Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

केबीसी प्रकरण २७ मार्चपर्यंत सीआयडीकडे वर्ग करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केबीसी कंपनीच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात साडेपाचशे याचिका दाखल झालेल्या आहेत. याचिकेच्या सुनावणीदरम्यान, पोलिस महासंचालकांची परवानगी घेऊन केबीसी व त्याअंतर्गत अन्य कंपनीच्या आर्थिक फसवणुकीचे प्रकरण २७ मार्चपर्यंत सीआयडीकडे वर्ग करण्याची हमी आर्थिक गुन्हे शाखेने न्या. आर. एम. बोर्डे व न्या. पी. आर. बोरा यांच्या समोर दिली.

केबीसी कंपनीच्या विरोधात गुंतवणूकदार महेश सरनाईक (हिंगोली), विष्णूदास पुराणिक (वसमत) यांच्यासह साडेपाचशे गुंतवणूकदारांनी खंडपीठात याचिका दाखल केलेल्या आहेत. कंपनीचा प्रमुख भाऊसाहेब चव्हाण याने गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा देण्याचे आमीष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रारी दिल्या. मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिले. तसेच खंडपीठात धाव घेतली.

याप्रकरणी मंगळवारी (१० मार्च) झालेल्या सुनावणीदरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक आयुक्तांनी वरील प्रमाणे हमी दिली. या विषयी पुढील सुनावणी ३१ मार्च रोजी ठेवली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. शिवाजी शेळके, तर सरकारतर्फे अॅड. वैशाली शिंदे हे काम पाहात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्वाइन फ्लू’च्या चार रुग्णांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकाच रात्रीतून 'स्वाइन फ्लू' च्या चार रुग्णांचा मृत्यू मंगळवारी (१० मार्च) घाटीच्या स्वाइन फ्लू वॉर्डामध्ये झाला. मृतांत पैठण तालुक्यातील १० महिन्यांच्या बालकाचा, छावणीतील एका महिलेचा, जळगाव येथील पुरुषाचा आणि पैठण तालुक्यातील एका तरुणाचा समावेश आहे. यापैकी मृत तरुण हा संशयित 'स्वाइन फ्लू'चा रुग्ण होता, तर इतर तिघे मृत रुग्ण हे स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह होते. घाटीमध्ये एकाच रात्रीतून चौघांचा मृत्यू होण्याची यंदाची पहिलीच वेळ आहे.

सद्यस्थितीत घाटीच्या स्वाइन फ्लू वॉर्डात १० रुग्ण दाखल आहेत. यातील ३ रुग्ण पॉझिटिव्ह, तर ७ रुग्ण संशयित आहेत. यापैकी ५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. वॉर्डात बुधवारी (११ मार्च) सिल्लोडचा एक संशयित रुग्ण, तर औरंगाबाद शहरातील एक संशयित रुग्ण, असे दोघे दाखल झाले आहेत. घाटीच्या वॉर्डामध्ये पैठण तालुक्यातील तोंडुळी गावातील महेंद्र रवींद्र नरवाडे या दहा महिन्यांच्या बालकावर सात मार्चपासून उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती गंभीर बनली होती. मंगळवारी रात्री नऊ वाजता त्याचा मृत्यू झाला. छावणी भागातील शाहेदा बेगम फारुख मोहम्मद (५०) यांच्यावर आठ मार्चपासून उपचार सुरू असताना मंगळवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून पाठवण्यात आलेल्या इंदरचंद देवचंद साखला (४१) यांच्यावर सहा मार्चपासून उपचार सुरू असताना मंगळवारी मध्यरात्री तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी पैठण तालुक्यातील राजापूर येथील खालेद तैय्यब शाह (१८) या तरुणावर मंगळवारी दुपारी साडेतीनपासून उपचार सुरू होते. रात्री साडेनऊच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. तो संशयित स्वाइन फ्लू रुग्ण होता. तसेच किडनीविकारांनी ग्रस्त होता, असे घाटीतून सांगण्यात आले. वातावरण बदलामुळे 'स्वाइन फ्लू'चा धोका कायम असून, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी चौपदरी किंवा तिहेरी रूमाल चेहऱ्यावर बांधून स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

वॉर्डातील रुग्णसंख्या शंभरीकडे

घाटीच्या स्वाइन फ्लू वॉर्डात एक जानेवारीपासून आतापर्यंत ९६ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी ४० रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. यातील १३ पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला, तर २७ पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. घाटीमध्ये दाखल होणाऱ्या स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह तसेच संशयित रुग्णांची संख्या स्पष्ट होत असली तरी खासगी रुग्णालयातील नेमकी संख्या अजूनही गुलदस्त्यातच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चकचकीत रस्त्यांना मुलामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या दोन-तीन वर्षांच्या काळात महापालिकेने ज्या रस्त्यांचे डांबरीकरण केले, त्या रस्त्यांवरच पुन्हा एकदा कोट्यवधींचा खर्च शासकीय अनुदानातून केला जाणार आहे. भाजपचे आमदार अतुल सावे यांच्या प्रयत्नामुळे राज्य शासनाने शहरातील रस्ते विकासासाठी २४ कोटी ३३ लाख रुपये मंजूर केले. ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली. या रकमेतून कोणत्या रस्त्यांची कामे करायची आहेत, याची यादीही शासनाने सोबत जोडली आहे. १० रस्ते शासनाने ठरवून दिले असून, त्याच रस्त्यांची कामे आता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली जाणार आहेत. २००६ मध्ये राज्य शासनाने एकात्मिक रस्ते विकास योजनेअंतर्गत महापालिकेला २५ कोटी रुपये दिले होते. त्यानंतर आताच शासनाने शहरातील रस्त्यांसाठी भरघोस मदत केली आहे, परंतु ही मदत ज्या रस्त्यांच्या कामासाठी उपयोगात आणली जाणार आहे, त्या रस्त्यांवर महापालिकेने आतापर्यंत केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. कारण त्यापैकी काही रस्ते तुलनेने चकचकीत आहेत. त्यांचेच पुन्हा मजबुतीकरण केले जाणार असल्यामुळे पालिकेचा खर्च वाया जाणार आहे.

हा रस्ता होणार चकचकीत : महावीर चौक ते क्रांतीचौक या रस्त्याचा समावेश शासनाने दिलेल्या पॅकेजमध्ये केला आहे. गेल्या १० वर्षांत पालिकेने हा रस्ता नव्याने तयार केला नाही. दरवर्षी पॅचवर्कच्या नावाखाली या रस्त्यावर पालिकेतर्फे लाखोंचा खर्च केला जातो. आता शासनाच्या पॅकेजमुळे हा रस्ता चकचकीत होणार आहे.

या रस्त्यांवर पुन्हा खर्च करण्याचे प्रयोजन काय?

आकाशवाणी ते त्रिमुर्तीचौकः या रस्त्याचे काम सहा महिन्यापूर्वीच सुमारे सव्वा कोटी खर्चून महापालिकेने केले आहे.

कैलासनगर ते एमजीएम ः या रस्त्याचे काम पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी रस्ता रुंदीकरण मोहिमेत केले. या रस्त्याच्या कामासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली. या तरतुदीनुसार लक्ष्मणचावडी ते कैलासनगर एवढे काम पूर्ण झाले. कैलासनगर ते एमजीएम काम बाकी आहे. हे काम शासन निधीतून केले, तर पालिकेने केलेल्या तरतुदीचे काय?

गजानन मंदिर ते जयभवानीनगर ः या रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक मंजूर आहे, तरीही शासनाच्या यादीत या रस्त्याचा समावेश आहे. त्यामुळे महापौरांच्या पुढाकाराने तयार केलेल्या अंदाजपत्रकाचे काय होणार?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावठी पिस्तुलासह हत्यार ताब्यात

$
0
0

म.टा.प्रतिनिधी वाळूज

सिडको वाळूज महानगर तीसगाव परिसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या एका टोळीला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. त्यांच्याकडून गावठी पिस्तुलासह तिक्ष्ण हत्यारे जप्त करण्यात आली. या टोळीतील सराईत गुन्हेगारांनी मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झाले.

वाळूज महानगर एकमध्ये काल(१० मार्च) गस्तीवर असताना पोलिस उपनिरिक्षक अजयकुमार पांडे यांना इंडिका कार (क्र.एमएच२०-डीएफ-३२००) रात्री एक वाजेच्या सुमारास सिडको महानगरकडे जाताना दिसली. तिला थांबविण्यासाठी त्यांनी बॅटरीचा लाईट दिला तसेच हात देखील दाखविला. कारचालकाने थांबण्याऐवजी कारचा वेग वाढविला. कार तीसगाव चौफुलीकडे वेगाने गेल्याने पोलिसांचा संशय बळावला.

चौफुलीवरील गस्तीचे पोलिस उपनिरिक्षक वसंत शेळके यांना फोनवरून ही महिती देऊन नाकाबंदी करण्यात आली. चौफुलीवरील गस्तीचे पोलिस समोर दिसताच सदरील कार रस्त्यावर उभी करून आरोपीन पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस कर्मचार्यांनी झडप घालून कारमधील अण्णा देवराव पारवे (५५), प्रकाश बाळू बत्तीसे(२४) दोघेही रा. गाजगाव ता. गंगापूर, विजय कुंडलीक कोर्हाडे (२४) रा. तांदुळवाडी ता. गंगापूर, गुलाम दस्तगीर रज्जाक शेख (२२) रा. फडीरोड महेमूद जमातखाना समोर धुळे या सर्वांना अटक केली. त्यांच्याजवळून इंडीका कारसह, एक गावठी पिस्तूल, जंबीया, गुप्ती, मिर्चीपुड व ३ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाइल असा एकूण २ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, मात्र या झटापटीत अंधाराचा फायदा घेवून अनेक गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला मुन्ना रुस्तूम शहा हा पळून जाण्यात यशस्वी ठरला.

याप्रकरणी पोलिस हेडकाँन्स्टेबल परमेश्वर पायगव्हाणे यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरिक्षक इंदलसींग बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक वसंत शेळके करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरच्या संख्येत २० पट वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत तब्बल २० पट वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये ७ गावांना ११ टँकरने पाणीपुरवठा करावा केला जात होता, यावर्षी १५१ गावांना २१० टँकर पाणी पुरविले जात आहे.

ऐन पावसाळ्यात मराठवाड्यावर रुसलेल्या वरूण राजाने परतीची वाटही वाकडी केली. त्यामुळे मराठवाड्यासह औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा टॅँकर सुरू करावे लागले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर आहे. जिल्ह्यातील सोयगाव वगळता इतर सर्वच तालुक्यामध्ये पाणीटंचाई असल्यामुळे प्रशासनातर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आठ तालुक्यातील १५१ गावे व सहा वाड्यांमध्ये २१० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. औरंगाबाद शहरालगतच्या सातारा- देवळाई नगरपालिका हद्दीतील नागरिकांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

विहीर अधिग्रहण

जिल्ह्यात टँकरसाठी ५८ व टँकर व्यतिरिक्त ११४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. औरंगाबाद तालुक्यात २६, फुलंब्री २४, पैठण ८, गंगापूर ४८, वैजापूर ३६, खुलताबाद ११, कन्नड १० तर सिल्लोड तालुक्यात ९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

३ लाख नागरिक अवलंबून

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव वगळता इतर सर्व तालुक्यांतील ३ लाख ४९ हजार ९१० नागरिकांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. औरंगाबाद तालुक्यातील ८१ हजार ८३०, फुलंब्री ३३ हजार ९३, पैठम ९८ हजार ८२६, गंगापूर ६४ हजार ७००, वैजापूर ४७ हजार ८६२, खुलताबाद ९ हजार १७१, कन्नड २ हजार ५२८, तर सिल्लोड तालुक्यातील ११ हजार ९०० नागरिक टँकरचे पाणी पित आहेत.

मार्चमधील तुलनात्मक स्थिती

तालुका २०१४ २०१५

औरंगाबाद ०० ४६

फुलंब्री ०० १५

पैठण ०१ ६९

गंगापूर ०१ ३३

वैजापूर ०८ ३३

खुलताबाद ०० ६

कन्नड ०० २

सिल्लोड ०० ६

एकूण ११ २१०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खराब बुटाची रक्कम परत करा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

नवीन बुट १५ दिवसात खराब झाल्याने तक्रारदारास बुटाची किंमत ३० दिवसांत परत देण्याचे आदेश औरंगाबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष के. एन. तुंगार, सदस्य किरण ठोले, संध्या बारलिंगे यांनी दिले आहेत.

फुलंब्री तालुक्यातील वारेगाव येथील सुदाम जाधव यांनी २८ ऑक्टोबर २०१३रोजी शहरातील टिळक पथवरील एम. एस. एल. शू शॉप या दुकानातून १,३९९ रुपयांचा बुट विकत घेतला होता. एमएसएल या नामांकित कंपनीचा नवीन बुट १५ दिवसांतच खराब झाला. जाधव यांनी १५ नोव्हेंबर २०१३ रोजी हा बुट दुरुस्तीसाठी दुकानदारास दिला. हे बुट निकृष्ट दर्जाचे व वापरण्यायोग्य नाहीत म्हणून ते बदलून द्यावे किंवा किंमत परत द्यावी, अशी विनंती तक्रारदाराने केली. ती दुकानदाराने अमान्य केल्याने जाधव यांनी मंचाकडे धाव घेतली. नोटीस मिळूनही दुकानदार मंचात हजर झाले नाही. तक्रारदाराची तक्रार मान्य आहे, असे मत मंचाने व्यक्त केले.

रक्कम डीडीने द्यावी

तक्रारदारास बुटाची किंमत १,३९९ रुपये ३० दिवसाच्या आत डीडीने परत करण्याचे आदेश मंचाने दिले आहेत. तक्रारदारास खर्च म्हणून ५०० रुपये देण्याचे निर्देशही दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगराध्यक्षपदी नंदू निंबाळकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबादच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदू उर्फ मकरंद राजे निंबाळकर यांची वर्णी लागली. नगराध्यक्षपदावर ते दुसऱ्यांना विराजमान झाले आहेत. मात्र, या निवडीमुळे नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकोप्याला तडा गेल्याचे स्पष्ट झाले.

३३ नगरसेवक असलेल्या या नगरपलिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे २३ नगरसेवक असताना मकरंद राजेनिंबाळकर यांना १९ मतेच मिळाली. तर प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार प्रेमा पाटील यांना केवळ सहा मते मिळाली. अध्यक्षपदासाठीच्या शर्यतीतील संपत डोके यांच्यासह राष्ट्रवादीच्या चार ‌नगरसेवकांनी या निवडणुकीकडे कानाडोळा करीत मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहून आपली नाराजी प्र‌दर्शित केली.

राष्ट्रवादीचे सुनील काकडे यांनी २३ फेब्रुवारी रोजी पक्षश्रेष्ठींच्या सुचनेनुसार नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे नगराध्यक्ष पदासाठीची ही निवडणुक घेण्यात आली. यासाठी ११ मार्च रोजी मतदान झाले. प्रथमता नगराध्यक्षपदासाठी संपत डोके यांचे नाव पक्ष श्रेष्ठींकडून निश्चित करण्यात आल्याची चर्चा होती. याचवेळी मकरंद राजे निंबाळकर हे राष्ट्रवादीच्या अकरा नगरसेवकासह वेगळा गट निर्माण करण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे या दबावापुढे पक्ष श्रेष्ठींना नमते घ्यावे लागले व त्यातुनच मकरंदची नगराध्यक्षपदाची इच्छा पुरी झाली. मात्र, याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेमधील गटबाजी उफाळून येत असल्याचे उघड झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राचार्याला विनयभंगप्रकरणी अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

घनसावंगीच्या मॉडेल कॉलेजचे प्राचार्य डॉ. संभाजी पाटील यांना औरंगाबाद येथील सिडको बसस्थानक परिसरात गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली. महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची तक्रार सोमवारी त्यांच्याविरूद्ध दाखल झाली होती. त्यानंतर ते फरारी होते. त्यांच्या विरोधात तत्काळ कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील विद्यार्थी आणि महिला संघटना सरसावल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

कॉलेजमध्ये सोमवारी (ता. ९ मार्च) दुपारी चारच्या सुमारास प्राचार्य पाटील यांनी एका विद्यार्थीनीस केबिनमध्ये शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याच विद्यार्थीनींचा २८ फेब्रुवारीला दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी विनयभंग केला होता. घटनेची जाहीर वाच्यता करू नये यासाठी त्यांनी तरूणीवर दबाव आणला होता. त्यानंतर संतप्त नागरिकांनी पाटील यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती या घटनेचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक पवार यांनी दिली.

गावात माहिती मिळताच पाचशे ते सातशे नागरिकांचा संतप्त जमाव मॉडेल कॉलेजमध्ये घुसला व त्यांनी पाटील यांना मारहाण केली. यावेळी घनसावंगीचे पोलिस निरीक्षक सुरेश गायकवाड यांनी पाटील यांना ताब्यात घेऊन मोटारसायकलवरून त्यांच्या घरी नेऊन सोडले होते. संतप्त जमाव नंतर पोलिस स्टेशनवर आला होता. त्यांनी पाटील यांच्याविरोधात त्या तरुणींने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला होता. ही माहिती कळताच प्राचार्य पाटील हे फरार झाले होते. या घटनेचे पडसाद जालन्यात उमटले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, युवा सेना, शिवसेनेची महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा पोलिसांना देण्यात आला होता. प्राचार्य पाटील यांना फरार होण्यासाठी मदत करणारे पो‌लिस निरीक्षक गायकवाड यांच्या विरोधात कारवाई करावी यासाठी संघटनी मागणी सुरू केली. या घटनेनंतर चार दिवस उलटून गेल्यावर पोलिसांनी पाटील यांना अखेर गुरुवारी सकाळी अटक केली. पाटील हे औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते.

डॉ. पाटील यांची जामिनावर सुटका

मॉडेल कॉलेजचे प्राचार्य डॉ. संभाजी पाटील यांना गुरुवारी अटक करून घनसावंगी तालुका न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांच्या विरोधात भादवि ३५४ अ, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तिडके यानी त्यांना पंधरा हजार रूपयांच्या जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले.

मॉडेल कॉलेजचे भवितव्य अंधारात

शैक्षणिकदृष्ट्या मागास भागात २००८मध्ये मॉडेल कॉलेज उघडण्याचा निर्णय माजी मंत्री राजेश टोपे यांनी घेतला होता. प्राचार्य डॉ. संभाजी पाटील हे टोपे यांच्या मस्योदरी महाविद्यालयात प्राध्यापक होते. मॉडेल कॉलेजच्या स्थापनेपासून पाटील यांना याठिकाणी प्रतिनियुक्तीवर पाठवले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे सर्व नियम धाब्यावर बसवून हे महाविद्यालय घनसावंगीलाच आणि त्यांच्याच नियंत्रणात ठेवण्याचा टोपे यांनी पूर्ण प्रयत्न केला. त्यांच्या या निर्णयाला उच्च न्यायालयाने फटकारले आहे. सध्या या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. मॉडेल कॉलेजच्या बांधकामासही न्यायालयाने स्थगिती दिली आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाळू माफियांच्या हल्ल्यात एकजण जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,जालना

जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी परिसरातील वाळू तस्करीची बातमी करण्यासाठी गेलेल्या वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर वाळू माफियांनी हल्ला केला. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये पत्रकाराचा समावेश आहे. या घटनेप्रकरणी घनसावंगी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पत्रकार गणेश जाधव हे छावा संघटनेचे आप्पासाहेब कुढेकर यांच्यासह गारपिटीची पाहणी करून बातमी करण्यासाठी घनसावंगी तालुक्यात गेले होते. दरम्यान, तीर्थपुरी परिसरात अवैधरित्या वाळू उपसा व वाळू तस्करी सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी तेथे असलेल्याशी त्यांची शाब्दिक चकमक झाली. वाळू माफियांशी संबंधित असलेल्यांनी या तिघांवर अचानक हल्ला केला. यावेळी पत्रकार गणेश जाधव, छावा संघटनेचे अप्पासाहेब कुढेकर आणि संतोष कुढेकर यांना मारहाण करण्यात आली. या प्राणघातक हल्ल्यात संतोष कुढेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर तीर्थपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आले. मारहाणीच्यावेळी हल्लेखोरांनी अप्पासाहेब कुढेकर यांच्या गळयातील २५ हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन देखील हिसकावून नेली.

याप्रकरणी गणेश जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोंदी पोलिसांनी शैलेंद्र पवार, चंद्रकांत पवार,बाळासाहेब बोबडे, नारायण बोबडे, जनार्दन बोबडे यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी शैलेंद्र पवार आणि चंद्रकांत पवार या दोघांना अटक करण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारवर अवलंबून राहू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

राज्यात यापूर्वीही भीषण दुष्काळ पडला होता. अवकाळी पाऊसही काही नव्याने पडत नाही. त्यावेळी शेतकऱ्यांना पॅकेज ऐवजी रोजगार उपलब्ध करून दिला जात होता. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आत्महत्या करणारा शेतकरी अशी बदनामी होत आहे. ते बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारवर अवलंबून राहणे बंद करावे असे अावाहन महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष रामचंद्र भोगले यांनी केले.

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चर आणि नॅचरल शुगर अलाईड इंडस्ट्रिजच्यावतीने लातूर येथे आधुनिक शेती आणि अन्न प्रक्रिया उद्योगावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राप्रसंगी भोगले बोलत होते. चर्चासत्राचे उद‍्घाटन लातूर अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रदीप राठी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चेंबर्सच्या मराठवाडा विभागाचे उपाध्यक्ष समीर दुधगावकर, नॅचरल शुगरचे एमडी बी. बी. ठोंबरे उपस्थित होते.

लातूर जिल्ह्यात आणि परिसरात शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योजक शेतकऱ्यांमधून निर्माण व्हावेत. उत्पादक ते ग्राहक यांना जोडणारा दुवा म्हणून काम करण्यासाठी शेतकरीच असावेत, यासाठी चर्चासत्राचे आयोजन केल्याची माहिती संयोजक बी. बी. ठोंबरे यांनी दिली.

शेतकऱ्यांनी शेतीवर अवलंबून न राहता आता उद्योगाकडे वळावे, उद्योग निर्माण करणे हे देश उभारणी करण्यासारखे असल्याचे मत समीर दुधगावकर यांनी व्यक्त करून ग्रामीण भागात शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्व सहकार्य चेंबरच्या माध्यमातून केल जाईल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी प्रदिप राठी म्हणाले, 'महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या आर्थिक कणा असलेल्या साखर उद्योगाच्या समस्या आता चेंबर्सनेच दिल्ली दरबारी, फिकी या संस्थेकडे मांडल्या पाहिजेत. ऊस देणाऱ्याला जर हमी भाव देण्याचे बंधन असेल तर विक्रीच्या भावाची हमी सरकारने दिली पाहिजे. या साठी चेंबर्सने प्रयत्न करण्याची गरज आहे.'

चेंबर्सचे अध्यक्ष रामचंद्र भोगले म्हणाले, 'देश स्वतंत्र झाल्यानंतर समाजाला स्वातंत्र्य मिळाले नाही. जे समाजाने ठरवायचे ते सरकार ठरवू लागल्यामुळे स्वातंत्र्याचा अर्थच समजलेला नाही. अनुदान, पॅकेजच्या माध्यमातून समाजाला पंगु बनविण्याचे काम झाले आहे. त्याचा परिणाम हा प्रत्येक गोष्टीवर झाला आहे. प्रत्येक काम सरकार करेल ही भावना रुजली आहे. आता राज्यात आणि देशात ही सरकार काही करणार नाही. जे काही करायचे आहे ते समाजाने करायचे आहे. यामध्ये सरकार त्यांच्यासोबत राहिल. विचार बदलला की कृती बदलते कृती बदलली की, त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील.' या चर्चासत्रात मकरंद चुरी, आशिष मंत्री जालना, डॉ. प्रकाश बडगुजर, डॉ. मुकुंद गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. चर्चासत्राचे सुत्रसंचालन पांडुरंग आवाड यांनी केले.

संकटाला सामोरे जाण्याची गरज

अवकाळी पाऊस यापूर्वीही पडत होता. परंतु, त्यावेळी शेतकरी आत्महत्या करीत नव्हता. खंबीरपणाने तो आलेल्या संकटाला सामोरे जात होता. याची आठवण करून देऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी विहिरीवर सौर उर्जेचा पंप बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तो फायदेशीर ठरणार असल्याने समजावून सांगण्याची गरज असल्याचे मत रामचंद्र भोगले यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूर डाळीचे दर कडाडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या खरीप हंगामात पावसाने दडी मारल्यामुळे तूर उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा फक्त ४० टक्के तूर उत्पादन झाले आहे. कमी उत्पादकतेचा फटका बाजारपेठेला बसला असून दाल मिल उद्योगाला तुरीची चणचण भासणार आहे. या परिस्थितीत डाळीचे दर वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात तब्बल दीड महिना उशिरा पाऊस पडल्यामुळे खरिपाची पेरणी लांबणीवर पडून जेमतेम पाऊस झाल्याने तूर पिकाला फटका बसला. त्यामुळे मराठवाड्याचे मुख्य पीक असलेल्या तूर उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. दरवर्षी तूर उत्पादन सरासरी हेक्टरी साडेसहा ते सात क्विंटल होते. यंदा उत्पादन हेक्टरी अडीच क्विंटल झाले आहे. उत्पादनात तब्बल ६० टक्के घट झाल्यामुळे कृषी अर्थव्यवस्थेला प्रचंड फटका बसला आहे.

औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्पादनाची सरासरी हेक्टरी दोन क्विंटल ६० किलो आहे. जिल्ह्यात तूर पिकाचे एकूण क्षेत्र २४ हजार हेक्टर होते. सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक साडेचार क्विंटल, तर कन्नड तालुक्यात सर्वात कमी अवघे सव्वा क्विंटल उत्पादन झाले आहे. विभागातील मुख्य पिकाला फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि इतर खासगी आडतीवर व्यापाऱ्यांचे व्यवहार थंडावले आहेत. तूर आवक नसल्यामुळे डाळ प्रक्रिया उद्योगही अडचणीत सापडले आहेत. मराठवाड्यात सर्वाधिक तूर उत्पादन होत असल्यामुळे जालना शहरात दाल मिल एकवटल्या आहेत. या मिलमधील डाळ राज्यभरात वितरीत होते; मात्र जेमतेम उत्पादनामुळे डाळ टंचाईची भीती आहे. या परिस्थितीत राज्य सरकार मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेशातून डाळ आयात करण्याची शक्यता आहे.

कडधान्य उत्पादनाला फटका

खरीप हंगामात तूर पिकाबरोबरच मूग, उडीद, हरभरा या कडधान्यांनाही अवर्षणाचा फटका बसला आहे. मूग आणि उडीद पिकाचे उत्पादन नगण्य आहे. रब्बी हंगामात परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे हरभरा पिकाची पेरणी झाली नाही. कडधान्य टंचाईमुळे डाळी महागण्याची शक्यता आहे.

हवामान बदलाचे सर्वाधिक तोटे मराठवाड्याला सहन करावे लागत आहेत. पीक उत्पादन घटल्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. तुरीचे सरासरी ४० टक्के उत्पादन निश्चितच चिंताजनक आहे. कडधान्य उत्पादनासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे; पण निसर्गचक्रात प्रयत्न निष्फळ ठरले. - सतीश शिरडकर, प्रकल्प उपसंचालक, 'आत्मा'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणमध्ये नाथषष्ठीचा उत्साह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

नाथषष्ठी यात्रेच्या मुख्य उत्सवाला गुरुवारी (१२ मार्च) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. उत्सवासाठी मानाच्या २१ दिंड्यासह सुमारे ५०० दिंड्या हरिनामाचा गजर करत दाखल झाल्या आहेत. अवकाळी पाऊस व स्वाईन फ्लूमुळे यावर्षी भाविकांच्या संख्येत घट जाणवत आहे.

नाथषष्ठी मुख्य उत्सवाआधी बुधवारी (११ मार्च) रात्रीपर्यंत २०० पेक्षा जास्त दिंड्याचे आगमन झाले होते. बुधवारी रात्रीपासून राज्यातून सुमारे चार लाख भाविक शहरात दाखल झाले आहेत. पैठणमधील सर्व अंतर्गत रस्ते वारकरी व भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. नाथ समाधीचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात रांगा लागल्या. गुरुवारी सायंकाळपर्यंत सुमारे चार लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती संस्थानतर्फे देण्यात आली.

फाल्गुन वद्य ७ म्हणजे नाथषष्ठीच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी रात्री बारा वाजता छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. महोत्सवाच्या अंतिम दिवशी फाल्गुन वद्य ८ रोजी दहीहंडी फोडून नाथषष्ठीची सांगता होणार आहे.

परंपरेनुसार निर्वाण दिंडी

परंपरेनुसार उत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी गावातील नाथ मंदिर ते नाथ समाधी मंदिरापर्यंत निर्वाण दिंडी काढण्यात आली. या दिंडीत घोडा, जरीपटका, भानुदास महाराजाचे निशाण, झेंडेकरी, विणेकरी, अमृतराय संस्थांची छत्री, नाथवंशजाच्या छत्र्या, संस्थानिक अमळनेरकर महाराजांची दिंडी, भगवानगडची दिंडी सामील झाल्या होत्या. यावेळी नाथ महाराजांनी रचलेले 'अवघे चित्रलौक्या आनंदची' हे कीर्तन करण्यात आले. निर्वाण दिंडीला ४१५ वर्षांची परंपरा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच घेणाऱ्या फौजदारास सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

पोलिस कोठडी मागू नये यासाठी स्वस्त धान्य दुकानदाराकडून १५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या गंगापूर पोलिस ठाण्यातील फौजदार सुदर्शन काशीनाथ वाघमारे (वय ३९) याला वैजापूर न्यायालयाने गुरुवारी (१२ मार्च) दोन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

गंगापूर तालुक्यातील गळनिंब येथील स्वस्त धान्य दुकानदार दादासाहेब बापुदेव पाचपुते यांचे स्वस्त धान्य दुकान होते. रॉकेलचा काळाबाजार केल्याप्रकरणी २० जानेवारी २००७ रोजी त्यांच्यावर गंगापूर पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी कोर्टात पोलिस कोठडीची मागणी न करणे व परवाना रद्द करण्याबद्दल अहवाल न पाठविण्यासाठी फौजदार वाघमारे यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारीनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वाघमारे यास १५ हजार रुपये घेताना पकडून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. विभागाचे पोलिस उपाधीक्षक अनिलसिंग राजपूत यांनी तपास करून वैजापूर कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीत चार साक्षीदार तपासण्यात आले.

अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश के. ए. कोठेकर यांनी वाघमारे याला दोन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आणखी एक महिना शिक्षेचे आदेश दिले आहेत. याच गुन्ह्यातील दुसऱ्या कलमाखाली दोन वर्षे कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत. सरकार पक्षातर्फे अॅड. कैलास पवार (खंडाळकर) यांनी काम पाहिले. त्यांना दादासाहेब गायकवाड यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिनिध‌ित्वासाठी राडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

राज्य पणन महासंघावर प्रतिनिधी पाठवण्यासाठी गुरुवारी (१२ मार्च) झालेल्या खरेदी विक्री संघाच्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना, काँग्रेस यांनी युती करून राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हमरातुमरी होऊन बैठकीत चांगलाच राडा झाला. या गोंधळात सहकार अधिकारी सुधीर गाढे यांनी माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रसचे नेते कैलास पाटील चिकटगावकर यांच्या नावाचा ठराव आवाजी मतदानाने मंजूर केला. त्यामुळे काँग्रेसचे संजय पाटील निकम यांनी हा ठराव रद्द करण्याची मागणी सहायक निबंधकाकडे केली आहे.

राज्य पणन महासंघावर तालुक्यातून प्रतिनिधी पाठविण्यासाठी सहायक निबंधक कार्यालय परिसरातील सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत संघाच्या ३८०० सभासदांमधून ठराव घेऊन प्रतिनिधी पाठवायचा होता. बैठकीला जवळपास २०० सभासद हजर होते. माजी आमदार कैलास पाटील चिकटगावकर व संजय पाटील निकम यांच्यात रस्सीखेच असल्याने दोन्ही गटाचे समर्थक बैठकीला हजर होते. बैठक सुरू झाल्यानंतर चिकटगावकर समर्थकांनी सभासदांची यादी फेकून देत प्रोसिडिंग पळविण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ माजला. त्यामुळे निकम यांनी सभा तहकूब करण्याची मागणी केली. सभेत हाणामारी व गोंधळ झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले; त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या दरम्यान चिकटगावकर यांच्या नावाचा ठराव मंजूर करण्यात आला. अधिकाऱ्यांनी दबावाखाली हा ठराव मंजूर केला असून तो रद्द करण्याची मागणी उर्वरित सभासदांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधार देण्यासाठी जाचक अटी हटवा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेत‌कऱ्यांच्या कुटुंबियांना एक लाख रूपयाची शासन मदत करते, मात्र जाचक अटी आणि नियमांमुळे अनेक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य मिळत नाही. शासनाने जाचक अटी शिथिल करून या कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी खासदार राजकुमार धूत यांनी राज्यसभेत केली.

संसदेच्या अधिवेशनात शून्य प्रहारामध्ये खासदार धूत यांनी शेतकरी आत्महत्येचा प्रश्न मांडला. यावेळी धूत म्हणाले की, जान है तो जहान है अशी म्हण आहे, मात्र विदर्भ आणि मराठवाड्यात दुष्काळ असल्याने त्यांची पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळते, मात्र ही मदत देताना, काही नियम शासनाकडून लावण्यात आले आहेत. यामुळे अनेक आत्महत्या ग्रस्त कुटुंबियांना ही मदत मिळालीच नाही. हे जाचक नियम शासनाने बदलण्याची गरज आहे. याशिवाय त्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या राशीत वाढ करायला हवी. एक लाखांऐवजी पाच लाख रुपये या कुटुंबियांना द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्त्यांना आचारसंहितेचा खोडा

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील दहा रस्त्यांच्या कामासाठी राज्य सरकारने विषेश अनुदान योजनेअंतर्गत २४ कोटी ३३ लाख रुपये मंजूर केले असले तरी या रस्त्यांच्या कामासाठी महापालिका निवडणुकांच्या आचासंहितेचा तसेच आचारसंहिता संपल्यानंतर पावसाळ्याचा खोडा लागण्याची शक्यता आहे. यामुळे या रस्त्यांच्या प्रत्यक्ष कामांना पावसाळ्यानंतरच सुरूवात होण्याचा अंदाज आहे.

शहरातील दहा रस्त्यांना राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. शहरातील महत्वाच्या भागातील असलेले हे रस्ते वेळेत तयार झाले तर सर्वसामान्य नागरिकांची मोठी अडचण दूर होणार आहे, मात्र महापालिकेची आचारसंहिता व पावसाळ्याचा या कामांना खोडा निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही महापालिका क्षेत्रात प्राथमिक सोईसुविधांची विकासकामे करण्यासाठी विषेश अनुदान योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध करुन देण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती. २४ कोटी ३३ लाख रुपये शहरातील दहा रस्त्यांच्या कामासाठी वितरित करण्याची शासनाने मंजुरी दिली आहे.

तांत्रिक मान्यता, नियमांच्या पूर्ततेनंतरच निधीचे वितरणरस्त्यांसाठी निधी खर्च करताना सर्व वित्तीय कायदे, टेंडरची नियमावली व नियम, प्रक्रीया पूर्ण करणे, वित्तीय अधिकारांच्या मर्यादेत व कुठल्याही शासन नियमांचा भंग होणार नाही याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर राहणार आहे. समितीची प्रशासकीय मान्यता व सक्षम प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता झाल्यानंतर तसेच शासनाच्या नियम व अटींची पूर्तता झाल्यानंतरच मंजूर झालेला हा निधी संबंधित यंत्रणेला वितरित करण्यात येणार आहे. टेंडर प्रक्रीया व त्यांना देण्यात येणाऱ्या निर्धारित वेळेमुळे एकूणच रस्त्यांच्या प्रक्रियेला आचारसंहितेचा अडथळा येण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुरुवारी झालेल्या बैठकीत दोन आठवड्यांत अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

गुणवत्ता तपासणी होणार

रस्त्याची कामे वेळेत व गुणवत्तेनुसार पूर्ण करण्यासाठी अंमलबजावणी, यंत्रणा बदल करण्याचे अधिकार हे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीस राहणार आहेत. मंजूर कामांनाच हा निधी खर्च होतोय की नाही हे पाहण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर राहणार आहे. शहरात होणाऱ्या कामांची गुणवत्ता तपासणी करण्यात येणार असल्याचेही विभागीय आयुक्त डॉ. दांगट यांनी सांगितले.

हे रस्ते तयार होतील

१. कैलासनगर ते एमजीएम हॉस्पिटल रोड

२. गजानन महाराज मंदिर ते जय भवानीनगर चौक

३. कामगार चौक ते महालक्ष्मी चौक

४. टीव्ही सेंटर मार्केट कॉर्नर ते बळीराम पाटील शाळा कॉर्नर

५. बाबा पेट्रोल पंप ते क्रांती चौक

६. आझाद चौक ते बजरंग चौक

७. सेव्हन हिल्स ते सूतगिरणी चौक

८. पीर बाजार ते शिवाजीनगर व्हाया दर्गा चौक

९. आकाशवाणी चौक ते जवाहर कॉलनी चौक

१०. सेव्हन हिल्स ते चिश्तिया कॉलनी चौक मार्गे एमजीएम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांना कोडे सुटेना

$
0
0

रवींद्र टाकसाळ

वाळूज औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत असल्याने या परिसरात नागरी वस्त्या झपाट्याने वाढल्या आहेत. या भागात सिडकोचे वाळूज महानगर व अनेक खासगी गृहप्रकल्प उभारले. या विस्तारलेल्या भागातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी वाळूज आणि वाळूज एमआयडीसी पोलिसांवर आहे. रोजीरोटीसाठी गाव सोडून आलेले शेकडो कामगार येथे स्थायिक झाले असून संसार चालविताना अनेकांनी अत्यंत अडचणीत गरजेपोटी दुचाकी वाहने खरेदी केली आहेत. परंतु, या भागातील दुचाकींवर गुन्हेगारांची २०१०मध्ये वाईट नजर गेली. तेव्हा बजाजनगरातून सुरू झालेले दुचाकी जाळण्याचे सत्र अद्यापही सुरूच आहे. २०१०पासून आतापर्यंत १५० दुचाकी व २६ चारचाकी वाहने जाळण्यात आली आहेत. दुचाकी जाळणाऱ्यांची हिंमत वाढण्यास पोलिसांची बेफिकीरी जबाबदार आहे. एकापाठोपाठ वाहने जाळण्यात येत असताना पोलिसांकडून खास मोहीम हाती घेणे आवश्यक होते परंतु, पोलिसांनी हे गांभीर्याने घेतले नाही.

आदर्श गजानन हाऊसिंग सोसायटी, श्री गुरुदेव सोसायटी, नदंनवन सासोयटी आदी भागात घरासमोर पार्क केलेली सहा वाहने जाळल्याप्रकरणी २०१३ मध्ये राजपूत उर्फ ताटू याच्यासह काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्यापैकी काहीजणांना हर्सूल जेलमध्येही पाठविण्यात आले. परंतु, वाहन पेटविण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. गेल्या काही दिवसात वाळूजप्रमाणे शहरातील जयभवानीनगर आदी भागात वाहने जाळण्यात आली. अज्ञात माथेफिरू दुचाकीव पेटवून क्षणात पसार होतात. काही घटनांमध्ये दुचारी पेटवणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाले आहेत. पोलिसांनी नुकतेच दोन संशयितांना जेरबंद केले. परंतु, नागरिकांच्या मनातील भीती मात्र कायम आहे.

पोलिस मात्र अपयश लपविण्यासाठी कॉलनीत सीसीटीव्ही कॅमेरे लावा, माध्यामांनी या घटनांना कमी प्रसिध्दी द्यावी, असा सल्ला देत आहेत, त्यामुळे नागरिकांमधील रोष आणखीनच वाढत आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गृहखात्याने पोलिसांना महागडी वाहने व इतर साहित्य पुरविले आहे. गस्त घालण्यासाठी खास नवीन वाहने देण्यात आली. ही साधने असतानाही पोलिस रात्री नेमके काय करतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिस आयुक्त राजेंद्र सिंग यांनी वाळूज येथे बैठक घेऊन पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढली, त्याचा परिणाम झाल्याचे सध्यातरी दिसत नाही.

प्रत्येक भागातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना बीट देण्यात आले आहेत. पेट्रोलिंग, फिक्स पॉइंट, नाकाबंदी पोलिस करू शकतात. विशेष शाखा, गुन्हे शाखा, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस आयुक्त, उपायुक्त, खबऱ्याचे जाळे, अशी भरभक्कम यंत्रणा आहे. तरीही वाळूज आणि वाळूज एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी जाळणारे पोलिसांच्या हाती का लागत नाही, हे कोडे आहे. याचा सखोल अभ्यास करण्याची वेळ वरिष्ठांवर आली आहे. नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडला, तर ते फार गंभीर ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेटल डिटेक्टरसाठी २० मार्चची मूदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद

येथील रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी २० मार्चपर्यंत मेटल डिटेक्टर लावावेत,अशा सक्त सूचना विभागीय व्यवस्थापक पी. सी. शर्मा यांनी दिल्या आहेत. औरंगाबाद स्टेशनवरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षिततेकडे रेल्वेचे दुर्लक्ष आहे.

नांदेड विभागाला मिळालेल्या अमेरिकन बनावटीच्या लोक इंजिनमधून पी. सी. शर्मा यांनी रेल्वे ट्रॅकची पाहणी केली. यावेळी ते काही वेळ औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर थांबले होते. या भेटीत स्टेशनवरील मेटल डिटेक्टरबद्दल आरपीएफच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. त्यावेळी पंजाबहून साहित्य येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर शर्मा यांनी २०मार्चपर्यंत मेटल डिटेक्टर लावण्याची सूचना केली.



संगणकीकृत इंजिन

अमेरिकन बनावटीच्या डीडब्ल्युडीपी ४ लोको इंजिन नांदेड विभागाला देण्यात आले आहे. या इंजिनमध्ये पिकअप हॉर्सपॉवर, ‌डिज‌िटल कन्समशन, रिडिंग, स्पेस वेस‌िब्लिटी याशिवाय चार संगणक बसविण्यात आले आहेत. संगणकीकृत व्यवस्थेच्या साह्याने इंजिन चालविले जात आहे. हे इंजिन अंजिठा एक्स्प्रेस आणि सचखंड एक्स्प्रेसला जोडले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरूंशी बोला जपून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुलगुरूंच्या दालनात गेलात तर तेथे बोलताना तारतम्य ठेवा. मोठ्या आवाजात किंवा अर्वाच्य भाषेत बोलू नका; कारण आता तुमचे बोलणे रेकॉर्ड केले जाणार आहे. वारंवार होणारी आंदोलने आणि त्यावेळी होणारी दमदाटीमुळे कुलगुरूंनी स्वतःच्या दालनात व्हॉइस रेकॉर्डर बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक संघटना, त्यांचे कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यात अनेकदा वाद झडतात. गेल्या दोन महिन्यात अनेकदा पोलिसांना पाचारण करावे लागले. कुलगुरूंच्या दालनात संघटनांची अरेरावी चालते, व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात ही वाद झाले. तत्कालिन परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेश गायकवाड यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करत आलेल्या कार्यकर्त्यांनीही कुलगुरूंना अरेरावी केल्याचे सांगितले जाते. कार्यकर्ते आणि कुलगुरू यांच्यातील घटनेचे सीसीटीव्ही फुटेज होते; परंतु व्हॉइस रेकॉर्ड नव्हते. प्रशासकीय इमारतीतील सीसीटीव्ही यंत्रणेत ध्वनीमुद्रण होत नसल्याने कार्यकर्त्यांनी बोलताना काय भाषा वापरली याचा पुरावा नसल्याचे कारण पुढे करून पोलिसांत तक्रार दिली नाही. तत्कालीन कुलसचिव डॉ. डी. आर. माने यांच्या दालनाबाहेरही एका कार्यकर्त्याने काही महिन्यांपूर्वी अशीच तोडफोड केली होती. विद्यापीठ प्रशासनाने वेळोवेळी मवाळ भूमिका घेतल्याने या घटना वाढल्या आहेत. या घटनांमुळे वैतागलेल्या कुलगुरूंनी स्वतःच्या दालनात व्हॉइस रेकॉर्डर बसविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे.

रविवारच्या घटनेत माघार

प्राध्यापक संघटनेचे सदस्य व कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यात रविवारी खडाजंगी झाली होती. संबंधित कार्यकर्त्यांवर पोलिसात तक्रार करण्यासाठी विद्यापीठाने तयारी केली. प्रशासनाने यापूर्वी व आत्ताच्या घटनाक्रमाचा आढावा घेत, आरोपांची जंत्री तयार केली; परंतु पुढे काहीच झाले नाही. या घटनेला चार दिवस उलटले असून विद्यापीठ प्रशासन नेहमीप्रमाणे मागे हटले आहे.

कर्मचाऱ्यांचा विरोध

कुलगुरूंच्या दालनांसह इतर संवैधानिक अधिकाऱ्यांच्या दालनात व्हॉइस रेकॉर्डर बसविण्याची तयारी सुरू आहे. या यंत्रणेला कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविल्याचे कळते. संघटनांवर नियंत्रण ठेवता येत नाही, याचा कर्मचाऱ्यांना ताण कशासाठी अशी चर्चा कर्मचारी खासगीत करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैलास लेणीचे पैलू उलगडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

'जगप्रसिध्द वेरूळ येथील कैलास लेणी हे जगभरातील पर्यटक, संशोधक आणि स्थापत्यकलेच्या शास्त्रज्ञांसाठी अभ्यासाचा विषय आहे,' असे प्रतिपादन भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक मदनसिंग चौहान यांनी केले. लेणीचा इतिहास, धार्मिक महत्त्व या विषयी चर्चा करण्यासाठी गुरुवारी (१२ मार्च) औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी आणि चिश्तिया महाविद्यालय खुलताबाद यांच्या वतीने वेरूळच्या कैलास हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पुरातत्वशास्त्र, स्थापत्यशास्त्र, लेखक अशा विविध क्षेत्रातील ३५ तज्ज्ञांनी विचार व्यक्त केले. कैलास मंदिर लेणे म्हणजे एकसंघ दगडातून निर्माण केलेले अवर्णनीय असे सुंदर महाकाव्य आहे. २९ मीटर उंच ५० मीटर लांब आणि ३३ मीटर रुंद असे त्याचे आकारमान आहे. शिवाचे सदन म्हणून कैलास लेणे ओळखले जाते. हजारो वर्षांपूर्वी हाती फक्त छन्नी हातोडा घेऊन अज्ञात कलाकारांनी निर्माण केलेले हे शिल्प माणिकेश्वर नावाने परिचित होते. पौराणिक प्रसंग, कथेचे सादरीकरण करण्यात येथील शिल्पकृती यशस्वी ठरल्या आहेत. कैलास लेणीच्या निर्मितीपासून तिच्या निर्मितीचा उद्देश, तंत्रज्ञान, लेणीतून मिळणारा संदेश या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे अजून बाकी आहे, असा सूर या चर्चासत्रातून निघाला.

चर्चासत्रात पहिल्या सत्रात प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर , डॉ. गणी पटेल, डॉ. शेख अजीझ , डॉ. हरी जमाले, डॉ. दुलारी कुरेशी, डॉ. रफत कुरेशी, डॉ. गोपाल बछिरे, डॉ. बिना संगेर, योगेश जोशी, प्रा. भगवान पाडळकर यांनी विचार मांडले. दुसऱ्या सत्रात हेरिटेज आर्किटेक्चर अँड कंझव्हेंशन या विषयावर डॉ. मदनसिंग चौहान, तेजस गर्गे, कचरूआप्पा जाधव आणि प्रदीप म्हैसकर यांनी वेरुळच्या कैलास लेणीचे विविध पैलू उलगडून सांगितले.

तिसऱ्या सत्रात कैलासचे धार्मिक महत्त्व आणि नवीन सिद्धांत याबाबत टाकास्वामी मठातील महंत टाकास्वामी, लेखिका अरुणा देशपांडे, मुक्त पत्रकार आणि सिद्धांताच्या प्रवर्तक क्रिस्टल प्लिझ, प्रा. वसंत कुंभोजकर, प्रा. बडवे, अण्णा वैद्य, डॉ. महेश सरवदे यांनी विचार मांडले.

अखेरच्यात सत्रात कैलासशी संबंधित माहितीचे संकलन करून दस्तऐवज तयार करणे याबाबत आर्किटेक्ट स्नेहा बक्षी, अजय कुलकर्णी , प्रदीप देशपांडे, नितीन गोजे, बलराम मडीलगेकर, पंडीत देशपांडे, फकीर पठाण, आरती पाटणकर आदींनी विचार मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images