Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

संरक्षण देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ

0
0

उस्मानाबादः उस्मानाबाद शहरातील मोक्याच्या ठिकाणच्या जमिनीवरील बेकायदेशीर व अनधिकृत अतिक्रमण हटविण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचा राग मनात धरून काही मंडळींकडून जीवितास धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी स्वातंत्र्यसैनिक विष्णुपंत धाबेकर यांनी केली होती. मात्र, याकडे पोलिस प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप धाबेकर यांनी केला आहे.

स्वातंत्र्यसैनिक धाबेकर यांनी सरंक्षण देण्याची मागणी २ मे २०१४ रोजी उस्मानाबादच्या पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली होती. यानंतर हा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी उस्मानाबाद पोलिस ठाण्याकडे पाठविण्यात आला होता. याप्रकरणात कोणाकडून धोका आहे याची माहिती पोलिस स्टेशनला कळवा त्यानंतर संरक्षणाची गरज आहे किंवा नाही याची पडताळणी करून संरक्षण देण्याबाबत विचार केला जाईल, असे पोलिस प्रशासनाकडून त्यांना कळविण्यात आले. त्यानंतर संरक्षणासाठी मागणी केलेला विनंती अर्ज निकाली काढण्यात आल्याचे अंमलदारांनी ३१ जानेवारी २०१५ रोजी त्यांना कळविले होते.

धोका कोणाकडून आहे त्यांची नावे द्या, अशा प्रकारची लेखी मागणी करून पोलिस आपली जबाबदारी टाळत आहेत. त्यांना नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरेंसारखी हत्या हवी आहे.

- विष्णूपंत धाबेकर, स्वातंत्र्य सैनिक, उस्मानाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरासह ३०४ गावांच्या नियोजनाला वेग

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरासह लगतच्या ३०४ गावांसाठी राज्य सरकारतर्फे महानगर नियोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीतर्फे संपूर्ण परिसर हा महानगर समजून विकास कामांचे कृती आराखडे व नियोजन तयार केले जाणार आहेत. या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः असल्यामुळे शहर तसेच परिसरातील ३०४ गावांचे नियोजन आता वेगाने होणार आहे.

औरंगाबाद शहर व परिसराचा झपाट्याने विस्तार होत आहे, मात्र त्याकरिता असे ठोस नियोजन नसल्याने अनियमित विकास सुरू आहे. आता समिती स्थापन होऊन या समितीला अध्यक्षही मिळाल्यामुळे समितीची कामे वेगाने मार्गी लागण्याची शक्यता आहे.

ही समिती महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या तरतुदीनुसार महानगर प्रदेश विकास योजनेचा मसुदा तयार करेल. तसेच समिती योजना तयार करताना महानगर क्षेत्रात नगर पालिकांनी व नगरपंचायतींनी तयार केलेल्या विकास योजनांविषयक प्रस्तावावर विचार करून प्रस्ताव तयार करुन तो राज्य शासनाकडे मान्यतेसाठी सादर करेल.

या समितीमुळे औरंगाबाद महानगर प्रदेशाचा संतुलित व सुनियोजित विकास होण्यास मदत होणार आहे. औरंगाबाद महानगर नियोजन समितीत शहरासह ३०४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. समितीत औरंगाबाद महानगर पालिका, खुलताबाद नगरपालिका, छावणी परिषद क्षेत्र, औरंगाबाद, पैठण, गंगापूर , खुलताबाद, फुलंब्री या तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांसह समितीमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आलेले ३० सदस्य तसेच शासन निर्देशित सदस्यांमध्ये पदसिद्ध तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यकारी अधिकारी नगर विकास, पायाभूत सुविधा, नागरी परिवहन, पर्यावरण यातील तज्ज्ञ असे एकूण १२ दस्स्य तसेच विशेष निमंत्रित व्यक्तींमध्ये संसद सदस्य व व विधानमंडळ सदस्य (महानगर क्षेत्रातून निवडून आलेले) एकूण ५ सदस्य व राज्य शासनाच्या उपक्रमांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, केंद्र शासनाच्या आस्थापनांचे प्रतिनिधी एकूण १० विशेष निमंत्रितांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावर पडलेले २५ हजार परत मिळाले!

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गारखेडा परिसरात कालिकामाता मंदिर परिसरात सकाळी पाऊणे नऊ वाजता दुचाकीवरून जाणाऱ्या एका व्यक्तीची बॅग रस्त्यावर पडली. याचवेळी व्यायामासाठी आलेल्या डॉ. शेषराव मसूडकर यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी दुचाकीस्वाराला आवाज देण्याचा प्रयत्न केला, परंतु दुचाकीस्वार निघून गेले होते. बॅगची पाहणी केली असता, यात २५ हजाराची रोख रक्कम व कागदपत्र, ओळखपत्र होते. याच्या आधारे त्यांनी वाहनधारकांचा शोध घेऊन ही बॅग परत करत माणुसकीचे दर्शन घडविले.

सकाळच्या वेळी कालिकामाता मंदिराच्या बाजूला खुल्या मैदानावर व्यायामासाठी आलेले शिक्षक डॉ. शेषराव मसूडकर हे व्यायामानंतर विश्रांती घेत होते. याचवेळी समोरच्या रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी वाहनाच्या हँडलला लटकविलेली बॅग रस्त्यावर पडली.

डॉ. मसूडकर यांनी आणि अन्य व्यक्तींनी संबंधित वाहनधारकाला हाक मारून बॅग पडल्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहनधारक वेगाने निघून गेले. या बॅगची तपासणी केली असता, रोख रक्कम, दोन एटीएम कार्ड, कंपनीची महत्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम डॉ. मसूडकर यांना आढळले. त्यांनी ओळखपत्राच्या आधारे वाहनधारकाची माहिती घेतली. गंगापूर येथील खाजगी कंपनीत काम करणारे दिलीप जाधव यांची ही बॅग होती. त्यांनी जाधव यांना फोन करून तुमची बॅग सापडल्याचे सांगितले. त्याचवेळी बॅग हरवल्याचे लक्षात आल्याने जाधव काहीसे तणावत होते, परंतु बॅग सापडल्याचा फोन आल्यानंतर त्यांना हायसे वाटले. बॅग घेत डॉ. मसूडकर यांचे त्यांनी आभार मानले. रोख रक्कम,कागदपत्रांसह सापडलेली बॅग प्रयत्नकरून संबंधिताला परत करणाऱ्या डॉ. मसूडकर यांचे उपस्थितांनी कौतुक केले. देवगिरी ज्युनिअर कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विषयाचे शिक्षक असलेल्या डॉ. मसूडकर यांचे कॉलेजच्या शिक्षकांनीही कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळालगत ‘अल्टिट्यूड’चे दोन मजले नियमबाह्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विमानतळ प्राधिकरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून विमानतळाशेजारी अल्टिट्यूड गृहप्रकल्पाचे दोन मजले नियमबाह्य बांधण्यात आले आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, नगररचना विभागाचे संचालक, औरंगाबाद महापालिका आयुक्तांकडे रितसर लेखी तक्रारी शहरातील हायकोर्टातील वकील बी. एल. सगर किल्लारीकर यांनी केल्या आहेत. १७.८५ मीटर उंचीपर्यंतच प्राधिकरणाची परवानगी असताना, तब्बल १८.१५ मिटर उंचीपर्यंत बांधकाम झाल्याचे तक्रारीनुसार समोर आले आहे.

चिकलठाणा विमानतळाशेजारी असलेल्या गट क्रमांक ७०१ मध्ये गोशाळेच्या बाजूला अल्टिट्यूड गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू असून, राजेश लक्ष्मणदास परसवाणी, सोनम राजू तनवाणी, मनाली बालाजी पाटील, अभय अशोकचंद छाजेड हे प्रकल्पाचे बिल्डर आहेत. या तक्रारीत म्हटल्यानुसार, या जागेवर २००८-९ मध्ये एका तारांकित हॉटेलची निर्मितीची परवानगी संबंधित बिल्डरने मागितली होती आणि महापालिकेने दिली होती. त्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने २३ एप्रिल २००९ रोजी नाहरकत प्रमाणपत्र देऊन संबंधित इमारतीच्या व छताच्या अंतिम टोकाची उंची १७.८५ मीटरपेक्षा जास्त असू नये, अशी अट घातली होती. तसेच यामध्ये इमारतीच्या वर उभ्या कराव्या लागणाऱ्या दीप मनोऱ्याच्या उंचीचाही समावेश होईल, असे प्राधिकरणाने स्पष्ट नमूद केले होते. अचानक या हॉटेलचा मूळ प्रकल्प बिल्डरांनी रद्द केला आणि गृहनिर्माण प्रकल्प २०१३ मध्ये महापालिकेमध्ये दाखल केला. त्यानुसार याच जागेवर चार स्वतंत्र इमारती व एकूण ८५ सदनिका (फ्लॅट) बांधण्यात येणार आहेत. या बांधकामासाठी मूळ रेखांकनामध्ये (लेआऊट) जाणीवपूर्वक व हवेतसे बदल विकासकाने सूचविले आणि विकासकाच्या फायद्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी नियमांचे खुलेआम उल्लंघन करून गृहप्रकल्पाला मंजुरी दिली.

विशेष म्हणजे दुसऱ्या गृहप्रकल्पाच्या रेखांकनाला अंतिम परवानगी १६ ऑगस्ट २०१३ रोजी दिली आहे, तर इमारतीच्या संबंधाने वास्तुविशारदाने दाखल केलेल्या आराखड्यामध्ये ८ ऑगस्ट या तारखेची नोंद आहे. म्हणजेच रेखांकनाला मंजुरी मिळण्याआधी आराखड्याला मंजुरी मिळाली होती, असेही तक्रारीत म्हटले आहे.

रहिवाशांसाठी हक्काची जागा नाही

नियमानुसार ४००० चौरस मीटर आराखड्याच्या भूखंडावर गृहप्रकल्प राबविताना एकूण क्षेत्रफळाच्या १० टक्के जागा प्रस्तावित प्रकल्पाच्या रहिवाशांसाठी सोडणे अनिवार्य आहे. या प्रकल्पात मात्र मनपा अधिकाऱ्यांना हाताशी धरून भूखंडाचे क्षेत्र ३७१६ चौरस फूट ठेवण्यात आले आहे. परिणामी, रहिवाशांची १० टक्के हक्काची जागा प्रकल्प अस्तित्वात येण्याआधी हिरावून घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लेआऊटला मंजुरी व बांधकाम परवान्याचे नूतनीकरण १६ ऑगस्ट रोजी करून घेण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच या प्रकाराची चौकशी सहसचिवापेक्षा वरच्या अधिकाऱ्यांमार्फत व्हावी, अशी मागणीही अॅड. सगरकिल्लारीकर यांनी केली आहे.

असे हे नियमबाह्य षडयंत्र

१७.८५ मीटर उंचीपर्यंत परवानगी असताना

मनपाने दिली १८.१५ मीटरपर्यंत परवानगी.

रहिवाशांना १० टक्के जागा न

मिळण्यासाठीच 'खास' प्रयत्न.

तारांकित हॉटेलची परवानगी रद्द

करून प्रकल्पात ८५ फ्लॅटचा घाट.

नगरविकास विभागाचे प्रधान सचिव,

'नगररचना'च्या संचालकांकडेही तक्रारी

नियमांचे सर्रास उल्लंघन करून शहरामध्ये या प्रकारचे अनेक गृहप्रकल्प उभे करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नजिकच्या काळात झालेल्या बांधकामांची तपासणी करण्यात यावी. तसेच गुढीपाडव्यानिमित्त वेगवेगळ्या गृहप्रकल्पांमध्ये पैसे गुंतवताना नागरिकांनी जागृत राहावे. अॅड. बी. एल. सगरकिल्लारीकर, तक्रारदार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घर फोडून २७ हजारांची चोरी

0
0

औरंगाबादः घराला कुलप असल्याची संधी साधून चोरट्यांनी हडको एन १२ येथून सोन्याच्या अंगठीसह २७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. गजाजन साळवे (वय ३०, रा. एन १२ हडको) हे ७ मार्च राजी रात्री ११ वाजता बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून चोरांनी कुलूप व कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करून चोरी केली. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीसह जाणाऱ्यास मारहाण

औरंगाबादः पत्नीसह जात असलेल्या एका तरुणाला संजयनगर, गल्ली नंबर २० येथे शुक्रवारी (६ मार्च) सकाळी साडेअकरा वाजता बेदम मारहाण करण्यात आली. अर्जून पवार (वय २५, रा. न्यायनगर) असे फिर्यादीचे नाव आहे. ते पत्नीसह घराकडे जात असतानाच अनिल पवार, उमेश राठोड, संजय पवार, एकनाथ पवार, ज्योती पवार, निर्मला पवार, सोनू पवार, रविना आणि सुनील पवार यांनी रस्त्यात अडवून मारहाण केली, अशी तक्रार त्यांनी दिली आहे. याप्रकरणी मुुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसच्या धडकेत जखमी

औरंगाबादः अज्ञात बसने धूत हॉस्पिटल चौकात गुरुवारी (५ मार्च) दिलेल्या धडकेत शंकरराव डंक (वय ८०, रा. ठाकरेनगर) हे जखमी झाले. त्यांना एका पिवळ्या रंगाच्या बसने धडक दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास एमआयडीसी सिडको पोलिस करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेळेत दुरुस्ती न केल्याने सहायक अभियंता निलंबित

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्रांतीचौक शाखा कार्यालयातंर्गत ११ केव्ही पाणीपुरवठा फिडरचा तांत्रिक बिघाड वेळेत दुरूस्त न केल्याने महावितरणचे सहायक अभियंता संदीप जयस्वाल यांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय इतर चार कर्मचाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

वादळी वारे व पावसामुळे २८ फेब्रुवारी रोजी महावितरणच्या क्रांतीचौक शाखा कार्यालयांतर्गत ११ केव्ही पाणीपुरवठा फिडर रात्री साडेदहा वाजता बंद पडला. या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी १ मार्च रोजी रात्री साडेबारा वाजता परमीट घेण्यात आले. मात्र, वेळेवर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे जयस्वाल याला निलंबित करण्यात आले. या कर्तव्यात कसूर केल्याने कनिष्ठ तंत्रज्ञ विलास कोरडे, संभाजी शिंदे, कैलास पवार, मोहन बोबडे आणि दिलीप तडवी या चौघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

वेळेत काम अपेक्षित

जीटीएलकडून वीज वितरण ताब्यात घेतल्यानंतर महावितरणने पहिल्यांदाच कडक कारवाई केली आहे. वसुली आणि वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात सक्त कारवाई करण्याचे हे संकेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ PRO ची निवड हायकोर्टात कायम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जनसंपर्क अधिकाऱ्याच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. व्ही. एल. अचलिया यांनी फेटाळली. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्या नेमणुकीला आव्हान देणारी याचिका जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील यांनी खंडपीठात दाखल केली होती. शिंदे यांनी वयोमर्यादा ओलांडली आहे. छाननीत त्यांचा अर्ज बाद झाला होता. दुसऱ्यांदा विद्यापीठाने त्यांचा अर्ज वैध ठरवला. अपात्र असतानाही त्यांची निवड केली. ही निवड रद्द करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली होती. विद्यापीठाच्या वतीने युक्तीवाद करताना,२००९ पासून शिंदे हे विद्यापीठाच्या सेवेत आहेत. त्यांची निवड पाच वर्षांसाठी होती. त्यानंतर विद्यापीठाने विद्यापीठ निधीतून त्यांना पूर्णवेळ नियुक्ती दिली आहे. शासनाच्या निर्णयानुसार व विद्यापीठ नियमावलीनुसार वय मर्यादा ही चाळीस वर्षांची असून, त्याआधारेच त्यांचा अर्ज वैध ठरवल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. युक्तीवादानंतर खंडपीठाने संजय शिंदे यांची नियुक्ती कायम ठेवून याचिका फेटाळली. विद्यापीठातर्फे अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी युक्तीवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांना अखेर जाग

0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

मुले पळविण्याच्या अफवेमुळे जिल्ह्यात दोघांचा बळी व शहरात काही हाणामारीच्या घटना घडल्यानंतर पोलिसांना जाग आली आहे. संशय आल्यास नागरिकांनी कायदा हातात न घेता तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्यावे, असे आवाहन पोलिसांनी केली आहे.

कन्नड तालुक्यातील टापरगाव व रुईखेडा शिवारात गुरुवारी (५ मार्च) मुले पळविण्याच्या अफवेतून दत्तात्रय सखाराम पल्हाळ (वय ३५, रा. बोडखा) यास जमावाने बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. पल्हाळ याने केलेल्या हल्ल्यात प्रकाश जंगले यांचा जीव गेला आहे. परंतु, या घटनेच्या आधीपासून शहर व जिल्ह्यात मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवा पसरल्या आहेत.

नोकरीच्या शोधात आलेल्या शरद रमेश म्हस्के (२७, रा. अन्वी, भोकरदन) यांना अपहरणकर्ता समजून एका टोळक्याने शनिवारी (७ मार्च) बेदम मारहाण केली. ते रोजाबाग येथील नातेवाइकांना भेटण्यासाठी चेतनानगरातून पायी जात होते. एका टोळक्याने त्यांना गाठून चॉकलेट दाखवून मुले पळवत असल्याची आवई ठोकली, तेवढ्यात १५ ते १६ जण जमा झाले व त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत हे तेथून जात असताने त्यांच्या नजरेस हा प्रकार पडला. त्यांनी शरद यांना पोलिसांच्या मोटारीतून जवाहरनगर पोलिस ठाण्यात नेऊन चौकशी केली असता वस्तुस्थिती समोर आली. मुकुंदवाडी भागातही असेच काही प्रकार घडले आहेत. त्यामुळे पोलिसांनी उशिरा का होईना, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे.

कायदा हाती घेतल्यास नागरिकांवर कारवाई

संशयावरून पूर्णतः खात्री न करता कोणत्याही व्यक्ती-महिलेला मारहाण करू नका. संशय आल्यास नजिकच्या पोलिस ठाण्यात कळवावे. संशयित वाहनात असल्यास त्याची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी कायदा हाती घेऊन मारहाण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्लिष्ट शस्त्रक्रियेने केली मुलाची आजारातून सुटका

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रांजणगाव शेणपुंजी (ता. गंगापूर) येथील नववीत शिकणारा १४ वर्षांचा मुलगा सहा महिन्यांपासून नाकातून रक्तस्त्राव होणे, श्वास घेण्यास त्रास होणे आदी तक्रारींनी त्रस्त होता. मुंबईत उपचार घेण्याची कुटुंबाची ऐपत नव्हती. मात्र शासकीय विभागीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करून आजारातून सुटका झाली.

१२ ते १८ वयोगटातील पुरुषांमध्ये आढळणारा 'जुव्हेनाईल अॅजिओफायब्रोमा ऑफ नेसोफॅरिकन्स' हा आजार शत्रुघ्न श्रीमंत कुंभेफळ याला असल्याचे स्पष्ट झाले होते. शस्त्रक्रियेपूर्वी रक्तपुरठा करणारी नस एंबोलाझेशन या तंत्राने तात्पुरती बंद करण्यात आली. डॉ. पोळ यांनी या तंत्राद्वारे रुग्णाचा शस्त्रक्रियेदरम्यानचा रक्तस्त्राव कमी केला. विभागप्रमुख डॉ. सुनिल देशमुख यांनी भूलतज्ज्ञ डॉ. आलापुरे, डॉ. गांगुर्डे यांच्या साह्याने १८ फेब्रुवारी रोजी अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली. शस्त्रक्रियेनंतरच्या सिटी स्कॅनमध्ये गाठ निघाल्याचे स्पष्ट झाले व त्याला २५ फेब्रुवारी रोजी सुटी देण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. देशमुख यांना डॉ. प्रमारे घनजकर, डॉ. आनंद तुळजापुरे, डॉ. जयराज, डॉ. अतुल पोरे यांनी साह्य केले.

साडेचार तास शस्त्रक्रिया

ही शस्त्रक्रिया तब्बल साडेचार तास चालली. यामध्ये रुग्णाची गाठ ही नाकाच्या बाजूने चीर देऊन व मेंदूच्या तळाशी व मेंदूखालील भागातून पूर्णपणे काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले. या विशेष शस्त्रक्रियेबद्दल अधिष्ठाता डॉ. छाया दिवाण यांच्या कॅन्सर हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी डॉक्टरांच्या टीमचे कौतुक केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् अफवेचा बाजार रंगला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याची अफवा रविवारपासून रंगली होती. सोमवारीही सोशल मीडियावरून तसेच फोन करून तारीख कन्फर्म करण्याची स्पर्धा लागली होती. १२ एप्रिलला निवडणूक जाहीर झाल्याच्या वृत्तात कोणतेही तथ्य नसून, ती अफवा असल्याचे शेवटी स्पष्ट झाले.

पालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. वॉर्ड रचना, आरक्षणाबाबत अनेक ठिकाणी नाराजी आहे. त्यावर आक्षेप मागविले गेले. राज्य निवडणूक आयोगाच्या सदस्यासमोर सुनावणी झाली. त्यातून १३ आक्षेप गंभीर असल्याचे निवडणूक आयोगानेही मान्य केले असून त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. निवडणूक जाहीर केलेल्या रचनेत होणार की ड्रॉ नव्याने होणार, निवडणूक लांबणार काय ? निर्णय कधी होणार याकडे सर्वपक्षीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच रविवारी रात्री निवडणूक १२ एप्रिलला होणार अशी पोस्ट व्हॉटसअपवर आली. जिकडे तिकडे चर्चा सुरू झाली. काल सुटी असल्याने त्याची फारशी चर्चा झाली नाही. मात्र सोमवारी सकाळपासून पालिकेच्या वर्तुळात निवडणुकीची चर्चा सुरू झाली. १२ एप्रिल फायनल झाली का ? अधिकृत पत्र आले का ? आक्षेपांचे काय ? फेररचना होणार नाही का ? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. काही इच्छुकांनी थेट मुंबईत संपर्क साधून खातरजमा करण्याचा प्रयत्न केला. पालिका कार्यालयात मात्र सायंकाळी सहापर्यंत कुठलीच अधिकृत माहिती आली नव्हती. त्यामुळे ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळाची झळ वन्यप्राण्यांच्या जीवावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळी परिस्थितीत तहानलेले वन्यजीव जगण्यासाठी संघर्ष करीत असून मानवी वस्तीत त्यांचा संचार वाढला आहे. जिल्ह्यातील पाणवठे कोरडेठाक असून पाण्याच्या शोधात प्राणी सैरावैरा धावत आहेत.

वैजापूर तालुक्यातील घायगाव शिवारात मागील आठवड्यात काळवीट विहिरीत पडले. सिंदोन (ता. औरंगाबाद) या गावातही नीलगाय विहिरीत पडली होती. पाण्याच्या शोधात हे प्राणी विहिरीत पडल्याचे स्पष्ट झाले. बळ्हेगाव परिसरात बिबट्याने दोन दिवस धुमाकूळ घातला होता. या बिबट्यानेही पाण्यासाठी विहिरीत उडी मारली होती. हा सगळा प्रकार वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसमोर घडला होता. गौताळा अभयारण्य, जायकवाडी अभयारण्य आणि इतर वनक्षेत्रात पाणी टंचाईने वन्यजीव त्रस्त झाले आहेत. कन्नड, वैजापूर, सोयगाव व सिल्लोड तालुक्यातील अनेक गावांत वन्यजीव भटकताना दिसत आहेत. 'गौताळा अभयारण्यातील नैसर्गिक पाणवठ्यात पाणी शिल्लक असून वन्यजीव संरक्षक विभागाने बांधलेल्या पाणवठ्यात पाणी टाकत आहोत' असे उपवनसंरक्षक सुनील ओहोळ यांनी सांगितले. वन विभागाच्या अखत्यारित ४० पाणवठे आहेत. वन्यजीवांची संख्या लक्षात घेता पाणवठ्यांची ही संख्या नगण्य आहे. शिवाय नैसर्गिक स्त्रोत बंद पडल्यामुळे जंगलात पाणी टंचाई आहे. त्यामुळे अनेक वन्यप्राणी परिसरातील गावात भटकत आहेत. या प्राण्यांनी गावात शिरकाव केल्यामुळे ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे. वैजापूर तालुक्यात पाळीव प्राण्यांवर जंगली प्राण्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. मार्च ते जून या चार महिन्यांत वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरण्याचे प्रकार वाढण्याची शक्यता आहे.

संकटावर मात

२०१२ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात अनेक वन्यप्राणी व पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. अभयारण्य आणि वन विभागाच्या हद्दीत मृत अवस्थेतील प्राणी आढळले होते. यंदा दुष्काळात प्राणी जगविण्यासाठी पाण्याचे नियोजन तातडीने करण्याची गरज आहे.

दुष्काळाची झळ प्राण्यांना बसू नये म्हणून पुरेपूर नियोजन केले आहे. या कामासाठी विभागाला सोमवारी निधी मिळाला आहे. नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठ्यात पाणी टाकण्याचे काम लवकर सुरू करण्यात येईल.- सुनील ओहोळ,

उपवनसंरक्षक, वन्यजीव संरक्षक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडिलांच्या मृत्यूचा कड उरात जिरवून दिली परीक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

वडील गेले अन् घरावर दुःखाचे आभाळ कोसळले. त्याचा आधारवडच हिरावला. डोळ्यांत पाणी, ओठांत शब्द फुटत नव्हते. हातापायाचे कापरेही थांबत नव्हते. हे सारे कड त्याने मोठ्या हिकमतीने उरात जिरवले. अन् अगोदर बारावीच्या परीक्षेचा पेपर दिला आणि त्यानंतरच वडिलांना निरोप.

प्रसाद प्रभाकर दांडगे हा फुलंब्री येथील वानखेडे विद्यालयाचा विद्यार्थी. तो मामाकडे शिक्षण घेतो. दांडगे कुटुंब मुळचे वेरूळचे. सध्या औरंगाबादमध्ये राहतात. प्रसादचे वडील प्रभाकर दांडगे (वय ५७) हे वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात पुजारी होते. त्यांना रविवारी (८ मार्च) दुपारी औरंगाबाद येथील मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन समोरून जाताना अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. प्रभाकर दांडगे यांची ओळख न पटल्यामुळे पोलिसांनी त्यांचा मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये ठेवला. त्यांच्या कुटुंबियांनी संध्याकाळपर्यत वाट पाहून शोध घेतल्यानंतर रात्री उशिरा अपघात झाल्याचे समजले. त्यांची शवगृहात ओळख पटवण्यात आली. ही माहिती रविवारी रात्रीच प्रसादला कळविण्यात आली होती, परंतु शेवटचा पेपर असल्याने नातेवाईकांनी परीक्षा देण्याची सूचना केली. या कठीण प्रसंगात प्रसादने काळजावर दगड ठेऊन शेवटचा पेपर दिला. त्यानंतर तो वडिलांच्या अंत्यविधीसाठी औरंगाबाद येथे गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भेगाळल्या भुईत दुधाचा महापूर

0
0

म. टा. प्र‌ति‌निधी,औरंगाबाद

मराठवाड्यात ठाण मांडलेल्या भयाण दुष्काळातही एक आशेचा किरण लुकलुकताना दिसतो आहे. सध्या विभागात दुधाचा सुकाळ असल्याचे चित्र आहे. डिसेंबर २०१४ मध्ये दररोज सरासरी ८ लाख लिटर असणारे दूध संकलन, जानेवारी २०१५ मध्ये सव्वाआठ लाख लिटरपर्यंत पोहचले आहे.

मराठवाड्यात अपुऱ्या पावसामुळे यंदा पिके गेली. त्यात अवकाळी पावसाची भर पडली. निसर्गाच्या अवकृपेमुळे ७६ तालुके पुन्हा एकदा दुष्काळात होरपळत आहेत. सध्या विभागात ४१६ टँकर सुरू आहेत. खबरदारी म्हणून १,२९८ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. सध्या सर्व प्रकल्पात फक्त १८ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार महिने बिकट राहणार, अशी चिन्हे आहेत. या भयाण दुष्काळातही सध्या जनावरांना पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध आहे. त्यामुळे दूध संकलनाचे प्रमाण वाढले आहे, मात्र दूध पावडरला जागतिक मार्केटमध्ये फारसा उठाव नाही. पावडर प्रकल्पातही दुधाला फारशी मागणी नाही. त्यात खासगी डेअरीवाल्यांनी खरेदी दर कमी केले आहेत. परिणामी शासकीय आणि सहकारी संघाकडे दूध उत्पादकांचा ओढा वाढल्याचे चित्र आहे.

डिसेंबर २०१४ मध्ये प्रतिदिन सरासरी ६७ हजार लिटर दुधाचे संकलन झाले. जानेवारी महिन्यात ७५ हजार, तर फेब्रुवारीमध्ये ८४ हजार लिटर दुधाचे संकलन झाले. खासगी डेअरीने खरेदी दर कमी केले. त्यात संघाचेही संकलन वाढल्याने नाईलाजाने खरेदी दर प्रतिलिटर दोन रुपयांनी कमी करावा लागला. अतिरिक्त दूध मुंबईला पाठवावे लागते.

- डॉ. पी. बी. पाटील, व्यवस्थापकीय संचालक, जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ.

गेल्या काही महिन्यांपासून दुधाचे संकलन तुलनेने वाढले आहे. त्यात शासनाबरोबरच सहकारी संघाकडेही दूध उत्पादकांचा ओढा वाढल्याचे चित्र आहे. आगामी काळात चारा टंचाई जाणवल्यास दूध उत्पादनावर परिणामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- सी. पी. राऊत, सहायक दूग्ध व्यवसाय विकास अधिकारी.

जानेवारी २०१३

शासकीय, खासगी आणि सहकारी दूध संघाचे दररोज सरासरी ७ लाख ३५ हजार लिटर दूध संकलन.

नोव्हेंबर २०१४

शासकीय, खासगी आणि सहकारी दूध संघाचे दररोज सरासरी ७ लाख ९९ हजार लिटर दूध संकलन.

डिसेंबर २०१४

शासकीय, खासगी आणि सहकारी दूध संघाचे दररोज सरासरी ८ लाख लिटर दूध संकलन.

जानेवारी २०१५

शासकीय, खासगी आणि सहकारी दूध संघाचे दररोज सरासरी ८ लाख २३ हजार लिटर दूध संकलन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूजमध्ये अपघातांची मालिका

0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

वाळूज परिसरात सोमवारी (९ मार्च) सकाळी झालेल्या दोन विचित्र अपघातात दोन जण जागीच ठार झाले. या अपघातात नऊ जण जखमी झाले आहेत. ट्रक व कारमध्ये सापडून एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर दुसऱ्या अपघातात खासगी बसमधील एकजण ठार झाला आहे.

ए. एस. क्लबजवळील नगर लिंकरोड चौकातून सोमवारी पहाटे पावणेचारच्या सुमाराला एक कंटेनर कांचनवाडीकडे जात होता. त्यावेळी राजलक्ष्मी ट्रव्हल्सच्या बस (एम. एच. ३४, ए. ८४०८) भरधाव जात होती. बसचालक एजाज नियाज खान याला कंटेनरचा अंदाज आला नाही व बस कंटेनरवर धडकली. बसमधील प्रवासी विलास किसन राठोड (वय २३) याचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. बसमधील राहुल काळे, रामेश्वर चव्हाण, देवानंद जाधव, आकाश राठोड, दीपक जिवलकर, कैलास राठोड, निवृत्ती राठोड, विजय जाधव, मंगेश महाजन (सर्व रा. लोहनवाडी, जि. यवतमाळ) जखमी झाले. बसचालकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बजाजनगरमध्ये एक ठार

बजाजनगरातील हायटेक इंजिनीअरींग कॉलेज समोरील रस्त्यावरील जय बाबाजी चौकातून जाताना अपे रिक्षाने हुलकावणी दिल्यामुळे मोटारसायकल घसरून एक जण ठार झाला. हा अपघात रविवारी (८ मार्च) सायंकाळी सहाच्या दरम्यान झाला. अविनाश धुराजीराव खेकडे (वय २१) हे मयत झाले असून मोटारसायकलवरील संदीप बाबूराव कांबळे (वय २४) व अक्षय रमेश भोसले (वय १९, तिघेही रा. एमआयडीसी क्वार्टर बजाजनगर) गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातांची वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. जखमींवर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

विचित्र अपघातात ट्रकखाली दबून एक ठार

नागपूर मुंबई महामार्गावर सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या अपघातात कार व कंटेनरमध्ये सापडून दुचाकीस्वार गणेश कुंडलिक राजाळे (वय ३०, रा. पिराची पिंपळवाडी, ता. पैठण) हे जागीच ठार झाले. औरंगाबादकडे येणाऱ्या आयशर ट्रकने ( एम.एच. १५, सी. के. ३७६९) आधी एका दुचाकीला हुलकावणी दिली. दुचाकीवरील शंकर तुकाराम शिंदे हे ताबा सुटून पडले व किरकोळ मार लागला. या ट्रकची त्याचवेळी नाशिककडे जाणारी इनोव्हा कारला ( एम. एच. ३८, ९९१९) समोरून डाव्याबाजूने जोरात धडक बसली. त्यामुळे कार रोडच्या दिशेने ५० फुट फेकली गेली व ट्रक उलटला. यावेळी दुचाकीवरून जाणारे गणेश राजाळे दोन वाहनांत सापडले. अपघातांनतर ट्रकचालक पळून गेला. कारमधील खुराणा ट्रव्हल्सचे मालक ललित खुराणा (वय ५० रा. हिंगोली) व भानुदास नारायणराव कोंडावार (वय ७०, रा.हिंगोली) हे किरकोळ जखमी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूलच्या लहरीपणाचा फटका

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबादेतील महसूल यंत्रणेच्या लहरीपणामुळे व मनमानी कारभारामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांबरोबरच फळबागधारकांना खरीप हंगामातील शासकीय अनुदानापासून वंचित राहवे लागले, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी उस्मानाबादेत पत्रकारांशी संवाद साधताना केला.

खरीप हंगाम व रब्बी हंगाम असा भेदभाव न करता तसेच कोरडवाहू, बागायती आणि फळबाग अशी वर्गवारी न करता खरीप हंगामातील शासकीय अनुदानाचे वाटप जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट करण्यात यावे, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली. जिल्ह्यातील ३५६ गावातून खरीपाची पेरणी झाली असताना सुद्धा शासन दरबारी ही गावे रब्बीची दर्शविण्यात आलेली असल्यामुळे या गावांनासुद्धा अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. खरेतर महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी खरीप हंगामात या ३५६ गावांना प्रत्यक्ष भेट दिली असली तर त्यांना पेरा पद्धतीतील बदलाचा प्रत्यय आला असता.

उस्मानाबाद शेजारच्या लातूर जिल्ह्यात खरीप हंगामातील शासन अनुदानाचे वाटप करताना कोरडवाहू बागायती क्षेत्र आणि फळबागा क्षेत्र अशी वर्गवारी करून शेतकऱ्यांना अनुदानाची अधिकाधिक रक्कम देण्याचा प्रयत्न तेथील महसूल यंत्रणेने केला. याउलट उस्मानाबादेत मात्र, येथील महसूलच्या मंडळींनी शेतीचे वर्गीकरण करून बागायती व फळबागाचे क्षेत्र अनुदानातून वगळले. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून जिल्ह्यात दुष्काळीस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बागायत व फळबाग क्षेत्रधारकांचीस्थितीही कोरडवाहू शेतकऱ्यांपेक्षा भिन्न नाही याची जाणीव महसूल यंत्रणेने ठेवणे गरजेचे होते.

वर्गवारीमध्ये बदल करण्याची गरज

अद्यापही महाराष्ट्र शासन हे खरीप व रब्बी अशा निजामकालीन पीक पद्धतीचा अवलंब करीत आहे. आता पिक पेरा पद्धतीत आमुलाग्र बदल झाला आहे. हवामानाची परिस्थिती पाहून शेतकरी पेरा करतात. पाण्याचे नियोजन करून पिकांची निवड करतात. त्यामुळे आता खरीप पेरा करणारी व रब्बी पेरा करणारी शेती अशी वर्गवारी करणे उचित ठरणार नाही, असेही पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपची सेनेवर कुरघोडी

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद

'ज्यांच्या जागा जास्त, त्यांचा महापौर...' हे सूत्र ठरलेले असताना भाजपने औरंगाबाद पालिका निवडणुकीआधीच मित्रपक्ष शिवसेनेवर कुरघोडी करायला सुरुवात केली आहे. शहरातील प्राथमिक सोयी-सुविधांच्या विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांनी भाजप शिष्टमंडळाला दिलेले आश्वासन पाळतांना महापालिकेला २४ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी दिला आहे.

शहरातील रस्त्यांच्या कामासाठी ३१ कोटी रुपयांचा निधी तत्काळ देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाला ३ फेब्रुवारी रोजी दिले होते. औरंगाबादच्या विकासासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने मुंबईत 'वर्षा' या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी आमदार अतुल सावे, डॉ. भागवत कराड, गोविंद केंद्रे, भाजपचे औरंगाबाद शहराध्यक्ष भगवान घडमोडे, अभिजित पटेल, चंद्रकांत हिवराळे उपस्थित होते. महापालिकेची निवडणूक लवकरच होणार असल्याने भाजप-शिवसेना यांच्यात शहरासाठी कोण किती निधी आणतो याची चढाओढ लागली आहे. फेब्रुवारीतच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्याचा प्रयत्न केला; पण ते भेटले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या सचिवांना मागण्याचे निवेदन द्यावे लागले होते.

त्यानंतर औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी औरंगाबादच्या पहिल्याच दौऱ्यात पालिकेच्या रस्त्यांसाठी ११ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. 'औरंगाबाद शहरातील रस्त्यांची अवस्था फारच बिकट झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे आहेत. त्यामुळे रस्त्यांसाठी महापालिकेला निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निधीतून ८ कोटी, तर जिल्हा नियोजन समितीतून (डीपीसी) ३ कोटी रुपये, असा एकूण ११ कोटी रुपयांचा निधी महापालिकेला रस्त्यांसाठी मंजूर करण्यात आले' असे रामदास कदम यांनी ८ जानेवारीला घोषित केले होते. पण आजपर्यंत हा ११ कोटींचा निधी महापालिकेला मिळालेला नाही.

महापालिका क्षेत्रात प्राथमिक सोयी-सुविधांच्या विकासकामांसाठी हा निधी वापरला जाणार आहे. ६० कोटी ५५ लाख ५० हजार रुपयांच्या तरतुदीपैकी ६० टक्क्यांच्या प्रमाणात एकूण ३४ कोटी ४२ लाख २० हजार रुपये इतका निधी राज्य सरकारने वितरित केला आहे. १ कोटी ८० लाख रुपये निधी महापालिकेला मिळाला आहे. आता २४ कोटी ३३ लाख रुपये निधी औरंगाबाद महापालिकेला देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. हा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. तांत्रिक मान्यता घेतल्यानंतर प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीत जिल्हाधिकारी आणि महापालिकेचे आयुक्त यांचा समावेश आहे.

दहा रस्त्यांची होणार कामे

या निधीतून शहरातील दहा रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. रस्त्यांची नावे अशी - कैलासनगर ते एमजीएम हॉस्पिटल, गजानन महाराज मंदिर ते जयभवानीनगर चौक, कामगार चौक ते महालक्ष्मी चौक, टीव्ही सेंटर ते बळीराम पाटील शाळा, बाबा पेट्रोल पंप ते क्रांतिचौक, आझाद चौक ते बजरंग चौक, सेव्हन हिल्स ते सूतगिरणी चौक, पीरबाजार ते शिवाजीनगर, आकाशवाणी चौक ते जवाहर कॉलनी, सेव्हन हिल्स ते चिस्तिया चौक मार्गे एमजीएम.

शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्यानंतर २५ कोटी रुपये मंजूर झाले. मात्र या निधीतून ११ रस्तेच मजबूत होतील. उर्वरित रस्त्यांसाठी एप्रिलपर्यंत आणखी २५ कोटी रुपये राज्य सरकारकडून आणू.

अतुल सावे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशीही विल्हेवाट!

0
0

देविदास त्रिंबके, वाळूज

सिडको वाळूज महानगर हद्दीतील तिसगाव शिवारात विविध कंपन्यांचे एक्सपायर्ड (मुदत संपलेले) शीतपेयांची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हजारो बाटल्यांमधील टाकाऊ शीतपेय याच परिसरात ​जिरवले जात असून, त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. खाम नदीत विषारी रसायन सोडले जाण्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार उघडकीस आल्यामुळे या परिसरातील सर्वच संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

तिसगाव शिवारातील गट नंबर १५१ मध्ये एक्सपायर झालेल्या शीतपेयांच्या बाटल्या रिकाम्या करण्याचा उद्योग निर्धास्तपणे चालविला जात आहे. मुंबई-नागपूर महामार्गालगत असलेल्या रमेश साळे यांच्या शेतात नेहा मल्टी सर्व्हिसेस नावाने बबन उत्तम साळवे यांनी हा प्रकल्प उभारला आहे. त्यात विविध कंपन्यांच्या टाकाऊ शीतपेयांच्या बाटल्या आणून त्या एका लोखंडी टाकीत रिकाम्या केल्या जातात. याच टाकीवर एक वीजपंप बसविण्यात आला आहे, मात्र या पंपाद्वारे टाकीतील शीतपेय कोठे नेले जाते, ही बाब गुलदस्त्यात आहे.

शहरातील तसेच बाहेरील अनेक ठिकाणाहून एक्सपायर झालेले सीलबंद शीतपेय एका टाकीत जमा करण्यात येते. तेथून ते शीतपेय टँकरमधून वाळूज एमआयडीसीच्या एसटीपी (सिव्हरेज ट्रीटमेंट प्लान्ट) प्रकल्पात पाठविले जाते. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी सर्वच विभागांकडून 'ना हरकत' प्रमाणपत्र घेतले आहे.

- बबन उत्तम साळवे; संचालक, नेहा मल्टिसर्व्हिसेस

मुदत संपलेल्या शीतपेयांची विल्हेवाट ही एसटीपीमध्येच लावली पाहिजे, कारण हे शीतपेय घातक नसले तरी त्याची इतरत्र विल्हेवाट लावणे योग्य नाही. इतरत्र रिकाम्या करण्यात येणाऱ्या एक्सपायर शीतपेयाचे एकही टँकर अद्याप एसटीईपी प्लॅनमध्ये आल्याची नोंद नाही.- गणेश साबणे; एसटीपी प्लॅन मॅनेजर.

सिडकोच्या वाळूज महानगर प्रकल्पात अशा प्रकारचा प्रकल्प सुरू करण्यासाठी परवानगी मागितलेली नाही. सिडकोने अशा प्रकारची एनओसी अद्याप दिलेली नाही.

- एन. व्ही. गोलखंडे; सहयोगी नियोजनकार, सिडको.

आमचा या प्रकाराशी संबंध नाही. याचा अन्न व औषधी प्रशासनाशी संबंध आहे. त्यांच्या अख्यत्यारित हा विषय येतो.

- प्रवीण जोशी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ.

एक्स्पायर झालेले कोल्ड्रिंक्स जमिनीत मुरत असतील, तर त्या त्या भागातील जमीन नापिक झाल्याशिवाय राहणार नाही. ते मनुष्याच्या पोटात गेल्यास पचनक्रिया निकामी होण्याची शक्यता आहे.

-प्रा. डॉ. सतीश पाटील,

पर्यावरणशास्त्र विभाग, विद्यापीठ.

कोल्ड्रिंक्स जमिनीत मुरल्यास भूगर्भातील पाणी दूषित होऊ शकते. ते पर्यावरणीयदृष्ट्या भयानक आहे. दूषित पाण्यामध्ये सुधारणा होणे जवळजवळ अशक्य आहे.

- प्रा. डॉ. क्षमा खोब्रागडे, पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख,

स. भु. विज्ञान महाविद्यालय.

'एक्स्पायर्ड झालेल्या शीतपेयांची एखाद्या ग्राहकांकडून तक्रार आल्यास त्या तक्रारीची दखल घेतली जाते. त्या तक्रारीनुसार एक्स्पायर्ड झालेल्या शीतपेयांची तपासणी करण्यात येते. बाटलीतील शीतपेय नदी - नाल्यात फेकून देण्यात येते. त्याशिवाय त्या प्लास्टिकच्या बाटल्या संबंधित विक्रेत्याकडे पुन्हा दिल्या जातात. त्या बाटल्यांवरील लेबल काढून तो त्याचा पुनर्वापर करू शकतो. त्याच्या वापरास आक्षेप घेता येत नाही.'

- शशिकांत केकरे, सहआयुक्त, एफडीए, पुणे विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिद्धेश्वर बँक निवडणुकीत सत्ताधारी गटातून शिवसेना

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

तालुक्याचे राजकारण व व्यापार उदिमासाठी प्रसिद्ध असलेल्या येथील सिद्धेश्वर अर्बन सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमुळे तालुक्याचे वातावरण तापले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी पालोदकर व सत्तार गटातून शिवसेना पदाधिकारीही निवडणूक लढवित आहेत.

सिद्धेश्वर बँकेच्या १३ संचालकांच्या निवडणुकीसाठी ५ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सत्ताधारी गटाकडून १६ जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपतर्फे १४ जण, तीन अपक्षांनी अर्ज दाखल केले. ३३ उमेदवारांपैकी चौघांचे अर्ज छानणीमध्ये बाद झाले. २५ मार्च रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल.

सत्ताधारी गटाकडून प्रभाकर पालोदकर, शिवसेनेचे किशोर अग्रवाल, बाबू शहा, गिरीष शहा, शिवाजी कळम, अजीज पठाण, खुशाल पवार, कल्याण गोराडे, पूर्णेराव साळवे, काशीनाथ जंजाळ, विजय खाजेकर, रमेश निंभोरे, अभय वाघ, नंदकिशोर सहारे, कुशीवर्ताबाई बडक, रुख्मणबाई गोडसे यांनी अर्ज दाखल केले आहेत. विरोधी भाजप गटातर्फे बालाजी कळात्रे, आंबादास सपकाळ, सुदाम जंजाळ, सरला सोनवणे, ज्ञानेश्वर काकडे, देविदास पंडित, राजेंद्र ठोंबरे, ज्ञानेश्वर गोरे, चंद्रशेखर साळवे, गोविंद भोजने, कल्पना प्रशाद, दत्ता कुडके, विनोद भोजवानी यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

मतदान केंद्र

सिल्लोड, भराडी, घाटनांद्रा, पालोद, उंडणगाव, शिवना, भवन, अंधारी अजिंठा हे तालुक्यातील गावे व फुलंब्री येथे मतदान केंद्र राहणार आहे. येथील नर्मदाबाई मंगल कार्यालयात ६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबादेत ‘रॅपिड अॅक्शन फोर्स’

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

भारत सरकारच्या केंद्रीय राखीव दल (सीआरपी) बरोबर संलग्न असलेले शीघ्र कृती दल (रॅपिड अॅक्शन फोर्स) सोमवारी दुपारी उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले. यामुळे नागरिकांत काही काळ घबराटीचे आणि नंतर औत्सुक्याचे वातावरण निर्माण झाले.

हैदराबाद येथील ९९ बटालियान अंतर्गतचे हे पथक उस्मानाबादेत १७ मार्चपर्यंत असणार आहे. यामध्ये सुमारे ८५ जवान व अधिकारी आहेत. यात काही महिला जवानही आहेत. या पथकाने उस्मानाबाद शहरातून फेरफटका मारून शहरातील संवेदनशील भागाबरोबरच देवस्थान परिसराची माहिती घेतली. यानंतर हे दल जिल्ह्यातील प्रमुख गावात जाणार आहे. या बटालियनकडे उस्मानाबाद जिल्ह्यासह नांदेड, परभणी, लातूर; तसेच सोलापूर व वाशीम या सहा जिल्ह्यांतील जातीय दंगलीवर नियंत्रण करण्याबरोकरच नैसर्गिक आपत्तीवेळी तातडीने घाव घेऊन मदत करण्याचे काम असल्याची मा‌हिती डेप्युटी कमांडंट एच. पी. सिंग यांनी दिली. या वेळी उस्मानाबादचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक बाळकृष्ण भांगे; तसेच उपअधीक्षक मोहन विधाते हे उपस्थित होते.

जिल्ह्यात कोठेही जातीय दंगल किंवा लुटालुटीचे प्रसंग उद्भवल्यास त्यावर तातडीने नियंत्रण आणण्याचे काम 'आरएएफ'कडे असते. हे दल अत्याधुनिक यंत्र सामग्रीने सज्ज असते. घटनास्थळी विनाविलंब पोहोचता यावे, म्हणून कार्यक्षेत्रातील जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरांचा, तेथील परिसराचे ज्ञान या दलातील अधिकारी व जवान यांना असावे, यासाठी हा यामागील उद्देश असल्याचे स‌िंग यांनी सांगितले. मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा, फुटीरतावादी नेता असरत आलमच्या सुटकेवरून तयार झालेले राजकीय वादंग यावरून जातीय सलोखा बिघडू नये, म्हणून जवान उस्मानाबादेत दाखल झाल्याची चर्चा नागरिकांत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंचन प्रकल्प दुरुस्तीतील गैरव्यवहाराबद्दल याचिका

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

लोकशाही आघाडी शासनाच्या कालावधीत दुष्काळी कामांमध्ये विविध सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीमध्ये २८९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी विनंती करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका तालुक्यातील जांबरखेडा येथील निवृत्ती पाटील बोरसे यांनी दाखल केली आहे.

याचिकेत रायगड जिल्ह्यातील जांबरुंग येथील तलावाच्या कामासह मराठवाड्यातील औरंगाबाद व बीड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पामध्ये गैरव्यवहार झाल्याचे म्हटले आहे. आघाडी शासनातील जलसंधारण मंत्री डॉ. नितिन राऊत, प्रधान सचिव व्ही. गिरीराज, उपसचिव सुनील चव्हाण, जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता डी. डी. पोहेकर (पुणे), मुख्य अभियंता एच. एम. शिंदे, अशोक नन्नावरे, विलास राजपूत यांच्यासह जलसंपदा विभागाच्या १५ अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचे म्हटले आहे. राज्य शासनाचे मुख्य सचिव, केंद्रीय दक्षता आयोग, राज्य लोकायुक्त, केंद्रीय कृषी मंत्री व सीबीआयचे सहसंचालक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. केंद्र शासनाने २०१२ ते २०१४ या कालावधीत राज्याला दिलेल्या निधीतून १२२ दुष्काळी तालुक्यांत कामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी समिती नेमली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी कामांसाठी तांत्रिक अथवा प्रशासकीय मान्यता नसताना कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे याचिकेत म्हटले आहे.

बोरसे पाटील यांनी माहिती अधिकारात मिळविलेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील जांबरुग येथील साडेबारा लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या तलावाच्या दुरुस्तीसाठी विविध प्रशासकीय मान्यतांच्या आधारे तब्बल २९ कोटी २७ लाख रुपये खर्च केल्याचे स्पष्ट झाले आहे. विदर्भ सदन सिंचन विकास या योजनेत ११५ कोटी, राष्ट्रीय कृषी विकास योजनेत १३४ कोटी व नियमित दुरुस्तीच्या कामांसाठी ४० कोटी असा २८९ कोटी रुपयांचा निधी वितरित केल्याचे याचिकेत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images