Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सोनोग्राफीमुळे बालमृत्युचे प्रमाण कमी करणे शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रसुतीकाळातील विविध प्रकारच्या आजार व अवस्थांच्या निदान तसेच उपचारांसाठी सोनोग्राफीचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपत्कालिन परिस्थितीतही सोनोग्राफी ही मार्गदर्शक म्हणून काम करते. सोनोग्राफीमुळेच्या अचूक वापरामुळे माता तसेच बाल मृत्युचे प्रमाण आणखी कमी करता येऊ शकेल, असे प्रतिपादन नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. अनघा वैद्य-देशपांडे यांनी केले.

महाराष्ट्र क्ष-किरणशास्त्र संघटनेच्या शहर शाखेच्या वतीने हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे दोन दिवसीय क्ष-किरणशास्त्र परिषदेचा रविवारी (२८ जुलै) समारोप झाला. या वेळी 'सोनोग्राफी तंत्राचा प्रसुतीकाळातील वापर; कायद्याची भिती' यावर त्या बोलत होत्या. डॉ. वैद्य पुढे म्हणाल्या, सोनोग्राफी हे उपकरण इतर अनेक आजारांच्या निदानाबरोबरच गरोदर महिलांच्या निरनिराळ्या आजार व अवस्थांच्या निदानासाठी उपयुक्‍त ठरते. याच सोनोग्राफीमुळे गर्भातील बाळाला काही व्यंग आहे का, व्यंग असतील तर त्यावर उपचार शक्य आहेत का, कशा पद्धतीने उपचार करता येतील, अशा विविधांगी पद्धतीने उपकरणाचा उपयोग होतो. मात्र पीसी-पीएनडीटी कायद्याच्या जाचक अटींमुळे क्ष-किरणतज्ज्ञांमध्ये सोनोग्राफीविषयी भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कायद्यातील जाचक अटी शिथील करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. 'गर्भातील बाळाला होणारे आजार आणि त्यावर उपाययोजना' या विषयावर बंगळुरू येथील डॉ. रचिता राममूर्ती, डॉ. मंजुषा कुलकर्णी, डॉ. स्वाती आढाव, डॉ. ज्योती रॉय यांनी मार्गदर्शन केले. परिषदेत ३०० क्ष-किरणतज्ज्ञांनी सहभाग नोंदवला. परिषदेसाठी परिषदेच्या अध्यक्ष डॉ. शिल्पा सातारकर, सचिव डॉ. सोनाली साबू, डॉ. शुभांगी शेटकार, कोषाध्यक्ष डॉ. रिंकू पळसकर, डॉ. प्रमोद लोणीकर, डॉ. संदीप कवठाळे आदींनी पुढाकार घेतला.

\Bजनजागृती मोहीम राबवणार

\Bगर्भलिंग निदान करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र यासाठी डॉक्टरांनाच विनाकारण दोषी ठरविले जात आहे. अनेक क्ष-किरणतज्ज्ञांना अपत्य म्हणून केवळ मुलीच आहेत. मग दोन मुली असतील किंवा एकच मुलगी असेल. हीच बाब समाजापुढे घेऊन जाण्यासाठी क्ष-किरणतज्ज्ञ संघटना राज्यभरात 'मुलगा मुलगी एक समान'चा नारा देत जनजागरण करणार आहेत, असा निर्णय परिषदेच्या समारोपात घेण्यात आल्याचे डॉ. शुभांगी शेटकार म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्टोन क्रशरचे टाळे तोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज महानगर

स्टोन क्रशरचे टाळे तोडून खदानीतून बेकायदा उत्थनन सुरू केल्याचा प्रकार गुरुधानोरा (ता. गंगापूर) येथे उघड झाला. महसूल अधिकाऱ्यांनी या 'स्टोन क्रशर'ला 'सील' केले होते. नागरिकांच्या तक्रारीनंतर २७ दुलै रोजी मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे.

गुरुधानोरा येथील गट क्रमांक ८३मध्ये शिवाजी काशिनाथ चिडे व गट क्रमांक ८१/१मध्ये मनसुख नारायण कोपनर यांच्या मालकीच्या स्टोन क्रेशरचे 'सील' तोडून खडी तयार केल्याप्रकरणी पंचनामा करण्यात आला. या दोन्ही स्टोन क्रेशरला नागरिकांच्या तक्रारीनंतर दीड महिन्यापूर्वी महसूल विभागाने सील ठोकले होते, मात्र त्या ठिकाणी खदानीत जिलेटिनचे स्फोट करून उत्खनन केले जाते, क्रेशरने बांधकामासाठी लागणारी विविध आकाराची खडी तयार केली जात असल्याची तोंडी तक्रार परिसरातील नागरिकांनी उपजिल्हाधिकारी संदीपान सानप याना केली होती. त्यांनुसार त्यांनी गंगापूरच्या तहसीलदारांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शेंदुरवादा येथील मंडळधिकाऱ्यांनी २७ जुलै रोजी स्थानिक पंचांना सोबत घेऊन पंचनामा केला. यावेळी मंडळाधिकाऱ्यानी क्रशर चालक चिडे याना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी,'ते मशीन दुरुस्तीसाठी वाळूज एमआयडीसी येथे पाठवले असून, त्याजागी हे नवीन मशीन बसवले आहे,' अशी माहिती दिली. दुसऱ्या क्रेशरवर उपस्थित असलेल्या महादेव धोंडिबा जाधव यांना याबाबत विचारले असता,' मी दोन दिवसांपूर्वीच कामावर आलो आहे. त्यामुळे याची माहिती मला सांगता येणार नाही,' असे सांगितले. खदान उत्खनन, स्टोन क्रेशर वापरण्यासाठी परवानगीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केले असून, अजून त्याची मान्यता मिळाली नसल्याचे क्रेशर चालकाने यावेळी सांगितले. यावेळी या ठिकाणी बांधकामासाठी वापरली जाणारी दहा मिलीमीटर जाडीची ३० ब्रास, सहा एमएम १२ ब्रास, २० एमएम चार ब्रास खडी परवानगी नसताना अवैधरित्या तयार केल्याचे आढळून आले असून, याचा उल्लेख पंचनाम्यात करण्यात आला आहे.

क्रेशरमधून धुळीचे लोट उठत असल्याने विद्यार्थी, शेतकरी; तसेच जवळच असलेल्या मुक्तेश्वर साखर कारखान्यातील कामगारांना दम्यासारख्या आजाराचा सामना करावा लागत असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. या त्रासाला कंटाळून परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा महसूल विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेत अवैधरित्या चालणाऱ्या स्टोन क्रशरवर दंडात्मक कारवाई केली होती. कोट्यवधी रुपयाचा दंड ठोठवल्यावर तो भरल्या शिवाय क्रशर सुरू करायचे नाही, असे सांगितले होते मात्र, परवानगी शिवाय काही दिवसांतच स्टोन क्रशर सुरू झाल्याने शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत असून, परिसरातील नागरिकाचे आरोग्य धोक्यात येत आहे. स्फोटातून उडालेल्या दगड लागल्याने जीवित हानी होऊ शकते.

\Bजिलेटिनच्या स्फोटांमुळे धोका\B

इसारवाडीफाटा ते शेंदूरवादा यादरम्यान असलेल्या गुरुधानोरा येथे असलेल्या खदानीत जिलेटिनद्वारे स्फोट घडवून दगडाचे उत्तखनन केले जाते. तेथेच स्टोन क्रेशरद्वारे खडी तयार केली जाते. रस्त्याच्या जवळच असलेल्या खदानीतील स्फोटमुळे दगड उडून जीवित हानी होण्याची भीती आहे. काही दिवसापूर्वी येथील छत्रपती महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याला दगड लागल्याने जखमी झाल्याची घटना घडली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावोगावी शेततळी...

$
0
0

गेल्या तीन-चार वर्षांपासून मराठवाड्यात पाऊस कमी होत आहे. परिणामी भूजल पातळी दिवसोंदिवस खोल जात आहे़ म्हणूनच 'सर्वांसाठी पाणी' हे ब्रीद घेऊन तीन वर्षांपूर्वी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले. या अभियानांतर्गत तब्बल ४४ हजार ३२७ हजार शेततळी पूर्ण झाले आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत गावोगावी शेततळी पूर्ण करत उद्दिष्टापेक्षा जास्त काम केले आहे.

९६ टक्के उद्दिष्ट साध्य

मागेल त्याला शेततळे देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. २०१६ - २०१७ या वर्षात ५१ हजार ५०० शेततळी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात मराठवाड्यात १६ हजार २०० शेततळे करण्यात येणार होते, दरम्यानच्या काळात नेहमीच उद्दिष्ठ वाढवण्यात येऊन आता सध्या मराठवाड्यातच ४६ हजार १०० शेततळे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या तुलनेत आतापर्यंत तब्बल ४४ हजार ३२७ शेततळी (९६ टक्के) तयार करण्यात आली आहेत. दरम्यानच्या काळामध्ये बीड जिल्ह्यासाठी पूर्वी साडेसहा हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट होते मात्र, यानंतर जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत ते १३ हजार करून घेतले. यामध्येही जिल्ह्याने आतापर्यंत ६७ टक्के काम पूर्ण केले आहे.

पावसाची प्रतीक्षा

पावसाची अनियमित्ता शेतकऱ्यांच्या नुकसानीचे कारण ठरू नये. पावसाने ओढ दिलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना मुबलक पाणीसाठा त्यांच्या जवळच उपलब्ध व्हावा, या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यात शेततळी तयार केली आहेत. आता या शेततळ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

तीन जिल्ह्यांची अनास्था कायम

अभियानात प्रारंभीपासूनच लातूर व नांदेड जिल्ह्यांची असलेली पिछाडी आजही कायम आहे. दोन्ही जिल्ह्यांसाठी देण्यात आलेले उद्दिष्ट अद्यापही पूर्ण झालेले नाही. अशीच अवस्था उस्मानाबाद जिल्ह्याची आहे. लातूर जिल्ह्याचे ४८ टक्के, उस्मानाबाद ८९ टक्के, नांदेड ६३ टक्के तर, परभणी जिल्ह्यात ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे.

शेततळ्यांची जिल्हानिहाय स्थिती

जिल्हा.............उद्दिष्ट.........पूर्ण........टक्केवारी

औरंगाबाद........९१००.....१३०२०.......१४३ टक्के

जालना............६०००......८२१५........१३७ टक्के

बीड................१३०००....८७१६........६७ टक्के

लातूर..............४८००.....२२९४.........४८ टक्के

उस्मानाबाद......३७००.....३२९१..........८९ टक्के

नांदेड.............४०००......२५२५.........६३ टक्के

परभणी............३०००......२९५९.........९९ टक्के

हिंगोली...........२५००.......३३०७.........१३२ टक्के

एकूण.............४६१००.....४४३२७.......९६ टक्के

शेततळ्यातील पाणी म्हणजे बँकेतील अकाउंटमधील पैसे. शेतकऱ्यांना गरज असेल तेव्हा शेततळ्यातील पाणी वापरू शकतो. उन्हाळ्यामध्ये विहिरीचे पाणी आटल्यानंतरही शेतकऱ्यांना शेततळ्यांचा आधार असल्यामुळे सरकारची ही सर्वात चांगली योजना आहे. शेततळ्यांसाठी आवश्यक असलेल प्लास्टिक अस्तर शासनाने उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

- डॉ. भगवानराव कापसे, कृषी शास्त्रज्ञ.

(संकलन : रामचंद्र वायभट)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

सिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.

प्रेरणा दिलीप थोरात

Prerana Dileep Thorat

९१.२० टक्के

साताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.

संतोष किसन शिंदे

Santosh Kisan Shinde

९०.२० टक्के

सिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.

विवेक गणेश जाधव

Vivek Ganesh Jadhav

९२ टक्के

रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.

गणेश दामोदर गायकवाड

Ganesh Damodhar Gaikwad

९३ टक्के

गणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.

\Bबळ द्या पंखांना…...\B

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात अडचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.

विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद मॉडेल राज्यभर राबविणार…

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभेत मिळविलेला विजय हा 'जश्न ए इम्तियाज' म्हणून साजरा केला जात आहे. हा जश्न ए इम्तियाज नव्हे तर हा 'जश्न ए औरंगाबाद' आहे. औरंगाबादकरांनी ऐतिहासिक बदल घडविला आहे. लोकसभेतील विजयाचे औरंगाबाद मॉडेल हे बीड, नांदेड, मालेगाव, नागपूरसह राज्यातील अन्य भागात राबविण्यात येणार असल्याची घोषणा खासदार इम्तियाज जलील यांनी केली. शहरात रविवारी (२८ जुलै) आझाद चौक येथून विजयी मिरवणूक काढण्यात आली. खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमचे नगरसेवक, तसेच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही रॅली आझाद चौक, रोशन गेट, चंपा चौक, शहाबाजार, लोटाकारंजा, सिटीचौक, पोस्ट ऑफिसमार्गे भडकल गेट येथे पोहोचली. ठिकठिकाणी खासदार इम्तियाज जलील यांचे स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीची सांगता भडकल गेट येथे सभा घेऊन करण्यात आली.

यावेळी खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीने लोकसभेत विजय मिळविला. विधानसभा निवडणुकीतही हीच युती प्रभावी ठरणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पक्षाच्या नेते एमआयएमला जातीयवादी पक्ष म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते. आता त्यांच्याच पक्षातील नेते भाजपा, शिवसेनेकडे चालले आहेत. कांग्रेसने लोकसभा निवडणुकीत २५ उमेदवार विविध मतदार संघात उभे केले होते. त्यापैकी फक्त एक उमेदवार विजयी झाला आहे. एमआयएमने राज्यात एकच उमेदवार दिला होता. तो विजयी झालेला आहे. एमआयएम हा 'बाप' असल्याचेही त्यांनी सांगितले.

विधानसभेशिवाय आगामी महापालिका निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम विजय मिळविणार असल्याचेही भाकित त्यांनी केले. एमआयएमकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याचेही ते म्हणाले. विदर्भातून ब्राह्मण समाजाचे काही जण, तर मराठा समाजाचेही अनेकजण एमआयएमसोबत येण्यास इच्छुक आहेत, असेही जलील यावेळी म्हणाले.

पाच तास चालला 'जश्न ए इम्तियाज'

हिरवा, निळा गुलाल उधळून एमआयएम कार्यकर्त्यांनी 'जश्न ए इम्तियाज' हा विजयी उत्सव साजरा केला. ४.४ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी या विजयी रॅलीला तब्बल पाच तासांचा अवधी लागला. ढोल ताशांचा गजर, फुलांची उधळण करीत ठिकठिकाणी खासदार इम्तियाज जलील यांचे स्वागत करण्यात आले. या ठिकाणी टँकरच्या माध्यमातुन रॅलीत पाण्याचीही फवारणी करण्यात आली.

एमआयएमच्या सभेत 'वंचित' दूरच

रविवारी काढण्यात आलेल्या या विजय रॅलीमध्ये वंचितचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर सहभागी होतील अशी अपेक्षा होती. मात्र, ते मिरवणुकीत आलेच नाहीत. शिवाय वंचित बहुजन आघाडीचा एकही नेता जश्न इम्तियाजच्या भडकल गेट येथील सभेत मंचावर नव्हता.

नशेखोरांवर कारवाई करा अन्यथा आंदोलन करू

जलील यांनी सभेत सांगितले की, पोलिसांनी शहरात नशेखोरीचे पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. माझी पिढी नशेने नष्ट होताना मी माझ्या डोळ्यासमोर पाहू शकत नाही. जर पोलिसांनी ही कारवाई केली नाही. तर पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा खासदार जलील यांनी दिला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही समाजकंटक शहरातील वातावरण बिघडवू पाहत आहेत. मात्र, ते बिघडणार नाही, शातता राहील याची काळजी घेण्याची जबाबदारी एमआयएमसह 'वंचित'च्या कार्यकर्त्यांची आहे, असेही यावेळी जलील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राफेलप्रश्नी राहुल गांधींना का पुढे केले?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

नरेंद्र मोदींनी काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या करारांतर्गत १२५ राफेल विमानांच्या किमतीत केवळ ३५ लढाऊ विमाने खरेदी केली. त्यामुळे राफेल खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला. यावर बोलण्याचा अधिकार केवळ तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना असताना राहुल गांधींना काँग्रेसने पुढे का केले, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी वैजापूर येथे आयोजित जाहीर सभेत केला.

दरवर्षी व्याजापोटी तब्बल ६४ हजार कोटी भरणारे सरकार जमिनीसह आहे ते विकून तिजोरी भरत असल्याने सरकारची अवस्था आज एखाद्या दारुड्यासारखी झाली आहे, अशी टीका त्यांनी केली. शिवसेनेचे नेते व माजी उपनगराध्यक्ष अकील शेख यांच्यासह सहकाऱ्यांनी आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित आघाडीमध्ये प्रवेश घेतला. त्यानिमित्त डेपो रस्त्यावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. प्रदेश महासचिव किसन चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भारिपचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र सिरसाठ, जालन्याचे डॉ. शरदचंद्र वानखेडे, युवा आघाडीचे अमित भुइगळ यांची प्रमुख उपस्थिती होती. अकील शेख, गफूर शेख, इरफान शेख, रियाज शेख, मुकुंद सोनवणे, अॅड. राफे हसन, राजेंद्र बागूल, लक्ष्मण धनेश्वर, सय्यद हिकमत यांनी बाळासाहेबांचे स्वागत केले.

राज्याचे अनेक प्रश्न आहेत. ब्रिटिशांनी केलेल्या कामांमुळे काही भागांना निसर्गाचे पाणी वापरता येते, पण काही भागात पाणीच नसल्याने दरवर्षी राज्याच्या एका भागात टँकरने पाणीपुरवठा तर, दुसऱ्या भागात ओला दुष्काळ, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे गुजरातकडे जाणारे तापीचे पाणी महाराष्ट्राकडे वळवले पाहिजे. मन्याडची उंची वाढवून वैजापूरकरांना पाणी देण्याबाबत राज्यकर्त्यांनी काय केले, असा प्रश्न त्यांनी केला.

किसन चव्हाण, अमित भुईगळ यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमात अझहर बेग, डॉ. राफे हसन, अल्ताफ बाबा, कलीम कुरेशी, सुधाकर सोनवणे, एकनाथ त्रिभुवन, रावसाहेब त्रिभुवन यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आघाडीत प्रवेश केला. मुकुंद सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.

\B

शिवसेनेवर टीका\B

शिवसेना विमा कंपन्यांचे भांडवल करत आहे पण, प्रत्यक्षात शिवसेना दुतोंडी सापासारखी वागत आहे, अशी टीका बाळासाहेबांनी केली. विमान अपहरण प्रकरणात तत्कालीन भाजप सरकारने अपहरणकर्त्यांना ५०० कोटी रुपयांची बिदागी दिली, असा खळखळजनक आरोप त्यांनी केला. पाकचा एकदाचा सोक्षमोक्ष लावा, असा सल्ला देत बाळासाहेबांनी पुन्हा एकदा भाजपला टीकेचे लक्ष्य केले. निवडणुकीत ईव्हीएम यंत्राला पराभूत करायचे असेल तर, वंचितच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाषा विषयांच्या अभ्यासक्रम रचनेत बदल आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाषा विषय केवळ विचार, भावनांचे साधन राहून चालणार नाही, ते अर्थाजनाचे साधन झाले पाहिजे. त्यासाठी भाषा विषय अभ्यासक्रमाच्या रचनेत बदल करत, भाषिक कौशल्य विकसित करणारी प्रणाली निर्माण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. भीमराव भोसले यांनी केले. 'अध्ययन फलितांवर आधारित अभ्यासक्रम' विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

श्री मुक्तानंद महाविद्यालयातर्फे नवीन शैक्षणिक धोरणानुसार या कार्यशाळा आयोजित करण्यात आली. देवगिरी कॉलेजच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला व्यासपीठावर पंडितराव हर्षे, अॅड. लक्ष्मणराव मनाळ, प्राचार्य डॉ. मधुसूदन सरनाईक, प्राचार्य आर. टी. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. भोसले म्हणाले, समाज सतत बदलत असतो. काळानुरूप समाजाच्या गरजा बदलतात त्याप्रमाणे त्या पूर्ण करणारी साधनेही बदलत जातात. समस्या सोडविण्यासाठी मानवाला प्रयत्न करावा लागतो. अशावेळी भाषा समाजाला सुसंस्कृत, समृद्ध करण्याचे काम करते. शिक्षण घेऊनही समाजात बेकारीची समस्या वाढलेली आहे. या समस्येला दूर करण्यासाठी कौशल्याधारित अभ्यासक्रमांची मांडणी करावी लागेल. त्यात भाषा विषयांचे अभ्यासक्रमही बदलले गेले पाहिजेत. अॅड. मनाळ यावेळी म्हणाले, विद्यार्थ्याला भाषा अभ्यासक्रमांमधून व्यवसायाभिमूख शिक्षण मिळायला हवे. कार्यशाळेस राज्यातील विविध कॉलेजांचे दोनशे प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. यावेळी उपप्राचार्य डॉ. बी. टी. पवार, प्रा. वैशाली बागुल यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सरनाईक यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अजय देशमुख यांनी केले. यशस्वीतेसाठी डॉ. बालाजी नवले, डॉ. ललित अधाने, डॉ. सविता वावगे, डॉ. मीना खरात आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात गुन्हेगार समीर बंटासह जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुख्यात गुन्हेगार समीर बंटासह एका हद्दपार आरोपीला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली. याप्रकरणी बंटाच्या ताब्यातून धारदार तलवार जप्त करण्यात आली असून सबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुन्हे शाखेचे पथक शनिवारी सायंकाळी सहा वाजता पडेगाव भागातील कासंबरी दर्गा परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी त्यांना संशयित आरोपी शेख कदीर उर्फ समीर बंटा शेख शफीक (वय २२ रा. कासबंरी दर्गा) हा आढळून आला. पोलिसांनी समीरची झडती घेतली असता त्याच्याजवळ धारदार तलवार आढळून आली. पोलिसांनी ही तलवार जप्त करीत समीर बंटाला अटक केली. त्याच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक तुषार देवरे आणि पथकाने ही कारवाई केली.

दुसऱ्या घटनेत बेगमपुरा पोलिसांनी हद्दपार आरोपी शेख सलमान शेख मकसूद (वय २४, रा. कटकटगेट, नेहरूनगर) याला अटक केली. घाटी परिसरातून पोलिसांनी त्याला जेरबंद केले. शहरातून हद्दपार करण्यात आलेले असतानाही शहरात वास्तव्य केल्याप्रकरणी आरोपी सलमानविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तक्रार निवारणदिनी २१४ प्रकरणे निकाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातर्फे दर शनिवारी नागरिकांसाठी पोलिस ठाण्यात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या उपक्रमात पहिल्या तक्रार निवारण केंद्रात २१४ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी जलद गतीने सोडवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये नागरिकांच्या आलेल्या प्रत्यक्ष तक्रारी; तसेच टपाल किंवा ई-मेलद्वारे आलेल्या तक्रार अर्जाची त्याच दिवशी आवक नोंद घेणे बंधनकारक करण्यात आले आहेत. प्रत्येक शनिवारी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किंवा नेमून दिलेले अधिकारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा यादरम्यान तक्रार निवारण दिनासाठी पोलिस ठाण्यात हजर राहणार आहे. आलेल्या तक्रारीचे हे अधिकारी निवारण करणार आहेत.

तक्रार दिनाचे आयोजन करण्यापूर्वी किमान दोन दिवस अगोदर अर्जदार आणि गैरअर्जदार यांना पोलिस स्टेशनला हजर राहण्याबाबत समजपत्र पाठवण्यात येणार आहे. यामध्ये तक्रारीचे स्वरूप पाहून त्यावर तशा पद्धतीची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या उपक्रमाची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी तक्रार दिनाची तारीख व माहिती असलेला बोर्ड हा पोलिस ठाण्याच्या दर्शनी भागात लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तक्रार निवारण दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी २७ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी एकूण २१४ प्रकरणे निकाली करण्यात आली असल्याची माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मियावाकी पद्धतीने वृक्षलागवडीवर भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अभियान अंतर्गत ठिकठिकाणी शासनाच्या विविध यंत्रणामार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम सुरू आहे. सामाजिक संस्था, वृक्षप्रेमी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत असून शहरातील काही युवकांनी मियावाकी पद्धतीने वृक्षलागवडीवर भर दिला आहे.

शहर झाडांनी भरलेले असावे, शहरातील वातावरण प्रदूषणमुक्त राहावे, सिमेंटच्या जंगलात राहाणे सुसह्य व्हावे म्हणून झाडे असावीत, यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रयास फाउंडेशनच्या सदस्यांनी यंदा जपानच्या मियावाकी पद्धतीने घनदाट वृक्ष लागवडीवर भर दिला आहे. कमी जागेत अधिक वृक्ष या पद्धतीत लावले जात असल्याचे संस्थेचे शिल्पा बाबरे यांनी सांगितले.

आतापर्यंत चिकलठाणा येथील कचरा निर्मूलन प्रक्रिया केंद्र परिसरात १५ हजार रोपे, नाथपूरममध्ये ७५०, ग्रीव्हज कॉटन कंपनी परिसरात १६००, कडा परिसरात एक हजार, जिकठाण परिसरात साडेपाच हजार, एमजीएम परिसरात ६०० अशा पद्धतीने आतापर्यंत विविध ठिकाणी एकूण दहा हजार रोपांची लागवड करण्यात आली. त्यात वड, पिंपळासह एकूण ५० विविध रोप लागवड केली जात आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रवी चौधरी यांनी दिली. वर्षभरात एक लाख रोप लागवडीचा संस्थाचा संकल्प असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लांब पल्ल्याच्या सात रेल्वे धावल्या औरंगाबादमार्गे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई भागामध्ये धो धो पाऊस कोसळत आहे. अनेक रेल्वे मार्ग पाण्याखाली गेल्याने मुंबईहून दक्षिण भारत तसेच उत्तर भारताकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे औरंगाबादमार्गे रवाना कराव्या लागल्या. त्यामुळे रविवारी औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून देशातील सात महत्त्वाच्या रेल्वे गेल्या.

दोन दिवसांपासून मुंबईत होत असलेल्या संततधार पावासामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग पाण्याखाली गेला आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस नदीत अडकून पडली. यामुळे या मार्गावरून रेल्वेची वाहतूक बंद झाली. पुणे मार्गावरून जाणाऱ्या रेल्वे नांदेड औरंगाबादकडे वळविण्यात आल्या. औरंगाबाद रेल्वे मार्गावरून जनशताब्दी एक्सप्रेस, तपोवन एक्सप्रेस, नंदिग्राम एक्सप्रेस आणि देवगिरी एक्सप्रेस या नियमित रेल्वेंसह अन्य काही रेल्वे मुंबईकडे धावतात. रविवारी (२८ जुलै) रोजी नियमित रेल्वेसह सात पाहुण्या रेल्वेंच्या आगमनाने औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली होती. मुंबईहून औरंगाबाद रेल्वे स्टेशनमार्गे रविवारी सात लांबपल्ल्याच्या रेल्वे देशाच्या विविध भागात पाठविण्यात आलेल्या आहेत.

रविवारी (२८ जुलै) मुंबई येथून आलेल्या रेल्वे औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथून कन्याकुमारी, भुवनेश्वर, अहमदाबाद, चेन्नईसह अन्य महत्त्वाच्या शहराकडे रवाना झाल्या आहेत. यातील अनेक रेल्वे औरंगाबाद फलाट क्रमांक दोन आणि तीनवर उभ्या करण्यात आल्या होत्या. सात रेल्वेंची वाहतूक औरंगाबाद रेल्वे मार्गावर झाल्याने याचा फायदा मराठवाड्यातील प्रवाशांनाही मिळाला. सात रेल्वे आल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांची मात्र धावपळ झाली. मुंबई भागात पावसाचे निमित्त झाले आणि एका दिवसासाठी का होईना औरंगाबादचे कनेक्शन मुंबईशिवाय देशातील अन्य महत्त्वाच्या शहरांशीही जोडले गेले.

……

या रेल्वे आल्या औरंगाबादमार्गे

११०१९ - सीएसटीएम ते भुवनेश्वर-कोणार्क एक्सप्रेस

१२२१९ - लोकमान्य तिलक टर्मिनस ते सिकंदराबाद-दुरांन्तो एक्सप्रेस

११०२७ - सीएसटीएम ते चेन्नई-एमजीआर चेन्नई सेंट्रल मेल

१२७०१ - सीएसटीएम ते हैदराबाद-हुसेनसागर एक्सप्रेस

१९३१६ - अहमदाबाद ते चेन्नई-हमसफर एक्सप्रेस

१६३५१ - सीएसटीएम ते कन्याकुमारी-कन्याकुमारी एक्सप्रेस

१६३५१ - सीएसटीएम ते नगरकॉईल-बालाजी एक्सप्रेस

…………

सर्वसामान्यांना कल्पनाच नव्हती

औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून लांब पल्ल्याच्या रेल्वे औरंगाबाद मार्गे वळविण्यात आल्याची माहिती २७ जुलै रोजी उशिरा देण्यात आली होती. यामुळे रेल्वे प्रशासनाला एकेरी रेल्वे मार्गावर या वाढीव रेल्वेंच्या वाहतुकीचे नियोजन करावे लागले. लांब पल्ल्याच्या या रेल्वेंची माहिती जर आधी देण्यात आली असती तर औरंगाबादसह मराठवाड्यातील अनेक प्रवाशांना थेट अहमदाबाद, कन्याकुमारी किंवा बालाजी एक्सप्रेसमधून बालाजींचे दर्शन शक्य होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गव्हालीच्या माजी सरपंचाची गळफास घेऊन आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

गव्हाली (ता. सिल्लोड) येथील माजी सरपंचाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (२८ जुलै) सकाळी आठच्या सुमारास जैनपूर कोठरा (ता. भोकरदन) शिवारात उघड झाली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. शिवाजी भीमराव शिंदे (५०, रा. गव्हाली) असे या माजी सरपंचाचे नाव आहे.

शिवाजी शिंदे सकाळी जैनपूर कोठरा (ता. भोकरदन) शिवारात असलेल्या शेतात गेले व झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. त्यांचे चुलत भाऊ शेतात गेले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ शेजारील शेतकऱ्यांच्या मदतीने सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले.

त्यांच्यावर रविवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, चार मुली असा परिवार आहे. ते २०१० ते २०१५ या कालावधीत गावाचे सरपंच होते. त्यांनी आत्महत्या केल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संग्रामनगर उड्डाणपुलाखाली लोहमार्गाजवळ अनोळखी ३५ ते ४० वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. रविवारी दुपारी उस्मानपुरा पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर हा मृतदेह घाटीत हलवण्यात आला. रात्री उशिरापर्यंत या मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती.

रेल्वे गेट क्रमांक '४५ अ' ते '५४ ब' याच्या मध्यभागी रेल्वे रुळाजवळ हा मृतदेह पडलेला होता. विशेष पोलिस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील यांनी ही माहिती उस्मानपुरा पोलिसांना दिली. या मृतदेहाच्या उजव्या पायाचा तुकडा पडलेला असून, उजवा हातही मोडलेला आहे. पोटाला किरकोळ मार असून, डाव्या हातावर साईबाबाचा टॅटू आणि बदामामध्ये 'जेएन' असे गोंदलेले आहे. अंगात निळा शर्ट, काळी पँट आहे. हा आत्महत्येचा आहे अथवा अपघात आहे याबाबत शंका व्यक्त होत आहे. अशा वर्णनाची व्यक्ती कोणाला माहित असल्यास उस्मानपुरा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

प्रकाश वानोळे यांना शिवसेना शहरप्रमुख पदावरून तडकाफडकी काढण्यात आल्याने, पैठण शहर व तालुका शिवसेनेत खळबळ उडाली आहे. खैरे गटाला तालुक्यात कमकुवत करण्यासाठी शिवसेनेतील त्यांच्या विरोधातील गट सक्रिय झाल्याची चर्चा सुरू असून, यामुळे पक्षात गटबाजी उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या ३० वर्षांपासून पैठण तालुका शिवसेनेचा गड राहिलेला आहे. एक, दोन अपवाद वगळता अडीच दशकांपासून पैठणमध्ये शिवसेनेचाच आमदार आहे. बहुतांश संस्थांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व असले तरी, पैठण शिवसेनेत खासदार चंद्रकांत खैरे व आमदार संदीपान भुमरे गट सक्रिय आहेत. हे दोन्ही गट नेहमीच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्नात असतात. २०१४मध्ये आमदार भुमरे यांनी खासदार खैरे यांच्या विरोधात बंड पुकारले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातल्यावर हे प्रकरण थोडे शांत झाले होते मात्र, या दोन्ही गटांतील शीतयुद्ध कधीच थांबले नाही.

सध्या तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदांवर भुमरे गटाचे वर्चस्व असून, खैरे गटाचे प्रकाश वानोळे मागच्या अनेक वर्षांपासून पैठण शहराध्यक्ष म्हणून काम करत आहे. शनिवारी वानोळे यांना शहरप्रमुख पदावरून तडकाफडकी हटवण्यात आले असून, त्यांच्या जागेवर नगरसेवक तुषार पाटील यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. पक्षाच्या या निर्णयामुळे तालुका व शहर शिवसेनेत खळबळ उडाली असून, खैरे हे लोकसभा निवडणूकीत पराभूत झाल्याने पक्षातील विरोधी गटाने त्यांच्या पराभवाचा फायदा घेऊन खैरे गटाला कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सध्या सध्या संपूर्ण तालुक्यात आहे. वानोळे यांना शहप्रमुख पदावरून हटवण्याचा निर्णयामुळे पक्षात पुन्हा एकदा गटबाजी उफाळून येण्याची शक्यता असून, आगामी विधानसभा निवडणुकीत यांचा शिवसेनेवर विपरित परिणाम होणार असल्याचा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.

मागच्या अनेक वर्षांपासून पक्ष वाढीसाठी जीव तोडून काम करत असताना मला कोणतीही पूर्वसूचना न देता मला पदावरून तडकाफडकी काढण्याचा पक्षाचा निर्णय धक्कादायक आहे. पक्षातील गटबाजीचा मला फटका बसला.

- प्रकाश वानोळे, माजी शहरप्रमुख

शिवसेनेत गटबाजीला स्थान नसून, पक्षाच्या धोरणानुसार आम्ही कार्यकर्त्यांची नियुक्त्या करण्याचा निर्णय घेत असतो.

- नरेंद्र त्रिवेदी, जिल्हाध्यक्ष, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसानंतर २८४ टँकर बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकीकडे राज्यभर वरुणराजाने दमदार हजेरी लावली असताना मराठवाड्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. मात्र औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे या जिल्ह्यांतील पिण्याचे पाणी पुरविणारे टँकर कमी झाले आहेत. गेल्या तीन दिवसांत झालेल्या पावसानंतर मराठवाड्यातील तब्बल २८४ टँकर प्रशासनाने बंद केले.

जून अखेरनंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर टँकरची संख्या निम्म्यापेक्षा कमी झाली होती, मात्र पाऊस नसल्याने जुलै महिन्यात टँकरची संख्या दोनशेने वाढली. दरम्यानच्या काळात औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात सतत होत असलेल्या पावसामुळे टँकरची संख्या घटली आहे. जूनअखेर टंचाई आराखडा संपुष्टात आला. त्यावेळी मराठवाड्यात ३२९७ टँकरद्वारे तब्बल ५४ लाख नागरिकांची तहान भागवण्यात येत होती. जुलै महिन्यात नव्याने टँकर सुरू करण्याचे सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे असल्यामुळे कोणत्या ठिकाणचे टँकर बंद करणे शक्य असल्याचा आढावा गावपातळीवरून घेऊन निम्म्यापेक्षा अधिक टँकर बंद करण्यात आले होते. मराठवाड्यात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली होती, प्रारंभी झालेल्या पावसानंतर मात्र पावसात सातत्य राहिले नसल्याने टँकरच्या मागणीत वाढ झाल्याने काही गावांत पुन्हा टँकर सुरू करावे लागले होते. सध्या मराठवाड्यातील दीड हजार गावे व ३४८ वाड्यांमधील ३६ लाख नागरिकांची तहान २०११ टँकरद्वारे भागवण्यात येत आहे.

मे महिन्यामध्येच राज्यातील टँकरच्या तुलनेत मराठवाड्यातील टँकरची संख्या सर्वाधिक होती. मान्सूनचे आगमन यंदा तुलनेत उशिराने झाले असले तरी, औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत टँकरची संख्या घटली आहे.

मराठवाड्यातील टँकर

जिल्हा.................... २६ जुलै रोजीचे टँकर .............. तीन दिवसांत झालेली घट

औरंगाबाद...............३९०...................२७७

जालना...................३५६....................०५

परभणी.....................६३....................००

हिंगोली....................४५......................०१

नांदेड...................१३१......................००

बीड....................६९९........................००

लातूर..................१०५.........................०१

उस्मानाबाद.........२२२..........................००

------------------------------------------

एकूण..................२०११.....................२८४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबाद, जालन्यात पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकीकडे राज्यात वरुणाराजा जोरदार हजेरी लावत असताना पावसाच्या दीड महिन्यानंतर मराठवाड्यावर अद्यापही पाऊस रुसला असल्याने स्थिती चिंताजनक असली तरी, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणामध्ये सातत्याने पाऊस होत आहे. त्यामुळे या भागातील पिकांना जीवदान मिळाले असल्याचे चित्र आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ७७.३ टक्के तर, जालना जिल्ह्यात ६९.१ टक्का पाऊस पडल्याची नोंद आहे.

मराठवाड्यातील इतर सहा जिल्ह्यांमध्ये मात्र अद्यापही दुष्काळाचेच सावट आहे. पावसाळ्याच्या दीड महिन्यानंतरही अद्याप १९ तालुक्यांमध्ये निम्माही पाऊस झालेला नाही. त्या तुलनेत औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात बरा पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी पहिल्या काही आठवड्यांमध्ये नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती. यावर्षी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांमध्ये वरुणराजाची सातत्याने हजेरी आहे.

आतापर्यंत मराठवाड्यातील लातूर आणि बीड जिल्ह्यांमध्ये अपेक्षित सरासरीच्या निम्माही पाऊस पडलेला नाही. सध्या विभागातील दीड हजार गावे आणि ३५७ वाड्यांमधील ३६ लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवण्यात येत आहे. पावसाळ्याच्या प्रारंभीपासूनच औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांमध्ये अनेक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली होती. या कालावधीमध्ये जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्पांमध्ये पाणी आले होते. दमदार पाऊस झाल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव व वैजापूर या तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी पहिल्या पावसानंतरच पेरण्या करण्यास सुरुवात केली होती. अशीच स्थिती जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद तालुक्यांची होती. आता गेल्या काही दिवसांपासून अंबड आणि घनसावंगी तालुक्यांतही पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

कमी अधिक पावसाच्या भरवशावर मराठवाड्यात खरिपाच्या ८२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. आता शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. हलक्या जमिनीवर करण्यात आलेल्या बहुतांश पेरण्या पावसाअभवी वाया जाण्याची शक्यता आहे.

आतापर्यंतचा पाऊस

जिल्हा...............पडलेला पाऊस......वार्षिक टक्केवारी

औरंगाबाद.............७७.३.......................३२.४

जालना.................६९.१.......................२९.५

परभणी.................५५.१.......................२२.६

हिंगोली.................५४.४......................२४.५

नांदेड...................५६.४......................२४.३

बीड.....................४३.९......................१८.०

लातूर...................४९.१......................१९.७

उस्मानाबाद...........५३.६......................२३.८

एकूण...................५७.१ टक्के...............२३.८ टक्के

(पडलेल्या २८ जुलैपर्यंत अपेक्षितच्या तुलनेत, मिली मीटरमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तुझे गीत गाण्यासाठी’ रसिकांना भावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रसिद्ध गायक सुधीर फडके यांच्या लोकप्रिय रचनांना उजाळा देणारा 'तुझे गीत गाण्यासाठी' कार्यक्रम विशेष रंगला. जुन्या अवीट गीतांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. गायक श्रीधर फडके यांनी सुश्राव्य स्वरांनी रसिकांचा आनंद द्विगुणित केला.

संगीतकार सुधीर फडके यांच्या स्मृतीदिनानिमित्त पद्मावती नारायणराव रामदासी स्मृती राघव फाउंडेशन व सौ. शारदाबाई देशमुख प्रतिष्ठान यांच्या वतीने 'तुझे गीत गाण्यासाठी' कार्यक्रम घेण्यात आला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी रात्री हा संगीतमय कार्यक्रम झाला. गायक श्रीधर फडके यांनी भावगीते, भक्तिगीत आणि चित्रपट गीते सादर करून रसिकांची दाद मिळवली. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या लोकप्रिय रचना श्रीधर फडके यांनी सादर केल्या. प्रा. केदार देशमुख, प्रा. विजयकुमार रामदासी, गिरीश धुंदे, स्नेहा राठोड, सारिका पाडळकर, सायली शिरखेडकर, डॉ. अनघा मारावार आणि निषाद यांनी सहगायन केले. या मैफलीचे उद्घाटन प्रा. विजय देशमुख, श्रीधर फडके, मिनल देशमुख, प्रा. राजेश सरकटे, अतुल दिवे, प्रमोद सरकटे यांनी केले. प्रा. रविंद्र मगर व सीमा रामदासी यांनी निवेदन केले. तर तुषार आग्रे, जगदीश व्यवहारे, जितेंद्र साळवी, विनोद वाव्हळ, मनोज गुरव, मिलिंद डोलारे, विजेंद्र मिमरोट यांनी संगीत साथसंगत केली. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादः जिंतूर तालुक्यात युवकाची आत्महत्या

$
0
0

जिंतूर:

जिंतूर तालुक्यातील यलदरी वसाहत येथील अमर उमेश स्वामी (वय १८) या नवयुवकाने राहत्या घरी गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

रविवारी स्वामी कुटुंबातील सर्वजण काही कारणानिमित्त घराबाहेर होते. अमर स्वामी हा एकटाच घरी होता. सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास गावात असलेल्या बाजारात जाऊन दोरी खरेदी केली. घरी कोणी नसल्यामुळे दोरीच्या साहाय्याने पंख्याला लटकून गळफास घेत अमर याने आत्महत्या केली. रात्री उशीरा घरची मंडळी पोहोचल्यावर ही भयानक घटना त्यांच्या समोर आली. जिंतूर पोलिसांना याबाबतची माहिती तातडीने देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. अमरने आत्महत्या का केली, याबाबतचे कारण स्पष्ट झालेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१४ इच्छुकांनी नेले अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, सोमवारपर्यंत (२९ जुलै) एकूण १४ अर्ज उमेदवरांनी घेतले आहे. यात प्रामुख्याने शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार सुभाष झांबड, समीर सत्तार, बाबुराव कुलकर्णी यांच्या नावाचा समावेश आहे. गेल्या चार दिवसांपासून उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र, अद्यापर्यंत एकाही उमेदवाने अर्ज दाखल केला नाही.

एक ऑगस्ट अर्ज भरता येणार आहे मात्र, त्यादिवशी अमावस्या असल्याने मंगळवारी किंवा बुधवारी बहुतांश उमेदवार अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत मतदारांची संख्या ४३८ होती परंतु, नव्याने आस्तिवात आलेल्या नगर पंचायतींमुळे मतदारांची संख्या ६५६पर्यंत पोचली आहे. दरम्यान, विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किमान ३० वर्षे असणे आवश्यक आहे. सिल्लोडचे नगराध्यक्ष समीर सत्तार यांचे वय २८ असल्यामुळे त्यांना ही निवडणूक लढता येणार नाही.

\Bमुंबईत नियंत्रण कक्ष\B

महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भातील तक्रारी दाखल करण्याकरिता नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. २५ जुलै २०१९पासून ते २६ ऑगस्ट २०१९पर्यंत कक्ष क्रमांक ६११ ( सामान्य प्रशासन विभाग, सहावा मजला, विस्तार इमारत, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय) येथे नियंत्रण कक्ष स्थापन केला असून, निवडणुकी संदर्भात तक्रार दाखल करावयाची असल्यास या नियंत्रण कक्षात (०२२-२२०२५०५९) या दूरध्वनी क्रमांकावर करावी, असे सहमुख्य निवडणूक अधिकारी व उपसचिव यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातग्रस्ताची दुचाकी चोरीस

$
0
0

औरंगाबाद: अपघात झाल्यानंतर दुचाकी सोडून उपचारासाठी दवाखान्यात गेलेल्या नागरिकांची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. १३ जुलै रोजी हर्सूल येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहाजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजेंद्र पदमाकर कांबळे (वय ४३, रा. हडको एन ११) यांनी तक्रार दाखल केली. कांबळे यांचा १३ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दुचाकी घसरल्याने अपघात झाला होता. यावेळी त्यांनी दुचाकी हर्सूल तलावाजवळील शासकीय मुलांच्या वसतिगृहाजवळ उभी करून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते. रात्री आठ वाजता त्यांनी मित्राला दुचाकी आणण्यासाठी पाठवले. यावेळी दुचाकी त्या ठिकाणी आढळून आली नाही. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images