Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शेतकऱ्यांना हवे तंत्रज्ञान निवड स्वातंत्र्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कोणतेही तंत्रज्ञान शेतकरीविरोधी नसते. त्याची शास्त्रशुद्ध तपासणी करणे गरजेचे आहे. 'झीरो बजेट'हेही तंत्रज्ञान आहे. त्याची शास्त्रशुद्ध पाहणी सरकारने, कृषी विद्यापीठांनी करावी. मात्र, ते वापरण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना असावे,' असे मत ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. चारुदत्त मायी यांनी केले. 'अन्नधान्याची उपलब्धता खूप झाली. देश श्रीमंत झाला, अन्नधान्यावर अवलंबून असणारे सर्व उद्योग श्रीमंत झाले. मात्र, शेतकरी श्रीमंत झाला नाही, याचाही विचार करावा लागेल,' या शब्दात त्यांनी वस्तूस्थितीची जाणीव करून दिली.

'शेती: झिरो बजेटची की बीटीची' या विषयावर देवगिरी महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. व्यासपीठावर 'सीआयएएम'चे माजी संचालक डॉ. शालीग्राम वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. मायी म्हणाले, शेतीतील तंत्रज्ञानाचे अनेक पैलू समजून समोर येत आहेत. 'बीटी' तंत्रज्ञानाकडेही प्रगल्भ दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. जनुकीय सुधारित तंत्रज्ञान आज एवढे प्रगत झाले आहे की, निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्याची क्षमता त्यात आहे. भावनात्मक होऊन 'झीरो बजेट शेती, बीटी हवे की नको', असा विचार होता कामा नये. सरकारनेही सक्ती करायची गरज नाही. सरकारने काय योग्य ते सांगायला हवे. काय पेरायचे, काय नाही ते शेतकरी ठरवतील. नव्याने निर्माण झालेल्या शेतीप्रश्नांचा विचार करण्याची गरज आहे. शेतीत उत्पन्न कमी होते, तेव्हा शेतकरी आत्महत्या होत होत्या. आज उत्पन्न प्रचंड प्रमाणात वाढले, ३१ कोटी टन फळांचे, तर ३८० दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पन्न देशात निघते, तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. अन्नधान्याची उपलब्धता खूप झाली. देश श्रीमंत झाला, अन्नधान्यावर अवलंबून असणारे सर्व उद्योग श्रीमंत झाले. मात्र, शेतकरी श्रीमंत झाला नाही. त्याचे कारण आम्ही जे जास्तीचे अन्नधान्य निर्माण केले त्याची विल्हेवाट लावण्याची क्षमता आमच्या धोरणात नाही. अमेरिका, इंग्लडसारख्या अनेक देशांनी सर्वस्तरावर प्रयत्न केले. त्यामुळे त्यांची शेती, शेतकरी टिकला, असे डॉ. मायी यांनी सांगितले.

डॉ. वानखेडे म्हणाले की, विषमुक्त अन्नासाठी सेंद्रीय शेती वाढली पाहिजे असे वाटत असेल तर, आर्थिकदृष्ट्या परवडणारे तंत्रज्ञान उपलब्ध असायला हवे. तरच ती झीरो बजेट शेती ठरेल. यावेळी त्र्यंबक पाथ्रीकर, पंडितराव हर्षे, डॉ. बापू आडकिणे, लक्ष्मण नेहे, भारत रानरुई, अजित नरदे, रावसाहेब घावटे, ललित बहाळे, राम बेळगे, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, अनिल घनवट, जयश्री पाटील यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. भगवानराव कापसे, सूत्रसंचालन श्रीकांत उमरीकर यांनी केले, तर गोविंद जोशी यांनी आभार मानले.

\Bसरकारस्तरावरून व्यवस्थापन आवश्यक\B

तंत्रज्ञानाकडे भावनिक होऊन न पाहता प्रगल्भतेने विचार करावा लागेल. जनुकीय बदलामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली. कमी पाण्यात वाढणारे पीक यावर आपण संशोधन करू शकलो. मात्र, अन्नधान्य निर्माण झाल्यानंतर त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात कमी पडलो. आपली विद्यापीठेही 'लावा, उगवा आणि खूप अन्नधान्य पिकवा' हा मंत्र देत राहिले. तो खर्च करून पिकवले. मात्र, बाजारपेठ शेतकऱ्याच्या हातात राहिले नाही. उगविण्यापासून ते विक्रीपर्यंतचा धंदा तो करू शकला नाही. शेती, शेतीचे उत्पन्न याबाबत व्यवस्थापन जे लागते ते सरकारस्तरावरून झाले नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यात आपण अपयशी ठरलो आहोत, असे डॉ. मायी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिल्लोडमध्ये भरदिवसा घरफोडी; ११ तोळे दागिने रोख लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

घरी कोणी नसल्याची संधी साधून मागचा दरवाजा तोडून भरदुपारी अकरा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम, असा एकूण तीन लाख ८९ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यानी पळविला. ही घटना रविवारी दुपारी एक ते तीनच्या दरम्यान येथील शिक्षक कॉलनीत घडली. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, शिक्षक कॉलनीत सेवानिवृत्त शिक्षक कडुबा देवराव साखळे हे राहतात. आठवडी बाजार असल्याने त्यांची पत्नी रविवारी खरेदीसाठी गेले होते. कडुबा साखळे हे कामानिमित्त बाहेर गेले होते. कायम रहदारीच्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या घराला कुलूप लावलेले होते. चोरांनी मागच्या वाड्याच्या भिंतीवरून उड्या मारीत साखळे यांच्या घराच्या आवारात प्रवेश केला. आतून बंद असलेले दाराचा कडी-कोयंडा लोखंडी अवजाराने दणके तोडला. घरात प्रवेश करून कपाटात शोधाशोध केली. पलंगावरील गादीखाली ठेवलेले रोख २५ हजार रुपये, एक चप्पल हार, एक पोत, एक गंठन, नऊ व सहा ग्रॅमची अंगठी (११ तोळे सोन्याचे दागिने), असा एकूण तीन लाख ८९ हजारांचा ऐवज लंपास केला. दुपारी तीनच्या सुमारास साखळे यांची पत्नी घरी आली, त्यांनी पुढील दाराने घरात प्रवेश केल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आली.

\Bयाच भागात मंगळसूत्र चोरी

\B

सिल्लोड शहरात याच गल्लीत दहा दिवसांपूर्वी सायंकाळी सहाच्या सुमारास शिक्षक दांपत्य फिरत असताना मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील ५५ हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला होता. या घटनेचा तपास लागण्यापूर्वीच ही चोरी झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. पोलिसांच्या कार्यक्षेमतेवर नागरिक प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारसावंगीमध्ये दारूबंदी; बाटली आडवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

बाजारसावंगी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घेतल्यानंतरही उत्पादन शुल्क विभागाने परवानाधारक बिअर बार व देशी दारूचे दुकाने बंद करावे या मागणीला सुमारे दहा महिन्यांनंतर रविवारी यश आले. दारू बंदी करावी, की नको यासाठी तहसीलदारांनी घेतलेल्या मतदानात १७५९ पैकी ११११ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात ९८९ महिलांनी आडव्या बाटलीला मतदान केले, ७३ मते उभ्या बाटलीला पडली. हा निर्णय सायंकाळी जाहीर होताच महिलांनी एकमेकींना पेढे भरवत मिरवणूक काढून फटाके फोडत आनंद व्यक्त केला.

दारू विरोधात गावातील सर्व राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला सारले होते. न ग्रामस्थांनी एकजुटीने बाटली आडवी करण्यात यश मिळवले. तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खुलताबाद तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार अशोक कापसे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. सकाळी आठ ते सायंकाळी पाच पर्यंत मतदानाची वेळ होती. मतदान संपल्यानंतर लगेच मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला. दारू विक्रेत्यांनी यापूर्वी केलेले प्रयत्न महिलांनी धुळीस मिळवले. ग्रामपंचायतीच्या सरपंच लक्ष्मीबाई नलावडे , उपसरपंच पांडुरंग नलावडे, तंटामुक्ती अध्यक्ष कारभारी नलावडे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे, पंचायत समितीचे सदस्य प्रभाकर शिदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील जय बाबाजी भक्त परिवार, सर्व नागरिकांनी यासाठी परिश्रम घेतले.

यावेळी पर्यवेक्षण अधिकारी नायब तहसीलदार अशोक कापसे, राज्य उत्पादन शुल्क विभाग निरीक्षक एम. एस पतंगे, दुय्यम निरीक्षक के. पी. जाधव, एस. एन. राख, मंडळ अधिकारी नंदकुमार कुरुद, बी. एन. गवळी, ए. एल. महाजन, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र दांडेकर, तलाठी बी. बी. जंगले, तुकाराम सपकाळ, पी. ए. चव्हाण, के. डी. घोडके, आर. डी. कऱ्हाळे, प्रकाश बंड, राजकुमार उदावंत, डी. पी. गोरे आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

सिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.

प्रेरणा दिलीप थोरात

Prerana Dileep Thorat

९१.२० टक्के

साताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.

संतोष किसन शिंदे

Santosh Kisan Shinde

९०.२० टक्के

सिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.

विवेक गणेश जाधव

Vivek Ganesh Jadhav

९२ टक्के

रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.

गणेश दामोदर गायकवाड

Ganesh Damodhar Gaikwad

९३ टक्के

गणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.

\Bबळ द्या पंखांना…...\B

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात अडचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.

विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेतील तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला. महापौर नंदकुमार घोडेले यांनी ही माहिती दिली. सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. महापालिकेत वर्ग तीनचे ५५० तर, वर्ग चारचे सुमारे २६०० कर्मचारी आहेत. त्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. पालिकेने मंजूर केलेला प्रस्ताव आता शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासनाच्या मंजुरीनंतर कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा लाभ मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणच्या मुख्य अभियंत्याकडे आठ लाखांच्या खंडणीची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांना आठ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागून तुमची बदनामी करणार नाही, अशी धमकी त्यांना देण्यात आली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने रविवारी सापळा रचून तीन आरोपींना खंडणीची रक्कम घेताना सिडको एन पाच परिसरात अटक केली.

या प्रकरणी महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी तक्रार दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून गणेशकर यांना उदय पालकर नावाची व्यक्ती त्रास देत होती. तुमच्या कार्यालयात वेगवेगळया माहितीच्या अनुषंगाने माहिती अधिकाराखाली अर्ज करून माहिती मागवून तुमची वर्तमानपत्रात बदनामी करणार नाही, यासाठी आठ लाख रुपये द्या अशी मागणी तो करत होता. गणेशकर यांच्या कार्यालयातील लिपिक विनोद सोनवणे याच्यासोबत त्याने ही बोलणी करत रविवारी चार वाजेपर्यंत आठ लाख रुपये आणून दिले नाही, तर बघून घेण्याची धमकी दिली होती. मुख्य अभियंता गणेशकर यांनी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल देत खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंदवला होता.

पोलिसांनी रविवारी सिडको एन पाच मधील जिजामाता शाळेजवळील साई संदेश हॉटेल समोरील मोकळ्या मैदानात सापळा रचला. महावितरणचा लिपिक विनोद सोनवणे याला खंडणीची रक्कम देऊन पाठविण्यात आले. सोनवणे यांच्याकडून रक्कम घेताना संशयित आरोपी उदय पालकरसह दोघांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये मुख्य संशयित आरोपी उदय अरुणराव पालकर (वय ४६ रा. टाउन सेंटर, सिडको एन पाच), भानुदास शंकर मोरे (वय ३१, रा. जयभवानीनगर) आणि अमोल सांडू साळवे (वय ३५, रा. गुलमोहर कॉलनी, सिडको एन पाच) यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त राहुल खाडे, एसीपी गुणाजी सावंत, पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, राजेश बनकर, प्रकाश डोंगरे, स्वप्नील रत्नपारखी, सुरेश भिसे आणि किशोर गाढे यांनी केली.

कोऱ्या कागदाची बंडले

खंडणीची रक्कम खरी वाटावी यासाठी पोलिसांनी दोन हजारांच्या नोटांच्या आकाराची कोऱ्या कागदाची चार बंडले तयार केली. या बंडलावर व खाली प्रत्येकी दोन हजार रुपयांची नोट लावली होती. चार बंडलाला मिळून एकूण १६ हजार रुपये लावण्यात आले होते. ही रक्कम घेताना खंडणी बहाद्दरांना पकडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीच्या पोटात सुरा खुपसणाऱ्यास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने चाकूहल्ला केल्याची घटना १८ जुलै रोजी पहाटे नारेगाव भागात घडली. याप्रकरणी जखमी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सासू, दीर आणि नणंदेविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली.

या प्रकरणी जखमी ज्योती गणेश चुंगडे (वय २२, रा. नारेगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांचे फेब्रुवारी २०१८ मध्ये गणेश चुंगडे याच्यासोबत लग्न झाले आहे. लग्नानंतर काही दिवस चांगले वागवल्यानंतर ज्योतीचा सासरच्या मंडळीकडून छळ सुरू झाला. पती गणेश याला मद्याचे व्यसन असून चारित्र्यावर संशय घेत पत्नीला सातत्याने मारहाण करत असल्याची तक्रार आहे. १८ जुलै रोजी पहाटे ज्योती या स्वच्छतागृहात गेल्या असता गणेशने कुठे गेली होती, अशी विचारणा करत मारहाण केली. त्यानंतर ज्योती झोपलेली असताना गणेशने घरातील कांदे कापण्याच्या चाकूने ज्योतीच्या पोटात चाकू खुपसत ठार मारण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड केल्यानंतर गणेश पळून गेला. शेजारी राहणाऱ्या महिलेने ज्योतीच्या आईला या प्रकाराची माहिती दिली. ज्योतीला उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी गणेश चुंगडे, सासू, नणंद आणि दीर दिनेश चुंगडे यांच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पती गणेशला अटक करण्यात आली असून त्याला २३ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाखा अभियंता, एसटी चालकास मारहाण; गुन्हे दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विविध दोन घटनांत शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. जिल्हा परिषदेचा शाखा अभियंता, तसेच एसटी बसचालकाला मारहाण केल्याप्रकरणी क्रांतीचौक आणि हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना शुक्रवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता अभियान कार्यालयात घडली. धोंडिबा उमाजी बनसोडे (वय ५५) हे खुलताबाद पंचायत समितीत शाखा अभियंता आहेत. ते कामानिमित्त जिल्हा परिषदेत आले होते. तेथे त्यांना मयूर बन्सी वंजारी (रा. सिरसगाव, ता. वैजापूर) हा भेटला. मंजूर अंदाजपत्रकावरून काम करण्याबाबत बनसोडे आणि वंजारी यांच्यात वाद झाला. वंजारी याने, मंजूर अंदाजपत्रकाप्रमाणे काम करणार नाही, असे म्हणत बनसोडे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्यांच्या हातातील ऑफिसचे महत्त्वाचे कागदपत्र फाडून सोबत घेऊन गेला. याप्रकरणी बनसोडे यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी वंजारी विरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजता हर्सूल टी पॉइंट जवळ घडली. योगेश काशीराम मोंडोकर (वय ३२, रा. किनखेड, ता. अकोट, जि. अकोला) हे चालक एस टी बस घेऊन हर्सूलमार्गे जात होते. यावेळी अॅटोरिक्षाच्या (एमएच २० डीसी ३८९४) चालकाने अडवले. माझ्या रिक्षाला धक्का का मारला या कारणावरून कॅबीनमध्ये शिरत मारहाण केली. या प्रकरणी योगेशच्या तक्रारीवरून हर्सूल पोलिस ठाण्यात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कृषी विद्यापीठांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतीय कृषी संशोधन परिषदेने कृषी विद्यापीठांची क्रमवारी जाहीर केली. यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत एक-दोनस्तर वरचा क्रमांक मिळविलेल्या राज्यातील विद्यापीठांपैकी एकही विद्यापीठ पहिल्या २०मध्ये स्थान मिळवू शकलेले नाही. संशोधन, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीसह विविध राष्ट्रीय स्पर्धेत विद्यापीठांची कामगिरी सुमार असल्याने गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे.

कृषी विद्यापीठांच्या वर्षभरातील कामगिरीवर कृषी संशोधन परिषदेने देशातील साठ विद्यापीठांची रँकिंग जाहीर केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ, संशोधन संस्थांचा समावेश असला तरी पहिल्या दहामध्ये स्थान मिळवणे अद्यापही शक्य झालेले नाही. विविध पातळीवर गुणवत्तापूर्ण तपासणीमध्ये हे विद्यापीठे मागे असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. राज्यात चार कृषी विद्यापीठे आहेत. त्यामध्ये राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मराठवाड्यातील परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ-अकोला, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ-दापोली यांचा समावेश होतो. यामध्ये केवळ महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ३४ वरून राष्ट्रीय क्रमवारीत २४ व्या स्थानावर मजल मारली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ३२ व्या क्रमांकावर आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ४५ व्या क्रमांकावर तर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ थेट ४८ व्या क्रमांकावर आहे. क्रमवारीतून विद्यापीठांच्या सुधारणांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पहिल्या दहामध्ये येण्यासाठी विद्यापीठांना मोझी झेप घ्यावी लागेल असे तज्ज्ञांनी सांगितले.

यावर ठरते गुणांकन

भारतीय कृषी संशोधन परिषद विविध पातळीवर विद्यापीठाची गुणवत्ता तपासते. त्यामध्ये विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन, चांगल्या जर्नलमध्ये संशोधनाचे त्यांचे पेपर किती, आंतरष्ट्रीय पातळीवरील कृषी संशोधन, प्रशिक्षणातील सहभाग, राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या 'अॅग्रीकल्चर रिसर्च सायंटिस्ट' (एआरएस) परीक्षेतील गुणवत्ता, देशपातळीवर पदवीस्तरावर होणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षेतील टक्का, जुनिअर रिसर्च फेलोशिप, 'एसआरएफ' परीक्षेतील विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा टक्का, संशोधक शास्त्रज्ञांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार, देशपातळीवरील १०६ संशोधन संस्थेतील विद्यापीठाचे स्थान, एम्पॉमेंट रेषो, विद्यार्थी-शिक्षक रेषो, सोयीसुविधा, विद्यापीठाने किती प्रकारचे वाण विकसीत केले जे राष्ट्रीयस्तरावर प्रमाणीत केले गेले त्यांची संख्या, विविध संस्थांशी सामंजस्य करार अशा विविध पातळ्यावर विद्यापीठांची गुणवत्ता तपासली जाते. त्यानुसार क्रमवारी निश्चित केली जाते.

गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात विद्यापीठे कमी पडतात असे नाही. मात्र, त्यांच्या अडचणी ही अनेक आहेत. 'आयसीएआर' विविध पातळीवर क्रमवारी ठरवते. विद्यापीठासह, शासकीय कृषी कॉलेजांमध्ये रिक्त शिक्षकांचा आकडा मोठा आहे. त्याचा परिणाम शिकविण्यावर निश्चित होतो. खासगी कॉलेजांची वाढती संख्या हा देखील विद्यापीठासमोरचा प्रश्न आहे. या सगळ्या अडचणींमधून विद्यापीठे मार्गक्रमण करत आहेत.

डॉ. अशोक धवण

कुलगुरू

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यात्रेकरूंचा पहिला जत्था हजला रवाना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हज यात्रेकरूंचा पहिला जत्था औरंगाबाद विमानतळावरून रविवारी (२१ जुलै) सकाळी साडेआठच्या सुमारास जेद्दाहकडे रवाना झाले. या विमानातून १६० हज यात्रेकरू रवाना झाले. देशात सुख शांती नांदावी, अशी प्रार्थना करणार असल्याचे हज यात्रेकरूंनी सांगितले.

औरंगाबाद येथील इन्बारकेशन पॉइंटवरून रविवारी हाज यात्रेकरूंचे पहिले विमान जेद्दाहकडे रवाना झाले. त्यांना विमानतळावरून रवाना करण्यासाठी जिल्हा हज समितीने तात्पुरत्या हज कॅम्पमध्ये विविध सेवा उपलब्ध करून दिल्या होत्या. तेथे यात्रेकरूंचे सामानाची विमानतळाच्या नियमानुसार बांधणी करून देण्यात आली. रात्री ११च्या सुमारास १६० यात्रेकरूंचे सामान रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हा हज समितीचे अध्यक्ष सरताज खान, वक्फ बोर्डाचे कार्यवाहक अध्यक्ष एम. एम. शेख यांच्यासह राज्य हज समितीचे सदस्य एजाज देशमुख उपस्थित होते.

यात्रेकरूंना रविवारी जामा मशीद येथील हज कॅम्पमध्ये तिकीट, अन्य आवश्यक कागदपत्रे देण्यात आली. यानंतर यात्रेकरूंनी 'एहराम' बांधून हज यात्रेची सुरुवात केली. त्यापूर्वी यात्रेकरूंना त्यांच्या नातेवाईकांनी निरोप दिला. 'हज यात्रेत आमच्यासाठी प्रार्थना करा,' अशी विनंतीही यात्रेकरूंकडे त्यांच्या नातेवाइकांनी केली. पहाटे दोनच्या सुमारास विशेष तीन बसमधून यात्रेकरूंना विमानतळाकडे पाठविण्यात आले. विमानतळाकडे जाणाऱ्या बसला राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी काँग्रेंसचे हमद चाऊस, राज्य हज समितीचे सदस्य देशमुख यांच्यासह स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी नऊच्या सुमारास औरंगाबादहून जेद्दाहला हज यात्रेकरूंचा पहिला जत्था रवाना झाला.

……

\B२८ यात्रेकरू थेट विमानतळावर पोचले\B

औरंगाबाद विमानतळावरून १६० यात्रेकरूंचा पहिला जत्था रवाना झाला. यामध्ये ८१ पुरूष, ७९ महिला होत्या. यातील २८ हाजी औरंगाबाद शहरात किंवा शहराजवळ राहणार होते. त्यांनी हज कॅम्पमधून हज यात्रेसाठी न येता, कॅम्पमधून हज यात्रेच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून थेट विमानतळावर येण्याबाबत विनंती केली होती. अशा २८ हाजींनी तीनपर्यंत विमानतळ गाठले.

\Bपावसामुळे एक तास आधी रवाना\B

जामा मशीद येथून विमानतळावर यात्रेकरूंना पाच तास आधी नेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सकाळी साडेआठच्या विमानासाठी पहाटे तीन वाजता नेण्यात येणार होते, मात्र रात्री होत असलेल्या पावसामुळे हज यात्रेकरूंना जामा मशीद येथून एक तास आधी रात्री दोन वाजता विमानतळाकडे पाठविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्लीहून जेद्दाहच्या विमानाने आले ७२ प्रवासी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हज यात्रेसाठी औरंगाबादहून जाणारे एअर इंडियाचे विमान आगामी सात दिवस दिल्लीमार्गे शहरात येणार आहे. एअर इंडियाच्या दिल्ली - औरंगाबाद - जेद्दाह या विमानातून ७२ विमान प्रवासी औरंगाबादला आले. दिल्ली - औरंगाबाद विमानातून मंगळवारी ९० प्रवासी येणार असल्याची माहिती एअर इंडियाच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद शहरातून विमान सेवा वाढविण्यात यावी, अशी अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. दिल्लीशिवाय मुंबई कनेक्शन वाढविण्यात यावे, यासाठी औरंगाबाद विमानतळ प्राधिकरण, टूर्स ऑपरेटर आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. औरंगाबाद विमानतळावरून सध्या मुंबई - औरंगाबाद - दिल्ली आणि औरंगाबाद - हैदराबाद या दोन मार्गावर विमान सेवा सुरू आहेत. दिल्लीसाठी सकाळी आणि संध्याकाळी विमान सेवा वाढविण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. या मागणीबाबत येत्या काही दिवसांत काही विमान कंपन्यांकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

हज यात्रेसाठी यंदा एअर इंडियाच्या विमानातून यात्रेकरूंना जेद्दाहकडे पाठविण्यात येत आहे. यात्रेकरूंना घेऊन जाणारे विमान जेद्दाह येथून परत येताना रिकामेच येत असते. रिकामे विमान आणण्यापेक्षा एअर इंडियाने जेद्दाह ते दिल्ली, दिल्ली ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते दिल्ली अशी विमान सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हे विमान जेद्दाहहून दिल्ली येथे येणार आहे. तेथून ते औरंगाबादकडे येईल. त्यामुळे दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांनाही अतिरिक्त विमान सेवा मिळाली आहे. दिल्ली - औरंगाबाद - जेद्दाह हे विमान दिल्ली विमानतळावरून सकाळी सहा वाजून २० मिनिटांनी निघणार असून, ते सकाळी साडेआठपर्यंत औरंगाबाद विमानतळावर पोचणार आहे. पहिल्या दिवशी औरंगाबादला आलेल्या एअर इंडियाच्या विमानातून ७२ प्रवासी औरंगाबादला उतरले आहेत तर, या विमानातून मंगळवारी सुमारे ९० विमान प्रवासी येण्याची शक्यता आहे. येत्या २७ जुलैपर्यंत एअर इंडियाचे दिल्ली - औरंगाबाद विमान सुरू राहणार असल्याची माहिती एअर इंडियाच्या सूत्रांनी दिली. सात दिवस दिल्ली औरंगाबाद एअर इंडियाचे सकाळी येणाऱ्या विमानाला पहिल्याच फेरीत चांगले प्रवासी मिळाले आहे.

\Bदिल्ली - औरंगाबादचा प्रवास\B

येत्या सात दिवसांसाठी औरंगाबादहून जेद्दाहला जाणारे विमान हे दिल्लीहून येणार आहे. या विमानातून प्रवास करण्यासाठी तिकिटाचे दर चार हजार ७०० रुपये आहेत. प्रवाशांच्या मागणी वाढल्यास येत्या काही दिवसांत हे दर वाढण्याची शक्यता आहे.

……

सध्या दिल्ली - औरंगाबाद हे विमान चालविण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारची जाहिरात न करता हे विमान सुरू झाल्यानंतरही त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या विमानाची हीच वेळ निश्चित करून दिल्ली आणि मुंबईशी औरंगाबादला जोडल्यास प्रवाशांची सोय होईल.

- मंगेश कपोते, सदस्य, टुरिस्ट असोसिएशन ऑफ औरंगाबाद

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावाच्या त्रासाला कंटाळून तो आला रेल्वेखाली जीव देण्यास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोठा आणि लहान भाऊ हे दोन्ही मिळून वारंवार त्रास देतात, झोपू सुद्धा देत नाहीत, वारंवार टोमणे मारतात. त्याबद्दल आईकडे तक्रार करून, मी मरायला चाललो, असे सांगितले असता तिने जा म्हटले, त्यामुळे जीव द्यायला आलो, असे सांगणाऱ्या एका १८ वर्षांच्या तरुणाला विशेष पोलिस अधिकाऱ्यांनी वाचविले.

संग्रामनगर उड्डाणपुलाखाली असलेल्या जुन्या रेल्वे क्रॉसिंगजवळच्या रुळाशेजारच्या एका दगडावर एक तरूण रविवारी दुपारी बसला होता. त्यावेळी नांदेडहून मुंबईकडे जाणारी तपोवन एक्स्प्रेस येण्याची वेळ जवळ आली होती. त्याच्या हातात नायलॉनची पिशवी होती. तो बराच वेळ येथे बसलेला असल्याचे लक्षात आल्याने विशेष पोलिस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. त्यांनी गोड बोलून आधी त्याला रुळाजवळून बाजुला घेतले. त्याची आस्थेवाईकपणे चौकशी करत असताना तेथून गेलेल्या तपोवन एक्स्प्रेसचा वेग लक्षात आणून दिला. रेल्वे गेल्यानंतर आत्महत्या का करणार होता, याबद्दल माहिती घेतली असता, त्याचे दु:ख समोर आले.

हा तरुण गादिया विहार येथील रहिवासी असून 'पीओपी'चे काम करून दररोज दोनशे ते तीनशे रुपये कमावत असल्याचे सांगितले. हे तीन भाऊ असून मोठा आणि लहान भाऊ हे दोघे मिळून वारंवार त्रास देतात. नीट जेवू देत नाहीत की झोपूही देत नाहीत. 'त्याबद्दल आज सकाळी आईजवळ त्यांची तक्रार केली. आईने काहीही केले नाही. त्यामुळे वैतागून जीव द्यायला चाललो, असे आईला सांगितले. त्यावर आईनेही 'जा' असे सांगितले. त्यामुळे एका पिशवीत माझे कपडे घेऊन मी घराबाहेर पडलो. दुसरे काहीसूचत नसल्याने रेल्वेखाली जीव देण्याचा निर्णय घेतला,' असे त्या तरुणाने सांगितले.

या तरुणाची कथा ऐकल्यानंतर विशेष पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला जवाहरनगर पोलिस ठाण्यात नेले. तेथे पोलिसांच्या मदतीने त्याच्या आई-वडिलांना पोलिस ठाण्यात बोलवून घेतले. त्यांच्याशी चर्चा केली. आत्महत्या करण्यासाठी आलेला मुलगा भावनिक असून तुम्ही अन्य दोन मुलांसोबत याचाही विचार करा, असे आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर त्याला पालकांसोबत घरी पाठविण्यात आले.

……

\Bलठ्ठ अन् वेंधळेपणामुळे टिंगल \B

आत्महत्या करण्यासाठी आलेला हा तरुण थोडा लठ्ठ असून किंचित वेंधळा आहे. त्यावरून दोन्ही भाऊ त्याची टिंगल करत असत. पोलिस ठाण्यात झालेल्या चर्चेत त्यानेही भावासोबत भांडण करणार नसल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जय भगवान’ची रुग्णालयात स्वच्छता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जय भगवान महासंघाच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) नुकतेच स्वच्छता अभियान राबवण्यात आले; तसेच संघटनेतर्फे रुग्णालयातील स्वच्छतागृहे व स्नानगृहांच्या स्वच्छतेसाठी फिनाइल वाटपही करण्यात आले. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ़. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांच्यासह संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप, डॉ. राजेश खरात, प्रिती मुसांडे, डॉ. विकास राठोड, अमोल जगताप, अजय सुरडकर, शिवराज मुंडे, रवी ढाकणे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जय श्रीराम’ची जबरदस्ती; रिक्षाचालकाला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मारहाण करून तरुणाला 'जय श्रीराम' म्हणण्यास भाग पडल्याप्रकरणी संशयित आरोपी रिक्षाचालक कुणाल उर्फ गणेश विनोद सोनवणे याला शनिवारी (२० जुलै) रात्री अटक करून रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता सोमवारपर्यंत (२१ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले. मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून या तरुणाची सुटका करणाऱ्या एका व्यक्तीची शनिवारी न्यायालयात साक्ष नोंदविण्यात आली.

याप्रकरणी इम्रान इस्माईल पटेल (वय २८, रा. मुजफ्फरनगर, जटवाडा रोड) यांनी फिर्यादी दिली होती. त्यानुसार, ते १८ जुलै रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात असताना हडको कॉर्नरजवळ एकाने रस्त्यात दुचाकी आडवी लावली होती. त्यामुळे त्याने तिच्याबाजुने दुचाकी काढली असता आठ ते दहाजण पळत आले. त्यापैकी एकाने इम्रान यांच्या दुचाकीची चावी काढून घेतली. त्यानंतर तिघांनी मारहाण करन 'जय श्रीराम' म्हणण्यास भाग पाडले. त्यामुळे घाबरून इम्रानने तीनवेळा 'जय श्रीराम' म्हटले. या वेळी आरडा-ओरड झाल्याने तेथे राहणाऱ्या दाम्पत्याने इम्रान यांची टोळक्याच्या तावडीतून सुटका केली.

या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन रिक्षाचालक कुणाल उर्फ गणेश सोनवणे (वय २०, रा. एन-१३, डी सेक्टर, भरत नगर, हडको) याला अटक करण्यात आली. त्याच्यावर यापूर्वी हर्सूल व बेगमपुरा पोलिस ठाण्यात मारहाणीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

यासाठी पोलिस कोठडी

आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांना अटक करणे बाकी आहे. आरोपीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कोणी मदत केली, याचाही तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील आमेर काझी यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षेत सामूहिक कॉपी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागातील सामूहिक कॉपीचा प्रकार तक्रारीनंतर उघड झाला आहे. प्रोफेसर शोभना जोशी यांनी कुलगुरूंकडे तक्रार करताना कॉपीचे चित्रीकरण सादर केल्यामुळे या प्रकारणाचे गांभीर्य वाढले आहे. हा आरोप अंतर्गत वादातून झाल्याची चर्चा आहे. तर सामूहिक कॉपीची पडताळणी करुन कारवाई करण्याबाबत प्रशासन निर्णय घेणार आहे.

विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागात एक ते १० जुलै या कालावधीत एम. एड. द्वितीय सत्राची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचा प्रकार घडला. या परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून जबाबदार व्यक्ती न नेमता फेलोशिपचे विद्यार्थी नेमण्यात आले होते. या विद्यार्थ्यांनी कॉपी न रोखता खुलेआम कॉपी करू दिली. विशेष म्हणजे परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांकडे सर्रास मोबाइल व कॉपीचे साहित्य होते, अशी तक्रार शिक्षणशास्त्र विभागातील डॉ. शोभना जोशी यांनी शनिवारी (२० जुलै) कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे केली. विभागप्रमुखपदाचा अतिरिक्त कार्यभार असलेले आणि मुख्य पर्यवेक्षक असलेले डॉ. सतीश दांडगे परीक्षा सुरू असताना एकही दिवस विभागाकडे फिरकले नाही, असे जोशी यांनी तक्रारीत म्हटले आहे. पर्यवेक्षक म्हणून त्यांनी हजेरीपत्रकावर स्वाक्षरी केली नाही. मौखिक परीक्षेतही दांडगे यांनी निष्काळपणा दाखवला होता. २९ जून रोजीच्या मौखिक परीक्षेत कार्य पूर्ण नसलेल्या विद्यार्थ्यांना पूर्तता प्रमाणपत्र नसताना परीक्षकांसमोर सादर करण्यात आले. तसेच सरसकट कॉपीची सूट देण्यामागे आर्थिक व्यवहार झाला असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप जोशी यांनी केला.

दरम्यान, सामूहिक कॉपीचा प्रकार विद्यापीठाच्या प्रतिमेस काळिमा फासणारा आहे. तसेच विभागाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. त्यामुळे परीक्षेसारख्या संवेदनशील कामात निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल डॉ. सतीश दांडगे आणि परीक्षा विभागाच्या डॉ. सांत्वना मिश्रा यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी डॉ. शोभना जोशी यांनी केली आहे.

कॉपीचे चित्रीकरण दिले

एम. एड. द्वितीय सत्राच्या परीक्षेत सामूहिक कॉपी झाल्याचा प्रकार सीसीटीव्हीत चित्रीत झाला आहे. हे चित्रीकरण जोशी यांनी पेन ड्राइव्हमध्ये तक्रारीसोबत जोडले आहे. कॉपी झाल्याचा पुरावा सादर केल्यामुळे कुलगुरू डॉ. येवले कडक कारवाई करण्याची शक्यता आहे. शिक्षणशास्त्र विभागाचा कारभार काही वर्षांपासून वादग्रस्त ठरला आहे. अंतर्गत वादातून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सर्जनशील लेखन हा ‘स्व’चा शोध!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'लेखक पुरस्कार किंवा प्रसिद्धीसाठी लिहीत नसतो. जगण्याचा शोध घेण्यासाठी आणि प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी लिहितो. सर्जनशील लेखन म्हणजे 'स्व'चा शोध आणि भवतालाचा वेध असतो,' असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. वसंत पाटणकर यांनी केले. ते पुरस्कार प्रदान कार्यक्रमात बोलत होते.

मराठवाडा साहित्य परिषदेचा २०१८ या वर्षीचा ग्रंथ पुरस्कार प्रदान कार्यक्रम रविवारी सायंकाळी झाला. यावेळी ज्येष्ठ समीक्षक डॉ. वसंत पाटणकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, नाटककार प्रेमानंद गज्वी, डॉ. सु. भि. वराडे, डॉ. दत्ता घोलप, किरण गुरव, प्रकाशक अनिल कुलकर्णी, सुचिता खल्लाळ, डॉ. दादा गोरे, के. एस. अतकरे, पुरस्कार निवड समितीचे शेषराव मोहिते आणि सुरेश सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटणकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लेखन प्रक्रियेवर पाटणकर यांनी भाष्य केले. 'सर्जनशील लेखन 'स्व'चा शोध असतो तर, समीक्षात्मक लेखन या शोधाचा शोध असते. लेखन लेखकालाही प्रेरणा देणारे असते. पुरस्काराने नवीन लेखकांना प्रेरणा मिळते. त्यामुळे लेखन आणि सन्मान आवश्यक बाबी आहे,' असे पाटणकर म्हणाले.

'लिहिणाऱ्याची दखल घेऊन सन्मान केला जातो पण, लिहिणाऱ्याची 'स्पेस' सांभाळणाऱ्यांची एक मोठी परंपरा मराठवाड्यात आहे. म. भि. चिटणीस या परंपरेतील होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे मोठा सन्मान आहे. सध्याचा काळ गोष्ट हरवण्याचा आहे. या काळात गोष्ट व लेखकाला सांभाळण्याचे काम करावे लागेल. मराठवाडा साहित्य परिषद आणि कौतिकराव ठाले पाटील ते काम करीत आहेत', असे दत्ता घोलप म्हणाले. 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य केवळ आजची स्थिती नाही. पूर्वीसुद्धा ही स्थिती होती. त्यामुळे भूमिका महत्त्वाची ठरते. कवितेची परखड समीक्षा आवश्यक आहे. तरच सुमार कवितांचे फोफावलेले पीक कमी होईल', असे सुचिता खल्लाळ म्हणाल्या. डॉ. कैलास इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\Bसाहित्यकृतींचा सन्मान\B

मराठवाडा साहित्य परिषदेच्या ग्रंथ पुरस्काराने दर्जेदार साहित्यकृतींचा सन्मान करण्यात आला. प्रेमानंद गज्वी (छावणी), डॉ. सु. भि. वराडे (पहिल्या सरीचा मृदगंध), डॉ. दत्ता घोलप (मराठी कादंबरी - आशय आणि आविष्कार), किरण गुरव (जुगाड-कादंबरी), प्रकाशक अनिल कुलकर्णी, सुचिता खल्लाळ (पहिल्या प्रलयानंतरची तळटीप) यांच्या साहित्यकृतींचा त्यात समावेश आहे. दर्जेदार कलाकृतींचा शोध घेऊन साहित्य पुरस्कार दिल्याचे शेषराव मोहिते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्या चंद्रावरोहणाची उलगडली कथा

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

'अपोलो ११' यानातून मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. हे यश नील आर्मस्ट्रॉंग किंवा एडविन ऑल्ड्रिनचे नव्हते तर कित्येकांनी अनेक वर्षे सातत्याने चिकित्सक वृत्ती, असामान्य बुद्धी, अविरत परिश्रम, चिकाटी आणि मेहनतीने हे यश खेचून आणले होते, अशा शब्दांत खगोल अभ्यासक, लेखक सुधीर फाकटकर यांनी पहिल्या चंद्रावरोहणाची कथा उलगडली.

माणसाने चंद्रावर पाऊल ठेवल्याचा घटनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्रातर्फे सुधीर फाकटकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेएनईसीचे प्राचार्य डॉ. हरिरंग शिंदे, विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुधीर फाकटकर लिखित 'अपोलो ११' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

इंग्रजांविरुद्धच्या लढाईत टिपू सुलतानने अग्निबाण वापरले होते. त्यावर संशोधन करून इंग्रजांनी या शोधात प्रगती केली. पुढे दुसऱ्या महायुद्धापर्यंत अग्निबाणांनी अधिकाधिक दूरवर मारा करण्याच्या क्षमता प्रचंड वाढल्या. यातूनच पुढे अवकाशात उपग्रह सोडण्याची कल्पना पुढे आली आणि प्रक्षेपकांच्या, उपग्रहांच्या आणि अंतराळयानांच्या शोधाला गती मिळाली. जर्मनी, रशिया आणि अमेरिका या तीन देशांच्या तीव्र स्पर्धेतून चांद्रमोहिमेची बिजे रोवली गेली. वैज्ञानिक जगातील स्पर्धेत अपोलो एक ते अपोलो ११ पर्यंतच्या मोहिमांमध्ये अमेरिका सरस ठरत गेली. यात अनेक अपघात झाले. अंतराळवीरांचे बळी गेले. अखेर अपोलो ११ यानातून नील आर्मस्ट्राँग, एडविन ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स यांनी चंद्रावरोहण यशस्वी केले असा प्रवास फाकटकर यांनी वर्णन केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांनी पकडले मोराची शिकार करणाऱ्यास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

डोंगरालगत फिरून मोराची शिकार करणाऱ्या एकाला शेतकऱ्यांनी रंगेहाथ पकडून वनविभागाच्या स्वाधीन केले, तर दोन जण पळून गेले. ही घटना रविवारी दुपारी बाराच्या सुमारास तालुक्यातील पळशी शिवारातील खांडी डोंगरालगत घडली. चौली बाबू भोसले (वय २५, रा. कायगाव, ता. सिल्लोड) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

पळशी शिवाराला लागून असलेल्या डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आहेत. त्यामुळे बाहेरील लोक येऊन शिकार करतात, असा सुगावा शेतकऱ्यांना लागला होता. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास दुचाकीवरून तिघे खांडी डोंगरालगत आल्याचे निदर्शनास आले. एका शेतकऱ्याने ही माहिती तत्काळ दत्ता बडक, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष गजानन बडक, उपसरपंच नारायण बडक, पोलिस पाटील सुदाम जैवाळ, काकासाहेब बडक यांना दिली. त्यांनी ही खांडी डोंगरालगत धाव घेत, शेतकऱ्यांसह दबा धरला. शिकारीसाठी आलेल्या तिघांनी लावलेल्या जाळ्यात एक मोर अडकला. मोर जाळ्यात अटकताच दबा धरून बसलेल्या शेतकऱ्यांनी त्या तिघांना पकडण्यासाठी धाव घेतली. तोपर्यंत शिकाऱ्यांपैकी एकाने मोराची मान मोडली. शेतकरी व त्या तिघांच्या झटापटीत दोघे दुचाकीवरून पळून गेले, तर एकाला पकडण्यात आले. ही माहिती वनविभागाला देताच सिल्लोडचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी दहिवाल, वनपाल आसाराम राठोड, अण्णा वाघ, वनरक्षक त्रिंबक मनगटे, हरिभाऊ चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन संशयित आरोपी व मृत मोरास ताब्यात घेतले. ताब्यातील व पळून गेलेले दोघे अशा तिघांविरोधात भारतीय वनविभाग संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती दहिवाल यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घृष्णेश्वर मंदिर विकासाचा १३ कोटी ३३ लाखांचा निधी प्राप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वेरूळ येथील श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिराच्या विकास आराखड्यासाठी ११२ कोटी ४१ लाख रुपयांच्या निधीची तरतूद सन २०१९-२० च्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी १३ कोटी ३३ लाख ३५ हजार रुपयांचा निधी शासनाने २० जुलै रोजी शासननिर्णयाद्वारे जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्याकडे वितरित केला आहे. या आराखड्यातील कामे दोन टप्प्यात ३१ मार्च २०२० पर्यंत पूर्ण करायची आहेत.

या आराखड्याला ९ ऑगस्ट २०१८ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. हा आराखडा शिखर समितीच्या मान्यतेने नियोजन विभागामार्फत राबविण्यात येत आहे. घृष्णेश्वर मंदिर विकास आराखड्यानुसार मंदिर परिसराचा कायापालट करण्यासाठी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार प्रशांत बंब लक्ष देऊन प्रयत्न करत आहेत. घृष्णेश्वर मंदिराला भेट देणाऱ्या पर्यटक व भाविकांना सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी विकास आराखडा सादर केला होता. त्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने ७ मार्च २०१८ रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली होती. ९ ऑगस्ट २०१८ रोजीच्या नियोजन विभागाच्या शासन निर्णयान्वये त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. औरंगाबादचे जिल्हाधिकारी हे या आराखड्यातील कामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी संनियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत.

या आराखड्यातील काही कामास तांत्रिक मान्यता देताना स्थानिक परिस्थितीनुसार अंशत: काही बदल किंवा सुधारणा करण्यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती करण्यात आली आहे. आराखड्यातील कामे दोन टप्प्यात ३१ मार्च २०२० पर्यंत पूर्ण करावयाची आहेत. आराखड्यातील ज्या कामांना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची परवानगी घेणे आवश्‍यक आहे, तिथे अशा मान्यता प्राप्त करून घेण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. आराखड्यातील कामांसाठी आवश्‍यकतेनुसार सल्लागारांची नियुक्ती करता येईल. आराखड्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती देवस्थान संस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात येणार आहे.

\Bअसा आहे आराखडा \B

सुंदर वास्तुशिल्प असलेले प्रवेशद्वार, ऐतिहासिक पाश्वभूमीची माहिती देणारी संरक्षण भिंत, वाहनतळ, पोलिस मदत केंद्र, पर्यटक स्वागत कक्ष, कार्यालय, उपहारगृह, हस्तकलेच्या वस्तूंची दुकाने, बेल व फुलांची दुकाने, नियंत्रण कक्ष, चप्पल-बूट स्टॅण्ड, डिजिटल लॉकर रूम, देवस्थान संस्थान कार्यालय, आरोग्य कक्ष, लहान मुलांसाठी काळजी कक्ष, स्वच्छतागृहे, तिकीट कक्ष, भक्त निवास, होमकुंड, व्हीआयपी कक्ष, बस स्टॅण्ड, त्रिशूळ, डमरू, दीपमाळा, नंदी, बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती, दगडी पाथवे, अंतर्गत रस्ते, दर्शन रांग, भुयारी मार्ग, येळगंगा नदीवर दर्शन रांगेसाठी पूल, पोलिसांसाठी निरीक्षण मनोरा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेंदुरवाद्यात कत्तलखान्यावर छापा, दोघांवर गुन्हा

$
0
0

वाळूज महानगर: गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा येथे जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्यावर छापा मारून मांस, कातडे, हाडे तसेच जीवंत गायी रविवारी सकाळी आठ वाजता वाळूज पोलिसांनी जप्त केल्या. शकील कुरेशी (वय २०), व समद मेहमूद कुरेशी (वय ५०, दोघे रा. शेंदुरवादा) या दोघांविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथे जनावरे कापून मांस विकले जात आहे, अशी माहिती गोरक्षक दलाला मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी घराची झडती घेतली असता मांस, कातडी, शिंगे, हाड, धारदार हत्यारे, वजन काटे आढळून आले. यावेळी बाजार तळाजवळील घरामध्ये अवैधरित्या मांस विक्री केली जात असल्याचे दिसून आले. समद कुरेशी याने घर बंद करून मांस फेकण्याचा प्रयत्न केला, तसेच घरामागील पत्रा काढून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला गोरक्षक दलाच्या मदतीने पकडले. घटनास्थळी मिळालेल्या दोन गाई गोशाळेत पाठविण्यात आल्या असून येथे मिळालेले मांसांची तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात आले आहे. ही कारवाई उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, एस. एस. राजपूत, व्ही. व्ही. चाटे, जे. डी. मिठ्ठे, पी. सी. कोतकर, चालक घुसुंगे यांच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images