Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

लाचखोराची सूडबुद्धी

$
0
0

तक्रारदाराचे दुकान पाडले, पैठणध्ये अनागोंदी

म. टा. प्रतिनिधी, पैठण

अतिक्रमण न काढण्यासाठी ४५ हजार रुपयांची लाच घेतना पकडले गेलेले नगर पालिकेतील वरिष्ठ लिपिक व्यंकटी पापूलवारने जामिनानंतर रुजू होताच सूडबुद्धीने कारवाई सुरू केली आहे. अँटी करप्शन विभागाकडे तक्रार करणाऱ्याचा व्यापाऱ्याचे दुकान पाडण्यासाठी नाथ मंदिर परिसरातील दुकाने नोटीस न देता गुरुवारी (२६ फेब्रुवारी) पाडली.

अतिक्रमण न काढणे व भोगवट्याची मुदत वाढवण्यासाठी तिरूप परदेशी यांच्याकडून ४५ हजार रुपयांची लाच घेताना व्यंकटी पापूलवार याला मंगळवारी (२४ फेब्रुवारी) रात्री अँटी करप्शन विभागाने सापळा लावून पकडले. पापूलवारला बुधवारी जामीन मिळाला व गुरुवारी नगर पालिकेत कामावर रुजू झाले. नगर पालिकेनेही त्यांना अतिक्रमण विरोधी पथकप्रमुखपदी रुजू करून घेतले. रुजू होताच पापूलवारने तक्रारदार परदेशी यांचे दुकान जमीनदोस्त केले. परदेशी यांचा दुकान पाडता यावे यासाठी त्या परिसरातील १५ दुकाने नोटीस न देता पाडली. त्याबद्दल विचारणा केली असता, नगर पालिकेने नाथ मंदिर परिसरात भोगवटा तत्वावर दिलेल्या सर्व जागा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पापूलवारने सांगितले. एक वर्षापासून प्रभारी मुख्याधिकारी असलेले सुधीर शेट्टी यांना माहिती विचारली असता, त्यांनी मला याविषयी काहीच माहिती नाही. विचारून सांगतो, असे सांगून कानावर हात ठेवले.

दरम्यान, मागच्या एक वर्षापासून मुख्याधिकारी नसल्याने नगर पालिकेच्या कर्मचार्‍यांनी सुरू केलेल्या मनमानी कारभाराची जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली असून त्यांनी पैठणचे तहसिलदार संजय पवार यांच्याकडे पैठण नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे देण्याचा निर्णय घेतला आहे.

नाथमंदिर परिसरातील अतिक्रमणे गेल्या आठवड्यात काढली. आता पूर्वसूचना न देता गुरुवारपासून जागा मोकळी करा, असे सांगितले आहे. - नारायण कणसे, व्यापारी

नाथमंदिर परिसरातील व्यापारी वर्षभर नाथषष्टी यात्रेची वाट बघत पाहतात. नगर पालिकेने यात्रेपर्यंत वेळ द्यावा. - भानुदास जाधव, व्यापारी

तहसीलदारांकडे सूत्रे

नगर पालिकेतील अनागोंदीची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली असून तहसीलदार संजय पवार गुरुवारी मुख्याधिकारी पदाची सूत्रे सोपवण्यात आली.

फटाके फोडून स्वागत

व्यंकटी पापूलवार जामिनावर सुटका झाल्यानंतर बुधवारी रात्री आठ वाजता पैठणमध्ये दाखल झाले तेव्हा समर्थकांनी महाराणा प्रतापसिंह चौकात फटाके फोडून स्वागत केले. यावेळी तक्रारदाराच्या दुकानासमोरही फटाके फोडण्यात आले.


मराठीच्या गळ्याला इंग्रजीचे नख

$
0
0

जिल्ह्यातील शाळा ४८वरून ४८०; पाच वर्षांत दहा पटीने वाढ

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात मराठी शाळांच्या गळ्याला इंग्रजी शाळांनी नख लावल्याचे दिसते. गेल्या पाच वर्षांत इंग्रजी शाळांची संख्या दहा पटीने वाढत ४८वरून ४८० वर पोहचली आहे, तर अनेक मराठी शाळा विद्यार्थ्यांअभावी शेवटच्या घटका मोजत आहेत.

मराठीचा कळवळा आणि टिमकी वाजविणाऱ्या प्रशासनापुढे आगामी काळात मराठी शाळांना तग धरून टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. गल्लोगल्ली इंग्रजी शाळांची झपाट्याने होणारी वाढ, पालकांची मराठीबद्दलची अनास्था यामुळे मुलांचा इंग्रजी शाळांकडे ओढा वाढतो आहे. अनेक मराठी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे काळाबरोबर नाही बदलल्यास, आगामी काळात मराठी शाळांच्या डोक्यावरची धोक्याची टांगती तलवार केंव्हाही तुटू शकते. विभागात एकट्या औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला, तर मागील पाच वर्षात इंग्रजी शाळांची संख्या दुप्पट, तिप्पटच नव्हे तर दहा पटीने वाढली आहे. आज घडीला जिल्ह्यात इंग्रजी शाळांची संख्या ४८८ एवढी आहे.

प्राथमिकस्तरपासून ते माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण आपल्या मुलांनी इंग्रजी शाळेतूनच शिकावे, तरच आपले पाल्य स्पर्धेच्या युगात पाल्य टिकेल ही भावना पालकांची झाली आहे.

विद्यार्थी संख्या लाखभर

इंग्रजीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ९७,४४९ एवढी आहे. तर मराठी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८, ०१५१७ एवढी आहे.

मराठीचा कल सेमी इंग्रजीकडे

पालकांचा इंग्रजीकडे वाढलेला कल पाहता, मराठी शाळांनीही कूस बदलण्याचा प्रयत्न केला आहे. पालकांचा आग्रह लक्षात घेत, बहुतांशी शाळा सेमी इंग्रजीमध्ये स्वतःला बदलत आहेत. यामाध्यमातून पालकांना आकर्षित केले जात आहे. सध्या इंग्रजी माध्यमातील एक शिक्षक, दोन तुकड्या घेतल्या की शाळा सेमी इंग्रजी होते.

वर्ष...........................इंग्रजी शाळांची संख्या

२००९-१०........................४८ २०१०-११.........................६१ २०११-१२.........................१८३ २०१२-१३.........................२२९ २०१३-१४.........................४१० २०१४-१५.........................४८८

वाचू ‘अॅप्स’ आनंदे

$
0
0

तुषार बोडखे, औरंगाबाद

वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी 'ई-बुक' संकल्पना यशस्वी ठरली. आता साहित्य व्यवहार वाढवण्यासाठी प्रकाशक 'अॅप्स' वापरत आहेत. वाचकांपर्यंत सहज पोहचण्यासाठी 'अॅप्स' भन्नाट यशस्वी ठरले असून औरंगाबादच्या प्रकाशकांनाही फायदा झाला आहे. बदलत्या काळात तंत्रज्ञानाद्वारे वाचक जोडणारा हा प्रयत्न मराठी वाचनसंस्कृतीसाठी मोलाचा ठरलाय.

विरंगुळ्यासाठी शेकडो पर्याय असल्यामुळे वाचनाचं प्रमाण कमी झालंय. कथासंग्रह, कादंबरी, नाटक, कवितासंग्रह या ललित साहित्याची वाचकसंख्या घटलीय. उपयुक्त पुस्तके, चरित्र आणि वास्तव विषयावरील पुस्तकांना विपुल मागणी आहे. वाचकांची आवड बदलताच प्रकाशन व्यवसायातही बदल झालाय. मराठी भाषेचे जतन करण्यासाठी वाचनसंस्कृतीचा महत्त्वाचा वाटा आहे. यात पुस्तकांची महत्त्वाची भूमिका आहे. ग्रंथालये ओस पडली असून पुस्तकांच्या दुकानातही जेमतेम मागणी असते. वाचनापासून वाचक दुरावत असताना काही वर्षांपूर्वी प्रकाशक आणि साहित्यिकांनी 'ई-बुक'चा प्रभावी वापर सुरू केला.

इंटरनेट वापरणारा वाचक पुस्तकांशी जोडण्याचे आव्हान होते. 'ई-शॉपिंग'चा पर्याय असल्यामुळे लक्षणीय फायदा झाला आणि पुस्तकांची ऑनलाइन खरेदी-वाचन प्रचंड वाढले. वाचकाला पुस्तके उपलब्ध केल्यास प्रतिसाद मिळतो याची प्रचिती प्रकाशक व साहित्यसंस्थांना आली. 'ई-बुक' संकल्पना लोकप्रिय ठरलेली असताना मोबाईलने अवघं विश्व व्यापलंय. सोशल साइट्स आणि इतर सर्व महत्त्वाच्या कामांसाठी स्मार्ट फोनचा वापर वाढला आहे. बिल भरणे, फोटो काढणे, संदेश आदानप्रदान आणि इतर कामांसाठी मोबाईल एकमेव पर्याय आहे. या परिस्थितीत वाचक पुन्हा जोडण्याचे आव्हान होते. 'अॅप्स' या प्रकाराने हा मार्ग सुकर झाला असून हजारो मराठी पुस्तके 'क्लिक'सरशी मिळत आहेत. सध्या 'न्यूजहंट' अॅप्स सर्वाधिक लोकप्रिय आहे. बातम्यांसाठी असलेल्या या अॅप्सवर सध्या अकरा भाषांतील पुस्तके उपलब्ध आहेत. या पुस्तकांना वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मराठी पुस्तकांनाही 'अॅप्स'वर मोठी मागणी आहे. 'टेक्नोसॅव्ही वाचकांनाही वाचनाची आवड असली तरी सहज मिळणारी पुस्तकेच वाचक वाचतात. नव्या तंत्रज्ञानाद्वारे त्यांना वाचन करायचे असते. सध्या हिंदी, इंग्रजी पुस्तकांना 'अॅप्स'वर प्रतिसाद असला तरी मराठी पुस्तकांचा प्रतिसाद वाढत आहे' असे 'साकेत' प्रकाशनचे साकेत भांड यांनी सांगितले. मुंबई-पुण्यातील विक्रेते आणि प्रकाशकांनी 'न्यूजहंट'शी संपर्क साधून पुस्तके उपलब्ध केली आहेत. तर 'अॅप्स'चा वापर करण्यासाठी मराठवाड्यातील इतर प्रकाशक प्रयत्न करीत आहेत.

सुरक्षित अॅप्स

'न्यूजहंट'वर पुस्तकांचा स्वतंत्र विभाग आहे. बेस्ट सेलर पुस्तकांची स्वतंत्र मालिकाच आहे. अकरा भारतीय भाषांतील पुस्तके उपलब्ध असल्यामुळे देशभरातील वाचक जोडले गेले आहेत. यात मराठी वाचकांची संख्या वाढली आहे. कमी किमतीत पुस्तक डाउनलोड केल्यानंतर मोबाइलवरच वाचता येते. शिवाय अक्षराचा 'फॉन्टसाइज' आणि पुस्तकाचा बॅकग्राउंड कलर निवडण्याचे वाचकाला स्वातंत्र्य आहे. डेबिट-क्रेडीड कार्डद्वारे पुस्तक सहज डाउनलोड करण्याची सोय असल्यामुळे हा अॅप्स लोकप्रिय ठरला आहे.

पुस्तक डाउनलोड केल्यानंतर ते फक्त मोबाईलवर वाचता येते. डाउनलोड पुस्तक इतरांना पाठवण्याची सुविधा नाही. तसेच इतरत्र सेट करता येत नाही. पुस्तकांची सुरक्षितता जपल्यामुळे प्रकाशकांना अॅप्सबाबत विश्वास वाटतोय. हजारो वाचकांपर्यंत सहज पोहचण्याचे नवे माध्यम तयार झालंय. मराठी भाषेसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.

- साकेत भांड, प्रकाशक

...अन्यथा ‘सोशल मीडिया’ व्यसनच

$
0
0

अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'खांद्यावर डोके ठेवता यावे त्याप्रमाणे अतिशय जबाबदारीने, विश्वासाने 'सोशय मीडिया'चा वापर व्हावा. अन्यथा 'सोशल मीडिया' हे व्यसनच आहे. या व्यसनाच्या आहारी गेल्यास कळत-नकळत जखम झाल्याशिवाय राहणार नाही,' असा इशारा प्रख्यात अभिनेते व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी घाटीच्या 'इरकॉन' परिषदेच्या उद‍्घाटनानिमित्त दिला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) वतीने गुरुवारपासून (२६ फेब्रुवारी) 'इरकॉन' परिषदेला सुरुवात झाली. या प्रसंगी अधिष्ठाता डॉ. छाया दिवाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर, परिषदेच्या संयोजन समितीचे सचिव डॉ. एम. बी. लिंगायत आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. 'डॉक्टर्स अँड सोशल मीडिया : टाइम टू एम्ब्रेस चेंज' या विषयावर मोकळेपणाने व गमती-जमती करीत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. आगाशे म्हणाले, 'हल्ली दोन व्यक्ती किंवा समूह शारीरिकदृष्ट्या एकत्र असतात; परंतु मानसिकदृष्ट्या तिसरीकडेच असतात आणि हा सोशल मीडियाचा परिणाम आहे. सोशल मीडियाद्वारे प्रचंड प्रमाणात माहिती मिळते. मात्र माहिती म्हणजे ज्ञान नव्हे तर माहितीवर योग्य ती प्रक्रिया केल्यानंतरच ज्ञानाची निर्मिती होते. 'टेक्स्टबुक' किंवा 'टेक्स्ट' महत्त्वाचे आहे, पण आयुष्य जगताना 'सबटेक्स्ट'ही तितकेच किंबहुना जास्त महत्त्वाचे आहे. 'सबटेक्स्ट' ही भावनेची भाषा आहे. 'क्लिनिकल मेडिसिन'मध्ये रुग्णाला तपासण्याचे शिकविले जाते. याचा अर्थ केवळ रुग्णाचा हात पकडून नाडी तपासणी असा होत नाही, तर रुग्ण कसा बसला आहे, कुठे बघतो आहे, हालचाल कशी आहे, काय म्हणतो आहे, हे आधी डोळ्यांनी तपासा, मग हाताने तपासा. अर्थात रुग्णाला तुमचा पहिला स्पर्श दिलासा अन् सुरक्षितता देणारा वाटला पाहिजे. हा 'सबटेक्स्ट'चा भाग अतिशय महत्त्वाचा असून, हीच 'सोशल मीडिया'कडून अपेक्षा आहे,' असेही डॉ. आगाशे म्हणाले. 'सोशल मीडिया अँड डॉक्टर्स'यावर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल देशमुख यांनी 'सोशल मीडिया'च्या दुष्परिणामांबाबत माहिती दिली. 'सोशल मीडिया'तील जुजबी, अपुरी माहिती व असंवेदनशीलता नुकसानदायक ठरू शकते. यामुळे नैराश्य, चिंताग्रस्त रुग्णांची ओपीडीतील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आळशीपणा व कुटुंबांपासून दुरत्व येण्याच्या प्रमाणाबरोबरच 'इंटरनेट अॅडिक्शन'सारखे व्यसन जडण्याचे दुष्परिणामही समोर येत असल्याचे डॉ. देशमुख म्हणाले. डॉ. दिवाण यांनी, वैद्यकीय क्षेत्रातील आंतरशाखीय संशोधन, अभ्यास, समन्वय वाढण्याच्या हेतुने सुरू केलेली 'इरकॉन' परिषद ही विद्यार्थ्यांसाठी सशक्य 'प्लॅटफॉर्म' ठरत असल्याचे नमूद केले.

‘समांतर’ वर वांझोटी चर्चा

$
0
0

अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ; सोमवारी होणार बैठक

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील पाणीपुरवठा आणि समांतर जलवाहनीचा प्रकल्प या विषयावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत वांझोटी चर्चा झाली. चर्चेतून काहीच निष्पन्न होत नाही असे लक्षात आल्यावर सोमवारी या संदर्भात आपल्या दालनातच बैठक घेऊ असे म्हणत सभापती विजय वाघचौरे यांनी चर्चेला पूर्णविराम दिला.

स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा पाणीपुरवठ्याचा विषय निघाला. शहागंज येथील जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. संपूर्ण शहराला तिसऱ्या दिवशी पाणी मिळते, पण शहागंज जलकुंभाच्या अंतर्गत येणाऱ्या भागांना पाच-सहा दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जातो, अशी तक्रार नगरसेवक मीर हिदायत अली, प्रीती तोतला यांनी केली. संजय चौधरी म्हणाले, चौधरी कॉलनीत केवळ सहा फुट पाइप टाकायचा आहे. तो टाकल्यामुळे काही महिन्यांपासून या भागात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी नेमलेल्या कंपनीने एक फूट देखील पाइप टाकलेले नाहीत, असा आरोप काशीनाथ कोकाटे यांनी केला. पाण्याच्या संदर्भात, कंपनीच्या संदर्भात सर्वसाधारण सभेत दोन दिवस चर्चा झाली. त्यानंतर महापौरांनी कंपनीला देण्यात येणारे पाच कोटी रुपये थांबवण्याचे आदेश दिले, पण या आदेशाची अंमलबजावणी अद्याप केली नाही हे दुर्देवी आहे, असे कोकाटे म्हणाले.

मीर हिदायत अली म्हणाले, 'आदेश पाळायचे नसतील तर विनाकारण चर्चा कशासाठी करता. चर्चा करून कारवाई केल्याचा दिखावा केला जात आहे,' असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे सभापती विजय वाघचौरे यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल खुलासा करण्यास सांगितले,पण खुलासा करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे चर्चेवर काहीही निर्णय होऊ शकला नाही.

१५ कोटींचा चेक तयार

औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला दर महिन्याला देण्यात येत असलेले पाच कोटी रुपये थांबवा व या रक्कमेतून वॉर्डांमध्ये पाइपलाइन टाकण्याचे काम करा, असे आदेश महापौर कला ओझा यांनी दिले होते. हे आदेश प्रशासनाने पाळले तर नाहीतच, पण आता त्या कंपनीला १५ कोटींचे पेमेंट करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. १५ कोटींचा चेक तयार झाला आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला.

१०१ क्रमांक लागतो उल्हासनगरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अग्नीशमन दलासाठी आरक्षित असलेला १०१ हा दूरध्वनी क्रमांक औरंगाबादेतील नागरिकाने लावला, तर तो थेट उल्हासनगरच्या अग्नीशमन दलाच्या कार्यालयात लागतो, असा खुलासा मुख्य अग्नीशमन अधिकारी शिवाजी झनझन यांनी स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी स्पष्ट केला. त्यांच्या स्पष्टीकरणानंतर लगोलग प्रात्यक्षिकही करण्यात आले, तेव्हा उल्हासनगरमधील कर्मचाऱ्यांनी संवाद साधला.

दोन दिवसांपूर्वी शहागंज येथील पाच दुकानांना आग लागली होती. आग लागल्यानंतर तेथील नागरिकांनी १०१ या क्रमांकावर फोन केला. आग लागल्याची माहिती दिली, तेव्हा त्यांना आग विझवण्यासाठी पाणी नाही. आमचे पगार झालेले नाहीत, असे उत्तर देण्यात आले. हा संवाद नगरसेवक मीर हिदायत अली यांनी आपल्या फोन मध्ये रेकॉर्डकरून ठेवला. स्थायी समितीच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा झनझन म्हणाले, 'औरंगाबादच्या अग्नीशमन दलाची प्रत्येक गाडी पाण्याने भरलेली असते. पाणी भरल्याशिवाय गाडी पोर्चमध्ये लावलीच जात नाही. अग्नीशमन दलाचा क्रमांक ०२४० - २३३४००० आणि ०२४० - २३२७४०१ ते ०६ असे आहेत. १०१ क्रमांकावर फोन लावला तर तो उल्हासनगरला लागतो.' त्यानंतर लगेचच १०१ या क्रमांकावर फोन लावण्यात आला, तर फोन उल्हासनगरला लागला.

सात दिवसांत १२०० टन कचरा उचलला

$
0
0

१५० उद्योजकांचे महास्वच्छता अभियानात सहकार्य

म.टा.प्रतिनिधी वाळूज

वाळूज एमआयडीसीची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत एकदाही कचरा न उचलला गेला नव्हता. त्यामुळे प्रशासनाला दोष देत बसण्यापेक्षा आपणच रस्त्यावर उतरून महास्वच्छता अभियान सप्ताह राबवित वाळूजमधील उद्योजकांनी सर्वांसमोर आदर्श घालून दिला. ग्लोबल डेव्हलपमेंट फोरम (जीडीएफ) या उद्योजकांच्या फोरमने यासाठी पुढाकार घेतला. या सप्ताहामध्ये सुमारे १०० किलोमीटरचा रस्ता १५० उद्योजकांनी स्वतः साफ केला. या अभियानात १२०० टन कचरा उचलण्यात आल्याची माहिती जीडीएफचे अध्यक्ष बी.एस.खोसे यांनी दिली.

वाळूज औद्योगिक क्षेत्राची स्थापना झाल्यापासून एकदाही एमआयडीसीने कचरा उचलण्याची तसदी घेतलेली नव्हती. गेल्या ३० वर्षांपासून अनेक कारखान्यांसमोर कचऱ्यांचे ढिगारे साचले होते. वेळोवेळी मागणी करूनही प्रशासन मात्र हलले नाही. एकीकडे देशाचे पंतप्रधान झाडू हातात घेऊन स्वच्छता अभियानात सहभागी होत आहेत. मग आपणच एमआयडीसी प्रशासनाकडून स्वच्छतेची अपेक्षा कशाला करायची? असा विचार करित येथील उद्योजकांनीच महास्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला.

या महास्वच्छता अभियानासाठी एकत्र आलेल्या १५० उद्योजकांनी ग्लोबल डेव्हलपमेंट फोरमची स्थापना केली. त्यातून वाळूज येथे महास्वच्छता सप्ताह अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानात सीआयआय, डब्ल्युआयए या उद्योजक संघटनाही सहभागी झाल्या होत्या. जीडीएफच्या पुढाकाराने एमआयडीसीतील १४ सेक्टरमधून तब्बल १२०० टन कचरा बाहेर काढण्यात आला. हे सर्व कार्य केवळ लोकसहभागातून पूर्ण झाले. त्यात अनेकांनी जेसीबी, ट्रॅक्टर, मजूर आदींचे सहकार्य केले.

असे राबविले अभियान

एमआयडीसीत एकूण १४ सेक्टर आहेत. एका दिवसात २ सेक्टर असा दिनक्रम ठरविण्यात आला. त्यासाठी सेक्टरमधील दोन टीम लिडरची नियुक्ती करण्यात आली. तर त्यांच्या सहकार्यासाठी सेक्टरमधील कंपनीतून देण्यात आलेल्या कामगारांची संख्या होती ४०. सात दिवस हा उपक्रम चालला. त्यात १० जेसीबी, ८ हजारपेक्षा जास्त मजूर मिळून तब्बल १२०० टन घनकचरा उचलण्यात आला.

या उद्योजकांनी घेतले परिश्रम

अभियानात जीडीएफचे अध्यक्ष बी.एस.खोसे, नारायण पवार, श्रीराम शिंदे, रवींद्र कोंडेकर मासिआचे अध्यक्ष भारत मोतिंगे, राहुल मोगले, ए.एस.शेख, संदीप जोशी, सुनील किर्दक सुनील राठी, अर्जुन गायकवाड, विकास पाटील, सर्जेराव साळुंके, प्रताप कोकीळ, गजानन देशमुख अंकूश लामतुरे यांच्यासह सीआयआय, डब्ल्युआयए संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

उद्योजकांच्या प्रतिक्रिया

आगामी काळात औरंगाबादेत डीएमआयडीसी होणार आहे. त्यामुळे औद्योगिकदृष्ट्या शहराचे महत्व वाढणार आहे. एमआयडीसीतील नीटनेटकेपणा व स्वच्छता आदी गोष्टींकडे आकर्षित होऊन गुंतवणूकदार आपली गुंतवणूक वाढवू शकतो. ही गुंतवणूक वाढली तरच स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. ही बाब लक्षत घेवून औद्योगिक परिसरात स्वच्छता महत्वाची असल्याचे कारखानदारांना पटवून देण्यात आले. त्यांच्या प्रत्यक्ष सहभागतूनच हा उपक्रम यशस्वी झाला.

- बी.एस. खोसे अध्यक्ष ग्लोबल डेव्हलपमेंट फोरम

वाळूज एमआयडीसीतील घनकचरा हा विषय न संपनारा होता, असे सर्वांना वाटत होते, मात्र त्यावर सहकार्यातून मार्ग काढता येऊ शकतो, असा विचार अनेकांनी मांडला होता. त्यासाठी पुढाकार घेणे गरजचे होते. त्यामुळे सर्वप्रथम आम्ही ई-सेक्टरमध्ये हा उपक्रम राबविला. त्यानंतरच इतरांना सांगितले. त्यासाठी सर्व कंपन्याच्या मालकांची भेट घेतली. त्यांच्या सहकार्याने व ग्लोबल डेव्हलपमेंट फोरमच्या पुढाकाराने, कामगार नागरिकांच्या मदतीने हे कार्य सहज शक्य झाले. - नारायण पवार, उद्योजक

रामप्रहरी उघडी मधुशाला

$
0
0

कायद्याच्या उल्लंघनाने शहरवासीय त्रस्त; उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रामप्रहरी चहाच्या टपऱ्या उघडायच्या आत शहरातील अनेक बिअरबार, परमिट रूम आणि देशी दारूचे गुत्ते सर्रास उघडली जात आहेत. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी निघणाऱ्या शहरवासीयांना टोकाच्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. झोपेचे सोंग घेतलेला उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस या मनमानी कारभाराविरुद्ध कारवाई करण्यासाठी डोळेझाक करत आहे.

शहरातील विविध भागात सकाळी सातच्या सुमारास फेरफटका मारला असता हा धक्क्दायक प्रकार उघड झाला. उस्मानपुरा, पीरबाजार, सूतगिरणी चौक, पुंडलिकनगर, जयभवानीनगर चौक, मुकुंदवाडी, हडको कॉर्नर, टीव्ही सेंटर या भागीतल दारूची दुकाने, परमिट रूम, बिअरबार सकाळी सातच्या सुमारास उघडले होते. शहरातील कामगार वस्तीच्या बाजूला अनेक ठिकाणी देशी दारूचे गुत्ते आहेत. या गुत्त्यांवर तर पहाटेपासून गजबजाट असतो. या बहुतांश ठिकाणी दारूच्या दुकानांसमोर सकाळपासून सुरू होणारी गर्दी, झिंगणारे माणसे, यामुळे अनेक भागात मॉर्निंग वॉकला निघणाऱ्या महिला, वृद्ध नागरिक, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे या दुकानांचा रात्री बंद होण्याचा कालावधीही ठरलेला नाही. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मद्यपींचा उच्छाद सुरू असतो. काही दर्जेदार हॉटेल, बिअरबार आणि परमिट रूम मात्र याला अपवाद आहेत.

नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमित कारवाई केली जाते. यात दंडात्मक कारवाई तसेच परवाना रद्द केला जातो. कुठेही अशा तक्रार असल्यास निश्चित कडक कारवाई केली जाईल. - सी. बी. राजपूत, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग.

परवानाधारक देशी दारूचे दुकान असो की बिअर बार व परमीट रूम. यांची उघडण्याची व बंद करण्याची वेळ कायद्याने ठरवून दिली आहे. नियम तोडणाऱ्यावर कारावाईचे अधिकार उत्पादन शुल्क विभागाला आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असल्यास पोलिसही कारवाई करू शकतात. तक्रार आल्यास निश्चित कारवाई करू. - बाबाराव मुसळे, सहायक पोलिस आयुक्त.

दारू दुकान उघडण्याचे वेळापत्रक

(शासनच्या सुधारित अधिसूचना २००७ नुसार)

नाव ....... वेळ

१) विदेशी ठोक विक्री (गोडावून) ......... सकाळी १० ते रात्री ८. २) देशी-विदेशी वाइन शॉप.... सकाळी १० ते रात्री १०.३० ३) बिअर बार अॅँड परमिट रूम .... सकाळी ११.३० ते रात्री १.३०(पोलिस आयुक्तलाय हद्दीसाठी) ४) एफ.एल ४ क्लब..... सकाळी ११.३० ते रात्री १.३०(पोलिस आयुक्तलाय हद्दीसाठी) ५) देशी दारू दुकान ........ सकाळी १० ते रात्री १०.


एमबीटी लढविणार १५ जागा

$
0
0

आजी माजी नगरसेवकही एमबीटीकडून इच्छुक

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये एमआयएम सोबतच मजलिस तहेरिक बचाव (एमबीटी) या पक्षाने निवडणूक रिगणांत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) ने महाराष्ट्राच्या राजकारणात नांदेड महानगर पालिकेच्या निवडणुकीत आठ उमेदवार निवडून आणत प्रवेश केला. यानंतर विधानसभेच्या निवडणुकीतही २६ मतदार संघातून एमआयएमने उमेदवार उभे केले होते. दोन जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले. यात एक जागा औरंगाबादमधीलही होती. एमआयएमचा राज्याच्या राजकारणात प्रवेश झाल्यानंतर हैदराबादमध्ये एमआयएमचे प्रखर विरोधक असलेला पक्ष मजलिस बचाव तहेरीक (एमबीटी) हा देखील आता महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार आहे.

एमबीटी पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. एमबीटी पक्षाने महानगर पालिकेच्या निवडणुकीत फक्त १५ जागांवर निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. यात मुस्लिम बहुल भागातच या उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली.

मनपा निवडणुकीत पंधरा वॉर्डात उमेदवार उभे करण्याचा आमचा विचार असून अनेक आजी माजी नगरसेवकांसह विविध पक्षाचे अनेक पदाधिकारीही एमबीटीकडून उमेदवारी दाखल करतील. सध्या उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. - नदीम राणा, एमबीटीचे जिल्हाध्यक्ष

विज्ञान संशोधनात उतरता आलेख

$
0
0

पाच वर्षांत टक्क्या निम्म्याने घसरला; वेब ऑफ सायन्सची पाहणी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विज्ञान विभाग संशोधनात कुठे आहे, हाच आता संशोधनाचा विषय ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या पाच वर्षांत विभागातील संशोधनाचा टक्का निम्म्याने घसरल्याचे 'स्कोप', 'वेब ऑफ सायन्स' या संस्थांच्या पाहणीतून समोर आले आहे.

२०११ मध्ये संशोधनातील सादरीकरणाची संख्या ११० होती. ती आता ५० पर्यंत घसरली आहे. संशोधनाची रखडलेली प्रक्रिया, सुविधांचा अभाव यामुळेही घट झाल्याचे संशोधकांचे मत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने बंधनकारक केलेल्या 'पेट' प्रक्रियेतील ढिसाळपणाचा परिणाम संशोधनावर पडला आहे. 'स्कोप', 'वेब ऑफ सायन्स' या संस्था जगभरातील विविध विद्यापीठांमधील संशोधनाचा डेटा संकलित करून संशोधनाचे वास्तव मांडतात. संबंधित प्राध्यापकांनी, संशोधकाने मांडलेल्या नवीन विचाराला जगातिक पातळीवर किती 'इम्पॅक्ट फॅक्टर' मिळाला, हेही या संस्था स्पष्ट करतात. विज्ञान शाखेत सर्वमान्य असलेल्या या संस्थांच्या रिर्पोटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संशोधन निम्म्यावर आल्याचे म्हटले आहे. २०११मध्ये विज्ञानाच्या विविध शाखांच्या संशोधकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर १११ संशोधने मांडली, परंतु गेल्या काही वर्षांत संशोधन प्रक्रियाच थांबली आहे. २०१५ मध्ये तीन महिन्यांत केवळ पाच संशोधने आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडली गेली. अशीच स्थिती कायम राहिल्यास वर्षभरात ही आकडेवारी बारापर्यंत पोचेल, असे मानले जाते.

'केमिस्ट्री' अव्वल

आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन मांडण्यात सर्वाधिक, २२.१ टक्के वाटा केमिस्ट्री विभागाचा आहे. यानंतर फिजिक्सचा वाटा १२.१ टक्के आहे. यानंतर बहुतांशी सर्व विभागांचा वाटा दोन आकड्यांतही नाही.

आकडेवारी

वर्ष............ आंतरराष्ट्रीय संशोधनातील सादरीकरण २०११..........११० २०१२..........८० २०१३..........६० २०१४..........५० २०१५..........५

खरेच विद्यापीठाने आपण संशोधनात आणि त्याच्या दर्जामध्ये कोठे आहोत, याचा विचार करावा. पाच वर्षांपासून तर प्रक्रियाच गोंधळात अडकलेली आहे. प्रशासन केवळ आपल्या दिखाऊपणावर आपली वाटचाल दर्शविते आहे. - तुकाराम सराफ, संशोधक विद्यार्थी.

भरतीसाठी ‘कॉमन सिलेक्शन बोर्ड’

$
0
0

भरती प्रक्रियेतील गैरव्यवहारांना आळा बसेल

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील विविध कॉलेजांमधील भरती प्रक्रिया एकाच छताखाली आणण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. एमपीएससी, यूपीएससीच्या धर्तीवर त्यासाठी 'कॉमन बोर्ड फॉर सिलेक्शन ऑफ टिचर इन अॅफिलेशन कॉलेज' स्थापन करण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या जॉइंट बोर्ड ऑफ व्हाइस चान्सलरची बैठकीत याला तत्वतः मान्यता मिळाली. राज्य पातळीवर केंद्रीय पद्धतीने भरती प्रक्रिया झाली, तर भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा बसणार आहे.

राज्यपाल विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत मंगळवारी 'जॉइंट बोर्ड ऑफ व्हाइस चान्सलरची' बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, सर्व विद्यापीठांचे कुलगुरू बैठकीला उपस्थित होते. बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; कॉलेजांमधील भरती प्रक्रियेत होणारा आर्थिक व्यवहार आणि त्यामुळे खालावणारी गुणवत्ता यावर चिंता व्यक्त करण्यात आली. भरती प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने एकाच पातळीवरून व्हावी, असा विचार अनेकांनी मांडला. यासाठी 'कॉमन बोर्ड फॉर सिलेक्शन ऑफ टिचर इन अॅफिलेशन कॉलेज' अशा प्रकारचे मंडळ स्थापन करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली. मंडळात राज्यसरकारचा प्रतिनिधी, कुलगुरू, संस्थाचालकांचे काही प्रतिनिधी असतील.

कॉलेजांमधील रिक्त जागांची जाहिरात, त्याची प्रक्रिया आणि भरती याची सर्वस्वी जबाबदारी मंडळाची असेल. मंडळाची रचना करण्याचे काम तातडीने केले जाईल, असे सरकारतर्फे सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. विद्यापीठ परीक्षांमध्ये 'आयटीसी' वापर, 'विद्यापीठ कायदा', कॉलेज, विद्यापीठांमध्ये 'चॉईस बेस्ट, क्रेडिट सिस्टीम' तातडीने राबविण्यात यावे अशा सुचना मांडण्यात आल्या.

भरती प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविणे, विद्यापीठ कायदा या मुद्द्यांवर बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. त्यावर सकारात्मक विचार सुरू आहे. - डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.

यंदाही महिला बायकर्सची धूम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्त्रीशक्तीचा जागर सर्वत्र सुरू असतानाच आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त यंदाही महिला बायकर्सची धूम रंगणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स हिरो प्लेझर ऑल वुमन बाइक रॅली'मध्ये संयमाबरोबरच वेगाच्या थराराचेही दर्शन घडणार आहे. यंदाही औरंगाबादेत बाइक रॅली होत असल्याने गेल्या वर्षी संधी हुकलेल्या महिलांना नवी संधी मिळणार आहे.

भरजरी पैठणी, बांधणीची साडी आणि दागदा‌गिने...भगवे फेटे, सलवार कुडता...अगदी जीन्स-टी शर्टही...अशा वेगवेगळ्या रंगीबेरंगी पेहरावात नारीशक्तीने गेल्या वर्षी जागतिक महिला दिनानिमित्त औरंगाबादेत 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'ऑल वुमन बाइक रॅली'त उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. सेलिब्रेटींच्या उपस्थितीत सहभागी महिलांच्या नातेवाइकांनी केलेल्या चीअरिंगमुळे या रॅलीतील उत्साह सुरुवातीपासूनच वाढला. ही रॅली पाहण्यासाठी रस्त्यांवरही गर्दी झाली होती. या रॅलीची सांगता झाली, त्या वेळी एका अनोख्या उपक्रमात सहभागी झाल्याचा आनंद प्रत्येकीच्या चेहऱ्यावर ओसंडत होता. आता पुन्हा एकदा हीच संधी चालून आली आहे.

महिला एकीला सलाम

बाइक चालवणे ही पुरुषांची मक्तेदारी मानली जात असे. हल्ली अनेक स्त्रिया उत्तम बाइक चालवतात. यातूनच आपल्याला स्त्री-पुरुष समानतेचे दर्शन घडते. जी गोष्ट या एका उदाहरणातून दिसते, त्यासाठी वेगळे दाखले द्यायला नकोत. बाइक रॅलीनिमित्त इतक्या महिला एकत्र येतात, याचे खरेच कौतुक आहे. महिलांच्या या एकीला माझा सलाम!

- मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री.

नावनोंदणीसाठी http://womenbikerally.mtonline.in या वेबसाइटला भेट द्या किंवा मोबाइलवर BikerallyAGB टाइप करून ५८८८८ या क्रमांकावर एसएमएस करा.

२४ वर्षांनंतर मोकळा श्वास!

$
0
0

श्वसननलिका अडकलेले हाड २० सेकंदात काढले

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्वासनलिकेत मटणाचे हाड अडकू शकते, ही सहजासहजी न पचणारी कल्पना, मात्र एका महिलेच्या श्वासनलिकेत अडीच सेंटीमीटर बाय एक सेंटीमीटरचे हाड तब्बल २४ वर्षे अडकून पडले. संबंधित महिला इतकी वर्षे मोकळा श्वास घेऊ शकत नव्हती. आश्चर्य म्हणजे २४ वर्षे अडकलेले हाड कुठलीही इजा न होता केवळ २० सेकंदात काढण्यात आले आणि दिवसरात्र खोकला-खरखर-निमोनियाचा त्रास क्षर्णार्धात नाहिसा झाला. तीव्र निद्रानाशाने त्रस्त असलेल्या महिलेला २४ वर्षानंतर शांत झोप लागली.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील आडगावात राहणाऱ्या ४५ वर्षीय तस्लिबा बी या महिलेची ही सत्य कहाणी. शहरातील फिजिशियन डॉ. पी. डी. शहापूरकर यांनी या महिलेला सतत खोकला व निमोनियाचा त्रास होत असल्याबद्दल फुफ्फसविकारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत पापीनवार यांच्याकडे पाठविले. महिलेची तपासणी केल्यानंतर तिच्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण केवळ ८८ टक्के इतके असल्याचे जाणवले, जे ९८ ते १०० टक्क्यांदरम्यान सामान्य समजले जाते. या महिलेला सतत दम लागत होता आणि वजन केवळ ३७ किलो होते. त्यामुळे महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला; परंतु दाम्पत्य त्यासाठी तयार नव्हते. चार दिवसांनी पुन्हा संबंधित महिला डॉ. पापीनवारांकडे आली व तीव्र त्रासामुळे सिटी स्कॅन केल्यानंतर डाव्या श्वासनलिकेत २.५ सेंटिमिटर हाय १ सेंटिमिटर आकाराची 'फॉरेन बॉडी' स्पष्ट झाली. ब्राँकोस्कोपीमध्ये तर ते हाड असल्याचे दिसून आले, मात्र हाड कधी अडकले याबाबतचा पूर्व इतिहास सांगण्यास महिला व तिचा पती दोघेही तयार नव्हते. जेव्हा भली मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची जाणीव डॉक्टरांनी करून दिली, तेव्हा कुठे दोघे बोलते झाले.

भ्रामक कल्पना अन् टीबीची औषधे

२४ वर्षांपूर्वी जेवण करताना मटणाचा तुकडा अडकल्याचे महिलेने कबूल केले. त्यावेळी एका डॉक्टरने शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले होते, मात्र हाड आपोआप निघून जाईल, या भ्रामक कल्पनेत दोघेही राहिले आणि औषधांवर औषधे घेत राहिले. डावी श्वासनलिका पूर्णपणे ब्लॉक झाल्यामुळे वारंवार जंतुसंसर्ग होऊन निमोनिया होत होता. खोकला तर दिवस-रात्र सुरू झाला आणि त्यामुळे निद्रानाशही जडला. जंतुसंसर्गामुळे हृदयावर ताण येत होता व एकूण प्रकृती क्षीण झाली होती. टीबी समूजन दोनदा दिलेली औषधेही देण्यात आल्याचे दाम्पत्याने डॉ. पापीनवारांना सांगितले. अर्थात, दुसरीकडे दाम्पत्याचा संसार सुरू राहिला, अपत्येही झाली, त्रास मात्र कमी झाला नाही. पूर्व इतिहास लपवून ठेवल्याने व विनाकारण दुर्लक्ष केल्याने २४ वर्षे श्वासनलिकेत अडकून राहिलेले हाड मात्र फोर्सेबने २० सेकंदात निघाले.

संबंधित महिलेची डावी श्वासनलिका पूर्णपणे ब्लॉक होती. त्यामुळे वारंवार जंतुसंसर्ग होऊन निमोनिया होत होता. अशा केसेसमध्ये हृदयावरही ताण येतो; शिवाय वर्षानुवर्षे अडकलेली 'फॉरिन बॉडी' काढताना गंभीर इजा होऊ शकते. याबाबत ही महिला सुदैवी ठरली व अशा प्रकारची माझ्या पाहण्यातली पहिलीच केस आहे, मात्र असे दुर्लक्ष नक्कीच धोकादायक ठरू शकते. डॉ. श्रीकांत पापीनवार, फुफ्फुसविकारतज्त्र

ज्येष्ठ पत्रकार रमेश राऊत यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील ज्येष्ठ पत्रकार रमेश बाबूराव राऊत (५२) यांचे गुरुवारी (२६ फेब्रुवारी) मध्यरात्री घाटीत उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी माधुरी, मुलगी रेणू, लक्ष्मण व सुरेश हे भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. या वेळी समाजातील मान्यवर उपस्थित होते.

गेल्या आठवड्यापासून आजारी असलेल्या राऊत यांना गुरुवारी स्वाइन फ्लू झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. राऊत यांनी दोन दशके शहरातील विविध दैनिकांमध्ये पत्रकार ते संपादकपदापर्यंत जबाबदारी सांभाळली होती. साप्ताहिक 'चित्रलेखा'चे ते अनेक वर्षांपासून मराठवाडा प्रतिनिधी होते. या काळात त्यांनी केलेले सामाजिक व राजकीय लेखन गाजले. प्रारंभीच्या काळात मुंबई दैनिक 'सामना'मध्येही त्यांनी काम केले. जालना येथील ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण राऊत यांचे ते भाऊ होत. रमेश राऊत हे मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीवरही होते. तसेच 'साक्षात प्रकाशन'चे संचालक होते. सध्या त्यांच्या पत्नी माधुरी यांच्यावर घाटीमध्ये उपचार सुरू आहेत.

‘स्वाइन’मध्ये जनुकीय बदल नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केवळ पावसाळ्यात असणारा 'स्वाइन फ्लू' उन्हाळा सुरू झाला तरी झपाट्याने वाढण्याच्या मार्गावर असून, आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये १४३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. १६,२३७ व्यक्ती पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे राज्यभर आजाराच्या 'एच१एन१' या विषाणूमध्ये जनुकीय बदल (म्युटेशन) झाल्याची चर्चा सुरू झाली असली तरी, 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी'च्या (एनआयव्ही) संशोधनानुसार या विषाणूमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. मात्र यंदा 'स्वाइन'चा राज्यातील फटका २००९ पेक्षा जास्त असू शकतो, असा अंदाज खुद्द आरोग्य संचालकांनी व्यक्त केला आहे.

केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये 'स्वाइन'चा फटका मोठा असून, संपूर्ण देशामध्ये एक हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, राजस्थान, तेलंगणा, पश्चिम बंगालमध्येही आजार वाढतो आहे. राज्यामध्ये जानेवारी महिन्यापासून 'स्वाइन फ्लू' सुरू झाला. प्रारंभीच्या काळात आजार नियंत्रणात असल्याचे दिसून आले, पण हळूहळू 'स्वाइन'ने पाय पसरायला सुरुवात केली. सद्यस्थितीत १६ हजारांपेक्षा जास्त 'स्वाइन फ्लू'च्या संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

या संदर्भात सार्वजनिक आरोग्य सेवेचे संचालक डॉ. सतीश पवार म्हणाले, 'एच१एन१'विषयी 'एनआयव्ही'मध्ये सातत्याने संशोधन सुरू असून, या विषाणूमध्ये कुठलाही बदल झालेला नसल्याचा अहवाल आजच प्राप्त झाला आहे. मात्र १० मार्चपर्यंत आजार नियंत्रणात येईल, असे मानले जात असताना, दोन दिवसांपासून झालेल्या वातावरण बदलामुळे, पाऊस, गारव्यामुळे 'स्वाईन'चा मुक्कम वाढणार आहे. आजच्या स्थितीवरून तरी हा आजार वाढण्याची शक्यता असून 'स्वाइन फ्लू' आजाराची आजापर्यंतची यंदा सर्वाधिक व्याप्ती असू शकते, असा अंदाजही डॉ. पवार यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना व्यक्त केला.

तापमान हवे ३५-२० च्या पुढे

जेव्हा कमाल तापमान ३५-३६ व किमान तापमान २० च्या पुढे जाईल तेव्हाच 'स्वाइन फ्लू' कमी होणार, हे निश्चित आहे. मात्र दोन ते तीन दिवसांच्या वातावरण बदलानंतर राज्यभरात बहुतांश ठिकाणी कमाल व किमान तापमानात चार-पाच डिग्रीपेक्षा जास्त घट झाली आहे. त्यामुळेच तापमान ३५-२० च्या पुढे जाण्यासाठी १५ ते २० मार्च उजाडू शकतो आणि त्यानंतर स्वाइन फ्लू कमी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

अशी आहे 'स्वाइन फ्लू'ची सद्यस्थिती

आजपर्यंत तपासणी झालेले रुग्ण १ लाख ९३ हजार ९२६

स्वाइन फ्लू सदृश रुग्ण १६,२३७

स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण १,७३५

स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १४३

'व्हेंटिलेटर'वर असलेले गंभीर रुग्ण ४१


‘खाम’ लागली मरणपंथाला !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उग्र वास आणि फेसाळणारे काळे पाणी ही खाम नदीची सद्यस्थिती. औरंगाबाद शहरातील सांडपाणी व वाळूज औद्योगिक पट्ट्यातील घातक रसायनांनी नदीचे अस्तित्व मोडीत काढले आहे. या घातक पाण्यामुळे परिसरातील शेती उद्ध्वस्त झाली असून नानाविध आजारांनी रहिवासी त्रस्त आहेत. मराठवाड्याची भाग्यरेषा ठरलेला जायकवाडी प्रकल्पही दूषित पाण्याने व्यापला आहे.

खाम नदीच्या काठावर वसलेले शहर अशी औरंगाबादची ओळख. मावसाळा येथून वाहणारी नदी जोगेश्वरी गावाजवळ गोदावरी नदीत विलीन होते. रांजणगाव शेणपुंजी, वाळूज, वळदगाव, सावखेडा परिसरात नदी सर्वाधिक दूषित झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाला आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीत १,४०० कंपन्या असून दीडशे केमिकल कंपन्या आहेत. या कंपन्यांनी दूषित पाण्यावर प्रक्रिया करूनच पाणी नदीपात्रात सोडावे असा नियम आहे. मात्र अनेक कंपन्यांनी हा नियम डावलून बासणात गुंडाळला आहे. रसायनयुक्त घातक पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाण्याचा दुर्गंध गावभर परसरल्यामुळे नागरिकांचे डोके गरगरते. शिवाय इतर आजारांनी नागरिकांना बेजार आहेत, असे वळदगावच्या रहिवाशांनी सांगितले. रासायनिक पाणी शुध्द करणे आवश्यक असूनही घातक पाणी कंपन्या जमिनीत जिरवत आहेत. या प्रकारामुळे जमिनीचा पोत बिघडला आहे. शिवाय परिसरातील विहिरींमध्ये दूषित पाणी पाझरत आहे. पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणेही दुरापास्त झाले आहे. खाम नदीत वाळूजमधील दीडशे कुटुंब मासेमारीचा व्यवसाय करुन चरितार्थ करीत असत. पहिल्या टप्प्यात औरंगाबाद शहराचे सांडपाणी वाढल्यानंतर माशांचे प्रमाण घटले. तर औद्योगिक कंपन्यांचे रासायनिक पाणी नदीत घुसल्यानंतर मासे नामशेष झाले. या प्रकारामुळे अनेक कुटुंबांचा व्यवसाय कायमचा बुडाला आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीत फेरफटका मारल्यानंतर प्रदूषणाच्या लक्षणीय पातळीची जाणीव होते. हवेतील प्रदूषण आणि पाण्यातील प्रदूषणाने सर्वोच्च पातळी गाठली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची सर्वांवर 'मेहेरनजर' असल्यामुळे कारवाईचे प्रमाण नगण्य आहे. कंपन्यांवर वचक नसल्यामुळे खाम नदी शेवटच्या घटका मोजत आहे.

ठेकेदारांची चांदी

केमिकल कंपन्यांनी रसायनुक्त पाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीपात्रात सोडावे असे बंधनकारक आहे; मात्र ही प्रक्रिया खर्चिक असल्यामुळे कंपन्या पाण्यावर प्रक्रिया करीत नाही. एक लिटर पाण्यासाठी नऊ रूपये खर्च येतो. त्यामुळे कमी खर्चात पाण्याची विल्हेवाट लावण्यावर कंपन्यांचा भर आहे. पंधरा हजार लिटर घातक रसायने असलेल्या एका टँकरसाठी कंपन्या ५० ते ६० हजार रूपये मोजत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच पाण्यासाठी दीड लाख रुपये खर्च करण्यापेक्षा ५० हजारात काम होत असल्यामुळे कंपन्यांनी हाच मार्ग निवडला आहे. त्यामुळे एमआयडीसी भागात परराज्यातील ठेकेदारांची संख्या वाढली आहे. स्थानिक राजकारणी आणि मंडळ अधिकाऱ्यांना हाताशी धरुन रासायनिक पाण्याची विल्हेवाट लावण्याचा गोरखधंदा सुरू आहे.

शेती उद्ध्वस्त

रासायनिक पाण्यामुळे वाळूज परिसरातील गावांची शेती उद्ध्वस्त झाली आहे. लवकी नदीत सोडलेले दूषित पाणी टेंभापुरी प्रकल्पात पोहचते. तर खाम नदीचे दूषित पाणी जायकवाडी प्रकल्पात पोहचते. नदीकाठावरील शेतीवर या पाण्याचा दुष्परिणाम झाला असून शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. काही शेतकरी दूषित पाणी वापरुन भाजीपाला पिकवतात. हा भाजीपाला आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

या भाज्या धोकादायक

खाम नदीच्या पाण्यात कॅडमियम, क्रोमियम, निकेल यांसारखे आरोग्याला अतिशय घातक असलेले जडधातू मिळाले आहेत. औरंगाबादच्या खाम नदीतील पाण्याच्या पृथक्करणातही असे घटक आढळले आहेत आणि इतर नद्यांच्या पाण्यातही हमखास आढळतील. जडधातू आरोग्याला घातक असतातच, शिवाय ते पाण्यातून पिकावाटे माणसाच्या व प्राण्यांच्या शरीरात पोहोचतात. मग या भाज्या वरून कितीही ताज्या व हिरव्यागार दिसल्या तरी आपल्या पोटात काय जात आहे याची कल्पना येते.

पाण्यात कोणते विषारी घटक आहेत त्याच्यावर धोका अवलंबून असतो. घातक द्रव्ये वाढलेले पाणी आजाराला निमंत्रण देते. काही घटकांमुळे पाण्यात ऑक्सिजन अस्तित्वात नसतो. खाम नदीची अवस्था बिकट झाली असून हेच पाणी पुन्हा पिण्यासाठी वापरतात. या पाण्यावर प्रक्रिया केली असली तरी पाण्याची प्रत घसरली आहे. नदीचे अस्तित्व जपण्याची गरज आहे.

- डॉ. एम. बी. मुळे, पर्यावरण विभागप्रमुख, डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ

पूर्वीच्या तुलनेत खाम नदी पूर्ण बिघडली आहे. शहरातील सांडपाणी आणि रासायनिक पाण्यामुळे नदीचा उपयोग नाही. उलट पाण्याच्या वासामुळे गाव बेजार आहे. विहिरींचे पाणीसुद्धा दूषित झाले आहे. आरोग्या अपाय करणारी नदी सुधारली पाहिजे.

- कारभारी सुरडकर, ग्रामस्थ, वळदगाव

राज ठाकरे यांचा दौरा रद्द

$
0
0

औरंगाबाद : मनसे शहराध्यक्ष सुमीत खांबेकर यांना खाम नदीत विषारी रसायन सोडण्याच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर मनसेत चलबिचल सुरू झाली आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाला आहे. मनपा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने खांबेकरांच्या समर्थकामध्ये नाराजी पसरली आहे. शहराध्यक्ष या नात्याने त्यांच्याकडे अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली होती. त्यांचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणात दोन राजकारण्यांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. त्यांच्या माध्यमातूनच रसायन नष्ट करण्याचे हे कंत्राट खांबेकर यांना मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी राज ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा आयोजित करण्यात आला होता.

सुमीत खांबेकरांची मनसेतून हकालपट्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खाम नदीत विषारी रसायने टाकणारे मनसे शहराध्यक्ष सुमीत खांबेकर यांची राज ठाकरे यांनी रविवारी रात्री पक्षातून हकालपट्टी केली. 'इतके अमानवी, दुष्ट आणि माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य कुणी, कसा आणि का करतो, असा प्रश्न पडला. हा प्रकार माणसाच्या जीवाशी खेळणे आहे. या कृत्याला शासनव्यवस्थाच काय, तर कुणीच माफ करणार नाही,' अशा कडक शब्दात राज ठाकरे यांनी ताशेरे ओढले आहे.

खांबेकर यांना अटक झाल्याचे कळताच ठाकरे यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली. राजकीय डावपेचातून खांबेकर यांना प्रकरणात गोवले असल्याची शक्यता राज यांना वाटली होती; मात्र खरी माहिती मिळताच त्यांनी हकालपट्टीचे आदेश दिले. पक्षाचा पदाधिकारी सहभागी असल्याचे कळल्यानंतर अत्यंत वाईट वाटल्याचे राज यांनी पत्रात म्हटले आहे.

अशा नराधमांना समाजात कुठलेच स्थान असता कामा नये. मग माझ्या पक्षातले पद, तर दूरची गोष्ट आहे. न्यायव्यवस्था आणि शासनव्यवस्था काय तो छडा लावतील आणि त्यांचे काम करतील, पण अशा कामात सहभागी आहे, अशा कुणालाही मी पक्षात सामान्य सदस्यत्वही देऊ इच्छित नाही.

- राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

खांबेकर, आगाखान ३ दिवस कोठडीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सुमीत खांबेकर, नगरसेवक आगाखान व साथीदारांना कोर्टाने बुधवारपर्यंत (४ मार्च) पोलिस कोठडी सुनावली आहे. खाम नदीपात्रात रासायनिक पदार्थ सोडल्याबद्दल वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खाम नदीपात्रात टँकरमधून कंपन्यांमधील धोकादायक रासायनिक द्रव पदार्थ टाकत असताना पोलिसांनी शनिवारी पहाटे ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मनसे शहराध्यक्ष सुमीत खांबेकर, ‌भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले कैलासनगरचे नगरसेवक आगा खान, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पाखरे, असलम शेख व चंदन नागेंद्र सिंह यांना घटनास्थळी अटक केली. त्यांना रविवारी कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने या सर्वांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.

या मंडळींनी टँकरमध्ये भरलेले धोकादायक रसायन कोणत्या कारखान्यातून व कोठून भरले, त्या टँकरचे चालक कोण, या रसायनाचे चालान कोठे ठेवले, टाकाऊ रसायन फेकण्याचा करारनामा कोणत्या कंपनीसोबत आहे, आरोपीचे आणखी साथीदार कोण, जेथे हे रसायन टाकले पाहिजे, तेथे न टाकता त्या कंपनीची पोचपावती कशी घेतात, आरोपी किती महिन्यांपासून हा धंदा करीत आहेत, तसेच आतापर्यंत त्यांनी किती रसायन खाम नदीपात्रात सोडले, ठाणे, अंबरनाथ येथील घटनांशी या घटनेचा सबंध आहे का आदी बाबींचा तपास करण्यासाठी कोठडीची मागणी करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. नेवारे यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांच्या वतीने सहायक सरकारी वकील व्ही. एन. चौकीदार, पोलिस उपनिरीक्षक अजयकुमार पांडे यांनी बाजू मांडली.

मोठे मासे कोण?, दोन राजकारण्यांचा वरदहस्त

या रॅकेटमध्ये खांबेकर व आगाखान यांच्याशिवाय आणखी वजनदार व्यक्ती सामील असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सुमीत खांबेकर यांच्यावर दोन बड्या राजकारण्यांचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे.

कोर्टात बंदोबस्त; समर्थकांना काढले बाहेर

सुमीत खांबेकर व आगाखान यांना कोर्टात आणले जात असताना समर्थक मोठ्या संख्येने कोर्टात जमा होतील, असा पोलिसांना अंदाज होता. त्यानुसार कोर्टाच्या आवारात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी समर्थकांना कोर्टाच्या आवाराबाहेर काढले.

बाइक रॅलीतून आत्मविश्वासाला बळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जागतिक महिला दिनाच्या औचित्याने 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित करण्यात आलेल्या विमेन बाइक रॅलीत सहभागी होण्यासाठी महिलांचा उत्साह वाढत आहे. कॉलनी, अपार्टमेंट, सोसायटीतील महिलांसोबत कार्यालयीन ग्रुप, भिशी मेंबर एकत्र येऊन या महिला बाइक रॅलीत सहभागी होणार आहेत. 'मटा'च्या उस्मानपुरा सर्कल येथील कार्यालयात नाव नोंदणी करण्यासाठी महिलांचा प्रतिसाद वाढत आहे.

आपल्या आवडत्या बाइकसोबत महिला दिन साजरा करण्याची संधी 'महाराष्ट्र टाइम्स'ने उपलब्ध करून दिली आहे. 'मटा'च्या वतीने औरंगाबादमध्ये आयोजित केलेल्या विविध उपक्रमांना जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. तसाच प्रतिसाद 'महाराष्ट्र टाइम्स वुमन्स बाइक रॅली'लाही मिळत आहे. जागतिक महिला दिनी रविवारी (८ मार्च) महिला बाइक रॅलीच्या माध्यमातून महिला शक्ती आणि एकजुटीचे अनोखे दर्शन औरंगाबादकरांना होणार आहे. अनेक महिला या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. रविवारी सकाळी 'मटा'च्या उस्मानपुरा कार्यालयापासून रॅलीला सुरुवात होईल, तर प्रोझोन मॉल येथे रॅलीचा समारोप होईल. या निमित्ताने महिलांच्या एकजुटीचे दर्शन आणि त्यांच्यातील स्वावलंबनासह आत्मविश्वासाला सलाम करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बाइक रॅलीच्यानिमित्ताने महिलांची सामूहिक शक्ती एकवटलेली दिसेल. महिलांची ही सामूहिक शक्ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. 'चूल आणि मूल' या संकल्पनेत अडकलेली स्त्री आता बाहेर पडून नोकरी, व्यवसाय करत आहे. अशा सामूहिक उपक्रमातून महिलांना बळ मिळेल. आज महिला विविध क्षेत्रांच्या माध्यमातून बाहेर पडत आहेत. त्यातून महिलांची एकजूट होऊ शकते. रॅलीच्या माध्यमातून महिलांची ताकद दिसून येईल.

नाव नोंदणीसाठी

http://womenbikerally.mtonline.in या वेबसाइटला भेट द्या, किंवा मोबाइलवर BikerallyAGB टाइप करून ५८८८८ या क्रमांकावर एसएमएस करा.

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images