Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘जय श्रीराम’ची जबरदस्ती; रिक्षाचालकास बेड्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

युवकाला मारहाण करून जबरदस्तीने 'जय श्रीराम' म्हणण्यास भाग पडणाऱ्या दहा जणांविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणीगणेश विनोद सोनवणे (रा. अंबरहिल परिसर, राजानगर, ह. मु. एन-१३, डी सेक्टर, भरतनगर) या रिक्षा चालकाला शनिवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

कटकट गेट येथील एका हॉटेलात वेटर म्हणून काम करत असलेल्या इम्रान पटेल (रा. मुजफ्फरनगर, जटवाडा) यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, इम्रान हे गुरुवारी (१८ जुलै) रात्री साडेबाराच्या सुमारास दुचाकीने घराकडे जात होते. त्यावेळी हडको कॉर्नरजवळ त्यांना दुचाकी आडवी लावून अडवण्यात आले. यावेळी आठ ते दहा जणांनी घेरले. एकाने दुचाकीची चावी काढून घेतली. दुसरा हातात दगड घेऊन मारण्यासाठी उभा होता. तिघांनी मारहाण करत कुठे जात आहे असे विचारले. त्यावर आपण घरी जात असल्याचे सांगितले होते. मात्र, टोपी घातलेल्या युवकाने 'जय श्रीराम' म्हणण्याची जबरदस्ती केली. आपण काहीही बोलत नसल्याचे पाहून टोळक्याने शिवीगाळ करून बळजबरीने जय श्रीराम म्हणण्यास भाग पाडले. यावेळी आरडा-ओरडा केल्याने गणेश सोनवणे व त्यांची पत्नी घराबाहेर आली. यांनी टोळक्याला हुसकावले. या तक्रारीवरून गणेश सोनवणेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्यावर हर्सूल आणि बेगमपुरा पोलिस ठाण्यात मारहाणीचे दोन गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धोकादायक इमारतींची जबाबदारी मालकावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धोकादायक इमारतीमुळे एखादी दुर्घटना घडली तर, त्यासाठी आता घरमालक आणि भाडेकरूंना जबाबदार धरले जाणार आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिकेने हात झटकल्याचे बोलले जात आहे.

धोकादायक इमारतींवरून महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला कोंडीत पकडले होते. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी महापौरांनी शुक्रवारी आपल्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. धोकादायक इमारतींच्या यादीत २००७पासून ज्या इमारती आहेत, त्याच इमारती आजही कायम आहेत, असे बैठकीच्या वेळी लक्षात आले. इमारतीचा काही भाग पडल्यामुळे संपूर्ण इमारतच धोकादायक ठरवण्यात आली आहे. त्यानुसार नोटीस देखील बजावण्यात आली आहे. काहींनी इमारतींची दुरुस्ती केली आहे. ज्यांनी धोकादायक इमारतींची दुरुस्ती केली आहे, त्यांनीच ही इमारत वापरण्यास योग्य आहे, असे प्रमाणपत्र महापालिकेला द्यावे असे बैठकीत ठरविण्यात आले. ज्या दिवशी पालिका प्रशासनाने इमारत धोकादायक ठरवून नोटीस दिली, त्या दिवशीची इमारतीची स्थिती आणि आजची स्थिती याचा अहवाल संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी शहर अभियंत्यांना द्यावा, शहर अभियंत्यांकडे जमा होणारी माहिती वृत्तपत्रांमधून प्रसिद्धीस दिली जावी, असेही बैठकीत ठरवण्यात आले. धोकादायक इमारत पडली तर, त्याची जबाबदारी इमारतीत राहणारे भाडेकरू आणि इमारतीचे मालक यांच्यावर निश्चित केली जाणार आहे. त्यासाठी पोलीस आयुक्तांचे प्रतिनिधी, तहसीलदार, महापालिकेचे प्रतिनिधी यांची समिती गठीत केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यशस्वी न होता समाधानी व्हावे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माणसाने केवळ यशस्वी न होता समाधानी व्हावे, असा सूर 'वेध भविष्याचा' या कार्यक्रमातून शनिवारी व्यक्त झाला. यशस्वी आणि समाधानी होण्यासाठीची गुरुकिल्ली मान्यवरांनी गुणवंतांच्या हाती दिली. विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या मनातील प्रश्न, शंका मोकळेपणाने विचारल्या. त्या प्रश्नांना समर्पक उत्तरेही मिळाली.

सरस्वती भुवन आणि शारदा मंदिर शाळा या दोन्ही शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी स. भु. शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स. भु. शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. शिल्पा सातारकर, सीए रेणुका देशपांडे, उद्योजक मुकुंद कुलकर्णी आणि कवी दासू वैद्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याची त्रिसूत्री दिली.

डॉ. शिल्पा सातारकर म्हणाल्या, 'आपण जे काम करतो, ते खूप मन लावून केले पाहिजे. दहावी होईपर्यंत कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे हे मी ठरवले नव्हते. गुणवंत म्हणून आपला फोटो पेपरमध्ये प्रसिद्ध झाला पाहिजे हेच ध्येय होते. त्यादृष्टीने अभ्यास केला. अभ्यास करताना मला काय समजले ते मी स्वत:च्या भाषेत लिहून काढले. त्यामुळे अभ्यास पक्का झाला. प्रत्येक विद्यार्थ्याने नोटस् काढाव्यात. त्यातून आपली त्या विषयाबद्दलची समज पक्की होते. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावेत. नियोजन करून अभ्यास कराव. केवळ नियोजन करून चालणार नाही तर, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी देखील करावी,' असे आवाहन त्यांनी केले. दासू वैद्य म्हणाले, 'आपल्याला आपला शोध लागला पाहिजे. मी कोण आहे हे कळाले पाहिजे. नवीन विचार करता आला पाहिजेत. आपल्यात कल्पकता असावी आणि जिज्ञासा देखील पाहिजे.' यासाठी त्यांनी स्वत:चीच काही उदाहरणे विद्यार्थ्यांना सांगितली. रेणुका देशपांडे यांनी 'कनसिव्ह, बिलिव्ह, अचिव्ह' ही यशाची त्रिसूत्री सांगितली. 'एखाद्या क्षेत्रात यश मिळवण्याची स्वत:च्या मनात इच्छा असावी. स्वत:वर विश्वास ठेवावा आणि मनात ठरवलेली गोष्ट साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यायची तयारी पाहिजे, तर यश नक्की मिळेल,' असा उल्लेख त्यांनी केला.

मुकुंद कुलकर्णी यांनी ध्येय निश्चितीबद्दल विद्यार्थ्यांना सांगितले. 'स्वत:चे ध्येय निश्चित असले पाहिजे. डोळे बंद करून बघितले जाते ते स्वप्न आणि स्वत:च्या हिंमतीवर साध्य केले जाते ते ध्येय. ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत. केवळ स्मार्टनेस असून चालत नाही, आत्मविश्वास असलाच पाहिजे. असेल तर आपला स्मार्टनेस निभावून जाऊ शकतो,' असे ते म्हणाले. चारही मान्यवरांच्या मनोगतानंतर विद्यार्थी - विद्यार्थिनींनी त्यांना विविध प्रश्न विचारून आपल्या यशाचा मार्ग आखून घेण्यास सुरुवात केली. माजी विद्यार्थी संघटनेच्या सचिव बिजली देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संघटनेचे अध्यक्ष उमेश दाशरथी यांनी प्रास्ताविक, तर संघटनेचे संचालक प्रसाद कोकीळ यांनी मान्यवरांच्या मुलाखतीच्या सत्राचे सूत्रसंचालन केले. संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद माने यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नॅक’च्या उधळपट्टीवर संशय !

0
0

\Bतुषार बोडखे, औरंगाबाद

\Bडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 'नॅक' मूल्यांकनावरील खर्चाचा ताळेबंद संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'नॅक' कार्यालयावर ९९ लाख ७६ हजार रुपये खर्च झाल्याची ढोबळ आकडेवारी सादर करण्यात आली. मात्र, या खर्चात वाढ होण्याची शक्यता असून लेखा व वित्त विभागाने विद्यापीठातील सर्व विभागांना तातडीने खर्च सादर करण्याची सूचना केली आहे.

विद्यापीठाने 'नॅक' मूल्यांकनात वारेमाप खर्च केल्यानंतर खर्चाचा ताळेबंद सादर करण्यात प्रशासकीय स्तरावर दप्तर दिरंगाई सुरू आहे. मूल्यांकनात 'ए' ग्रेड मिळाल्यानंतर तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी समाधान व्यक्त केले होते. पण, पायाभूत सुविधांवरील खर्चाचा योग्य तपशील जाहीर केला नव्हता. या प्रक्रियेच्या खर्चावर शैक्षणिक संघटनांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कॅम्पसमधील रस्ते निर्मिती, रंगरंगोटी, नवीन फर्निचर खरेदी आणि इतर पायाभूत सुविधांवर जवळपास ५० कोटी रुपये खर्च झाला. या अतिरिक्त खर्चातून विद्यापीठाचा परिसर चकचकीत करण्यात आला. 'नॅक' प्रक्रिया संपल्यानंतर खर्च सादर करण्याबाबत वित्त व लेखा विभागाने सर्व विभागांना पत्र पाठवले होते. 'नॅक'च्या मध्यवर्ती कार्यालयासह एकाही विभागाने तपशीलपूर्वक खर्च सादर केला नसल्याने १५ जुलै रोजी लेखा व वित्त विभागाने पुन्हा स्मरणपत्र पाठवले. त्यानंतर कमी खर्च असलेल्या विभागांनी खर्चाचा ताळेबंद सादर केला. मात्र, बहुतेक विभाग खर्चाची जुळवाजुळव करीत असल्याने संशय वाढला आहे. काही खरेदी प्रक्रिया निविदेशिवाय झाल्याचा आरोप आहे. इलेक्ट्रॉनिक साहित्य जास्तीच्या दरात खरेदी केल्याची चर्चा असून तपशील सादर झाल्यानंतर अधिक उलगडा होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी जास्त खर्च झाल्याचे प्राथमिक पाहणीत आढळले आहे. मागील तीन महिन्यांपासून वित्त व लेखा विभाग नॅकच्या खर्चाची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करीत आहे. खर्चाच्या ताळेबंदासाठी तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. तसेच व्यवस्थापन परिषद सदस्यांनी खर्चावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली होती. मे महिन्यात आचारसंहितेचे तांत्रिक कारण दाखवत बैठक रद्द करण्यात आली. जून महिन्यात चोपडे यांचा कार्यकाळ संपताच ताळेबंद गुंडाळण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

\Bकार्यालयाचा एक कोटी खर्च

\B'नॅक' प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्यासाठी असलेल्या मध्यवर्ती कार्यालयाने ९९ लाख ७६ हजार रुपये खर्च केला आहे. या खर्चाचा हिशेब कार्यालयाने चक्क ढोबळ पद्धतीने सादर केला होता. या हिशेबाच्या कागदावर कुणाचीही स्वाक्षरी नसल्याने लेखा व वित्त विभागाने योग्य पद्धतीने खर्च सादर करण्याची सुचना केली. काटेकोर ताळेबंद मांडल्यास हा खर्च वाढण्याची शक्यता आहे. फक्त कार्यालयावरील एक कोटी रुपये खर्च विद्यापीठ वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

तीन महिन्यांपूर्वी 'नॅक' कार्यालयाने खर्च सादर केला होता. मात्र, योग्य तपशील नसल्याने पुन्हा सादर करण्याची सूचना केली. इतर विभागांनाही खर्चाचा हिशेब देण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.

- राजेंद्र मडके, वित्त व लेखा अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाना, आम्हालाही न्याय द्या!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उत्तरपत्रिका पान फाडल्याच्या प्रकरणात अंजली गवळीला जसा न्याय दिला तसा इतरांनाही द्या, अशी मागणी करत संघटनांनी शिक्षण मंडळात शनिवारी धाव घेतली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना इतर विद्यार्थी दिसले नाही का, असा सवाल करत, 'आम्हालाही न्याय द्या...! नाना' अशा आशयाचे फलक गळ्यामध्ये अडकवून कार्यकर्ते मंडळाच्या कार्यालयात दाखल झाले.

दहावीच्या हिंदी पेपरला उत्तरपत्रिकेतील पान फाडल्याचा ठपका अंजली गवळी हिच्यावर ठेवत मंडळाने निकाल राखीव ठेवला होता. विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी त्यामध्ये लक्ष घालत मंत्रालयात बैठक लावत प्रकरणाची फेरचौकशी लावली. त्यात गवळी दोषी नसल्याचे समितीच्या अहवालातून स्पष्ट होत असल्याने तिला पास करण्यात आले. गुणपत्रिका मिळाल्यानंतर सभापती बागडे यांनी तिचा सत्कार केला. त्यावर आता इतर विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न उभा राहिला आहे. शनिवारी याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) विद्यार्थी संघटनेने मंडळात धाव घेत इतरांना तसाच न्याय द्या, अशी मागणी केली. उर्वरित ६० विद्यार्थ्यांना कोणी वाली नाही. आम्ही आता पोस्टर लावून हरिभाऊ बागडे बनून आलो आहोत. आता या विद्यार्थ्यांनाही पास करा, असे म्हणत रिपाइं संघटनेने मंडळाच्या विभागीय सचिव सुगता पुन्ने यांना साकडे घातले. यावेळी मराठवाडा युवक अध्यक्ष नागराज गायकवाड, संघटक लक्ष्मण हिवराळे, मुकेश गायकवाड, मनोज भालेराव, विशाल सोनवणे, मयूर गायकवाड, नितीन साळवे, अनिल आगळे, योगेश गायकवाड, अरुण पाईकडे आदी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून पाच जुलै रोजी मंडळात धाव घेतली. विद्यार्थिनीला न्याय मिळवून दिला. मात्र, अंजलीसारख्याच ६० विद्यार्थ्यांना मंडळाने दोषी ठरवून शिक्षा केली आहे. त्या विद्यार्थ्यांचे काय, त्यांच्याबाबत मंडळ प्रशासन गप्पच आहे. त्याबाबत मंडळाने तात्काळ निर्णय घ्यावा.

\B- नागराज गायकवाड, मराठवाडा अध्यक्ष\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंदे कुटुंबास मदत; दोन दिवस लांबणीवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना महापालिकेकडून आणखीन दोन दिवस मदत मिळू शकणार नाही, असे शनिवारी स्पष्ट झाले.

काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. शिंदे यांच्या बलिदानाला २३ जुलै रोजी एक वर्ष होत आहे. मात्र, अद्याप पालिकेने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली नाही. याबद्दल 'मटा'ने वृत्त प्रसिद्ध केल्यावर पालिकेचे प्रशासन हादरले आहे. सर्वसाधारण सभेत याच संदर्भात नगरसेवकांनी प्रशासनाचे वाभाडे काढले होते. नगरसेवकांना शांत करताना महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी सायंकाळपर्यंत मदतीचा धनादेश त्या कुटुंबाला दिला जाईल असे आश्वासन दिले. मात्र, ते शक्य झाले नाही. त्यानंतर शनिवारी मराठा क्रांतीमोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी महापौरांची भेट घेतली. काकासाहेब शिंदे यांच्यासह प्रमोद होरे, उमेश एंडाईत, कारभारी शेळके यांनीही मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले होते. त्यांच्या कुटुंबीयांनाही आर्थिक मदत देण्याचा ठराव महापालिकेने घेतला होता. ती मदत केव्हा देणार असा प्रश्न त्यांनी महापौरांना केला. तेव्हा शिंदे यांच्या कुटुंबाला आणखी दोन दिवस मदत मिळू शकत नाही, आयुक्त बाहेरगावी गेले आहेत असे महापौरांनी कार्यकर्त्यांना सांगितले. महापालिकेने केलेल्या ठरावाची प्रत कार्यकर्त्यांनी मागितली, पण ती प्रतही सापडली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक सेनेचे भजन आंदोलन मागे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषद शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मुद्देनिहाय कालावधीनुसार सीमारेषा निश्चित करून सोडविले जातील, असे लेखी पत्र जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे भजन आंदोलन मागे घेण्यात आले.

गेल्या कित्येक दिवसांपासून चटोपाध्याय वेतनश्रेणी, स्थायित्व, भाषा सूट, परीक्षा परवानगी, दरमहा एक तारखेला सीएमपी प्रणालीद्वारे वेतन, डीसीपीएस हिशोब स्लीप आदी प्रश्न प्रलंबित होते. याबाबत वेळोवेळी शिक्षक सेनेकडून पाठपुरावाही करण्यात येत होता. परंतु प्रशासन याची कसलीही दखल घेत नसल्याने शिक्षक सेनेकडून आगळे-वेगळे भजन आंदोलन आयोजित करण्यात आले होते. आंदोलनाचे निवेदन मिळाल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी गुरुवारी १८ रोजी शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावून सविस्तर चर्चा केली. या प्रश्नी लेखी स्वरूपात कालावधीची सीमारेषा निश्चित करण्याचे आश्वासन देण्याची कबुली दिली होती. शुक्रवारी चर्चेदरम्यान झालेल्या मुद्यांऐवजी अन्य मुद्यांचे पत्र देऊ केल्याचा दावा शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे आंदोलन होणार अशी शक्यता निर्माण झाली. अखेरीस शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक सेनेच्या मागणीप्रमाणे प्रत्येक मुद्देनिहाय कार्यालयाकडून काय कार्यवाही केली जाईल व किती दिवसांत केली जाईल, याचे लेखी पत्र आंदोलन सुरू होण्यापूर्वी शिक्षक सेनेला दिले. त्यामुळे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांनी पत्रकाद्वारे कळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धावत्या रेल्वेतून ५० हजारांची पर्स चोरणारा गजाआड

0
0

म.टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

हैदराबाद - पुणे एक्स्प्रेसमधून ५० हजार रुपयाची पर्स चोरी करणाऱ्या चोरट्यास परळी लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. दहातोंडे यांनी रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पुणे येथील राजकुमार चंद्रकांत गुजराथी (वय २३) हे आपल्या कुटुंबांसह पाच जून रोजी हैदराबाद - पुणे एक्स्प्रसेने एस वनमधून प्रवास करत होते. लातूर रोडवरून एक्स्प्रेस निघाल्यानंतर पाळत ठेवलेल्या चोरट्याने लेडीज पर्स चोरून नेली. यामध्ये रोख तीन हजार रुपये आणि चार मोबाइल असे ४९ हजार ९९७ रुपयाचे साहित्य होते. पर्स चोरी झाल्याचा प्रकार लक्षात येताच ऑनलाईन पद्धतीने गुजराथी यांनी तक्रार नोंदवली. परळी लोहमार्ग पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून केज तालुक्यातील पिसेगाव येथील स्वप्नील विश्वंबर जगताप या तरुणास अटक केली. तो चोरीच्या गुन्ह्यातील मोबाइल वापरत असल्याचे तपासामध्ये समोर आल्यामुळे त्याला अटक केली. त्याला न्यायालया समोर हजर केले. स्वप्निलने मोबाइल कोणाकडून घेतला याचा तपास करावयाचा असून, त्याच्या ताब्यातून चोरीचा मोबाइल हस्तगत करावयाचा असल्यामुळे पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करत कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धमकी देत विवाहितेवर अत्याचार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बदनामी करून पती व मुलांना जिवे मारण्याची धमकी देत नातेवाईक विवाहितेवर २०१५ ते २०१८पर्यंत वारंवार अत्याचार करणाऱ्या आरोपीला शनिवारी दुपारी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एम. माने यांनी दिले. धीरेंद्र दत्तात्रय पुरी (२७, रा. एन-६, मथुरानगर) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात ३० वर्षीय विवाहीतेने तक्रार दिली. २०१५मध्ये पीडितेच्या पतीचा नातेवाईक आरोपी धीरेंद्र पुरी याच्याशी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर पुढे मैत्रीत झाले. त्यामुळे आरोपी पीडितेला वारंवार फोन करायचा व शरीर सुखाची मागणी करायचा. मात्र, पीडिता त्याला नकार देत होती. २२ जुलै २०१५ रोजी आरोपीने पीडितेला फोन करून तुझा पती त्याच्या मैत्रिणीला घेवून माझ्या घरी अल्याची बतावणी केली. त्यामुळे पीडिता आरोपीच्या घरी गेली असता आरोपीने तिला मारहाण करीत तुझी रेकॉर्डिंग तुझ्या पतीला ऐकवतो, अशी धमकी देत अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने पीडितेला वारंवार फोन करून फोन रेकॉर्डिंग तुझ्या पतीला पाठवतो, तुझी बदनामी करतो व पती व मुलांना जीवे मारतो अशी धमकी देत पीडितेवर तीन वर्ष वारंवार अत्याचार केला. या प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता सहाय्यक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे असून आरोपीचा मोबाइल हस्तगत करणे आहे. गुन्हा करते वेळी आरोपीने परिधान केलेले कपडे जप्त करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोडकळीस आलेल्या शाळांचे ऑडिट

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेची सिडको एन ९ येथील शाळा पडल्याचे वृत्त 'मटा' ने प्रसिद्ध केल्यावर मोडकळीस आलेल्या शाळांबद्दल महापालिका आता दक्ष झाली आहे. या शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, बनेवाडी येथील शाळा पूर्णपणे पाडण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

महापालिकेच्या ताब्यात असलेल्या सिडको भागातील शाळा मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे सिडको एन ६, एन ७, एन ९, एन ११, एन १२ या ठिकाणी असलेल्या शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश सर्वसाधारणसभेत महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले. बनेवाडी येथील शाळेच्या चार खोल्या धोकादायक असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी लक्षात आणून दिले. या खोल्या तात्काळ पाडा, दुर्घटना होण्याची वाट पाहू नका असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. बनेवाडी येथील शाळा स्थलांतरित करण्याचे आदेश देखील महापौरांनी दिले. मिटमिटा येथील शाळेला संरक्षक भिंत नाही, उस्मानपुरा येथील शाळेच्या दोन खोल्या पडायला आल्या आहेत. खोकडपुरा येथील शाळेच्या दोन खोल्यांचे स्लॅब पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी महापौरांना दिली. शाळांच्या दुरुस्तीसाठी व नवीन शाळा बांधण्यासाठी पालिकेकडे पुरेसा निधी नाही. त्यामुळे या कामासाठी स्मार्ट सिटी मिशनचा आधार घेण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. स्मार्ट एज्युकेशनच्या माध्यमातून सहा कोटी रुपयांची तरतूद मोडकळीस आलेल्या इमारतींच्या देखभाल दुरुस्ती साठी करा, अशी सूचना महापौरांनी केली. या निधीतून देखभाल दुरुस्तीसह शाळांचे नव्याने बांधकाम देखील केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घर बांधणाऱ्यांना ‘त्या’ शुल्कातून सूट

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वत:च्या जागेवर घराचे बांधकाम करणाऱ्यांना बेटरमेंट चार्जेसमध्ये सूट देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वत:च्या जागेवर घरांचे बांधकाम करण्यासाठी महापालिकेकडे १० हजार ८०० लाभार्थींची नोंद झाली आहे. त्यापैकी ७३१ लाभार्थींचे प्रस्ताव मान्य झाले आहेत. या लाभार्थींना राज्य सरकारकडून एक लाख रुपये तर, केंद्र सरकारकडून दीड लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. तीस चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत घर बांधण्यासाठी ही मदत केली जाते. एवढ्या क्षेत्रफळाच्या जागेत दोन खोल्या, संडास - बाथरूम बांधण्याची तरतूद आहे. तीस चौरस मीटर जागेवर करावयाच्या बांधकामासाठी संबंधितांना महापालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी घ्यावी लागणार आहे. बांधकाम परवानगी घेताना बेटरमेंट चार्जेस आणि शहर विकास शुल्क भरावे लागते. तीस चौरस मीटर जागेसाठी सुमारे पंचेवीस हजार रुपये बेटरमेंट चार्जेस तर, तीस हजार रुपये विकास शुल्क म्हणून घेतले जाते.

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी बेटरमेंट चार्जेसमध्ये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे २५ हजार रुपयांची सूट या लाभार्थ्यांना मिळणार आहे. बेटरमेंट चार्जेसचे ८५० रुपये प्रती चौरस मीटर प्रमाणे आकारले जातात, तर विकास शुल्क रेडिरेकनर दराच्या दोन टक्के आकारले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेच्या एक लाख वृक्षलागवडीचा शुभारंभ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यात एक लाख वृक्ष लावण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ शनिवारी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आला. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, असे ते यावेळी म्हणाले.

मिटमिटा येथील सफारी पार्कच्या जागेवर दहा हजार झाडे शिवसेनेतर्फे लावण्यात येणार आहेत, असे खैरे यांनी यावेळी स्पष्ट केले. सफारी पार्कच्या जागेवरच वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. रविवारी कांचनवाडी येथील राजे संभाजी महाराज सैनिकी शाळेच्या आवारात पाच हजार झाडे लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद त्रिवेदी, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार संजय शिरसाठ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोंणगावकार, युवासेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ, महापालिकेचे सभागृह नेते विकास जैन, शहरप्रमुख बाबासाहेब डांगे, महीला आघाडी संपर्क संघटक कला ओझा, जिल्हासंघटक सुनीता देव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्रजी शाळांना पाचपट कर; व्यवस्थापनाचा आंदोलनाचा इशारा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेकडून इंग्रजी शाळांकडून व्यवसायिक करापेक्षा पाच पट जास्तीची कर आकारणी केली जात आहे. ती थांबवा अन्यथा शाळा बंद ठेवून रस्त्यावर उतरू, असा इशारा इंग्रजी शाळा व्यवस्थापनांनी दिला आहे.

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल संस्थाचालक असोसिएशनतर्फे संस्थाचालकांचा मेळावा शनिवारी औरंगाबादमध्ये झाला. त्यानंतर पत्रकारांना अध्यक्ष संजय तायडे यांनी माहिती दिली. राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात येणाऱ्या इंग्रजी शाळांना व्यवसायिक कर भरावा लागतो. औरंगाबादमध्ये पाचपट जास्तीचा कर आकारला जातो. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्याचा आर्थिक भार जाऊ शकतो. शाळा चॅरिटेबल ट्रस्ट, सेवाभावी संस्था अंतर्गत सुरू आहेत. त्यांना कंपनी कायदा लागू होऊ शकत नाही. त्यानुसार पालिकेने कर आकारणीची सक्ती करू नये. यासह नैसर्गीकवाढ, ३:१, ३:२, मंडळ मान्यताबाबतची प्रकरणे मार्गी लागावीत, प्रलंबित ठेवण्यात येतात. त्याबाबत रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यात येईल. यावेळी आदित्य वराडे, सायली शालीग्रामे, विलास साळुंके, एस. पी. जवळकर, संतोष सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीला भोसकले, पतीला अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

चारित्र्यावर संशय घेत पत्नीच्या पोटात चाकू भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात आरोपी पती गणेश हिमतलाल चुगडे (२८, रा. नारेगाव) याला शनिवारी दुपारी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी दिले.

या प्रकरणात विवाहिता ज्योती गणेश चुगडे (वय २२) यांनी तक्रार दिली. ज्योतीचे लग्न ११ फेब्रुवारी २०१८मध्ये आरोपी गणेशशी झाले. लग्नानंतर काही दिवस चांगले वागविले. आरोपी गणेश हा दारू सेवन करत होता. तो ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला त्रास देत होता. तर ज्योतीची सासू द्वारकाबाई, दिर दिनेश, नणंद रेखा ताजे हे नेहमी तुझ्या आई-वडीलांनी लग्न चांगले लावून दिले नाही, आम्हाला मानपान दिला नाही म्हणून मारहाण करून त्रास देत होते. १७ जुलै रोजी रात्री १० वाजता विवाहिता घरी असताना गणेश दारु पिऊन आला. त्याने ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ व मारहाण केली. ही बाब ज्योतीने फोनद्वारे मामाला सांगितली. १८ जुलै रोजी पहाटे ज्योती पहाटे तीन वाजता लघुशंकेला जावून आल्यावर आरोपी गणेश उठला त्याने ज्योतीला शिवीगाळ करीत माराहण केली. साडेतीन वाजेच्या सुमारास कांदा कापण्याच्या चाकू गणेशने ज्योतीच्या पोटात भोसकून तेथून धुम ठोकली. ज्योतीचा आरडा-ओरडा एकूण शेजारच्या लोकांनी ज्योतीच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर ज्योतीला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीने गुन्ह्यात वापरलेला चाकू हस्तगत करणे असून आरोपीने नेमक्या कोणत्या कारणामूळे ज्योतीला जखमी केले याचा तपास करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील एन. ए. ताडेवार यांनी न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्त जागांचे प्रवेश अधांतरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. रिक्त जागांसाठी पुन्हा सीईटी न घेता थेट प्रवेश देण्याची सुचना कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केली होती. त्यानुसार रिक्त जागा थेट प्रवेश देऊन भरण्याची शक्यता आहे. तर नियमानुसार सीईटी घेण्याबाबत काही विभागप्रमुख ठाम असल्याने प्रवेशाचा निर्णय अधांतरी आहे.

विद्यापीठ कॅम्पसमध्ये पदव्युत्तर वर्गाच्या प्रवेशासाठी शुक्रवारी स्पॉट अॅडमिशन प्रक्रिया राबवण्यात आली. प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) दिलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात आले. अनेक विभागात जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्याचा मुद्दा समोर आला आहे. नियमानुसार सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची गरज आहे. त्यासाठी पुन्हा सीईटी घेण्याची सूचना काही विभागप्रमुखांनी प्रशासनाला केली आहे. मात्र, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पदव्युत्तर विभागाशी चर्चा करताना सीईटीशिवाय प्रवेश देण्याची सूचना केली होती. प्रवेश क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थी असल्यास सीईटी घेण्याचे प्रयोजन काय, या प्रक्रियेत ऊर्जा आणि खर्च वाया जातो असे, येवले यांनी स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर कुलगुरू नागपूरला रवाना झाले. स्पॉट अॅडमिशन झाल्यानंतर अनेक विभागात रिक्त जागा आहेत. या जागा कशा भरणार असा पेच निर्माण झाला आहे. याबाबत कुलगुरू सोमवारी (२२ जुलै) निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया पार पडेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, 'स्पॉट अॅडमिशन'पूर्वीच प्रवेश देण्याची कामगिरी काही विभागांनी केली. नियम डावलत केवळ विभाग भरण्यासाठी घाईने प्रवेश उरकण्यात आले. त्यात गुणवत्तेनुसार पात्र विद्यार्थी डावलले गेले आहेत. या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी रेटा वाढल्यामुळे एकूण प्रवेशाची चौकशी होणार आहे.

\Bआकडेवारी उपलब्ध नाही

\Bपदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतरही विभागांनी आकडेवारी सादर केली नाही. शनिवारी दुपारी एकपर्यंत आकडेवारी देण्याचे परिपत्रक काढण्यात आले होते. केवळ दोन विभागांनी माहिती दिल्यामुळे पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. उस्मानाबाद उपपरिसरातील काही विभागात एकही प्रवेश झाला नाही. त्यामुळे रिक्त जागांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिमझिम पावसाच्या सरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दीर्घ कालखंडानंतर पावसाचे शनिवारी शहरात आगमन झाले. शहरात दिवसभरात १८.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्याचा अपवाद वगळता मराठवाड्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. पुढील सहा दिवस पाऊस कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर शनिवारी पावसाला सुरुवात झाली. मागील चोवीस तासात विभागात १०.२० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. विभागात आतापर्यंत १४१.६५ मिमी पाऊस झाला आहे. बीड जिल्हा वगळता इतर सात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात १०.६८ मिमी, जालना ११.९५ मिमी, परभणी ५.४३ मिमी, हिंगोली १.८१ मिमी, नांदेड १८.१८ मिमी, लातूर १८.०३ मिमी, उस्मानाबाद जिल्ह्यात १५.४९ मिमी पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील काही तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला. औरंगाबाद तालुक्यात ८.८० मिमी, फुलंब्री ३२.५० मिमी, पैठण १४.९ मिमी, सिल्लोड ०.८८, सोयगाव १.३३ मिमी, वैजापूर ७.८० मिमी, गंगापूर ६.५६ मिमी, कन्नड ६.१३ मिमी, खुलताबाद १८ मिमी अशी जिल्ह्यात एकूण १५६.५९ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, येत्या २७ जुलैपर्यंत पाऊस कायम राहणार आहे. पावसात खंड पडण्याची शक्यता नसल्याचे हवामान तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीएम’ तंत्रज्ञान शेतीसाठी लाभदायक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शेती उत्पन्न वाढीसाठी जगात स्पर्धा सुरू असताना देशात मात्र जेनेटिकली मॉडिफाई (जीएम) तंत्रज्ञानाच्या बियाणांना विरोध केला जात असून, या बियाणांच्या अभावामुळे शेती व्यवसाय धोक्यात येत आहे,' असा दावा शनिवारी शेती तंत्रज्ञानाचे अभ्यासक अजित नरदे यांनी केला. ते हेमंत देशमुख बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते.

नरदे यांनी 'एच.टी.बी.टी. कापूस वाण आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान' या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, 'स्वातंत्र्यानंतर देशातील जनता अर्धपोटी, उपाशी राहत होती. त्या काळात उत्पादन कमी होत असल्याने अन्नधान्याची मोठी टंचाई निर्माण होत असे. मात्र, १९६६मध्ये हरितक्रांती झाल्यानंतर उत्पादन वाढीसाठीची अनेक प्रकारचे हायब्रीड वाण, बियाणे बाजारात आले. त्यामुळे उत्पन्न वाढले. मात्र, त्याचबरोबर लोकसंख्याही वाढत गेली. आज देशाची लोकसंख्या १३५ कोटींच्या घरात आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य मिळावे त्यासाठी बी. टी. बियाणांमध्ये जी. एम. तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न वाढीसाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. मात्र, या बियाणांमुळे आरोग्य धोक्यात येईल, प्रदूषण होईल अशा प्रकारच्या अफवा पसरावून जीएम तंत्रज्ञानयुक्त बियाणे शेतकऱ्यांना मिळू दिले जात नाही. मात्र त्याच बियाणांपासून बनविलेले खाद्यतेल आयात करण्यात येते. जगातील जवळपास निम्य्या देशांमध्ये जीएम बियाणांचा वापर करून शेती पिकविली जाते. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत आपल्या देशातील शेतकरी मागे पडत आहे. याला केवळ सरकार जबाबदार आहे,' अशी टीका यावेळी नरदे यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेतकरी संघटनेचे कैलास तवार यांनी केले. यावेळी गोविंद देशमुख, श्रीकांत उमरीकर शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्त विद्यापीठ प्रमाणपत्र वाटप

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुक्त विद्यापीठाचा दर्जा सुधारण्यासाठी अभ्यास केंद्रांचा सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन यशंवतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक प्रवीण घोडेस्वार यांनी रविवारी केले. केंद्र संचालकांशी संवाद व प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे वितरण करण्यात आले. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी गर्दी केल्याने काहीवेळ विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागली.

देवगिरी इंजिनीअरिंग कॉलेजच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर माजी कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, विभागीय संचालक, वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. राम माने यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे घोडेस्वार म्हणाले, विद्यापीठाच्या दर्जाबाबत अनेकदा बोलले जाते. दर्जा अधिकाधिक सुधारण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू असून प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा असतो. केंद्रांनी आपल्यास्तरावर दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन ही त्यांनी केले. प्रकाश अतकरे यावेळी म्हणाले, पारंपारिक शिक्षणापेक्षा कौशल्यनिष्ठ शिक्षणावर भर महत्वाचा आहे. त्यानुसार विविध अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे. तसे अभ्यासक्रम अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. यानंतरच्या सत्रात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी सहाय्यक कुलसचिव अनिल बारवकर, अमोल पाटील, सतीष पाटील, अनिल निपळुंगे, रवी काटे, निवृत्ती बोटे यांनी परिश्रम घेतले.

पदवी प्रमाणपत्र वितरण

मुक्त विद्यापीठातील विविध पदवी, पदविका अभ्यासक्रमांच्या प्रमाणपत्रांचे वितरण दुपारच्या सत्रात करण्यात आले. या कार्यक्रमाला देवगिरी इंजिनीअरिंगचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मे २०१८मध्ये अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. मागील वेळी अचानक विद्यार्थी संख्या वाढल्याने विद्यापीठाची पुरती तारांबळ उडाली होती. यंदा प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी वितरणाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. मात्र, त्याबाबतची फारशी माहिती नसल्याने विद्यार्थ्यांची धांदल उडाली. विद्यार्थी संख्या वाढल्याने रांगाही मोठ्या प्रमाणात लागल्या होत्या. प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना काहीवेळ ताटकळत उभे रहावे लागले.

शिक्षण शुल्क वाढवणार!

विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रमांना देण्यात येणारा प्रवेश अतिशय कमी पैशात होतो. विद्यापीठाचा वाढता खर्च व इतरबाबी विचारात घेत शैक्षणिक शुल्क वाढविण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करते आहे असे प्रविण घोडेस्वार यांनी सांगितले. २०२०-२१ शैक्षणिक वर्षापासून शैक्षणिक शुल्क वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. अभ्यास केंद्रांनी विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करावी असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्ध एजंटचे अपहरण, एकास पोलिस कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कमिनशन एजंटकडे विक्रीसाठी दिलेल्या ३० टन आंब्याची रक्कम वसूल करण्यासाठी ६५ वर्षीय कमिशन एंजटचे अपहरण केल्याच्या आरोपात एकाला शनिवारी दुपारी अटक करण्यात आली. मोहसीन ताहेर मियाँ बागवान, असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, सोमवारपर्यंत (२२ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. मोटे यांनी दिले.

या प्रकरणी शेख अय्युब शेख अहेमद बागवान (वय ६५, रा. खोकडपुरा) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, दोन महिन्यांपूर्वी मुनाफ चौधरी याचे (रा. अहमदनगर) चार लाख ३६ हजार रुपये किंमतीचे ३० टन आंबे कमिशनवर अल्ताफ बागवान याला विकण्यासाठी दिले होते. अल्ताफ याने आंब्याचे दोन लाख १० हजार रुपये दिले व उर्वरित पैसे नंतर देण्याचे ठरले. मात्र अल्ताफने पैसे मुदतीत दिले नाही. त्यामुळे मुनाफ चौधरीचा साथीदार व संशयित आरोपी मोहसीन ताहेर मियाँ बागवान (वय २६, काद्राबाद, जालना) याने फिर्यादीला भेटून अल्ताफकडून पैसे घेऊन दे, अन्यथा ते पैसे तुझ्याकडून वसूल करू, अशी धमकी दिली. १८ जुलै रोजी सायंकाळी शेख अय्युब हे पैठण गेट येथील सब्जीमंडीत उभे असताना मोहसीन याने त्याचे अपहरण करून काद्राबादला नाले. फिर्यादीच्या मोबाईलवरून त्यांच्या पत्नीला फोन करून पैसे दिल्याशिवाय त्यांना सोडणार नसल्याचे सांगितले. १९ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादीचा मुलगा रफिक हा पोलिसांना घेऊन काद्राबादला गेला. त्यानंतर फिर्यादीची सुटका करण्यात आली. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन संशयित आरोपी मोहसीनला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करणे तसेच आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याचा तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मध्य’साठी शिवसेनेत पाच इच्छुकांत रस्सीखेच

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभेच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे सुरू झाले आहे. शिवसेनेत औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार शिवसेनेच्या पाच पदाधिकाऱ्यांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

विधानसभेच्या २०१४-१५मध्ये झालेल्या निवडणुकीत मध्य विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेला. या मतदारसंघातून 'एमआयएम'चे इम्तियाज जलील निवडून आले. त्यावेळी शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल आणि भाजपचे किशनचंद तनवाणी यांच्यात लढत झाली होती. त्याचा लाभ जलील यांना झाला. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना, भाजप यांची युती होणार हे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचा मिळून एकच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहील आणि तो निवडून येईल, असे मानले जात आहे. निवडून येण्याची शाश्वती वाटत असल्यामुळे शिवसेनेत इच्छुकांची संख्या वाढली आहे. युतीमध्ये मध्य आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला तर, पूर्व मतदार संघ भाजपला सुटणार आहे.

मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल उत्सुक आहेत. आमदार, खासदार, महापौर म्हणून त्यांनी काम केले आहे. यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेने त्यांना 'मध्य'मधून उमेदवारी दिली होती, पण त्यांना यश आले नाही. जैस्वाल यांच्या बरोबरच जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात आणि युवासेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ इच्छुक असल्याची चर्चा आहे. या पाच जणांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

\Bआदित्य ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची\B

शिवसेनेने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करणे सुरू केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार ठरवताना आदित्य ठाकरे यांच्या पसंतीचे जास्त उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यांच्या पसंतीत 'औरंगाबाद मध्य'चा उमेदवार असण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images