Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जायकवाडीच्या पातळीत ११ दिवसांत २५ फुटांनी वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याचा ओघ गेल्या साडेतेरा तासांत ओसरला असला तरी, २४ तासांत धरणाची पाणीपातळीत पाच फूट व पाणीसाठ्यात जवळपास १२ अब्ज घनफूट वाढ झाली आहे. गेल्या ११ दिवसांत धरणाच्या पाणीपातळीत २५ फुटांनी वाढ झाली असून, धरणाची पाणीपातळी आणखी सात फूट वाढल्यास धरण काठोकाठ भरणार आहे.

मंगळवारी दिवसभर जायकवाडी धरणात सव्वा लाख ते दीड लाख क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. बुधवारी त्यामध्ये थोडी घसरण झाली. दिवसभर धरणात एक लाख ते ८० हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याचा ओघ ओसरला असला तरी, गेल्या २४ तासांत ३९० दशलक्ष घनमीटर म्हणजेच जवळपास साडेतेरा टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. धरणाच्या पाणीपातळीत पाच फुटांनी वाढ झाली असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

२८ जुलैपासून जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू झाली असून, आतापर्यंत जायकवाडी धरणात १६०३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा म्हणजेच जवळपास ५६.६ टीएमसीने वाढ झाली आहे. गेल्या ११ दिवसांत धरणाची पाणीपातळीत २५ फुटांनी वाढ झाली आहे. १५२१ फूट पाणीपातळीची क्षमता असलेल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी १५१४.५ फुटांवर पोचली आहे. धरण काठोकाठ भरायला अजूनही धरणाची पाणीपातळी जवळपास साडेसहा फूट वाढण्याची आवश्यकता आहे. सध्या जायकवाडी धरणात २०६१.५१९ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा असून, यापैकी १३२३.४१३ दशलक्ष घनमीटर (६०.९६ टक्के) उपयुक्त साठा जमा झालेला आहे.

जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठा बुधवारी रात्री २१०१.३९० दशलक्ष घनमीटरपर्यंत (उपयुक्त साठा १३६३.२८४ दशलक्ष घनमीटर ६२.७९ टक्के) पोचला. रात्री प्रकल्पात ९७ हजार ७९२ क्युसेक पाणी येत होते. नांदूर मधमेश्वर येथून गोदापात्रात ३६ हजार १४२ क्युसेक आणि निळवंडे प्रकल्पातून प्रवरेच्या पात्रात आठ हजार ५५१ क्युसेक पाणी सोडण्यात येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तहसील कार्यालयात मेंढ्या आणून आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

लोहगड नांद्रा येथील वन विभागाची ९० हेक्टर जमीन मेंढपाळांना चराईसाठी मोकळी करून द्यावी, या मागणीसाठी प्रहार संघटना व धनगर समाज संघर्ष समितीने मंगळवारी तहसील कार्यालयासमोर मेंढ्या आणून आंदोलन केले.

मेंढपाळ व्यावसायिकांना कुरण चराईवर शासनाने बंदी घातली असून, त्यामुळे त्यांना भटकंती करावी लागते. याप्रश्नी बांधवांनी अनेकदा तहसलीदारांना निवेदन दिले. मात्र, निर्णय न झाल्याने मंगळवारी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मेंढपाळांनी मेंढ्या व घोडे तहसीलसमोर आणून दुपारी बारा वाजता आंदोलन सुरू केले. तब्बल दोन तासांनी नायब तहसीलदार कचरू काथार त्यांना भेटण्यासाठी आले, पण तहसीलदार आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. तहसीलदार उशिरा आल्याने पोलिसही ताटकळत उभे होते. तहसीलदार आले नाही आले तर, मेंढ्या औरंगाबाद - जळगाव महामार्गावर नेऊन रास्ता रोको करू असा इशारा दिल्यानंतर तहसीलदार सूरेंद्र देशमुख व वनपाल अण्णा वाघ हे आले. त्यांनी राखीव जमीन सोडून कुठेही मेंढ्या चारा असे लेखी आश्वासन दिले. मात्र, आंदोलक ९० हेक्टर सपाट जमिनीच्या मागणीवर अडून होते. ही मागणी मान्य झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी धनगर समाज संघर्ष समितीचे विभागीय अध्यक्ष अरुण रोडगे, जिल्हाध्यक्ष रंगनाथ राठोड, जिल्हा उपाध्यक्ष कैलास गायके, प्रहार जिल्हा कार्याध्यक्ष प्रभाकर बापू भुसारे, विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष कृष्णा गाडेकर, उपजिल्हाध्यक्ष सुदाम गायकवाड, शेकडो मेंढपाळ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीएसएनएल’ बंद; दोन तालुके वेठीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी फुलंब्री

फुलंब्री आणि गणोरी येथील 'बीएसएनएल'च्या टॉवरचे वीजबिल थकल्याने महावितरणने या टॉवरचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे बँका, शासकीय कार्यालये, खासगी कार्यालयातील ऑनलाइन कामे आठवड्यापासून खोळंबली आहेत. याचा मोठा फटका नागरिकांना बसला आहे.

फुलंब्री येथील बीएसएनएलकडे तब्बल चार लाख २० हजार ८६४ रुपयांचे वीजबिल थकले आहे. गणोरी परिसरातील टॉवरचेही वीजबिल थकले आहे. ही वसुली करण्यासाठी महावितरणने कठोर पावले उचलत, 'बीएसएनएल'च्या टॉवरची वीज तोडली आहे. त्यामुळे आठवड्यापासून 'बीएसएनएल' ग्राहकांची कामे खोळंबली आहेत. तालुक्यातील शासकीय कार्यालये, खासगी कार्यालय, बँका आणि घरामध्येही अनेकांनी 'बीएसएनएल'चे इंटरनेट कनेक्शन घेतले आहे. त्यामुळे या ठिकाणची सर्व ऑनलाइन कामे ठप्प झाली आहेत. खासगी व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. कुठल्याही सरकारी बँकेमध्ये कामासाठी गेल्यास इंटरनेट बंद आहे. त्यामुळे सिस्टिम सुरू नाही. इंटरनेट सुरू झाले की या, असे ग्राहकांना उत्तर मिळत आहे. ऑनलाइन शिक्षापत्रिका नोंदणीही सध्या बंद आहे. इंटरनेट बंद असल्यामुळे ई पॉस मशीन बंद आहे. त्यामुळे ग्राहक चकरा मारत आहेत. आठवड्यापासून ऐन मोक्याच्या काळात खतविक्री बंद झाली आहे, त्याबद्दल कृषी सेवा केंद्र चालक संताप व्यक्त करत आहेत. याबाबत महावितरणने मात्र बिल भरल्यास आम्ही लगेच वीजपुरवठा सुरू करू, अशी भूमिका घेतली आहे.

\Bसिल्लोडलाही तडाखा

\Bसिल्लोड : फुलंब्री येथील 'बीएसएनएल'चा वीजपुरवठा तोडल्याने सिल्लोड तालुक्यातील 'बीएसएनएल'ची इंटरनेट सेवा कोलमडली आहे.

त्यामुळे बँकांसह सरकारी कार्यालयातले व्यवहार ठप्प आहेत. मोठ्या बाजारपेठेचा तालुका म्हणून सिल्लोडची ओळख आहे. तालुक्यासह शेजारील कन्नड, सोयगाव, भोकरदन, फुलंब्री तालुक्यातील नागरिक देवाण-घेवाणीसाठी येथे येतात. यामुळे शहरात राष्ट्रीय बँकांसह खासगी बँकांची संख्या मोठी आहे. यातील बहुतांश बँकांमध्ये 'बीएसएनएल'च्या इंटरनेट सेवेचा वापर केला जातो. इंटरनेट सेवा बंद पडल्यामुळे येथील कामे ठप्प झाली आहेत. ग्राहक बँकांमध्ये हेलपाटे मारत असून बँक अधिकाऱ्यांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील पळशी, निल्लोड, गोळेगाव, अजिंठा, शिवणा, माणिकनगर, अन्वी यासह जिह्यातील तब्बल ७० 'बीएसएनएल'च्या टॉवरचे वीजबील थकल्याने महावितरणे वीजपुरवठा तोडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असल्याने पुरवठा विभागात ऑनलाइन शिधापत्रिका नोंदणी करण्याला विलंब होत आहे. दैनंदिन कामात अडचण निर्माण होत आहे. त्यासंबंधी संबंधित विभागाला पत्रही दिले आहे.

- प्रशांत काळे, नायब तहसीलदार

फुलंब्री येथील 'बीएसएनएल'च्या टॉवरचे वीजबिल थकले आहे. त्यामुळे टॉवरचा वीजपुरवठा बंद केला आहे. बिल भरल्यानंतर पुरवठा सुरू करू. इतर टॉवरचेही बिले थकल्याने त्यांचाही वीजपुरवटा बंद केला आहे.

- आर. आर. मिरगवणे, सहाय्यक अभियंता, महावितरण

गणोरी परिसरातील 'बीएसएनएल'च्या सर्व टॉवरचे वीजबिल थकले आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने सर्व टॉवरचे कनेक्शन बंद करण्यात आले आहे. बिल भरल्यानंतर विद्युत पुरवठा सुरळित करण्यात येईल.

- व्ही. आर. खाडे, कनिष्ठ अभियंता, वारेगाव

गेल्या दोन दिवसांपासून शहरात इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे ई पॉस मशिन बंद पडले आहे. त्यामुळे गेल्या तीन चार दिवसांपासून खत विक्री बंद झाली आहे. शेतकरी रोज दुकानामध्ये चकरा मारत आहेत.

- अशोक जाधव, कृषी सेवा केंद्र चालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन हजार ब्रास मुरूम परवानगीविना वापरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी फुलंब्री

खुलताबाद - फुलंब्री रस्त्याच्या सिमेंटीकरण कामासाठी वारेगाव गायरानातून कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता तीन हजार ब्रास मुरूम वापरल्याने मोठा महसूल बुडाला आहे. याप्रकरणी कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी वारेगावच्या गावकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

वारेगांव येथील गट क्रमांक २७८ व ३४४मधून हा मुरूम उचलला जात आहे. हे गट सरकारी गायरान डोंगर पायथ्याशी आहेत. याच पायथ्याशी वारेश्वर मंदिर, खंडोबा मंदिर व भवानीमाता मंदिर आहेत. येथे दरवर्षी यात्रा असते. हजारो भाविक येतात. महाप्रसादाचे मोठ-मोठे कार्यक्रम होतात. हा मुरूम उचलला जात असल्याने देवस्थानाची देखील विटंबना होत आहे. आतापर्यंत परवानगीविना तब्बल तीन हजार ब्रास मुरूम उचलला गेल्यामुळे त्यात प्रशासनाचा महसूल बुडाला व देवस्थान प्रांगणाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीवर गुन्हा दाखल करून संपूर्ण महसुल वसूल करावा अन्यथा बेमुदत उपोषण सुरू करा, असा इशारा गावकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदनावर शैलेश बोरसे, योगेश जाधव, साहेबराव जाधव, सागर जाईबहार, अक्षय जाधव, दीपक बोरसे, गणेश जाधव, पंडित जाधव, भाऊसाहेब थोरात, लक्ष्मण जाधव, सोनाजी जाईबहार, बाळासाहेब जाधव यांच्या सह्या आहेत.

वारेगाव येथील तक्रार अर्ज आलेला आहे. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पाहणी करून अहवाल दिला आहे. किती उत्खनन झाले ते ठरविण्यासाठी ईटीएस यंत्राद्वारे मोजणीसाठीचे पत्र भूमिअभिलेख यांना दिले आहे. या यंत्राद्वारे मोजणी करून उत्खनन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.

\B- सुरेंद्र देशमुख, तहसीलदार\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सख्ख्या भावाने केला बहिणीवर बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी कन्नड

राखीपौर्णिमा जवळ आली आहे. भाऊ-बहिणीचे नाते सगळ्यात श्रेष्ठ, पवित्र मानले जाते. मात्र, पिशोर येथे भावाने सख्ख्या बहिणीवर दोन दिवस बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी भावास अटक करण्यात आली असून, पीडित मुलगी अल्पवयीन आहे.

पिशोर येथील पीडित मुलीस तिच्या सख्खा भावाने सोमवारी (५ ऑगस्ट) सकाळी नऊ ते मंगळवारी (६ ऑगस्ट) दुपारी चारच्या दरम्यान कुणाला काही सांगितले तर मारून टाकीन, अशी धमकी देत तिच्यावर दोन दिवस बलात्कार केला. मुलीला त्रास होत असल्याने तिने हा प्रकार तिच्या आईस सांगितला. तेव्हा आईने मुलीस कोणाला काही सांगितले तर याद राख, असे धमकावले. या घटनेमुळे तिला त्रास होत असल्याने ती रडू लागली असता तिला तिच्या आईने काठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून कलम ३७६(२)(फ (आय), (जे,एन),३२४, ५०६, ३४ सह कलम ४ /६ पोस्कोसह कलम ७५ बाल न्याय (बालकांचे काळजी व संरक्षण अधिनियम) अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपींना अटक करण्यात आली असून औरंगाबादच्या विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली. तर आईस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश पवार करत आहे.

\Bआईने धमकावले

\Bबलात्कारानंतर मुलीला त्रास सुरू झाला. तिने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. तेव्हा आईने मुलीला धमकावले. हा प्रकार दुसऱ्यास सांगितला तर याद राख, अशी तंबी दिली. याप्रकरणी आईलाही अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आईची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इव्हीएम ‘हॅक’ न झाल्यास सत्तापरिवर्तन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधानसभा निवडणुकीत इव्हीएम मशीन हॅक होणार नसतील, तर निश्चित सत्तापरिवर्तन होईल. एक हॅकर ग्रुप न्यायालयात शपथपत्र सादर करणार आहे. प्रत्यक्ष वापरातील इव्हीएम हॅक होऊ शकते हे न्यायालयात सिद्ध करण्यास तयार असल्याचा दावा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीसाठी शहरात आलेले अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सुभेदारी विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीच्या नियोजनावर त्यांनी माहिती दिली. 'कॉंग्रेस वंचित बहुजन आघाडीवर भाजपची 'बी' टीम असल्याचा आरोप करीत आहे. त्यांनी कमरेखालचे आरोप केले असून आरोप सिद्ध करावा. अन्यथा, ऐकण्याची तयारी करावी. आरोप करणाऱ्या काँग्रेससोबत जाण्याचा प्रश्नच नसल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आहे का, या जाळ्यात मला अडकायचे नाही. ही अध्यक्षीय पद्धतीची निवडणूक नाही. मतदारसंघाचा आढावा घेऊन सक्षम उमेदवार दिले जातील, असे आंबेडकर म्हणाले.

विदर्भ आणि मराठवाड्याला वैधानिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विशेष दर्जा मिळाला आहे. त्यामुळे राज्यपालांनी निधी द्यायचा आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात त्याचा समावेश केल्यास विधानसभेत मंजूर होते. हा निधी महामंडळाने वापरायचा की राज्याने यावर माझी याचिका दाखल आहे. दोन्ही ठिकाणी फेब्रुवारीपर्यंत निधी अखर्चित ठेवून इतरत्र वळवतात. त्यामुळे अतिरीक्त मुख्य सचिव दर्जाचा अधिकारी नेमण्याची मागणी केली असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली. कलम ३७० नुसार विशेष दर्जा असलेल्या राज्याचा दर्जा काढण्याचे भाजपचे धोरण आहे. राज्याच्या विकासात विसंगती राहू शकत नाही. त्यामुळे मराठवाडा व विदर्भाच्या विकासाला धोका निर्माण झाला आहे, अशी टीका आंबेडकर यांनी केली.

\Bमुस्लिमांची नाराजी\B

निवडणुकीत मुस्लिम मतदारांची मते मौलवी ठरवतात. लोकसभा निवडणुकीत ही मते काँग्रेसला गेली, ओवेसी यांनीसुद्धा मान्य केले. या समस्येवर तोडगा काढणार आहोत. काँग्रेससोबत जाण्याचा विषय फक्त पत्रकार परिषदांमधून समोर येतो. वंचित बहुजन आघाडी एमआयएमसोबत लढणार असून संसदीय समितीचा दौरा आठवडाभरात पूर्ण होईल, असे आंबेडकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अर्ली चाइल्डहूड असोसिएशन’ची औरंगाबादेत शाखा सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पूर्व प्राथमिक शाळांशी संबंधित 'अर्ली चाईल्डहूड असोसिएशन'ची (ईसीए) औरंगाबादेत शाखा स्थापन करण्यात आली असून, विद्यार्थ्यांसंदर्भात समानता, शिक्षकांना प्रशिक्षण अशा विविध पातळींवर काम करण्यात येईल, अशी माहिती औरंगाबाद शाखेच्या अध्यक्ष स्नेहा गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पूर्व प्राथमिकस्तरावर मोठी असमानता आहे. बालवाड्या, समाजसेवी संस्था, छंदवर्ग चालवनाऱ्या संस्थांमधील शिक्षक, पालकांना सोबत घेऊन चांगले बदल घडविण्यासाठी शाखा काम करेल. त्यासह शिक्षकांना प्रशिक्षण, पूर्व प्राथमिकबाबत सरकारला ठोस धोरण निश्चित करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. सध्या ४०पेक्षा अधिक पूर्व प्राथमिक शाळा असोसिएशनशी जोडल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

औरंगाबाद शाखेचा उद्घाटन सोहळा ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यासाठी 'ईसीए'च्या उपाध्यक्ष रिटा सोनावट यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. औरंगाबाद शाखेच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी लिटिल वंडर इंटरनॅशनल स्कूलच्या स्नेहा गुप्ता यांची निवड करण्यात आली. सचिवपदी एमजीएम फर्स्ट स्टेप स्कूलच्या मीता कपूर, कोषाध्यक्ष निकिता अग्रवाल (ओइकस इंटरनॅशनल स्कूल), अन्नपूर्णा हलमाजगे (हॅप इंटरनॅशनल स्कूल), पल्लवी नरवाडे (क्रेयॉन किड्स नर्सरी), साक्षी देशपांडे (रिव्हरडेल), वैशाली कुलकर्णी (पोदार जम्बो किड्स) निरुपमा बाफना (एवोलविंग माइंडस प्री-स्कूल्स), सोनल लाडनिया (क्रेयोन्स प्री-स्कूल), आभा नागोरी (मिनी मिरॅकल), रश्मी चोप्रा (फूटस्टेप किंडेरगार्टन) आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी प्रवेशासाठी विशेष फेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विशेष फेरीचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. शुक्रवारी विशेष फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश अर्जाचा भाग-एक व भाग-दोन शुक्रवारपासून भरता येणार आहे.

अकरावी प्रवेशात प्रवेशाच्या तीन फेरी पूर्ण झाली. तिसरी फेरी दोन ऑगस्टपासून सुरू झाली सुरुवातीला पाच ऑगस्टपर्यंत मुदत होती मात्र, आठ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली. त्यानंतर विशेष फेरीचे गुरुवारी सायंकाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार शुक्रवारपासून प्रक्रिया सुरू होणार आहे. सकाळी दहा वाजता रिक्त जागांचा तपशील जाहीर केला जाणार आहे. या फेरीसाठी विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज दाखल करता येणार आहे. यामध्ये आतापर्यंत कोणत्याही कनिष्ठ कॉलेजमध्ये प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, प्रवेश नाकारलेले, या फेरीपूर्वी प्रवेशासाठी न गेलेले, कॉलेज न मिळालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया ९ ते १० ऑगस्ट अशी दोन दिवस चालणार आहे. या फेरीसाठीची गुणवत्ता यादी १४ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांना १४ ते १९ ऑगस्ट दरम्यान प्रत्यक्ष प्रवेश घ्यावा लागणार आहे.

\B'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य'\B

अकरावी प्रवेशात विशेष फेरीनंतर 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या फेरीचे' वेळापत्रकही जाहीर करण्यात आली. ही फेरी २० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. विशेष फेरीत रिक्त राहिलेल्या जागांची यादी २० ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. २१ ऑगस्ट रोजी प्रवेश न घेतलेले व दहावीमध्ये ८० टक्क्यापेक्षा अधिक गुण घेवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पॅनलद्वारे विद्यार्थी कॉलेज निवडू शकतात. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पॅनलद्वारे मिळालेल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना २१ ते २२ ऑगस्ट दरम्यान प्रवेश घ्यावा लागेल. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता रिक्त जागांची यादी जाहीर केली जाईल. यामध्ये २३ ऑगस्ट रोजी दहावीत ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी कॉलेज निवडू शकतात. त्या विद्यार्थ्यांना २३ व २४ ऑगस्टपर्यंत प्रवेश घ्यावयाचा आहे. तिसऱ्या प्रकारात २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी रिक्त जागांची माहिती जाहीर केली जाणार आहे. यामध्ये २६ ऑगस्ट रोजी दहावीत उत्तीर्ण विद्यार्थी कॉलेज निवडू शकतात. नोंदणी केलेल्या या विद्यार्थ्यांना २६ ते २७ असे दोन दिवस प्रवेशासाठी देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगरसेवक मलके यांना अपात्र ठरवावे

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

भाजपचे नारेगावचे नगरसेवक गोकुळ संपत मलके यांना अपात्र ठरवावे अशी विनंती करणाऱ्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. मंगेश पाटील यांनी प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

मलके यांनी २०१५ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरताना त्यांच्या तिसऱ्या अपत्याची माहिती दडविली. त्यांचे पद रद्द करावे आणि नगरसेवकपदाची फेरनिवडणूक घेण्याचा आदेश द्यावा. किंवा या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्ते चंद्रकांत दहिहंडे यांनी केली आहे. दहिहंडे यांनी खंडपीठात याचिका केली आहे. या याचिकेत राज्य शासन, राज्य निवडणूक आयोग आणि औरंगाबाद महापालिकेला प्रतिवादी केले आहे. मलके यांनी निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र भरताना त्यांच्या दोन अपत्यांची माहिती दर्शविली. त्यांना तिसरे अपत्य असूनही निवडणुकीआधी दस्तावेजात बदल करून त्यांचे तिसरे अपत्य हे 'भावाचा मुलगा' असल्याचे दर्शविले असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. यासंदर्भात महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातून माहिती अधिकारात ऑडिट ट्रेल रिपोर्ट मिळविला असता सदर दस्तावेज निवडणुकीच्या एक महिना आधी तयार केल्याचे समजले. दहिहंडे यांनी निवडणूक आयोग आणि पालिका आयुक्तांना मागील दोन वर्षांपासून पत्रव्यवहार केला. त्यात निवडणूक आयोगाने २०१७मध्ये चौकशी करून माहिती सादर करण्याचा आदेश पालिका आयुक्तांना दिला होता. परंतु पालिकेच्या विधी अधिकाऱ्यांनी प्रतिकूल अहवाल दिल्यामुळे यासंदर्भात कार्यवाही झाली नाही, असा दावा याचिकेत केला आहे. राज्य शासनातर्फे सहायक सरकारी वकील ए.आर. काळे काम पाहत आहेत. याचिकाकर्त्याची बाजू अभयसिंह भोसले व नीलेश देसले हे मांडत आहेत. या याचिकेची सुनावणी ११ सप्टेंबर रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृत्रिम पावसाचा आजपासून प्रयोग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यामध्ये अखेर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीचा मुहूर्त मिळाला आहे. शुक्रवारपासून (९ ऑगस्ट) औरंगाबाद विमानतळावरून 'क्लाउड सिडिंग' करण्यासाठी विमान उड्डाण घेणार असल्याची माहिती नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी तसेच तज्ज्ञांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयावर डॉप्लर रडार इन्स्टॉलेशनचे काम पूर्ण झाले असून प्रयोगासाठी सी-९० बनावटीचे विमानही औरंगाबाद येथे आले आहे. एकीकडे राज्यभर जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे, तर दुसरीकडे कोरड्या मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा असल्याने येथे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. प्रयोगाची पहिली चाचणी शुक्रवारी करण्यात येणार आहे.

विमानासोबतच शहरामध्ये कॅल्शियम क्लोराइड आणि सिल्व्हर आयोडाइड या रसायनांची फवारणी विमानाद्वारे केल्यानंतर १५ मिनिट ते एक तासाच्या दरम्यान पाऊस होऊ शकतो, असे तज्ज्ञ डॉ. जीवन प्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेसाठी हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर, यूएनडीपी व नैसर्गिक आपत्ती विभागाचे दत्त कामत, ख्याती वेदर मॉडिफिकेशन कंपनीचे अधिकारी, सुकाणू समितीचे श्रीरंग घोलप, कानुराज बगाटे, महसूल उपायुक्त सतीश खडके, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, मृणालिनी निंबाळकर यांची उपस्थिती होती. दरम्यान, गुरुवारी दिवसभर कृत्रिम पावसाच्या प्रयोगाशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली.

\Bदररोज सकाळी ११ वाजता नियोजन\B

आयुक्तालयाच्या तिसऱ्या मजल्यावर कंट्रोल रूम तयार करण्यात आली असून या कंट्रोल रूममध्ये प्रयोगासाठी नियुक्त करण्यात आलेले तीन अधिकारी हवामानाचा अंदाज, योग्य ढगांची माहिती तसेच 'प्लाइट प्लान' तयार करतील. पाऊस पाडण्यायोग्य ढगांची माहिती वैमानिकाला पाठवण्यात येऊन हा प्रयोग राबवण्यात येणार आहे. दररोज सकाळी ११ वाजता या प्रकारची बैठक होऊन विमान उड्डाणासाठी हिरवा कंदील मिळाल्यानंतर कृत्रिम पावसासाठी प्रयोग राबवण्यात येणार आहे.

- ५२ दिवस होणार प्रयोग

- २०० किमी हवाई अंतर ढगांचे मॉनिटरिंग

- ६ तास विमान हवेत राहू शकते

- प्रत्येक उड्डाणात ४८ फ्लेअर्सद्वारे होणार क्लाउड सिडिंग

- दररोज ठरणार फ्लाईंग प्लान

- पावसाचा दररोज अहवाल घेणार

- परतीच्या पावसातही प्रयोग करणार

- मुंबई, औरंगाबाद राहणार नियंत्रण केंद्र

- सोलापूर, गोवा, नागपूर येथील डॉप्लरचीही मदत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाथसागरावरील आरक्षण वाढविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरासाठीच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी जायकवाडी धरणातील पाण्याच्या आरक्षणात वाढ करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. आता हे आरक्षण ११३.२८ दशलक्ष घनमीटरवरून २२०.७७ दशलक्ष घनमीटर होणार आहे. हे आरक्षण २०५२मधील लोकसंख्या विचारात घेऊन केले आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार औरंगाबाद महापालिकेने वाढीव पाणीपुरवठा योजना तयार केली. या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) प्रशासकीय मंजुरीसाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाला सादर करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात प्रशासकीय मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद शहराची लोकसंख्या २०५२मध्ये सुमारे ३३ लाख होईल, असे गृहित धरून या योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी जायकवाडी धरणातील औरंगाबाद महापालिकेसाठीच्या पाण्याच्या आरक्षणात देखील वाढ करणे गरजेचे होते. त्यादृष्टीने गुरुवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली, अशी माहिती आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिली. पाण्याचे आरक्षण वाढवण्याच्या प्रस्तावाला तात्काळ मान्यता द्या, असे आदेश विभागीय आयुक्तांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (कडा) अधिकाऱ्यांना दिले आहेत. जायकवाडी धरणात औरंगाबाद महापालिकेसाठी सध्या ११३.२८ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण आहे. आता ते २२०.७७ दशलक्ष घनमीटर केले जाणार आहे. पाण्याचे आरक्षण वाढवण्याचा प्रस्ताव सोमवारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे सादर केला जाणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी नक्षत्रवाडी येथे जागा मिळाली आहे, त्याशिवाय 'एमबीआर'साठी (संतुलित जलकुंभ) जागा मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली आहे, असे त्यांनी सांगितले. जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनी टाकण्यासाठी राज्य शासनाच्या वन मंत्रालयाने परवानगी दिली आहे. आता याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या वन मंत्रालयात पाठवण्यात आला आहे. त्याला देखील मान्यता मिळण्याची शक्यता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

\Bसफारी पार्कचा 'डीपीआर' मंगळवारी\B

सफारी पार्कचा 'डीपीआर' अंतिम करण्यात आला असून, येत्या मंगळवारी तो दिल्लीतील सेंट्रल झू ऑथॅरिटीला सादर केला जाईल, अशी माहिती आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिली. 'डीपीआर' सादर करण्यासाठी आपण स्वत: जाणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉटर फिल्टर प्लांटची अधिकाऱ्यांकडून पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अहिंसानगर भागातील रहिवासी युसूफ मुखाती यांच्या वॉटर फिल्टर प्लांटची अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी पाहणी केली. पाहणीचा अहवाल हायकोर्टात सादर केला जाणार आहे. युसूफ मुखाती यांच्या वॉटर फिल्टर प्लांटबद्दल स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण, भूजल सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन केली होती. या समितीला प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी केली. पथकामध्ये केंद्रीय भूजल मंडळाचे प्रमुख प्रभाकुमार, महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक, अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. पी. कुलकर्णी, विधी सल्लागार अपर्णा थेटे, विधी सल्लागार अपर्णा थेटे, उपायुक्त रवींद्र निकम, नगररचना विभागाचे उपअभियंता ए. बी. देशमुख यांचा समावेश होता. पथकातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली. अहवाल न्यायालयात सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील तिन्ही जागांवर ‘एमआयएम’चा दावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधानसभेची २०१४ च्या निवडणुकीत 'एमआयएम'ने २४ लढविल्या होत्या. त्या कायम ठेऊन एकूण ८० जागांबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या समितीसोबत चर्चा केली जाणार आहे, असे 'एमआयएम'चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. औरंगाबाद शहरातील मध्य, पूर्व आणि पश्चिम या तिन्ही जागांवर 'एमआयएम'चाच हक्क राहिल, असे संकेत त्यांनी दिले.

'आधी 'वंबआ'कडे आधी १०० जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र अभ्यास केल्यानंतर ८० जागांची मागणी केली आहे. चर्चा करण्याकरिता शंकरराव घुगे, महेंद्र रोकडे आणि सुभाष तन्वर यांची समिती नियुक्त केली आहे. समितीने तीन दिवसांचा वेळ मागितला असून बकरी ईदमुळे आम्ही चार दिवसांचा वेळ दिला आहे. गेल्या निवडणुकीत 'एमआयएम' स्वबळावर दोन जागा मिळवल्या आहेत. इतर २२ जागांवर पक्षाचे उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहिले. शिवाय पाच वर्षे तेथे कार्यकर्ते परिश्रम करत आहेत. त्यामुळे या २४ जागांवर आमचा हक्क आहे', असे खासदार जलील यांनी सांगितले. पक्षात कुरघोडी करणारे, लोकसभा निवडणुकीत पक्षाचे काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची माहिती पक्षांकडे आलेली आहे. त्याची शहनिशा करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष शेख अहेमद, एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दीकी, एमआयएम पक्षाचे अरूण बोर्डे यांची उपस्थिती होती.

\B'सोशल इंजिनीअरिंग' \B

आगामी विधानसभा निवडणुकीत 'सोशल इंजिनीअरिंग' करण्यात येणार आहे. ब्राह्मण, मराठासह विविध जाती-धर्माच्या इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. इतर पक्षांचे नेते पक्षात दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

……

\Bसोलापूरसारखी चूक होऊ देणार नाही\B

लोकसभेच्या सोलापूर मतदारसंघात काही मुस्लिम धार्मिक नेत्यांनी काँग्रेसच्या प्रचारात पुढाकार घेतला. ही चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. तिहेरी तलाकप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी निर्णय बदलला. मुस्लिमांना धोका देणाऱ्या या पक्षाच्या प्रचारात हे धार्मिक नेते सहभागी होणार का? असा सवाल त्यांनी केला.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा क्रांतीमोर्चाचे आज धरणे आंदोलन

$
0
0

औरंगाबाद: मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात सरकारला दिलेल्या इशाऱ्यानंतरही मागण्या पूर्ण झाल्या नाही, यामुळे मराठा क्रांती मोर्चातर्फे ९ ऑगस्ट पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. समाजाच्या मागण्यांसाठी ४३ बांधवांनी बलिदान दिले होते, शासनाने या कुटुंबांना देऊ केलेली आर्थिक मदत अद्याप दिली नाही. या शिवाय आंदोलनादरम्यान १३ हजार ७०० कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे अद्याप मागे घेतले नाही, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे नाहीत, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची कर्जप्रकरणे मंजूर करण्याची प्रक्रियाही संथगतीने आहे. या मागण्या तत्काळ पूर्ण कराव्या या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकाचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माझ्या गाडीला धक्का का दिला, असे म्हणत एसटीसमोर रिक्षा आडवी लावून एसटी चालकाच्या केबिनमध्ये घुसून शिविगाळ करीत एसटी चालकाला मारहाण केल्याच्या प्रकरणातील आरोपी रिक्षाचालक कैलास रावसाहेब मोघे याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. गिरधारी यांनी फेटाळला.

या प्रकरणी एसटी चालक योगेश काशिनाथ मोंडोकार (३२, रा. रा. किनखेड, ता. अकोट, जि. अकोला) यांनी फिर्याद दिली होती. हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीला सोमवारी (५ ऑगस्ट) अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, प्रकरण गंभीर असून, आरोपीला जामीन दिल्यास आरोपी पुन्हा गुन्हा करू शकतो, साक्षीदारांवर दबाव आणू शकतो व तपासात अडथळे आणू शकतो. तसेच प्रकरणातील पुरावे गोळा करणे बाकी असल्याने आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील अजित अंकुश यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्योगांची फिनिक्स भरारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणानिमित्त क्रांतिदिनी नऊ ऑगस्ट २०१८ रोजी पुकारलेल्या बंदमध्ये समाजकंटकांनी घुसून वाळूज एमआयडीसी परिसरातील ५० कंपन्यांची तोडफोड करत ६० कोटींपेक्षा जास्त नुकसान केले. अवघ्या चार महिन्यांत या भळभळत्या वेदनेवर मात करत उद्योगांनी फिनिक्स भरारी घेत तब्बल ३० टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

गेल्या वर्षी क्रांतिदिनी शहरात शांततेत बंद सुरू असताना दुपारनंतर अचानक तरुणांच्या काही जमावांनी वाळूज एमआयडीसीमध्ये कंपन्यांना लक्ष्य केले. कंपन्यामध्ये शिरत मोठ्या प्रमाणावर जाळपोळ, दगडफेक केली. रात्री उशिरापर्यंत ही दंगल आटोक्यात आली नव्हती. पोलिसांनी दंगलीच्या विविध सात गुन्ह्यामध्ये अडीच हजार दंगलखोरांवर गुन्हे दाखल केले होते. मोठ्या प्रमाणावर धरपकड केली होती. या घटनेने उद्योग क्षेत्राचे अक्षरश: कंबरडे मोडले होते. मात्र, या संकटाला मोठा धैर्याने तोंड देत उद्योजकांनी वाटचाल केली. याबाबत उद्योजक राम भोगले 'मटा'शी बोलताना म्हणाले, 'पोषक वातावरण असेल तरच गुंतवणूकदार येतात पण, या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्राची प्रतिमा डागाळली. त्याचे गुंतवणुकीवर मोठे परिणाम होतील, अशी भीतीही अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र, या संकटावर उद्योजकांच्या एकजूटमुळे मात करता आली.

नकारात्मक विचार न करता सकारात्मक दृष्टीने पुढे जात येथील उद्योगक्षेत्राचा कसा विकास होईल, यासाठी सातत्याने सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच घटनेनंतर अवघ्या चार महिन्यांत संबंधित उद्योजकांनी १० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली. उद्योग वाढीसाठी हा काळा दिवस नव्हे तर, उद्योग संकल्प दिन म्हणून साजरा केला जात आहे,' असे ते म्हणाले. भोगले म्हणाले, 'शेंद्रा आदी भागात काही नवीन उद्योग निश्चित आले. मात्र, येथील काही उद्योजकांनी प्रकल्प विस्तार केला असे फारसे घडले नाही. एका वर्षापूर्वी घडलेल्या घटनेमुळे असे झाले असे म्हणता येणार नाही तर, हवाई वाहतूक नसणे, वाहन क्षेत्राबाबत जागतिक पातळीवर घडणाऱ्या घटना, दुष्काळी परिस्थिती यासह अन्य कारणेही यामागे असू शकतात. उद्योग वाढीसाठी अधिक पोषक वातावरण निर्मितीसाठी सर्वांचे संघटित प्रयत्न सुरू आहेत. त्यात शासनानेही अधिक पुढाकार घ्यावा, पायाभूत सुविधा द्याव्यात,' अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षण आंदोलनाचे समन्वयक नितीन देशमुख म्हणाले, 'नऊ ऑगस्ट २०१८ रोजी मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी झालेले आंदोलन हे लोकशाही पद्धतीने केले. त्यावेळी वाळूज एमआयडीसीत जो हिंसाचार झाला यात आंदोलकांचा सहभाग नव्हता. काही समाजकंटकांनी त्यांच्या फायद्यासाठी तसेच 'एमआयडीसी' विस्कळीत करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले होते. त्याचा आम्ही निषेध करतो. ज्या मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते त्यातील काही मागण्या काही अंशी पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे आंदोलनातील काही जणांवर दाखल केलेले गुन्हे शासनाने ते त्वरित मागे घ्यावे अशी आमची मागणी आहे. त्यानंतर वर्षभरात कुठेही हिंसाचाराचे पडसाद उमटले नाहीत. त्यामुळे कामगार किंवा मराठा मोर्चा आंदोलनाचा यात सहभाग नव्हता यावरून हेच यावरून सिद्ध होते.'\B

\B

\Bदंगलीचा आंदोलनाशी संबंध नाही

\Bदंगलीचा आणि मराठा आरक्षण आंदोलनाचा काही सबंध नाही, हे त्याच वेळी पेालिस प्रशासनाने स्पष्ट केले होते. दरम्यान, या दंगलीमागे अनेक वेगवेगळी कारणे असल्याचे तपासात समोर आले. यामध्ये कंपनीच्या युनियनमधील वाद, कंपन्यातून कमी केलेले कामगार, कंत्राटी कामगार आदी कारणांचा समावेश होता. दंगलीनंतर वाळूज एमआयडीसी परिसरात आणखी एक पोलिस ठाणे उघडणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र, एका नविन पोलिस चौकीची सुरुवात 'एमआयडीसी'त करण्यात आली. वर्ष उलटले तरी नवीन पोलिस ठाण्याची चर्चा तशीच राहिली.

दंगलीच्या घटनेतून बाहेर पडत सर्वांनी सकारात्मक दृष्टीने प्रयत्न केले. काय होऊ नये, त्यासाठी काय केले पाहिजे, हेच त्या घटनेतून शिकलो. म्हणूनच नऊ ऑगस्ट हा दिन उद्योगवाढीसाठी, पोषक वातावरणसाठी उद्योग संकल्प दिन साजरा केला जात आहे.

-राम भोगले, उद्योजक

--

त्या दिवशी जे काही घडले ते कोणत्याही औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी चांगली बाब नाही. अशा घटनेचा मोठा विपरित परिणाम त्या औद्योगिक क्षेत्रावर होतो. मात्र, सर्वांच्या प्रयत्नामुळे आज येथील औद्योगिक क्षेत्रातील वातावरण खूपच पोषक असे झाले आहे.

-प्रसाद कोकीळ, उद्योजक

--

तोडफोडीची घटना औद्योगिक क्षेत्रासाठी अत्यंत वाईट होती. अनेक उद्योगांचे मोठे नुकसान झाले. मालमत्तेची नासधूस झाली होती. स्वखर्च करत उद्योजकांनी पुन्हा नव्या उमेदीने कंपन्या उभारल्या आहेत. येथील औद्योगिक क्षेत्राची प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आहे.

- ज्ञानदेव राजळे, उद्योजक

----

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिस्पर्ध्यांचे ‘घोडेबाजार’वर एकमत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार भवानीदास (बाबूराव) कुलकर्णी यांचे 'मतदारांचा घोडेबाजार' होऊ न देण्यावर एकमत झाले आहे. या संदर्भात त्यांनी संयुक्त पत्र प्रसिद्धीस दिले आहे.

महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती रेणुकादास वैद्य यांनी पुढाकार घेत दानवे व कुलकर्णी यांची स्वत:च्या घरी बैठक घडवून आणली. या बैठकीत दानवे-कुलकर्णी यांनी विधान परिषदेच्या निवडणूकीत घोडेबाजार न करण्याचा संकल्प केला. या दोन उमेदवारांनी जारी केलेल्या संयुक्त पत्रकात म्हटले आहे की, १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या संस्था निवडणुकीत विविध माध्यमातून घोडेबाजार सुरू असल्याच्या खोट्या बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत. आम्ही दोन्ही उमेदवारांनी या निवडणुकीत काही बाबी करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यात प्रामुख्याने भ्रष्ट पद्धतीचा अवलंब करून या निवडणुका होऊ नयेत, आपला पक्ष, आपली विचारसरणी, आपले सामाजिक-राजकीय कार्य या हेतूनेच मतदारांशी संपर्क साधून मतदान करावे, असे आवाहन मतदारांना करण्याचे ठरवले आहे. मतदारांनी सुद्धा लोकशाही मजबूत करण्यासाठी पारदर्शक निवडणूक करण्यासाठी आम्हास सहकार्य करावे, असे आवाहन आम्ही करीत आहोत. या पत्रकावर दानवे आणि कुलकर्णी यांच्या सह्या आहेत.

\Bबाबूरावांचे 'संभाजीनगर'\B

संयुक्त पत्रकावर स्वाक्षरी करताना भवानीदास (बाबूराव) कुलकर्णी यांनी 'उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्था संभाजीनगर-जालना मतदारसंघ' असा उल्लेख असलेला शिक्का मारला आहे. दानवे-कुलकर्णी यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यात मात्र कुलकर्णी यांनी औरंगाबाद-जालना मतदारसंघ, असा उल्लेख केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलवाहिनीचा व्हॉल्व्ह फुटला; औरंगाबाद शहरात निर्जळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी प्रकल्पातून औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १४०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पैठण रोडवरील इसारवाडी येथे फुटला. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रात्री आठच्या सुमारास जायकवाडी येथील पंप हाउसमधील सर्व पंप बंद करून जलवाहिनीचा पाणीपुरवठा खंडित केला. संपूर्ण जलवाहिनी रिकामी होईपर्यंत दुरुस्तीचे काम करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. जलवाहिनी रिकामी होण्यासाठी किमान चार तास लागतील. त्यानंतर दुरुस्तीचे काम सुरु केले जाणार आहे. यामुळे शुक्रवार आणि शनिवारी पाणीपुरवठा होणार नाही, असे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे कळवण्यात आले आहे. प्रामुख्याने सिडको-हडकोभागात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहमदाबाद विमान सेवा २ सप्टेंबरपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

येत्या दोन सप्टेंबरपासून औरंगाबाद-अहमदाबाद विमान सेवा सुरू होणार आहे. ही सेवा सुरू करण्याबद्दल 'ट्रु जेट' या विमान कंपनीने अधिकृत घोषणा केली असून तिकीट बुकिंग सुरू करण्यात आली आहे.

औरंगाबाद विमानतळावरून विमान सेवा सुरू होण्यासाठी काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्याला 'ट्रु जेट' कडून पहिला प्रतिसाद मिळाला आहे. 'ट्रु जेट'तर्फे अहमदाबाद-औरंगाबाद-अहमदाबाद विमान सुरू होत असल्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली. हे विमान दोन सप्टेंबर रोजी दुपारी ४.१० वाजता अहमदाबादहून औरंगाबादकडे निघणार आहे. ते औरंगाबादला सायंकाळी ५.३५ वाजता पोहचणार आहे. हे विमान औरंगाबादहून सायंकाळी सहा वाजता उड्डाण करून अहमदाबाद येथे रात्री ७.२५ वाजता पोहचणार आहे. या सेवेत इंदूरचा समावेश करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. सध्या हे विमान आठवड्यातून चार दिवस उड्डाण करणार असून प्रतिसाद वाढल्यास फेऱ्या वाढविण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.

…………

\B'स्पाईस जेट'चे दिल्ली विमान लवकरच \B

'इंडिगो' पाठोपाठ 'स्पाईस जेट'नेही दिल्ली-औरंगाबाद विमान सेवेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हे विमान ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

………

\Bपर्यटन उद्योगाला होणार लाभ \B

औरंगाबादेतून सध्या 'एअर इंडिया'ची मुंबई-औरंगाबाद-दिल्ली, ट्रु जेटची हैदराबादसाठी विमान सेवा आहे. 'एअर इंडिया'ने मुंबई-औरंगाबाद-उदयपूर व 'इंडिगो'ने दिल्ली विमान सेवेची घोषणा केली आहे. आता ट्रु जेटने अहमदाबाद, स्पाईस जेटने दिल्ली विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही महिन्यांत पर्यटन उद्योग वाढण्यास मदत मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीव्हीची केबल टाकताना मृत्यू

$
0
0

औरंगाबाद : टीव्हीची केबल टाकताना एका तरुणाचा गुरुवारी विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. नितीन शेजवळ असे या तरुणाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून महूनगर मध्ये गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास शेजवळ हा टीव्हीची केबल टाकत होता. त्यावेळी त्याचा विद्युत वाहिनीशी संपर्क होऊन ते भाजला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असता मृत झाल्याचे स्पष्ट झाले. दुसऱ्या एका घटनेत चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये दुपारी तीनच्या सुमारास कृष्णा जाधव यांच्या १५ ते २० म्हशींचा कळप रस्त्याने जात होता. त्यावेळी रस्त्याच्या कडेला साचलेल्या पाण्याच्या डबक्‍यात विद्युत वाहिनी तुटून पडलेली होती. त्यावेळी विद्युत वाहिनीच्या संपर्कात आलेल्या तीन म्हशींचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images