Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विजयी मिरवणुकीत हद्दपार गुन्हेगार अटकेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खासदार इम्तियाज जलील यांच्या विजयी मिरवणुकीत गोंधळ घालण्यासाठी आलेला हद्दपार आरोपी शेख आलीम शेख शौकत (रा. बायजीपुरा) याला गुन्हे शाखेने वेळीच ताब्यात घेतले. हा प्रकार रविवारी सायंकाळी आठ वाजता कटकटगेट भागात घडला. पोलिसांनी पकडल्यानंतर या आरोपीने वाहनामध्ये धुडगूस घातला. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदार इम्तियाज जलील यांच्या विजयानिमित्त शहरात रविवारी मिरवणुकीचे आयोजन केले होते. यावेळी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देशमुख हे बंदोबस्तसाठी गस्त घालत असताना त्यांना हद्दपार आरोपी अलीम हा शहरात आला असून तो मिरवणुकीत गोंधळ घालण्याची शक्यता आहे, असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून कटकटगेट भागात सापळा रचत पोलिसांनी अलीम याला ताब्यात घेतले. त्याला दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार करण्यात आले असून कोणतीही परवानगी न घेता तो शहरात आला होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला वाहनामध्ये बसवण्यात आले. यावेळी आरडाओरड करीत त्याने स्वत:चे डोके वाहनाच्या काचेवर मारून घेतल्याने जखमी झाला. त्याला अटक करून जिन्सी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अलीमविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक फौजदार हेमंत सुपेकर तपास करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्त्यांची डेडलाइन हुकणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आयुक्तांच्या इशाऱ्यानंतरही रस्त्यांच्या कामांना अद्याप गती मिळाली नाही. काही रस्त्यांची कामे बंदच असल्याचे चित्र आहेत. ही कामे पूर्ण करण्याची डेडलाइन पुन्हा एकदा हुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामाबद्दलच शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मंगळवारी महापौर रस्त्यांच्या कामांची पाहणी करणार आहेत.

शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाने महापालिकेला शंभर कोटी रुपयांचे विशेष अनुदान दिले आहे. या अनुदानातून ३० रस्त्यांच्या व्हाइट टॉपिंगची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा करार महापालिकेने कंत्राटदारांबरोबर केला आहे. सहा महिन्यांत निम्म्या रस्त्यांची कामे देखील पूर्ण झालेली नाहीत. ३०पैकी १६ रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली होती, परंतु यापैकी हायकोर्ट ते कामगार चौक, जानकी हॉटेल ते मेहरसिंह नाईक हायस्कूल हे दोन रस्ते वगळता अन्य रस्त्यांची कामे खोळंबली आहेत. काही रस्त्यांची कामे तर बंद पडली आहेत.

दोन दिवसांपूर्वी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू आहेत, असे लक्षात आल्यावर त्यांनी कामाची गती वाढविण्यासाठी कंत्राटदारांना इशारा दिला. संबंधित अधिकाऱ्यांना देखील त्यांनी याबद्दल सूचना केली, परंतु आयुक्तांच्या इशाऱ्याचा काहीच परिणाम झालेला दिसून येत नाही. रस्त्यांची कामे आहे त्याच स्थितीत आहेत. काही रस्त्यांची कामे तर बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. रस्त्यांची कामे संथगतीने सुरू असताना या कामासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेबद्दल देखील संशय व्यक्त केला जात आहे. अधिकाऱ्यांचा कंत्राटदारांवर वचक नाही का, की कंत्राटदाराच्या दबाव या अधिकाऱ्यांवर आहे, असा प्रश्न आता विचारला जात आहे. आयुक्तांनी आदेश दिल्यावर देखील रस्त्यांच्या कामाची गती वाढत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रस्त्यांच्या कामांना गती मिळत नसल्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी रस्त्यांच्या कामांची पाहणी करण्याचे ठरवले आहे. रस्त्यांची पाहणी करुन सोक्षमोक्ष लावतो, असे ते म्हणाले.

\Bमुदत डिसेंबरअखेरपर्यंत\B

सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या १५पैकी पाच रस्त्यांची कामे १५ जुलैपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन महापालिका प्रशासनाने दिली होती. त्यानंतर ही डेडलाइन ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली. आता ही डेडलाइन देखील हुकण्याची शक्यता आहे. सर्वच्या सर्व ३० रस्त्यांची कामे करण्यासाठी डिसेंबरअखेरची डेडलाइन आहे. या डेडलाइनमध्ये कामे पूर्ण होण्याची शक्यता नाही, असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीत आले तीन टक्के पाणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

जायकवाडी धरणात मागच्या चोवीस तासापासून पाण्याची आवक सुरू असून सोमवार संध्याकाळ पर्यंत धरणात पाणी साठ्यात जवळपास तीन टक्के म्हणजेच पाऊने दोन टीएमसीने वाढ झाली आहे.

नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सोडण्यात आलेला पाणीसाठा रविवारी संध्याकाळी जायकवाडी धरणात यायला सुरुवात झाली होती. मागच्या चोवीस तासांपासून धरणात २७ ते २५ हजार क्यूसेक एवढी आवक सुरू होती. सोमवारी संध्याकाळी सहाच्या दरम्यान २२ हजार क्यूसेक प्रमाणे आवक सुरू होती. परिणामी, धरणाचा पाणीसाठा ५३९.२२ दशलक्ष घनमीटर (उणे ९.२२ टक्के) वरून वाढून ५८७.५७६ दशलक्ष घनमीटर (उणे ६.८९ टक्के) एवढा झाला होता.

गेल्या २४ तासांत जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात जवळपास पावणे दोन टीएमसीची भर पडल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली. सध्या धरणाची पाणीपातळी १४९०.८३ फुटांवर असून धरणात २१९५० क्यूसेक प्रमाणे पाण्याची आवक सुरू आहे.

पाणीसाठा अजूनही मृतसाठ्यात

जायकवाडी धरणात रविवार संध्याकाळपासून आवक सुरू असून धरणाच्या पाणीसाठ्यात पावणे दोन टक्क्यांनी वाढ झाली असली तरी अजूनही जायकवाडी धरण मृतसाठ्यातच आहे. जायकवाडी धरणाची पाणीपातळी ज्योत्याच्या वर व जिवंत साठ्यात यायला अजूनही धरणात १५० दशलक्ष म्हणजेच जवळपास सवा पाच टीएमसी पाणीसाठ्याची आवश्यकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा हेल्पलाइन’साठी महिला मंडळाचा पुढाकार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दातृत्व प्रत्येकाकडे असले, पण दिशादर्शक मिळला तर मदतीची वाट सोपी होते. 'मटा हेल्पलाइन'द्वारे महाराष्ट्र टाइम्सने दातृत्वाला दिशा देत आम्हाला चांगले काम करण्याची संधी दिली. महिला मंडळ म्हणून आम्ही आमचे सामाजिक दायित्व ओळखले या शब्दांमध्ये ओंजळ महिला मंडळाने 'मटा हेल्पलाइन'च्या 'बळ हवे पंखांना' या उपक्रमात सहभाग नोंदवला.

ओंजळ महिला मंडळाने गुरुवारी महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयास भेट देत आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी मंडळाच्या अध्यक्ष माधुरी लासूरकर, उपाध्यक्ष स्मिता साळुंके स्मिता, सचिव दीपाली मुळे, संस्थापिका अनुराधा पुराणिक, सीमा चौरसिया, वृषाली स्वामी उपस्थित होत्या. प्रतिकूलतेवर मात करत यशोशिखर गाठलेल्या तन्वी दीपक देशमुख (९६.२० टक्के), गणेश दामोदर गायकवाड (९३ टक्के), विवेक गणेश जाधव (९२ टक्के), प्रेरणा दिलीप थोरात (९१.२० टक्के) आणि संतोष किसन शिंदे (९०.२० टक्के) या गुणवंतांच्या संघर्षगाथा मांडून 'मटा'ने वाचकांना या विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत ओंजळ महिला मंडळाने मदत केली. गुणवंतांना अत्यंत योग्यवेळी मदत मिळवून दिल्याबद्दल त्यांनी 'मटा'चे कौतुक केले. आम्ही सर्व सर्वसामान्य कुटुंबातून आहोत, त्यामुळे जे शक्य झाले ते केले, अशा भावना यावेळी व्यक्त झाल्या. यावेळी निलिमा देशमुख, प्रणाली चौधरी, योगिनी कुलकर्णी, अरुणा रोजेकर, वैशाली भोकरे, लता खेडकर, मंजुषा कुडके उपस्थित होत्या.

दात्यांच्या दातृत्वाच्या या उपक्रमात आपणही सहभागी व्हाल अशी अपेक्षा आहे. या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी तुम्ही पण मदत करा.

महाराष्ट्र टाइम्स आमच्या कुटुंबाचा भाग आहे. 'बळ हवे पंखांना' उपक्रम तर अत्यंत आदर्श घेण्यासारखा आहे. आमच्या मदतीतून अशा गुणवंत विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाट सोपी होत असेल, तर आम्ही दरवर्षी या उपक्रमाचा भाग होण्यास तयार आहोत.

-माधुरी लासूरकर, अध्यक्ष, ओंजळ महिला मंडळ

समाजात आजही अनेक गुणवंतांना केवळ आर्थिक अडचणींमुळे आपली गुणवत्ता सिद्ध करता येत नाही. 'मटा'ने अशा विद्यार्थ्यांना बळ देत आम्हालाही या उत्कृष्ट उपक्रमात सहभागी करून घेतले त्याबद्दल आभारी आहोत.

-अनुराधा पुराणिक, संस्थापिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशोधन प्रमाणपत्रापुरते मर्यादित नसावे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संशोधन हे गुणवत्तावाढीसाठी, ज्ञाननिर्मितीसाठी आवश्यक असते. ते केवळ अॅकॅडमिक पुरते मर्यादित राहू नये, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सोमवारी केले. सरस्वती भुवन कॉलेजमध्ये 'हवामान बदलाचे जैव विविधता, पर्यावरण, जीवन विज्ञानवर होणारे परिणाम' विषयावर परिषदेत ते बोलत होते.

सरस्वती भुवनच्या गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीच्या सभागृहात झालेल्या उद्घाटन सोहळ्याला व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष राम भोगले, आयएएसआरचे सचिव डॉ. मन्मय रूद्र, डॉ. ए. के. वर्मा, प्राचार्य डॉ. पी. व्ही. जब्दे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, भारतीय शिक्षणाचा प्राचीन वारसा गौरवशाली आहे. मात्र, आज आपण बरेच मागे पडलो आहोत. जगातील छोट्या छोट्या देशांमधील विद्यापीठांमध्ये उत्तम दर्जाचे संशोधन होऊन शेकडो पेटेंट त्यांनी मिळविले. अधिकाधिक नोबल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ तेथे तयार होतात. मात्र, आपल्याकडे अशी उदाहरणे कमी आहेत. आपल्याकडेही जागतिक दर्जाचे संशोधन व्हायला हवे,

संशोधन जागतिक दर्जाचे असेल तर त्या संशोधनाचे फलित साध्य होईल, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राम भोगले म्हणाले, शिक्षण आणि संशोधन हे समाजउपयोगी, देशाच्या विकासाला चालना देणारे, शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावणारे असावे. यावेळी डॉ. मन्मय रूद्र, डॉ. ए. के. वर्मा यांचेही मार्गदर्शन झाले. प्राचार्य डॉ. पी. व्ही. जब्दे यांनी प्रास्ताविक केले. सहसमन्वयक डॉ. प्रमोद दवणे यांनी चर्चासत्राच्या आयोजनामागची भूमिका मांडली. यावेळी उत्कृष्ठ शोध निबंध सादर करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. मीना नागवंशी, डॉ. प्रीती कुलश्रेष्ठ, डॉ. व्ही. जे. जाधव, प्राचार्य डॉ. बी. एल. सोनवणे, डॉ. व्ही. एन. परदेशी यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निजाम वंशज अमित शहांना भेटणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निजाम वारसदारांचा वाद कोर्टात प्रलंबित आहे. कोर्टाचा निकाल लागेपर्यंत निजाम संपत्ती केंद्र शासनाने ताब्यात घ्यावी. कोर्टाच्या निर्णयानंतर ही जमीन वंशजांना परत करावी, असा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे मांडणार असल्याची माहिती निजाम वंशज प्रिन्स दिलशाद जहां दिलदार जाह बहादूर यांनी सोमवारी (२९ जुलै) येथे पत्रकार परिषदेत दिली. औरंगाबाद; तसेच निजामच्या महाराष्ट्रात असलेल्या संपत्तीबाबत निजाम वंशजांकडून कोणत्याही प्रकारची नेमणूक करण्यात आलेली नाही. निजाम संपत्तीबाबत कोणतेही व्यवहार कोणाशीही करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी प्रिन्स दिलशाद जाह दिलदार जाह बहादूर यांनी, औरंगाबाद शहरात हिमायत बाग येथे काही जणांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. औरंगाबाद शहरात हिमायत बाग आणि नवखंडा या दोन संपत्ती निजाम वंशजांच्या आहेत. याशिवाय निजाम वंशजाच्या मालकीच्या हैदराबाद, मुंबई, औरंगाबाद, महाबळेश्वर, कर्नाटक, तामिळनाडू आणि उघाडाल्लम, उटी आदी ठिकाणी एकूण २३ हजार मालमत्ता असल्याचा दावा केला. औरंगाबाद येथील जागेवर ताबा मिळविण्यासाठी काही जण प्रयत्न करीत आहेत. ताबा मिळाल्यानंतर ते या जागा विकण्याच्या प्रयत्नात आहे. या जागेबाबत शहरातील; तसेच अन्य भागातील कोणत्याही व्यक्तीने संबंधित बेकायदा व्यक्तींसोबत व्यवहार करू नये. निजाम वंशजांनी कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या संपत्तीबाबत कोणत्याही प्रकारचे अधिकार दिलेले नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. निजामाच्या संपत्तीवर होत असलेले अतिक्रमण रोखण्यासाठी; तसेच संबंधित भूमाफियांवर कारवाईसाठी पोलिस आयुक्तांची भेट घेणार असून, या भेटीत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

निजामाच्या संपत्ती सुरक्षित राहावी. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अध्यक्ष अमित शहा यांची निजाम वंशज एकत्रित भेट घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र, त्यांची वेळ मिळाली नव्हती, अशीही माहिती दिलशाद जहां यांनी पत्रकार परिषदेत दिली.



\Bधमक्या दिल्याचा दावा\B

निजाम वंशजांनी औरंगाबादेत येऊन त्यांच्या संपत्तीबाबत माहिती देऊ नये, यासाठी बाहेरून बराच दबाव आणला जात आहे. या पत्रकार परिषदेपूर्वी काही जणांनी धमक्या दिल्याची माहिती त्यांनी दिली.



\Bकोण आहेत दिलशाद जहां...?\B

शहरात पत्रकार परिषदेत घेणारे दिलशाद जहां यांनी निजाम वंशज असल्याचा दावा केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार; सातवे नवाब मीर उस्मान अली यांचे तीन वारसदार होते. आलम जहां, मौजम जहां आणि शहजादी पाशा. आजम जहा यांना मुकर्रम जहां आणि मुफकम जहां हे दोन वारस होते. मौजम जहां यांना शहामत अली खान, फातिमा फौजिया, आमिना मरजिया आणि औलिया कुसूम हे चार वारसदार होते. दिलशाद जहां हे निजामाच्या दुसऱ्या वारसरदाराच्या चौथ्या पत्नीचे नातू असल्याचा दावा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण हटाविण्याची तोंडदेखली कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापौर नंदकुमार घोडेले यांच्या आदेशानंतर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने हातगाड्या, टपऱ्या हटवण्याची तोंडदेखली कारवाई सोमवारी केली. तीच ती अतिक्रमणे पथकांनी हटविली. आता पुन्हा तीच अतिक्रमणे पुन्हा होतील, असे बोलले जाते.

रस्त्यांवरील हायगाड्या, टपऱ्या आणि शेडस् हटविण्याचे आदेश गेल्या आठवड्यात महापौरांनी अतिक्रमण हटाव विभागाला दिले होते. सोमवारपासून या कारवाईला सुरुवात केली जाईल, असे या विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी सकाळी कारवाईला सुरुवात करण्यात आली. सिडको बसस्टँड समोरील रस्त्यावरच्या हातगाड्या हटविण्यात आल्या. त्यानंतर सिडको एन-१ पोलिस चौकीच्या जवळ एसबीआय बँकेच्या कॉर्नरला असलेल्या फळांच्या दुकानांवर कारवाई करण्यात आली.

दुपारच्या सत्रात घाटी रुग्णालयाच्या रस्त्यावरील हातगाड्या, टपऱ्या आणि शेड हटवण्यात आले. याठिकाणी तीन टपऱ्या, सहा हातगाड्या, सोळा शेड काढण्यात आले. त्यानंतर कारवाई बंद करण्यात आली. पालिकेचे पथक कारवाई करून परतल्यावर पुन्हा हातगाड्या, टपऱ्या लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचे बैठकांचे सत्र

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना - भाजप युतीच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. युतीचे बहुमत असले तरी गाफील न राहण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.

विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्याचे ठरवले आहे. दानवे यांच्या उमेदवारीची घोषणा अधिकृतपणे झालेली नसली तरी, त्यांना कामाला लागण्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार सोमवारी दानवे यांना निवडून आणण्यासाठी व्यूहरचना आखण्याच्या उद्देशाने सोमवारी तीन बैठका झाल्या. पहिली बैठक सकाळी जालना येथे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर औरंगाबादेत एका हॉटेलमध्ये सुरुवातीला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, सुहास दाशरथे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, महापौर नंदकुमार घोडेले आदींची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीला शहरप्रमुख, तालुका प्रमुख यांना देखील बोलावण्यात आले होते.

शिवसेना - भाजप युतीचे बहुमत असले तरी गाफील राहून चालणार नाही. सूक्ष्म नियोजन करून आपली व्यूहरचना आखली पाहिजे, असे खैरे यांनी बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यासाठी त्यांनी प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली. शिवसेनेच्या बैठकीनंतर शिवसेना - भाजपच्या समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीला भाजपकडून प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, उपमहापौर विजय औताडे, पालिकेतील भाजपचे गटनेते प्रमोद राठोड उपस्थित होते. सर्वांनी मिळून विधान परिषदेच्या निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे यावेळी ठरवण्यात आले.

गुरुवारी अर्ज दाखल करणार

अंबादास दानवे गुरुवारी (एक ऑगस्ट) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेनेचे नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहनमंत्री दिवाकर रावते, भाजपचे नेते तथा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, केंद्राय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे आदींची विशेष उपस्थिती राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

खैरे स्वत: फोन करणार

या निवडणुकीत आपण स्वत: मतदारांना फोन करून शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करणार आहोत, असे चंद्रकांत खैरे यांनी बैठकीत सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीत खैरे यांनी कुणालाच फोन केले नव्हते, असा आक्षेप घेतला जात होता. त्यामुळे खैरे यांनी आता फोन करण्याची भूमिका घेतली का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पँथरसारख्या कणखर संघटनेची गरज

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यात दलित-मुस्लिमांवर अत्याचार वाढला असून दलित पँथरसारख्या कणखर व बंडखोर संघटनेची नितांत गरज आहे. अन्याय-अत्याचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी पँथरच्या कार्यकर्त्यांनी जागरुक रहावे. दलित वस्त्यातील दारुची दुकाने हटवण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन व्यापक आंदोलन करावे, असे प्रतिपादन खासदार इम्तियाज जलील यांनी केले. ते मेळाव्यात बोलत होते.

भारतीय दलित पँथरचा विभागीय मेळावा नुकताच मौलाना आझाद संशोधन केंद्रात घेण्यात आला. या मेळाव्याला राज्यमंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, भारतीय दलित पँथरचे लक्ष्मण भूतकर, बाळासाहेब सानप, प्रकाश सोनवणे, अंबादास रगडे, सत्तार पटेल, प्रा. ज्ञानेश्वर खंदारे, एजाज खान, रामकिसन दुधवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील कष्टकऱ्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी काम करणार असल्याचे सावे म्हणाले. तर भूतकर यांनी पँथरच्या चळवळीचा इतिहास मांडला. मेळाव्यात १५ ठराव पारित करण्यात आले. तसेच संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी एजाज खान यांची निवड करण्यात आली. गुणवंत विद्यार्थी पूजा जाधव, अश्विनी घुगे, संकेत श्रीखंडे, पायल भालेराव, राजश्री चौधरी, शेख साहिल यांचा सत्कार करण्यात आला. अमोल भूतर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तरपत्रिका फाडली; विद्यार्थी खंडपीठात

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

उत्तरपत्रिका फाडल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ औरंगाबाद (एसएससी बोर्ड) यांनी दहावीच्या विद्यार्थ्याचा निकाल राखीव ठेवला तसेच परीक्षेस बसण्यास प्रतिबंध घातल्याप्रकरणी दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रतिवादी विभागीय सचिव, एसएससी बोर्ड (औरंगाबाद) आणि पुणे शिक्षण मंडळाच्या सचिवांना नोटीसा बजावण्याचे आदेश दिले. खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती मंगेश एस. पाटील यांच्या पीठासमोर सुनावणी झाली.

गारखेडा (जि. औरंगाबाद) येथील गजानन बहुउद्देशिय माध्यमिक शाळेतील दहावीचा विद्यार्थी किरण विनोद पाडसे याने याचिका केली आहे. त्याने शैक्षणिक वर्ष मार्च २०१९ मध्ये दहावीची परीक्षा (बैठक क्रमांक k ००३७३४) दिली होती. मात्र एसएससी बोर्डाने त्याचा निकाल जाहीर केला नाही. त्याने वडिलांसोबत बोर्डात जाऊन २७ जून रोजी अर्जाद्वारे माहिती विचारली असता, काही दिवसांनी निकाल लागेल, असे तोंडी सांगण्यात आले. विद्यार्थ्याने पुन्हा ६ जुलै रोजी त्याने निकालाबाबत बोर्डात विचारणा केली असता, बोर्डातर्फे गणिताच्या उत्तरपत्रिकेचे पान फाडल्याचा आरोप करत निकाल राखीव ठेवण्यात आला असल्याचे तोंडी सांगण्यात आले. दरम्यान, याचिकाकर्त्याने आपण संपूर्ण पेपर सोडविला असतानाही उत्तरपत्रिका का फाडू?, असे सांगत बोर्डाला निकाल जाहीर करण्याची आर्त साद घातली. मात्र बोर्डाने काहीएक ऐकून न घेता, परीक्षेतील सर्व विषयाची संपादनूक रद्द करण्यात आल्याचे कळविले. तसेच पुढील परीक्षेलाही प्रतिबंध घातल्याचे ९ जुलै सांगितले. याचिकेच्या सुनावणीदरम्यान विद्यार्थ्यांचे वकील पाटील यांनी या बाबी खंडपीठासमोर मांडल्या. दरम्यान, खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावत पुढील सुनावणी ५ ऑगष्ट रोजी ठेवली. याचिकाकर्त्यातर्फे विष्णू मदन पाटील यांनी काम पाहिले. सुरेखा महाजन यांनी बोर्डातर्फे नोटीस स्वीकारल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध देशी दारू साठ्यासह एकाला अटक

0
0

वाळूज महानगर: रिक्षातून अवैधरित्या विक्रीसाठी देशी दारूचे दहा बॉक्स घेऊन जाणाऱ्यास महावीर चौकात रविवारी अटक करण्यात आली. गोविंद प्रकाश दुधमोगरे (वय २५, रा. पवननगर, रांजणगाव शेणपुंजी), असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून दारूसह रिक्षा जप्त करण्यात आली.

एकजण तिरंगा चौकातून रांजणगाव येथे अवैध विक्रीसाठी देशी दारू घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस उपनिरीक्षक राहुल रोडे यांनी सापळा रचला. हवालदार वसंत जिवडे यांनी संशयित रिक्षा (एम एच २० ई एफ १७६६) तपासली असता देशी दारूचे दहा बॉक्स आढळले. अंदाजे २४ हजार ९६० रुपयांची दारू व ५० हजार रुपयांचा रिक्षा, असा एकूण ७४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोडे, हवालदार वसंत शेळके, वसंत जिवडे, रामदास गाडेकर, प्रकाश गायकवाड, सुधीर वीण, फकीरचंद फड, बाबासाहेब काकडे, बंडू गोरे, दीपक आरमते, एम. पी. कोलिमी, सतवंत सोहळे, प्रदीप कुटे, मुळवंडे, चालक शिनगारे यांच्या पथकाने पार पाडली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूज एमआयडीसीतून तरुण कामगार बेपत्ता

0
0

वाळूज महानगर: वाळूज एमआयडीसीत कामासाठी आलेला २१ वर्षीय कामगार १८ जुलै रोजी दवाखान्यात जाऊन येतो, असे सांगून गेला तो परत आला नसल्याने बेपत्ता असल्याची नोंद वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. विद्यानंद हनुमंतराव कांबळे (रा. एकतानगर रांजणगाव शेणपुंजी, मूळ रा. अंबानगर विमानतळ रोड सांगवी जि. नांदेड), असे बेपत्ता कामगारांचे नाव आहे.

हा कामगार दोन महिन्यापूर्वी येथे कामाच्या शोधात आला होता. तो येथील विजया प्लास्टिक प्लॉट नंबर के २४ या कंपनीत हेल्पर म्हणून काम करत होता, तसेच रांजणगाव येथे मित्र ओम ठाकूर व सतीश खिल्लारे यांच्या सोबत भाड्याने राहत होता. १८ जुलै रोजी त्याचे त्याच्या आई सोबत फोनवर बोलणे झाले, त्यावेळी त्याने मारहाणीत माझ्या डोळ्यावर मार लागला असून डोळा सुजला असल्याचे सांगितले. आईने उपचार करून गावाकडे येण्याची सूचना केली. मात्र त्यानंतर त्याचा फोन सतत बंद येत असल्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी रांजणगाव येथे येऊन शोध घेतला असता तो सापडला नाही.

त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता, त्याने १८ जुलै रोजी सकाळी दहा वाजता दवाखान्यात जाऊन येतो असे सांगून निघून गेला, असी माहिती मिळाली. त्यादिवसापासून तो खोलीवर परत आला नसल्याने परिसरात, नातेवाईकांकडे व काम करत असलेल्या कंपनीत शोध घेतला मात्र तो मिळाला नाही. या प्रकरणी बेपत्ता कामगाराची आई शातांबाई हनुमंतराव कांबळे यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास देवरे हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका तपानंतर ‘सिद्धार्थ’च्या प्राणिसंग्रहालयात वाघांचे जगणे सुसह्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एका तपानंतर झालेल्या सुधारणांमुळे महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय वाघांसाठी सुसह्य झाले आहे. राज्यातील कोणत्याही प्राणिसंग्रहालयात नसतील एवढे वाघ सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात आहेत. नऊ पिवळे आणि तीन पांढरे असे बारा वाघ या ठिकाणी आहेत. एवढ्या वाघांना सांभाळण्याची क्षमता देखील प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनात आहे.

सिद्धार्थ उद्यानाचे प्राणिसंग्रहालय आता वाघांचे संग्रहालय म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या एक ते दीड वर्षात वाघांच्या आहार-विहार आणि निवासासाठी करण्यात आलेली कामे. वाघांसाठी या ठिकाणी सोळा पिंजरे आहेत. या पिंजऱ्यांची देखभाल दुरुस्ती केलीच जात नव्हती. त्यामुळे पिंजरे मोडकळीस आले होते. पिंजऱ्यांची स्वच्छता होत नसल्यामुळे कुबट वास त्या परिसरात यायचा. पिंजऱ्यांच्या भिंती देखील शेवाळलेल्या असायच्या. दिवाबत्तीची योग्य प्रकारे सोय नसल्यामुळे आंधाऱ्या कोठडीत वाघांना ठेवले आहे की काय असे वाटायचे, परंतु गेल्या एक-दीड वर्षात पिंजऱ्यांची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली. पिंजऱ्याच्या भिंतीला टाइल्स लावण्यास आल्या. त्यामुळे शेवाळलेल्या भिंती हे चित्र पालटले आहे. त्याचा परिणाम म्हणून कूबट वास देखील गायब झाला आहे. पिंजऱ्यांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. दिवाबत्तीची सोय केल्यामुळे पिंजऱ्यांमध्ये सतत प्रकाश असतो. पिण्याचे स्वच्छ पाणी वाघांना उपलब्ध करून दिले जात आहे. त्याशिवाय प्रत्येक पिंजऱ्याला एक्झॉस्ट फॅन लावण्यात आले आहेत. ही सर्व कामे सुमारे एक तपाच्या नंतर झाल्याचे सांगितले जाते.

वाघांना जगणे सुसह्य होईल असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासानाकडून केला गेला आहे. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या बारा झाली आहे. केवळ वाघांना पाहण्यासाठी नागरिक प्राणिसंग्रहालयात गर्दी करतात. याच प्राणिसंग्रहालयात २६ एप्रिल २०१९ रोजी वाघांच्या चार बछड्यांनी जन्म घेतला आहे. चार पैकी दोन पांढरे आणि दोन पिवळ्या रंगाचे बछडे आहेत. या बछड्यांचा नामकरण सोहळा देखील महापालिकेने मोठ्या दिमाखात केला. पांढऱ्या रंगाच्या बछड्यांची नावे प्रगती, आरती अशी ठेवण्यात आली आहेत, तर पिवळ्या रंगाच्या बछड्यांची नावे कुश आणि देविका अशी ठेवण्यात आली आहेत. आता हे बछडे आकर्षणाचा विषय ठरणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक शिरसाट यांना डेंगीची लागण

0
0

औरंगाबाद : महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांना डेंगीची लागण झाली आहे. त्यांच्यावर शहानूरवाडी परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकाला डेंगीची लागण झाल्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीचे आजार होऊ नयेत म्हणून आरोग्य विभागाने सतर्क रहावे, अशा सूचना वेळोवेळी पालिकेच्या आरोग्य विभागाला आयुक्त, महापौरांनी दिल्या होत्या. आरोग्य विभागाने देखील आपण सज्ज आहोत असे स्पष्ट केले होते. परंतु आता नगरसेवकालाच डेंगी झाल्यामुळे आरोग्य विभागाच्या सज्जतेबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धांत शिरसाट यांना डेंगीची लागण झाली. रविवारी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्ताचे नमुने तपासल्यावर त्यांना डेंगीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३० किलो प्लास्टिक तीन दिवसांत जप्त

0
0

औरंगाबाद : प्लास्टिक बंदीची कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या पथकाने तीन दिवसात शहरातील ९० दुकानदारांकडून १३० किलो प्लास्टिक जप्त करून एक लाख १४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. गेल्या आठवड्यात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी महापालिका आयुक्तांना प्लास्टिक बंदीची कारवाई प्रभावीपणे करण्यास सांगितले होते. त्यानंतर पालिकेने या कारवाईला वेग दिला. या कारवाईसाठी शिवाजी झनझन यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २७ जुलै रोजी झनझन यांच्या पथकाने २२३ दुकाने, ८६ टपऱ्या आणि ९३ हातगाड्यांची तपासणी केली. यामध्ये ५७ दुकानदारांकडून ६७ किलो ३०० ग्रॅम प्लास्टिक जप्त करीत ४२ हजार ९०० रुपयाचा दंड वसुल केला. २८ जुलै रोजी १२७ दुकानांची तपासणी करून पाच दुकानांमधून पाच किलो ७०० ग्रॅम प्लास्टिक जप्त करीत सात हजारांचा दंड वसूल केला. २९ जुलै रोजी १३२ दुकानांची तपासणी केली असता २७ दुकानांमधून ५७ किलो प्लास्टिक जप्त करीत ६४ हजार ४०० रुपयाचा दंड वसूल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठवाड्यात खरिपाची ८३ टक्के पेरणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाने पुन्हा एकदा सर्वदूर हजेरी लावल्याने पेरण्यांना वेग आला असून आतापर्यंत मराठवाड्यात ८४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात औरंगाबाद विभागात ९३, तर लातूर विभागात ७७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पीक उगवण आणि वाढीच्या स्थितीत असतानाच पावसाचे आगमन झाल्याने त्यांचा मोठा फायदा पिकांना होईल, असे कृषी विभागाने नमूद केले आहे.

आधीच मका पिकावर लष्करी अळीचे संकट व पीक वाढीच्या अवस्थेत असतानाच गेल्या काही दिवसापासून पावसानेही ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. त्यात पावसाने कृपादृष्टी दाखवत सर्वदूर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्याचा समावेश असून या तिन्ही जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सर्वसाधारण क्षेत्र २१ लाख १५ हजार हेक्टर आहे. यात प्रामुख्याने कापसाचे पेरा क्षेत्र १० लाख २० हेक्टर, तर त्यापाठोपाठ सोयाबीन आणि मक्याचे पेरा क्षेत्र जास्त प्रमाणात आहे. औरंगाबाद विभागात सर्वसाधारण क्षेत्रापैकी आतापर्यंत ९३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. लातूर कृषी सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात लातूर, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली या पाच जिल्ह्याचा समावेश आहे. लातूर विभागाचे खरीपचे सर्वसाधारण क्षेत्र ३० लाख हेक्टर असून आतापर्यंत ७७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

\Bपीकनिहाय पेरणी \B

मराठवाड्यात मक्याची पेरणी २ लाख ५४ हजार ४५३ हेक्टरवर पेरा (१०२ टक्के) झाला आहे. तूर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेते ७० टक्के, मूग ७१ टक्के, उडीद ६९ टक्के तर ११ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रावर (४३ टक्के) भूईमुगाची पेरणी झाली आहे. सोयाबीनचे सरासरी पेरणी क्षेत्र १२ लाख ३४ हजार ५०७ हेक्टर असून त्यापेक्षा अधिक म्हणजे १६ लाख ३७ हजार ९६० हेक्टरवर (१३२ टक्के) पेरणी झाली आहे. कापसाचे सरासरी क्षेत्र १७ लाख ७६ हजार ६५६ हेक्टर असून आतापर्यंत १५ लाख ६ हजार ८१२ हेक्टरवर पेरणी (६९ टक्के) झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसानंतर २८४ टँकर बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकीकडे राज्यभर वरुणराजाने दमदार हजेरी लावली असताना मराठवाड्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. मात्र औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे या जिल्ह्यांतील पिण्याचे पाणी पुरविणारे टँकर कमी झाले आहेत. गेल्या तीन दिवसांत झालेल्या पावसानंतर मराठवाड्यातील तब्बल २८४ टँकर प्रशासनाने बंद केले.

जून अखेरनंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर टँकरची संख्या निम्म्यापेक्षा कमी झाली होती, मात्र पाऊस नसल्याने जुलै महिन्यात टँकरची संख्या दोनशेने वाढली. दरम्यानच्या काळात औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात सतत होत असलेल्या पावसामुळे टँकरची संख्या घटली आहे. जूनअखेर टंचाई आराखडा संपुष्टात आला. त्यावेळी मराठवाड्यात ३२९७ टँकरद्वारे तब्बल ५४ लाख नागरिकांची तहान भागवण्यात येत होती. जुलै महिन्यात नव्याने टँकर सुरू करण्याचे सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे असल्यामुळे कोणत्या ठिकाणचे टँकर बंद करणे शक्य असल्याचा आढावा गावपातळीवरून घेऊन निम्म्यापेक्षा अधिक टँकर बंद करण्यात आले होते. मराठवाड्यात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली होती, प्रारंभी झालेल्या पावसानंतर मात्र पावसात सातत्य राहिले नसल्याने टँकरच्या मागणीत वाढ झाल्याने काही गावांत पुन्हा टँकर सुरू करावे लागले होते. सध्या मराठवाड्यातील दीड हजार गावे व ३४८ वाड्यांमधील ३६ लाख नागरिकांची तहान २०११ टँकरद्वारे भागवण्यात येत आहे.

मे महिन्यामध्येच राज्यातील टँकरच्या तुलनेत मराठवाड्यातील टँकरची संख्या सर्वाधिक होती. मान्सूनचे आगमन यंदा तुलनेत उशिराने झाले असले तरी, औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत टँकरची संख्या घटली आहे.

मराठवाड्यातील टँकर

जिल्हा.................... २६ जुलै रोजीचे टँकर .............. तीन दिवसांत झालेली घट

औरंगाबाद...............३९०...................२७७

जालना...................३५६....................०५

परभणी.....................६३....................००

हिंगोली....................४५......................०१

नांदेड...................१३१......................००

बीड....................६९९........................००

लातूर..................१०५.........................०१

उस्मानाबाद.........२२२..........................००

------------------------------------------

एकूण..................२०११.....................२८४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटीतील नेत्र विभागाच्या शस्त्रक्रियागृहात ड्रेनेजच्या पाण्याची गळती झाल्यानंतर शस्त्रक्रियांना ब्रेक लागला होता. त्यानंतर निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पूर्ण होऊन घाटीतील नेत्र शस्त्रक्रियांना प्रारंभ झाला आहे. त्याचवेळी स्थलांतराचा निर्णय घेण्यात आलेल्या आमखास मैदानासमोरील जिल्हा रुग्णालयाच्या नेत्र विभागात एक ऑगस्टपासून पुन्हा एकदा नेत्र शस्त्रक्रिया सुरू होणार आहेत. चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रियागाराचे काम पूर्ण होईपर्यंत आमखाससमोरच शस्त्रक्रिया होणार आहे. मिनी घाटी अर्थात चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नेत्र विभागाच्या शस्त्रक्रियागृहाचे काम पूर्ण होण्यासाठी ऑक्टोबर उजाडणार असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकाचा खून; दोन वर्षांनंतर एकास अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षकाच्या डोक्यात दगड घालून खून करून त्याच्याकडील रोख रक्कम, सोनसाखळी व मोबाइल लांबवल्याप्रकरणातील आरोपी राजू संतदिन गौतम उर्फ सोन्या बिहारी याला तब्बल दोन वर्षांनी शनिवारी (२७ जुलै) रात्री तपोवन एक्सप्रेसमधील जनरल डब्ब्यातून अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाात हजर केले असता बुधवारपर्यंत (३१ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. डी. श्रृंगारे-तांबडे यांनी दिले.

या प्रकरणात यापूर्वी लोहमार्ग पोलिसांनी १९ ऑगस्ट २०१७ रोजी आरोपी सोनू दिलीप वाघमारे (वय २०, रा. राजूनगर) व दीपक काशिनाथ सोळस (वय २०, रा. मनमाड) यांना अटक केली होती. दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रकरणात मृत दत्तात्रय माधवराव पोफळे यांचा भाऊ गुलाबराव माधवराव पोफळे (वय ४३, रा. शिंदेवडगाव, ता. घनसावंगी, जालना) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, दत्तात्रय पोफळे हे २२ फेब्रुवारी २०१७ रोजी औरंगाबादेत कामानिमित्त आले होते. काम संपल्यानंतर रात्री साडेनऊला ते पुन्हा जालन्याकडे जाण्यासाठी रेल्वेस्थानकात आले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना माराहण करून त्यांच्याजवळील रोख रक्कम, सोन साखळी व मोबाइल हिसकावून घेतला होता. त्यावेळी पोफळे यांनी आरोपींना प्रतिकार केला असता आरोपींनी त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. प्रकरणात औरंगाबाद लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. आरोपीकडून गुन्ह्यातील ऐवज हस्तगत करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी न्यायालयात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारमधील रक्कम लंपास; कोठडीत वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कारची काच फोडून चोरट्यांनी एका कंत्राटदाराचे ४ लाख ५० हजार रुपये चोरुन नेल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कोकणवाडी परिसरात घडली होती. या प्रकरणात विष्णू सिंग उर्फ विशाल सिंग प्रमोद सिंग, सोनुसिंग उमाशंकरसिंग व संदिप सत्तू सोनकर या आरोपींच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत (३० जुलै) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. डी. श्रृंगारे-तांबडे यांनी दिले.

या प्रकरणी निवृत्ती लक्ष्मणराव सूर्यवंशी (६१, रा. गारखेडा) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा कंत्राटदार असून, २५ फेब्रुवारी रोजी फिर्यादीने कामगारांचे वेतन देण्यासाठी बँकेतून ४ लाख ५५ हजार रुपये बँकेतून काढले होते. ही रक्कम फिर्यादी व त्यांच्या मित्राने कासलीवाल यांनी कारच्या डॅशबोर्डमध्ये ठेवली असता, आरोपींनी कारची काच फोडून डॅशबोर्डमधील रक्कम लांबवून धुम ठोकली होती. प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन विष्णू सिंग उर्फ विशाल सिंग प्रमोद सिंग (२८, रा. उत्तर प्रदेश, ह.मु ठाणे), सोनुसिंग उमाशंकरसिंग (२८, रा. उत्तर प्रदेश) व संदिप सत्तू सोनकर (२६, रा. उत्तर प्रदेश) या आरोपींना २३ जुलै रोजी अटक करुन त्यांना २८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांच्या पोलिस कोठडीमध्ये मंगळवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images