Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अवकाळीने हिरावला घास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विभागात परतीच्या पावसाने दडी मारल्यामुळे रब्बीची पेरणी उशीरा झाली. जानेवारी महिन्यांपर्यंत मराठवाड्यात रब्बीची ६१.२८ टक्के पेरणी झाली; मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीत पिकांची प्रचंड वाताहत झाली आहे. प्रत्यक्ष क्षेत्र अधिक असले तरी रब्बीचे उत्पादन नगण्य आहे. सर्व पिकांच्या सरासरी उत्पादनात घट झाली असून यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी भयावह ठरले आहे.

तब्बल दोन महिने पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा फायदा झाला नाही. ऑगस्ट महिन्यात पेरणी केलेल्या पिकांचे उत्पादन पावसाअभावी घटले. कापूस, तूर आणि मका या पिकांनी शेतकऱ्यांना काही प्रमाणात आधार दिला; मात्र दरवर्षीच्या तुलनेत सरासरी उत्पादन प्रचंड घटल्यामुळे उत्पादन खर्चही निघाला नाही. पाऊस नसल्यामुळे मूग, उडीद, सोयाबीन या पिकांची लागवड झाली नाही. रब्बी हंगामावर शेतकऱ्यांच्या आशा केंद्रीत झाल्या होत्या. शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाची वाट पहावी लागली. जेमतेम पावसानंतर रब्बीची पेरणी झाली; मात्र अनेक भागात रब्बी पिकांची उगवण झाली नाही. ज्वारी, गहू, हरभरा या मुख्य पिकांचे उत्पादन घटले आहे. जानेवारी महिन्यापर्यंत मराठवाड्यात रब्बीची पेरणी करण्यात आली. जालना, बीड, नांदेड या जिल्ह्यात कालव्याला पाणी सोडल्यानंतर रब्बीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. रब्बी तीळ, करडई, सूर्यफूल आणि इतर गळीतधान्याचे क्षेत्र वाढले आहे. सद्यस्थितीत विभागात रब्बीचे एकूण ६१.२८ टक्के क्षेत्र आहे. पहिल्या टप्प्यात जेमतेम १८ टक्के क्षेत्र होते. सध्या प्रत्यक्ष क्षेत्र जास्त असले तरी नैसर्गिक संकटांनी रब्बीची वाताहत झाली आहे. पावसाच्या फटक्यात ज्वारी आणि गहू पीक आडवे पडले आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. या पावसाने उत्पादनात ४० टक्के घट होईल. तसेच धान्याचे रंग उडाल्यामुळे बाजारपेठेत कमी भाव मिळेल असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. मराठवाड्याचे नगदी पीक असलेल्या कापसाचे उत्पादन घटले आहे. दरवर्षी हेक्टरी ८ ते १० क्विंटल निघणारा कापूस यावर्षी अडीच ते तीन क्विंटल झाला आहे. तसेच कापसाला फक्त ३,२०० रुपये भाव मिळाला आहे. बुधवारी (११ मार्च) पडलेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिके भुईसपाट झाली आहेत.

पुन्हा पावसाची भीती

जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून शनिवारी (१४ मार्च) पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे फळांची गळ होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषध फवारणी करावी, असे आवाहन कृषी हवामान विभागाने केले आहे. सध्या आंब्याचा प्रचंड मोहोर पावसाळी वातावरणात गळण्याची भीती आहे. या संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे.

रब्बी हंगामात पिके चांगली आली होती; पण अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल. दुष्काळी मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. - जनार्दन जाधव, विभागीय कृषी सहसंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॉँग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीत प्रबळ उमेदवार रिंगणात उतरविण्यासाठी इच्छुकांमधून मुलाखती घेण्याचा निर्णय कॉँग्रेसने घेतला आहे. येत्या २३ आणि २४ मार्च रोजी इच्छुकांच्या मुलाखती होणार असून, येत्या २१ तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षातून जोरदार हालचाली सुरू आहेत. गेल्या निवडणुकीत अवघ्या १९ जागांवर विजय मिळविलेल्या कॉंग्रेसने यंदा विजयासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात मराठवाड्याचे सुपुत्र, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाचे सूत्रे आल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढला आहे. त्यामुळे इच्छुकांच्या भाऊगर्दीतून चांगला प्रबळ उमेदवार रिंगणात उतरविण्यासाठी मुलाखत घेण्याचा निर्णय कॉग्रेस श्रेष्ठींनी घेतला आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबादेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबई येथील प्रदेश कार्यालयात बैठक घेण्यात आली. यात निवडणूक कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती प्रदेश चिटणीस व मीडिया समन्वयक अभिजीत देशमुख यांनी दिली आहे.

असा आहे कार्यक्रम

येथील गांधी भवन तसेच मुंबई येथील टिळक भवन कार्यालयात इच्छुकांकडून विहित नमुन्यातील अर्ज छायाचित्रासह स्वीकारले जाणार आहेत. खुल्या प्रवर्गातील इच्छुकांना अर्ज १ हजार रुपये तर महिला व राखीव प्रवर्गातील इच्छुकांना ५०० रूपये शुल्क भरावे लागणार आहेत. २३ व २४ मार्च रोजी इच्छुकांच्या मुलाखती औरंगाबाद येथे होणार असून, २५ मार्च रोजी जिल्हा निवडणूक मंडळाची बैठक होईल.

दीडशे इच्छुकांचे अर्ज दाखल

कॉँग्रेसमधील इच्छुकांनी आपापल्या इच्छुक वॉर्डात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विविध माध्यमातून उमेदवारांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होत आहेत. विशेष म्हणजे पक्षांतर्गत प्रक्रिया जाहीर होण्याआधीच उमेदवारीसाठी गांधीभवनात १५० इच्छुकांचे अर्ज आले आहेत.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेने ताणला बाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आलात तर तुमच्यासह, नाही तर तुमच्या शिवाय,' अशा पध्दतीची रणनीती शिवसेनेने ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत युती व्हावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्याचा आणि या प्रयत्नांना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी प्रतिसाद न दिल्यास स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (११ मार्च) मुंबईत शिवालयात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीला मराठवाडा विभागातील शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार, औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम, संपर्कनेते विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहर प्रमुख रेणुकादास उर्फ राजू वैद्य, बाळू थोरात यांची उपस्थिती होती. या बैठकीत औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीबद्दल गांभीर्याने चर्चा करण्यात आली. महापालिकेवर पुन्हा एकदा युतीची सत्ता आणण्याची शिवसेनेची तयारी आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेतर्फे पुढाकारही घेतला जात आहे, परंतु अद्याप भाजपच्या नेत्यांकडून त्याला योग्य प्रतिसाद मिळालेला नाही. असे असले तरी युती होण्यासाठी शेवट पर्यंत प्रयत्न करण्याचे संकेत या बैठकीत देण्यात आले. भाजपने युती करण्याची तयारी दाखवलीच नाही, तर त्यांच्या शिवाय निवडणूक लढवण्याच्या सूचना यावेळी ठाकरे यांनी सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना दिल्या. स्वबळावर निवडणूक लढवून साठ जागा जिंकून आणण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सुमारे दोन तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या या बैठकीत औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येक लोकप्रतिनिधीवर जबाबदारी देण्याचेही ठरवण्यात आले. शिवसेनेचे मराठवाड्यातील सर्व आमदार, खासदार निवडणूक प्रचाराच्या दरम्यान औरंगाबादेत डेरेदाखल होणार आहेत. प्रत्येकाला वॉर्ड वाटून दिले जाणार आहेत. वाटून दिलेल्या वॉर्डातच त्यांनी काम करावे आणि उमेदवार निवडून आणावेत, असे यावेळी सांगण्यात आले. निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर झाल्यावर शिवसेना आपले पत्ते उघड करणार आहे.

इच्छुकांची मोठी यादी

शिवसेनेने प्रत्येक वॉर्डातील इच्छुक उमेदवारांची माहिती गोळा करणे सुरू केले आहे. ११३ वॉर्डानुसारच पालिकेची निवडणूक होईल, असे गृहीत धरून तयारी केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका वॉर्डात किमान दहा ते पंधरा इच्छुक उमेदवारांची यादी तयार झाली आहे. त्यातून एक उमेदवार निवडण्यासाठी नेत्यांचा कस लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका निवडणुकीची लगीनघाई सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वॉर्डांचे नाव आणि चतुःसीमांचा उल्लेख असलेल्या गॅझेटची छपाई गुरुवारी (१२ मार्च) करण्यात आली. त्यामुळे तीन दिवसांत म्हणजे सोमवारी महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते, असे संकेत मिळाले आहेत. गॅझेट छपाईचे वृत्त पालिकेत येऊन धडकताच राजकीय वर्तुळात धावाधाव सुरू झाली.

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुलात उलट सुलट चर्चा सुरू आहे. पालिकेच्या प्रशासनातर्फेही अधिकृतपणे ठोस माहिती दिली जात नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी संभ्रमात आहेत. तीन दिवसांपासून निवडणूक विषयक काम करणारे पालिकेचे चार वरिष्ठ अधिकारी मुंबईत तळ ठोकून आहेत. निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्या उपस्थितीत या अधिकाऱ्यांची बैठक झाली. आक्षेपांच्या अनुषंगाने काही किरकोळ बदल करण्याची सूचना पालिकेच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली. त्यानुसार आवश्यक ते बदल करून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अंतिम मसुदा आयोगाला सादर केला. या मसुद्याच्या आधारे गुरुवारी वॉर्डांची नावे, त्याच्या चतुःसीमा आणि कोणता वॉर्ड कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे याच्या उल्लेखासह गॅझेटची छपाई करण्यात आली. मात्र छपाई केलेले गॅझेट प्रसिध्द केले नाही. निवडणुकीचा कार्यक्रम ज्या दिवशी अधिकृतपणे जाहीर केला जाईल, त्याच दिवशी गॅझेटही प्रसिद्ध केले जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी किंवा मंगळवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. ज्या दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल त्या दिवसापासून आचारसंहिता लागू केली जाणार आहे.



सातारा नगरपालिका निवडणुकीची शक्यता

औरंगाबाद महापालिकेबरोबरच सातारा-देवळाई नगरपालिकेची देखील निवडणूक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या नगरपालिकेसाठी तयार करण्यात आलेली वॉर्ड रचना आणि वॉर्डांचे आरक्षण या संदर्भात हरकती-सूचनांवर सुनावणी पूर्ण झाली आहे. महापालिका निवडणूक कार्यक्रमासोबत सातारा नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांच्या विरोधात अवमान याचिका

$
0
0

मटा प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र व राज्य शासनाने तयार केलेल्या नियमांची अंमलबजावणी करणे राज्य निवडणूक आयोगाला अनिवार्य आहे, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते; परंतु औरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणुकीत या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही, त्यामुळे औरंगाबाद खंडपीठात राज्य निवडणूक आयुक्त जगेश्वर सहारिया यांच्याविरुद्ध अवमान याचिका करण्यात आली आहे.

येथील सामाजिक रवींद्र श्रीनिवास देशमुख यांनी ही याचिका केली आहे. ७४ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास वर्ग आणि महिलांसाठी आरक्षण करण्यात आले. या दुरुस्तीनंतर १९९५ च्या औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत जातनिहाय आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतरच्या निवडणुकीत आरक्षण चक्रानुक्रम करण्याचे नियम राज्य शासनाने केले नव्हते. हे नियम ५ जुलै २०११ रोजी करण्यात आले. या नियमांच्या अंमलबजावणीनंतर येणारी निवडणूक पहिली समजण्यात यावी.

एप्रिलमध्ये होणारी निवडणूक ५ जुलै २०११ नंतरची पहिली निवडणूक ठरते. त्यामुळे या निवडणुकीसाठी आरक्षण नव्याने काढणे निवडणूक आयोगाला बंधनकारक होते. एप्रिलमध्ये होणारी निवडणूक पहिली गृहित न धरता याआधीच्या दोन निवडणुकींतील आरक्षणानंतरचा चक्रानुक्रम यंदाही लागू करण्यात आला. त्यामुळे आयोगाने हायकोर्टाच्या आदेशाचा अवमान केला आहे, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५७ शाळांची झाडाझडती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नियमांना केराची टोपली दाखवित मनमानीला करणाऱ्या शाळांचा शिक्षण विभागाने फास आवळला आहे. शिक्षण विभागाने दोन दिवसात शहरातील २५७ शाळांची तपासणी केली. यापैकी अनेक शाळांमध्ये शुल्कवाढ, कँटीनची सक्ती केली जात असल्याचे लक्षात आले आहे. विभागातर्फे त्रुटीनिहाय शाळांची यादी सोमवारी जाहीर केली जाणार असून शासनाकडे कारवाईसाठी अहवाल दाखल केला जाणार आहे.

शिक्षण विभागाने १४८ पथके नेमून बुधवारीपासून तपासणीला सुरुवात केली आहे. या शाळांचे अहवाल आणि त्रुटी असलेल्या शाळांची यादी करण्याचे काम गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सुरू होते. ही यादी सोमवारपर्यंत जाहीर केली जाणार आहे. तपासणी करण्यात आलेल्या शाळांपैकी अनेक शाळांमध्ये सुविधांची वाणवा, तर आहेच; त्यासोबत सर्वाधिक अतिरिक्त शुल्कवाढ झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. शाळांची ही मनमानी पाहता तपासणी पथकेही चक्रावली आहेत. अनेक शाळांमध्ये कँटीन सक्ती, मान्यता न घेणे, संचमान्यता नसणे, क्रीडागंण नसणे आदी त्रुटी आहेत. बहुतांश शाळांनी पालक-शिक्षक संघ केवळ कागदापुरतेच तयार केले आहेत. शिक्षण विभागाच्या तपासणीत अशा शाळांचे पितळ उघडे पडले आहे.

तपासणीनंतर छाननीची प्रक्रिया सुरू आहे, अनेक शाळांमधील शुल्कवाढ नियमाला धरून केलेली दिसत नाही. अनियमितता असलेल्या शाळांवर निश्चित कारवाई केली जाईल.- नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४ लाखांचे कोल्ड्रिंक्स जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील पद्मपुरा भागात अन्न व औषध प्रशासन विभागाने बुधवारी (११ मार्च) रात्री उशिरापर्यंत छापे टाकून ४ लाख रुपयांचे कोल्ड्रिंक्स जप्त केले. जप्त केलेल्या कोल्ड्रिंक्सचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठविण्यात आले आहे. तपासणी अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.

पदमपुरा येथील सुयोग कॉलनीतील शिवम् ट्रेडर्सवर बुधवारी रात्री सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके, सहआयुक्त मिलिंद शहा यांनी छापा टाकला. या ठिकाणी १५ प्रकारच्या कोल्ड्रिंक्सची विनापरवाना विक्री केली जात होती. हे दुकान स्वप्निल सतीश जयस्वाल (वय २१) यांचे असून रायगड येथील एजीई इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि पुणे येथील सनराईन ब्रेव्हरिज प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांच्या विनापरवाना कोल्ड्रिंक्सची विक्री केली जात होती. या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे, वर्षा रोडे यांनी सहकार्य केले. कालबाह्य कोल्ड्रिंक्सची अशास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रकार उघडकीस आल्याने शहरात चर्चा आहे. त्यापाठोपाठ ही कारवाई करण्यात आली आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'स्टरलाइट'वर कारवाई होणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कंपनीतील विषारी रसायने सोडून खाम नदी दूषित केल्याप्रकरणी स्टरलाइट कंपनीवर कारवाई करा,' अशी शिफारस करणारा अहवाल प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पर्यावरण विभागाकडे पाठविला आहे.

वाळूजमधील साई ढाबा परिसरात २८ फेब्रुवारी रोजी खाम नदीपात्रात विषारी रसायने सोडताना पोलिसांनी सात टॅँकर जप्त केले होते. जागेचे मालक आगा खान, सुमित खांबेकरांसह दोघांना अटक करण्यात आली होती. हे रसायन स्टरलाइट कंपनीतील असल्याचे माहितीही समोर आली होती. या रसायनाचे नमुने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविण्यात आले होते. या रसायनांचा तपासणी अहवाल मंडळाला प्राप्त झाला आहे. या अहवालात रसायन मिश्रीत पाण्यात विषारी घातक द्रव्य आढळून आली आहेत. त्यामुळे 'स्टरलाइट'वर कारवाई करा, अशी शिफारस मुंबईतल्या पर्यावरण विभागाला करण्यात आली आहे.

खाम नदी पात्रात रसायन सोडण्याबाबतचा तपासणी अहवाल मिळाला आहे. त्यावरून स्टरलाइट कंपनीवर कारवाई करावी असा अहवाल मुंबईला पाठविला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील तसेच वाळूज, शेंद्रा भागातील ज्या कंपन्यांनी प्रदूषण केले आहे त्या कंपन्यांना नोटीस देऊन कारवाई केली आहे. या प्रकरणातही निश्चित कारवाई केली जाईल.- प्रवीण जोशी, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विकास‌निधी सुविधांसाठीच

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर विकास अधिनियम १९६६च्या कलमामध्ये प्रत्येक नियोजन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात विकास योजना करण्याची तरतूद आहे. या कायद्याच्या कलम १२४ (त्र) नुसार वसूल झालेला विकास आकार निधी सार्वजनिक सुविधा पुरविण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी बंधनकारक आहे. या तरतुदीचे पालन न केल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल, असे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. पी.आर. बोरा यांनी ‌राज्यातील महापालिका व नगरपालिकांना दिले आहेत.

औरंगाबादचे नागरिक शोधन यशवंत जोशी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. कायद्यातील तरतुदींचे पालन औरंगाबाद महापालिका करत नाही. त्यामुळे पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत नाही, असा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे. वसूल केलेला विकास निधी महापालिका किंवा नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर किंवा अन्य बाबींवर खर्च केला जातो. भविष्यातील लोकसंख्या विचारात घेऊन आवश्यक त्या सोयी-सुविधांचे नियोजन विकास योजनेमध्ये आहे. विकास योजना व विकास नियंत्रण नियमावलीच्या तरतुदींच्या अधीन राहून कोणत्याही जमिनीचा विकास करण्यासाठी नियोजन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असते. त्यासाठी अधिनियमाच्या कलम १२४ (त्र) नुसार विकास आकार (डेव्हलपमेंट चार्ज) वसूल करण्याची तरतूद आहे. हा निधी केवळ त्या-त्या प्राधिकरणाच्या (महापालिका व नगरपालिका) क्षेत्रामध्ये सार्वजनिक सुविधा पुरविणे, क्षेत्राची देखभाल व सुधारणासाठी वापरणे कायद्यान्वये बंधनकारक करण्यात आले आहे. असे असताना महापालिका व नगरपालिका आपल्या अर्थसंकल्पामध्ये विकास योजनेतील नियोजन प्रस्तावांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती तरतूद करत नाहीत. त्यामुळेच कायद्यात तरतूद करण्यात आली, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांचे वकील देवदत्त पालोदकर यांनी केला. वेळेत भूसंपादन न झाल्याने आरक्षणाखालील जमीन आरक्षणमुक्त होण्याचे प्रमाण अलीकडील काळात वाढले आहे. त्यामुळेच विकास आकाराच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या निधीचा विनियोग आरक्षणाखालील जमिनीच्या संपादनासाठी करण्याबाबत राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांना निर्देश देणे आवश्यक झाले आहे, असा आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने २१ सप्टेबर २०१३ रोजी काढला होता. या आदेशाची अंमलबजावणी महापालिका करत नसल्यामुळेच याचिकाकर्त्याने हायकोर्टात धाव घेतली. या याचिकेत प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. चार आठवड्यांनंतर या याचिकेवर सुनावणी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ला आलेली नोटीस बेकायदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंपनीला महापालिकेने बजावलेली हद्दपारीची नोटीस बेकायदा होती, असे स्पष्ट झाले आहे. कराराच्या आडून एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न पालिका आणि कंपनीकडून सुरू आहे.

समांतर जलवाहिनीच्या संदर्भात पालकमंत्री रामदास कदम यांनी २६ जानेवारी रोजी पालिकेचे अधिकारी, कंपनीचे अधिकारी यांची बैठक घेतली. जलवाहिनीचे काम सुरू करण्यात येत नसल्यामुळे कंपनीला हद्दपारीची नोटीस देण्याचे फर्मान त्यांनी सोडले. त्यानुसार महापालिकेने २३ फेब्रुवारी २०१५ रोजी सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिम‌िटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुशील सेठी यांच्या नावे करार रद्द करण्याबाबत नोटीस पाठवली. सात दिवसांत काम सुरू झाले नाही तर करार रद्द केला जाईल, असे कळवले. समांतर जलवाहिनीचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी या नोटीसची माहिती माहितीच्या अधिकारात महापालिकेकडून माग‌ितली. तेव्हा त्यांना दिलेल्या माहितीतून महापालिकेने कंपनीला बजावलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनीला नोटीस बजावताना महापालिकेने कंपनीबरोबर केलेल्या करारनाम्यातील ५.१(ए) या कलमाचा उल्लेख केला आहे, परंतु करारात मात्र अशा प्रकारचे कोणतेही कलम नाही. कराराच्या पुस्तकातील पान क्रमांक १४ वर कलम ५.१ चा उल्लेख आहे. हे कलम संपल्यावर लगेचच ५.२ हे कलम सुरू होते. या दोन्हीही कलमाच्या दरम्यान ५.१ (ए) हे कलम नाही.

पालिकेच्या नोटीसला कंपनीने दिलेले उत्तरही बेकायदेशीर आहे. कंपनीवर कारवाई करण्याच्या नावाखाली पालिकेची बनवाबनवी सुरू आहे.- राजेंद्र दाते-पाटील, समांतर जलवाहिनीचे अभ्यासक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबादेत ‘स्वाइन फ्लू’ने महिन्यात सहा जणांचा मृत्यू

$
0
0

उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात ७ फेब्रुवारी ते १४ मार्चदरम्यान एकूण ४० संश‌‌‌यित स्वाइन फ्लूचे रुग्ण दाखल झाले होते. त्यातील ३७ रुग्ण हे औषधोपचारानंतर बरे झाले. दाखल रुग्णांपैकी सहा रुग्ण हे पॉझिटिव्ह निघाले होते. यातील तीन रुग्णांना वेळेत योग्य ते उपचार मिळाल्यामुळे बरे झाले. तर तीन पॉझिटीव्ह रुग्ण हे तातडीने औषधोपचार न घेतल्यामुळे दगावले. याशिवाय स्वाइन फ्लूचे तीन रुग्ण औषधोपचार घेताना दगावले, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक वसंत बाबरे यांनी दिली.

स्वाइन फ्लूने राज्यात धुमाकूळ घातला असला, तरी संबंधितांनी वेळीच दक्षता घेऊन तातडीने औषधपोचार घेतले, तर स्वाइन फ्लूचा आजार बरा होतो. हे उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयाने दाखवून दिले आहे. त्यामुळे स्वाइन फ्लू या आजाराला घाबरून न जाता त्यावर तातडीने औषधोपचार करणे गरजेचे आहे. या आजाराची काळजी करण्याची गरज नाही. केवळ दक्षता घ्यायला हवी, असे मत उस्मानादमधील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चंचला बोडके यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

…अन्यथा आपली स्थिती मराठा आरक्षणासारखीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

'भारतीय जनता पक्षात गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा सर्वसमावेशक एकही नेता आज आपणास दिसत नाही. मुंडेसाहेब असते, तर यापेक्षा अधिक चांगले चित्र दिसले असते. आपणही आता उतावीळपणा दाखवण्यात अर्थ नाही, आपल्याला आरक्षण नक्की मिळेल, थोडा धीर धरा. उतावीळपणा केला, तर मराठा आरक्षणासारखीच आपली अवस्था होईल,' असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी रविवारी केले. जालन्यात झालेल्या धनगर समाज मेळाव्यात ते बोलत होते.

जानकर म्हणाले, 'अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. आतापर्यंत आपण केवळ शेतीवर अवलंबून असायचो. पण, निसर्गाने दगाफटका केला, तर कुणाला दाद मागणार? आत्महत्या करू नका. यापुढे शेतकऱ्याने आपल्या एका मुलाला उद्योग आणि दुसरा राजकारणात पाठवा. आपले दुःख तर खरे आपल्याच मुलांना समजेल.'

पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि आमदार महादेवराव जानकरांनी रविवारी सकाळी घाणेवाडी जल संरक्षण मंचाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. घाणेवाडी जलाशयाच्या गाळ उपसण्याच्या कामाला त्यांनी आमदार निधीतून पंधरा लाख रुपये देण्याचे जाहीर केले. घाणेवाडी जल संरक्षण मंचाचे अध्यक्ष भाईश्री रमेश पटेल, उद्योजक सुनील रायठ्ठठा, 'सीएमआयए'चे सचिव रितेश मिश्रा, 'विक्रम चहा'चे संचालक भावेश पटेल, ओमप्रकाश चितळकर या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्ष उत्पादक आर्थिक विवंचनेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

द्राक्ष उत्पादकांना मिळणारे दर बाजारपेठेतील द्राक्षविक्रीच्या दराच्या तुलनेत अत्यल्प असल्यामुळे उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अवकाळी पावसाचा फटका बसल्याचाही परिणाम नुकसानावर झाला आहे.

उत्पादन खर्चात झालेली वाढ, भरमसाठ वाढलेली मजुरी, वाहतुकीचा वाढलेला खर्च, व्यापाऱ्यांची मनमानी व दलालांची साखळी यांमुळे भरडलेला शेतकऱ्यावर अवकाळी पावसाने अवकृपा केली. त्यामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकऱ्यावर अधिकच संकट कोसळले आहे. एकरी सुमारे अडीच ते तीन लाख रुपये खर्च करूनही नफा केवळ २० ते ३० हजार रुपयांच्या आसपास राहत आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आता पॉलिहाउस किंवा शेडनेट शेतीकडे वळण्याच्या तयारीत आहे. नुकत्याच उद्भवलेल्या नैसर्गिक संकटामुळे खानापूर, कौडगाव, चिलवडी, करी-नारी या भागातील द्राक्षांच्या बागांना अपेक्षित माल लागला नाही.

व्यापाऱ्यांची मनमानी

दलालांची साखळी व व्यापाऱ्यांची मनमानी यामुळे द्राक्षांना चांगला दर मिळणे कठीण झाले आहे. द्राक्ष उत्पादकांकडून दलाल व व्यापारी साधारणपणे २० ते २२ रुपये किलो दराने माल उचलत आहेत. आणि मंडईत किंवा किरकोळ बाजारात ग्राहकांना हे ५० ते ७० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहेत. द्राक्ष उत्पादक व ग्राहक यांच्यातील दरातील ही तफावत शेतकऱ्यांना फायद्याची होत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारपीट, पावसाने पिके उद्‍‍ध्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. विशेषत रब्बीच्या गहू, ज्वारी आणि हरभरा पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानेच हिरावून घेतला. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या गारपिटीने जालना तालुक्यातील रेवगाव परिसरातील शेकडो एकर जमिनीवरील कांदा बियाणे जमीनदोस्त झाले. जिल्ह्यात सोमवारपासून जवळपास रोजच पाऊस हजेरी लावत आहे.

जालना जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. सोमवारपासून (दि. ९) एकूण सरासरी ५०.७० मिमी पाऊस झाला आहे. यात सर्वाधिक जालना ७२.८६ मिमी, भोकरदन ७०.८६ , जाफराबाद ६७.८० मिमी, अंबड ५५.२५ मिमी, घनसावंगी ४४.१२ मिमी, परतूर ३७.२० मिमी, बदनापूर ३७ मिमी व मंठा २०.५० मिमी असा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे.

भोकरदन आणि जालना तालुक्यात शनिवारी अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीनंतर पावसाच्या सरी पडल्या. जालना तालुक्यातील रेवगाव परिसरात शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास जबरदस्त गारपीट झाली. यासंदर्भात पंचायत समितीचे माजी सभापती संतोष मोहिते यांनी दिलेल्या माहितीवरून परिसरात तीन ते चार इंच गारांचा थर जमा झाला आहे. परिसरात कांदा, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

भोकरदन तालुक्यातील दानापूर, वडशेत, गोद्री, निंबोळा, मलकापूर, मनापूर, हसनाबाद, परिसरात बोराच्या आकाराच्या गारा पडल्याने रब्बीच्या पिकांची नासाडी झाली आहे. या अवकाळी पावसाने ग्रामीण भागात काही ठिकाणी ओढ्यांना चक्क पाणी आले आहे. शेताच्या बांध आणि रस्त्यावर दोन्ही बाजूंना बऱ्याचशा पाण्याने भरून गेल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये वीज पडून एक ठार; दोन जखमी

$
0
0

बीड : जिल्ह्यात शनिवारी रात्री, रविवारी पहाटे दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून एक मुलगी मृत्युमुखी पडली असून दोन महिला जखमी झाल्या आहेत. जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने रब्बी पिकांचे आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास वीज पडून एक मुलगी मृत्युमुखी पडली. आष्टी तालुक्यातील करखेल येथील शिवकन्या कवळे वय (१४) असे मृत मुलीचे नाव आहे. रविवारी पहाटेपासून गेवराई तालुक्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. या वेळी गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे घरावर वीज पडून घरातील सामान जाळून खाक झाले. तसेच, घरातील दोन महिला भाजून जखमी झाल्या. जंत्राबाई सारंग नवले, आणि नीलाबाई विष्णु देशमुख अशी महिलांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, द्राक्ष, खरबूज, टरबूज या फळपिकांचे; तसेच गहू, ज्वारी, हरभरा या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रब्बीला बसलेल्या फटक्याने फुलंब्री तालुक्यात निराशा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बीची आशा सोडली आहे. या पावसामुळे हाताशी आलेल्या मोजके का होईना उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

या शेती हंगामाच्या पावसाळ्यात पावसाने ताण दिल्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतरही पुरेसा पाऊस न झाल्याने खरिपाचे उत्पादन घटले. मका, तूर, कापूस आदी नगदी पिकांपासून यंदा फारसे उत्पादन निघाले नाही, केलेला खर्चही भरून निघाला नाही. जमिनीत ओल नसल्याने त्याचा रब्बी पिकांवर परिणाम झाला. तरीही शेतकऱ्यांनी हिंमत बांधून गहू, हरभरा, मिरची आदींची पेरणी केली. ही पिके हाताशी आली असताना वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. तूर, हरभरा, गहू, मिरची, मका या पिकांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. पावसामुळे केलेला खर्च निघणे मुश्किल झाले आहे.

खरिपाच्या उत्पादनात सावकार आणि बँकाचे कर्ज फेडून दिवाळी साजरी करायची, तर रब्बी पिकात मुलामुलीचे लग्न व उर्वरित कर्ज फेडायचे, असे शेतकऱ्यांचे सर्वसामान्य गणित असते. मात्र शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे.

शेती ठोक्याने देण्याची तयारी

खरिपाचे पीक हातून गेल्यामुळे शेतकर्यांनी रब्बी पिकांच्या उत्पादनासाठी महागडी बियाणे, खते, औषधी व तंत्रज्ञानाचा उपयोग केला. परंतु निसर्गाच्या दुष्टचक्राचा फटका बसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अनेक शेतकरी यावर्षी शेती ठोक्याने देण्याबद्दल बोलून दाखवित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नड तालुक्यात ३१ मिमी पाऊस

$
0
0

कन्नड : तालुक्यात शनिवारी (१४ मार्च) सांयकाळपासून झालेल्या विजेच्या कडकडाटासह झालेला वादळी पाऊस व काही भागातील गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पंधरवड्यात तालुक्यात ४५ ते ५० मिमी पाऊस पडला आहे.

तालुक्यातील सर्व भागात शनिवारी रात्री कमी अधिक प्रमाणत पाऊस पडला. काही ठिकाणी तूरळक काळ बोराच्या आकाराच्या गारा पडल्याची माहिती आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व पिकाचे गणित बिघडून गेले आहे. काढणीस आलेला गहू, काही भागात सोंगणी झालेला गहू, कांदा, बिजोत्पादनाचा कांदा, आंबा व चिकूचे नुकसान झाले आहे. तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद देवगाव (रंगारी) महसूल मंडळात झाली. मंडळनिहाय झालेला पाऊसः देवगाव रं. ३८ मिमी, कन्नड ३२ मिमी, चापानेर ३० मिमी, चिकलठाण २३ मिमी, करंजखेडा २८ मिमी, पिशोर ११ मिमी, नाचनवेल १३ मिमी, चिंचोली लिं. १४ मिमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादळी पावसाने शेतकरी कंगाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सिल्लोड तालुक्यात पिकांचे मार्च महिन्यातील पावसाने आतोनात नुकसान केले आहे. पावसाळ्यात पडला नाही, एवढ्या सातत्याने मार्चमध्ये पाऊस पडत आहे. तालुक्यात मार्चमध्ये सरासरी ७०.७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या वादळी पावसामुळे मळणी, सोंगणीसाठी तयार झालेला गहू आडवा पडला आहे. वादळी पावसामुळे शेतकरी कंगाल झाले आहेत.

तालुक्यात शनिवारी (१४ मार्च) रात्री सातच्या सुमारास सर्वत्र काळे ढग दाटून आले व आठपासून विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रविवारी (१५ मार्च) पहाटे पाचपर्यंत पडत होता. या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. मळणी, सोंगणीसाठी तयार झालेला गहू, हरभरा, करडई, कांदा बियाणे, मिरची, भाजीपाला, मळणीसाठी गंजीत ठेवलेला मका, रब्बी हंगामातील काढणीला आलेला मका आदी पिकांचे शनिवारच्या पावसात नुकसान झाले आहे. पावसाच्या तडाख्यातून वाचलेले पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

सततच्या पावसामुळे गहू काळा पडला आहे. गव्हाची चकाकी जाऊन दाणे काळे पडले. यावर्षी कांदा बियाणे कमी पावसामुळे जोमदार आले होते. त्यावर शेतकऱ्यांची मदार होती. हे पीक सोंगणी, मळणीच्या टप्प्यात असताना वादळी वाऱ्याने घात केला. कांदा बियाणांची बोंडे तुडून पडली आहेत. बोंडांतील काळे बियाणे शेतात पसरले आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर खर्च करून कमी पावसात हिंमत बांधून शेतकऱ्यांनी शेती केली होती.

शनिवारचा पाऊस

(मंडळनिहाय)

सिल्लोड ६ मिमी

भराडी ६ मिमी

अंभई ३६ मिमी

अजिंठा १६ मिमी

आमठाणा १३ मिमी

गोळेगाव २४ मिमी

निल्लोड ५ मिमी

बोरगावबाजार २५ मिमी

सरासरी १९.५ मिमी

तालुक्यात यावर्षी रब्बी हंगामात २८ हजार हेक्टरवर गहू, हरभरा, उन्हाळी मका, करडई, मिरची, कांदा बियाणे, भाजीपाला आदींची लागवड करण्यात आली आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केले आहे

सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणाने नाला तुंबला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

पोलिस ठाण्याच्या पाठीमागील शहरातील मुख्य नाल्यावर एका व्यापाऱ्याने पक्के बांधकाम करून अतिक्रमण केल्याने नाला पूर्णपणे बंद झाला आहे. नाल्यातील सांडपाणी रस्त्यावर येत असून दुर्गंधीने त्रस्त नागरिकांनी हे अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे.

जिल्हा परिषद कन्या शाळेच्या समोर व पोलिस ठाण्याच्या पाठीमागे शहरातील मुख्य नाला असून या नाल्यातून शहरातील नाथ कॉलनी, पोलिस कॉलनी या भागातील सांडपाणी वाहते. शहरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याने या नाल्यावर पक्के बांधकाम करायला सुरुवात केली होती. नगर पालिकेने सुरुवातीला हे बांधकाम थांबवून बांधकामाचे साहित्य जप्त केले होते. काही महिने बांधकाम बंद ठेवल्यावर, या व्यापाऱ्याने गेल्या महिन्यात पुन्हा नाल्यावरच बांधकाम केले. परिणामी हा नाला पूर्णपणे बंद झाला असून नाल्यातील सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. पाऊस पडल्यास या ठिकाणी तीन ते चार फूट पाणी साचून रहदारीस मोठा अडथळा निर्माण होतो.

दरम्यान, नागरिकांनी हे अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे. पालिककडे यासंदर्भात चौकशी केली असता, सध्या पैठण नगर पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असून येत्या आठवड्यात नाल्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागातील कर्मचारी मुकुंद महाजन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेवारस मोटारसायकलींवर गंज

$
0
0

म.टा. प्रतिनिधी , खुलताबाद

गुन्ह्यातील विविध कारणांमुळे पोलिस ठाण्यांत आणून ठेवलेल्या शेकडो मोटारसायकली वर्षानुवर्षे बेवारस स्थितीत पडून आहेत. मुख्य म्हणजे त्यातील कित्येक मोटासायकलींची संबंधित पोलिस ठाण्यातही नोंद नाही. त्यामुळे चोरीच्या अगर दुसऱ्या गुन्ह्यात हव्या असलेल्या मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात असूनही, दुसऱ्या पोलिस ठाण्यातील पोलिसांना त्याची माहिती नाही.

खुलताबादमधील पोलिस ठाण्यात हेच चित्र आहे. पोलिस ठाण्याच्या आवारात वर्षानुवर्षे अशा शेकडो गाड्या पडून आहेत. काही गाड्या तर १८ ते २० वर्षांपासून कुजत उभ्या आहेत. गुन्ह्यांमधील असलेल्या गाड्यांची विल्हेवाट लावता येत नाही. कित्येक वाहने चोरीच्या गुन्ह्यात वापरण्यात आली आहेत.

ती इतर पोलिस ठाण्यांना हवी आहेत. त्यामुळे गुन्हे तसेच तपासाअभावी रखडले आहेत. पोलिस ठाण्यांच्या आवारात कुजक्या वाहनांची संख्या वाढतच आहे. पोलिसांना बेवारस वाहनांची यादी तयार करण्यास सांगितली होती. ही यादी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत एकत्रित करण्याची तयारीही करण्यात आली. ही यादी त्यानंतर सर्व पोलिस ठाण्यांना उपलब्ध करून देण्यात येणार होती, मात्र तेही अद्याप झालेले नाही.

मोटारसायकल चोरीला गेल्यावर किंवा अपघात झाल्यावर संबंधित मालकाला अनेकदा विम्याची रक्कम मिळते. त्यामुळे तेही पोलिसांकडे आपली मोटारसायकल नेण्यासाठी येत नाहीत, तर अनेकांना आपली मोटारसायकल पोलिसांकडे आहे, हेही अनेकांना माहीत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images