Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शिक्षकांनी राष्ट्र निर्माते व्हावे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कोणत्याही शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षक, विद्यार्थी, व्यवस्था व अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण घटक असतात. भारतीय मानसिकता आजही वसाहतवादी प्रभावातून मुक्त नसल्याने आजच्या शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मकता आली आहे. आजच्या काळात शिक्षणामध्ये शिक्षकांची तटस्थता, अज्ञान, जागरूकतेचा अभाव या मोठ्या समस्या झाल्या आहेत. या दूर होऊन शिक्षकाला राष्ट्र निर्मात्याची भूमिका बजावावी लागेल,' असे आवाहन प्रज्ञा प्रवाहचे अखिल भारतीय संयोजक जे. नंदकुमार यांनी केले.

विवेकानंद महाविद्यालय आणि भारतीय शिक्षण मंडळ, देवगिरी प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने 'नवभारत निर्मितीत उच्च शिक्षणाची भूमिका' या विषयावर एक मंगळ‌वारी विवेकानंद महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आयटी तज्ज्ञ प्रशांत पोळ यांच्या हस्ते झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, डॉ. सर्जेराव ठोंबरे, विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय शिसोदे उपस्थित होते. उद्घाटकीय भाषणात पोळ म्हणाले, 'भारतातील शिक्षण परंपरा या अत्यंत भव्य आणि गौरवशाली होत्या. शिक्षणातून समृद्धी भारतामध्ये अनुभवास येत होती. प्राचीन काळात शैक्षणिक प्रगतीमुळेच भारत विश्व व्यापारामध्ये नेतृत्व करीत होता.'

जे. नंदकुमार म्हणाले, 'आजच्या काळात शिक्षणामध्ये शिक्षकांची तटस्थता, अज्ञान, जागरूकतेचा अभाव मोठ्या समस्या झाल्या आहेत. या दूर होऊन शिक्षकाला राष्ट्र निर्मात्याची भूमिका बजावावी लागेल असे सांगत शिक्षकांनी तटस्थ राहू नये,' असे आवाहन केले. समारोप सत्रात बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले यांनी 'भारतीय शिक्षण पाश्चात्त्य प्रभावाने बळी पडत आहे. आज घडीला भारतीय शिक्षणामध्ये सामाजिक प्रासंगिकता, गौरवशाली सांस्कृतिक वर्षाचा अभ्यास, प्रादेशिक गरजांशी पूर्तता, कौशल्य आधारित आणि मानवतावादाचा अंतर्भाव असणे आवश्यक आहे. येणारे नवीन शैक्षणिक धोरण, प्राथमिक शिक्षण व संशोधनावर भर देणारे असल्याचे,' त्यांनी नमूद केले. यावेळी श्रीमंतराव शिसोदे, प्रभाकर मोरे, कार्यशाळेचे संयोजक डॉ. अशोक गायकवाड, निमंत्रक प्रो. मकरंद पैठणकर, डॉ. योगेश भादे, डॉ. गोपाल बल्लोज, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र शेजुळ उपस्थित होते. प्रास्तविक प्राचार्य श्याम शिरसाठ यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाढदिवस - विजया रहाटकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग

दौलताबाद - चाळीसगाव रेल्वे मार्गाला मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दौलताबाद - चाळीसगाव या ८१ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला अखेर महाराष्ट्र रेल्वे डेव्हलपमेंट लिमिटेडच्या (एमआयडीएल) संचालक मंडळाने मंजुरी दिली असून, हे काम लवकरच सुरू होणार आहे.

नांदेड ते औरंगाबाद मार्गे जाणाऱ्या गाड्यांना सध्या मनमाडहून उत्तर भारतात जावे लागते. दौलताबाद ते चाळीसगाव मार्गाचे काम तयार झाल्यास या रेल्वेंना मनमाडकडे जाण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे हा मार्ग करण्याची मागणी आमदार प्रशांत बंब यांनी केली होती. रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली. आयआयटी खरकपूर संस्थेने सर्वेक्षणही केले होते. मात्र, गेल्या चार वर्षांत यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा, रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर, सचिव प्रल्हाद पारटकर, कन्नडचे लोकप्रतिनिधी, व्यावसायिक, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी पाठपुरावा केला. संसदेत खासदार इम्तियाज जलील आणि खासदार उन्मेष पाटील यांनीही प्रश्न उचलला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा मार्ग 'एमआरडीएल'च्या माध्यमातून करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर 'एमआरडीएल'च्या संचालक मंडळाचे अध्यक्ष अजॉय मेहता यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या मार्गाला मंजुरी देण्यात आली असून, हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर वित्त विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे.

……

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौलताबाद चाळीसगाव रेल्वे मार्गाची घोषणा केली होती. त्यानुसार 'एमआरडीएल'ने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांच्या मतदार क्षेत्रातून हा मार्ग जाणार असल्याने ते ही या प्रस्तावाबाबत पाठपुरावा करून काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

\B- अनंत बोरकर, अध्यक्ष, रेल्वे कृती समिती औरंगाबाद

\B

\Bरेल्वे मार्गाचे फायदे

\B- औरंगाबाद चाळीसगाव अंतर फक्त तासाभराचे

- उत्तर भारतातली मालवाहतूक थेट औरंगाबाद पर्यंत

- मनमाड रेल्वे स्टेशनवर होणारी रेल्वेची गर्दी कमी होईल

- बिकानेर, दिल्ली तसेच अन्य मार्गावर रेल्वेची संख्या वाढेल……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३४३८ खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदारांची मनधरणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तिडोरीत खडखडाट असलेल्या महापालिकेने आता पॅचवर्कसाठी कंत्राटदारांची मनधरणी सुरू केली आहे. नऊ झोन कार्यालयांच्या क्षेत्रात तब्बल ३४३८ खड्डे असून कंत्राटदार सहकार्य करीत नसतील, तर हे खड्डे बुजवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एक खड्डा बुजवण्यासाठी एक ते पाच हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. कंत्राटदार पॅचवर्कसाठी तयार होत नसल्यामुळे शंभर कोटींच्या रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडूनच खड्डे बुजवा, असे आदेश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

शासनाने शहरातील रस्त्यांच्या कामासाठी महापालिकेला शंभर कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. शासनाच्या निधीतून केल्या जाणाऱ्या रस्त्यांची कामे फारच धीम्यागतीने सुरू आहेत. त्यातच आता उर्वरित रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे खड्ड्यांची समस्या अधिकच तीव्र झाली आहे. त्यातच आता सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत. दोन सप्टेबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर खड्डे बजवण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी बैठक घेतली. बैठकीला अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. पी. कुलकर्णी, शहर अभियंता सखाराम पानझडे, वॉर्ड अभियंते उपस्थित होते. कंत्राटदार पॅचवर्कची कामे करण्यास तयार नाहीत, असे वॉर्ड अभियंत्यांनी बैठकीत सांगितले. पॅचवर्कच्या कामेचे टेंडर भरून देखील कंत्राटदार काम करण्यास तयार नाहीत, असे या अभियंत्यांनी स्पष्ट केले, तेव्हा अशा कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करा, असे आदेश महापौरांनी दिले. शासनाने दिलेल्या शंभर कोटी रुपयांच्या अनुदानातून चार कंत्राटदार रस्त्यांची कामे करीत आहेत. याच कंत्राटदारांकडून पॅचवर्कची कामे करुन घ्या, पॅचवर्कसाठी आवश्यक असलेले जास्तीचे साहित्य त्या कंत्राटदारांना उपलब्ध करून द्या, असेही महापौरांनी अधिकाऱ्यांना सांगितले. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी पॅचवर्कची कामे पूर्ण झाली पाहिजेत असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

झोन क्रमांक लहान खड्डे मध्यम खड्डे मोठे खड्डे एकूण खड्डे अपघात स्थळ

१ - ७२ - १८ - ४ - ९४ - ५

२ - १८३ - १८२ - ६० - ४२५ - ८

३ - ३९९ - ३२ - २५ - ४५९

४ - १४४ - ८२ - ७९ - ३०५

५ - १३१ - ५७ - २० - २०८

६ - १४२ - ६१ - ६१ - २६४ - ५

७ - ७४४ - ४९ - १८ - ८११ - १

८ - २५५ - ४४ - १२ - ३११

९ - २२७ - २३२ - १०२ - ५६१

एकूण - २२९७ - ७६० - ३८१ - ३४३८ - १९

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी अधिकाऱ्यांकडून लष्करी अळीची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मका पिकापाठोपाठ अमेरिकन लष्करी अळीने बाजरीवर हल्ला चढवल्याची बातमी 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेत मंगळवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या अळीचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राची पाहणी केली व शेतकऱ्यांना एकात्मिक कीड व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.

अंत्यत विध्वंसक कीड असलेल्या अमेरिकन अळी जिल्ह्यातील सुमारे ६० हजार हेक्टरवरील मका पिकांवर आढळून आली आहे. अमेरिका, आफ्रिका खंडासह चीन, फिलिपाइन्स या देशात या किडीने मका पिकांचे मोठे नुकसान केले. २० ते ६० टक्के नुकसान झाल्याच्या नोंदी आहे. गेल्यावर्षी कर्नाटक, तामिळनाडूमध्ये या अळीने मका पीक उद्ध्वस्त केले.

कोल्हापूर भागातही प्रादुर्भाव आढळून आला. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक भागातील मका पिकाला लक्ष्य केल्यानंतर ही अळी कुंभेफळ भागात लागवड केलेल्या बाजरीवर आढ‌ळून आली आहे. याबाबतची बातमी 'मटा'ने प्रसिद्ध केल्यानंतर, त्याची दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, डॉ. एन. आर. पतंगे, डॉ. के. के. झाडे यांनी मंगळवारी कुंभेफळ परिसरातील बाजरी लागवड क्षेत्राची पाहणी केली.

पाहणीनंतर 'मटा'शी बोलताना डॉ. मोटे यांनी, ही लष्करी अळी ८० प्रकारच्या वनस्पतीवर जगू शकते. काहीच मिळाले नाही तर गवतावरही जगू शकते. या किडीचे मका हे आवडते पीक असून, ज्वारी, ऊस, गहू व इतर पिकांवर उपजीविका करू शकते. या परिसरातील मक्या पाठोपाठ बाजरी पिकावर ही अळी आढळून आली. बाजरी कणसे लागल्याच्या अवस्थेत असून, उपाययोजनेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदीतही चोरट्यांची चांदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देशात मंदी असल्याची चर्चा सुरू असताना, खासगी क्षेत्रांतील नोकऱ्यांबाबत चिंतेचे वातावरण असताना शहरातील भुरट्या चोरांची मात्र 'चांदी' होत आहे. दुचाकी वाहनांसह घरफोडीचे गुन्हे गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहेत.

शहरात चोऱ्या आणि रस्त्यांवरील घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेष पोलिस अधिकारी श्रीमंत भाऊराव गोर्डे पाटील (६४, रा. संग्रामनगर) नेहमी पोलिसांच्या मदतीला धाऊन जातात. त्यांच्याच बियर शॉपीवर चोराने डल्ला मारला. विधान परिषदेची निवडणूक असल्याने सोमवारी सायंकाळपर्यंत 'ड्राय डे' होता. त्यावेळी भरदुपारी पावणेदोनच्या सुमारास चोराने गोर्डे पाटील यांच्या बियर शॉपीच्या गेटजवळील ग्रील उचकटून गल्ल्यातील पाच ते सहा हजारांची रोकड लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यावर गोर्डे पाटील यांनी जवाहरनगर पोलिस ठाणे गाठत सीसीटीव्हीत चित्रित झालेल्या अमोल वैजनाथ गलाटे (रा. इंदिरानगर) याच्याविरुद्ध तक्रार दिली.

भावसिंगपुरा भागातील डॉक्टर कुलदीप सखाराम वाकपांजर (३१, रा. प्लॉट क्र. १०, पेठेनगर) हे कुटुंबीयांसह १६ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास अकोल्याला गेले होते. त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजाला व चॅनेल गेटला कुलूप लावले होते. बंगल्यात कोणीही नसल्याची संधी साधून चोराने कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांच्या बंगल्यातून १२ हजारांचे कानातील झुंबर, कर्णफुले, दहा ग्रॅमची सोनसाखळी, एक ग्रॅमचे पेंडल, मणी-मंगळसूत्र, चांदीचे दोन शिक्के; तसेच एक चांदीची पैंजण लांबवली. हा प्रकार रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरी परतलेल्या वाकपांजर यांच्या निदर्शनास आला. त्यावरून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांधकाम कंत्राटदाराची आई बाथरुममध्ये असताना बाथरुमला बाहेरून कडी लावून दाग-दागिन्यांसह रोकड लांबविल्याचा अजब प्रकार आठ ऑगस्ट रोजी भरदिवसा घडला. आकाश किशोर गायकवाड (२८,, रा. फ्रेंड्स कॉलनी, कोकणवाडी) यांच्या आई सकाळी दहाच्या सुमारास बाथरुमममध्ये होत्या. यावेळी नातेवाईक असलेल्या महिलेने बाथरुमला बाहेरून कडी लावून १६ ग्रॅमच्या चार पोत, दोन ग्रॅमचे सेव्हनपीस, तीन ग्रॅमच्या दोन अंगठ्या, एक ग्रॅमची नथ, तीन ग्रॅमचे ओमचे पेंडल, चार ग्रॅमचे कानातील रिंग आणि पाच हजारांची रोकड लांबवली.

याशिवाय सेवानिवृत्त अधिकारी सुहास भीमराव मुंगीकर (६९, रा. पेन्शनपुरा, क्रांतीचौक पोलिस ठाणे रोड) हे रविवारी सायंकाळी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. सायंकाळी सहा ते रात्री आठ यादरम्यान चोराने दरवाजाचे कुलूप तोडले. आत शिरून चोराने दोन तोळ्याचे चांदीचे अभिषेक पात्र, २० ग्रॅमची चांदीची अंगठी, एक ग्रॅमची सोन्याची अंगठी, पाच हजाराचा मोबाइल आणि एक हजार चारशे रुपयांची रोकड लंपास केली. याशिवाय मोबाइल चोरी, मोटार वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

\Bअवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई\B

शहरात दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर कारवाई सध्या वेगात सुरू आहे. गुन्हे शाखेपासून ते पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांपर्यंत बहुतांश पोलिस या कारवाईत मग्न आहेत. सार्वजनिक वाहतुकीला अडथळा आणण्याऱ्या वाहनांवरही वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू आहे. याशिवाय अन्य छोट्या कारवाई करण्यात पोलिस विभागाचे मोठे परिश्रम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

\Bचमकोगिरी अधिकाऱ्यांवर 'नजर'\B

पोलिस आयुक्तालयात असलेल्या विविध विभागांतर्गत काही मोजके पोलिस अधिकारी योग्य कारवाई करून गुन्ह्यांचा छडा लावत आहेत. काही प्रकरणांमध्ये ही कारवाई 'चमकोगिरी' असल्याची चर्चा समोर आलेली आहे. अशा काही अधिकाऱ्यांविरोधात मुंबईच्या वरिष्ठ कार्यालयापर्यंत तक्रारी गेलेल्या आहेत. अशी 'चमकोगिरी' करणाऱ्या अधिकाऱ्यांवर पोलिस आयुक्तांची नजर असल्याची माहिती पोलिस विभागाच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरू सर्मा यांनी स्वीकारला पदभार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार डॉ. कोल्लुरू व्यंकटा सोमनाचा सर्मा यांनी मंगळवारी (२० ऑगस्ट) प्रभारी कुलगुरू कोंडय्या जोनलगड्डा यांच्याकडून स्वीकारला. यावेळी विदयापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अशोक वडजे व कुलगुरूचे स्वीय सहाय्यक विठ्ठल सपकाळ हजर होते.

डॉ. सर्मा हे तेलंगणामधील नलसार राष्ट्रीय विधी विद्यापीठ हैदराबाद येथे गेल्या २० वर्षांपासून वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. तसेच ते कन्झ्युमर आणि कॉम्पिटेशन लॉ विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्या शिवाय तेथे त्यांच्याकडे कार्पोरेट आणि कमर्शियल लॉ विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता. त्यांनी निझाम इन्स्ट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, हैदराबाद येथील प्रसिद्ध रुग्णालयामध्ये विधीतज्ज्ञ म्हणून काम केले आहे, अशी माहिती विधी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विठ्ठल सपकाळ यांनी दिली.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृत्रिम पाऊस पडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी उपयुक्त ढग असल्यामुळे मंगळवारी विमानाने आकाशात झेप घेतली. जालना तसेच घनसावंगी तालुक्यांमधील काही गावांमध्ये सहा फ्लेअर्स सोडण्यात आल्यामुळे काही ठिकाणी पाऊस झाल्याची माहिती महसूल उपायुक्त सतीश खडके यांनी दिली.

फ्लेअर्स संदर्भात अद्यापही परवानग्या प्रलंबित असल्यामुळे संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कृत्रिम पावसाच्या विमानाने सोलापूर येथून उड्डाण घेतले. दरम्यानच्या काळात डॉप्लर रडारच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील घनसावंगी तसेच जालना तालुक्यातील काही गावांवर पाऊस पाडण्यायोग्य उपयुक्त ढग असल्याची माहिती वैमानिकाला देण्यात आली. यानंतर बेलगाव, हासनखेडा व भटाण यासह परिसरातील सहा ते आठ गावांवर सहा फ्लेअर्स सोडण्यात आले. ढगांवर रसायनांची फवारणी केल्यानंतर काही गावांमध्ये पाऊस पडला आहे. नेमका किती पाऊस पडला या संदर्भात माहिती गोळा करण्याचे काम संध्याकाळपर्यंत सुरू होते. बुधवारी सकाळी पुन्हा एकदा तज्ज्ञांची बैठक होणार असून, उद्या विमान उडणार की नाही हे ढगांच्या स्थितीनुसार ठरवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाळुप्रकरणामध्ये खून; तिघांना अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाळुचा हप्ता देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून ३२ वर्षांच्या तरुणाचा खून केल्याप्रकरणी हुसेन खान उर्फ बाली इब्राहिम खान, इम्रान खान हुसेन खान व उस्मान खान इस्माईल खान या आरोपी बापलेकासह पुतण्याला सोमवारी (१९ ऑगस्ट) रात्री अटक करण्यात आली. तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना शुक्रवारपर्यंत (२३ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एन. माने यांनी मंगळवारी दिले.

याप्रकरणी मृत फेरोज खान अनिस खान पठाण (३२, रा. दादा कॉलनी) याचा भाऊ अफसर खान अनिस खान पठाण (२७) याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, मृत फेरोजचा वाळुचा व्यवसाय होता. फेरोजसोबत त्याच परिसरात राहणारा हुसेन खान उर्फ बाली इब्राहिम खान (३८), त्याचा मुलगा इम्रान खान हुसेन खान (१८) व पुतण्या उस्मान खान इस्माईल खान (३०, सर्व रा. दादा कॉलनी) या आरोपींशी काही दिवसांपासून वाद सुरू होता. फेरोज खान वाळुचे हप्ते देत नसल्याचा आरोपींना राग होता, तर आरोपींनी पत्त्याच्या अड्ड्याची माहिती पोलिसांना दिल्याचा संशय फेरोजला होता. याच प्रकरणावरुन सोमवारी (१९ ऑगस्ट) सकाळी हुसेन उर्फ बालीने फेरोज खानला घरातून बोलावून घेतले. यानंतर संजयनगरातील नाल्याजवळ असलेल्या महापालिकेच्या सभागृहासमोर नेत त्याला मारहाण करत इम्रान व उस्मान या दोघांनी फेरोजला पकडले तर, हुसेन उर्फ बालीने त्याच्या गुप्तांगाजवळ चाकुने दोन वार केले.

फेरोजचा आरडा-ओरड ऐकून त्याचा भाऊ अफसर खान व काही तरुणांनी धाव घेतली असता आरोपींनी तिथून पळ काढला. फेरोजला उपचारासाठी घाटीत नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. प्रकरणात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तिघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त करणे तसेच आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहे का याचा तपास करणे बाकी असून, आरोपींनी कट रचून गुन्हा केला असल्याने सखोल तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील अशोक सोनवणे यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेतून पर्सची चोरी; आरोपीला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुणे-नांदेड एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्स चोरी प्रकरणात आरोपी चिंतामणी धामणकरला अटक करून न्यायालयात हजर केले असता, आरोपीला शुक्रवारपर्यंत (२३ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. दहातोंडे यांनी मंगळवारी (२० ऑगस्ट) दिले.

नांदेड जिल्ह्यातील एकतानगर, वसरणी येथे राहणारे अशोक रामराव पवार हे आपल्या पत्नीसह पुणे-नांदेड एक्स्प्रेसने प्रवास करत होते. रेल्वेमध्ये पवार दाम्पत्याला झोप लागल्याची संधी साधत चोरट्याने पर्सची चोरी केली. प्रकरणात औरंगाबाद येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी चिंतामणी ज्ञानेश्वर धामणकर (रा. उरसे, ता. मावळ, जि. पुणे) याला अटक करण्यात आली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेअर्स फेलोकडून महापौरांचीच फिरकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मेअर्स फेलोकडून महापौरांचीच फिरकी घेण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. परंतु, महापौरांनी मेअर फेलोंची फिरकी त्यांच्यावरच उलटवली. फिरकीमुळे फेलोंना महापालिकेचे पाणी फारच लवकर लागले, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.

महापौर नंदकुमार घोडेले यांनी आठ दिवसांपूर्वी मेअर फेलोंची बैठक घेतली होती. त्यात त्यांनी काही फेलोंना कामाचे वाटप करून दिले होते. बंद पथदिवे किती, रस्त्यांवरील खड्ड्यांची स्थिती काय आहे, घनकचरा व्यवस्थापनाचे काम कसे सुरू आहे, कचरा प्रक्रिया केंद्रावर केल्या जाणाऱ्या कामाची स्थिती काय आहे, अतिक्रमण हटाव विभागाकडून करण्यात येणारे काम कसे सुरू आहे अशी विविध कामे वाटून देण्यात आली होती. या कामांचा अहवाल आठ दिवसांत द्या, असेही सांगण्यात आले होते. त्यानुसार मेअर फेलोंनी मंगळवारी महापौरांकडे अहवाल सादर केला. मेअर फेलोंचे अहवाल पाहून महापौरांना आश्चर्याचा धक्काच बसला. मेअर फेलोंनी प्रत्यक्ष साइटवर जाऊन पाहणी करावी व त्याचा अहवाल सादर करावा, अशी महापौरांची अपेक्षा होती. पण मेअर फेलोंनी त्या त्या विभागात जावून टिप्पणी ताब्यात घेतली आणि त्याच्या आधारे अहवाल तयार करून महापौरांना दिला. हा अहवाल पाहून महापौरांना आश्चर्याचा धक्काच बसला.

\Bमहापौरांचे आदेश \B

मेअर फेलोंना उद्देशून ते म्हणाले, असे अहवाल मला दररोज त्या त्या विभागांकडून येतात. तुम्हाला प्रत्यक्ष साइटवर जावून पाहणी करायला व त्या आधारे अहवाल सादर करायला मी सांगितले होते. आता साइटवर जा आणि दोन-तीन दिवसात अहवाल सादर करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी इमारतीच्या छताला गेले तडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या छताला तडे गेल्याचे समोर आले आहे. दरम्यान, तडे गेल्याचे लक्षात येताच बांधकाम विभागाची धावाधाव सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेची निजामकालीन ऐतिहासिक इमारत आहे. याच ठिकाणी बहुविध प्रशाला भरत होती. १९६२नंतर जिल्हा परिषद अस्तित्वात आली. या इमारतीची वेळोवेळी डागडुजी करण्यात येते. दरम्यान, जिल्हा परिषद इमारतीच्या वरच्या मजल्यावर भविष्य निर्वाह निधीचे

कार्यालय आहे. या कार्यालयाच्या छताला तडे गेल्याचे लक्षात आले. दरम्यान, बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी मंगळवारी दुपारी त्याची पाहणी केली. ऐतिहासिक वास्तू असलेल्या इमारतीचे जतन करणे आवश्यक आहे. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा ओरड होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम कार्ड बदलून ६० हजारांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादः बँकेचा नवीन कार्डाचा 'वन टाइम पासवर्ड' (ओटीपी) चुकीचा असल्याचा बनाव करीत महिलेचे एटीएम कार्ड बदलून ६० हजारांचा गंडा घातल्याची घटना गजानन महाराज मंदिराजवळ राहणाऱ्या एका महिलेसोबत घडली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गंडा घालणाऱ्यांचा सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या मदतीने पोलिस शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन महाराज मंदिर परिसरात राहणाऱ्या एका चाळीस वर्षांच्या महिला बँकेचे नवीन 'एटीएम' घेऊन मंगळवारी (२० ऑगस्ट) सकाळी साडेदहाच्या सुमारास पटियला कॉर्नर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाशेजारी असलेल्या एटीएम सेंटरवर गेल्या. बँकेच्या एटीएम मशीनमध्ये नवीन कार्ड टाकून 'पीन' तयार करण्याची कारवाई करीत असताना, एक २५ ते ३० वर्षांचा व्यक्ती त्यांच्यामागे 'एटीएम'मध्ये आला. त्याने, 'तुम्ही 'ओटीपी' चुकीचा टाकत आहात,' असे सांगून 'एटीएम'मध्ये टाकलेला कार्ड काढून महिलेला परत केले. एटीएम देऊन हे दोघेही निघून गेले. वारंवार एटीएम टाकूनही प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने, बँकेमधील कर्मचाऱ्याला बोलावून घेतले. ही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ती महिला तेथून निघाली. एटीएमपासून काही अंतरावर आल्यानंतर त्यांच्या मोबाइलवर त्यांच्या खात्यातून २० हजार रुपये काढल्याचा संदेश आला. हा संदेश येताच त्या महिलेने बँक गाठून 'ओटीपी' तयार झालेला नसतानाही २० हजार रुपये कसे निघाले, असा प्रश्न केला.

बँकेच्या अधिकाऱ्याकडे कार्ड दिल्यानंतर त्यांनी त्या कार्डावर 'रिजवान शेख' नाव असल्याचे निदर्शनास आले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर, त्या युवकांनी हातचलाखीने बँकेचे 'एटीएम' बदलल्याचे लक्षात आले. बँक अधिकाऱ्यासोबत चर्चा सुरू असतानाच त्यांच्या खात्यातून ४० हजार रुपये काढल्याचा पुन्हा संदेश आला. हा संदेश येताच बँकेच्या अधिकाऱ्यांने या महिलेले खाते बंद केले. यानंतर महिलेने पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठून घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. या माहितीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यामध्ये दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दुसरा व्यवहार थेट ठाणे शहरात

'एटीएम' बदलून महिलेच्या गंडविल्याच्या प्रकरणात पहिला २० हजारांचा व्यवहार हा शिवाजीनगर येथील एका 'एटीएम सेंटर'वर केल्याची माहिती समोर आली. दुसरा ४० हजार व्यवहार हा ठाणे येथे करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीवरून पुंडलिकनगर पोलिस गंडा घालणाऱ्या दोघांचा शोध घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेठे प्रकरणात आरोपीचा नियमित जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वामन हरी पेठे ज्वेलर्समधील ५८ किलो सोन्यावर डल्ला मारल्याच्या प्रकरणात राजेंद्र जैनचा भाचा लोकेश जैनचा नियमित जामीन अर्ज फेटाळत जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. भोसले यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात योग्य ती कागदपत्रे सादर न केल्याने नाराजी व्यक्त केली.

वामन हरी पेठे ज्वेलर्समधून व्यवस्थापक अंकुर राणे व कापडाचा व्यापारी राजेंद्र जैन यांनी संगनमत करून ५८ किलो सोन्यावर डल्ला मारला होता. २१ किलो सोने मणप्पुरम फायनान्सकडे गहाण ठेऊन ४ कोटी ४३ लाख ४८ हजार ९८७ रुपयांचे कर्ज उचलले होते. पोलिस कोठडीदरम्यान राणेने सराफा राजेश उर्फ राजू सेठियाला उर्वरित सोने विकले असल्याचे सांगितल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सेठियाला अटक केली होती व सेठियाने २० किलो सोने वितळवले असल्याचे तपासामध्ये समोर आले होते. सोने गहाण ठेवण्यासाठी लोकेश जैन जात असल्याचे सीसीटीव्ही फुâटेजमध्ये समोर आल्याने लोकेश जैनला अटक करण्यात आली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याने नियमित जामिनसाठी अर्ज दाखल केला होता. अर्जावरील सुनावणीवेळी, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी गुन्हा गंभीर असल्याचे निदर्शनास आणून दिले. तर, फिर्यादी पेठे यांच्या वतीने अ‍ॅड. सागर लड्डा यांनी बाजू मांडताना, लोकेश जैन हा वामन हरी पेठेतील सोने गहाण ठेवण्यासाठी घेऊन गेला व त्या ठिकाणावरुन पैसे घेऊन आल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याची न्यायालयाने गंभीर दखल घेत 'तपासामध्ये समोर आले असताना न्यायालयात ती कागदपत्रे सादर का केली नाही' अशी सरकार पक्षाला न्यायालयाने विचारणा केली. तपास अधिकारी गैरहजर असल्यामुळे न्यायालयाने गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांना बोलवून, तपासासंदर्भातील कागदपत्रे सादर का केली नाही, अशी विचारणा करत नाराजी व्यक्त केली. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून लोकेश जैनचा नियमित जामीन फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भावस्थेतील जनुकीय दोषांचे निराकरण गरजेचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महिला गर्भवती असताना घ्यावयाच्या सर्व काळजींसोबतच गर्भातील अर्भकाच्या जनुकीय दोषांबाबत योग्य तपासणी व त्या दोषांचे वेळीच निराकरण होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. प्रार्थना शाह यांनी 'गर्भधारणेदरम्यान जन्मजात विसंगती व कम्युनिटी स्टेम सेल बँकिंग' कार्यशाळेत व्यक्त केले.

शहरातील प्रसुती व स्त्रीरोगतज्ञ आणि लाईफ सेलच्या वतीने झालेल्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. कार्यशाळेत मुंबईहून आलेले क्लिनिकल जेनेटिसिस्ट डॉ. पराग ताम्हणकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी गर्भावस्थेतील अर्भकांच्या विकारांविषयी व अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. या वेळी फिटल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. प्रार्थना शाह यांनी गर्भवतीच्या प्रथम व द्वितीय त्रैमासिक चाचणींविषयी माहिती दिली. या चाचण्यांमुळेच गर्भावस्थेतील माता व बाळाचे भविष्य सुरक्षित केले जाऊ शकते, असेही डॉ. शाह यांनी नमूद केले. या वेळी डॉ. मनोज तोष्णीवाल यांनी कम्युनिटी स्टेप सेल बँकिंगचे रक्तविकारांसंदर्भातील महत्त्व पटवून दिले. तसेच नव्या अत्याधुनिक वैद्यकीय प्रणालीविषयी माहिती दिली. या कार्यशाळेत साठपेक्षा जास्त स्त्रीरोग व प्रसुतीतज्ज्ञांनी सहभाग घेतला. तज्ज्ञांनी शंकांचेही निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. भाग्यश्री रांजवान यांनी केले.कार्यशाळेसाठी स्त्रीरोगतज्ज्ञांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयश्री मोरे यांच्यासह प्रवीण सरदेशपांडे, अलीम शेख, निखिल मुटकुळे, प्रफुल्ल चौधरी यांनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इनाम जमिनीला टीडीआर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेत उघडकीस आलेल्या टीडीआर घोटाळा प्रकरणाची चौकशी शासनाच्यास्तरावर सुरू असतानाच आणखी एका टीडीआर घोटाळ्याने पालिकेत जन्म घेतला आहे. इनामी जमिनीला टीडीआर दिल्याचे स्पष्ट झाले आहे. इनामी जमिनीला टीडीआर दिल्याचे प्रकरण लक्षात आल्यावर त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली. तक्रार दाखल झाल्यावर देखील टीडीआर लोड करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

इनामी जमिनीला टीडीआर देण्यात आल्याचे प्रकरण गट क्रमांक ११/१ पैकी मौजे भावसिंगपुरा येथील आहे. या संदर्भात किशोर राजपूत यांनी महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकांकडे लेखी तक्रार केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मौजे भावसिंगपुरा या महार हाडोळा जमिनीवर टीडीआर मंजुरीची संचिका नगररचना विभागात १ जून २०१६ रोजी दाखल झाली. विकास योजनेत मालमत्ता बाधित होत असल्यामुळे मालमत्ताधारकाने टीडीआर स्वरुपात मोबदला देण्याची मागणी केली. मालमत्ताधारकाने दाखल केलेल्या सातबारा उताऱ्यावर इनाम जमीन, असे लिहीलेले असताना नगररचना विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी २४ डिसेंबर २०१८ रोजी टीडीआर प्रमाणपत्र दिले. याबाबत आपण स्वत: जानेवारी २०१९ मध्ये आक्षेप घेतल्यानंतर २ फेब्रुवारी २०१९ रोजी त्या जागेचा टीडीआर लोड करण्याबाबतची कार्यवाही स्थगित करण्यात आली. पण या प्रकरणात तांत्रिक चौकशी न करता व जिल्हाधिकारी कार्यालयाला इनामी जमिनीबद्दल कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार अद्याप करण्यात आला नाही. पत्रव्यवहार न करता टीडीआर लोड करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. ती जमीन इनामी असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी न घेता कोणत्याही प्रकारचा मोबदला देऊ नये, असा नियम आहे. परंतु याकडे नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

इनामी जमीन आणि या जमिनीसाठी देण्यात आलेल्या टीडीआर प्रकरणाची माहिती तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात यावी, टीडीआर लोड करण्याची कार्यवाही स्थगित करावी, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन टीडीआर प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी आहे.

तहसीलदारांच्या पत्राकडेही दुर्लक्ष

औरंगाबादच्या अप्पर तहसीलदारांनी महापालिका आयुक्तांच्या नावे २२ मार्च २०१९ रोजी पत्र दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मौजे भावसिंगपुरा सर्वे क्रमांक ११ मध्ये आपण संबंधितास टीडीआर प्रमाणपत्र दिले आहे. सदर जमीन भोगवटादार वर्ग २ इनाम स्वरुपाची जमीन आहे. त्या जमिनीच्या हस्तांतरणासाठी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. तहसीलदारांच्या या पत्राकडे देखील नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नपूर्तीसाठी हवी समाजाच्या दातृत्वाची साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शिक्षणासाठी समाजाच्या दातृत्वाची साथ हवी आहे. या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गापर्यंत शिकवताना त्यांच्या आई, वडिलांनी कमालीचे परिश्रम घेतले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेत त्यांनी आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर पोचवले आहे. यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

तन्वी दीपक देशमुख

Tanvi Dipak Deshmukh

९६.२० टक्के

सिडको एन आठ येथील वेणुताई चव्हाण शाळेत तन्वी देशमुखचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्या वर्गापासूनच तिची अभ्यासातली चुणूक शिक्षकांनी ओळखली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आई, बाबांनी देखील हात आखडता घेतला नाही. काबाडकष्ट करून त्यांनी तन्वीला दहावीपर्यंत शिकवले. तिचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत तर, आई शिवणकाम करून संसाराच्या गाड्याला हातभार लावते. दहावीच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी तन्वीच्या बाबांकडे पैसे नव्हते, त्यामुळे चार टप्प्यांत तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेचे शुल्क भरण्यासाठी त्यांना हातउसने पैसे घ्यावे लागले. अशा परिस्थितीत खचून न जाता तन्वीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवले. तिला 'सीए' व्हायचे आहे.

प्रेरणा दिलीप थोरात

Prerana Dileep Thorat

९१.२० टक्के

साताऱ्यात (खंडोबा) डोंगराच्या पायथ्याशी भीमशक्तीनगरात दोन खोल्यांचे पत्र्याचे घर प्रेरणाचे आहे. सातारा गावातून रोज दहा-पंधरा किलोमीटरची पायपीट करून जिद्दीने शिक्षण घेत प्रेरणाने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवले. सहकारनगरमधील ओम प्राथमिक व माध्यमिक शाळेची ती विद्यार्थिनी. तिची आई, कविता शिपाई आहे. वडील कामगार आहेत. रोज मातीकाम मिळेलच याची खात्री नाही, त्यांना आठवड्यातून चार दिवस काम मिळते. प्रेरणाची शाळा सकाळची. शाळा सुटल्यावर दुपारी ती ट्युशनला जात होती. ट्युशन संपल्यावर ज्योतीनगर भागात एका ब्युटी पार्लरमध्ये साफसफाईचे काम करते. हे करताना तिने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. दहावीच्या परीक्षेत तिने मोठे यश मिळवले. आता तिला इंजिनीअर व्हायचे आहे.

संतोष किसन शिंदे

Santosh Kisan Shinde

९०.२० टक्के

सिडको एन सात येथील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असलेल्या संतोष किसन शिंदेला सीए व्हायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता त्याने चिकाटीने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवले. संतोषचे वडील रिसोड तालुक्यातील बिबेवाडीचे. संतोषच्या जन्मानंतर त्यांनी गाव सोडले आणि मुंबई गाठली. कामाच्या शोधात मुंबईत त्यांची काही वर्षे गेली, पण त्यांना म्हणावे तसे काम मिळाले नाही. पत्नी भारती यांचे आई, वडील औरंगाबादेत होते. त्यामुळे मुंबईसोडून त्यांनी औरंगाबाद गाठले. बांधकामाच्या साइटवर काम करीत त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा विडा उचलला. त्यांच्या परिश्रमला साथ देत संतोषने दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. यश टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याला दातृत्वाची साथ हवी आहे.

विवेक गणेश जाधव

Vivek Ganesh Jadhav

९२ टक्के

रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी असलेला विवेक गणेश जाधवने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई संसाराचा गाडा समर्थपणे ओढते. विवेकचे वडील कन्नड तालुक्यातील कोळंबीचे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते औरंगाबादेत आले. शिक्षणाबरोबरच नोकरीही करू लागले. हंगामी कामगार म्हणून त्यांना काम मिळत असे. त्यांच्यासाठी आर्थिक विवंचना कायमच होती. पदवीपर्यंत शिक्षण जाल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. भाड्याने रिक्षा चालवणे त्यांनी सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते संसाराचा गाडा हाकतात. वडिलांचे कष्ट डोळ्यात साठवणाऱ्या विवेकला इंजिनीअर होऊन आपल्या आई, वडिलांना समर्थ साथ द्यायची आहे.

गणेश दामोदर गायकवाड

Ganesh Damodhar Gaikwad

९३ टक्के

गणेश दामोदर गायकवाडला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले. राजर्षी शाहू विद्यालयाचा तो विद्यार्थी. त्याला कम्प्युरट इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील परभणीत एका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांना महिन्याकाठी सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यावर घर चालणे शक्य नसल्यामुळे गणेशची आई देखील कंपनीत कामासाठी जाते. त्यांना रोज २५० रुपये मिळतात. साप्ताहिक सुट्ट्या आणि खाडे वजा जाता त्यांच्या पदरात महिन्याकाठी जेमतेम पाच-सहा हजार रुपये पडतात. कितीही कष्ट पडले तरी आपल्या मुलांना चांगले शिकवायचे आहे असा संकल्प त्यांनी सोडला आहे. विपरित परिस्थितीपुढे हात न टेकता त्याने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले. त्याला पुढील शिक्षणासाठी दातृत्वाची साथ हवी आहे.

\Bबळ द्या पंखांना…...\B

बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे पुढील शिक्षण घेण्यात अडचण असणाऱ्या विद्यार्थांना वाचकांच्या दातृत्वाच्या जोरावर बळ देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा उपक्रम म्हणजे 'मटा हेल्पलाइन'. प्रतिकूलतेवर मात करीत दहावीचे यशोशिखर गाठलेल्या काही गुणवंत मुला-मुलींची संघर्षगाथा आम्ही मांडत आहोत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी या मुलांच्या नावाने चेक आमच्याकडे पाठवावा.

विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावे 'मटा'च्या कार्यालयात द्यावेत. चेक जमा करण्यासाठी 'मटा'ने अन्य कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, साई स्क्वेअर, उस्मापुरा सर्कल, औरंगाबाद, ४३१००१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओवेसींचा आंबेडकरांना बंद लिफाफा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांना एक बंद लिफाफा दिला आहे. हैदराबाद येथे २६ ऑगस्ट रोजी ओवेसी आणि आंबेडकर यांच्यात जागा वाटपाची बैठक होणार आहे. त्यापूर्वी हा लिफाफा दिल्याने चर्चा रंगली आहे.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला १४४ जागा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. एमआयएम नेते डॉ. गफ्फार कादरी यांनी मंगळवारी मुंबईला जावून खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिलेले पत्र अॅड. आंबेडकर यांच्याकडे सोपविले. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीत आघाडी केली होती. त्यात 'एमआयएम'ने एकच जागा लढवली. त्या जागेवर इम्तियाज जलील निवडून आले. यामुळे विधानसभेसाठीही आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय दोन्ही पक्षातील वरिष्ठांनी घेतला. 'एमआयएम'ने वंचित बहुजन आघाडीकडे ८० जागांची मागणी केली आहे. वंचित बहुजन आघाडीने 'एमआयएम'सोबत चर्चा करण्यासाठी एक समिती तयार केली आहे. सध्या औरंगाबाद मध्य विधानसभा जागेसह अन्य काही जागांवर 'वंचित'ने दावा केला आहे. मात्र, 'एमआयएम' या जागा सोडण्यास तयार नाही. यामुळे या आघाडीत बिघाड येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे 'वंचित' आणि कॉँग्रेसमध्ये आघाडी झाल्यास 'एमआयएम'ची अडचण होऊ शकते. हे ध्यानात घेत ओवेसी यांनी हे पत्र दिल्याचे समजते. दरम्यान, आगामी २६ ऑगस्ट रोजी प्रकाश आंबेडकर आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांची हैदराबादेत बैठक होणार असून, या बैठकीत जागा वाटपासह निवडणूक प्रचाराच्या नियोजनाबाबत उभय पक्षात चर्चा होण्याची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रिपल तलाकप्रकरणी कन्नडमध्ये गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी कन्नड

ट्रिपल तलाकप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी शबाना बी अकील शेख (वय २६, ह. मु. पांढरी मोहल्ला कन्नड, रा. भोकरी वरखेडी ता. पाचोरा) या मुजरी करणाऱ्या महिलेने पती अकील सुलतान शेख (काकर) व दीर आसिफ सुलतान शेखविरोधात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी (१७ ऑगस्ट) दुपारी साडेतीनच्या सुमारास फिर्यादीच्या भावाच्या मोबाइलवर महिला फिर्यादीस पतीने शिवीगाळ केली. तसेच सांभाळ न करण्याच्या उद्देशाने मोबाइलवरून तलाक, तलाक, तलाक असे तीन वेळा बोलून बेकायदा तलाक दिला व शिवीगाळ केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ५०४, ३४सह कलम मुस्लीम महिला विवाह वरील हक्काचे संरक्षण कायदा २०१९च्या कलम चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव, महिला कर्मचारी शीतल बारगळ करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलवारी भिरकावल्या हवेत; दोघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कार रस्त्याच्या कडेला लावून मोठ्या आवाजात गाणे वाजवत तलवारी हवेत भिरकावल्याच्या प्रकरणात मोहम्मद नफीस उर्फ सरवर मोहम्मद याकुब व सय्यद वाजेद उर्फ अज्जू-वज्जू सय्यद शौकत यांना मंगळवारी (२० ऑगस्ट) अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना बुधवारपर्यंत (२१ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी दिले. याच प्रकरणात यापूर्वी आरोपी शेख गफ्फार उर्फ बबल्या शेख सत्तार याला अटक करुन त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

याप्रकरणी एमआयडीसी सिडकोचे पोलिस नाईक गणपतसिंग सरदारसिंग बायस (४७) यांनी तक्रार दिली होती. फिर्यादीनुसार, १६ ऑगस्ट रोजी रात्री बायस तसेच त्यांचे सहकारी गस्त घालत असताना अजिज कॉलनी परिसरात काही तरुण तलवारी घेऊन गोंधळ घालत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, रस्त्याच्या कडेला कार लावून मोठ्या आवाजात गाणे वाजवत चार तरुण तलवारी हवेत भिरकावत होते. आरोपींनी पोलिसांना पाहताच कार सोडून पळ काढला. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन, मोहम्मद नफीस उर्फ सरवर मोहम्मद याकुब (२४, रा. मुजीब कॉलनी) व सय्यद वाजेद उर्फ अज्जू-वज्जू सय्यद शौकत (२७, रा. किराडपुरा) यांना अटक होऊन दोघांना न्यायालयात हजर केले असता, आरोपींच्या ताब्यातून तलवारी जप्त करणे व कार मालक-चालकाचा शोध घेणे बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील एन. ए. ताडेवार यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने दोघांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images