्रमण पुढीलप्रमाणे : चनकवाडी, हादगाव, लाडजळगाव, कुंडल पारगाव, मुंगुसवाडा, राक्षसभुवन, रायमोह, पाटोदा, दिघोळ, खेर्डा, दांडेगाव, अनाले, परंडा, बिटरगाव, कुर्डू, अरण, करकंब, होळे, शिरढोणमार्गे ११ जुलै रोजी संत एकनाथांची पालखी पंढरपूर येथे पोचेन. आषाढी वारीत महोत्सवात सहभागी झाल्यावर १६ जुलैपर्यंत पालखीचा मुक्काम पंढरपूरच्या नाथ मंदिरात राहील.

\Bमुक्कामाच्या गावात वृक्षारोपण\B

दरवर्षी प्रमाणे नाथवंशजाच्या दुसऱ्या पालखीही प्रस्थान सोमवारी संत एकनाथ महाराज यांच्या मुख्य पालखीच्या प्रस्थानाअगोदर झाले. नाथ वंशजाच्या दुसऱ्या पालखीचे दुपारी चारच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यावर्षी आम्ही पालखीच्या मुक्कामाच्या गावात पाच झाडे लावण्याचा व नाथांची हरित पालखी काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दुसऱ्या पालखीचे प्रमुख विनित महाराज गोसावी व छय्या महाराज गोसावी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांनी रस्ता फोडल्याची तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दोन महिन्यांपूर्वी तयार केलेला हमरापूर ते गाढेपिंपळगाव हा रस्ता शेतकऱ्यांनी फोडल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. हा रस्ता मच्छिंद्र पाटीलबा पवार व अशोक पाटीलबा पवार यांनी फोडला आहे, अशी तक्रार भाऊसाहेब विरू थोरात यांनी बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याकडे दिली आहे. पंचनामा करून दोन्ही शेतकऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा थोरात यांनी दिला आहे. वैजापूर तालुक्यातील हमरापूर ते गाढेपिंपळगाव हा रस्ता बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात येतो. मार्च महिन्यात या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले, मात्र अवघ्या दोन महिन्यांतच हा रस्ता फोडल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. याबाबत आठ दिवसांत कारवाई केली नाही तर, बेमुदत उपोषण करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी पुरवठा योजनेसाठी वीज निर्मितीचा प्रयोग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

शहराचा पाणी प्रश्न मिटविण्यासाठी मराठवाडा विकास मंडळाने पुढाकार घेतला आहे. महापालिकेला दर महिन्याला पाणी पुरवठ्यासाठी पाच कोटी रूपयांचे वीज बिल महावितरणाला द्यावे लागत आहेत. हे पाच कोटी रुपये वाचविण्यासाठी शहरच्या पाणी पुरवठा योजनेच्या नवीन पाइपलाइनमध्ये टरबाइन बसवून वीज निर्मिती करण्याचा प्रयोग राबविण्याबाबत विकास मंडळाकडून प्रयत्न सुरू आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास महापालिकेचे पाच कोटी रुपये वाचणार असून अशा पद्धतीची वीज निर्मिती करणारे देशभरातील पहिले महानगर पालिका म्हणून औरंगाबाद महानगर पालिकेला ख्याती प्राप्त होईल, अशी माहिती मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी पत्रकारांना दिली.

औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठाबाबत मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य, महापालिकेचे पदाधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच महावितरणाचे अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जायकवाडी ते शहर अशा नवीन पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. राज्यपालांनी औरंगाबाद आणि लातूर या दोन शहरांच्या पाणी पुरवठा योजनेबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांना केली होती. त्यानुसार पत्रही दिले होते. या पत्रानुसार महापालिकेने तयार केलेला पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्यपालांच्या माध्यमातून शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळेल, अशी ग्वाही डॉ. कराड यांनी दिली.

जायकवाडीतून पाणी लिफ्ट करण्यासाठी महावितरण महापालिकेला २२०० युनीट प्रती तास वीज पुरवठा करीत आहे. सात रुपये प्रती युनीट प्रमाणे विजेचे बिल महापालिकेला द्यावे लागते. यावर साधारणत: पाच कोटी रुपये खर्च येत आहे. हा खर्च कमी व्हावा व महापालिकेवरील विजेचा भार कमी व्हावा यासाठी वीज निर्मितीचा प्रस्ताव काही तज्ज्ञांनी मांडला होता. यात नवीन पाण्याच्या पाइपलाइनमध्ये वीज निर्मिती करणारे टरबाइन बसवून वीज निर्मिती करण्याबाबत सूचना करण्यात आली होती. या माहितीनुसार टरबाइनद्वारे वीज निर्मितीचा प्रकल्प राबविण्याबाबत प्रस्ताव विचाराधीन असून या प्रस्तावाला मंजुरी मिळून हा प्रयोग यशस्वी झाल्यास महापालिकेचा पाच कोटी रुपयांचा खर्च वाचणार असल्याचे संकेतही डॉ. कराड यांनी दिले.

………

२०५१ पर्यंत शहराची तहान भागणार

शहराच्या पाणी पुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेली नवीन पाणी पुरवठा योजना ही २०५१ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन तयार करण्यात आली आहे. त्यावेळी शहराची लोकसंख्या अंदाजे २१ लाखपर्यंत जाणार आहे. या २१ लाख लोकांची तहान भागविण्यासाठी ही योजना असल्याचेही डॉ. भागवत कराड यांनी दिली.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गीतासार, कृष्णलीलांचे दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मनुष्याच्या जीवनात गीता अतिशय मार्गदर्शक आहे. आयुष्यातील प्रत्येक वाईट प्रसंगावर मात करावी, असा गीतेचा आदर्श आहे.

शरिराची वाढ नैसर्गिकरित्या होते. परंतु, आत्मा व मनाची शांती, औदार्य हे गीतेसारख्या ग्रंथाच्या अभ्यासातून साध्य होते,' असे प्रतिपादन इस्कॉनचे डॉ. जय हनुमान दास यांनी व्यक्त केले.

प्रख्यात चित्रकार व्यंकटेश देशपांडे यांच्या गीतेवरील तैलचित्र व श्रीकृष्ण लीला या विषयावरील चित्र प्रदर्शनाचे रविवारी मालती आर्ट गॅलरीमध्ये उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गॅलरीचे संस्थापक विनायक पाटील आणि विनय बाऱ्हाळे होते. अंबरीश महाराज यांच्या हस्ते व्यंकटेश देशपांडे यांनी रचलेल्या 'हरी म्हणे अभंग व काव्य' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. श्रीकृष्णाची संपूर्ण जीवन, चरित्र आणि कृष्ण भक्तीचे गारूड संपूर्ण विश्वावरच आहे, असे उद्गार मान्यवरांनी काढले.

अंबरीश महाराज म्हणाले, व्यंकटेश यांना चित्ररूपाने सद्गुरूंचा आशीर्वाद मिळाला. कृष्ण पहिले सायकोथेरपिस्ट आहे, असे मत विनय बाऱ्हाळे यांनी व्यक्त केले. सोनाली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले, तर अनंत देशपांडे यांनी आभार मानले. यावेळी संगीती रोंघे, मालती आर्ट गॅलरीच्या क्युरेटर विजया पातूरकर उपस्थित होत्या.

\Bप्रदर्शनात आहेत ही चित्रे \B

चित्रकार देशपांडे यांना बालपणी गीतेचे अध्याय शिकायला मिळाले. हाती पडलेली गीता व गुरूंचा सहवास घडला. त्यामुळे गीतेच्या मुखपृष्ठावरील चित्राप्रमाणे गीतेचे सार कॅनव्हासवर उतरवावे, असे त्यांना वाटले. त्यातून त्यांनी प्रत्येक अध्यायाचा सारांश काढून १८ अध्यायावर मोठी चित्र काढली आहेत. नंतर कृष्णलीलेतील प्रसंग चित्रातून सादर केले. या प्रदर्शनात १८ अध्यायावरील १८ चित्रे आणि कृष्णलीलेवरील १६ चित्रांचा समावेश आहे. चित्रासमोर श्लोक व त्याचे अर्थ लक्ष वेधून घेतात. नव्या पिढीला मार्गदर्शन करणारे हे चित्रप्रदर्शन रसिकांनी आवर्जून बघावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हे चित्रप्रदर्शन मालती आर्ट गॅलरी, काल्डा कॉर्नर येथे ३० जूनपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी साडेसात पर्यंत खुले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभेलाही एमआयए ‘वंचित’सोबत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला ठोस प्रस्ताव देण्यात आलेला नाही. यामुळे वंचित बहुजन आघाडी व एमआयएम पक्षाची युती विधानसभेच्या निवडणुकीतही कायम ठेवण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्या दिल्लीत येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

दिल्ली येथे सोमवारी (२४ जून) खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्या निवासस्थानी ही बैठक घेण्यात आली. यावेळी माजी खासदार अॅड प्रकाश आंबेडकर, खासदार इम्तियाज जलील, एमआयएमचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत 'एमआयएम'ने निवडणूक लढविली होती. 'एमआयएम'चे उमेदवार इम्तियाज जलील यांना विजय मिळाला आहे; तसेच अन्य मतदारसंघांत या युतीमुळे वंचित बहुजन आघाडीचे मताधिक्य वाढले. लोकसभेत वाढलेल्या मताधिक्यामुळे आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीसोबत युती कायम राहावी, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्या जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. आगामी आठवडाभरात दोन्ही पक्षांकडून जागांबाबत यादी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने राज्यात २४ जागांवर उमेदवार उभे केले होते. यंदा ही संख्या जास्त असणार आहे.

दिल्लीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अॅड प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी विधानसभाही वंचित बहुजन आघाडी प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय कायम आहे.

- इम्तियाज जलील, खासदार, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images