Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दंगलीचे शहर ही प्रतिमा पुसू !

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राजकीय फायद्यासाठी हिंदू-मुस्लिम तणाव वाढवून औरंगाबादची प्रतिमा दंगलीचे शहर अशी करण्यात आली. रस्ते, पाणी, उद्योग, पर्यटन, शिक्षण या सुविधांकडे दुर्लक्ष करून राजकारण खेळले गेले. या शहराला आदर्श शहर करण्यासाठी जनतेने स्वत:च्या अधिकारांची जाणीव ठेवावी. लोकप्रतिनिधींना प्रतिप्रश्न विचारण्याचा हक्क आपण विसरल्याने शहर बकाल झाले', असे प्रतिपादन खासदार इम्तियाज जलील यांनी केले. ते व्याख्यानात बोलत होते.

प्रा. अविनाश डोळस सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने 'औरंगाबाद जिल्ह्याचा विकास - संधी आणि समस्या' या विषयावर खासदार इम्तियाज जलील यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात रविवारी व्याख्यान झाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. विजय दिवाण, डॉ. वाल्मिक सरवदे आणि डॉ. संजय मून यांची प्रमुख उपस्थिती होती. औरंगाबाद जिल्ह्याच्या स्थितीवर जलील यांनी विचार मांडले. 'पाण्याचे खासगीकरण करणारे हे एकमेव शहर होते. काही नेत्यांच्या आर्थिक फायद्यासाठी समांतर योजना लादली होती. शहराबद्दल आत्मियता असलेल्या नागरिकांनी योजना बंद पाडली. मला मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करावा लागला. त्यामुळे जनतेने ठेकेदार, पालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे संगनमत ओळखणे गरजेचे आहे. शहराच्या प्रश्नांवर आपण प्रतिप्रश्न करीत नसल्याने शहर बकाल झाले. आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा करण्याची चर्चा सुरू झाली आहे. शहराची प्रतिमा सुधारण्याची हीच योग्य वेळ आहे. नागरिकांनी पाच वर्षे मला विकासकामांसाठी वारंवार विचारणा करावी. तरच आपण धार्मिक संवेदनशील शहर अशी ओळख पुसून आदर्श शहर निर्माण करू', असे जलील म्हणाले. शहरात पासपोर्ट कार्यालय पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी दिल्लीला जाण्याचे नियोजन तत्कालीन खासदारांना सांगितले होते. तर आमच्याआधी त्यांनीच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना निवेदन देऊन फोटो छापून आणल्याचा अनुभव जलील यांनी सांगताच हशा झाला.

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पाण्याचे नवीन स्रोत शोधण्याचे आग्रही मत प्रा. विजय दिवाण यांनी मांडले. 'शहराला साठ किलोमीटर अंतरावरील जायकवाडी धरणाचा उद्भव पुरणारा नाही. पाणी लवादानुसार जायकवाडीला ८१ टीएमसी पाणी मिळणार आहे. मात्र, ऑक्टोबरनंतर प्रत्यक्षात २० ते २५ टीएमसी पाणी मिळते. त्यामुळे पाणी टंचाई दूर करण्यासाठी ब्रह्मगव्हाण योजनेतून पाणी आणणे शक्य असल्याचा विचार करावा. औरंगाबाद परिसरातील टेकड्यांवरून वाहणाऱ्या पाण्याचा वापर शक्य आहे. शहराचा विस्तार म्हणजे विकास नसतो. चांगले रस्ते, पुरेसे पाणी, नियमित सफाई या सुविधाही आवश्यक असतात', असे प्रा. दिवाण म्हणाले. डॉ. उत्तम अंभोरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\Bवीस लाखांचे फोटो तरी दाखवा

\B'निवडून आल्यानंतर मला सरळ करण्याची भाषा एका आमदाराने केली. पण, मला सरळ करण्याऐवजी स्पाइस जेटच्या कार्यालयात जाऊन त्यांना सरळ करण्याची गरज होती. ते काम मी केल्याने ऑगस्टमध्ये स्पाइस जेट विमानसेवा सुरू होणार आहे. बारापुल्ला दरवाजाच्या संवर्धनासाठी सहा कोटी रुपये मंजूर झाले. एका वर्षात फक्त स्वत:च्या फोटोसेशनवर महापौरांनी २० लाख रुपये खर्च केले. ही माहिती बाहेर निघताच महापालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सारवासारव करीत फोटोसाठी फक्त दीड लाख रुपये खर्च केल्याचे सांगितले. आता प्रश्न पडतो की, माहिती देणारा लेखा विभाग खोटा की जनसंपर्क अधिकारी खोटा ? डिजिटल युगात २० लाख खर्च करून काढलेले फोटो जनतेसाठी खुले करा', असे आव्हान जलील यांनी दिले. तसेच फोटोग्राफीचा प्रताप चव्हाट्यावर आणणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीजविहिनीच्या स्पर्शामुळे दोन मुले गंभीर जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळताना समोरील दुकानाच्या छतावर पडलेला बॉल आणण्यासाठी गेलेल्या दोघांचा मुख्य विद्युत वहिनीचा स्पर्श झाला. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (सात जुलै) दुपारी घडली.

अरबाज मुन्ना पटेल (वय १६) याची प्रकृती चिंताजनक आहे तर, साद खलील पटेल (१५) हा गंभीर जखमी झाला आहे. दोघांनाही घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने नातेवाईकांनी दोघांनाही खाजगी रुग्णालयात हलविले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा परिषद शाळेला रविवारी सुट्टी असल्याने नेहमी या ठिकाणी मुले क्रिकेटसह आदी खेळ खेळतात. नेहमीप्रमाणे क्रिकेट खेळतांना बॉल मैदानाशेजारील दुकानांच्या छतावर गेला. हा बॉल आणण्यासाठी अरबाज पटेल व त्याचा मित्र साद पटेल हे दोघे शाळेच्या कंपाउंडमधील झाडाच्या साह्याने दुकानांच्या छतावर गेले. झाडांच्या फाद्या या दुकानांच्या छतावर पसरलेल्या आहे. याच ठिकाणाहुन मुख्य विद्युत वाहिनी आहे. बॉल आणण्यासाठी गेलेल्या अरबाज व साद यांना झाडांच्या फाद्यामुळे मुख्य विद्युत वाहिनी दिसली नाही व अरबाजचा विद्युत वहिनीला स्पर्श झाल्याने तो तात्काळ खाली कोसळला. त्याच्या सोबत असलेला साद पटेल यालाही विजेचा धक्का बसला.

सोबत असलेल्या मुलांनी आरडाओरड केली. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी धावून आले व रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी दोघांनाही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र अरबाज विजेच्या शॉकमुळे पूर्णपणे भाजला असल्याने त्यांला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर साद पटेल याच्यावर प्राथमिक उपचार करून त्यालाही घाटी रुग्णालायत हलविले. अरबाज पटेल यांची प्रकृती चिंताजनक असून, दोघांवरही घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र, सायंकाळी दोघांच्या नातेवाईकांनी दोघांनाही खाजगी रुग्णालयात हलविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणमध्ये बदल्यावरून असंतोष

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महावितरणमध्ये ६० ते ७० तांत्रिक कामगारांच्या बदलीचे आदेश देण्यात आले असून त्यावरून नाराजी निर्माण झाली आहे. मुख्य अभियंता सुटीवर असताना बदल्यांचे आदेश निघालेच कसे?, असा प्रश्न उपस्थितीत करून बदलीप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेने केली.

महावितरणमध्ये तांत्रिक कामगारांच्या बदल्यांच्या घोळ मार्चपासून सुरू आहे. सुरुवातीला ३१ मार्चपर्यंत बदल्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. कामगारांनी विनंती बदल्यांसाठी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यांच्या बदल्या करण्यासाठी चार अधिकाऱ्यांचे पॅनल नियुक्त केले होते. या पॅनलच्या निर्णयानुसार आणि नियमानुसार बदल्या करण्यात आल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली. ज्यांना बदल्या नको होत्या, त्यांनी अर्ज मागे घेणे आवश्‍यक होते, असे त्यांनी स्पष्ट केले होते. दुसरीकडे औरंगाबाद शहरातील वीज वितरणाचे खासगीकरण होईल या भीतीने कामागारांनी ग्रामीण मंडळात बदलीसाठी अर्ज केला होता. ते अर्ज नंतर अनेकांनी रद्द केले. त्यानंतर प्रसिद्ध केलेल्या यादीत नावे नसतानाही बदल्यामध्ये नावे सामाविष्ट करण्यात आली आहेत.

शुक्रवार (५ जुलै) आणि शनिवारी (६ जुलै) मुख्य अभियंता सुटीवर असतानाही बदल्याचे आदेश कसे निघाले, असा सवाल तांत्रिक कामगार संघटनेने उपस्थित केला आहे. बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून त्या रद्द कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन ताराचंद कोल्हे, आर. पी. थोरात, एस. आय. सय्यद, कैलास गौरकर, मच्छिंद्र लग्गड, अब्दुल हमीद, एस. पी. शाहीर, सुनील राठोड यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावनिक मुद्द्यांमुळे मूळ प्रश्न दुय्यम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'देशात रोजगारांचा प्रश्न गंभीर आहे. शेतकरी आत्महत्या, तसेच इतर सामाजिक प्रश्नांकडे सर्वसामान्यांचे लक्ष जाऊ नये यासाठी भावनिक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. गोरक्षेवरून होत असलेल्या हत्या, धर्मा-धर्मात सामाजिक तेढ आदी भावनिक मुद्दे निर्माण करून सर्वसामान्यांचे लक्ष मूळ प्रश्नावरून दुसरीकडे वळविले जात आहे. रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे दुय्यम ठरविण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे,' असे मत प्रसिद्ध लेखक, विचारवंत प्रा. राम पुनियानी यांनी व्यक्त केले.

जमात-ए-इस्लामी हिंदच्या मुख्य कार्यालयात शनिवारी 'सद्यस्थिती व राष्ट्र' या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. प्रा. पुनियानी म्हणाले की, अमेरिकेने तेलाच्या राजकारणासाठी इस्लाम धर्माला दहशतवाद जोडला. इंग्रजांना १८५७च्या उठावानंतर 'फूट पाडा व राज्य करा' हे धोरण घडवावे लागले. भारताच्या इतिहासाचा अभ्यास केल्यास मुस्लिम शासनकर्ते यांच्या दरबारात हिंदू सेनापती, तर हिंदू राजाकडे मुस्लिम सेनापती होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५ अंगरक्षकांपैकी १८ अंगरक्षक हे मुस्लिम होते. सम्राट अकबर आणि महाराणा प्रताप यांच्या युद्धात अकबराकडून राजा जयसिंग आणि महाराणा प्रताप यांच्याकडून मुस्लिम सेनापती होते. इतिहासातील घटनांचा आणि सध्याच्या युगाचा जोड लावून त्याबाबत चर्चा करणे संयुक्तिक होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जमात-ए-इस्लामी हिंदचे वाजेद कादरी, मौलाना इलियाज खान फलाही यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

\Bसमाजाचे प्रश्न उपस्थित करा \B

सध्या देशात 'मॉब लिंचिंग'च्या माध्यमातून मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात आहे. दोन धर्मात फूट पाडून राजकारण केले जात आहे. देशाच्या स्वातंत्र्यात मुस्लिमांचे मोठे योगदान आहे. लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी सरकारला प्रश्न विचारले पाहिजे, त्यांनी समाजाचे प्रश्न उपस्थित केले पाहिजे. विरोधी पक्षांन एकत्र येऊन सक्षमपणे बेरोजगारी, शेतकरी सुरक्षा आदी मुद्दे उपस्थित केले पाहिजेत' असे मत प्रा. पुनियानी यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन लाखांची बॅग पळवली; तिघांना बुधवारपर्यंत कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तीन लाखांची रोकड घरी घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याच्या हातातील बॅग दुचाकीस्वारांनी हिसकावून धूम ठोकल्याच्या प्रकरणात विष्णुसिंह उर्फ विशालसिंह प्रमोदसिंह, सोनुसिंह उमाशंकरसिंह व संदिप सत्तू सोनकर या आरोपींना कोल्हापूरहून रविवारी (सात जुलै) पहाटे अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना बुधवारपर्यंत (दहा जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. आर. भंडारी यांनी दिले. आरोपींकडून रोख २४ हजार रुपये, दुचाकी, कार्डसह सात मोबाईल, स्क्रू ड्रायव्हर, आधार, पॅन व इलेक्शन कार्ड असा सुमारे एक लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

हर्सूल परिसरातील धनगरगल्ली येथे राहणारे विठ्ठल उर्फ प्रल्हाद मोरे (४४) यांचे कपड्यांचे दुकान असून त्यांनी अ‍ॅक्सिस बँकेतून सात लाखांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी त्यांनी तीन लाख रुपये ७ जून रोजी दुपारी काढले होते. ती रक्कम घेऊन ते कारने घरी आले. घराच्या बाजुला कार लावली व कारमधील तीन लाख रुपये असलेली बॅग, मोबाइल चार्जर व इतर साहित्य घेत त्यांनी कार लॉक केली. ते घराकडे जाणार तेवढ्यात दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चोरट्यांनी पैशांची बॅग हिसकावून घेत धुम ठोकली. या प्रकरणात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात विष्णुसिंह उर्फ विशालसिंह प्रमोदसिंह (२८, मूळ रा. उत्तर प्रदेश, ह.मु. ठाणे), सोनुसिंह उमाशंकरसिंह (२८, रा. उत्तर प्रदेश) व संदीप सत्तू सोनकर (२६, रा. उत्तर प्रदेश) या आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, आरोपींकडून चोरीची रक्कम, बनावट आधार कार्ड व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करणे बाकी असून, आरोपींनी बनावट आधार कार्ड कुठे तयार केले, याचाही तपास करायचा आहे; तसेच आरोपींच्या इतर साथीदारांबाबत तपास करावयाचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील भाग्यश्री संचेती यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपींना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकास लुबाडणारे तिघे जेरबंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बिहारी शिक्षकाला लुबाडणाऱ्या रिक्षाचालकासह दोघांना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार रविवारी बाळापूर फाटा येथे घडला होता. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मनीषकुमार सियाराम प्रसाद (वय २९ रा. शादीपूर, ता. वंशी, जि. अरवल, बिहार) यांनी तक्रार दाखल केली. प्रसाद यांचा रविवारी झाल्टा येथील एका सेंटरवर 'सीटीईटी'चा पेपर होता. यासाठी प्रसाद शहरात आले होते. मुकुंदवाडी येथे लॉज पसंत न पडल्याने ते रिक्षाने शिवाजीनगर भागात लॉज शोधण्यासाठी जात होते. यावेळी रिक्षामध्ये चालकासह दोन प्रवासी सुरुवातीपासून बसले होते. या तिघांनी रिक्षा बाळापूर फाटा येथील कमानीकडे नेले. तेथे प्रसाद यांना मारहाण केली; तसेच त्यांचे तीन हजार, चांदीची चैन, सोन्याची अंगठी, मोबाइल आदी ऐवज हिसकावून आरोपी पसार झाले.

याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुकुंदवाडीच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने याप्रकरणी शोध घेत संशयित आरोपी रिक्षाचालक विशाल बाळासाहेब जाधव (वय २१, रा. मुकुंदनगर), अनिकेत रावसाहेब हिवाळे (वय २२ रा. लोकशाही कॉलनी, मुकुंदवाडी) आणि सचिन रमेश नाथभंजन (वय २३, रा. मुकुंदनगर) यांना अटक केली. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त गुणाजी सावंत, पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल बांगर, कैलास काकड, विजय चौधरी, प्रकाश सोनवणे, सोमकांत भालेराव आणि सुनील पवार यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जहागीरदांनी घडविले सुजाण नागरिक’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'एनसीसी'च्या माध्यमातून केवळ विद्यार्थीच नव्हे, तर एक सुजाण नागरिक घडविण्याचे काम मेजर डॉ. सुधीर जहागीरदार त्यांनी केले, अशा शब्दात सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेचे संचालक कर्नल अमित दळवी यांनी जहागीरदार यांचा गौरव केला. डॉ. जहागीरदार यांचे व्यक्तीमत्व उत्तुंग आणि असामान्य आहे. गुरूच्या ऋणातून उतराई होण्याच्या दृष्टीने त्यांच्या विद्यार्थ्यांनी ठेवलेला गौरव समारंभ म्हणजे गुरू शिष्य नाते अतूट ठेवण्याची प्रक्रिया आहे, असे ते म्हणाले.

वसंतराव नाईक कॉलेजमधील एनसीसीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मेजर जहागीरदार यांच्या गौरव समारंभाचे आयोजन केले होते. जहागीरदार यांचा मानपत्र, पुष्पहार देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी महेश आंधळे, सुप्रिया जहागीरदार, प्राचार्य डॉ. शिवाजी बिराजदार, प्राचार्य डॉ. जगधीश खैरनार, सुरेश भाले, अशोक मालू, दीपक पांडे, सतीश जहागीरदार, दीपक जहागीरदार, वासुदेव जहागीरदार, जयंत जहागीरदार आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कर्नल दळवी म्हणाले, हा गौरव समारंभ म्हणजे गुरू शिष्य नाते अतूट ठेवण्याची प्रक्रिया आहे. आज दुर्मिळ होत चाललेल्या नात्यांना नवी झळाळी देण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले.

या प्रसंगी गौरवपत्राचे वाचन प्राचार्य खैरनार यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात वैदेही खैरनार हिच्या भरतनाट्यमने करण्यात आली. कार्यक्रमात राजेंद्र वैराळ यांनी देशभक्तीपर गीत, बहारदार गझल सादर केली. सतीश वैराळकर यांनी सूत्रसंचालन केले, तर अशोक अंधारे यांनी आभार मानले. प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये आसाराम चव्हाण, राजेंद्र वैराळ, जगधीश खैरनार, अशोक अंधारे, सचीन वेताळ, नीलेश लकडे, राजेश माळी, ईश्वर कोळगे, आंनद माकोडे, विजय भंडारे, महेश आंधळे, रमेश पवार, रवींद्र शिरसाठ, राहुल धसे, गीताराम कांबळे, आनंद वाघ यांची उपस्थिती होती.

\Bही माझ्या कार्याची पावती: जहागीरदार \B

सत्काराला उत्तर देताना मेजर जहागीरदार म्हणाले, विद्यार्थ्यांनी केलेला गौरव माझ्या कार्याची पावती आहे. समोर येईल ते यशस्वीपणे पार पाडले. कार्य करत राहिलो, फळाची चिंता कधीच केली नाही. देशासाठी एक चांगला नागरिक घडवू शकल्याचा आनंद मोठा आहे, असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत प्रवेशाची दुसरी फेरी समाप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आरटीई' अंतर्गत मोफत प्रवेशासाठी येत्या आठवड्यात तिसरी फेरी होणार आहे. दुसऱ्या फेरीनंतर प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. मुदत संपल्याने आता रिक्त जागांची माहिती घेतली जाणार आहे.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाधिकार कायद्या अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, त्याला विलंब लागल्याने प्रक्रिया लांबली. पहिल्या फेरीनंतरच राज्यभर प्रक्रिया रखडल्याने दुसरी फेरी सुरू होऊ शकली नव्हती. दुसरी फेरीसाठी सोडत झाल्यानंतर पालकांनी शाळेत जावून प्रवेश घेण्याची मुदत २९ जून पर्यंत होती. त्यानंतरही अनेकांचे प्रवेश राहिल्याने ६ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. यानंतर आता रिक्त जागांची माहिती प्रक्रिया सोमवार, मंगळवारी पूर्ण करण्यात येणार आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयांना ही प्रक्रिया पूर्ण करत त्याची माहिती संचालकांना द्यायची आहे. त्यानंतर तिसरी फेरीची सोडत होणार आहे. प्रवेश प्रक्रियेत तिसरी फेरी प्रवेशासाठी शेवटची फेरी असण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर प्रवेशाचा कोटा निश्चित करण्यात आला. त्यापैकी ६० टक्केच प्रवेश पूर्ण होऊ शकले आहेत. त्यामुळे यंदाही कायद्यांतर्गत प्रवेशातील जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठीच्या पुस्तकासाठी धरणे आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उर्दू माध्यमातील इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाची पुस्तके मिळत नसल्याने शैक्षणिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करत विद्यार्थ्यांसह जनजागरण समितीने आयुक्त कार्यालयासमोर धरणे धरले.

उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांना शाळेतून मराठी विषयाची मोफत पुस्तके मिळत नाही. अनेक पालकांची बाजारातून पुस्तक खरेदी करण्याची ऐपत नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत पुस्तक देण्याची योजना असताना पुस्तके मिळत नाहीत. हा भुर्दंड पालकांना बसत आहे. त्यामुळे समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर पत्रकारांना माहिती देताना सांगण्यात आले की, राज्य सरकार हे पुस्तक खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहे. नियमानुसार शाळांतून विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य लक्षात घेऊन हा प्रश्न सोडवावा. हायकोर्टाने पुस्तके देण्याचे आदेश देऊनही शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला.

विद्यार्थ्यांना मराठी विषयांची पुस्तके दिली जात नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रशासनाकडे याबाबत परिस्थिती मांडली आहे. त्यांच्याकडून शासनाला याबद्दल कळ‌विण्यात येईल एवढेच उत्तर मिळते आहे.

-मोहसीन अहमद, अध्यक्ष, जनजागरण समिती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयितरित्या जनावरे बाळगणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संशयितरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. फुलंब्री पोलिस ठाणे हद्दीतील पोखरी येथे रविवारी ही कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून सहा बैल जप्त करण्यात आले. याप्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोखरी शिवारात बायपासवर गस्त घालत होते. यावेळी त्यांना एका ट्रकमध्ये जनावरांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पथकाने ट्रक अडवून तपासणी केली असता आत जनावरे आढळून आली. ट्रकचालक शेख ताहेर शेख उस्मान (वय ४०, रा. देवळाई) याला ताब्यात घेतले असता, त्याने ही जनावरे नायगाव येथील शेख जावेद शेख सुभान (वय ३२, रा. नायगाव) याची असल्याची माहिती दिली. शेख जावेद याला ताब्यात घेतले असता त्याने धुळे येथील बाजारातून ही जनावरे विकत घेतल्याची माहिती दिली. धुळे येथे खातरजमा केली असता ही जनावरे तेथील नसल्याची माहिती समोर आली.

याप्रकरणी पोलिसांनी शेख ताहेर, शेख जावेद आणि शेख खलील शेख समशेर (वय २२, रा. नायगाव) यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून सहा जनावरे; तसेच दोन वाहने जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पोलिस उपनिरीक्षक सोळुंके, रतन वारे, श्रीमंत भालेराव, विठ्ठल राख, विनोद खांडेभराड, संजय भोसले, सागर पाटील, राहुल पगारे, विनोद तांगडे आणि रामेश्वर धापसे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हज यात्रेच्या ‘इन्बारकेशन पॉइंट’वरून वाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादहून हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी 'इंम्बारकेशन पॉइंट' ठरविण्यावरून राज्य हज कमिटी आणि केंद्र हज कमिटीमधील वाद समोर आला आहे. हज यात्रेला सुरवात झाल्यानंतरही राज्य हज कमिटीकडून औरंगाबाद इंम्बारकेशन पॉईंट ठरविण्यात आले नसल्याने अखेर केंद्रीय हज समितीने हज यात्रेकरूंना जुन्या पॉइटवरून जाण्याचा संदेश यात्रेकरूंच्या मोबाइलवर पाठविला आहे.

याबाबत केंद्रीय हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मकसूद खान यांनी सात जुलै रोजी औरंगाबाद 'इंम्बारकेशन पॉइंट'बाबत (यात्रेकरू एकत्रित येण्याचे ठिकाण) एका पत्राद्वारे दिलेल्या माहितीनुसार; जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात औरंगाबाद विमानतळावरून हजसाठी यात्रेकरू रवाना होणार आहेत. यामुळे 'इंम्बारकेशन पॉइंट'चा प्रस्ताव सादर होणे आवश्यक होते, मात्र राज्य हज समितीकडून आतापर्यंत प्रस्ताव देण्यात आलेला नाही. यामुळे यात्रेकरूंसाठी विशेष व्यवस्था निर्माण करण्याचा प्रस्ताव पेडिंग आहे. याबाबत राज्य हज समितीकडून केंद्रीय हज समितीकडे पाठविण्यात आलेले नाही. यामुळे हज यात्रेकरूंसाठी कोठे जावे, याची माहिती हज यात्रेकरूंना दिली जात नव्हती.

या पॉइंटवर यात्रेकरूंना पासपोर्ट आणि त्यांचे तिकीट देण्यात येते. ही व्यवस्था अजूनही स्पष्ट नसल्याने अखेर केंद्रीय हज समितीने यंदा हज यात्रेकरूसाठी जामा मशीद येथे 'इंम्बारकेशन पॉइंट' निश्चित केला आहे. हज यात्रेकरूंची व्यवस्था करण्यासाठी हुज्जाज कमिटीतर्फे करण्याचाही निर्णय केंद्रीय हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मकसूद खान यांनी घेतल्याचे जाहीर केले आहे.

\Bशिवनेरी लॉन्स येथे 'पॉइंट'चा प्रस्ताव\B

राज्य हज समितीने जिल्हा हज समितीच्या सदस्यांची नियुक्ती केली. त्यांनी चिकलठाणा जवळील शिवनेरी लॉन्स येथे 'इंम्बारकेशन पॉइंट' उभारण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी सर्व सुविधा जिल्हा हज समितीकडून देण्यात येणार आहेत. या ठिकाणी हाजींना दहा तासांपूर्वी हजला जाण्यासाठी बोलविण्यात येणार आहे. असा निर्णय राज्य हज कमिटी घेतला. याचा प्रस्ताव शनिवारी केंद्रीय हज समितीकडे पाठविला आहे. याबाबत सोमवारी (आठ जुलै) रोजी राज्य हज समितीचे सदस्य अध्यक्ष, अधिकारी केंद्रीय हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मकसूद पठाण यांची भेट घेऊन शिवनेरी लॉन्स येथील 'इंम्बारकेशन पॉइंट' सुरू करण्याबाबत चर्चा करणार आहे.

\Bअपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची?\B

विमानतळापुढे जालना शहराच्या दिशेला एका खासगी लॉनवर 'इंम्बारकेशन पॉइंट' उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉन जालना रोडवर असल्याने, हज यात्रेकरूंच्या नातेवाईकाचे अपघात होण्याची शक्यता आहे. एखाद्या यात्रेकरूच्या नातेवाईकाचा अपघात घडल्यास जबाबदारी कोणाची राहणार, असा सवाल यात्रेकरूंनी उपस्थितीत केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक परिस्थितीमुळेच शेतकरी आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मराठवाड्यातील सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजाही पूर्ण होत नाही. या कठीण आर्थिक परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. यावर आर्थिक उपाययोजना आवश्यक आहेत,' असे राज्याचे कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र आत्महत्याग्रस्तांसाठी उपाययोजना व पॅकेज संदर्भात कृषीमंत्र्यांनी मौन बाळगले.

औरंगाबाद कृषी विभागाचा पीक पेरणी आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील विविध योजनांसंदर्भात कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी बैठक घेण्यात आली. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या वाढत असून त्या रोखण्यासाठी स्वतंत्र पॅकेज आदी उपाययोजनांबद्दल विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले. कोरडवाहू शेतीचे उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त जात नाही. शेतकऱ्यांसोबत संवाद वाढला पाहिजे, त्यांना जोडधंदा दिला पाहिजे, असे ते म्हणाले. मात्र आत्महत्याग्रस्तांसाठी उपाययोजना व पॅकेज संदर्भात कृषीमंत्र्यांनी मौन बाळगले. यावेळी बोलताना ते म्हणाले, शेतकरी कुटुंबांना केंद्रस्थानी ठेऊन प्रधानमंत्री पीक विमा योजनेसह शेतीसंदर्भातील इतर योजनांचा समावेश असलेले एकत्रिकृत मॉडेल तयार करण्यात येणार असल्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी आमदार नारायण कुचे उपस्थित होते.

औरंगाबाद, जालना व बीड अवर्षणग्रस्त जिल्हे असून येथे अपुरा पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांना पेरणी दरम्यान व पेरणीनंतर कोणत्याही स्वरुपाच्या अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासंदर्भात जिल्हाध‍िकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.

\Bयोजनांचे एकत्रित मॉडेल \B

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना, हवामान अधारित फळपीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, मागेल त्याला शेततळे, शेततळे अस्तरीकरण, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा आदी कृषी विभागाच्या योजनांचा समावेश असलेले एकत्रीकृत मॉडेल तयार करण्यात येणार आहे. यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांच्या सूचनांचा अंतर्भाव राहणार असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

---

\Bकृषी सहायकांना कार्यालय\B

ग्रामपंचायत कार्यालयात कृषी सहायकांना स्थायी स्वरुपाचे कार्यालय देण्यात येणार आहे. या कार्यालयात कृषी सहायकाच्या उपलब्ध वेळा, मोबाइल क्रमांक ठळक अक्षरात नमूद करण्यात येणार असून या संदर्भात सूचना दिल्या आहेत, असे डॉ. बोंडे यांनी सांगितले.

\Bशेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यांवर कारवाई\B

राष्ट्रीयकृत बँकांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांसंदर्भात संवेदनशिलता कमी आहे. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी बँकांमध्ये येण्याऐवजी बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत जावे, मेळावे घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत कृषीमंत्री म्हणाले की, बोगस खतविक्रेते, होलसेल डिलर्स यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. एकूणच शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या सर्व घटकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस नसतानाही टँकरकपात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकीकडे राज्यभर वरुणराजाने दमदार हजेरी लावली असताना मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही. पाऊस नसतानाही टँकरची घसरण कायम असून, जून अखेरनंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर टँकरची संख्या निम्म्यापेक्षा कमी झाली आहे.

जूनअखेर टंचाई आराखडा संपुष्टात आला. त्यावेळी मराठवाड्यात तीन हजार २९७ टँकरद्वारे तब्बल ५४ लाख नागरिकांची तहान भागवण्यात येत होती. जुलै महिन्यात नव्याने टँकर सुरू करण्याचे सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे असल्यामुळे नेमके कोणत्या ठिकाणी सुरू असलेले टँकर बंद करता येणे शक्य आहे. याचा गावपातळीवरून आढावा घेऊन निम्म्यापेक्षा अधिक टँकर बंद करण्यात आले. सध्या मराठवाड्यातील एक हजार २१० गावे व २६७ वाड्यांमधील २८ लाख ४३ हजार ८०३ नागरिकांना एक हजार ६८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. चार जून रोजी विभागात एक हजार ५४९ टँकर सुरू होते. आता यापैकी १३५ टँकर बंद करण्यात आले आहेत.

मे महिन्यामध्येच राज्यातील सर्वाधिक टँकरच्या तुलनेत मराठवाड्यात टँकरसंख्या सर्वाधिक होती. जून महिन्यामध्ये काही महसूल मंडळांमध्ये पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली होती. दरम्यानच्या कालावधीमध्ये काही भागांमधील विहिरी, बोअरला काही प्रमाणात पाणी लागले होते. मान्सूनचे आगमन यंदा तुलनेत उशिराने झाले असले तरी, औरंगाबाद, जालना जिल्ह्यांच्या काही भागात कमी अधिक प्रमाणामध्ये सातत्याने पाऊस सुरू होता. टंचाई आराखडा जून अखेरीस संपुष्टात येत असला तरी, संबंधित जिल्ह्याची टंचाई परस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाकडून टंचाई असलेल्या ठिकाणी टँकर सुरू ठेवण्यात आले आहेत. पावसाचे मराठवाड्याला हुलकावणी असली तरी, आतापर्यंत समाधानकारक पाऊस झालेल्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतच सर्वाधिक टँकर सुरू आहेत. सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील दहा लाख ४६ हजार तर, जालना जिल्ह्यतील सहा लाख दहा हजार नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवण्यात येत आहे.

मान्सूनचे उशिराचे आगमन आणि त्यानंतर समाधानकारक नसलेल्या पावसामुळे जुलै महिन्यातही गावोगावी टँकरफेरा कायम आहे. मराठवाड्यात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली होती, त्यानंतर मात्र पावसाची फारशी कृपादृष्टी राहीली नाही.

\Bविहीर अधिग्रहणही घटले\B

दुष्काळी मराठवाड्यात विहीर अधिग्रहणाची संख्याही मोठी झाली होती. आता टँकर कमी होत असल्याने अधिग्रहणाची संख्येतही घट झाली आहे. चार जुलैच्या तुलनेत आता ४४ विहिरींचे अधिग्रहण कमी करण्यात आले आहे. अहवालानुसार सध्या मराठवाड्यात टँकर आणि टँकर व्यतिरिक्त असे चार हजार ९४२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात १८५, जालना २८३, परभणी ४५७, हिंगोली ५६२, नांदेड एक हजार १२२, बीड १८, लातूर एक हजार २३९ तर, उस्मानाबाद जिल्ह्यात एक हजार ७६ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

सध्या सुरू असलेले टँकर

जिल्हा............टँकर.......अवलंबून लोकसंख्या

औरंगाबाद.......६११........१०४६५५२

जालना...........३४७........६१०७०२

परभणी...........७२..........१७४६७७

हिंगोली...........७१..........८२०१७

नांदेड............१५१........१९५१५०

बीड..............८३..........७९४७३

लातूर............११०........२३३०४०

उस्मानाबाद....२३९........४२२१९२

एकूण............१६८४......२८४३८०३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्रीतील नगरसेवक जफारोद्दिन यांना दिलासा

0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक दहाचे नगरसेवक सय्यद जफरोद्दिन यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले होते. या निकालाविरोधात त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या नगर पालिका विभागाकडे अपील दाखल केली होती. महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी प्रवीण पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाला चार जुलै रोजी स्थगिती दिली. त्यामुळे नगरसेवक सय्यद जफरोद्दिन यांना दिलासा मिळाला आहे.

फुलंब्री येथील नगरपंचायतीची निवडणूक वर्षभरापूर्वी घेण्यात आली होती. येथील वार्ड क्रमांक दहाचे नगरसेवक सय्यद जफारोद्दिन यांच्या विरोधात त्यांचे प्रतिस्पर्धी जमीर पठाण यांनी तिसऱ्या अपत्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन सय्यद जफारोद्दिन यांना अपात्र ठरवीत जमीर पठाण यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर सय्यद जफारोद्दिन यांनी २८ जून २०१९ रोजी अपात्र आदेशाच्या विरोधात महाराष्ट्र नगर पालिका, नगरपंचायत व औद्योगिक अधिनयम १९६५च्या कलम ४४(४)अन्वये शासनांकडे अपील दाखल केले होती. अपिलाच्या अनुषंगाने नगरविकास यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अपात्रतेच्या निकालाला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण मुद्याबाबत अहवाल शासनाला पाठविण्याच्या सूचना या आदेशाद्वारे देण्यात आलेल्या आहे. नगर पालिका विभागाचे महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी प्रवीण पाटील यांनी हा आदेश दिला आहे. या निकालामुळे सय्यद जफारोद्दीन यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजचोरीचे जालन्यातील गुन्हे आता स्थानिक पोलिसांकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

कन्नड शहर व तालुक्यातील वीजचोरी, तत्सम गुन्हे जालना येथील स्वतंत्र पोलिस ठाण्यात नोंदवण्यात येत होती. यातील दोन हजार २४० गुन्ह्यांचा तपास तालुक्यातील चार पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. यामुळे नियमित तपासाबरोबर आता या नवीन तपासाचा भार स्थानिक पोलिसांवर आला आहे.

सहा जिल्ह्यातील वीजचोरी व तत्सम गुन्हे जालना येथील स्वतंत्र पोलिस ठाण्यात दाखल होत होती. या ठिकाणी गुन्हे दाखल करून गुन्ह्यांचा तपास करून दोषारोपपत्र जालना पोलिस दाखल करत होते. जून महिन्यात जालना पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास स्थानिक पोलिसांकडे देण्यात आला आहे. पोलिस ठाण्यांमधील कमी मनुष्यबळ, दररोज घडणाऱ्या घडामोडी, दाखल होणारे गुन्हे, बंदोबस्त आदी कामांचा मोठा व्याप असताना आता महावितरणच्या गुन्ह्यांची भर आता पडली आहे. स्थानिक पोलिस ठाण्याकडे २०११पासून आतापर्यंत दाखल झालेले गुन्हे वर्ग करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा तपास करून, संबंधित वीज चोरांना नोटीस देऊन दंड वसूल करण्यात येणार आहे.

\Bपोलिस ठाणेनिहाय गुन्हे\B

कन्नड शहर : ५३४

कन्नड ग्रामीण : ६७६

पिशोर : ८६५

देवगाव (रंगारी) : १६५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


४२ लाखांची फसवणूक; दोघांच्या कोठडीत वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नादुरुस्त कॅथलॅब मशीनची वाळुजमधील डॉक्टरला विक्री करून हैदराबादेतील दोन भामट्यांनी ४२ लाखांना गंडविल्याप्रकरणातील आरोपी नागेश बाबू चेपली व आरोपी दानम चैतन्य कृष्णा यांच्या पोलिस कोठडीमध्ये सोमवारपर्यंत (८ जुलै) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. आर. भंडारी यांनी दिले.

वाळूजमधील कै. गंगोत्री कलवले चॅरेटेबल अँड रिसर्च सेंटर ट्रस्टच्या रुग्णालयात कार्यरत डॉ. राहुल बाबासाहेब जावळे (रा. अथर्व रॉयल, बीड बायपास, सातारा परिसर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, रुग्णालयात अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीसाठी कॅथलॅब मशीन खरेदी करायची होती व जुनी सुस्थितीतील मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नोव्हेंबर २०१७ मध्ये एक्सजीई मेडिकल सिस्टीम कंपनीचा संचालक असलेला नागेश बाबू चेपली (३९, रा. हैदराबाद) याने रुग्णालयातील डॉ. अनिल गवळी यांच्याशी संपर्क साधून फिलिप्स कंपनीची तीन वर्षांपूर्वीची कॅथलॅब मशीन उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच मशीन इन्स्टॉलेशननंतर एक वर्षाची गॅरंटी देण्याची थाप मारली. त्यानंतर चेपलीने कंपनीचा सेल्समन दानम चैतन्य कृष्णा (३५, रा. हैदराबाद) याला औरंगाबादला पाठवले. कृष्णाने वाळूज रुग्णालयातील डॉक्टरांची भेट घेऊन जीएसटीसह मशीनची किंमत ४२ लाख रुपये सांगितली. व्यवहार ठरल्यानंतर पहिल्यांदा दहा लाखांचा चेक व अडीच लाख रुपये आरटीजीएसद्वारे एक्सजीई कंपनीला पाठवण्यात आले. इन्स्टॉलेशन झाल्यावर उर्वरित २९ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते. कृष्णा हा दोन अभियंत्यांसह कॅथलॅब मशीन रुग्णालयात घेऊन आला व मशीन बसविण्यात आली; पण ती सुरुच झाली नाही. डॉक्टरांनी त्याला विचारणा केली तेव्हा मशीनमध्ये काही सॉफ्टवेअर अपडेट करायचे आहेत, अशी थाप मारुन कृष्णाने मशीन इन्स्टॉलेशन फॉर्मवर स्वाक्षरी घेतली. त्यानंतर मशीनसाठी मंजूर झालेले २९ लाख ५० हजार रुपये परस्पर खात्यावर जमा करून घेतले. त्यानंतरही मशीन सुरुच झाली नाही व मशीनवर फिलिप्स कंपनीचे २०१४ चे बनावट स्टिकर असल्याचेही स्पष्ट झाले. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर फिर्यादीने तक्रार दिल्यावरुन वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात ९ ऑक्टोबर २०१८ रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तब्बल नऊ महिन्यांनी दोघांना पाच जुलै २०१९ रोजी अटक करण्यात आली व न्यायालयात हजर करण्यात आले असता, दोघांना रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

\Bसर्व्हिस इंजिनीअरचा शोध बाकी

\Bदोन्ही आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे दोघांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, मशीनवर लावण्यात आलेल्या बनावट स्टिकरचा तपास करणे, आरोपींनी रुग्णालयात ज्या सर्व्हिस इंजिनीअरला पाठवले होते, त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेणे व आरोपींनी आणखी कुणाची फसवणूक केली आहे का आदी बाबींचा तपास करणे बाकी असल्याने आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील भाग्यश्री संचेती यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत सोमवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैनचे २१ बँकांत ५० खाते

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पेठे ज्वेलर्समधून ५८ किलो सोने लंपास करणाऱ्या राजेंद्र जैन यांचे शहरातील २१ बँकांमध्ये सुमारे ५० खाती विविध जणांच्या नावांनी उघडल्याचे समोर आले आहे; तसेच त्याने पेठेंचे दागिने गहाण ठेवून दुचाकी, कार आणि पोकलेन मशीनसह २६ वाहने खरेदी केल्याचा संशय असून, या वाहनांची तपासणी आरटीओकडून करण्यात येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली.

पोलिसांनी शनिवारी राजेंद्र जैन यांच्या कारमधून कागदपत्राच्या बॅग जप्त केल्या होत्या. या बॅगमध्ये पोलिसांना वेगवेगळ्या बँक खात्याचे पासबुक, चेकबुक आढळून आले आहेत. यामध्ये जैनने नातेवाईक; तसेच कारचालकांच्या नावाने विविध बँकांत खाती उघडल्याचे दिसून येत आहे. यामध्ये ज्योती पवन जैन, भारती राजेंद्र जैन, राजेंद्र किसनलाल जैन, यक्ष कलेक्शन, आनंद गारमेंटस्, बी अँड बी कलेक्शन, लोकेश जैन, लक्ष राजेंद्र जैन, किसन तारा प्रायव्हेट लिमीटेड, चालक अजय हिवराळे, साई लक्ष्मी ट्रेडिंग, चालक अर्जून कांबळे, अनिल रामदास गायकवाड आणि क्रिष्णा संतोष कांबळे या नावे शहरातील २१ बँकांमध्ये ५०हून अधिक खाती उघडण्यात आल्याची माहिती रविवारी सूत्रांनी दिली; तसेच राजेंद्र जैन याच्या पाच विविध कंपन्या असून, यामध्ये बी अँड बी ज्वेलर्स, आनंद गारमेंट, यक्ष कलेक्शन, किसनतारा प्रायव्हेट लिमिटेड आणि साईलक्ष्मी ट्रेडिंग या कंपन्याचा समावेश आहे. पेठे यांचे चोरलेले दागिने फायनान्स कंपनीकडे तारण ठेवून जैन याने २६ वाहने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटक्याचे आकडे घेणारे जेरबंद

0
0

कन्नड : पाणपोई येथून मटक्याचे आकडे घेऊन कन्नडकडे येणाऱ्या, कन्नड शहरातून मुंबई, कल्याण मिलन या मटक्याचे आकडे घेणाऱ्या दोघा आरोपींना कन्नड शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी मक्रणपूर पुलाजवळ आणि शहरातील दत्त कॉलनीतून सापळा रचून जेरबंद करत ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पाणपोई फाटा येथून मुंबई, कल्याण व मिलन मटक्याचे आकडे घेऊन येणाऱ्या सतीश शिवलाल निंभोरे २६, रा. सिरसगाव) याला शनिवारी (सात जुलै) दुपारी मक्रणपूर पुलाजवळ तर, प्रदीप रामदास चिकसे (२८, रा. कन्नड) याला दत्त कॉलनीतील घरातून ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून एक दुचाकी, प्रिंटर, तीन मोबाइल, पाठीवर अडकवेलेल्या बॅगमध्ये मुंबई, कल्याण व मिलन मटक्याचे आकडे लिहिलेले रजिस्टर, आकड्याच्या चिठ्ठ्या व नगदी एक हजार ४०० रुपयांसह ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलिस उपनिरीक्षक भूषण सोनार, कैलास करवंदे, किरण गंडे, विनोद पाटील, रुपाली सोनवणे, गणेश गोरक्ष यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच्या १७ शाळांमध्ये सेमी इंग्रजीतून शिक्षण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या १७ शाळांमधून सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणे सुरू करण्यात आले आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेबद्दल आत्मविश्वास निर्माण व्हावा, अन्यही स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करणे त्यांना सोपे जावे या उद्देशाने सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.

महापालिकेच्या सध्या ७२ शाळा आहेत. सुमारे अकरा हजार विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेतात. महापालिकेने सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले पाहिजे, अशी मागणी पालकांकडून होत होती. त्यामुळे गतवर्षी सात शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले. त्याला प्रतिसाद चांगला मिळाला. त्यामुळे यंदा दहा शाळांमधून सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा निर्णय घेतला गेला आणि शैक्षणिक वर्ष सुरू होताच त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आली. ज्या शाळांमध्ये दहावीपर्यंतचे वर्ग आहेत, अशाच शाळा सेमी इंग्रजीसाठी निवडण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सलग दहावी पर्यंत सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळणे सोपे होणार आहे. पूर्णपणे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणे महापालिकेला शक्य नसल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.

\Bइंग्रजी माध्यमाचा प्रवास खडतर

\Bइंग्रजी माध्यमाच्या शाळांना शासनाचे अनुदान मिळत नाही. शिक्षकांच्या पगाराचा बोजा महापालिकेवर पडतो. त्याशिवाय विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके या सुविधा देखील मिळत नाहीत. गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचा खर्च एकतर महापालिकेला उचलावा लागतो, नाहीतर संबंधित विद्यार्थी आणि त्याच्या पालकाला हा खर्च करावा लागतो आणि ते शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे पूर्णपणे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करता येणार नाहीत असे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोण म्हणतं भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही?

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आगामी विधानसभा निवडणुकीत युतीची सत्ता आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणार काय?' असे विचारले असता, 'कोण म्हणतं भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही?, ' असा प्रतिसवाल करून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुगली टाकली आहे. शिवसेना-भाजप युतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या तर्कवितर्कात आता दानवे यांच्या वक्तव्याची भर पडली आहे.

भाजप सदस्य नोंदणी अभियानाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे रविवारी औरंगाबादेत आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यातील विधानसभा निवडणुकीची तयारी युतीने पूर्ण केली आहे. काँग्रेसला विधानसभेची चिंता आहे. आम्ही २२० जागा जिंकू. मुख्यमंत्री भाजपचा होणार काय?, असे विचारल्यानंतर दानवे यांनी गुगली टाकत प्रतिप्रश्न केला आणि म्हणाले, की कोण म्हणतं भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही? या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरू होणार आहे.

शहराच्या प्रश्नांबद्दल ते म्हणाले, औरंगाबाद शहरातील पायाभूत सुविधांच्या अडचणींचा आढावा मी घेतला. येथील पाणीप्रश्न जटील झाला आहे. तो सोडविण्यासाठी राज्याने १६०० कोटींची तरतूद जाहीर केली आहे. रस्त्यांसाठी १२५ कोटी रुपये पूर्वी दिले. नव्याने १०० कोटी दिले जातील. मलनि:सारण वाहिनीला केंद्राने पूर्वीच निधी दिला आहे. कचराप्रश्न सोडविण्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत. लवकरच महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या अडचणींवर तोडगा काढला जाईल. शहराच्या प्रश्नात अधिक लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहराच्या विमानसेवेबाबत दानवे म्हणाले, सध्या औरंगाबादसाठी एकच विमान आहे. गेल्या आठवड्यात मी, राज्यमंत्री अतुल सावे, भाजपचे काही नेते केंद्रीय नागरी उड्डयण मंत्र्यांना भेटलो. दहा जुलै रोजी त्यांनी दिल्लीत विमानसेवा पुरविणाऱ्या दहा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे. त्यातून नक्कीच काही विमानाची उड्डाणे औरंगाबादमार्गे सुरू होतील, असा विश्वास व्यक्त केले.

\Bआमदार सत्तारांचा भाजप प्रवेश गुलदस्त्यात \B

आमदार अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये प्रवेश देणार काय?, असे विचारल्यानंतर दानवे म्हणाले, की आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला प्रवेश दिला जाईल. आमदार सत्तार यांनी अजून आमच्याकडे पक्षप्रवेश करण्याबद्दल इच्छा व्यक्त केली नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images